*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- दहावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 28 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5
*विषय :- शाळेतल्या गमतीजमती*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
**~**~**~**~**~**~**~**~**
01) पहिल्या शाळेतील स्वागत..
-------------------------------------
1992 ला मी नवीन नोकरीला लागलो. विचित्र अशा भौगोलिक परिस्थितीचा सामना करत मी नोकरीच्या गावी पोहोचलो. शाळा डोंगरी भागात होती, जुलै महिना होता, धो-धो पडणारा पाऊस, खळखळ वाहणारे झरे, ढगाचे काळे काळे लोट एकामागून एक बाहेर पडत होते. कौलारूचे दोन वर्ग, या दोन वर्गाच्या पुढे 30 बाय 20 मीटरचे साधारण ग्राउंड असेल, सातवीपर्यंतची शाळा, वर्गखोल्या दोनच, समोर आणि बाजूला तीन मंदिरे होती. काही वर्ग त्या मंदिरामध्ये भरत असतात. गटशिक्षण कार्यालयाकडून मिळालेले नियुक्ती पत्र घेऊन त्या शाळेमध्ये मी दाखल झालो. सामान्य उंचीचे असणारे, डोळ्याला चष्मा लावलेले पांढर्या मिशाचा पुणेरी कट ओठावर असणारे वय वाढलं असूनही विनोदी भावमुद्रा दाखवणारे मुख्याध्यापक जणू आमच्या स्वागताला थांबले होते. आमचे नियुक्तीपत्र त्यांच्या हातामध्ये दिले. माझ्यासोबत शिवाजी शिंदे हा देखील होता. परिचय त्यांना दिला. त्यांनीही आपला परिचय देताना अनेक वर्षाचा आमचा परिचय असल्यासारखे बोलत स्वतःचे नाव सांगितले, मी चि.ना. आडकर.,चिंतामण नारायण आडकर. स्वतःचा परिचय देण्याची त्यांची पद्धतअनोखी होती. आमचे हासू ओठात दाबून त्यांच्याशी बोलत होतो. ते पुन्हा पुन्हा आम्हाला बोलण्यासाठी उद्युक्त करत होते. बिन्धास्त राहण्यासाठी सांगत होते. तुम्ही एवढ्या लांबून येथे आलेला आहात, कुठलीही काळजी न करता आनंदाने नोकरी करा. मी तुमचा मुख्याध्यापक आहे तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाही. असे दिलासादायक शब्द ते वापरत होते. कौलारूच्या एका वर्गामध्ये कपाटाचा आडोसा करून त्यांचे ऑफिस सजलेले होते. मुख्याध्यापकाच्या खुर्ची शेजारीच स्टोव्ह आणि चहा पातेले आम्हाला दिसले होते. त्यांच्यासमोर चौथीचा वर्ग होता. मुख्याध्यापकांनी एका मुलाला बोलावले, आणि कोणाच्या तरी घरून दूध आणण्यासाठी सांगितले. तोपर्यंत मुख्याध्यापक खुर्चीवरून खाली स्टोव्हच्या जवळ बसले.चार दोन पंप मारले. कपाट उघडून काडीपेटी घेतली. स्टोव्ह पेटवला. हा प्रकार चालू असतानाच न सांगता एका मुलाने पाण्याची कळशी भरून आणली. मुख्याध्यापकांनी पातिल्यामध्ये पाणी ओतले. कपाटामधून चहा साखरही काढली. चहाची सर्व सामग्री इथेच उपलब्ध आहे. असे ते काहीबाही सांगू लागले. उगीच आमच्या मुळे त्यांना त्रास होतो आहे असे आम्हाला वाटले म्हणून आम्ही मर्यादा पालन करत म्हटले,की कशाला त्रास घेता आमच्यासाठी... चहाची आवश्यकता नाही. तर त्यांनी निसंकोचपणे आम्हाला म्हटले आज मी त्रास घेतो आहे, उद्यापासून तुम्ही घेताल. आम्ही सर्व जण खळखळून हसलो. तेवढ्यात दूध आणायला गेलेला तो मुलगा परत आला आणि म्हणाला की कुठेच दूध नाही. एक इरसाल शब्द वापरून मुख्याध्यापक यांनी पुन्हा त्याला दुसऱ्या घरी लावले. बराच वेळ झाला तरी तो मुलगा येत नाही हे पाहून दुसरा एक मुलगा त्याला बोलवण्यासाठी पाठवला. तोपर्यंत बोलण्याच्या ओघात पातेल्यातील चहा आटून चालला होता. मधेच ते त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पुन्हा तांब्याने त्या पातेल्यात मोजमाप न घेता पाणी ओतले. तेवढ्यात दूध आणायला गेलेल्या मोहिमेवरील ती दोन मुले दूध घेऊन परत आली. मुख्याध्यापक शाबासकी देतील असे वाटले होते. परंतु पुन्हा एकदा इरसाल शब्द वापरला आणि म्हणाले की तुला मी सांगितले होते ना तेथे जात जा. मुख्याध्यापकाचे बोलणे मुलांच्या अंगवळणी पडले होते की काय मुले फिदीफिदी हसली आणि जाग्यावर जाऊन बसली. आम्ही नविन शिक्षक वर्गामध्ये दाखल झाल्यामुळे मुलांनाही थोडे नाविन्य वाटत होते ते आमच्याकडे आश्चर्याने आणि वेगळ्या नजरेने पाहत होती. मुख्याध्यापक आडकर कधी आम्हाला तर कधी त्या मुलांना मधेच बोलत असत. मुलांशी बोलताना मात्र प्रत्येक शब्दातून विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. आमची नोकरीची सुरुवात अशा ठिकाणी होते आहे. अशा मुख्याध्यापकाच्या सहवासात होते आहे. याचा कधी आनंद व्हायचा तर कधी वाटायचे की शिक्षण क्षेत्रात असेही असते का....? पुण्याच्या सुसंस्कृतपणाचा ठसा असलेल्या गावामध्ये, भागांमध्ये आम्ही नोकरीला लागल्यालो. आम्ही मराठवाड्यातले आमच्या भाषेमध्ये कठोरता होती. आमच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द म्हणजे मग्रुरी वाटायची. भाषेमध्ये मृदुपणा नव्हता. त्यामुळे लोकांना आणि विद्यार्थ्यांनादेखील आमच्याशी बोलताना आणि जुळवून घेताना भीती वाटायची. कालांतराने आमचा स्वभाव त्यांच्या लक्षात आला.आणि मग मने जुळली. मुख्याध्यापक आडकरांना आम्ही आप्पा म्हणू लागलो. आमच्यातील कामाची धमक आणि हस्ताक्षर पाहून सर्व कार्यभाग आमच्यावर सोपवला आणि स्वतःचा वर्ग घेऊन ते मंदिरात जाऊन थांबू लागले. त्यावेळेला शाळेमधून दुधाचे वाटप होत होते. मंदिराच्या बाजूला दूध तापवण्याचे काम अप्पा करू लागले. दुधावरची साय गोळा करून त्याच्यामध्ये साखर टाकून आमच्यासाठी ते ग्लासामध्ये काढून ठेवत असत. आम्ही आमच्या कार्यात अध्यापनात मग्न असलो तरी, आप्पाचा निरोप आला की जावे लागे. त्यावेळेस माझे लग्न झालेले नव्हते. त्याच नोकरीच्या गावातील एका मुलीशी लग्न वुळवण्याचा आप्पाने केलेला खटाटोप आजही स्मरणात आहे.
हणमंत पडवळ
उस्मानाबाद.
**~**~**~**~**~**~**~**~**
02) शाळेतल्या गमतीजमती...
"खेळू,नाचू,उड्या मारू
आनंदाने शाळेत जाऊ
तंटा, भांडणे रोजच होती
तरी मिळूनच सारे राहू"
बालपणीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.शाळेतल्या अनेक गमतीजमती आहेत त्या आठवल्या की,आणखी शाळेत जावे वाटते.खरोखरच बालपण..हेच देवपण आहे असं म्हटलं तरी चालेल.आजी-आजोबाच्या गोष्टी ऐकून कधी शाळेच्या पहिल्या वर्गात पोहचलो कळलेच नाही.मला तर शाळेत जायचे म्हटले की, अगोदर खूप कंटाळवाणा वाटायचा... मला शाळेत जावं, शिकावं असं वाटत नव्हतंच मुळी... माझ्या वडिलांनी मारत-मारत मला शाळेत नेलं पण तिथे गेल्यावर देखील शिक्षणकावरच रागावलो.शिक्षकालाच घाण-घाण शिव्या दिलो.माझे बाबा शाळेतून घरी जात नाही तर मला सरांनी पाटीने, रुळाने नि फळ्याला आपटू-आपटू मारले.मी दिवसभर कसा तरी शाळेत राहिलो नंतर विचार केला की,काहीही झाले तरी ह्या शाळेत शिकणार नाही,जाणार नाही असाच माझा अट्टहास होता त्या दिवशीपासून आजी,आजोबा,आई,बाबा व इतर वडीलधारी सांगितले तरी देखील काही ना काही बहाणा सांगायचा. मी इथे शिकणार नाही,मामाच्या गावाला शिकणार...माझेच वर्गमित्र दुष्मणासारखे माझ्याशी वागायचे.गुरुजी मुलांना म्हणायचे की,दुशांत आला नाही बोलवून आणा त्याला म्हटले की,मी मुले दिसली की रडायला लागायचो नाही तर सुसाट वेगाने रस्त्यावरनं धावत सुटायचो पण त्यावर्षी पुन्हा शाळेत पाय टाकला नाही.पहिल्या वर्गात 'नापास' होणारा मीच पहिला विद्यार्थी असेल असं मला वाटते.
माझ्या आजोबांचा आणि शिक्षकांचा खूप चांगला संबंध होता मग शिक्षकाला माझ्या आजोबांनी मारू नका असा मौलिक सल्ला दिला आणि माझ्या सोबत माझे आजोबाही शाळेत येऊ लागले.मी वर्गात सर्वापेक्षा मोठा असल्याने 'वासरात लंगडी गाय शहाणी' याप्रमाणे मीच सर्वांना माझ्या धाकात ठेऊ लागलो.गुरुजीही मलाच सांगू लागले.दुसऱ्या वर्षी पहिलीत असतांनाच मी गुरुजींचा चांगला मित्र बनलो आणि काहीही वस्तू आणायचे झाल्यास गुरुजी मलाच सांगू लागले उदा.हजेरी,खळू, डस्टर,स्केल इ.त्यामुळे गुरुजी नसले की,मीच गुरुजी म्हणून त्यांना शिकवू लागलो.आज त्या गोष्टीही अजूनही जशाच्या तशा आठवतात.आज शाळेच्या गमतीजमती लिहिण्याचा योग आला म्हणूनच ना!!!तेव्हापासून मग मी कधीही मागे वळून बघितलं नाही.गावात चौथीपर्यंतच शाळा असल्याने पूर्वप्राथमिक शिक्षण व आठवणी अजूनही स्मरणात आहेत अशा अनेक गमतीजमती माझ्या बालपणी घडल्या आहेत.इयत्ता 5 वी वर्ग गावात नसल्याने 3 किलोमीटर अंतरावर जावे लागत होतं..तेथील प्रसंग देखील खूप मजेदार आहेतच...
मला शाळेची खूप ओढ लागली होती.दररोज सकाळी लवकर उठून तयारी करून शाळेला जायला निघायचे.तीन किलोमीटरपर्यत चालत जावे लागत असे.पायी चालण्याची लहानपणी भांडण,तंटा करण्याची मजाच खूप भारी असते.आमच्याच वर्गमित्राचे दोन गट असायचे..दोन गटातच भांडणे,खेळ खेळत असायचो.एके दिवशीचा प्रसंग तुम्हाला सांगतो की,माझे व माझा मित्र विनोद आम्हामध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले.भांडणाची बातमी दोघांच्याही आई-वडीलापर्यंत गेली.हाता-पायाने चित्रपटातील फायटिंग सारखीच भांडणे झाली त्यामुळे आम्हा दोघांना दुखापत झाली.मी त्याला दगड फेकून मारल्याने त्याच्या डोक्याला खूप दुखापत झाली त्यामुळे मला माझ्या वडिलांकडून आणखी मार बसेल यासाठी खूप भयभीत झालो आणि झालंही तसंच... मी खोडकर,उन्हाडक्या करनाराचं होतो.अशा शाळेत जातांनाच्या घटना होत असत.एकदा तर शाळेत न जाता दिवसभर 'पैशाचा गेम' खेळत बसलो होतो.खूप खूप गमती जमती आहेत.
शाळेतील एक प्रसंग तुम्हाला सांगतो की,शाळेत मी जेवढ्या मस्त्या करत होतो तेवढाच अभ्यासही करत होतो.वर्गाचा मीच वर्गप्रमुख असल्याने वर्गात शांत ठेवत असतांना मी खोड्या करत राहायचा..एकदा मी इयत्ता 6 वी मध्ये असतांना शिक्षकांनी न सांगता हिंदी या विषयाची 20 गुणांची चाचणी घेतली पण त्या विषयाचा अभ्यास कुणीच केले नव्हते जेव्हा सरांनी चाचणी तपासून आम्हाला बघण्यासाठी दिली तेव्हा तर..मला आणखी सर खूप मारतील अशीच मला भीती वाटत होती कारण माझाही पेपर छान गेला होता आणि प्रत्येकाचे पेपर स्वतःला बघण्यास देऊ लागले पण माझा पेपर सरांनी अलग ठेऊन दिला आणि पेपर दिल्यावर प्रत्येकाला छडीने जोरजोराने दोन्ही हातावर मारू लागले ..मला तर असं वाटत होतं की,मलाही 'शून्य' मार्क्स असेल म्हणजेच यांच्यापेक्षा मला अधिकच मार बसेल असं माझ्या मनात वाटत होते. सर्वांचे पेपर देऊन झाल्यावर सर माझ्याजवळ आले आणि माझ्या हातात पेपर दिल्यावर बघितलं तर मला 20 पैकी 8 मार्क्स मिळाले होते म्हणजेच जेमतेम मी पास झालो होतो.सर्वांनाच शिक्षा झाली अन 24 विद्यार्थ्यांमधून फक्त मी एकटाच पास झालो होतो याचा मला आनंद झाला होता..मी देखील सर्वांसमोर मार खालाच होता पण मी यांच्यापेक्षा थोडा हुशार आहे असं वाटू लागलं त्यानंतर माझी पुस्तकासोबत घट्ट मैत्री झाली.मी मग माझा अभ्यास नि पुस्तके एवढेच माझ्या मनात होते.कोठेही जायचे झाले तरी मी पुस्तक घेऊनच जात असे.शाळेतल्या गमतीजमती आठवल्या तर आजही वाटतं की,'लहानपण देगा देवा,मुंगी साखरेचा रवा' असंच वाटत राहते.
✒ श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
dushantnimkar15@gmail.com
**~**~**~**~**~**~**~**~**
03) शाळेतील गमती जमती
-------------------------------------------------------------------बिड जिल्ह्यातील आष्टी येथे माझा जन्म झाला सन १९५५साली . माझे शिक्षण ही आष्टीलाच झाले . १९६१ ला आमच्या वडिलांनी आमचे नाव घातले बिगारीत . आताची नर्सरी म्हणजे तेव्हाची बिगारी होती . मी त्या बिगारी भरायची वेळ झाली की मोडल्याने भोकाड पसरायचो . आमच्या काकाने मला नांदी लावून तिथे न्यायचे . मी कसाबसा अर्धातास तिथे काढायचो . भोकाड पसरले की पुन्हा घरी आणून घालायचे .
आता खरी शाळा सुरू झाली . शनिमारुतीच्या मंदिरा समोर भली मोठी पत्र्याची शाळा होती . पुन्हा आमचे नाव तिथे घातले गेले . हेडमास्तर होते वैजिनाथ जोशी गुरुजी . किडमिडीत शरीरयष्टी , डोक्यावर काळी टोपी , धोतर आणि पांढरा शर्ट . पाढे म्हणून घेत चुकला की पृष्ठभागावरील शर्ट एका हातात धरुन दुसर्या हाताने छडीने पृष्ठभाग शेकून काढीत .
गोलमाल गुरुजींचा माझ्यावर आणि माझा लंगोटीयार दोस्त शंकर कुलकर्णी वर फार डोळा असायचा . आम्ही गल्लीत कुठे खेळताना दिसलो की दुसऱ्या दिवशी आम्हा दोघांना ल.सा.वि. म. सा. विचार. चे एखादे अवघड गणित देवून आमची धुलाई व्हायची .
शाळेतला शेवटचा तास बागकामाचा असायचा . आता जिथे आष्टीचे बस स्टॅण्ड आहे तिथे जि . प. शाळेचे छोटेसे ग्राउंड होते आणि मध्यभागी छोटासा बगीचा . त्या झाडांना पाणी घालायला पत्र्याच्या मोठं मोठ्या झार्या होत्या . त्या ओढ्यावरुन दोघांनी भरुन आणायच्या . मी अशक्यच असल्यामुळे मला ते काम फार जड जायचे . एके दिवशी आम्ही एक आयडीया केली . ओढ्यावरुन रिकामीच झारी रस्त्यावर टेकवित टेकवित घेऊन आलो . आम्हाला वाटले आम्ही गुरुजींना फसविले पण गुरुजी ते गुरुजी असतात . त्यांनी पाहिले जड झालेल्या जातीतून पाण्याचा एक थेंब ही खाली कसा सांडत नाही . मग त्यांनी धुलाई करुन आमच्या डोळ्यातून पाणी काढले .
इयत्ता ५ वीला जि.प. प्रशालेत हायस्कूल ला प्रवेश झाला . तिथे हेडमास्तर होते नेत्रुडकर सर ! अत्यंत कडक शिस्तिचा माणूस . सकाळी १०वा. प्रार्थना झाली की हातात वेताची छडी घेऊन गेट वर उभे राहायचे . जे उशिरा येतील त्यांना छडीने फोडून काढीत आणि हेडमास्तरांच्या केबिन समोरील व्हरांड्यात शाळा सुटेपर्यंत अंगठे पकडायला लावत . आमच्या शाळेत नविन क्लार्क आले कुलकर्णी म्हणून
त्यांना उशिर झाला होता . कुलकर्णी सरांचा आडोसा धरुन दोन विद्यार्थीही हळूहळू गेट मधून येऊ लागले . नेत्रुडकर सरांनी त्यांना पाहिले . झोडपून अंगठे धरायला लावले त्यामधे नविन लागलेले बिचारे कुलकर्णी सरांनी ही अंगठे धरले. नंतर क्लार्क ला बोलावणे झाले तर हे महाशय अंगठे धरुन वाकलेले .
विश्वनाथ उतरणे सर आम्हाला इंग्रजी व इतिहास भूगोल शिकवायचे . मी आणि निशिकांत व शेख मुकीम ने सरांना गोड बोलून इतिहास ची नोटही घेतली व तिघांनी सर्व टिपणे उतरुन घेतली . वर्गात जेव्हा उतरणे सर इतिहास च्या टिपा लिहून देऊ लागले तेव्हा मी , मुकीम आणि निशी गप्पा मारण्यात दंग ! हे सरांनी पाहिले आणि आमच्या कडे हात दाखवून मोठ्याने ओरडले " हे पहा जगातील तीन शहाणे ! " पेशवाईत साडेतीन शहाणे होते . आमच्या वर्गात हे तीन शहाणे आहेत .
पाठक सर विज्ञान शिकवायचे . गुरुत्वाकर्षण चा धडा शिकवताना सांगत होते " गुरुत्वाकर्षणा मुळे वस्तू वर फेकली तरी खाली पडते , उदाहरणार्थ --- असे म्हणून हातातले विज्ञानाचे पुस्तक त्यांनी वर्गाच्या बाहेर भिरकावले . मग काय अर्थाचा अनर्थ आणि पुस्तकाच्या चिंधड्या !
मी सातवीला होतो तेव्हाची गोष्ट ! शाळेच्या इन्सपेक्षण चा दिवस होता . आम्ही रात्रीच शाळेचा युनिफॉर्म पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी धूवून तांब्यात जळते निखारे टाकून कडक इस्त्री केली होती ते कपडे घालून हातात दप्तर घेऊन शाळेला निघालो होतो . दिवस पावसाळ्याचे होते . रात्रभर पाऊस पडल्यामुळे रस्ता चिखलाने माखलेला होता . डबकेच डबके साचलेले . मी त्या डबक्यातून वाट काढत चाललेलो होतो . तितक्यात माझ्या पाठीमागून एक दाढीवाला भला मोठा बोकड आला व त्याने आमच्या पृष्ठभागावर जोरदार धडक दिली . स्वारीने चिखलात लोळण घेतली . नखशिखांत चिखलाने भरलेला मी रडत रडत घरी आलो .
श्री . डी . जी . देशपांडे सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे . अलनाश्चर म्हणून एक धडा होता . एका स्वप्नाळू मुलांची कहाणी . ते शिकवत असताना सर म्हणाले अलनाश्चर सर्वप्रथम पाहू लागला . ही भांडी विकून मी पुन्हा भांडी घेईन पुन्हा ती विकून अजून जास्त भांडी घेईन मग मी मोठा व्यापारी होईन . मग माझे लग्न होईल . बायको माझी सेवा करीन . तिने जर माझे ऐकले नाही तर मी अशी लाथ मारीन असे म्हणून अलनाश्चरने लाथ मारली आणि सारे काचेचे भांडे फुटून गेले . असे सांगत असतानाच डी . जी . सरांनी ही अॅक्शन मधे येवून लाथ मारली ती टेबलाला लागली आणि भळाभळा करत येवू लागले . सगळा वर्ग हसू लागला .
अशा अनेक गमतीजमती शाळेत होत होत्या . आज या लेखाच्या निमित्ताने त्या आठवल्या आणि मन भुतकाळात रमून गेले .
अरविंद कुलकर्णी पिंपरखेडकर
मोबाईल 9422613664
arkulkarni.1955@gmail.com
**~**~**~**~**~**~**~**~**
04) चौथी बोर्डाची परीक्षा
घराच्या जवळ शाळा, घरात शैक्षणिक वातावरण, वडील प्राथमिक शिक्षक तरी देखील मला लहानपणी शाळेची भीती वाटायची. शाळेचे नाव काढलं की, रडत बसायचो. माझ्यापेक्षा मोठी ताई त्या शाळेत शिकायला जायची, शेवटी एके दिवशी मला तिच्यासोबत जावेच लागले. शाळेत जाऊ लागलो, गल्लीतले सारे जण तिथं दिसू लागले तसे मन ही रमायला लागलं. मला अभ्यासापेक्षा खेळण्याची जास्त आवड. सकाळ आणि सायंकाळ जास्तीत जास्त वेळ खेळण्यात जायचा. माझ्या वयाची अनेक मुलं गल्लीत होती त्यामुळे आम्ही गोट्या, चिंचोके, आंब्याची कोय, भोवरा, सूरपारंब्या, क्रिकेट आणि कबड्डी असे अनेक खेळ खेळत असू. आमचे गुरुजी खूप कडक शिस्तीचे होते. दोन खोल्यात चार वर्ग आणि दोन शिक्षक होते. आमच्या गावाच्या शेजारील गावाचे शिक्षक आम्हाला शिकवण्यासाठी होते. आमचे सकाळचे कार्यक्रम आटोपु नये त्यावेळी गुरुजी शाळेवर हजर व्हायचे. शाळेची घंटा वाजली की की आम्ही धावत पळत शाळेत जात असू. तिसऱ्या वर्गापर्यंत शाळा अशी तशीच चालू होती. अक्षरांची आणि अंकाची ओळख झाली होती. चौथीचा वर्ग म्हणजे बोर्डाची परीक्षा. खुप अवघड असते आणि दुसऱ्या गावात जाऊन परीक्षा द्यावी लागते याचे मनावर दडपण असायचे. त्या वर्गात गुरुजींनी आमच्याकडून कसून तयारी करवून घेत. कविता पाठ करणे, वाचन करवून घेणे, सायंकाळच्या वेळी परवंच्या करून घेणे, ( परवंच्या म्हणजे अंकाची उजळणी व पाढे म्हणणे यामुळे तीस पर्यंत पाढे तोंडपाठ झाली होती.) गणिती क्रिया करवून घेणे यामुळे खेळायला थोडा कमी वेळ मिळत. पण या वर्गात मन लावून अभ्यास केलोत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चौथी बोर्ड परीक्षेला सुरुवात होणार होती. मनात या परीक्षेविषयी भीती होतीच शिवाय दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षा द्यावी लागते याची भीती वेगळीच. शेवटी तो बोर्ड परीक्षेचा दिवस उजाडला. आमचे गुरुजी सूर्य उगवण्यापूर्वी गावात हजर आम्ही 15-20 मुले देखील आपल्या भाजी भाकरीच्या डब्यासोबत हजर झालो. त्यावेळी सायकल शिवाय इतर कोणतेच वाहन नव्हते. आमच्या गुरुजीजवळ ते ही नव्हते. आम्ही सारेचजण सहा किमी दूर असलेल्या केंद्रीय शाळेवर परीक्षा देण्यासाठी मजल दर मजल करीत पायी पायी निघालोत. दीड दोन तासांनी परीक्षा केंद्रावर पोहोचलोत. पहिला पेपर मराठीचा होता. बोर्डाची परीक्षा म्हणजे बोर्डावर काही तरी लिहून देतील आणि आपण ते लिहायचे असे बाळबोध कल्पना डोक्यात होती. पण ते व्यर्थ ठरले. आजूबाजूचे दहा गावातील विद्यार्थी तेथे आले होते. बरोबर नऊ वाजता पेपर सुरू झाले आणि बारा वाजता संपले. पेपर बऱ्यापैकी लिहिला होता, त्याचा आनंद चेहऱ्यावर होता. दुपारी एक वाजता डब्यातील जेवण करून घरी जाण्यास सर्वजण परत निघालोत. एप्रिल महिन्याचे रखरखीत ऊन तळपत होते. पळत पळत उड्या मारत आम्ही घराककडे निघालो. भर उन्हात घरी आलोत. सायंकाळी अचानक मला ताप चढले, अंग गरम झाले होते. माझी आई अडाणी होती पण तिला प्राथमिक उपचार सारे ठाऊक होते. तिने माझ्या अंगावरील सारे कपडे काढायला लावले, बाजावर झोपवले आणि माझ्या बेंबीत मिठाचा खडा ठेवून थंड पाणी टाकू लागली. मला गुदगुल्या होत होत्या. एक पांढरा कपडा ओला केली आणि माझ्या चेहऱ्यावरून पायापर्यंत सरकवत नेली. तोंडातून ती म्हणत काय करतंय तर मी म्हणत होतो ऊन काढतंय. थोड्या वेळाने मला बरे वाटले. दुसऱ्या दिवशी गणिताचा पेपर होता. माझा आवडता विषय त्यामुळे मला त्याची काळजी नव्हती पण परीक्षा केंद्रावर कसे जायचे ? हा प्रश्न होता. वडील त्याच केंद्रात शिक्षक होते. मग त्यांनी मला त्यांच्या सायकल वर बसवून परीक्षेला नेले. त्यामुळे पुढील तीन पेपरला मला त्रास झाला नाही मात्र आदल्या दिवशी ताप आल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. त्या वर्गाला चार विषयांचे पेपर होते मराठी, गणित, सामान्य विज्ञान आणि शिवाजी महाराजांचा इतिहास. चार ही पेपर खूप चांगले सोडविण्यात आले होते. शेवटच्या पेपरच्या दिवशी एक आनंदाची गोष्ट घडली. परीक्षा केंद्राच्या गावात माझ्या मोठ्या बहिणीची सोयरीक शेवटच्या पेपरच्या दिवशी जमली. माझ्या घरातील सर्वचजण त्यादिवशी तेथे आले होते. ऊन उतरल्यानंतर पाहुण्याच्या घरी जेवण उरकून सायंकाळी बैलगाडीत बसून घरी आलो. परीक्षा संपल्याचा आनंद होत होता मात्र अशक्तपणा वाढल्यामुळे घराच्या बाहेर न पडण्याची सक्त ताकीद होती. एक मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. आम्ही सर्वचजण उत्तीर्ण झालोत. फक्त चार ते पाच मुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते त्यात माझा ही नंबर होता हे ऐकून खूप आनंद झाला. आईने सर्वाना साखर वाटली आणि एक बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालो याचा मला आनंद वाटत होता. हा क्षण मी कदापिही विसरू शकत नाही.
- नासा येवतीकर, 9423625769
**~**~**~**~**~**~**~**~**
05) माझे पहिले भाषण
मी इयत्ता पाचवी मध्ये शिकत असतांनाचा हा प्रसंग. तो प्रसंग आठवला की अजून सुद्धा हसू येतं. शाळेतले दिवस आठवले की कितीही दुःख असले तरी दूर झाल्यासारखे वाटते. ते दिवस असतातच निरागस, निडर, आणि मंतरलेले.
आमच्या शाळेमध्ये लोकमान्य टिळकांच्या जयंती निमीत्त भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मी तेव्हा इयत्ता पाचवी मध्ये होतो. मी मोठ्या उत्सुकतेने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. पहिल्यांदाच भाषण स्पर्धेत भाग घेतल्यामुळे खूप उत्साहात होतो. घरी गेल्या बरोबर आईकडून भाषण लिहून घेतले. स्पर्धेला साधारण आठ-दहा दिवस बाकी असतील. भाषणाची जय्यत तयारी मी करत होतो (तयारी म्हणजे काय फक्त पाठांतर करत होतो) पहिल्यांदाच व्यासपिठावर बोलणार म्हटल्यावर मी खुपच आनंदात होतो. येता-जाता सतत मुखात भाषणच होते. सराव अगदी जोरात सूरु होता. घरी कुणीही पाहुणा आला तरी माझं त्यांच्यासमोर कॅसेट लावल्यासारखं तेच भाषण सुरु व्हायचे.
ज्या दिवसाची मला उत्सुकता होती तो दिवस अखेर उजाडला. आम्ही चार-पाच मित्र मोठ्या उत्साहाने शाळेकडे पाई-पाई निघालो. शाळेकडे जातांना रस्त्यातच माझ्या वर्गातील मित्र कैलासचे घर होते. त्याला नेहमीप्रमाणे शाळेत येण्यासाठी आवाज दिला तेव्हा त्याच्या वडिलांनी आम्हाला घरात बोलावले. कैलासने सुध्दा भाषणामध्ये भाग घेतला होता. त्याच्या वडीलांनी त्याच्याकडुन चांगली तयारी करुन घेतली होती. त्यामुळे त्याच्यापेक्षाही त्याच्या वडीलांना जास्त उत्सुकता होती त्याच्या भाषणाची. त्यांना तर खूप वाटत होते की, आपण सुद्धा शाळेत यावे कैलासचे भाषण ऐकायला पण त्यांना ड्युटीवर जायचे असल्यामुळे ते त्या कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरीच आमची तयारी कशी झाली आहे हे बघण्याचे ठरविले. आम्ही त्यांच्या समोर भाषणे करुन दाखविली. कैलासने आमच्या सर्वांपेक्षा छान भाषण करुन दाखविले. त्याचे वडील खुपच खुष झाले व त्यांनी आम्हाला सगळ्यांना संत्रागोळ्या घेण्यासाठी पाच रुपये दिले. आम्ही अति उत्साहाने शाळेकडे पळतच सुटलो. शाळेच्या गेटसमोर पोहोचताच गेटच्या बाजूला असलेल्या हातगाडीवरून अगोदर संत्रा गोळ्या घेतल्या. गोळ्या वाटपात कोणताही भ्रष्टाचार होणार नाही याची कैलासने पूर्ण काळजी घेत व्यवस्थित वाटे केले आणि उड्या मारत मारत आम्ही शाळेच्या दिशेने निघालो.
आम्ही आमच्या वर्गात बसलेलो होतो सरांनी हजेरी घेतली आणि आम्हाला ग्राऊंडवर एका लाइनमध्ये जाण्यास सांगितले. एका लाईन मध्ये जातील ती मुलं कसली ? त्यामुळेच तर आमचे सर आम्हाला नेहमी म्हणत... अरे तुम्ही देवाघरची फुलं नसून देवाघरची ढोरं आहात ढोरं. त्यांचे हे बोलणे आम्ही कधीच खोटे ठरू दिले नाही हे सुद्धा विशेष.
अखेर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रतिमापूजन, स्वागत-सत्कार चालू होते. तिकडे माझं लक्ष नव्हतंच. खालचे वाळूचे बारीक-बारीक खडे उचलून समोर बसलेल्या मुलाच्या चड्डीमध्ये टाकण्यातच मला जास्त आनंद वाटत होता. तितक्यात अंभोरे सरांनी माझ्या डोक्यात टपली मारत मला व्यवस्थित बसण्यास सांगितले. तसा मी हाताला घडी आणि तोंडावर बोट ठेऊन बसलो. सर गेल्यानंतर माझे उद्योग परत चालू झाले.
आता विद्यार्थ्यांच्या भाषणास सुरुवात झाली होती. एक-एक स्पर्धक भाषण करत होता. बऱ्याच जणांचे भाषण तर "मी शेंगा झाल्या नाही, मी टरफले उचलणार नाही" या पलीकडे जातच नव्हते. एखादा मुलगा अतिशय जोरदार भाषण करत होता तर एखादा भाषण करतांना काही आठवले नाही तर खिशातली चिठ्ठी काढुन वाचायला सुरुवात करत होता. तर कुणी पहिल्या वाक्यातच आपले भाषण संपवित होता. आम्ही खाली बसुन मात्र त्यांना मोठ्याने हसत होतो. त्यात कैलास आणि मी तर आघाडीवरच होतो.
बऱ्याच वेळाने भाषणासाठी कैलासचे नाव पुकारण्यात आले. आम्ही सर्व मित्रांनी त्याला टाळ्यांनी भर-भरभरुन दाद दिली. कैलासने जेव्हा भाषणाला सुरुवात केली. तेव्हा त्याला सुरुवातीला काहीच सुचेना. इकडुन-तिकडुन त्याने भाषणाला सुरुवाती केली तर मुलींकडे हात करुन त्यांना मित्रांनो तर मुलांकडे हात करत मैत्रीणिंनो म्हटल्याबरोबर एकच हशा उडाली. घाबरल्यामुळे असे झाले असावे. कैलास ने एक-दोन वाक्यातच आपले भाषण आवरते घेतले. मनात विचार आला की, हाच का तो कैलास ज्याने आत्ताच त्याच्या घरी इतके छान भाषण केले होते. आणि त्याने केलेल्या छान भाषणामुळे आपल्याला संत्रा गोळ्या खायला भेटल्या. आता काय झालं असेल नेमकं याला ? याच्या भाषणाचा कचरा झालाच आहे. त्याला अपमान वाटला तर तो आपल्याकडच्या उरलेल्या गोळ्या सुद्धा परत घेईल म्हणून मी उरलेल्या दोन गोळ्या एकदमच तोंडात टाकून घेतल्या. आता घे म्हणावं तुझ्या गोळ्या परत असा मनातल्या मनात विचार करत गालातल्या गालात हसायला लागलो. तेव्हड्यात भाषणासाठी माझे नाव पुकारण्यात आले. माझे नाव कानावर पडताच तोंडातल्या गोळ्या चखळत न बसता दाताने चावून-चावून बारीक केल्या आणि व्यासपिठाकडे जाईपर्यंत खाऊन घेतल्या आणि चिकट झालेले तोंड शर्टाच्या बाह्यांना पुसत व्यासपीठावर प्रकट झालो.
सरांनी माईक समोर उभे राहण्यासाठी इशारा केला. मोठ्या थाटात माईकला हात लावताच कुर्र्रर्रर्रर्रर्र असा आवाज यायला लागला. त्याचवेळी सगळे हसायला लागले. बाजूला बसलेले शिक्षक समोर आले आणि त्यांनी माईकला हात न लावण्याचे सुचवले. मी कशी-बशी भाषणाला सुरुवात केली. माईकवर पहिल्यांदाच बोलत असल्यामुळे माझाच आवाज मला परत ऐकू येत असल्याचा भास होत होता. कधी-कधी वाटत होते की आपला आवाज समोर जातोय की नाही. भाषणापेक्षा माझे लक्ष त्या माईककडेच जास्त होते. माझं भाषण बिनचुक चालु होतं परंतु आवाज समोर जात नव्हता. त्यामुळे माझ्या उजव्या बाजुला थोड्या अंतरावर बसलेले आमचे वर्गशिक्षक सरकटेसर मला माईक कधी लांब तर कधी जवळ धरण्याचा लांबूनच इशारा करत होते. माईकला हात लावला तर परत कुर्र्रर्रर्रर्र आवाज होईल म्हणून मी त्याला हात न लावता स्वतःच माझे तोंड मागे पुढे करत होतो. आता मी मात्र पुरता गोंधळून गेलो होतो. या सगळ्यांमुळे माझी मात्र उरली-सुरली हवा निघुन गेली होती. माईकचं अंतर मेन्टेन ठेवण्यासाठी कमरेतून पुढच्या बाजूला थोडं वाकुन भाषण करत होतो. ते बघुन खाली बसलेले सर्वच मुलं हसायला लागली होती. मी तर भाषण न चुकता करत होतो. पण मला कळत नव्हते की, ही मुलं नेमकी का हसत आहे म्हणुन. जेव्हा भाषण संपवून खाली बसलो तेव्हा कैलासने माझी नक्कल करुन दाखवली त्यानंतर मला हसावे कि रडावे हेच कळत नव्हते.
भाषण स्पर्धा संपून वर्ष होत आले तरी मला चिडविण्यासाठी माझे मित्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुर्र्रर्रर्रर्रर्र.... पुज्ज गुरुजन कुर्र्रर्रर्रर्र आणि येथे जमलेल्या माझ्या कुरुर्रर्रर्रर्र .... असं म्हणून चिडवत असत.
असो... पण तो माझा व्यासपिठावरचा पहिला अनुभव असल्याने मी कधिही विसरु शकणार नाही. आता ही आम्ही जुने मित्र भेटलो की तो भाषणाचा किस्सा आठवल्या शिवाय राहत नाही.
ते भाषण परत एकदा करण्याची संधी आता मिळाली तर किती बरे होईल.....!
गणेश सोळुंके (जालना)
8390132085
**~**~**~**~**~**~**~**~**
06) पहिल्या शाळेतील स्वागत. मनात एक मोठं वादळ होत. गावच्या विरुद्ध दिशेने वाहायच ठरवलं होत.मनात एकच कुन कून सतत असायची .फक्त नवकरी हवी .सतत एकच गोष्ट मनात घोळत होती फक्त नवकरी.त्यात कोणतेही आव्हान पेलण्यास समर्थ होतो.दुकानदारी करत होतो पण अजिबात लक्ष लागत नव्हते.वडील हुशार ,व सतर्क बुध्दी ने वागत असल्यामुळे वडिलांची सुद्धा मनापासून इच्छा होती.गावात वर्तमानपत्र सुद्धा येत नव्हते.गावातील लोक दूध विकण्यासाठी गावापासून 10 की.मी.वर जायचे त्यांना वर्तमान पत्र आणायला सांगाव लागत असे. त्याच तळमळी मध्ये अचानक यवतमाळ वरून अत्याचा मुलगा आला .त्याला पूर्ण मनातली तळमळ संगीतली तेव्हा पासून त्यानेही वर्तमान पत्र आवडीने पाहायला सुरू केले.म्हणतात ना इच्छा असेल तिथे मार्ग निघतो.पण कार्य योग्य दिशेने व्हायला पाहिजे.तेवढ्यात अचानक भंडारा येथे संस्थेवर लोकमत पेपर वर जाहिरात आली. गावापासून नोकरीचे ठिकाण350 की.मी. असल्यामुळे एवढ्या लांब पाठवण्याची वडिलांची हिम्मत होत नव्हती. तरी सेवा करण्याची प्रकट इच्छा असल्यामुळे नेहमी विचार यायचाकी देशाची सेवा करणारे सेवक सीमेवर लढतात .आपल्याला तर पवित्र कार्य करायचे आहे हे मनात थाणून मुलाखतीला निघालो .भंडारा शहर कधीच पाहिले नव्हते.पण जायचं तर आहेच म्हणून 16/7/2006ला निघालो व17/7/2006 रोजी मुलाखत होती.मुलाखतीचा वेळ 11.00वा.ते 5.00 वा.पर्यंत होता .मी सकाळी 10.00 वा. पोहचलो. मनात एकदम वेगळं वाटत व्होत.आपण कसे राहणार .घर कसे सोडणार या सर्व गोष्टी सतावत होत्या.पण खंबीरपणे आव्हान स्वीकार करावं असही वाटत होत.असे करत मनाच्या घाळा घोळ मध्ये 11.00वाजले मुलाखत घेण्यासाठी पदाधिकारी उपस्थित झाले.मुलाखती साठी एकवीस लोकं उपस्थित होते.एकेकाने शाळेच्या सेविका दस्तऐवज जमा केल्या प्रमाणे आवाज देत होत्या. मुलाखत देऊन एकेक जन बाहेर एत होते.तसे तसे मनातली ठोके वाढत होती .एकवीस लोकं पाहून वाटत होते आपला नंबर काही लागणार नाही .बाहेर आलेली लोकं एकमेका सोबत बोलतही नव्हती.त्या मुळे अजून चिंता वाढत होती.अकरा व्या क्रमांकावर शाळेच्या सेविकेने माझ्या नावाचा पुकारा दिला.मी नतमस्तक होऊन कार्यालयात शिरलो.आत मध्ये 6 लोकं मुलाखती घेण्यासाठी बसली होती .मुख्याध्यापक,सचिव, सहसचिव,लिपिक संस्थे अंतर्गत चालत असलेल्या शाळेचे मुखाध्यापक . पहिला प्रश्न विचारला सचिव ने.पुन्हा सगळ्यांनीच प्रश्नाची भडी मार सुरू केली .मी पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तोडक्या मोडक्या भाषेत देण्याचा प्रयत्न करत होतो.प्रश्न उपयोजनात्मक होते.त्यांचा शेवटचा प्रश्न होता तुम्हाला इंग्रजी शिकवायला जमते का?माझा आवडता विषय होता.पण मी म्हटल प्रयत्न केल्याने जमेलच. कारण त्या पूर्वी मी महात्मा फुले हमी योजना केंद्र रात्रीच्या शाळेत काम करत होतो. त्या मुळे शिकविण्याचा आत्मविश्वास होता.व मुख्याध्यापक मॅडम यांनी 5 व्या वर्गावर एक पाठ शिकवण्यास सांगितले मी एक पाठ शिकाविला निरीक्षण साठी शाळेच्या मुख्याध्यापिका व लिपिक बसले होते.त्यांनी अजून चांगले प्रयत्न करण्याचा मोलाचा सल्ला दिला तेव्हा थोडीशी मनात पाल चुकचुली व अशा पल्लवित झाली. तरी पण वाटत होते की विनाकारण आत्मविश्वास वाढवणारे लोकही असतात .पण तसे नव्हते .मी बाहेर थांबलो होतो.पुन्हा मला बोलावले .व शाळेचे लिपिक व संस्थेचे सभासद गुलाबराव शंभरकर यांनी सांगितले .संस्था आपली नियुक्ती करत आहे .आपल्याला आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करावे लागेल ..हे वाक्य खोलवर एकदम मन पटलावर कोरल गेलं आणि त्यांनी नियुक्ती आदेश दिला .व आजही माझ्या जीवनाला एका वाक्यात आकार देणारे गुलाब आजही माझ्या मनात महक त आहे. आणि मी आजही एक चांगला शिक्षक म्हणून शिखणाचे पवित्र कार्य करत आहे.
- जीवन खसवात भंडारा
9545246027
**~**~**~**~**~**~**~**~**
07) शाळेतील गमती जमती
हुंदडायचो बालपणी
खात कैऱ्या चिंचा बोरे
नसे चिंता उद्याची ही
मन निरागस होते कोरे
बालपणचे शाळेतले ते रम्य दिवस आठवतात. अंगावरून सुखद लहर फिरल्याचा भास होतो. मनमयूर पुन्हा बालपणातच रमतो. नव्हते डझनभर चपला, कपड्यांचे जोड. नव्हते ब्रांडेड वह्या कंपास. खुशालचेंडू जीवन जगत हिंडायचं, बागडायचं. खात मस्त कैऱ्या, चिंचा, आवळे, चिंचा पाडण्यात एक नंबर. पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी- नदीत डुंबायचे.मित्र-मैत्रिणीसंगे खेळायचे, शाळेतून आले की वडाच्या झाडाखाली सूरपारंब्या, आट्यापाट्या, लगोरी, कबड्डी खेळायचे.ना भरपेट गृहपाठ नि प्रकल्पाचा त्रास.
परीक्षेला जाता जाता तासभर केलेला अभ्यास पहिला नंबर काढायला पुरेसा असायचा. मग कशाला हवा पुस्तकाचा छंद! अशी मस्तमौला वृत्ती! रात्र पडली की आईची धमकीमिश्रित हाक कानावर आली की वडाच्या झाडाखालून हळूच घरात शिरायचे.बाबा घरात आहेत की नाहीत याचा अदमास घेतला जायचा.असतील घरात तर "शुभंकरोती" म्हणून गुपचुप दप्तर घेऊन अभ्यासाला बसायचे.शाळेतील मारकुट्या गुरूजींचा गृहपाठ फक्त पूर्ण करायचा. दुसऱ्या विषयांसाठी सबब सांगतमास्तरांना झूलवायचे.
"उंदराला मांजर साक्षी" या उक्तीप्रमाणे "रोज पोटात दुखत होते, ताप आलेला, हवे तर राजाला विचारा" म्हटले की राजा जोरात ओरडायचा, " होय गुरुजी होता त्याला काल ताप. तळमळत होता". गुरुजींची सहानुभूती मिळायची, पण जीवन जगण्याचे कसब यातूनच शिकलो. आयुष्यात पुस्तकं उपयोगी पडत नाहीत तर अंगी व्यवहारज्ञान नि कला असायला हव्यात. त्यामुळेच आज करिअरची एकेक पायरी उंचावत इथवर पोहोचलो. शाळेत गुरुजी शिकवताना पूर्णवेळ लक्ष केंद्रित करायचं त्यातील सखोल ज्ञान आजही मनःपटलावर ताजं आहे. पाढे, गुणाकार, भागाकार, भाषिक व्याकरणाचे गुरुजींनी जे काही बाळकडू पाजले ते संचित आजही टिकून आहे. कारण गुरुजींची छम छम वाजणारी छडी होती. छडी पडलेला लाल तळहात पाहून आई-बाबांची सहानुभूती कधीच नव्हती. त्यामुळे गमतीजमती करत लहानपणी केलेला अभ्यास आणि खरे जीवन जगण्याचा घेतलेला आनंद या मोबाईल नि लॅपटॉप समोर बसुन इंग्रजाळलेल्या शाळांमधून मिळणार नाही.शाळांमधून निबंधस्पर्धा ,समूहगीत, गीताई पठन, नाट्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून दुनियेचे सार मिळत गेले.
आत्मविश्वासाने बोलण्याची हिंमत जागृत झाली. लिखाणाचा सराव झाल्याने हस्ताक्षर सुंदर, वळणदार झाले. सुट्टीत शेतात काम करण्यास हातभार लावल्याने परिस्थितीचे चटके सोसण्यामुळे हलाखीची परिस्थिती असणाऱ्यांना सहजच सहकार्याचा हात पुढे होतो.गरीब, दीनांविषयी कळवळा, एकमेकांना मदत करण्याची वृत्ती,घरातील आजी आजोबा ज्येष्ठ व्यक्तींना सन्मानाने वागविण्याची वृत्ती जोपासली गेली. परिस्थितीने माणुसकी शिकवली. जे मिळते त्यातच सुखी समाधानी राहण्याचे कसब शिकविले. त्यामुळे शाळेतील गमती जमती जीवनभर पुरून उरल्या.
धन्य धन्य जी शाळा
जी देशाकरता तयार करते बाळा
सुसंस्कारांची शिदोरी पुरवून आदर्श नागरिक घडवणारी ही शाळा राष्ट्र संपन्न बनविण्यासाठी सिंहाचा वाटा उचलते. शाळेतल्या गमतीजमती फिरून अनुभवण्यासाठी तुकारामांचे सुभाषित आठवते.
'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रेवा'
सौ.भारती सावंत, मुंबई
**~**~**~**~**~**~**~**~**
08) शाळेतील गंमतीजमती
शाळेत असताना आम्हा मित्रांना
ताप येत नसे
पोटच का दुखत होतं की?
आमचे सर, केंद्रांवर काम आहे म्हणून जायाचे.
आम्हाला वाटायचं
चंद्रावर कसे गेले असतील.
आम्ही चिंचा शाळेत नेत होतो.
आम्ही खाताना मुलामुलींच्या तोंडाला पाणी येतं असलेले पाहून बरं वाटायचं.
कुणी मागलं की,तू मला मागल्यानं दिला होतास का?असे म्हणताच.
तो म्हणायचा,तवा मझं मुरकूल,
गोळी कसा मचामचा खाल्ला होतास.आता देत नाहीस.
मग आम्ही देऊन टाकताना तुझं आता काहीच घेत नाही,उचकणं
काढतूस तू म्हणून मोकळे होत होतो.
कडीबट्टी हे प्रकरणं तर नेहमीचच.
ज्या मित्रासोबत नेहमी राहत होतो.त्याची कटी झालेल्या सोबत आम्हाला इच्छा नसली तरी कट्टी करावी लागत असे.
नाही तर आमचा क्लोज फ्रेंड म्हणायचा, एक तर मला बोला ना तर त्याला बोला.
मग जाऊन कट्टी बट्टीच गाणं गाऊन यावं लागतं असं.
मग तेव्हा आमच्या क्लोज फ्रेंडला बरं वाटतं असे.
उद्या सकाळी ते दोघे बोलताना दिसत.
आता सगळ्याचीच दो बे
म्हणून युती होतं असे.
युती होणं आणि युती तुटणं ह्याला काही विशेष कारणांची गरज नसे.
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
**~**~**~**~**~**~**~**~**
09) शाळेच्या पहिल्या दिवशी..
लहानपणी प्राथमिक शाळा ही घराजवळच असल्याने पहिली ते चौथी पर्यंतच शिक्षण घेताना मला वेगळ अस काहीच वाटल नव्हत. घराजवळची शाळा असल्याने ते दुसर घरच होत. पुढे इयत्ता चौथीचा निकाल जाहीर झाल्यावर माझ एका मोठ्या शाळेमध्ये ऍडमिशन केल. तेव्हा मी घरी खुप रडलो होतो. मी एवढ्या लांब शाळेला जाणार नाही म्हणून. पण काही दुसरा पर्याय नव्हता. ज्या शाळेत मी आता जाणार होतो, त्या शाळेत आम्हच्या शेजारचा मुलगा होता. त्या मूलग्यान मला सांगितल होत की, या शाळेत खूप मज्या येत्या व त्या मुलान मला सांगितल की, तुला त्या शाळेमध्ये कोणत्याही शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी काहीही बोल, ओरोडले,मारलेत तर यल्याला नाव सांगिन अस म्हणायच. ही गोष्ट मी चांगलीच लक्षात ठेवलेली.
अखेर शाळेचा पहिला दिवस उज्याडला. मी नवीन शाळेची कपडे घालून शाळेत गेलो. त्या शाळेच्या मोठ-मोठया इमारती पाहून व डोळ्याची नजर जिथेपर्यंत जाईल तेवढ मोठं मैदान पाहुन मी खूप घाबरलो व घाबरतच वर्गामध्ये प्रवेश केलो. माझ्यासाठी ही शाळा व इथले सर्व मुले, शिक्षक ही नवीन होते. मी वर्गांमध्ये जाऊन दुसऱ्या बाकड्यावर बसलो.मी खुपच घाबरलेलो. तेव्हा माझ लक्ष एकदम फळ्याकडे गेल. त्या फळ्यावर एक सुविचार लिहिलेला होता, "आयुष्याच्या अडचणी सोडवण्यास समर्थ असतात, तेच खरे शिक्षक " मी हा सुविचार वाचत असताना, तितक्यात वर्गशिक्षक वर्गात आले. सर्वाना आपली ओळख करून दिली. व सर्व विद्यार्थ्यांना आपापली ओळख करून देण्यास सांगितले. सर्व विद्यार्थी आपापली ओळख सांगत होते. माझ त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हत. मी खूप घाबरलो असताना, माझ्यावर ओळख करून देण्याचा नंबर कधी आला मला माहीतच नव्हत, तेव्हा अचानक सर मला ओरडले. मला काही कळल नाही. तेव्हा मला माझ्या मित्रान सांगितलेल आठवल. शिक्षक जर ओरडले तर यल्याला नाव सांगिन अस म्हणायच. "मी रडतच सरांना म्हणल, ओ सर मी तुमच नाव यल्याला सांगिन." तेव्हा सर खूप चिडले व माझ्या कानाखाली दिले व मला स्टाफरूम मध्ये नेऊन उभा केल, व मला सांगितले मी येऊस पर्यत तू इथेच उभा राहायच अस म्हणून सर दुसऱ्या वर्गात निघून गेले. मला यल्या या शब्दाचा अर्थ सुध्दा माहीत नव्हता. तितक्याच शाळेचे शिपाई मामा मला विचारले "ये पोरा वर्गात जा की. मी शिपाई मामांना म्हणलो, सरांनी उभा केल्यात. शिपाई मामा म्हणाले, का? मी घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा शिपाई मामांनी सांगितल की, बाळ यल्या या नावान या सरांना पोर चिडवत्यात म्हणून. मी आणखी घाबरलो. थोड्या वेळाने ते सर आले, मी सरांची माफी मागितली, इथुन पुढे माझ्या कडून अशी कधीच चूक होणार नाही.त्या सरांनी मला माफ केल व माझी दहावी पूर्ण होऊस पर्यत माझ्याकडे जातीन लक्ष दिल व माझ्या शाळेत होणाऱ्या चुका त्यांनी लक्षात आणून दिल्या आणि त्या मी चूका सुधारल्या ही. दहावीच्या शेवटच्या दिवशी मला कळल, मी पहिल्या दिवशी वाचलेल्या सुविचाराचा संपूर्ण अर्थ.
लेखन - प्रतिक विजय उकले
इचलकरंजी, जिल्हा - कोल्हापूर
मो.नं. -8624872409
**~**~**~**~**~**~**~**~**
10) शाळेच्या गोड आठवणी म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जमापुंजी.
मित्रांनो मला लहानपणापासूनच खुप मित्र आणि मैत्रिणीं गोळा करायची सवय होती. का?कुणास ठाऊक पण न भांडता अगदी प्रेमाने वागने हि जनु काही माझ्यात जन्मताच कला म्हना किंवा गुण म्हना हे होतेच.
आज मी वयाच्या५४व्या वर्षात पदार्पण केले असतांना आज निबंधाच्या निमित्ताने पुन्हा भुतकाळात डोकावयाला मिळाले. माझे वडील त्याकाळात गडचिरोली जिल्ह्यात न्यायाधीश होते.नक्षलवादि ठीकानी काम करायचे म्हणून त्यांनी आम्हा भावंडांना र्वर्धैला त्यांच्या म्हातार्या आई, वडिलांन कडे शिक्षणासाठी ठेवले. आणि ते माझ्या आईला घेऊन गडचिरोली ला निघून गेले.तो काळ होता मराठी प्राथमिक शाळेत शिक्षण घेण्याचा माझ नाव प्राथमिक शाळेत आजोबांनी नेऊन टाकले आणि त्या दिवसापासून माझा मित्र, मैत्रिणी गोळा करायला सुरुवात झाली. आज्जी आणि आजोबांच्या प्रेमात मी जनु काही न्हाहून निघत होती. आणि अचानक मला कंच्चे खेळायचा नाद जडला ऐवढ्या मुलांन मध्ये मी एकटीच मुलगी कंच्चे खेळायची आणि माझे आजोबा प्रेमापोटी मला कंच्चे आनुन द्यायचे. मग मी ते कंच्चे माझ्या आजीच्या गहु मोजायच्या पायलीत जमा करायची. कंच्चानीं पायली भरली की मला खूप आनंद व्हायचा. आज्जी सुध्दा गहु मोजन झालं की पुन्हा माझे कंच्चे पायलीत भरुन ठेवायची.
रम्य ते बालपण म्हटल्या प्रमानेच माझं बालपण खुप मजेत गेले. कधी मित्र,मैत्रिंनीं मध्ये जातिभेद नाही तर कधी गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही.दुमजली घरात राहणारी मी दिवसभर झोपडपट्टीत कंच्चे खेळत असायची. कुणाचा धाकनाही,भिंती नाही पण त्याकाळातील समाजातले वातावरच इतकं सुंदर होतं की जनु वृंदावनात लावलेल्या तुळशी पेक्षा रानात वाढलेली तुळस जशी बहरते अगदी त्याप्रमाने मी वाढली. मोठी झाली उच्च शिक्षण घेतलं आणि नौकरी करण्याची वेळ आली तेंव्हा खास ग्रामिन भागातील शाळा निवडली. कारण विद्यार्थी माझं आराध्यदैवत बनलं.
मी माझ्या शाळेत शिक्षक कंक्षात न बसता नेहमी विद्यार्थ्यांन सोबत असते. जेवनाच्या सुट्टीत मी विद्यार्थ्यांन सोबत जेवते देने करून मला त्यांच्या टिफिन वरून त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितची जाणिव होते.
मी कधीच माझ्या विद्यार्थ्यांवर हात उचलत नाही कारण ते मला कधी त्रासच देत नाही. एकदा मी एका विद्यार्थ्याला गणवेशात करीता रागावले आणि वर्गाबाहेर उभे ठेवले. काही वेळानं त्याला वर्गात घेतले. तासिका संपली म्हनुन मी वर्गाबाहेर पडली. आणि त्याच क्षणाला माझ्या कानावर शब्द पडले काही विद्यार्थी गणवेशासाठी बाहेर काढलेल्या विद्यार्थ्यांनला चिडवत होते आणि क्षणातच वर्ग शांत झाला. शिक्षामिळालेला विद्यार्थी ओरडून ओरडून सांगत होता. मला म्यामने का शिक्षा केली,कारण शाळेमध्ये शाळेचे संस्थाचालक आले होते ते गाडीत बसुन जाताच म्यामने मला वर्गात घेतले. मी वर्गाबाहेरुन हे ऐकत होती. त्याचा माझ्यावरचा एवढा प्रचंड विश्र्वास बघुन मी पुन्हा वर्गात गेली नि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
एखाद्या दिवस असाहि निघतो की मुलं स्वताहुन सांगतात की आज अभ्यासाला सुट्टी मग काय वर्गात कच्यां चिवड्याची पार्टी.सगळे विद्यार्थ्यां खुश . माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांला त्याच्या घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात मला फार आनंद मिळतो ते ही मर्यादा न अचानक काही मुले सोबत नेऊन त्याचा वाढदिवस साजरा करायचा.
कोरोनाच्या या लॉक डाऊन च्या काळात मी पहिल पत्र माझ्या विद्यार्थ्यांना लिहिले आणि त्यांच्या फेसबुक व वाट्स ऍप वर टाकले आणि माझे पत्र वाचून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कोरोनामध्ये आपली काळजी घ्यायला आपल्या म्याम आहे हा विश्वास त्यांना मीळाला.
मित्रांनो आज माझे विद्यार्थी कंच्चे खेळत दिसले की सगळे शिक्षक रागावतात पण मी मात्र तिथे उभी राहुन त्यांचा खेळ बघते . वयाचे व जबाबदारी चे भान ठेवून शांत उभी राहाते आणि त्या कंच्चान मध्ये आपले बालपण शोधतांना खुप समाधान मिळते आणि असं वाटतं आयुष्याची सगळी जमापुंजी इथेच लपवली आहे.
सौ . मेघा विनोद हिंगमिरे. शिक्षिका भारत विघालय वेळा.त.हिंगनघाट जि.वर्धा.७७९८१५९८२८
**~**~**~**~**~**~**~**~**
11) शाळा म्हणजे सुसंस्कृत नागरीक घडविण्याचे पवित्र स्थान
"शिक्षण ही एक पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र. ते एक राष्ट्रीयतेचे, मानवतेचे, नि अज्ञानतम दूर करण्याचे उदात्त कार्य आहे. शाळेत समबुद्धीचे, उदात्त, नि:पक्षपाती, थोर मनाचे शिक्षक पाहिजेत. शिक्षक वर्ग हा राष्ट्राचा सारथी आहे. कारण, त्याच्या हाती शिक्षणाच्या नाड्या असतात. यास्तव शिक्षक कोण असावा यासारखा समाजसुधारणेच्या दृष्टीने पाहता दुसरा प्रश्न महत्त्वाचा नाही."
एकदा एक विद्यार्थी माझ्याकडे तक्रार घेऊन आला,"सर सर.., ह्याने मला शिवी दिली.
मी सुरुवातीला शाळेत गेल्यानंतर भांडणं, शिव्या अशा अनेक तक्रारी रोज यायच्या. मुले एकमेकांना शिव्या देतात, मारामारी करतात हे पाहून विद्यार्थ्यांना सांगितलं होतं ,"एखादयाने तुम्हाला शिवी दिली तर त्याला उलट शिवी नाही द्यायची. कारण कुत्रं आपल्याला बघून भुंकत असेल तर त्याच्याकडे बघून आपण उलट भुंकतो का ? नाही ना.! अगदी तसंच.! फक्त दोन कुत्रेच एकमेकांना भुंकतात.. तुम्ही त्याला उलट शिवी दिली तर त्याच्यात आणि तुमच्यात काहीच फरक राहणार नाही.!"
असंच मारामारीच्या बाबतीत त्यांना सांगितलं होतं, "पहिल्यांदा कोणीही हात उचलायचा नाही. कोणी उचलाच तर लगेच सरांना सांगायचं. तरंच त्याचं ऐकून घेतलं जाईल. दोघांनी एकमेकांना मारलं तर दोघेही गुन्हेगार होतील. मग त्या दोघांच्या पालकांना बोलावून घेतलं जाईल."तुमच्या शिवी देण्याने किंवा भांडण करण्याने पुढच्याला वाईट वाटतं. दुःख होतं. त्रास होतो. तुम्हाला दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडतं का..? एक नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याला दुःख देऊन तुम्ही कधीच सुखी राहू शकत नाही. दुसऱ्याशी तुम्ही जेवढं प्रेमाने वागाल, तेवढं तुम्हालाही प्रेम मिळेल. जीवनात नेहमी दुसऱ्यांशी प्रेमाने, चांगलं वागणारी माणसंच खूप मोठी होतात."
पण लागलेली सवय काही लगेच जात नाही. आणि हा प्रकार घडला. आजूबाजूला, मुलांच्या घरात आई ,वडील, भाऊ ,बहीण, काका, शेजारी आणि मित्र असे अनेकजण बिनबोभाट घाणेरड्या शिव्या देताना मुलांनी पाहिलेल्या असतात. आपल्या मुलांनी शिव्या देऊ नये असं अशी इच्छा असणारे पालक आपण मात्र त्यांच्यासमोर शिव्या देत असतात. ज्यांच्याकडून आदर्श घ्यायचा असतो तेसुद्धा शिव्या देतात. हेही मुलांनी पाहिलेलं, ऐकलेलं असतं. शिव्या ह्या आपल्या सुसंस्कृत संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. तिथुनच तर मुले शिकत असतात. आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा शिव्यांनी पद्धतशीर शिरकाव केलाय. असो. ते पाहूनच मला हे लिहिणं गरजेचं वाटलं.
मग मी त्या शिव्या देणाऱ्या मुलाला बोलावून घेतलं. त्याला अजिबात न रागावता खरं खोटं विचारून घेतलं. सर मारत नाहीत ह्याची खात्री असल्यामुळे मुलं बऱ्यापैकी खरं बोलतात. त्याने शिवी दिली असल्याचं कबुल केलं. ज्याला शिवी दिलेली असते त्याची इच्छा असते की सरांनी शिक्षा केली पाहिजे. अशावेळी मी त्यांचं भावविश्व लक्षात घेऊन मुलांशी संवेदनशीलतेने वर्गात सर्वांसमक्ष बोलत असतो. संवाद करतो. त्या दोघांना समोर बोलावून घेतलं.
" या जगात कोणीच जन्मतः वाईट नसतं. खरं तर माणूस वाईट नसतोच, वाईट असतात त्याला असलेल्या सवयी. ज्याला आपण गुण- दोष म्हणतो. माणसानं त्याच्या वागण्यात असेलेले दोष, चुकीच्या सवयी बाजूला काढून टाकल्या तर जो शिल्लक राहतो तो चांगला माणुस.!"
मी विचारले " तू शिवी दिल्यामुळे ह्याला किती वाईट वाटलं असेल ? तो म्हणला होय सर मग मी म्हटले " त्याला त्रास देऊन तुला चांगलं वाटलं का? " त्याचा आवाज अजून खाली गेला.तो म्हणला नाही सर आणखी विचारल " तू शिवी म्हणून त्याच्या आईबद्दल जो शब्द उच्चारलास ते तुझ्या ,माझ्या , ह्याच्या, सर्वांच्या आईला आहे रे..! विचारू शकतो का घरी जाऊन..? तु ह्याच्या आईचा आदर केला नाहीस तर हा तुझ्या आईचा आदर करेल का? तू ज्यांना ज्यांना अशी शिवी दिली आहेस आणि भविष्यात देशील ते सगळेच तुझ्या आईचा कधी आदर करतील का..? तुझ्यामुळे तुझ्याच आईचा मान,किंमत, आदर कमी होणार नाही का सांग मला..!?"त्याला होत असलेला पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर आता दिसू लागला होता. आवाजातही जाणवू लागला. तो- " हो सर. चूक झाली माझी. सॉरी सर.! आता मी कोणालाच शिवी देणार नाही सर." रडवेल्या सुरात तो बोलला. मी म्हटले " मला सॉरी नको म्हणूं. ह्याला म्हण.!"मग त्याने कान पकडून त्या मुलाची माफी मागितली. त्याला पुन्हा शिवी देणार नाही असं प्रॉमिस द्यायला सांगितलं. तसं त्यानं लिहून दिलं.ज्याला शिवी दिली होती त्याला विचारलं, "ह्याला शिक्षा करायची की नको रे?"
तो म्हणला " नका सर. राहू द्या!" ह्याचीसुध्दा बदल्याची भावना नष्ट झाली होती.
दुपारच्या सुट्टीत वर्गात मुलामुलींची ह्यावर चर्चा झाली. सगळ्यांनी प्रॉमिसचिठ्ठ्या लिहिल्या होत्या. ज्यात त्यांनी 'आम्ही कोणालाच शिवी देणार नाही. भांडण करणार नाही.' अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. मी वर्गात आल्यावर मुलांनी सर्व चिठ्ठ्या माझ्याकडे आणून दिल्या. तोंडी प्रॉमिस केलं. मला भरून आलं. मग त्यादिवशी आम्ही याच विषयावर खूप वेळ बोललो. मुलांशी चर्चा केली. मुलांनी एका एकाने उठून आपल्या चुका, वाईट सवयी सर्वांसमोर कबुल केल्या. त्या सोडून द्यायचं प्रॉमिस केलं. गृहपाठ म्हणून ते सर्व लिहून आणायचं ठरलं. तसेच आणखी आठवून आजपर्यंत कोणाकोणाशी आणि का भांडणे केली तेही लिहून आणायचं ठरलं.
एकदम बदल नाही झाला सगळा. चुकून किंवा रागात मुलांकडून चुका व्ह्यायच्या. आम्ही पुन्हा पुन्हा वर्गात त्यावर चर्चा करायचो. Sorry... प्रॉमिस व्हायचं. वाद झाले तरी बोलण्यातुन प्रश्न सुटू शकतात याची हळूहळू जाणीव मुलांना होऊ लागली. त्यांना रेडीमोड उत्तरं न देता त्यांचे प्रश्न त्यांनीच सोडवण्यासाठी मी प्रोत्साहन देऊ लागलो.आमचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी यांचं प्रोत्साहन आणि सहकार्य मिळत होतं. इतर वर्गातील मुले मोठया मुलांचं अनुकरण करू लागली. स्टाफ आणि मुख्याध्यापक यांच्यामधील समन्वय व संवाद याचंही विद्यार्थी निरीक्षण करत असतात. त्याचाही सकारात्मक परिणाम होऊ लागला. छोट्या मुलांची काही भांडणे शिक्षकाकडे न नेता मोठी मुले ती स्वतःहून सोडवू लागली. मोठी मुलेच परस्पर सॉरी- प्रॉमिस करून घेऊ लागली. हळूहळू दृष्य बदल होऊ लागला. गावात किशोरवयीन मुले- मुली, तरुण, महिला यांच्यात ह्या सॉरी आणि प्रॉमिसची चर्चा होऊ लागली. आज वर्गातील मुलांमध्ये शिव्या आणि भांडणाचं प्रमाण नसल्यागत आहे.!मुलाना मध्ये केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे सत्य घटनेवर आधारीत आहे.
लेखन: श्री.सुंदरसिंग आर.साबळे
ता गोरेगाव जि गोंदिया
मो.9545254856
ईमेल- sundarsable88@gmail. com
**~**~**~**~**~**~**~**~**
12) *शाळेतील गमतीजमती*
मला आठवतात त्या आता लहानपणी च्या गोष्टी .पण कसल्या ही कुठल्याही कामात मस्ती. गृहपाठाची ती माझी वहिनी कधीच पूर्ण नसायचे , कारण ताईच्या वर्गात कोणी नसेल तर खोड्या करायची आणि पकडले गेलो तर . तर काय?कारण मात्र तयार ठेवावे. अशी माझी नेहमीची शक्कल
लढवायची.मधल्या सुट्टीत एकत्र डबा खायचा , संपला रे संपला की खेळायला पळायचं. सुट्टीची घंटा झाली रे झाली की घराच्यादिशेने पडायचं .शाळेची सर्व वर्ष संपून गेले या पथकावरी गोड आठवण राहून गेली. कधीकधी आयुष्याच्या पुस्तकात डोकावून पाहिले की वाटते हे सर्व आपण आयुष्यात प्रत्येक्ष अनूभव घेऊन पार झालोत.
असे वाटते माझ्या रोजच्या बाकावर जावून बसायचं . रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत .प्रतिज्ञा म्हणावी.
.नव्या वहीचा वास घेत पानावर एकदा तरी सुंदर अक्षरात नाव गिरवायंच. समोर बसण्यासाठी ओठातान करायंच.
*मुंगी साखरेचा ठेवा !लहानपण देगा देवा!*
खरंच अगदी या क्षणाला असं वाटते शाळेत केलेल्या लहान सहान गोष्टी आठवायला लागल्या की मन आनंदाने उधान घ्यायला लागतो .
मी चौथ्या वर्गात असताना गणित विषय शिकविण्यास दुसर्या वर्गातून माझ्या वर्गात आले, मला गणिताची धास्ती आधीपासूनच वाटत होती. पिरेड एंगेज करण्यासाठी गणित विषय शिकवत. शिकविण्यास सुरुवात केली. की.धडधडत्या छातीने वही पेन हातात घेत गणित सोडवायला लागली . आधीच मनात बाबांची भिती वाटायची .गणितासारखा विषय सोडविणे मोठे कठीण काम वाटायचे. पण करणार काय ?गणिते सोडवायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! सर्वच्या सर्व गणिते अगदी बरोबर सोडवून दाखविण्यास पहिला नंबर,. मग काय शाबासकीची थाप पाठीवर.! मग काय आनंद गगनात मावेना!आणि तेव्हापासून गणित हा इतका आवडीचा विषय झाला की .आज पर्यंत आवडीचाच आहे.
असाच एक प्रसंग नित्य नियमानूसारआम्ही तिन्ही भाऊबहीण शुंभकरोती करून अभ्यासाला बसलो. अभ्यास करीत असतांना एक भागाकार सोडवायचा होता.उदाहरण माझ्यासाठी कठीणच होता.पण त्याचवेळी आई पाटणावरून गंज काढत असतांनी .तिच्या हातून निसटला आणि थेट माझ्या डोक्यावर बसला ..रडायला आले:पण धाक इतका रडणे सोडून गणित सोडविण्यास सुरू केले .आणि न थांबत न चुकविता तो कठीण भागाकार क्षणाचा विलंब न लागता सुटला देखील .म्हणतात ना, “ *छडी लागे छमछम : विद्या येई गमगम*”.
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
**~**~**~**~**~**~**~**~**
13) शाळेतील गमती जमती
एक दिवस गावातून फेरफटका मारताना माझी सहज नजर माझ्या शाळेकडे गेली. शाळा पाहील्यावर मला बालपण आठवले व माझे पाय हळूच शाळेकडे वळले. मी शाळेच्या ओरांड्यात गेल्यावर मला बालपणीच्या गमती जमती आठवायला लागल्या . माझ्या मनात विचार यायला लागले की, हा ओरांडा मला ओळखत असेल का? ....मग माझ्या मनानेच उत्तर दिले का नाही ,'तु विसरला तरी ती शाळा कसे विसरले. कारण याच शाळेत अनेक गमती जमती केलोत. मस्ती केलोत. सर्वांनी मिळून दुपारचे जेवण केलोत. दुपारच्या सुट्टीत विटी दांडू, उंच उडी, आंधळी कोशिंबीर अनेक खेळ खेळलोत.
शाळेत पहील्या बेंचवर बसण्यासाठी सकाळी लवकर येऊन बसायचो. ही गंमत वेगळीच होती. शाळेत नियमित यायचो. एखादी सुट्टी मिळावी या करीता खुप पाऊस पडावा व शाळेला सुट्टी भेटावी बाबतचा भावार्थ आनंद वेगळाच होता. तितक्याच आवडीणे शाळेत जायचो. लहाणपणीचे जीवण हे वेगळेच असते म्हणून म्हणतात ना, लहाणपण दे गा देवा. लहाणपणी शाळेत चोरून बोर, चिंचा, संत्री गोळ्या वाटून खाणे याचा आनंद खुपच वेगळा आहे. दुपारी दुधा करीता ग्लास वाजवणे व ते दुध पिल्यानंतर तोंडाला तयार होणारी मिशी पाहू मुले मुली एकमेकींकडे पाहून होणारी गंमत वेगळीच होती.
एकदा काय झाले मी लहाणपणी दुपारच्या सुट्टी नंतर दांडी मारायचो पण सरांस आम्ही दपत्तर कसे घेऊन जायचो समजत नव्हते. एके दिवशी सरांना आमचा प्लॅन समजला ते दुपारची सुट्टी होताच पकडले व आम्हाला चेक केले तर आमचे दपत्तर आमचे पोटाला लपून ठेवलेले सापडले त्या दिवसा पासून मी संपुर्ण शाळा करायला लागलो.
अशीच एक गंमत आम्ही शाळेत करायचो. इंग्रजी तासीकेत इंग्रजी शब्द पाठांतर करावे लागायचे. आम्ही एक युक्ती केली पहील्या बेंच पासून आपला कितवा नंबर येतो तो एकच शब्द पाठांतर करायचो व सरांना वाटायचं मी चांगले शब्द पाठांतर करत आहे पण एके दिवशी सरानी मागून सुरूवात केली व माझी पोल खुलली. आशा अनेक गमती जमती चालायचे. वर्ग मित्र व मैत्रिणीची मजाक करणे, एकमेकांची उडवणे, हसणे हे निर्मळ असे होते..सरांनी एखादे काम सांगीतले व ते केल्यानंतर होणारा आनंद हा एखादा पुरस्कार भेटल्या सारखा होता.
कट्टी करणे व दो करण्यासाठी मित्राची मर्जी राखणे त्यास खुश करून दो करणे .अशा प्रकारे कट्टी व दो खेळ खुपच गमतीदार होता. कागदा पासून बनवलेला चेंडू त्या पासून मारामारी खेळणारा खेळ, काचेच्या गोट्या हा खेळ खुपच गमतीदार होता. चड्डी फाटकी असली तरी त्यावर कडदोराचा बेल्ट असायचा ,ती फॅशन खुपच गमतीदार होती. ह्या गमती खुपच प्रेरणा देणारे असतात व चुकातून बरेच काही शिकायला मिळाले. हीच गुरूच्या शिकवणीची शिदोरी व सराचा मार मला जिवना खुपच उपयोगी पडतो. बालपणीचे गमती जमती ह्या आपल्या जिवणातील सुवर्ण अक्षरात लिहिलेला इतिहास आहे.......
*बोईनवाड गुणवंत किशनराव (होटाळकर)
नांदेड ..9921034211
**~**~**~**~**~**~**~**~**
14) माझे रंगीत शालेय जीवन
'बालपण' हा शब्द जरी नुसता उच्चारला तरी माझं मन फ्लॅश बॅक मध्ये जाऊन शाळेत उंडारायला लागतं. माझी पुण्यातील सुप्रसिद्ध शाळा हुजूरपागा. या शाळेने माझ्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे रंग दिले. माझ्या पदरात खऱ्या, जीवाला जीव देणाऱ्या,हरहुन्नरी मैत्रिणींचे दान टाकले. पन्नास वर्षे होऊनही आमच्या मैत्रीत खंड नाही. या शाळेचा सार्थ अभिमान मला होताच, आजही आहेच.
मला माझे सगळे भाऊ 'घोड्यांच्या पागेत' जाते म्हणून चिडवायचे. कारण पूर्वी तिथे पेशव्यांच्या घोड्यांची पागा होती. त्यामुळे लगाम हातात धरून च्यॅक-च्यॅक करत मला हाकलण्याचा अविर्भाव ते करीत असत. बरं, बहीण मी एकटीच. त्यामुळे मी रडत जाऊन आईला गाऱ्हाणे सांगत असे. कारण माझ्या शाळेला नावे ठेवलेली मला अजिबात खपायचे नाही. आता आठवले की हसूच येते.
आणखी एक आठवण माझ्या डोक्यात अगदी घट्ट बसली आहे. मी पहिलीत होते. बाईंनी दहा पर्यंतचे पाढे पाठ करून यायला सांगितले होते. घरी आईने माझ्याकडून पाढे पाठ करून घेतले होते. झोपेत जरी विचारले तरी मी उत्तर बरोबरच देत असे. त्यादिवशी गणिताच्या तासाला मी अगदी खुशीत होते. बाईंनी उभे केले, विचारले, "पाढे पाठ केले"? मी जोरात, "हो" म्हटले. त्यांनी मला लगेच विचारले, " सात सकं किती?" आणि काय सांगू तुम्हाला? माझी वाचाच बसली. काही आठवेच ना. पाय कापू लागले. सगळा वर्ग हसू लागला. अस्मादिकांचा घोर अपमान झाला होता. मी रडू लागले. माझे रडे काही केल्या थांबेना. शेवटी वर्गाला गप्प करून बाईनी मला जवळ घेतले. समजावले. तेव्हा मी शांत झाले. अशी माझी फजिती.
पाचवी-सहावीत गेल्यावर थोडी मला शिंगे फुटली होती. तेव्हा वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा मला फार आवडत असे. त्यामुळे वर्गात मैत्रिणींची खोडी काढणे, वर्गाला डिस्टर्ब करणे असे प्रकार मी मुद्दाम करीत असे. त्यामुळे मला वर्गा बाहेर काढले जाई. त्या वर्गाच्या मागे आमच्या शाळेची आमराई होती. तिथे चिंचेची पण दोन झाडे होती. त्यामुळे तिथे बाईंची नजर चुकवत जाऊन खाली पडलेल्या कैऱ्या, चिंचा खायला मन फार आतूर असे. डबा खायचा सुट्टीत तिकडे जाण्यास परवानगी नव्हती. एकदा अशीच चिंचा खात खात तंद्रीत चालले होते. समोर आमच्या परांजपे बाई अचानक दोन्ही हात कमरेवर विठोबा सारखे ठेवून उभ्या ठाकल्या. माझी पाचावर धारण बसली. उद्या शाळेत येताना 'शिक्षेचे महत्त्व' या विषयावर निबंध लिहून वर्गात वाचून दाखवण्याच्या बोलीवर माझी बोळवण झाली.
शाळेच्या कबड्डी च्या टीम मध्ये मी दरवर्षी असे. आम्हाला बहुदा दरवर्षी चॅम्पियनशिप मिळायची. तेव्हा इंटर स्कूल मॅचेस हिरा बागेच्या मैदानावर होत असत. आम्ही मॅच जिंकली की त्या दिवशी आमच्या कोच वझे बाई घरी बोलून पार्टी देत असत. त्यावेळी श्रीखंड पुरी, बटाटेवडे, पाव मिसळ, पाव- मटारची उसळ यापैकी एखादा मेन्यू असायचा. पण बाईंच्या घरी जायचे म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायची. मॅच जिंकली की हिरा बागेपासून आमच्या शाळेपर्यंत एक ते दीड किलोमीटर अंतर आम्ही घसा फुटेपर्यंत आरडाओरडा करत शाळेच्या आरोळ्या देत शाळेत यायचो. आरोळी अशी असायची, "वीर कन्यका, वीर कन्यका भारत मातेच्या
विजयी विजयी विद्यार्थिनी आम्ही हुजूरपागे च्या l
ह्या गोष्टी अगदी जशाच्या तशा डोळ्यासमोर उभ्या राहतात.
शाळेच्या वार्षिक संमेलनांमध्ये भाग घेण्याची मला फार हौस असायची. नाटकात भाग घ्यायला मला खूप आवडत असे. खरं छुपं कारण सांगू का? गॅदरिंग मध्ये भाग घेतला की शाळेत शेवटच्या तीन तासांना सूट मिळत असे. तेव्हा प्रॅक्टिस घेतली जायची. तेवढीच अभ्यासापासून सुटका. आणि दुसरे असे की संमेलन झाले की भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींना शाळेतर्फे अल्पोपहाराचा कार्यक्रम असे. तेव्हा खूप मजा येई. सगळ्या बाईंशी जवळकीने खूप गप्पा मारता यायच्या. अजूनही जुने फोटो पाहिले की एक एक प्रसंग आठवतो.
शाळेसंबंधी ची ही एक आठवण मी अगदी बकुळीच्या फुलाप्रमाणे जपून ठेवली आहे. त्यादिवशी आम्ही म्हणजे दहावीच्या मुली 'बाई' व्हायचो. पाच सप्टेंबरचा शिक्षक दिन असा साजरा केला जायचा. अगदी मुख्याध्यापक पासून शाळेचा गडी, शाळेतल्या मावशी, सर्व भूमिका दहावीच्या विद्यार्थ्यांनी करायच्या. शाळेचा गडी व्हायला सगळ्याजणी फार उत्सुक असायच्या. मुख्याध्यापिका यांच्या ऑफिस बाहेर असणाऱ्या दशरथ नावाच्या प्यून चे काम करणे सर्वात आवडे. कारण प्यून म्हणून नोटीस घेऊन कुठल्याही वर्गात जाता यायचे आणि मुख्य म्हणजे शाळेची घंटा वाजवायला मिळे. सगळ्या वर्गांना खडू चे वाटप करायचे काम असे. त्यातील काही खडू ढापले जायचे. म्हणून हा प्यून होण्यास सर्वात जास्त पसंती असायची. ज्या बाईंची भूमिका घेऊन आम्ही वर्गात जायचो, त्यांची एखादी खुबी, सवय बोलण्याची स्टाईल, लक्षात ठेवून नक्कल करायचो. मग वर्गात हशा पिकत असे. त्यांना रागवायचं. ह्या सगळ्या लहान-सहान गोष्टीत खूप मजा यायची. त्यादिवशी आम्ही सर्वजणी पांढऱ्या साड्या नेसून वर्गावर जायचो. खूप मोठे झाल्यासारखे वाटायचे.
शाळेतील अकरा वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील सोनेरी वर्षे होती. ज्या शाळेने मला घडवलं आणि त्यामुळे आजपर्यंतचे आयुष्य माणूस म्हणून आणि इतर सर्व दृष्टीने यशस्वीरीत्या मी घालवू शकले, त्या शाळेला शतशः प्रणाम!
आपले ते दिवस, ते बालपण, परत मिळवू शकत नाही. पण आपल्यातल्या त्या निरागस मुलास आपण कायम जपू शकतो. आपले पायही कायम जमिनीवर रहावे. म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात.....
लहानपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा ll
ऐरावत रतन थोर l त्यास अंकुशाचा पार ll
महापुरे झाडे जाती l तेथे लव्हाळ पाचोळा ll
जया अंगी मोठेपण l तया यातना कठीण ll
तुका म्हणे बरवे जाण l व्हावे लहानाहून लहान ll
शुभदा दीक्षित
पुणे
**~**~**~**~**~**~**~**~**
15) शाळेतील गमती जमती.
चौथीच्या वर्गा पर्यंत आमची कन्याशाळा होती. धरा पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर. त्याकाळी नव्हते रिक्षा किंवा बस. सगळीच मुलं पायीच शाळेत जायची. सकाळी दफ्तर घेऊन डुलत डुलत रस्त्यावर खोड्या करत साडे दहा पर्यंत शाळेत पोहोचायचे. मग प्रार्थना म्हणून वर्गात जायचो.
रोजच सगळे मिळून एका सुरात पाढे म्हणायचे. त्यामुळे अगदी दिडकी अडीचकीचे पाढे सुद्धा तोंड पाठ असायचे आणि म्हणूनच आजही कुठलाही हिशोब पटकन करता येतो. केलक्युलेटर किंवा काॅम्प्युटरची गरज पडत नाही.
इयत्ता चौथीला बालभारती बरोबर शिवरायांचा इतिहास ,प्रयोगातून विज्ञान, भूगोल 'आपला महाराष्ट्र'असावे कारण तिसरीला 'आपला जिल्हा 'होता अन गणित ...(गणित विषय माझ्या नावडीचा)हे विषय होते .बालभारती बरोबर शिवरायांचा रोमहर्षक इतिहास प्रचंड आवडायचा. मला तसेही गोष्टींची खूप आवड होती त्यामुळे भाषा आणि इतिहास अगदी आवडीचे विषय.
दर शुक्रवारी सरस्वती पुजा व्हायची. त्यातही श्लोक प्रार्थना असायचे.सगळे झाल्यावर फुटाण्याचा प्रसाद असायचा. कधी वर्गातील सगळ्या मुली मिळून चुरमुरे आणायचो आणि सगळ्या मिळून चुरमुरे फुटाणे खायचो.
शाळेच्या बाहेर एक आजीबाई बोरकुट,उकडलेली बोरं, लिमलेटच्या गोळ्या विकायला बसायची . ती बोर आणि बोरकुट खाण्याची सक्त मनाई असायची. पण सगळ्याच मुलींना ती दोन्ही पदार्थ खूप आवडायचे. मग लपुन छपून बोरांवर मीठ खालून खायचो अगदी बोटं चोखून चोरून खाण्याची ती मजा आता माॅल मधे मिळणारे बोरं खातांना येत नाही. असे सगळे अरबट-चरबट पदार्थ खाऊनही कोणी आजारी पडायचे नाही . किंबहुना त्या काळी कुठल्याही गोष्टीचा बाऊ करायची पद्धत नव्हतीच मुळी.
खेळतांना पडायचं स्वतच उठुन परत धावायचे. कदाचित म्हणूनच जुनी पिढी इतकी कणखर आहे तना-मनानी. शाळेत रमत-गमत झालेला अभ्यास, ती आमची जडणघडण, एकत्र येऊन खेळायचे, सगळी कामे करायचो.
ह्या सर्वांचा आजही मनावर पगडा आहे. त्या जडणघडणीने आजच्या वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटणारी पिढीचे निर्माण झाले.
डाॅ.वर्षा सगदेव
**~**~**~**~**~**~**~**~**
16) बालपण - एक आनंदाची खाण
मित्रांनो , आपल्या जीवनात बालपण , तरूणपण आणि वृद्धपण या तीन अवस्था सर्वांनाच अनुभवास मिळतात . मग तो जगातील कोणत्याही व्यक्ती असोत . सर्वांना ह्या अवस्थेला सामोरे जावेच लागते बरं का! फक्त फरक एवढाच की कुणी मानसिकदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या कमकुवत असेल तर मात्र त्याला वार्धक्य लवकरच येणार ! कारण , " माणूस वयाने जरी म्हतारा असला तरीही मनाने नेहमी तरूणच असला पाहिजे ! " तरच या सुंदर जीवनाचा मनसोक्त व निर्भेळ आनंद घेऊ शकतो . बरं ते सर्व जाऊ दे ! आज मी तुम्हाला माझ्या बालपणीच्या विश्वातील काही रंजक व हास्यास्पद गमतीदार क्षणाची ओळख करून देणार आहे !!
" रम्य - निरागस ते बालपण
स्मरणता होई आनंदीत मन !! "
मी चौथ्या वर्गात असतांनाची एक गोष्ट आहे.त्या दिवशी माझा वाढदिवस होता . त्या काळी आत्ताच्या सारखा कुठंला केक नि कुठली जंगी पार्टी ! थोडाफार चुरमुर्याचा चिवडा नि एखादा गोड पदार्थ .ओवाळणीचे औक्षणासाठी सुसज्ज असे ताट ! न मेणबत्त्या न फुगे ! हा ड्रेस मात्र नविन असायचा बरं का !! आईने सकाळीच खव्वा घेऊन मस्त गोड - गोड रसरशीत पातेलभर जामून केले होते . आणि संध्याकाळी वाढदिवसाला काही जीवलग मैत्रीणींना हा खाऊ वाटप करायचा होता . पण ! म्हणतात ना , " विनाशकारी विपरीत बुद्धी ! " त्या जामूनांचे भरलेले पातेले माझ्या भूकेल्या नजरेसमोरून काही केल्या हटवेनाच ! संधी साधून चोरपावलांनी गुपचूप त्या पातेल्यातील स्वादिष्ट जामूनांवर यथेच्छ ताव मारला ! त्या वेळी मी स्वतःला बालकृष्ण समजून जामून मला लोण्यासारखे वाटत होते बरं का !! पोटभर खाऊन झाल्यावर मात्र काही चार - पाच जामून त्यातील पाकासह तसाच प्लेटीने झाकून ठेवला . काही वेळाने आईनं पातेल पाहिले व ओरडू लागली . कुणी खाल्ले जामून ? मी म्हणाले , " आई , थोड्या वेळापूर्वी मी किचनरूम मधून बाहेर जाताना एक मोठे मांजर पाहिले होते! तिनेच खाल्ले असतील ते जामून !! " मग आईचं ती ! अनुभव व ज्ञानाने हूशार ! ती म्हणाली , " मांजरीने प्लेटही कसं काय पातेल्यावर झाकून ठेवली ? " आता मात्र मी पार भयभित झाले होते . मी लहान भाऊ अनिल किंवा सुनिल यांच्यावर आळ घेतला ! कारण एक खोटं लपविण्यासाठी शंभर खोटं बोलावे लागते याची साक्षात प्रचितीचं मला अनुभवायला येत होती . मग काय आईने लगेच दोन्ही भावाला बोलावलं . ते बिचारे ! खरं सांगू लागले अगदी निर्भिडपणे ! म्हणतात ना , " कर नाही त्याला डर कशाला " या अविर्भावात... मग आईने सर्व भावंंडाना देवावर हात ठेवून , " मी खरं बोलत आहे ! मी जर खोटं बोललो तर देवा ! रात्री माझ्या स्वप्नात येऊन शिक्षा करं ! " असा प्रकार आई आमच्याकडून सत्य वदवून घ्यायची . जणू काही बुडबुड घागरीतील कथेची प्रत्यक्ष प्रचितीच आमच्याकडून करून घ्यायची !! मग माझी अवस्थाही त्या लबाड मांजरीसारखी व्हायची . देवावर हात न ठेवताच मी माझ्या चोरीची कबूली दिली . नि आत्ताही जामून केले किंवा पाहिले तरी ही चोरीची आठवण बालपणी नेऊन तरोताजा करून ठेवते जीवनभर ........
अशा एक नाहीत तर अनेक गमती - जमतीचा बालपण हा एक अनमोल असा खजिनाच होय ! नि ह्या सुखद व निरागस आठवणी ह्या एक आनंदाची साक्षात खाणचं होय . ह्या वाळवंटी जीवनातील बालपण ही एक हिरवळचं होय ! जी या चिंतीत व थकलेल्या मनाला क्षणभर आनंद देऊन मनावरील दुःखाचे मळभ दूर करते . मनातील मरगळ दूर सारून तना - मनांत चैतन्याचा झराच ओसंडून वाहू देतो . म्हणून म्हणतात , " बालपणीचा काळ सुखाचा ! " ते आता या धकाककीच्या प्रत्यक्षात बालपण ओलांडून गेल्यावरच जाणवते ....
असो , या लेखानिमित्त माझ्या बालपणीच्या जामूनच्या गोष्टींच्या आठवणीने तुम्हांलाही मी तुमच्या बालपणी घेऊन गेले हो की नाही ! अशाच बालचौर्यातील तुम्हांला आनंददायक क्षण नव्हे तर अख्खी आनंदाची खाणचं नक्कीच आठवल्याखेरीज राहणारचं नाही बरं का .....
अर्चना दिगांबर गरूड ( स.शि.)
ता. किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552954415
**~**~**~**~**~**~**~**~**
17) बालपणीचा काळ सुखाचा
ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही जशी माऊली बाळा
शाळा म्हटली म्हणजे ते बालविश्व पुन्हा एकदा जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते. शाळेतही गमतीजमती पुन्हा आठवू लागतात.
आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. आमच्या शाळेत लादी फारशी वगैरे काही नव्हते. आम्ही खालीच सारवलेल्या जमिनीवर बसून शिकायचो. विशेष म्हणजे खाली अंथरायला साधी चटई पण नसायची. दर शनिवारी सकाळची शाळा सुटतांना शाळा सारवायची पद्धत होती. आम्ही मुलं शेण जमा करून आणायचो आणि मुली सारवायच्या असा आमचा अलिखित करार होता. एकदा आमचा वाद झाला आणि सगळ्या मुलामुलींनी मिळून मला शेणाने माखवले .त्यादिवशी माझा नकाशा पाहण्यासारखा झाला होता. ,घरी न येता तसाच नदीवर गेलो आणि कपडे धुवून सुके पर्यंत तिथेच थांबलो. विशेष म्हणजे तो पर्यंत माझ्या घरी सगळी मुलं आधीच पोहोचले होते . आणि घडलेला सर्व प्रकार तिखटमीठ लावून सांगून टाकला होता. त्यामुळे शाळेतील प्रसाद आणि घरचा प्रसाद असा दुहेरी लाभ मला त्यादिवशी झाला.
एकदा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शाळेत नाटक बसवले . डॉ.गणेश हिर्लेकर लिखित अधिकार हे नाटक होते. माझी पाठांतर क्षमता , उच्चार आणि आवाजातील जरब पाहून मला सुनील हे मुख्य पात्र मिळाले. तयारी झाली. भरपूर सराव घेतला.आणि 26 जानेवारी रोजी रात्री ठीक 9:00 नाटक होणार होते. आदल्या दिवशी सरांनी रंगीत तालीम घेतली. मला एक फुल पॅन्ट आणि एक शर्ट असे कपडे घालून इनशर्ट करायचे होते. एका मित्राची फुल पॅन्ट मला मिळाली होती आणि दुसऱ्याचे शर्ट मिळाले होते. आदल्या दिवशी मी ते आणणार होतो पण मला घाई झाली. आणि मी शाळेच्याच कपड्यांवर रंगीत तालीम दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजताच आम्हाला तयारीसाठी शाळेत बोलावले होते .सर्व कलावंत जमले होते . माझा मात्र वेगळाच प्रॉब्लेम झाला होता. मला जो शर्ट देणार होता तो मी मित्र अचानक गावी निघून गेला . जाताना 'तो' शर्ट पण घेऊन गेला. मी इतर मित्रांकडे खूप हिंडलो. बरेच शर्ट पण जमा केले पण मला एकही व्यवस्थित बसत नव्हता. आता काय करायचे ? मोठा प्रश्न निर्माण झाला. काय करावे सुचेनासे झाले .अखेर मी नाटकालाच न जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे शाळेच्या मैदानात प्रेक्षकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. सर्व कलाकारांचा मेकअप पूर्ण झाला . सगळे माझी वाट पाहत होते. अखेर दोन शिक्षक घरी आले. माझा प्रॉब्लेम समजून घेतला. पाठीत एक धबाका लगावला. 'हे आधीच का नाही सांगितले' असे विचारू लागले. मला तसाच सोबत घेतला आणि एकाचा फटका सदरा घालून फाटलेला दिसणार नाही अश्या अँगल मध्ये उभे राहत मी भूमिका निभावून नेली. विशेष म्हणजे ते नाटक प्रचंड यशस्वी झाले आणि जवळजवळ पुढचे सहा महिने त्याच नाटकाची सगळीकडे चर्चा होती . तो प्रसंग आठवला तर सर आणि मी पोटधरून आजही हसतो.
एकदा वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या . शेजारच्या शाळेत जावे लागणार होते. त्यासाठी पाचसहा विद्यार्थ्यांनी चांगली तयारी केलेली होती . माझी पण तयारी होती. सरांनी तीनचार वेळा सराव घेतला आणि मला निवडला .सर्वांच्या आशा माझ्याभोवती जमा झाल्या .,सगळेच म्हणू लागले, 'आपल्याच शाळेचा नंबर यायला पाहिजे ' .नकळत प्रचंड दबाव आला माझ्यावर. त्यातल्यात्यात शेवटचा सराव घेत असताना मला वर तिरपे पाहून बोलायची सवय होती. सरांनी सपकन पायावर एक काठी मारून ती सवय चालणार नाही असे सांगितले. आणि व्हायचे तेच झाले.
एकेक शाळा करत आमच्या शाळेचा पुकारा झाला आणि मी उभा राहिलो .समोरच सर बसले होते. मी सुरुवात केली आणि पुन्हा मान तिरकी करून वर बघून बोलायला लागलो. इतक्यात सरांच्या काठीची आठवण झाली. खाली बघ, समोर बघ, वर बघ असे करत करत मला पाठ केलेले भाषणच आठवले नाही. सर्व विद्यार्थी शिक्षक पोट धरून हसले .मी मात्र ओशाळभूत नजरेने शाळेत परतलो आणि पुन्हा सरांच्या काठीचा प्रसाद खावा लागला. आजपासून भाषणाला कधीच जायचे नाही अशी जणू भीष्मप्रतिज्ञाच केली. तो प्रसंग आजही हसवून जातो.
सर्व वर्गात इंग्रजी वाचणारा आणि लिहिणारा मी एकटाच होतो .माझ्या वहीतून पाहूनच सर्व जण गृहपाठ करायचे. असाच एक दिवस माझा एक शब्द चुकला . सरांना नेमका तोच शब्द बघायचा होता. माझा चुकल्यामुळे सर्व वर्गाला छड्या खाव्या लागल्या. पण असे असले तरी बालपणीचा काळ सुखाचा असेच आजही वाटते.
सुधाकर रामदास पाटील
ठाणे
7798963063
srp1672@gmail.com
**~**~**~**~**~**~**~**~**
18) शाळेतील करामती
शिक्षण तसे खेडेगावात झाले. पण शाळा म्हणाल तर कुठल्याही प्रकारच्या प्रगत गावापेक्षा कमी नाही. मोठं मैदान आणि भव्य अशी ती इमारत. भलीमोठी हिरवीगार, डोलदार झाडे. खेळून दमलो की झाडाखाली बसायचं छान मांडी घालून. ११ ते ५ पर्यंत असायची शाळा. मधल्या सुट्टीत कुल्फीवाला असायचा मैदानावर. घरून येतानाच एक रुपया घेऊन यायचा. मग ताव मारला जाई तो अंडा कुल्फी आणि मलई कुल्फी वर. पैसे नसतील तर उधार घ्यायची कुल्फी आणि दुसऱ्या दिवशी पैसे द्यायचे. पण खायचे सोडायचे नाही. अगदी तसंच चिंचा, बोरं विकणाऱ्या आजीचं. शिक्षकांनी पाठ फिरवली फळ्यावर लिहिण्यासाठी की हळूच खिशातून चिंचा आणि बोरं काढायची. चिंचा, बोरं, खट्टी-मिठी इमलीची पाकीटं, लेमन गोळ्या, पार्ले चॉकलेटं हे सारे आवडते शौक. चोरून खाण्यात जी मजा होती ती आता नाही. अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास. कोणाची नक्कल कर ,मस्करी कर , चिमटे काढ, पेन लपव, वही लपव,मुद्दाम पेनाचे टोपण खाली पाड अशी करामत तर रोजच असायची. छान दिवस जायचे. मैत्रिणी बरोबर भांडण पण व्हायचं आणि मग दोन-दोन महिने अबोला असायचा. त्या दोघी बोलत नाहीत हे साऱ्या शाळेला माहिती व्हायचं आणि परत बोलायला लागल्यावर शाळेतले सारेच हसायचे. एकत्र वाचलेली ग्रंथालयातील पुस्तके.मला जे पुस्तक पाहिजे असायचं तेच माझ्या मैत्रिणीला पण हवं असायचं.गोंधळ असायचा नुसता आमचा. बंधन असं नव्हतं.मोकळं वाटायचं फार शाळेत. शिक्षक तर आई-वडिलांसारखेच. चुकलं की छडी आणि चांगले गुण मिळाले की कौतुकाची पाठीवर थाप. त्यावेळी स्नेहसंमेलनाला मोजक्याच मुलांना घेतलं जायचं. मग शिक्षिका त्यांना नसलेल्या तासांमध्ये आम्हाला बोलवून गाणं बसवायच्या. तास बुडाला की दुःख व्हायचं. पण छंद जोपासायचा हे मनी असायचं.पाणी प्यायला एकटं कधी जायचं नाही आणि नेमका तास चालू झाला की आठवण व्हायची पाण्याची. मैत्रिणीला घेऊन जायचं.पाच- दहा मिनिटं तिकडेच. आणि हे सगळं जो विषय आवडत नाही त्यावेळी करायचं. तरी शाळेत मधली सुट्टी, दुपारची सुट्टी अशी दोन वेळा सुट्टी असायची.
गणिताच्या तासाला शिक्षकांनी फळ्यावर गणित लिहायच्या आधीच सगळी मांडणी करून ठेवायची. गणित लिहिले फळ्यावर की फक्त आकडेमोड करायची.कोण पहिल्यांदा गणित सोडवून दाखवेल ह्याची शर्यत असायची. ज्याचं पहिलं व्हायचं तो सगळ्यांना अंगठा दाखवायचा आणि मीच जिंकलो असं भासवायचा.
गजगे, सूर पाट्या, जिबली पाणी खेळण्यात कसा वेळ जायचा ते कळायचं नाही. कधीतरी शाळा बुडवायला पण खूप आवडायची. मग घरी राहिले की वाटायचे उगीच बुडवली जायला पाहिजे होतं. शाळेतच आमची जडणघडण झाली. शिस्त,चारचौघात कसे बोलावे ,वागावे ,सहकार्य ,नेतृत्व इत्यादी गुण शाळेमध्ये इतरांचे अनुकरण करताना, निरीक्षण करताना आत्मसात करत गेलो. पण शाळेतील शिक्षक, मित्र-मैत्रिणी वर्ग माणूस त्याच्या आयुष्यात कधीच विसरत नाही म्हणतात ना ते खरे आहे. तो काळ सतत सगळ्यांना हवाहवासा वाटतो. असं वाटतं 'लहानपण देगा देवा'. परत एकदा रमू दे मला त्या बालपणात आणि माझ्या आवडत्या शाळेत.
"मराठीच्या तासाला समास सोडविताना यायची गंमत
परीक्षेतील गुणांवरून कळायची व्याकरणाची खरी किंमत
हिंदी समजायला नाही लागायचा कस
रविवारी रामायण बघण्यात घेतला जायचा रस
इंग्रजीच्या तासाला स्पेल्लिंग करायला वाटायचं भारी
अन उच्चार करताना जायची मजाच सारी
संस्कृत विषयाची होती ख्याती
सुभाषिते पूर्ण करताना वाटायची भिती
गणिताची उदाहरणे सोडवायला वाटायचे छान
सगळ्यात आधी उत्तर बाईंना दाखवायला वाटायचा अभिमान
विज्ञानाच्या तासाला खेळत होतो विज्ञानी खेळ
टाचण्या एका रेषेत दाखवायला घालावा लागायचा मेळ
इतिहासाच्या तासाला ऐकावी लागायची इंग्रजांची सक्ती
पण डोळे भरुन यायचे ऐकून देशभक्ती
भूगोलाच्या तासाला यायची मजा
वाटायचं बाईंनी कधीच घेऊ नये रजा
पीटीच्या तासाला खेळत होतो खोखो
शिक्षकांनी चला वर्गात म्हटलं की म्हणत होतो नुसतचं हो हो
चित्रकलेच्या तासाला काढत होतो वेगवेगळे चित्रं
रंगसंगतीत आपल्यापेक्षा सरस वाटायचे आपले मित्रं"
प्रिती दबडे,पुणे
9326822998
**~**~**~**~**~**~**~**~**
19) रम्य ते दिवस
कुठे गेले ते दिवस
राहिल्या त्या आठवणी
आज माळा साफ करत असताना एक फोटो दिसला,त्याला पाहून खूपच आनंद झाला .तो फोटो होता सातवीच्या सेंड ऑफ चा.किती वर्षांनी आज ताज्या आठवणी जाग्या झाल्या.
फोटो पाहताना माझा मुलगा म्हणाला आई ही कोण? आणि मला हसू आलं .ही माझी बाल मैत्रीण पूनम .कधीच दात घासायची नाही आम्ही तिला चिडवायचो,ये वासाडे.ती रडायची.हा मन्या डिड फुटाचा खूप मस्तीखोर.हा काळ्या.याला आम्ही डांबर म्हणायचो. ही झिपरी.सर्व काही आठवत होता.
छान होते ते दिवस.
रुसायचो.कट्टी धरायची. मग बट्टी. मजा यायची .झाला गेला राग विसरून जायचो.
शनिवार आला की पळत घरी जायचो, शक्तिमान लागलेले असायचे.गोल गोल फिरायचो.रविवारी रंगोली ,श्री कृष्णा,महाभारत ,हनुमान, बघत बसायचो.जोडीने लपाछपी खेळायचो.किती गम्मत असायची.
गेले ते दिवस..…...
आज बऱ्याच वर्षांनी जेव्हा आपण आपल्या बाल मित्रांना भेटतो तेव्हा खूप बदल जाणवतो.आज सर्व काही बदललंय. आजची मैत्री स्वार्थापोटी तयार झाली.आज कोणी अबोला जरी धरला तरी मानवणारे कोणी नाही.बालपन सुखाचे होते .ना स्वार्थ होता ना कोणाची गुलामी .
आजही झोपळ्यावर बसू वाटते .त्या कच्च्या चिंचा खाऊ वाटतात .बोरकूट पाहिले की तोंडाला पाणी सुटते.बॉबी आधी जशी भेटायची तशी चव लागत नाही.सर्व कृत्रिम झालं.
हे देवा ,एकच विनंती आम्हाला मोठं कर पण आमच्यातील बालपण असेच राहूदे.
निलम गायकवाड, पुणे
**~**~**~**~**~**~**~**~**
20) शाळेतील गमती जमती
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
या उक्तीप्रमाणे लहानपण म्हणजे खरोखर निर्मळ, निरागस असते कारण प्रत्येक गोष्टीचे सर्वत्र कौतुक आणि कौतुकच होत असते. कुठल्याही जबाबदारीचे ओझे नसते. शालेय जीवनात अनेक विनोद घडलेले असतात. खरे तर विनोद आणि शालेय जीवन यांचे समीकरण अगदी घट्ट जुळलेले असते. त्यामुळे शालेय जीवनाकडे आजवरच्या माझ्या जीवनातील वाटेवर मागे वळून पाहिले तर विनोद सर्वप्रथम शाळेतील आठवतात. यातील काही अविस्मरणीय असतात. इतरांप्रमाणेच माझ्याही जीवनात काही अविस्मरणीय विनोदाचे क्षण आहेत. त्यातील काही मांडण्याचा प्रयत्न करते.
इयत्ता पाचवी शिकत असताना माझ्या एका नातेवाईकांचा मृत्यू झाला. म्हणून आई आणि वडील तातडीने रात्री गावी गेले. मी आणि माझी थोरली बहीण दोघेही घरीच होतो. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून मी आंघोळ केली व तयार झाली. त्यानंतर माझी बहीण आंघोळीसाठी गेली. मी लवकर लवकर शाळेची तयारी केली व माझी सकाळी शाळा असल्यामुळे शाळेत घाईघाईने निघाली. रस्त्यात कोणीही दिसत नव्हते. असेही मी दररोज सकाळी पायीच शाळेत जात होती कारण शाळा तीन मिनिटांच्या अंतरावर होती. रस्ता अगदी सुनसान दिसत होता मला असे वाटले कि मला उशीर झाला आहे म्हणून रस्ता सुनसान आहे. शाळेत जवळ गेली तर शाळेचे गेट बंद, मग मात्र मला धक्काच बसला. जवळच असलेल्या वॉचमनकडे मी गेली तर वॉचमनच्या घरालाही कुलूप होते. रस्त्यात चालताना सारखा पाय पडत होता, मी जरा खाली वाकून पायाकडे पाहिले तर एक स्लीपर माझ्या आईची घातली होती व एक स्लीपर माझी होती. आईची स्लीपर उंच टाचेची असल्यामुळे सारखा पाय घसरत होता, पण मी लक्ष दिले नाही, शाळेच्या गेटवर आल्यावर माझी चूक लक्षात आली व मला खूप हसू फुटलं. शाळेच्या बाजुला दुकान होती त्या दुकानदाराने मला ऐकूनच म्हटलं अग बाई आज रविवार आहे हे तुझ्या लक्षात नाही का? मग मात्र मला हसावं की रडावं हेच समजत नव्हतं. मी लगेच धावत-पळत घरी गेली, बघते तर काय माझ्या बहिणीने माझा शोध घ्यायला सुरुवात केली होती. तिने घराला कुलूप लावलं व माझ्या सर्व शालेय मैत्रिणींकडे मला शोधण्यासाठी निघाली. रस्त्यात जाताना जो मिळेल त्याला ती विचारत होती की तुम्ही मेघा ला पाहिलं का? माझे आई-वडील गावाला गेले आहेत आणि ती सकाळीच कुठे गेली ते सांगून गेली नाही म्हणून मी तिचा शोध घेत आहे. ती माझ्या वर्गातल्या आठ ते दहा मैत्रिणींकडे माझा तपास करण्यासाठी गेली. प्रत्येक वेळी एक एका मैत्रिणीची की त्याच्या वाढ होत गेली आणि सर्व ग्रुपच्या ग्रुप पुढच्या मैत्रिणीकडे माझा शोध घेण्यासाठी गेल्या. त्यामुळे दहा ते बारा जणांचा मोठा घोळका जमला आणि सर्वत्र माझा शोध सुरु झाला. माझी ताई एवढ्यावरच थांबले नाही ही तर ती माझ्या शिक्षकांकडे सुद्धा गेली त्यांना सुद्धा विचारले ती शाळेत जादा तास घेतला होता का? कारण माझी बहीण सकाळी शाळेच्या वेळेपासूनच घरातून बाहेर पडली आहे.
मी घरी कुलूप पाहून ताईच्या मैत्रिणीच्या घरी गेली व माझ्या ताईचा तपास करू लागली. पण तपास काही लागेना. कारण ती मला शोधत होती ना . रस्त्यात माझ्या आईच्या मैत्रिणीचे घर लागले तिला मी सर्व काही सांगितले तिने मला तिच्या घरी थांबवले व खायला दिले माझे रडणे थांबले . आज पासून चाळीस वर्षांपूर्वी मोबाईल सारखे सुविधा नसल्यामुळे तात्काळ कोणाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सगळीकडे गोंधळच गोंधळ सुरू होता .मी माझ्या ताईला शोधत होती तर माझी ताई मला शोधत होती. सायंकाळी आई-वडील आले व माझी माझी ताई माझ्या सर्व मैत्रिणी सहित अत्यंत व्याकूळ तेने माझी वाट पाहत होते आणि तेव्हाच मी घरी गेली मला पाहून सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला, पण पण प्रत्येकाने मला नाना प्रश्न विचारले. माझ्या पायातली विजोड चप्पल, माझा शाळेचा गणवेश, माझा घाबरलेला भेदरलेला चेहरा पाहून सर्व मला विचारपूस करायला लागले की तू कुठे होतीस? आम्ही सर्व तुला शोधत होतो? मग मी त्यांना सांगितले की आज रविवार असल्याचे माझ्या लक्षात नव्हते म्हणून मी सकाळी लवकर लवकर उठून माझे आवरून चुकून आईची एक चप्पल पायात घालून शाळेत गेली होती पण शाळा बंद असल्यामुळे मी परत घरी आली बघते तर घरी कुलूप, मग मी ताईच्या मैत्रिणीकडे गेली. मग सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आणि हसून हसून पुरेवाट झाली. तेव्हापासून आज पर्यंत मला सर्वजण रविवारची आठवण करून देतात. अगदी शाळेतील प्रत्येक शिक्षकांपर्यंत चं नाही तर वर्गातील सर्व मुला मुलींनपर्यंत, गल्लीतील लहान मोठ्यापर्यंत, बाहेरगावी असलेल्या नातेवाईकां पर्यंत ही गोष्ट ज्ञात झाली. म्हणून मला सर्वजण आवडीचा व सवडीचा रविवार असे म्हणून ओळखू लागले. ही गोष्ट मी मी कधीही विसरू शकत नाही. अगदी आजही रविवार असला की माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहतो, आणि आणि माझी हसून हसून पुरेवाट होते. एक वेगळेच चैतन्य निर्माण होतं.
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार .
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
**~**~**~**~**~**~**~**~**
21) '.....आणि मी शाळेत जाऊ लागलो'
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."
एके ठिकाणी ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं. 'शाळा'दोन अक्षरी शब्द पण किती भव्यता, व्यापकता आणि गोड आठवणींचा खजिना!!!खरोखर शाळेचे ते दिवस आठवले की,कितीतरी जुन्या आठवणींना उजाळा मिळतो..... शिस्तीवरून गुरुजींकडून खाल्लेली बोलणी, एकमेकांना टोपण नावांनी मारलेली हाक,त्यावरून झालेली भांडण, घरच्याच बागेतील आणि शेतातील आंबा,चिंच,बोरे ,हुरडा, काकड्या यांसाठी मित्रांबरोबर केलेले चोर्य काम....घरच्यांनी पकडल्यावर खाल्लेली बोलणी.....खेळतांना लागल्यावर घरी माहीत होऊ नये म्हणून जखमेवर मातीचीच केलेली केलेली मलम पट्टी अशा कितीतरी आठवणींमध्ये शाळेच्या गमती जमती सामावलेल्या आहेत.बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात तो काही उगीच नाही......शाळा म्हटलं की, सगळ्या जुन्या आठवणींना एकदम उजाळा येतो व त्या एका चित्राप्रमाणे डोळ्यांसमोर उभ्या राहतात. आज शालेय शिक्षण पूर्ण होऊन जवळ जवळ २५ -३० वर्षाचा कालावधी उलटून गेला. तरी आठवणी मात्र अगदी ताज्या वाटतात.
इयत्ता 4 थी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि पुढोल शिक्षणासाठी मला शेजारीच असलेल्या नडगाव येथील किसान हायस्कुल येथे पाठविण्यात आले.५वी ला नवीन शाळेत हायस्कुल ला जायला मिळणार,दररोज पैसे मिळून आपल्याला वडापाव ,समोसे या सारखे पदार्थ खायला मिळणार (हायस्कुलला जाणाऱ्या जुन्या मुलांनी अगोदरच तसं चित्र निर्माण केलं होतं) प्रत्येक तासाला नवीन शिक्षक असणार म्हणून मनातून खूप खुश होतो.
शाळेचा पहिलाच दिवस होता. पहिलाच दिवस असल्याने पहिल्या तासाला थोडी फार ओळख परेड झाली..नडगावसह आजू बाजूच्या जवळपास 10/15गावाची मुले तिथं यायची. सर्वांच्या ओळखी करत पहिले दोन तास असेच संपले. तिसऱ्या तासाला काहीतरी अभ्यास देऊन शिक्षक दुसऱ्या कोणत्यातरी कामाला निघून गेले. आम्ही पंचक्रोशीच्या अनेक गावांतुन आलेल्या मुलांनी.....हळू हळू करता करता संपूर्ण वर्गच डोक्यावर घेतला.आमचा इयत्ता 5 वी चा वर्ग अगदी ऑफिसच्याच बाजूला असल्याने मुख्याध्यापक धावत वर्गात आले.ते वर्गात आल्या बरोबर वर्गात सगळे चिडी चूप बसले....त्या काळी इंग्रजी हा विषय पाचवीपासूनच होता त्यांनी सरळ सरळ इंग्रजी विषयालाच हात घातला....आणि 'कोणा कोणाला A, B, C, D ....बोलता येते?'असा प्रश्न केला.मी पहिल्याच बेंचवर त्यांच्या समोर बसलेला होतो.अभ्यासात जरा बऱ्यापैकी असल्याने आणि जिल्हा परिषद शाळेत आम्हाला शिकवायला असणारे शिक्षक आमच्याच घरी रूमवर राहात असल्याने शिक्षकांविषयीची भीती फारशी मनात नव्हती....मी पटकन माझे बोट वर केले....बाकी वर्गात नजर फिरवली तर माझ्या शिवाय कोणाचेच बोट वर नव्हते.मनोमन मी खरे तर सुखावलो होतो....! मग काय मुख्याध्यापकांनी मला उभं राहून A, B, C, D ... बोलायची संधी दिली.मी M, N च्या पुढे चाललोच होतो तर मला सरांनी अडवलं आणि M चा उच्चार 'यम' नाही तर 'एम :असा करायचा असं सांगितलं!!मी पुन्हा A, B, C, D ... बोलायला सुरुवात केली.. पुन्हा सरांनी 'यम' नाही एम असं बोलायला सांगितलं.मी खेड्यातला विद्यार्थी त्यात इंग्रजी कशाशी खातात याचे काहीही ज्ञान नसलेला आणि शिवाय बोलण्यातील ढबही थोडी ग्रामीण त्या 'यम' चा एम असा उच्चार जमेना....इकडे सरांचा पारा चढला आणि पहिल्याच बेंचवर असल्याने त्यांचा 'हतोड्या' सारखा हात दोन चार वेळा गालावर पडला.... मला फक्त मुलांच्या हसण्याचा गालावरच्या 'सपकन' पडलेल्या आघाताचाच तेव्हढा आवाज आला.माझी सर्व गात्र बधिर झाल्यागत वाटली....गोरा गोमटा असल्याने गालावर सरबरीत बोटे दिसत होती!! 'बाकीच्या मुलांना येत असूनही त्यांनी आपली बोटे का वर केली नाहीत' याचा उलगडा झाला....आमचे 'ते' मुख्याध्यापक अत्यंत कडक शिस्तीचे होते....हे मुलांकडून मला समजलं.....!!शाळा सुटली गाडीची वाट न बघता धावतच घराकडे निघालो...!घरी गेल्याबरोबर माझा अवतार बघून बाबांनी काय झालं आहे हे विचारण्यापूर्वीच मी 'उद्या पासून शाळेत जाणार नाही' .....असं सांगितलं. तो पर्यंत काय झालं आहे हे साग्र संगीत सांगायला माझे बाकीचे मित्र आमच्या घरी आलेच होते!!बाबांनी सगळं ऐकून घेऊन मला जवळ घेतलं....आणि सांगितलं मी' तुमच्या मुख्याध्यापकांचा खाडे विद्यालय,शहापूर येथील विद्यार्थी असून 'त्यांच्या'मारण्यांनीच मी देखील 8वीला असतांना शाळेला राम राम ठोकला होता'मला जरा हायसे वाटले..... 'पुढच्या वर्षी तुला शहापुरच्या शाळेत पाठवीन ,यंदाचं वर्ष काढ...'अशी समजूत घालत त्यांनी माझी रवानगी शाळेत केली.'ते 'सर वरच्या वर्गांना शिकवत असल्याने पुन्हा वर्षभर आमच्या वर्गावर आले नाहीत....'
वर्ष संपलं आणि मी शाळा बदलण्याचा तगादा बाबांच्या पाठी लावला...आणि माझा इयत्ता सहावी साठीचा प्रवेश खाडे विद्यालय शहापूरला झाला. मला जरा बरे वाटले....'चला
सुटलो एकदाचा..' पण नियतीला ते मान्य नसावे पहिल्याच दिवशी शाळेत गेलो....आणि तिसऱ्या तासिकेला इंग्रजी शिकविण्यासाठी 'ते'सर माझ्या समोर उभे ठाकले.माझ्या सोबत त्यांचीही बदली 'खाडे विद्यालयात' झाली होती....आता मात्र माझी पाचावर धारण बसली....घरी गेल्याबरोबर 'बाबांना'ही गोष्ट सांगितली. दहशत इतकी बसली होती की,दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याच्या वेळीच माझं पोट दुखू लागलं....हे दुखणं दररोज 'शाळेत 'जायच्या वेळी वेग वेगळ्या रुपात वाढू लागलं. मग बाबा माझ्या नकळत शाळेत जाऊन आले....सरांना भेटून त्यांना सांगितलं---'तुमच्या दहशतीने मी शाळा अर्धवट सोडली.....आता माझ्या मुलावर ती पाळी येऊ देऊ नका.... तुमच्या दहशतीने तो शाळेत यायला तयार नाही.दुसऱ्या दिवशी सकाळीच सर मला घ्यायला घरी आले.... त्या दिवसा पासून थेट पुढील शिक्षणात 'त्या'सरांनी खूप मदत केली....त्यांच्या मुळेच आज मी खऱ्या अर्थाने उभा आहे.....!!
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
**~**~**~**~**~**~**~**~**
22) लेख
बालपणीची शाळा
लहानपण दे गा देवा
मुंगी साखरेचा रवा ||
ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार ||
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी आठवताच बालपण डोळ्यासमोर उभे राहते.अत्यंत निरागस,हासरं,खोडकर,निस्वार्थी,दगड,माती,झाड यांच्या सोबत रमणार.सकाळच्या सूर्याच्या प्रकाशाने उठणार व दिवसभर सैरावैरा धावून संध्याकाळच्या मावळत्या सूर्याबरोबर शांत होऊन आईच्या कुशीत झोपणार.आईच्या प्रेमाने,वात्सल्याने दिवसागणिक फुलणार बालपण कधीच संपू नये असं वाटायचं.हळूहळू काळाबरोबर शरीर बदललं आणि वयही वाढत गेल.वयाची सहा वर्षे पूर्ण झाल्याचा अंदाज आईने बांधला.माझा बाळ शाळेत जाण्या योग्य झाला.असा निश्चय तिने करून टाकला.वडिलांच्या मागे तगादा लावला.याला गुरुजीकडे घेऊन जा व शाळेत नाव दाखल करा.शाळा म्हणजे काय? हे कधी माहीतच नव्हतं. कारण वयाच्या सहा वर्षापर्यंतच आयुष्य चार भिंतीच्या बाहेरच्या मोकळ्या जगात मुक्तपणे संचार करणार होतं.एके दिवशी वडील सकाळीच आईला म्हणाले,याला स्वच्छ आंघोळ घालून चांगले कपडे घालून दे.याला शाळेत घेऊन जातो.याचे नाव शाळेत टाकूनच येतो.मी म्हणालो बाबा मी नाही शाळेत जाणार.मी आईसोबत शेतात जाणार आहे. बाबा म्हणाले तू शाळेत गेला तर,तुला नवीन पाटी व लेखणी घेऊन देईल.नवीन पाटी अरे वा! मी उड्या मारतच उठलो. आईने अंघोळ करून तयारी करून दिली.वडिलांचे बोट धरून शाळेत पोहोचलो.धोतर टोपी घातलेले गुरुजी शाळेत होते.वडिलांनी त्यांच्याकडे बोट करुन लांबूनच दाखवले.ते बघ गुरुजी तुला रोज शाळेत लिहायला वाचायला शिकवतील.गुरुजी म्हणजे शाळेचे मुख्य असतात.सगळे गुरुजीला घाबरतात.या गोष्टीची जाणीव त्यावेळेस नव्हती. वडिलांबरोबर गुरुजीच्या कार्यालयात शिरलो.वडिलांनी गुरुजीला सांगितलं गुरुजी याचे नाव शाळेत टाकायचे आहे.किती वर्षाचा मुलगा झाला गुरुजी ने विचारले.सहा वर्ष पूर्ण झाले असेल याला.जन्मतारीख नाही आठवत.गुरुजी म्हणाले कानाला हात लाऊन दाखव.पुरतो का ते बघुदे.मी माझा उजवा हात डोक्यावरून घेतला व जोऱ्यात ओढून कसाबसा डाव्या कानाला लावला.गुरुजीने ते बघितले ठीक आहे म्हणून शाळेत नाव दाखल करून घेतले.त्या दिवसापासून शाळेला सुरुवात झाली.अनेक मुलांशी ओळख झाली.दैनंदिन जीवनच बदलून गेले.सकाळी एकदा शाळेत गेलो की सायंकाळी परत घरी यायला मिळायचे. दिवसभर शाळेतच राहावे लागायचे.अ आ इ म्हणत शिक्षणाला सुरुवात झाली.उजळणी,गाणी,गोष्टी यात मन रमून गेले.हळूहळू शाळा,गुरुजी याविषयी स्नेह वाढत गेला.आजही आठवते ती पाटीवरची मक्याची सुगडी व थंडीच्या दिवसात सकाळी मिळणारे गरम गरम दूध.त्या दुधात टाकण्यासाठी घरून चुपचाप साखर न्यायची मज्जा काही वेगळीच होती. कारण गोड खाऊ नये म्हणून आई नेहमी ओरडायची.शाळेत असतांना अनेक खोडकर गोष्टी केल्या पण त्यामागे वाईट हेतू कधीच नव्हता. 1993 ला किल्लारीचा भूकंप झाला होता.त्यावेळी प्रथमच भुकंप म्हणजे काय? ते कळाले.त्यात अनेक लोक मरण पावले. त्यांना मदत द्यायला आपण गावातून प्रभातफेरी काढुया असे गुरुजींनी सांगितले.त्यावेळी मी कागदी बॉक्समध्ये पैसे मागत मागत गावभर फिरलो होतो.आजही आठवतो आयुष्यातील सर्वात समजुतदारपणाचा तो दिवस.माझ्या शाळेच्या जवळच नदी वाहत असे.एके दिवशी सकाळी खूप पाऊस पडला.व नदीला खूप पूर आला.दुपारच्या सुट्टीत मुले एकमेकांना म्हणू लागली नदीला खूप पूर आला आहे. मी काही मित्रांनसोबत नदीच्या काठावर जाऊन पूर पाहत बसलो.खूप वेळाने एक मुलगा आला आणि म्हणाला तुम्हाला गुरुजींनी लवकर बोलावले.ते शब्द ऐकताच एकदम ध्यानावर येऊन शाळेकडे पळत सुटलो.शाळेत येतात सरांनी फटके दिले.आज ते फटकेआठवले की हसायला येते.इयत्ता चौथीची वार्षिक परीक्षा जवळ आली होती.मी आईकडे परीक्षेसाठी पॅड घेऊन देना म्हणून तगादा लावला होता.घरची परिस्थिती बेताचीच.त्यात आम्ही चौघे भावडं होतो.त्यामुळे पॅड घेऊन देणे शक्य नव्हते.जोपर्यंत पॅड घेऊन देणार नाही. तोपर्यंत शाळेत जाणार नाही.अशी प्रतिज्ञा मी करून टाकली.त्यादिवशी आईच्या मागे शेतात फिरत राहिलो. शाळेत गेलोच नाही.दुसऱ्या दिवशी मात्र पॅड तर मिळालाच नाही.पण आईने बेदम मारले व शाळेत नेऊन घातले.त्यादिवशी वडिलांनी दुकानातून एक रुपयाचा चिमटा विकत आणला.व दुकानदाराकडून कागदी पुठ्ठा मागून घेतला.त्याला व्यवस्थित पॅडच्या मापाचे कापून त्याला चिमटा लावला. तो पॅड मला दिला.त्यावर मी चौथीची परीक्षा दिली.पुढे आयुष्यात अनेक पॅड मिळाले व अनेक परीक्षा दिल्या.पण त्या पॅडची आठवण आजही मनात तशीच घर करून आहे.शेवटी काही दिवसांनी निकाल लागला.मी पास झालो.व गावातील माध्यमिक शाळेत पाचवीत प्रवेश घेतला.बालपणीची शाळा सोडावी लागली.या शाळेने लिहायला वाचायला शिकविले.याच शाळेने आदर,प्रामाणिकपणा शिकविला.याच शाळेने मेहनत,कष्ट करण्याची जिद्द मनावर कोरली. जीवनात उंच भरारी घेण्याचे बळ पंखात या शाळेने भरले.पुढे आयुष्यात जी काही उंच भरारी घेतली.त्या भरारी मागे प्रेरणा बनून होती ती बालपणीची शाळा.आयुष्यात जेव्हा केव्हा शिक्षण व परिस्थिती ची आठवण येते.तेेव्हा मला आठवत राहते ती माझ्या बालपणीची शाळा.
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलडाणा
9823425852
rajendrashelke2018@gmail.com
**~**~**~**~**~**~**~**~**
23) *शाळेतील गमती जमती*
शाळेतील गमती जमती म्हटलं की, आठवण येते जेव्हा आपण शाळेत जात होतो त्यावेळची. आपला तो शालेय अनुभव कसा होता त्याची नक्कीच आठवण होते.
माझ्या लहानपणीचे शिक्षण विचित्र प्रकारे झाले. कारण मला शिक्षणाची बिलकुल आवड नव्हती. आणि आई-बाबा शाळेत पाठवायचे. शिकणारा विद्यार्थी मग शाळेतून पळ काढणे, मुलांना मारणे, माझे धंदे सुरू झाले शाळेच्या लगत असलेल्या बाजारात मी पळ काढत होतो काही वेळेला तर शाळेतील विद्यार्थी आठ-आठ दहा-दहा विद्यार्थी येऊन मला पकडून आणायला माझा झुला तयार करून ते शाळेत घेऊन जायचे आणि गुरुजी मग चांगली बत्ती बसवायचे आणि मग नंतर मी बोंबलायला लागलो की मला खाऊ द्यायचे कधी चॉकलेट द्यायची कधी बिस्किटे द्यायची महाराष्ट्र सरकार त्यावेळेस रवा वाटत होती ज्या पद्धतीने आज खिचडी वाटप होते आपल्या शाळेत त्या पद्धतीने आधी रवा येत होता तो मला देत होते. आणि शाळेत शिक्षणासाठी मला चांगलं समजवायचे पण मी कुठे ऐकायला गेलो?
मला आठवते मी चौथ्या वर्गात होतो तेव्हा आमच्या बाईने मला गुणाकार करायला दिले मी चुकलो त्यावेळेस छडीने चार पाच वार मला मिळाले तेव्हा इतका राग आला की माझ्या हातावर लाल लाल छडीची ओर पाहून मी शाळेतून पळ काढला चालू वर्गातच मी बाहेर जाऊन एक दगड आनला आणि मॅडमला मारायला आलो तेव्हा त्या मॅडम मुख्याध्यापक काकडे धावत-पळत गेल्या आणि माझी कम्प्लेंट केली आणि मग त्यांनी मला पकडून पुन्हा मार दिला. नंतर माझ्या बाबांना बोलवून गुरूजींनी माझ्या बद्दल सर्व सांगितले. त्यानंतर माझ्या बाबांनी मला झोडपत घरी घेऊन गेले.
गंमत आहे पाचव्या वर्गाची माझं एका सहाव्या वर्गातील मुलासोबत भांडन झालं. तो होता बी.डी.ओ. चा मुलगा. माझ्या हातून त्याचा शर्ट फाटला होता. त्याने माझे गराणे मुख्याध्यापकांकडे सांगितले. तेव्हा ते ही घाबरले की माझ्या साहेबांचा मुलगा घरी जाऊन सांगितले तर साहेब माझ्यावरच रागावतील म्हणून त्यांनी माझे शर्ट त्याला घालायला दिले होते आणि मला शंभर ऊठबश्या लावायला लागल्या.
मी सातवीत असतांना माझ्यासोबत एक सरदारजी चा मुलगा शिकत होता. त्याला एक दिवस आणि भुताचा बाजार दाखवला. तोही मोठ्या आवडीने भूत कसा असतो हे पाहण्यासाठी आमच्यासोबत मैदानात आला. मातीत गड्डा तयार केला खाली पोकळी ठेवून एका काडी वर रेती आणि नंतर त्याला दोन्ही हात डोळ्याच्या जवळ ठेवून पाहायला सांगितलं आणि त्याला म्हंटल की आता तुला भूत नाचतांना दिसणार पोरगा भूत पाहण्यासाठी आमच्या सोबत घेऊन बसला आणि त्या काडीला एकीकडून मारून त्याच्यावर असलेली जी वाळू होती ती त्याच्या डोळ्यात घुसली आणि तो नंतर बोंबलायला लागला आम्ही पळ काढला आणि त्याला चिडवत होतो भूत दिसला भूत दिसला म्हणून. पण या नंतर त्या मुलाला आपल्या डोळ्याचा ईलाज डॉक्टर कडे करावे लागले. त्या वेळी आम्हाला म्हणजे तीन मुलांना शिक्षकांनी उलटा लटकवून खालून मिर्ची ची धूनी दिली. ते दिवस आजही कायमचे आठवतात.
अशा अनेक घटना शाळा शिकत असताना झाल्या आहेत. शाळेतून घरी जाताना आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागत होता. कारण घरून शाळेत आणि शाळेतून घरी जात असताना मित्रांसोबत एकमेकांना मारणे त्यांची टिंगल करणे यातच वेळ जात होता. आमच्यापैकी एखादा मुलगा कधी पिक्चर पाहून आला तर आम्ही आपल्या तासिकांना चाट मारून त्याच्याशी कमीत कमी चार ते पाच तासिका नुसती त्या सिनेमाची स्टोरी ऐकण्यामध्ये घालत होतो.
शाळेच्या गमतीजमती मध्ये विद्यार्थ्यांसोबत केलेली मस्ती दंगा माणसाच्या आयुष्यात कधीही न विसरणारे क्षण असतात. आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी काढल्या तर अशा सर्व आठवणी येतात. मुलींचे आकर्षणाचा भाग असो, हायस्कूलमध्ये शिकत असताना आम्ही नंबर मिळो किंवा नको पण प्रत्यक्ष खेळात भाग घेत होतो आम्हाला त्या खेळामुळे बाहेर जायला मिळे. त्यामुळे शाळेपासून दोन चार दिवस वेगळे राहायला मिळत होते. व्यक्तीच्या जीवनात गमतीजमती नसतात तेव्हा जीवन हे निरर्थक असते लहानपणीच का आताही कितीतरी गमती जमती यामध्ये दररोज येत असतात मुलांच्या गमती जमती पण आमच्याशीचं निगडित असतात आणि आपणच एक गंमत होऊन जातो.
_________________________
*महेंद्र सोनेवाने, गोंदिया*
तह. जिल्हा - गोंदिया
**~**~**~**~**~**~**~**~**
24) धमाल गंमती जमती शाळेच्या
एक दोन तीन चार
आमच्या शाळेची पोर हुशार
पाच सहा सात आठ
सगळे आमचे पाढे पाठ
अस म्हणतच आमची शाळा सुरू व्हायची. चांदेकर गुरुजी वर्गात आले की एक साथ नमस्ते म्हणायचो गुरुजी हजेरी घ्यायचे
जो आदल्या दिवशी आला नाही त्याला कोंबडा व्हावे लागे बाकीचे त्याला मस्त फिदीफिदी हसायचे
गुरुजी मग छान कविता शिकवत ती कविता नाचून म्हणायचो आम्ही ,हे चालू झाले की ज्याला कोंबडा केला तो आमच्यात सामील होत असे कविता संपल्यावर कोणीतरी आठवण करायचा गुरुजी ह्याचा कोंबडा सुटला गुरूजी म्हणायचे का रे
आता बुडवशील का शाळा नाहीतर दिवसभर कोंबडा व्हावं लागेल मग शाळा बुडवणारा बहाद्दर म्हणायचा एवढया वेळेस माफी करा ना आत्ता नाही पुन्हा घरी राहणार तेवढ्यात दुधाची घंटा व्हायची रांगेत दुध घेण्यासाठी आम्ही हातात ग्लास घेऊन वर्गाबाहेर पडायचो तेव्हा प्रत्येक जण घरून ग्लास आणत असे मला दूध म्हणजे नावडीची गोष्ट होती पण चांदेकर गुरुजींसमोर नाही म्हणायची कोणाची हिम्मत होती?
मग जिथे शक्ती चालत नाही तिथे युक्ती वापरायची असे गुरुजींनी सांगितलेले कसे विसरू आम्ही
त्यावेळी मी ग्लास म्हणून एक मोठा प्लास्टिक ग्लास आणत असे बाहेरून प्लास्टिक कोटिंग आणि आतून स्टील असा तो ग्लास होता ,दिसायला मोठा असा तो ग्लास पण दूध मात्र अर्धाच ग्लास मावायचे. ग्लासभर दूध मी घेतले म्हणजे गुरुजी खुश आणि अर्धाच ग्लास दूध मिळाले म्हणून मी खुश.पण फार काळ हा आनंद टिकला नाही कुणीतरी पिन मारलीच गुरुजींना मग काय एक दिवस रांगेत उभी असताना गुरुजींनी हातातील ग्लास घेतला आणि म्हणाले मला तुझा ग्लास खूप आवडतो आज तू माझा ग्लास घे मी तुझा घेतो मग काय
युक्ती फसली ना हो गुरूजी म्हणाले आजपासून मी तुझ्याच ग्लासने दूध पिणार आणि तू माझा ग्लास वापरायचा काय चालेल ना? नाही म्हणून कुणाला सांगता गुरुंजीसमोर बोलायची कुणाची हिम्मत होती.आता गुरुजींचा राग यायला सुरुवात झाली होती तो राग आता शब्दात व्यक्त होत होता आता मी त्यांना जाडे गुरुजी म्हनायला सुरुवात केली होती काय म्हणता तोंडावर बोलायचे नाही हो तोंडावर बोलायची काय बिशाद. हो आम्ही मुले मधल्या सुट्टीत किंवा गुरुजी ऑफिसमध्ये काही कामानिमित्त गेले तर चिडवायचो मागे.अभ्यासात मी चांगली असल्याने माझी निवड मॉनिटर म्हणून झाली गुरुजी रजेवर असले किंवा काही कामासाठी ऑफिसमध्ये गेले की
वर्ग शांत राहील याची जबाबदारी माझी कोणी गोंधळ घातला की नाव टिपायचे आणि मग वर्गात गुरुजी आले की त्याचा बेत बघायचे .वर्गात एक मुलगा नेहमी गोंधळ घालायचा आणि नेहमी मार खायचा एक दिवस त्याने वर्गात चिंचा आणल्या आणि सर्व मुलांना वाटल्या मला मात्र त्याने चिंचा दिल्या नाही सर्वांना चिंचा खाताना पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले मी त्याला म्हणाले गण्या मला देना चिंचा तसा तो म्हणला ए पळ ए तुला देत नसतो काही चिंचा बिंचा हा गण्या माझं नाव टिपतीस रोज मला मला मार बसतो आता बस तशीच.सर्व मुले चिंचा खात होती आणि मी सर्वांकडे बघत होते , गण्याने सर्वांना दम दिला होता कुणी हिला चिंचा दिल्या तर त्याला परत काहीच मिळणार नाही त्यामुळे मला कोणीच चिंचा दिल्या नाही .गण्या म्हणायचा मस्त चिंचा आहेत भो तुला पाहिजे का पण माझं नाव नाही टिपायच बोल हाय का कबूल तरच चिंचा तुझ्या,आता झाली
माझी पंचाईत चिंचा तर पाहिजे
पण नाव नाही टिपलं आणि वर्गात गण्याने गोंधळ घातला तर गुरुजी आपल्यालाच बोलतील, पण शेवटी गुरुजींच्या पुढे काय करणार मला काही चिंचा नाही मिळाल्या नाही पण गण्याला पुन्हा मार बसला.आता मला गुरुजींचा तर गण्याला माझा राग येत होता .एक दिवस गण्याला मार्ग सापडला मार चुकवण्याचा
मी गुरुजींना जाडे गुरुजी म्हणते हे गण्याला माहीत झालं बस मग काय मग गण्याला दहा हत्तीचं बळ आलं धिंगाणा घालायला मग मि टीपल गण्याचं नाव गण्या जोरात म्हनाला टीप टीप माझं नाव
मी पण गुरुजींना सांगीन तुझं नाव
मी म्हणाले मी काय केले माझं नाव सांगायला तू गुरुजींना जाडे गुरुजी म्हणतीस ते सांगील मग मग तुला मार ,आता मात्र माझी चांगलीच पंचाईत झाली मला लगेच रडू कोसळलं माझा रडण्याचा आवाज वाढतच गेला
वर्गात गोंधळ सुरू झाला गुरुजी वर्गात आले जोरात ओरडले काय रे काय चाललंय कसला गोंधळ आहे सगळे चिडीचूप गण्या हसत होता आणि मी रडत होते गण्याने तोंड उघडलं , गुरुजी वर्गातले पोर तुम्हाला जाडे गुरुजी म्हणतेत मग काय गण्याने सर्वांची नावे सांगितली आता सर्व घाबरले सर्वांना आता गुरुजी प्रसाद देणार, सगळे लागले रडायला
गुरुजींनी सगळ्यांना उभे केले
एकाची तर आधीच भीतीने पॅन्ट ओली झाली पोरींनी हे रडायचे सूर काढले आता कसं होणार काहींनी हातावर थुंकी लावली म्हणजे छडी बसली तर आग कमी होईल ना, गुरुजींनी हाताची घडी घातली आणि बोलले काय रे मी जाड्या काय बर कुणासारखा जाड आहे मी सांगा बर गुरुजींच्या या प्रश्नाने सगळे बुचकळ्यात पडले.प्रश्न गुरुजींनीच सोडवला
अरे पोरांनो माझं गोलगोल पोट कुणासारखं वाटत सांगा बर
एक मुलगा म्हणाला गुरुजी त्या आकाशातल्या चंद्रासारखे .गुरुजी म्हणाले अगदि बरोबर अरे म्हणून तर माझे नाव चांदेकर काय माझं नाव सांगा बर,मग मुले म्हणाली चांदेकर गुरुजी अरे मी जाड चंद्रासारखा गोलगोल म्हणून चांदेकर काय आनि रडणारे सर्व मुले हसू लागली.
आमच्या शाळेची सहल निघाली निमगाव गांगर्डे धरण पाहायला
आम्ही घरून मस्त डबा घेतला
आणि आनंदाने निघालो. मी पहिल्यांदा एवढं मोठं पाणी पाहिलं आणि मला तर चक्कर आली धरणातील पाणी पाहून
मी घाबरले आणि खाली बसले
गुरुजी जवळ आले काय झालं ग
मी म्हणाले गुरुजी मला नाही बघायचं धरण बिरण मला भीती वाटते गण्या म्हणलं ए भित्री भागूबाई कशाला आली ग मग उड्या मारीत सहलीला बसायचं ना घरी .गुरुजी म्हणाले गण्या तुला नाही भीती वाटत तर तो म्हणाला गुरुजी मला पवायला येतंय मग कशाला घाबरू मी.
गुरुजी म्हणाले शाब्बास .गण्या तर हवेतच गुरुजी आज पहिल्यांदा गण्याला शाब्बास म्हणाले होते गुरुजींनी मुलांना रांग करायला लावली आणि एक नंबरला आज गण्या होता मुले धरणाची भिंत पाहण्यासाठी चालू लागली, मी मात्र बसून होते पाण्याची भीती वाटल्याने मला काही उभे राहवेना मला आता सहलीचा आनंद घेता येणार नाही
या कल्पनेने मी निराश झाले पण
गुरुजींनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले चल आज धरण दाखवतोच तुला आणि गुरूजींनी कडेवर उचलून घेतलं मला आणि चालू लागले गुरुजींच्या कडेवर होते त्यामुळे मी काही धरणाच्या पान्यात पडणार नाही याची खात्री होती मला .गण्या ओरडला ए बाबो हिला तर कडेवर घेतलं गुरुजींनी चला आता सगळेच धरण पाहू. माझी पाण्याची भीती गेली आणि मला वाटणारी गुरुजींची भीतीही गेली सहल अविस्मरणीय झाली.
सहलीचा मॉनिटर आज गण्या झाला होता.
1मेला आमचा निकाल लागला मी वर्गात पहिली आली गुरुजींनी अभिनंदन केले मला खूप आनंद झाला इतका की चपला वर्गातच विसरल्या आणू मी धावतपळत घरी सांगायला पहिला नंबर आला म्हणून.शाळेतील अजून महत्वाची गंमत म्हणजे माझ्याच नावाची आणखी एक मुलगी आमच्या वर्गात होती आणि विशेष म्हणजे आम्ही पक्क्या मैत्रिणी होतो
आज मागे वळून पाहिल्यावर अजून पुन्हा त्याच वर्गात बसवेसे वाटते पण तेवढीच धमाल आज येईल का पुन्हा ते सवंगडी भेटतील का तेच गुरुजी लाभतील का आम्हाला.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
सविता वि साळुंके
salunkesavita42@gmail.com
श्रीरामपूर
**~**~**~**~**~**~**~**~**
25) शाळेतील गंमतीजमती
शाळा...... या शब्दातच लहानपणापासूनच गोडवा, शाळेत शक्यतो कधीच सुट्टी न मारणार मी विध्यार्थी.
शाळेतील गमती जमती सांगितले तितके कमीच असतात, पण त्यातील मी वर्ग 8 वि ते 10 वीच्या काही थोडक्यात गोष्टी सांगू इच्छितो..!!
तस लहान पण म्हणजे पहिली ते सातवी गावातच जिल्हा परिषद मध्ये खूप छान आनंदात,मजाक मस्ती मध्ये गेला ,, कारण कसली अक्कल नसताना काही पण करत जाणे आणि त्यातून खूप काही शिकणे या सारखी मजा कुठे, असच काहीस बालपण म्हणजे सातवी पर्यंत झालं.
पण मग आठविला प्रवेश करायचं होतं, तीन शाळा ऑपशन मध्ये असल्याने मनात थोडं गोंधळ सुरू होता, माझ्या इतकेच थोडंफार हुशार मित्र तालुका शाळेत शिकायचे ठरवले व आम्हच्या एक मॅडम ने मला पण आग्रह केला,, पण एकदम खास जवळीक मित्र गावच्या शाळेत असल्याने आपलं जीव थोडंफार इथेही असायचा,,, यामुळे मी थोडा काँफुजच होतो, पण म्हणतात न "दोघात तिसरा, आता सगळे विसरा" . असाच काही तरी अनुभव माझ्या जीवनात आलं,, एक आम्हचे रेलटिव्ह शिक्षक आम्हच्या घरी येऊन बसले. ते आले मला काहीच माहिती नव्हते, आले त्याच दिवशी घरच्यांची परमिशन ने माझी ऍडमिशन आपल्या शाळेत करण्याकरिता माझे सर्टिफिकेट घेऊन गेले,, ती शाळा म्हणजे आम्हच्या गावावरून किमान 30 किमी, होती,, आणि तिथे वस्तीगृह असल्याने तिथे राहूनच शिकायचं होत,, घरी आल्यावर मला हे सर्व कळाल, खूप विचार करू लागलो,, आपले सर्व मित्र मंडळी इकडे, आपण तिथे कुणासोबत असणार, आणि अगदी लहानवयातच घर सोडल्यामुळे थोडं घाबरटपणा मनात होत.
काही दिवसांनी शाळा सुरू झाले , माझं पहिला दिवस बाबांनी मला सोडण्या करीता माझ्या सोबत शाळेत आले,, कारण आई बाबाला सोडून कधी एक दिवसाठी गावाला न जाणार मी आता आईबाबा व कुटूंबाला सोडून बाहेर राहायच होत.. वडीलाच्या मनात ही खुप सारी भीती दुःख, पण ओठावर खोटेपणाच हसू आनून छान राय अस सांगून ते निघून गेले,
पहिल्यांदा नवीन वर्गात म्हणजे 8 वित गेल्याने सर्व शिक्षक आले की सर्वात पहिले सर्वांचं विचारपुस करायचं, विचाराने थोडं फार हुशार असल्याने तेव्हाच कळलं की आपल्यासारखेच सर्वच मूल या शिक्षकासाठी नवीनच आहे ..
मग पहिल्या दिवशी मूल काहीशे कमी असल्याने वर्गात येणारे प्रत्येक शिक्षक बेसिक म्हणजे सातवी पर्यंतचे काही प्रश्न घ्यायचे, पण मला नवल वाटायचं की त्यातील सर्व प्रथम उत्तरे मी द्यायचा.. मग काही दिवसातच मी सर्व शिक्षकाच्या नजरेत येऊन गेलं, आणि शेवटून दुसऱ्या नंबरच्या बेंच वर बसणारा मी पहिल्या बेंचवर सरांनी निवड केली कळलंच नाही. आता त्या वर्गातील हुशार व्यक्ती म्हणून माझी नेमणूक झाली,, वर्गाची शिक्षिका कॅप्टन म्हणून म्हणून माझं नाव घेतली पण मला पहिले पासूनच या गोष्टीत काही इंटरेस्ट नसल्याने मी ते नाकारलं,, व त्यामुळे वर्गात चिट्टी टाकून मग निवडणूक घेण्यात आली..
सांगायचं खूप काही छान छान आहे पण sorry time अपुरा असल्याने ठीक आहे इतकंच, थोडं कामात होत, त्यामुळे, वाटलं तर निकालास ग्राहय नाही धरले तरी चालेल..!
कु. महेंद्र संगावार
**~**~**~**~**~**~**~**~**
26) "लहानपण देगा देवा खडीसाखरेचा मेवा" खरंच! लहानपण खूप सुखद असते.मी शाळेत असताना माझ्या बऱयाच आठवणी आहेत,आणि अजूनही त्या आठवतात,आम्ही मुंबई स्थित रहात होतो,आमची शाळा
15-20मिनिटांवर होती. शाळेत मी व माझी भावंडे आई सोबत जायचो.प्राथमिक शाळेत बाई व गुरूजी फार काळजी घ्यायचे.पालकांना भेटायला बोलवायचे.
रीजल्ट दिवशी तक्रारी सांगितल्या जायच्या.आमच्या शाळेजवळ एक बाग होती,मधली सुट्टी झाली की मुले त्या बागेत पळायची, कुणाला खाण्या पिण्याची चिंता नसे,नुसते जणू माकडे!मग माळी काठी घेऊन यायचा आम्हांला मारायला मुले त्रास देतात म्हणून शाळेत,तक्रार माळी करायचा,हे ऐकून शाळेने सूचना काढली की,मधल्या सुट्टीत कोण जर त्या बागेत दिसले तेर त्यास शिक्षा होईल,झालं... माळ्याने त्या वेळेत कुलूप लावायला सुरुवात केली,सगळेच वांदे आम्हा बापड्यांचे!
शेवटी काही दिवसांनी बागेत जाळी होती,कुंपण होते,त्या खालून गपचूप जायचो, मस्त झुला,घसरगुंडी,फुलपाखरं शोधायची धावायचे,असे उपक्रम सुरू झाले,माळी दिसला की पळायचे, त्यात खरचटलं जायचे,पण या आनंदा पुढे काय,एक दिवस माळीने पकडले,शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक या समोर उभे केले,आणि सर्वांनी कबुल करून घेतले की,पुन्हा यायचे नाही.
माझे वर्गशिक्षक गुरुजी होते,त्यांनी बरेच समजावले,त्यांनी मला विविध स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त केले, त्यांची अजूनही आठवण येते,मला ते या जगात नसतीलही,त्यांनी मार्गदर्शन केलेले अजूनही आठवते.
सुजाता जाधव
नवी मुंबई
**~**~**~**~**~**~**~**~**
27) लेख
शाळेतील गमतीजमती
लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा
असे बालपणाविषयी बोलले जाते.लहानपण सर्वांना आवडते.त्याचप्रमाणे शाळा आहे.आपण मोठे होतो.पण शाळेच्या आठवणी नेहमीच ताज्या असतात.
मला माझी शाळा मनापासून आवडते.लहानपणी मी कन्या विद्या मंदिर नं.१ मध्ये शिकत होते.इयत्ता पहिली ते सातवी आम्ही बालमैत्रीणींनी खूप मजा केली.ते दिइआजहघ आठवले की मन हर्षोल्हासित होऊन नाचू लागते. माझ्या वर्ग शिक्षिका सौ.डिग्रजे बाई होत्या.तेंव्हा आम्ही बाईच म्हणायचो.कीती गोडवा आह त्या शब्दात!!! आम्ही पाचसहा जणांचा एक ग्रुप होता.मी बाईंच्या मैत्रीणीची मुलगी म्हणून असेल,कींवा थोडी हुषार, आगाऊ जास्त असल्याने असेल माझ्यावर बाईंचे सतत लक्ष असे.त्यामुळे आपसूकच बाकीच्या मुलींही माझ्या भोवती भोवती असत.आम्ही वेगवेगळ्या खेळात तरबेज होतो.सर्व स्पर्धांत भाग घ्यायचो.एकमेकांच्या घरी जाऊन दंगामस्ती करायचो,पालकांचा काव खायचो,पण काही बदल होत नव्हता.
शाळेत गरीब मुलीही होत्या. कधीतरी त्यांना परीस्थिती मुळे काही वस्तू मिळायच्या नाहीत. त्यावेळी आमच्या ग्रुपतर्फे त्यांना आम्ही थोडे थोडे पैसे काढून त्यांना हवी असलेली वस्तू कींवा फी भरायला मदत करायचो.तेंव्हा खूप छान वाटायचे.मग त्यापण आमच्या खेळात सामिल व्हायच्या.सातवीनंतर आठवघ ते दहावीला हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मग आमचा दंगा काय विचारता. खेळाच्या तासाची आम्ही आतुरतेने वाट पहायचो.एकदा का बेल झाली की सुसाट मैदानावर... कायकाय कीती खेळ खेळायचो ..बापरे..एक तर असा होता, आमच्या शाळेच्या मैदानावर ट्रक्टरची ट्राली उभी असायची.पाठशिवीचा खेळ त्यावर आम्ही खेळायचो.एकटी पाठ लागली की बाकीच्या पळायचो.फक्त पळायचो नाही तर त्या ट्रक्टरच्या वर चढायचो.मैत्रीण शिवायला आली की लगेच दुसऱ्या बाजूने उतरून ट्रक्टरच्या खालच्या बाजूने परत वर चढायचो.तेही अगदी लिलया.कसं जमतं होतं कुणास ठाऊक.
कुणीतरी एखादी वस्तू आणली तर सर्वजण त्याचा उपयोग करायचो.एखादे नवीन फळ आणले कुणीतरी तर चिमणीच्या दातांनी सर्वजण कुरतडायचो.आता कीळस वाटते ना ? पण तेंव्हा असले भाव मनातच येत नव्हते. अगदी निरागसतेने हे सर्व चाललेले असायचे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की कघ मीळेपर्यंत आम्ही गप्प बसत नव्हतो.वर्गात विद्यार्थीनी प्रतिनिधी मीच असल्याने मी सांगेल तेत बाकीच्या करायच्या अर्थात आवडीने.हं !! मी कधीच कुणावरही कुठल्याही गोष्टींची जबरदस्ती केली नाही. सगळे गोडीगुलाबीने रहात असू.
शाळेत असताना सर्व खेळ खोखो,कबड्डी, लपाछपी, शिवाशिवी, कींवा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असूदे सर्वात सहभागी होत असू.एकदा " सुंदर ते ध्यान, उभे वीटेवरी" हा डान्स आम्ही बसवला होता.प्रत्यक्ष स्टेजवर आम्ही वारकरी, पांडुरंग इ.ची वेशभूषा करुन तल्लीन होउन नाचत होतो.तेंव्हा एक बाई स्टेजवर येउन पांडुरंगाच्या व आमच्या पाया पडून गेली.खूप छान वाटले तेंव्हा.टाळ्यांचा गजर अजून मला ऐकू येतो.
एक दिवस भाषण करायचे होते.मी पाठ केले नव्हते.शिक्षिकांनी माझे नांव पुकारले. मी म्हटलं, " माझं पाठांतर झाले नाही." त्या म्हणाल्या, " कख नि केलं? जेवढं केलयं तेवढं तरी बोल,उठ " मी उठले स्टेजवर गेले पण भाषण काही आठवेना. सुरवात केली.सगळ्यांची नावं घेऊन झाली. पण पुढे काय ? मला एक शब्द आठवेना. मराठी भाषा सोडून कन्नड ,इंग्रजी भाषा आठवायला लागल्या. रडू येतयं का काय असं वाटत होतं.शेवटी शिक्षिकेंनी रागानेच ये खाली म्हटल्यावरच सुटका झाली. तेंव्हापासून आजपर्यंत तसा अनुभव कधीच आला नाही कारण मी आधी तयारी करायची असते हे लक्षात ठेवले होते.
पण आता ते शक्य नाही. फक्त गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी एवढचं म्हणू शकतो.व पुन्हा बालपणात रमून जाऊ शकतो.खरंच रम्य होते बालपण .बालपणातील शाळा व शाळेतल्या आठवणी, गमतीजमती.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
**~**~**~**~**~**~**~**~**
सर्व लेख वाचन केल्याबद्दल आभारी आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें