*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- पाचवा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 23 एप्रिल 2020
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 5
*विषय :- पुस्तक किंवा ग्रंथ*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
पुस्तकाने सुधारेल मस्तक
जगविख्यात लेखक विल्यम्स शेक्सपिअर यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस 23 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगात जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा प्रासंगिक लेख.
जीवनाला दिशा देण्याचे काम पुस्तकाद्वारे केल्या जाते. पुस्तक म्हणजे गुरू आहेत, मित्र आहेत आणि आपले जीवनसाथी देखील. ज्यांच्या जीवनात पुस्तकाला जागा नाही त्याचे जीवन निरर्थक आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तसं पाहिलं तर पुस्तकाचा आणि आपला संबंध लहानपणापासून आलेला असतो. अगदी बालपणीचा विचार केल्यास आपणाला रंगीबेरंगी पुस्तक खूप आवडतात म्हणून आपले वडील मंडळी अगदी त्याचप्रकारचे पुस्तक आपल्यासाठी आणून देत असत. जसे वय वाढत जाते तसे पुस्तकाचे प्रकार देखील बदलत जातात. शाळेत जाण्याचे वय झाले की अभ्यासक्रमाचे पुस्तका शिवाय इतर अवांतर पुस्तक वाचण्याची सवय लागावी म्हणून शाळेत गोष्टीची पुस्तके वाचायला देतात. पण सर्वच मुले ही पुस्तके वाचतात असे नाही काही मुले नाईलाजस्तव हातात पुस्तक धरतात तर काहीजण मन लावून पुस्तकाचे वाचन करतात. जी मुले शालेय जीवनात अवांतर पुस्तकांचे वाचन मन लावून करतात ते भविष्यात देखील पुस्तकं वाचतात असे नाही तर पुस्तकाशिवाय त्यांना करमत देखील नाही. पुस्तकातून आपणाला ज्ञान व माहिती मिळते सोबतच मनोरंजन देखील होते हे ज्याला कळते तीच व्यक्ती पुस्तक वाचनाकडे गांभीर्याने लक्ष देऊ शकते. बऱ्याच जणांना हेच कळत नाही की, पुस्तक कशासाठी वाचन करायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर ज्याला मिळते त्याचे वाचन योग्य दिशेने होत असते. वक्ते मंडळी बोलण्यासाठी उपयोगी पडावे म्हणून नेहमी काही ना काही वाचत असतात. लेखक मंडळी आपल्या साहित्याची समृद्धी व्हावी, लिखाण उत्कृष्ट व्हावं म्हणून वारंवार स्वतःला पुस्तकामध्ये गुंतवून ठेवतात. शास्त्रज्ञ लोकं नवीन शोध लावण्यासाठी माहिती मिळवितात, त्यासाठी त्यांना अनेक पुस्तकं वाचावं लागतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते, अनेक प्रकारची माहिती मिळविण्यासाठी ते दिवसातले वीस तास वाचनामध्ये घालावीत असे. त्याचे वाचनाचे वेड जगावेगळे होते. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे भेटलेली माणसं आणि दुसरं म्हणजे वाचलेली पुस्तकं. आपले मस्तक म्हणजे डोक्यातील मेंदू याचा चांगला विकास साधायचा असेल तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही. जगात असे अनेक उदाहरणे आहेत ज्याचे जीवन पुस्तकामुळे पूर्णतः बदलून गेले आहे. दीडच दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे पुस्तकामुळेच लोकशाहीर बनू शकले. अक्षरशत्रू असलेली सावित्रीबाई फुले पुस्तकांच्या मदतीने देशातील पहिली महिला मुख्याध्यापिका व महिलांच्या शिक्षणातील क्रांतीज्योती ठरल्या. स्वातंत्र्यचळवळीत क्रांतिकारक मंडळी जेंव्हा तुरुंगात जात असत तेंव्हा पुस्तकं हेच त्यांचे प्रमुख आधारस्तंभ होते. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हे पुस्तक लिहून काढलं तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी तुरुंगात असतांना डिस्कव्हरी ऑफ इंडिया ( भारत एक खोज ) नावाचे पुस्तक लिहिले आहे. एकांतवासातील खरा मित्रा म्हणजे पुस्तक. आजकाल अशी ओरड ऐकायला मिळते की, पुस्तक वाचणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. महाराष्ट्रात अनेक चांगले लेखक व कवी झाले आहेत, ज्यांचे साहित्य त्याकाळी अत्यंत चवीने वाचल्या जात असे. आज त्याप्रमाणात साहित्य प्रकाशित होत नाही किंवा तसे वाचक नाहीत असे बोलल्या जाते मात्र त्यात काही तथ्य नाही. आज ही अनेक पुस्तकं प्रकाशित होत आहेत आणि वाचक मंडळी वाचत आहेत. पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी काही पाऊले उचलणे आवश्यक आहे असे वाटते. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविली तरच भविष्यात त्याचे फायदे बघायला मिळू शकतात. कोणत्याही गोष्टीची पायाभरणी ही शालेय जीवनातूनच करावी लागते. मोठे झाल्यावर त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करतो म्हणणे अशक्य आहे. म्हणून घरात पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी मुलांच्या अवांतर वाचनाकडे लक्ष देऊन त्यांच्यात पुस्तकं वाचण्याची गोडी निर्माण करावी. असे म्हटले जाते की, बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे आणि विचार करण्यासाठी वाचन केले पाहिजे. जेवढे जास्त आपण वाचन करू तेवढं आपण समृद्ध होत जातो. ज्याप्रकारे सोन्याच्या वस्तूमुळे स्त्रियांचे सौन्दर्य अधिक खुलून येते तसे आपल्या मनाचे सौंदर्य खुलून येण्यासाठी पुस्तकाचे वाचन महत्वाचे आहे. आपले मन शुद्ध करण्यासाठी पुस्तक वाचणे आवश्यक आहे. कोणत्याही पुस्तकाचे मोल पैश्यात करणे अशक्य आहे. पुस्तकांची किंमत सोन्याहून जास्त आहे. सोन्याची चोरी होते म्हणून आपण त्याला लॉकर मध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी जपून ठेवतो. ताई पुस्तकांना ठेवण्याची गरजच नाही म्हणून घरात सोने ठेवण्यापेक्षा पुस्तके ठेवत जावे. पुस्तक वाचताना आपण एकटेच असतो. पुस्तकांशी एकजीव झालो की आपणाला तहानभूक देखील लागत नाही. एवढं तल्लीन होऊन जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकवेडे होते. जगात पुस्तकासाठी घर बांधलेलं एकच व्यक्ती होते ते म्हणजे डॉ. आंबेडकर. ते म्हणत माझ्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयात मी पाव घेईन आणि दुसऱ्या एका रुपयात पुस्तक विकत घेईन. पावामुळे माझ्या पोटाची चिंता मिटेल आणि पुस्तकांमुळे डोक्याला खुराक मिळेल. म्हणून आपण देखील आपल्या जीवनात दरवर्षी काही चांगली पुस्तके विकत घ्यायला हवी. मित्राच्या वाढदिवसाला अन्य काही भेट देण्यापेक्षा पुस्तकं भेट देत राहावे. कार्यक्रमात येणाऱ्या मान्यवरांना देखील पुष्पहार, शाल, श्रीफळ असे काही देण्यापेक्षा एक छानसे पुस्तक दिले तर किती चांगले होईल. मकरसंक्रांतीच्या काळात महिला वर्गाकडून हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यात वाण म्हणून अनेकजण वेगवेगळे वस्तू देत असतात. त्याऐवजी वाण म्हणून पुस्तकं देण्याची प्रथा सुरू करणे आवश्यक आहे. सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की, खूप वाचन करण्यापेक्षा थोडे वाचावे आणि त्यावर चिंतन मनन करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे खरा विकास होतो. एखादं चित्रपट पाहिल्यावर आपण मित्राला ज्याने ते पाहिलं नाही त्याला स्टोरी सांगतो अगदी तसेच वाचलेल्या पुस्तकाची स्टोरी इतरांना सांगावी. त्याविषयी चर्चा करावी म्हणजे इतर लोकं देखील वाचन करतात. आमचे मुंबईचे एक शिक्षक मित्रा आहेत वेच्या गावित नावाचे, पुस्तक भिशी नावाचा उपक्रम त्यांनी चालविला जो की संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण शाळेत पोहोचला. आपण वाचन केलेले पुस्तक इतरांना द्यावी आणि त्यांच्याकडून पुस्तक आपण घ्यावे म्हणजे खूप पुस्तकांचे वाचन करता येईल. निदान पंधरा दिवसातून एका पुस्तकांवर चर्चा करावी म्हणजे त्या पुस्तकाची महती इतरांना कळेल. शेवटी जाता जाता सांगावे वाटते की, पुस्तक वाचतांना एकच काळजी घ्यावी कोणतेही अश्लील पुस्तक जीवनात कधीच वाचू नका. असे पुस्तक आपल्या जीवनाला वाईट वळणावर घेऊन जाऊ शकतात. मस्तकात सुधारणा होण्याऐवजी ते बिघडले जाऊ शकते आणि आपले वाचन धोक्याचे वळण घेऊ शकते. म्हणून डोक्यात चांगले विचार उत्पन्न होण्यासाठी चांगलेच पुस्तकं वाचत चला आणि इतरांना सांगत चला.
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड 9423625769
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
01) वाचन संस्कृती वाढावी...
ग्रंथाना गुरु मानण्याची आमची संस्कृती, पुराणकाळापासून अनेक ग्रंथानी माणसांना ज्ञानसमृद्ध केले आहे. हाच समृद्धीचा वारसा पुढे अनेक लेखकांनी सांभाळत महाराष्ट्रात वाचन संस्कृती विस्तारीत केली. अनेक गावात वाचनालये निघाली आणि पुस्तकाची दालनं वाचन वेडयांसाठी खुली झाली.जे काल वाचणारे होते तेच आजही वाचणारे आहेत.वाचकवर्गात हवी तशी वाढ होताना दिसत नाही. कपाटात सजलेली पुस्तके वाचकांच्या प्रतिक्षेत कित्येक दिवस पडून असतात. चटक मटक आणि संस्काराहिन पुस्तकांची ओढ असणारे आंबटशौकीन तुरळक पुस्तके हाताळताना दिसतात. परखड बोलने टोचणारं असले तरी बोलणे भाग आहे. आणि मी नाही बोललो तरी वास्तव कांही झाकले जाणार नाही. शासनाचे उदात्य हेतूने दिले जाणारे अनुदान सोईस्करपणे इतर ठिकाणी वळवणे वा लाटणे यासाठीच गावोगावी वाचनालये उभारली गेली. हा सर्वसकट
माझा मुळीच आरोप नाही. पण हेही तथ्यहिन नक्कीच नाही.टीव्ही आणि इंटरनेटमुळे तसेच हातात अॅन्डराईड मोबाईल आल्याने पुस्तकांची पाने उलगडत बसण्यास लोकांना सवड आणि आवड नाही. तरीही वाचनालये जोमात चालू आहेत. कपाटात असणारी पुस्तके त्याच त्या लेखकांची आणि पुन्हा पुन्हा वाचलेली. नवे लेखक नवे कांही भावनारे लिहताना दिसत नाहीत. आणि त्यांनी ढिगभर लिहलेले कोणी वाचताना दिसत नाही. जोमात चालणारी वाचनालये दिशा हरवून दशा दाखवत उभी आहेत. आमचे वाचन हरपून बसले आहे. गावोगावी उभी असणारी वाचनालये अनुदान
प्राप्तीची केंद्र म्हणून प्रतिमा जी निर्माण झालेली आहे ती पुसली पाहिजे. वाचन संस्कृती रुजली पाहिजे , वाढली पाहिजे. ग्रंथाचा सहवास चांगली पर्यटन स्थळं मिळवून देतो. चांगल्या लोकांचा सहवास देऊन जातो. म्हणूनच ग्रंथ हे गुरुच नव्हे तर सखासुद्धा आहेत. नाही तरी कोणीतरी म्हंटले आहेच की,वाचाल तर वाचाल..... ! वाचनालयाची आजची दुर्दशा आणि दिशा बदलण्याची सर्वसी जबाबदारी तुम्हा आम्हावर व स्वतःला शहाणे सुशिक्षित समजणाऱ्यांवरचआहे.
हणमंत सोपान पडवळ
उस्मानाबाद
hanamantpadwal8956@gmail.com
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
02) जीवन जगण्याची कला शिकवणारा माझा सखा - पुस्तक
23 एप्रिल म्हणजे माझ्या सर्वात आवडत्या मित्राचा वाढदिवस. मला जेव्हा हवं तेव्हा माझ्यासाठी सतत उपलब्ध असणा-या माझ्या मित्राच्या खूप आठवणी आहेत.काही आठवणी शब्दात मांडता येतात तर काही शब्दांत मांडता येत नाही. आजवर मझ्या पुस्तक मित्राने मला खूप काही शिकवले आहे नव्हे मला त्यानेच घडवले आहे .
आपण पाहतो आजच्या धकाधकीच्या काळात मानवी नात्यात कुठं न कुठं उणीव भासत राहते . व्यक्तींचे मूड्स नेहमीच बदलत राहतात . कधी चिड चिड तर कधी अबोला .सर्वांचे मन जपण्यासाठी आपले मन कुठे तरी मारुन टाकावे लागते .
अशावेळी मनाला गरज असते . आपल्याला कोणीतरी समजून घेणार्याची कोणीतरी असावं समजून सांगणारं माझंही मन जपणारं . अशावेळी बोलक्या मनुष्यांपेक्षा न बोलता समजून सांगणारे पुस्तकच मला जवळचे वाटते .
एक काळ होता बालपणाचा त्यावेळी पुस्तकांपेक्षा मित्रमंडळी फार जवळची वाटत होती. पुस्तक वाचणं म्हणजे काहीतरी कठीण काम वाटत होते . पण माझ्या नकळत या पुस्तकांनी च मला उजेडात आणले .त्यांच्यातल्या ज्ञानाच्या भंडार्याने च मला जीवन जगण्याची कला शिकवली.
लहानपणापासून मला जीवनात पदोपदी मार्गदर्शन केले. ते माझ्या न बोलणार्या या पुस्तक मित्राने . सर्व काही शिकवले . आयुष्याचे गणित कसे सोडवावे . आयुष्यात जिद्दीने कसे लढावे हे ज्ञान ऐतिहासिक कथा कादंबऱ्यांचे पान शिकवून गेले . आजही थोर विचारवंत आपल्यात जिवंत आहेत ते त्यांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकांच्या रुपाने . 'मरावे परी पुस्तकी रुपात उरावे ' हे त्यांनी लिहिलेले पुस्तकांना पाहून सहज मनी येऊन जाते .
तसं पाहिलं तर संपुर्ण पिढी घडविण्याचे काम पुस्तकच करत असतात . आज आपण संगणक युगात राहतो . आज सर्व माहिती एका लहानशा 'चीप' मध्ये संग्रही करून ठेवता येते पण ती माहिती कुठे गहाळ होण्याची कुठे पुसल्या जाण्याची भीतीही असते .आजकाल तर काँपी पेस्ट करुन साहित्य चोरीचे ही प्रकार वाढता आहेत . अशात लिहून ठेवलेले साहित्य पुस्तक रुपात सुरक्षित आणि जसेच्या तसे समाजा समोर येते. ह्या साठी आजही पुस्तक हे सुरक्षित ठरते .ह्यात असलेली माहिती पिढ्यानपिढ्या उपयोगी येते मग ते कोणतेही धार्मिकशास्त्र असो किंवा कथा कादंबऱी असो किंवा सभवोतालच्या जगाचे ज्ञान सांगणारे मासिक असो. लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या बुद्धी लागणारे भोजन यात असते . प्रत्येकाच्या बुद्धीला पचेल असे भोजन या पुस्तक मित्रा जवळ असते .
मला पुस्तक वाचण्याचा लळा लागला तो शाळा सोडल्यावर. असं म्हणतात ना एखाद्या वस्तू ची किंमत फक्त दोन वेळा कळते एक तर ती आपल्याला मिळत नसेल तेव्हा आणि दुसरे ती मिळवून गमावून देतो तेव्हा . तसंच झालं माझं शाळा सुटली संसाराची दोरी हाती आली . तेव्हा मला माझ्या कधीही न रुसणारा कधीही न भांडणारा आणि चुकलं तर लगेच मार्ग दाखवणारा माझा पुस्तक सखा मला हवा हवासा वाटू लागला .मी मला मिळेल ते पुस्तक वाचून काढू लागले . अगदी उत्सुकतेने शालेय बालभारती भूगोलाचे सर्व इयत्तांचे पुस्तक वाचून काढायचा मला छंदच लागला . माझ्या आजूबाजूला राहणार्या लहान मुलांचे बालभारती चे पुस्तके मी एका दिवसात वाचून पुर्ण करु टाकत असे . तेव्हा पासून पुस्तकांची माझी खूप घनिष्ट मैत्री झाली. मग हळुहळू कादंबर्या वाचायला लागले . भौगोलिक माहिती वाचायला मला फार आवडत असे . टिव्ही पाहणे म्हणजे गडबड गोंधळ वाटत असे . पुस्तक वाचणे म्हणजे एक रम्य शांतता एक सुंदर जग अशी माझ्या मनाची संकल्पना दृढ झाली . मला जीवन जगण्याची कला शिकवली ती माझ्या या अबोल पुस्तक मित्राने .
तो आवाज करत नाही
पण त्याचे शब्द खूप काही
सांगून जातात .
जीवनात संघर्षाची कला
नकळत शिकवून जातात .
असा हा माझा पुस्तक मित्र
तुम्हाला ही आवडेल .
बघा एकदा त्याच्याशी मैत्री करून नक्कीच जीवनात हरवलेला आनंद परत येईल.
🖋 सौ सुवर्णा सोनावणे चाळीसगाव .
७७४४८८००८७
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
03) इंटरनेटच्या दुनियेतच पुस्तके वाचुया
माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे पुस्तक होय. माणसाला बालपणापासून घडवण्याचे काम संस्कार करतात.कुटुंबातून व शाळेतून उत्तम संस्कार मिळत असतात.असाच वाचनाचा संस्कार बालपणी आपले गुरुजी आपल्याला देतात.अ आ इ पासून ज्ञ पर्यंत आपली स्वर व व्यंजनाशी ओळख होते. हळूहळू आपण वाचायला शकतो.वाचनामुळे आयुष्यात किती मोठा फायदा होतो,ते त्या वयात कळत नाही.पण आपण वाचन करत जातो.हीच वाचनाची सवय माणसाला आयुष्याला समृद्ध बनवते.कारण प्रत्येक जण ज्या प्रकारचे वाचन करतो,त्यानुसार त्याचे विचार बनत जातात.विचारावर त्याचे आचरण घडत जाते.आचरणातून त्याचे कार्य घडत असते.म्हणून वाचनाची सवय ही प्रत्येकाला असलीच पाहिजे. वाचनामुळे माणूस किती मोठा होतो,याचे उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होय.डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना शाळेत जायला लागले.त्या काळातील समाजाने अस्पृश्यतेच्या नावाखाली त्यांना खूप छळले.यामध्ये वर्गातील विद्यार्थी सुद्धा मागे नव्हते.वर्गातील मुले बाबासाहेबांशी बोलत नसत.त्यांना जवळ बसू देत नसत.कुणी स्वतःहून त्यांच्याशी मैत्री करत नव्हते.यातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकाशी मैत्री झाली.याचा फायदा असा झाला की, याकाळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तके वाचायला सुरुवात केली.मिळेल ते पुस्तक त्यांनी वाचुन टाकले.यामुळे त्यांच्या ज्ञानात प्रचंड वाढ झाली.वाचनामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अठरा-अठरा तास अभ्यास करण्याची सवय लागली होती.वाचनामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले.आज संपूर्ण भारत देशात व देशाच्या बाहेर सुद्धा बाबासाहेबांचे विचार व कार्याची प्रेरणा घेतली जाते.म्हणून प्रत्येकाने वाचन केले पाहिजे.वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे.भारत देशाने विज्ञान व तंत्रज्ञानात प्रगती केली.या प्रगतीचा प्रभाव थोडासा आजच्या तरुण पिढीवर विरुद्ध होताना दिसत आहे.त्याचे कारण असे की आजची तरुण पिढी मोबाईल व इंटरनेट मध्ये प्रचंड गुंतली आहे.आज प्रत्येक व्यक्तीकडे अत्याधुनिक मोबाईल आहे.त्यामुळे वाचनाची सवय हळूहळू कमी होत चालली आहे.कुटुंबातील संवाद कमी होत आहे.गप्पागोष्टी, संवाद,चर्चा होताना दिसत नाही.याचे कारण म्हणजे मोबाईल,इंटरनेट, टीव्ही, लॅपटॉप, वाट्सअप, फेसबुक, ट्विटर,यासारख्या गोष्टींचा अतिवापर होय.जुन्या काळात प्रत्येक जण न्यूज पेपर आवडीने वाचायचा. वाचनालयात जाऊन वाचन करायचा.अनेक कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, प्रवास वर्णन, नाटक,संवाद पत्रिका,आवडीने वाचायचे.यामुळे वैचारिक पातळी अत्यंत चांगली होती.आज आपण पाहतो शिक्षणाची टप्पे पार करताना प्रत्येक जण वाचन करतो.अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी वाचन करतो.स्वतःची ध्येय साध्य झाले की, जो तो आपापल्या व्यवसायात, नोकरीत,काम धंद्यात स्थिरावतो.व हळूहळू वाचनापासून दूर होतो.माणसाला ज्याप्रमाणे शारीरिक वाढ व विकासासाठी उत्तम आहार व व्यायामाची गरज आहे.त्याप्रमाणे बौद्धिक विकासासाठी वाचनाची गरज आहे. प्रत्येकाला लहानपणापासून वाचण्याची सवय लागावी यासाठी राज्यसरकारने 15 ऑक्टोंबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सुरू केला आहे.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोंबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो.डॉ.अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येकांनी वाचनाचा छंद जोपासला पाहिजे.देशातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक विचार करून स्वतःला समृद्ध करण्यासाठी वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे.म्हणून आपण सर्वजण नियमित वाचन करूया व इतरांना सुद्धा वाचनाची प्रेरणा देऊया.
राजेंद्र प्रल्हाद शेळके
रा.किनगाव राजा ता.सिंदखेड राजा
जि.बुलढाणा 9823425852
rajendrashelke2018@gmail.com
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
04) वाचूया पुस्तक, सक्षम करूया मस्तक
आज पुस्तक दिन !
माणसाला विचारांनी समृद्ध व्हायचे असेल तर पुस्तकासारखा चांगला मित्र नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, ' जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि उरलेल्या 1 रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवील. पुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्यांच्या घरी नाही पुस्तकांचे कपाट त्याचे घर होईल भुईसपाट .
पुस्तके का वाचावीत याचे कारण सांगताना गांधीजी म्हणतात , ' पुस्तक वाचकाचे मस्तक सशक्त होते आणि सशक्त मस्तक शक्यतो कोणासमोर नतमस्तक होत नाही'.
भगतसिंग तुरुंगात होते. दुसऱ्या दिवशी त्यांना फाशी दिली जाणार होती. तरीही आदल्या रात्री भगतसिंग पुस्तक वाचत बसले होते. जेलर हे सर्व पाहत होते. न राहवून जेलर तेथे आले आणि म्हणाले, ''अरे तुला तर उद्या फाशी देणार आहेत. मग या पुस्तक वाचनाचा काय फायदा?" . तेंव्हा भगतसिंग म्हणाले , " माझ्या वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील".
पुस्तकाच्या वाचनातूनच जगण्याची प्रेरणा मिळते. संस्कारांचा ठेवा मिळतो. संघर्ष कळतो. जागतिक ठेवा ,सामायिक वारसा, रूढी ,परंपरा, भले बुरे सारं काही पुस्तकांच्या वाचनातून मिळते.
सुदैवाने आज मराठी भाषा देखील साहित्याने समृद्ध झालेली आहे. आज आम्हाला शेक्सपिअर , उडवर्थ यांच्या साहित्यकृती इतक्याच दर्जेदार साहित्यकृती आपल्या मराठीत दिसू लागल्या आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मराठीचे बोलू कौतुके,
परी अमृतातेही पैजास जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन.
दुर्दैवाने आज वाचक कमी होत चालल्याची स्थिती दिसून येत आहे. ग्रंथ किंवा पुस्तक वाचनाचे पेशन्स आज वाचकांमध्ये दिसत नाहीत. व्हाट्सएप किंवा फेसबुक युनिव्हर्सिटीतून ज्ञान मिळवणारे वाचक अलीकडे वाढत चालले आहेत. परिणामी मुद्रित साहित्याला निश्चितच वाईट दिवस आलेले दिसतात. एखादे दुसरे चेतन भगत, अच्युत गोडबोले यासारख्या नामवंत लेखकांच्या पुस्तकांच्या लाखो प्रती खपतात हे वास्तव असले तरी लेखकांची पहिली आवृत्तीही खपत नाही हे वास्तव मान्य करावेच लागेल.
म्हणूनच आज पुस्तकदिनी केवळ भाषणे ठोकून काहीही होणार नाही तर प्रत्येकाने महिन्यातून निदान एक तरी पुस्तक विकत घेण्याचा आणि ते वाचनाचा संकल्प करायला हवा. आपल्याकडे ग्रंथालयांची संख्या देखील विपुल आहे पण कमतरता आहे वाचकांची. म्हणूनच वाचन चळवळ गतिमान करणे हे सुशिक्षित असलेल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
आज या पवित्र दिनी आपण सर्व संकल्प करूया. पुस्तके वाचूया आणि समृद्ध होऊया.
सुधाकर रामदास पाटील
शहापूर, ठाणे 7798963063
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
05) " पुस्तके - एक व्यक्तीमत्वाचा आरसा "
मित्रांनो , आपल्या जीवनात आई - वडिल , गुरू , मातृभूमी , याप्रमाणेच पुस्तके - ग्रंथ यांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे . ही निर्जीव पुस्तके सजीव मानवांच्या जीवनात आनंद , यश , किर्ती निर्माण करीत असतात . मानवी व्यक्तीमत्व साकारण्याचे ते एक यशस्वी व प्रभावी साधनच होय . कारण पुस्तकातील विचारधारेवर आपले मनोविश्व प्रतिबिंबित होत असते .त्या विचारांचा ठसा आपल्या व्यक्तीमत्वावर पडत असतो . म्हणून , "पुस्तके ही एक व्यक्तीमत्वाचा आरसाच होय . "
" पुस्तकासम नसे मित्र अन्य
त्याच्याविना जीवन होई शून्य ! "
पुस्तके आपल्या जीवनात एका मित्राची भूमिका बजावित असतात . सूर्याचे एक नाव मित्र आहे . तद्वतः ही पुस्तके आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी काळोख दूर सारून ज्ञानरूपी प्रकाश निर्माण करतो . म्हणून अशा पुस्तकं मित्रांशिवाय आपल्या आयुष्य शून्यच ठरते , हो ना !
" पुस्तकांची चाळीता पान
आयुष्याची बहरेल रान ! "
पुस्तके ही आपल्या आयुष्यात ज्ञानासह आर्थिक भूकही शमवत असतात . खरंच , फक्त दोन - चार हजार रूपयांची पुस्तके आपल्याला आयुष्यभर नव्हे तर काही पिढ्यापर्यंतची संपत्ती मिळवून देतात !
"पुस्तकांची जुळवीता मैत्री
होई उज्ज्वल भविष्याची खात्री ! "
खरंच , या पुस्तक मित्रांमुळे आपले भविष्य हे उजळून जाणार . तेव्हा आपण आपल्या पाल्याला बालपणीच ह्या मित्राची ओळख करून त्याच्याशी आयुष्यभराची गट्टी करायला शिकवायला हवे ! कारण आपल्या समाजात , देशात सुसंस्कृत व सुसंकारी नागरिक निर्माण करण्याचा ' परिस ' , म्हणजेच ही पुस्तके होतं .
अशी ही पुस्तके आपली मित्र - गुरू असतात . त्या आपल्याला आदर्शवादी व सर्वगुणसंपन्न बनवितात . त्यांची संगत आपण आजन्म पाळूया . शाळेतही 15 अॉक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो .
शेवटी एवढेच सांगू इच्छिते की ,
" पुस्तकास जो मानी सखा
होई त्याच्या आयुष्याचा पाठीराखा ! "
अर्चना दिगांबर गरूड
ता. किनवट , जि. नांदेड 9552954415
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
06) वाचनसंस्कृती
United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) ने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून घोषित केला आहे. महान लेखक शेक्सपिअर यांचा आज जन्मदिवस व इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
पुस्तक दिन लेखक आणि पुस्तकांना समर्पित केला गेला आहे. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे
लेखक, कवी , प्रकाशक , मुद्रक आणि वितरक यांचे महत्व अधोरेखित करणे.लहान मोठे सर्वांमध्येच वाचनाची आवड निर्माण करणे. मला इयत्ता पाचवीत निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आणि तेंव्हा पासूनच खऱ्या अर्थाने माझे लेखन सुरु झाले. तेंव्हापासून आजपर्यंत गेल्या 40 वर्षांत मी अनेक काव्य, निबंध , ललित लेख लिहिले. त्यातील काही बक्षिसप्राप्त ठरले, काही प्रसिद्ध झालेत , तर काही पुन्हा एकदा लिहावे असे वाटले.
ज्या लोकांनी लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे
त्यांच्याप्रति आपला आदर व्यक्त करणे.
वाचन म्हणजे एका व्यक्तीचे विचार, मते व्यक्त केल्यानंतर त्या विचारांचा प्रवेश आपल्या मनात होत असतो, जिथे लिहिणाऱ्याच्या नजरेतून आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो, तिथले अनेकविध अनुभव घेतो, त्यातील प्रत्येक क्षण प्रत्यक्ष जगतो. पुस्तकांशी मैत्री केली तर आयुष्यभराची साथ देणारे अनेक जिवाभावाचे सोबती आपल्याला मिळू शकतात, त्यांचं आणि आपलं एक वेगळं विश्व तयार होतं. आपले अनुभव विश्व अधिक समृद्ध होते व आपण मनन,चिंतन, मंथन करून वर्तनात बदल घडवून आणतो.
वाचनाने ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, बौध्दिक आणि मानसिक विकास अशा अनेक गोष्टी साध्य होतात. एकदा वाचनाची गोडी लागली की ही वाचन भूक उत्तरोत्तर वाढत जाते आणि वाचनाचं व्यसन लागत जातं, अर्थात हे व्यसन असणं चांगलंच. ज्यामुळे वाचकांना एका उच्च प्रतीची तात्विक बैठक लाभते. याचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनातच नव्हे तर समाज मनावर परिणाम होतो, यात तिळमात्र शंका नाही. वाचनाचे व्यसन वाढविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. उदा. शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसे पुस्तकांच्या स्वरूपात देण्यात यावीत, कुणालाही वाढदिवशी पुस्तकेच भेट द्यावीत.
वाचन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
श्रीमती मेघा अनिल पाटील, उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
07) पुस्तक...Friends forever.... . आम्हा घरीं धन शब्दाचीच रत्ने l शब्दाची च शस्त्रे यत्न करू ll शब्द चि आमुच्या जीवाचे जीवन l शब्दे वाटू धन जनलोका ll तुकोबारायांनी फार सुंदर अशा शब्दात शब्दांची महती सांगितली आहे आणि या शब्दांचा आविष्कार म्हणजेच पुस्तक असते.असे म्हणतात की निसर्गचं मानवाला शिकवतो आणि त्या निसर्गाचाच एक आविष्कार म्हणजे पुस्तक ,मित्र सदासर्वदा.जरी पुस्तक माणूसलिहतो आणि घडवतो तरी कर्ता मात्र निसर्ग असतो.पुस्तक या शब्दाचा मतितार्थ खूप विस्तृत असा आहे.धुळपाटीवर ग भ न ....ची सुरुवात होते आणि त्या मुलाची ओळख होते त्याच्या आयुष्यातिल पहिल्या पुस्तकासोबत म्हणजे ज्याला उजळणी म्हणतात.मग हळूहळू त्या त्या वर्गांच्या पाठपुस्तकांसोबत ओळख होते.जसं जसं ते मूल मोठं होतं तसा त्याचा परिचय एकेका पुस्तकप्रकारासोबत होतो.मूळची आवड म्हणा किंवा मग कोणी तरी जाणता करून देतो.कवीमनाचा असेल तर तो कविता संग्रहाकडे वळतो.कोणी कादंबरी,लघुकथा,कोणी एखाद्याचे चरित्र वाचून प्रभावित होतो.उजळणी,पाठपुस्तके, कवितासंग्रह, कादंबरी,लघुकथा,चरित्र,हे जरी पुस्तकाचे प्रकार असले तरी यावरून पुस्तक या शब्दाचा अर्थ किती विस्तृत आहे हे ध्यानात येते.वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर प्रत्येकजण पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकारासोबत मैत्री करतो,काही जण तात्पुरती मैत्री करतात तर काहि जणांसाठी ती मैत्री कायमस्वरूपी असते.आणि मग पुस्तकांशी कायमस्वरूपी मैत्री करणारे जगाला दिशा दाखवण्याचे काम करतात.ते कुणाचेही हस्तक तर होतंच नाही उलट त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर जग चालत असते.एवढि किमया पुस्तके घडवून आणतात.पुस्तकेच तर जगात क्रांति घडवून आणतात,नाही तर पुस्तकांच्या धाकाने त्यांच्यावर बंदी घालण्याची उदाहरणे इतिहासात घडलीच नसती.पुस्तके वाचल्याने माणसाचं मस्तक सशक्त होतं, आणि सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं. हल्ली भरकटलेली, कुणाची तरी कार्यकर्ते झालेली पिढी कशाचं द्योतक आहे तर वाचनसंस्कृती लोप पावत असल्याची.ज्यांचं मस्तकंच सशक्त नाही ते कोणाचेतरी हस्तक होणारंच. "वाचाल तर वाचाल"असे म्हणतात ते काही उगाचंच!एखादा लेखक जेव्हा पुस्तक लिहतो तेव्हा त्याचे जगणे, अडखडणे, ठेचकाळने तो जगासमोर मांडत असतो.लेखकाचा जीवनप्रवास म्हणजे त्याचा हा आविष्कार असतो.आणि आपण ते वाचून आपलं जगणं समृद्ध करत असतो.लेखक आपल्या सोबत त्या पुस्तकाद्वारे बोलत असतो.आपले अनुभव सांगत असतो.आपण त्याचे जगणे सुद्धा जगत असतो.ही किमया आहे पुस्तकांची. आज कोणतीही मोठी व्यक्ती घ्या त्यांचा वाचनअनुभव विचारा?त्यांची आणि पुस्तकांची मैत्री आजही घट्ट असल्याचे ते सांगतील.सुदैवाने आपल्या मराठी भाषेमध्ये पुस्तकांचे विश्व खूप समृद्ध आहे,त्यात प्रत्येकाने शिरून आपले जगणे समृद्ध करून घेऊन लाभलेल्या मानवजीवनाचे सार्थक करून घ्यावे.
हेमंत साहेबराव पापळे सहाय्यक शिक्षक, प.स.मूर्तिजापूर, जिल्हा अकोला 9422762278. hemantpapale@gmail.com
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
08) जीवनाला आकार देणारा दोस्त:पुस्तक
आज संपूर्ण जगात 'पुस्तक दिन' म्हणून साजरा केला जातो.ज्येष्ठ साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्मदिन व मृत्यूदिनही आहे.त्या निमित्याने 'पुस्तक' हेच आपल्याला जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारा दोस्त आहे असं म्हटल्यास वावगे वाटणार नाहीच. आज जीवनाला आकार देण्याकरिता,जीवनातील नैतिक मूल्ये जोपासण्याकरिता, वेळोवेळी दोस्तांसारखे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा, अज्ञानाकडून-ज्ञानाकडे जाण्याचा प्रखर मार्ग म्हणजे पुस्तकाचे वाचन करणे होय.पुस्तक वाचन केल्यावर आत्मसात करून त्याचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी व्यवहारात ज्ञानाचे उपयोजन करता येते.पुस्तके वाचन केल्यामुळेच जगातील,देशातील चालू असलेल्या घडामोडी व मागील शतकात घडलेल्या घटना माहिती होतात त्यावरून जीवनाचे मर्म कळून येते व जगण्याला नवीन आकार,दिशा मिळण्यास मदत होते.ही वाचनाची सवय लहानापासून तर मोठ्यापर्यत अंगी बाळगणे आवश्यक आहे.
लहान मुलांना ज्याप्रमाणे मोबाईलचे खूप वेड असते त्यांना सांगावे लागत नाहीत की,त्यात करमणुकीचे खेळ असतात म्हणून ते आपोआप शिकत असतो, त्याचप्रमाणे आपणही वाचन संस्कृतीकडे जेवढे लक्ष द्यायला हवे तेवढे देत नसल्याने मुले त्या मोबाईलकडे वळतात त्यासाठी घरामध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करण्यासाठी वेगवेगळे पुस्तक पालकांनी विकत आणावे.पुस्तकाविषयीचे मुलांमध्ये कुतूहल निर्माण करून वाचनाकडे लक्ष देण्यात यावे.स्वतः वाचन करीत असल्याने लहान मूल पालकांचे अनुकरण करीत असतो त्यामुळे प्रथम आपण पुस्तक हे माझे जीवनाला आकार देणारे दोस्त असून मनुष्याचे अंतरंग घडविण्यासाठी पुस्तके शिकवीत असतात हे मुलांना सांगावे.तेव्हा मुले त्याकडे आकृष्ट होऊन वाचन करू लागतात व त्याचे फायदे चिरकाल टिकत असतात. त्यानुसार जीवनात एक उत्तम नागरिक घडण्यास मदत होते अन्यथा दुसऱ्याच्या विचारानुसार चालत असल्यास आपली फसगत होऊ शकते हे विसरता येत नाही कारण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात अशिक्षित लोकांचे कसे शोषण करीत होते हे सगळं माहिती आहेच.
'वाचाल तर वाचाल' असे ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे.'पुस्तक हेच आपले मित्र'आहे.पूर्वीच्या काळात वंचित घटकांना शिक्षणाचा मुळीच अधिकार नव्हता आणि केवळ त्यांच्याकडून कमी वेतनातून अधिकाधिक काम करवून घेत असे.तेव्हा डॉ.बाबासाहेबांनी पीडित,शोषित,वंचित घटकांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले.एवढेच नाही तर पुस्तक वाचल्याने आपले मस्तक सुधारते.सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही त्यामुळे पुस्तकाचा अविरत व्यासंग जीवनाचे भिन्न-भिन्न पैलू आत्मसात करण्याचे यथोचित कार्य आपल्या हातातून घडावे असा बाबासाहेबांचा अट्टाहास असायचा.आजही आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची जशी गरज आहे तशीच पुस्तके वाचण्याची गरज आहे.
शिक्षित असलेला व्यक्तीच पुस्तक वाचून आपले ज्ञान मिळवीत असतो. सर्वाधिक महत्व पुस्तकाला देऊन त्यातून वेगवेगळ्या कथा, गोष्टी, कादंबरी, क्रमिक पुस्तके, सहशालेय पुस्तके यातून ज्ञान मिळते.जीवनात भौतिक सुविधेकडे मानवाचा कल असला तरी पुस्तके विकत घेऊन वाचनाचा सर्वोच्च आनंद घेऊन ज्ञानाची भूक प्राप्त करण्यास अतोनात प्रयत्न व्हायला हवे.तेव्हाच वाचन संस्कृतीला बळकटी मिळू शकते.
अगदी पुस्तकालाच महत्व देऊन विचारतंतु अवगत करण्याचे कार्य सदोदित करीत राहावे.बाबासाहेब इतरांना नेहमी सांगत असत की,जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयांची भाकरी घ्या नि एक रुपयांचे पुस्तक घ्या.भाकरी तुम्हाला जगविते तर पुस्तक 'कसं जगायचं' हे शिकविते.अक्षरशः पुस्तकातूनच माणूस घडविण्याचे कार्य करीत असते.पुस्तकाशिवाय दुसरा दोस्त नाहीच म्हणून पुस्तके स्वतःजवळ बाळगाच व पुस्तके वाचून टिपणे काढून जीवनात त्याचा उपयोग करून आनंद उपभोगणे अत्यावश्यक आहे म्हणूनच पुस्तके वाचण्याचा व्यासंग आजन्म ठेऊन वेगवेगळ्या कला कौशल्य अंगी बाणवून जीवनाला आकार देण्याचेच कार्य पुस्तके करू शकते.
✒श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा, चंद्रपूर 9765548949
dushantnimkar15@gmail.com
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
09) ग्रंथ हेच गुरु*
जगप्रसिद्ध लेखक शेक्सपिअर यांचा जन्मदिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. शेक्सपिअर यांचा जन्म (23 एप्रिल 1564 ) व योगायोगाने मृत्यूदिनही तीच तारीख (23 एप्रिल 1616).जन्मगाव व मृत्यूगावही एकच.जन्म मृत्यूची तारीख व जन्म मृत्यूचं ग्राम एकच असा योग शेक्सपिअरच्या बाबतीत घडून आला.शेक्सपिअरच्या शरीरधर्माला भूतलावर अवघं पन्नाशीचं आयुष्यमान लाभलं पण लेखनानं निर्माण केलेलं कीर्तीमान अमर ठरलं आहे.
वाचाल तर वाचाल हा महामंत्र देवून सकल मानवजातीला देणारे महामानव यांनी वाचनाचे महत्व पटवून दिले. वास्तविक ग्रंथ किंवा पुस्तक वाचल्यावर बुद्धीचा विकास होतो. मन:शांती मिळते ग्रंथालाच आपण गुरु मानले तर मानवी जीवन समृद्ध होईल.
मला लहानपणापासून वाचनाची आवड बालपण खेड्यात गेल्यामुळे लहाणपणी अवांतर वाचनाची आवड असूनही वाचायला पुस्तकं मिळत नसल्याने मी घरातील अध्यात्मिक ग्रंथ वाचायची रामायण, महाभारत, हरिविजय, विविध संताची चरित्रे वाचायची आवड निर्माण झाली. आणि तेच माझे गुरु झाले.
पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.पुस्तकं हि प्रसंगी सल्लागार आणि संयमी शिक्षकांची भूमिका पार पाडतात. व्यक्तीला विचार आणी आचारांनी अधिक समृद्ध बनविण्याची क्षमता उत्तम पुस्तकात आहे. म्हणुनच विद्यार्थ्यांमध्ये, तरुणाईमध्ये वाचनाची गोडी वाढावी. वाचनसंस्कृतीचे जतन व्हावे.यासाठी भरीव सामाजिक उपक्रम आणि वाचत जरगर होणे गरजेचे आहे.
सौ. खेडकर सुभद्रा बीड
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
10) 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त
लेख
पुस्तक माझ्या जीवनाचा सखा
पुस्तकेच आहेत खरे मित्र
एकाकीपणा आपला घालवतात.
दु:खातसुद्धा सुखाच्या,
राजमार्गाचा रस्ता दाखवतात.
खरे आहे हे.कारण पुस्तके आपल्याला योग्य रस्ता दाखवतात.माझ्या आयुष्यात पुस्तकांना फार महत्त्व आहे. थोर साहित्यिक, मातृह्रदयी ,कवीमनाचा स्वतःच्या आईला साऱ्या जगात पोहचवणारे साने गुरुजींच्या शामची आई या पुस्तकाने माझ्या मनावर अधिराज्य केले आहे.मी कीतीतरी वेळा हे मातृप्रेमाचे महंन्मगल स्त्रोत असलेले पुस्तक वाचून काढले आहे.प्रत्येकवेळी डोळ्यात आसवांचा महापूर आलेला आहे.भावनेचा बांध फुटला आहे.या पुस्तकामुळेच माझ्या मनात गरीबांच्या बद्दल,प्राणीमात्रांबद्दल आपुलकी, सहानुभूती निर्माण झाली आहे. मीही लिहण्यास उद्युक्त झाले आहे. म्हणून पुस्तके आयुष्यात फार महत्वाची कामगिरी पार पाडतात.
माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे.तो समाजात राहतो. समाजातील चालीरिती पाळतो. त्याला आई वडिलांच्या , पूर्वीच्या बर्याच प्रथा आहेत ज्या पुस्तकांद्वारे मिळतात.पुस्तक हा समाजाचा आरसा आहे.पुस्तक साहित्याच्या एकत्रिकरणाचा एक मार्ग आहे.भारतात व भारताबाहेर अनेक साहित्य तज्ज्ञ आहेत. इंग्रजी साहित्यात शेक्सपिअर चे मोठे योगदान आहे. या जगप्रसिद्ध साहित्यिकांचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी झाला आहे, म्हणजे 23 एप्रिलला. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. पुस्तके आपल्याला त्यात्यावेळच्या युगाचे ज्ञान देतात.पुस्तकामुळेच आपल्याला भूतकाळाचे ज्ञान प्राप्त होते.
गद्य, श्लोक,पद्य,बखर,कथा, कविता, कादंबरी इत्यादी अनेक प्रकारची पुस्तके आज आपल्याला पहायला मिळतात.या सर्व प्रकारच्या पुस्तकांची आज सर्वांनाच आवश्यकता आहे.पुस्तकाशिवाय आपल्याला कशाचेही ज्ञान कसे मिळणार?अज्ञानाच्या अंध:कारामध्ये गटांगळ्या खाणारी व्यक्ती ज्ञानाच्या प्रकाशात येण्यासाठी पुस्तकाचा आधार घेते.जर आपण आपल्या आयुष्यात स्वतःचे ज्ञान वाढववायचे असेल तर,आयुष्य समृद्ध करायचे असेल, आपले जीवन विकासाच्या वाटेकडे न्यायचे असेल तर आपल्याला पुस्तके नेहमीच मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असतात.जेव्हा आपण पुस्तके वाचतो त्यावेळी आपल्या मतांमध्ये फरक पडतो.सकारात्मक वा नकारात्मक विचारसरणी मनात आणण्यापूर्वी आपले मन रिकामे असते. पण पुस्तक वाचणानंतर आपला विचार बदलतो. पुस्तके वाचल्यास आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो.पुस्तके आपल्या मेंदूला ज्ञानाचे भांडार उपलब्ध करुन देतात.आपण आयुष्य जगताना पुस्तक आपल्याला काय चांगले आणि काय वाईट आहे याबद्दल माहिती देतात पुस्तकप्रेमी नेहमीच पुस्तकावर बोलतात.आपले जीवन एक संघर्षमय जीवन आहे.पुढे काय होईल?हे आपल्यालामाहित नसते पण जेंव्हा आपल्याला या संघर्षपूर्ण जीवनात कोणत्याही समस्येचा सामना करावा लागतो, तेंव्हा त्या समस्येचपासून बचाव करण्यासाठी पुस्तके आपल्याला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतात. पुस्तके आपले खरे मित्र आहेत. कारण जेव्हा आपण आनंदी असतो किंवा दु: खी असतो तेव्हा.सर्वप्रथम आपण आपल्या मित्रांना सांगतो. आणि आपल्या मनावरचे दडपण कमी करतो.त्याच प्रकारे पुस्तके देखील आपल्याला आनंद देतात.जेंव्हा आपण दुःखात असतो तेंव्हा आपले मन खूप उदास असते. अशा वेळी आपल्या हातात एखादे चांगले पुस्तक सापडले तर ते वाचल्यानंतर आपले मन हलके होते. एखाद्या व्यक्तीच्या मनात असणाऱ्या उदासी भावना बाहेर येतात.तो विचार करु लागतो.सारासार विचार केल्यानंतर त्याला योग्य दिशा सापडते.त्याच्या मनातील वाईट विचार बाहेर येतात. त्याच प्रकारे जेव्हा आपण दु:खी असतो तेव्हा आपण प्रसिद्ध यशस्वी लोकांच्या जीवनकथा वाचाव्यात.कारण तेंव्हाच आपल्याला कल्पना येते की या लोकांच्या जीवनात किती समस्या आल्या होत्या तरीही त्यांनी त्यांचा सतत सामना केला आणि शेवटी त्यांना यश, कीर्ती मिळाली.अशाचप्रकारे जेंव्हा जेंव्हा आपल्या मनात उदासीनता येते आणि आपण दु:खी असतो , तेंव्हा आपल्या मनात एक नवीन आशा पुस्तकांच्यामुळेच जन्माला येते आणि आपल्याला नवीन कार्य करण्यास भाग पाडते. त्याचप्रमाणे पुस्तकांच्यामुळे नेहमीच गौरवशाली जीवनाच्या महामार्गाचे दरवाजे उघडत असतात.
पुस्तके नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात. ते चांगले मार्गदर्शक आहेत.कारण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचे काम पुस्तक करतात. समाजात चांगले काय आहे, काय वाईट आहे, नैतिक काय आहे, अनैतिक काय आहे हे आपल्याला पुस्तकातूनच समजू शकते. आपल्या मनात चांगल्या, वाईट भावना कधी येतात हेदेखील आपल्याला ठाऊक नसते.पुस्तके समाजभावनांचे सामाजिक आरसे असतात.जेंव्हा जेंव्हा साहित्यिक, कवी त्यांचे लेखन करतात,तेंव्हा त्यांच्या वेळेस समाजात ज्या घटना घडतात त्या सर्वांचा त्यांच्या मनावर परिणाम होत असतो.तेच त्यांच्या लेखनात येत असते.दररोज जे काही घडते ते त्यांच्या लेखनातून पुस्तकात येते. त्याच बरोबर साहित्यिकांच्या मनाचे प्रतिबिंबही पुस्तकात दिसते.जेंव्हा एखादा साहित्यिक उदास मनाने बसलेला असतो आणि त्याची प्रतिभा जागृत होते, तेव्हा दु:खद भाव त्याच्या लिखाणात येतात. आणि उदास मनाची व्यक्ती जेंव्हा ते वाचते तेंव्हा त्याला ते स्वतःचेच दु:ख वाटते,आणि त्याला ते आवडते.त्याच्या मनाच्या भावनांचे प्रतिबिंब त्याला त्या पुस्तकात दिसते.आणि त्याला वाटते की माझेच दु:ख येथे व्यक्त केले गेले आहे.
आयुष्यातील बर्याच समस्या आपल्याला त्रास देतात. जर आपणास काही सुचत नसेल तर अशावेळी जर आपण पुस्तक वाचले तर आपले मन त्या पुस्तकांच्या विचारांमध्ये भटकत राहते. खरोखरच हा योग्य मार्ग आहे.कारण यामुळे तर आपले चंचल मन स्थिर होते आणि चांगले विचार करण्यास सुरवात करते.पुस्तक वाचणे फार महत्वाचे आहे. कारण पुस्तके शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात,आपल्या विचारांचे समर्थन करतात.म्हणून, प्रत्येक घरात ग्रंथालय व पुस्तकसंपत्ती असली पाहिजे.जर एखाद्यास एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असेल किंवा मनातील भावभावनांची आंदोलने चालली आहेत. अशावेळी पुस्तकांद्वारे आपला त्रास कमी करू शकतो.जेव्हा घरातील मोठी माणसे पुस्तके वाचतात, तेव्हा घरी असणारी छोटी मुलंही पुस्तके वाचण्यास सुरवात करतात.आजकालच्या मुलांचा बराचसा वेळ टीव्ही पाहण्यात किंवा मोबाइलवर गेम खेळण्यात घालवला जातो.त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.संवेदनशीलता नष्ट होत आहे.ही सवय त्यांना भविष्यात त्रास देणारी आहे.शाळेत शिक्षकांना व घरात पालकांनाही या मुलांचा त्रास होत आहे. यावर वेळीच उपाययोजना करायला हवी.पण जर मुलांना पुस्तके वाचण्याची आवड निर्माण केली तर हे सर्व हळूहळू थांबेल.कारण पुस्तके मुलांना योग्य मार्ग दाखवतात.मुलांना त्यांच्या प्रतिभेची जाणीव करुन देतात.आणि मुले अभ्यासामध्ये रस घेऊ लागतील.माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनाही पुस्तकांची आवड होती.ते नेहमी पुस्तके वाचत असत.पुस्तकांवरील त्यांचे प्रेम पाहून सरकारने त्यांचा वाढदिवस " वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.ही चांगली गोष्ट आहे.त्यादिवशी मुलांना सर्व शाळांमध्ये वाचायला सांगितले जाते, पुस्तकांविषयी माहिती दिली जाते, लोकांना पुस्तकांचे महत्त्व सांगितले जाते. ही सर्वांसाठी प्रेरणा आहे.जेंव्हा जेंव्हा आम्हाला मोकळा वेळ मिळेल तेंव्हा आपण त्या वेळेचा उपयोग केला पाहिजे, पुस्तके वाचली पाहिजेत, आपले ज्ञान वाढविले पाहिजे.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त संपूर्ण जग हा दिवस आनंदाने साजरे करते मला आशा आहे की या पुस्तकाविषयी आपुलकी सर्वांच्या मनात रुजावी. आणि त्यांनी आपला मोकळा वेळ वाचनात घालवावा. जेणेकरून त्यांच्या मनात जे काही दुःख आहे,ते दूर होईल.हा आपला सखा नेहमी आपल्या बरोबर राहतो.सदैव प्रेरणा देत राहतो.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जि. कोल्हापूर
9881862530
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
11) पुस्तक. आज जग प्रसिद्ध साहित्यिक साहित्य वाचक व लेखक महामेरू शेक्सपियर यांचा जन्म व मृत्यू दिन .वाचन हे मनाला निर्मळ करणारे साबण आहे. पुस्तकातून आपल्याला अनेक प्रकारची माहिती मिळवता येते. जगप्रसिद्ध अर्थ शात्रज्ञ,संविधान सभेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर पुस्तका विषयी तर अनेक विचार प्रकट केले आहेत . वाचाल तर वाचाल .,ज्यांच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट त्यांचे जीवन भुई सपाट,अशा विविध सुविचारणे समाजाला वाचणा कडे वळवण्याचा प्रयत्न केला व पुस्तक वाचूनच पूर्ण जगाचा गाढा अभ्यास करून देशाचे संविधान तयार करून मानाचा मुजरा आपल्या शिरपेचात खोवला.एवढेच नाही तर त्यांनी समाजाला ठणकावून सांगितले की तुमच्या जवळ दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घा .त्याने पोटभरेल .व एक रुपयाचे पुस्तक घ्या ते तुम्हाला कसे जगायचे शिकवेल.वाचनाने आपल्या मनातल्या भावना स्पष्ट करता येतात.मैदाणा वरची कुस्ती लढण्यासाठी जशी शारीरिक ताक दी ची गरज आहे .तशीच विचाराची लढाई लढण्यासाठी साहित्य वाचनाची गरज आहे. लोकमान्य टिळकांना तुरुंग वास झाला .तरीही पण त्यांनी तुरुंगातच गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला.सावरकरांनी सुद्धा माझी जन्म ठेप ग्रंथ लिहिला. लिहिणाऱ्या वाचणाऱ्या साठी कारण आडवे येत नाही.परंतु अताच्या काळात मात्र लीहिण्या वाचनाची सवय कमी होत चालली आहे .कारण इंटरनेट, फेसबुक वर शॉर्ट कट माहिती मिळवण्याची सवय पालक व विद्यार्थ्यांना पडली आहे. यातून वाचन संस्कृती लोप पावल्या सारखी होत आहे.पण वाचन संस्कृती वाढवण्या साठी प्रत्येकानी प्रयत्न करायला हवे. ज्ञानाच्या शाखा मोठ्या प्रमाणात विस्तारल्या आहेत. आणि धाव पळीच्या युगात माणसाकडे वेळ कमी असून वेळात वेळ काढून वाचन संस्कृती आपण जगवली पाहिजे. ग्रंथ हेच गुरु आहेत. ग्रंथ वाचनाने विविध लेखकाच्या विचार शैली ,त्या वेळच्या चाली रिती ,रुढी परंपरा ,संस्कृती ची छाप आपल्या मनावर पडून आपले व्यक्तिमत्व विकास होत असते. वाचन व लिखाणातून बुद्धीला चालना मिळते.तसेच अनेक लेखकाकडे लिहिण्याची शैली वेगवेगळी असते त्यातून दैनंदिन जीवनात त्यांच्या विचारातून आनंद व उत्साही प्रेरणा मिळत असते. महाणून दररोज उत्साह प्रेरणा देणारे साहित्य वाचन केल्यास दिवस चांगला जात असतो. ही सवय लागेपर्यंत त्रास होतो पण एकदा सवय लागली की सुटत नाही.पुस्तक वाचनाने मानवाच्या जीवनाला सुंदर आकार प्राप्त होतो .आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित आहे. आणि प्रत्येक वक्तीला आपल्या पाल्याचे जीवन चांगले घडावे असे मनापासून वाटते. त्या साठी पालकांनी दैनंदिन वापराची एक वस्तू कमी अनवी पण महिन्याच्या शेवटी एक पुस्तक घरी नवीन आणायला पाहिजे.त्यातून लहान मुलांना वाचनाची अावड लागेल.
आणि आपल्या पाल्याचे व आपले भविष्य उज्वल होईल. म्हणून आपण रोज वाचन केले पाहिजे. जीवन खासावत भंडारा. 9545246027
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
13) "वाचाल तर वाचाल"
गणेश सोळुंके, जालना
उत्तम चारित्र्य घडण्यासाठी जसे चांगल्या संस्काराची गरज असते तसेच चांगल्या पुस्तकांची सुद्धा गरज असते. म्हणूनच तर पुस्तक वाचून सुधारलेले मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही असं म्हटलं जातं.
आपण ज्या प्रकारची पुस्तके वाचू त्याच प्रकारे आपण घडत असतो. थोडक्यात काय तर पुस्तकं हे व्यक्तीचे चारित्र्य घडविण्यासाठी आणि बिघडविण्यासाठी सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतात.
पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा, नवीन दिशा मिळत असते. म्हणूनच पुस्तके ही कधीच न थांबणारी व सतत वाहत राहणारी ज्ञानाची गंगा आहे.
चांगल्या व प्रेरणादायी पुस्तकांमुळे जसं चरित्र उजळून निघतं तसंच चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांमुळे संपूर्ण आयुष्य अंधकारमय होऊ शकते. इतकी ताकत या पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे आपण नेहमी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक पुस्तकेच वाचली पाहिजेत.
ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तकासारखा चांगला, सोपा आणि स्वस्त मार्ग कोणताच नसावा. पुस्तकांमुळे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो.
पुस्तके ही आपली चांगली मित्र आहेत. म्हणून आपण सर्वानी नेहमी चांगले ज्ञान देणारी पुस्तके वाचली पाहिजेत.
कोणत्याही कार्यक्रमाचे औचित्य साधून आपण आपल्या प्रियजनांना महागड्या वस्तू भेट म्हणून देत असतो. परंतु माझ्या मते कोणताही कार्यक्रम असो तिथे प्रेरणादायी पुस्तके भेट दिल्याने एक सुसंस्कृत समाज घडण्यास नक्कीच मदत होईल व हा सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आपल्याला सुद्धा खारीचा वाटा उचलला येईल.
गणेश सोळुंके, जालना
8390132085
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
14) वाचाल तर वाचाल
जसे प्रकाशाच्या सहाय्यशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि हे ज्ञान प्राप्त व्हायचे असेल तर आपल्याला पुस्तक वाचणे आवश्यक आहे. माणसाला जसे जगण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच बुद्धीच्या कक्षा वाढविण्यासाठी,ज्ञानप्राप्तीसाठी वाचण्याची गरज असते कारण वाचन हे आपल्या मनाचे अन्न आहे. असं म्हणतात 'वाचाल तर वाचाल'
ज्ञानाची, विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनु आहे.
जर ही संपत्ती आपल्याला गोळा करायची असेल तर आपल्याला पुस्तक, ग्रंथ वाचन करावेच लागेल. मानवी जीवन हे जरी क्षणभंगुर असले तरी त्यातले काही क्षण आपल्या ज्ञानाचे अमृत पाजून चिरंजीव करण्याचे कार्य ग्रंथच, पुस्तकेच करत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुची महती विषद केली आहे.' गुरु बिना ज्ञान नही' असे एका हिंदी संत कवीने म्हटले आहे. गुरु नंतर ग्रंथ हेच आपले गुरु आहे. ग्रंथाद्वारे आपल्याला ज्ञानप्राप्ती करता येते. कारण ज्ञान काट्यांना देखील फुल बनवून घेते, अज्ञान फुलांना देखील काटे बनवून घेते. दृष्टी बदलली तर सारे बदलून जाते. आणि ही दृष्टी बदलवायची असेल समदृष्टी करायची असेल ज्ञानी व्हायचे असेल तर वाचावेच लागेल आणि म्हणूनच मानवाच्या जीवनात ग्रंथांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आणि त्यामुळेच पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्याची समदृष्टी झाली तो ज्ञानी झाला.
पुस्तक वाचनामुळे माणसाला बहुश्रुतता प्राप्त होते. मनात उद्भवणार्या शंका निरसन ग्रंथच करत असतात. पुस्तक वाचनामुळे आपल्याला कसे जगावे याचे भान राहते. जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. व आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. ग्रंथांचे पुस्तकांचे वाचन केल्यामुळे माणसाच्या भावनांना प्रतिसाद प्राप्त होतो. आपल्या मनाचे उदात्तीकरण होते. त्यामुळेच मानवाच्या जीवनात ग्रंथांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. माणसाला वर्तमानातील परिस्थितीशी संघर्ष कसा करावा व भविष्यातील स्वप्ने कशी रंगवावी हे ग्रंथ शिकवतात. ग्रंथ वाचनामुळे माणसाला त्याच्या भूत भविष्य आणि वर्तमान जीवनात उत्तम प्रकारे लाभ घेता येतो. ग्रंथ हे आपले केवळ मित्र नाहीतर मार्गदर्शकही आहेत तसेच गुरु सुद्धा आहेत. पुस्तक वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो.हा सुसंस्कृतपणाच त्याच्या यशाचा मार्ग असतो.
ग्रंथ हा माणसाचा सर्वात मोठा आधार आहे. ग्रंथामुळे ज्ञान प्राप्त होते. आणि हे ज्ञान प्राप्त झाले की माणूस विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. मानवाला सुखरूपी आकाशात सहज उडायचे असेल तर ग्रंथ, ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख असावे लागते. यामुळेच माणूस सुखात आनंदात राहू शकतो. आणि ज्ञानाच्या कक्षा वृंद्धिगत करायचा असेल तर 'ग्रंथ हेच गुरु' आहेत. म्हणून पुन्हा एकदा सांगावसं वाटतं ' वाचाल तर वाचाल'.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
senkude35@gmail.com.
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
15) पुस्तक माझा मित्र
मित्र कुणाला म्हणायचे ? ज्याच्याशी मनाची जवळीक असते ; जो नि:स्वार्थपणे नेहमी देत असतो . कठीण समयी आपल्या उपयोगाला येतो , तोच खरा मित्र . तो जिवंत प्राणीच असला पाहिजे असे मुळीच नाही . आणि म्हणूनच पुस्तक हाच माझा मित्र आहे .
मला वाटतं मला वाचनाची आवड माझ्या वडिलांमुळे लागली असावी . आमच्या घरी कायम पुस्तकांची थप्पी असायची . माझ्या डोळ्या समोर माझे वडिल आराम खुर्चीत बसलेले , पुस्तक वाचत असलेले असेच येतात .
अगदी लहानपणी मी पऱ्यांची पुस्तके ज्यात राजकुमार चमत्कार करायचे अशी पुस्तकेहि वाचायची . पण लवकरच वडिलांच्या मार्गदर्शनामुळे माझी आवड बदलली . मोठ्या मोठ्या लोकांची चरित्रे मी वाचू लागले . त्यामुळे माझ्या विचारांना वेगळी दिशा मिळाली . जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली . हे सर्व श्रेय पुस्तकांचे .
आपण जसजसे मोठे होत जातो तसे आपण काय वाचायला हवे हे ठरवता आले पहिजे . आपल्याल काय आवडते? चांगले वाचन म्हणजे काय? सकस वाचन कसे करता येईल ? अशा पुस्तक वाचनाचा आपले व्यक्तित्व चांगले घडण्यात फार मोठा मोलाचा वाटा असतो .आपले पुस्तक- प्रेम डोळस, सजग असायला हवे. त्याला चांगला स्तर असावा.
कुठल्याही विषयात जाऊन, कुठल्याही काळात जाऊन त्या लेखकाशी-पुस्तकाशी आपण संधान साधू शकतो. पुस्तकांमुळे विचारांचा समतोल साधला जातो. नको असलेल्या विचारांचा कचरा बाहेर टाकू शकतो. वाचनास जात-पात-धर्म देश-विदेश कुठलीही सीमा नाही.
प्रत्येक मनुष्य वेगवेगळी स्वप्ने पहात असतो. मनोरथे बांधत असतो. आपली स्वप्ने बरेचदा पुरी होतातच असे नाही. पण केवळ स्वप्नांमध्ये आपण जगू शकतो अशा स्वप्नांच्या अलौकिक आनंदाची अनुभूती आपल्याला पुस्तक वाचन देते. आपल्या परिघा पलीकडचं जग पाहण्याची दिव्यदृष्टी केवळ वाचनामुळे लाभू शकते.
वाचनामुळे लक्ष किंवा मन एकाग्र करण्याची सवय अंगी जडते. पुस्तकात लक्ष एकाग्र केल्यामुळे आपण त्या लेखनाचा आनंद घेऊ शकतो.
पुस्तकातील छापील अक्षरे म्हणजे कुठल्याही भाषेतील अचूक प्रमाण अक्षरे. ती अक्षरे त्यापासून तयार झालेली वाक्ये सतत आपण मेंदूत साठवत राहिलो तर आपल्या मेंदूमध्ये त्या प्रमाण अचूक शब्दांची छाया स्मृती म्हणजे फोटो मेमरी तयार होते. त्यामुळे नंतर कधीही चुकीचे किंवा प्रमाण शब्द वाचले की ते खटकायला लागतात. अचूक शब्दांचा मेंदूचा हा आग्रह आपल्याला उत्तम भाषा ज्ञानाकडे घेऊन जातो.
छापील शब्दांचे हे प्रेम आपल्याला माणूस म्हणून उन्नत करतं. आपल्याला अजून जीवनात भरपूर काही शिकायचं, त्या अनुषंगाने वाचन ही करायचे, या भावनेतून ते आपल्याला विनम्र ठेवते.
बरेचदा काही गोष्टी मनावर थोपवल्या जातात. या जोखडातून मुक्तता होते ती वाचनामुळे. योग्य वाचनामुळे मेंदूला विचार करण्याची शिस्त लागते आणि ही आपल्या व्यक्तिमत्वाला वेगळं करणारी ताकदही असू शकते. नीर-क्षीर विवेक म्हणतात तो पुस्तक वाचनामुळे येतो.
पुस्तकांमुळे अज्ञानाचा अंध:कार दूर होतो . पुस्तक भांडार - पुस्तक बाग इतकी प्रचंड मोठी आहे की त्यातली कितीहि फुले खुडली तरी ती कमीच आहेत . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकाची पेटी जहाजात बुडाली तेव्हां त्यांना एखादा आप्त गेल्याचे दु:ख झाले . असे घनिष्ट त्यांचे पुस्तकांशी नाते होते . सगळ्याच थोर पुरुषांना मार्गदर्शन मिळाले ते पुस्तकांमुळेच . प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकांना अनन्यसधारण महत्व आहे . समाजसेवी वृत्ती जी माणसात बळावते ती पुस्तकांमुळेच .
आपले मित्र एखादवेळेस खोटे बोलून फसवतील . पण पुस्तके ..... कधीच नाही खरंच ही शाश्वत अशी मैत्री आहे .
एखादे वेळेस मनावर मळभ येते . depressed वाटते . अशा वेळी एखादे हलके फुलके पुस्तक वाचले की आपल्यात उत्साह संचारतो . पुस्तके आपल्या बरोबर कायम असतात, त्यामुळे कधीहि , कुठेहि , कुठल्याहि वेळी ते मैत्रीचा हात पुढे करतात .
घराला घरपण जसे माणसांमुळे येते तसेच पुस्तकांमुळेहि येते . ज्या घरात एखादे तरी पुस्ताकांचे कपाट असते त्या घराची शोभा आणखीनच वाढते .
तरूणाईच्या उर्जेला बंधारा घालून योग्य दिशेने वळवण्याचे कामहि पुस्तकेच करतात .
आपले आयुष्य समृध्द करण्यासाठी फक्त आपले अनुभव पुरेसे नसतात तर पुस्तकातले दुसऱ्यांचे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात . आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात .
शैशवात चित्रांची पुस्तके मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण करतात . मुले तासन तास त्यात रमतात . तसेच जीवनाच्या संध्याकाळी बरेच वेळा घराबाहेर पडणे शक्य नसते . कंटाळा येतो . त्यावेळी हीच मित्र मंडळी आपले मनोरंजन करतात .
आजच्या T. V. , mobile च्या युगात मुलांना पुस्तकांचे आकर्षण वाटत नाही . वाचन संस्कृती कमी होत आहे का? पण लक्षात ठेवायला हवे , ' वाचाल तर वाचाल . '
पुस्तक वाचन ही एक सुंदर संस्कृती आहे . ही एक साधना आहे . ज्यामुळे आत्मा उजळून तृप्त होतो .
इंग्रजांचे एका ह्या बाबतीत आभार मानायला हवेत . त्यांच्या मुळे आपल्या देशात printing press लवकर आले , छपाईची कामे सुरु झाली . त्यामुळे भारतात शिक्षणाचा प्रसार सुरु झाला .
माणूस प्रगल्भ झाला .
पुरातन काळापासून लिखाण केले गेले आहे . कधी भूर्ज पत्रावर , कधी धूळाक्षरे म्हणून . मग कागदांचे वेगवेगळे प्रकार . सरते शेवटी printing machines . त्यामुळेच पिढ्या न पिढ्या पासून चालत आलेले ज्ञान आपल्यापर्यंत पोचले आहे .
पण समजा , ...... हे काही घडलेच नसते तर ......
पुस्तकेच आपल्या आयुष्यातून वजा केली तर ........
शुभदा दीक्षित
९८८११०६२११५
shubhada09@gmail.com
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
16) साहित्य सेवक समूह आयोजित
रोज एक लेख:चौथा दिवस
दि. २३/०४/२०२०
विषय :- " पुस्तक / ग्रंथ
शीर्षक :-" नीर क्षीर विवेक "
आज संपूर्ण जगात ,' पुस्तक दिन ' म्हणून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.पण या वर्षी 'कोरोना या विषाणूंच्या थैमानामुळे सारं जगच जणू बंदिवासात अडकलंय. नाहीतर आज या दिवशी ठिकठिकाणी ग्रंथ दिंडी , पुस्तक मेळा , मोठमोठ्या दिग्गज लेखकांची व्याख्याने , कवी संमेलनं मोठ्या प्रमाणात हिरीरीने आखली जातात. आज हेच दृश्य आॅनलाईन स्वरूपात दिसतंय.
मला लहानपणापासूनच पुस्तकांची भुरळ पडत आलीय. आजही मी मोठ्या आवडीने पुस्तकांचं पारायण करीत असते. माझ्या यजमानांना ही वाचनाचं खूप वेड आहे. त्यामुळे आमच्या घरी एक सोडून तीन तीन लायब्ररींची पुस्तके येतात. अन कित्येकदा असंही घडतं की , एखादं पुस्तक मला न हाताळताच परत लायब्ररीत जाऊन बसतं. मग फुकाची वादावादी चालते घरात !
पुस्तकासारखा गुरू , सखा , सोबती दुसरा कुणी नाही. मी त्या पुस्तकांशी एवढी एकरूप होते की, कधी कधी एकटीच हसते , तर कधी आतल्या आत मुसमुसते. मी पुस्तक एन्जाॅय करते." आम्हा घरी धन.... शब्दांचीच रत्नें "
" पुस्तकाच्या प्रत्येक पानात
असती ज्ञानाचेच झरे
जे वाचतील पुस्तके
त्यांनाच गावती ते खरे !"
पुस्तकांशी आपला परिचय तसा शालेय जीवनापासूनच सुरू होतो, तो त्याच्या अंतापर्यंत सुरूच राहतो. अन माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो.पुस्तकच त्याला नीर क्षीर विवेक शिकवित असते.
मला व. पु.च्या " महोत्सव " या कथेतील नायक ' केदार ' हा पायातील वहाणेलाही काढता-घालता नमस्कार करतो.पावसाळ्यात फुगणाऱ्या दारांना समजून घेतो.निर्जीव वस्तूंबद्दलचीही भावना आपल्याला जीवंत माणसांचा आदर करायला शिकविते.
वाचन हा प्रभावी अन सुजाण व्यक्तिमत्वाचा पाया ! लेखकाच्या नवनिर्मिती इतकीच वाचकाची रसग्रहण क्षमता तल्लख असेल तर, त्याची नांदी वाचन हीच असते.वाचन हाच लेखनाचा पाया व मेरुमणी होय.
" हाती बोधाचा बोधाचा.... झेंडा मी घेईन " असे संत एकनाथांनी म्हटले आहे. त्याच धर्तीवर मी असे म्हणेन की , ऐंशी पुस्तके पुस्तके.... रोज मी वाचीन. त्यातून बोधाचा बोधाचा.... धडा मी घेईन !"
थोडक्यात काय तर...
" पुस्तकाला बनवा चांगला मित्र
तर समाजात उमटेल चांगले चित्र !"
सौ. सरोज सुरेश गाजरे, भाईंदर
मोबा.नं. ९८६७३९४००१
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
17) सच्चा सखा माझा-ग्रंथ/पुस्तक
जिवनात अमृत रूपी ज्ञान देण्याचे काम ग्रंथ करतता. यांच्या आधारे आपण जिवनात उतुंग शिखरावर जाण्याचा मार्ग दाखवणारा सखा आहे. सखा,मित्र हे नाते असे आहे की, ते तुम्हाला चूकीचे असे काही सांगत नाही. योग्य, सत्य जे आहेच सांगतो. तसाच पुस्तक हा मित्रा सारखाच वाटतो. तो आपणास जिवनाचा योग्य, सरळ मार्ग दाखवतो व अडचणी तेव्हा मदत करतो म्हणून मला तो मित्र, सखा सारखा मार्गदर्शक वाटतो.
जिवनात आपणा खुप काही प्राप्त करायचे असेल तर आपणास पुस्तकाशिवाय पर्याय नाही. म्हणून म्हणात ना 'विचाल तर वाचाल' . डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांगता की, ज्ञान हे वाघीणीचे दुध आहे. असे हे ज्ञान आपणास प्राप्त करण्यासाठी ग्रंथ/पुस्तक हेच साधन आहे. व्यक्ती जवळ ज्ञान असेल तर तो जगावर राज्य करू शकतो. त्या करीता त्याच्या जवळ पुस्तक रूपी शस्त्र आवश्यक आहे.
पुस्तक वाचना माणसास ज्ञान अवगत होतो, त्या त्याची वैचारिक शक्ती वाढते. भाषण कौशल्ये हे पुस्तके वाचनाने होते. याच शक्ती वर आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी हे सर्व जगात लोकप्रिय पंतप्रधान झाले या मागचे कारण वाचन, मनन हेच आहे. हे ज्ञान रूपी महासागर पार करायचे असेल तर पुस्तक हे आवश्यक आहे. ग्रंथ हे आपले गुरू आहेत. गुरू मुळेच आपण उच्च पद, मान सन्मान प्राप्त करू.
पुस्तक रूपी हा मित्र प्रत्येककच्या घरी आवश्यक आहे. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी इतर कोणतेही गिफ्ट देण्यापेक्षा पुस्तक रूपी मित्र द्यावा. ग्रंथ/पुस्तक यांचे महत्त्व सांगावे तेवढे कमी म्हणून हा मला सखा वाटतो.
श्री. बोईनवाड गुणवंत किशनराव
होटाळकर (नांदेड) 9921034211
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
18) आज जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ग्रंथ हेच गुरु
मित्रांनो इंटरनेट चे युग येण्याआधी आपण सगळेच पुस्तक प्रेमी होतो. अगदी लहाणापासून तर मोठ्या पर्यंत.कारण त्या काळात ज्ञान संपादन करण्याचा मार्गच ग्रंथ किंवा पुस्तके होती. लहान असताना शाळा सुरू झाली की आधी पुस्तक आणायची घाई .मग त्याला कव्हर लावने आणि अलगत हाताने. सारखं सारखं दप्तरातुन काढने आणि सगळ्यांना दाखविले. हे झालं बालपणीचे वेड. मग थोडं मोठं झाल्यावर शाळेसाठी जुणे पुस्तके मिळविण्यासाठी घर घर फिरने. अर्ध्या कीमतीत ती पुस्तके विकत घेऊन त्याला कनकेची चिक्की करून पेपरचे पुठ्ठे लावने . तरी सुद्धा जुन्या पुस्तका बदल तेवढेच प्रेम आकर्षण. हळूहळू पुस्तकांच्या सहवासात केव्हा मोठो झालो कळलेच नाही. जे वाचून काढले ते ते हळूहळू हळूहळू जिभेवर रेंगाळत होते. थोड्या वेळापुरता अहंकार जागा व्हायचा. पण मग लक्षात यायचं आपलं काही नाही .हि सगळी पुस्तकांची कीमया आहे. एका लेखकांनी म्हटले आहे वाचाल तर वाचाल. कारण मोठं मोठे समाज सेवक, थोर पुढारी,महामानव यांचे चरित्र वाचले म्हणजे त्यांच्या पासून आपल्याला जिवन जगण्याची प्रेरणा मिळते. आपल्याला एक चांगला मार्ग मिळतो. ज्ञानात भर पडल्या मुळे या भौतिक जगात कधी ही दुःखी होत नाही. त्याकाळात सर्व संतमंडळिंनी ऐव्हढे मोठ्या प्रमाणात ग्रंथ आणि साहित्य लिहून ठेवले की त्याचे वाचन करता करता आयुष्य कमी पडेल पण ग्रंथ संपनार नाही. आणि या युगात कुठल्याच बाबा लोकांना गुरू मानुन सर्वांचीच फसवणुक करून घेण्यापेक्षा जर ग्रंथालाच आपले गुरु मानले तर नक्कीच सगळ्यांचाच फायदा होईल. ग्रंथ हे समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा जागेवर अनंतात. मित्रांनो लहानपणी साने गुरुजींचे श्याम ची आई, तरुनपणी ग्रामगीत व भारताचे संविधान तसेच म्हातारपणी ज्ञानेश्वरी वाचुन चिंतन व मनन करा.
सौ . मेघा विनोद हिंगमिरे
भारत विद्यालय वेळा
7798159828
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
19) *पुस्तक*
आज २३एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त, पुस्तकांवर बोलू काही. पुस्तकांच्या ऊगमाचा इतिहास खूप रोचक आहे. अगदी पुरातन काळी जेव्हा लिहिण्याचे साधन नव्हते तेव्हा सगळं मुखोद्गत असायचे. स्वरात असायचे. प्राचीनकाळी आपल्या येथील शिक्षण संस्था प्रामुख्याने मौखिक परंपरेला मानणारी होती. विद्याभ्यासही मौखिक परंपरेने चालत आलेला आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा होता. मग भोजपत्रावर लिहिणे सुरु झाले. महाभारत भोजपत्रावर लिहिले गेले होते. पुढे काळाच्या ओघात छपाईची कला अवगत झाली आणि पूर्वासुरींचे हे मौखिक विचारधन छापील स्वरूपात कायमस्वरूपी बंदिस्त झालं. पण हे सगळे घडून आले ते भाषेमुळे. भाषेची उत्पत्ती शब्दातून झाली. शब्दांची निर्मिती अक्षरातून झाली . "_पण अक्षरांची उत्पत्ती कशी झाली_"?
महाशून्यातून उद्भला ओंकार,
ओंकारतून प्नसवला अनहद नाद,
अनहद-नादातून निपजला स्वर.
स्वरांना लाभले अक्षरांचे लेणे,
ओविता अक्षरांना उपजले शब्द,
शब्द-कळ्यांनी गुंफल्या ओळी,
स्वरातून अक्षरांची उत्पत्ती झाली. अक्षरचा अर्थ जे क्षर नाही, नाशवंत नाही. लेखकाची चेतनाच अक्षरात अवतरते. अक्षर म्हणजे अक्षयचेतना अक्षरातून ऊदभवले *शब्द ब्रम्ह*.पुस्तक /ग्रंथ म्हणजे मूर्तिमंत ब्रह्म.
श्रीकृष्णानी परजले शब्द ;
तिक्ष्ण धारेनी वेधले अज्ञान,
दिले समरांगणी कुरू-क्षेत्रात,
श्रीमद भगवतगीतेचे ज्ञान....
ज्ञानेश्वरांची अक्षय चेतना,
प्रकटली प्रत्यक्ष शब्दब्रम्हात,
अवतरल्या अक्षरातून ओवी,
साक्षात ज्ञानेश्वरीच्या रूपात..
भगवतगीता, ज्ञानेश्वरी,दास बोध अशी ग्रंथसंपदा ज्ञानाचा अथांग सागर आहे. हे ग्रंथ गुरुच आहेत. ह्या ग्रंथातून आत्मज्ञान मिळते. आत्मबोध जागा होतो. जीवनाचा अर्थ कळतो. जीवनाचे प्रयोजन कळते.एवढेच नाही तर हे ग्रंथ आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणतात. हे ग्रंथ खरे गुरु होय. शिवाय ही ग्रंथसंपदा एक दीपस्तंभ असते. अज्ञानाचा अंधार नाहीसा करून ज्ञानरूपी प्रकाश दाखविणारा सूर्य म्हणजेच ग्रंथ होय. ह्या विश्वात अफाट ग्रंथसंपदा आहे. ती वैविध्यपूर्ण आहे. अबालवृद्ध , सर्वांना वाचनाची शिदोरी पुरवणारी आहे. ग्रंथसंपदा म्हणजे सप्तरंगी ईंद्रधनुष्य .ग्रंथात ७ गुण आहेत. ग्रंथवाचनाने आपणास लेखन कौशल्य, वक्तृत्व कला, आदर्श जीवन जगण्याची कला, आत्मविश्वास, ज्ञान, अनुभव व अनेक प्रकारची माहिती प्राप्त होते.सत्य समजते.
काही पुस्तके विज्ञानाची विविध दालने आपल्या समक्ष उद्धृत करतात. बहुतांशी पुस्तकातून काही तरी नवीन शिकायला मिळते. व आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण, चौफेर विकास होतो. तर काही पुस्तके निखळ आनंद देतात. आपले ‘ रंजन करता-करता ही पुस्तके आपल्या डोळ्यात चांगल्या शिकवणुकीचे प्रभावी झणझणीत अंजन घालतात.’ काही पुस्तकाशी आपली मैत्री होते. ही पुस्तके आपल्या मनात खोलवर रुजतात. वारंवार वाचल्या जातात. त्या विषयावर चर्चा केली जाते. कधी कधी व्याख्याने पण घडतात.; जनजागृतीवर आधारित अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. यांचा उपयोग समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, चाली-परंपरा याचे उच्चाटन होण्यास होतो.यामुळे समाज सुधारणा होते, समाजसुधारणेत ही ग्रंथच बहुमोलाचे कार्य करतात. आपला पूर्वापार चालत आलेला ग्रंथांचा वारसा पुढे नेणं ही आपलीच जबाबदारी नाही का! नक्कीच आहे. पण ही जवाबदारी पार पाडायची कशी हा ऐक यक्ष प्रश्न आहे?
बालवयात मुलांना गोष्टीचे आकर्षण असते. त्याना रोज नवीन गोष्ट सांगितली की, त्याना हळुहळु गोष्टीची आवड निर्माण होते. रंगीबेरंगी चित्र कथा,बाल कथेची पुस्तके वाचून दाखवली की त्यांना सुद्धा वाचनाची गोडी लागते. हा माझा स्वानुभव आहे. मी माझ्या मुलीत आणि नातीत सुद्धा वाचनाची आवड निर्माण केली आहे . प्रत्येक परिवारातील निदान एक सदस्यात जरी वाचनाची आवड निर्माण झाली तरी त्याचे दूरगामी परिणाम होतील. सरत शेवटी
प्रकाशा शिवाय अंधार कसा फिटणार?
औषधा शिवाय रोग कसा दूर होणार?
प्रेमा शिवाय कलह कसा मिटणार?
‘ग्रंथाशिवाय’ ज्ञान कसे मिळणार?
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
20) पुस्तक :-चारित्र्य निर्माण करण्याचे साधन
मानवाला आपल्या अवतीभवतीचे अदृश्य जग समजून घ्यायचे असेल तर सर्वांना वाचनाची कास धरावी लागेल.पुस्तकांवर प्रेम करायला हवे .पुस्तकांशी एकदा नाते जुळले की जीवनाचा प्रवास अगदी आरामदायक होतो,कारण आपल्याला काळजी करायची गरज नसते. पुस्तक सदैव आपल्या सोबतीला असते.पुस्तक वाचनाची एकदा आवड लागली तर आपणास आपल्या जीवनात काय फरक पडतो, हे सहज कळते. मनातील जळमट काढून टाकण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे विविध रंगी वाचन. मेंदूसाठी सर्वोत्तम खाद्य म्हणजे वाचन होय.
पुस्तक हे आपले गुरू सारखे असतात ,कारण आपण ज्या गोष्टींचे वाचन केले आहे त्या वाचनातून आपण बरेच काही शिकत असतो व घडत असतो.शिकवण्याचा, मार्ग दाखवण्याचा,घडवण्याचं काम पुस्तक करत असतात.आपण वाचलेलं कधी थोडा वेळ स्मरणात राहतं ,तर काही पुस्तके आयुष्यभर स्मरणात राहतात. आजूबाजूची परिस्थिती आपल्या वाचनावर नक्कीच परिणाम करते.पुस्तक वाचनामुळे मानवाला काही पात्रांचा आपल्या जीवनावर परिणाम झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ छत्रपती संभाजी
महाराज हे छावा या पुस्तकातून तर मृत्यूंजय मधून कर्ण समजून येतो.पुस्तक वाचनामुळे आपण समाजात वावरताना किंवा व्यवसायात व्यक्तींशी संवाद साधताना कधीच अडथळा येत नाही.कोणता शब्द कुठे आणि कसा वापरावा याचे ज्ञान आपणास अवगत झालेले असते,त्यामुळे संवाद सुकर होतो.वाचनामुळे आपले शब्द भंडार समृद्ध होते लेखन करताना व्याकरणात चुका टाळता येतात. वाचनामुळे संभाषण कौशल्य विकसित झाल्यामुळे बोलताना इतरांची मने दुखविणे टाळता येते. एकटे राहण्यापेक्षा आपण आपल्या सोबतीला पुस्तके नेहमी ठेवलीत, तर ते योग्य वाट दाखवितात.
पुस्तके चारित्र्य निर्माण करण्याचे उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो ,तसेच पुस्तकाद्वारे नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे, जी कधीच थांबत नाही. जर आपल्या भविष्याचे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर चांगल्या दर्जेदार व उत्तम पुस्तकांना आपले मित्र बनवावे लागेल त्यावर दुसरा पर्याय आपल्यासमोर नाही .
विश्वाचा विसर पाडण्याची प्रचंड क्षमता पुस्तकात असते. सारे विश्व आपल्या विरोधी असतांनाही आपण पुस्तकांशी मैत्री करू शकत। पुस्तक आपला एकटेपणा तर घालवतातच,पण त्याच बरोबर एक नवीन शक्ती, नवीन उत्साह आणि नवीन दिशाही देतात.जीवनात आलेली मरगळ घालवायची असेल तर, पुस्तक वाचलेच पाहिजे. संकटाशी सामना करण्यासाठी मानसिक आणि बौद्धिक तयारी करण्यासाठी सुद्धा पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे.कुणीतरी म्हटल्याप्रमाणे "सर्वच अनुभव स्वतःच्या जीवनात घेण्याएवढे आपले आयुष्य मोठे नसते, म्हणून आपण इतरांच्या अनुभवावरून पण शिकले पाहिजे". प्रत्येक पुस्तक एक अनुभव असतो,तो अनुभव घेण्यासाठी व्यक्तीने सारे आयुष्य खर्ची घातलेले असते. तोच अनुभव एक किंवा दोन तासात घ्यायचा असेल तर पुस्तक वाचण्यासारखा सोपा उपाय दुसरा कुठलाही नाह। एकूण काय माणसाला जगण्यासाठी सुद्धा पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे.
सौ.योगिता नागमोती.नाशिक
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
21) वाचन संस्कृती आजची गरज....
" ज्ञानरुपी गंध पसरुनी सुगंधित केले समाज सारा,
संकटे अनेक सोसली परी दूर केला अज्ञानरुपी अंधकारा"
"वाचाल तर वाचाल"
ही मन आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो, परंतु आजच्या तरुण पिढीला याचे महत्व कळण्याची आजही गरज आहे, आजच्या युगातील तरुणांना वाचनाचे वेड असायलाच हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पर्यायाने त्याचा उत्तम युवा पिढी घडवण्यासाठी उपयोग होईल.
वाचन केल्याने माणूस कुठं पर्यंत जाऊ शकतो याच थोडक्यात उदा. महानपूज्य भीमराव आंबेडकर हे जग प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे वाचणं, ते दिवसाचे 18 तास वाचन करून भारताला कसे जगायला पाहिजे हे शिकवले, आणि वाचनानेच आपल्याला हवं ते साध्य करता येते हे त्यानी सिद्ध केले.
आज मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागील पिढी पेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे, वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे.
लोकमान्य टिळकांनीही म्हटले की, तुम्हाला तुम्हचे व्यक्तीमत्व घडवायचे असेल तर वाचन करा, धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन करा असा उपदेश त्यांनी दिला, मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात इलेक्ट्रनिक्स उपकरणांनाच्या दुनियेत गुंतल्यामुळे त्यांच्या उपदेशाकडे नव्या पिढीचे लक्ष नाही. सखोल विचारातूनच एकरूप समाज निर्माण होत असतो, आणि सखोल विचार करण्याची सवय चांगल्या विचारातूनच तयार होते, हे आज आपण कुठंतरी विसरत चाललेले आहे, याची जाणीव आपल्याला असायला हवी.
वाचन म्हणजे जीवनाला उत्तम करणारी बाब असून बुद्धीची मशागत होते, माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा खूप महत्वाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत पुस्तके हा अनेकांचा जिव्हाळ्याच विषय आहे. पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठीकाण म्हणजे वाचनालय असे, मात्र आज त्याची जागा इंटरनेट व ई-बुक ने घेतली आहे, ऑनलाइन साईटवर विविध विषयामधील पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, तरीही आजचा तरुण वाचनापासून दूर जातोय, तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी,त्यांना वाचनाचे महत्व कळावे यासाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुस्तकातील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कायमचा बदलून जातो, पुस्तके हे केवळ शब्दसंपदा वाढविण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तके हे अनुभवासह कल्पनांचे आशा, आकांक्षाचे क्षितिज निर्माण करणारे साधन आहे. ते आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात त्याचे महत्व आपल्याला पटले पाहिजे.
" या जगात जे जे उपलब्ध आहे. त्या सर्वांमध्ये विद्येचा साठा अधिक आहे".
महेंद्र एन.संगावार
रा. सोनापूर जि. गडचिरोली
(9011560498)
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
22) पुस्तक माझा मित्र...
जे जे आपणासी ठावे
ते ते इतरासी सांगावे
शहाणे करूनी सोडावे
सकळ जना
आपल्याशी खर बोलणारा मनातील प्रत्येक गोष्ट आपल्याला जशीच्या तशी
खरी सांगणारा मित्र कोण असेल तर ते म्हणजे आपले पुस्तक..खरा मित्र
खरोखर अनादीकालापासून च्या जगाच्या इतिहासाचे रहस्य, मानवाच्या उत्पत्तीचा इतिहास ,आध्यात्मिक वारसा ,जगाच्या नकाशावरील अनेक घडामोडी आपल्याला पुस्तका शिवाय कोण सांगत ?पुस्तकच ना..मानव काही एवढा दीर्घायुष्यी थोडाच आहे जो आपल्याला घडलेल्या चांगल्या वाईटाची माहिती देईल
आपण ते सर्व पुस्तकामधे तर वाचतो.
वाचाल तर वाचाल उगीच नाही म्हटले
जगात कुठे तरी स्थान मिळवायचे असेल किवा स्थिर व्हायचे असेल तर नक्कीच वाचावे लागेल पुस्तकांना.पुस्तक वाचल्यामुळे तर आज आपण वेगवेगळ्या साहित्यिकाचे विचार जाणु शकतो कारण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते कुणी सकारात्मक ,कुणी नकारात्मक ,कुणी विनोदी शैलीतून आपले विचार मांडत असतो.वाचकाला काय हवे हे लेखकाला थोडेच माहित असते परंतु वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनातून आपण ते प्राप्त करतो व पुस्तक वाचनाची आवड कायम जपतो.
आज शिक्षणाची दार॔ खुली झाली व
पुस्तकाचे भांडार समोर येऊन पडले त्या ज्योती सावित्री व बाबासाहेबाना तर नतमस्तक व्हावेच लागेल.जगण्याचं गणितच माहित नव्हते आम्हाला देव व दानवातला फरक समजण्याची कुवत नव्हती आमची परंतु याच "पुस्तकानी"
"आज आमची मान अभिमानाने ताठ केली आहे"
किती हुशार केले आम्हाला या पुस्तकांनी
कारण आमच्याशी कुणी कधी हिताचे व फायद्याचे बोललेच नाहीत इतिहास सांगतो..परंतु जगात चांगल्या विचाराची माणसे आहेत ..त्यानी तर मोठमोठ्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे की ,माणसाला जगण्यासाठी पुस्तकाचा सहारा घ्यावा लागतो,आधार घ्यावा लागतो..त्याशिवाय आपल्या जगण्याला
पूर्णत्व नाही.
निष्क्रिय,निरस जीवन जगणे हे पशुत्वाचे लक्षण आहे माणसांमध्ये कशी रसिकता हवी ....आणि ती हवी असेल तर निश्चितच आपल्याला सुरेश भटांच्या कविता गझल वाचाव्या लागतील पु.ल ची बटाट्याची चाळ वाचावी लागेल.खरोखर पुस्तक वाचनाने माणसांत जिवंतपणा येतो. स्वत्व हरवून जातो हो..आपण..सुखदुःखाचे भान राहत नाही
काळाचा विसर पडतो ..पुस्तकाच्या व्यक्तिरेखा क्षणभर स्वतः जगतो आपण किती छान...सुखद अनुभव ..साने गुरूजीचे श्यामची आई वाचताना एवढी तंद्री लागते ..डोळ्याच्या कडातून पाणी कधी ओघळले व किती ओघळले ,नाही कळत..श्यामचे जीवन जगुन होते कलाकार साहित्यिक खूप हळवा असतो हो...त्याला पुस्तकातील व्यक्तिरेखा जगायला पण आवडतं ...पण हे सर्व कधी शक्य होतं .जेव्हा आपण वाचनासाठी पुस्तक हातात घेतो...खरोखर पुस्तक जीवनातील उणीवा भरून काढतो.जाणीव निर्माण करतो .कारण ते आपल्याला जे मनात आहे ते सांगतो ..म्हणून तर ते सर्वांच्या आवडीचे आहे.अगदी लहानापासून थोरापर्यंत..पुस्तक सर्व जण वाचतातच.
आम्हाला जीवनात यशस्वी व्हावे असे वाटत असते म्हणून आपण थोरामोठ्याच्या जीवनचरित्राचे ग्रंथ वाचन करतो.तेवढे नाही पण काठापर्यंत तर नक्कीच जाता येते आपल्या .असं म्हणतात" जसं अन्न तस मन".तसेच
जसे वाचन तशीच वैचारिकता पण असते
पुस्तक वाचनाचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव असतो. एकटेपणाची जाणीव न होऊ देणारा माझा पुस्तक मित्र मी खूप जपते त्याला तो ही माझ्या प्रत्येक सुखदुःखाचा साक्षीदार आहे.पुस्काला गुरू म्हणावे की मित्र ..पण मी तर मित्रच म्हणते कारण मित्रांसमवेत प्रत्येक रसात जगता येत.
पुस्तका तुच माझा आधार
मानते तुझे मी आभार
****************************
स्नेहलता कुलथे बीड
मोबा.7588055882
Kulthe.lata@gmail.com
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
23) ग्रंथ हेच गुरु
गुरू तो जो लघू नाही. गुरू तो जो दुसऱ्याचे लघुत्व हरून त्याला मोठेपणा मिळवून देतो. गुरु योग्य दिशा व मार्ग दाखवितो.अंधारातून प्रकाशाकडे नेतो. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो गुरू .”गुर्रूब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः|| ब्रह्म देवाप्रमाणे सद्गुणांची उत्पत्ती, विष्णू प्रमाणे त्या सद्गुणांचे पालन-पोषण व संवर्धन करतो आणि शिवा प्रमाणे दुर्गुणांचे ,वाईट विचारांचा संहार करतो तो गुरू .आईच्या मायेने समजतो, वडिलांप्रमाणे योग्य-अयोग्यची समज देतो आणि मित्राप्रमाणे जो सोबत करतो. “अज्ञानतिमिरअंधकारस्य ज्ञानांजन शलाकाया तस्य चक्षुर्उमिलितेन तस्मै श्री गुरवे नमः| अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानरूपी अंजन डोळ्यात घालतो आणि आपली दृष्टी सतेज करतो तो गुरू.
अज्ञानाने भीती जन्म घेते, भीतीने अंधविश्वास जन्म घेतो, अंधविश्वासाने अंधश्रद्धा जन्म घेते, अंधश्रद्धेने व्यक्तीचा विवेक शून्य होतो, तो व्यक्ती मानसिक गुलाम होतो. म्हणून अज्ञानी नाही तर ज्ञानी बनावे असे ग्रंथ आपणास सांगतात. म्हणुनच ग्रंथ हे आपले गुरू आहेत .आपले अनेक प्रकारचे अज्ञान दूर करून श्रद्धेचा डोळा देतात. अज्ञानाच्या अंधकारातून आपल्याला योग्य मार्ग दाखवितात. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची प्रेरणा ग्रंथच देतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना देखील त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन करून प्राप्त परिस्थितीवर मात करत ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर' नावाचा ग्रंथ लिहिला. त्यातून कित्येकांना प्रेरणा मिळाली .लोकमान्य टिळकांना ज्यावेळेस आयुष्यात अडचणी आल्यात तेव्हा तेव्हा त्यांनी श्रीमद् भगवद्गीतेचा आधार घेतलेला दिसून येतो. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे या महापुरुषांच्या जीवनचरित्रातून हेच समजते की त्यांच्या जीवनात ग्रंथांचे स्थान अनन्यसाधारण होते .
आपण ज्या कुटुंबात, समाजात लहानाचे मोठे होतो त्या समाजात अनेक रूढी ,परंपरा, उत्सव, सण आपण साजरे करत असतो.ते का करायचे ?त्या मागील आपली भूमिका काय? परंपरेने आपले पूर्वज करत आले म्हणून आपणही करायचे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणांस ग्रंथच देतात.संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे. “वसुधैव कुटुम्बकम” ची भावना जागृत ठेवण्याचे काम ग्रंथ करतात. माणसाने माणसाशी माणसासम वागले पाहिजे ,स्व:ची जाणीव निर्माण करून मानवाच्या पंखात गगन भरारी घेण्याचे बळ ग्रंथामुळे येते. साहित्य, संगीत ,कला याविषयीचे ज्ञान ग्रंथ देतात. संसार रुपी सागर तरून जाण्यासाठी ग्रंथरूपी होडीच साहाय्यभूत ठरते.मानवी मनात जेंव्हा काही विकार उत्पन्न होतात तेंव्हा त्या विकारांना योग्य दिशा देऊन त्यांचे विचारांत परीवर्तन करण्याचे काम ग्रंथ करतात. ग्रंथामुळे व्यक्तीत चातुर्य व विवेकीपणा येतो. व्यक्तीची सद्सद्विवेकबुद्धी ही केवळ ज्ञानानेच जागृत राहते, अशी व्यक्ती स्वतः बरोबरच इतरांचे देखील आत्मभान जपते. ज्ञान हि अशी शक्ती आहे की तिच्यामध्ये स्वत:बरोबरच संपूर्ण विश्वाला बदलण्याची ताकद आहे. म्हणूनच त्याला तिसरा डोळा म्हटले आहे. समर्थ रामदास सांगतात की ,नासे अज्ञान ,दुःख भ्रांती || शीघ्रची होय ज्ञानप्राप्ती || ऐसी फलश्रुती इये ग्रंथी ||ग्रंथामुळे व्यक्ती ज्ञानवान होऊन सर्वत्र कौतुकास पात्र ठरते. “स्वदेशे पूज्ये राज विद्वान सर्वत्र पूज्यते ”राजा फक्त स्वदेशात पूजला जातो पण विद्वान व्यक्ती सर्वत्र पूजनीय ठरते. आपल्याला घरबसल्या विश्वाची सैर घडवून आणण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्ये आहे. ग्रंथाकडून मिळालेले ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करत असते ज्याप्रमाणे प्रकाश अंधार नाहीसा करतो त्याचप्रमाणे विद्येच्या प्रकाशाने अज्ञानरूपी अंधार नष्ट होतो.
मानसिक अपंगत्व व शारीरिक अपंगत्व दूर करण्याचे सामर्थ्य ग्रंथामध्ये आहे .माझ्या एका मैत्रिणीचा दुचाकीवर मोठा अपघात झाला होता. फार मोठी दुखापत पायाला झाली होती. सहा वर्ष अंथरूणावर होती. या कालावधीत तीला ग्रंथांनीच आधार दिला. तिचे मनोबल वाढविण्याचे काम ग्रंथांनी केले. आणि तिने देखील ग्रंथांचा आधार घेत ‘साहित्य भूषण' ही पदवी मिळवली. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील कि ग्रंथांमुळे व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे.श व्यक्तीचे आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य फक्त गुरू असते आणि म्हणून ग्रंथ हे गुरु आहेत
“तैलाद रक्षेत,जलाद रक्षेत ,रक्षेत् शिथिल बंधनात”या ग्रंथांचे आपण तेल, पाणी यांपासून रक्षण करायला हवे.त्याची पाने सैल होऊ नये म्हणून त्यांना व्यवस्थित कव्हर घालावे.त्यांची पाने दुमडून नये.ग्रंथ हाताळताना काळजीपूर्वक हाताळायला हवेत कारण ग्रंथ हे गुरु आहेत.
सौ.आरती डिंगोरे, नाशिक.
९४०४६८७७२९
aartidingore@gmail.com.
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
24) *"पुस्तक - सच्चा मित्र."*
माणसाच्या आयुष्यात अनेक वेळा एकट्याने संकटाला सामोरे जायची वेळ येते. बरेचदा उपाय न सुचणार्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो. नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्र किंवा मदतीचा कोणताही हात पुढे येत नाही. अशावेळी काय करावे, हे आपल्या मेंदुला सुचते, ते केवळ मेंदूच्या अनेक कप्प्यांमध्ये साठवून ठेवलेल्या आपल्या पुस्तकरूपी मित्राच्या सहाय्याने.
जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस त्याच्या मेंदूच्या केवळ चाळीस टक्केच भाग वापरतो असे म्हटले जाते. खरे खोटे माहित नाही. पण लहानपणापासून आपण जेवढे वाचन केलेले असते, ते मात्र आपल्या मेंदूच्या कुठल्या न कुठल्या तरी कप्प्यांमध्ये साठवून ठेवलेले असते. त्या माहितीचा आधार आपल्याला वेळोवेळी होत असतो. वाचन मग ते कोणत्याही प्रकारचे असो. तुम्ही गोष्टीचे पुस्तक वाचा, अभ्यासाचे पुस्तक वाचा, ज्ञानसंवर्धनाची पुस्तक वाचा, विरंगुळ्यासाठी पुस्तक वाचा किंवा अध्यात्म चे पुस्तक वाचा.
पुस्तके आपल्याला जगायला शिकवतात, पुस्तके आपल्याला जगाकडे बघायला शिकवतात. पुस्तके आपल्याला जगात वागायला शिकवतात. पुस्तके आपल्याला श्वास घ्यायला शिकवतात. पुस्तके आपल्याला इतरांना मदत करायला शिकवतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करायला सगळ्यात जास्त मदत कोणाची होत असेल तर ती पुस्तकांची....!
जीवनात सगळी माणसे तुमची साथ सोडतील, मित्रपरिवार, कुटुंबीय, तुमचे जोडीदार किंबहुना तुमची मुले सुद्धा तुमचा साथ सोडतील. तुम्ही कमावलेले पैसे, दागदागिने, रोख आणि जंगम मालमत्ता एवढेच काय पण, तुमची तब्येत सुद्धा तुमची साथ सोडते. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जर काही तुमच्या सोबत राहत असेल तर ते केवळ पुस्तकांच्या मदतीने तुमच्या डोक्यात राहिलेलं ज्ञान.
जेव्हा हाती काहीच नव्हते, तेव्हा 10000 ओळी तोंडपाठ करून अंदमानातून आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून काढली होती. ही अलौकिक बुद्धिमत्ता, प्रज्ञा, ओज रुपाने प्रकट झाली ती पुस्तकाच्या माध्यमातून.
ज्ञानोबांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी असेल किंवा तुकोबांनी सर्वसामान्यांच्या मुखामध्ये दिलेली अभंग वाणी असेल. या शाश्वत ज्ञानाचा उपयोग आपल्या आयुष्यात होत असतो.. आणि म्हणूनच संवर्धन करणारा मुख्य स्रोत म्हणून पुस्तके आपल्या आयुष्यात येतात आणि ती एका सच्चा मित्राची भूमिका पार पाडतात.
श्री. गुरुराज गणेश गर्दे.
समुपदेशक पुणे.
9422058288.
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
25) 'पुस्तक खरा सद्गुरू'
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
'पुस्तक हेच माझे गुरू
त्याने झाले जीवन हे सुरू
लहानपणी चाले तुरु तुरु
व बोले मात्र चुरुचुरु'
एका कवीने लिहिलेल्या या ओळींप्रमाणे खरोखरच पुस्तका शिवाय दुसरा सदैव संगतीत राहू शकणारा दुसरा गुरू या जगतात सापडणे मुश्किल आहे.कदाचित आपल्या शाश्वत गुरूंचा सहवास काही काळापूर्तीच मर्यादित असतो पण पुस्तक मात्र सदैव आपल्याला कोणत्याही ठिकाणी आणि केव्हाही उपलब्ध होऊ शकणारा गुरू आहे.थोडक्यात पुस्तक जगातील एकमेव असा गुरू आहे ज्याला स्थळ,काळ किंवा वेळेचे बंधन नाही.
असं म्हणतात 'ज्याच्या घरी नाही पुस्तकांचे कपाट ते घर होईल भुईसपाट' खरोखरच स्वयंअध्ययनाने स्वतःला समृद्ध करणारा खजिना म्हणजे पुस्तक,सर्वप्रकारच्या ज्ञानाचा दिशादर्शक म्हणजे पुस्तक,अनुभवांची गाढ शिदोरी म्हणजे पुस्तक,भरकटणाऱ्या मनांना बंदीस्त करणारी श्रुंखला म्हणजे पुस्तक,प्रगाढ ज्ञानाचा साठा म्हणजे पुस्तक,सहज साधनेने ज्ञानाच्या उपासनेचा मार्ग म्हणजे पुस्तक. सहजासहजी उपलब्ध होऊन कुबेराचा धना सारखे ज्ञानाने धनवान होण्याचा मार्ग म्हणजे पुस्तक,या पुस्तकरूपी भांडारातून जितके ज्ञानाचे कण वेचावे तितका माणूस अधिक समृद्ध होऊन अष्टपैलू होतो.
या पुस्तकरूपी गुरूच्या ठायी जो लिन होई त्याला सारस्वतांच्या पंगतीत स्थान मिळण्याची संधी प्राप्त होत असते.असं म्हणतात ज्याच्या सोबत पुस्तके आहेत ती व्यक्ती या जगात कधीच एकटी नसते.म्हणूनच पुस्तकांसारखा दुसरा खरा साथी कोणीही नाही असे म्हटले असावे.कदाचित वास्तविक जीवनातले आपले मित्र आपली साथ सोडतील, स्वार्थपारायण भावनेने आपल्याला योग्य मार्गदर्शन करतांना त्यांचा हात आखडला जाईल पण पुस्तकरूपी मित्र मात्र सदैव योग्य दिशादर्शकाचे काम करत असतात.
या पुस्तकरुपी गुरूंचे महत्व स्पष्ट करतांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयांची भाकरी खरेदी करा व एक रुपयांचे पुस्तक घ्या ,भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.' जशी पोटाची भूक शमवण्यासाठी भाकरी आवश्यक आहे तशीच ज्ञानाची भूक भागविण्यासाठी पुस्तके उपयोगी पडत असतात.जीवनाच्या प्रत्येक बऱ्या वाईट अनुभवांना सामोरे जाण्यासाठीच नव्हे तर एक अष्टावधानी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पुस्तके उपयोगी पडतात.
पुस्तके केवळ ज्ञानच नाही तर मनोरंजन करून आपल्या सर्वच ताण तणावात मनाला उभारी देण्याचं जणू टॉनिकच आहे.पुस्तकांच्या सानिध्यात माणसाला केवळ एकसुरी ज्ञान मिळते असे नाही तर चौरंगी आणि चौरस प्रकारचे ज्ञान पुस्तकातुन मिळत असते.पुस्तके खऱ्या अर्थाने झेप घेणाऱ्या पंखांना बळ देण्याचे काम करतात.
पुस्तके खऱ्या अर्थाने ज्ञानाचे वाहक आहेत. आज प्राचीन काळी लिहिलेल्या ग्रंथ संपदा मानवी जीवनातील विविध नाविन्यपूर्ण संशोधन कार्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.नव नवीन आविष्कार, सर्जनशीलता नव्या पिढीकडे अलगत पोहचवण्याचे काम पुस्तके करीत आहेत.असं म्हणतात की इतिहास घडविण्यासाठीच नव्हे तर त्यात यशस्वी होण्यासाठी अगोदरच्या इतिहासाची पाने चाळावी लागतात.आशा सर्वच क्षेत्रातल्या इतिहाचाच खरा आरसा म्हणजे पुस्तकरूपी गुरुच आहे. जाता जाता एव्हढंच म्हणावेसे वाटते,
वाचन वाढले तर विचार रूजतील
विचार रुजले तर संस्कृती रुजेल
संस्कृती रुजली तर सत्कृत्य रूजतील
सत्कृत्य रूजले तर सुसंस्कार टिकतील
सुसंस्कार टिकले तर आणि तरच पिढी पिढी मधील सुसंवाद टिकेल.आणि तेव्हाच भारताचे सुजान आणि कर्तव्यदक्ष नागरिक तयार होऊन आपला देश जगाच्या इतिहासात महासत्ता नक्कीच बनेल.
म्हणूनच म्हटले जाते 'वाचाल तर आणि तरच वाचाल' कारण वाचन हे मनाचे अन्न आहे.मात्र त्यासाठी 'या संस्कृत सुभाषिताचा अर्थ लक्षात घ्यावा लागेल-
अर्थेंन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन | अर्थेन ग्रंथ संभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः||
म्हणजेच पैसे देऊन औषध मिळते,पण आरोग्य कधीही पैसे देऊन मिळत नाही.पैशांनी पुस्तकांची चळत विकत मिळते, पण त्यामुळे ज्ञान मिळत नाही ते पुस्तके वाचून कष्टाने मिळवावे लागते.
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
पुस्तकदिनाच्या शुभेच्छा
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
26) गाव तेथे ग्रंथालय
वाचाल तर वाचाल ही म्हण आपण फार पूर्वीपासून वाचत आलेलो आहोत. ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार असून ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे सागर होत. ते मानवाचे उत्तम गुरु व सच्चे मित्र आहेत. कधी कधी त्यांच्या महत्त्वाला रेडिओ, टीव्ही,मोबाईल,लॅपटॉप यांसारख्या दृक्श्राव्य साधनांमुळे आहोटी लागल्यासारखे वाटते, पण ज्ञानार्जनासाठी ग्रंथालयाइतका प्रभावी दुसरा पर्याय नाही. ग्रंथालये ही अक्षरवाड्.मयाची भव्य कोषागारे आहेत आणि ती सहज उपलब्ध असून अखंडपणे वाहत असणारी ज्ञानसरिता आहे. ग्रंथालयाची चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत विस्तारित करण्याची आवश्यकता आहे ती यासाठीच.
काही ग्रंथांचा आस्वाद घ्यायचा असतो काही थोडे ग्रंथ चावून पचनी पाडायचे असतात. याचाच अर्थ असा की काही पुस्तके केवळ मधून-मधून चाळायची असतात. ग्रंथाच्या वाचनाने मानवाला परिपूर्णता प्राप्त होते. वादविवादातून त्याला हजरजबाबीपणा प्राप्त होतो. लेखनामुळे त्याच्या अंगी तंतोतंतपणा बाणतो.पूर्वी मुलांना साहित्य, सामाजिक व नैतिक तत्त्वप्रणाली तसेच तत्त्वज्ञान व धर्म यांचे सुद्धा शिक्षण त्यांच्या बालवयातच आजीने सांगितलेल्या गोष्टीं- मधूनच मिळत असे. त्यामुळे मुले संध्याकाळ झाली की आजीच्या सभोवती घोळका करून बसत असत. परंतु संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि वैज्ञानिक संशोधनातील टीव्ही,संगणक, लॅपटॉप या माध्यमांमुळे त्या गोष्टी ऐकता व पाहता येतात.
परंतु भारतातल्या कितीतरी खेड्यात अजून वीजही पोहोचलेली नाही, त्यामुळे दूरदर्शन ,संगणकसारख्या वैज्ञानिक सोयीसुविधा तेथे पोहोचणे विरळच. म्हणून वाचनालय, ग्रंथालय असणे अत्यावश्यकच. 'गाव तेथे ग्रंथालय' या घोषवाक्यानुसार अगदी लहानात लहान गावापर्यंत ग्रंथालय चळवळ पोहोचणे आवश्यक आहे. ग्रंथालय हीच मानवी हृदयातील देवालये आहेत.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधियेल्या
जसे देवळाच्या पायरीवर उभे राहिल्याने देवाशी हितगूज साधता येते, तसे ग्रंथालयात डोकावल्याने त्यातील ज्ञानगंगेशी एकरूप होता येते.
सौ.भारती सावंत
मुंबई
📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕 💐📕
सर्व लेख वाचल्याबद्दल आपले मनस्वी आभार.
सर्वच छान
जवाब देंहटाएंNice .khupch sundar..bro👍👍👍👌
जवाब देंहटाएंFrom
Mahendra sangawar
khupch chhan..........
जवाब देंहटाएं