बुधवार, 8 जुलाई 2020

13 श्रीमती माणिक नागावे

लघुकथा 
शिर्षक- सोन्याची चेन 

  जीवनात सुख व दुःख हे  प्रत्येकाच्या वाट्याला येत असते. जीवनात गोडी मिळवण्याकरता हे आवश्यकच आहे. दुःख नसेल तर सुखाला काहीच किंमत राहणार नाही.अशा सुखदुःखाच्या अनेक घटना आयुष्यामध्ये घडत असतात. काही घटना सुख देऊन जातात तर काही घटना आयुष्यभर मनामध्ये दुःख ,वेदना, सलत राहतात.ज्या आपण कधीही विसरु शकत नाही. व त्यात सुधारणा ही करु शकत नाही.

   मी माझ्या संसारात अतिशय सुखी होते.मोठी मुलगी व लहान मुलगा अशा गोंडस दोन मुलांच्या कडे पाहून अतिशय आनंद होत असे. माझे पती आणि मी दोघेही गावातच हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करत होतो. शैक्षणिक कार्याबरोबर समाजकार्याचीही आवड आम्हाला दोघांना होती. माझे आई-वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे माझे लग्न मोठ्या थाटामाटात करुन दिले होते. लग्नात त्यांनी मला बिल्वर ,पाटल्या ,गंठण असे दागिने घातले होते. माझे पती म्हणजे माझ्या आईचे भाऊ म्हणजे माझे मामाच होते. त्यामुळे परकेपणा नव्हताच. त्यांनाही दीड तोळ्याची चेन केलेली होती. असेच आनंदात दिवस निघून जात होते. लग्नानंतर पंधरा-सोळा वर्षानंतर दागिन्यांची झीज होणे क्रमप्राप्तच आहे. दररोज वापरल्यामुळे माझ्या हातातील बिल्वर झीजले होते. पातळ झाले होते. माझ्या मनात आले की आपण नवीन बिल्वर करावेत. मी माझ्या पतींना म्हटलं," अहो," माझे बिल्वर खूप झीजलेले आहेत. आपण नवीन करूया का?" त्यांनी होकार दिला. होकार मिळताच परत मी म्हणाले,"  मग असं करूया का, एकाच डिझाइनमध्ये बिल्वर आणि पाटल्या दोन्ही करूया." त्यांनी थोडा विचार केला व मला  होकार दिला. मग मी म्हणाले," या बरोबर तुमच्या गळ्यातील चेनही आपण थोडी मोठी करूया."  तेव्हा ते म्हणाले," बघू त्याचं नंतर." विचार पक्का झाला.. सोनाराकडे जाऊन एक डिझाईन ठरवले.आनंदातच घरी परत आले.कधी एकदा नवीन बांगड्या मिळतात व मी त्या कधी हातात घालते असं झाले होते.सोनार कधी बोलावतो याची वाटचं पहात होते.

 जेव्हा बिल्वर व पाटल्या तयार झाल्या तेंव्हा सोनाराकडे गेलो. एकाच वेळा दोन्ही जिन्नस केल्यामुळे त्याची किंमत ही भरपूर झाली होती.  त्यावेळी माझे पती म्हणाले,"त्या चेनची कींमत करा व ते पैसे वजा करुन कीती पैसे होतात ते सांगा."  मला एकदम धक्काच बसला. मी म्हणाले," असं का सांगताय?"  तेव्हा ते म्हणाले," आपण दुसरी नवीन चेन करूया." मी कितीही सांगितलं तर त्यांनी ऐकले नाही.मी जास्त बोलुही शकत नव्हते.कुठुन दोन्ही बाल्वर व पाटल्या मोडायच्यख ठरवलं हे मनाला वाटून पश्चाताप होऊ लागला.बिल्वर, पाटल्या घेऊन घरी आलो. पण मनात उत्साह ,आनंद नव्हता. कुठेतरी मनात रुखरुख लागून राहिली होती. हे असं व्हायला नको होतं असं सारखं सारखं वाटत होतं. त्या मला हातात सुद्धा घालवेनात. कारण माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीचा मोकळा गळा दिसत होता. थोडे दिवस निघून गेल्यानंतर मी स्वतः विषय काढला,"अहो, ती चेन कधी करायला टाकता?" तेव्हा ते मला म्हणाले की,"अगं, टाकूया कि काय गडबड आहे?" असेच दिवस निघून जात होते. एक-दोनदा घरगुती कार्यक्रमात वेळी मी त्या बांगड्या कसंतरी घातले होते. हे ऐकत नाहीत म्हटल्यानंतर मी ही बांगड्या कपाटात ठेवून दिल्या.त्यांना म्हटलं ही," चेन करा नाहीतर मी बांगड्या हातात घालणार नाही."पण हो नाही करत दोन वर्षे निघून गेले.

 आणि अचानक माझ्या आयुष्यात तो काळा दिवस उगवला. माझ्या पतीचे अपघाती निधन झाले. आणि माझ्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. वादळात भरकटलेल्या जहाजासारखी माझी अवस्था झाली होती. जीवन जगण्यामध्ये काही अर्थ आहे असे वाटत नव्हते. पण माझ्या घरच्या लोकांनी दिलेला आधार व दोन लहान मुलांच्या कडे बघून मी स्वतःला सावरले. हळूहळू मी सावरत गेले. मुलांना संस्कारक्षम बनवून उच्च शिक्षण दिले. मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःला सावरत नोकरी,समाजकार्य,राहिलेला वेळ लेखनामध्ये वेळ घालवून साहित्य सेवा करु लागले.समाजात माझे एक स्थान निर्माण केले आहे.आज मला कशाचीही कमतरता नाही. पण जेंव्हा जेंव्हा मी त्या बिल्वर, पाटल्यांच्याकडे पाहते तेंव्हा तेंव्हा मला खूप वेदना होतात.कारण माझ्या पतींची चेन करायचीच राहून गेली.मला राहून राहून वाटते मी तेंव्हाच हट्टाने चेन करायला हवी होती.पण त्यांचा स्वभाव आड येत होता. बिल्वर , पाटल्या तयारच होत्या. पण त्याचा आनंद काही मला शेवटपर्यंत घेता आला नाही. कारण जेव्हा जेव्हा मी त्या बांगड्या हातात घेत असे तेंव्हा तेंव्हा मला माझ्या पतीच्या चेनची आठवण येत असे.

 आतातर पती नसल्यामुळे ते शक्यच नाही.आता पैसा आहे,पण ती चेन घालणारा गळाच नाही.. कीती वेदनादायी प्रसंग माझ्या जीवनात आला.अशावेळी वाटतं की नियतीपुढे आपण हतबल असतो.नियती आपल्याला कठपुतळीप्रमाणे नाचवते.आपण असहाय्यपणे पाहण्याशिवाय काहीच करु शकत नाही. सोन्याची चेन शेवटपर्यंत माझ्या पतीच्या गळ्यात मी बघू शकले नाही ही सल माझ्या आयुष्यात कायम मला टोचत राहणार आहे.आजही मी त्या बांगड्या कपाटात ठेऊन दिल्या आहेत.हातात घालण्याची इच्छाच होत नाही. माझ्यामुळेच सोन्याची चेन त्यांनी गळ्यातून काढली ही सल माझ्या हृदयात माझ्या अंतापर्यंत अशीच सलत राहणार...मी कीतीही आटापिटा केला तरीही काही उपयोग होणार नाही. मघ सतत उत्तर शोधते पण सापडत नाही. माझी वेदना, सल कमी होईल का ? आहे का कुणाकडे उत्तर???????

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...