सोमवार, 20 अप्रैल 2020

रोज एक लेख :- तिसरा दिवस व्यसन

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- तिसरा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 21 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5

*विषय :- व्यसन*

लेखास चांगले शीर्षक देऊन लेख लिहावं. 

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769


01) चुक आहे तरी कोणाची ?

     आज जर विचार करायचा झाला तर आपल्या देशाला लागलेली कीड जर कोणती असेल तर ती व्यसन आहे.  आणि हे जास्त तर तरूणांमधेच आढळून येत आहे. पण सध्याच्या काळात व्यसन जडण्याला कोण कारणीभूत आहे ? हा प्रश्न मनात कूठेतरी सलतोय ना...
               आताच्या काळात मुलांचे पालक केवळ पैशाच्या मागे धावत आहेत यामधे ते विसरून जात आहेत की पैसाच सर्व काही नसतो. खुप अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.  माझ्या मते जर पालकांनी मुलांना वेळ दिला तर कदाचित मुलं भरकटायची नाहीत. ते अस की , आताचे पालक काय करत आहेत ? सकाळी ऑफिसला जायच, रात्री दमुन यायचं आणि झोपुन जायचं.  मग मुलांना फक्त रविवार दिला जातो.  तुम्हीच सांगा मित्रहो आपल्या आई बापावर आपला खुप हक्क आहे आणि तेच आई बाप आपल्याला फक्त रविवारी काही वेळ देतात हे योग्य आहे का ? मग भलेही तुम्ही त्यांना सांभाळायला बाई ठेवली तरी ती त्या मुलावर आपल्या माता पित्या सारखी प्रेम करणार आहे का ? आई बापासारखे संस्कार करू शकणार आहे का ? नाही ना...मग हे काय इथंच चुकतोय आपण ... मी म्हणत नाही पैसा कमावणे सोडुन मुलांजवळ बघा. पैसा कमवा पण मर्यादीत कारण जर अति असेल तर पैशाच्या बळावर कोणतेही पाऊल उचलु शकतात मग हे व्यसन काय चिज आहे बरं....
        आज काय होतंय माहितीय का ? मुलांना लहानपणी काही प्रश्न पडतात, काही गैरसमज असतात ते दुर करण्यासाठी आपल माणुस पाहीजे असतं. मग मुलांना लहानपणी ज्या गोष्टीच्या उणिवा आहेत , काही गैरसमज आहेत त्याची उत्तरे ती मोठे होत गेल्यावर या बाहेरील जगात ते प्रश्नांची उत्तरे शोधु पाहतात आणि एकटेपणाला कशात तरी झोकून देतात तेच हे व्यसन..... मला सांगा चांगल्या घरंदाज घरातील मुलं का भरकटत नाहीत ? अरे तिथे त्यांच्या मुलांना वेळोवेळी चांगल्या वाईटाची जाणिव करुन देणारे कोणीतरी तटस्थ उभा असतो.. मी म्हणत नाही काम सोडुन मुलांजवळ बसा पण कमीत कमी रात्री कामावरून आल्या वर त्यांच्या जवळ 15 -20  मिनिटे तरी जावा. त्यांना आपल्या अडचणी, जबाबदारी समजवायचा प्रयत्न करा. प्रेमाने समजवले की कोणीही समजते. आपल्या धावपळीत त्यांच्यावर प्रेम करायचं राहुन जातय हे विसरू नका. मुलं एकटी पडली की इतर गोष्टीत आनंद शोधत राहतात. अर्थातच व्यसनात सुद्धा... मुलांना बिघडवायला आपण कारणीभूत ठरू नका...
मग आता तुम्हीच सांगा मुलांना व्यसनात अडकवण्याला कोण कारणीभूत आहे पालक की स्वतः मुलं ...? ? 

कु. दिपाली शिवाजी राऊत, उस्मानाबाद 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02) *व्यसन सामाजिक स्वास्थ बिघडवते*

रविवारचा दिवस होता. रेडिओवर गाण्यांची फर्माइश
चालू होती, ' मुझे पिने का शौक नही, पिता हॅू गम भूलाने को.. I ' थोडयाच वेळात दुसरं एक गाणं ऐकायला मिळाले,' थोडीसी जो पी है, कोई चोरी तो नही की... I ' अशी एकापाठोपाठ एक वेगवेगळी पण नशा आणि दारुशी संबंधीत गाणी ऐकयला मिळाली. मी फक्त मनोरंजन म्हणून गाणी ऐकत नव्हतो. त्या गाण्यांचा अर्थ आणि एकंदर प्रवृती शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो. तेव्हाच मला एक एक दारू संबंधी गाणी आठवत गेली. त्यातच 'शराबी' चित्रपटातील अमिताभ बच्चनचे गाणे आठवले, "नशा शराब मे होता, तो नाचती बोटल... I नशेमे कौन नही है, मुझे बताओ जरा... I " खरंच आज कोण नशेत नाही....? कोणाला मोठेपणाचा नशा, कोणाला श्रीमंतीचा नशा, कोणाला सत्तेचा नशा तर कोणाला बुद्धी आणि हुशारीचा नशा. तर कोणाला मादकतेचा नशा. कोनतेही नशीले जीवन चांगले नक्कीच नाही. पण ज्यांच्या दिवसाची सुरुवात दारूने होते त्यांच्या आयुष्याची, त्यांच्या कुटुंबाची ते राहात असणाऱ्या समाजाची पर्यायाने देशाची मानहानी तर होतेच होते पण प्रगतीत अडसर बणनारी ही प्रवृती घातक होवून बसतेय. पण ही प्रवृत्ती काल होती, आज आहे आणि उदयाही राहणार आहे. पण स्वतःचे कुटुंबाचे आणि समाजाचे स्वास्थ बिघडविणारे अनेक महाभाग दारूच्या आहारी जावून सर्वांनाच वेटीस धरताना दिसतात. पिढयानं पिढया दारिद्रयांशी लढणाऱ्या घरात दारूमुळे सत्यानाश होतो आहे हे आजूबाजूच्यांना कळत असते पण त्याच घरातील त्या वेसनी प्राण्यांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही. दारूच्या वेसनात डुबून गेलेले कर्जाचा डोंगर उभारून बायका मुलांना वाऱ्यावर सोडून रोज नित्यनियमाने गुत्त्यावर हाजर असतात. दारुच्या आहारी गेलेल्याची कथा आणि व्याकूळता आजच्या सारखी पुर्वीपण होतीच. म्हणून तर लेखक प्रेमचंद यांचे "कफन" आणि गडकरीचां "एकच प्याला" आजही लोक लक्षात ठेऊन आहेत. दारूसाठी वाट्टेल ते करणारे कोणात्याही थराला जाऊ शकतात. अशी माणसे दुसऱ्यांसाठी जशी घातकी असतात तशी स्वतःसाठी आत्मघातकी होऊ शकतात.वस्तुस्थिती पाहणं आणि तिच्यावर व्यक्त होणं थोडं कठीण आहे. कारण शेतकरी हा घटक सर्वांच्याच आत्मसन्मानाचा आहे. पण आज होत असलेल्या आत्महत्या या केवळ कर्ज आणि नापीकी यामुळेच आहेत की नशा अर्थात दारूचे व्यसन हेही कारण आहे. याचा सरकारी अहवालानुसार शोध घेणे गरजेचे आहे.किड्या मुंग्यासारखी स्वतःहोवून माणसं का जीव देतात, का त्यांनी जीव दयावा आणि ती जीव देणारी शेतकरीच का आहेत. त्यांच्या जीव देण्याने कोणत्या समस्या सुटतात. समाज, सरकार, देश कोणती प्रगती साधतोय. सरकारी मदत मिळून कुटूंब सावरेलही पण आपल्या जीवाची सरकारी मदत येवढीच किमंत आहे का.?या ही पुढे जाऊन आपण  व्यसनांध लोकांच्या तऱ्हेचे निरिक्षण केले तर आनेक रहस्यमय कथा समोर येतील. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या कडेला असणारे ढाबे आणि बार हे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मौजेची ठिकाणे तर त्यांच्या कुटूंबासाठी धोक्याची ठिकाणी आहेत. ज्यांच्या गाडीच्या पाठीमागे सुंदर विचार आणि नक्कीच कांही घेण्यासारखे लिहलेले असते. ' घर कब आयोगे ' असं लिहलेले अनेक गाड्यांच्या मागे दिसते आणि ते वास्तवही आहे. त्यांचं कोणीतरी घरी वाट पाहत असतं पण नशा, दारू त्यांना घरापर्यंत पोहचू देत नाही. सुसाट बेभान आणि सैराट झालेली तरुणाई आणि ओठावर कोवळ्या मिसरुटाची पोरं एंजॉय म्हणून बीअरची सुरुवात करुन दारुच्या बाटलीत केव्हा डुबून जातात हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. ज्यांच्या खांद्यावर देशाचं स्वप्न आधारल्यालं आहे त्यांच्या छातीच्या फासळ्या उघडया पडून खांदे लिचपीचे झालेले दिसतात.. मग काय साधणार आमचा तरुणभारत प्रगती..?अशात लग्न होवून कुटुंबाची जबाबदारी येवून पडते, वर्षात दोनाचे चार आणि त्यात भर पडते. पण याची नशाची आणि दारुची तलफ कांही कमी होत नाही. आणि मग कलह जे आधीच चालू होते ते आणखी वेगळे रंग घेतात. आणि घरात अशांतता आणि बायको दोघीही नांदत असतात सवती बनून ऐकमेकीच्या. त्याचा या नशेखोरावर कांहीच परिणाम होत नाही. नित्यनियमाने मारझोड करून मधुशालेत हजेरी लावणारा हा महाभाग स्वतःची  जबाबदारी विसरून अडसर बनून राहतो सर्वासाठीच. घरातील भांडणाचा परिणाम नुकत्याच शाळेत चाललेल्या चिमुरडयावर होत असतो. त्याच्या या वागण्याला घरातील व नात्यातील लोकांचा विरोध होऊ लागला तर मग अनेक क्लृप्त्या या नशेबाजाकडे उपलब्ध असतात, मित्रांचा आग्रह, नको त्याची पार्टी, अनेक बहाणे आणि गऱ्हाने यातही कांही अडथळे आलेच तर चोरून दारु पिणे, हा उद्योग सर्रास चालू असतो. अर्थीक दुर्बलता येत जाते आणि मग जीवन लाचार बनते. मिळेल त्याच्या कडून आणि मिळेल तसली ढोसायला मिळाली की बस्स हा विचार घर करतो आणि हाडाची काडं होईपर्यंत शरीरात अल्कोहल घेतलं जातं. आणि मग बातमी वाचायला मिळते की आमुक ठिकाणी विषारी दारूचे शेकडयावर बळी. त्यात याचाही नंबर असतोच. मग संपून जातं आयुष्य आणि कोणाच्या तरी आयुष्यातील , कोणत्यातरी समाजाच्या, कोणत्या तरी घटकाचा प्रगतीचा अडसर. पण एक अडसर संपला तरी दिवसागणिक असे अनेक अडसर नव्याने निर्माण होत असतात.

              *हणमंत पडवळ*.
              *उस्मानाबाद*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
03) व्यसन म्हणजे आरोग्याचे शोषण

व्यसन म्हटले की आपल्या नजरेसमोर दारु, तंबाखु, गुटखा, सिगारेट, ड्रग्स, गांजा यांसारख्या अंमली पदार्थांचे सेवन करणारे लोकं दिसु लागतात. परंतु केवळ अंमली पदार्थांचे सेवन करणे म्हणजेच व्यसन नाही हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. मग कुणाला अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे व्यसन असेल, कुणाला मोबाईलचा सतत वापर करण्याचे, कुणाला सतत पत्ते खेळण्याचे व्यसन असेल तर कुणाला सोशियल मीडियावर टाकलेल्या पोस्ट ला किती लाईक मिळतात हे बघण्याचे व्यसन यासारख्या कोणत्याही गोष्टींच्या अतिआहारी जाणे धोक्याचेच आहे.
व्यसन म्हणजे व्यक्तीला लागलेली अशी सवय जिच्यामुळे त्या व्यक्तीचे शारीरिक, मानसिक, कौटुंबीक व सामाजिक नुकसान होत असुन सुध्दा ती सवय सोडणे त्या व्यक्तीला शक्य होत नाही अशी सवय.
थोडक्यात काय तर, ज्या गोष्टीमुळे फायदा काहीच होणार नाही हे माहिती असून सुद्धा त्या गोष्टीची किंवा वस्तूची आपल्या शरिराला किंवा मनाला खुपच गरज भासत असते तेव्हा त्याचे एकप्रकारे व्यसनच जडलेले असते. सध्याच्या काळात जसे अंमली पदार्थांचे व्यसन हा चिंतेचा विषय आहे तसाच सोशल मेडीयाचा अतिवापर, पोर्नसाईट्स सतत बघण्याची सवय, मोबाईलचा अतिवापर, वाढते गॅजेट्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा गरजेपेक्षा जास्त व सतत होणारा अतिवापर हे सुध्दा व्यसनच म्हणता येईल आणि हे व्यसन येणाऱ्या पिढीसाठी खुप मोठा चिंतेचा विषय असणार आहे. तशी बरीच प्रकरणे सध्या आपल्या अवतीभोवती घडतांना आपण बघत आहोत, वाचत आहोत.
आपल्या अवती-भोवती अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांना सुपारीचे सुध्दा व्यसन नाही परंतु त्यांना काही अशा सवयी आहेत ज्यांच्यामुळे त्यांच्या नकळतपणे त्यांचे शारीरिक, मानसिक व कौटुंबीक नुकसान होत असते. जसे की, कुणाला सतत लॉटरी खेळण्याची सवय असते, कुणाला सतत पत्ते खेळण्याची सवय असते, कुणाला सतत जुगार खेळण्याची सवय असते. यातला सतत हा शब्द खुप महत्वाचा आहे. कारण, जिथे कोणतीही क्रिया किंवा सवय सतत होत असेल ते एकप्रकारचे व्यसनच असते आणि एकदा लागलेली सवय व जडलेले व्यसन खुप प्रयत्न करुन सुध्दा सोडता येणे शक्य होत नसते.
जेव्हा कोणतेही व्यसन करण्यासाठी पैसा नसतो किंवा वेळेवर ते व्यसन करता येत नसेल तेव्हा चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे, चलबिचल होणे, हातापायांचा थरकाप होणे यासारखी लक्षणे दिसु लागतात. वेळीच यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. व्यसनात बुडालेली व्यक्ती त्या व्यसनातुन बाहेर येणे वाटते तितके सोपे नाही व अशक्य सुध्दा नाही. त्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे सुध्दा आहेत, मानसोपचार तज्ञ सुध्दा योग्य मानसोपचारांचा वापर करुन विविध व्यसनांतुन सहीसलामत सुटका करुन देऊ शकतात.
थोडक्यात कोणत्याही पदार्थाचा किंवा वस्तुचा गरजेपेक्षा जास्त वापर करणे हे व्यसनच असते. त्यामुळे कोणत्याही पदार्थाच्या किंवा वस्तुच्या आहारी न जाता मर्यादेत राहुन त्याचे सेवन किंवा वापर केल्यास पुढील धोके नक्कीच टाळता येऊ शकतात.
तुमच्या कुटुंबात तुम्ही हवे आहात, त्यांचा विचार करा… व्यसन सोडा.
आयुष्य संपवण्यापेक्षा व्यसन संपवणं कधीही चांगलंच… नाही का…?
चला मग व्यसनापासुन राहु दुर, जीवनात सुख मिळवु भरपुर.

 - गणेश सोळुंके, जालना
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
04) उद्याची पिढी व्यसनाधीश

       व्यसन म्हणजेच एक सवय, ती एका चुंबकासारखी मनुष्याच्या शरीराला चिटकलेली आहे. आज आपल्या देशामध्ये मनुष्याला व्यसन करण्यासाठी नेमक कारण पाहिजेल असत. ते कारण दुःख असो, सुख असो किंवा मानसिक ताणतणाव असो या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी मनुष्य व्यसन करीत असतो. जी माणसे व्यसनाच्या आहारी गेली आहेत, त्याची उद्याची पिढी ही व्यसनाच्या आहारी जाण्याची ज्यास्त शक्यता आहे. याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे, मी काही  महिन्यांपूर्वी एका पार्टीच्या ठिकाणी गेलो असताना, या पार्टीमध्ये काही मुले आपल्या पाल्यांबरोबर पार्टीच्या ठिकाणी आलेले, त्यातले काही मुले एका टेबलावर बसून काही तर खेळ करताना मला लांबून दिसलीत. मी त्या मुलाकडे पाहत होतो. ती मुले पाण्याचा ग्लास घेऊन व चॉकलेटची काटी आपल्या हाताच्या दोन्ही बोटामध्ये ठेऊन कोणतातरी खेळ खेळत असताना दिसले. मला त्या मुलांचा अजब असा खेळ कळला नव्हता. तेव्हा अचानक माझं लक्ष दुसऱ्या टेबलाकडे गेले. त्या मुलांचे पालक तिकडे सिगरेट व दारूसारखे व्यसन करीत असताना मला दिसले. तेव्हा मला कळलं की, ही मुले खेळ-खेळत नव्हते, तर ही मुले आपले पालक व्यसन करीत आहेत त्यांची इकडे कृती करत होतीत. मला हे सगळ पाहून असे वाटते की, हे पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायच्या वयात, हेच पालक आपल्या मुलांना व्यसन कसे करावे हेच शिकऊन देत असावे. आज ही मुल आपल्या पालकांची कृती करताना दिसली, उद्या हीच पिढी दारूचा ग्लास व सिगारेट सारख व्यसन करालाही मागे पुढे बघणार नाही. या सगळ्या गोष्टी वर आजच्या पिढीने कुठे तरी आळा घातला पाहिजेत, तर आणि तरच उद्याची पिढी व्यसनमुक्त होऊ शकते...

लेखन : प्रतिक विजय उकले
इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर
8624872409
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
05) माणसाचा शत्रू '' व्यसन ''

भारत हा संस्कृती व परंपरेने नटलेला देश आहे. या देशाला संस्कृती व संस्काराची पार्श्वभूमी लाभलेली आहे. या देशाला संत-महात्मे, समाजसुधारक, थोर विचारवंत, शास्त्रज्ञ, अशा सर्वांच्या विचारांची परंपरा लाभलेली आहे. या सर्वांच्या विचारांवर आज प्रत्येक जण स्वतःला सुशिक्षित समजून घेत आहे. स्वतःच्या सुशिक्षित व उच्चशिक्षित अहंकाराला आधुनिक जगाच्या स्पर्धेत ढकलून देत आहे. या जीवघेण्या स्पर्धेत प्रत्येक जणाला यश मिळवायचे आहे. या स्पर्धेत अपयश पदरी पडले की, ते कुणालाच पचनी पडत नाही. मग हेच अपयश मनुष्याला निराशेच्या खाईत लोटून देते. पुढारलेल्या विचारसरणीला हे नैराश्यपूर्ण अपयश हळूहळू मनाला पोखरू लागते. अशा वेळी मनुष्य सहाजिकच व्यसनाकडे ओढला जातो. माणसाला वेगवेगळी व्यसन जडली जाते. तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटका, दारू, गांजा, ड्रग्स, कोकेन आधी वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं माणसाला जडते. मुळात व्यसन शौक किंवा ऐश्वर्य प्रगट करण्याचे साधन नाही. व्यसन मुळातच वाईट आहे. व्यसनामुळे अत्यंत घातक स्वरूपाचे दुष्परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात. त्यातून आर्थिक, कौटुंबिक, मानसिक आणि शारीरिक स्वरूपाचे दुष्परिणाम होत असतात.व्यसन करण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. दिवसभरात कमावलेला पैसा व्यसनापायी खर्च होऊ लागला की, निश्चितच आर्थिक चुणचुण भासू लागते. यातूनच मग कुटुंब कलह सुरू होतो. नवरा बायकोचे भांडण, वडील मुलाचे भांडण, भावा-भावाचे भांडणे होतात. कुटुंबाचे आनंदी क्षण व्यसनापायी मावळायला लागतात. मनावरचा ताण कमी होईल म्हणून माणूस व्यसन करतो. मुळात घडते मात्र उलटेच, व्यसनामुळे मानसिक ताणतणाव अधिक वाढतो. माणसाचे मानसिक संतुलन बिघडते. व्यसनात तो काय करतो याचे त्याला भान राहत नाही.आईच्या गर्भातून मिळालेले सुंदर जीवनरूपी शरीर व्यसनामुळे खराब होते. लाखमोलाचे शरीर व शरीराचा एक-एक भाग व करोडोरुपये खर्च करून ही परत न मिळणारे आत्मारुपी देह रोगांना आमंत्रण देत असतो. व्यसनामुळे कॅन्सर, लिव्हर खराब होणे, पोटाचे आजार या सारख्या महाभयंकर रोगांना आमंत्रण दिले जाते. व्यसनाच्या धुंदीत मनुष्य या गोष्टीकडे लक्ष देत नाही. एक वेळ स्वतःचे शरीर रोगाच्या स्वाधीन करून सर्वात शेवटी पश्चातापाचा जप करत बसतो. कारण व्यसनाचा शेवट हा आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक पश्चातापाचा शिवाय त्याच्याकडे काही उरत नाही. मनुष्याने निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गासारखे निर्मळ व स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे. आयुष्यात व्यसन करायचेच असेल तर चांगल्या गोष्टीचे केले पाहिजे. ज्यातून माणसाच्या आयुष्याला आनंदी व निरोगी बनवू शकेल.आयुष्यात व्यसन करायचे असेल तर राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊं आईसाहेबांच्या संस्काराचे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचे, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे, व संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेचे केले पाहिजे. अशा व्यसनाने स्वतःला, कुटुंबाला, समाजाला या महाराष्ट्राच्या मातीला व भारतभूमीला सुजलाम सुफलाम बनवूया.

राजेंद्र प्रल्हाद शेळके, सहशिक्षक
मु.पो.किनगाव राजा 
ता.सिंदखेड राजा जि.बुलडाणा
मो.न 9823425852
rajendrashelke2018@gmail.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
06) मनाचा निर्धार , व्यसन करू दूर

  मादक पदार्थांच्या सेवनाने  गुंगी येते .   अवयव शिथिल पडतात . विचारशक्ती नाहीशी होते . गात्रे शिथिल होतात . काही वेळाने ही नशा उतरते व  मादक पदार्थांच्या सेवनाची ईच्छा तिव्र होते .   वारंवार मादक पदार्थांच्या सेवनालाच व्यसन असे म्हणतात कसे लागते व्यसन ?  
लहानपणी चुकीच्या संगतीचा परिणाम , घरात आई वडीलांना व्यसन असते . वडील  मुलाला सांगतात ,जा रे पिंटू दुकानातून गायछाप  घेऊन ये ,  जा रे पिंंट्या स्वयंपाक घरातून ही बिडी पेटवून आण ,   मग पिंट्याला ही तरतूद बिडीचा एखादा झुरका घ्यायचा मोह होतोच कधीतरी .  मुले थोडी मोठी झाली काॅलेजला जाऊ लागली की  काॅलेज च्या मित्र मैत्रिणींच्या ओल्या सुक्या पार्ट्या मधून दारु , सिगारेट इतकेच नव्हे तर ड्रग्ज ही घेतले जातात . 
     इंटरनेट च्या अतिवापरामुळे ही जो तो घरात असूनही घरात नसतो . होय आता या ही एका व्यसनाची भर पडली आहे ,  सुटीच्या दिवशी कुटूंबातील सर्वजण घरातच असतात . तरी कोणी कोणाशी बोलत नाही . आई  टी.व्ही. वरील मालिका बघण्यात दंग . वडील लॅपटॉप वर आणि मुले मोबाईल मधे डोके घालून बसलेली . त्या मुळे कौटुंबिक संवाद होत नाही . मुले कुठे जातात , कोणाबरोबर राहातात , काय करतात हे पालकांना समजत नाही व जेंव्हा समजते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते .  
 काॅलेजच्या शिक्षणानंतर जाॅब मिळवण्या साठी मुलांची धडपड सुरू होते . मनासारखी नौकरी मिळत नाही त्याचे टेन्शन येते . ते टेन्शंन घालविण्यासाठी तरुण पिढी  व्यसनाच्या आहारी जाते.
पुढे येतो लग्नाचा प्रश्न  ?   आजकालच्या मुलींना पांच आकडी पगार असलेला , वेल सेटल्ड मुलगा नवरा म्हणून पाहिजे असतो . मुलगा चाळीशीत येई पर्यंत त्याचे लग्न झालेले नसते  , इकडून तिकडून लग्न झालेच तर बायकोशी पटत नाही  मग भांडणे सुरू होतात .
पुन्हा नैराश्याच्या खोल गर्तेत माणूस ओढला जातो .  त्या गुंत्यात तो अधिकच गुंतला जातो. विचारशक्ती क्षिण होते . आत्मविश्वास ढासळतो . व्यसनपुर्ती करण्यासाठी असा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो .  व्यसनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते . आर्थिक नुकसान होते . कौटुंबिक सुख हरवून बसते. हे सर्व टाळावयाचे असेल तर व्यसनापासून चार हात दूर राहणेच योग्य आहे . जे कोणी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत  त्यांनी त्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत . ईच्छा शक्तीच्या जोरावर माणूस व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडतोच .व्यसनाधिन माणसाला जर त्यातून सोडावयाचे असेल तर प्रथम त्याचा तिरस्कार करणे सोडा . त्याला आपुलकी ने वागवा . थोडा वेळ लागेल.   आता त्यालाही व्यसनांचे दुष्परिणाम कळू लागलेले असतात पण त्यातून बाहेर पडण्याची हिंमत नसते. व्यसनी व्यक्तीस कुटुंबात ठेऊनच त्यावर योग्य उपचार  करावेत . कुटूंबातील बाहेर ठेवल्यास त्याला असुरक्षित वाटू लागते व तो तेथून पळून जातो . ॐकार साधना , मेडीटेशन , योगा  इत्यादी चा अवलंब करून  व्यसनापासून मुक्त होता येते . 
   एखाद्या रुग्णाला काही आजार झाल्यास त्याला हाॅस्पिटल मधे अॅडमीट केले जाते . आजारातून बरा झाल्यावर त्याला डिस्चार्ज मिळतो . तो जितके दिवस दवाखान्यात अॅडमीट असतो तितके दिवस त्याला कुठलेही व्यसन करता येत नाही . तंबाखू  खाता येत नाही किंवा सिगारेट ओढता येत नाही . तंबाखू , सिगारेट शिवाय तो दवाखान्यात राहू शकतो ना ? मग बाहेर आल्यावर पुन्हा त्या वाटेला कशाला जायचे ?  व्यसनमुक्त होणे काही फार अवघड नाही . फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे .
 *निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेची फळ*
मनाचा निर्धार करा , व्यसन रोग होईल बरा 

अरविंद कुलकर्णी पुणे
9422613664
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
07) नको जाणे व्यसनाच्या आहारी

व्यसन शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर अनेक प्रकारचे लोक उभे राहतात.त्यामध्ये विडी, सिगारेट, गांजा, चिलीम, हुक्का इ. ओढणारे. दारु पिणारे, तंबाखू, मावा खाणारे, असे अनेक लोकं असतात. व्यसनी व्यक्तीला समाजात म्हणावे तेवढे सन्मानाचे स्थान नसते. व्यसन सुटावे म्हणून शासकीय स्तरावर मोठे प्रयत्न चालू आहेत. त्यामधे व्यसन विरोधी, तंबाखू विरोधी असे अनेक अभियान चालवले जातात.
 31 मे हा जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून पाळला जातो.  लोकं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर रहावेत यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ज्यायोगे लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी माहिती व्हावी.
माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे.त्याला गटात राहणे आवडते.समूहात राहण्याची आणि एकमेकांच्या आनंदात आणि दु: खामध्ये सहभागी होण्याची प्रथा पुर्वीपासूनच प्रचलित आहे. त्या कारणास्तव, ते मनाला, शरीराला,आनंद देण्यासाठी सण समारंभ साजरे करणे,पार्ट्यांचे आयोजन करणे,त्यामध्ये मादक पदार्थांचा वापर करणे.मादक पदार्थ किंवा नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये तंबाखूचा जास्त वापर केला जातो.जसे मानवांने बीडी, सिगारेट, हुक्का, जरदा, पानमसाला, तंबाखू ,च्युइंगम इत्यादींचा वापर केला आहे.
जर आपल्याला धूम्रपान करण्याचा इतिहास पहायचा असेल तर तो इ.स.पू. 5000 ते 3000 पासूनचा आहे.  प्राचीन काळी सुगंध म्हणून तो जाळला गेला, ज्याचा लोकांनी आनंद घेतला.पण हळूहळू लोकांना याची सवय झाली.त्यानंतर मात्र यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली, तरीही ती लोकप्रिय झाली.1920 मध्ये, धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग झाला,हे लक्षात आल्यानंतर धूम्रपानविरोधी मोहीम सुरू केली गेली.1050 मध्ये याविरोधात बरीच चर्चा झाली.1980 मध्ये याचा वैज्ञानिक पुरावाही मिळाला आहे.
आजकाल तंबाखूचे सेवन करणे सामान्य झाले आहे.  बीडी, सिगारेट किंवा हुक्का पीत असताना, तंबाखूचा श्वास घेतला जातो आणि ते जेंव्हा श्वास घेतात,तेंव्हा तो धुर थेट फुफ्फुसांमध्ये जातो आणि तेथील पेशी त्याचे शोषण करतात,ज्यामुळे डोपामाइन आणि ऑडॉर्फिनचे प्रमाण वाढते आणि आनंदानुभूती जाणवते, परंतु या भावनांपेक्षा जास्त धोकादायक त्याच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आहेत.बरेच लोक पौगंडावस्थेत किंवा तारुण्यात धूम्रपान करण्यास सुरवात करतात.प्रारंभिक स्थितीत आनंदाच्या भावनामुळे याच्या भावनांचे मजबुतीकरण होते.व पुन्हा पुन्हा ते व्यसन तो करायला लागतो.तो चांगलाच त्याच्या आहारी जातो.नंतर नंतर तर त्याचे शरीर त्याला साथ देत नाही, व तो व्यसनाच्या पूर्ण आहारी गेल्यामुळे सद्सदविवेकबुद्धी काम करेनाशी होते.आणि व्यसनाचा परिणाम दिसायला लागतो आणि यामध्ये तो पूर्णपणे गुरफटून जातो यामुळे त्यातून सहजासहजी बाहेर येणे अवघड होते.
लोकं आता त़ंबाखूचे पाउच खिशामध्ये मध्ये ठेवण्यास सुरवात केली आहे.त्यामुळे ती नेहमीच त्यांच्याबरोबर राहते आणि जेंव्हा पाहिजे तेंव्हा त्यांना सहज उपलब्ध होते. काही लोक असे सांगून त्याचे समर्थन करतात की हे दात आणि दातदुखीमध्ये औषध म्हणून काम करते.काही लोक म्हणतात की तंबाखूमुळे सर्दी बरी होते.  परंतु लोकांना हे समजत नाही की तंबाखूमुळे नफ्यापेक्षा अधिक नुकसानच होते, म्हणून तंबाखू नेहमीच टीकेचा विषय बनला आहे.ऑट्टोमन साम्राज्याचा सुलतान, मुराद चौथा याने प्रथम तंबाखूविरोधी मोहीम सुरू केली आणि तंबाखूवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला नंतर अनेकांनी त्याविरोधात आवाज उठविला, जो आजपर्यंत चालू आहे.विकसनशील देशांमध्ये तंबाखूचा वापर सर्वाधिक आहे.
बीडी, सिगार ,ड्रिंकमुळे फुफ्फुसांना हानी होते.या व्यतिरिक्त सिगारेट, इलेक्ट्रॉनिक सिगारेट, हुक्का, क्रिटेक्स, अप्रत्यक्ष धूम्रपान, पाईप धूम्रपान असे अनेक प्रकारचे तंबाखूचे सेवन केले जाते.  तंबाखूमधील निकोटीन ज्यामुळे शरीर, फुफ्फुस आणि आतड्यांचे नुकसान होते.  याच्या बरोबर हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, कर्करोग, यकृत रोग, टीबी, अर्धांगवायू, नपुंसकत्व यासारखे आजार होतात. डोपामाइनमुळे, निकोटीनमुळे व्यक्ती हळूहळू अशक्त होते.  शरीराच्या अवयवांची क्षमता नष्ट होऊ लागते.शेवटी कर्करोगासारखा गंभीर आजार होतो ज्यामध्ये जीवनातून उठण्याची शक्यता जास्त असते.
मादक पदार्थांविना आयुष्य जगता यावे यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.भारतात तंबाखूच्या सेवनामुळे 10 लाख लोक विविध प्रकारच्या आजारामुळे मरण पावले जातात. महाराष्ट्रातील 36% पुरुष आणि 5% महिला तंबाखू आणि तंबाखूचे सेवन करतात. भयानक दुष्परिणाम माहित असूनही लोक या व्यसनातून मुक्त होत नाहीत.भारत सरकार आणि स्वयंसेवी संस्था यांच्याकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत, परंतु तंबाखूची निर्मिती बंद केल्यावरच हे शक्य आहे,असे मला वाटते.जर घाव मुळावरच घातला तरच या व्यसनाच्या विषाचे झाड फोफावणारच नाही.

घाव मुळावरच घालू
व्यसनाच्या राक्षसाला पळवू
अलिप्त राहून मादक पदार्थापासून
आरोग्यसंपन्न आयुष्य मिळवू

 श्रीमती माणिक नागावे 
 कुरुंदवाड, ता.शिरोळ जिल्हा  कोल्हापूर
 9881862530
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
08) व्यसन शेवटी वाईटच

 व्यसन म्हटल्याबरोबर अगदी धस्स होतं कारण हा शब्द आहेच नकारार्थी आणि नकोसा. कुणालाच व्यसन हे एकदम किंवा अचानक लागत नाही तर जेव्हा एखाद्या कृतीमध्ये किंवा वस्तूच्या वापरामध्ये अतिरेक होतो तेव्हा त्याचे व्यसनात रूपांतर होते थोडा अधिक विचार केला तर लक्षात येतं कोणतीही वस्तू किंवा एखादे तत्त्व जेव्हा अस्तित्वात येते त्यासाठी अनेक शास्त्रज्ञ ,संशोधक यांनी अभ्यासपूर्ण संशोधन करून ,विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देऊन ती वस्तू किंवा तत्त्व निर्माण केलेलेअसते .हे करण्यामागे त्यांचा शुद्ध हेतू असतो की , दैनंदिन जीवनात जाणवणाऱ्या समस्या व प्रश्न सोडवून मनुष्यांचे जीवन अधिक सोपे करणे.
 व्यसने ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत कुणाला सिगरेटचे व्यसन, तर कुणाला सट्टेबाजीचे ,कुणाला अल्कोहोलचे व्यसन तर कुणाला   ड्रगचे व्यसन. वास्तविक  अल्कोहोल हे अनेक औषधांमध्ये योग्य प्रमाणात वापरल्या जाते. आयुर्वेदामध्ये ही अल्कोहोलचे योग्य प्रमाण काही आजारासाठी मान्य केलेले आहे .परंतु ते तज्ञांच्या सूचनेप्रमाणे . पण जर अल्कोहोलचा अतिरेक झाला तर मग ते व्यसन बनते आणि आपण बघतो कित्येक संसार ह्या व्यसनामुळे उध्वस्त झालेले आहेत. महान साहित्यिक राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला या नाटकांमधून याविषयीचे प्रबोधन केलेले आहे आणि व्यसनामुळे संसाराची राखरांगोळी कशी होते हे खूपच संवेदनशीलपणे मांडलेले आहे अशा प्रकारचे प्रबोधन अनेक संस्था आजही करीत आहेत .तसेच कथा, कीर्तन प्रवचन यामधून सुद्धा प्रबोधन हे होत असते .
जग हे परिवर्तनशील आहे त्यात अनेक घडामोडी सुरू असतात काळ बदलतो तसे जीवनमान बदलते त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक युगामध्ये ही काही नवीन प्रकारचे व्यसन निर्माण झालेली आहेत. मोबाईलचा अतिवापर ,सोशल मिडीयाचा अतिरेक ,सेल्फी काढण्याचा अतिरेक ,मोबाईल वरील तासनतास बोलणे ही झाली   आधुनिक व्यसने. ह्या मधून सुटका करण्यासाठी, मोबाईलचे व्यसन सोडविण्यासाठी अनेक अँटी एडिक्शन  सेंटर सुरू झालेली आहेत आणि लोक तेथे जातही आहेत .आणखी एक आधुनिक व्यसन म्हणता येईल ते म्हणजे शॉपिंगचे व्यसन. गरज नसताना अतिप्रमाणात आणि ते ही सतत केलेली कपड्यांची खरेदी ,हॉटेलिंग अशा चंगळवादी सवयीयींचा अतिरेक हे सुद्धा एक प्रकारचे व्यसनच म्हणता येईल. आपल्या अवतीभवती अशी कित्येक उदाहरणे दिसतील की दारू ,सिगरेटमुळे आर्थिक परिस्थिती डबघाईस गेली नाही तर केवळ आणि केवळ चंगळवादी वृत्तीमुळे परिस्थिती हलाखीची झाली . त्यामागची अनेक ही कारणे असू शकतात  पण हेही एक प्रमुख कारण आहे .
कोणतेही व्यसन हे वाईटचं कारण व्यसन मनुष्याच्या मानसिक ,भावनिक आणि सामाजिक विकासावर वाईट परिणाम करतात .मनुष्याची सर्जनशीलता नष्ट करतात. त्याच्यामध्ये राग ,चिडचिड, निद्रानाश, भूक न लागणे अशा अनेक नकारात्मक गोष्टी निर्माण करतात. सुरुवातीला फक्त दुःख विसरण्यासाठी, मनावरील ताण कमी करण्यासाठीची कारणे देऊन लागलेली सवय केव्हा व्यसनात रूपांतरित होते हे त्या व्यक्तीलाही कळत नाही त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे .वेळीच सावध होऊन चांगल्या सवयी लावण्याची गरज आहे. चांगले वाचन, लेखन ,पर्यटन ,बागकाम मित्र-मैत्रिणींशी सुसंवाद आणि आपल्या मध्ये असलेल्या कलेचा योग्य उपयोग करून  निर्माण केलेली एखादी कलाकृती ,योग,  ध्यानधारणा ,व्यायाम या सर्व गोष्टी आपल्याला व्यसनापासून दूर ठेवू शकतात अशा चांगल्या सवयी अंगीकारल्यास मनुष्य स्वतःचे कुटुंबाचे आणि समाजाचे हित साधू शकतो .

प्रा.सुनीता आवंडकर बारी नाशिक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
09) व्यसनाला लावा वेसण

व्यसन म्हणजे सवय. सवयी दोन प्रकारच्या असतात एक चांगली आणि दुसरे वाईट. चांगली सवय माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते तर वाईट सवयी ज्याला जास्तीत जास्त लोकं व्यसन म्हणून म्हणतात ते माणसाला खाईत घेऊन जाते. म्हणून जीवनात व्यसनाला कुठे ही स्थान न देता चांगल्या सवयी कश्या अंगीकारता येतील याचा जास्तीत जास्त विचार करावा. चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले पाहिजे. साधू संत महात्मा लोकांनी सांगून ठेवले आहे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. सज्जनांच्या सहवासात राहिलो तरच चांगले कानावर पडते. सगळेच जण काही कमळ होऊ शकत नाहीत की, चिखलात राहून देखील लोकं त्याकडे आकर्षित होतात. चिखल म्हणजे वाईट लोकांची संगत असे समजण्यास हरकत नाही. एखादे झाड कापण्यास काही वेळ लागत नाही पण तेच झाड जमिनीवर उभं करण्यास कितीतरी वर्षे लागतात. व्यसनाचे देखील असेच आहे. चांगली सवय लागायला अनेक वर्षे तपश्चर्या करावी लागते तर वाईट व्यसन लागायला काही वेळ लागत नाही. दिवसेंदिवस समाजात व्यसनाचे प्रमाण विशेषतः तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. तंबाखू गुटखा खाणे, विडी सिगारेट ओढणे, दारू पिणे, नशा करणे, पत्ते खेळणे, काम न करता रिकामटेकडे फिरत राहणे यासारखे व्यसन वाढत असताना उच्चभ्रु लोकांच्या घरातील मुले रेव्ह पार्टीमध्ये अडकत असल्याचे दिसत आहे, जे की खूपच घातक आहे. यातून तरुण मुलांमुलीचे जीवन सुरू होण्यापूर्वीच उध्वस्त होत असते. ग्रामीण भागात देखील ह्या व्यसनाचे लोण पसरले असून उमद्या वयातील तरुण मुले यात बरबाद होताना दिसत आहेत. जेथे संसाराची गाडी नेमकं सुरुवात होणार असते त्याचवेळी ही मुले मृत्यूशय्येवर अनेक रोगासोबत झुंज देत आहेत. दारू पिण्यामुळे लिव्हर खराब होते तर तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याची शक्यता असते. भारत देशाची तरुण पिढीच जर असे व्यसनात नष्ट होत असेल तर देशाचे भविष्य खूप अवघड बनणार आहे, यात शंका नाही. या सगळ्यासोबत आजच्या मुलांना, युवकांना आणि मोठ्याना देखील एक व्यसन जडले आहे ते म्हणजे तासनतास मोबाईल वर राहणे. फेसबुक, व्हाट्सअप्प, यांच्यासह इतर वेगवेगळे गेम यामुळे खूप वेळ हातात मोबाईल राहत आहे, जे की व्यसनात रूपांतर होत आहे. घरात एकमेकांशी संवाद कमी झाले आणि माणूस घरातल्या घरात सोशल डीस्टनशिंग मध्ये राहतोय. म्हणून या मोबाईलचा वापर कमी करणे आवश्यक आहे. यावर आजकाल खूप काम पूर्ण होत असले तरी याच्या संपूर्ण आहारी जाणे म्हणजे मोबाईल व्यसनी झाल्यासारखे होय. जीवनात यशस्वी व्हायचे असेल आणि आपले नाव व्हावे असे वाटत असेल तर वरील वाईट व्यसनापासून दूर व्हावे आणि रोज काही तरी वाचन करणे, रोज काही तरी लिहिणे, आपला छंद जोपासणे, गायन करणे, चित्रं काढणे यासारख्या चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. ज्यामुळे जीवनात आपणाला त्याचा फायदा झाला नाही तरी चालेल निदान आपले नुकसान तर होणारच नाही. सध्या संपूर्ण भारतात लॉकडाऊन असल्यामुळें साहजिकच आपण अनेक व्यसनापासून आपोआप दूर झालो आहोत. तेंव्हा पुन्हा त्या वाईट सवयीकडे वळण्याचा प्रयत्न करू नये, एवढेच या निमित्ताने सुचवावे वाटते. सध्या आपण रोज एक लेख या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन लिखाण करत आहात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. एका महिन्यानंतर जेंव्हा आपण आपल्या सर्व लेखांकडे एकदा वळून पाहू त्यावेळी या सवयीचे महत्व नक्कीच कळणार आहे. म्हणून शेवटी सांगावेसे वाटते की चांगल्या सवयी जवळ करताना वाईट व्यसनाला वेसण घालावे. 

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10) व्यसन एक आजार

   व्यसन म्हणजे एखादी अशी सवय की, ज्यामुळे मोठय़ा प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही. व्यसन असणे हा एक मानसिक, शारीरिक आजार आहे, हे जाणून घेतले पाहिजे. नशेबद्दल अनावर आकर्षण आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. ह्यात फक्त शारीरिक, मानसिक च नाहीत तर शरीराच्या प्रत्येक कोषाणूत ती अनावर ओढ निर्माण होते, आणि शरीराची प्रत्येक क्रिया प्रक्रिया व्यसनाधिन होते.  मादक पदार्थाची नशा चढते. मेंदूत घडणाऱ्या रासायनिक बदलांमुळे आणि आपल्या मेंदूतील आनंद (reward centre) देणाऱ्या केंद्रामुळे ती नशा पुन्हा करून बघावी असे वाटते आणि हळूहळू मादक पदार्थ घेण्याची सवय लागते. पुरेशी नशा मिळवण्यासाठी आता पूर्वीचे प्रमाण पुरत नाही. मादक पदार्थाचे प्रमाण यातून वाढत जाते. आता अशी स्थिती निर्माण होते की मादक पदार्थ घेतला नाही, तर अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे (withdrawal symptoms) निर्माण होतात. ही लक्षणे टाळण्यासाठी पुन्हा नशेकडे पाय वळतात. दिवसभर मनात नशेसाठी पैसे मिळवणे, नशीला पदार्थ काहीही करून मिळवणे हाच ध्यास राहतो. .*जागतिक आरोग्य संघटनेने व्यसनाधीनतेला १९८७ मध्ये आजारात समाविष्ट केले आहे*
    प्रसंगांना दारू पिणारे कित्येक असतात, पण सगळेच व्यसनी होत नाहीत. असे का? ज्याच्या घराण्यात व्यसनाधीनता आहे अशी व्यक्ती आनुवंशिकतेमुळे सहजी व्यसनाला बळी पडते. त्याबरोबरच वातावरणातील अनेक घटक एखद्या व्यक्तीला व्यसनाच्या अधीन व्हायला प्रवृत्त करतात. माणसाचा स्वभाव काही प्रमाणात त्याला व्यसनाकडे खेचून नेतो. नावीन्याचे आकर्षण असणारा, पटकन धोका पत्करणारा माणूस नवीन नवीन नशेचे पदार्थ चाखून पाहायला केव्हाही तयार असतो. लहानपणापासून नियमांचे उल्लंघन करणे, शाळा बुडवून इतरत्र भटकणे, प्राणिमात्रांना त्रास देणे अशा वर्तणकवर्तणुकीच्या समस्या असलेल्या मुलांना व्यसन पटकन लागते. घरात वातावरण चांगले नसले की माणूस व्यसनाकडे वळतो. दैनंदिन संघर्षांचा, ताण-तणावाचा, मनातल्या निराशेचा सामना करण्याचा एक उपाय म्हणजे नशा अशी पळवाट शोधली जाते. परंतु कधीकधी उदासीनता, अतिचिंता आणि स्किझोफ्रेनिआ सारखा गंभीर मानसिक आजार असलेले रुग्ण आपल्या लक्षणांपासून सुटका म्हणून व्यसनांचा आधार घेतात.
    आज समाजात सिगरेट पिणे, दारू पिणे याला प्रतिष्ठा आहे, त्यामुळे तरुण मुले आणि मुलीसुद्धा सहजपणे दारूचा ग्लास हातात घेताना आणि सिगरेट ओढताना दिसतात. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमुळेही तरुणांना आपल्या समवयस्कांमध्ये सामावून जायचे, आपलेसे व्हायचे तर हे सगळे करणे गरजेचे आहे असे वाटते. हाती खेळणारा पैसा, कौटुंबिक जबाबदाऱ्या नसणे आणि हाताशी रिकामा वेळ असणे यातून तरुणाई व्यसनांच्या आहारी जाताना दिसते. 
     व्यसनाधिन व्यक्तीचे काही भावनांवरील नियंत्रण सुटते. चांगल्या-वाईटातील फरक करण्याची बुद्धी काम करत नाही. ह्याला कारण फक्त अंमली पदार्थाचे सेवन हेच आहे. तो पदार्थं मिळविण्यासाठी माणूस चूकीचे, अनैतिक किंवा आक्रमक वर्तन करताना दिसून येतो.
        प्रत्येक व्यसनी आपल्या व्यसनाच्या आड येणाऱ्या लोकांना आपला शत्रू समजत असतो ..आणि आपले व्यसन निर्धोक सुरु राहावे म्हणून ..घरात दादागिरी करतो .. आरडाओरडा..वस्तूंची फेकाफेक ..आत्महत्येची किवा खुनाची धमकी ." मार डालुंगा ..तोड डालुंगा ..छोडूंगा नही ..सबक सिखाउंगा " ..वगैरे भाषा करतो..सर्वसामान्य माणसे घरात तमाशा नको ..उगाच बाहेरच्या लोकांना शोभा नको ..घराण्याचे नाव बदनाम होईल या भीतीने अथवा ..हा दारू पिवून आहे याच्या कोण नादी लागणार या सुज्ञ विचाराने चूप बसतात ..आणि व्यसनीचा आतंकवाद सुरु राहतो.. 
   संपूर्ण व्यसनमुक्ती एक दीर्घकालीन लढा आहे. त्याकरता खालील तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत

१. व्यसनी व्यक्तीची स्वत:ची व्यसनमुक्त राहण्याची प्रामाणिक इच्छा.
२.  कुटुंबाचा व सहृदयी मित्रांचा भावनिक आधार.
३.  व्यसनमुक्ती केंद्रामार्फत केले गेलेले योग्य उपचार, समुपदेशन व पुनर्वसन.
परंतु असे लक्षात आले की ती व्यक्ती परत व्यसनाकडे ओढली जाते. त्याचे कारण म्हणजे मेंदूत घडणाऱ्या रासायनिक बदल, आणि आपल्या मेंदूतील आनंद (reward centre) देणाऱ्या केंद्रामुळे ती नशा पुन्हा करून बघावी असे वाटते.  त्या तथाकथित आनंददायी उर्मी वर ताबा मिळवणे अत्यावश्यक आहे. आता ह्या क्षेत्रातही अनेक आध्यात्मिक गुरूंचे कार्य शुरू आहे आणि त्यात बर्‍यापैकी यश पण मिळते आहे. 
     व्यसनमुक्ती हा अतिशय दीर्घकालीन लढा आहे. हा लढा जिंकण्यासाठी  व्यक्ती गत पातळी वर पाठपुरावा आणि       
प्रचंड प्रयत्न करावे लागतात. ह्यात ती व्यक्ती अगदी जेरीस येते. म्हणूनच  कुटुंबाचा आधार अतिशय  महत्वाचा आहे. 
         सरत शेवटी एवढेच म्हणायचे आहे की व्यसनाधिनतेच्या अजगराने आपल्या समाजाला विळखा घातला आहे. श्रीमंत  गरीब सगळ्याच वर्गातील लोकांच्या मधे व्यसन पसरले आहे.
   दक्षता उपचारा पेक्षा अधिक सोपी आहे. सध्याच्या लाॅकडाॅउनचा या कालावधीत दारूची  दुकाने बंद आहे.
ह्यात असे कित्येक लोक जे व्यसनाधिनतेच्या उंबरठय़ावर आहेत त्यांचे व्यसन सुटण्याची शक्यता आहे. म्हणून दारू सहजपणे उपलब्ध न होणे ही सुद्धा व्यसन मुक्तीच्या श्रंखलेतील एक कडी आहे. आज चौका चौकात दारूची दुकाने आहेत. त्यांच्यात अंतर वाढविणे ही अतिशय महत्वाचे आहे.
        जरी वरकरणी असे वाटते की दारूवरचा कर सरकारच्या कमाईचे महत्त्वपूर्ण साधन आहे. परंतु  दारू मुळे वाया जाणारे ( man hours) मानवतास,त्यामुळे होणारी कुटुंबाची वाताहत आणि व्यसनाधिनते मुळे होणाऱ्या आजारमुळे  होणारा अवाढव्य वैद्यकीय खर्च  ह्याचा विचार केला तर दारूची उपलब्धता टप्प्या टप्प्यात कमी करणे हा सुद्धा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे.

डाॅ. वर्षा सगदेव नागपूर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11)  व्यसन आणि वेसण

       व्यसन म्हणजे एक प्रकारे आपल्याला लागलेली सवय.. वेसन आणि व्यसन  या दोन शब्दाचा आपण विचार केला तर आपल्याला एक प्रकारे विरोधाभास जाणवेल..वेसन ही बैलाला लगाम घालण्यासाठी वापरलेली दोर होय..याचा अर्थ असा होईल की,बैल आपल्या आवाक्यात राहण्यासाठी आपण त्याला वेसन घालतो...पण हलीच्या पिढीला वेसन घालण्या अगोदरच व्यसन लागत आहे...
                 व्यसन हे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक  केले तर लागते...म्हणजेच व्यसन हे  जास्त सराव केला तर आपल्या अंगवळणी पडते...कुणी अती वाचन करतो ,कुणी अती लेखन करतो, कुणी अती गायन करतो,तर कुणी अती नशा करतो..जिथे अती झाले तिथे व्यसन आले...याचाच अर्थ असा की, व्यसन हे दोन प्रकार मध्ये मोडता येईल..चांगले व्यसन आणि वाईट व्यसन..परंतु हल्ली आपल्याला चांगले  व्यसन असलेली माणसे  कमी तर  प्रमाणापेक्षा जास्त व्यसन करणारे जास्त दिसत आहे...मग आज आपण जर याकडे दुर्लक्ष केले तर येणारी पिढी ही व्यसनाच्या खाईत लोटल्या सारखे होईल. तेंव्हा आजच यावर निर्बंध लावणे गरजेचे आहे...आपण आपल्या आजूबाजूला बघितले तर,अगदी कमी वयातील मुले ही व्यासानाकडे खेचली जात आहे...चांगली गोष्ट शिकायचे म्हंटले तर थोडा वेळ लागतो,परंतु. व्यसन लागायला कसलाही वेळ लागत नाही...इथे घे रे थोडी ,,काय होत नाही म्हंटले की सुरू होते....नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाचे सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी येणे,शरीराचे अवयव शिथिल पडणे,ग्लानी येणे विचारशक्तिचा र्‍हास इत्यादी प्रकार घडतात.याने मनावरील दडपण निघुन जाते किंवा कमी होते.या मादक द्रव्याची मग शरीराला सवय लागते.अश्या पदार्थाचे वारंवार सेवन करण्याची सवय म्हणजे व्यसन होय.
     व्यसनांचे शारीरिक दुष्परिणाम सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन करणे, मावा  खाणे इत्यादींमुळे फुप्फुसे, हृदय, जठर,  पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग  व इतर भयंकर रोग होतात. व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. तसेच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय. . 

व्यसन म्हणजे जणू वाळवी
जी पोखरते शरीराला !
एकदा कां लागली की,
सुटका नाही त्याला...
     
        तेंव्हा वाईट व्यसनापासून दुर राहिलेले कधीही चांगलेच...

श्री समाधान दगडूबा बोरुडे
       लोणार बुलढाणा
   📱📞  ९२७००१८३५३
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 12) व्यसन एक मानसिक आजार

          व्यसन हा मानसिक आजार आहे. व्यसनामुळे माणसाचे आपल्यावर ताबा नसतो. तो त्या व्यसनाचे आहारी जातो. त्या शिवाय त्याला करमत नाही म्हणजे त्याचा मेंदू त्याशिवाय काम करत नाही. दारू पिणारा त्याची नशा संपली की, तो दारू पितो. ही  वारंवार होणारी क्रिया म्हणजे सवय (व्यसन)होय. 
       व्यसनाची सुरूवात सहज, गंमत, विरंगुळा म्हणून लागते व माणूस कायचा त्यात जिवन गमावून बसतो. यामुळे तो व्यसन नाही केला तर तो चिड चिडपणा वाढतो.  या व्यसनामुळे अनेक घर, जिवन बरबाद होत आहे. यावर एकच उपाय आहे. आपले मनावर ताबा आवश्यक आहे. कारण लोक काही निमित्त करून व्यसन करतात. यात आपले तरूण पिढी ओढली जात आहे. कारण व्यसन करणे फॅशनेबल विचार रूढ होत आहे.  हेच तरूण देशाचे भविष्य आहे. हेच व्यसनाधीन झाले तर देशाची प्रगती होणे अवघड आहे.   
      या करिता शासनाने याचे निर्मिती करणे बंद करावे. हाच चांगला उपाय. कर कमी भेटला तरी चालेल पण माझा तरूण देशाचे भविष्य आहे तो निरोगी,सुद्धड, समृद्धी आणि मुल्यवर्धक असा असेल तरच देशाची प्रगती होईल. 
    *व्यसन रूपी आजार समाप्त होईल तरच देश समृद्ध होईल*
          श्री. बोईनवाड गुणवंत किशनराव 
         होटाळकर (नांदेड) 9921034211
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 13) व्यसनांपासून दूर राहा 

             भूतलावरील प्रत्येक व्यक्ती जीवनात आनंद मिळावा, जमेल तितकी मौज अनुभवावी, नेहमी खुश राहावे आणि मुक्तपणे जीवन जगावे या प्रकारच्या मनोवृत्तीच्या असतात. याच मुक्तछंदाचा वापर करून मानव हळू हळू व्यसनाच्या आहारी जातो आणि त्यामध्ये आकंठ केव्हा बुडून जातो त्यालाही कळत नाही. 
            'जागतिक आरोग्य' संघटनेच्या आकडेवारीनुसार दारू, ताडी, माडी, गांजा, चरस, भांग, अफू इ. मादक पदार्थाचे भारतातील ३०% लोकं नियमितपणे सेवन करतात. या सेवन करण्याच्या पद्धतीत भिन्नता आढळून येते.  तर आँर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार १७ वर्षाखालील ७०% मुलांनी आणि तब्बल ६९% मुलींनी आपल्या आयुष्यात एकदा तरी मद्याचे घोट रिचवण्याचा अनुभव घेतलेला असतो. 
            आर्य समाजात मद्यपान व जुगार खेळण्याचे सर्रास  प्रचलन होते. प्रत्येक राजाकडे जुगार खेळणारा विशेषज्ञ नोकरीला असायचा. सम्राट विराटकडे 'कंक' नावाचा जुगार विशेषज्ञ होता. हे राजेलोक केवळ मनोरंजनासाठी जुगार खेळत नसून त्यावर मोठमोठे डाव लावीत असत. या डावात राज्य, आश्रित, नातेवाईक, गुलाम इ. लावले जात. पांडवांचा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठीर हा जुगारात राजपाट, लहान भावासह पत्नीदेखील गमावून बसला. ऋग्वेदात सुद्धा जुगार खेळून कंगाल झालेल्यांची अनेक वर्णने पाहायला मिळतात. 
              सांगायचे तात्पर्य असे की, व्यसन मानवाला कोणत्या थराला घेऊन जाईल याची शाश्वती नाही.
      व्यसनाधीनता हा मनो-शारीरिक आजार आहे. या आजारात सर्वप्रथम मनाचा भाग क्षतिग्रस्त होत जातो. नंतर वारंवार व्यसन करीत गेल्याने शारीरिक हाणीला सामोरे जावे लागते. 
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज त्यांच्या एका भाजनामध्ये म्हणतात......
" मानव का बडा दुश्मन 
बिघडता सरासर खून न
इसके बडी बुरी है धुंद "
     वरील ओळी या मद्याला अनुसरून उच्चारल्या आहेत हे संपूर्ण भजन वाचलं की आपल्या चटकन लक्षात येईल. 
             व्यसन कोणतेही असो, कशाचेही असो ते मानवाच्या सुदृढ आरोग्याला हानी तर पोहचवतेच त्याचबरोबर कुटुंबातील एका व्यसनी व्यक्तीमुळे त्याच्या कितीतरी पिढ्यानपिढ्या हा प्रकार चालत असतो. त्याच्या अक्ख्या कुटुंबावर व्यसनाधीनतेचा शिक्कामोर्तब समाजाकडून केला जातो तेव्हा आपल्या कुटुंबाचे स्थान आपल्याच समाजात खालावले जाते ते कायमचेच. म्हणून तुमच्या भल्यासाठी, तुमच्या कुटुंबीयांच्या भल्यासाठी तुम्हाला एकच सांगणे आहे- "व्यसनांपासून दूर राहा" ,"कुटुंब जपा" , "स्वतःच्या आरोग्याला जपा" असे कराल तर स्वतः खुश राहाल, इतरणांनाही खुश ठेवाल आणि नकळतपणे देश घडवायला हातभार लावाल. 

नम्रता दिलीपराव उभाळे 
रा. तिवसा (अमरावती )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 14) व्यसन -- क्षणिक सुखाचे मृगजळ  

'सुखाचे सोबती सारे 
दुःखाचे फिरते वारे
मूकाटे करावे सहन
आपलेच भोग सारे '
      अशीच काहीशी आजच्या काळात प्रत्येक मनुष्याची . सतत बदलणारी सामाजिक , आर्थिक , व्यवहारी होत चाललेली नाती या कारणांमुळे आजचा प्रत्येक मनुष्य मानसिक दडपणाखाली आयुष्याचे दिवस कंठत आहेत. कोणी बोलून मोकळं होतं तर कोणी मनातल्या मनात कुढत जीवन कंठत आहेत .कधी आर्थिक चणचण तर कधी घरातील अशांत  वातावरण तर कधी सामाजिक दडपण (काय म्हणतील लोक) अशा नानाविविध मानसिक तणावाखाली एक एक दिवस पुढे ढकलत आहेत .सततच्या‌ वाढत्या तणावा मुळे जगभरात मानसिक डिप्रेशन चे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे . मोलमजुरी करुन पोट भरणारा असो किंवा उच्च वर्गीय मनुष्य असो 
लहान मुलं असो किंवा वयोवृद्ध असो. सर्वच जण कमी अधिक प्रमाणात मानसिक डिप्रेशन खाली वावरतांना दिसत आहे. आपण डिप्रेशन मध्ये आहोत हे फार कमी लोक स्विकारताना दिसतात. आणि वेळेवर औषध उपचार घेऊन बरे होतात.
सतत लहान सहान कारणांवरून चिडचिड करणे‌, रात्री झोप न येणे, एक गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे, सतत काही ना काही विचारात मग्न राहणे, तहान भुक न लागणे ,एकटेच रहायला आवडणे , सतत डोक्यात आत्महत्येचा विचार येणे . हे काही लक्षणे आहेत मानसिक डिप्रेशन चे .
याला कारणे अनेक असू शकतात पण एक कारण प्रामुख्याने समोर येते ते म्हणजे माणसा माणसात होणारा संवाद आता फारच विरळ आणि व्यवहारिक होत चालला आहे . माया प्रेम आपुलकीचे नाते आता फक्त स्वार्थासाठी आणि व्यवहारासाठी उरले आहे. दिवसभरात एकमेकांशी दोन शब्द बोलायला किंवा कोणाचे दोन शब्द ऐकायला लोकांजवळ वेळ नाही . पैसा धनसंपत्तीच्या मागे धावणार्या लोकांना नाते जपण्यासाठी वेळ नाही किंवा  नाते फक्त व्यवहाराठीच उरले आहे. फक्त कामापुरते आणि आपल्या फायद्याचेच बोलणे एवढाच संवाद आता उरला आहे . मला समजून घेणारे कोणीच नाही अशी भावना लहानपणापासून  प्रत्येकाच्या मनात रूळत आहे.  सर्वांनाच आपले दुःख डोंगरा एवढे वाटत आहे .सर्वच जण सांत्वनाचे - प्रेमाचे - मायेचे भुकेले आहेत.  याचा परिणाम म्हणजे आज सहनशक्ती कोणाच्याच जवळ शिल्लक राहिली नाही.सर्वच जण आज  मनाने कमजोर बनलेले आहेत.मनातील सतत उठणार्या  नकारात्मक विचारांचे ओझे कमी व्हावे म्हणून जगात आज लाखो तरुण वाईट संगतीत फसतात आणि  लोक विविध प्रकारच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकतात.
हा एक असा विळखा आहे ज्यात अडकणे सोपे असते पण त्यातून बाहेर पडणे खुप कठीण असते . व्यसन रूपी विष माणसाचे शरीर आतून  पोखरत असतं .ज्यावेळी हे लक्षात येते तेव्हा खुप उशीर झालेला असतो .
व्यसनाधीनता म्हणजे एखाद्या पदार्थाच्या संपूर्णपणे आहारी जाणे त्याशिवाय जगणे अशक्यच असणे ही संकल्पना मनात खोलवर रुजणे.'  
व्यसनांचे सात प्रकारात विभाजन होते . कोणते  आपण आधी ते पाहू.
1) केना बिस इन्डिका -- ह्या प्रकारात भांग , चरस , गांजा ,इ. चा समावेश होतो .
ह्या पदार्थांचे सेवन केल्याने त्या व्यक्तीला काही वेळेसाठी प्रसन्नचित्त किंवा हलकेपणाची अनुभुती होत असते. तेवढ्या वेळेतच ती व्यक्ती व्यसनाच्या छोट्याश्या दुनियेत आनंदित राहू शकते. ह्या व्यसनाचा दुष्परिणाम मानसिक असंतूलन अनिद्रा , बैचेनि आणी स्मरणशक्ति कमी होते .  2) झोप येण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या ---  कमी आणि मध्यम प्रभावी अशा 'बारर्बिचुरेट' आणि 'डायजिपाम' या गोळ्यांनी सर्वसामान्यतः झोप येत नाही तर ह्या गोळ्यांनी मेंदूवर विपरित परिणाम होतो .झोपेसाठी Valium आणि  calmpose ह्या जगातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या  गोळ्या आहेत .  
3) मोरफिन आणि हेरोइन --- आधुनिक काळातील तीव्र वेदनाशामक आणि तीव्र झोप आणि गुंगीत ठेवणारा मादक पदार्थ .हेरोइन मोरोफिन पेक्षा अधिक प्रमाणात प्रभावशाली आहे. पैथिडीन मोरफिन सारखाच प्रभावी आहे . ब्राऊन शुगर मिश्रित हेरोइन हा जास्त विस्तारित झालेले व्यसन आहे . ह्या तीव्र प्रभावशाली व्यसनात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढणे अत्यंत कठीण असते . ह्या व्यसनाची तलप इतकी तीव्र असते की ती व्यक्ती गुन्हेगारीच्या कोणत्याही थराला जाऊ शकते.
4) दारू आणि तंबाखू , सिगारेट ----  ड्रग्ज ब्राऊन शुगर सारखे पदार्थ खुलेआम विक्री होत नाही कारण सरकारची त्यावर बंदी आहे . त्या विरुध्द कडक कायदा आहे . पण दारू ,तंबाखू , सिगारेट या सारख्या नशिली पदार्थाच्या विक्रीने सरकारला भरमसाठ कर मिळतो. त्यामुळे दारू, सिगारेट ,तंबाखू विक्रीवर बंदी नाही त्यामुळे हे सहज उपलब्ध होतात. या पदार्थांच्या विळख्यात सापडलेली व्यक्ती स्वतःचे आयुष्य तर उध्वस्त करतेच पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला देखील दुःखाच्या खाईत टाकते .दारूच्या व्यसनापायी अनेक कुटुंब आज उध्वस्त झालेली आहेत. दारु ची तलप पुर्ण करण्यासाठी व्यसनी घरदार सुध्दा गहान ठेवतो . दारूचा दुष्परिणाम लिव्हर वर , किडनी वर आणि ह्रदयावर सुध्दा होतो . मेंदूची आकलन शक्ती कमी होते . मेंदू विचार करणे कमी करतो . व्यसनी व्यक्तीच्या डोक्यात सतत व्यसनांनचेच संकल्प चालत असतात.
5) मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन --- हे व्यसन सुध्दा दारु इतकेच घातक . आजकाल आपण पाहतो अगदी 3ते 4 वयोगटातील मुलं सुध्दा अँड्रॉइड मोबाईल सहज हाताळतात त्याला सहज ओपन करून गेम्स डाऊनलोड करून आणि  सारा दिवस तहान भूक हरपून  गेम्स खेळण्यात मग्न  असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचे व्यसन जडलेले आहे . मोबाईल इंटरनेट जेव्हढे उपयोगी तेव्हढेच आरोग्यासाठी घातक आहे याचा अति प्रमाणात वापराने डोळ्यांवर ,  मोबाईल आणि इंटरनेट मुळे मैदानी खेळ कमी झाले त्यामुळे शरीराचा व्यायाम होत नाही वजन वाढते  असे विपरीत परिणाम होतात .
6) एम्फेटमाइन ... वर आपण सर्वांनी जी व्यसने पाहिलीत ती सर्व गुंगी आणि झोप आणणारे आहेत . पण एम्फेटमाइन ह्या गोळ्यांच्या व्यसनाने निद्रानाश होण्यासाठी च ह्या गोळ्या घेतल्या जातात . विद्यार्थी वर्ग आणि ज्या कर्मचाऱ्यांना रात्री जागून काम करावे लागते अशी लोकं ह्या गोळ्या घेतात . पण कालांतराने ह्या गोळ्यांची सवय होऊन जाते . परिणामतः ती व्यक्ती अतिआत्मविश्वासी होते . त्या व्यक्तीच्या मनावर ताबा राहत नाही व त्याने मांडलेला मुद्दा तो दूसर्याना समजू शकत नाही . त्या व्यक्तीला काय सांगायचे आहेच कोणाला कळत नाही परिणामतः ती व्यक्ती वेडी होते. म्हणून परिक्षेच्या काळात सुध्दा ह्या गोळ्या कोणी ही घेऊ नयेत . 
7)  जुगार रेस आणि सट्टा .... लवकर श्रीमंत होण्याच्या नदापायी अनेक जणांना हेव्यसन जडलेले असते . ह्या व्यसनापायी माणूस घरदाराला विकून संपूर्ण कंगाल होत असतो .
   आपण पाहिलेत वरील सारेच व्यसने मानवास दुर्गति कडे घेऊन जातात . आजच्या काळात केवळ पुरूषवर्गच नाही तर स्रीयां सुध्दा व्यसनांना बळी पडलेल्या आहेत . गरोदर काळात दारू पिणे सिगारेट ओढणे गर्भावर विपरित परिणामकारक ठरू शकते . बाळ व्यंग घेऊन जन्माला येते किंवा मतिमंद होऊन जन्माला येत असते. 
व्यसन नावाचा राक्षस त्या व्यक्तीला हळूहळू मानसिकरित्या दुर्बल बनवतोच आणि त्याचे शरीर सुद्धा आतून हळूळू पोखरत असतो . त्या व्यक्तीला मृत्यूच्या शय्येवर झोपवल्या शिवाय त्या राक्षसाला चैन पडत नाही .
आईवडील आपल्या मुलांबद्दल फार जास्त प्रमाणात अश्वस्त असतात त्यांना आपल्या मुलावर 100% भरवसा असतो व आमचा मुलगा किंवा मुलगी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. पण आजकाल चे तरूण मुलं सूर्वातीला फँशन म्हणून आणि स्टेटस् म्हणून दारु ,ड्रग्ज घेतात घरी पालकांना हे माहीत नसते .जेव्हा माहीत होते तेव्हा खुप उशीर झालेला असतो . मुलं हातातून निसटून गेलेली असतात ते पालकांचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात . आणि आपले संपूर्ण जीवन उध्वस्त करतात . आपण पाहतो व्यसनी माणसाला समाजात आणि घरात काही किंमत नसते . त्याची फक्त मनधरणी म्हणून तोंडावर स्तूती केली जाते पण माघारी मात्र त्याची निंदानालस्ती  केली जाते . कोणालाही व्यसनी माणुस आपल्या कोणत्याही समारंभात नको असतो . ह्याचा त्या व्यसनाधिन व्यक्तीच्या मनावर जास्तच परिणाम होतो .व तो  व्यसनाच्या डोहातून बाहेर येण्याऐवजी आणखी खोलवर बुडत जातो . खरंतर अशा व्यक्तींना अधिक सात्वनाची आणि प्रेमाची खुप गरज असते . गरज असते त्यांना समजून घेण्याची . गरज असते त्यांच्या मनात खोलवर जाऊन मनातील चालू असलेले विचारांचे अविचारांच्या युध्दा चे कारण जाणून घेण्याची . त्यांना सकारात्मक दृष्टिकोन देण्याची .  लागलेले कोणतेही व्यसन लगेच एका दिवसात सुटत नाही त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी पेशन्स ठेवणे गरजेचे असते व्यसनी व्यक्तीला सतत सकारात्मक विचार देणे गरजेचे असते . 
राजयोग मेडिटेशन शिकून त्या सकारात्मक दिशेने जाऊन . त्या व्यक्तीला मानसिक बळ देणे खुप गरजेचे आहे .

 सौ .सुवर्णा सोनवणे 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
15) व्यसन झालंय फॅशन

व्यसन!व्यसन! व्यसन!
सगळ्यांची झाली फॅशन!

एखाद्या गोष्टीच्या अाहारी जाऊन पुर्णपणे तिचा गुलाम होणे यालाच की,काय व्यसन म्हणून संबोधले जाते.व्यसनाने माणूस मानसिक गुलाम होउन जातो.कुणी फॅशनपायी तर कुणी बेरोजगारी,नैराश्य,असफलता अशा अनेककारणामुळे हे व्यसन जडते.या व्यसनरूपी अजगराने तरूण वर्गाला गिळंकृत करण्याचा जणू काही वसाच घेतलेला अाहे.जो तरूण वर्ग भविष्यातील भारताची धुरा सांभाळणारा,देशाचे भविष्य उज्वल करणारा अाधारस्तंभ अाहे .तोच अाज व्यसनाच्या अाधीन गेलेला अाहे.समाजाच्या,कुटूंबाच्या वाढत्या अपेक्षा,करिअरच्या मागे धावताना येणार्‍या अडचणी,गरिबीमुळे हैराण होऊन थकलेल जीवन,श्रीमंत बापाच्या पोरासोबत केलेली मैञी,राजकारणात तरूणावर उधळपट्टी ,प्रेमातील वैफल्य,वारंवार येणार अपयश या सारख्या असंख्य कारणामुळे हा तरूण वर्ग स्वतःच अनमोल जीवन व्यसनात फेकून देतो.हळूहळू ही सवय वाढत जावून व्यसनाधीन ,गुलाम होतो.
   
   दारू,तंबाखू,विडी,सिगारेट,अफू गांजा,ड्रग्ज,व हल्ली नवीन लागू झालेला सोशल मिडीयाचा अतिवापर ही सर्व व्यसनाची प्रकार अाहेत.हल्ली 10 पैकी 8 जण कशाने ना कशाने तरी व्यसनाधीन अाहेतच.हे सर्व घटक स्वतःच्या जीवनास हानिकारक अाहेत हे माहीत असूनही खुलेअाम याच्या अाहारी जाऊन स्वतःबरोबर कुटूंबाचेही जीवन नष्ट करून घेतात.

*बाळ्या येड्या रताळ्या
खाऊ नको तंबाखू गुटका
होईल टी बी कॅन्सर
लाविल जिवाला चटका

या व्यसनात बुडून गेलेल्या महान हस्तीला कुणीही शहाण्यानी समजवायचा प्रयत्न केला तर त्याला झिडकारून न लावता त्यालाच व्यसनाचे फायदे पटवून देणारे महाभाग ही कमी नसतात.व्यसनाधीन लोकांच्या नादी लागणे भल्याभल्याला महागात पडत.पण हे व्यसन करणारा कुठे जाणतो ,की या दारू गुटख्यामुळे अापल्या शरीराचे अातडे,फेफडे निकामी होतात? स्वतःबरोबर कुटूंबाचीही धूळधानी करून टाकतात.एकूणच समाज व देशाचे नुकसान होते.

सुरवातीला हे व्यसन शौक म्हणून व नंतर जीवनाचा अविभाज्य भाग बनून केले जाते.देशातील सर्व स्तरातून हे होताना दिसते.मग तो श्रीमंत वा गरीब असो! शहरी भागाबरोबर अाज ग्रामीण भागातही पार्ट्या,पब्ज,डिस्को साठी मुले वारेमाप पैसा खर्च करत अाहेत.दिवसभर मिळवलेली तुटपुंजी कमाई संसारासाठी कमी व फालतू शौक करण्यात जास्त खर्च करतात.घरातील भांडीकुंडी विकून,बायकापोरांची काळजी न करता ही लोक सरास अापली हौस पुरवतात.संसाराची राखरांगोळी करतात.मग लेकरांची शिक्षण अर्धवट राहतात.पुन्हा हीच पुनरावृत्ती होते.याऊलट शहरात मौज मज्जा मस्तीसाठी ऐशअारामात जगण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती बळावताना दिसते.
एकूणच काय अाज व्यसन ही समस्या देशाला कमकुवत बनवताना दिसत अाहे.अापण अाज एकविसाव्या शतकात देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहत अाहोत.अाणि अापला हा तरूण वर्ग इथे खितपत पडलेला अाहे.या तरूण वर्गाला जागृत केले पाहीजे, सावध केले पाहीजे.
अापण देशाचे कारागिर अाहोत ही उर्मी,ही क्रांती या तरूणाईत पेटवली पाहीजे,डाॅ.ए.पी.जे.अब्दूल कलाम,गांधी,महात्मा,फुले,डाॅ.अांबेडकर,छञपती शाहू महाराज,छञपती शिवाजी महाराज यांचे वारस अापण अाहोत ही तळमळ यांच्यात रूजवली पाहीजे. अपयश येत जातं न हारता लढलं पाहीजे हा गुण रूजवला पाहीजे.
मग! हे करायच कुणी??हा प्रश्न पडला असेल? हो सोप्प अाहे !
  देशपातळीवरून व्यसनमुक्तीचे अनेक उपक्रमाचे अायोजन केले जात अाहे,जनजागृती केली जाते अाहे.पण अापला समाज फक्त ते दिखाव्यापुरतं करतो अन "शेवटी ये रे माझ्या मागल्या"असचं होताना दिसतं.म्हणून व्यसनमुक्त समाज बनवायचा असेल तर अाधि समाजातील माणसांची मानसिकता बदलायला हवी,मतपरिवर्तन दुसर कुणी करू शकत नाही स्वतःच स्वतःला बदल्याचं ध्येय रूजवाव लागत.प्रत्येक कुटूंबातील लहानमुलांपासूनचं हे संस्कार रूजवावे लागतात.अगोदर कुटूंबातील पालकंानी अापण स्वतःला बदलून घ्यावं मग येणारी पिढी ही अशीच सुविचारी ,सुसंस्कृत बनेल.हल्ली शाळकरी मुलेही व्यसनात फसत अाहेत.म्हणून पालकांनी त्वरित सावध व्हाव,जागरूक व्हावं अापल मुल ही अापली संपत्ती अाहे .त्याला वाईट विचार व व्यसनापासून दूर राहण्याची प्रवृत्ती निर्माण करणारी शिकवण द्यावी.मग पहा कसा सुसज्ज तरूण भारत तयार होईल अाणि व्यसनमुक्त भारत झाला तर महासत्ता बनायला काहीच वेळ लागणार नाही..

बघा पटतय का? 
पालकानों उठा जागे व्हा!
देशाला घडवा..,,

✍🏻श्रीम.रावते ज्योती
 (सहशिक्षिका  )
नांदेड
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
16) व्यसन : चांगले-वाईट
गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी एकमेव उपाय म्हणून प्रत्येक देशाचे शासन लॉकडाऊन या पर्यायाचा अवलंब करत आहे. लॉकडाऊनचा विचार करता जिवंत राहण्यासाठी घरी राहणे सुरक्षित आहे. त्याचबरोबर कोरोना हा विषाणू “शाप की वरदान” या संभ्रमावस्थेमध्ये व्यक्ती आहेत. हा आजार झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.
परंतु याची दुसरी बाजू विचारात घेतली तर ती सकारात्मक आहे. लॉकडाऊनमुळे या अगोदरच्या काळात एवढा कालावधी कुटुंबाला देणे प्रत्येकाला शक्य होत नव्हते. अनेक व्यक्तींना स्वत:च्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तसेच विविध नवनवीन कला गुण शिकण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. या कलागुणांचा भविष्यात सर्वांना नक्कीच फायदा होणार आहे. अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण सहज करू शकतो. उगाचच भीती मनात बाळगत होतो आता अनेक व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढला असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.
अनेक परिवार किंवा व्यक्तीचे संसार व्यसनाधीनतेमुळे उघड्यावर आले होते. शासनाच्या या लॉकडाऊनमुळे बऱ्याच प्रमाणात व्यसनाधीनतेवर सुद्धा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आता सहज व्यसनासाठी उपलब्ध होणाऱ्या गोष्टी मिळत नाहीत. अनेकजण व्यसनातून बाहेर पडल्याचे चित्र समाजामध्ये दिसत आहे. घरामध्ये राहून स्वत:चे कुटुंब, कुटुंबातील व्यक्तींचे महत्व प्रत्येकाला समजत आहे. व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकल्यामुळे चांगल्या गोष्टीपासून दूर लोटलेल्या व्यक्ती आता चांगले गुणकौशल्य आत्मसात करताना दिसत आहेत.
मानसशास्त्रीय अभ्यासक सांगतात की, “कोणतीही व्यसनी व्यक्ती पहिल्याच दिवशी व्यसनी होत नाही.” प्रथम त्या व्यक्ती एखादी गोष्ट करून पाहतात. महिन्यातून एकदा किंवा दोन वेळा व्यसन करतात, त्यानंतर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करतात. त्यावेळी त्या व्यक्तीने समजावे की, आता आपल्याला त्या गोष्टीची सवय होत चालली आहे. पुढे-पुढे ती गोष्ट प्रत्येक दिवशी केली जाते किंवा दिवसातून वारंवार केली जाते. त्या गोष्टीची असलेली सवयीचे रुपांतर व्यसनात होते. ‘एखादी सवय सोडणे सोपे असते, परंतु व्यसन सोडणे अवघड आहे.’
सलग २१ दिवस केलेली कोणतीही गोष्ट ही प्रथम सवय बनते आणि नंतर त्याचे व्यसन होते. मग ती चांगली किंवा वाईट असेल. भगवान महावीर म्हणतात, *“हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे, परंतु एक व्देष दूर करणे फार कठीण आहे.”* व्यसन चांगल्या गोष्टींचे असेल तर सामान्य व्यक्ती सर्वश्रेष्ठ होते, परंतु व्यसन हे वाईट गोष्टीचे असेल तर सर्वश्रेष्ठ व्यक्तीसुद्धा अति सामन्यातील सामान्य होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: ठरवायचे आहे की, ‘व्यसन करताना चांगल्या गोष्टीचे करायचे की वाईट गोष्टीचे....’
-     मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
17)  " सेविता व्यसनाची गोळी ,
  करी उभ्या आयुष्याची होळी!"

     'माणूस ', हा पृथ्वीवरील एकमेव बुद्धीमान प्राणी आहे . तो समाजशील असून समूहात राहतो . शिवाय तो एक अनुकरणशीलही प्राणी आहे . समाजात तो ज्या वातावरणात , परिस्थितीत वावरतो त्या सर्वांचा परिणाम त्याच्या जडणघडणीवर होत असातो . त्याप्रमाणेच त्या मानवाचे व्यक्तीमत्व साकारत असते . 
         " लहान मूल हा एक मातीचा गोळा असतो , त्याला आपण जसा आकार देऊ तसा तो घडत असतो . " समाजात मानवाचे दोन प्रकार ठरविले जातात . एक म्हणजे सदाचारी व दुसरे म्हणजे दुराचारी . एक म्हण आहे , " वर्तनावरून शील ठरत असते . " म्हणून आपण आपले वर्तन सुसंस्कारी ठेवले पाहिजे . तरच सुसंस्कृत व निकोप समाजाची निर्मिती होणार .
     आज समाजात आधुनिकतेच्या नावाखाली जी पिढी भरकटत जात आहे तिला सर्वस्वी आपणच कारणीभूत आहोत . आपणच मुलांना बालपणांपासूनच कामचूकार व आळशी बनवतो . शिवाय त्यांना आपण महागडे मोबाईल , लॕपटॉप , भारी कपडे , चैनीच्या वस्तू , वाहने नि विशेषतः पॉकिटमनीही दिला जातो . या सर्व सुखसोईने तो हळूहळू सुस्त व आळशी केव्हा होत जातो ते आपल्याला कळतचं नाही . आज मानवाला पैशाची एवढी नशा चढली आहे की तो सतत या पैशाच्या मागे - मागे सैराट झालेला दिसतोय . आजघडीला तो आपल्या कुटूंबासाठी फावला वेळही काढू शकत नाही . शिवाय एकत्र कुटूंबाची जागाही विभक्त कुटूंबाने घेतली आहे . त्यामुळे नातेवाईक , पाहूणे यांच्या संपर्कापासून मुले जशी दूरावतात तशीच त्यांच्यापासून मिळणाऱ्या आपूलकी , मायेलाही पारखी होत चालली आहेत . परिणामी मुले एकांगी व एकलकोंडी बनून विरंगुळा म्हणून नशेचा मार्ग नाईलाजाने स्विकारतात . 
     मग सांगा बरे ह्या व्यसनाधीनतेला आपणच कारणीभूत होतो की नाही . व्यसन हे अनेक स्वरूपाचे असते . दारू , गांजा , चरस , विडी , सिगारेट , तंबाखू , गुटखा , गंजीपत्ता , मटका , विविध मोबाईलचे गेम्स , अश्लिल फिल्मे , असे अनेकविध प्रकार असतात . घरातील वातावरण सभ्य व सदाचारी असेल तर मुलेही सुसंस्कारी निपजू शकतात . पण त्यासाठी कठोर व कडक शिस्तीची सवय बालपणीच लावावी लागते . कारण भिंतीत रूजलेल्या बीजाचं रोपट ते लहान असतानाच मूळासकट उपटावे लागते अन्यथा उशीर केल्यास ते रोपटे एवढे मजबूत होते की भिंतीला तडा देऊन अख्खे घरच कोसळून पाडते . हे निर्विवाद सत्य  व्यसनाबाबत आपण विसरता कामा नये .
     व्यसन हा समाजाला लागलेला एक कलंक आहे . जो या व्यसनाच्या आहारी जातो तो तर बरबाद होतोच पण आपल्या सुखी कुटूंबालाही पूर्णपणे बरबाद करून सोडतो . महाभारत ही या व्यसनानेच घडवीले . पांडवांनी द्दुत खेळात आपले राज्य , वैभव , आणि पत्नीही डावावर लावली होती हे आपणांस सर्वज्ञातच आहे . तरीसुद्धा आपला समाज ह्या अशा ऐतिहासिक गोष्टींपासून धडा का घेत नाही ? महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भोलेनाथाच्या नावाने प्रसाद म्हणून भांग का वाटल्या जाते ? एखादी आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी पार्ट्यांमध्ये मादक व नशिले पेयांचाच का वापर केला जातो ? इतकेच काय तर मयताच्या शवासमोरही नातेवाईक दारूची बाटली , विड्या - सिगारेटीचे पाकिटेही सर्रास ठेवतात . कधी होणार अशा जूनाट व मूढ रूढी बंद ? असे अनेक प्रश्न आपण स्वतःच्या मेंदूला विचारून त्यावर मार्ग काढला पाहिजे , अन्यथा आपला सुसंस्कृत व सुसंस्कारी भारत फक्त इतिहासातच पहावा लागेल . म्हणून वेळेपूर्वीच शहाणे झालेले बरे .
     आपल्या देशात व्यसनमुक्तीसाठी अनेक आदर्श व थोर विभूतींनी अविरत कार्य केलेत . संत गाडगेबाबानी आपल्या स्पष्ट व परखड वाणीने भजन - किर्तनातून अनेक नशेखोरांना या विळख्यातून बाहेर काढले . शिवाजी महाराज हे तर अख्ख्या भारताचेच दैवत . ते एक निर्व्यसनी व शुद्ध चारित्र्याचे होते . अशा महापुरूषांची तस्बीरे प्रत्येक घरी , कार्यालयात लावली जाऊन त्यांची पूजा केली जाते ! पण त्यांच्या सद्विचारांची पूजा  मनातून केव्हा केली जाणार ? जेव्हा मानव मनापासून अंर्तमुख होणार तेव्हाच ह्या व्यसनाधीनतेचा महाप्रश्न सुटणार .
    " माणूस हा केवळ विचारावरच जगतो . " जसे विचार तशी कृती घडत असते . म्हणून विचार शुद्ध व पवित्र बनविणारे एकमेव साधन म्हणजे योगासने व ध्यानधारणा होय . हे एकमेव शस्त्र आहे ज्याने   "वाल्याचा महर्षी वाल्मीकी " होऊ शकतो ! अनेक विस्कळित व भग्न कुटूंबे सुखी - समाधानी होऊ शकतात . म्हणून घरी सर्वांनी प्रातःकाळी योगासने व ध्यानधारणा करावी . ज्यामूळे मनातील सकारात्मक ऊर्जा जागृत होऊन नकारात्मक ऊर्जा आपोआप चुटकीसरशी अंर्तमनातून बाहेर जाईल !! माणसांच्या स्वार्थी व असंतुष्टवृत्तीस लगाम बसून तो समाधानी , आत्मसंतुष्ट , संयमी , संतुलित व शालीन होईल . यामुळे व्यसनच काय भ्रष्टाचार , गुन्हेगार , व्याभिचार , आदी अनेकविध समस्यांचे निर्मूलनही आपोआपच होईल यात शंकाच नाही .....
      शेवटी एवढं सांगू इच्छिते की जीवन हे एकदाच मिळते , ते अशाप्रकारे व्यसनेच्या घाणीत व्यतीत करून स्वतःसह कुटुंबाची , समाजाची , देशाची  दूर्दशा का करावी ? सुख हे आपल्या मानन्यावर असते ! म्हणून मनाच्या घोड्याला नेहमीच
विवेकाचा लगाम घालावा अन्यथा तो स्वैर होईल ...... 
     प्रेम व आपूलकीने समज दिल्यास व वाईटाला वाईटांची जाणिव करून दिल्यास कितीही व्यसनी माणूस व्यसनमुक्त होतोच . नि हरवलेल्या जीवनातील आनंद पुन्हा प्राप्त करण्यास तत्पर होतो . " केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . " या उक्तीचा प्रत्यय जीवनात खरोखरच आल्याशिवाय राहणार नाही .

✍️ अर्चना दिगांबर गरूड 
         ता. किनवट , जि. नांदेड .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
18) 
 जगतगुरू संत तुकाराम  महाराजांचा एक अभंग आहे, तुकोबा म्हणतात, 
" ऐसे कैसे झाले कली। दबंग तोंडी तमाखूची नळी॥
स्नान संध्या बुडविली। पुढे भांग उडविली॥
भांग भोरला हे साधन। पचनी पडे मद्यपान॥
तुका म्हणे एवढे सोंग। तेथे कैसा पांडुरंग॥"
   खरंच व्यसन हे मानवाच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे. एकविसाव्या शतकात मनुष्य माहिती ,तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील युगाकडे वाटचाल करताना दिसतोय. मात्र व्यसन हा आजच्या मानवी प्रवृत्तीला जडलेल्या असाध्य रोग आहे. आजची पिढी ही आधुनिकतेचा  उज्ज्वल सूर्याची कास धरतो आहे. माणसाच्या असामान्य कर्तृत्वाचे कितीही कौतुक केले तरी कमीच पडते.परंतु याच कर्तृत्त्वाला आजच्या काळात व्यसन नावाचा रोग जडला आहे.
    आधुनिक युगामध्ये व्यक्तीची बुद्धी, ज्ञान, चिंतनशीलता, या सर्वांचा जलदगतीने विकास होताना दिसतो मात्र आपल्या क्षणिक सुखासाठी किंवा दुःखांचे दमन करण्यासाठी मानव व्यसनाच्या आहारी जातो,ही गोष्ट वाईट आहे. 
   प्रत्येक मानव हा जीवनात त्याला आनंद मिळावा या मनोवृत्तीचा असतो. विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ, कपडे, महागड्या गाड्या, मोठे घर,  वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधने, पर्यटन, कला, क्रीडा,  साहित्य असे आनंद  मिळविण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत . काही जण असा आनंद मिळविण्यासाठी मादक पदार्थांचा आधार घेतात. या पदार्थांच्या सेवनाची सुरुवात जरी आनंदाचा शोध, मित्रांचा आग्रह, श्रमपरिहार, तणावमुक्ती, एखाद्या व्यथेला विसरणे, संगत,  अनुकरण वगैरे मार्गांनी झाली असली तरी यांचे होणारे दुष्परिणाम विनाशकारी ठरतात. 
   मादक द्रव्यांचे सेवन केल्यानंतर शरीर मनाची अवस्था ही अत्यंत आनंददायी असते, प्रत्येकाला आवडणारी असते. या अवस्थेत व्यक्तीची रसिकता बहरते, मनमोकळेपणा जाणवतो, कल्पनाशक्ती जागृत झाल्याचा आभास होतो, आपण खूप शक्तिशाली आहोत,शूर आहोत, असे वाटू लागते. हे सर्व अनुभव मानवी मेंदूत संग्रहित केले जातात . मग स्वाभाविकच असे अनुभव पुन्हा पुन्हा घेण्याची ओढ निर्माण होते. जे लोक जास्त संवेदनशील असतात, अशांच्या बाबतीत हे अनुभव घेण्याची ओढ इतरांच्या तुलनेत अधिक असते आणि अशा प्रकारची माणसे व्यसनाच्या आहारी जातात. 'व्यसन' म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आनंद मिळावा म्हणून केलेला मानवी प्रयत्न किंवा अंगी जडलेली सवय. पण व्यसन हे फक्त आपण एक प्रकारची नशा किंवा लागलेली सवय म्हणूया. मग ती आपण फक्त वाईटाकडे म्हणजे मदिरा,गुटखा,तंबाखू व पुर्वापार म्हणजेच महाभारताच्या  किंवा रामायणामध्ये घडलेल्या घटना सुद्धा एक व्यसनाचा भाग होता. म्हणूनच महाभारत व रामायण घडले. हे तर रामायण महाभारत या पुराणातील घटनेचा आढावा घेऊनच कळते. परंतु आजच्या युगात किंवा एकविसाव्या शतकाचा विचार केलात तर व्यसन हे फक्त वाईट गोष्टींचेच असू शकते का ? जर प्रगल्भ विचार करण्याची पातळीचह जर पालकांनी आपल्या पाल्यास दिली तर व्यसन हे चांगल्या सवयींचे सुद्धा असू शकते. हे शेवटी ज्याच्या त्याच्या वैचारिक पातळीवर अवलंबून असते. 
    आपण जर मुलांना वाचनाचे, सुंदर गाणे म्हणण्याचे, एखादे वाद्य सुंदर रीतीने वाजविण्याचे व छान मैदानी खेळांमध्ये भाग घेऊन प्रावीण्य मिळविण्याचे वेड लावले तर मुलांना ते चांगल्या व्यसनाप्रमाणे लागते व तेही त्यात प्रावीण्य मिळवू लागतात. आजकाल लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत मोबाइलचे व्यसन जडलेले असते. त्यातून तर आपण आपल्या मुलांना त्याच्या वापराविषयी खबरदारी समजाविले व  काय योग्य काय अयोग्य हे त्यांना समजाविले तर ते व्यसन नसून योग्य परिणाम दायी वापरात बदल होतो.
    व्यसन हे वाचनाचे,लिखाणाचे,  व कविता करण्याचे,अभंग, भारुड, कीर्तन ऐकण्याचे, समाजप्रबोधन व वेगवेगळी साहित्य वाचन असे असंख्य प्रकारचे व्यसन मानवाला जडले तर किती सुंदर होईल. एखाद्या गृहिणीला सुद्धा सुंदर पाककृती करण्याचे व्यसन जडलेले असते. ते कसे काय??? छान छान पाककृती बनवून ते छान सजवून सादर करून इतरांना खाऊ घालण्यात तिला जो आनंद असतो तो द्विगुणीत असतो. परंतु त्यावर तिचे तेवढे कौतुकही होणे अभिप्रेत असते. 
    कविता करणे हा एक प्रकारचा छंद किंवा व्यसनच म्हणावे लागेल. यात उत्कृष्ट नमुना म्हणजे बहिणाबाई. या शेतात काम करता करता,दळण दळता दळता, भाकरी करताना,  झाडावरील पक्षी बघूनसुद्धा त्यांना छान छान मधुर आणि गेय अजरामर कविता  सुचत असत. 
   संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई ,सोपान, मुक्ताबाई, एवढे महान संत या पृथ्वीतलावर होऊन गेलेत. त्यांचे मुख्य व्यसन म्हणजे परमेश्वरावरील भक्ती. ईश्वरावर एवढी अपरिमित भक्ती असणं  सुद्धा एक प्रकारचे व्यसनच आहे.             म्हणून व्यसन हे वाईटच गोष्टींचे असावे असे अजिबात नाही. 

योगिता नागमोती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19)  व्यसन !

          व्यसन हे चांगले किंवा वाईट असू शकते. व्यसनाच्या आहारी गेलेला मनुष्य हा कुणाचेच ऐकत नाही.त्याला व्यसनापुढे सर्वच तुच्छ वाटत असते.जेवण सुध्दा त्याला नकोसे होते.मादक पदार्थांचे व्यसन हे शरीरास हानिकारक ठरत असते.काहींना सहगमनाचे व्यसन हे लागलेले असते. आजच्या काळात स्मार्टफोनमुळे सारे जग जवळ आल्याने तरूणांईत याची क्रेझ वाढत असल्याचे लक्षात आलेले आहे.यामुळे काहींची पाऊले चुकीच्या मार्गाने गेल्याने त्यांनी स्वत:ला व कुटुंबातील लोकांना सुध्दा संकटात टाकलेले आहे.ही झाली व्यसनाची अंधारी बाजू.
             व्यसन हे चांगले सुध्दा असू शकते. डाॅ.बाबासाहेबांना तरूणांना वाचनाचे व्यसन जडले पाहिजे असे वाटत होते.आजचे जग हे एका क्लिकवर जगातील चांगली-वाईट माहिती प्राप्त करू शकते.चांगली माहिती प्राप्त केल्याने आपले ज्ञान हे संपन्न होवू असते.याचा फायदा आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी होत असतो.खेळाचे व्यसन हे माणसाला उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याचे नावलौकिक व संपन्नता ही मिळवून देवू
शकते. चांगले नागरीक होण्याचे व्यसन सर्वांनाच जडले गेले पाहिजे.यामुळे आपले राष्ट्र सक्षम होवू शकते.प्रगतीबाबत व प्रामाणिकते बाबत जपानचे अनुकरण करण्यास हरकत नसावी.चांगले ते व्यसन स्विकारावे आणि वाईट ते व्यसन सोडावे तरच आपली आणि राष्ट्राची प्रगती ही वेगाने होवू शकते. संपूर्ण जातीचे कल्याण व मानवता जपण्याचे व्यसन ज्या राष्ट्रास जडेल  तेच राष्ट्र या पृथ्वीतलावर राज्य करू शकणार आहे.याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.
                        * मिलिंद गड्डमवार, राजुरा.
                           जिल्हा-चंद्रपूर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

20) व्यसन 

अचानक रात्री जाग आली बघते  तर अंधार..... समोर कोणीच नाही अचानक रडू आले . आज आज काहीतरी हरवले याची कल्पना झाली. मग आठवले आज एक गोष्ट राहुन गेली. आज आईला कॉल केलाच नाही.        
      ``दुष्परिणाम माहिती असूनही 
       केले जाणारे प्रेम म्हणेज  व्यसन",
होय, कॉल करणे हे मला लागलेले व्यसन आहे. आजही तो दिवस आठवतो, नेहमीप्रमाणे कॉल करणारी मी त्या दिवशी कॉल केलाच नाही. आणि त्याच्या आदल्या दिवशी कॉल केला तेव्हा फक्त आई सोबतच बोलले मी. पप्पांना कॉल केलाच नाही. आणि जो कॉल आला तो हृदयाचे पाणी पाणी करून टाकणारा होता. पप्पा अस्तित्वात नाही असा कॉल होता तो. का बोलले नाही मी पप्पांशी? का कॉल केला नाही मी त्यांना ? मनात राहिलेली आयुष्य भरासाठीची खंत. 
        मनात एक भीतीच असते आता कॉल नाही केला तर.....
कॉल करणे हे व्यसन लागले आहे.
व्यसन म्हटल तर नकारात्मक गोष्टी 
डोळ्यासमोर येतात. परंतु मला लागलेले हे व्यसन भीतीपोटी निर्माण झाले असले तरी त्यात सकारात्मकता  आहे.आज पप्पा नाहीयेत .त्यांचा आवाजही ऐकता  येत  नाही .आई  सतत  आजारी  असते ,त्यामुळे तिला कॉल  केला  नाही तर मन बैचैन होते .जसे  आपल्याला  एखादया गोष्टीची  सवय लागली  की आपण  त्या  शिवाय राहू  शकत  नाही तसेच  व्यसन  मला लागले  आहेत                     
        "फालतू  व्यसन करायला हिंमत  नाही  लागत ........             
 हिंमत लागते  ते  आयुष्यभर चांगले व्यसन लावायला " .

  निलम गायकवाड पुणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आपण जगा दुसऱ्याला जगवा....*

  एका प्रथित यश लेखकाने म्हटले आहे 'ज्या घरात व्यसनी मनुष्य नाही त्याच घरातून चारित्र्यवान माणसे जन्माला येतात.'खरोखरच जग भरातील सांसारिक दुःखाच्या कारणांपैकी 90 टक्के घरातील कारणे ही व्यसनाशी निगडित आहेत.
  व्यसन मग ते कोणत्याही प्रकारचे असो वाईटच!!,दारू,सिगारेट या व्यसनांची सवय माणसाला मनुष्यत्वाकडून राक्षसी प्रवृत्तिकडे नेते. असं म्हणतात कली युगातील खरा कळी म्हणजे 'व्यसनच' मानावा लागेल.
   नशा म्हणजे विनाश...!हे माहिती असूनही अनेक जण दारूच्या आहारी जातात.आपल्या मुला बाळांसह आपल्या संसाराची दुर्दशा स्वतःच्या डोळ्यासमोर बघूनही व्यसनी माणूस काहीच बोध घेताना दिसत नाही. 'दारूची नशा करी संसाराची दुर्दशा' हे माहिती असूनही दारूची चटक लागलेल्या व्यक्तीचे पाय अपवापच गुत्या कडे वळतात.
    जग भरातील 99 टक्के गुन्हे हे अशा व्यसनाच्या अंमल असतानाच घडतात हे ही आपण समजून घेतले पाहिजे. व्यसनी मनुष्य या व्यसनांमुळे स्वतःचा विवेक हरवून बसतो आणि नको ते गुन्हे व्यसनांच्या नशेत करून बसतो.
 आयुष्य फार सुंदर आहे ते सुंदरच राहिले पाहिजे.व्यसने अनेक विकार जडवून आयुष्य कठीण करून टाकतात. मित्रांनो,या विश्वात जर स्वर्ग कोठे असेल तर तो आहे आपल्या परिवारात आणि असं म्हणतात हा नरदेह प्राप्त होण्यासाठी  84 लक्ष योनी फिरून यावे लागते.
थोडक्यात सर्व योन्या फिरून सर्वात शेवटी मनुष्य जन्म मिळतो.या जन्मात आल्यावर प्रेम, नम्रता, पवित्रता ,व्यापकता ,दया ,सेवाभाव,आपुलकी असे गूण आपल्याला शिकायला मिळतात.आई,वडील,बहीण, भाऊ,पत्नी,मित्र,शिक्षक,अशी कितीतरी छान छान नाती आपल्याला संस्कारित करतात.खरं तर या नात्यात जर प्रेम आणि आपुलकीचा ओलावा असेल तर स्वर्ग म्हणतात तो  पेक्षा वेगळा खचितच नसेल.स्वर्ग शोधण्यासाठी आपण आकाशाकडे न पाहता आपल्या आसपास पाहायला पाहिजे.आपल्यावर स्वतःच्या जिवापेक्षा जास्त प्रेम करणारी आई, सतत मायेची पाखर घालणारे व खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे वडील, जीवनभर  आनंदाने सोबत करणारी पत्नी, गरजेला तत्परतेने उपयोगी पडणारे  मित्र.ही नाती या पृथ्वीवरील आश्चर्य म्हणावे लागेल.अशी पदोपदी आपल्याला जपणारी माणसे आपल्याला कुठे मिळणार आहेत.या सर्वांच्या सोबत या जगाचा आनंद  घेण्यासाठी हे जीवन अपुरे पडेल.पण हे सर्व माहीत असूनही जेव्हा व्यसनी माणसे 'कळतंय पण वळत नाही'या पध्दतीने वागताना दिसतात तेव्हा मात्र वरील सर्व नात्याना अशी माणसे डोकेदुखी ठरताना दिसतात 
  म्हणून मला वाटतं की आपल्याला हा अगदीच दुर्मिळ असा जन्म मिळालेला आहे.मस्त जगा आपल्या परिवाराला जपुन  सर्वांना सुख द्यायचा प्रयत्न करूया.आणि हे सर्व करण्यासाठी जे शरीर आपल्याला लाभले आहे आहे त्याची प्रथम काळजी घेऊया.कारण शरीर व मन निरोगी असेल तरच आपण या जन्मी सर्व सुखं भोगू शकतो व इतरांनाही सुख देऊ शकतो.
 अन्यथा याच जन्मात नरकाचा अनुभव होऊ लागतो.अनेक रोग लागतात.हे रोग बरे होता होत नाहीत,आणि परिवारालाही केवळ आपल्यामुळे त्रास भोगावा लागतो.आणि या रोगांचे मूळ कारण असते आपल्याला लागलेली व्यसने.तंबाखु मुळे तोंडाचा कँसर, विडी सिगारेट मुळे फुफ्फुसाचे बरे न होणारे विकार. दारू मुळे लिवरचे विकार.हे विकार याच जन्मात नरकाचा अनुभव देऊन टाकतात.
   स्वतःचे आयुष्य तर बरबाद होऊन जातेच इतरांनाही प्रचंड मनस्ताप.हे झाले आपले व आपल्या परिवाराच्या आरोग्याबाबत.आपण आपल्या सोबत पर्यावरणाचे आणि समाजाचे किती नुकसान करतो याचाही जरा विचार केला पाहिजे.व्यसनी माणसे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तंबाखू खाऊन जिकडे तिकडे थुंकत असतात.पानाचे तोंबारे तोंडात कोंबून मनाला वाटेल तिकडे पिचकाऱ्या मारत बसतात.विडी सिगारेटी फुकत हवेत धूर सोडत असतात.तंबाखू ची थुंकी व पानाच्या पिचकाऱ्या जमिनीवरील मातीत मिसळतात आणि मातीतुन हवेत.आपले विकार थुंकीच्या माध्यमातून पसरतात.आणि सिगारेटीचा धूर हवेलाच दूषित करून टाकतो.आजूबाजूचे बिचारे मनात नसतानाही नाईलाजाने अशा व्यसनी माणसांनी सोडलेला घातक धूर श्वासावाटे शरीरात घेतात.आता मला सांगा तुम्ही आपली हौस भागवता मात्र समाजाला किती रोगी करत आहात. आपली मुले बाळेही हाच दूषित श्वास घेत आहेत हो.लोकांसाठी नाही आपल्यांसाठीतरी थांबवा आता.समाजाचे आणि पर्यावरणाचे दुश्मन बनु नका. व्यसने सोडा आणि स्वतःही निरोगी जागा आणि इतरांनाही जगू द्या.नाहीतर फक्त तुमच्याच परिवारावर नव्हे तर समस्त मानवजातीवर आपण नुसते भार आहात असे म्हणावे लागेल.
    समस्त मानवाला मोकळा शुद्ध श्वास घेण्यासाठीआपण व्यसनी होऊ नका. तसेच मेहनतीने कमावलेला पैसा शरीराचे वाटोळे करण्यासाठी खर्च करू नका.जन्माचे सार्थक करायचे कि किडामुंगी सारखे मरून जगायचे ते ठरवा.परिवाराची सेवा करायची कि त्यांनाच आपली सेवा करायला भाग पाडायचे ते ठरवा.चला तर मग ,एक सुंदर आयुष्य जगुया.

*डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर*
         शहापूर ,(ठाणे)9226435827
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
व्यसन म्हणजे समाजाला लागलेली किड.

आपल्या देशाने नाही म्हणता म्हणता ब-याच क्षेत्रात प्रगती केली. पण खरतर प्रगती पेक्षा अधोगती च जास्त दिसत आहे. याला कारण प्रशासकीय यंत्रणा मजबूत नाही. मी या लेखात खास करून ग्रामिन भागातले भयानक असे चित्र आपल्या समोर उभे करते.हल्ली ग्रामिन भागात व्यसनाचे प्रमान खुप वाढले आहे. अगदी लहानपणापासून तर मोठ्या पर्यंत गावातील ७५%लोक दारू व खर्रा च्या आधिन गेले आहे. त्यांना दारू साठी कुठे बाहेर पडायचे काम नाही. गावात च एखाद्याच्या शेतात हातभट्टी ची दारू काढली जाते.  आणि सगळं गाव तिथे ‌दारू पिण्याकरीता हजर असते . दारु काढणारा मानुस आणि विकनारी त्याची बायको. कोण आलं कोण गेलं याकडे लक्ष ठेवण्यासाठी त्याचीच लहान मुले.कधी कधी एखादयाने तक्रार केली तर गावात पोलिस येतो आणि हे त्या दारु विक्री करनार्या बाईच्या छोट्या मुलाला कळत आणि तो पोलिस गावात येणारया आधि घरी बातमी पोहोचवतो नि पोलिस येण्याआधि दारूचे दुकान गायप. अश्या पध्दतीने खुप छान व्यवसाय चालतो. कधी ‌कधी अचानक पोलिसांची धाड पडते त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात येते आणि दोन दिवसांत पुन्हा सुटका करून दारूचा व्यवसाय सुरळीत ‌सुरु होत. कधी कधी तर एखादा पोलिस ही तीथे दारु पित गप्पा मारत बसला असतो. गावचे सरपंच, पोलिस पाटील हे तर तिथं पडलेच राहातात. त्यामुळे दारु विकणारे शिरजोर बनतात. निवडणूक जवळ आली की सगळं गाव दारुत लोळत असते. घरातिल स्त्रिया कामाला शेतात जातात आणि हे माणस‌ दारु पिऊन कुठे हि लोळत असतात. आणि घरी आल्यावर पुन्हा बायको ला‌ मारणार . जुण्या काळातील स्त्रिया नवर्याचा अत्याचार सहन करुन तिथेच आयुष्य काढायच्या पण आता ग्रामिन भागातील चित्र अजुनच भयानक झाले आहे. आता घरचा पुरुष पिऊन रात्रभर घरात पडला असतो आणि हि स्त्रि स्वताची शारीरिक भूक मिटवण्यासाठी आपल्यापेक्षा लहान मुलांना सुध्दा काही लावते. याला जबाबदार कोण? फक्त व्यसनच. आणि अश्यापध्दतिने किती तरी स्त्रिया अधोगतिला चालवल्या आहे. गावात , शेतात बरेच घानेर्डे वर्तन केले जाते. आणि त्यामुळे दिवस न दिवस  ग्रामिन भागातील चित्र भयानक होतं आहे. याचा शासनाला असल्यास नाही आणि अनुभव नाही. राजकारणी या लोकांचा उपयोग निवडणूक आली की करून घेतात.
गावात ‌सभेसाठी गाडया पाठवल्या जातात. दारुसाठी नेत्यांन कडुन पैसे  मिळतात. जेवन मिळते . ग्रामिन लोक खुश होतात आणि राजकीय नेते हि .पण ह्या व्यसनाधीनते मुळे समाज कोणत्या स्तराला जात आहे याचं भान कोणालाच नाही. मोठ्यांच्या पाठोपाठ शाळकरी मुले ही दारू पिऊन ‌शाळेतिल मुलींची छेड काढणार आणि मग मोठा रांडा होणार .हे सगळे व्यसनामुळे. पुर्वि शेतात जाणारया स्त्रिया सुंदर सुंदर भजन म्हणत शेतात काम करीत असे पण आता घरून निघताना त्या सुध्दा पानठेल्यावर जातात आणि गुटखा, खर्याच्या पुढल्या सोबत नेतात . सतत त्यांच्या तोंडात गुटखा असतो. याला जबाबदार कोण?  त्यामुळे  मुखाच्या कर्क रोगाचे प्रमाण वाढले.
व्यसनाधीनते मुळे हे लोक स्वाभिमान हरवुन बसले आहे. पैसा पुरत नाही. मग फुकटच कुठुन मिळेल का ? या शोधात असतात. योजनांच्या मागे धावत असतात. शाळेत मुलांना फुकटचे पौष्टिक आहार, पुस्तके, गणवेश मिळाले पाहिजे यावर त्यांचा भर असतो. मुलांना ही फुकटच्या वस्तुंची किंमत नसते. इतकं भयानक चित्र आहे ग्रामिन भागातील लोकांचे. मग आत्महत्या चे प्रमान वाढले .
मला एवढेच म्हणावयाचे आहे की वाली कोणी च नाही का. रात्रभरात सरकारी नियम लावले जातात . मग व्यसनासाठी कठोर कायदे का केलेल्या जात नाही? हा मला भेडसावणारा प्रश्न आहे. कोणी उत्तर देवु शकाल?

सौ. मेघा विनोद हिंगमिरे
शिक्षिका
भारत विद्यालय वेळा,ता. हिंगणघाट
जि. वर्धा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   व्यथा व्यसनाची

           व्यसन म्हणजे विकतचे दुखणे. व्यसन म्हणजे व्यक्तीला लागलेली अशी सवय जिच्यामुळे त्या व्यक्तीचे शारीरिक, मानसिक, सामाजिक नुकसान होत असूनही त्या सवयीत बदल करणे त्यास सर्वथा अशक्य असते. ज्याचे मन अस्थिर चंचल असते,  खंबीर नसते ती व्यक्ती  लवकर व्यसनाधीन होते.
            मेंदूला बधीर करणाऱ्या कोणत्याही मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन करणारी व्यक्ती म्हणजे व्यसनी व्यक्ती. ज्यामुळे स्वतःच्या पायाने एकेक पायरी उतरत जाऊन मृत्यूच्या गर्तेत ती संपून जातात.
           व्यसनी व्यक्ती स्वतःच्या भावनांवर, विचारांवर नियंत्रण गमावून बसते. त्याचे स्वभावदोष, मानसिक विकार असतील तर ते या काळात जास्त उफाळून येतात. सगळ्याचे ताळतंत्र गमावून बसलेली व्यक्ती आपले सामाजिक जीवन त्रासाचे करून घेते. रोजची शिवीगाळ, मारझोड, भांडणे यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींनाही त्याचा खूप त्रास होतो. व्यसनी व्यक्तीकडे समाज एक वाया गेलेली व्यक्ती ह्या नजरेने बघत असतो. व्यक्ती व्यसनाच्या इतकी आधीन होते की ती व्यक्ती  अगदी हतबल होऊन जाते. म्हणजेच ही व्यसनापायी ओढवून घेतली घेतलेली मानसिक गुलामगिरी.
            बरेचदा मुबलक पैसा सहज हाती आल्यामुळे माणूस व्यसनाधीन होतो. आईवडिलांकडे मुलांसाठी वेळच नसतो. म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव हेही कारण असू शकते. कधी कुठल्यातरी गोष्टीची उत्सुकता हेही कारण असू शकते. उदाहरणार्थ दारू काय आहे? त्यात नशा किती चढते? यासाठी 'एकच प्याला' घेतला जातो. पण नंतर मात्र 'सुधाकरा'चा 'तळीराम' तयार होतो. यात संगत कारणीभूत असते. 'संगती संग दोषेण' म्हणतात ते खोटे नाही. वाईट गोष्टी करण्यास सोप्या असतात. त्यामुळे त्याची सवय चटकन लागते.
         बेरोजगारी, त्यामुळे मोकळा वेळ, ताणतणाव, नैराश्य, खोटा दिखावा, एकटेपणा, अपयश अशी पण कारणे व्यसन लागण्यास कारणीभूत होतात. ही व्यसने समाजाला पोकळ करतात.
        व्यसने खूप प्रकारची असतात. सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती दारू पिऊन जिंकलेली व्यक्ती. तपकीर ओढणे, गांजा ओढणे, तंबाखू खाणे ही व्यसने. काहींना पत्ते खेळण्याचे व्यसन असते. काहींना घोड्यांची रेस खेळणे, त्यावर पैसा लावणे हेही एक व्यसन. सट्टा खेळणे हा ही त्यातीलच भाग. यात बघता बघता माणूस राजाचा रंक होतो. अगदी क्षुल्लक चहा पिण्याचे ही व्यसनच. हल्लीच्या पिढीचे आणखी वेगळे व्यसन. चोवीस तास मोबाईल वर असणे. मोबाईल फोन शिवाय ते जगू शकत नाही. त्यात खेळल्या जाणाऱ्या गेम्स मुळे लोकं आपलं सुंदर आयुष्यही गमावून बसतात. या मोबाईल मुळे घरातल्या घरात एकमेकांशी भेटणे, गप्पा गोष्टी सर्व बंद झाले आहे. जणू माणसाला माणसाचे नाते नको झाले आहे.
           व्यसनी माणूस मन एकाग्र करू शकत नाही. त्यामुळे नोकरीवर त्याचा परिणाम होतो. कुठलेच काम तो नीट करू शकत नाही. त्यामुळे थापाथापी, खोटे बोलणे, या सवयी लागतात, व्यसनी माणूस आमूलाग्र बदलतो हेच खरे. कायम पैशाची तंगी. त्यामुळे कोणतीही सबब सांगून (खोटी) व्यसन करणे, हीच त्याची प्राथमिक गरज बनते.
          व्यसनाधीनता हा एक मानसिक आजार आहे. त्यावर उपचार आहेत. व्यसनापासून मुक्ती होऊ शकते.  विविध व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. तिथे राहून उपचार घेतल्यास व्यसनमुक्ती होते.
           व्यसन, मग ते कोणतेही असो, वाईटच. 'अति सर्वत्र वर्ज्ययेत्'.
           माझ्या एका मैत्रिणीला कामाचे व्यसन आहे. अगदी वर्कोहोलिक. कामाची तिला झिंग चढते. ती रिकामी कधी बसूच शकत नाही. नव्हे, तीला रिकामे बसणे मान्यच नाही.
          माझ्या घरी मी सर्व मैत्रिणींना जेवणासाठी बोलवण्याचे ठरवले. नीला नेहमीप्रमाणे पहिल्या माझ्या वाक्यानंतर नकार देऊन मोकळी झाली. "नाही गं  मला नाही जमणार. मला कुठे आहे वेळ? असे म्हणून दहा कामांचा पाढा तिने माझ्यासमोर वाचला.
          मी तिला म्हटले, "अगं, ही सर्व कामे आम्ही पण करतोच. तू आज तुझ्या कामांची यादी कर. त्यात priority कुठल्या कामाची आहे ते बघ. तेवढी करून तू ये. अगं सगळ्याजणी येणार आहेत. घर आज अगदी मोकळे आहे. त्यामुळे आपल्याला अगदी धम्माल करता येईल बघ. पण तिचा आपला नन्नाचा पाढा चालू.
        खरं सांगू का, तिला अति स्वच्छतेचे वेड. त्यामुळे तिला वेळेची मॅनेजमेंट जमतच नाही. स्वच्छतेच्या नादात आपले स्वास्थ्य बिघडवून घेते. आणि मग होते सारखी चिडचिड. बाकी सगळ्यासाठी वेळ कमी पडतो. अगदी अंतरातल्या व्यक्तीची भावनिक भूक तिच्या लक्षात येत नाही. इतकी ती त्या कामाच्या जाळ्यात आडकते. मग तिला उगाच वाटतं आपलं आयुष्य म्हणजे,' एकला चलो रे. आपल्याला कोणाची मदत नाही .'
         मुलांचे संगोपन, आईपण आणि इतर भूमिका पार पाडताना मुलांच्या शिक्षणाचा आर्थिक भारही व्हायचा. यातून हा सुपरवुमन सिंड्रोम तयार होतो. आता मल्टी टास्किंग चा जमाना आहे. व्याप एवढे वाढले आहेत. आपणही गती वाढवली नाही तर मागे पडण्याचे भय आहेच. आपले आयुष्य एका ठराविक चाकोरीतून जाते. ते थांबायला पाहिजे. त्यातच ती पत्नी म्हणजे काही तासांची बायको आणि अनंत काळाची माता या विचारात सुपर वुमन होण्याचा ध्यास घेते. पण ह्या साठी लागणारे वेळेचे गणित, कामाचे गणित,  मात्र तिला कधीच जमत नाही.
           मी जर मुलांना वेळ दिला नाही, मुलांना कशात अपयश आले तर बोट आईकडे दाखवले जाते. पण हा वेळ देणे हा qualitative असावा quantitative नसावा. त्यामुळे थोडासा वेळ मुलांबरोबर घालवला तरी चालतो. योग्यवेळी 'नाही' म्हणता येत नाही. आणि त्यामुळे कामाच्या कचाट्यात अडकले जाते. घरात सारखी चिडचिड सुरू झाली की, घराचे स्वास्थ्य बिघडते.
तर असेही हे एक व्यसन.
         व्यसन हे विनाशकारी वादळ आहे. ह्यात आत्ताची पिढी पूर्णपणे अडकलेली आहे. ते जर वेळेवर थोपवलं नाही तर, नव्या शतकातला सूर्य पाहण्यास सुदृढ मानसिकता असणारी पिढी शिल्लक राहील का?

शुभदा दीक्षित 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

                                           

4 टिप्‍पणियां:

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...