शनिवार, 4 जुलाई 2020

11 प्रा. सुनीता आवंडकर

अ  प्रिय मैत्रीण 

गीताची रोजच्या कामाची नेहमीप्रमाणे घाई चालू होती .कामवाली बाई सुद्धा तीन चार दिवसांपासून सकाळी न येता सायंकाळी येत होती .त्यामुळे सकाळची सर्व कामे ती घाईनेच आवरत होती. गिता कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी करीत होती .तिचे लहानपणापासूनचे स्वप्नं  पूर्ण झाले होते त्यामुळे ती नोकरी व घर, सर्व जबाबदाऱ्या आनंदाने सांभाळत असे .मुलांची सकाळची शाळेची तयारी, डबा येणारे नातलग ,पाहुणे सर्वांचे  ती मनापासून करीत असे आणि कॉलेजमधील सुद्धा सर्व जबाबदाऱ्या अगदी मनापासून पार पाडीत असे .त्या दिवशी सकाळी साडेआठला तिच्या मोबाइलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला गीताने हातातले काम सोडून फोन उचलला गीताने कॉल उचलताच तिकडून आवाज आला  'गीता अग! कशी आहेस तू ?'
'मी  . आपण कोन????' असे  बोलण्याआधी 
 तिकडून आवाज 'मी . मी आली आहे तुझ्या गावी जमलं तर भेटते तुला '
तशी गीता म्हणाली "सॉरी मॅडम मी ओळखला नाही आपल्याला "
त्यावर उत्तर मिळाले मी  तुझी बालमैत्रीण सीमा.
 गीताला खूपच आश्चर्य वाटले.
ती म्हणाली "मी माझा पत्ता पाठवते .तू ये माझ्याकडे "
त्यावर सीमाने येईलच अशी खात्री न देता बघते,जमले तर येते, माझे काम पूर्ण झाले तर येते अशी उत्तरे दिली आणि फोन कट केला .
अाता गीताचे मन मात्र बालपणात गेले आणि तिला एक एक प्रसंग आठवू लागला .सीमा ही सुशिक्षित घरात वाढलेली सुखी कुटुंबातील व एका शिक्षकाची मुलगी तर गीता एका गरीब शेतकऱ्याची मुलगी. दोघींचे घर जवळ जवळच होते।दोघींची खरी मैत्री प्राथमिक शाळेपुरतीच मर्यादित राहिली कारण जशी शाळा बदलली तशा सीमाच्या मैत्रिणी बदलल्या वास्तविक इथेही गीता व सीमा एकाच वर्गात होत्या .  पाचवी ते दहावी.
पण आता सीमाला श्रीमंत मैत्रिणी हव्या हव्याशा वाटू लागल्या .सुरुवातीला गीताच्या हे लक्षात आले नाह। सीमा तिला हळूहळू टाळू लागली तिच्याशी बोलणे ही कमी झाले .जेव्हा शाळेत एकटी जायला लागली तेव्हा गीताला कळले की अरे !!आता हिला माझी गरज नाही. कारण आता श्रीमंत मुलींच्या घोळक्यात मिरवणे, मोठ मोठ्यांनी हसणे, वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्यांच्याकडे जाणे, त्यांना आपल्याकडे बोलावणे, ह्या गोष्टी सीमाला जास्त आकर्षित करीत आहेत आणि ह्या श्रीमंत ग्रुपमध्ये मला स्थान नाही. गीता ही अतिशय स्वाभिमानी मुलगी होती तिने कधीच लाचारी स्वीकारली नाही.तिने तेव्हाच मनाशी पक्के केले की आज यांच्याकडे लक्ष्मी आहे पण सरस्वती माता यांच्यावर अजून प्रसन्न नाही आज माझ्याकडे लक्ष्मी नाही पण सरस्वती आहे. बस तिने निश्चय केला की एक दिवस असा येईल की पूर्ण ग्रुप जगाला ओरडून सांगेल की we are proud of you Geeta. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये गीताच्या पाठीशी उभे होते ते तिचे आई वडील दोघांनी अपार कष्ट घेतले चारही मुलांना शिक्षण देण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला होता .गीताचे आईवडील एक एक पैसा जोडून मुलांना शिकवित होते .प्रसंगी गीताची मावशी आणि काका त्यांना मदत करीत होते .गीता सर्वात मोठी. गीताची आई, सर्व चारही भावंडांना तिच्या लहानपणाच्या गोष्टी सांगायची. तिचे कष्टात आई शिवाय गेलेले बालपण ,लोकांची त्यांच्यासोबतच वागणूक सर्व सर्व सांगायची .यातूनच गीताच्या मनावर संस्कार होत गेल. केवळ गीता वर नाही तर चारही भावंडांवर .गीताला आई वडिलांचे हाल कष्ट बघवत नव्हते. तिचे मन भरून आले  जेव्हा तिच्या आईने भाऊबिजेचे मिळालेले पैसे खर्चून तिच्या अभ्यासासाठी टेबल लॅम्प आणला आणि तिच्या बाबांनी स्वतःचे फाटलेले कपडे असून त्यावर खर्च न करता, गीता अगदी नववीत असतानाच नवीन घड्याळ विकत आणले .जणू काही त्यांना सांगायचे होते की बेटा आपलीही वेळ बदलणार आहे आणि म्हणून वेळेचा सदुपयोग तुला करायचा आहे .यातूनच गीता घडत गेली तिचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले आणि तिने स्वतःलाच जणूकाही वचन दिले की आई बाबा तुमचे हे कष्ट वाया जाणार नाहीत.आपल्या आयुष्यात आनंद येण्यावाचून नाही राहणार.
पुढे गीताने सर्व शिक्षण पूर्ण केले .बारावीनंतर गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य हाती घेतले . दोन विद्यार्थ्यांपासून सुरू केलेले अध्यापनाचे कार्य पन्नास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले.अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आनंदीत होऊन त्यांच्या पाल्यांची फी सुद्धा दिली आणि तिच्या शिक्षणाला तसेच तिच्या भावंडांच्या शिक्षणाला हातभार लागला.हे करीत असतांना सीमा परत गीतासोबत चांगले बोलू लागली कारण दोघींनाही एकाच कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेला होता।गीताला वाटले कि सीमा आता पूर्वीसारखी गर्विष्ठ राहिलेली नाही. पण गीता ही फक्त कॉलेजपर्यंत जाण्यासाठी व येण्यासाठी सोबत होती.
कॉलेजमध्ये मात्र सीमाच्या दुसऱ्या श्रीमंत मैत्रिणी होत्या. कॉलेजमध्ये रोज जाताना येताना स्वतःच्या सौंदर्याविषयी मोठे पनाविषयी सांगण्यात सीमाला धन्यता वाटत होती .सीमाने कधीच गीतासोबत मैत्री केली तर नाहीच परंतु इतरही मुलींना तिच्याशी मैत्री करू दिली नाही.गीताला जेव्हा पाहुणे पाहायला येणे सुरू झाले तेव्हा सीमा इतर मैत्रिणींना सांगायची की ही तर किती गरीब आहे.शेतकऱ्याच्या मुलीला शेतात जावे लागणार.असे काहीही बोलू लागली. ग्रुपमधील इतर मैत्रिणी सर्व ऐकून घ्यायच्या पण एखादी चांगली मैत्रीण गीताला येऊन सांगायची हे ऐकून गीताला खूपच वाईट वाटायचे पण तरीही तिने कधीच सीमाचा अपमान केला नाही की तिला जाब विचारला नाही अशातच तिचे शिक्षण सुरू असतानाच तिचे लग्न झाले एका खूपच चांगल्या स्वभावाच्या सरकारी नोकरीत असलेल्या इंजिनिअर मुलाशी लग्न झाले म्हणतात ना की प्रयत्न जर प्रामाणिक असतील त्याला कष्टाची जोड असेल तर नशीब सुद्धा साथ देतं  तसेच गीताच्या बाबतित  घडले. तिच्या नवऱ्याने तिला लग्नानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून प्रसंगी स्वतः स्वयंपाक आणि घरातली पडेल ती कामे केली आणि मुलांनाही सांभाळले अशाच प्रकारे गीताने लग्नानंतरही शिक्षण सुरूच ठेवले आणि पीए.डी .ची पदवी प्राप्त केली.दारावरची बेल वाजली आणि गीताचे मन भूतकाळातून वर्तमानकाळात आले आणि आणि ती म्हणाली बापरे !कॉलेजला जायला वेळ होतो आहे . माझी मैत्रीण खरंच  येईल का मला भेटायला? कदाचित हो .तिला पाहायचे असेल की आता माझी आर्थिक परिस्थिती कशी आहे.संध्याकाळी गीता  कॉलेजमधून घरी आली तर सीमा तिच्या डॉक्टर नवऱ्याबरोबर आलेली होती .गीता सीमासोबत बोलत होती पण अगदी मोजून मापून कारण दोघींमध्ये एक अंतर  लहानपणापासून कायम राहिलेल होतं. गीताने सीमाला जेव्हा तिच्या शिक्षणाविषयी विचारले त्यावर ती म्हणाली मी सध्या गृहिणी आहे वास्तविक आम्हाला नोकरी करण्याची गरजच नाही. गीताने सीमाला तिचा बंगला दाखवला मुलांचे drawings दाखविले मात्र छान !खूप छान !असे शब्द सीमाच्या तोंडून आलेच नाहीत .खूप आग्रह करूनही सीमाने जेवण केले नाही जेव्हा सीमा परत जायला निघाली तेव्हा गीताने तिला हळदीकुंकू देऊन तिची ओटी भरली आणि मनातच म्हणाली परमेश्वरा माझ्या मैत्रिणीला सद्बुद्धी दे तिला सुखात  राहु दे.

ले. प्रा.सुनिता आवंडकर  बारी 
मोतीवाला शिक्षणशास्त्र महाविद्यालय नाशिक .9850328663.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...