शनिवार, 18 अप्रैल 2020

रोज एक लेख :- पहिला दिवस

लॉकडाऊमुळे मी काय शिकलो ? 
दिनांक 19 एप्रिल 2020 रविवार
रोज एक लेख :- दिवस पहिला

*लॉकडाऊनमुळे मी काय शिकलो*

यात सहभागी लेखक

01) मिलिंद गड्डमवार, चंद्रपूर
02) अरविंद कुलकर्णी, पुणे
03) राजेंद्र शेळके, बुलढाणा
04) सुनीता आवंडकर, नाशिक
05) आरती ठाकूर
06) नासा येवतीकर, धर्माबाद
07) गुणवंत बोईनवाड, नांदेड
08) समाधान बोरुडे
09) गणेश सोळुंखे, जालना
10) सौ. सुवर्णा सोनवणे

पहिल्याच दिवशी 10 साहित्यिक मंडळींनी आजच्या उपक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि पुढील लेखनास शुभेच्छा. 
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*Top 3 लेखकांचा घेऊ या शोध*

प्रस्तुत दहा लेखांमधून आपण Top 3 लेखकांची निवड आपल्या माध्यमातून करणार आहोत. 
त्याची पद्धत अशी आहे. 

सर्व लेख वाचन करून त्यांच्या नावासमोर 5 पैकी किती गुण द्यायचे आहे ते गुणदान करून संयोजकांकडे पोस्ट करावे. 

ही प्रक्रिया उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत चालेल. 

स्वतः लेखक देखील आपला लेख सोडून इतरांना गुणदान करायचे आहे. 

सर्वाकडून आलेले गुण संकलित करून Top 3 चा निकाल उद्या सायंकाळी 06 वाजता जाहीर होणार आहे. 

तेंव्हा सर्वाना विनंती आहे की, आपण वरील सर्व लेख या समुहात वाचावे किंवा blog वर देखील एकत्रित रित्या लेख वाचन करता येईल. 

चला तर खालील लेख वाचन करून Top 3 चा शोध लावू या.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
01)
लाॅकडाऊनमुळे मनाचे दरवाजे उघडले गेले.कविता,लेख,छंद जोपासायला लागलो. सकारात्मक ऊर्जा जागी झाल्याने रेनबसेरातील लोकांना मदत कशी करता येईल याचा विचार करून कामी लागलो.लाॅकडाऊनमुळे पिंज-यातील प्राण्यांची घालमेल समजली.पदोपदी अंतर राखून वागणे किती अवघड असते ते कळले.रिकामे मन सैतानाचे घर कसे असते ते कळले.कुणाचे कुणांवाचून अडत नाही याची जाणीव झाल्याने अहंकार गळून पडला.प्रदुषण विरहीत वातावरण कसे असते ते कळले.मनाची शांतता,मित्र नातेवाईकांचे महत्त्व,आमदानी,संवाद बंदचे महत्व कळले.
- मिलिंद गड्डमवार, चंद्रपूर
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
     02) *लाॅकडाउन मुळे मी काय शिकलो ?*
 
    कधी कल्पना ही केली नव्हती की एका व्हायरस मुळे सर्व जग बंद पडेल . चिन मधे या विषाणूंचा उद्रेक झाला आणि तेथून ही जीवघेणी साथ सर्व जगभर पसरली . नुसती पसरलीच नाही तर अमेरिका , स्पेन , इटली व चिन मधे हजारो लोक मृत्यूमुखी पडले .  काही दिवसातच ही साथ भारतात आणि महाराष्ट्रात आली .
 कोरोना या आजारावर अद्याप लस नाही . व त्यावर विशेष असा उपचार ही नाही .   कोरोना चे विषाणू शिंदे द्वारे किंवा खोकल्या द्वारे निरोगी माणसांच्या शरीरात जातात व त्याला या रोगाची लागणहोते . 
      या रोगा पासून स्वत:ला ,आपल्या कुटुंबाला वाचवायचे असेल तर एकच प्रभावी व विना खर्चाचा उपाय आहे तो म्हणजे , घराच्या बाहेर न पडणे. म्हणूनच देशाच्या पंतप्रधानांनी  "लाॅकडाउन" ची घोषणा केली.  २१ दिवसांचे लाॅकडाउन ! सर्व व्यवहार बंद ! फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठी ठराविक मुदतीत बाहेर पडायचे तेही अत्यावश्यक असेल तरच !  या लाॅकडाउन मुळे मला खूप काही शिकायला मिळाले . 
     गरजा कमी करा , हा उपदेश एखाद्या संजीवनी मंत्रासारखा वाटू लागला .  वीकेंडला बाहेर फिरायची सवय लागलेल्यांना बाहेर ची हाॅटेल्स , माॅल , सिनेमागृह सर्व काही बंद ! ते नाही मग आयुष्य काय थांबले का ? एरव्ही सणावाराला एकत्र येणारे घरातील सर्व कुटूंबातील सदस्य घरातूनच " वर्क फ्राॅम होम" करु लागली . मुलांना , नातवांना शाळेला सुट्टी असल्यामुळे तेही घरातच खेळू बागडू लागली . अवघ्या घराचे गोकूळ होऊन गेले . नौकरी च्या , कामाच्या धबाडग्यात  आपल्या अंगात असलेल्या कला सादर करायला कुणाला वेळच नव्हता . कोणी गाणे गाऊ लागले . कोणी धूळ खात पडलेले हर्मोनियम बाहेर काढले .  कोणी पत्र्याचे डाव टाकू लागले . घरात येवढी पुस्तके पडून राहिली होती , वि . स . खांडेकर , व. पू . काळे . शिवाजी सावंत इत्यादी नामवंत लेखकांची साहित्य संपदा माझ्या आरमारी त होती पण तिकडे कधी लक्षच गेले नव्हते . आता वेळच वेळ होता . आणि मुख्य म्हणजे मी मला कधी वाचलेच नव्हते . मी मला कधी बघीतलेच नव्हते . माझ्या अंतरंगात कधी डोकावलेच नव्हते . मी स्वत:ला कधी वेळच दिला नव्हता . तो या लाॅकडाउन मुळे मिळाला .  
    हे झाले घराच्या आत . बाहेरची परिस्थिती दुरदर्शन मुळे बघायला मिळत होती .  गंगा , यमुना , कृष्णा या नद्या स्वच्छ झाल्या होत्या . त्यांचे नितळ पाणी मनाला सुखवित होते . ओझोन चा पातळ झालेला थर पुन्हा पहिल्या सारखा होत होता .  कारखाने बंद असल्यामुळे व वाहनांची वर्दळ नसल्यामुळे हवा प्रदुषण मुक्त झाली होती . जंगलात राहाणारे प्राणी मुक्त पणे फिरु लागली . सकाळचा उगवतीचा सुर्य पाहिला का कोणी ? नसेल पाहिला तर अवश्य पाहा आणि फरक अनुभवा !
 तो सोनेरी , भगवा रंग अधिक गडद झालेला दिसेल . पक्षांचा चिवचिवाट स्पष्ट ऐकू येईल .
     लवकरच हा कोरोना संपेल , आपण निश्चितच त्याला संपविणार आहोतच 
पण .....,
 मला असे वाटते की हे लाॅकडाउन  प्रत्येक महिन्यातून एक आठवडाभर असायलाच हवे .
     धन्यवाद ! 
                *अरविंद कुलकर्णी पुणे* 

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
03) लॉकडाऊनमुळे कौटुंबिक स्नेह वाढला

पूर्वीच्या काळातील माणुस व त्याचे जीवनमान इतिहास जमा झाले असे वाटु लागले होते.कारण पूर्वीच्या काळातील माणुस अतिशय शांततेचे व आनंदाचे जीवन जगत होता. त्याच्या जगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भय,ताण तणाव,स्पर्धा दिसत नव्हती.तो त्याच्या कुटुंबाला लागणाऱ्या उदरनिर्वाहाच्या गोष्टी पुरताच विचार करत होता.मर्यादित स्वतःच्या गरजा पुरताच काम करत होता.हळूहळू परिस्थिती बदलली.एकविसाव्या शतकाला सुरुवात झाली. या एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता,माणसाचे जीवनमान अतिशय जलद गतीचे व वेळेच्या चौकटीत बांधले गेले आहे.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घड्याळातील काट्याप्रमाणे मनुष्य धावत आहे.या प्रगतीच्या मृगजळामागे धावतांना तो कधी मागे वळुन पाहतच नव्हता.माणूसच माणसाला हरवायला निघाला होता.जगाच्या स्पर्धेत टिकतांना स्वतःचे आयुष्य जगायला तो विसरला.अचानक कोरोना सारख्या विषाणूने या स्पर्धेला ब्रेक लावला.कुठेतरी एकदम सुन्नपणा आला. जगात महासत्ता म्हणून मिरवणारे अनेक देश कोरोनाच्या या संकटात चिंतेत पडले.या चिंतेने मनुष्याच्या जगण्याला बदलवून टाकले.माणूस स्वतःच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळाप्रमाणे जगायला लागला.याचे कारण असे की,कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी एकविस दिवसाचे लाॅकडाऊन जाहीर केले.संपूर्ण भारत वासियांना एकविस दिवस घरातच राहण्याचे आव्हान केले.एकवीस दिवस घरातच बसून दैनंदिन कामे पूर्ण करायचे असे सांगितले.मग ती स्वतःची कामे असतील,अथवा प्रशासनाचे काम असेल घरी बसून पूर्ण करायचे.या एकविस दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये प्रत्येक माणूस सकाळी झोपेतूनच रिलॅक्सपणे उठत आहे.कुठलाही ताण तणाव चेहऱ्यावर नाही.कुठलीही स्पर्धा,घाई,धावपळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्णवेळ स्वतःच्या कुटुंबात तो घालवत आहे.कुटुंबातील लोक एकमेकांच्या जवळ आली.एकमेकांना वेळ देऊ लागली. नाष्टा,चहा,जेवण या गोष्टी एकत्र बसून करून लागली. रोजच्या दैनंदिन कामामुळे मग व्यवसाय असेल किंवा नौकरी या व्यस्ततेमुळे संपूर्ण कुटुंब आपआपल्या वेळेनुसार करणाऱ्या गोष्टी आज आनंदाने एकत्र करत आहे.यामध्ये जेवण करणे,टीव्ही पाहणे,गप्पा,गोष्टी,संवाद,हसी मजाक पुन्हा एकदा कुटुंबात घडत आहे.त्याचबरोबर बालपणीचे आवडते छंद शिक्षण,नोकरी,व्यवसाय यामध्ये कुठेतरी मागे पडले होते.कारण जगाच्या स्पर्धेत आपण मागे पडू नये म्हणून प्रत्येकजण छंद,आवड हे विसरला होता.स्वतःला या स्पर्धेत पुढे रेटून नेत होता.पण या एकविस दिवसाच्या लाॅकडाऊन मध्ये पुन्हा एकदा बालपणीचे छंद आठवले. यामध्ये चित्र काढणे असेल,गाणी म्हणणे,गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे,कविता,कथा,कादंबरीचे वाचण,इत्यादी. याबरोबरच चार भिंतीच्या आतील खेळ कॅरम,बुद्धिबळ, चंफुल,सोळाखडी हे खेळ नविन पिढीसोबत खेळता येत आहे.अशा गोष्टी नकळत घडत आहे.व यातून प्रत्येकाला आनंद मिळत आहे.अगदी बालपणात गेल्यासारखा अनुभव प्रत्येकाला येत आहे.आई,वडील,पत्नी,मुले यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारत मारत हळूच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू निश्चितच पैसा,संपत्ती, प्रगती यापेक्षा ते मोठे आहे.या लाॅकडाऊन च्या काळात निश्चितच प्रत्येक जण आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या अगदी जवळ आला आहे. मन,भावना,विचार या गोष्टी फक्त बोलून चालत नाही.तर त्या अनुभवाव्या लागतात.यासाठीच माणूस समूहाने राहत आलेला आहे.समूहातून निश्चितच प्रेम,आनंद,स्नेहभाव एकमेकांना मिळतो.व यातून माणूस वैचारिक व सुसंस्कारित बनत असतो.अशा माणसाच्या हातूनच उत्तम कार्य घडत असते.एकविस दिवसाच्या लाॅकडाऊनने निश्चितच प्रत्येकाला बालपण व तरुणपणाची आठवण करून दिली.या आठवणींनी प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात मागे वळून पाहता आले.कधी कधी नकळत चांगल्या गोष्टी घडतात.कोरोनाने प्रत्येकाला घरात बसायला लावले.पण या मोबदल्यात कौटुंबिक स्नेह वाढला हे तेवढेच खरे आहे.

राजेंद्र प्रल्हाद शेळके
शिक्षक
मु.पो.किनगाव राजा
ता. सिंदखेड राजा
जि.बुलडाणा
9823425852
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
04) लॉकडाऊन मुळे मी काय शिकले

 लहानपणापासून महत्वाकांक्षी असलेली मी आणि अतिशय खडतर परिस्थितीमध्ये मिळालेले शिक्षण या गोष्टींमुळे 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही '
अशी माझी दृढ धारणा झाली आणि लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवले अर्थातच प्राध्यापिका झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अध्ययनाथी झाले .त्यामुळे रोजचा ठराविक दिनक्रम ,नातेवाईकांशी बोलायलाही वेळ नाही असे माझे बिझी शेड्युल होते.
 पण भरधाव वेगाने रस्त्यावर धावणाऱ्या गाडी समोर अचानक स्पीड ब्रेकर यावा आणि आपोआप ब्रेक लागावेत अशीच काहीशी स्थिती माझी झाली. माझ्या जीवनातला किंबहुना सर्वांच्याच जीवनातला ब्रेक काही आनंदाने आलेला नाही .जिवंत राहायचे असेल आणि इतरांनाही जिवंत बघायचे असेल तर ही सक्ती ची सुट्टी आणि हा ब्रेक .
संस्काराने आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद दिलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करण्यातून नवीन ऊर्जा आपल्याला मिळत असते .ह्या लॉक डाऊन  मध्ये माझ्या नवीन घराचा कोपरा न् कोपरा कुटुंबातील सदस्यांनी उपयोगात आणला .घरातील प्रत्येक जागेचे महत्त्व मला याकाळात कळले .मग तो प्रत्येक खोलीचा वरंडा असेल गच्ची असेल छोटी बाग असेल पार्किंगची जागा असेल .कदाचित माझ्या घरालाही खूप आनंद झाला झाला असावा यामुळे कारण सतत माणसांचा वावर माझ्या घराने बघीतलेलाच नाही .
निर्जीव वस्तूंशी माझे भावबंध जुळले ते या लॉक डाऊन मधे. कॉलेजच्या वर्क फ्रॉम होम व्यतिरिक्त मी माझा छंद, आवड जोपासू शकली मी माझ्या मुलांसाठी मराठी पुस्तकांचे वाचन करून ग्रामीण भागातील जीवन समजावून सांगू शकले. सध्या वाचन सुरू असलेले राजेश पाटील यांचे 'ताई मी कलेक्टर व्हयनू '
त्यामुळे माझ्या घरातील सर्व सदस्यांमध्ये सुसंवाद वाढला प्रत्येकाचा अहंकार निघून गेला प्रत्येकामध्ये आणि माझ्या मध्येही समायोजना चे कौशल्य वाढले .
मला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचे महत्त्व कळले .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'आरोग्यं धनसंपदा' चा अर्थ कळला . व्यायामाचा कंटाळा करणारी मी आरोग्यासाठी न चुकता व्यायाम करायला शिकले या काळातच . माझ्या मनातील विचार ,भावना हे मी लिहून ठेवायला शिकले ते याच काळात .
अशा प्रकारे मला आत्तापर्यंत साधता न आलेल्या गोष्टी साध्य करून दिल्या या  लॉक डाऊन ने 

प्रा. सुनिता आवंडकर -बारी नाशिक
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
05) लॉकडाऊन आणि .....
लॉकडाऊन चे सुरुवातीचे दिवस फारच नैराश्याचे होते . घरातील रोजची कामं बाई नसल्याने वाढली होती . सवय नसल्याने अंगवळणी पडायला त्रास होत होता . सतत मनावर कोरोनाच्या संकटाचा आघात होत होता . मुलं pubg खेळाच्या विश्वात होती . नवरा सतत tv  वर नाहीतरी work from home च्या पडद्याआड होता . सासू सतत तब्येतीची तक्रार करत होती . आई बाबा जवळच राहत असले तरी त्यांची काळजी घेणारे कोणी नाही ही जाण सतत सलत होती .
सकारात्मक असे काहीच जाणवत नव्हते.
एक दिवस आनंद नाडकर्णी यांना ऐकलं . 
'धोखा की मौका ' हे शब्द डोक्यात कोरून घेतले . 
मुलांशी संवाद साधला .
आपण फक्त घरातच राहून अजून काय -काय करू शकतो ? भरपूर गोष्टी पुढे आल्या . मोठ्या मुलाने cooking मधे intrest दाखवला . आता पीठ मळणे हे त्याचं रोजचं task आहे . रोज संध्याकाळी कापूर आणि तूप घालून नारळाच्या करवंटीपासून मच्छर पळवण्यासाठी धूर ही करतो .
छोट्याला रोज गॅझेट्स sanitize कसे करायचे शिकवले . झाडांना ओंजारून गोंजारून पाणी घालणे ही नियमित करू लागला .
आता आई ( सासू ) ला विश्वासात घेतले . आम्ही दोघी मिळून एकत्र व्यायाम करू लागलो. तक्रारींची जागा संभाषणाने घेतली. नवरा ही सामील झाला .
मुलांनी हळूहळू पुढच्या शैक्षणिक  वर्षाची तयारी सुरु केली . आता अवसाद गळू लागला होता आणि उत्साह चढू लागला होता
मी गेली दीड वर्ष शैक्षणिक विडिओ तयार करत होते . बरेच काम बाजूला  पडले होते . एवढा वेळ मला कधी  मिळेल ही कल्पना पण केली नव्हती .
मग काय ! आता रोज एक विडिओ upload  करते आहे . त्या प्रक्रियेत रोज  काहीतरी नवीन शिकते आहे . Online test तयार करणे ही  शिकले . संवाद साधून महत्वाचे .पण  सर्वात महत्वाचा भाग -
'धोखा या मौका '

आरती ठाकूर
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
06) *लॉकडाऊनमुळे मी काय शिकलो ?*

लॉकडाऊन म्हणजे काय असते ? याची साधी कल्पना देखील यापूर्वी नव्हती. पण या कोरोना विषाणूमुळे आज अनेक बाबी नव्याने कळाले आणि जीवन जगायला देखील कळाले. ज्यावेळी चीनमध्ये हा विषाणू हाहाकार माजवत होता, त्यावेळी अनेक प्रकारचे विनोदी किस्से करून यावर हसणारे मंडळी आज आपल्याच घरात बंद आहेत. मी आणि माझा कुटुंब एवढं मर्यादित विचाराचा पर्याय आपल्यासमोर निर्माण झाले आहे. आपल्या जीवसाठी आजपर्यंत सीमेवरचा सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूशी दोन हात करतो एवढंच माहीत होतं. पण आज कोरोना विषाणूचा समूह संसर्ग होऊ नये म्हणून आपल्यासाठी कित्येक जण लढा देत आहेत. सर्वात पहिल्यांदा ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जावे ते म्हणजे आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी. या विषाणूने बाधित असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी या विभागातील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आणि आशा वर्कर यांच्यावर येऊन पडली. तेंव्हा त्यांनी दिवसरात्र एक करत काम केले आहे. ज्यांना आपण पूर्वी अनेक प्रकारचे दूषण लावत होतो तेच आरोग्य कर्मचारी आज आपल्या सर्वांसाठी देवदूत बनून समोर आले आहेत. खरं तर सर्वात जास्त धोका या विभागात काम करतांना दिसून येतो. आपली माणुसकी सांगते की, यांना पाठबळ द्यावं पण काही ठिकाणी डॉक्टर आणि इतर कर्मचारी सोबत गैरवर्तन झालेल्या बातम्या वाचण्यात आणि पाहण्यात आल्या. त्यावेळी खरंच खूप वाईट वाटले. दवाखान्यात काम करतात म्हणून एका ठिकाणी परिचारिकेला खोली खाली करण्यास भाग पडल्याची बातमी वाचून मन खिन्न झाले. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या कार्याचा विचार केल्यास ते देवापेक्षा ही श्रेष्ठ आहेत. आजच्या काळातच नाही तर केंव्हाही ते श्रेष्ठ आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी टाळ्या किंवा थाली वाजविण्याचे आवाहन केले होते. त्याचा देखील आपण विपर्यास केलोय. तेंव्हा विचार येतो की, आपण संकट काळात काय शिकलो. असे म्हटले जाते की मनुष्य अडचण आणि संकटसमयी भरपूर शिकत असतो. यानंतर दुसरे एक व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्यासाठी खुप मेहनत घेत आहेत. ते म्हणजे पोलीस. खरं तर पोलिसांची ड्युटी म्हणजे अवघडच आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भारतात संचारबंदी लागू करून लॉकडाऊन करण्यात आले. आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावे, बाहेर पडतांना तोंडावर मास्क बांधावे. एवढे साधे नियम आपण पाळलो नाही आणि पोलिसांच्या कामावर ताण निर्माण करण्याचे काम आपण केलोय. समुहात जगायचे असेल तर नियमाचे पालन करणे आवश्यक आहे, याची ओळख यानिमित्ताने आपणांस झाली. तसे तर देशाच्या कायद्यात अनेक नियम सांगितले आहेत. पण आपण कोणतेच नियम मनावर न घेता सर्व नियमांची पायमल्ली करत असतो. कायदे किती कडक असतात आणि शासनाने त्याची अंमलबाजवणी करण्यास सुरुवात केल्यावर नियम तोडणाऱ्या आपल्या सर्वांना खूपच कठीण बनून जाते. जेंव्हा डॉक्टर, पोलीस, परिचारिका आपल्या ड्युटीसाठी घराबाहेर पडतात तेंव्हा त्यांच्या घरातील सदस्यांचे काय हाल होत असतील ? याची साधी कल्पना देखील करवत नाही. संवेदनशीलता हे जे मूल्य आहे त्याची ओळख यानिमित्ताने आपणाला झाली आहे. विदेशातील मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या आणि त्यांची अवस्था बघून मन बेचैन होऊन जात होते. तशी अवस्था आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर येऊ नये अशी प्रार्थना आपण सर्वचजण करत होतो. नुसती प्रार्थना करून काही फायदा नाही तर शासनाने सांगितलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले तरच आपले काही तरी खरं आहे, याची जाणीव देखील झाली. आपण आपल्या वैयक्तिक स्वछतेसोबत सर्वांच्या स्वच्छतेची काळजी घेणे किती आवश्यक आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आपले वाडवडील मंडळी पूर्वी जे काही सांगायचे किंवा आपणांस करायला लावायचे त्याचे महत्व आज पटले. जीवनात पैसा, धन, संपत्ती, मालमत्ता ह्या सर्वांपेक्षा आपले जीवन खूप अनमोल आहे हे सत्य कळाले. कोरोना विषाणू लवकरात लवकर नष्ट व्हावे, लॉकडाऊनचा काळ लवकर संपावे आणि सर्वांचे जीवन पूर्ववत सुरळीत व्हावे ही एकच प्रार्थना त्या निर्मात्याकडे करावेसे वाटते. 

- नासा येवतीकर, 9423625769
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
07) लाॅकडाऊनमुळे मी काय शिकलो? 
     एका करोना व्हायरस मुळे सर्व जग लाॅकडाऊन मध्ये अडकून पडले. जगातील सर्व देश प्रगती ची स्पर्धा करायचे पण एका विषाणू मुळे घरात घाबरून  अडकून बसावे लागत आहे. यामुळे आपणास हे शिकायला मिळाले की, निसर्गापुठे काही करू शकत नाही..
      या लाॅकडाऊनमुळे नाती यांचे महत्त्व समजले.पैसा हा सर्वस्वी नाही. लोक फॅशन च्या,लाईफ स्टाईल च्या नावाने खेडी गावे सोडून शहरात जावून राहत होती. आता आपणास म.गांधी यांचा संदेश आठवतो *खेड्या कडे चला* .आपल्या गरजा ह्या मर्यादीत आहेत याची जाणीव झाली...विनाकारण प्रगती च्या नावा खाली व वेळ नाही म्हणून धावपळ करत होतो. *गरजा कमी केले की धावपळ कमी करता येते * 
 या लाॅकडाऊनमुळे आपणास काय लागत आहे..काही जीवनावश्यक वस्तू भेटले तरी समाधान आहोत. नवीन कपडे न  अडल नाही.पण माझ्या शेतकरी बंधु नेच हे जग जगवत आहे.  
   लाॅकडाऊनमुळे आपणास बरेच गोष्टी शिकायास व अनुभव घेण्यासाठी भेटते.
   बोईनवाड गुणवंत किशनराव ..नांदेड

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
08) लॉकडाऊनमुळे मी काय शिकलो

  खरं पाहिलं तर मनुष्य प्राणी हा आजन्म विद्यार्थी दशेतच राहतो..तो प्रत्येक वेळेस या निसर्गाच्या सानिध्यात काहीतरी नवंनवीन शिकतच असतो.... मात्र गेली काही दिवस मला वेगळीच प्रचिती येत आहे...हल्ली अख्खं आयुष्य ज्याने नुसते कमाईच्या मागे घातले.भरपूर पैसा कमावला नोकर चाकर घरी ठेवलेत,मोठमोठाले बंगले बांधले,दरात भल्या मोठ्या गाड्या लावल्या.ते आज एका विषाणूने किंमत हिन करून टाकल्या..तुम्ही कितीही मोठे झालात, भली मोठी संपत्ती जमा करून ठेवली तरी सुद्धा तुम्ही निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही...या मानव जाती मध्ये अनेक प्रकारच्या प्रवृत्ती जन्माला आलेल्या आहेत..कुणी गुंडगिरी करून,कुणी शावकारी करून तर कुणी मारामारी करून लोकांना भीती दाखवत असतात...पण आपले जीवन हे नश्वर आहे ..हे मात्र आता सर्वांनाच कळलेले आहे...एक सूक्ष्मजीव किती भयानक असतो..याची प्रचिती सर्वांना आता आलेली आहे...गेली एक महिना आपण सर्वजण घरातच आहोत..त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपण पूर्णपणे वेळ देत आहोत...हल्ली मोठमोठ्या शहरात राहणारे आज आपल्या मुळगावी कधींनव्हे आपल्या आई वडिलांसोबत राहत आहे...शेवटी आईवडिलांच्या कष्टाची व गावातील घराची किंमत सर्वांना कळाली आहे...
विभक्त कुटुंब पद्धतीपेक्षा एकत्रित कुटुंब पद्धत कधीही चांगलीच हा फरक लॉकडाऊन मुळे आमलात आला आहे..
जीवन हे अमूल्य आहे..त्याची काळजी कशी घ्यावी..त्याची काळजी घेण्यासाठी आज धडपड करताना सर्वजण दिसत आहे....

शेवटी...

       थांबले आहे जग सारे
      आपण सुद्धा थांबुया
           बसुन सारे घरातच
    कोरोना हद्दपार करूया...

.     जीवन अमुल्य आहे
      याची जाण राहुद्या
  लॉक डाऊन क्षणभंगुर आहे
घरातच जगण्याचा मार्ग शोधुया..
  
 श्री समाधान बोरुडे ९२७००१८३५३
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
09) लॉक डाऊन मुळे मी काय शिकलो ?

*"कोरोना"* चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने *लॉक डाऊन* जाहीर केले. मुळात लॉक डाऊन असं काही असतं हे मला तरी पहिल्यांदाच समजलं. दंगल सदृश्य परिस्थितीमध्ये कर्फ्यु लागणे, जमावबंदी हे माहिती होतं. पण ही परिस्थिती पहिल्यांदाच अनुभवत होतो.
कोरोना हे एकप्रकारचे संकट असले तरी या संकटामुळे नव-नवीन पर्याय सुद्धा आपल्यासमोर खुले झाले आहेत. 
या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्याच माणसांना वेळ देत नव्हतो तो वेळ देणे लॉक डाऊन ने शिकविले.
माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी काय महत्वाचे आहे हे या लॉक डाऊन मुळे समजले.
लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांचे महत्व समजले.
कधी कुणाला कामाव्यतिरिक्त फोन करणे होत नव्हते पण आता वेळ जातच नाही म्हटल्यावर किमबी 4-5 पाहुण्यांना तरी फोन लावणे व्हायला लागले आहे.
थोडक्यात माणसाला माणुसकी समजली.
कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झालाय. तसाच तो शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा झालेला आहेच. मी एक शिक्षक असल्यामुळे मी माझा अनुभव येथे कथन करण्याचा प्रयत्न करतोय.
कोरोनामुळे खबरदारीचे पाऊल म्हणून शाळांना लवकर सुट्टया द्याव्या लागल्या. आमच्या शाळेसहित परिसरातील सर्वच शाळांनी सुट्टया जाहीर केल्या. नियोजीत वेळेपेक्षा लवकरच सुट्टया दिल्यामुळे थोडाफार अभ्यासक्रम बाकीच होता. 
शासनाने परीक्षा रद्द करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. असे असले तरी आमची शाळा हि खाजगी, इंग्रजी माध्यमाची, त्यातल्यात्यात स्वयंअर्थ. इंग्रजी शाळांमध्ये सध्या जी स्पर्धा चालू आहे ती पाहता या संकटाच्या प्रसंगी आपण काय नवीन देऊ शकतो ? ज्यामुळे आपला स्वार्थ हि साधला जाईल आणि परमार्थ सुद्धा. मग बऱ्याच सकारात्मक गोष्टी यातून करता आल्या. 
शाळेचा व्हाट्सअप ग्रुप आधीपासूनच होता. त्याचा वापर फक्त पालकांना सूचना देण्यापूरताच मर्यादित होता. पण लॉक डाऊन नंतर मी त्यावर ऑनलाईन व ऑफलाईन प्रश्नपत्रिका, नोट्स अशी विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी माहिती टाकण्यास सुरुवात केली. तर अभ्यासाबरोबरच घरात बसल्या-बसल्या कोणते उपक्रम करता येतील किंवा कोणते खेळ खेळता येतील याचा विचार करून दररोज एका उपक्रमाची माहिती ग्रुप वर देण्यास सुरुवात केली व त्यानुसार पालक सुद्धा आपल्या मुलांकडून ती कृती अगदी आनंदाने करून घ्यायला लागले. 
हे उपक्रम राबवितांना पालकांना सुद्धा आपल्या बालपणीचे दिवस आठवत आल्याच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. कारण यामध्ये आम्ही पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, कागदांपासून जमेल त्या वस्तू बनविणे, चित्र काढणे, चित्र रंगविणे, चंफुल खेळणे, शब्दकोडे सोडविणे इ. उपक्रम अतिशय मजेशिररित्या मुलं पूर्ण करत आहेत.
अशा उपक्रमामुळे पालकांसोबतचे संबंध अधिकच घनिष्ठ झाले आहेत. हा एक वेगळाच बदल मला जाणवत आहे.

गणेश एन.सोळुंके (जालना)
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
10) लॉकडाऊन नी फिरविली जादूची कांडी 
➖➖➖➖➖➖➖
आपण सर्वचजण २१व्या शतकातील सुशिक्षित आणि सुजाण पिढीचा एक भाग आहोत. घड्याळाच्या काट्यावर आपले सर्वांचे जीवन धावत आहे . सर्वांजवळ ज्ञान आहे साधन संपत्ती आहे .पण वेळ मात्र कोणाच जवळ नाही . पैसा कमववण्याच्या नादात घरपरीवार सर्वांपासून मनाने दूर जातोय हे कोणाला समजत नाही आहे . 
प्रत्येकाला वाटते आपण पैसा तर आपल्या परिवारासाठी च कमवितो आहे. पण आपण हे विसरलो परिवाराला तुमच्या  पैशा पण अधिक महत्त्वाचा तुमचा सहवास आहे . 
घरासाठी पैसा कमवायचा म्हणून दोघांना घराबाहेर पडावे लागते घरातील वडीलधारी मंडळींना वेळ देता येत नाही म्हणून त्यांना वृध्दाश्रमात ठेवले जाते किंवा त्यांना गावीच ठेवले जाते .लहान मूलांना पाळणा घरात ठेवले जाते . 
फक्त पैसा कमविणे हेच आयुष्याचे ध्येय बनलेले आहे. 
नाती कमविणे हेच खरे माणसाचे धेय्य हे आजचा सुजाण माणूस विसरला आहे. एका विषाणू ने दाखवून दिले आज तुमचा पैसा धन संपत्ती कवडीमोल आहे . एक अदृश्य जिवघेणा विषाणू जेव्हा शरीरावर वार करतो तेव्हा ही धनसंपत्ती काही कामात येत नाही .
आज सर्व जगाला लॉकडाऊन करायला भाग पाडले एका विषाणू ने . 
आज माणसाला त्याची खरी गरज पैसा नाही तर आपल्या थोरामोठ्यांचे आशिर्वाद आपल्याला गरजेचे आहेत .
घड्याळाच्या काट्यावर धावणार्या माणसाला त्याने ही लॉकडाऊन ची सुवर्ण संधी दिलीय हरवलेले नाते पुन्हा कमवण्याची . 
वडीलधारी मंडळी आणि लहान मुलांना तुमचा पैसा नकोय त्यांना तुमचा सहवास हवा आहे.  लॉकडाऊन च्या पंचवीस दिवसात एखादी जादूची कांडी फिरवावी तशी 
पंचवीस वर्षांचा काळ पुन्हा आल्याचे भासू लागले आहे . पंचवीस वर्षांपूर्वी मोबाईल इंटरनेट चे एवढे वेड नव्हते त्या काळात सर्वजण घरात एकत्र बसून गप्पा मारायचे .एकत्र सफाई करायचे . एकत्र बैठकीतले खेळ खेळायचे .
लहान मोठे सर्वच खेळात रमायचे .
त्या काळात मोबाईल चा विरंगुळा नव्हता म्हणून माणूस मनाने जोडलेला होता . आता मोबाईल विरंगुळ्याचे साधन बनले आणि नाती दुरावत चालली .पण लॉकडाऊन नी तीच नाती पुन्हा जोडण्यास मदत केली .
हॉटेलमधले  जेवण बंद म्हणजे पिझ्झा ,बर्गर  , चायनीज फूड सर्वच बंद झाले . आई जीवतोडुन जेवण बनवत असे पण तिच्या जेवणाला नाव ठेवणारे आता घरचे जेवण आवडून खायला लागले .
रिकाम्या घराचे गोकुळ झाले . 
लॉकडाऊन मुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाली .कंपन्या बंद त्यामुळे हवेचे प्रदुषण कमी झाले . आता सर्वांना शुध्द हवेत श्र्वास घेता येऊ लागले .
त्यामुळे दमा ,हार्ट च्या समस्या देखील काही प्रमाणात कमी झाल्या.
एक विषाणू जगणे शिकवून गेला
🖋 सौ सुवर्णा सोनावणे .
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- दुसरा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 20 एप्रिल 2020

वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5

*विषय :- माणसात दिसला देव*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~

या समुहात join होण्यासाठी खालील क्रमांकावर request पाठवावे. 
~~~~~~~~~~~~~

संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



1 टिप्पणी:

  1. सकाळी उठायचे पटकन घरचे कामे करायची 9वाजता शाळेला निघायचे दिवसभर लहान लहान विद्यार्थ्यांसोबत वेळ कसा जायचा कळायच नाही हेचं माझं दैनंदिन...सगळे पाहुणे नातेवाईक नाराज कुणाला ही वेळ देणं मुश्किल...पण या अदृश्य व्हायरस ने अचानक गाडी ला ब्रेक लावल्यासारखा आपलं आयुष्य थांबले...कधीही विचार केला नव्हता असेही दिवस येतील....पण याचाही फायदा करून घ्यायचं ठरवलं अनेक पुस्तकं वाचायची राहीली होती त्याची सुरूवात केली...लेकरांच्या मनाप्रमाने त्यांच्या सोबत वेळ घालवत आहे...या लाॅकडाऊन मुळे माझं कुटुंब खुप जवळ आलं एकत्र येऊन कामाची विभागणी झाली घरात असेल त्या च्या त वेगवेगळे पदार्थ लेकरांकडून बनले जाऊ लागले.....आपन सगळे मिळून या व्हाईरस ला हरवू आणि परत एकदा आपल्या नियमित कायॆला लागू ......जय हिंद

    जवाब देंहटाएं

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...