बोधकथा
आधी करावे मगच सांगावे
संध्याकाळची वेळ झाली होती, इतक्यात फाटकाचा आवाज आला. राजू आल्याची चाहूल आईला लागली. राजू आलास बाळ ! आईने न पाहताच राजुला आवाज दिला. हो ग आई ! आज सुट्टी असल्याकारणाने आज मित्रांसोबत खूप खेळलो. अरे ! हो रे बाळा जरा वेळेचेही भान ठेवायचे होतेस ना. उद्या सोमवार आहे, बाईंनी सांगितलेला गृहपाठ केलास ना. नाही ग आई आता करेन. आई आमच्या वर्गाचा परिपाठ सुद्धा असतो उद्या आणि मला वक्तशीरपणा या मूल्यावर बोलायचे आहे.
बरं ! राजू तू आता हात पाय धुऊन घे आणि देवास नमस्कार कर तोपर्यंत तुझे बाबा येतीलच आणि आले की सोबतच जेवण करायला बसा. आई बैलगाडीचा आवाज येतोय बाबा आले वाटते.
काय राजू आज आला नाही शेताकडे,
नाही हो बाबा आज मित्रांसोबत खूप खेळलो. खूप मज्जा आली.
जेवण आटोपल्यानंतर राजू गृहपाठ खूप उशीर पर्यंत करत बसला आणि तसाच झोपी गेला. सकाळ झाली तरीही राजू गाढ झोपेतच होता. राजू उठ! अरे राजू उठ! आईच्या हाका चालूच होत्या तरीही राजू अंथरुणावर लोळतच होता. शेवटी कसाबसा तरी राजू उठला. घाईघाईने आंघोळ करून शाळेची तयारी केली. तोपर्यंत शाळा भरण्याची वेळ निघून गेली होती. राजूला आज शाळेत जायला उशीर झाला होता. शेवटी उशिरा का होईना राजू शाळेत पोहोचला. तोपर्यंत म्हणजे परिपाठ आटोपून मुले वर्गात जात होती. राजुला स्वतःची खूपच लाज वाटली. आज तो वक्तशीरपणा या विषयावर बोलणार होता. परंतु तोच वेळेवर न पोचल्याने त्याच्या वक्तशीरपणा बोलण्याचा काही परिणाम होणार नव्हता. त्याला स्वतःची चूक समजली. तो स्वतःच्या मनाशी खजील झाला.
परंतु आता यापुढे त्याला कळले वेळेवर काम कसे करावे व वेळेचे महत्व कसे जाणावे हे चांगले समजले होते आणि राजूने मनाशी निश्चय केला यापुढे मी कोणतेही काम वेळेवर करेन.
तात्पर्य : वेळेचे महत्व जाणावे. वक्तशीरपणा हा स्वतः अंगी बाळगून मगच दुसऱ्यास सांगावा.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
(स्वरचित, स्वलिखित बोधकथा)
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता. हदगाव जि. नांदेड.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें