शनिवार, 25 जुलाई 2020

21 प्रदीप पाटील

बोधकथा.... 
लेखक.. प्रदीप मनोहर पाटील... 

माझे आजोबा कै. वेडू आण्णासो.. लहानपणी  मला नियमित  गोष्टी सांगत त्यातील आठवणीतील एक गोष्ट...  


गाव होते लहान काळ नवं युगास सुरवातीचा. सारे बाराबलुतेदार गुण्यागोविंदात आप आपली कामं करत. हेवेदावे,  द्धेष,  मत्सर कधीच कोणाला शिवत नसे एकोपा सर्वांच्या ठायी भरलेला. विभिन्न कामं करून कुठंही जातीभेद लवलेश न्हवता.गावात एकमेकांना मान सन्मान योग्य ठेवत.  एकीत सारे कामे करत.
    
     गावात पाटील यांचा दरारा  भलामोठा वाडा  सुख समृद्धी तेथे नांदत होती छोट्याश्या किल्या प्रमाणेच त्यांचा वाडा होता. वाड्यात नोकरचाकर यांचा राबता असे. पाटलांनी हिशोब लिहण्या साठी मुनीमजी ठेवला होता. त्यातूनच त्यांच्या संपत्तीचा अंदाज येई.. पाटलांच कुटुंब तसं लहानच ते दोघे आणि त्यांना  एकच मुलगा त्याच नुकतंच काही दिवसा  पूर्वी लग्न झाले होते. संध्याकाळची वेळ होती दिवे लागणीची पाटील ओसरी वर बसलेले असतात. नेमकं त्याच वेळी गावात काही शिक्षण प्रेमी गावात शाळा उभारणी करत असतात  ती चार पाच जण शाळेच्या साठी वर्गणी मागण्यासाठी पाटला कडे येतात. पाटील सर्वांना नमस्कार करतात साऱ्यांना बसण्यास सांगतात. नोकर गुळ  पाणी आणून देतात. पाटील काय येणं केलं  त्यांना येण्याचं प्रयोजन विचारतात. गावकरी येण्याचं कारण सांगतात... नेमकं त्याच वेळी पाटलांची नवोदित सुनबाई दिवे लावत असते. वाडा मोठा तर दिवे पण खूपच लावावे लागतं वाड्यात. सुनबाई प्रत्येक ठिकाणी जाऊन दिव्यात तेल टाके आगगाडी पेटवे दिवा लावे असा क्रम तिचा सुरु असतो. त्या कडे त्याच वेळी पाटलांचे तिकडे लक्ष गेले..  सुंनबाईंना आवाज दिला ओरडले  सुनबाई अहो हे काय करतात आपण?  प्रत्येक दिव्या जवळ जाऊन आगगाडी पेटवत आहात. पहिला दिव्या  वरून सारे दिवे पेटवायचे सोडून असं कराल तर रोजच एक आगपेटी लागेल.. मला या पुढे असं चालणार नाही लक्षात ठेवा.. समज देतात... समोर बसलेले गावकरी आवाक होऊन पाहतच राहतात..मनोमन विचार करू लागतात  पाटील काय कंजूस माणूस दिसतोय आपण उगाच आलोय.. येथे काही आपल्याला वर्गणी मिळणार नाही... दहा पैश्याच्या आगपेटी साठी पण सुनबाई ला रागावले... तेवढ्यात पाटलांच्या लक्षात येते समोर गावकरी बसलेत.. ते गावकर्यांना सांगतात उदया या आपण सकाळी पाहू आपणास काय दयायचे ते आता संध्याकाळ झाली ... गावकरी उठतात निराश मनाने वाड्यावरून खाली उतरतात... दुसरा दिवस उजाळतो काही जण सांगतात आता पाटला कडे जायचं नाही तेथे काही आपल्याला एक धेला हि मिळणार नाही!. दुसरा उदगारतो अहो बोलवलं तर जाऊन पाहू बघु काय म्हणतात ते.   जायला काय हरकत !असं हो नाही करत सारे सकाळी सकाळी वाड्यावर जातात... सकाळ ची वेळ वाड्यावर सर्व घरातील मंडळी नोकर चाकर  कामात  गुंग असतात पाटील बैठकीत बसलेले असतात. मुनीम आपलं लिहण्यात व्यस्त  असतात. त्याच वेळी गावकरी येतात. पाटील सर्वांचे स्वागत करतात या आपलीच वाट पाहत होतो.  सर्वांना बसवतात आणि नोकरास गावकऱ्यांना पाणी सोबत नास्ता देण्यास सांगतात. .. मुनीम यास हाक मारून चेकबुक आणण्यास सांगतात. मुनीम चेक आणून देतो पाटील त्यावर सही करतात आणि  गावकऱ्यांच्या हाती चेक  देतात... गावकरी चेक घेतात बघतात तर  चेक वर सही आहे पण रक्कम भरलेली नाही.. विचारात पडतात यांच्या कडून चुकून रक्कम लिहली गेली नसेल!  पाटलांना विचारतात रक्कम लिहली नाही आपण?... तस  पाटील सांगतात. नाही !आपणास जी रक्कम लागेल ती भरा जेवढे पैसे शाळेच्या कामास हवेत तेवढे सारे पैसे भरा आपणास पाहिजे तितके.. सारेच  बुचकळ्यात पडतात अरे आपण काय विचार करत होतो आणि काय दिसतंय. न राहवून एक गावकरी धाडस करून विचारतो. पाटील आम्हाला खात्री न्हवती आपण पैसे देणार अशी संध्याकाळी सुनबाई  यांना दहा पैश्याच्या आगपेटी साठी बोलत होतात आणि आम्हाला कोरा चेक देतात असं का? त्यावर पाटील सांगतात माणसाने काटकसर करावी जीवनात पण कंजूस पणा करू नये ! योग्य ठिकाणी पैसा असला  तर सत्कारणी लावावा ! गावाचे काम आहे गावचा पाटील या नात्याने गावातील सारे गावकरी कुटूंबच की त्यात गावात शाळा होणार ज्ञानदान सारख्या  चांगल्या कार्यास सुरवात होतेय तर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं,  सारे शिक्षित व्हावेत. गावाचे नाव उंचवावे  म्हणून जमलेल्या पैश्यातून योग्य खर्च करतोय .... 

तात्पर्य...
1) काटकसर करावी कंजूसपणा करू नये.. 
2)"थेंब थेंब पाणी साचे " या म्हणी प्रमाणे..लहान लहान गोष्टी विचारात घेऊ  तेव्हाच श्रीमंती येते... 
3)चांगल्या कार्या साठी संपत्ती खर्च करावी.... 



प्रदीप पाटील 
गणपूर ता चोपडा 
जिल्हा. जळगाव 
मोबाईल. 9922239055©️®️

बुधवार, 22 जुलाई 2020

20 गणेश सोळुंके

कोंडमारा...

सोहम, त्याची बायको जान्हवी आणि 12 वर्षांचा मुलगा कार्तिक असं एक छोटंसं मध्यमवर्गीय कुटुंब.
कोरोनामुळे सगळं जग थांबलेलं असतांना या तिघांचं मात्र घरातल्या घरात काहीतरी सुरूच असायचं.
सोहमने त्याचा जुन्या फोटोंचा अल्बम काढला होता. त्यातील एक-एक फोटो कार्तिकला दाखवत तो आपल्या बालपणीच्या, शाळेतल्या व कॉलेजातल्या आठवणी सांगत होता. कार्तिकला सुद्धा यात मजा वाटत होती.
इकडे जान्हवी youtube चा आधार घेत ड्रेसडिझायनिंग मधल्या नवीन फॅशन शिकत होती आणि ते करून बघत होती, तर कधी-कधी नवनवीन पाककृती करून बघत होती.
कार्तिक सकाळी उठून गच्चीवर व्यायाम करणे, स्केटिंग खेळणे, दुपारी टीव्ही पाहणे, कॉम्पुटर वर गेम खेळणे असं तो आलटून-पालटून त्याच्या मुडनूसार करत असे. संध्याकाळी तिघं पण सोबत बसून एखादा चित्रपट बघत किंवा छत्रपती संभाजी राजे, चला हवा येऊ द्या यासारख्या मालिका बघत असत तर कधी-कधी नातलगांना व्हिडिओ कॉल करून बोलत असे.
सगळं एकदम व्यवस्थित चालू होतं. लॉकडाऊन मुळे बाहेर हाहाकार माजलेला असतांना यांचं वेगळंच जग निर्माण झालं होतं. कधी नव्हे तो इतका वेळ ते एकमेकांना देत होते. कोरोनाचे सावट असतांना सुद्धा हे तीन महिने कसे निघून गेले हे त्यांना कळले सुद्धा नाही.
सोहमचे आई-वडील मोठ्या शहरात राहत होते. परंतु तिकडे कोरोना पेशंट वाढत असल्यामुळे आठवडाभरापूर्वीच ते सुद्धा आता गावाकडे परत आले होते. सोहमचे आई-वडील गावाकडे आल्यापासून जान्हवी आणि सोहमवर मात्र मर्यादा आल्या होत्या. त्यांना पूर्वीसारखं मोकळं वागता येत नव्हतं, एकमेकांसोबत हसून-खेळून राहता येत नव्हतं. जान्हवीचे तिच्या सासू-सासऱ्यांसोबत बोलणं बंद झालं होतं. असं एकाच घरात अबोला धरून किती दिवस राहणार ? असं आपल्याच घरात परक्यासारखं राहणं सोहमच्या आई-वडिलांना कसं जमेल ? असे बरेच प्रश्न समोर उभे होते.
यात नेमकं कुणाला समजून सांगावं ? नेमकी चूक कुणाची ? हे मात्र सोहम ठामपणे सांगू शकत नव्हता. कारण प्रत्येक जण आप-आपली बाजू अतिशय ठामपणे सांगत होता. दोन्हीकडचे युक्तिवाद एखाद्या मातब्बर वकिलाला लाजवेल असे असल्यामुळे सोहमपुढे शांत बसण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय सध्यातरी नव्हता.
बाहेर कोरोनाने थैमान घातलेलं असतांना घरातल्या वादळापुढे सोहमचाच नव्हे तर घरात राहणाऱ्या प्रत्येकाचाच 'कोंडमारा' होत होता.
सासू-सुनेच्या वादामध्ये होणारी सोहमच्या मनातली घालमेल त्याच्या वडिलांनी ओळखली होती.
एक दिवस जान्हवी कपडे धुत होती तर सोहमची आई पूजा करत असल्याचे पाहून सोहमचे वडिल सोहमला जवळ बोलावत म्हणाले, "सोहम, ये बैस इथं." सोहम सुद्धा वडिलांच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसला.
"प्रत्येक घरात असे छोटे-मोठे वाद होतच असतात. वेळीच त्यावर तोडगा काढला गेला पाहिजे." सोहमचे बाबा त्याला शांततेत समजावून सांगत म्हणाले.
"हो बाबा बरोबर आहे तुमचं. पण, नेमकं कोण बरोबर आणि कोण चूक हेच कळत नाहीये त्यामुळे मला कोणाचीच बाजू निट समजत नाहीये. तुम्ही नसल्यावर आमच्या दोघांमध्ये जो संवाद होत असतो त्यात खूप सहजता असते. तुम्ही आल्यावर तिचा चिडचिडेपणा एकदमच वाढतो. आईचं पण तसंच असतं जान्हवी नसल्यावर आई माझ्यासोबत खूपच मोकळेपणाने गप्पा मारते, जान्हवी असल्यावर तिला पण काय होतं काही कळत नाही." सोहम पहिल्यांदाच आपलं मन वडीलांसमोर मोकळं करत होता. सोहमचं बोलणं ऐकून घेत, "हे बघ सोहम, मी समजू शकतो तुझ्या मनाची अवस्था. याचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाहीये. त्यामुळे मी परत जाण्याचा विचार केलाय. कसं आहे ना 'कोरोना' मुळे मरू तेव्हा मरू पण अश्या घुसमटीने एकतर तुम्हाला निट जगता येत नाहीये आणि आम्हाला सुद्धा. यावर पर्याय निघेपर्यंत तरी आपण दूरच राहिलेलं बरं." असं म्हणत बाबा उठले आणि त्यांनी आईला बॅग भरण्यास सांगितले.
हे ऐकून सोहम मात्र स्तब्ध होऊन बसला होता. 
सोहमच्या कुटुंबाची कथा ऐकली की या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही...

"घर असावे घरासारखे नकोत नुस्त्या भिंती...
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती"

*गणेश सोळुंके*
भोकरदन (जालना)
8390132085

रविवार, 19 जुलाई 2020

19 प्रिती दबडे

*बलिदान* 

स्मिता तशी काळी सावळी. पण नाकी डोळी छान होती.तीच थोरली होती.तिच्या पाठीवर दोन बहिणी आणि एक लहान भाऊ होता.वडिलाचं बांगड्याचं दुकान होतं. गावात बरीच बांगड्यांची दुकाने होती. त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती.स्मिताला मैत्रिणीवर्ग पण खूप होता.सतत हसत खेळत असायची ती. वेगवेगळ्या कलांवर जणु तिचं प्रभुत्व होतं. कामातही चुणचुणीत होती.लहानपणापासून आईला घरकामात मदत करायची.घरच्या परिस्थितीची चांगलीच जाण होती तिला.बारावी झाली आणि तिला स्थळ आले.ती बाबांची फार लाडकी होती.तिने स्पष्ट सांगितलं त्यांना,"बाबा, मला आत्ताच लग्न नाही करायचं."आईने पण खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.पण स्मिताचा ठाम नकार होता.

मग दुसऱ्या नंबर च्या मुलीला विचारण्यात आले.तिने हो म्हटलं. अभ्यासात फारसं डोकं चालत नव्हतं तिचं. घर मात्र आरशासारखं लख्ख ठेवायची.

पण मोठी मुलगी लग्नाची असताना तिच्यापेक्षा छोटीचं लग्न? समाज काय म्हणेल हा विचार काही आईबाबांच्या मनातून जात नव्हता. स्मिताने समजूत काढली सगळ्यांची. "बाबा, मला शिकायचं आहे. घरासाठी काहीतरी करायचे आहे."तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत होतं. बोलण्यात खूप आत्मविश्वास जाणवत होता.अखेर सगळ्यांनी समाजाचा विचार बाजूला सारून आपल्याला कशात समाधान मिळेल हे पहिले. लग्न सुरळीत पार पडलं. इकडे स्मिताने बारावीनंतर डी.एड.ला प्रवेश घेतला. लवकरात लवकर तिला स्वतःच्या पायावर उभे रहायचे होते. लग्न झालेल्या बहिणीचं चांगलं चाललं होतं.तिची अजिबात चिंता नव्हती आता कोणाला. बघता बघता डी.एड. चा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण झाला. पण अजून भरती सुरू होत नव्हती.हिम्मत न हारता तिने बी.एस.सी.ला प्रवेश घेतला. अर्ध वर्ष संपलं. पण तिचं लक्ष लागत नव्हतं. तिला आता चिंता वाटू लागली. शेवटी दिवाळीच्या सुमारास तिच्या हातात शिक्षिकेच्या नोकरीची ऑर्डर पाहून सर्वांचा आंनद गगनात मावेना. पोरीने करून दाखविले. सुखाचे अश्रू डोळ्यांतून वाहत होते.बाबांनी तर पाठच थोपटली. मोठ्या जोमाने लागली स्मिता कामाला. पहिल्या पगारात तिने सगळ्यांना कपडे घेतले. दुसऱ्या पगारापासून घरात टीव्ही, फ्रीज ह्या गोष्टी जागा घेऊ लागल्या.तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.आईने बाबांना म्हटले, "आज आपण स्मिता आली की हळूच तिच्या लग्नाचा विषय काढू.तिच्या आवडीची भजी करते मस्त." स्मिता खूप दमली होती.आईने गरमागरम चहा आणि भज्यांची डिश ठेवली स्मितापुढे. "वा! छान झाली आहेत भजी म्हणत स्मिताने चहा घ्यायला सुरवात केली. मोठया धीराने आईने विषय काढला. स्मिताने आठवण करून दिली. अजून छोट्या बहिणीचं लग्न आहे . सारंगचे शिक्षण आहे." अगं ते आम्ही करू. तुझं लग्नाचं वय व्हायला लागलयं. तिची स्वप्नंच खूप वेगळी होती. सगळं सुरळीत करण्याशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं तिला.

दिवस भरभर जात होते. बघता बघता छोटीचं लग्न झालं. अगं आता तरी स्मिता. पण ती काही केल्याने लग्नाला तयार होईना.जीव तुटत होता तिच्यासाठी. पण करणार काय? लाडाची पोर होती. जबरदस्ती कशी करायची? भावाचं शिक्षण पूर्ण करेपर्यंत ३५ वय झालं होतं स्मिताचं. तोपर्यंत नोकरी करत करत तिने एम.एस.सी. पूर्ण केली. आता स्थळं येणं पण बंद झाली होती. तिच्या अचूक कामामुळे तिला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवण्यात आले होते. तिने लग्नाचा विचार पूर्णपणे मनातून काढून टाकला होता.आता फक्त समाजसेवा करायची असं तिच्या मनाने ठरवलं.सगळं मनासारखं झालं होतं तिच्या.खूप खुश होती ती. घरातले सगळे मात्र तिच्या बलिदानाचे कायम ऋणी राहू असे म्हणत होते.

प्रिती दबडे, पुणे
9326822998

गुरुवार, 16 जुलाई 2020

16 सौ. रूपाली गोजवडकर नांदेड .

*निश्चय*
----------------------------------

"मॕडम, ओ मॕडम, हा राजेश हात न धुताच जेवायला बसलाय.  राधा आणि आदित्य श्लोक म्हणत नाहीयेत."  शाळे च्या मधल्या सुटीत अधूनमधून ऐकू येणारा हा गोड आणि तितकाच आर्जवी स्वर. निकिताची दररोज  मध्यंतरात मुले जेवायली बसली कीअशी प्रेमळ तक्रार कानी पडायची. निकिता तिसरीत शिकणारी अतिशय चुणचुणीत मुलगी. अगदी टापटीप व नीटनेटकेपणाने तयार होऊन नियमित शाळेत यायची. मी सांगितलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करायची. दिलेला अभ्यासही व्यवस्थित करायची. खेडेगावातील अतिशय दुर्गम अशा वस्तीशाळेत शिकत असूनही ती शिस्तीत शाळेत येत असे. तिच्याकडे पाहून ही नक्कीच सुशिक्षित व सधन कुटुंबातील असावी असे वाटायचे. पण खरे तर ती एका साध्या मजुरी करणा-या गरीब कुटुंबातील होती. मोलमजूरी करूनसुद्धा निकिताच्या आईला तिला खूप शिकवून मोठे करायचे होते.निकिताची आई सुनीता नेहमी शाळेत यायची, निकिताच्या अभ्यासाबाबत चौकशी करायची. "मॕडम, खूप शिकवणार आहे मी निकिताला. लक्ष द्या बरं का तिच्याकडे." असे शाळेत येऊन सांगत असायची. खेडेगावात राहूनही तिची तळमळ पाहून कौतुक वाटायचे मला. एकदा न राहवून सुनीताला मी विचारलेच, " खूप काळजी घेता तुम्ही निकिताची, अभ्यासही छान घेता तिचा, किती शिक्षण झाले आहे तुमचे?" या माझ्या प्रश्नावर सुनीताने  सांगायला सुरुवात केली. "मॕडम, मी नववीपर्यंत शिकले, मला आईवडील नाहीत. मी लहान असतांनाच दोघेही  वारलेत. मामाकडे  राहून घरकाम व शेतमजूरी करतच शिक्षण घेत होते. अभ्यासातही हुशार होते.पण नववी पास झाले की, मामाने माझे लग्न करून दिले. निकिताचे वडीलसुद्धा मिळेल ते काम करतात, मी पण मजुरी करून कुटुंबास हातभार लावते. दोन मुली आहेत मला. या दोघींना मात्र मला खूप शिकवून मोठे करायचे आहे. कितीही कष्ट करण्याची माझी तयारी आहे." सुनीताचे बोलणे ऐकून मला तिचे कौतुक वाटले आणि परिस्थितीमुळे माणसाला किती संघर्ष करावा लागतो हे पाहून मन विषण्ण झाले. 
            असेच काही दिवस निघून गेले निकिताला शाळेत सोडायच्या निमित्ताने सुनीता आली. "मॕडम, काही दिवस निकितासोबत धाकट्या अंकितालाही शाळेत पाठवू का? " " ती अंगणवाडीत जाते ना? मग पुढच्या वर्षी घेऊया ना तिचे नाव पहिलीला." मी उत्तरले. " हो. पण एक अडचण होती......!" माझे बाळंतपण जवळ आले आहे. बाळ झाल्यावर थोडे दिवस अंकिताकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून अंगणवाडी संपली की दुपारनंतर निकितासोबत बसू देता  का अंकिताला? ती काही त्रास नाही देणार .." मी जरा वैतागूनच होकार दिला.  "अहो,पण तिसरे मूल हवे कशाला? सुशिक्षित आहात ना तुम्ही ? " कुटुंब नियोजन आॕपरेशन करायला हवे होते अंकिताच्या पाठीवर."  "तुमचे बरोबर आहे मॕडम, माझी तीच इच्छा होती, पण नवरा ऐकायला तयार नव्हता. मुलगा पाहिजेच म्हणून अडून बसल्यामुळे माझा नाइलाज झाला." 
        खाली मान घालून सुनीता सर्व सांगत होती. "ठीक आहे पाठवत जा अंकिताला". मी होकार दिला आणि कामात व्यस्त झाले. दरम्यान काही दिवसांतच सुनीता बाळंत झाली. अपेक्षेप्रमाणे मुलगा न होता तिसरी मुलगीच झाली. मुलगी झाल्याचे ऐकून सुनीताचा नवरा नाराज झाला.मुलीचे तोंडही पाहिले नाही. सरळ दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसला. रात्रभर घरी आला नाही . शेजा-यांनी सुनीताच्या विनवणीमुळे शोधाशोध केली तर तो एका मोठ्या नाल्यात पडल्याचे दिसले. दारूच्या नशेत नाल्यात पडून तो वारला. सुनीतावर दुःखाचा पहाड कोसळला. हा प्रसंग ऐकूनच सर्वांचा थरकाप उडाला. माझ्या नजरेसमोरून सुनीता, निकीता, अंकीता यांचे आकांत करणारे चेहरे हलत नव्हते. दुर्दैवाची परीसीमा काय असते ते या प्रसंगावरून लक्षात येत होते.
               असाच एक महिना निघून गेला. सुनीताचे नातेवाईक आल्या पावलांनी निघून गेले. शाळेतील शिक्षकांनी व आजूबाजुच्या लोकांनी केलेल्या मदतीवर कशीबशी गुजराण चालू होती . एके दिवशी अनपेक्षित पणे सुनीता शाळेत आली. तिचा भकास व शून्यात हरवलेला चेहरा व कृश शरीर पाहून माझ्या मनात कालवाकालव झाली. काय बोलावे हे न सुचून मी स्तब्ध उभी होते. सुनीतानेच बोलायला सुरुवात केली. "मॕडम, एक विचारू का ? "हो, विचारा ना !" मी उत्तरले. उद्यापासून  मी शेतावर मजुरीसाठी जाणार आहे. निकीताला सोबत घेऊन जावे लागेल. बाळ थोडे मोठे होईपर्यंत तिला मदतीला न्यावे लागेल मला. पण अंकिताला मात्र बसू द्या शाळेत, वळण लागेल आणि अभ्यासाची सवय लागेल तिला. निकीताचाही अभ्यास मी घेईन घरी दररोज संध्याकाळी. अधूनमधून पाठवेन शाळेत. तेवढे सांभाळून घ्या. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरारले. काय उत्तर द्यावे सुचेना. आवंढा गिळून मी म्हणाले कुठून आणले एवढे बळ? कसे सांभाळणार तीन तुम्ही लेकरांना?  त्यावर सुनीता उत्तरली. माझ्या तीनही मुलींना खूप शिकवणार आहे मी. मी अनाथ म्हणून वाढले. पण मुलींना आई व बाप दोघांचे प्रेम देईन खूप शिकवेन. मुलीच झाल्या म्हणजे आभाळ कोसळले असे वाटून माझा जन्माचा साथी संसार अर्ध्यावर सोडून निघून गेलाय. पण मी हिंमत हरणार नाही मॕडम. सर्वांना माझ्या मुलीच कौतुक वाटेल असे घडवेन मी त्यांना. पाहत राहतील सर्वलोक असे वाढवेन माझ्या लेकींना. फक्त खूप शिकवा मॕडम तुम्ही त्यांना असे म्हणत सुनीता निर्धाराने गेली. तिच्या कृश पण दृढनिश्चयी पाठमो-या आकृतीकडे पाहत मी नतमस्तक झाले. सुनीताचे सर्व मनोरथ पूर्ण होवो म्हणून परमेश्वराची मनोमन प्रार्थना केली....

सौ. रूपाली गोजवडकर नांदेड .

15 डॉ. वर्षा सगदेव

*श्रद्धांजली*
         
   मालती मंदिराच्या आवारात ऊभी होती .सायली तिची मुलगी, तिला घ्यायला येणार होती. अचानक कुठून कसा एक वेडा धावून आला, तो ओरडला 'दार बंद कर' ,दार बंद कर , ऐकू येत नाही का तुला'! असा ओरडत तो तिच्या अंगावर धावून आला. मालती घाबरली,जागच्या जागीच  थिजली. तिच्या अंगाचा थरकाप उडाला. वीस वर्षानी तिनी तो आवाज परत ऐकला होता. तीच जरब, तोच आवेश, हो तिला सुतराम शंका नव्हती, तो आवाज तिच्या नवर्‍याचा
होता. तिने समोर पाहिले, एक काळा कभिन्न भयावह चेहरा , वाढलेली दाढी, विस्कटलेले केस,अंगावर लटकणारी लक्तरे. ती मागे सरकायला गेली, तेवढ्यात सायलीने  तिला मागुन आधार दिला, दोधी घरी आल्या. मालती अजून ही सावरली नव्हती. 
    तिच्या डोळ्या समोरुन भूतकाळाचा सारीपाट सरकत होता. मालती खूप  देखणी होती. विसाव्या वर्षीच आकोल्याच्या इंजिनिअर मुलाशी मालती चे लग्न झाले. लग्न झाल्यावर चवथ्या दिवशीच तो ऑफिस मधून आला तेंव्ह त्यांचा फ्लॅटचे दार ऊघडे होते'दार का उघडे होते? मी तुला दार बंद ठेवायला सांगितले होते ना.' तो तिच्या वर ओरडला, अहो रमाकाकू आल्या होत्या मालती ने सांगितले. त्याने तिचे काहीच ऐकून घेतले नाही. दुसऱ्या दिवशी 
ऑफिसला जाताना तो दाराला बाहेरून कुलुप लावून गेला. जवळ जवळ आठ ते दहा तास ती अशी एकटी भुता सारखी घरात असायची. दोन आठवडय़ात कुलदेवीच्या दर्शनाला जायचा प्रोग्राम ठरला. मालतीला आनंद झाला चला थोडा बदल. बस मघे बसले .आजुबाजुचा निसर्ग बघुन मालती आनंदी झाली. तिचा आनंद तिच्या चेहर्‍यावर ओसंडत होता. मानेवर एक रट्टा बसला, ती कळवळली." तिकडे कुठे बघत होतीस? कोणा कडे बघत होतीस?" तिचा नवरा ओरडला. "सरळ बघ." मालती हिरमुसली आणि सरळ बघत बसली. तिची मान अवघडली, दुखायला लागली, त्यावर त्याने तिला परत दरडावले  'नखरे करु नकोस,बाईला दुःख सहन करता आले पाहिजे. मुर्ख कुठली.'मालती ला रडू कोसळले, त्यावर त्याने तिचा हात जोरात पीरगळला, आणि म्हणाला तमाशा करु नकोस ,लोक बघत आहेत.तो कधी कधी अतिशय चांगला वागे तर कधी हिंस्रपणे तिला मारझोड करायचा. त्याच्या मानगुटीवर वर बसलेला संशयीपिशाच त्याचा पिच्छा सोडत नव्हता आणि मालतीची ससेहोलपट काही थांबत नव्हती.
     तिला दिवस गेले. तिने सासुबाई ना बोलावून घेतले. दोधी जणीं आनंदात होत्या. जेवणात शिरा केला नंतर सासुबाई ने मुलाला गोड बातमी दिली, समजावून सांगितले अरे आता तू बाप होणार आहे , तुझी जवाबदारी वाढणार आहे. तुला मालतीला जास्तच जपायला पाहिजे. झाले! तो जोरात कडाडला, काय ! तुला कोणी सांगितले?मालतीनेच मला सांगितले, सासुबाई म्हणाल्या.
    एखाद्या हिंस्रश्वापदा सारखा तो तिच्या अंगावर धावून गेला. लाथा बुक्क्यांनी तो तिला तुडवत होता. बोल कुठे शेण खाल्लस? कोणाचे पाप माझ्या माथी मारती आहेस ! मालती अगदी स्तब्ध झाली, तीचा जणू दगड झाला होता. त्याने हात धरून दाराच्या बाहेर ढकलून दिले ,एवढ्या आवाजामुळे शेजारी गोळा झाले होते,रमाकाकू अगदी पुढे आल्या ,तिचा हात धरून ओढत ओढत स्वतःच्या घरी घेऊन गेल्या. तिला पाणी दिले. दोन घास भरवले, मालती रमाकाकूंच्या खांद्यावर वर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडायला लागली, माझे काय चुकले हो? रमाकाकू तिला थोपटत राहिल्या. सकाळी मालतीला घ्यायला तिच्या सासुबाई आल्या. एव्हाना मालती सावरली होती. तिने घरी जायला सपशेल नकार दिला. मी सगळे सहन केले पण माझ्या चारित्र्यावर त्यानी जे लांछन लावले ते मी कदापि सहन करणार नाही .आता मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही ती ठामपणे म्हणाली. ती माहेरी गेली भावाने साथ दिली , भरतकाम शिवणकाम विणकाम करून ती तिचा चरितार्थ चालवत होती. तिची मुलगी सायली मोठी होत होती. सायलीचा ओरडण्याचा आवाजाने ती भानावर आली. 'अग हे काय अजून जेवली नाहीस'? मग तिनेच पानं घेतली. तिच्या लक्षात आले की आईचे काहीतरी बिनसले आहे. मालतीने तिला मामाला फोन करुन बोलवायला सांगितले. मालतीने त्याला सकाळचा प्रकार सांगितला, पूढे म्हणाली तो अशोक होता. मालती ठाम होती. भाऊ म्हणाला उद्या आपण याची खात्री करुन घेऊ. दुसर्‍या दिवशी सकाळी तो मंदिराच्या आवारात गेला तेव्हा तिथे खूप गर्दी होती. चौकशी केल्यावर कळले कालचा तो वेडा बस अपघातात ठार झाला. पोलिसांना पंचनाम्यात त्याचे परिचय पत्र सापडले. तो अशोकच होता.पोलीसांनी खात्री करून घ्यावी म्हणून, त्याचे डी.एन .ए सायलीच्या डी. एन .ए.शी मॅच करुन घेतले. तो अशोकच होता.
      मालतीचा रडण्याचा आणि सायलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता.आज मी तुझे अजिबात ऐकणार नाही सायली चिडून म्हणाली, अग बेटा असे काय करते?तो तुझा जन्मदाता आहे. बापाला असे बेवारस सोडू नको, मालती अगदी हुंदके देत म्हणाली.तावातावाने सायली म्हणाली. मी तुझ्या पोटात असताना,त्याने नव्हते का, आपल्याला अर्ध्या रात्री असेच बेवारस सोडले त्याने आपल्या गरोदर बायकोला. तो बाप तर सोड, माणूस म्हणायच्या लायकीचा सुद्धा नाही.शेजारच्या  रमाकाकूनी तुला आसरा दिला नसता तर आपण दोघी जिवंत तरी राहिलोअसतो का'? मालतीने रमाकाकूनां  फोन  करून सगळी परिस्थिती कळवली.  रमाकाकू लगेच यायला निघाली. तेवढ्यात मालतीचा भाऊ  पण आला. त्याने  सांगितलेली माहिती धक्कादायक होती. अशोकच्या कागदा पत्रात मनोरुग्णालयाचे  कार्ड होते, त्यानुसार तो पॅरेनोइड स्किझोफ्रेनियाचा रुग्ण होता आणि त्याचा आजार खूपच  वाढला होता.
      रमाकाकू म्हणाल्या  अशोक 20 वर्षाचा असतांनाच  त्याच्या समुपदेशकाने  त्याला मनोविकारतज्ञा कडे पाठवले होते. पण अशोकचे  बाबा खूप चिडले माझा मुलगा काय वेडा आहे का? अशोकच्या रोगाचे निदान झालेच नाही, आणि अर्थातच  औषधोपचार पण झाला नाही. जो पर्यंत आई जिवंत होती ती त्याची काळजी घ्यायची.आई गेली, अशोकचा  आजार बळावला. तो नौकरी वर पण जायचा नाही. दिवसोन दिवस घरात पडून राहायचा .कधी बाहेर गेला तर त्याचा यायचा पत्ता नसे . घरी खाऊ घालयला कोणी नाही. कधी भूकेला असताना ऊकीरड्या वरुन  वेचून खायचा.मग मी रोज दोन पोळ्या करुन त्याचा दाराशी ठेवायची . शेवटी त्याचा आजार खूपच वाढला तो खूप आरडा ओरडा करायचा, वायलेंट व्हायचा. सोसायटीच्या सदस्यांनी  त्याला मेंटल हॉस्पीटल मधे दाखल केले. तिथे त्यांची तबियत सुधारली. पण आठवड्यापूर्वी तो तिथून पळाला असे कळले. आज काय तर तो ह्या जगातच नाही.  अतिशय दुर्दैवी होता तो. वेळेवर ऊपचार झाले असते तर तो कदाचित बरा ही झाला असता. 
    आता  सायलीचा राग सुद्धा  निवळला. तिच्या लक्षात आले की तिच्या बाबाला नियतीनेच  छळले होते .ती त्याला मुखाग्नि द्यायला तयार झाली. स्मशानात मुखाग्नि देताना तिला आठवले  लहानपणी ती बाबाला भेटायचा किती हट्ट करायची,तिला बाबा भेटला पण कुठे! तर अगदी सरणावर, आणि तिला हुंदका आवरला नाही .
      अशोक सरकारी नोकरीत होता त्याच्या फंडाचे सगळे पैसे मालतीला मिळाले. ते पैसे आणि अशोकचा फ्लॅट विकून भरपुर रक्कम आली. मालती आणि सायलीने त्याचा वरदान नावाचा ट्रस्ट केला सायली सायकोलोजिस्ट झाली.तिचा नवरा सचिन सायक्येट्रीस्ट होता. दोघं मिळून ट्रस्टचे काम संभाळायचे.
    सायली स्टेजवर उभी होती तिच्या सेवाभावी कार्याच्या गौरव झाला होता . तिच्या वरदान संस्थेला सर्वोत्तम सेवाभावी संस्था म्हणून गौरविण्यात आले होते. सचिन  तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला आता तुझ्या बाबाचा आत्म्याला आज शांती मिळाली असेल. तू तुझ्या बाबांच्या  वेदनांचे  वरदानात रुपांतर केले. रस्त्यावर एकटे भटकत असलेल्या असंख्य मनोरुग्णानां बरे करून माणसात आणले. त्यांची नातेवाईकांशी भेट घालून दिली आणि त्यांना त्यांचे घर परत मिळवून दिले.ही तुझ्या बाबांना तू दिलेली खरी '*श्रद्धांजली*' आहे.
डाॅ. वर्षा सगदेव नागपूर

17 बालाजी पेटेकर खतगावकर

*अल्लाचा मित्र* 
***************

२६ जानेवारी जवळ आली होती.सलीम गुरुजींना सारखं एखाद्या चित्रपटाचा प्रसंग दिसावा तसे हनुमंताच्या पोराचं बोलणं दिसत होतं.देवा पुढं जाऊन मला पुस्तक,दप्तर,वह्या,शाळेचा ड्रेस नाही म्हणून गरिबीची तक्रार करणारा निरागस मुलगा सतत डोळ्यापुढे दिसत होता.एवढ्याशा पोरांमध्ये शिक्षणाची ओढ आणि चटके देणारी गरीबीची होरपळ पाहून गुरुजींना विचार करायला भाग पाडले होते.गुरुजी सकाळी लवकर उठले पहिल्या बसनेच नायगाव गाठले.संध्याकाळी काय आणले देव जाणे पण,एक पिशवी भरून कसलेतरी सामान आणले.

 कडकडत्या थंडीतही सकाळी सात वाजता शाळेतली सर्व मुलं गणवेशात आली होती न आलेली मुलं स्पष्ट गरीबची कळा दाखवत होती.एकदा शिंप्याच्या गणुच्या पोराला शाळेचा ड्रेस का आणला नाही म्हणलं तर तो म्हणाला, "गुरुजी इथं दोन बार पेरणी करून शेतात मोड लागत नाही.आम्ही कशाचा जीवावर संसार करावा तुटपुंज्या तीन एकरांत किती पिकलं बर.. घरात असलेले पैसे घालून पेरणी केली पण तेही गेलं वाया... दुसऱ्यांदा व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागली.".... गुरुजीचे मन सुन्न झालं होतं.झेंडावंदन झालं गावातील माजी विद्यार्थी झेंडावंदनाला हजर होते,ज्येष्ठ मंडळी,शिक्षणप्रेमी हे ही आले होते.
सलीम गुरुजींनी सर्वांना उद्देशून मनात साठवलेल्या शब्दांना वाहत केलं."मित्रहो, शिक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे.माणूस मनाने,धनाने,ज्ञानाने श्रीमंत फक्त शिक्षणानेच होत असतो.म्हणून मी शिक्षणाला देव मानतो.त्याची पूजा केल्याने,आराधना केल्याने,साधना केल्याने नक्कीच यश मिळते.मी लहान असताना मला गरिबीमुळे शिक्षण घेता आलं नाही ही खंत अजूनही माझ्या मनात आहे माझं स्वप्न होतं.मी डॉक्टर व्हावं. मी अधिकारी व्हावा आणि तशी जिद्द,चिकाटीही होती पण,माझ्या गरिबीनं मला हैराण केलं. पैसेवाले पैसे भरून उच्च शिक्षणाला प्रवेश घेतले पुढचे शिक्षण घेतले नोकऱ्या मिळवले आणि अधिकारीही झाले.मला मात्र गरिबीमुळे शिक्षण पूर्ण घेता आलं नाही,शेवटी 'पळत्याची लंगोटी सही'म्हणून ही मास्तर कि धरली." गुरुजी पोटतिडकीने बोलत होते,माझ्या मनातली खंत,माझे स्वप्न सत्यात उतरावे म्हणून गावातील प्रत्येक घराघरात जाऊन पोरांना शिकवतो माझं स्वप्न त्या पोरात पाहतो पेरतो.आणि गावकर्‍यांनी माझ्यावर विश्वासही टाकला म्हणून गावकऱ्यांच्या कोणाचे घरांमध्ये जाऊन पोरांना मारून शिकवत असतो.
 आईही एकच असते पण तिला माता,अम्मा,मदर,माॅ,मम्मी वेगवेगळ्या नावाने हाक मारत असतो तसचं ईश्वरीही एक असतो पण आपल्या वेगळ्या धर्मातील लोकांनी त्याला देव,ईश्वर,भगवान,गाॅड असे वेगवेगळ्या नावांनी आपण त्यांना हाक मारत असतो. सर्व धर्मांची शिकवण एकच आहे ती म्हणजे माणुसकी,म्हणून मी माणुसकी हा सर्वात मोठा धर्म मानतो. आता शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्ठित मंडळी कडून वह्या वाटप करण्यात यावे म्हणून एक मोठी पिशवी समोर आणली.गुरुजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शेवटी हनुमंताच्या मुलांना हा हाक मारून बोलावून त्याला एक पिशवी दिली कारण त्याची परिस्थिती गुरुजींना माहीत होती त्यांनी केदारनाथच्या मंदिरातले बोललेले त्याचे बोल अजूनही मनात रुसून बसले होते.गुरुजी ती पिशवी हनुमंताच्या मुलांना देऊन एका वर्गामध्ये घेऊन गेले काही वेळाने वर्गातून ते दोघे बाहेर आले सगळ्यांना आश्चर्य वाटले केदार चक्क बदलून गेला होता त्याच्या अंगावर नवा गणवेश होता,दप्तर नवे,पुस्तकं,वह्या तो फारच खुशीत दिसत होता सर्व मुलांना खाऊ वाटप करून घरी जाण्या सुट्टी दिली सर्व मुलांनी हेऽऽऽ करून एकच गलका केला.आनंदाने उड्या मारत वासरं पळावीत अशी पळत सुटली, गुरुजी मोठ्या कौतुकानं पाहत होते. तेवढ्यात कुणीतरी त्यांचा हात धरला गुरुजी वळून पाहिले, तर त्यांचा हात धरून केदार म्हणत होता "गुरुजी,मला हे शाळेचा ड्रेस हे सर्व साहित्य कोण दिले?" तेव्हा गुरुजींना काय बोलावं कळत नव्हतं त्या निरागस बाळाचा बोलणं जनरल नॉलेज अवघड प्रश्न सारखं वाटत होतं.तेव्हा विचार करून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत गुरुजी म्हणाले.बेटा मला हे सगळं अल्लांच्या मित्रांन दिलं. तेव्हा केदार तोंडावर हसू आणत भोळ्या मनानं विचारलं,गुरूजी हे अल्ला कुठे राहतो, आम्हाला का दिसत नाही?किती अवघड प्रश्न त्यांन अगदी सहज विचारलं होतं. गुरूजी त्याचे प्रेमानी गाल ओढत म्हणाले,बेटा,अल्ला म्हणजे देव,गाॅड,ईश्वर,नाव अनेक पण,देव एकच...काल येऊन तो माझ्या अल्लाच्या मित्रानं तुला हे द्यायला सांगितलं. गावातील सर्व हे पाहत होते. देव कुणी पाहिला नव्हता पण चांगल्या विचारांच्या माणसात देव राहतो हे मात्र नक्की... म्हणून तर गावातील काही चांगल्या माणसांना देवमाणूस म्हणतात.देव सज्जनात राहतो.देव चांगल्या गुणात राहतो.देव धर्मात नसतो देव चांगल्या कर्मात असतो.देव जातीत नसतो देव पिक पिकवुन भुक भागवणा-या काळ्या मातीत असतो.तो मजिद,गुरुद्वारा,चर्च,देवळात नसतो,देव भुकेलेल्या माणसाच्या कवळात असतो.हे सर्व त्याच्या विचाराच्या पलिकडचे होते.पण त्याला ऐवढे समजले होते की,मला हे सर्व मिळाले ते माझ्या हुशारीमुळं मिळालं.अल्लाच्या मित्रामुळं मिळालं.अल्लाचा मित्र  ऐवढा चांगला तर अल्ला कसा असेल...
मंदिरातल्या,मजिदीतल्या,चर्च मधल्या गुरुद्वारा मधल्या मुर्तीत  देव असो वा नसो पण अल्लाचा मित्र म्हणून आलेल्या गुरुजीत मात्र देव दिसत होता. आणि केदारही सर्व मुलांना सांगत फिरत होता आता मी खूप अभ्यास करणार... खूप पुस्तकं वाचणार... मी खूप मोठा होणार.... अल्लाच्या मित्रांनी मला हे सर्व दिलयं.....
अल्लाच्या मित्रांनी हे सर्व  दिलयं......

*बालाजी पेटेकर खतगावकर*
कलाध्यापक,श्री.सद्गुरु नराशाम विद्यालय टेंभुर्णी ता. नायगाव जि.नांदेड 
भ्र.८९७५३४०७७७

मंगलवार, 14 जुलाई 2020

14 सौ.गौरी ए.शिरसाट

*शांतादुर्गा*

"अनया, अगं आवरले की नाही तुझे?" काॅलेजचा पहिला दिवस आहे, वेळेवर जायला हवे ग."
"आले ग,मम्मा."
असे म्हणत तिने रेवाच्या गळ्याभोवती हात गु़फले.रेवाला क्षणभर दाटून आले पण तिने आवंढा गिळला.हसऱ्या चेहऱ्याने तिला तिने निरोप दिला.
           स्वयंपाक घरातील कामे आवरून तिलाही ऑफिसला जायचे होते.मनातील खळबळ लपवून जगणे तिला असह्य होत होते.तेवढ्यात तिच्या सासुबाई आत आल्या.
         "रेवा,अगं किती दिवस मुलांपासून सत्य लपवणार.कधी ना कधी त्यांना कळणारच ना की राजेश त्यांचे वडील आहेत ते."
"आई, मला ह्या विषयावर बोलायचे नाही.तुमचा मुलगा आहे.म्हणून मी घरात येऊ  दिले आहे.त्यांना लवकरात लवकर परत जायला सांगा."
"अगं,आता कुठे जाणार तो?"
"म्हणजे,इथेच राहणार की काय?तसे जर तुम्ही ठरवले असेल तर मी आजच माझ्या मुलांना घेऊन इथून निघून जाईन."
"रेवा,अगं तो तुझा नवरा आहे.तुझ्या मुलांचा जन्मदाता आहे."
" हो, आहे ना.पण मागची सोळा वर्षे हाच जन्मदाता कुठे होता?तेव्हा मुलांचे काय झाले? हे कधी त्यांनी विचारले का?
"आई, माझ्या आयुष्याची १६ वर्षांपासूनची हेळसांड तुम्हाला कधी जाणवली नाही का?"
यावर तिच्या सासुबाई काहीच बोलू शकल्या नाहीत.
         तोच सोळा वर्षांपुर्वींचा प्रसंग पुन्हा डोळ्यासमोर तरळला.राजेश तेव्हा रात्रभर बाहेर रहायचा.काही विचारले की भांडायचा.त्यामुळे वाद टाळण्यासाठी रेवा शांत रहायची.दोन मुले पदरात ना कळत्या वयातली, अमेय तीन वर्षांचा तर अनया एक वर्षांची होती.
            एके दिवशी संध्याकाळी राजेश आॅफिसवरून घरी आला.तिने त्याच्या पुढ्यात चहाचा कप ठेवला.पण तो सरळ बेडरूममध्ये निघून गेला.बाहेर आला तर स्वत:ची बॅग घेऊनच आणि रेवा ,सासुबाई व सासऱ्यांना घर सोडून जात असल्याचे सांगितले.तिला तर क्षणभर काहीच कळेना.मेंदू बधीर झाल्यासारखा वाटू लागला.त्याच्या वडिलांनी राजेशला अडवण्याचा प्रयत्न केला.पण तो थांबला नाही.मुलाच्या अशा वागण्याचा त्यांना धक्का बसला.त्यातच ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले.
         रेवावर तर आभाळच कोसळले.तिला स्वत:ला सावरावे की सासुबाईंना हेच कळेना.राजेशच्या सोडून जाण्याने व सासऱ्यांच्या निधनाने ती खचली होती.परंतु माहेरी न जाता इथेच राहण्याचा तिने निर्णय घेतला.तेव्हापासून आजतागायत एकटीने कुटुंबप्रमुखाची  सर्व जबाबदारी पार पाडली.राजेश गेल्यानंतर नोकरीसाठी घराबाहेर पडली.ती शिकलेली होती.त्यामुळे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ती सर्व आव्हाने पेलत होती.
         आणि आज अचानक राजेशचे आयुष्यात पुन्हा येणे तिला अनाकलनीय म्हणण्यापेक्षा धक्कादायक होते.तेवढ्यात घड्याळाच्या अलार्मने तिची विचारशृंखला तुटली.ती बेडरूममध्ये तयारी करण्यासाठी गेली.तिच्यामागोमाग राजेश आत आला आणि त्याने तिचा हात धरला."रेवा,आपण पुन्हा एकत्र राहूया ना.मी केलेल्या चुकीविषयी मनापासून माफी मागतो.यापुढे मी जराही वावगे वागणार नाही.प्लीज,मला तुझ्या आयुष्यात जागा दे."
"राजेश,मी माझे आयुष्यच तुम्हाला बहाल केले होते.परंतु तुम्ही त्याचे मातीमोल केले.आता तुमच्याशिवाय जगणे आयुष्याने स्विकारले आहे."
"रेवा,एकदाच माफ कर.पुन्हा तुला,मुलांना सोडून कधीच जाणार नाही.मी हात जोडतो."
राजेशने हात जोडण्यासाठी रेवाचा हात सोडला.रेवाने राजेशकडे पाहिले आणि म्हणाली,"राजेश, तुम्ही आज दुसऱ्यांदा माझा हात सोडलात.कदाचित हा नियतीचाच निर्णय असावा.तुम्ही माझ्याशी असे का वागलात? हे मी विचारणार नाही.परंतु एक मात्र खरे आहे की,जी व्यक्ती स्वत:च्या जन्मदात्यांना सोडू शकते.तिच्यासमोर माझे काहीच मोल नाही.त्यामुळे मला माझ्या आईला आणि मुलांना स्वबळावर जगण्याची सवय लागली आहे.कृपया तुम्ही त्यात ढवळाढवळ करू नका.आता तुमचे इथे कोणतेही स्थान नाही." एवढे म्हणून पर्स खांद्यावर अडकवून ती आॅफिसला जायला निघाली.बाहेरच सासुबाई उभ्या होत्या.त्यांच्या नजरेतील भाव तिला समजले पण काही न बोलता ती निघून गेली.
               संध्याकाळी घरी आल्यावर हातपाय धुवून रेवाने देवाजवळ दिवा लावला.प्रार्थना म्हटली.तेवढ्यात तिथे सासुबाई आल्या.त्यांनी देवापुढील निरांजनाचे ताट उचलले आणि रेवाचे हळदकुंकू लावून औक्षण केले. तिला मायेने कवटाळले.तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या," रेवा,तूच माझे सर्वस्व आहेस.इथून पुढे मी कधीही तुझ्या निर्णयाच्या आड येणार नाही.आज तुझी आई म्हणून मी सर्व भरून पावले.तूच माझी शांतादुर्गा आहेस.जिने स्वत:ची लढाई अगदी शांतपणे लढून विजय प्राप्त केलाय."
    रेवा अगदी लहान मुलीसारखी सासुबाईंच्या कुशीत शिरली.दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रूची मुक्त बरसात होत राहिली.

©सौ.गौरी ए.शिरसाट
       मुंबई

बुधवार, 8 जुलाई 2020

12 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे

बोधकथा 
आधी करावे मगच सांगावे

संध्याकाळची वेळ झाली होती, इतक्यात फाटकाचा आवाज आला. राजू आल्याची चाहूल आईला लागली. राजू आलास बाळ !  आईने न पाहताच राजुला आवाज दिला. हो ग आई ! आज सुट्टी असल्याकारणाने आज मित्रांसोबत खूप खेळलो. अरे ! हो रे बाळा जरा वेळेचेही भान ठेवायचे होतेस ना. उद्या सोमवार आहे, बाईंनी सांगितलेला गृहपाठ केलास ना. नाही ग आई आता करेन. आई आमच्या वर्गाचा परिपाठ सुद्धा असतो उद्या आणि मला वक्तशीरपणा या मूल्यावर बोलायचे आहे. 
बरं ! राजू तू आता हात पाय धुऊन घे आणि देवास नमस्कार कर तोपर्यंत तुझे बाबा येतीलच आणि आले की सोबतच जेवण करायला बसा. आई बैलगाडीचा आवाज येतोय बाबा आले वाटते.
 काय राजू आज आला नाही शेताकडे, 
नाही हो बाबा आज मित्रांसोबत खूप खेळलो. खूप मज्जा आली. 
 जेवण आटोपल्यानंतर राजू गृहपाठ खूप उशीर पर्यंत करत बसला आणि तसाच झोपी गेला. सकाळ झाली तरीही राजू गाढ झोपेतच होता. राजू उठ! अरे राजू उठ! आईच्या हाका चालूच होत्या तरीही राजू अंथरुणावर लोळतच होता. शेवटी कसाबसा तरी राजू उठला. घाईघाईने आंघोळ करून शाळेची तयारी केली. तोपर्यंत शाळा भरण्याची वेळ निघून गेली होती. राजूला आज शाळेत जायला उशीर झाला होता. शेवटी उशिरा का होईना राजू शाळेत पोहोचला. तोपर्यंत म्हणजे परिपाठ आटोपून मुले वर्गात जात होती. राजुला स्वतःची खूपच लाज वाटली. आज तो वक्तशीरपणा या विषयावर बोलणार होता. परंतु तोच वेळेवर न पोचल्याने त्याच्या वक्तशीरपणा बोलण्याचा काही परिणाम होणार नव्हता. त्याला स्वतःची चूक समजली. तो स्वतःच्या मनाशी खजील झाला. 
परंतु आता यापुढे त्याला कळले वेळेवर काम कसे करावे व वेळेचे महत्व कसे जाणावे हे चांगले समजले होते आणि राजूने मनाशी निश्चय केला यापुढे मी कोणतेही काम वेळेवर करेन.

तात्पर्य : वेळेचे महत्व जाणावे. वक्तशीरपणा हा स्वतः अंगी बाळगून मगच दुसऱ्यास सांगावा.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
(स्वरचित, स्वलिखित बोधकथा)
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता. हदगाव जि. नांदेड.

13 श्रीमती माणिक नागावे

लघुकथा 
शिर्षक- सोन्याची चेन 

  जीवनात सुख व दुःख हे  प्रत्येकाच्या वाट्याला येत असते. जीवनात गोडी मिळवण्याकरता हे आवश्यकच आहे. दुःख नसेल तर सुखाला काहीच किंमत राहणार नाही.अशा सुखदुःखाच्या अनेक घटना आयुष्यामध्ये घडत असतात. काही घटना सुख देऊन जातात तर काही घटना आयुष्यभर मनामध्ये दुःख ,वेदना, सलत राहतात.ज्या आपण कधीही विसरु शकत नाही. व त्यात सुधारणा ही करु शकत नाही.

   मी माझ्या संसारात अतिशय सुखी होते.मोठी मुलगी व लहान मुलगा अशा गोंडस दोन मुलांच्या कडे पाहून अतिशय आनंद होत असे. माझे पती आणि मी दोघेही गावातच हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करत होतो. शैक्षणिक कार्याबरोबर समाजकार्याचीही आवड आम्हाला दोघांना होती. माझे आई-वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे माझे लग्न मोठ्या थाटामाटात करुन दिले होते. लग्नात त्यांनी मला बिल्वर ,पाटल्या ,गंठण असे दागिने घातले होते. माझे पती म्हणजे माझ्या आईचे भाऊ म्हणजे माझे मामाच होते. त्यामुळे परकेपणा नव्हताच. त्यांनाही दीड तोळ्याची चेन केलेली होती. असेच आनंदात दिवस निघून जात होते. लग्नानंतर पंधरा-सोळा वर्षानंतर दागिन्यांची झीज होणे क्रमप्राप्तच आहे. दररोज वापरल्यामुळे माझ्या हातातील बिल्वर झीजले होते. पातळ झाले होते. माझ्या मनात आले की आपण नवीन बिल्वर करावेत. मी माझ्या पतींना म्हटलं," अहो," माझे बिल्वर खूप झीजलेले आहेत. आपण नवीन करूया का?" त्यांनी होकार दिला. होकार मिळताच परत मी म्हणाले,"  मग असं करूया का, एकाच डिझाइनमध्ये बिल्वर आणि पाटल्या दोन्ही करूया." त्यांनी थोडा विचार केला व मला  होकार दिला. मग मी म्हणाले," या बरोबर तुमच्या गळ्यातील चेनही आपण थोडी मोठी करूया."  तेव्हा ते म्हणाले," बघू त्याचं नंतर." विचार पक्का झाला.. सोनाराकडे जाऊन एक डिझाईन ठरवले.आनंदातच घरी परत आले.कधी एकदा नवीन बांगड्या मिळतात व मी त्या कधी हातात घालते असं झाले होते.सोनार कधी बोलावतो याची वाटचं पहात होते.

 जेव्हा बिल्वर व पाटल्या तयार झाल्या तेंव्हा सोनाराकडे गेलो. एकाच वेळा दोन्ही जिन्नस केल्यामुळे त्याची किंमत ही भरपूर झाली होती.  त्यावेळी माझे पती म्हणाले,"त्या चेनची कींमत करा व ते पैसे वजा करुन कीती पैसे होतात ते सांगा."  मला एकदम धक्काच बसला. मी म्हणाले," असं का सांगताय?"  तेव्हा ते म्हणाले," आपण दुसरी नवीन चेन करूया." मी कितीही सांगितलं तर त्यांनी ऐकले नाही.मी जास्त बोलुही शकत नव्हते.कुठुन दोन्ही बाल्वर व पाटल्या मोडायच्यख ठरवलं हे मनाला वाटून पश्चाताप होऊ लागला.बिल्वर, पाटल्या घेऊन घरी आलो. पण मनात उत्साह ,आनंद नव्हता. कुठेतरी मनात रुखरुख लागून राहिली होती. हे असं व्हायला नको होतं असं सारखं सारखं वाटत होतं. त्या मला हातात सुद्धा घालवेनात. कारण माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीचा मोकळा गळा दिसत होता. थोडे दिवस निघून गेल्यानंतर मी स्वतः विषय काढला,"अहो, ती चेन कधी करायला टाकता?" तेव्हा ते मला म्हणाले की,"अगं, टाकूया कि काय गडबड आहे?" असेच दिवस निघून जात होते. एक-दोनदा घरगुती कार्यक्रमात वेळी मी त्या बांगड्या कसंतरी घातले होते. हे ऐकत नाहीत म्हटल्यानंतर मी ही बांगड्या कपाटात ठेवून दिल्या.त्यांना म्हटलं ही," चेन करा नाहीतर मी बांगड्या हातात घालणार नाही."पण हो नाही करत दोन वर्षे निघून गेले.

 आणि अचानक माझ्या आयुष्यात तो काळा दिवस उगवला. माझ्या पतीचे अपघाती निधन झाले. आणि माझ्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. वादळात भरकटलेल्या जहाजासारखी माझी अवस्था झाली होती. जीवन जगण्यामध्ये काही अर्थ आहे असे वाटत नव्हते. पण माझ्या घरच्या लोकांनी दिलेला आधार व दोन लहान मुलांच्या कडे बघून मी स्वतःला सावरले. हळूहळू मी सावरत गेले. मुलांना संस्कारक्षम बनवून उच्च शिक्षण दिले. मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःला सावरत नोकरी,समाजकार्य,राहिलेला वेळ लेखनामध्ये वेळ घालवून साहित्य सेवा करु लागले.समाजात माझे एक स्थान निर्माण केले आहे.आज मला कशाचीही कमतरता नाही. पण जेंव्हा जेंव्हा मी त्या बिल्वर, पाटल्यांच्याकडे पाहते तेंव्हा तेंव्हा मला खूप वेदना होतात.कारण माझ्या पतींची चेन करायचीच राहून गेली.मला राहून राहून वाटते मी तेंव्हाच हट्टाने चेन करायला हवी होती.पण त्यांचा स्वभाव आड येत होता. बिल्वर , पाटल्या तयारच होत्या. पण त्याचा आनंद काही मला शेवटपर्यंत घेता आला नाही. कारण जेव्हा जेव्हा मी त्या बांगड्या हातात घेत असे तेंव्हा तेंव्हा मला माझ्या पतीच्या चेनची आठवण येत असे.

 आतातर पती नसल्यामुळे ते शक्यच नाही.आता पैसा आहे,पण ती चेन घालणारा गळाच नाही.. कीती वेदनादायी प्रसंग माझ्या जीवनात आला.अशावेळी वाटतं की नियतीपुढे आपण हतबल असतो.नियती आपल्याला कठपुतळीप्रमाणे नाचवते.आपण असहाय्यपणे पाहण्याशिवाय काहीच करु शकत नाही. सोन्याची चेन शेवटपर्यंत माझ्या पतीच्या गळ्यात मी बघू शकले नाही ही सल माझ्या आयुष्यात कायम मला टोचत राहणार आहे.आजही मी त्या बांगड्या कपाटात ठेऊन दिल्या आहेत.हातात घालण्याची इच्छाच होत नाही. माझ्यामुळेच सोन्याची चेन त्यांनी गळ्यातून काढली ही सल माझ्या हृदयात माझ्या अंतापर्यंत अशीच सलत राहणार...मी कीतीही आटापिटा केला तरीही काही उपयोग होणार नाही. मघ सतत उत्तर शोधते पण सापडत नाही. माझी वेदना, सल कमी होईल का ? आहे का कुणाकडे उत्तर???????

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

रविवार, 5 जुलाई 2020

18 अजय शिवकर

अजय शिवकर यांची अंगावर शहारे आणणारी लघुकथा

       *आत्म्याचं दुखण*

 "!! *देह करी जे जे काही* !! "
 "!! *आत्मा भोगितो नंतर !!*"

"यलकोट  यलकोट जय मल्हार "
सदानंदाचा यलकोट ,,,,
अशा जय-घोषात शिवकर कुटुंबाची  गाडी  जेजूरी  वरून गावी केळवणे येथे दोन दिवसांनी  संध्याकाळी ७ वाजता परत आली ,कुटुंबातील प्रमुखाने ताकीद  दिली होती आधी कुळदेवतेच्या देवळात आरती होईल मग आपापल्या घरी जा,माझे घर देवळासमोर असल्यामुळे मी आधी घरीच गेलो सौ. तर खूपच थकली होती 
 मीः अग चल चल आधी आरतीला जाऊ 
सौःनाही हो मी नाही येत तुम्ही जा
मीःअरे अस कसं इतक करुन काय फायदा पोरा-बाळांच्या सुखासाठी आपण  जेजुरीला जाऊन देव घेऊन आलो ना चल लवकर 
तीः नाही येत ना,,,
मी खुप वेळा सांगून बघितलं पण ..तीच सारखं उत्तर नाहीच.
एव्हाना मला राग येऊन आवाज वाढला होता 
मीःचल मुला-बालांना काय झालं तर
तीः होऊ दे
,,,,आणि पुढच्याच क्षणी  मी तिच्या श्रीमुखात दिली ,,,
ती तोंड झाकून रडू लागली ,तिच्या गालावर कमी पण        ह्दयावर जास्त लागलं होत,लग्नाच्या ५ वर्षात पहिल्यांदाच मी हात उचलला होता , माझी चुक मला जाणवली पण माघार कोण घेणार ? शेवटी मी पुरुष होतो ,माझा पुरषार्थ आडवा येत होता ,आणि मग येईल ते तोंडात बरळुन मी देवळात आरतीला एकटाच  गेलो .
रात्रीच जेवण झाले कुणी कुणाशी बोलत नव्हता 
 अंथरूणावर पाठ टेकली आणि लक्ष भिंतीवरील आजोबांच्या फोटोकडे गेलं तेच मला अडी-अडचणीला योग्य मार्गदर्शन करत   माझे डोळे झोपेमुले बारीक होत होते...............
बाहेर खूप आवाज येत होता,मी दार उघडून बघिटलं रामभाऊ काकांच्या घरासमोर गर्दी होती मी त्यांच्या घरात गेलो पाहतो तर काका शेवटच्या घटका मोजत होते ,त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते ,लहानमुलांप्रमाणे हुंदके देत होते ,आजूबाजूला पूर्ण परीवार होता पण त्यांचं लक्ष कुणाकडेच नव्हतं , मला थोडं विचित्र वाटल आणि हे जास्त बघवलही नाही मी मागं-मागं सरकताना माझ्या हाताचा कोपरा कोणालातरी लागला पाहतो तर आजोबा ....
आजोबाःकाय बघतोस बाळा 
मीःबाबा हे असे का करतात 
आजोबाः त्याची शेवटची वेळ झाली आहे 
मीःपण बाबा हे मरताना असे का करतात दोन वर्षापूर्वी आपल्या शेताशेजारी रंगा मामा सर्पदंशाने मेला होता तो तर खूप ओरडत होता किंचालत होता  आणि हे काका तर  हुंदके देतात 
आजोबाः बाळा ह्या दोघांत खूप फरक आहे
रंगा हा अय्याशी होता व्यसनाधीन होता पोरी-बालींची छेड काडणं बाया-बापड्यांवर नजर ठेवणं देवाने दिलेल्या या देहाचा त्याने कधी सद्पयोग केला नाही या उलट रामभाऊने समाजकार्यासाठी आपला देह चंदनासारखा झिझवला तो निर्व्यसनी होता देवाने दिलेल्या शरीराचा योग्य उपयोग केला ,
बाळा हा देह नाशिवंत असतो  पण आत्मा पवित्र असतो मग तो रामभाऊचा असो की रंगाचा,आत्मा सोडून जाताना रामभाऊला मिठी मारतोय नी रडुन सांगतोय तुला सोडून जाताना मला दुःख होतय मला ह्या देहात तु सूखात ठेवलास धन्य केलस मला जावेसे वाटत नाही ,,,,म्हणून रामभाऊ हुंदके देतोय ,पण रंगाचं तस नव्हतं त्याचा आत्मा बाहेर जाताना त्याला लाथा-बुक्यानं तुडवत होता की मला तु बदनाम केलस ,चांगल्या कामी लावलस नाही ,आणि म्हणून तो मरताना ओरडत होता ....

............मिक्सरच्या गरररररररर आवाजानं मी खडबडुन स्वप्नातुन  जागा झालो सकाळचे ७वाजले होते  ,भिंतीवरील आजोबांच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला,आज आजोबा जाऊन १५ वर्ष झाली होती पण अजून ते आहेत अस वाटत होते 
..............तिच्या कडे बघितलं अजून अबोलच होती .....

दूरवर कुठं तरी गाणं चालु होत 
!! *देह करी जे जे काही आत्मा भोगीतो नंतर*  !!

तोंडावर पाणी मारून तसाच बाजारात गेलो , येताना आजोबांसाठी हार आणि सौ.साठी तिच्या आवडीचा मोगऱ्या चा गजरा घेऊन आलो,
 द्यायची हिम्मत नव्हती  ,ती किचन कट्यावर भाजी कापत होती मी हळुच गजरा फ्रिजच्या हँडलला अडकून ठेवला ,तिने फ्रिज उघडताना गजरा बघितला आणि एक नजर माझ्यावर  मी काही न बोलता कळविलीन माफी मागितली ...ती फक्त हसली ,मी जवळ जाऊन दोन्ही हात हातात घेऊन डोळ्यांनीच तिला वचन दिले की परत असा वागणार नाही 
*शेवटी मला आत्मा दुखवायचा नव्हता  माझा ,तिचा आणि इतर कुणाचाही*

*अजय शिवकर* 
*केळवणे पनवेल*
७९७७९५०४६४

शनिवार, 4 जुलाई 2020

11 प्रा. सुनीता आवंडकर

अ  प्रिय मैत्रीण 

गीताची रोजच्या कामाची नेहमीप्रमाणे घाई चालू होती .कामवाली बाई सुद्धा तीन चार दिवसांपासून सकाळी न येता सायंकाळी येत होती .त्यामुळे सकाळची सर्व कामे ती घाईनेच आवरत होती. गिता कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी करीत होती .तिचे लहानपणापासूनचे स्वप्नं  पूर्ण झाले होते त्यामुळे ती नोकरी व घर, सर्व जबाबदाऱ्या आनंदाने सांभाळत असे .मुलांची सकाळची शाळेची तयारी, डबा येणारे नातलग ,पाहुणे सर्वांचे  ती मनापासून करीत असे आणि कॉलेजमधील सुद्धा सर्व जबाबदाऱ्या अगदी मनापासून पार पाडीत असे .त्या दिवशी सकाळी साडेआठला तिच्या मोबाइलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला गीताने हातातले काम सोडून फोन उचलला गीताने कॉल उचलताच तिकडून आवाज आला  'गीता अग! कशी आहेस तू ?'
'मी  . आपण कोन????' असे  बोलण्याआधी 
 तिकडून आवाज 'मी . मी आली आहे तुझ्या गावी जमलं तर भेटते तुला '
तशी गीता म्हणाली "सॉरी मॅडम मी ओळखला नाही आपल्याला "
त्यावर उत्तर मिळाले मी  तुझी बालमैत्रीण सीमा.
 गीताला खूपच आश्चर्य वाटले.
ती म्हणाली "मी माझा पत्ता पाठवते .तू ये माझ्याकडे "
त्यावर सीमाने येईलच अशी खात्री न देता बघते,जमले तर येते, माझे काम पूर्ण झाले तर येते अशी उत्तरे दिली आणि फोन कट केला .
अाता गीताचे मन मात्र बालपणात गेले आणि तिला एक एक प्रसंग आठवू लागला .सीमा ही सुशिक्षित घरात वाढलेली सुखी कुटुंबातील व एका शिक्षकाची मुलगी तर गीता एका गरीब शेतकऱ्याची मुलगी. दोघींचे घर जवळ जवळच होते।दोघींची खरी मैत्री प्राथमिक शाळेपुरतीच मर्यादित राहिली कारण जशी शाळा बदलली तशा सीमाच्या मैत्रिणी बदलल्या वास्तविक इथेही गीता व सीमा एकाच वर्गात होत्या .  पाचवी ते दहावी.
पण आता सीमाला श्रीमंत मैत्रिणी हव्या हव्याशा वाटू लागल्या .सुरुवातीला गीताच्या हे लक्षात आले नाह। सीमा तिला हळूहळू टाळू लागली तिच्याशी बोलणे ही कमी झाले .जेव्हा शाळेत एकटी जायला लागली तेव्हा गीताला कळले की अरे !!आता हिला माझी गरज नाही. कारण आता श्रीमंत मुलींच्या घोळक्यात मिरवणे, मोठ मोठ्यांनी हसणे, वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्यांच्याकडे जाणे, त्यांना आपल्याकडे बोलावणे, ह्या गोष्टी सीमाला जास्त आकर्षित करीत आहेत आणि ह्या श्रीमंत ग्रुपमध्ये मला स्थान नाही. गीता ही अतिशय स्वाभिमानी मुलगी होती तिने कधीच लाचारी स्वीकारली नाही.तिने तेव्हाच मनाशी पक्के केले की आज यांच्याकडे लक्ष्मी आहे पण सरस्वती माता यांच्यावर अजून प्रसन्न नाही आज माझ्याकडे लक्ष्मी नाही पण सरस्वती आहे. बस तिने निश्चय केला की एक दिवस असा येईल की पूर्ण ग्रुप जगाला ओरडून सांगेल की we are proud of you Geeta. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये गीताच्या पाठीशी उभे होते ते तिचे आई वडील दोघांनी अपार कष्ट घेतले चारही मुलांना शिक्षण देण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला होता .गीताचे आईवडील एक एक पैसा जोडून मुलांना शिकवित होते .प्रसंगी गीताची मावशी आणि काका त्यांना मदत करीत होते .गीता सर्वात मोठी. गीताची आई, सर्व चारही भावंडांना तिच्या लहानपणाच्या गोष्टी सांगायची. तिचे कष्टात आई शिवाय गेलेले बालपण ,लोकांची त्यांच्यासोबतच वागणूक सर्व सर्व सांगायची .यातूनच गीताच्या मनावर संस्कार होत गेल. केवळ गीता वर नाही तर चारही भावंडांवर .गीताला आई वडिलांचे हाल कष्ट बघवत नव्हते. तिचे मन भरून आले  जेव्हा तिच्या आईने भाऊबिजेचे मिळालेले पैसे खर्चून तिच्या अभ्यासासाठी टेबल लॅम्प आणला आणि तिच्या बाबांनी स्वतःचे फाटलेले कपडे असून त्यावर खर्च न करता, गीता अगदी नववीत असतानाच नवीन घड्याळ विकत आणले .जणू काही त्यांना सांगायचे होते की बेटा आपलीही वेळ बदलणार आहे आणि म्हणून वेळेचा सदुपयोग तुला करायचा आहे .यातूनच गीता घडत गेली तिचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले आणि तिने स्वतःलाच जणूकाही वचन दिले की आई बाबा तुमचे हे कष्ट वाया जाणार नाहीत.आपल्या आयुष्यात आनंद येण्यावाचून नाही राहणार.
पुढे गीताने सर्व शिक्षण पूर्ण केले .बारावीनंतर गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य हाती घेतले . दोन विद्यार्थ्यांपासून सुरू केलेले अध्यापनाचे कार्य पन्नास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले.अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आनंदीत होऊन त्यांच्या पाल्यांची फी सुद्धा दिली आणि तिच्या शिक्षणाला तसेच तिच्या भावंडांच्या शिक्षणाला हातभार लागला.हे करीत असतांना सीमा परत गीतासोबत चांगले बोलू लागली कारण दोघींनाही एकाच कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेला होता।गीताला वाटले कि सीमा आता पूर्वीसारखी गर्विष्ठ राहिलेली नाही. पण गीता ही फक्त कॉलेजपर्यंत जाण्यासाठी व येण्यासाठी सोबत होती.
कॉलेजमध्ये मात्र सीमाच्या दुसऱ्या श्रीमंत मैत्रिणी होत्या. कॉलेजमध्ये रोज जाताना येताना स्वतःच्या सौंदर्याविषयी मोठे पनाविषयी सांगण्यात सीमाला धन्यता वाटत होती .सीमाने कधीच गीतासोबत मैत्री केली तर नाहीच परंतु इतरही मुलींना तिच्याशी मैत्री करू दिली नाही.गीताला जेव्हा पाहुणे पाहायला येणे सुरू झाले तेव्हा सीमा इतर मैत्रिणींना सांगायची की ही तर किती गरीब आहे.शेतकऱ्याच्या मुलीला शेतात जावे लागणार.असे काहीही बोलू लागली. ग्रुपमधील इतर मैत्रिणी सर्व ऐकून घ्यायच्या पण एखादी चांगली मैत्रीण गीताला येऊन सांगायची हे ऐकून गीताला खूपच वाईट वाटायचे पण तरीही तिने कधीच सीमाचा अपमान केला नाही की तिला जाब विचारला नाही अशातच तिचे शिक्षण सुरू असतानाच तिचे लग्न झाले एका खूपच चांगल्या स्वभावाच्या सरकारी नोकरीत असलेल्या इंजिनिअर मुलाशी लग्न झाले म्हणतात ना की प्रयत्न जर प्रामाणिक असतील त्याला कष्टाची जोड असेल तर नशीब सुद्धा साथ देतं  तसेच गीताच्या बाबतित  घडले. तिच्या नवऱ्याने तिला लग्नानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून प्रसंगी स्वतः स्वयंपाक आणि घरातली पडेल ती कामे केली आणि मुलांनाही सांभाळले अशाच प्रकारे गीताने लग्नानंतरही शिक्षण सुरूच ठेवले आणि पीए.डी .ची पदवी प्राप्त केली.दारावरची बेल वाजली आणि गीताचे मन भूतकाळातून वर्तमानकाळात आले आणि आणि ती म्हणाली बापरे !कॉलेजला जायला वेळ होतो आहे . माझी मैत्रीण खरंच  येईल का मला भेटायला? कदाचित हो .तिला पाहायचे असेल की आता माझी आर्थिक परिस्थिती कशी आहे.संध्याकाळी गीता  कॉलेजमधून घरी आली तर सीमा तिच्या डॉक्टर नवऱ्याबरोबर आलेली होती .गीता सीमासोबत बोलत होती पण अगदी मोजून मापून कारण दोघींमध्ये एक अंतर  लहानपणापासून कायम राहिलेल होतं. गीताने सीमाला जेव्हा तिच्या शिक्षणाविषयी विचारले त्यावर ती म्हणाली मी सध्या गृहिणी आहे वास्तविक आम्हाला नोकरी करण्याची गरजच नाही. गीताने सीमाला तिचा बंगला दाखवला मुलांचे drawings दाखविले मात्र छान !खूप छान !असे शब्द सीमाच्या तोंडून आलेच नाहीत .खूप आग्रह करूनही सीमाने जेवण केले नाही जेव्हा सीमा परत जायला निघाली तेव्हा गीताने तिला हळदीकुंकू देऊन तिची ओटी भरली आणि मनातच म्हणाली परमेश्वरा माझ्या मैत्रिणीला सद्बुद्धी दे तिला सुखात  राहु दे.

ले. प्रा.सुनिता आवंडकर  बारी 
मोतीवाला शिक्षणशास्त्र महाविद्यालय नाशिक .9850328663.

गुरुवार, 2 जुलाई 2020

10 जी एस पाटील

*"दारूडा सहदेव"*  
                       
      सहदेव नावाचा एक मोलमजूरी करून 
जीवन जगत असणारा गरीब कुटुंबातील इसम होता.त्या कुटुबातील पाच भावापैकी व पाच बहिनी पैकी सर्वात धाकटा होता.
एकत्र कुटुंब असतानाच त्याचे लग्न झाले नंतर प्रत्येकजण आपोआपला संसार करू लागले त्याप्रमाणे सहदेव सुध्दा त्याच्या वाटणीला आलेल्या घरात पत्नी व तो राहु लागला.पत्नी सुध्दा गरीब कुटुंबातीलच होती.त्यामुळे दोघे एकत्रित काम करून संसाराचा गाढ़ा ओढ़त असताना एका पुत्र रत्नाचा जन्म झाला.त्या दोघाना आंनद झाला.मुलाचे पालन पोषण करणेची अधिक जबाबदारी त्याचेवर येवून पडली पण त्याने काही मन खचू न देता अधिक काम करुन आपले कुटुंब कसे सुखी समाधानी राहील याचा प्रयत्न करू लागला.हळू हळू मुलगा मोठा होवू लागला शाळेत जावू लागला.
         पुन्हा दोन-तीन वर्षात दुसऱ्या पुत्र रत्नाचा जन्म झाला.आता त्यांच्या कुटुंबात सोन्या सारखे दोन मुलगे व पति पत्नी मिळून चार लोकांचा सुखी संसार चालू होता.मंजूरी करणेचा प्रयत्न करून मजूरीतून मिळणाऱ्या पैशावर कुटुंबाचे छान पालन पोषण करुन रहात असतानाच जशी दृष्ट लागावी तशी त्यांच्या कुटुंबाला दृष्ट लागली कारण सहदेवला दारू पिण्याची सवय सुरु झाली.सुरवातीस आठवड्यातून एकदा रविवारी मांसाहार असेल तेव्हा दारू घेऊ लागला पण नंतर ती दारूची सवय रोजचीच सुरु झाली.रोजच्या मिळणाऱ्या मजूरीतुन रोजच दारुची सवय सुरु झाली.समाजात असणारी किंमत दिवसे दिवस कमी होऊ लागली.मिळणाऱ्या कामावर सुध्दा परिणाम झाला.काम करून पैसे मिळविण्याचा त्याच्या संसारावर परिणाम झाला.घरात पुरेशे पैसे देवू शकत नव्हता,घरात टंचाई सुरु झाली.  घरात सर्व खाती तोंडे होती व व्यसनाधीन झालेमुळे ना विलाज म्हणून दारू पिण्यासाठी घरातील काही सुख सोई च्या वस्तु उदा. खाट,टेबल,खुर्ची,पंखा अशा घरातील वस्तु  विकुन दारू पिण्यासाठी पैसा गोळा करू लागला.कारण ऊत्पन्न बंद झालेमुळे व शारीरिक क्षमता सुध्दा दारुमुळे कमी झालेली होती.जास्त ताक़दीच्या मजूरीचे काम करू शकत नव्हता.
      मुले लहान असतानाच त्याने राहते घर सुध्दा कोणा इसमाला विकायचे ठरवून त्याच्या कडून थोड़े थोड़े उसने पैसे संबधित इसमाकडून घेऊन शेवटी घराचा खरेदी दस्त देऊन वडीलार्जित मोकळ्या जागेत छोटेसे छप्पर घालून तेथे राहु लागला.शेवटी शरीर साथ देत नसलेमुळे  व दारुच्या आहारी गेलेमुळे एके दिवशी त्याचे निधन झाले. त्याचेवर अवलंबून असलेले कुटुबांत दोन मुलगे व पत्नीला दारू पायी वा-यावर सोडून निघुन गेला.बिचा-या पत्नीवर सर्व जबाबदारी येऊन पडली.मजूरी करून मुलांच्या संभाळ करू लागली.कुटुबाची अशी वाताहत झालेने मुलांना सुध्दा पुरेशे शिक्षण न मिळाल्याने मुले सुध्दा छोटी छोटी मिळेल ती शेतीची,हमालीची कामे करू लागली.पालक जर व्यसनाधीन असला तर कुटुंबाची कशी अवस्था होत असते हे यावरून दिसून येते.दारूमुळे असे किती तरी संसार देशो धड़ीला लागलेले आहेत.
       मोठ्या मुलाला गरीब कुटुंबातील होतकरु मुलगी मिळाली. सर्वजण एकत्र राहू लागले.आई हीच त्यांची कुटुम्ब कर्ता होती. काही दिवसा नंतर मोठा मुलगा त्याच्या पत्नीच्या माहेरी राहणेस गेला तेथे त्याला सुध्दा वडिलांचे सारखे दारू पिण्याचे व्यसन कधी लागले ते कळले नाही.गावी छोटा मुलगा होता त्याला सुध्दा गरीब कुटुंबातील एका मूलीशी लग्न करून दिले. तो मिळेल ती मोलमजूरी करून त्या छपरामध्ये आई पत्नी सोबत राहु लागला पण वडील, मोठा भाऊ ,यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याला सुद्धा दारु पिण्याचे व्यसन लागले.त्यामुळे त्याची पत्नी पळून गेली.तो सुद्धा तिच्या माहेरी जावून राहु लागला.पण "दारुडया तो दारूड्या कधी सुधारत नसतात."त्यामुलीने त्याला सोडून दिले.नंतर दुस-या मुलीशी लग्न करून आता त्याला दारुचे पहिल्या पेक्षा जास्तच व्यसन लागलेले आहे.आता पर्यन्त दोन मुलींना जन्म दिलेला आहे.
       मुलीच्या माहेरची गरीबी असल्यामुळे ती बिचारी नवरा मारहाण करतो तरी ना विलाज म्हणून अशा दारुडया नव-या सोबत रहात आहे. दारूड्याने आई  माहेरी गेल्यावर पत्नीच्या परस्पर सिलेंडर सुद्धा विकला होता आईला कळल्या नंतर  आईने पैसे उसने पासने करून तो विकलेला सिलेंडर सुद्धा परत आणला एकदा तर या दारूड्याने छपरावर असणारी पत्र्याची  काही पाने सुद्धा दारुला पैसे हवेत म्हणून विकली होती .
       या कथे मधील घटनेचा अभ्यास केला तर  दारूच्या व्यसनापायी आपल्या कुटुंबाची कशी दुर्दशा होत असते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता येत नाही.मुलांचेवर चांगले संस्कार करु शकत नाही.स्वत: व्यसनी असल्यामुळे मुले सुद्धा भविष्य काळात व्यसनीच निघाली.सुखी संसाराची  राख रांगोळी झाली.माणसात माणूस राहिला नाही.कारण एक दारूड्या भाऊ पत्नीच्या माहेरी,आई माहेरात,धाकटा  एकटाच गावी छोटयाशा पाचटीच्या छपरा मध्ये  जीवन कंठीत आहे.जनतेने व्यसनापासून दूर राहिले पाहिजे कारण व्यसन हेच आपले दुश्मन किवा शत्रु आहे.हे लक्षात ठेवले पाहिजे.कथेतील "दारुडा सहदेव "जागोजागी भेटेल "बाप तसे बेठे."हाच बोध या कथे मधून घेतला पाहिजे.ही कथा काल्पनिक असली तरी  सत्य वाटते.या कथेतील प्रसंग कोणाशी  समान वाटत असतील तर तो एक योगायोग समजणेत यावा. 
  
 *लेखक - जी.एस.कुचेकर -पाटील.*  भुईंज                          
ता.वाई जि.सातारा  मो.नं.७५८८५६०७६१.

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...