*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
01) कोरोना व्हायरस;लोभ टाळा
लालच बुरी बला सगळेच म्हणतात.मानतातही.पण कोणीही लोभ सोडलेला नाही.सगळीच माणसं लोभ करीत असतात.त्यातच गडगंज संपत्ती गोळा करीत असतात.प्रसंगी या लोभापायी एकमेकांचे मुदडेही पाडत असतात.
सर्वांना माहित अाहे की लालच बुरी बला आहे.तरीही आम्ही लोभ का करतो? ते आम्हाला कळत नाही.कळणारही नाही.ते का बरे कळत नाही हे समजायला कारण नाही.
संत सांगून गेले की लालच बुरी बला आहे.तरीही आम्ही लालच करतो आणि आपला विनाश करुन घेतो.
- अंकुश शिंगाडे, नागपूर
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
02) " लोभ " एक मानवी स्वभाव !
लोभाची उत्पत्ती ही स्वार्थातून झालेली आहे.स्वार्थाचा संबंध हा उपजीविकेशी,पोटाशी,भुकेशी जुळला गेलेला आहे.कुठलाही सजीव प्राणी आपली पोटाची भुक भागविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो.सजीव प्राणी हा जन्मताच लोभी असतो असे समजले जाते ते याच अर्थाने.लहान मुलं जन्माला येते तेंव्हा ते रडते.चुकून रडले नाही तर डॉक्टर लोक, परिचारीका चिमटा काढून रडायला भाग पाडतात. जेणेकरून ते मुलं रडून थकले गेले पाहिजे.त्याला भुक लागली गेली पाहिजे.आईचे अमृततुल्य दुध पिऊन ते झोपी गेले पाहिजे.सांगायचे तात्पर्य लोभ हा मानवी स्वभाव आहे.जो प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात पहायला मिळतो.प्राणी सुध्दा लोभी असतात.जेंव्हा दोन प्राणी एकत्र येतात तेंव्हाच याची परीक्षा होते.गाय, कुत्रा, मांजर,घोडा किंवा इतर प्राणी एकत्र येतात तेंव्हा एखादा भाकरीचा तुकडा किंवा खाद्य पदार्थ त्यांचे जवळ घेऊन जा म्हणजे जो ताकदवान,शक्तीशाली आहे तो त्यावर आपला अधिकार गाजवितो.या ठिकाणी लोभाची उत्पत्ती होते.हेच तत्व हेरून राजश्री शाहू महाराज यांना आरक्षणाची कल्पना सुचली असे सांगितले जाते.
व्यक्तिच्या स्वभावरून, गरजेच्या प्रकारावरून लोभाचे प्रकार पडतात.राजे महाराजे यांना सत्ताविस्ताराचा लोभ जडू शकतो.उद्योजकांना उद्योग वाढीचा, संपत्तीचा लोभ जडू शकतो. ज्ञानपिपासूना ज्ञान संपादनाचा लोभ जडू शकतो.जसा भारतरत्न ज्ञानसुर्य डॉ.बाबासाहेबांना शिक्षणाचा,ज्ञान संपादनाचा लोभ जडला होता.जो चांगल्या कामासाठी असल्याने पिडीत जातींचे कल्याण करता आले.तसेच भारताला चांगली घटना देता आली.पुढे ती जगमान्य झाली.ब-याच स्त्रियांना दागीने जमविण्याचा लोभ असतो.कधी कधी हाच लोभ जीवावर बेतू शकतो.अनेक जणांना घरे जमविण्याचा लोभ असतो किंवा स्थावर मालमत्ता,संपत्ती जमविण्याचा लोभ असतो.मनुष्याला जोपर्यंत समज येत नाही तोपर्यंत सारेकाही ठिकठाक चालू असते.एकदा समज आली की हेवेदावे चालू होतात.लोभ आणि समज याचा गाढा संबंध असतो.ज्या व्यक्तीला समज नाही जो मेनटली डिस्टर्ब आहे त्याला सोन्याचा,हि-याचा हार जरी दिला तरी तो ती वस्तू फेकून देईल.लोभाचा संबंध हा मानसिकतेशी जोडला गेलेला आहे हे यावरून सिद्ध होते.अनेक साधु,संत,महात्मे यांना संसाराचा मोह जडला नव्हता म्हणून ते जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडू शकले.यातून त्यांच्या त्यागी वृत्तीचे दर्शन घडून येते.
मानवी लोभामुळेच रामायण आणि महाभारत घडले होते.रामायणात रावणाला सितेचा लोभ जडला होता.तर महाभारतात दुर्योधनाने सुईच्या टोकाएवढी पण जमिन पांडवांना देवू देणार नाहीअसे सांगून आपला लोभ प्रगट केल्यानेच महाभारत घडले होते. या घटनेतील प्रत्येक पात्रांकडून काहीनाकाही चांगले शिकण्यासारखे, घेतल्यासारखे आहे.जे आपल्या दैनंदीन जीवनात, व्यवहारात कामी येऊ शकते. आजच्या धकाधकीच्या जीवनात, व्यवहारात मनुष्य हा अत्यंत स्वार्थी,लोभी झालेला पहायला मिळतो आहे.बाजारात असलेली कुठलिही गोष्ट आपल्याकडे प्रथम असली पाहिजे यासाठी तो रात्रंदिवस धडपडतो असतो.यासाठी तो वेळप्रसंगी नियमांचे पण सर्रास उल्लंघन करीत असतो.याचे त्याला काहीच वाटत नाही.माणसाच्या लोभी प्रवृत्तीमुळे निसर्गाचे अपरिमित न भरून येणारे नुकसान हे झालेले आहे.त्याची फळे तो आज भोगतो आहे.माणसांच्या लोभी प्रवृत्तीमुळेच आज अनेक प्रजाती या नष्ट झालेल्या आहेत.अनेक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.मनुष्य प्राणी हा भौतिक सुखाच्या आहारी गेल्याने तो इतरांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत,वरचढ आहोत याच्या स्पर्धेत गुंतून पडलेला आहे.संपत्ती आणि साम्राज्य विस्तार महाशक्ती होण्याच्या लोभात पडून संपुर्ण जगावर आपलीच आर्थिक सत्ता साम्राज्य पसरविण्याच्या नादात संपुर्ण जगावर जैविक तंत्रज्ञानाचा मारा करण्याच्या षडयंत्रात चीन स्वत:च अडकून पडल्याने संपुर्ण जग कोरोनारुपी संकटाशी आज झुंजते आहे.लोभ हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे.म्हणून सत्ताधारी लोकांनी कुठल्याही लोभास बळी पडता कामा नये.जनतेचे हीत हे सर्वोच्च स्थानी ठेवले पाहिजे.यात कसलिही चुक होता कामा नये.हेच तत्व मानवी स्वभावासही लागू पडते.मानवी संसार हा लोभाने ओतप्रोत भरलेला असल्याने भौतिक सुखाच्या नादी मनुष्य प्राणी लागलेला आहे. पैसा हा देव झालेला आहे.लोक पैशाच्या पाठीमागे लागल्याने मानवी संवेदना या बोथट झालेल्या आहेत.पैसा प्राप्त केल्याने सारे सुख पदरात पाडता येते असा समज झाल्याने कुठल्याही मार्गाने पैसा प्राप्त करने अनिष्ट समजले जात नाही.मानवी नितीमत्तेची घसरण येथूनच झालेली पहायला मिळते आहे.
आजचा मानव हा अहंकारी बनलेला आहे.दुस-यांचे सुख ओरबडतांना त्याला याचे दु:ख जाणवत नाही.उलट दुस-यांना नुकसान पोहचवून आपल्या पदरात जास्तीचे माप कसे पाडून घेता येईल याचाच सतत विचार त्याच्या डोक्यात घोळत असतो.यामुळे मानव हा असामाधानी झालेला पहायला मिळत आहे.त्याचे आनंदी जीवन हे दुःखमय झालेले आहे.तो सुखाच्या शोधात वनवन भटकतो आहे.जे सुख त्याचेच पाशी आहे." हाती कळसा गावाला वळसा " अशी मानवाची गत झालेली आहे. आपला आनंद मनुष्य प्राणी हा संपत्तीत शोधत असल्याने तो लोभाचा बळी ठरतो आहे.यामुळेच देशात भ्रष्ट्राचार,अहंकार आणि अत्याचाराचे प्रमाण हे वाढतेच आहे. मानवी लोभामुळेच निसर्गाचे अपरिमित नुकसान होते आहे.औद्योगिक विस्ताराच्या नावाखाली जंगल छाटले जात आहे.खनिज संपत्तीचे मोठ्याप्रमाणावर उद्खनन होते आहे.यामुळे वातावरणातील प्रदुषणात वाढ
झालेली आहे. पृथ्वीच्या वातावरणातील बदलाने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.आपली इच्छा सिमित ठेवून निसर्गाचे संवर्धन करून कुठल्याही लोभास बळी न पडता मानवाने आपली वाटचाल केली तर भावी अनर्थास आळा घातला येईल.अन्यथा मानवी लोभाचा परिणाम हा स्वत:चे व इतरांचे अस्तित्व धोक्यात आणणारा ठरू शकतो हे जाणून घेऊन पुढची वाटचाल करणे गरजेचे झाले आहे.
मिलिंद गड्डमवार, राजुरा, ९५११२१५२००
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
03) *लोभाचे फळ*
मुलांनो, आपणाला सोन्याचे अंडे देणार्या एका कोंबडीची गोष्ट माहीत असेलच. एका माणसाजवळ सोन्याचे अंडे देणारी एक कोंबडी होती. ती रोज नित्यनेमाने सकाळी सोन्याचे अंडे देत होती. त्यामुळे त्या माणसाचे दारिद्र्य दूर झाले आणि तो चैनीत व ऐषोआरामात दिवस घालवीत होता. मात्र तो समाधानी नव्हता. त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. लवकर श्रीमंत व्हावे ह्या लोभापायी त्याने विचार केला की रोज एक सोन्याचे अंडे घेण्यापेक्षा कोंबडीला कापून तिच्या पोटातील सर्वच्या सर्व सोन्याची अंडी एकदाच मिळवावी आणि खूप श्रीमंत व्हावे. म्हणून त्यांने ती कोंबडी कापली. तेव्हा त्याच्या हाती काहीच लागले नाही. उलट रोजचे अंडीसुद्धा कोंबडीसोबत संपले. हे असे का झाले ? अति लोभामुळे झाले. वेदव्यास ऋषी म्हणतात की, पाण्याने तुडुंब भरलेली नदी समुद्रास मिळते तरी त्याचे समाधान कधीच होत नाही. तेंव्हा आपणाजवळ जे काही उपलब्ध असेल तर त्याच उपलब्धतेवर समाधानी असणे अत्यावश्यक आहे. जेव्हा केव्हा आपण एकाचे दोन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात लोभ निर्माण होतो. त्यासाठी शेख सादिक यांनी सांगितले वचन नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणतात की, मनुष्य जर लोभाला धुडकावून लावेल तर सम्राटापेक्षाही उच्च दर्जा त्याला प्राप्त होईल. समाधानी मनुष्यच समाजात ताठ मान करून वावरत असतो. आजपर्यंत जे कोणी महात्मा किंवा महान व्यक्ती होऊन गेले त्यांच्या जीवनात लोभाला शून्य महत्त्व होते. ते जर लोभाच्या आहारी गेले असते तर समाजात ते ताठ मानेने राहू शकले नसते. जीवन जगत असताना पदोपदी आपणाला लोभ निर्माण होतील असे प्रसंग घडतात. लॉटरी लागेल म्हणून मनुष्य रोज शंभर रुपयांचे तिकीट खरेदी करतो. झटपट श्रीमंत व्हावे म्हणून आपली कमाई लॉटरीच्या तिकिटात खर्च करणारा लवकरच कंगाल बनतो. म्हणून अश्या मोठमोठ्या स्वप्न दाखविणाऱ्या बाबीकडे दुर्लक्ष केलेले केंव्हाही बरे. फुकटच्या गुलाबजामुन पेक्षा कष्टाची चटणी भाकर केंव्हाही गोड लागते. अनेक वेळा आपणास लोभाचे आमिष दाखविल्या जाते. मात्र वेळीच आपण सावध होणे गरजेचे आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावू नये या अर्थाची म्हण सुद्धा आपणाला लोभापासून वाचून राहा असे सांगते. संस्कृत सुभाषितांमध्ये म्हटले आहे की लोभी माणसाला कोणी मित्र असत नाही किंवा कोणी गुरूही असत नाही. कारण तो सदानकदा एकटा जीव सदाशिव प्रमाणे एकलकोंडा बनतो आणि त्याच्या मनाला सदोदित लोभांचे विचार चालू असतात. दिलदार मनुष्य अंतिम क्षणापर्यंत आनंदी जीवन जगू शकतो तर कंजूष अर्थात लोभी मनुष्य शेवटपर्यंत दुःखी असतो असे कैसे बिनइल खतीम यांनी सांगून ठेवले आहे. त्यास्तव नेहमी आनंदी राहण्यासाठी समाधानी राहायला शिकावे व लोभापासून शक्यतो दूरच राहावे. कारण लोभाचे फळ आज नाहीतर उद्या दुःखातच परिवर्तित होणार आहे याची जाणीव ठेवावी.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व विषय शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
( पाऊलवाट या पुस्तकातून साभार )
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
04) माझा लोभ,त्याची लालसा
अष्टविनायक चित्रपटातील गीत आठवते...
तू सुखाकर्ता,तू दुःख हरता
तुच कर्ता आणि करविता...
तूच ईश्वरा साह्य करावे,
हा भव सिंधू तराया....
परंतु आज सर्व लोक सुखकर्ता आणि दुखहर्ता विसरून गेलेले आहेत. माणसासाठी सुखकर्ता आणि दुखहर्ता केवळ पैसा झालेला आहे. पैशाचा लोभ आणि मोह अनेकांना वाईट मार्गाला लावतो आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लहान-मोठे असे प्रसंग निश्चित आलेले असतील की स्वतःला लोभ झाला असेल किंवा स्वतः लोभाचे बळी पडलेले असाल. आयुष्य जगत असतान अनेक व्यसने माणसाला जडतात. काहींची व्यसने सुटतात, तर काहीची व्यसने माणसाला धरून ठेवतात. शासकीय व्यवस्थेमध्ये लोभ आणि लालच हे शब्द अगदी रूढ होऊन बसले आहेत. ग्राम पातळी,तालुका पातळी, जिल्हा पातळी याही पुढे जाऊन जर विचार केला तर राज्यपातळी नव्हे देश पातळीवरती सर्व ठिकाणी याचा प्रत्यय सर्वांना येतो आहे.
साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे माझी बदली दुसऱ्या जिल्ह्यातून माझ्या जिल्ह्यात करावयाची होती. जिल्हा बदली असल्यामुळे ते काम मंत्रालयातून करणे भाग होते. एका आमदाराच्या मार्फत मंत्रालयामध्ये प्रवेश केला. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधीक्षकांकडे मला जायचे होते. परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणाची तरी मदत किंवा मध्यस्थी हवी होती. ती मध्यस्थी आणि मदत एका मंत्र्याने पूर्ण केली. जिल्हा बदली असल्याने मला दहा वर्षाची अट शिथील करून विशेष बाब म्हणून बदली हवी होती. अधीक्षकाला मंत्र्याचे पत्र दाखवले, अधीक्षकाने कसलाही प्रतिसाद दिला नाही. उलट मला सांगण्यात आले की दहा वर्षाची अट बंद झाली आहे.तुमची बदली होणार नाही. तुम्ही माझा वेळ घेऊ नका आणि तुमचा वेळ वाया घालू नका. परंतु अधीक्षकाने सांगितलेली ही गोष्ट निव्वळ असत्य होती. कारण याच अधीक्षकांनी माझ्या मित्राची काही महिन्यापूर्वी जिल्हा बदली करून दिली होती. त्यांनी मला फटकारले परंतु मी तेथेच शांत आणि स्तब्ध उभा राहिलो. ते मधून माझ्याकडे पहायचे आणि सांगायचे की तुम्ही इथे थांबू नका थांबण्याचा काही उपयोग होणार नाही. मला विश्वास होता, माझ्या मित्राचे काही महिन्यापूर्वी काम यांनीच केले आहे माझे देखील हे काम करतील... परंतु ते वरच्या मनाने मला हाकलण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या मनामध्ये लोभाचा विस्तार होत होता. जास्त वेळ घेतल्याने आणि जास्त ताणून धरल्याने देण्याघेण्याची काहीतरी भाषा होईल हा त्यांचा मानस असावा. माझ्यातील विश्वास कमी झाला नाही. त्यांच्या दालनाच्या बाहेर येऊन मी थांबलो. मंत्रालय सुटण्याची मी वाट पाहू लागलो. साडेपाच पावणेसहाच्या वेळेला मंत्रालय सुटले. मी त्या अधीक्षकांच्या पाठीमागे धावत होतो. काही करून माझे काम करा असे विनवत होतो. ते भरभर भरभर या मजल्यावरून त्या मजल्यावर चालत होते, मी देखील त्याच वेगाने त्यांच्या पाठीमागे चालत होतो. ते मंत्रालयाच्या बाहेर पडले. तरीही मी त्यांच्या पाठीमागे होतो. मी माझ्या मनात निश्चय केला होता काम होणारच नाही तर विनवणी करत राहावे काय बिघडेल... ते बस स्टॉपच्या जवळ पोहोचत होते. तोपर्यंत मी त्यांचा पाठलाग करत होतो. शेवटी त्यांच्या तोंडून शब्द पडला, 'पुढील मंगळवारी या,करू काहीतरी .' मी सुटकेचा निश्वास सोडला आणि परत फिरलो. बाहेरच गाडयावरचे जेवण केले. आणि मंत्रालयाच्या जवळ असणाऱ्या थिएटरमध्ये जाऊन एक पिक्चर पाहिला. पिक्चर पाहण्याचा हेतू नव्हता परंतु मला थोडी आरामाची आवश्यकता होती... डोके जबरदस्त दुखत होते. आणि त्यासाठी थिएटरमधल्या खुर्ची वरती आरामात थांबता येईल म्हणून पिक्चर पाहिला.नंतर आमदार निवास या ठिकाणी मुक्कामास गेलो. उद्याच्या दिवसाची आखणी आणि आजच्या दिवसाचे परीक्षण करत मी डोळे झाकून स्तब्ध होतो. लोभ आणि लालच याच्या अतिव अपेक्षेने आजचा दिवस कसा गेला याचा विचार करत मी झोपी गेलो. सकाळी उठून आंघोळ वगैरे करुन बाहेर पडलो.. नाश्ता आटोपून मंत्रालय कामकाज सुरू होण्याची वाट पाहत थांबलो. साडेअकरा वाजता मंत्रालयात प्रवेश मिळवला. कालच्या प्रसंगाने मला थोडी धिटाई आली होती. मी सरळ त्या अधीक्षकांच्या टेबलासमोर जाऊन उभा राहिलो. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि कडाडला, 'मंगळवारी या म्हटलं होते.. तुम्ही लगे आजच आलात...?'
मला जाणे येणे परवडत नाही असेच काहीतरी सांगून मी ती वेळ मारून नेली. ठीक आहे म्हणत त्यांनी मंत्रालय संपल्यानंतर समोरच्या क्लर्कला भेटा म्हणून सांगितले. तो तुमच्याशी बोलेल... असेही त्यांनी सांगितले. माझ्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. जेवणाची सुट्टी झाली त्यावेळेला त्या क्लार्कचे माझ्याकडे लक्ष गेले, आणि त्याने मला सांगितले की टॉयलेटमध्ये चला. टॉयलेट मध्ये लघुशंका करत करत त्यांनी मला पाचशे रुपयाची मागणी केली. ते देणार असाल तर मंत्रालय सुटल्यानंतर आपण भेटूया असे सांगितले. पुन्हा माझ्या आशा पल्लवीत झाल्या. या मजल्यावरून त्या मजल्यावर वेळ घालवत होतो. ऑफिस टाईम संपल्यानंतर मी ठरलेल्या ठिकाणी गेलो. ट्यूबलाईट चालू होत्या, गर गर गर गर पंखे फिरत होते. प्रत्येक टेबलावरती फाईलीचे ढिगारेच ढिगारे होते. मी त्या दालनात पोहोचलो माझी नजर त्या क्लर्कला शोधत होती. तो देखील माझीच वाट पाहत होता. योग जुळून आला. बसा तुम्ही मी तुमचे पत्र तयार करतो असं तो म्हणाला. मी अवतीभवती नजर फिरवली बसण्यासाठी कुठे जागा नव्हती. तो पुन्हा पुन्हा म्हणाला बसा. शेवटी मीच वैतागुन विचारले कोठे बसू..? त्याने अधीक्षकाची खुर्ची दाखवली. मी नम्रपणे नकार दिला. तरीही त्याने आग्रह केला. आणि सांगितले समोरच्या टेबलाचा ड्राव्हर उघडून त्याच्यात आपली ठरलेली रक्कम टाका. आयुष्यामध्ये प्रथमच मी लाच देत होतो. मी सांगितले माझ्याकडे पाचशे रुपये नाहीत केवळ तीनशे रुपये आहेत. व्यवहार काय असतो, व्यवहार कसा असतो याचे तो मला धडे देऊ लागला आणि त्रागा करू लागला. परंतु तीनशे रुपयाचा मोहही त्याला सुटत नव्हता. नाविलाजाने त्याने पत्र तयार केले. आणि मला सांगण्यात आले संबंधित जिल्हा परिषदेकडे सोमवारी जाऊन चौकशी करा तुमचे पत्र तिथे पोहोचेल. मी थोडा जिंकलेल्या आणि थोडा हरलेल्या भावनेने तिथून निघून आलो. बदलीची अट शिथिल करणारे पत्र मिळवून जिंकलो होतो. आणि लाच देऊन हरलो होतो. ते पत्र मिळण्याचा मला लोभ होता आणि त्या पत्राच्या मोबदल्यात कांही मिळण्याची त्याला लालसा होती.
हणमंत पडवळ, उस्मानाबाद.
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
05) लोभ:मानवाची वाईट प्रवृत्ती
मानव जन्मताच लोभीवृत्ती धारण करीत असतो.प्रत्येक व्यक्तीला लालच असते.प्रत्येकाची वृत्ती ही भिन्न-भिन्न असते.कोणाला संपत्ती,भूक,समृद्धी,साम्राज्य यासारख्या मानवी स्वभावाने स्वतःच स्वतःची अधोगती करीत असतो.मनुष्य भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी पैशाच्या मागे धावत असतांना दिसतो आहे.'जगण्यासाठी पैसा आवश्यक नसतो तर व्यवहारासाठी पैसा महत्वाचा आहे' हे जोपर्यत मानवाला समजणार नाही तोपर्यंत लालची वृत्ती जाणार नाही असं वाटते. पृथ्वीवर असलेल्या मानवासहित इतर सजीव देखील स्वार्थी आहेच हे यापूर्वी ऐकलेल्या,वाचलेल्या कथेवरून आपणास समजून येते.कमी वेळात,कमी कष्टात क्षणात श्रीमंत होण्याची मानवाची वाईट प्रवृत्ती हीच खरोखर धोकादायक आहे असं म्हटल्यास वावगे वाटणार नाही
पैशावरून पैसा कमविण्याच्या नादात आपण सर्वस्व गमावून बसतो.मानवाने स्वतःच्या भौतिक सुविधेसाठी समान न्याय देणाऱ्या निसर्गाची अतोनात लयलूट केली.घरे,कारखानदारी,उद्योगिकीकरण या नावाने वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मानव कमी पडला आणि मानवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे त्यामुळे हवेतील अशुद्ध ऑक्सिजन घेतल्याने संपूर्ण मानवजातीला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे म्हणजेच मानवाने कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नये अन्यथा लोभीवृत्ती ही दुःखाच्या खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे.निसर्गाच्या अपरिमित हानीमुळे पर्यावरणात बिघाड आलेला असल्याने कोरोना सारख्या साथीचे आजार आज उद्भवत आहेत एवढेच नाही तर पैशाच्या मोहासाठी आर्थिक महासत्तेच्या नादात मानवजात लोभी बनत चालल्याचे उदाहरणे दिसत आहेत.
कष्ट करून समाधानाने जीवन जगणेच उचित व योग्य आहे पण मनुष्य वाईट मार्गाने जाऊन पैसे कमविण्याच्या नादात पडला आहे त्यामुळे झटपट पैसा हातात येण्यासाठी वाममार्ग स्वीकारला आहे.लॉटरी,जुगार खेळून श्रीमंत होण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे असे लोभी मानव स्वतःच स्वतःच्या नुकसान करीत आहेत त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढलेला दिसून येत आहे.कोणतेही काम करावयाचे असल्यास पैसे दिल्याशिवाय काम करायला पुढे धजावत नाही.गुन्हेगारीला देखील खतपाणी घालत असल्याचे दिसते.कुटूंबात देखील स्त्रियांचे लाड पुरविण्याकरिता भ्रष्टाचार, गुन्हेगारी कडे वळतांना पाहतो आहे.वास्तविक समाज जीवनात याचे मूळ बघितल्यास मानवाची लोभी वृत्तीच कारणीभूत आहे असे दिसून येते.
मेहनतीने कमावलेली चटणी भाकर ही हरामीने कमविलेल्या पूरणपोळीपेक्षा रुचकर व गोड असते.आज राजकारणात देखील अधिकाधिक संपत्ती मिळविण्याची लालच सुटलेली नाही.लोभी कुत्रा,सोन्याची अंडी देणारी कोंबडी,कंपनीमधून होणारी लूट इत्यादी उदाहरणातून मानवाच्या स्वभावाला बदलण्याची संधी मानवाला मिळाली आहे.प्रत्येक संकट हे एक संधी घेऊन येत असते.स्वतःलाच चुकातून शिकायला मिळत असते तरी देखील मानवाची लोभी वृत्ती न सुधारल्यास लालच मृत्यूच्या खाईत लोटत असतो हे एकदा सिद्ध झाले आहे.
'जब इन्सान के अंदर लालच का जन्म होता है तो उसके सुख और संतुष्टी को खत्म कर देता है'
✒ श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
dushantnimkar15@gmail.com
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
06) लोभ / लालच. मानवी जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाही त्या गोष्टी मिळाविणे.कधी कधी जी गोष्ट मिळाली ती गोष्ट पुन्हा पुन्हा मिळाविणे आणि मग या तूनच लोभ निर्माण होतो .मूल म्हणजे मिळणे आणि लोभ धरणे यात बराच फरक आहे .भूक लागली कि आपल्याला अन्न हवं असतं पण अन्न मिळालं कि आपण पंच पक्वान्नाची अपेक्षा करतो. अन्न मिळणं गरज आहे आणि पंचपक्वान्न मिळणं ही अपेक्षा लोभ अथवा लालच झाली जगण्यासाठी खाणं आणि खाण्यासाठी जगणं हे या गोष्टीचं तंतोतंत जुळणारं उदाहरण होऊ शकत . थोडक्यात सांगायचे झाले तर लालच म्हणजे हव्यास.होय , लालच अथवा लोभाचा शेवट गोड होत नाही. या साठी मी एक छोटीशी गोष्ट आपल्या समोर मांडीन एकदा एक वाटसरू एक घनदाट जंगलातून जात असतो, वाटेत चालताना तो खूप थकतो , त्याच्या कडे पिण्यासाठी पाणी किंवा खाण्यासाठी काहीच नसते , आणि काय करावे त्याला काही सुचत नाही . तो फक्त चालतच राहतो इतक्यात त्याला एक गर्द सावलीचे झाड दिसले आणि त्या गर्द सावलीचा त्याला मोह होतो म्हणजे लोभच त्याला निर्माण होतो . तो त्या सावलीमध्ये विसावा घेतो आणि नुसती कल्पना करतो येथे जर थंड पाणी असते तर खूप बरं झालं असतं , आणि काय आश्चर्य लगेच त्याला पाणी मिळालं तो पाणी पितो , त्याला लगेच असे वाटते आता काही खाण्यासाठी असते तर ? नुसती कल्पना करे पर्यंत वेळ कि लगेच जेवण हजर तो खूप जेवण करतो नंतर त्याला गाड झोप येते पण झोपण्यासाठी , विश्रांतीसाठी बिछाना नसतो तो म्हणतो आता बिछाना असता तर अशी कल्पना करतो तर लगेच बिछाना हजर तो गाड झोप घेतो परंतू त्याचे कल्पना करण्याचे चाललच होतं एक मिळालं कि पुन्हा पुढील अपेक्षा करायचं , लोभाच्या तो पूर्ण अहारी गेला होता . नंतर तो जी अपेक्षा करतो ती त्याची पूर्ण होते किमान आता तरी थांबायला पाहीजे होतं आणि पुढे जाणं अपेक्षित होतं परंतू नाही तो उगाच कल्पना करतच राहतो आणि म्हणतो " आपण जी जी अपेक्षा केली , ती ती पूर्ण होत गेली कदाचित इथे भूत तर असेल का ? मला ते खाणार नाही ना ? फक्त कल्पना करण्याचाच विलंब लगेच तेथे भूत हजर होते त्याला ते लगेच खाते . थोडक्यात तो माणूस किती लोभाच्या अधिन झाला हे या गोष्टी वरून आपल्या लक्षात येते. माणसाने लागेल तेवढे जरूर घ्यावे मग ते अन्न असो , पैसा कमविणं असो ( न खर्च करता ) मान मरातब किंवा अन्य काही असो ते प्रमाणात नक्कीच असावे कोणत्याही गोष्टीचा प्रमाणाबाहेर हव्यास करू नये. सुंदर उदा. आपण रोज आपल्या अंगणात पाहतो .काही तरी धान्य तेथे वाळण
लोभ / लालच. मानवी जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाही त्या गोष्टी मिळाविणे.कधी कधी जी गोष्ट मिळाली ती गोष्ट पुन्हा पुन्हा मिळाविणे आणि मग या तूनच लोभ निर्माण होतो .मूल म्हणजे मिळणे आणि लोभ धरणे यात बराच फरक आहे .भूक लागली कि आपल्याला अन्न हवं असतं पण अन्न मिळालं कि आपण पंच पक्वान्नाची अपेक्षा करतो. अन्न मिळणं गरज आहे आणि पंचपक्वान्न मिळणं ही अपेक्षा लोभ अथवा लालच झाली जगण्यासाठी खाणं आणि खाण्यासाठी जगणं हे या गोष्टीचं तंतोतंत जुळणारं उदाहरण होऊ शकत . थोडक्यात सांगायचे झाले तर लालच म्हणजे हव्यास.होय , लालच अथवा लोभाचा शेवट गोड होत नाही. या साठी मी एक छोटीशी गोष्ट आपल्या समोर मांडीन एकदा एक वाटसरू एक घनदाट जंगलातून जात असतो, वाटेत चालताना तो खूप थकतो , त्याच्या कडे पिण्यासाठी पाणी किंवा खाण्यासाठी काहीच नसते , आणि काय करावे त्याला काही सुचत नाही . तो फक्त चालतच राहतो इतक्यात त्याला एक गर्द सावलीचे झाड दिसले आणि त्या गर्द सावलीचा त्याला मोह होतो म्हणजे लोभच त्याला निर्माण होतो . तो त्या सावलीमध्ये विसावा घेतो आणि नुसती कल्पना करतो येथे जर थंड पाणी असते तर खूप बरं झालं असतं , आणि काय आश्चर्य लगेच त्याला पाणी मिळालं तो पाणी पितो , त्याला लगेच असे वाटते आता काही खाण्यासाठी असते तर ? नुसती कल्पना करे पर्यंत वेळ कि लगेच जेवण हजर तो खूप जेवण करतो नंतर त्याला गाड झोप येते पण झोपण्यासाठी , विश्रांतीसाठी बिछाना नसतो तो म्हणतो आता बिछाना असता तर अशी कल्पना करतो तर लगेच बिछाना हजर तो गाड झोप घेतो परंतू त्याचे कल्पना करण्याचे चाललच होतं एक मिळालं कि पुन्हा पुढील अपेक्षा करायचं , लोभाच्या तो पूर्ण अहारी गेला होता . नंतर तो जी अपेक्षा करतो ती त्याची पूर्ण होते किमान आता तरी थांबायला पाहीजे होतं आणि पुढे जाणं अपेक्षित होतं परंतू नाही तो उगाच कल्पना करतच राहतो आणि म्हणतो " आपण जी जी अपेक्षा केली , ती ती पूर्ण होत गेली कदाचित इथे भूत तर असेल का ? मला ते खाणार नाही ना ? फक्त कल्पना करण्याचाच विलंब लगेच तेथे भूत हजर होते त्याला ते लगेच खाते . थोडक्यात तो माणूस किती लोभाच्या अधिन झाला हे या गोष्टी वरून आपल्या लक्षात येते.
माणसाने लागेल तेवढे जरूर घ्यावे मग ते अन्न असो , पैसा कमविणं असो ( न खर्च करता ) मान मरातब किंवा अन्य काही असो ते प्रमाणात नक्कीच असावे कोणत्याही गोष्टीचा प्रमाणाबाहेर हव्यास करू नये.
सुंदर उदा. आपण रोज आपल्या अंगणात पाहतो .काही तरी धान्य तेथे वाळण घातलेले असताना पक्षी पटकन तेथे येतात आणि चोचीत जेवढे बसेल तेवढेच घेऊन जातात ते तेथे थांबत नाहीत पडून राहत नाहीत . संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात " पक्षी अंगणी उतरती ! ते का पडोनी राहती.!! तैसे असावे संसारी ! म्हणजे हव्यास न करण्याचा उपदेश संत महात्मे ही आपल्याला करतात कारण कितीही आपण कमावले मिळविले ते सर्व एक दिवस आपणास सोडून जाणे आहे म्हणून लोभ करणे लालच करणे योग्य नाही नियतीने, कष्टाने मिळविणे हे आनंदी पणानं आहे म्हणून लोभाची दूरबुद्धी नूपजे नारायणा !
भागवत लक्ष्मण गर्कळ ( बीड)
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
07) *सुटता सुटेना लोभ दिखावेगिरीचा..*
काही महिन्यापासून संपूर्ण जगाला कोरोना विषाणूच्या आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. मानव निर्मित विषाणूमुळे पुन्हा एकदा आपल्या रौद्र रूपाचे दर्शन केले आहे. संपूर्ण मानव जातीच्या अहंकाराला उन्मळून ठेवण्याची ताकद घातक विषाणूमध्येच असल्याचे सिद्ध केले. या विषाणूमुळे अनेक देश व तेथील सामाजिक, आर्थिक व्यवस्था लयास गेली आहे.
विविध त्रासाने कंटाळलेला मानव आता नवीन आजाराला सामोरा जात आहे. प्रत्येक वेळी नवीन आत्मविश्वास उरी बाळगून सकारात्मकतेने जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या कोरोना विषाणूमुळे मानवाला शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच व्यावहारिकदृष्ट्या कधीही न भरून निघणारी हानी होत आहे. पशु, पक्षी व शेतातील पिके त्याचबरोबर अनेकांचे संपूर्ण संस्कार उद्वस्त होऊन जात आहेत.
कोरोना विषाणूच्या भयावह परिस्थितीपासून वाचण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. कोणी मास्क वाटप करत आहेत. कोणी सॅनिटायझर वाटप करत आहेत, तर कोणी अन्न धान्य व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत. या मदतीच्या हाताबरोबर त्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारचे छुपे राजकारण, राजकीय, सामाजिक आणि अहंकारी फायदा घेणाऱ्या अनेक मंडळीची डोकीवर निघत. आपण आपत्ती ग्रस्तांना जी मदत करतो, म्हणजे या आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींवर एका प्रकारचे उपकारच करतो आहे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर व्यक्त होताना दिसतो. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अनेकांनी या आपत्तीचा फायदा देखील घेतला आहे, आणखी घेत आहेत. ज्यांनी ज्यांनी आपत्ती ग्रस्तांना मदत करताना फोटो काढले, सेल्फी काढली व ती प्रिंट मिडिया तसेच फेसबुक, व्हाट्सअप्प, इंस्टाग्राम व इतर ऑनलाईन प्रसिद्धीच्या माध्यमातून अपलोड केली. त्यांच्यासाठी माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट आज आपणापर्यंत पाठवत आहे.
एकदा श्रीकृष्णाने त्याच्या समोरच्या दोन टेकड्याचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला..
हे सगळे सोने गावकऱ्यांना वाटून टाक,
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावकऱ्यांला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
पुढे अर्जुन छाती काढून चालत होता.
मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.
दिवस रात्र काम चालू होते.
अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.
पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.
लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.
आता अर्जून अगदी दमून गेला होता.
पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!
आता यापुढे मी काम करू शकत नाही.
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की,
या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या...
पण अट एकच, एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्याना बोलवले आणि सांगितले,
या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत.
एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला.
लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला.
हा विचार आपल्या मनात का आला नाही? तो भयंकर अस्वस्थ झाला.
कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला...
अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास..!
तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास.
जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास..!
कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.
त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
थोडक्यात म्हणजे देणगीच्या बदल्यात, मदत केलेल्याच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, शाबासकी द्यावी, धन्यवाद द्यावेत, अशी अपेक्षा ठेवणे हे कधीच निरपेक्ष दान नसते. अशावेळी तुम्ही जिंकून देखील हरलेले असता.
मग एखाद्याला मदत करत असताना स्वत:ची प्रसिद्धीचे लागलेले व्यसन केव्हा सुटणार आहे कोणास ठाऊक?
हा संदेश सद्य स्थितीस योग्य वाटला म्हणून यावर थोडस लिहाव अस वाटलं. या आजारात स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वंसेविका हे खऱ्या अर्थाने ते निरपेक्ष भावनेने व कार्य दक्षतेने काम करत आहेत. अशा असंख्य लोकांना ज्यांचे कार्य मानवता, कर्तव्य, सामाजिक बांधिलकी अशा भावनेने करत आहेत त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे.
मंगेश विठ्ठल कोळी. ९०२८७१३८२०
mangeshvkoli@gmail.com
- (Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
08) लोभ : एक सामाजिक समस्या
लोभ नसे चांगला, लालच बुरी बला है... असं आम्हाला लहानपणापासूनच विविध बोध कथांच्या माध्यमातून शिकवलं गेलंय. पण हि शिकवण मानव केव्हाच विसरलाय.
लोभ हा पैशांचाच असतो असं नाही. कुणाला पदाचा लोभ असतो, कुणाला प्रतिष्ठेचा, कुणाला मान-सन्मानाचा, कुणाला मोठेपणाचा. लोभाचे प्रकार भिन्न असले तरी ते घातकच आहेत. कारण स्वतः ची प्रतिष्ठा जपण्याच्या लोभापायी दुसऱ्याची प्रतिष्ठा कशी कमी करता येईल याचा विचार मनुष्य करतोय. राजकीय खुर्ची च्या लोभासाठी एकमेकांवर कुरघोडी करतोय. आहे त्यात समाधान न मानता यापेक्षा अधिकच्या सुख-सुविधा कशा मिळवता येईल यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करतोय.
जास्तीचे पैसे कमविण्यासाठी भ्रष्टाचार, चोरी, सट्टा, पत्ते, जुगार यासारख्या मार्गाचा अवलंब केला जातोय. त्यामुळे देशात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अत्याचार वाढतांना दिसतोय. जेव्हा मानवाच्या मनात सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी लोभ निर्माण होतो तेव्हाच या समस्या निर्माण होत असतात. आपण जर आहे त्यात समाधान मानले व आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या तर निश्चितच आपण एक चांगले आयुष्य जगू शकतो.
सध्या कोरोनामुळे जी परिस्थिती आपण अनुभवतोय त्यावरून तरी आपल्याला धडा घेण्याची गरज आहे. अति लोभ केल्यामुळे मानवजातीची माती व्हायला वेळ लागणार नाही.
गणेश सोळुंके (जालना)
8390132085
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
09) " लोभ - एक अतृप्त तृष्णा "
मित्रांनो , आपल्या मानवी जीवनात भावनेला फार महत्त्व दिल्या जाते . भावनेवरच त्या त्या मानवांचा स्वभाव ठरत असतो . मन आणि शरीर हे दोन्ही आपण एकमेकांपासून दूर करूच शकत नाहीत . मनातील भावनांचे प्रतिबिंब हे शरीरावरही उमटतच असतात . मानवी स्वभाव हा षड् रिपूंनी बनलेला असतो . राग , मोह , मद , मत्सर , ईर्षा नि लोभ हीच ती सहा शत्रू होत जिच्या अति आहाराने मनूष्य हा पशूतुल्य व पापी बनतो . पण या षडरिपूंचा मर्यादित व समाजहितकारक वापराने मानव आपल्या जीवनाचा उत्कर्षही करू शकतो !
प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ मॕक डूगल यांनी मानवाच्या एकूण 14 सहजप्रवृत्ती असतात असे स्पष्ट केले आहे . त्यांच्या मते , " प्रत्येक मानव जन्माला येताना ह्या 14 सहजप्रवृत्त्या घेऊनच येत असतो . काही अनुवंशिक स्वरूपाच्या तर काही सभोवतालच्या परिसरातील सामाजिक घटकांच्या परिणाम स्वरूप मानवी जीवनात त्या येत असतात . " हे जरी खरे असले तरी त्यांचे उन्नयनही सामाजीकिकरणामुळे शक्य होते बरं का !! रामायणातील वाल्या कोळीचा महर्षि वाल्मिक ऋषी हे एक या सामाजिकीकरणाचेच उत्तम उदाहरण होय !
' लोभ ' , हीही एक अशीच मानवाला मिळालेली जन्मतः मान्य सहजप्रवृत्ती होय ! तिचे स्वरूप एखाद्या अतृप्त तृष्णेसमच असते . " लोभ हा जन्मापासून प्रारंभ होऊन मानवाच्या मृत्यूनंतरच संपते !! " हे एक निर्विवादित सत्य आहे , जे कुणीही नाकारू शकत नाही , हो ना ! ह्या लोभाच्या जाळ्यात फक्त सामान्य बुद्धीचीच मानवप्राणी गुंतले जातात . जो व्यक्ती अतिसामान्य बुद्धीच्या व मनाला पूर्णपणे काबूत केलेल्या असतात अशाच महान विभूती संत - थोर पुरूष या लोभाच्या जाळ्यात कधीच गुंतले जाऊच शकत नाहीत !! संत तुकाराम , छ. शिवाजी महाराज , संत गाडगेबाबा , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , डॉ . अब्दूल कलाम इ. अशा ह्या थोर व्यक्ती होत .
' लोभ ' , हा दोन प्रकारचा असतो : (1) समाजहितावह , (2) समाजविघातक .
एखाद्या साहित्यिकाला उत्कृष्ट लेखनशैलीचा लोभ जडला तर त्यातून उत्तम साहित्यकृतीच जन्माला येईल व समाजहित निश्चितच जपल्या जाणार . पण एखाद्या मानवाला जर विनात्रास संपत्ती जमविण्याचा लोभ जडला तर त्यातून हमखास भ्रष्टाचार , चोरी , गुन्हेगारी अशीच विध्वंसक व समाजविघातक समस्यांच जन्माला येणार . तेव्हा लोभ ही एक समुद्रासम विशाल व आकाशासम अमर्याद अशीच तृष्णा होय !
एखाद्या गरीब पादचारी व्यक्तीला सायकलीस्वाराचा हेवा वाटतो . जेव्हा सायकल मला मिळाली असाती तर .... सायकल मिवविल्यानंतर मोटारसायकल माझ्याकडे असती तर .....ती हस्तगत केल्यावर एखादी कार जवळ असती तर ..... कार प्राप्त झाली की एखादे हेलीकॉप्टरही माझ्याकडे असते तर ... ते जरी मिळवले असते तर एखादे विमान माझ्याकडे असते तर..... एवढयाने लोभ न थांबता अख्खे विश्व माझ्या मुठीत असता तर ..... अशाप्रकारे मानवी लोभ ही एक अतृप्त तृष्णाच होय !!
शेवटी , एवढेच सांगू इच्छिते की , ह्या लोभाला विवेकाच्या अंकूशाने नियंत्रित करून स्वतःचे व इतरांचे जीवन आनंदी व सुखी करावेत ! आणि हो , जगजेत्त्या बादशहा सिकंदरही ह्या लोभामुळेच आपले दोन्ही हात रिकामे ठेवूनच गेला !! ह्या लोभाच्या अतृप्त तृष्णेने तो अंतसमयी आपल्या मातृभूमी व जन्मदात्री या दोघांच्याही भेटीला मुकला .... हे सत्य आपण विसरता कामा नये बरं का !!
अर्चना दिगांबर गरूड (स.शि.)
मु. पो. ता.किनवट , जि. नांदेड
मो.क्र . 9552954415
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
10) लोभ - नाण्याच्या दोन बाजू
कुठलीही गोष्ट जास्त हवी झाली की आपण त्याला अति म्हणतो. अति तिथे माती या म्हणीप्रमाणे खरंच माती होते. जीवनामध्ये लोभ नसावा असे नाही. चांगल्या गोष्टीचा निश्चितच लोभ असावा. कोणाच्या तरी उपयोगी पडण्याचा लोभ, नातेसंबंध उत्तमरित्या सांभाळण्याचा लोभ, देशासाठी काहीतरी चांगलं करण्याचा लोभ, माणुसकी जपण्याचा लोभ, ज्यामुळे आपले आयुष्य सत्कारणी लागेल अशा सार्या गोष्टींचा लोभ नक्कीच असावा. पण स्वतः मोठे होण्यासाठी, स्वतःचं नाव होण्यासाठी जर तुम्ही लालच करत असाल तर ते चुकीचे आहे. लोभ हा कोणत्याही गोष्टीचा असू शकतो. कोणाचे काहीतरी काम करून देण्यासाठी पैसा किंवा इतर गोष्टींची मागणी करणे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे प्रामाणिक,होतकरु लोकांची खूप कुचंबना होते. जी व्यक्ती अशा लोभी लोकांच्या मागण्यांची पूर्तता करते, तीच व्यक्ती त्या लोकांची जवळची व्यक्ती बनते आणि बरं का तिच्यामध्ये तेवढी कुवत नसली तरी. श्रीमंतांना अजून श्रीमंत होण्याचा लोभ. ह्या लोभापायी माणूस धावतोय नुसता पैशाच्या मागे. समाधान असे नाही. पैसे खूप असतील तरच समाधान आहे अशी एक सुखाची व्याख्या करून घेतली आहे आपण. पण निर्जीव गोष्टी च्या नादी लागून आपण सजीव, बोलक्या गोष्टींना वेळ देत नाही ,नीट आयुष्य जगत नाही ही एक मोठी खंत आहे. ह्या लोभापायी लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत लाच मागितल्यामुळे.होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. असे एकही क्षेत्र नसेल जिथे काळाबाजार चालत नाही. कोथिंबीरची पेंडी आणली तर त्यात पाच-सहा गवताच्या काड्या असतात. शेंगदाण्यांमध्ये शेंगदाण्यासारखे दिसणारे गारगोटीचे खडे असतात. लोभापायी नुसती भेसळ चालू आहे.
शहाणे व्हा आणि खरे समाधान कशात आहे हे ओळखून त्या गोष्टीचा लोभ असू द्या.
प्रिती दबडे
9326822998
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
11) लोभ / लालच
श्रीमद भगवतगीतेत एक श्लोक आहे.
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।।
काम क्रोध आणि लोभ नरकाची दारे आहेत ,हे तिन्ही जिवात्म्च्याचा पतनाला कारणीभूत ठरतात म्हणून ह्या तिन्ही दोषांचा त्याग केला पाहिजे लोभाचे निराकरण, निवारण अतिशय कठीण आहे. लोभाचे वेगवेगळे रुप आपल्याला माहित आहे. सर्व साधारणपणे लोभ /लालच ह्या संबंध पैशाची जोडल्या जातो.पण लोभ म्हणजे आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त मिळण्याची, मिळविण्या, इच्छा, हव्यास म्हणजेच लोभ. जास्त करुन लोभ हा पैशाचाच असतो. पैशाच्या हव्यासापोटी लाचलुचपतीची प्रकरणे घडतात , किंबहुना आपल्या देशात व्याप्त भ्रष्टाचाराचा विक्राळ अजगर ही, ह्याच लोभ आणि लालसेचे अपत्य आहे.
हव्यास ,लोभ लालसा फक्त पैशाची नसते तर कोणाला नावलौकिकाची लालसा असते. कुणाला सत्तेचा हव्यास असतो तर कधी भुकेल्याला चार भाकरी अधिक मिळावी ह्याची हाव असते. कित्येक स्त्रीयांची नवनवीन कपडे,पर्स, चप्पल जोडे जमा करण्याची हौस ही सुद्धा सरत शेवटी ह्या लोभ आणि लालसाचाच एक प्रकार आहे
लोभ माणसाच्या सदसदविवेक बुद्धीचे हनन करतो,त्याला पापीकृत्य करण्यासाठी प्रवृत करतो.कधी पैशाच्या हव्यासापोटी माणुस इतका काही खालच्या पातळीवर उतरतो की त्याची कल्पनाही करवत नाही. मरणाच्या दारात असलेल्या कडून तर पैशाची वसुली होतेच पण मरणा नंतर ही त्या मृत कलेवराची ही किंमत वसुल केल्या जाते. मेल्याच्या टाळु वरचे लोणी खाणाऱ्याची जमात जागोजागी सापडते. अपघाती मृत्यू, खून,किंवा संशयास्पद मृत्यू मधे मृत शरीराचे शव विच्छेदन कायद्याने बंधनकारक आहे. लवकर पोस्टमोर्टम करुन शव लवकर मिळण्यासाठी सुद्धा लाच घेणाऱ्यांना काय म्हणावे! माणुसकीला सुद्धा लाज आणणाऱ्या ह्या मंडळींची गणना कशात करावी !नराधम हा शब्द ही छोटा ठरतो .ह्यांना नरपिशाच म्हणणेच योग्य आहे.
असाच चिड आणणारा आणखी एक प्रकार म्हणजे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्या वर सुद्धा मृतांचे शव मिळायचा आधी दवाखान्याच्या बिलाची पूर्ण रकम भरणे आवश्यक आहे, ही अट तशी योग्य ही असेल कारण नंतर कोणी बिलाची भरपाई करत नाही.कधी कधी नातेवाईकांच्या कडे पूर्ण पैसे नसतात, तेव्हा सुद्धा शव देण्यास नकार देऊन, नातेवाईकांची अडवणूक होते. अशाच कुठल्या प्रसंगी नातेवाईकांनी तोडफोड केली असेल. आता हे प्रकार सर्रास घडतात . इथे माणसाच्या मनात दडलेला लोभ रुपी राक्षस त्याचे विक्राळ रुप धारण करतो.
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
12) लालच बुरी बला है
मित्रांनो लोभ,अति तिथे माती हे शब्द आपण नेहमीच ऐकतो.आणि समाजात लोभी लोकांची वागणुक व उतरत्या वयात झालेली त्यांची फजिती सुध्दा आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत असतो.एक ग्रामिन भागात म्हण आहे.सडे पण बाहेर नाही पडे. जिवन हे शणभंगुर आहे.अस म्हणतात आपले श्र्वास देखिल मोजलेले आहे. तरी सुद्धा मानवाला मोह आवरत नाही.बरं झालं मेल्यावर सोबत काहीच नेता येत नाही कींवा सोबत येत नाही.येते फक्त आपण केलेले चांगले वाईट कृत्य. मग तरीही इतका मोह का बरं?निसर्गाने आम्हाला एक एक उदाहरण देऊन जिवन कसं जगायचं हे सांगितले आहे.फक्त आपलं लक्ष त्यावर असायला पाहिजे. बघा तर एक गंमत सांगते . मधमाशी खुप लांब लांब जाऊन फुलांचा रस गोळा करते आणि सुंदर अस मधाचपोळ तयार करते आणि त्या मधमाशांनी ते स्वता मध पिऊन टाकले नाही तर लोक ते मधाच पोळ झाडून घेऊन जातात. हे उदाहरण आमच्या जिवनात ही लागू होत. जर आम्ही संपत्ती जमविली आहे तर आपण मरण्या आधिच सपात्रि दान केले पाहिजे नाहीतर मेल्यानंतर नातेवाईक प्रेताजवळच संपत्ती साठी भांडायला सुरुवात करतात.स्वताची ओंजळभरुन खाली पडण्या आधि दान करा. मित्रांनो जिवन जर सुखी करायचे असेल तर लोभ बाजूला ठेवून देने शिका. १०कपाट भरून साड्या जमवल्या तरी एका वेळेस एकच घालण्याची सोय केली आहे. घरात धान्याची कोठारे भरली असली तरी जेवढी भुक असेल तेवढच अन्न तुमच्या पोटात जाईल.आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मते मुलांसाठी संपत्ती जमवुन ठेवण्या पेक्षा मुलांना संपत्ती कमविता येईल असं उच्च शिक्षण द्या. तेव्हा त्याला मेहनती ची आणि संपत्ती ची कींमत कळेल.मग उगाच लोभ न बाळगता सुंदर जिवन जगता येईल. पण मग आपल्या जवळ जे काही असेल त्यातले म्हातारपणासाठी थोडेफार ठेवून. उरलेल्या संपत्ती चा आंनद कसा घ्यायचा हेतर महिण्यातून एक दिवस वृध्दाश्रम गाठायचे. तिथल्या वृध्दांना गरजेच्या वस्तू घेऊन दयायच्या. दुसऱ्या महिण्यात अनाथाश्रम गाठायचे तिथल्या लहान मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करायचे. बघा कसा आनंद मिळतो ते. घरात सुध्दा खुप सामान भरून नये सगळी अडगळ तयार होते आणि आपले विचार हि त्या अडगळीत पडलेल्या वस्तूसारखे एकलकोंडे होतात. आणि मग माझं माझं करत असतांनाच आपल्यात विकृती निर्माण होते.असे असंख्य विकृत लोक समाजात वावरताना दिसतात.हे सगळं ऐकट्या लोभामुळे . आणि ज्या वेळेस त्यांना पश्र्चाताप येतो त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. शेवटी त्यांच्याच तोंडावाटे शब्द बाहेर पडतात की संपत्ती जमविण्यासाठी वेळ वाया गेला जगायचं राहुनच गेले.मित्रांनो खुप फिरा सगळा देश पालथा घाला, खुप खा विविध मेनुंचा आस्वाद घ्या जिथे जाल तिथे आपली मैफिल तयार करा पण हे करत असताना आपला हात जरा सैल ठेवा आपल्या आजूबाजूला हि डोकावून बघा त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्या . शेवटी जे पेराल तेच उगवेल. या हाताने द्या या हाताने घ्या.
सौ मेघा विनोद हिंगमिरे. शिक्षिका भारत विघालय वेळा. त.हिंगणघाट .जि वर्धा
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
13) लोभ किंवा लालच
लहानपणी पत्र लिहित असताना समारोप वेळी माझी आई मला नेहमीच लिहायला सांगत होती , ते म्हणजे कळावे लोभ असावा. त्यावेळी मला कळत नव्हते की लोभ असावा असे का लिहितो ? आपण ज्यांना पत्र लिहितो आहोत त्यांनी आपला लोभ ठेवावा ,आपल्याला संग्रही ठेवावे, आपल्यावर जास्तीचे प्रेम करावे , असा अर्थ त्यातून निघतो. असे मला त्यावेळी कळले. त्यानंतर हायस्कूलमध्ये असताना लालच का फल बुरा होता है ! हा पाठ हिंदी विषयात अभ्यासला आणि खऱ्या अर्थाने लालच आणि लोभ या दोन्ही शब्दांचा अर्थ मानवी मनाशी कसा जोडलेला आहे याचा विचार करण्यास भाग पडले .
आपल्याकडे निसर्गनियमानुसार व आपल्या कर्मा च्या रूपाने मिळालेली अनुवंशिकता, परिस्थिती ती मग ती कोणतीही ही आर्थिक, राजकीय-सामाजिक अशा कोणत्याही स्तरावरील परिस्थिती ती जी आणि जशी असेल या तशी आपण मान्य केली पाहिजे. जर आपण दुसऱ्याशी तुलना करून आपल्यापेक्षा प्रभावी व सरस असलेल्या व्यक्तीला जशा आहेत तसे स्वीकारले तर आपल्या तुलना होऊ शकत नाही किंवा आपण तुलना करत नाही त्यावेळी आपण लोभी असूच शकत नाही. पण जेव्हा आपण आपल्या कुवतीपेक्षा जास्त मिळावे हे अशी अपेक्षा ठेवतो इर्षा ठेवतो तेव्हा तो लोभीपणा असतो. हा मानवी स्वभावातील महत्त्वाचा दुर्गुण म्हणता येईल.
गौरीशंकर सर करणाऱ्या तेनसिंगला अनेक वेळा अपयश आले. त्यामुळे तो निराश झाला नाही ,पण त्याने हिमालयावर चढण्याचा लोभ ठेवला आणि पुन्हा प्रयत्न करण्याचे सामर्थ्य निर्माण केले आणि अखेर त्याने हिमालयावर विजय मिळवलाच, केवळ त्याने ठेवलेल्या विजयाच्या लालसेपोटी हे ही लक्षात घ्यावे.
" जे सुदूर, असाध्य तेथे मन धावे!"
मानवी स्वभावाचे अचूक वर्णन करताना थोर कवयत्री शांताताई शेळके यांनी माणसाच्या मनाचे अचूक वर्णन एका ओळीत केले आहे. माणसा जवळ जे असते हे त्यात तो समाधान मानत नाही, तेवढ्यात त्याला तृप्तता येत नाही. जे आपल्याकडे नाही ते सतत मिळवण्यासाठी लालसा जोपासत असतो. मानव लोभी होत जातो, आणि निर्मळ , निर्भेळ, निस्वार्थी आणि निखळ जीवनाचा आनंद दूर होत जातो. म्हणून आपल्या जीवनात लोभ किंवा लालसा चांगल्या गोष्टीची असावी. म्हणजे आपली प्रगती निश्चित होते.
श्रीमती मेघा अनिल पाटील, उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
14) लोभ: अति सर्वत्र वर्ज्ययेत्
आपल्या यशाची सुरुवात जिथे झालेली असते तिथेच अपयशाची मुहूर्त मेढ रोवलेली असते. कुठल्याही उंच शिखरावर वास्तव्य करण्यासाठी जागा आणि स्वातंत्र्य कोणी देत नाही. कारण शिखर हे सर करण्यासाठी असते, राहण्यासाठी नाही. हा निसर्गाचा नियम आहे. तो आपण समजुन घेतला पाहीजे. या शिखरावरून खाली उतरावेच लागते. कुठे थांबायचे हे ओळखता आले पाहिजे. लोभाच्या अधीन होणे म्हणजे आत्मघाताची सुरुवात.
फ्रान्सचा भाग्यविधाता नेपोलियनला वयाच्या विसाव्या वर्षी आपण काय करू शकतो हे त्याला समजले होते. म्हणजेच आत्मशक्ती ची जाण त्याला आली होती. पण तो शेवटी हरला. कारण कुठे थांबायचे हे त्याला कळलेच नाही. तीच गोष्ट हिटलरची. आपले हुकूमशाही कुठपर्यंत चालवायची हे न कळल्यामुळे आत्महत्येची वेळ त्याच्यावर आली.
पण शिवाजी महाराज हा विवेक बोध ठेवून होते. म्हणून संधी आणि वारा बघत ते दिशा बदलत गेले. कधी दोन पावले मागे आले. म्हणून त्यांनी स्वतःचे राज्य तर राखले. पण रयतेचा राजा म्हणून नावलौकिकहि कमावला.
आजच्या गतिमान जीवनात मुलांना सर्व काही झट् की पट् हवे असते. तेही जास्तीत जास्त. तुमच्या अंगातली कला ही हळूहळू जोपासली गेली पाहिजे. त्यासाठी रोज रियाज पाहिजे. पण आजकाल सगळ्यांना एका दिवसात तानसेन व्हायचे असते. त्यासाठी पालकही काहीही करायला तयार असतात. पण हा लोभ कशासाठी? कळीतून हळूहळू फूल उमलत असतं. पण हे लक्षात न येणाऱ्या पालकांची कीव करावीशी वाटते.
लोभ कसा असतो यासाठी प्रसिद्ध रशियन लेखक टाॅलस्टाॅय ची एक कथा मला इथे सांगावीशी वाटते.
एका लोभी माणसावर देव प्रसन्न झाला. त्याला म्हणाला, "उद्या सूर्यास्त होईपर्यंत जेवढ्या जमिनीवर तुझी पावले पडतील, ती सगळी जमीन तुझी होईल. आता जमीन किती हवी हे तू ठरवायचे. त्याप्रमाणे प्रयत्न करायचा." हे ऐकून त्याला खूप आनंद झाला. तो लोभी होताच. त्यामुळे तो आपली विचार क्षमता गमावून बसला होता. त्यामुळे देवाच्या बोलण्यातला आशयही तो समजू शकला नाही.
सकाळी उठून तो चालू लागला. त्याच्या लक्षात आले जर मी चालत राहिलो, तर कमी जमीन मिळेल.म्हणून त्याने पळायचे ठरवले. त्याप्रमाणे तो पळत राहिला. काही वेळाने त्यास तहान, भूक लागली. पण तहान-भूक काय रोजचीच आहे. अशी संधी परत थोडी मिळणार? म्हणून तो आणखी पळत राहिला. खरंतर संध्याकाळपर्यंत बरीच जमीन त्याला मिळाली होती. आता थांबायला हरकत नव्हती. पण पुढची मोकळी जमीन त्याला खुणावत होती. तो अजून पुढे, अजून थोडी, करत राहिला. तो तहानेने, भुकेने, अतिश्रमाने इतका व्याकुळ झाला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याने एवढी जमीन मिळवली, पण आता मृत्यूनंतर त्याला फक्त साडे तीन हात जमीन लागणार होती. हा केवढा मोठा विरोधाभास! एवढा हव्यास, एवढा लोभ कशासाठी? जगलोच नाही तर काय उपयोग? एवढा तरी विवेक हवा ना. मोहाचे क्षण टाळता आले पाहिजे. स्वतःचे हित अहितच कळण्याइतका विवेक आपल्याकडे असतो. तो फक्त वापरला पाहिजे. कोणत्या गोष्टीला कधी आणि किती महत्त्व द्यायचं हे कळलेच पाहिजे. किती जमीन आपल्याला हवी आहे हे ओळखता आले असते तर त्याच्यावर मृत्यू ओढवला नसता.
आजच्या काळात प्रत्येकाला गुरु बनवायची घाई आणि शिष्य बनवायची घाई. यांना पुन्हा स्वतः गुरु बनण्याची घाई. म्हणजे हव्यास. ह्या खेळात शिष्य खरंच का गुरुचा पाहिजे तसा मान राखतात? नाही. कारण त्यांनाही गुरु बनवण्याचा हव्यास असतो .अशा लोकांसाठी कबीर म्हणतात, ' लोभी गुरू, लालची चेला, पडे नरक मे ठेली ठेला.'
रामाने या लोभ मोह यावर विजय मिळवला होता म्हणून रामाचे ते 'राम राज्य' ठरले. द्यूत खेळण्याच्या हव्यासाने धर्मराजाने आपले पूर्ण राज्य गमावले. आपले सारे काही गमावले.
लोभ, हव्यास, मोह आत्मघातकी आहे. ते षड्- रीपुंपैकी एक आहेत, हे माहिती असूनही, तो क्षण टाळता येत नाही. याचे कारण म्हणजे जीवनात सतत वाटत असणारी अनिश्चितता. खात्री नसलेला पण करावा लागणारा जीवनाचा प्रवास आणि तसदी न घेता प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात सर्व काही मिळवण्याचा हव्यास. एका रात्रीत सर्व काही हवे. वाट पाहण्याचा पेशन्स आजचा धावणाऱ्या माणसाकडे नाही. आवश्यक असलेले श्रम घेण्याची तयारी नाही.
यासाठी मला मिडास राजाची गोष्ट आठवली. मिडास राजा म्हणजे सोन्याचा लोभी. सोने मिळवण्याच्या लालसेने त्याने देवाकडून वरदान मिळवले. तो ज्या वस्तूला हात लावेल ती सोन्याची होईल असा तो वर. मिडास राजाला हव्यासामुळे कुठे थांबायचे ते कळले नाही. ह्या हव्यासापायी, ह्या लोभापायी, तो आपली अतिशय लाडकी मुलगी गमावतो. मग त्याला पश्चाताप होतो. पण 'अति तेथे माती' हे ठरलेलेच आहे.
कुठलाही लोभ, लालसा, हव्यास धरताना आपली सद्सद् विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. आयुष्याच्या वाटेवर पदोपदी मोहाचे क्षण येत असतात. ते टाळता आले पाहीजेत. आयुष्यात सोनेरी संध्याकाळ बघायची असेल तर सूर्योदयाचे महत्त्व ही समजावून घेतले पाहिजे. हातात आलेला पेला, अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे ते आपणच आपले ठरवायला हवे. धावणाऱ्या ला थांबण्याचं महत्व कळायला हवे. लक्षात ठेवायला हवे,
'अति सर्वत्र वर्जयेत'
शुभदा दीक्षित पुणे
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
15) लालच /लोभ
'लालच बुरी बला है' ही हिंदी म्हण प्रचलित आहे. पुराणकाळापासून संत महती सांगून गेलेत की लालच किंवा लोभ माणसाला रसातळाला घेऊन जातो. यात लोभापायी मानवाने निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी प्रगती, विकास साधण्याच्या नावाखाली मानवाने जंगले नष्ट केली. वृक्षांची बेसुमार कत्तल केली. खेळाची मैदाने नष्ट केली. पशु पक्षांचे निवारे तोडले.पण हा लोभ किंवा लालची वृत्ती जास्त टिकत नाही. त्यात तो स्वतःच फसत जातो.मानवाच्या या अधम कार्याची परिणिती अवकाळी पाऊस,अवर्षण,अनावृष्टी,ग्लोबल वॉर्मिंग नि घातक विषाणूंचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचे वाईट परिणाम मानवालाच भोगावे लागतात.
या लोभामुळे सामाजिक,नैतिक अध:पतन होते.हव्यास किंवा लोभामुळे मानव जीवनात आणखी चुका करतो. बालपणापासून आपण सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट ऐकत आलो आहोत. रोज एक सोन्याचे अंडे मिळत असूनही एकदाच सर्व अंडी एकदाच मिळविण्यासाठी कोंबडीच्या मालकाने कोंबडीला मारले. नि एकही अंडे मिळाले नाही. म्हणून अजूनही वेळ आहे. मनुष्याने लोभ नि हव्यास सोडून निसर्गाला त्याचे सौंदर्य पुन्हा बहाल करावे मग हा निसर्गही भरभरून दान पदरात टाकेल. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी बनून राहील. फक्त गरज आहे योग्य बुद्धिमत्तेची आणि नीतिमत्तेची.
सौ.भारती सावंत, मुंबई
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
16) *लोभ -मानवी स्वभाव*
मानवी स्वभाव हा राग,लोभ ,क्रोध .मोह.मद आणि. मत्सर या शङरिपूनी तयार झालेला आहे. प्रत्येक मनुष्याला कशाना कशाचा तरी लोभ असते.मग तो पैशाचा .असो प्रसिद्धीचा असो सुंदर तेचा असो , धनसंपत्तीचा असो , पुत्र्याचा असो वा वासनेचा एक ना अनेक प्रकारचे लोभ मनुष्याला ग्रासून टाकतात . या लोभापायी माणूस कोणत्याही स्तराला पोहचतो. या जगात प्रत्येक मनुष्य लोभापायी आपले कार्य करीत असतो, नोकरी असो शेती असो या देशासाठी सर्व काम करणारे लोक हे कोणत्या ना कोणत्या लोभापायी आपले काम करत असतात. आणि त्याच्या मोबदल्या मध्ये कशाची तरी इच्छा बाळगत असतात. म्हणून हा लोभ कोणालाही सुटला नाही .हा लोभ माणसांमध्ये कुप्रवृत्ती निर्माण करते. काही लोक खालच्या स्तरापर्यंत पोहोचून जातात .आपले कार्य तर करतात .पण ते आपल्या अपेक्षाभंग करणारे सुद्धा कार्य करत असतात.
*लोभाचा वाईट परिणाम* .गोष्ट आहे माझ्या लहाणपणीची.
सकाळी आम्ही बागेत फिरत असताना माणसाची गर्दी च असायची . तिथे दोन मानसं आले .त्यांनी शिरीष ला दोन मोठी चॉकलेट दिली ."आणखी चॉकलेट हवे असल्यास आमच्या बरोबर चल” अनोळखी व्यक्ती म्हणाले . चाँकलेट च्या लोभापाई शिरीष त्यांच्या बरोबर गेला.आम्ही शिरीष ला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला:पण शिरीष ला चॉकलेटची भुरळ पडली होती ना.शिरीष त्या माणसाबरोबर जाताच आम्ही आरडाओरड केली. माणसांना थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. आपल्या लोकांना जमवलं .त्यांचा पैकी दोघांनी मोटारसायकलवरून त्या लोकांचा पाठलाग केला .बसस्टाप रोड नी नेताना दिसले.त्यांनी त्या माणसांना अडवले. पोलिसांच्या ताब्यात देऊन शिरीष ला घेऊन ते घरी आले .शिरीष फार घाबरलेला होता .आम्ही घाबरलेलो होतो.
“ घाबरून जाऊ नका” घाबरल्यावर कार्यभार फसतो. तेव्हा नीट विचाराने वागा. पाहिलाच ना बाळांनो. लोभ हा कधीही वाईटच रे !शुल्लक पैक्षाचा लोभापाई स्वताःच स्वतःला कैदी करून घेणारा मनूष्य आणि चॉकलेटचा लोभानं स्वतःवर संकट ओढवून घेणारा शिरीष हे दोन्ही सारखेच ना.अशावेळी विचारांना वागायला हवं ......
या लोभामुळे ओढवलेल्या संकटाची गोष्ट तुम्हाला सांगते.
एकदा एका जंगलात एक तहानलेला माकड पाण्यासाठी वणवण भटकत होता .पुढे त्याला अंधारी येत होती. पाण्यासाठी फिरत होते. फिरता-फिरता त्याला एका खड्ड्यात भरपूर पाणी दिसले. माकडाला राहवलं नाही. त्याला बाहेर येणे जमेना.बाहेर पडता माकडाने म्हाताऱ्या बोकडाकडे चोरून पाहिले. बोकडाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून माकड खूप खुश झाले. "बोकड दादा , हे पाणी अमृतासारखे गोड आहे. आणि हो, या खड्ड्यातील पाण्यात नुसती डुबकी मारली तरी, प्राण्यांना तारुण्य प्राप्त होते .मला याची प्रचिती आली. मी आता पूर्ण तारुण्य उपभोग तोय".एवढं बोलून माकड पुन्हा जोरजोराने पाण्यात पोहू लागला .बोकडआनंदला लोभीभावनेने अधीर होऊन त्यांना विचारलं खरं ना.माकडोबा ?
म्हणजे काय?तू प्रत्यक्ष येऊन तर बघ.खात्री करुन घे.अरे, मी तर तुझ्या पेक्षा ही म्हातारा होतो. मला धावता येत नव्हतं ,उडी मारता येत नव्हती, झाडावर चढणं उतरणं जमत नव्हतं, जीवनाला कंटाळलो होतो .पण या दैवी पाण्यात आंघोळ केली; आणि जादू झाली. गगनाला कवेत घेण्याचे सामर्थ्य माझ्यात आले. आता मी रोज ईथं आंघोळीसाठी येतो. आणि नवी ऊर्जा नवा उत्साह घेऊन घरी परततो.
माकडाने गोड बोलून बोकडाला लोभात पाडलं आणि बोकळ तारुण्याची स्वप्न पहात हरवून गेला. मलाही तरुण व्हायचं बोकड म्हणाला.," माकडदादा मलाही तुझ्यासारखा व्हायचे रे! मी येतो" असं म्हणून बोकडांनं पाण्यात उडी मारली. पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खावू लागला.हे पाहून माकड चटकन बोकडाच्या डोक्यावर चढून खड्ड्यातून बाहेर आला आणि बोकडाला हसून म्हणाला," मूर्ख लोभी बोकळा आता तिथेच रहा .माकडाच्या शब्दांनी बोकडाला हे कळले की.त्याच्या डोळ्यात अंजन घातले गेले.तो शोक करू लागला ,पण त्याचे रडणे ,ओरडणे ऐकायला तिथे कुणीही नव्हते .
पाहिलतं ना या लोभामुळे काय, कशी वेळ येते.अशावेळी सारासार विचार करणे गरजेचे असते. लोभाला बळी न पडता वागावं.त्यातच स्वतःचे कल्याण आहे. लोभामुळे शिरीष आणि बोकड फसला रे बाबा म्हणून लोभाला बळी पडायचे नसते .काय होईल हा विचार प्रत्येकाने करायला हवा. नाही तर बोकडासारखे फसगत होईल कळेलं ना!
माकडाने गोड बोलून बोकडाला लोभात पाडलं आणि बोकळ तारुण्याची स्वप्न पहात खड्यातच हरवून गेला.
--------------------------
यशोधरा सोनेवाने , गोंदिया
9420516306
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
17) लोभ
मोहमायेच्या या दुनियेत
आयुष्य तुझे क्षणभंगुर वाटे
लोभ सारुन बाजूला जग
नको पसरू वाटेत तुझ्या तू काटे
लोभ म्हणजे आहे त्या गोष्टीत समाधान न मानता असलेल्या गोष्टींची परत परत अभिलाषा बाळगणे होय." लालच बुरी बला है।"असे म्हणतात आणि ते खरेच आहे.कारण लोभाने अति तेथे मातीच होते.कोणत्याही गोष्टीचे अति केले की एकतर नुकसान होते कींवा आपल्यावर पश्चातापाची वेळ येतेच येते.ज्याप्रमाणे रोज सोन्याची अंडे देणारी कोंबडी जर लोभाने ,हाव करुन जर मारली नसती तर त्या कोंबडीच्या अंतापर्यंत ती रोज एक सोन्याचे अंडे देत राहिली असती.पण तिच्या मालकाने जास्त अंड्यांच्या लोभाने कोंबडीला मारले.व शेवट काय ? तर अंडे ही गेले अन् कोंबडी ही गेली.तशीच गोष्ट एका गरीब पण समाधानी माणसाची. गरीबीला वैतागलेला एक भिकारी देवाला तळमळीने विनवतो. देव प्रसन्न होऊन विचारतो , " काय हवे." भिकारी म्हणतो ," मला खूप सारे धन दे " त्यावर देव त्याला सांगतो , " तुझ्या झोळीत मावेल तेवढेच देणार,खाली पडले की सगळी माती होणार." भिकारी होकार देतो .देव त्याच्या झोळीत सुवर्ण मुद्रा टाकायला सुरवात करतो.भिकारी समाधानी असल्याने तो झोळीत मावेल,सोसेल एवढ्या मोहरा झाल्या की ,"आता बास " असे म्हणतो. घरी जातो व त्या मोहरांच्या सहाय्याने सुखी जीवन जगू लागतो.भिकाऱ्याच्यात झालेला बदल पाहून शेजारी जो लोभी असतो.बदलाचे कारण विचारुन स्वतः हघ देवाला प्रसन्न करुन मोहरा मागतो.पण देव देत असताना लोभी मनुष्य थांब म्हणत नाही. झोळी फाटते, सर्व मोहरा जमिनीवर पडतात व माती होतात.व देवही गायब होतो.लोभी मनुष्य रडायला लागतो,पश्चाताप करायला लागतो.पण काहीच उपयोग होत नाही. म्हणून लोभ कधीही करु नये.
आयुष्यात आपल्याला जे जे मिळते त्यात आपण जर आनंद,समाधान मानले तर आपण नेहमी समाधानी व आनंदी राहतो.सकारात्मकता अंगी बाणते.जीवन शांततेत राहते.आपल्या गरजा,आपल्या व आपल्या कुटुंबातील लोकांच्या गरजा भागल्या तर आपण शांत रहावे.ज्यादा पैशाची हाव ठेवली की मिळवलेल्या पैशाचा उपभोग पण आपल्याला समाधानाने घेता येत नाही. घरामधील साधनसंपत्ती कीती आहे? ती पुरेशी आहे का? असेल तर ज्यादा मिळावे ही भावना आपण न बाळगता राहिले पाहिजे.
आता सध्याच्या घडीला कोरोनामुळे सगळीकडे संचारबंदी लागू झाली आहे. पण काही लोभी लोकं गरजा भागवण्यासाठी बाहेर पडतात व पोलीसांचा मार खातात.काही दुकानदार जादा दराने माल विकतात.काही तंबाखूजन्य पदार्थ विकतात. पण सापडले तर मात्र दंड भरावा लागतो.शिवाय बदनामी होते ती वेगळीच.म्हणून लोभ कुणीच न करता जीवनयापन केले पाहिजे. व कोणत्याही गोष्टीचा लोभ न धरता धीर धरून धिराने धीरोदात्तपणे राहणे केंव्हाही चांगले.सर्वात महत्वाचे म्हणजे घरीच थांबावे व सुरक्षित रहावे.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
18) *कर्म लोभाचे*
लोभ हा मानवाचा अत्यंत असा दुर्गुण आहे की त्याने या जगातील कोणत्याही व्यक्तीला सोडलं नाही. लोभ नसता तर माणसाने कमावणे खाणे यावर कधी आपला वेळ घालवला नसता. लोभ आहे म्हणून माणूस उद्याची फिकीर करतो आपल्या पोटाची व आपल्या मुलांच्या जीवनाची सुध्दा फिकरित राहतो. लोभ नसता तर उद्याची त्याला फिकीर करायची गरजच नव्हती.
लोभापायी लोक चोऱ्या करतात, डाके टाकतात. कमी मेहनत करून आपल्या जवळ कसं धन एकत्रित करता येईल याबाबत विचार करत असतात.
लोभ हा असा मानवी स्वभाव आहे की त्याच्यामुळे तो आपले काम तर करतो पण कधी तरी आपल्या जीवनाचा अति करण्यात जीवही गमवावे लागते.
जेव्हा आपण गुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो त्याला मोह म्हटले आहे, आणि जेव्हा गुल्फी खाल्यावर त्या गुल्फी ची दांडी चाटतो त्याला लोभ म्हणतात.
लोभमुळेच लोक अन्न धान्यात भेसड करतात. त्यात भेसड केल्यावर लोकांची तब्येत खराब होते व मग डॉक्टर ची कमाई होते. डॉक्टर च्या मागे मागे औषध विक्रेत्यांचे ही लाभ होते.
या लोभापायी समाजात साखळी करून सर्व आपापला लाभ कसा होईल याची काळजी घेत असतात.
प्रत्येक माणसात षड्रिपु हे असतात. राग, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सहा मानवी भावनांचे शत्रु आहेत. ज्यामुळे लोकांचे मन अशांत व्हायला वेळ लागत नाही. लहान मुलं ही लोभामुळे मोठ्यांची ऐकतात. मोठे माणसं लहान मुलांकळून कोणतेही काम करण्यासाठी त्यांना लालच देतात की माझा हा काम करून दे मी तुला चॉकलेट किंवा पैसे देईन, आणि त्या लालचेपायी मुलं सुध्दा काम करतात. लोभ जिथे असतो तिथे लोकं फसतात. उदा. एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन पूजा करा मग तुम्हाला धन प्राप्ती होईल असं एखाद्या ब्राम्हनान सांगितले की आपण आपल्या लाभासाठी तो जो सांगतो तस ऐकतो व त्यासाठी जेवढा खर्च करायला सांगतो तेवढा खर्च करतो. ब्राम्हण आपल्याला फसवत असतो हे आपण विसरून जातो. पूजा केल्यानं कोणी पैसेवाला होत नाही तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मेहनत करावी लागते.
ट्रेन मध्ये सफर करीत असताना लुटारू मिळतात. आधी गोड बोलून जवळ बसतात व मग हळूच एखादी गोष्ट लोभाची सांगतात आपल्याला ती व्यक्ती बरोबर वाटते. नंतर हळूच काही तरी खायला देते एखाद्या देवळाची प्रसाद आहे असं सांगून. आपणही सहज भावनेने त्याच्या जवडची प्रसाद खातो व थोड्या वेळात बेहोष होतो व तो आपले सर्व सामान चोरून घेऊन जातो. नंतर आपल्याला जाग येते तेव्हा कळते की आपण फसल्या गेलो. असा असतो लोभाचा परिणाम.
लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास, मिडविण्याची इच्छा, अतीव प्रेम. लोभामुळे लोक एक दुसऱ्या शी चांगलं ही वागतात हा एक विचार करण्या सारखा आहे. समाजात लोक राहतात व सर्व एक दुसऱ्याच्या मदतीने जगतात. कोणाला कशाची गरज केव्हा पडणार हे काही सांगता येत नाही म्हणून लोकं पुढच्या वेळेला पाहून म्हणजे लोभापायी दुसऱ्यांशी गोड वागतात.
महेंद्र सोनेवाने, गोन्दिया
तह. जिल्हा - गोन्दिया
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
20) लोभ मनाला
लोभ हा एक स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नाही असे म्हणतात या स्वभावाने मानवाला कधी तारले आहे तर कधी मारले आहे.लोभ ही भावना आहे ज्या भावनेने संत तुकाराम महाराज परमेश्वराशी एकरूप झाले लोभ या भावनेने रावणाने सीतेचे हरण केले, हरणाच्या लोभामुळे सीतेने रामाला हरणाच्या मागे पाठवले आणि त्यामुळे सीतेचेच हरण झाले.संत कान्होपात्रा परमेश्वर प्राप्तीच्या लोभाने परमेश्वराशी एकरूप झाल्या सत्तेच्या लोभाने औरंगजेबाचा सत्ता मिळवूनही एकाकी कुढत अंत झाला.
सत्तेच्या लोभाने हिटलरने जगाला महायुद्धाच्या गर्तेत लोटले पण त्यालाही शेवटी आत्महत्या करावी लागली.
नाण्याला दोन बाजू असतात तसेच लोभालाही दोन बाजू आहेत.आईला बाळाच्या प्रेमाचा लोभ असतो आणि बाळाला आईच्या दुधाचा आणि म्हणूनच बाळाचे संगोपन आई करते आणि बाळ आईच्या सानिध्यात वाढते.
वेलीला वृक्षाच्या आधाराचा लोभ असतो म्हणून वेल वाढते वेलीच्या
लोभाचा उपयोग मानव करून घेतो व त्याच्या दारात जाई, जुईला बहर येतो म्हणजे मानवाला वेलीच्या सौंदर्याचा लोभ
असतो म्हणून तो वेलीला दारात बहरण्याचे स्वातंत्र्य देतो आणि वेलही तिला वाढायचे असते म्हणून मानवाच्या दारात छान मांडवावर चढते व मांडव रुपात बहरते म्हणजे इथे लोभामुळे दोघांचेही फायदे झाले.
पूर्वी मानव जंगलात रहायचा वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून उंच झाडांवर घर बांधून राहायचा
झाडे सुर्यप्रकाश मिळवण्यासाठी उंच वाढतात इथे झाडाला सुर्यप्रकाशाचा लोभ त्यामुळे ते उंच वाढते तर मानवाला स्वतःच्या जीवाचा लोभ म्हणून म्हणुन उंच झाडावर तो घर बांधतो लोभ दोघांनाही फायदा दोघांचाही.
आजची परिस्थिती वेगळी आहे
आजही झाडाला उंच व्हायचं आहे पण या उंच झाडावर माणसाला घर बांधायच नाही तर
घर बांधण्यासाठी झाडच तोडायची आहेत इथे एकाचा लोभ दुसऱ्याच्या नाशाला कारणीभुत ठरत आहे.आणि जेव्हा एकाचा लोभ दुसऱ्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो तेव्हा
दोन्हींचा विनाश अटळ असतो.
मनुष्याला वेगवेगळ्या गोष्टींचा लोभ आहे जसे सत्ता, संपत्ती, प्रेम,पैसा, ज्ञान,सौंदर्य .
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो असे म्हणतात लोभाचेही तसेच आहे आईचे आपल्या मुलावर प्रेम असते पण अति प्रेम म्हणजे लोभ मूल चुकत असेल आणि आई पाठराखण करीत असेल तर हा लोभ मुलाला दरोडेखोर बनवू शकतो. काही व्यक्तींना घरात सर्व सुखसोयी हव्या असतात मग वारेमाप पैसे खर्च करून या सुविधा विकत घेतल्या जातात थंड वातावरणासाठी ए सी , घरातच जिम, फ्रिज, ओव्हन मग मोकळ्या निसर्गातील हवाच मिळत नाही मग सुरू होतात दूखणी तो विचार करतो एवढ्या सोयी घरात मग सर्दी, खोकला ,मधुमेह ,रक्तदाबाचा आजार मला कसा झाला तेव्हा लक्षात येत पैशाने खरेदी केलेली हवा आजारही खरेदी करते. निसर्गातील मोकळी हवा ए सी च्या हवेपेक्षाही महत्वाची आहे.
शाकाहारी असणारा मनुष्य मांसाहाराकडे वळला आधी कोंबडी, मासे, बोकड ,ससा, कबुतर ,हरीण,आणि कधी वटवाघळे देखील मांसाहाराच्या लोभाने तो खाऊ लागला आणि या लोभामुळे जग कोरोनाच्या विळख्यात सापडले भोगतोय मानव आता अतिलोभाचा परिणाम.प्राण्यांना जगण्याचा लोभ आणि मानवाला त्याला खाण्याचा लोभ एकाचा लोभ दुसऱ्याचा नाश परिनामी दोघांचा विनाश हा निसर्गाचा नियम आहे.
आपला आपल्या शेजाऱ्यांशी, नातेवाईकांशी लोभ आहे असे आपण म्हणतो तो असावा असे सर्वांनाच वाटते तो कुठपर्यंत टिकतो जोपर्यंत दोघांचा लाभ होतो आहे एकाचे काही नुकसान झाल्यास लोभ संपून शत्रूत्त्व निर्माण होते.संपत्तीचा लोभ भावा भावात, बहीणभावात, वडील मुलात भांडणे निर्माण करतो
खून, कोर्ट कचेरी घडवतो असा संपत्तीचा लोभ विनाश घडवतो.
जगात अनूवस्त्रांचा शोध लागला आणि महासत्ता होण्याचा लोभ निर्माण झाला दुसऱ्या महायुद्धात जपान मंधील हिरोशिमा नागासाकी उध्वस्त झाले .सत्तेच्या लोभामुळे ,सूडाच्या लोभामुळे जग अजूनही लढतेच आहे कधी इतर देशांशी तर कधी आपल्याच देशातील सामान्य जनतेशी.
मग प्रश्न पडतो लोभ असावा की असू नये हो लोभ असावा कारण लोभामुळेच तर सर्व जग एकमेकांशी जोडले आहे, लोभामुळे आपापल्या गरजांमुळे व्यवहार चालू आहेत चालू राहतील पण काळजी अशी घ्यावी लागेल की कोणा एकाचे नुकसान झाल्यास दुसऱ्याने त्याबाबत विचार करावा नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी
नुकसानीतून समोरच्याला बाहेर पडण्यास मदतीचा हात द्यावा तरच लोभ टिकेल, रुचेल आणि वाढेलही.
सविता वि साळुंके, श्रीरामपूर
salunkesavita42@gmail. com
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
21) लोभ
अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा
अति विषयी सर्वदा दैन्यवाणा
या समर्थ रामदासांच्या श्लोकानुसार अति लोभ अतिशय घातक असतो.आणि या अति लोभापायी केलेल्या कृत्याचे फलितही अगदी दैन्यवाणे असते.अनेक संत महात्म्यांनी काय करावे काय करू नये हे आपल्या श्लोकांतून, अभंगांमधून, काव्यातून सांगितले आहे.
परंतु मानवाला सगळा विसर पडत जातो.कोणत्याही गोष्टीचा अति लोभ करणे अतिशय वाईट असतो.आणि त्यांचे परिणामही वाईट असतात.पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.आपल्या सर्वांना मिडास राजाची गोष्ट तर माहीत असेलच.त्याला सोन्याची इतकी हाव असते की तो हात लावेल त्याचे सोने व्हावे असा वरदान मागून घेतो.सर्व वस्तू सोन्याच्या होत जातात.परंतु जेव्हा त्याची मुलगी जवळ येते आणि आपले वरदान विसरून तो मुलीला हात लावतो नि मुलगी पण सोन्याची होते.आपली हसतीखेळती मुलगी जेव्हा पुतळ्याप्रमाणे त्याच्या समोर उभी राहते तेव्हा त्याला आपली चूक कळते.पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
हे माणसांसाठी फार मोठं उदाहरण आहे.त्यामुळे माणसाने प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात करायला पाहिजे.म्हणजे पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही.
©सौ.गौरी ए.शिरसाट, मुंबई
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
वरील सर्व लेख वाचल्याबद्दल आभारी आहे.
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सर्वांनीच चांगले लिखाण केले.आता आपलाच प्रथम क्रमांक यावा याचा लोभ नाही जडला तरच नवल म्हणावे लागेल.
जवाब देंहटाएं