*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- सातवा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 25 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
*विषय :- महिला / नारी/ स्त्री*
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
"स्री" असते तरी कशी???
स्री या शब्दांतच सारे विश्व सामावले आहे... पण माझ्या मनात हा एक नेहमी प्रश्न पडतो की, खरच का लोकांना स्री कळलीय? आज पर्यंत आपल्या पुरूष प्रधान संस्कृतीने स्रीला एक निर्जिव वस्तू केल्या सारखेच केलेय. आजच्या काळात स्त्रियांना 50% आरक्षण सुद्धा आहे पण कदाचित तिच्या जिवनाचा विचार करू पाहता, ते सुद्धा तिच्या साठी कमीच आहे...ईश्वराने सृष्टीचा निर्माण करताना काही गोष्टी नेमून दिल्या आहेत... अर्थात स्त्रियांचे भोग स्रीयांना , पुरूषांचे भोग पुरूषांला...आणि या स्पर्धेच्या जगात हे कोणी वाटुन वगैरे घेऊ शकत नाही... कदाचित एकवेळ मातीचा सुगंध हिसकावून घेता येईल पण स्रीचे दुःख, तिच्या वेदना कोणीच दुर करू शकत नाही...
. स्रीला जितक्या उपमा देऊ त्या कमीच पडतील कारण असतेच फार वेगळी...मला तर कधी-कधी असं वाटतं की , मी एक स्री असुन सुद्धा स्रीला समजु शकले नाही मग तुम्ही तरी काय समजणार? स्रीचे जीवन अथांग सागरा सारखे आहे ज्याचा तळ शोधणे फार कठीण...मी खुप काही सोसलय पण माझ्यातली स्री काय-काय सोसतेय याची मला तर कल्पना सुद्धा नाही...माझ्या मते स्रीचे जीवन एका इंद्रधनुष्या सारखे असते.विज,वादळ,वारा,पाऊस आणि काळवंडलेले ढग जवळ ठेवून सुद्धा सुंदरच दिसाव लागत... वेदनेच्या, संकटांच्या गर्दीत वावरून सुद्धा जगापुढे सुंदरच दिसाव लागत....पण तिच्या वेदना ,दुःख केवळ सौंदर्य पहाणाराला कधी कळलेय हो...?
खरंच स्री खुप वेगळी असते.आयुष्यभर त्या इंद्रधनुष्याचे रंग पांघरून संकटांच्या मधे वावरत असते...आयुष्यभर हसमुख राहुन शेवटी मातीत विरघळून जाते स्री......!!! स्री एक न सुटलेले कोडे आहे, स्री एक न दिसणारे आभाळ आहे,स्री एक विचारांच्या पलीकडची संकल्पना आहे,स्री असंख्यशा सुर्यमाला आहेत, स्री आहेच जगाहुनी वेगळी......!!! जिला स्पष्ट करण आजपर्यंत साक्षात परमेश्वराला देखिल जमले नाही मग आपले शब्द काय चिज आहेत....?
स्री कोणत्याही परिस्थितीत घर सावरून घेते,स्री आयुष्यभर चुलीजवळ बसून जळत असते..... तरी देखील परमेश्वराने सगळे भोग स्रीच्याच वाटेला दिले........
"एक स्री"
कु दिपाली राऊत
उस्मानाबाद
7498702706
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
02) तिच्याबद्दल वाटलं म्हणून लिहलं....
प्रिय,
सखे, आज अंतकरणाच्या खिडक्या खुल्या करून मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी मिळते आहे. तुझं आजन्म खपणं आणि झिजनं मनाला पिळवटून टाकतं. पण मी पडलो पुरुष वर्गातला, कोण विश्वास ठेवणार या गोष्टीवर. पण खरं खरं सांगतो आहे, एकूणच स्त्री जातीबद्दल कायमच कणव आणि आदर आहे मनात माझ्या. परंपरेच्या जोखडात अडकावून तुला सोयीस्करपणे वागवण्यात आले आणि आजही वागवले जाते. देवदेवताही तूला बनविले आणि महत्व देऊन झुलविले. पण वास्तव कांही निराळे आहे. अनेकविध भूमिका तुला पार पाडाव्या लागतात. कधी तू माता असतेस कधी तू बहिण असतेस तर कधी मुलगी तर कधी तू पत्नी असतेस. पण प्रत्येक भूमिकेत तुला फक्त आणि फक्त यातनाच सहन कराव्या लागतात. तुझ्या जन्मापासूनच्या कहान्या, हो मी कहान्या असंच म्हणतोय कारण एक कहानी नाही.जन्मापासूनच काय तर तू जन्माला येण्याआधी पासून तुझ्यामुळं माणूस हैरान आणि बेचैन होतोय. जिच्या उदरातून तो आलाय तीही बाईच होती हे तो सहज विसरतोय. तीची वाताहत बघवत नाही. पण मातृदेवो भवः या गोंडस शब्दात तिला बसवून तिची पुत्र या नात्याने नको तेवढी वाताहत तो करत असतो, अर्थात सरसकट सर्वच पुरुष वर्गांसाठी माझे हे म्हणणे नाही. पण बहुतांशी सर्वत्र ही परिस्थिती दिसून येते.आकाशात झेप घेण्यासाठी पंखात बळ नव्हते तेव्हा तिच्याच पदराचा आधार घेऊन मांजरीच्या पिला सारखं पायात घोटाळणारे आम्ही ,पंखात बळ आल्यावर सहजपणे जन्मदात्रीला विसरून जातो. आणि मग अचानक वर्षातील एखादया दिवशी असेच मातृत्वाचे गीत गातो. त्याचे स्वर कुठे कसे हवेतच विरून जातात. ज्या मातेनं आपल्या पापण्यांचा पाळणा करून आपणाला झुलवलं तिला आपण आयुष्यभर झुरवतो. आपल्या चिमुकल्या पायात बळ नव्हते तेव्हा लटपटणाऱ्या पायाला आधार मिळावा म्हणून ती स्वतः आधार दयायची. पण आज खऱ्या अर्थानं तिला आपल्या आधाराची आवश्यकता असताना ती निराधाराप्रमाणे जीवन जगते आहे. आपल्यासाठी सदैवंश्रमात राहणारी आई आज आश्रमात आहे. याचाही तिला राग येत नाही. मुलांना दोष देण्यापेक्षा कलीयुगाचा फेरा म्हणून ती नशीबालाच दोष देत असते.
आई म्हणून ही अवस्था अशी असताना बहिण या पात्रात तरी तू खुशाल आणि निवांत जगते आहेस का...? बहिण भाऊ घरात असताना एकमेकांना कसे वागवतात किंवा बहिण म्हणून कुंदुंबात तुला भावापेक्षा कशी दुय्यम वागणूक असते हे सर्वज्ञात आहेच. पण तिथंही तू कधी तक्रारीचा सूर काढत नाहीस.आहे असं आणि आहे त्या परिस्थित जगण्याचं सामर्थ्य जणू तुला जन्माताच मिळाल्यागत तू राहतअसतेस. तुला चहा आणि दादाला दुधाचा ग्लास दिला तरी तुझी तक्रार नसते. अजाणत्या वयातच तुला सहनशक्तीचे पाठ शिकवले जातात जणू. पण भाऊ तुला त्या उपकाराची फेड करण्यासारखं वागतो का...? द्रोपदीच्या नशिबी श्रीकृष्णासारखा भाऊ होता, तिच्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी आणि प्रत्येक हाकेला तो धाऊन यायचा. आज तसा भाऊ विरळाच. तरीही तू तीळ तीळ तुटत असते त्याच्यासाठी,त्याच्या सुखासाठी. होय तुला त्याची जेवढी काळजी वाटतेय तेवढी त्याला तुझी वाटत नाही.. रक्षाबंधनाचा रेशमी बंध जुळवता येतो पण त्या बंधाला आणि धाग्याला जपणारे आणि जागणारे बंधू आज कुठं दिसतात..?
मुलगी म्हणून तर तुला मी फारच जवळून अनुभवतो आहे. कारण दोन मुलींचा मी बाप आहे. त्यांचे मातापित्यावरचे प्रेम मला मुलगा नाही याची थोडीही खंत वाटू देत नाही. शिवाय मलाही मुलगा नसल्याची कधी कधीच खंत वाटली नाही. पण मुलीच असणं किंवा मुलगा नसणं हे मला नाही पण समाजातील लोकांना खटकतंय. कारण तुझ्या मोठेपणास त्यांनी कधी स्विकारले नाही. मला कांही जण विचारतात, " फक्त दोन मुलीच आहेत." त्या वेळेला या लोकांची कीव येते. आणि त्यांच्या मानसिकतेबाबत नवल वाटते. आई, बहिण, बायको हवी असणाऱ्यानां मुलगी नको वाटते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सखे, तुझं असणं दु:खदायक वाटतं या लोकांना. त्यासाठी तुझं अस्तीत्वच मिटवण्यामागं लागलेत हे लोक. निसर्गाचा समतोल बिघडला जातोय, अन्याय अत्याचार आणि रोजच तूझ्याबाबत होणाऱ्या विचित्र घटना याबाबत पाषाण ऱ्हदयी लोकांना कांहीच वाटत नाही. गर्भात तुला संपवण्याचा घाट रचणाऱ्या या लोकांना मला म्हणावं वाटतय,
असेच वागाल तुम्ही तर.....
डोहाळे लागतील पुरुषाला
पुरूषच होईल पुरुषाची आई ?
वाढतील वारस पुरुषाच्या पोटात
घडेल का ही अपूर्वायी
असेच वागाल तुम्ही, तर दिसणार नाही बाई ||
गर्भातील आर्त हाक
कानावर कोणाच्याच का येत नाही
कळीचा कोंबारा खुडताय तुम्ही
फुलांचा गंध मिळणारच नाही
असेच वागाल तुम्ही, तर दिसणार नाही बाई ||
स्फुर्तीचा स्रोत,
रणरागिणी राणी लक्ष्मीबाई
प्रितीचे प्रतिक आहे
कृष्णाची ती मिराबाई
असेच वागाल तुम्ही, तर दिसणार नाही बाई ||
सण पोर्णिमेचा नि दिवाळीचा
राखी बांधणार कोण..?औक्षण होणार नाही
सात जन्माचं भोळं स्वप्न घेऊन
वडाला फे-या मारणारं कोण उरणारंच नाही
असेच वागाल तुम्ही, तर दिसणार नाही बाई ||
लाडीकवाणी बाबा म्हणोनी
दारात उभी छकुली नि ताई
पुरुष मुलांना जन्म देणारी
तिही एक बाई..
पुन्हा कधी दिसणार नाही
असेच वागाल तुम्ही, तर दिसणार नाही बाई ||
निसर्गान स्त्री पुरुष निर्माण करून सुंदर अशा सृष्टीची निर्मिती केली. पण कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता आणि निव्वळ अनैतीक मार्गानं मुलींच्या जीवावर उठलेला समाज आज तुझं वरपांगी कौतुक करुन तुला रिझवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही वस्तुस्थिती तुला, मला आणि कोणालाही नाकारून चालणार नाही.
पत्नी म्हणून तर तुझी भूमिका फारच कसरतीची आहे. तुला संसार रगाड्यात अनेक समस्यांना तोंड दयावं लागतं. पहाटे पहाटेच तुझ्या दिवसाला सुरुवात होते. घरातील कामे आटोपून मुलांचे ,पतीचा डब्बे बनविने असेल, गावाकडे असशील तर सडा रांगोळी करुन घरातील सर्व कामे आटोपून तुला शेतावर जायचं असतं, तू नोकरी करत असली तर घर आणि नोकरी सांभाळत तुला फारच कसरत करावी लागते.आम्ही पुरुष क्वचितच तुला सहकार्य करत असतो.
असो, खूप बोलतोय मी. हे पत्र समज, संदेश समज किंवा माझी तुझ्या बाबत असणारी कणव समज.... पण एखादया पुरुषाकडून मिळालेले तुला सहानुभूतीचे हे शब्द कदाचीत खरेही वाटणार नाहीत. पण मनःपूर्वक सांगतो आहे हे अंतकरणातील शब्द आणि भावना आहेत. पण निव्वळ शब्द सहानुभूतीने कांही साध्य होत नाही. हेही मला कळते आहे. तुलाच तुझ्यासाठी समर्थपणे वागावे लागणार आहे. मन मेंदू आणि मनगट एकवटून आणि साऱ्या सख्या मिळून जाचक बंधनं झुगारण्याची आता वेळ आली आहे असं तुलाच वाटलं पाहिजे. रोज मारझोड करुन रोजच लेझीम खेळत घरी झिंगत परतणाऱ्या नवऱ्यासाठी तुझं सात जन्माचा तोच दिवटा मिळावा म्हणून वडाला फेऱ्या मारणं बंद होवून तुला खटकलं पाहिजे..पती परमेश्वर ही संकल्पना तू पडताळली पाहिजेस. असो
अन्यायमुक्त उज्वल भविष्यासाठी तुला ऱ्हदयातून शुभेच्छा.... !!!
श्री. हणमंत पडवळ
मु.पो. उपळे (मा.)ता. उस्मानाबाद
8698067566.
hanamantpadwal8956@gmail.
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
03) *स्त्री आज आणि उद्या*
*प्रत्यक्ष जन्मदात्यानां ही नको असलेली*;
*मृत्यूच्या दारातून ह्या जगात आलेली*!
*अमर-अक्षर, नारी मी*.......
वरच्या ह्या दोन ओळी आजच्या नारीचे चपखल वर्णन करतात. वरपांगी पाहताना आजच्या स्त्रीने चौफेर प्रगती केली आहे. एवरेस्टचे शिखर असो, अंतराळा चा वेध, किंवा अंटार्टिकाची दक्षिण गंगोत्री मोहीम, एकही क्षेत्र असे नाही जे स्त्रीने पादाक्रांत केले नाही.
ही झाली नाण्याची एक बाजू. शास्त्रीय भाषेत सांगितले तर स्त्रीची प्रगती पिरामीड सारखी आहे. वरच्या त्रिभूज नेत्रदीपक कामगिरीने झळाळत आहे. समस्त स्त्रीवर्गाचा विचार केला तर ही संख्या बरीच छोटी आहे. ह्या पिरामीडचा मघला भाग आणि आधार भाग बहुसंख्यक स्त्रीयांचे प्रतिनिधित्व करतो आहे. माझ्या मते हा पिरामीड आता डमरू सारखा झाला आहे. वरचा भाग स्त्रीस्वातंत्र्य उपभोगणारा प्रगतीशील स्त्रीयांचा, आणि खालचा भागत आजही त्याच जुन्या पारंपरिक रुढीवादी जोखडात जखडलेला स्त्रीया आहे.
*पण* प्रत्यक्षात प्रगत स्त्री सुद्धा खरोखर मुक्त आहे का! गल्लोगल्ली, भरस्त्यात,चौकात, लोकलमधे, कार्यालयात सगळी कडे दुर्योधन-दुःशासनची वंशावळ सापडतेच.आज ही ह्या स्वयंसंपूर्ण द्रौपदीचे चिरहरण होतेच, शब्दांनी, नेत्रकटाक्षानी, गर्भीत इशाऱ्यानी तर कधी प्रत्यक्षात. स्वकर्तूत्वाने भरारी घेणाऱ्या यशस्वी होणाऱ्या, वेगळी वाट घुंडाळणाऱ्या सावित्रीच्या ह्या लेकींवर आज ही शाब्दिक चिखलफेक होतेच. सरतेशेवटी चारित्र्य हननाचे अमोघ अस्त्र बाहेर येतेच. स्त्री शिकती आहे सगळ्या क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे. पण पुरुषप्रधान मनोवृत्ती मुळे तिची विटंबना होतच आहे.
स्त्री मुक्तीचा लढा पुरूषांच्या विरुद्ध नाही,तर पुरुष प्रधान मनोवृत्तीच्या विरोधात आहे. स्त्रीला वस्तु समजुन तिचा वापर करण्याच्या आणि तिच्या वर हक्क गाजवणाऱ्या पुरुष प्रधान मनोवृत्तीच्या विरोधात आहे. स्त्रीला वस्तु समजुन तिचा वापर करण्याच्या आणि तिच्या वर हक्क गाजवणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीच्या विरोधात आहे.
स्त्रीमुक्ती ची दुसरी बाजु जास्त त्रास दायक आहे. ती स्वतःच जुनाट परंपरा आणि रुढीचुस्त गोष्टीत अडकली आहे. *माझ्या मते स्त्री ही मुक्तांगणाची बंदिनी आहे*. जुन्या रूढीचे अवशेष खोलवर दडले आहे. स्त्रीमुक्ती म्हणजे स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात शिरून तिने हे तण उपटणे आवश्यक आहे. उद्याची स्त्री स्वयंप्रकाशी सूर्या सारखी तळपावी,स्वयंसिद्ध व्हावी. कुठल्या ही कृष्णाची वाट न पाहता नराधमांचे हात छांटण्यास सक्षम असावी.
समस्त स्त्रीवर्गाच्या प्रगतीची पाइक असावी.
*उद्या ची स्त्री*
रोज रोज भेटणाऱ्या!
दुर्योधन - दुःशासनाला,
चांगली अद्दल घडवणारी
धनुर्धारी अर्जुनाचे ,
अचूक लक्षवेधी तीर असावी
नदीत बुडवले
तरी तरंगणाऱ्या
तुक्याच्या अजरामर
भीजक्या अभंगा सम!
अभंग अक्षुण्ण असावी
डाॅ.वर्षा सगदेव
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
04) भारतातील कर्तबगार महिला...
भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष यांच्यात कोणताही भेदभाव न करता 'स्त्री-पुरुष समानतेचे' तत्त्व स्वीकारले आहे.'चूल आणि मूल' सांभाळत असणारी नारी आज सर्व क्षेत्रात अग्रेसर ठरत आहे ही बाब आम्हा भारतीयांसाठी अभिमानाची व गौरवाची आहे.पूर्वी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये नारी अबला आहे असं म्हणून हिणवल्या जात असे परंतु आज नारी ही 'अबला नसून सबला' आहे असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न करीत आहे ही भारतीय समाजासाठी गौरवाची बाब आहे.सामाजिक,आर्थिक,राजकीय,क्रीडा,साहित्य,कला,वैद्यकीय,अंतराळ,न्यायालय,अधिकारी,कर्मचारी या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत म्हणून कर्तबगार स्त्रिया म्हणून गौरवोद्गार करण्यात येत आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले आहे की,"जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उद्धारी" आहे.म.फुले यांच्या काळात स्त्रियांना शिकण्याचा मुळीच अधिकार नव्हता तेव्हा सावित्रीमाई देखील अशिक्षित होत्या.प्रथम आपल्या पत्नीला शिक्षणाचे धडे देऊन साक्षर केले आणि पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली.मुलीच्या शिक्षणाचा ध्यास सवित्रीमाईला स्वस्थ बसू देत नव्हता.काही सनातनी विचारकंटकानी सावित्रीबाईला त्रास देत.शेण,माती,दगड मारीत पण मुलींच्या शिक्षणासाठी शेवटपर्यत झटल्या. आज भारतातील शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारी भारताच्या आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे नाव आदराने घेत असतो.सावित्रीमाईने शिक्षणाची ज्योत पेटविली नसती तर आजही स्त्रिया 'चूल आणि मूल' यामध्येच गुरफटून राहिल्या असत्या.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणीच संस्काराचे बीज जिजामातेने दिल्यामुळे छत्रपती प्रजेचे राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले.तसेच अहिल्यादेवी होळकर,राणी दुर्गावती,चांदबीबी,झाशीची राणी या महिलांचा उल्लेख करावेसे वाटते.बालपणी विवाह झाल्यानंतर तरुणपणीच विधवा झालेली आनंदीबाई जोशी विदेशात जाऊन एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेतले नि रुग्णांची सेवा करू लागले.वैद्यकीय क्षेत्रातील पहिली महिला डॉक्टर आनंदी जोशींचा च्या कार्याचा उल्लेख करावा वाटतो.समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्याची सेवा करणारे बाबा आमटे यांच्या पत्नी साधना आमटे देखील त्या सेवेत समरस होऊन अखेरपर्यंत कार्य करीत राहिले.
राजकीय क्षेत्रात देखील महिलांनी पाय रोवलेला आहे पूर्वी राजकारणात येण्यासाठी महिला धजावत नसत परंतु त्यांच्यात असलेली नेतृत्व क्षमतेला तोड नसतोच हेच सिद्ध करून दाखविले आहे.विजयालक्ष्मी पंडित,राजकुमारी अमृत कौर,सुचेता कृपलानी,इंदिरा गांधी,प्रतिभा पाटील,मायावती,ममता बॅनर्जी यासारख्या महिलांनी राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली आहे.क्रीडा क्षेत्रात देखील वेगवेगळ्या खेळामध्ये महिलांनी वेगळी छाप उमटविली आहे.ऑलिम्पिक मध्ये देशाला पाहिले सुवर्णपदक मिळवून देणारी के.मलेश्वरी तर साक्षी मलिक (कुस्ती) पर्यतच्या क्रीडा क्षेत्रातील महिला जसे की,सानिया नेहवाल,पी व्ही सिंधू(बॅडमिंटन),सानिया मिर्झा (टेनिस),तेजस्विनी सावंत,हिमा दास, द्युती चंद (धावपटू) स्मृती मंधाना (क्रिकेट)मेरी कोम (बॉक्सर पट्टू)आरती साहा (जलतरण पट्टू)इ अनेक कर्तबगार महिला क्रीडा क्षेत्रात देखील नाव कोरले आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन इतर खेळाडू महिला देखील प्रेरणा घेऊन क्रीडा क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.
कला क्षेत्रात बॉलिवूड मध्ये नामवंत अभिनेत्रींनी अभिनयाची छाप सोडली आहे.संगीत क्षेत्रात देखील आशा भोसले,उषा भोसले या भगिनींचा वावर आहे.त्याचसोबत उद्योग जगतही सुटले नाही.बँकिंग व्यवसायात चंदा कोचर,अरुंधती भट्टाचार्य या महिलांनी वेगवेगळ्या बँकेत प्रशासक म्हणून उत्तम छाप सोडली आहे.न्यायालयात देखील न्यायाधीश,वकील म्हणून महिलांची भरारी दिसून येते.फातिमा बीबी मिरसाहेब ह्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश असून त्यांच्याकडून प्रेरणा घेत इतर महिलांनी न्यायदानाचा पवित्र क्षेत्रात उडी घेतली आहे.
महिलांच्या हातून अंतराळ क्षेत्रही सुटू शकलं नाही.कल्पना चावला,सुनीता विल्यम्स यांच्या बालपणी बघितलेले स्वप्न खरं ठरविणाऱ्या अंतराळवीर आहेत.नौसेना,भूदल व वायुदलात देखील महिलांना संधी असल्याने त्या क्षेत्रात देखील महिला आघाडीवर आहेत.शेवटी एकच सांगणे आहे की,महिलांमध्ये अनेक गुण, कला कौशल्य,नेतृत्व,मातृत्व,संयम,जिद्द,चिकाटी इ अनेक गुणामुळे सर्वश्रेष्ठ आहेत त्यामुळे या कर्तबगार महिलांच्या कार्याची प्रेरणा घेऊन प्रत्येक क्षेत्रात बहुसंख्येने क्षेत्र पादाक्रांत करावे.आणि नारी 'अबला नसून सबला' आहे हे पुनश्च एकदा सिद्ध करून दाखवावे.भारतातील कर्तृत्वाने मोठ्या हुद्यावर गेलेल्या महिलांच्या कार्यास सलाम करतो.
✒श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
dushantnimkar15@gmail.com
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀ 05) जिच्या हाती पाळण्याची दोरी
सायंकाळच्या वेळेला सहजच गल्लीत फेरफटका मारल्यानंतर एक छोटा सात वर्षाचा मुलगा फारच बेजबाबदारपणे बोलत होता. हा मुलगा कोणत्या कुटुंबातील आहे ? याचा तपास लावला तेंव्हा असे समजले की, त्या लहान मुलाला या जगात फक्त वडीलच आहेत. त्याची आई या जगात नाही. तो गल्लीतल्या पोरांसोबत राहतो. त्या मुलांवर योग्य प्रकारचे संस्कार टाकणारी त्याची आई या जगात नाही. याचसाठी तो मुलगा काहीबाही बोलत होता. तात्पर्य असे आहे की, मुलगा हा आई-वडिलांचा असतो, पण आई ज्याप्रमाणे मुलांवर संस्कार घडवू शकते तेवढे प्रभावी संस्कार कोणीच घडवू शकत नाही.
शाळेत जाणारा मुलगा, गुरुजींनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट शिकत असतो. पण तेथे अनुभव मात्र शून्य असते. आई जे काही शिकविते, त्यात अनुभवास ज्यास्त जोर दिला जातो. असे म्हटले जाते की, परिवारातील आई, आजी ही त्या बालकांची पहिली शिक्षिका असते. आपल्या पाल्याला नैतिकतेचे शिक्षण देणे हे प्रत्येक आई
-बाबांचे कर्तव्य आहे. आपल्या घरात एखादा पाहुणा आला, या पाहुण्यासोबत कसे वागावे ? त्यांच्याशी कशा प्रकारचा संवाद करावा ? याची शिकवण अगदी उत्तमप्रकारे आई देऊ शकते. आईच्या चेहऱ्यात, वागण्यात, बोलण्यात प्रत्येक भागात, नसानसात प्रेम भरलेले असते. याचसाठी वडील कधी रागावले तर ते मूल आईच्या मागे जाऊन लपते व आपली शिक्षा वाचाविते. जीवनातील प्रत्येक वळणावर ज्या ठिकाणी चुका होतात त्याच ठिकाणी दुरुस्ती करून तेथे कसे वागावे ? याची शिकवण आई देते. या पृथ्वीतलावर आई राहिली नसती तर सर्वत्र हाहाकार माजला असता. कोण ? कोणाला ? काय ? म्हणून विचारावे ? सर्वत्र नुसता अंधकारमय जीवन झाले असते. याची नुसती कल्पनासुद्धा केली तर डोळ्यात अंधार दाटून येतो.
आजचा बालक हा उद्याच्या देशाचा आधारस्तंभ आहे, या बालकाला नैतिकतेची शिकवण प्रभावीपणे आईच देऊ शकते. पण हीच आई जर निरक्षर, अडाणी आणि अंधश्रध्देवर विश्वास ठेवणारी अशी दोषपूर्ण असेल तर ती त्या बालकाला त्याचप्रकारे शिकवण देईल यात शंका नाही. पण आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे नारी ही " चूल आणि मूल " एवढेच सांभाळावे असे आहे. पण जोपर्यंत स्त्री घराबाहेर पडणार नाही तिला विश्वाचे दर्शन होणार नाही. त्याशिवाय ती आपल्या मुलांना काही शिकवू शकणार नाही. ही बाब जेंव्हा महात्मा फुले यांना समजली तेंव्हा त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपले सर्वस्व वाहून घेतले. त्यांच्याच कृपेने आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहे. पुरुषांच्या बरोबरीने कामाला जात आहेत. त्यामुळे काही विचारी लोकं असे सुध्दा म्हणतात की, ही महिला घराबाहेर पडल्यानंतर या बालकावर संस्कार कोण टाकणार ? ती घराबाहेर पडली म्हणजे ती घरात लक्षच देणार नाही, असे कधीच होणार नाही. ती घरात तेवढीच लक्ष घालेल जेवढी पूर्वी ती लक्ष देत होती.
याचा तात्पर्य असा आहे की, देशाला प्रगतीपथावर नेण्याची दोरी ही स्त्रियांच्या हातात आहे. तिला शिक्षण देऊन, तिला जागृत करणे अत्यावश्यक आहे. महिला अशी आहे की जी मनात घेते ते पूर्णत्वास नेते. याचसाठी एका संतानी म्हटले आहे की, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उध्दारी
- नागोराव सा. येवतीकर
विषय शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
06) महाराष्ट्रातील स्त्रीरत्ने
भारत हा अनेक प्राचीन संस्कृतीनी बनलेला देश आहे.अनेक धर्म,अनेक भाषा,अनेक रुढी परंपरेने नटलेला देश आहे.भारत हा संस्कार आणि संस्कृतीने वैभवशाली बनलेला आहे.या संस्कृतीत पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांचाही तेवढाच मोठा वाटा आहे.संपूर्ण देशात अनेक स्त्रियांनी अमूल्य असे कार्य केलेले आहे.महाराष्ट्राला सुद्धा अनमोल असे स्त्रीरत्न लाभलेले आहे.यामध्ये स्वराज्याच्या मातोश्री राष्ट्रमाता,राजमाता माँ जिजाऊ आईसाहेब व शिक्षणाच्या प्रवाहातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या होय.यासारख्या स्त्रीरत्नांनी महाराष्ट्राला संस्कारित अशी ओळख निर्माण करुन दिली आहे.राष्ट्रमाता माँ जिजाऊ आईसाहेबांनी महाराष्ट्राला संस्कार दिले.तर सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण दिले.संस्कार व शिक्षण या दोन्हीच्या जोरावर आज प्रत्येक कुटुंबातील मुले-मुली घडताना दिसत आहे.प्रत्येक क्षेत्रात महिलांची भरीव कामगिरी आपल्याला दिसते.या कामगिरीत या यशात या दोन्ही रत्नांचा खूप मोठा वाटा आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या त्यांच्यावर गर्भात असल्यापासून संस्कार करणाऱ्या माँ जिजाऊ आईसाहेब किती हुशार व कर्तृत्ववान होत्या हे दिसून येते.माँ जिजाऊ आईसाहेबांनी हिंदवी स्वराज्याला एक नव्हे तर दोन राजे दिले.छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे होय. स्वतःच्या संस्कारानी बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले.त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार केले.त्यांना रामायण,महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये शौर्य निर्माण केले.त्यांना विविध युद्धकलेत निपुण केले.रयतेसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी परिपूर्ण बनविले.शिवाजी महाराजांनी या संस्काराला आपल्या रक्तात उतरवून रयतेसाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केले.हिंदवी स्वराज्याच्या त्या राजमाता म्हणून आपल्या सर्वांसमोर आदर्श आहेत.प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक स्त्रीने,आईने आपल्या मुलावर चांगले संस्कार केले पाहिजे.चांगल्या संस्कारांनी आपली मुले घडविली पाहिजे.सरकारच्या कठोर कायद्यापेक्षा आपल्या मुलाचे संस्कार अधिक चांगले असले पाहिजे.जेणेकरून कुठल्याच आई बहिणींना आपल्या मुलांपासून त्रास होणार नाही.असे संस्कार घरातूनच दिले तर समाजातील कोणत्याच आई बहिणीवर वाईट प्रसंग ओढवणार नाही.माँ जिजाऊंची ही संस्काराची शिदोरी आपल्या मुलांच्या जन्माबरोबर त्यांच्या झोळीत टाकली तर सुसंस्कारीत मुले घडतील यात शंका नाही.याचबरोबर दुसरे स्त्रीरत्न म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय.मुलींनी शिकावे घराच्या बाहेर पडून शिक्षण घेऊन स्वतःला समृद्ध करावे यासाठी मुलींची पहिली शाळा काढली.गोर गरीबांच्या,सर्व जातीधर्माच्या मुलींना एकत्र आणून शिक्षण दिले.याच शाळेत मुलींना शिकविण्यासाठी घराच्या बाहेर पडून समाजातील तीव्र असा विरोध सहन केला.समाजातील अनेकांचा विरोध पत्करून स्वतःचे स्त्री शिक्षणाचे कार्य चालू ठेवले.अनेक गोरगरीब मुलींना एकत्र आणुन शिक्षण दिले.लिहायला वाचायला शिकवले.समाजात शिक्षणाचे महान कार्य सुरू केले.याच कार्यामुळे आज शिक्षण क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने मुलीसुद्धा शिक्षण घेत आहे.संस्कार व शिक्षणाच्या जोरावर आज प्रत्येक क्षेत्रात महिला सर्वोच्च स्थानावर पोहोचल्या आहे.आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.गावातल्या सरपंचापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदा पर्यंत स्त्रियांनी सर्व पदे भुषविले आहे.आज गरज आहे ती फक्त महिलांचा आदर व सन्मान राखण्याची. प्रत्येकाने माँ जिजाऊ आई साहेबांचे संस्कार व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण घेऊन एक उत्तम मानव म्हणून जगले पाहिजे.समाजातील प्रत्येक महिलांचा आदर केला पाहिजे.स्त्रीयांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाबतीत योग्य सन्मान योग्य वागणूक मिळाली पाहिजे.हा त्यांचा अधिकार आहे.तो अधिकार प्रत्येक पुरुषाने त्यांना मिळवून दिला पाहिजे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माई यांचे संस्कार व शिक्षण घेऊन या देशात महिलांचा सन्मान वाढवुया.
राजेंद्र प्रल्हाद शेळके
शिक्षक, मु.पो किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा जि.बुलढाणा
9823425852
rajendrashelke2018@gmail.com
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
07) स्त्री जागर
म- मनमोहक/ममता
हि- हितचिंतक
ला - लाजाळू
अगदी बरोबर मला एका महिलेची अशी ओळख करून द्यायला आवडेल. चूल आणि मूल या साच्यातून बाहेर पडून तिने पुरुषांबरोबर पाऊल टाकत स्वतःची अशी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. कल्पना चावला, इंदिरा गांधी, सुधा मूर्ती, झाशीची राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी इत्यादी महिलांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.आई,बहीण, मुलगी, सासू,आजी म्हणून साऱ्या जबाबदाऱ्या ती सक्षमपणे पार पाडते. हे सर्व करत असताना तिची होणारी तारेवरची कसरत,ओढाताण हे सारं लपवून ती सतत सर्वांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करत असते.तिला प्रत्येक क्षेत्रात 50 टक्के आरक्षणही मिळालेले आहे. कौटुंबिक जबाबदारी आणि नोकरी यांचा सुंदर मेळ घालण्याचा प्रयत्न तिचा नेहमीच असतो. नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याचा जणू तिने ध्यास घेतलेला आहे. स्वतःच्या आईवडिलांना लग्नानंतर सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आजकाल कितीतरी महिला चोखपणे पार पाडतात. एवढेच नव्हे तर स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना स्त्रियांसाठी सुरू केल्या आहेत.जसे की सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप एक मुलगी योजना- माझी कन्या भाग्यश्री योजना इत्यादी. स्री म्हटलं की सहनशीलता,ममता,संयम,
चिकाटी, शालीनता हे गुण अंगी आलेच. पण हे सगळं जरी असलं तरी खालील उल्लेख केलेल्या बाबी विचारात टाकतात. कधी कधी वाटतं खरंच परिस्थिती बदलली आहे का? स्त्रीचा अबला ते सबला उत्कर्ष सगळीकडे झाला आहे का? अजूनही काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर आहे.
" गावाकडची म्हणून झालेली अवहेलना
तर शहरातील मॉडर्न, वाया गेलेली म्हणून लोकांच्या उंचावलेल्या भुवया
जास्त शिकली म्हणून डोक्यावर मिरे वाटेल
तर कधी अडाणी म्हणून केलेला अपमान
सासू सासरे, घर सांभाळण्यात सारे आयुष्य घालवलेली
साऱ्यांचं करण्यात जीवाची घालमेल झालेली
रात्री बीपीओ मधून कामावरून उशीरा परतणारी
संस्कार कुठे गेले ह्या प्रश्नांना बळी पडणारी
टोमणे,अत्याचार निमूटपणे सहन करणारी
स्वतःचे अश्रु न दाखवता मनातच गिळणारी
सगळे करूनही तू दिवसभर काय करतेस ह्या प्रश्नाने आश्चर्यचकित होणारी
खांद्याला खांदा लावून निर्भयपणे लढणारी
तुला त्यातलं नाही कळत काही म्हणून दुधातल्या माशीसारखी दूर सारलेली
स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी संधीच न मिळालेली सहन नाही होत ऍसिड अटॅक आणि ब्लेड चे वार आत्महत्या करून जीवन संपवून मानते हार आणखी किती दिवस अवमान सहन करायचा बास आता लढा द्यायला"
पटतयं ना तुम्हाला?
प्रिती दबडे, पुणे
9326822998
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀ 08) अधरी अमृत , नयनी पाणी
अंधेरी अमृत नयनी पाणी ,
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी !
खरोखर स्रीचा जन्मच असा आहे . स्वत:च्या सुख दुःख:खाचा विचार करायला तीला वेळच कुठंय ? सतत आपल्या कुटूंबासाठी अहोरात्र झटणारी ही स्त्री , पुराण काळापासून व वैदिक काळापासून आजपर्यंत त्यागमुर्ती चे ठरलेली आहे .
जेंव्हा वर्ण व्यवस्था असस्तित्वात होती तेंव्हा स्त्री हीच कुटूंब प्रमुख होती . जेव्हा टोळी रुपाने समाज एकत्र येऊ लागला तेंव्हाही सर्व निर्णय स्रीच घेत होती . आपला डेरा कुठे टाकायचा ? कोणती वरती आपल्याला योग्य होईल याचे सर्व निर्णय स्त्रीच घेत होती व तीला कुटूंबात व समाजात आदराचे स्थान होते .
कालांतराने ही समाजव्यवस्था पुरुष प्रधान होत गेली . पुरुष घराबाहेर पडून कुटुंबाच्या उदरनिर्वाहा पुरते कमवायला लागला आणि स्रीयांना चूल आणि मूल यांची जबाबदारी देवून उंबर्याच्या आतच बंदिस्त करुन ठेवण्यात आले .
तिच्यावर अनेक बंधने घालण्यात आली . तरी ती ते निमूटपणे सहन करीत आली . पुरुषांनी तिच्याकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून सतत पाहिले .
रामायण महाभारत कालापासून तीची विटंबना होत आली आहे .
तंत्रज्ञ नार्यस्तू पुज्यंते , रमते तंत्रज्ञ देवता:
यत्रेस्तू न पुज्यंते सर्वस्रंत्रफला: क्रिया :
जिथे नारीचा सन्मान केला जातो , तिला सुखात आनंदात ठेवले जाते त्या घरात प्रत्यक्ष परम्वराचा वास असतो . ते घर सतत आनंदी राहाते . या उलट जिथे स्त्रियांवर अन्याय , अत्याचार होतात ते घर तो समाज कधीही सुखी होणार नाही .
आज आपण समाजात जे चित्र पाहातो आहोत खूप निराशाजनक आहे . दररोज , बलात्कार , अत्याचाराच्या बातम्या ऐकू येत आहेत , रोज घटस्फोट होत आहेत . आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी , ती घराबाहेर पडते तेंव्हा वखवखलेल्या कामूक नजरा तीच्या शरीराचे लचके तोडीत असतात . गर्दीत लागलेला धक्का आणि मुद्दाम मारलेला धक्का यातला फरक तीला समजतो पण ती सारे हे निमूटपणे सहन करीत असते . आपल्या चिल्यापिल्यांना पोसण्यासाठी , आपले घर सावरण्यासाठी असंख्य यातना सहन करत असते तरी चेहेर्यावरचे हास्य कधी मावळू देत नाही . ओठांवर हासू आणि डोळ्यात आसू अशी तीची अवस्था काल पण होती , आजपण आहे आणि उद्या ही राहील .
या विषयाचा आवाका खूप मोठा आहे . कितीही लिहिले तरी ते कमीच आहे . तुर्तास इथेच थांबतो.
अरविंद कुलकर्णी पिंपरखेडकर (पुणे)
9422613664
arkulkarni.1955@gmail.com
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
09) स्ञी (नारी ) रत्नांची खाण !!!!!!
जेव्हा जगाताची निर्मिती झाली असेल तेंव्हा परमेश्वराने , इश्वराने , ब्रम्हदेवाने किंवा आपण मानत असाल त्या तत्वाने याची निर्मिती झाली तेंव्हा त्या परम तत्वाने समग्र सजीवाची निर्मिती केली आणि त्यात मानवाची निर्मिती केली आणि त्यात पुरुष आणि स्ञी ही निर्मित केली अर्थात सर्व स्ञीलिंगी जोडीदाराची निर्मिती केली धन्यता दयावी लागेल त्या सर्जनशील तत्वाला !!! असो फक्त मानवी जीवनाचा विचार करता स्ञीशिवाय मानवी जीवन पूर्ण होऊ शकत नाही कारण कोणत्याही गाडीला एक पेक्षा जास्त चक्र असतात आणि त्यातील सहयोगी.चक्र म्हणजे स्ञी होय, सुभाषितामध्ये तर स्ञीला रत्नां च्या खाणीची उपमा दिलेली आहे आणि आगदी बरोबर आहे स्ञी जर नसती तर भारतातील किंवा जगातील कोणत्याही नर रत्नांचा जन्म झाला नसता त्यामध्ये रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज , छञपती शाहू महाराज , लो टिलक, म गांधी , म फुले , Dr बाबासाहेब.अंबेडकर , Dr ए पी जे अब्दुल कलाम, इत्यादी आणखी कितीही कर्तबगार महा पुरुष यांची नावे आपल्याला घेता येतील अर्थात या सर्वाच्या मध्ये त्या त्या मातेचे कर्तृत्व एका अर्थाने दडलेले आहेच हे नाकारून चालणार नाही. दुसरी बाजू अशी कि नारी शक्तीचा जर विचार केला तर असे आपल्या लक्षात येईल कि विश्व वंदनीय संत ज्ञानेश्वर माऊली महाराजानी विश्वाला उपदेश केला आणि ज्यावेळी माऊली थोडेसे खिन्न होतात आणि ताटी लाऊन बसतात त्या वेळी छोटीशी मुक्ताबाई माऊलींना उपदेश करते "जगी विश्व झाले वह्नी ! संती सुखे व्हावे पाणी ! ताटी उघडा ज्ञानेश्वरा ! म्हणजेच स्ञी शक्ती महानच आहे शिवाजी महाराजांना घडवायलाही मासाहेब यांचा वाटा सिंहाचा आहे , भारतात पुरुष प्रधान संस्कृती मध्ये मुलींना शिक्षणाची दारे खुली नव्हती ती खुली करून देण्याचं योगदान फुले दांपत्याला जाते त्यातही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते त्यानंतरच पुढे नारी शक्तीचा खरा कर्तृत्वकाल सुरू होतो मग या एके काळी फक्त चूल आणि मूल संभाळणार्या स्ञी शक्तीने सर्व क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेतली त्याचे उदा स्व इंदिरा गांधी, असतील विजया लक्षमी पंडित असतील सरोजिनी नायडू कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील, किंवा अगदी सैमिञा महाजन हया सर्व भगिनीनी देश उन्नत बनविण्यासाठी आपल्या आपल्या परीने योगदान दिलेले आहे तेंव्हा स्ञी ला कमी लेखून चालणार नाही स्ञी आज कोणत्याही कामा मध्ये पुरुषापेक्षा मागे नाहीत त्यांनी स्वत: ला सिद्ध केलेले आहे मग ते काम खरतर असो कि सोपे उलट पुरुषापेक्षा कोणतेही काम स्ञीकडून लवकर होते थोडक्यात सांगायचे झाले तर स्ञी ही विश्वाची पालणहार आहे पोषण करणारी आहे , माता , बहिण , मावशी या सर्व नात्याची गुंफण आहे म्हणून मातेविणा आपल्याला जगाचे दर्शन होतच नाही म्हणूनच म्हणतात "आई माझा मायेचा सागर , दिला तिने जीवना आकार ! आणि दुसरे ही असे की माणूस कितीही महान असेल तरीही त्याला जर माता नसेल तर तो शून्य आहे" स्वामी तिन्ही जगाचा! आईविना भिकारी !! म्हणून आई धन्य आईची पूर्ण.स्ञीजात धन्य ! माझा ञिवार दंडवत असो त्या स्ञीशक्तीला नारी शक्तीला !!!!
भा. ल .गर्कळ जिल्हा परिषद मा शा चकलांबा ता गेवराई जि बीड
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀ 10) असेल जरी मी नारी घेईल उंच भरारी
'स्त्री म्हणजे अल्प काळाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे.' परिवाराचा भरभक्कम आधार म्हणजे महिला. सर्वांना मायममतेने वागवून कुदुंबाचा रथ खेचण्याचे महत्कार्य महिलाच करीत असतात. आई बाबांसाठी ती लाडाची लेक असते तर सासू सासऱ्यांसाठी ती मांगल्याची खूण असते. पतीसाठी सहचारिणी असते तर भावाची राखी आणि भाऊबीज असते. मुलांसाठी प्रेमळ आई असते तर भाच्यांसाठी गोड मामी असते. ती नणंद असते ती वहिनी असते. अशा कितीतरी भूमिका तिला पार पाडाव्या लागतात नव्हे तर प्रत्येक भूमिकेला न्याय द्यावा लागतो, तेव्हा ती आयुष्याच्या पटलावर यशस्वी महिला समजली जाते. एरवी ती आई म्हणून सरस असली आणि सून म्हणून अनुकूल नसली तरी तिचा उद्धार होतो.
लेकराची माय तू
वासराची गाय तू
दुधावरची साय तू
लंगड्याचा पाय तू
अशी तिची महती वर्णिली जाते.
अलीकडे तर तिच्या भूमिका आणखी विस्तारलेल्या आहेत.ती घराबाहेर पडू लागली आहे. ती शिक्षिका आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस आहे किंवा उच्च पदस्थ अधिकारी आहे. ती सरपंच आहे, जि. प.सदस्य आहे ,आमदार आहे किंवा एखाद्या राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ती आहे. प्रत्येक ठिकाणी न्याय देण्याचा तिचा प्रयत्न असतो. बऱ्याचदा ती यशस्वी होतेही. पण कदाचित एखाद्या भूमिकेत जरी ती अपयशी ठरली तिचे इतर क्षेत्रातील यश झाकोळले जाते.
महिला म्हणून राजमाता जिजाऊ माँसाहेब, अहिल्याबाई होळकर , राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, प्रतिभाताई पाटील अशी लांबलचक यशस्वी महिलांची यादी देता येईल. एवढेच नाही तर प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्रीचा हात असतो असे सर्वच जण मान्य करतात. छत्रपती शिवाजी महाराज, राजीव गांधी, सानेगुरुजी ही त्याची उदाहरणे देता येतील.
खरं म्हणजे स्त्रीच्या वाट्याला खूप मोठी आव्हाने निसर्गतःच आलेली दिसून येतात.
म्हणूनच
कोमल है कमजोर नही तू
शक्ती का नाम ही नारी है ,
सबको जीवन देणेवाली
मौत भी तुझसे हारी है!
अशी तिची महती वर्णन केली जाते.
चुलीजवळची सर्व कामे तिनेच करायची. आतातरी निदान गॅस वर स्वयंपाक करायला मिळतो. परंतु पूर्वीच्या काळी पावसाळ्याच्या दिवसात तिला ओल्या लाकडांवर स्वयंपाक करावा लागे. तेव्हा ती करत असलेल्या कष्टाचे मोजमाप आपण करूच शकत नाही.
स्वयंपाक , कपडे धुणे, झाडलोट, अंथरून पांघरूण, सडासमार्जन , दिवसभरातील चहापाणी हे सर्व जणू काही तिनेच करायची कामे आहेत अशा अघोषित परंपरा आपल्या संस्कृतीत दिसून येतात. विशेष म्हणजे मासिक धर्म, बाळंतपण ,स्तनपान, गर्भपात ,संततिनियमन अशा अनेक दिव्यांना तिला सामोरे जावे लागते. हे सारे पाहिल्यावर निश्चितच तिच्या अचाट शक्तीची कल्पना येते. म्हणूनच तिची दुर्गा ,अंबा, भवानी ,आदिशक्ती अशी विविध रूपे मानली जातात. पण या सर्व जोखडातून हळूहळू स्त्री मुक्त होताना दिसत आहे. आज ती कल्पना चावला बनून अवकाशात भरारी घेत आहे. ममता बॅनर्जी बनून भल्याभल्यांना राजकारणातून हद्दपार करत आहे. किरणबेदी बनून अट्टल गुन्हेगारांना अद्दल घडवत आहे तर सायना नेहवाल बनून खेळांचे मैदान गाजवीत आहे.
एवढंच नव्हे तर आज 10 वी ,12 वीच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या युवती पाहिल्यावर उद्याचा भविष्यकाळ महिलांसाठी निश्चितच फलदायी असेल याविषयी शंका घेण्याचे कारण नाही.
स्त्री असे शक्तीचे एक रूप
रुजवा हर एक मनी हा ध्यास
मोडुनी जुन्या संकल्पना
करूया महिला शक्तीचा विकास
असा तिला आधार देण्याची गरज आहे. आज 33 टक्के आरक्षणाची मागणी करणारी महिला भविष्यात पुरुषांनाच 33 टक्के आरक्षण मागायला लावते की काय असे विधायक चित्र निर्माण होण्याचा काळ अगदी समीप आलेला दिसतो एवढे मात्र नक्की.
स्त्री ही महान आहे. सहनशील आहे, त्यागी आहे ,विवेकी आहे, विनयशील आहे, अष्टपैलू आहे, कष्टाळू आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे एवढच नाही तर अशी शेकडो विशेषणे तिच्या कर्तुत्वापुढे फिकी वाटतात.
आकाशाचा केला कागद
समुद्राची केली शाई
तरीसुद्धा स्त्रीचा
महिमा लिहिला जाणार नाही.
सुधाकर रामदास पाटील
शहापुरच्या, ठाणे
मो.7798963063
srp1672@gmail.com
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
11) स्त्री ........आदिशक्ती यस्या कटाक्षमात्रेन:जायंते विबुद्धा नर....अर्थात "जिच्या एका कटाक्षाने मनुष्य शहाणा होतो अशा माता आदिशक्तीस प्रणाम करतो"ही ओळ आहे अतिशय विद्वान आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुधभूषण या ग्रंथातील.ते आदिशक्तीस सुरवातीला नमन करतात,यातच स्त्रीची महती आली.स्त्री या शब्दाचा अर्थ व्यापक आहे स्त्री म्हणजे 'सृजन',स्त्री म्हणजे 'जन्म',स्त्री म्हणजे 'नवनिर्माण',.मानवामध्ये स्त्री तर ती कोणत्याही प्राण्यामध्ये मादी असते.जेव्हा माणूस प्रगतशील अवस्थेत होता,दैनंदिन गरजांसाठी निसर्गावरचं अवलंबून होता.तेव्हा स्त्रीनेच शेतीचा शोध लावला आणि अन्नासाठीची भटकंती थांबवण्याचा प्रयत्न केला.एका निवांत क्षणी जगनियंत्याने स्त्रीची निर्मिती केली असे म्हणतात ते उगीच नव्हे.जेव्हा हा प्रगतशील मानव एका प्रदेशात स्थिरावला तेव्हा त्यामध्ये निश्चितच स्त्री आणि पुरुष हा भेद नव्हता.हा भेद तेव्हा ठाऊकच नव्हता.जगभरात ज्या संस्कृती विकास पावल्या त्या सर्वांचा तत्कालीन धांडोळा घेतल्यास स्त्रियांची कामगिरी ही समसमान असल्याचेच दिसून येईल.अगदी सिंधु संस्कृती मध्येही स्त्रीची भूमिका ही समसमानच दिसून येते.स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयीं पान्हा,नयनी पाणी हे केव्हा आणि कसे आले काय ठाऊक?हृदयीं पान्हा,हे ठीक आहे पण नयनी पाणी का?आणि कसे व कोणी आणले? हे जर शोधले तर फक्त आपले वर्चस्व रहावे या पुरुषी भावनेतून अथवा इथं आमचे वर्चस्व या एका गटाच्या भावनेतूनच हेच उत्तर मिळेल.कारण गार्गी,अरुंधती सारख्या स्त्रिया ज्या देशात वा संस्कृतीत होऊन गेल्या त्या देशात,संस्कृतीत स्त्री दुय्यम दर्जास जातेच कशी?नक्कीच कुण्या तरी बाहेरून आलेल्या आक्रमक समूहाने स्त्रीचे महत्व ओळखून जर आपण येथील स्त्रीस दुय्यम स्थानि ढकलण्यास यशस्वी झालो तर आपण येथल्या लोकांना दुय्यम स्थानी ढकलू शकतो व आपले गुलाम करू शकतो,हे ओळखले व पद्धतशीरपणे स्त्रीस दुय्यम स्थानी ढकलले.तरीसुद्धा राजमाता जिजाऊ माँसाहेब,क्रा.सावित्रीबाई फुले, माता रमाई या स्त्रियां आपले कर्तृत्व दाखवून गेल्याच.जगाच्या इतिहासात मादाम कुरी,मार्गरेट थाचेर, इंदिरा गांधी यांनी आपली छाप सोडलीच.स्त्री कोणत्याही सजीव प्रवर्गातील का असेना सृजनाची शक्ती तिच्या जवळच असते,नवनिर्मिती म्हणा का प्रजनन म्हणा अथवा वंश वाढवणे म्हणा हे फक्त स्त्री आणि फक्त स्त्रीच करू शकते.जरी पुरुषाचा अथवा नराचा सहभाग असला तरी तो फक्त नाममात्र असतो.खरी चेतक ही स्त्री असतो.घरट्यात अंड्यातून बाहेर येणारे पिल्लं पक्षिणीचीच वाट बघत असतात हे फक्त कारणमात्रेच नव्हे.निसर्गाने जगातील संपूर्ण सजीवातील स्त्री वर्गास सृजनाचे वरदान दिलेले असले तरी कुठेही दुय्यम स्थान दिलेले नाही.माणूस सोडून कोणत्याही प्राण्यात असा भेदभाव दिसत नाही.कोणताही देश,धर्म वा समूह असो त्या त्या देशातील धर्मातील समूहातील पुरुषांनी स्त्रीला बंधनात अडकऊन दुय्यम स्थानच दिले आहे.मात्र अशाही परिस्थितीत त्या आपल्या ठसा सोडत आहे.कल्पना चावला,असो साक्षी मलिक असो वा सायना नेहवाल अथवा असो वा काल आजची कोरोना टेस्ट किटची शोध लावणारी स्त्रीचं होती.या जगात नेहमीच स्त्रीचं कर्तृत्व पुरुषापेक्षा अधिकच राहिलेलं आहे. ✍हेमंत साहेबराव पापळे, कारंजा जिल्हा वाशीम 9422762278, hemantpapale@gmail.com
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
12) तिचे अस्तित्व
माझा बी.एड ला नंबर लागला होता
व अंबाजोगाईला जाऊन फार्म घ्यावयाचा होता .मी गेले खूप मोठी रांग होती.बापरे,आता फार्म कधी मिळणार मी परत कधी जाणार...पण चटकन आठवलं ..मी स्त्री आहेना ..आरक्षीत..
चला ..सरळ समोर जाऊन खिडकीला हात घातला...लगेच मागुन आवाज आला
आम्ही काय वेडे आहोत का एवढ्या वेळेपासून रांगेत उभे आहोत ते ?
मी लगेच म्हटलं ..मी महिला रांग बनवली आहे ..ते म्हणाले ,इथे बाकीच्या महिला आमच्या मागे उभ्या आहेत ना. मी म्हणाले
त्यांचा प्रश्न आहे तो...त्याना समजायला पाहिजे होते.कुठे उभे राहायचे?
खरोखर मानगुटीवर बसलेलं गुलामीचं जोखड आम्हाला खाली काढायचचं नाही अस महिलावर्गानी जणु ठरवून टाकले आहे .असच वाटत आहे
आज पर्यंत पुरुषी सत्तेत जगत आलोत ,राबराबराबलोत ती सवय एवढी
अंगवळणी पडलेली आहे की,आज शासन दरबारी 50%आरक्षण असून देखील ब-याच महिला त्याचा उपयोग करत नाहीत .
महिला आमदार आहेत सरपंच आहेत शिक्षीका आहेत.परंतु पगारीचे एटीएम कार्ड मात्र पतीदेवाकडे ..ठेवा परंतु कधी तरी स्वत्वाची जाणीव होऊ द्या स्वतः पगार काढुन आणा ना..मनुष्य जन्माला आलोत आपण त्याचा मोकळेपणा नक्की उपभोगा ."लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे "
मान्य आहे मला त्या कुठल्याही गोष्टीचे उल्लंघन न करता आपण स्वत्व जपलच पाहिजे.असे वाटते मला
पुरूष थोडेच आई होणार आहेत
ती जबाबदारी आपलीच..कायम आपलीच राहणार आहे.कवीने किती ही कल्पना केल्या तरी पुरूष गरोदर राहणार नाही
"नारी जन्मा तुझी ही कहाणी
ह्रदयी अमृत नयनी पाणी"
दिसते ना गोड स्त्री....असावं तिने असं ..परंतु जगाने तिच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन बदलला आहे तो अतिशय किळसवाणा आहे..."स्त्री म्हणजे फक्त उपभोगाची वस्तु" हा जो आमचा मानस ठरत आहे तो किती घातक आहे हे आम्हाला समजण्याची आज खूप गरज आहे.भगवतगीतेत तर श्रीकृष्णाने असे सांगितले आहे की "स्त्री पुरूष संबंध फक्त वंशवृद्धीसाठीच"... जगाने तर बाजार मांडला आहे.
स्त्री मध्ये पुरूषा पेक्षा सहनशिलता
सोशिकपणा जास्त असते .म्हणजे पुरूषांनी अजून तिला त्रासच दिला पाहिजे का? कुठली स्त्री असो .स्वंयपाक घरात गेल्याशिवाय तिला चालते का? नासा. सरांनी पाच पर्य॔त लिखाणाची वेळ ठेवली महिलांचा विचार केला का किती धावपळ होते ..काय सांगावं...विनोदाचा भाग .वेळ महत्वाची.सर्वाना वेळच्या वेळी प्रत्येक वस्तु पुरवणे हे तर तिचे कर्तव्य
ती नोकरीला जाणारी असो घरी बसणारी असो...प्रत्येक गोष्ट लाडीगोडी लावुन मुलं नातवंड अगदी पतीदेव सुद्धा करून घेतात च ना..ती पण नाही म्हणतं नाही हो ,दोन प्रेमाच्या शब्दाला भुकेली असते ती ..लगेच शहारते ..हळवी असते ..प्रत्येकाच्या मनाचा विचार करते
त्याला काय वाटेल ..माझ्याशिवाय कोण देईल त्याला करून ..आणि राबतेच ना
सवय लागली आहे सर्वाना जगवायची
पण तिला स्वतःचे स्वत्व जगण्यास मात्र वेळ मिळतंच नाही.
वडिलांच्या धाकात,पतीच्या धाकात,
मुलाच्या धाकात,नातवंडांना सांभाळण्यात तिच आयुष्य कधी संपून जातं व ती म्हातारी होते हे तिला कळत नाही.
तिच्या आवडीनिवडी तिचे छंद जोपासायला तिला वेळ मिळत नाही व ते राहूनच जाते.सवय राबण्याची ती नाकारू पण शकत नाही.तिच्याशिवाय घराला घर पण नसते ती घरात नसली की घरादारत
उकीरडा होतो .पण मला असे सांगावेसे वाटते की घराघरात पुरूषमंडळीनी देखील घरातील सर्वच कामात सहभाग घेतला पाहिजे.ती एवढी सोज्वळ आहे ती कधीच म्हणणार नाही तुम्हाला ."मला पाणी द्या बरं" ..परंतु तुम्ही मात्र माठा जवळ जाणार व मला पाणी आण बरं असं म्हणणार.बरोबर ना.
देवाने खूप वेळ काढून स्त्री बनवली
अस म्हणतात. कदाचित त्याला ही वाटले असेल हीच करेल सर्वा चे संरक्षण
करू यात संरक्षण परंतु स्वतःच्या अस्तित्वाला मात्र विसरणार नाही .वेळ आली तर ते पण सिद्ध करून दाखवण्याची आज मात्र वेळ आली आहे
सावित्री माईनी शेणाचे गोळे अगावर झेलले परंतु आजची सावित्रीने शिक्षणाचे ज्ञानामृत पिले आहे.तिला तिसरा डोळा आला आहे .तिला तो डोळा उघडायला भाग पाडू नये कोणी नसता त्याचे परिणाम
अर्थात संपूर्ण समाजाला भोगावे लागतील
तिच्या चांगुलपणाचा जास्तच फायदा घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये .
शेवटी सर्वाची आपापल्या अस्तित्वाची लढाई असतेच ना.स्त्री टिकली पाहिने सक्षम ,सुदृढ,विचारी झालीच पाहिजे.प्रथम
आपण सर्व स्त्रीया आपला मान आपण ठेवु या .
*****************************
स्नेहलता कुलथे बीड
7588055882
Kulthe.lata@gmail.com
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
13) स्त्री शिक्षण
संत तुकडोजी महाराज म्हणतात -
“ प्रल्हादाची कयाधु आई l छत्रपतीची जिजाबाई
कौशल्या, देवकी आदीसर्वाही l वंदिल्या ग्रंथी"
अशाप्रकारे माँसाहेबजिजाऊ मुळे शिवछत्रपती घडले. यशोदे मुळे श्रीकृष्ण घडले, या सर्व माता प्रमाणेच कार्य करण्यासाठी स्त्री शिक्षण महत्त्वाचे आहे. कुटुंबामध्ये स्त्री प्रथम मुलगी, नंतर पत्नी आणि नंतर माता अशा तीन महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असते. या सर्व भूमिका व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, मुलांच्या संगोपनासोबतच संवर्धनाचे आणि कुटुंबाच्या विकासाचे कार्य पार पाडण्यासाठी स्त्रियांना शिक्षण मिळणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.
भारतीय संस्कृतीत मुलांचे संगोपन आणि संवर्धन असे दुहेरी कार्य आजच्या मातेकडून अपेक्षित असल्यामुळे तिला सर्व सुसूत्रता राखून कार्य करावयाचे असते. असे म्हणतात, ' जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी'
या जगाचा उद्धार करायवयाचा असेल तर तर प्रत्येक स्त्री शिक्षित होणे महत्त्वाचे आहे. कारण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत असत, ' मुलांचे शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे शिक्षण आहे. परंतु मुलींचे शिक्षण हे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण आहे. म्हणून तिला शिक्षण घेणे आवश्यक आहे.
स्त्री ह्या कोणतीही जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात म्हणूनच स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. ग्रामीण स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत स्वतःच्या कुटुंबापासून तर राष्ट्रव्यापी व संघटनेपर्यंत कृषी कार्यापासून ते संशोधन कार्य पर्यंत अशा अनेक क्षेत्रात स्त्रिया ह्या पुरुषा बरोबरीने कार्य करत आहे.असे प्रत्ययास येते. म्हणूनच मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण असते.
स्त्री म्हणजे सृजनशील सामर्थ्य आणि करुणाजन्य शक्ती होय'.
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
14) स्त्री मनाचे कंगोरे
द्विधा कृत्वात्मनो देहमर्धेन पुरुषो अमवत
अर्धेन नारी तस्या स दिराजम् सृजत्प्रभु: ll
हिरयन्गर्भाने आपल्या शरीराचे दोन भाग केले. अर्ध्या भागाने पुरुषाची निर्मिती केली, तर अर्ध्या भागाने स्त्रीची. स्त्री आणि पुरुषांच्या संयोगाने प्रजोत्पादन होते. हे प्रजोत्पादन पुढे चालू ठेवण्यास जेवढी आवश्यकता पुरुषांची असते, तेवढीच स्त्रीची असते. स्त्री भागाची निर्मिती देवाने अलौकिक रित्या केली आहे. त्या रचनाकारांनी जणू बुद्धी पणाला लावून स्त्रीची निर्मिती केली. त्याने तिच्या मनाला तऱ्हेतऱ्हेच्या रंगांनी रंगवलं. त्यामुळे ते आणखीनच सुंदर, अनाकलनीय असं बनलं.
स्त्रीच्या मनाचे इतके विविध कंगोरे आहेत की त्याचे वर्णन करणे कठीण आहे. जितकी तिच्या मनाची उकल करत जावी तितका तिच्या मनाचा थांग लावण्यासाठी आणखी खोल, आत शिरावं लागतं. एखाद्या सुंदर कळीच्या पाकळ्या जणू एक एक करून उकलत राहाव्या आणि त्याचा सुंदर सुगंध पसरत जावा.
ती आपल्या बाळाशी इतकी तादात्म्य पावते की आजूबाजूचे तिला भान राहत नाही. नुसत्या बाळाच्या डोळ्यातील भावांवरून बाळाला काय पाहिजे, हे तिला समजतं. तिच्या मनाचा हा कोपरा अतिशय ओला, हळुवार असतो. बाळ डोळ्यापुढे येताच ते किती भुकेलं असेल, या विचाराने कुठलाही विचार न करता -बाळाची आई- हिरकणी कड्यावरून खाली उडी मारते. ते फक्त बाळापर्यंत पटकन पोहोचण्यासाठी. केवढं असीम धैर्य.
मरण यातनांची आठवण करून देणाऱ्या प्रसव वेणा ती अगदी सहज सहन करते. कारण तिचा एक अंश पृथ्वीवर जन्म घेणार असतो. बाळाला पाहताच इतका वेळे सहन केलेल्या असह्य यातना ती एका क्षणात विसरून बाळाला अत्यानंदाने पोटाशी धरते. तिच्या मना बरोबरच तिचा पान्हा उचंबळून येतो. हा अगम्य कंगोरा.
साने गुरुजींच्या श्यामला ठेच लागली तर त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी येते. इतकी हळवी आई, श्याम पोहायला घाबरतो म्हणून पाण्यात ढकलून देणारी करारी आई. दोन्ही आगळ्याच.
फुलासारखी कोमल असणारी यशोदा. कृष्णाची चूक दिसताच कठोरपणे त्याला शिक्षण देणारी यशोदा. दोघी दोन टोकाच्या. एक अशी तर दुसरी तशी.
अशिक्षित असणारी पुतलीबाई आपल्या मुलाला- महात्मा गांधींना - सुसंस्कृत घडवणारी एक विदुषी नव्हे काय?
कडक उन्हात- ग्रीष्मात- अगदी विषम परिस्थितीत ही तटस्थ उभे राहून वाटसरूंना शीतल छाया देणाऱ्या वृक्षांप्रमाणे असते. राणी अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी नारी होत्या.
विवाह होताच, आपले आई-वडील, बहिण-भाऊ, आपले घर सोडून, कणखरपणे, मागे वळून बघता सासरच्या घरात ती पाऊल टाकते. त्यास आपलेसे करते. 'त्याग' हा तर स्त्रीचा स्थायीभाव. काही काळापूर्वी अनोळखी असलेल्या घराला आपलं मानणं हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. अनोळखी असणाऱ्या सासूमध्ये आई बघायची. सासऱ्यांच्या हृदयात वडील बघायचे. यास फार मोठं मन लागतं. नणंदेला बहिणीच्या प्रेमाने भिजवून टाकायचं. दिराला मित्र प्रेमाचा हात पुढे करायचा. आपल्या पती साठी फक्त आणि फक्त समर्पणाची भावना. आपल्या सासरच्या राजघराण्याला कलंक लागू नये म्हणून महाराणी सीतेने घर सोडून खंबीरपणे पुन्हा वनवासी होण्याचा घेतलेला निर्णय. अशा अलौकिक सीतेच्या मनाचा सांग कसा लागावा?
प्रसंगी आपल्या घरावर निखारे ठेवून, उंबरठा ओलांडून कर्तव्य बजावणारी आजची पोलीस कमिशनर किरण बेदी.
परत येऊ की नाही याची शाश्वती नसताना, कठोर प्रयत्नांची शिकस्त करत अवकाशात झेप घेणारी कल्पना चावला. कुठून आलं एवढं धैर्य? कुठून आली एवढी वीरता?
घरातला त्रास सहन करून बायकांची उन्नती व्हावी म्हणून अठराव्या शतकात बाहेर पडणाऱ्या रमाबाई रानडे. या काळात 'चूल आणि मूल' एवढंच बायकांचे क्षेत्र होते. हा निर्धार, ही समाजसेवा, वंदावी तेवढी कमीच.
पंतप्रधान इंदिरा गांधींसारख्या राजकारण पटू यांनी आपल्या द्रूढ संकल्पाच्या बळावर सबंध जगाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला. अशीहि ही एक स्त्री.
आपल्या भक्तीत लीन होऊन कृष्णाशी अद्वैत साधणाऱ्या मीराबाईचा हा वेगळाच कंगोरा.
' जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले' असे जीवन जगणारी संत जनाबाई, संत मदर तेरेसा.
मनाचा थोरपणा, कोमल पणाचा एकेक कंगोरा.
शिवाजी महाराजांना घडवणारी अलौकीक माता शूरवीर जिजाऊ. धन्य ती माता! 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उद्धारी' हे शंभर टक्के खरे.
"लोकांना जागृत करण्यासाठी प्रथम महिलांनी जागृत झाले पाहिजे. एकदा तिने आपले भक्कम पाऊल पुढे टाकले की ही प्रथम आपला परिवार, नंतर गाव, राज्य आणि आपले राष्ट्र जागृत करून त्याचा उद्धार करते." असे स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे.
असे किती कंगोरे सांगू घ्या स्त्रीमनाचे? म्हणूनच म्हणतात ना, जिथे नारीची पूजा होते, तिथेच देवताही वास करतात.
"यस्य पूज्यन्ते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता: l"
शुभदा दीक्षित
पुणे
9881062115
Shubhada09@gmail.com
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
15) लेख
महिला
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खचून न जाता सर्व निराशाजनक परीस्थितींना बाजूला सारून येणाऱ्या दुःखांना हसतखेळत सामोरे जाण्यासाठी एकविसाव्या शतकातील महिलांना सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.लोकसंख्येमध्ये जवळपास निम्म्या संख्येने असणारा स्त्रीवर्ग हा देशाच्या विकासाचा कणा म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गतकाळातील स्त्रीयांची महती गाऊन फक्त चालणार नाही तर त्यासाठी आजच्या स्त्रीवर्गाच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातील समस्या आजही पूर्णपणे संपुष्टात आल्या नाहीत.सुखसुविधांचा , शिक्षणाचा अभाव व असुरक्षित सामाजिक परिस्थिती , समाजातील बदलती मानसिकता यामुळे खेड्यातील सातवी पर्यंतच्या शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवण्याची मानसिकता पालकांच्या मनात जोर धरू लागली आहे.जेव्हा पटसंख्येसाठी आजूबाजूच्या खेडेगावात आम्ही फीरतो तेव्हा हे विदारक चित्र आम्ही पाहतो.त्यांना खूप समजावून सांगावे लागते.तेव्हा दहावी पर्यंत शिक्षण कसेबसे पूर्ण करतात . पुढे लग्न लावून दिले जाते.आजवर जे चर्या पहात आलेल्या आहेत ,सोसत आलेल्या आहेत त्यामुळे स्वविकास व आरोग्य याकडे दुर्लक्ष केले जाते.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो तिच्या आरोग्याचा .कर्ता पुरुष सकाळी लवकर उठून शेतावर कींवा इतर व्यवसायासाठी बाहेर जातो , तेव्हा जर तिला काही समस्या निर्माण झाल्या तर तिला त्यांची घरी येईपर्यंत वाट पहावी लागते.त्रास सोसावा लागतो.कुणीतरी सांगीतलेले घरगुती उपचार केले जातात.पण काहीवेळा हे उपाय जीविवरही बेतू शकतात.यासाठी शासनाने ग्रामीण भागात आरोग्य केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.आरोग्यसेविकांची नेमणूक करून गावातील महिलांना वरचेवर भेटी देऊन प्रत्येक महिलेची आरोग्याची माहिती घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.प्रत्येक महिलेच्या आरोग्यासंबंधीची माहिती जर नोंदवली गेली तर शासकीय स्तरावरून त्याचे निराकरण करणे सोपे जाईल.घराघरामध्ये संडास असलेच पाहिजेत याची सक्ती करायला हवी. ब-याचवेळा संडास बाथरूम नसल्यामुळे महिलांना सकाळी लवकर उठून कींवा संध्याकाळी अंधार पडल्यावर बाहेर जावे लागते. तोपर्यंत तिला त्रास करावा लागल्यामुळे पोटदुखी कींवा पोटासंबधी आजारांना तोंड द्यावे लागते.हल्ली शासकीय योजनांच्या मुळे ब-याच प्रमाणात संडास बांधलेले आहेत पण शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मासिक पाळी संदर्भात सुद्धा अनेक गैरसमज ग्रामीण भागात आहेत.त्यासाठी शासकीय स्तरावर महिलांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी महिला कर्मचारी नेमण्यात आले पाहिजेत व जागृती निर्माण केली पाहिजे.कारण या काळात ग्रामीण महिलांना शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात.याबद्दलही जागरूकता शास्त्रीय माहिती देऊन मासिक पाळी संदर्भात माहिती सांगितली जावी व याबद्दल चे गैरसमज दुर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.कारण तिच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी असते.ती जर तंदुरुस्त असेल तर ती आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडे , मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देउन भावी नागरिक सक्षम बनवू शकेल.परिणामी भारत देश संकर्षण बनेल व योग्य पिढीद्वारे विकास करु शकेल.
विविध सरकारी योजनांची माहिती देऊन त्यांना कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन हवं आहे हे पाहून त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक पातळीवर बचत गट व महिला मंडळे स्थापन करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.यासाठी सतत प्रयत्नशील राहून पाठपुरावा करणे गरजेचे आहे,कारण सातत्य हे गरजेचे आहे.यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.महिला काहिही करु शकते गरज आहे ती फक्त तिला जागृत करण्याची , प्रेरणा देण्याची , जबाबदारी सोपविण्याची.सर्वात महत्त्वाचे तिला आदर देण्याची. आदर द्या,आदर घ्या. घडवा सशक्त भारत.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ९८८१८६२५३०
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
16) नारी शक्ती
कोमल है कमजोर नही शक्ति का नाम नारी है. मंडळींनो जेव्हा महिशासुराच्या त्रासाला कंटाळून सर्व देवता अपयशी ठरले तेव्हा ते देवी ला शरन गेले आणि आपले शस्त्र तिच्या सर्वाधिक केले तर या वेळेस याच देविनी रणचंडिकेचे रूप धारण करून महिशासुराचा वध करून तिन्ही लोकात महिशासुरवदनी म्हनुनओळखल्या जाऊ लागली. प्रत्येक स्त्रि मध्ये अशी एक शक्ती दडलेली आहेत पण ती ज्यांना ओळखता आली तिन त्या शक्तिचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी, एवढेच नव्हे तर विश्वकल्याना साठी केला आहे. पुरुष प्रधान संस्कृती ने जरी तिला अबला म्हटले असेल तरी ती कमजोर नाही तर कोमल आहे. प्राचिन भारताचा जर विचार केला तर त्या काळातही बरयाच स्त्रियांनी ग्रंथांचा अभ्यास केला व भरपूर साहित्य लिहून ठेवले. पण मग इंग्रज राजवटीत जरा चित्र बदले समाजात अंधश्रद्धेचा पगडा होता. त्यामुळे स्त्रियांचे विश्र्व चुल आणि मुल एवढेच सिमीत झाले.पण त्र्या काळातही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्रियांना स्वातंत्र समता व शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले. लोकांनी त्यांच्यावर शेण सुध्दा फेकले. पण त्यांनी आपला लढा सुरू चे ठेवला.आज असं एकही क्षेत्र नाही की तिथे स्त्रियांचा सहभाग नसेल . प्रत्येक ठिकाणी तिनं आपला स्थान पटकावले आहे. पण दुंखाची बाब हि आहे की अजून ही बरयाच घरात पुरुष प्रधान संस्कृती नको त्या पेक्षा जास्त बघायला मिळते.आणि मग तिथल्या स्त्रि ची अहवेलना बघुन मन गहिवरून येते.ग्रामिन भागातील स्त्रिया दिवसभर शेतात राबतात आणि घरी आल्यावर दारु पिऊन आलेल्या नवऱ्याचा मार खातात.आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला जातात. असंच दुंख सहन करत ती आपलं आयुष्य काढते. हे चित्र कुठे तरी बदलायला हवं.या विज्ञान युगात स्त्रि खुप पुढे निघून गेली पण....ती आता आपल्या क्षेत्रात सुरक्षित आहे का? माझ्या डोळ्यांसमोर उत्तर येत . नाही. समाजात दिवसेनदिवस विकृती चे प्रमान खुप वाढले आहे. त्यामुळे मला असं वाटतं स्त्रियांनिहि जरा खुप आधुनिकतेच्या आहारी जाऊ नये. स्वताच्या पोशाखा कडेलक्ष द्यावे .शक्य तितक्या लवकर आपले घर गाठावे. विनाकारण ओळख नसतांना कुठल्याही नात्यामध्ये अडकु नये. कारण काळ विचित्र आहे. अर्थात माझे हे जुनाट विचार काहींना पटनार पण नाही. पण मी ज्या शाळेत शिक्षिका आहे त्या शाळेतील मुलींना तेव्हाजरी चुकीचे वाटले तरी काही दिवसांनी माझ्या या विचारांचे स्वागतच करतात.कारण स्त्रिच्या सर्वांगिण विकासाबरोबरच नितिमुल्य हि तेवढेच महत्त्वाचे आहे.विज्ञान युगात तिनं कीतिही प्रगती केली,तरी जिथपर्यंत संध्याकाळी तीने तुळशी जवळ लावलेला दिवा दिसत नाही. तिथपर्यंत त्या अंगनात चैतन्य निर्माण होते नाही. तिथपर्यंत नवर्याला रागवुन मुलांच्या पाठीवर दनके देत नाही , तिथपर्यंत त्या घराला चालना मिळत नाही.मंडळींनो ज्या घरात स्त्रिला मान दिलेल्या जातो.तिचा सन्मान केलेल्या जातो. ते घर स्वर्गा पेक्षाही सुंदर असतं.शेवटी हेच. तुझ्याविन वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला संसार पेलना. ऐग ऐग रखुमाई ऐ भक्तांच्या माहेरी.
शिक्षिका
सौ. मेघा विनोद हिंगमिरे
भारत विद्यालय वेळा,त. हिंगणघाट
जि. वर्धा
7798159828
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
17) साहित्य सेवक समूह आयोजित लेखमाला: रोज एक उपक्रम
दिवस सातवा दि. २५/०४/२०२०
विषय :-" नारी /महिला
शीर्षक :-"बंधमुक्त "
आयुष्यभर घर संसार सांभाळताना स्वत:लाच विसरलेली , प्रत्येक वळणावर नवऱ्याच्या सोबतीची संवय झालेली स्री अचानकपणे ही बंधनं झुगारून मुक्त होऊ पहाते , तेव्हा घराची घडी कधी कधी एवढी विस्कळून जाते , अन मुळातच घरादाराची आवड असलेल्या तिचे पाय परत त्याच घराकडे वळतात.
" स्री ही अनंतकाळाची माता " हेच ती सिद्ध करत असते.लग्नानंतरचा सासूरवास , मुलींच्या जन्मांचे सुसह्य करून घेतलेले दु:सह्य सोहळे , बाल्य अन अंत या मधल्या काळात शरीराची झालेली परवड , होकारापेक्षा नकारच जास्त पचविणारी ती ! कधी कधी विचार करते , झालंय का माझं क्षितीज मुक्त !
मावळतीच्या वाऱ्यांचे झोत , मंदिरातल्या घंटा , सगळ्याचंच हवं नको पाहता पाहता तिच्या मनात विचार येतात , प्रत्येक दिवस म्हणजे आधीच्या दिवसाची झेराॅक्स !
" चाल चाल माते ,
पायी मोडले किती काटे !"
तर हे असे काटे फक्त मोडलेच नाही तर, त्यांची कुरपं होऊन अजूनच पिडा देताहेत.
शिरीष फुलांचा गंध मनाला किती बरं वेड लावायचा ! गाणं गुणगुणतच भराभर कामं हातावेगळी करणारी काॅलेज जीवनातील ती , फुलपाखरी आयुष्य जगणारी ती , कारंजाप्रमाणे थुईथुई नाचणारी ती ! नंतर नंतर कुठं बरं हरवते. मुठभर वाळू हातात धरावी , अन ती सगळीच्या सगळी गळून जावी . उरावे ते दोन तीन कण आयुष्य ! हेच का ते स्री जीवन !
आई , जी नव्या श्वासाला जन्म देते. अन ताईरूपी ती त्या श्वासाचे भास पूर्ण करते.मैत्रिण सुखद:खाची सोबतीण होते , तर पत्नी या नात्यात ती सत्यात वावरते.अन मुलगी स्वरूपात तर ती बापाचं जणू काळीजच असते.अन आजी रुपातील ती तर दुधावरची सायच !
अशा अनंत कड्यांनी नाती निभावणारी ती आहे म्हणून या जगाचा गाडा अद्ययावत सुरळीत चालू आहे. तरीही पन्नास टक्क्यांच्या आरक्षण काळातही तिला का बरं नेहमी दुय्यमच स्थान !
आल्या असतील पन्नास टक्के स्रिया उजेडात ! पण मग बाकीच्या अजूनही अंधश्रद्धा , जाती पाती , उच्च निच , अशिक्षित पन्नास टक्क्यांचं काय ?
एकीकडे भारतीय संस्कृतीचे पोवाडे गायचे अन एकीकडे तिला पायाची वहाणच समजायचे ! एकीकडे तिला देवीचा दर्जा देऊन मखरात बसवायचे अन दुसरीकडे तिला खोट्या प्रेमजाळ्यात अडकवून कोठ्यावर बसवायचे ! अरे ! संस्कृतीच्या पूजकांनो आता तरी जागे व्हा रे ! अन तिला तिचा मान द्या रे !
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी " फक्त म्हणण्यापुरतं नको . कृतीतून सिद्ध करा !
सौ. सरोज सुरेश गाजरे
भाईंदर
मोबा. नं ९८६७३९४००१
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
18) *महिला सबलीकरण वास्तव व व्यथा*
संपूर्ण जगात भारत देश आपली संस्कृती, परंपरा, अध्यात्म व भौगोलिक विविधता यामुळे ओळखला जातो. ही नाण्याची एक बाजू झाली. पण हाच देश जगभर पुरुष प्रधान संस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. तसे बघितले तर महिलांना आदिशक्तीचे रूप मानून पुरातन काळापासून पूजनिय मानले गेले आहे. त्याच वेळी याच भारत देशात महिला घरात आणि समाजात बांधनामध्ये अडकून पडल्या आहेत. त्यांना दुय्यय स्थान दिले जाते. त्यांचे अधिकार व विकास यापासून त्यांना पूर्णपणे दूर केले जाते. तरीसुद्धा येथे स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी बोलल्या जातात. महिलांच्या स्वातंत्र्य व अधिकाराविषयी कळकळ व्यक्त केली जाते. असे असतानाही निर्भया कांड किंवा कोपर्डीसारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना घडतात आणि अशा वेळी आपल्यासमोर महिलांचे प्रश्न बिकट समस्या बनून उभ्या राहतात. त्यावर उपचार म्हणून समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरवात करतो; पण याच वेळी या समाजाला प्रश्न विचारावासा वाटतो, खरंच भारतातील महिला अबला आहेत का? ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का?
मुळातच भारतीय महिला ही कधी अबला नव्हतीच. भारत हा नवदुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे येथे म्हटले जाते. किंबहुना या समाजात घडलेले अनेक महापुरुष स्त्रीमुळे घडले. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा आणि इतरही अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलैकिक वाढविला आहे. राजमाता जिजाऊ होत्या म्हणून संस्कारमूर्ती व कीर्तिवंत छत्रपती शिवराय घडले. सावित्रीबाई फुलेंची साथ होती म्हणून जोतिबा फुले महात्मा झाले आणि इतकेच नव्हे, तर कौसल्यानंदन श्रीराम व अंजनीपुत्र हनुमान ही आपली देवप्रतीके स्त्रीच्या संस्काराचा आणि सृजनाचा आविष्कार आहे. मुळातच महिलांमध्ये निसर्गाकडून काही देणग्या पुरुषांपेक्षा जास्त आहेत. स्त्रीमध्ये सहनशीलता, नावीन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गतःच अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे; कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे. स्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. तीन ‘प’ अर्थात पिता, पती आणि पुत्र यांच्या आदेशाने आणि बंधनाने ती आपले आयुष्य काढते आहे. अगदी कामकाजी, व्यवसायी, नोकरदार महिलांशी चर्चा केली असता त्यादेखील स्वतःला सक्षम मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने महिला सबलीकरण म्हणजे फक्त कार्यक्रम, व्याख्यान आहे; पण तसे न होता वास्तविकतेत महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे होय. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ व सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे.
आपल्या देशाची अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. या लोकसंख्येसाठी सरकारद्वारे मातृ दिवस, महिलादिन, बालिकादिन, जननी सुरक्षा अभियान असे कार्यक्रम राबविले जातात. त्यामुळे समाजात स्त्री शक्तीचे महत्त्व व अधिकार जागृत करण्याचे काम केले जाते; पण यासोबत आज महिला सबलीकरण करताना सर्वप्रथम समाजात महिलांचे अधिकार व मूल्य यांच्यावर घात करणाऱ्या विघातक प्रवृत्ती अर्थात हुंडा प्रथा, स्त्री भ्रूणहत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता इत्यादींचा नाश करणे गरजेचे आहे. लैगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणे, तसेच सामाजिक, घरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजना करणे, त्याचबरोबर महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे महिला सबलीकरण करणे म्हणजे पुरुषांना हिणवणे किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठता सिद्ध करणे असे नव्हे, तर फक्त महिलांना त्यांच्या नैसर्गिक गुणधर्म, क्षमता, परंपरा यांच्यासह समानतेने वागविणे होय. असा विचारप्रवाह समाजात प्रस्थापित झाला तर खऱ्या अर्थाने महिलांचे सबलीकरण होईल. स्त्रीशक्तीच्या रूपात देशात असलेले मनुष्यबळ विकसित करून स्त्रीशक्तीचे आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वालंबन हे चार आधारस्तंभ समाजाने भक्कम केले तर समाजात सुराज्य व स्वराज्य दिसेल आणि फक्त अभियानापुरते कागदोपत्री नाही, तर वास्तवात महिला सबलीकरण झालेले असेल. आपल्या भारत देशाला पूर्ण विकसित बनवण्यासाठी व परिपूर्ण विकासाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महिला सबलीकरण महत्त्वाचे ठरेल.
मानवसमुहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांशी हतोत्साहित करणारे वर्तन, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन केलेली कृती यांचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण, असे थोडक्यात म्हणता येईल.
मानवी हक्कांविषयी अनेक आंतरराष्ट्रीय करारांत मान्यता मिळूनही, स्त्रिया निर्धन आणि निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. त्या पुरुषांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या सक्रीय असण्याची शक्यता फारच कमी आहे आणि त्या घरगुती हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता खूपच मोठी आहे.स्रियांची मानसिकता बदलणे हे अतिशय महत्वाचेआहे.ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत.इथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात.त्यांची निर्णय क्षमता वाढणे गरजेचे आहे.घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत,याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे प्रबोधन झाले पाहिजे ती अजूनही 100% सक्षम आहे हे आपण मान्य करू शकत नाही.
कायदे व कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे, विकासाठी संधी उपलब्ध करून देणे, आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे या प्रक्रियेला स्त्री सक्षमीकरण असे म्हणतात.
––––––
महेंद्र सोनेवाने,
गोंदिया
मो. 9421802067
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
19) जिवनात अनेक रूपात अभिनय वटवणारी ती नारी.(स्त्री)......
तिन्ही जगाचा कैवारी आई विना भिकारी. घराला घरपण येतो ते स्त्री मुळे. आपल्या देशात महीलांना पूजनीय असे स्थान दिले आहे. स्त्री विषयीची महीमा शब्दात व्यक्त न करता येणारी अशी आहे.
स्त्री तिच्या जिवनात पदोपदी आपली नवीन नाती जोडत असते. ती जिवनात मुलगी, बहिण, पत्नी,सुन व आई आशा अनेक रूपात ती आपले काम आपल्या नातेवाईकांना सुख देण्याचे काम करते.
तरीही कंठक समाज हा मुलीला, कमी , जड का समजतो ? आता मुलगी मुलापेक्षा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे तरी पण मुलाचीच अपेक्षा,म्हणतात वंशाचा दिवा पाहीजे. पणतीच नाही तर दिवा कठून येणार? या करीता समाजाचे माणसीकता बदलणे आवश्यक आहे.
ईश्वराने स्त्री कडे अनेक असे गुण दिले आहे याच्या आधारावर ती कोणत्याही संकटावर मात करू शकते. मनोबल वाढवू शकते. आपल्या शेतकरी नवराला खांद्याला खांदा लावून उभे होते आणि माझ्या बळी राजाला आत्महत्या करण्यापासून रोखते व हिंमत देते. धनी या वर्षी नाही पिकल तर पुढच्या वर्षी चांगल पिकल..काळजी करू नका.
नारी ही दुःख स्वतः घेते व आपल्या प्रियजनांना सुख देण्यात ती आपल जिवनवाहून टाकते. आपले जन्मदाते यांना सोडून ती अनओळखी पुरूषासोबत ती आपल जिवन वाहून देते. खरच नारी ही जिवनात खुप काही त्याग करीत असते. या त्यागात, सुख देण्यात ती आपल जिवन
व्यतीत करत असते. अशा या माऊलीस शतदा नमन. तुझाच हक्क, तुझीच वेगळी माया.......
बोईनवाड गुणवंत किशनराव
(होटाळकर, नायगाव नांदेड )
9921034211
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
20) आजची स्त्री शक्ती
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरीयसी' जन्म देणारी स्त्री व आपली जन्मभूमी या दोन्हींचे महत्त्व किती आहे याचे सुंदर वर्णन वरील संस्कृत काव्यामध्ये कवीने केले आहे. अनेक कवी आणि साहित्यिकांच्या साहित्य रचनेतील एक आदर्श पात्र किंवा कुटूंबातील एक शोषिक ,धिरोदत्त आधारस्तंभ अशा अनेक रूपात जरी स्त्री रेखाटली जात असली तरी तिच्याकडे आजही एक भोगवस्तू म्हणून पाहिलं जातं ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. स्त्री पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत, आम्ही आमच्या घरी तिला समानतेची वागणूक देतो असे म्हणणारे अनेक वीर आजही तिला नोकरी सांभाळून 'चूल आणि मूल' ही भूमिका तर पाडावीच लागेल हे छाती ठोकपणे सांगताना दिसतात.
खरे तर आज स्त्री अनेक क्षेत्र पादाक्रांत करीत असतानाच घरच्या जबाबदाऱ्या देखील तेव्हढ्याच सामर्थ्याने पेलताना दिसतात.'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उध्दारी' अशी तात्या पंतोजी पासून चालत आलेली म्हण आज 'जिच्या हाती घराची दोरी ती घरा दाराचा उद्धार करी' अशी परावर्तित झालेली दिसत आहे. याचं कारण ज्या घराची धुरा स्त्रीच्या हाती असते त्यास घराचं एक घरंदाज घरपण जपण्याची हातोटी स्त्रीला निसर्गदत्त पणे मिळाली आहे.
स्त्रियांना नेहमी नाण्याप्रमाणे जगावं लागत. जशा नाण्याला दोन बाजू असतात अगदी तसेच आई - बायको - बहिण - मैत्रीण असे अशा अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात.
आज २१ व्या शतकात नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रिया उंबरठा ओलांडत असल्या तरीही त्यांना अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहिले की पूर्वी स्त्री जशी उंबरठ्याच्या आतच सुरक्षित होती,तशीच परिस्थिती आज निर्माण होत आहे की की काय? असं वाटायला लागतंय.
याला जबाबदार कोण? यावर उपाय काय? हे कुठे थांबेल?….अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यास व योग्य ती पाऊल उचलण्याची आज खरंच गरज आहे.परंतु आपल्या समोर किरण बेदी, कल्पना चावला, इंदिरा गांधी,अंजली भागवत,पी.टी.उषा, राणी बंग, सुनिता आमटे अशा अनेक क्षेत्रात भरारी मारलेल्या व आपले वर्चस्व सिद्ध करुन दाखवलेल्या अनेक आदर्श स्त्रिया असताना निराश होऊन चालणार नाही.या सर्वच स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात
“या देवी सर्व भूतेषू शक्तीरुपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:”
हे वचन सिद्ध करुन दाखवले आहे.
आज स्त्रियांचे होणारे शोषण,समाजात तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसेच 'आई हवी,बहीण हवी,पत्नी हवी पण मुलगी नकोया अट्टाहासापायी होणारी भ्रूण हत्या हे सर्व चित्र पाहिल्यानंतर या विषयावर काही बोलायचं म्हटलं कि द्विधा मनस्थिती होते. पुरुषांच्या जोडीने पुढे जाणारी स्त्री कि हे जग बघण्याआधीच अंधारात जाणारी मुलगी ह्यापैकी कोणाचे नक्की उदाहरण द्यायचे ह्याचा विचार करावा लागतो.
स्त्रियांची बुद्धिमत्ता ही निसर्गताच असते असं खुद्द महाकवी कालिदासानं म्हटलं आहे. असे असूनही 'बायकांना काय कळत ?' बोलून मोकळे होणारे असंख्य लोक समाजात वावरताना दिसतात. एकेकाळी पुरुषांच्या बरोबरीने समाजात स्थान घेणारी म्हणून उदाहरण देण्यात येणारी स्त्री हल्ली मात्र जन्मासाठीच लढताना दिसते. मुळात गर्भाशयात असल्यापासून ते जन्म घेईपर्यंत एवढेच काय ते तिची आयुष्य आहे असे वाटू लागलय.असं म्हणतात की बाळाला जन्म दिल्यानंतर आईमार्फत त्याला अन्नपुरवठा करणारी नाळ कापली जाते, परंतु स्त्री जेव्हा जन्म घेते तेव्हाच तिची नाळ समाजाशी बांधली गेलेली असते. पण हे मान्य करण्यास मात्र समाज तयार होताना दिसत नाही.
पुरातन काळापासून आई अथवा माता ह्या शब्दाला एक विशेष महत्व आहे. इतिहासात ठिक ठिकाणी मातृदेवतेचे वर्णन केलेले दिसते. मुळात समाज जन्माच्या उत्पत्तीचे मूळच स्त्री असते.
प्राचीन काळात स्त्रीला अनन्यसाधारण महत्व होते. पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी झालीय. बदल घडवून आणण्यासाठी छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक ,भगत सिंग,राजगुरू,ज्योतिबा फुले यांसारखे युगपुरुष जन्माला यावेत असे ओरडून सांगणारा समाज ह्या सर्व विभूतींना जन्म देणारी एक स्त्रीच होती हे मात्र सोयीस्कर पणे विसरत आहे.
प्रत्येक स्त्री कडे मग ती ग्रामिण असो,किंवा शहरी असो, तिच्यात एक अशी सुप्त शक्ती असते,की कोणत्याही येणा-या संकटाशी दोन हात करु शकेल. निसर्गानेच तिला ही शक्ती दिली आहे. आज स्त्रिला असेच स्वातंत्र्य हवे आहे.
"अबला नहीं सबला है तू, नारी नहीं चिंगारी है तू"
हे आजच्या स्त्रियांनी लक्षात घेतले पाहिजे. स्त्री ही माणूस आहे. तिला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो हक्क आजच्या स्त्रीला मिळालाच पाहिजे.आज पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाणारी स्त्री अनेक संकटांना सुद्धा सामोरे जातेय, समाजाने सुद्धा ह्या सर्वात तिची साथ दिली पाहिजे. कारण जेव्हा स्त्री जन्माला येईल तेव्हाच तिच्या गर्भातून समाज जन्म घेईल ! जाता जाता एव्हढेच म्हणावेसे वाटते,प्रसिद्ध हिंदी साहित्यिक जय शंकर प्रसाद यांच्या शब्दा नुसार
'नारी तेरी यही कहानी,
आंचल मे दूध और ऑखो में पानी||
हे चित्र पालटण्याची शक्ती नक्कीच आजच्या स्त्री मध्ये आहे हे नाकारून चालणार नाही.
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
21) सलाम महिलाशक्तीला…….
“मी कामिनी मी दामिनी, मी गृहिणी मी स्वामिनी, मी सेवक मी शिक्षक, मीच माझी असे रक्षक”. महिला हा शब्दचं सारं काही सांगून जातो. म म्हणजे महान,हि म्हणजे हिम्मतवाली,ला म्हणजे लाजवंती. काळोखाच्या गर्भातून एकाच सूर्याचा उदय होतो पण या आदिजननीच्या उदरातून कितीतरी क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य ,ज्ञानसूर्य जन्म घेत असतात. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते याची इतिहास ग्वाही देतो .म. फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई , महर्षी कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई, साधना आमटे, मंदाकिनी आमटे तसेच देशासाठी रणांगणावर आपले रक्त सांडणा-या सैनिकाची वीरपत्नीही तितकीच महान. व्यक्तिगत ,कौटुंबिक, सामाजिक समस्यांवर मात करणारी ऊर्जेचे स्त्रोत म्हणजे महिला. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली आहे.
वैदिक काळात मुलींना शिक्षण दिले जात होते, याचा उल्लेख पाणीनी यांनी केलेला आहे. वाल्मिकींच्या आश्रमात लवकुशाबरोबर आत्रेय हिने शिक्षण घेतले होते. त्या काळातील गार्गी, मैत्रेयी ,लोपामुद्रा या विदुषी तशाही आपण जाणतोच. त्या काळात मुलींना युद्धाचेही शिक्षण दिले जात होते. दशरथाला युद्धामध्ये कैकयीने मदत केली होती .परंतु कालौघात समाजात, संस्कृतीत चुकीचे विचार प्रवाह रुढ झाले आणि मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. मध्ययुगीन काळात तर स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधने होती. अनेक अनिष्ट रूढी परंपरांनी ती जखडली गेली होती. समाजात तिला दुय्यम स्थान दिण्यात आले .अशा काळातही संत जनाबाई, संत मुक्ताबाई, महदंबा ,कान्होपात्रा या संत कवयित्री आपल्या साहित्यातून समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार केले.या अनिष्ट रूढी परंपरांनी बांधल्या गेलेल्या ,स्त्रियांचे शोषण करणाऱ्या समाजाला अनेक समाजसुधारकांनी जागे केले. .स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली. त्यामुळे महिलांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला. स्त्री शिक्षण देण्याबरोबरच तिला आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले .
“स्त्रीने शोधली शेती, मातीतले मोती, स्त्री-पुरुषांची तिनेच ,निर्मिली नवी नवी नाती.” नवनिर्मितीचा मूलाधार असणारी, कुटुंबाचे केंद्रस्थान, असणारी महिला तिच्या मनात शिक्षणाचा प्रवेश झाला आणि तिला तिच्या ‘स्व’त्वाची जाणीव झाली. पहिली महिला डॉ. आनंदीबाई जोशी, डॉ.रखमाबाई, ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे आदी स्त्रियांनी स्त्रियांचे प्रश्न हाती घेत त्यावर जनमत जागृत करून तोडगा काढला.
बालशिक्षणाचा वसा घेतलेल्या अनुताई वाघ, ताराबाई मोडक. पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी,पहिल्या महिला राष्ट्रपती डॉ.प्रतिभाताई पाटील, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आकाशाला गवसणी घालणारी कल्पना चावला, पहिली मोनोरेल चालवणारी जुईली भंडारे, अंध गिर्यारोहक नेहा पावसकर, स्वच्छतादूत ठरलेली संगीताबाई, पॅराशूटमधून अंटार्टिकावर उडी घेतलेली शिल्पा महाजन, पोलीस अधिकारी किरण बेदी ,थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ हि केवळ प्रातिनिधिक उदाहरणे सांगता येतील.या महिलांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या व साधनेच्या जोरावर स्वतःचे कार्यकर्तृत्व सिद्ध केल्याचे दिसून येते .कवयित्री इंदिरा संत म्हणतात त्याप्रमाणे,” एक दगड कष्टाचा, एक दगड काळाचा, एक दगड का त्यागाचा, वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा, अशी सुरेख घरोघरी असलेली ,घर सांभाळणारी ,घर जोपासणारी तिचेच नाव गृहस्वामिनी, गृहलक्ष्मी. सकाळपासून रात्रीपर्यंत अविरत झिजणारी ,”तरी सुद्धा आई काय करते? हे जिला ऐकावे लागते ती महिला.
मग घरातील व्यक्तींचे आजारपण असो किंवा नव-याची नोकरी जावो.खंबीरपणे कुटुंबाला पुन्हा उभे करणारी महिला.किती बिकट प्रसंग आला तरी न डगमगता सामोरी जाणारी.अहो बळीराजाने आत्महत्या केल्याचे आपण नेहमी ऐकतो.पण त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे कधी ऐकायला येत नाही.आज कोरोनासारखे संकट देशात असताना सर्व लॉक डाऊन असताना स्वत:ची जबाबदारी निष्ठेने पार पाडणारी, हातावर पोट असलेल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी भाजी विकण्यास ,काम करण्यास बाहेर पडलेली महिला. झाशीच्या राणी सारखीच लढत असते.फक्त तिच्या हातातील तलवारीचे स्वरुप बदलले आहे. भा.रा.तांबे यांच्या ओळी येथे आठवतात,” कडकडा कडकडे बिजली शत्रुंची लष्करे थिजली,मग किर्तीरूप ती उरली ती हिंद भूमीच्या पराक्रमाची इतिश्री झाली’’अशा तिच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही. बहुकार्यप्रवण (Multitasking) हा गुण तिच्याकडे असल्यामुळे कमी वेळात अधिकात अधिक कामे करण्याची क्षमता तिच्याकडे असल्यामुळे आजच्या डिजिटलायझेशनच्या, अँड्रॉइडच्या युगात प्रभावी व यशस्वी पणे काम करताना दिसत आहे. सकाळी लवकर उठून घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत कार्यालय गाठते. संध्याकाळी दमून भागून आल्यावर तितक्याच ताकदीने विनातक्रार स्वयंपाक घरात शिजवणारी आणि शिजणारी तीच.कितीतरी धागे घट्ट पकडून ठेवणारी तीच. चैतन्याचा स्त्रोतच नाही का? आर्थिक गरज म्हणून ,आवड म्हणून ,वेळेचा सदुपयोग म्हणून नोकरी, उद्योग, व्यवसाय करणारी महिला रोज अनेक अडथळे पार करत ,संघर्ष करत पुढे जात राहते .यशाची एक एक पायरी चढत असताना मार्गात तिला कौतुक करणारेही भेटतात आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे हि भेटतात. पण ती नाही घाबरत, नाही डगमगत, मार्ग काढत ,मान अपमान सहन करत येणारे अडथळे पार करत मार्ग काढत रहाते.नदी प्रमाणे ती वाहत राहते कारण तिने ठरवलेलं असतं ,”वाटेतील काट्या कुट्यांना द्यायचा नसतो भाव, ध्येय समोर ठेवून गाठायचं असतो गाव”. अशी नावाप्रमाणेच महिला असलेल्या तिच्या हिमतीला सलाम. शारदास्वरुप असलेली शा म्हणजे शालीनता,रा म्हणजे रमणीयता,व दा म्हणजे दाहकता यांचा संगम असणा-या समस्त महिलांकडे आदराने,सन्मानाने बघावे हिच सदिच्छा !
सौ.आरती डिंगोरे, नाशिक.
9404687729
aartidingore@gmail.com
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
22) स्त्री
बंदिनी स्त्री ही बंदिनी
हृदयी पान्हां नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी
स्त्री ही प्रेमळ हळव्या मनाची असते. पण प्रसंगी ती रणचंडिकेचे रूप धारण करते. नरातील राक्षसाचा खातमा करण्यास ती महिषासुरमर्दिनी बनते. स्त्री ही "एका क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते" ती व्यक्ती एकच पण आजी, आई, वहिनी, मामी, आत्या, मावशी,ताई नि काकी अशा नाना रूपात समाजात वावरत असते. ती चांगल्याशी चांगले नि वाईटाशीही चांगली वागते. आपल्या स्वभावानुसार त्यांना आपलेसे करून टाकते. गर्भात असल्यापासून ती आपल्या लेकरांवर मायेची पाखर घालते.
गर्भाला जोडलेल्या शाळेतून जीवनसत्त्वाचे वहन होते तसे तिचे सदाचरण तेव्हापासून बाळाच्या अंगी बाणवले जाते.म्हणूनच राम, कृष्ण,अभिमन्यू आणि शिवाजी दुष्टांचा संसार करू शकले.
ती घरातील साऱ्यांची खूप काळजी घेते. मातेच्या मायेने जपते. काही दुखले खुपले तर ती मनापासून सेवा करते.लेकराला ठेच लागली तरी आईच्या हृदयात कळ उठते. एवढे तिचे विश्व आपल्या लेकरांभोवती सामावलेले असते.ती सर्वांना खाऊ-पिऊ तर घालतेच पण घरातील हवे-नको कमी-जास्त सगळ्यांवर तिची करडी नजर असते. ती भावनाप्रधान असते परंतु चुकीला तिच्याकडे माफी नसते, ती खडसावून जाब विचारते.ती एका पुरुषासोबत अनेक नात्यातून वावरत असते. ती एकाच वेळी परिचारिका, स्वयंपाकीण,मोलकरीणही बनते. ती गृहकृत्यदक्ष असते म्हणूनच तिला गृहस्वामिनी किंवा गृहमंत्री असे नामाभिधान केले आहे. तिची चौफेर नजर समाजमनाचा कानोसा घेते. कुठे संकट येणार असेल तर तिला लगेच चाहूल लागते. आपल्या कुटुंबाला संकटापासून वाचण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करते. गरिबीचे चटके सोसूनही हासत खेळत ती घरात रमते. तिला अहंकार,गर्व अजिबात शिवत नाही. म्हणूनच तिला गरीब गाईची उपमा दिली आहे. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन घरातल्यांच्या सुखासाठी वाट्टेल ते कष्ट करते.
पापण्यातील अश्रूंनाही परतवून लावते, पण आपल्या दुःखाचे भांडवल करत नाही. सहनशक्तीने ती दु: खाचे भांडवल करत नाही. म्हणजे स्त्री म्हणूनच स्त्रीला देवतेसमान मानले जाते. बाहेरून कितीही कुरूप असली तरी तिच्या मनाचा आरसा स्फटिकासम स्वच्छ असतो की त्यात आपली प्रतिमा उमटलेली दिसते. घरातील पुरुष व्यसनी असेल तरी ती लेकरांना वाऱ्यावर टाकुन देत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी पदर खोचून कामाला लागेल. पण कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यात तिचा हात कोणी धरू शकणार नाही. बाहेरून काटेरी वाटली तरी आतून फणसाप्रमाणे गोड आणि रसाळ असेल म्हणूनच तिची मूर्ती कोरून हृदयात वसावी असे म्हणावेसे वाटते. ती सन्मानासाठी हपापलेली नसते, परंतु तिचा अहंकार दुखावला गेला तर वेळेला नागिण म्हणून डंख करायला पुढेमागे पहात नाही.लोण्याहूनी मऊ नि वज्राहूनी कडक अशी ही स्त्री आजवर कुणालाही कळालेली नाही.
सौ.भारती सावंत
मुंबई
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
23) अाजचा विषय
स्ञी
स्ञी म्हणजे काय?सृष्टीवर संसाररूपी रथाचे ती एक चाक. कुणाची मुलगी,कुणाची अाई ,कुणाची बहीण,अाजी,काकू,मावशी,अात्या,प्रेयसी अशा अनेक नात्याची ती.प्रत्येक नात्यात कुणाचा ना कुणाचा अाधार तिला हवा असतो किंबहूना तिच्यावर लादला असतो ती बंदिस्त अशी स्ञी!
सगळे नाते निभावूनही कुठे तरी कमी पडणारीच ती.हृदयात दुःखाचा झरा ओसंडून वाहत असताना ,ओठावर हास्याचा निशिगंध फुलवणारी ती स्ञीच.जीवनातील प्रत्येक अाव्हानाला पचवायची हिम्मत तिच्यातच ईश्वराने निर्माण केली असूनही या दुनियेने अबला ठरवलेली ती स्ञीच.सहनशीलता ,सोशिकता,सजगता सृजनत्वता,सर्जनशीलतेची खाण असणारी ती परंपरेच्या ,चालीरितीच्या पिंजर्यात कोंडली गेलेली स्ञी.देवी सितेलाही अाग्निपरिक्षा द्यावी लागली म्हणून अाजही पदोपदी स्वतःला सिद्ध करण्यासाठी अग्निपरिक्षा तिला द्यावीच लागते ती ही स्ञी..
जन्म मुळातच स्ञीचा खूप घाईचा.ती जन्माला अाल्यावरच प्रश्नांची मालिका तिला सोडावावी लागते अस नाही बरं! तर अाईच्या गर्भात असताना पहिल्या महिन्यापासून तिच्या अस्तित्वार प्रश्न उद्धभवत असतात.तिची नाजूक कळी उमलण्या अाधीच खूडून टाकतात.
अाम्ही साविञिच्या लेकी
फेरे वडाला घालितो
गर्भातल्या लेकी अाम्ही
गर्भातच मारतो..
ती जन्माला अाली की तिच्या असण्यावरून ती नकोशी होते.अाज थोडीशी सुधारणा असली तरी पण बरेच पालक अजूनही मुलामुलींत भेदभाव करतातच.ती जरी अनेक क्षेञात पारंगत असेल,तीची ख्याती सर्वदूर पसरली तरी तिची स्ञीची जात कमीच लेखली जाते.
एखादी कळी उमलून तिचे फूल होऊ लागले की सुंदर दिसू लागली की,वासनेने बरबटलेल्या हैवानाची ती शिकार होते.मग समाजात तिच्यावर अाणखी बंधने लादली जातात.यातून तिच्या अायुष्याचा प्रश्न उद्धभवतो.ग्रामीण भागात तीचे शिक्षण थांबवले जाते.बालविवाह होतो अाणि तिचे एकूणच अारोग्य धोक्यात येते.अल्पकालीन मातृत्व,बालवयातील वैधव्य यासारख्या अनेक समस्यांना तिलाच सामोरे जावे लागते.या प्रत्येक वळणावर तिलाच दोषी ठरवले जाते.काय तर म्हणे जुनी परंपरा अाहे ,मुलीने त्या प्रथा पाळायच्याच,सगळ्या जगाचा ठेका काय तिनैच घेतला का?? तिच्यावरच अारोप का? याला पुरूषसत्ताक कुटूंबपद्धतीबरोबर अापलीच एक स्ञी दुसर्या स्ञीवर अन्याय करत असते.याची प्रचिती प्रत्येक क्षणाला येतच असते.उदा.सांगायच म्हटल तर नातू व्हावा व्हावा हे अाजीलाच वाटत असते अाजोबाला नातही तेवढीच प्रिय असते.
हे कुठतरी बदलायला हव.स्ञी ही उपभोगाची वस्तू नसून तिलाही भावना अाहे ,मन अाहे हे ओळखायला हव.अाणि मुलींबरोबर मुलावरही संस्कार घराघरात व्हायला हवे.यासाठी प्रत्येक घरातील जिजाऊ,रमाई,साविञी,भिमाई,ह्या सजग असायला पाहीजेत.समानतेचे,समतेचे पैंजण जर का वाजू लागले तर कुठेही वावगे प्रकार घडणार नाहीत..अाणि स्ञी पुरूष बरोबर अाहेत हे सिद्धही करावे लागणार नाही ते अापोअापच दिसून येईल....
श्रीम.ज्योती रावते
( सहशिक्षिका )
नांदेड
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
24) " हे नारी , बनवं मनांस
तू करारी
घेशील तू या उत्तुंगनभी
गरूडभरारी !! "
मित्रांनो , आपल्या या भारत देशात स्त्रीयांना अनादी कालापासून खूपच तुच्छ व गौण दर्जा दिला गेला आहे . स्त्री ही केवळ , " चूल व मूल " , एवढीच मर्यादित होती . घरी - दारी सर्वत्र तिला फक्त नि फक्त हीन व दीन स्वरूपाचीच वर्तणूक दिली जायची . ती अजूनही संपली नाही ......
पण समाज आता बदलला आहे . काही समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांची फलश्रृती म्हणून या जुलमी जोखडांतून तिला मुक्तता देण्याचा काही अंशी यशस्वी झालाय . पण अजूनही ती पूर्णपणे मानसिक व वैचारिक दृष्टीने स्वतंत्र झालेली नाही . याला कारणीभूत फक्त पुरूषवर्गच नसून स्त्रीवर्गही आहे .
" मी आहे एक अबोल कळी
पण उमलण्यापूर्वीच जातो माझा बळी
माणूस का बनला एवढा क्रूर
का विसरला राणी लक्ष्मी होती शूर !! "
खरंच , या स्त्रीयांना आपले जीवन जगण्याचाही अधिकार या अशा संकुचित मनांच्या मानवांनी हिरकावून घेतलाय . फक्त पुस्तकातील शौर्य भाग म्हणून आज अशा शूर विरांगणांचा मार्क घेण्यासाठीच अभ्यास केला जातो . त्यांचे शौर्य प्रत्यक्षात मात्र अंगीकारण्याचे शिक्षण ह्या स्त्रीला कधी मिळणार ? कारण बालपणापासूनच मुलींना आपला समाज नाजूक करून ठेवतो . हजड अवघड काम करू नकोस ? जड ओझे उचलू नकोस ? रात्री बाहेर जास्त वेळ राहू नकोस ? बाहेर जाताना खाली मान घालूनच जा ! कुणी काही छेडले वा अश्लिल वर्तन केले तर वाच्यता करू नकोस ? त्याकडे दूर्लक्ष करून आब्रू जाईल या भितीने अशा घटनेवर पांघरूण घातले जाते . परिणाम स्वरूप हा असला विनयभंग , अत्याचार वरचेवर वाढतच जातात . हे कुठं तरी थांबायला हवंय !
" ऊठ पेटूनी तू अबला
घे हाती कलमतलवार
होण्या तू आता सबला
दे जुलमाविरूद्ध ललकार !! "
खरंच ! नारी तुला आता या जुलमाविरूद्ध आता पेटून ऊठायचे आहे . शिक्षणरूपी तलवार नि राज्यघटनेची ढाल हातात घेऊन या जुलमाविरोधी ललकार द्यायचा आहे . तू आता एक सबला , सक्षम स्त्री हो ! शिक्षण घेऊन तुला आत्मनिर्भर व स्वावलंबी व्हायचं आहे . शिवाय तुला मानसिक व शारिरीकदृष्ट्याही मजबूत बनायचं आहे .
" जागव तुझ्यातील अस्मिता
जगती प्रकटविण्या तुझी प्रतिमा
होऊ नकोस आता सीता
कर सिद्ध गं तुझ्यातील प्रतीभा !! "
" स्त्री ही एक उत्तम गुणांची एक खाणच असते . " प्रेम , माया , ममता , सहनशिलता , आत्मविश्वास , जिद्द , कणखरता , काटकता , संवेदनाशीलता , सह्रदयता , आत्मसमर्पणवृत्ती , आपूलकी , जिव्हाळा , धैर्य ,संयमी , वात्सल्यता अशी एक अमूल्य व अतूल्य साक्षात कामधेनू , कल्पवृक्ष , एक अक्षयपात्रचं असते ! अशा स्त्रीने आपल्यातील प्रतिभा व कौशल्ये जगात सिद्ध करून दाखवून जीवन सार्थकी करावे . शिवाय सीतेचे जगणं सोडून दूर्गा होऊन जगायला शिकले पाहिजे !
" पुरूषप्रधान संस्कृतीचे बदलण्या मानस
हाती घ्यावे लागणार आता समतेचे कानस
बुरसटलेल्या कोयत्याला देणार नवी धार
झुगारण्या सर्व अत्याचार देणार घणाचा मार !! "
मित्रांनो , शेवटी हा एक उपाय आहे , ज्यायोगे स्त्री ही एक या सृष्टीत आपले आयुष्य मनसोक्त व स्वच्छंद जगण्याचा अधिकार स्वतःचं मिळविणार !
अर्चना दिगांबर गरूड (स.शि.)
प्रा. शा. पांधरा , ता. किनवट
जि. नांदेड , मो.क्र . 9552954415
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀
25) वस्त्रहरण आणि क्षीलहरण
याला जबाबदार कोण ?
➖➖➖➖➖➖➖
सायंकाळची५:३०ची वेळ होती . प्रिया शिकवणीला जाण्यासाठी दप्तर भरत होती. काळ्या रंगाची जीन्स आणि लाल रंगाचा शॉर्ट टि शर्ट घालून ती तयार झाली
ती घाईघाईने चहा संपवला दप्तर पाठीला अडकवले . सोफ्यावर बसून तीचे वडील चहा घेत होते . तीने आत खोलीत बसलेल्या मोठ्या भावाला आवाज दिला .पराग दादा मला शिकवणीला सोडून दे .
तिने जिन्स आणि टी शर्ट घातलेले पाहून तो तिच्यावर चिडला .तीला म्हणाला मी तुला किती वेळा सांगितले आहे . तु जिन्स पँन्ट आणि टी शर्ट घालत जाऊ नकोस . तो रागात बाबांना म्हणाला ,'बाबा मी हिला शिकवणीला नेऊन सोडणार नाही . हिला अशा वेशात पाहून रस्त्यावरची टवाळखोर पोरं शिट्टया वाजवतात .मी कोणा कोणाला आडवणार कोणा कोणाशी भांडण करणार तुम्हीच सांगा हिला .
वडील चिडून म्हणाले , प्रिया तुला सांगितलेले कळत नाही का? हे असले घट्ट कपडे घालत जाऊ नकोस . प्रियाने लगेच चिडून ऊत्तर दिले तुम्ही लगेच दादाची बाजू घेऊन बोलता . माझ्या सर्व मैत्रीणी जिन्स पँन्ट घालतात .मी का नको घालू ? वडील आणखी चिडले आणि प्रियाला म्हणाले तु आज पासून सायंकाळच्या शिकवणीला जायचे नाही . आजकाल किती स्त्री अत्याचाराच्या बातम्या कानावर पडत आहेत ? तुला समजत नाही का ?
आत जाऊन अभ्यास कर. चौदा वर्षांची कोवळी प्रिया तीला बलात्कार या शब्दाचा अर्थ देखील कळत नसावा . तिला विरोध करणाऱ्या वडिलांचा आणि भावाचा राग आला .तिने रागातच दप्तर सोफ्यावर फेकले . आत तिच्या खोलीत जाऊन रडत बसली .
वरील प्रसंगात दोष कुणाचा ? प्रिया चा की तीला शिकवणीला न पाठवणार्या परिवाराचा ?
विचार करण्याची बाब आहे .
आज आपण स्वतःला सुशिक्षित पिढीचा एक भाग म्हणुन संबोधतो.
आपल्या भारताची गणना प्रगतशील देशांमध्ये केली जाते .
औद्योगिक क्षेत्रात आणि इतर सर्वच ठिकाणी स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत . ही खूप अभिमानास्पद बाब आहे .
मोठ्या मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये एखाद्या मुलीने साडी किंवा पंजाबी ड्रेस घातला तर तीला अशिक्षित, अडाणी , काकू बाई मावशी बाई म्हणून तीला हिणवले जाते. बदलत्या काळानुसार समाजात राहणीमान बदलत चालले आहे. फॅशनच्या नावाने वेशभूषा आणि सवयी बदलत चालल्या आहेत.
सोशल मीडियाचे वाढते जाळे आणि मनोरंजनाच्या नावाखाली चाललेले अश्लील चित्रपट यामुळे समाजात 'कामी' वृत्ती वाढत चालली आहे.
यामुळे दोष फक्त पुरुषांनाच देऊन चालणार नाही . याचे मुळ कारणांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. आज आपण ऐकतो वाचतो लहान मुलींवर चे अन्यायाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि आश्र्चर्यचकित करणारी बाब म्हणजे अन्याय करणार्यांच्या यादीत अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. हा फार चिंतेचा विषय आहे. आपली नवीन पिढी कोणत्या दिशेने जात आहे हे कोणाच्या लक्षात कसे येत नाही .
वाढती काम - विकारी मानसिकता याला कुठेतरी आळा घालणे गरजे चे आहे . आज गरज आहे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची .
त्याची संगत सोबत कोणासोबत आहे प्रत्येक पालकाने जाणून घेणे गरजेचे आहे आपले पाल्य मोबाईल वर काय पाहतो अभ्यासाच्या नावाने कोणकोणते व्हीडिओ पहातो हे तपासणे गरजेचे आहे. जर तुमचे पाल्य तुमचे ऐकत नसेल तर तुम्ही काऊन्सलर ची मदत घेऊ शकता . आपल्या आणि आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक पालकाने सतर्क राहणे गरजेचे आहे .
🖋 सौ सुवर्णा सोनावणे
चाळीसगाव ७७४४८८००८७
♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.♀.
सर्व लेख वाचल्या बद्दल धन्यवाद
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें