*शांतादुर्गा*
"अनया, अगं आवरले की नाही तुझे?" काॅलेजचा पहिला दिवस आहे, वेळेवर जायला हवे ग."
"आले ग,मम्मा."
असे म्हणत तिने रेवाच्या गळ्याभोवती हात गु़फले.रेवाला क्षणभर दाटून आले पण तिने आवंढा गिळला.हसऱ्या चेहऱ्याने तिला तिने निरोप दिला.
स्वयंपाक घरातील कामे आवरून तिलाही ऑफिसला जायचे होते.मनातील खळबळ लपवून जगणे तिला असह्य होत होते.तेवढ्यात तिच्या सासुबाई आत आल्या.
"रेवा,अगं किती दिवस मुलांपासून सत्य लपवणार.कधी ना कधी त्यांना कळणारच ना की राजेश त्यांचे वडील आहेत ते."
"आई, मला ह्या विषयावर बोलायचे नाही.तुमचा मुलगा आहे.म्हणून मी घरात येऊ दिले आहे.त्यांना लवकरात लवकर परत जायला सांगा."
"अगं,आता कुठे जाणार तो?"
"म्हणजे,इथेच राहणार की काय?तसे जर तुम्ही ठरवले असेल तर मी आजच माझ्या मुलांना घेऊन इथून निघून जाईन."
"रेवा,अगं तो तुझा नवरा आहे.तुझ्या मुलांचा जन्मदाता आहे."
" हो, आहे ना.पण मागची सोळा वर्षे हाच जन्मदाता कुठे होता?तेव्हा मुलांचे काय झाले? हे कधी त्यांनी विचारले का?
"आई, माझ्या आयुष्याची १६ वर्षांपासूनची हेळसांड तुम्हाला कधी जाणवली नाही का?"
यावर तिच्या सासुबाई काहीच बोलू शकल्या नाहीत.
तोच सोळा वर्षांपुर्वींचा प्रसंग पुन्हा डोळ्यासमोर तरळला.राजेश तेव्हा रात्रभर बाहेर रहायचा.काही विचारले की भांडायचा.त्यामुळे वाद टाळण्यासाठी रेवा शांत रहायची.दोन मुले पदरात ना कळत्या वयातली, अमेय तीन वर्षांचा तर अनया एक वर्षांची होती.
एके दिवशी संध्याकाळी राजेश आॅफिसवरून घरी आला.तिने त्याच्या पुढ्यात चहाचा कप ठेवला.पण तो सरळ बेडरूममध्ये निघून गेला.बाहेर आला तर स्वत:ची बॅग घेऊनच आणि रेवा ,सासुबाई व सासऱ्यांना घर सोडून जात असल्याचे सांगितले.तिला तर क्षणभर काहीच कळेना.मेंदू बधीर झाल्यासारखा वाटू लागला.त्याच्या वडिलांनी राजेशला अडवण्याचा प्रयत्न केला.पण तो थांबला नाही.मुलाच्या अशा वागण्याचा त्यांना धक्का बसला.त्यातच ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले.
रेवावर तर आभाळच कोसळले.तिला स्वत:ला सावरावे की सासुबाईंना हेच कळेना.राजेशच्या सोडून जाण्याने व सासऱ्यांच्या निधनाने ती खचली होती.परंतु माहेरी न जाता इथेच राहण्याचा तिने निर्णय घेतला.तेव्हापासून आजतागायत एकटीने कुटुंबप्रमुखाची सर्व जबाबदारी पार पाडली.राजेश गेल्यानंतर नोकरीसाठी घराबाहेर पडली.ती शिकलेली होती.त्यामुळे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ती सर्व आव्हाने पेलत होती.
आणि आज अचानक राजेशचे आयुष्यात पुन्हा येणे तिला अनाकलनीय म्हणण्यापेक्षा धक्कादायक होते.तेवढ्यात घड्याळाच्या अलार्मने तिची विचारशृंखला तुटली.ती बेडरूममध्ये तयारी करण्यासाठी गेली.तिच्यामागोमाग राजेश आत आला आणि त्याने तिचा हात धरला."रेवा,आपण पुन्हा एकत्र राहूया ना.मी केलेल्या चुकीविषयी मनापासून माफी मागतो.यापुढे मी जराही वावगे वागणार नाही.प्लीज,मला तुझ्या आयुष्यात जागा दे."
"राजेश,मी माझे आयुष्यच तुम्हाला बहाल केले होते.परंतु तुम्ही त्याचे मातीमोल केले.आता तुमच्याशिवाय जगणे आयुष्याने स्विकारले आहे."
"रेवा,एकदाच माफ कर.पुन्हा तुला,मुलांना सोडून कधीच जाणार नाही.मी हात जोडतो."
राजेशने हात जोडण्यासाठी रेवाचा हात सोडला.रेवाने राजेशकडे पाहिले आणि म्हणाली,"राजेश, तुम्ही आज दुसऱ्यांदा माझा हात सोडलात.कदाचित हा नियतीचाच निर्णय असावा.तुम्ही माझ्याशी असे का वागलात? हे मी विचारणार नाही.परंतु एक मात्र खरे आहे की,जी व्यक्ती स्वत:च्या जन्मदात्यांना सोडू शकते.तिच्यासमोर माझे काहीच मोल नाही.त्यामुळे मला माझ्या आईला आणि मुलांना स्वबळावर जगण्याची सवय लागली आहे.कृपया तुम्ही त्यात ढवळाढवळ करू नका.आता तुमचे इथे कोणतेही स्थान नाही." एवढे म्हणून पर्स खांद्यावर अडकवून ती आॅफिसला जायला निघाली.बाहेरच सासुबाई उभ्या होत्या.त्यांच्या नजरेतील भाव तिला समजले पण काही न बोलता ती निघून गेली.
संध्याकाळी घरी आल्यावर हातपाय धुवून रेवाने देवाजवळ दिवा लावला.प्रार्थना म्हटली.तेवढ्यात तिथे सासुबाई आल्या.त्यांनी देवापुढील निरांजनाचे ताट उचलले आणि रेवाचे हळदकुंकू लावून औक्षण केले. तिला मायेने कवटाळले.तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या," रेवा,तूच माझे सर्वस्व आहेस.इथून पुढे मी कधीही तुझ्या निर्णयाच्या आड येणार नाही.आज तुझी आई म्हणून मी सर्व भरून पावले.तूच माझी शांतादुर्गा आहेस.जिने स्वत:ची लढाई अगदी शांतपणे लढून विजय प्राप्त केलाय."
रेवा अगदी लहान मुलीसारखी सासुबाईंच्या कुशीत शिरली.दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रूची मुक्त बरसात होत राहिली.
©सौ.गौरी ए.शिरसाट
मुंबई
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें