कोंडमारा...
सोहम, त्याची बायको जान्हवी आणि 12 वर्षांचा मुलगा कार्तिक असं एक छोटंसं मध्यमवर्गीय कुटुंब.
कोरोनामुळे सगळं जग थांबलेलं असतांना या तिघांचं मात्र घरातल्या घरात काहीतरी सुरूच असायचं.
सोहमने त्याचा जुन्या फोटोंचा अल्बम काढला होता. त्यातील एक-एक फोटो कार्तिकला दाखवत तो आपल्या बालपणीच्या, शाळेतल्या व कॉलेजातल्या आठवणी सांगत होता. कार्तिकला सुद्धा यात मजा वाटत होती.
इकडे जान्हवी youtube चा आधार घेत ड्रेसडिझायनिंग मधल्या नवीन फॅशन शिकत होती आणि ते करून बघत होती, तर कधी-कधी नवनवीन पाककृती करून बघत होती.
कार्तिक सकाळी उठून गच्चीवर व्यायाम करणे, स्केटिंग खेळणे, दुपारी टीव्ही पाहणे, कॉम्पुटर वर गेम खेळणे असं तो आलटून-पालटून त्याच्या मुडनूसार करत असे. संध्याकाळी तिघं पण सोबत बसून एखादा चित्रपट बघत किंवा छत्रपती संभाजी राजे, चला हवा येऊ द्या यासारख्या मालिका बघत असत तर कधी-कधी नातलगांना व्हिडिओ कॉल करून बोलत असे.
सगळं एकदम व्यवस्थित चालू होतं. लॉकडाऊन मुळे बाहेर हाहाकार माजलेला असतांना यांचं वेगळंच जग निर्माण झालं होतं. कधी नव्हे तो इतका वेळ ते एकमेकांना देत होते. कोरोनाचे सावट असतांना सुद्धा हे तीन महिने कसे निघून गेले हे त्यांना कळले सुद्धा नाही.
सोहमचे आई-वडील मोठ्या शहरात राहत होते. परंतु तिकडे कोरोना पेशंट वाढत असल्यामुळे आठवडाभरापूर्वीच ते सुद्धा आता गावाकडे परत आले होते. सोहमचे आई-वडील गावाकडे आल्यापासून जान्हवी आणि सोहमवर मात्र मर्यादा आल्या होत्या. त्यांना पूर्वीसारखं मोकळं वागता येत नव्हतं, एकमेकांसोबत हसून-खेळून राहता येत नव्हतं. जान्हवीचे तिच्या सासू-सासऱ्यांसोबत बोलणं बंद झालं होतं. असं एकाच घरात अबोला धरून किती दिवस राहणार ? असं आपल्याच घरात परक्यासारखं राहणं सोहमच्या आई-वडिलांना कसं जमेल ? असे बरेच प्रश्न समोर उभे होते.
यात नेमकं कुणाला समजून सांगावं ? नेमकी चूक कुणाची ? हे मात्र सोहम ठामपणे सांगू शकत नव्हता. कारण प्रत्येक जण आप-आपली बाजू अतिशय ठामपणे सांगत होता. दोन्हीकडचे युक्तिवाद एखाद्या मातब्बर वकिलाला लाजवेल असे असल्यामुळे सोहमपुढे शांत बसण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय सध्यातरी नव्हता.
बाहेर कोरोनाने थैमान घातलेलं असतांना घरातल्या वादळापुढे सोहमचाच नव्हे तर घरात राहणाऱ्या प्रत्येकाचाच 'कोंडमारा' होत होता.
सासू-सुनेच्या वादामध्ये होणारी सोहमच्या मनातली घालमेल त्याच्या वडिलांनी ओळखली होती.
एक दिवस जान्हवी कपडे धुत होती तर सोहमची आई पूजा करत असल्याचे पाहून सोहमचे वडिल सोहमला जवळ बोलावत म्हणाले, "सोहम, ये बैस इथं." सोहम सुद्धा वडिलांच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसला.
"प्रत्येक घरात असे छोटे-मोठे वाद होतच असतात. वेळीच त्यावर तोडगा काढला गेला पाहिजे." सोहमचे बाबा त्याला शांततेत समजावून सांगत म्हणाले.
"हो बाबा बरोबर आहे तुमचं. पण, नेमकं कोण बरोबर आणि कोण चूक हेच कळत नाहीये त्यामुळे मला कोणाचीच बाजू निट समजत नाहीये. तुम्ही नसल्यावर आमच्या दोघांमध्ये जो संवाद होत असतो त्यात खूप सहजता असते. तुम्ही आल्यावर तिचा चिडचिडेपणा एकदमच वाढतो. आईचं पण तसंच असतं जान्हवी नसल्यावर आई माझ्यासोबत खूपच मोकळेपणाने गप्पा मारते, जान्हवी असल्यावर तिला पण काय होतं काही कळत नाही." सोहम पहिल्यांदाच आपलं मन वडीलांसमोर मोकळं करत होता. सोहमचं बोलणं ऐकून घेत, "हे बघ सोहम, मी समजू शकतो तुझ्या मनाची अवस्था. याचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाहीये. त्यामुळे मी परत जाण्याचा विचार केलाय. कसं आहे ना 'कोरोना' मुळे मरू तेव्हा मरू पण अश्या घुसमटीने एकतर तुम्हाला निट जगता येत नाहीये आणि आम्हाला सुद्धा. यावर पर्याय निघेपर्यंत तरी आपण दूरच राहिलेलं बरं." असं म्हणत बाबा उठले आणि त्यांनी आईला बॅग भरण्यास सांगितले.
हे ऐकून सोहम मात्र स्तब्ध होऊन बसला होता.
सोहमच्या कुटुंबाची कथा ऐकली की या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही...
"घर असावे घरासारखे नकोत नुस्त्या भिंती...
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती"
*गणेश सोळुंके*
भोकरदन (जालना)
8390132085
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें