सोमवार, 20 अप्रैल 2020

रोज एक लेख :- दुसरा दिवस

 *साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- दुसरा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 20 एप्रिल 2020

वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5

*विषय :- माणसात दिसला देव*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~

 *माणसांत दिसला देव*

नगर जिल्ह्यातील , कर्जत श्रीगोंदा व जामखेड हे तालूके  सदा दुष्काळ ग्रस्त , अवर्षण ग्रस्त . दारिद्रय हे त्यांच्या पाचवीलाच पुजलेले .   शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प . आरोग्याची हेळसांड ,   पोटभर जेवण मिळण्याची मारामार .!  सर्वत्र पसरलेला अज्ञानाचा अंधकार ! अशा या तमाला छेदीत एक आशेचा किरण   , जामखेड शहरात आला
 . ते बहुधा १९७० साल असावे .  *डॉ . रजनीकांत आरोळे व डॉ . मेबल आरोळे* या डॉ. दांपत्यानी जामखेड च्या बाजार तळावर एक छोटेखानी क्लिनीक सुरू केले  दोघांनीही परदेशात आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले .  
  दोघांनीही परदेशात राहून रोज लाखोंनी पैसा कमावला असता . पण  उभयतांनी जामखेड सारख्या अवर्षण ग्रस्त भागातील गोर गरीबांची सेवा करण्यासाठी हा भाग निवडला .
  रोग झाल्यावर औषधोपचार करण्या पेक्षा रोग होउच नयेत  म्हणून करायच्या प्रतिबंधात्मक उपायांवर त्याचा भर होता .      सुरवातीला होतकरू , सुशिक्षित व तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी केली .  माझे भाग्य की मी या कार्याचा एक भाग होतो .
 प्रत्येक खेड्यात , प्रत्येक गावात आम्ही भजनी मंडळ , तरुण मंडळ , महिला मंडळे स्थापन केली . गावांतील  सांडपाण्याच्या गटारगंगा रस्तोरस्ती वाहात होत्या . ठिकठिकाणी "शोषखड्डे" घेऊन गावातील रस्ते स्वच्छ केले .    त्या काळी महाराष्ट्रात  अशिक्षित पुरुष व महिलांचे प्रमाण जास्त  होते . डॉ . आरोळे साहेबांच्या " ग्रामिण आरोग्य प्रकल्पाने"" त्यांच्या साठी प्रौढ शिक्षण वर्ग चालू करुन त्यांना अक्षर ओळख करून दिली .   परसबागा तयार करुन  दिल्या .   हे झाले प्रतिबंधात्मक उपाय .  पण क्षयरोग व कुष्ठरोगा सारख्या  रोगांनाही , सर्वेक्षण , निदान आणि उपचार या त्रिसुत्री च्या माध्यमातून ते रोग आटोक्यात आणले . अंधत्वावर मात करण्यासाठी लाखो मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत केल्या . ज्यांना काही कारणांमुळे अपंगत्व आले त्यांच्या साठी मोफत  कृत्रीम अवयव बसऊन दिले   ज्यांना पाय नव्हते त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले . काहीही मोबदला न घेता . हे सर्व लिहित असताना एक संस्कृत श्लोक आठवला , 
 *मुकं करोती वाचालम पंगू लंघयते गिरीम* 
*यत्कृपा त्वहंम वंदे प्रमाणे नंद माधवम* .

 त्यांनी मुक्या माणसांना बोलतं केलं , आंधळ्याला डोळे दिले , पांगळ्यांना पाय दिले .
 आज ज्या "आशा " कार्यकर्त्या देशभर  आरोग्य सर्वेक्षणाचे काम करताना दिसत आहेत ती  देणगी डॉ. आरोळे साहेबानीच देशाला दिली आहे .  आय ए एस , आय पी एस अधिकारी देखील अभ्यासासाठी ग्रामिण आरोग्य प्रकल्पात येत असत.
    डॉ. आरोळे साहेबांनी अनेकांचे संसार उभे केले .   या कामाची पावती म्हणून जगद्विख्यात " *रॅमन मॅगसेसे पुरस्कार* "त्यांना मिळाला . भारत सरकारनेही *पद्मश्री* पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं .  
त्यांच्या पश्चात आज  त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरच ग्रामिण आरोग्य प्रकल्प जामखेड काम करीत आहे . डॉ . रजनीकांत व डॉ . मेबल आरोळे यांचे पुत्र रवी आरोळ सर व डॉ . शोभा आरोळे मॅडम यांनी  "कोरोना "बाधीत रुग्नांना काॅरंटाईन करण्यात पुढाकार घेऊन  १००  खाटांची सोय केली  व राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवला.  डॉ . रजनीकांत आरोळे यांच्या भगिनी  रत्नाताई कांबळे व त्यांचे पुत्र जयेश यांचे योगदान ही तितकेच महत्वाचे आहे .
 योगायोग असा की  कुष्ठरोग पर्यवेक्षक  म्हणून माझी सेवा निवृत्ती ज्या गावी झाली . ज्यांनी मला कुष्ठरुग्णांच्या सेवेची दिक्षा दिली  त्या माझ्या दैवताचे गांव राहूरी होते .   त्यांच्या गावी त्यांच्या चरणी मी माझी सेवा अर्पण केली .
‌      पुराण कथेत वर्णन केलेले देव तर तुम्ही ही पाहिले नाही व मी ही पाहिले नाही  ज्यांनी मला माणसात आणलं लाचारीला लाथ मारुन स्वाभिमानाने जगणं शिकवलं त्या  ग्रामिण आरोग्य प्रकल्पाच्या डॉ . रजनीकांत आरोळे या  अवलियात मला देव दिसला.   दरिद्री नारायणाची निस्वार्थ सेवा करणारा हा फकीर  माझ्या सारख्या हजारो लोकांचा देवच होता .
‌*अरविंद कुलकर्णी पुणे*
~~~~~~~~~~~~~~~
माणसात दिसला देव

2020 या नवीन वर्षाला सुरुवात झाली.संपूर्ण देशवासीयांनी नवीन वर्षाचे आनंदात स्वागत केले.याच नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोव्हीड 19 कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.हळूहळू कोरोनाने इटली, अमेरिका अशा अनेक देशांत पसरायला सुरुवात केली.जगात कोरोना संकट थैमान घालत आहे.या संकटात भारता सुद्धा ओढावला गेला. संपूर्ण देशाला या संकटापासून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.राज्य सरकार व केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.भारत हा एक कुटुंब आहे.आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते. त्याचप्रमाणे देशाची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक राज्य शासन व केंद्र शासन घेत आहे.भारताच्या पंतप्रधानांनी सुरुवातीला 21 दिवसांसाठी व नंतर 18 दिवसासाठी संपुर्ण भारत देश लाॅक डाऊन केेला.कोरोना या विषाणूची कुठेतरी साखळी खंडित व्हावी यासाठी हे लॅाक डाऊन.प्रत्येक नागरिकांनी या काळात घरात थांबून देशाला सहकार्य करावे.असे आवाहन भारताच्या पंतप्रधानांनी केले.अर्थात ते प्रत्येकाच्या जिवित्वाच्या दृष्टीने फायद्याचे होते.जेव्हा जेव्हा देशावर संकटे येतात.तेव्हा देशातील अनेक माणसे पुढे येतात.स्वतःचे कुटुंब, कुटुंबातील सदस्य यांचा विचार न करता देशाच्या संकटाला हातभार लावण्यासाठी स्वतःची बाजी लावतात. यावेळेस सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या देशातील डॉक्टर्स,परिचारिका,वाॅर्ड बॉय, पॅथॉलॉजी डाॅक्टर,दवाखान्यातील सफाई कामगार, मेडिकल असोसिएशनचे कर्मचारी,पोलिस अधिकारी,पोलीस कर्मचारी बांधव, मीडिया,पत्रकार,अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी,कामगार बांधव पुढे आलेले आहे.या संकटावर मात करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहे.यामध्ये स्वतःच्या जिवाचा कुठेही विचार नाही.त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबाचा,कुटुंबातील सदस्यांचा आई-वडिल, पत्नी,मुले यांचा विचार न करता.देशातील प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक नागरिकासाठी 24 तास हे सर्वजण झटत आहे.कोरोना सारख्या विषाणूची लागण होऊ नये.म्हणून प्रत्येकाने स्वतःला घरातच बंद करून घ्यायचे आहे.असे आवाहन सरकार व प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.परंतु या संकटाला सामोरे जात असताना स्वतः मात्र काळजी घ्यायला पुरेसा वेळ त्यांना नाही.याच काळात लोकांच्या रक्षणासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिवस-रात्र उभे आहे.राज्यात संचारबंदी लागू केली असताना सुद्धा लोक काही काम नसताना घराच्या बाहेर पडत आहे. यावेळी पोलिस बांधवांनी त्यांना अडवले.त्यांची चौकशी केली.त्यांना समजावले तर अनेक माणसातील अविचारी राक्षस याच बांधवांना विरोध करत आहे.पोलिस बांधवांना शिवीगाळ,मारहाण करत आहे.हे अतिशय निंदनीय कृत्य आहे.अनेक डॉक्टर्स आपण चुकीचे समजतो. वेळप्रसंगी शिवीगाळ करतो.मारहाण करतो.पण हेच डॉक्टर्स व त्यांचा संपूर्ण मेडिकल स्टाफ आज अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी रात्रंण दिवस झटत आहे.स्वतःच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे देशातील प्रत्येक व्यक्तीला वाचवण्यासाठी दवाखाना व मेडिकल यंत्रणेतील सर्वजण अतोनात प्रयत्न करत आहे. याचबरोबर देशातील संपूर्ण घटना,प्रत्येक हालचाल,नविन सुचना,उपाययोजना आपल्याला घरी बसून कळाव्या यासाठी मीडिया कर्मचारी व पत्रकार बांधव कोरोनाचा धोका पत्करून देशातील प्रत्येक गल्लीबोळात उभे आहेत.व प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे.याचबरोबर सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहासाठी अत्यावश्यक लागणाऱ्या गोष्टी किराणा, भाजीपाला,बँक,पेट्रोल पंप या ठिकाणी कार्यरत असणारे सर्व बांधव कोरोनाचा धोका पत्करून हजर आहेत.आजच्या घडीला भारतातील सर्व मंदिर,मशिद, चर्च,गुरुद्वार,बौध्द विहार,देरासर आज बंद आहे.पण खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या संरक्षणासाठी मंदिर,मशिद, चर्च,गुरुद्वार,बौध्द विहार,देरासर यातील देव डॉक्टर्स,नर्स, मेडिकल स्टाफ,पॅथॉलॉजी डाॅक्टर,पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी,पत्रकार, मीडिया,दवाखान्यातील सफाई कामगार,अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी बांधव यांच्या रूपाने जनसामान्यांसाठी झटत आहे.याक्षणी देवळातील देवा पेक्षा या माणसातील खरा देव ओळखण्याची गरज आहे. म्हणून प्रत्येक भारतीयांनी या माणंसातील देवाला सहकार्य केले पाहिजे.यांच्याप्रती ऋण व्यक्त केले पाहिजे.संकटातून भारत लवकर बाहेर पडेल.

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु.पो.किनगाव राजा 
ता.सिंदखेड राजा जि.बुलढाणा मो.न.9823425852
rajendrashelke2018@gmail.com

~~~~~~~~~~~~~~~
मानसात दिसला देव...

अस म्हणतात की ,या सृष्टीवर देव तर कना कनात आहे.   मग माणसात का नाही? माणसात सुद्धा देव आहे... तो तेव्हा दिसतो जेव्हा माणूस चांगले कर्म करतो. 
               ऐकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही एक कौटुंबिक सहल काढली होती. ठिकाणे तशी दुर दुर ची होती. मी तेव्हा साधारण 10 वर्षांची असेल. खुप कडाक्याचे उन होते. आणि जास्त तर देवस्थान निवडली होती.मग निघली आमची सवारी आनंदात... 
               आम्ही एका ठिकाणी दर्शनाला गेलो.  तिथे पाणी माञ मिळत नव्हते.  जरा डोंगरावर होते ते ठिकाण... उन्हाने जीव लाही लाही झाला होता आणि देवळात जायचे म्हणाल्या वर चप्पल थोडी नेऊ शकतो. आता मला इतकी तहान लागली होती की ,मी रडायला च लागले होते... दर्शन तर झाले पण खाली जायला अजुन अर्धा तासा पेक्षा जास्त वेळ लागला असता.  मी तिथेच देवळात खाली बसले... आणि मी पाहिले की खालुन एक थकलेली म्हतारी देवळाकडे येत आहे. मला काही वेळ आश्चर्य वाटले की इतकी वृद्ध बाई वर कशी आली असेल... ती वर आली देवळात जाऊन दर्शन घेतलं आणि आमच्या जवळ येऊन बसली.  तिच्या जवळ एक बाटली होती जिला बाहेरून पोताडयाचा कपडा लपेटला होता.  पाहताच वाटलं किती थंड पाणी असेल यात..... जरा वेळ थबकुन ती आईला म्हणाली," पोरे  लेकरं बाळ संग आसतानी एकाधी पाण्याची बाटली संग ठिवावा लागती" माझ्या अंगावरून हात फिरवत म्हणाली,"बघ लेकरू उनानी कसलं सुकून गेलय..." मग तिने तिच्या जवळची बाटली दिली आणि म्हणाली, " पि बाय पाणी..."  माझा तर जिवच फुलुनी आला... आणि मी ति सगळी बाटली पाणी पिऊन टाकले... मग काही वेळाने आम्ही उठुन खाली निघलो. पण माझ्या मनात विचार आला कि,'देवाच्या दारात असुन जीव तडफडत होता. पण ती आलेली म्हतारी मला देवा पेक्षा तरी कमी वाटत नव्हती.....
 मला मानसात दिसला देव.....

कु दिपाली राऊत, उस्मानाबाद
~~~~~~~~~~~~~~~
*जनसेवा हीच ईश्वरसेवा*

संत गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनातून आणि जनजागृती करताना लोकांना नेहमी म्हणत असे की, देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, दगडात देव नसून ते माणसात आहे. म्हणून अनाथ, गरीब आणि दारिद्र्याच्या खाईत असलेल्या गरजुना मदत करा. पण त्यांच्या बोलण्याकडे सहसा कोणी लक्ष दिले नाही. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात स्वछता किती महत्वाची आहे ? हे समजवून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबीकडे देखील कोणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र आज प्रकर्षाने संत गाडगेबाबा यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आठवत आहेत आणि बाबा किती खरे बोलत होते हे आजच्या लॉकडाऊनमध्ये पटत आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारत सरकारने देखील संचारबंदी लागू करून संपूर्ण देश लॉकडाऊन करून टाकले. त्यामुळे सर्व काही बंद करण्यात आले. तिरुपतीचे बालाजी मंदीर, शिर्डीचे साईबाबा मंदीर, पंढरपूर चे विठ्ठलाचे मंदीर तसेच इतर अनेक लहानसहान मंदीर बंद करण्यात आले. त्यात देऊळ, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा ही सर्व प्रार्थनास्थळ देखील भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली. खरे तर संकटकाळात देवच मदतीला धावून येतो पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली की, देवांना देवळांत बंद करून ठेवावे लागले. याच ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होते हे लक्षात घेऊन ही प्रार्थनास्थळे ताबडतोब बंद करण्यात आले ते खूपच चांगले झाले. संत गाडगेबाबा यांचे म्हणणे होते की देवळात जाऊ नका हे लोकांना पटले आणि पूर्ण झाले. दगडात देव नाही तर ते माणसात आहे याची प्रचिती देखील यानिमित्ताने झाली आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वत्र काम बंद झाले होते तेंव्हा हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाची खरी पंचाईत सुरू झाली. कामच नाही तर पोटाची खळगी कशी भरावी ? हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. अश्या बिकट प्रसंगी सेवाभावी संस्था आणि समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन या गरीब, अनाथ आणि असहाय लोकांना अन्नधान्य तसेच जेवण वाटप करण्याचे काम केले. काही लोकांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरघोस अशी मदत देऊन आपली मानवाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. सरकारने देखील या लोकांना जगविण्यासाठी अनेक प्रकारे मदत केली. विदेशात या विषाणूने जो हाहाकार माजविला त्यापेक्षा जास्त भारतात त्याचा स्तोम वाढू शकला असता. पण रोग पसरण्यापूर्वी संचारबंदीचा नियम लागू केल्यामुळे सर्व काही आटोक्यात आले. लोकांचे रोजगार बुडाले, अनेक उद्योगधंदे डबघाईला आले तरी देखील जीव वाचविणे महत्वाचे आहे म्हणून सर्व लोकांनी नियमांचे पालन करून देशाला सहकार्य केले. कोरोनापेक्षा भुकेने जास्त लोकं मरतात की काय अशी शंका वाटताना अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्यामुळे गरीब लोकांचे प्रश्न सुटले, एवढे मात्र खरे आहे. नेमकं याच काळात रक्ताचा तुटवडा जाणवू लागले त्यावेळी अनेक युवकांनी आणि सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर आयोजित करून रक्ताच्या पाकिटाचे संकलन केले. विज्ञानाने आजपर्यंत अनेक संशोधन करून शोध लावले असले तरी प्रयोगशाळेत रक्त तयार करू शकले नाहीत. रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होऊ शकते, म्हणून रक्तदान करणे अत्यंत महत्वाचे आहे. 
या बिकट प्रसंगात आपल्या जीवाची काळजी न करता ज्यांनी दिवसरात्र काम केले आणि या विषाणूचा खरा प्रतिबंध केला ते म्हणजे पोलीस, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, सफाई कामगार आणि पत्रकार. हे सर्व खरोखरच देवांचे दूत बनून गेल्या तीस दिवसापासून दिवसरात्र राबत आहेत. खरा सॅल्युट या सर्वांना. खराखुरा देव या सर्वामध्ये दिसून आला. खरंच आहे कोणत्या दगडात हा देव वसलेला नसून माणसामध्ये देव वसलेला आहे. प्रसंगानुरूप या माणसाच्या सेवेतच खरा देव आहे. इंग्रजीत एक वाक्य आहे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. माणसाची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. माणसाने दानशूर व्हायला पाहिजे. मरणानंतर आपल्या सोबत सत्ता, संपत्ती, लेकरं हे काही येत नाही. हे सर्व इथंच सोडून जावे लागते. म्हणून असलेल्या संपत्तीचा योग्य वापर करून लोकांची सेवा करण्यात खरी धन्यता आहे. 

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769
~~~~~~~~~~~~~~~
 या कोरोनाला हरवू...

लहानपणी एक वाक्य ऐकायला मिळाले. ते जसेच्या तसे आज ही माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जसेच्या तसे कोरलेले आहे, ते म्हणजे माणसाची प्रगती कोण रोखू शकते? त्याचे उत्तर होते ‘माणूसचं.’ आज देखील तशीच स्थिती आपल्या समाजात घडताना दिसते आहे. संपूर्ण जगाला कोरोना या विषाणूने कवटाळले आहे. दिवसेंदिवस हा विषाणू मोठ्या प्रमाणात फोफावताना दिसत आहे. हा विषाणू कोणाची जात, धर्म, पंत, वंश, गरीब, श्रीमंत अथवा कोणत्या देशाचा व्यक्ती आहे हे पाहून वार करत नाही. परंतु या विषाणूला कशा प्रकारे रोखू शकतो. त्यासाठी संपूर्ण जगभरातील विविध शास्त्रज्ञ अभ्यास करून उपाययोजना शोधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.
आपल्या देशात देखील कोरोना विषाणूचा काही दिवसात मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत हा प्रसार फारच कमी आहे. परंतु आपल्या देशात आणखी मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूपासून बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू नये. यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत. त्याला जनतेने सहकार्य करणे आवश्यक आहे. शासन स्तरावर ज्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यापाठीमागे अनेक शास्त्रीय कारणे असतात. अनेक तज्ज्ञ व्यक्ती त्यावर काम करत आहेत. त्या व्यक्ती कोणी बाहेरच्या नाहीत आपल्याच देशातील आहेत. कदाचित आपल्या घरातील, परिसरातील, गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील आहेत हे विसरू नका. त्याचा अभिमान बाळगायला हवा. 
लॉकडाऊन केल्याचा फायदा पुढील उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
जंगलात जेव्हा वणवा पेटतो. तेव्हा सगळे प्राणी सैरावैरा पळायला लागतात. सगळीकडे नुसती पळापळ चालू असते. त्यामध्ये वाघ, सिंह, चित्ता, माकड इत्यादी चपळ प्राणी वाऱ्याच्या वेगाने पळत सुटतात. परंतु वणवा मात्र कुणालाच सोडत नाही, संपूर्ण जंगल भस्मसात करून सोडतो. सर्व प्राणी जळून खाक होतात. पण तुम्हाला माहीत आहे काय? त्याच जंगलात असा पण एक प्राणी आहे. ज्याला वणव्याचा अजिबात फरक पडत नाही. त्याला थोडी देखील इजा पोहचत नाही. डोकं चक्रावले ना.. तर होय, त्याच जंगलात असा पण एक प्राणी आहे. ज्याला जंगलातील वणव्याचा काहीही फरक पडत नाही. तो प्राणी म्हणजे ‘उंदीर’ होय. कारण जेव्हा वणवा पेटतो, तेव्हा तो त्याच्या घरात म्हणजे बिळात असतो. म्हणून त्याला जरा वणव्याची इजा पोहचत नाही.
कोरोना रुपी वणवा सध्या आपल्या मानवी जंगलात पेटला आहे. आपल्याला वाघ, सिंह, चित्ता होऊन काही फायदा नाही. त्यापेक्षा उंदीर व्हा आणि आपल्या (बिळात) घरात रहा. स्वतःला आणि आपल्या परिवाराला, समाजाला, देशाला सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करा.
रविवारी आपल्या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेणबत्ती, दिवा लावण्याचे आव्हान केले आहे. त्यांच्या या आव्हानाला अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आरे एवढा पण प्रधानमंत्री यांचा द्वेष करू नका. प्रधानमंत्री काय देशाचे दुश्मन नाहीत. 
सगळं जग पुढं गेलं. ६००००+ मृत्यू. महासत्ता अमेरिका सुद्धा ५०००+. पुढारलेले युरोपियन देश सुद्धा हजारांत, तेलवाले आखाती देश सुद्धा त्रस्त व भयभीत झाले आहेत. आख्या जगात मृत्यूतांडाव सुरु आहे. भारत मात्र अजूनही १००च्या आतच आहे.
हे यश नाही तर काय? 
जागतिक आरोग्य संघटना आहे. तिच्या प्रवक्त्याने प्रेस काँफरेन्समध्ये सांगितले आहे. भारताचे कोरोना विरोधात प्रयत्न चांगलेच नाहीत तर तुलनेने सर्वात उत्तम आहेत.
अनेकांनी ' प्रधानमंत्री म्हणजे समस्या', हेच चित्र रंगवले आहे. पण आज कोरोनाला 'प्रधानमंत्री' उत्तर आहेत. प्रधानमंत्री काय आहेत, हे सर्वांना दिसतं आहे. प्रधानमंत्री द्वेषाने प्रश्न सुटणार नाही. दिवे लावल्याने पण नाही.
दिवे लावण्याचे लगेच विशेष फायदे नाहीत हे खरं आहे, पण त्याचे तोटे पण नाहीत. मात्र मानसिक फायदे आहेत. हा एक प्रयत्न आहे सामाजिक अभिप्रेरणेचा प्रयोग आहे. आता आपल्याकडे काय इतर साथींप्रमाणे दरवर्षी कोरोना येत नसतो, मग परफेक्ट उपाय कसे करणार? काही लहान मोठे प्रयोग करून पाहायला हरकत काय? काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात जंगल पेटलं. ऐतिहासिक संकट त्या देशावर आलं. त्यांनी काय केलं माहितीये का? सगळे लोक एकत्र येत देवाला सामूहिक प्रार्थना केली. कडक उन्हाळ्यात पाऊस पडला व आग विझली. हा प्रयोग होता. पण केलाच ना प्रयोग आणि तो यशस्वी झाला.  
दिवाळी करतो ना आपण? आपल्या मागच्या पिढ्यांनी दिवे पेटविण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ते मनाला आनंद देतात, सामूहिक प्रेरणा देतात, मन उत्साही करतात. आज अख्खा देश घरात बोर झालाय. मिळू द्या ना उजेडाचा थोडा आनंद लोकांच्या मनाला. थोडासा दिवाळीसारखा आनंदी फिलिंग. लोकांचे मन प्रसन्न झाले तर आता येत्या जागतिक महामंदीच्या काळात त्यांचे निर्णय योग्य होतील. कोरोना संकट तर हरणारच आहे. जे अमेरिकेला व आख्या युरोपला नाही जमले ते आपला भारत करणार बघा.
ताब्लिकीनी आगाऊपणा करून कोरोना देशात आणखी पसरवला नसता तर आतापर्यंत प्रशासनाने कोरोनाला बराच कॉन्ट्रोल केला असता. पण तरीही भारतीय जिद्दी आहेत. कोरोनाचा पाडाव करणारच आहे. 
लावा ना २-४ पणत्या, मेणबत्या तुमच्याच घरी. काय विशेष आभाळ पडणार आहे डोक्यावर? 
असो. “विज्ञानाने तरी कुठे म्हटले आहे? दिवे लावू नका, लावल्यामुळे नुकसान होईल!”
-     मंगेश विठ्ठल कोळी.
-    मो. ९०२८७१३८२०
-    ईमेल mangeshvkoli@gmail.com
(Mangesh Koli) माझे असे प्रेरणादायी विचार मिळविण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, टेलिग्राम, इन्स्टाग्राम चॅनेलवर फॉलो करू शकता.
~~~~~~~~~~~~~~~
माणसात दिसला देव

सर्वभूतस्थमात्मानं सर्व भुतानि चात्मनि ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र सम दर्शनम् :

भगवद् गीतेमधील सहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात ,वास्तविक योगी सर्व प्राणीमात्रांना मध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणिमात्रांना सुद्धा माझ्या मध्ये पाहतो .याचाच अर्थ प्रत्येकाच्या हृदयात भगवंताचा वास आहे आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येकामध्ये भगवंताचा एक तरी गुण दिसतो .कुणामध्ये सेवाभाव आहे. तर कुणामध्ये दुसऱ्यांना ज्ञान देण्याची तळमळ आहे .कुणी परोपकारी आहे तर कुणी स्वतःचा आनंद दुसऱ्यांमध्ये सोधतांना दिसतोय. जर आपण पूर्णतः स्वच्छ मनाने व कुठलाही द्वेष मत्सर मनात न ठेवता तटस्थ होऊन या गोष्टीकडे बघितले तर आपल्याला देव माणसात पण दिसेल आणि चराचर सृष्टी मध्ये देखील दिसल्याशिवाय राहणार नाही .म्हणूनच एका महान कवीने म्हटले आहे कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी ? हृदयातील भगवंत राहीला हृदयात उपाशी .ह्या कविला तर भगवंत रिमझिम पाऊस धारा मध्येही दिसतो .मातीतून मोती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ही दिसतो. एखाद्या कर्जबाजारी शेतकऱ्याला संकटसमयी मदत करणारा व्यक्ती देवाच्या समान वाटेल ,स्वतःच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला झालेल्या मोठ्या आजारावर उपचार करून त्याला मरणाच्या दारातून परतवणारे डॉक्टर ,नर्सेस देव वाटतील .त्या संकट समयी आर्थिक मदत करणारा आणि दोन शब्द धिराचे बोलणारा त्याप्रसंगी  नक्कीच देव वाटेल .ग्लोबल अवॉर्ड विजेती सौंदर्यवती नमिता कोहक एकदा तिच्या आयुष्यावर बोलताना म्हणाली होती की हॉस्पिटल मधील नर्स  अगदी देवासारखी माझ्या आयुष्यात आली आणि दुर्धर आजाराशी लढता लढता तिने मला स्पर्धे पर्यंत पोहोचवले .
असे एक नाही अनेक उदाहरणे देता येतील एखाद्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक मदत करणारी व्यक्ती आयुष्यभर त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात देवासमान पूजनीय असेल .
त्याचप्रमाणे मीसुद्धा अनेक व्यक्तींमध्ये देवाला बघते. सर्वात प्रथम मला घडवणारे माझे आई-बाबा ,माझेआजोबा ,माझे मावशी काका ,हे सर्व माझ्यासाठी देवच आहेत आणि रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त असलेली एक देवासमान व्यक्ती म्हणजे आमच्या शेजारच्या ताई सौभाग्यवती भामरे ताई. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ,नेहमी हसरा चेहरा ,घरी येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करणे ,आपल्या घासातला घास देणे असा ताईंचा गोड स्वभाव .आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानासुद्धा मुलांचे शिक्षण पूर्ण केले दोन्ही मुलांना इंजिनियर बनविले .मुलीचे शिक्षण पूर्ण करून थाटात लग्न करून दिले. हे करीत असताना कधीच कुरकुर नाही की दुःख नाही .प्रसंगी पापड लोणची बनवली ती विकली व त्यातून मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह सर्व केले .
ह्या ताई माझ्या आयुष्यात आल्या तेव्हा माझे लग्न होऊन 1वर्ष झाले होते अगदी आईच्या सारखे त्यांनी मला प्रेम दिले एवढेच नाही तर मला शिक्षण सुरू ठेवण्याची प्रेरणा दिली आणि अशाप्रकारे आमचे ऋणानुबंध जुळले .सात आठ वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर त्यांनी माझ्या मध्ये असलेली शिक्षणाची आवड ,तळमळ बघून की काय मला शिक्षिकेची नोकरी करण्याची प्रेरणा दिली व सांगितले मुलांची अजिबात चिंता करू नका मी त्यांना सांभाळते सांभाळते. ताईंनी माझ्या मुलांना केवळ सांभाळलचं नाही तर त्यांच्यावर स्वतःच्या नातवा सारखे प्रेम केले .संस्कार दिले .आज मी जे काही बनू शकले ,जीवनात जे काही करू शकले ते त्याप्रसंगी त्यांनी मला जी साथ दिली त्यामुळे .त्याक्षणी खरोखर मला त्यांच्यामध्ये देव दिसला म्हणतात .त्या प्रत्येक स्त्रीला समजून घेऊन मदत करतात मग स्वतःला कितीही त्रास झाला तरी .
 अशा अध्यात्मिक वृत्तीच्या ताई देवाची भक्ती तर करतातच पण ती भक्ती खऱ्या अर्थाने आपल्या आचरणात आणून त्याप्रमाणे जगतात अशा निस्वार्थ प्रेम करणाऱ्या ताईंना उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना 

प्रा .सुनीता आवंडकर बारी मोतीवाला शिक्षणशास्त्र महाविद्यालय नाशिक

~~~~~~~~~~~~~~~
 *माणसात देव दिसला*

 सध्या विश्वभरात "कोरोना"या विषाणू ने थैमान घातलेले असतांना सर्वच धार्मिक स्थळे बंद आहेत. अश्या संकटाच्या वेळी देव सुद्धा सुट्टीवर गेला असे उपरोधिक उद्गार सुद्धा ऐकायला मिळत आहे. पण, खऱ्या अर्थाने देव हा कधीच सुट्टीवर जात नसतो. तो नेहमी आपल्या अवतीभवती असतोच. फक्त त्याचे अस्तित्व समजून घेता आले पाहिजे. म्हणूनच तर संत गाडगे महाराज नेहमी सांगत असत की, देव देवळात नसून तो माणसात आहे. माणसातला देव ओळखायला शिका. तो आपल्यामध्ये राहून आपली वेळोवेळी मदत करत असतो. 
म्हणूनच तर आज "कोरोना" मुळे सगळे जग बंद पडलेले असतांना आपला जीव धोक्यात घालून या संकटावर मात करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. मग त्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर वाले, पोलीस बांधव, पेट्रोल पंपावर सेवा देणारे कर्मचारी, तसेच इतर कर्मचारी हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे आपले कर्तव्य बजावतांना दिसतात.
आजच्या परिस्थितीमध्ये हि माणसं देवापेक्षा कमी नाहीत. जणू देवच यांच्या रूपाने मानवजातीचे संरक्षण करण्याचे कार्य पार पडत आहेत. विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय पुढारी, सेलिब्रिटीज हे आप-आपल्या परीने होईल ते कार्य करत आहेतच त्याचबरोबर बऱ्याच सामाजिक संस्था सुद्धा देवाच्या रुपानेच गोर-गरिबांसाठी अन्न पुरविण्याचे काम करतांना दिसत आहेत. ज्या लोकांना एक वेळचं जेवण मिळू शकत नाही अशा लोकांच्या भाकरीची व्यवस्था केल्यानंतर साहजिकच त्या गरीब व गरजू लोकांसाठी ते आज घडीला देवच आहेत. मी अजून तरी देव प्रत्यक्ष बघितलेला नाही आणि आपल्यापैकी त्याला कुणीही बघितलेले असेल असे वाटत नाही. पण, हि जी माणसं आपला जीव धोक्यात टाकून होईल त्या पद्धतीने मानवजातीची सेवा करत आहेत ते आपल्यासाठी आजघडीला तर देवच आहेत.

गणेश सोळुंके, जालना
~~~~~~~~~~~~~~~
*माणसात दिसला देव*
         
          *डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर*
         शहापूर ,(ठाणे)9226435827

  खरं म्हणजे या ओळीचा अर्थ स्पष्ट करताना मला एका संत अभंगाच्या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्या ओळी आहेत
*देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देवालयी, देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई*
  थोडक्यात या ओळींचा अर्थ आहे देव जळी, स्थळी,काष्टी, पाषाणी सर्व ठिकाणी पहायला मिळतो  या जगात असा पुण्यवान माणूस नाही जो देव चोरून नेऊ शकतो.थोडक्यात प्रत्येक चांगुलपणा करणाऱ्या माणसामध्ये देव सामावलेला आहे.
   सकाळी उठल्यापासूनच आपल्याला मनुष्यरूपी देवाचं अस्तीत्व जाणवायला सुरुवात होते...मग कधी स्वतः कष्टमय जीवन जगून आपल्या सर्व इच्छा आकांक्षांची आहुती देऊन आपल्या पिल्लांच्या पंखांना बळ देणाऱ्या *आई वडिलांच्या रुपात,*  तर कधी श्रीकृष्णा सारखा प्रत्येक संकटात द्रौपदीला मदत करणाऱ्या *भावाच्या रुपात* कधी आपल्या मित्राच्या प्रत्येक संकटात त्याची पाठराखण करणाऱ्या कर्णा सारख्या *मित्राच्या रुपात*  तर कधी आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या *पत्नीच्या रुपात*  हा मनुष्यरुपी देव आपल्याला सदैव मदत करीत असतो.  ही देवत्वाची यादी फार मोठी होईल.
    असं म्हणतात की *मानला तर देव नाहीतर.....दगड* .खरोखरच गाडगे महाराजांनी म्हटल्या प्रमाणे *'तीर्थी  धोंडापाणी ,देव रोकडा सज्जनी'* म्हणजेच प्रत्येक सज्जन माणसाच्या रुपात देवाचं अस्तित्व सदैव या पृथ्वीतलावर आपल्याला जाणवतं. कधी कधी असे अनेक संकटांचे प्रसंग येतात ज्या प्रसंगातून सुटका करण्यासाठी आपण ज्या व्यक्तीला ओळखतही नाही किंवा जिच्याशी आपला फारसा परिचयही नाही अशी व्यक्ती अचानक उभी राहून आपल्याला संकटातून सहीसलामत मुक्त करून जाते आणि मग सहजच तोंडातून शब्द बाहेर पडतात अमुक तमुक व्यक्ती *'देवासारखी धावून आली..'* मला वाटतं देव देव म्हणजे काय तर ती अशीच व्यक्ती असावी.
    आज संपूर्ण जग कोरोनारुपी संकटाचा सामना करतो आहे.अशा 
संकटात खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या पोटाची खळगी भरण्याचं काम करीत असलेला *शेतकरी* असो,आपल्या जीवाची पर्वा न करता रोग्यांना सेवा देणारे सरकारी *डॉक्टर,नर्स सर्व आरोग्य कर्मचारी असोत*  किंवा भर उन्हा तान्हात संपूर्ण देशात कायदा आणि सुव्यवस्था ठेवणारे *पोलीस* असोत किंवा या महामारीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या दीन दुबळ्यांची *अन्नपूर्णा होऊन*  सेवा करणाऱ्या संस्था वा व्यक्ती असोत हे सारेच देवस्वरूपच!!
   संकट काळात *'माणसाशी माणसाप्रमाणे वागून '* सेवा करणारे सारेच जण देवस्वरूप आहेत.ऊन, वारा,थंडी यांची जराही पर्वा न करता देशाच्या रक्षणार्थ आपल्या घरादाराचा त्याग करून सीमेवर उभे ठाकलेल्या सैनिकांचे काम देखील देवस्वरूपच आहे.
   *'देतो तो देव आणि राखतो तो राक्षस'*  या सुभाषिता प्रमाणे देश संकटात असताना आपल्या संपूर्ण झोळ्या देशासाठी खाली करणारे टाटा,बिर्ला यांसारख्या अनेक व्यक्तींना देवसापेक्ष समजण्यात काय चूक आहे. जाता जाता एव्हढंच म्हणावेसे वाटते की तुकाराम महाराजांच्या  ओळींसारखं काम करणाऱ्या प्रत्येक नर देहात देवपण सामावलेले असते असे मला वाटते .त्या ओळी आहेत
*जे का रंजले गांजले,त्यांसी म्हणे जो आपुले,तोचि साधू ओळखावा ,देव तेथेची जाणावा ||*

          *डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर*
         शहापूर ,(ठाणे)9226435827

~~~~~~~~~~~~~~~
" माणसात दिसला देव "

   आपली भारत भूमी ही सर्व विश्वात वंदनीय व श्रेष्ठ मानल्या जाते . आपल्या देशात जी शाश्वत संस्कृती व पूज्यनिय संस्कार आहेत ते खरंच या विश्वात शोधूनही सापडणार नाहीत . भारतात देवी - देवतांचीच नव्हे तर साधू - संत , वृक्ष - वेली , नदी - सागर , पशू - पक्षी आदींची पूजा केली जाते . तद्वतः काही आदर्श व पूज्यनिय व्यक्तींचीही पूजा केली जाते . त्यांच्या विचारांची पूजा केली जाते . आपल्या या देशात अनेक थोर संत - महात्मे होऊन गेलीत . ज्यांना देव हा केवळ मूर्तीत नव्हे तर पिडीत - दुःखी अशा माणसांत दिसला . अशा माणसांच्या सेवेत त्यांनी आपले आयुष्य सार्थकी लावले . अशा विभूतींची नावे - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , संत गाडगेबाबा , बाबा आमटे असे एक नाहीतर अनेकांची नावे घेता येतील .
   पण सध्या भारताला विळखा घातला तो एका कोरना विषाणूने . या ड्र्यगनने अख्ख्या विश्वात आपल्या विषग्रंथीचा फवारा मारला . त्यात असंख्य मानवहानी झाली . 
   या बिकट परिस्थितीत मात्र आपल्या देशात देवरूपाने अशा कोरोनाबाधित रूग्नांची सेवा करणाऱ्या देवदूतांत मलाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रत्यक्षात देवदर्शन झाले . स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ही डॉक्टर , परिचारिका , पोलिस , सफाई कामगार , आशावर्कर , अंगणवाडीसेविका , इत्यादी ही मानवी देवांचीच रूपे होत .
   " जे का रंजले - गांजले त्यांसी म्हणे जो आपूले ..." ह्या उक्तीचा साक्षात् प्रत्यय आज मला जाणवला . अशा संवेदनशील व देशभक्त माणसांत दिसला देव .

अर्चना गरूड , किनवट.
~~~~~~~~~~~~~~

*विषय :- माणसात दिसला देव*

सहभागी लेखकांची यादी

01) अरविंद कुलकर्णी, पुणे
02) राजेंद्र शेळके, बुलढाणा
03) दिपाली राऊत, उस्मानाबाद
04) नासा येवतीकर, धर्माबाद
05) मंगेश विठ्ठल कोळी
06) सुनीता आवंडकर
07) गणेश साळुंखे, जालना
08) डॉ. हरिश्चंद्र भोईर, ठाणे
09) अर्चना गरुड, किनवट

~~~~~~~~~~~~~~
रोज एक लेख :- तिसरा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 21 एप्रिल 2020

वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5

*विषय :- व्यसनापासून दूर राहा*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769


1 टिप्पणी:

  1. प्रत्येकांनी मिळून असं सामूहिक माणसातलं देवत्व शोधणे हा प्रयोग स्तुत्य
    आहे. आनंद झाला.धन्यवाद

    बळी आंबुलगेकर,नांदेड
    9960587210

    जवाब देंहटाएं

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...