*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- सहावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 24 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5
*विषय :- खेळ / क्रीडा / शारीरिक शिक्षण*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
01) " आमची मुलं आणि खेळ "
===================
पी टी चे सर : "सांग गण्या , रियो ओलम्पिक मधे भारताले मेडल काउन नाही भेटलं....?"
गण्या : "गुर्जी , मेडल कसं भेट्न...?
तुमी आमाले पीटी मंधी निसते कागदंच येचाले लावता अन् गवत उपटाले लावता................!!!"
वरील विनोद नुकताच व्हॅट्स अॅपवर वाचायला मिळाला. विनोदाचा भाग सोडला तर खूप कांही सांगून जातो हा विनोद आणि वास्तव सांगतो आहे हा विनोद. शाळेत फूलणारी मुलं शाळेचं जसं वैभव आहे तसंच ते देशाचं भाग्य आहे. पण या खेळकर वयात शरीरात साठलेली उर्जा बाहेर पडण्याऐवजी गुणवतेच्या नावाखाली तीचे दमण होताना दिसते आहे. पुन्हा रोष गुरुजींवरच आणि दोषही गुरुजींनाच दिला जातो. पण पालकांच्या अवास्तव आपेक्षांचे ओझे पेलत पेलत दमछाक
करत पुढे निघालेला विधार्थी, खेळ, क्रिडा बाबत उदासिन झालेला दिसतो आहे.गुरुजी पण गुणवत्तेच्या ध्यासाने पछाडलेले आहेत. शासन आणि पालक यांना वही पुस्तकातील गुणवत्ता हवी असते.क्रिडांगणावरील गुणवता नंतरची बाब असते. अशा परिस्थितीत पीटीचा तास केवळ वेळापत्रकातील रकान्यात शोभून दिसतो. आणि प्रसन्न बागेतील ही फुलं कोमेजून जाऊ लागली.
सव्वाशे कोटी लोकसंख्याच्या देशात ऑलंपिक पदक तालीका बघताना लाज वाटावी अशी परिस्थिती असताना ज्या देशात ऐवढी लोकसंख्या असूनही स्त्री सन्मान जपला जात नाही. निर्भयाची इज्जत वाचवू शकलो नाही, त्याच देशातील साक्षी मलिक आणि पी.व्ही. सिंधू या दोन महिलांनी देशाची इज्जत वाचवली.
पण हा प्रसंग सांगण्याचा हेतू येवढाच की आमचे अभ्यासक्रम हे ज्यांचे सरकार येईल त्यांच्या विचारानी तयार होतात. नवा शिक्षणमंत्री नवी धोरणे राबवतो.निशब हे की तीन तीन महिन्याला मंत्री बदलत नाही. खेडोपाडयात शाळांची अवस्था पाहिली तर पुरेसे मैदान नाही. प्रशिक्षक असा शिक्षक वर्ग मुलांना प्राप्त होत नाही.आडातच नसेल तर पोवऱ्यात कोठून येणार...?गावोगावी शाळेच्या जवळ असणाऱ्या तालमी आज पाहिला मिळत नाहीत. कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण यांच्या तासिका अभ्यासक्रमात असतात पण प्रत्यक्षात त्याकडे धड गुरुजीचे लक्ष असते ना प्रशासनाचे शिवाय
याचे फारशा गांभिर्याने मूल्यमापनही होत नाही.
कांही कांही वेळा मूलं मैदानावर तर सर किंवा गुरुजी अन्यत्र व्यस्त असे चित्र दिसते. सव्वाशे कोटीचा देश कोणत्याही खेळात नैपुण्य दाखवू शकत नाही. ही केवळ क्लेषदायीच नव्हे तर आत्मपरिक्षण करण्याजोगे आहे. क्रिडा किंवा खेळाचा विषय अशाच प्रसंगी मोठ्या चवीने चाबलाला जातो. जेव्हा अॅालंपिक किंवा अन्य स्पर्धा असतात. शालेय सारावरून या कामी कांही बद्दल वा हालचाल व्हावी यासाठी कोणी झटताना दिसत नाही. चार भिंतीत डांबून दिलं जाणारं शिक्षण किती बौद्धीकता वाढवते, स्वच्छंदपणे, आनंदाने आणि मुक्तपणे हसत खेळत शिक्षण दिले तर पदक तालीकेकडे डोळेला लाऊन बसण्याची वेळ येणार नाही. सदृढ शरीर बनविण्याची प्रत्येक शाळा ही केंद्र बनली पाहिजे. गुणवत्तेच्या नावाखाली भोंगळ आणि कुचकामी पिढी बनवीत आपण एकविसाव्या शतकापर्यंत पोहचलो खरे पण काय दिले काय केले हा हिशोब जुळवला तर बाकी काय राहिल याचाही विचार व्हावा. शरीर कसदार बनवण्याच्या वयातच पुस्तकांच्या झापडया बांधून मुलांना बालपण कोमेजण्याच्या स्थितीत नेवून ठेवतो. शालेय अभ्यासक्रमात क्रिडेचं महत्त्व जाणून आणि ओळखून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे.
हणमंत पडवळ
उस्मानाबाद.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
02) मानसिक संतुलनाचे साधन:खेळ
"खेळ ही एक शारीरिक कला
त्यातून शारीरिक विकास साधतो
सोबत मानसिकता प्रबळ होते
नि मानसिक स्वास्थ्य लाभतो"
खेळ हा जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.ग्रामीण भागातील वा शहरी भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खेळ अतिशय आवश्यक आहे.फरक एवढाच आहे की,ग्रामीण भागात खेळले जाणारे खेळ व शहरी भागात खेळले जाणारे खेळ भिन्न-भिन्न असू शकतात.ग्रामीण जीवनाचा विचार केल्यास विटीदांडू, लपाछपी, लगोरी, पाटीवरून उडी घेणे, चिंचोक्याचा खेळ यासारखे सांघिक खेळ खेळले जातात याउलट शहरी भागात क्रिकेट, बॅडमिंटन,व्हॉलीबॉल यासारखे खेळ खेळले जातात यामधून खेळाडूचा शारीरिक विकास साधला जातो.व्यायाम होत असल्याने शरीर सुदृढ होण्यास मदत होते त्याचसोबत मानसिक संतुलन राखण्यास मदत होते म्हणून प्रत्येकाच्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे.
बालपणी प्राथमिक शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी व कला ओळखून त्यांना त्या-त्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी शिक्षक या नात्याने कार्य करीत असतात.महाराष्ट्रातील प्रामुख्याने विदर्भात सांस्कृतिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये खो-खो, कबड्डी यासारख्या सांघिक खेळ घेतले जातात त्याचसोबत वयक्तिक खेळ देखील घेतले जातात यामधून जिल्हा,राज्य व देशात होणाऱ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूला निवडले जाते.म्हणून विद्यार्थ्याने अभ्यासासोबत आवड असलेल्या खेळामध्ये प्रगती करण्यासाठी वाव मिळत असते.त्यामुळे जेवढे महत्व आपण अभ्यासाला देतो तेवढेच महत्व खेळाला देखील देणे अतिशय आवश्यक आहे.प्राथमिक स्तरापासून खेळामध्ये रुची बाळगत असल्याने त्या खेळातील कौशल्य आत्मसात करता येऊ शकते.
आज शहरी किंवा ग्रामीण भागातील मुले असेल तरी पूर्वी खेळले जाणारे खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्याचे प्रमुख कारण हेच आहे की,तंत्रज्ञान युग असल्यामुळे मुलांना दिलेला गृहपाठ,कृती मोबाईलमधील गूगल मधून शोधून लिहून आणायला शिक्षक सांगत असतात त्यामुळे मोबाईल मधून काय-काय मिळते याची माहिती मुले करून घेत असतात आणि करमणुकीचे साधन म्हणून मोबाईल मधील गेम खेळण्यात वेळ घालवीत असतात त्यामुळे लहान मुले ते मोठया व्यक्ती देखील आभासी खेळाकडे जास्त वळले असल्याने मुख्य मैदानी खेळाकडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे ते एक प्रकारचे व्यसन लागलं आहे असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही त्यामुळे त्यांचा शारीरिक,मानसिक विकासापासून वंचित राहून उलट परिणाम झालेले आपण समाजात बघतो आहोत.
शिक्षणात आपापल्या क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी आहे त्याचप्रमाणे खेळाडूच्या अंगी असलेले कौशल्याचा वापर करून आवड असलेल्या खेळामध्ये खिलाडीवृत्तीने खेळ खेळण्याला खूप वाव आहे.आज अधिकाधिक मुले क्रिकेटच्या मागे जाऊन आपले जीवन व्यर्थ घालवीत आहेत म्हणजेच मला हे सांगायचे आहे की,बहुसंख्येने खेळाडू याच खेळाला प्राधान्य दिल्यास स्पर्धा अधिक राहते त्यापेक्षा इतर फुटबॉल, व्हॉलीबॉल, नेमबाज, तिरंदाजी, कुस्ती, टेनिस, बॉक्सिंग यासारख्या खेळामध्ये रुची घेतल्यास देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यास हातभार लागेल.उत्कृष्ट पद्धतीने खेळाचे बारकावे लक्षात घेऊन खेळत असेल तर त्यांना आपली प्रगती त्याच खेळात दाखवून सरकारी नोकरी देखील मिळू शकते हे राष्ट्र, राज्य स्तरावरील खेळाडूला राखीव जागा आहेत. आता सध्या जगासह संपूर्ण भारत देशात संचारबंदी लागू असल्याने सर्वच खेळावर बंदी लादण्यात आली आहे.अशावेळी मैदानी खेळ बाहेर जाऊन खेळता येणार नाही परंतु बैठे खेळ खेळता येईल.घरातल्या घरात राहून करमणुकीचे साधन म्हणून बैठे खेळाला प्राधान्य देता येते.आपल्या देशात पाहिजे त्या प्रमाणात खेळाडू घडले नसले तरी जेवढे आहेत तेवढेही आपापल्या खेळात अग्रेसर आहेत.'बुद्धीबळ' या खेळाचा नामोल्लेख केला की,आपल्याला विश्वनाथन आनंद यांचे नाव तोंडात येते.हा खेळ दोघे जण खेळायचा असून बुद्धीला चालना देणारा खेळ आहे.चौसष्ट चौरसात सोळा सोंगट्या घेऊन खेळणारा गेम असून विश्वनाथन आनंद पाचवेळा जगजेत्ता आहे.बुद्धीबळ हा गेम संचारबंदी असतांना देखील ऑनलाइन खेळता येतो हे प्रामुख्याने सांगावे वाटते.म्हणून आपल्याला शारीरिक विकासासोबत मानसिक संतुलन राखण्यासाठी,ताण-तणाव कमी करण्यासाठी जीवनात खेळ अतिशय आवश्यक आहे आणि प्रत्येकांनी आपापल्या खेळात उंच भरारी घेण्यासाठी मेहनत घ्यावी व राज्य,देशाचे नाव उज्ज्वल करण्यास हातभार लावावा.
✒श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर
dushantnimkar15@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
03) *मैदानी खेळूया नवे नवे खेळ*
*सत्कारणी लावूया फावला वेळ*
सुधाकर रामदास पाटील
एम.ए. बी.एड.
शहापूर, ठाणे
मो. 7798963063
srp1672@gmail.com
'Sound mind in sound body ' असे इंग्रजीत, 'शरीर माद्यम खलु धर्म साधनम् ' असे संस्कृतात तर 'निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते' असे मराठीत सुभाषित आहे. हे बोलायला, वाचायला आणि लिहायला खूप छान वाटते. परंतु याची अवलंब करताना फारसे युवक दिसत नाही हे वास्तव मान्य करावे लागेल.
शरीराच्या निकोप वाढीसाठी, सामाजिक भावना वृद्धिंगत होण्यासाठी, एकोपा-संघभावना वाढीस लागण्यासाठी, शारीरिक ,मानसिक व भावनिक विकासासाठी, नेतृत्वगुण विकसनासाठी, समता बंधुताचे मूल्य रुजविण्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुर्दैवाने आज विद्यार्थ्यांची दिनचर्या एवढी बदलली आहे की त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकात खेळण्याला स्थान नाही. पहाटे उठणे ,शाळेत जाणे, दुपार नंतर खाजगी कोचिंग,नंतर एखादी अकॅडमी जॉईन केलेली असते,रात्री गृहपाठ,थोडा वेळ मोबाईल आणि टीव्ही असा सर्व दिनक्रम बहुतांश विद्यार्थ्यांचा अनुभवास मिळतो.शाळेतही क्रीडेच्या तासिकेला कॉम्प्युटर शिक्षक, गाण्यांच्या भेंड्या, इतर अभ्यास विषयांचे मार्गदर्शन असे उपक्रम सुरू असतात परिणामी मुलांना पुरेसे खेळायला मिळत नाही. शासन स्तरावर देखील क्रीडा प्रकारची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. प्राथमिक शाळेत क्रीडेसाठी स्वतंत्र शिक्षक नाहीत.माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात असले तरी पुरेसे नाहीत.परिणामी विद्यार्थ्यांना खेळाचा मनमुराद आनंद लुटता येत नाही. कौशल्य प्राप्त करता येत नाही. आशियायी क्रीडास्पर्धा किंवा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला अपेक्षित यश मिळत नाही याची हीच कारणे आहेत.
आज 24 एप्रिल जगद्विख्यात क्रिकेटपटू, भारतरत्न ,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस आहे. अशा पवित्र दिवशी प्रत्येकाने खेळांना जीवनात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चला तर मग करूया संकल्प,
मैदानी खेळूया नवे नवे खेळ
सत्कारणी लावूया फावला वेळ !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
04) खेळ खेळू चला
पुराण काळापासून खेळाचा इतिहास आहे . द्वापारयुगात गोपालकृष्ण यमुनेच्या काठी चेंडूफळीचा खेळ खेळत होते . कौरव पांडव द्यूत खेळले गेले . इतकेच काय शंकर पार्वती ही सारीपाटाचा खेळ मांडून बसत होते हे आपण पुराणा मधे ऐकले व वाचलेले आहेच. आपल्या लहानपणी आपण सुरपारंब्या , आट्यापाट्या , लगोरी , कब्बड्डी , गोट्या , विटीदांडू इत्यादी भारतीय खेळ खेळले आहेत . शाळेतून आले की दप्तर कोपर्यात भिरकावून आपण खेळायला पळत असू . उन्हाळ्यात अंब्याच्या कोणाचाही खेळ आम्ही खेळायचो . गोल रिंगण करून कोया त्या रिंगणात एकावर एक रचायच्या लांब अंतरावरून नेम धरुन ती कोणाची लगड पाडायची . रिंगणाच्या बाहेर आलेल्या कोया आपण जिंकायचो . चिंध्याचा चेंडू करुन एकमेकांच्या पाठीत मारायचो.
बैठ्या खेळांमध्ये , कॅरम , पत्ते (५, ,३,,२) भिकार सावकार , बदाम सात, गटार उपशी असे खेळ असायचे , महिलाही कामातून वेळ मिळाला की , सागरगोटे , काचकूर इत्यादी खेळ खेळून थोडा विरंगुळा घ्यायच्या .
पाश्चात्य खेळा पेक्षा भारतीय खेळाला खूप महत्त्व होते . क्रिकेट , हाॅकी , टेनिस , बॅडमिंटन ईत्यादी खेळासाठी लागणारे क्रिडासाहित्य फार महाग होते . शिवाय ते खेळ शिकवायला तज्ञ मंडळी ही उपलब्ध नसायची . त्या पेक्षा पारंपारिक खेळाला काही पैसे खर्च करायची गरज नव्हती व ते खेळ खेळण्यासाठी मैदानांची आवश्यकता नव्हती . गल्लीत मोकळ्याजागी सहज हे खेळ खेळले जायचे लहान थोर मंडळी ही या पारंपरिक खेळाचा आनंद घेत असत . आमच्या गांवी पिंपरखेड ला पाऊस पडून गेल्यावर नदीकाठी अग्रावर (नदीच्या डगरीवर) मोठी माणसे आट्यापाट्या खेळत असत. आता मुलांना खेळण्यासाठी वेळ मिळत नाही . शाळेतून आले की लगेच क्लास ला जायची तयारी . इंग्लीश मेडीमचे फॅड डोक्यात घेतलेल्या पालकांनी आपल्या मुलांना रेस च्या घोड्यासारखे तयार करायचे ठरवले आहे . जिल्हापरिषद ची किंवा मनपा च्या शाळा च विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा साठी चांगले प्रयत्न करताना दिसतात . दुसरे असे की खेळाच्या मैदानावर ही अतिक्रमण केले जात आहे . मुंबई पुण्यासारख्या शहरात मुलांना खेळण्यासाठी मैदानांची वाणवा आहे . गावाकडे , खेड्यात सुद्धा खेळाकडे कोणी गांभिर्याने पहायला तयार नाहीत . तिथे सुद्धा ग्रामपंचायतीने मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करुन द्यायला पाहिजे . , व्हाॅलीबाॅल क्रिकेट या सारख्या खेळांना लागणारे साहित्य उपलब्ध करुन द्यायला पाहिजे . ग्राम स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करुन खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. दररोज किमान दोन तास तरी मुलांनी खेळलेच पाहिजे . खेळल्यामुळे मनाला तरतरी येते . शरीरात एक प्रकारची स्फुर्ती ची लहर उत्पन्न होते . व्यायाम तर होतोच . पण भूक ही चांगली लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे खेळामुळे खिलाडूवृत्ती वाढते . यश आणि अपयश पचवायला शिकतो. समोरच्या स्पर्धकाला खेळाडू कधीच कमी लेखित नाही . त्यांच्यावर कितीही संकटे आली तरी तो नडगमगता संकटावर मात करतो . या उलट जी मुले कधीही खेळत नाहीत ती आत्मकेंद्रित होतात . त्यांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो ती एकांतप्रिय व अबोल होतात . काही अडचणी संकट आले तर भांबाऊन जातात . संकटांना घाबरतात , रडत बसतात . या उलट जो स्पोट्समॅन असतो तो संकटांना दिलाने सामोरे जातो रडत नाही तर तो लढतो आणि संकटावर मात करतो . म्हणून म्हणतो चला मैदानावर आणि खेळत राहा.
मी एकदा एका मुलाला विचारले अरे आम्ही लहानपणी खूप खेळत असू . मी तुला कधी खेळताना पाहिले नाही . तर तो मला म्हणतो "आजोबा मी पण खेळतो क्रिकेट , टेनिस , फुटबाॅल पण मैदानावर नाही . तर मोबाईल मधे हे सगळे गेम आहेत ना . मी ते सगळे खेळतो मोबाईल मध्ये. अशा मोबाईल च्या गेम खेळून अकाली वृधत्व येण्या पेक्षा चला मैदानावर , खेळ खेळू चला....
अरविंद रामचंद्र कुलकर्णी
पिंपरखेडकर (पुणे)
9422613664
arkulkarni.1955@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
05 शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी व्ही सिंधू ठरली पहिली भारतीय खेळाडू. हिमा दास ही एक भारतीय धावपटू आहे. २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे. नुकतेच जुलै महिन्यात चीनमध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेत ती पाच सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावण्याचे काम केले आहे. रिओ ऑलिम्पिक मध्ये भारत पदक तालिकेत आपले खाते उघडते किंवा नाही याबाबत प्रत्येक भारतीयांच्या मनात शंका निर्माण होत असताना साक्षी मलिकने कुस्तीत कास्य पदक जिंकून 125 कोटी भारतीयांची शान राखली. तसे पाहिले तर इतर देशाच्या तुलनेत आपली एवढी मोठी लोकसंख्या असून सुध्दा पदक मिळण्याच्या बाबतीत खुपच मागे का आहे ? यावर विचार करणे आवश्यक आहे.
खरे तर खेळाची सुरुवात प्राथमिक शाळेपासून व्ह्ययला पाहिजे. उत्तम आरोग्य असेल तर त्याचे डोके सुध्दा उत्तम असते अश्या अर्थाची एक म्हण वाचण्यात येते. त्याचा अर्थ शालेय जीवनापासून लक्षात घ्यायला हवे. कारण प्राथमिक शिक्षणाची सुरुवात शाळेत होते आणि याच ठिकाणी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. मुलाचा शारीरिक,भावनिक विकास होण्यासाठी खेळ आवश्यक आहे. मुले खेळण्यात जास्त वेळ घालू लागली की पालकाची ओरड ठरलेली असते की आत्ता किती वेळ खेळणार ? चल बस अभ्यासाला. ही नेहमीची पालक वर्गाची ओरड प्रत्येक घरात दिसून येते. यास पालकाना दोष देऊन चालणार नाही कारण सध्या परिस्थितीच आहे तशी खेळापेक्षा अभ्यासाला महत्व जास्त देण्यात येते.
संगणकच्या युगात काही चांगले घडत आहे तर काही वाईट सुध्दा घडत असताना दिसत आहेत. मोबाईल नावाच्या जादुई खेळणीने मुलांचे सर्वच खेळ हिरावुन घेतले आहे असे वाटते. पूर्वी ग्रामीण भागातील शाळा आणि रिकामी जागा मुलांच्या खेळाने भरून जात असत. शहरात खेळाची मैदाने सायंकाळी आणि रविवारच्या दिवशी मुलांनी फुलून जायचे. पण आज हे चित्र फार कमी पाहायला मिळत आहे. कारण आज मुले घरात बसल्या ठिकाणी मोबाईल वर सर्व खेळ खेळत आहेत. मैदानी खेळ कमी झाले. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यांचा मेंदू काम करेनासे झाले आहे. शरीर जड होत आहे. मुलामध्ये चैतन्य नावाची वस्तु सापडत नाही. या सर्व बाबीवर एकच उपाय ते म्हणजे शारीरिक खेळ. मुलांचा अभ्यास तेंव्हाच चांगला होऊ शकतो ज्यावेळी त्यांचे मन प्रसन्न असेल आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांना मैदानावर खेळण्यास नेणे गरजेचे आहे. मैदानावर फिरणे असो खेळ खेळणे असो वा इतर काही करणे यामुळे मुलांना ताजी हवा मिळते जे की शरीरला आवश्यक आहे आणि मन प्रफुल्लित होते. म्हणून मुलांना नुसते अभ्यास करा असे म्हटल्याने मुलांचा अभ्यास नीट होणार नाही. ते आपल्या धाकामुळे वाचन लेखन अभ्यास करतील पण त्यांच्या लक्षात राहणार नाही, हे ही तेवढेच सत्य आहे त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी थोडा तरी वेळ खेळ खेळणे आवश्यक आहे. पण आज आपल्या मुलांची सकाळ आणि सायंकाळची वेळ ही शिकवणीमध्ये जात आहे. शाळेत सुध्दा खेळाचा एक तास असतो मात्र शाळेत किती व कोणकोणते खेळ शिकवल्या जातात हा एक संशोधन करण्याचा विषय होऊ शकतो. त्यास शिक्षक दोषी आहेत असे नाही कारण तेथे खेळाच्या शिक्षकाची कमतरता भासते. आज कित्येक शाळेत खेळाचे शिक्षकच नाहीत तर काही शाळेत खेळाचे मैदान उपलब्ध नाही तर मुले काय खेळतील आणि कुठे खेळतील ? कधी कधी मुले ज्यांच्या शाळेत मैदान आहे तेथे खेळताना दिसून येतात त्यांना कोणाचे मार्गदर्शन नसते, ना कोणाचा कानमंत्र ते आपले उगीच खेळ खेळत असतात. परंतु त्यांना चांगला गुरु मिळाला तर अनेक स्तरावर आपले नाव व कीर्ती मिळवू शकतात. शाळेत शिकलेल्या खेळाचा आयुष्यात फायदा होतो. शालेय जीवन संपल्यावर आपले कोणत्याच खेळाकडे लक्ष जात नाही कारण त्या खेळाविषयी जी रूची शाळेत तयार व्ह्ययला पाहिजे ते होत नाही. शाळेतील खेळ पावसाळी आणि हिवाळी खेळापूरती औपचारिकपणे पूर्ण केल्या जाऊ नये.
शालेय अभ्यासक्रमात खेळाचा तास हा शेवटचा असतो ज्यात सहसा काहीच होत नाही कारण मुलांना घरी जाण्याचे वेध लागलेले असते. दुपारची पूर्ण वेळ खेळासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. शाळेतून विविध प्रकारच्या खेळाची तयारी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासनाने या बाबिकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. निदान सहाव्या वर्गापासुन तरी खेळाच्या शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुले योग्य दिशेत मोकळेपणाने खेळ खेळतील. एखाद्या खेळात निपुण व्हायाचे असेल तर विषय शिक्षकच फक्त त्यास न्याय देऊ शकतो. प्रत्येक सहावी ते दहावीच्या वर्गासाठी क्रीडा शिक्षक असेल तर भविष्यात साक्षी, सिंधू, हिमा दास सारखे खेळाडू मोठ्या प्रमाणावर तयार होतील. अशी आशा करण्यास हरकत नाही. कोणत्याच सोई सुविधा उपलब्ध नसेल तर आपली मुले स्पर्धेत कशी राहतील याचा विचार करणे आवश्यक नाही काय ? जर आत्तापर्यन्तच्या ऑलिम्पिक चा इतिहास पाहिले असता भारत देश सन 1900 पासून यात सहभाग घेत आहे. 2016 पर्यन्त भारताने 9 सुवर्ण चार रौप्य आणि 12 कास्य असे एकूण 25 पदक गेल्या 116 वर्षात मिळविले आहे आणि गेल्या 20 वर्षाचा मगोवा घेतल्यास असे लक्षात येते की सन 1996 पासून भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कास्य पदकाची कमाई केली याचाच अर्थ गेल्या वीस वर्षापासुन भारताचा ऑलिम्पिक मधील सहभाग वाढला असून जास्तीत जास्त खेळ खेळून पदक मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत म्हणण्यास हरकत नाही. मात्र अजूनही मुलांना या खेळाच्या बाबतीत अधिक जागृत करून त्यांना खेळाकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. शाळास्तरापासून ते देशस्तरापर्यन्त विविध स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूना प्रोत्साहन मिळवून देणे याची आत्ता खरी गरज आहे. आज भारतीय क्रीडा दिवस त्यानिमित्ताने भारतीय खेळविषयी प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
- नागोराव सा. येवतीकर
विषय शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद
09423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
06) "शारीरिक शिक्षण आणि मानसिक जडणघडण"
यश,अरे ये ना लवकर वर. किती वेळ झाला खेळतो आहेस? आठ वाजले. अजून होमवर्क राहिला आहे करायचा ये लवकर.
मंडळी, ही वाक्यं फेब्रुवारी महिन्यातील आहेत. मामाचं पत्र हरवलं असं म्हणण्याऐवजी या दिवसात मैदानी खेळ हरवला असं म्हणावं लागेल. जरी बऱ्याच CBSE माध्यमाच्या शाळांनी एप्रिल पासून ऑनलाईन लर्निंग सुरू केले असले तरी मुलांना खूप कंटाळा येतो आहे. मुलांची ऊठबस, वर्गातील मस्ती, गप्पा-टप्पा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पीटीचा तास, ज्याची सारी मुले आतुरतेने वाट बघत असतात ते सगळं बंद झालं. मुलांच्या तोंडून आम्ही मैदानात न खेळून एक रेकॉर्ड केले आहे अशी खंत व्यक्त होत आहे.
घरी व्यायाम करून करून करणार किती? शेवटी बाहेरची खेळती हवा हवीच. त्यापेक्षा खेळून घामाने डबडबलेलं शरीर तर हवंच. तुम्हाला, तुमच्या मनाला खेळच ताजतवान ठेवायला मदत करतो.मुलांचे कोमेजून गेलेले, हिरमुसलेले चेहरे पाहिल्यावर कळते की त्यांना किती गरज आहे खेळाची. शासनाच्या नियमाप्रमाणे आठवड्यातील चार तास शारीरिक शिक्षणासाठी म्हणजेच पीटीसाठी दिले जातात.
शहरात इंग्लिश मिडीयम च्या शाळांची चढाओढ असते. त्यात मी काय जास्त पुरवते हेच प्रत्येक शाळेचे ध्येय असते. म्हणूनच मुलांच्या शारीरिक विकासासाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल, खोखो, कबड्डी सूर पाट्या, धावणे, बॅडमिंटन, लंगडी इत्यादी खेळ शाळेमध्ये घेतले जातात. त्यामुळे निर्णयक्षमता, आत्मविश्वास मानसिक जडण-घडण, न्याय, दया,माया, सहकार्य, आदर, निष्ठा नेतृत्व, खिलाडूवृत्ती, शिस्त, नैतिक मुल्ये यांसारख्या गुणांचा विकास शारीरिक शिक्षणामुळे होतो. थोडक्यात मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासाचे हे मूळ आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. आर. कॅसिडी यांच्या मते," विविध गतिमान शारीरिक क्रियेंमधून मिळणाऱ्या अनुभवांमध्ये व्यक्तींमध्ये होणाऱ्या वर्तनातील क्रियेस शारीरिक शिक्षण असे म्हणतात."
"पीटीचा तास आहे माझी आवड
खेळासाठी व्हावी शिक्षकांकडून निवड
पदके जिंकून वाढविन देशाची शान
अन् विसरायला होईल जीवनातील सारा ताण"
आई , मी कधी जाणार खाली खेळायला हे वाक्य ऐकलं की निरुत्तर व्हायला होतं.
लवकरच सारी मैदाने ही मुलांरूपी फुलांनी सजतील, अशी आशा मनी बाळगू.
"पीटी च्या तासाला खेळत होतो खोखो
शिक्षकांनी चला वर्गात म्हटलं तर म्हणत होतो नुसतंच हो हो" अशी मुले म्हणताना आणि आनंदाने बागडताना दिसतील.
प्रिती दबडे, पुणे
9326822998
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
07) मानवाची पहिली संपत्ती शरीर
मित्रांनो आपल्या देशात पुर्वि पासुन योग,व्यायाम, आणि शारीरिक शिक्षणाला खुप महत्वाचे स्थान दिले आहे.आणि ते आवश्यक हि आहे . या भुतलावावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आनंद आहे.पण त्या आनंदाचा उपभोग घेण्याकरीता मन प्रसन्न असायला हवं. आणि मन तेव्हाच प्रसन्न राहील जेव्हा शरीर सुदृढ असेल तर.
आणि म्हनुनच बालकांच्या लहान वयापासूनच शाळेत शारीरिक शिक्षणाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले.पुर्वि प्रत्येक शाळेत विविध स्पर्धा होत असे. ग्रामिन स्तरापासुन तर राष्ट्रीय पातळीवर विघार्थि खेळ कुद स्पर्धेत सहभागी व्हायचे आणि जिंकून यायचे त्यावेळेस त्यांचा आनंद गगनात मावेनासा होत असे.
शारीरिक व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते योग्य वयात उंची हि वाढते मनगटात ताकद येते.रोग प्रतिकारशक्ती वाढते.खुप खेळल्याने भुकहि छान लागते रात्रि झोपही गाढ येते. पण अलीकडे आम्ही विज्ञानाच्या भलतेच आहारी गेलो. त्यामुळे सध्या आमच्या शरीराचे शत्रु हि आम्ही च बनलो.जेव्हा आमचा एक दात बदलावयाचा असेल तर एका दाताची कीम्मत दहा हजार तर ३२ दातांची कीम्मत तीन लाख विस हजार. ते ही ओरीजनल मिळणार नाही. मित्रांनो यावरून आपल्या शरीराची कीम्मत लावा .ते ही ओरीजनल नाही.आणि सर्व संपत्ती मध्ये शरीर संपत्ती सगळ्यांत महत्त्वाची आहे. पण आज चित्र बदलेल आहे. टि.व्हि. आणि मोबाईल च्या वापरा मुळे प्रत्येक व्यक्ती एका जागेवर जनु चिकटून बसलेल्या दिसतो एक तर टि.व्ही नाही तर मोबाईल. त्यामुळे अन्न पचनाच्या समस्या वाढल्या , आम्लपित्त,ब्लडप्रेशर, साखरेचे आजार. याला कारण शारीरिक व्यायामाचा अभाव. मित्रांनो वाईट एका गोष्टीच वाटत की आपलं तर निभल पण या लहान व तरूण मंडळींचे कसे होनार? आता पासुन त्यांचे केस पांढरे झाले.डोळ्यांना चष्मे लागले. आणि हि मंडळी सुध्दा सतत मोबाईल फोनचा वापर करतात.त्यामुळे घरी व्यायाम नाही आणि हल्ली शाळेत सुध्दा शारीरिक शिक्षण काही वेगळ्याच पध्दतीने घेतले जाते ते शारीरिक शिक्षणाचा लेखि पेपर . हो तो आवश्यक आहे पण १००/नाही. तर पेपर पेक्षा त्यांना मैदानी खेळ आवश्यक आहे पण बहुतेक शाळांमध्ये तिथले मुख्याध्यापक मुलांना वर्गातच असल्यास करायला लावतात. का, तर शिक्षक गप्पा मारतात म्हनुन . मित्रांनो हे चुकीचे आहे. माझ्या मते तर हया संधिचा फायदा सर्व शिक्षकांनी घ्यायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांन सोबत शिक्षकांनी देखील मैदानी खेळात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मोबाईल ,टि.व्ही. पासुन दुर नेवुन आपल्या लहानपणी सारखे झाडावर चढने. चिंचा ,बोर तोडने आणि कोनी मागे धावत आले तर त्याच्या हातात न सापडणे हा सगळा आनंद एका शारीरिक शिक्षणामुळे मिळवून देऊ शकतो..
शिक्षिका
सौ.मेघा विनोद हिंगमिरे
भारत विद्यालय वेळा,त. हिंगणघाट
जि. वर्धा
7798159828
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
08) " आजन्म जो खेळी क्रिडा
जीवनी उद्भवी शून्य पिडा "
मित्रांनो , आजच्या ह्या स्पर्धेच्या युगात मानवप्राणी हा सतत कामात व्यस्त व व्यग्र असतो . असे वाटते जणू त्याने आपल्या आयुष्याला एक घड्याळच बनवले . तो रात्रंदिवस घरी - दारी सतत कामाच्या विवंचनेतच गुरफटलेला असतो . यामुळेच घरी सर्व सुखसोई लोळण घालत असूनही तो नेहमीच चिंताग्रस्त व अतृप्त असतो . भय , नैराश्य , क्रोध , चिडखोरपणा , असमाधानीवृत्ती , ईर्ष्या , हव्यास , अशा अनेक विध्वंसक विकृत मनोवृत्तीने मानवाला ग्रासले आहे . " आयुष्यातील आनंद व हास्याला तो पार पारखा होत चालला आहे! "
" अंगीकारता जीवनी क्रिडेचा मार्ग
दुःख - नैराश्याचा होई उपसर्ग ! "
खरंच मित्रांनो , आपले जीवन हे आपल्याला हसून - खेळून आनंदाने व्यतित करायला हवे. अहो , ' पैसा ' हा सर्वश्रेष्ठ नाही ! पैशाने आपण भौतिक सुखसोई मिळवू शकतो , पण अभौतिक व अंतरिक सुख - समाधानाचंं काय ? त्यासाठी मानसिक स्वास्थ्य हवे ना ! आणि ते मिळण्याचे एकमेव माध्यम म्हणजे तर ही ' क्रिडा ' , होय !
कारण या क्रिडेमुळे जे मानसिक समाधान व मनःशांती मिळेल ती जगाच्या बाजारात कुठेही मिळणार नाही . त्यामुळे जीवनात आपसूक दुःख व नैराश्य अदृश्य होऊन जीवन आनंदी व आशावादी होईल .
" मनास करावे मुक्त - स्वच्छंद
घ्यावा क्रिडेचा मनसोक्त आनंद ! "
मानसिक ताणतणावांचे निरसन फक्त नि फक्त या क्रिडेद्वारेच होते ! आपण पाहतो की , लहान मूल हे कसे नेहमी हासरे व आनंदी असते . त्याच्या या मनस्वी आनंदाचे मूळही दडले आहे तेही याच ' क्रिडेत ' ! ते मूल सतत फक्त नि फक्त खेळतच असते . शारिरीक हालचालीमुळे तो स्वच्छंदी मनाचा होऊन निर्भेळ आनंंदाचा मानकरी ठरतो . मग मला सांगा , जे कार्य लहान अजाण बालक करू शकतो ते आपण मोठे व अनुभवी माणसं का करू शकत नाहीत ? का आपण आपल्या जीवनात या क्रिडेला महत्त्वाचे स्थान देत नाही ? का आपण आपल्या आयुष्यात हा मनोविकार व डिप्रेशनला ' घर 'करून दिलंय ? कधी आपण या बालकाप्रमाणे आपले जीवन स्वच्छंदी व मुक्तपणे जगणार ? या मातीत गेल्यावर ?
" नाही गेली अजूनही वेळ
हे मानवा , आतातरी खेळ
मिळेल तुला अपार मनःशांती
जीवनी येईल नव - क्रांती !! "
मित्रांनो , या क्रिडेचं एक ताज उदाहरण तुम्हांला सांगते ! आता काही आठ - दहा दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे . माझी ओळख एका अशा मैत्रीणीशी झाली होती की ती आपल्या आयुष्याला कंटाळून नेहमी उदास व हताश रहायची . कारणही तसंच होत , एक तप होऊन संसारवेल सुनीचं होती . सारखं चिंता करून मानसिक ताणतणावाने शारिरीक वजनही वाढले . त्यातच भर म्हणून नोकरी निमित्तानं गळी एकांतवासाच लोडणं बांधल्या गेलं . ह्या एवढया मानसिक संकटांनी ती पार खंगून व खचून गेली होती . रात्रंदिवस ती तहान - भूक विसरून फक्त चिंता व रूदनचं करायची . सताड डोळ्यांनी रात्रा जागून काढायची . न हसायची न कुणाशी मनसोक्त बोलायची !
एके दिवशी मी तिच्या बंदिस्त मनोबांधाला वाट मोकळी करून दिली . तिला तिच्या दुःखाचे मूळ शोधून दिले . आणि काय आश्चर्य ! पहिल्या दिवशीच ओमकारांच्या व गायत्रीमंत्रांच्या उच्चाराने तिला फ्रेश वाटू लागले . नंतर शितली - शितकारीने तर तिच्या शरिरातील उष्णता गायब होऊन शरीर थंडगार वाटू लागले .काही प्राणायाम व व्यायामाने तर तिला अशी गाढ व शांत झोप येऊ लागली की जी कित्येक वर्षे तिने अनुभवली नव्हती ! आता तिचे मनं पूर्णपणे परिवर्तन होऊन ती एक आशावादी व सकारात्मकवृत्तीची बनली आहे . हा आमुलाग्र बदल घडवून आणणारा ' परिस ' , म्हणजे ही ' क्रिडाच ' , होय !
शेवटी मित्रांनो , एवढंच सांगावसं वाटते की , ह्या जीवनात निरोगी व आरोग्यसंपन्न व्हायचं असेल तर या क्रिडेविना तरणोपाय नाही ! ही एकमेव क्रिडाचं आपलं आयुष्य चिरतरूण व आत्मसंतुष्ट बनविते .
" जीवनी आणण्या आनंदाचा झरा
आपल्या शिरोपेचात ठेवावा हा क्रिडारूपी हिरा !! "
अर्चना दिगांबर गरूड ( स.शि.)
प्रा. शा. पांधरा , ता. किनवट
जि. नांदेड , मो. क्र. 9552954415
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
09) खेळाचे महत्व
शारीरिक खेळ हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे. ज्याप्रमाणे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, औषध हे सर्व लागतं. तसं निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या शरीराला व्यायामाची, खेळाची खूप आवश्यकता असते. खेळामुळे शारीरिक व्यायाम तर होतोच परंतु कसरतीनंतर भूकही लागते. आणि मानसिक संतुलनही टिकून राहते. त्यासाठी हवेशीर मोकळ्या मैदानात, क्रीडांगणातच खेळायला हवे. पाण्यात पोहणे हा सुद्धा एक खेळाचाच प्रकार आहे. खेळ सांघिक असो की दोघांसोबत , खेळ हा खेळच असतो.
खेळामुळे मनात स्पर्धा वाढते. खेळात वेळेचेही बंधन असते त्यामुळे कोणतीही गोष्ट वेळेत पुर्ण करण्याची सवय लागते. खेळात हार-जीत ही असतेच. त्यामुळे हारले की खचून न जाता पुन्हा उमेदीने उभे राहावे आणि जिंकण्याच्या प्रयत्नाने खेळत राहावे."अपयश ही यशाची पहिली पायरी असते" हे घोषवाक्य नेहमी मनावर बिंबवावे. जो जिंकला असेल त्याचं खिलाडूवृत्तीने नेहमी स्वागत करावे, अभिनंदन करावे. त्यातून हे साध्य होते की जिंकण्याची उत्स्फूर्त भावना नेहमी वाढीस लागते. जेव्हा खेळ हे गावापुरते, तालुक्यापुरते किंवा राज्यापुरते मर्यादित नसून ते देशांतर्गत सुद्धा खेळले जातात. आणि देशाबाहेर देखील खेळले जातात. खेळाचे अनेक प्रकार असतात. मैदानी खेळांच्यात कबड्डी, खो-खो,टेनिस, फुटबॉल, वॉलिबॉल, लंगडी इ. त्यामुळे खेळाचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे.बरेच खेळ राष्ट्रपातळीवरही खेळले जातात. त्यांच्यात राष्ट्रीयतेची भावना निर्माण होते.
आमच्या लहानपणापासून शाळेच्या मैदानावर आम्ही खो-खो, कबड्डी, लंगडी, क्रिकेट, टेनिस, हॉकी असे सर्व खेळ खेळत आलो आहोत, इतकेच नव्हे तर जिम्नॅस्टिक आणि ॲथलेटिक्स मध्ये सुद्धा आमची शाळा वरच्या क्रमांकावर आहे.शाळेत खेळमहोत्सव भरला जायचा. ते तीन-चार दिवस सर्व प्रकारच्या स्पर्धा होत असत. त्यात उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक. त्याशिवाय सर्व सांघिक खेळ देखील खेळले जायचे. मॅरेथॉन,धावणे, असे बरेच खेळ शाळेच्या खेल महोत्सव मध्ये खेळले जायचे .सर्वजण चुरशीने सराव देखील करत .खेळताना कितीतरी वेळा मुलांना लागते. खरचटते, मुरगळते. काही वेळेला हात पायाचे हाडदेखील मोडते. भांडणं होतात .परंतु एकीचे बळ वाढत असते. ज्यावेळी खेळाच्या सामन्यांत निर्णय घेण्यासाठी पंच असतात त्यावेळी पंचांच्या निर्णयावर विश्वास ठेवून खेळत राहिले तर खेळाची मजा वाढते. महोत्सवाच्या वेळी अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. परंतु शारीरिक कसरत मात्र खूपच होते. सर्वजण खेळाचा आनंद खुप हर्षाने आणि उल्हासाने घेत असतात. लहान मोठ्या सर्वांना खेळ खूप आवडतात. खेळाने शरीर निरोगी तर होतेच परंतु मन देखील प्रफुल्लित राहते. एक तास संध्याकाळी मैदानावर खेळून आल्यानंतर खूपच ताजेतवाने होते. शरीराची मरगळ निघून जाते आणि पुढच्या कामासाठी नवीन तजेला भरतो .त्यामुळे प्रत्येकाने हे ध्यानात ठेवायला हवे की खेळ हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे आणि क्रीडांगणावर खेळणे आपल्यासाठी अनिवार्य आहे.
सौ.भारती सावंत
मुंबई
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
10) 'आजची गरज खेळातून आरोग्याकडे'
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
असं म्हणतात 'आरोग्य हाच खरा दागिना आहे' खरोखर मानवी जीवनाचे सार हे त्याच्या आरोग्यवरच आवलंबून असते.sound mind in sound body असे म्हटले जाते ते काही उगाच नाही.खरेतर आपले मन आणि शरीर यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.निरोगी शरीरातच निरामय मन वास करू शकते.म्हणूनच ज्या राष्ट्राची युवा संपत्ती सुदृढ असेल तेच राष्ट्र अधिक प्रगतीपथावर आणि उद्योगशीलतेमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येते.
'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।
शरीर हे धर्म पालनाचे पहिले साधन मानले जाते ते काही उगाच नाही. साधी दात दुखी जरी असली तरी देखील आपले मन कोणत्याच कामात लागत नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.आणि त्यासाठीच खेळ , व्यायामआणि योगा या शिवाय तरणोपाय नाही .परंतु बदलत्या जीवन शैलीमध्ये याच गोष्टींच्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
आरोग्य हा आपल्या सर्वांच्या सर्वागीण विकासामधील एक महत्त्वाचा घटक आहे. सर्वागीण विकास साधायचा असेल, तर आपले स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वाचेच शारीरिक कष्ट कमी झाले आहेत. सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगामध्ये शारीरिक, मानसिकदृष्टय़ा सक्षम नागरिक तयार करणे आज आव्हान बनले आहे. तंत्रज्ञानाशिवाय तर तरणोपाय नाही. माणूस हा बुद्धिवान प्राणी असल्याने तो आपल्या बुद्धीच्या जोरावर आजूबाजूचे वातावरण बदलत आहे. मात्र या सर्व बदललेल्या जीवनशैलीमुळे माणूस शारीरिक कष्ट व शुद्ध मोकळी हवा यापासून कोसो दूर गेलेला आहे. आज सर्वच वयोगटांतील व्यक्तीवर निरनिराळे ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी मानसिक, शारीरिक, भावनिक असंतुलन वाढत आहे. त्यामुळे समाजामध्ये अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे.
वास्तविक पाहता आपले शरीर ही आपली मौलिक संपत्ती आहे. म्हणूनआपल्या शरीराची ओळख करून घेणे व त्या साठी नित्य नेमाने व्यायाम ,योगा करण्याची सवय अंगी बाणणे हे आपले प्राथमिक कर्तव्य प्रत्येकाने समजणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने याच गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून ऐहिक सुखाच्या मागे धावत आहोत . खरे तर शालेय जीवनापासूनच या सवयी रुजविणे आवश्यक असताना नेमकी त्याच वेळी मुलांच्या हाती मोबाईल,लॅपटॉप देऊन आणि विविध क्लासेसमध्ये त्यांना गुंतवून त्यांच्या भावी आरोग्य संपत्तीचे तीन तेरा वाजविण्याचे काम पालकांसह सर्वजण करताना दिसत आहेत.
खरे म्हणजे अंगी असणा-या प्रचंड ऊर्जेला विविध खेळातून जो वाव व दिशा मिळते याचाच सध्या अभाव दिसत आहे.
“We have moved from a state of nothing to everything! अर्थात- आम्ही काही नसल्याच्या अवस्थेतून सर्व काही असल्याच्या अवस्थेत पोहोचलो आहोत.” पण त्यामुळेच आपण आपल्या आरोग्याच्या महत्वपूर्ण संपत्तीकडे मात्र दुर्लक्ष करीत आहोत.पूर्वीच्या काळी माणूस निरोगी, आरोग्यसंपन्न व बऱ्याचदा निर्व्यसनी जीवन जगत असायचा. आज मात्र चित्र बदललेले दिसते. आरोग्यसंपन्न, निरोगी, निर्व्यसनी माणसे अगदी कमी होऊन फास्ट फूड ,खेळ, व्यायाम आणि योगा यांच्या अभावामुळे तरूण वयातच अनेकांना अनेक व्याधींनी ग्रासले जाऊन तरुणपणीच वृद्धत्वा कडे वाटचाल सुरू असल्याचे भयाण चित्र दिसत आहे. म्हणूनच केवळ अभ्यास आणि करियर याकडे लक्ष न देता खेळ,व्यायाम आणि आरोग्य यांची योग्य सांगड घालणे महत्वाचे आहे. शेवटी जाता जाता एव्हढंच म्हणावेसे वाटते---
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः
'सर्वजण सुखी आणि रोगमुक्त राहु देत,सर्वांच्या जीवनात चांगल्या घटना घडू देत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये' या साठी सर्वांनीच खेळ ,व्यायाम यातून निरामय आरोग्यकडे गेलं पाहिजे.
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
11) *खेळ आठवणीतले*
जस जस वय वाढत गेल, तस-तस खेळ हे आठवणीमध्ये राहत गेलं. लहानपणीच जणू वातावरण हे वेगळच होत. लहानपणी क्रिकेट खेळण्यासाठी ब्यॅट बॉल लवकर मिळायच नाही म्हणून, एखाद्या फळीचा तुकडा घेऊन व कागदामध्ये एखादा लहानसा दगड घालून व त्याला कापडाने बांधून बॉल तयार करायच मग आम्ही खेळायचो. तर दुपारच्या वेळेमध्ये लोखंड-साखळी हा खेळ खेळायचो. लोखंड-साखळी या खेळामध्ये एकाने डाव घायचा, व ठरवून दिलेल्या ठिकाणी सर्व जन लोखंडाला शिवत त्या जागेपर्यंत पोहचायच. असा हा लोखंड-साखळीचा खेळ खूप रमायचा. पावसाळ्यात मध्ये तर मोठ मोठे मैदानामध्ये विहिरीसारखे खड्डे पाडायचे व पाऊस येऊन गेल्यावर कुणाचा खड्डा जास्त भरला हे पाहण्यामध्ये मज्याच वेगळी होती. त्याच पावसाळ्यामध्ये गोट्या व भोवऱ्यान सारखे ही खेळ खूप मोठया प्रमाणात रंगायचे पण आज हे खेळ खेड्यामध्ये कुठे तरी चुकूनच मुले खेळत असलेले दिसतात. नाही तर आजची मुले ही ज्यास्त प्रमाणात मोबाईल वरती गेम खेळताना दिसतात. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
*लेखन : प्रतिक विजय उकले*
*इचलकरंजी , जिल्हा - कोल्हापूर*
*मो.नं - 8624872409*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
12) खरा दागिना
'Health is wealth'. आपले शरीर निरोगी, धट्टेकट्टे असणे हीच खरी संपत्ती. हे म्हणणे फार सोपे. पण प्रत्यक्ष कृतीत आणणे फार कठीण. कारण त्यासाठी लागणारे कष्ट घेण्यास बरेच जण कंटाळा करतात. किंवा केवळ आळशीपणा म्हणाला ना. प्रत्येकजण 'उद्यापासून व्यायामाला सुरुवात करीन' असे म्हणतो. पण तो उद्या मात्र कधीच उगवत नाही.
शारीरिक शिक्षण म्हणजे शारीरिक हालचालींवर शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया आहे.
खरं तर शारीरिक शिक्षणाची सुरुवात अगदी नवजात बालकापासून होते. बाळाची आई त्याला अंघोळीच्या अगोदर तेल लावून मसाज करते आणि मग आंघोळ घालते. हाता पायाचे व्यायाम करून घेते. लहान बाळाचे हेच शारीरिक शिक्षण असते. तेव्हापासून आई शिकवत असते, 'इतके सुंदर शरीर देवाने दिले आहे, त्याची नीट योग्य प्रकारे काळजी घ्या.' पण लक्षात कोण घेतो?
बाळ जसे मोठे होईल तसे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम व्यायाम त्याला शिकवले जायचे. आठव्या वर्षी गुरूगृही जाऊन प्रमुखत: दंड- बैठका, नमस्कार, तिरंदाजी, तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, अशा प्रकारचे शिक्षण पूर्वीच्याकाळी दिले जाईल. तेव्हा प्राणायाम, योग याला फारच महत्व होते. त्यामुळे मुलाची आत्मिक आणि बौद्धिक बैठक चांगली होत असे. त्यांना युद्धासाठी तयार केले जात असे.
आता एकविसाव्या शतकात शारीरिक शिक्षणाची पद्धत बदलली आहे. शारीरिक शिक्षणाचा उपयोग शाळा- कॉलेजमधून केला जातो. या शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्याचे शरीर, मन निरोगी ठेवणे, आचरण चांगले ठेवणे. नियमित व्यायामाची यासाठी गरज असते. अभ्यास करून मन आणि मेंदू थकल्यावर मोकळ्या हवेत व्यायाम करणे. त्यात खेळ पण अंतर्भूत आहेतच. ह्यात लांब उडी, उंच उडी, खो-खो, धावणे, कबड्डी, हॉकी, क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल अशा तऱ्हेचे खेळ शिकवले जातात. खेळ हा मुलांच्या आनंदाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. खेळल्यामुळे बुद्धीला आलेली मरगळ जाऊन ती ताजीतवानी होते.
आजकाल मुले सतत स्क्रीनवर असतात. त्यांना संध्याकाळी बाहेर बाहेर खेळणे आवडत नाही. कारण कष्ट नको अशी मुले घर कोंबडी,एकलकोंडी होतात. त्यांच्या चेहऱ्यावर निरोगी पणाचे चे तेज नसते. जर मुले मोकळ्या हवेत खेळत असतील, व्यायाम करत असतील, तर त्यांचा हेल्दी लुक वेगळाच असतो. वाढीच्या वयात मुलांनी व्यायाम केल्यास त्यांची उंची वजन दोन्ही वर चांगला परिणाम होतो.
खेळामुळे मुलांना नियम पाळण्याची सवय लागते. त्यांच्यात संघ भावना निर्माण होते. एकमेकात शेअरिंगची भावना वाढते. 'एक तीळ सात भावंडात वाटून घ्यावा' ही ती वृत्ती. खेळामुळे मनाची मशागत होते. मनाचा कणखरपणा वाढतो. धैर्य वाढते. खेळात हरलो तर वाईट वाटून न घेता, आपली खेळताना काय चूक झाली ते समजून घेऊन, ती सुधारणे, हे शिकले पाहिजे. खेळ चालू असताना विरुद्ध संघ हा शत्रू समान असतो. पण तो खेळ संपताच शत्रुपक्षातील जो गडी चांगला खेळला असेल त्याचे कौतुकही करता आले पाहिजे. नव्हे ते केलेच पाहिजे. असे sportsman's spirit खेळामुळे आपण शिकतो. जिंकलो तरी आनंदात वाहून जायचे नाही. हरलो तरी निराश व्हायचे नाही.
खेळामुळे, व्यायामामुळे आत्मविश्वास वाढतो. शारीरिक आणि आत्मिक शक्तीमुळे आलेला तो आपल्या स्वतःवरचा विश्वास असतो. त्यामुळे कुठलेही काम सहजपणे आत्मविश्वासाने केले जाते.
खेळ- व्यायामामुळे शरीर निरोगी बनते. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आजार रोग आपल्यापासून दूर राहतात. त्यामुळे मन आनंदित असते. आजारपणामुळे होणारी चिडचिड, अशांतता वगैरे गोष्टींना थाराच नसतो.
प्राणायाम, योग, योगासने, ओंकार साधना ही खरी तर आपलीच परंपरा. मधल्या काही वर्षात यास एवढे महत्त्व दिले गेले नाही. पण हल्ली पाश्चात्त्य देशातील लोकांनी आपल्या कडून ही कला शिकून घेतली. जगात त्याचा चांगला प्रसार व प्रचार होत आहे. आपले लोकही आता जागरूक झाले आहेत. त्यांनाही त्याचे महत्त्व पटले आहे. आता लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे हा व्यायाम करू लागले आहे.
आजकाल हास्ययोग ही शिकवला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या हसण्याने फुफ्फुसांना चांगला व्यायाम होतो.
आजकाल जिमला जाणे ही एक स्टेटस ची बाब बनली आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स असतात. त्याच्या साहाय्याने वेगवेगळ्या स्नायूंना व्यायाम देता येतो.
एरोबिक्स व्यायाम हा म्युझिक लावून त्याच्या तालावर केला जातो. कुंकू, कराटे, तायक्वांदो हे ही व्यायामाचे प्रकार आहेत.
सणावारी, मंगळागौरीला खेळले जाणारे खेळ बघा. सगळ्या खेळात व्यायामाचे, आसनांचे प्रकार साधले आहेत. तेही विशिष्ट गाण्याच्या ठेक्यात, तालासुरात. पूर्वी दळण -कांडण, धुणी-भांडी सगळे घरी केली केले जात असे. त्यामुळे मुद्दाम व्यायाम करण्याची गरज पडत नसे. आता या बऱ्याच गोष्टी मशीन मार्फत केल्या जातात. त्यामुळे जिम ला जावे लागते लागते. व्यायाम करावा लागतो.
नृत्यकला हा ही व्यायामच आहे. कुठल्याही प्रकारचा व्यायाम असो, खेळ असो, ते करणे महत्त्वाचे. त्यात सातत्य असणे महत्त्वाचे. म्हणजे तुम्हाला अनमोल, अमूल्य असा खरा दागिना लाभतो तो म्हणजे तुमचे सुदृढ, निरोगी शरीर.
शुभदा दीक्षित
9881062115
Shubhada09@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
13) शारीरिक शिक्षणाचे महत्व
शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे .शिक्षण हा शब्द “शास्” यामुळे संस्कृत धातू पासून आलेला आहे. याचा अर्थ शिस्त लावणे ,नियंत्रण करणे, अध्ययन करणे असा होतो .विविध शारीरिक हालचालींद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवांचे संघटीत ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण होय. स्नायुंची हालचाल व त्या संबंधित असलेल्या क्रियांना शारीरिक शिक्षण असे म्हटले जाते .”शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन ,आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणे”अशी शारीरिक शिक्षणाची व्याख्या केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाने केली आहे. आजच्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. गतिमान जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कमकुवत होत चालले आहे .मोबाईल ,संगणकावरील बैठे खेळ यामध्ये शारीरिक हालचाली कमी झाल्याने विद्यार्थीदशेत मधुमेह, लठ्ठपणा स्थूलपणा, चिडचिडेपणा विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. त्यावर उपाय केवळ आहार बदलणे हा नसून शारीरिक व मानसिक व्यायामाची जोड देणे आवश्यक आहे .
शारीरिक शिक्षणाचा तास बहुतांश विद्यार्थ्यांचा आवडता असतो. या तासाला कधी एकदा वर्गाबाहेर जातो असं विद्यार्थ्यांना होत असतं. खेळ म्हटलं की सर्व आनंदाने सहभागी होतात. परंतु या तासाला होणा-या कवायती, योगासने, सूर्यनमस्कार करायला बरेच विद्यार्थी नाक मुरडतात. पण त्यातूनच तर चांगल्या सवयी लागतात हे विद्यार्थीदशेत समजत नसतं.प्राथमिक स्तरावर इ.१ली ते ५वी तील विद्यार्थ्यांकरीता शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांतर्गत विविध अवयवांवर ताबा मिळवून कौशल्य संपादन करण्याच्या दृष्टीने धावणे, फेकणे,झेलणे आदि कसरतींचा अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. कार्यक्षमता वाढविणाऱ्या हालचाली करणे याचा अंतर्भाव शारीरिक शिक्षणात होतो. इंद्रीय विकास व शरीराची सुदृढता यावर कार्यक्षमता अवलंबून असते. शारीरिक क्रियांचे कौशल्य वाढविणे, मूलभूत क्रिया( चालणे, फिरणे ,उड्या मारणे ,झेलणे ,तोल सांभाळणे इत्यादी ) सहज व कौशल्यपूर्ण होण्याकरिता शारीरिक शिक्षण आवश्यक आहे.
शारीरिक शिक्षणामुळे व्यक्तिमत्व विकास सहज सुलभ होण्यास मदत होते.व्यक्तीमत्व म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक, अभिवृत्ति, अभिरुचि, कर्तुत्व, कलागुण यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात होय. आंतरिक व बाह्य व्यक्तिमत्व विकास होण्याकरिता शारीरिक शिक्षणाची गरज आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्याकरिता शारीरिक शिक्षण देणे आवश्यक आहे. मानवी मनावर देखील शारीरिक शिक्षणाचे संस्कार होतात. आरोग्य चांगले असेल तर मनही चांगले राहते.शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून तर म्हंटल आहे.”Sound mind in a sound body.”शारीरिक शिक्षणामुळे निर्णय शक्तीचा विकास होतो, खेळामध्ये काही निर्णय तात्काळ घ्यावे लागतात उदाहरणार्थ प्रतिस्पर्ध्यावर चढाई कशी, कुठून करावी आपला बचाव कसा, कुठे करता येईल यासंबंधीं निर्णय घेण्यासाठी सराव उपयोगी पडतो तर यासंबंधीचे धडे शारीरिक शिक्षणांतूनच मिळतात.तसेच संघनिष्ठा ,राष्ट्रनिष्ठा, समाजनिष्ठा देखील वाढीस लागतात. व्यक्ती भावनांवर नियंत्रण ठेवून त्यांना सहज आवर घालू शकते. जय-पराजय, आनंद दुःख अशाप्रकारच्या भावनांवर नियंत्रण ठेवणारी समायोजन साधणारी व्यक्ती आनंदी जीवन जगण्यास लायक होते. तसेच आत्मविश्वास, सदाचार प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, तत्परता, निष्ठावान इत्यादी वैयक्तिक गुणांचा विकास होऊन सहकार्य ,बंधुभाव आदरभाव, सहानुभूती, खिलाडूवृत्ती, समानानुभूतीही या गुणांची वाढ होते. नैतिक मूल्यांचे आपोआप संवर्धन होते. चारित्र्य घडविण्याचे काम शारीरिक शिक्षण करते.
वैदिक काळात देखील स्वसंरक्षण व स्वजाती संरक्षणाकरिता युध्दोपयोगी शिक्षण दिले जात असे. मध्ययुगीन काळात लढाऊ वृत्ती टिकवण्यासाठी कुस्ती, मल्लयुद्ध, अश्वारोहण, नेमबाजी,तलवार चालवणे ,भालाफेक, तिरंदाजी इत्यादी चा समावेश शारीरिक शिक्षणात होता. तसेच प्राणायाम सूर्यनमस्कार वनविहार इत्यादींचाही समावेश केला जात होता. समर्थ रामदासांनी गावोगाव बलोपासणेकरिता हनुमानाची मंदिरे उभारली .दंड बैठका ,सूर्यनमस्कार, वजन उचलणे, कुस्ती, दांडपट्टा चालवणे ,भालाफेक अनेक गोष्टींचा समावेश शारीरिक शिक्षणात होत असे.
भारत सरकारने शारीरिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्वाल्हेर येथे राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था 1957 मध्ये सुरू केली. तसेच पंजाब मधील पतियाळा येथे राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण 1961 मध्ये स्थापन केले. तेथे विशिष्ट खेळातील मार्गदर्शक तयार केले जातात. महाराष्ट्रामध्ये देखील औरंगाबाद येथे सहा आठवड्यांचा अभ्यासक्रम हा शिकविला जातो. 1912 मध्ये मध्यवर्ती सरकारने शारीरिक शिक्षणाकरता विशेष तरतूद केली होती. तेव्हापासून फुटबॉल, क्रिकेट सारखे खेळ सरकारी शाळांमध्ये शिकवले जाऊ लागले.
बहुतेक वेळा माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर शालेय विद्यार्थ्यांचा शालेय विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर शारीरिक शिक्षणाच्या तासिकांचाच वापर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी केला जातो. .विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या या तासिकांचे महत्त्व दुर्लक्षिले जाते. विद्यार्थी संख्या बघता क्रीडा शिक्षकांची ही कमतरता शाळा-महाविद्यालयांमध्ये दिसून येते. 200 ते 400 विद्यार्थ्यांमागे एक क्रीडाशिक्षक नेमले जातात.शारीरिक शिक्षणातून तयार झालेले क्रिडापटू ,क्रीडासंघ देशाला नावलौकिक मिळवून देतात.राष्ट्राच्या दृष्टीने हि अभिमानास्पद बाब असते.ऑलंपिंक सामन्यांमध्ये विविध प्रकारची पदके प्राप्त करण्यासाठी शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातूनच असे क्रीडापटू व संघ तयार होतात हे सत्य नाकारून चालणार नाही.म्हणूनच व्यक्तीमत्व विकास व राष्ट्रविकासाकरीता शारीरिक शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
शारीरिक शिक्षणाने साधूया
सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा,
नैतिक मूल्यांच्या आधारे
गाठूया कळस प्रगतीचा....
सौ.आरती डिंगोरे, नाशिक.
9404687729
aartidingore@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
14) लेख क्रमांक 6
विषय- खेळ/क्रीडा
धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मानव हा ताणतणावाखाली वावरत आहे.दररोजचा कामाचा व्याप यामुळे स्वतः कडे वेळ द्यायला वेळच कुणाकडे सापडेना.पण मन:शांती मात्र सगळ्यांना हवी आहे. यावर काय उपाय आहे का?
याला उत्तर आहे , या समस्येवर उपाय आहे. आता तुम्ही म्हणाल की कोणता तो उपाय ? सांगते.. या सगळ्यावर उपाय म्हणजे खेळ खेळणे होय.चकीत झालात ? होऊ नका कारण खेळ हा एकमेव तंदुरुस्ती चा उपाय आहे.खेळ म्हणजे सगळेच मैदानावर, घरात,नियमांत बंदिस्त राहून,मुक्तपणे खेळले जाणारे सगळेच खेळ होय.खेळाचे हे विविध प्रकार आहेत. जगाच्या विविध ठिकाणी विविध प्रकारचे खेळ खेळले जातात.खेळामुळे हे कसं शक्य आहे असे वाटते का ? हो अगदी खरे आहे.
खेळाडू आपला खेळ चांगला व्हावा यासाठी खूप मेहनत घेतात,सराव करतात.खूप त्रास सहन करतात.तेंव्हा कुठे ते यशाच्या जवळ जातात.या खेळाडूंच्या जीवनाकडे पाहिल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते.,उत्साह येतो.भारतीय खेळ हॉकी,कबड्डी, खो-खो. इ. तर क्रीकेटसारखे परदेशी खेळही भारतात खेळले जातात.आता खेळाडूंना ही शासन शिष्यवृत्ती देत आहे.यामुळे मुलं असो अथवा मुली खे आहे.ळात आनंदाने भाग घेत आहेत. वेटलिफ्टींगसारख्या,कुस्तीसारख्या खेळात मुलीही आता मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
अनाथ दिव्यांग खेळाडूंनाही शासनाच्या विविध प्रकारच्या योजन माहिती करुन घेणे क्रमप्राप्त आहे.खेळात खेळताना योग्य समन्वय घालावा लागतो.अंदाज अचूक असावा .याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे हॉकीचे जबरदस्त खेळाडू मेजर ध्यानचंद होय.त्यांना लोकं हॉकीचा जादूगार समजत . गोल करण्याचा त्यांचा परफेक्ट अंदाज होता.सर्वांना वाटे त्यांच्या स्टीकला लोहचुंबक लागले आहे की काय.तशी तपासणी ही झाली. त्याचप्रमाणे क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सनी म्हणजेच सचिन तेंडुलकर होय.अनेक विक्रम त्यांच्या नावावर नोंद आहेत. हे सगळं आपोआप नाही आले.तर त्या पाठीमागे त्याची मेहनत आहे.आज त्याचा वाढदिवस आहे.संपूर्ण जगातील लोक आज त्याला शुभेच्छा देत आहेत.
खेळामुळे अंगात उर्जा निर्माण होते.मन शांत होते.ताण सगळा निघून जातो. मनी सकारात्मक विचार येतात.ताजेतवाने वाटते.आमच्या लहानपणी शाळेतून आल्यानंतर आम्ही एक तखस खेळ खेळत असू.मग हातपाय धुवून अभ्यासाला बसायचो. त्यामुळे अभ्यास कधी कंटाळवाणा वापलाच नाही. कधी आळस आला नाही. आता खेळ ही संकल्पना बदलण चालली आहे. खेळ आजची मुले खेळ खेळतात पण मैदानावर नाही तर मोबाईल, कम्प्युटरवर खेळतात. तासंतास एकाजागी बसून वेळ घालवतात.पण याचा काहीच उपयोग नाही तर उलट नुकसानच आहे.एकाजागी बसल्यामुळे उर्जा खर्च होत नाही. शिवाय नजरेवर वाईट परिणाम होतात.
आरोग्य ही धनसंपदा मानली जाते. पण त्यासाठी आपण व्यायाम, योगासने, प्राणायामची जोड खेळाबरोबर द्यायला हवी.निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हणतात.हे खरेही आहे. त्यासाठी आपण खेळले पाहिजे. जीवनात खेळाला महत्त्व दिले पाहिजे.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
15) खेळ आणि खेळाडू
खेळ मानवी जीवनाचे एक अभिन्न अंग असायला पाहिजे. खेळ म्हणजे निखळ आनंद. लहानपणापासून पासून खेळा सगळी बालगोपाल मंडळी रमतात. नेहमीचे साधे खेळ लधोरी, शिवाशीवी, खो-खो ह्यानी सुद्धा शारीरिक क्षमता वाढते. चुरसीमुळे इच्छाशक्ती वाढते. छोट्या छोट्या दुखण्या कडे दुर्लक्ष करून मुले खेळणे चालू ठेवतात, त्यामुळे मुलांची सहनशक्ती वाढते. रोजच संध्याकाळी प्रत्येक सोसायटीच्या प्ले पार्क मधे, प्रत्येक छोट्या मोठ्या मैदानावर मुले गोळा होतात आणि सुरु एकच गलका.
लहान मोठे सर्व आप आपल्या वयानुसार घोळक्यात खेळत असतात. आनंदाचा वर्षाव होत असतो.
तर काही जागेवर अगदी वेग वेगळ्या खेळांचे प्रशिक्षण देणे चालु असते. संध्याकाळची ही वेळ सहसा आऊटडोअर खेळांसाठी राखून ठेवण्यात आली असते. शिस्त, स्वानुशासन शारीरिक बरोबर मानसिक क्षमतेचा सुद्धा विकास होतो.
मुलं खंबीर होतात. अपयश पचवायला शिकतात. त्यांचा मित्रच त्यांचा प्रतिस्पर्धी असतो त्यामुळे त्याचा विषयी कुठलीच नकारात्मक भावना येत नाही. प्रतिस्पर्ध्याच्या यशाचे कौतुक करायला शिकतात.
आजच्या हम दो हमारे दो च्या काळात अशी सकारात्मक भावना खेळण्यातूच वृद्धिंगत होते. .
पण आजच्या स्पर्धात्मक युगात खेळ सुद्धा निव्वळ स्पर्धा झाला आहे. हे योग्य नाही. खेळात काही अंशी स्पर्धा असणे आवश्यक आहे. त्याने मुलांचा सर्वांगीण विकास होतो ह्यात वाद नाही. पण बर्याच ठिकाणी पालकांना खेळाचे मुख्य मुद्दय़ाचा विसर पडतो. मुलांनी प्रत्येक सामना जिंकला पाहिजे. एवढेच नव्हे तर मुलांनी अभ्यासात ही पुढे असायला पाहिजे, खेळातही पुढे असायला पाहिजे. गाणे ही आले पाहिजे. मुलांना ते मशीन बनवुन टाकतात.
खेळ हा आनंदादायी गोष्ट आहे. त्याचा मुलांना जाच होता कामा नये. मुलाचा सर्वांगीण विकासात खेळाचा खूप मोठा वाटा असतो जर खेळा कडे खेळ म्हणून पाहिले तर. ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेणे अतिशय आवश्यक आहे.
डाॅ.वर्षा सगदेव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
16) आरोग्य जपण्यासाठी खेळ महत्वाचे
"आरोग्य हीच खरी संपत्ती" असं म्हटलं जातं. पण हे आरोग्य जपण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे शिकवते शारीरिक शिक्षण.
"शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे म्हणजे शारीरिक शिक्षण."
शारीरिक शिक्षण हे हे केवळ मैदानावर खेळ खेळण्यापूरते मर्यादित नसून त्याचा गाभा खूप मोठा आहे. तो गाभा समजणे खूप महत्वाचे आहे. कारण यात फक्त खेळांचा सहभाग होत नाही तर आरोग्यशास्त्र व मानसशास्त्राचा सुद्धा यात मेळ साधला गेला आहे. परंतु शासन याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करत असल्याचे जाणवते.
कारण, जेव्हा ऑलम्पिक चे सामने सुरु होतात तेव्हा भारताच्या नावावर बोटावर मोजण्याइतके मेडल्स येतात आणि तेव्हा राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी खेळाचे व शारीरिक शिक्षणाचे महत्त्व मोठ्या तोऱ्यात सांगत असतात. पण त्याची अंमलबजावणी होतांना मात्र दिसत नाही.
खेळाचा तास म्हटलं की शाळेचा परिसर स्वच्छ करणे किंवा एखाद्या विषयाचा अभ्यास मागे पडलेला असेल तर तो या तासात पूर्ण करावा हा बऱ्याच शाळेतला अलिखित नियम झालेला आहे. बऱ्याच शाळांमध्ये तर शारीरिक शिक्षकाचे पद सुद्धा भरलेले नसते. हि गोष्ट खूपच वेदनादायी आहे.
शारीरिक शिक्षण, खेळ, आरोग्य शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळावा तसेच हा विषय शिकविण्यासाठी पात्र शिक्षकांचीच नियुक्ती करावी हेच या माध्यमातून सांगेल.
गणेश सोळुंके,
(जालना)
8390132085
gnsolunke0092@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
17) खेलो इंडिया
भारतीय संस्कृती मध्ये पूर्वी मुलांना शिक्षणासाठी गुरुकुल मध्ये जावे लागायचे
स्वतःचे काम स्वतः करणे व शिक्षण घेणे अशा पद्धतीचे स्वयंशिस्तीचे शिक्षण घेऊन
मुले मात्र सुदृढ व कुतीयुक्त बसायची प्रात्यक्षिके खूप चांगल्या पद्धतीची असायची.आता मात्र याच बाबीची थोडी कमतरता मध्यंतरी होती शासनाने पुन्हा कुतीयुक्त ला भर दिला .खरेच आहे मुलांना कुतीयुक्त व स्वयंशिस्तीचे खूप गरज आहे.
"बाळा ,पाठांतर केलेस का ,पाठ कर
अशा सुचना पालक देत असतात परंतु त्यांच्या शरीराचे एकाठिकाणी बसून काय हाल होत असतील ह्याचा विचार कोणी करत नाही."फीट है तो हीट है"..हा मंत्र
ज्याच्या लक्षात आला तोच खरोखर यशस्वी म्हणायला हरकत नाही.
अस म्हणायला हरकत नाही की पुन्हा मागील काही गोष्टीना महत्व आले आहे .खेळाचे महत्व आजतागायत आमच्याकडे नव्हतेच अजून तेवढ्या प्रमाणात नाहीच म्हणा...परंतु आता ब-यापैकी शाळेमार्फत खेळात चुणूक दाखवणा-या मुलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर शिकणा-या मुलांना विविध खेळामध्ये सहभाग घेता येतो .परंतु ग्रामीण भागातील मुलांना मात्र अजूनही मागेच राहावे लागत आहे .त्या मुलाच्या नशीबाने त्याला जर खेळाची आवड असणारे शिक्षक भेटले तर तो पण जातो पुढे परंतु ग्रामीण भागात खेळाचे विशेष शिक्षक भेटत नाही.त्यामुळे मैदानावरील कागद वेचने व वर्ग मैदान स्वच्छता करण्यात आमचा खेळाचा तास संपून जातो.
' खरोखर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या "खेळ "या विषयाला जर कलाटणी दिली तर भारताच्या गळ्यात सुवर्ण पदकांच्या माळी पडायला वेळ लागणार नाही'.
ग्रामीण भागात खूप मुलं घडु शकतात त्यांची कष्टाळुवृत्ती चिकाटी त्या कामी येऊ शकते.खेळ कुणाला आवड नाही ."खेळातला उत्साह, चपलता मनाला
एक वेगळाच आल्हाद देऊन जाते".
मन प्रसन्न करते शरीरात देखील रक्तसंचार वाढतो ह्रदय देखील बलवान होते ..खूप चांगला बदल मानसिक व शारीरिक होतो पण त्यासाठी ...हालचाल करावी लागते.
आज थोडा आळसावलेला तरूण मोबाईल व टिव्हीच्या स्वाधीन करतो आहे स्वतःला परंतु हे आम्हा शिक्षकांना कमी करावे लागणार आहे.शिक्षकांनी खूप चांगले मार्गदर्शन करून विद्यार्थी पुढे आणावेत व भारताच्या भावी नागरिकांना खेळात अजून पुढे न्यावे .कारण फीट है तो हीट है.जय हिंद.....
*****************************
स्नेहलता कुलथे बीड
मोबा 7588055882
Kulthe.lata@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
18) *खेळाचे महत्त्व*
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात खेळाचे महत्त्व असतें खेळामुडे शारीरिक , सामाजिक ,मानसिक तसेच बौद्धिक जडणघडण आणि वाढ होण्यास खेळ हे फारच उपयुक्त ठरतात ।खेळामुळे सहकार्याची भावना वाढते ,खेळामुळे तान कमी होते सांघिक खेळामुळे संघ भावना निर्माण होते कल्पकता वाढीस लागते । खेळ जय आणि पराजय पचावण्यास शिकवते . नियमांचे पालन करण्याची सवय लागते. खेळामुळे काही प्रमाणात बुद्धी नियोजनबद्धता परखण्याचे गुण वाढीस लागतात.
सायकल चालवनेे, धावणे, पोहणे आणि इतर मैदानी खेळ या मुळे शरीरास व्यायाम मिडतो आणि शरीर बळकट बनण्यास साहाय्य होतो. तसेच स्नायूंच्या कौशल्यपूर्ण हालचाली आत्मसात होतात.छोट्या मुलांना खेळन्याच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. खेळामुळे मुलांची मानसिक वाढ हिन्यास साहाय्य होते.
लहानपणी माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट होता पाचवी पासून सातवी पर्यंत मला जेव्हा कधी शाळेपासून सवड मिळायची तेव्हा मी गल्लीतल्या माझ्या सवंगड्यां सोबत क्रिकेट खेळायचो.इथर खेळही आम्ही खेळत होतो. पण क्रिकेट हा खेळ आमचा सर्वात प्रिय खेळ होता. भारताचा एखादा अटीतटीचा सामना टीवी वर पाहत असतांना मी भावूक होत होतो तसेच एकदा भारत अश्याच एका अटीतटीच्या सामन्यात जिंकता जिंकता हरला तेव्हा मला माझे अश्रु अनावर झाले . इतका माझं प्रेम क्रिकेट वर होत.इथर खेळही आम्ही खेळत होतो. पण क्रिकेट हा खेळ आमचा सर्वात प्रिय खेळ होता. भारताचा एखादा अटीतटीचा सामना टीवी वर पाहत असतांना मी भावूक होत होतो तसेच एकदा भारत अश्याच एका अटीतटीच्या सामन्यात जिंकता जिंकता हरला तेव्हा मला माझे अश्रु अनावर झाले . इतका माझं प्रेम क्रिकेट वर होत.
जसे जसे आम्ही मोठे होत गेलो तसे तसे कालांतराने जुने मित्रही दूर झाले आणि क्रिकेट सुद्धा कमी झाले.खेळ हा मनुष्याच्या जीवनात फार उपयोगी आहे. त्यामुळे मनुषयची विचार करण्याची पद्धत प्रगल्भ होते , आणि त्याचा मनही मोठं होते. आज गाव गावात विविध खेळाचे प्रतियोगीता होत असतात, त्यात विध्यार्थी आणि प्रौढांना सुद्धा संधी दिली जाते. देशाच्या प्रत्येक कन्या कोपऱ्यात खेळाच्या प्रतियोगीतेतुन देशाला चांगले खेळाडू मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाह्मदे खेळून आपला व आपल्या देशाचा नाव खेळाच्या माध्यमातून पुढें नेत आहेत . खेळामुळे आंतरराष्ट्रीय संबंध जवळ येत आहेत.
--------*****---------
- महेंद्र सोनेवाने (गोंदिया) 9421802067
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सर्व लेख वाचन केल्याबद्दल आभारी आहे.
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
सर्वांनी आपापल्या परीने चांगले लेख लीहले आहेत. सर्वांचे अभिनंदन. खेळ व त्या विषयी उत्तम माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार.
जवाब देंहटाएं