*निश्चय*
----------------------------------
"मॕडम, ओ मॕडम, हा राजेश हात न धुताच जेवायला बसलाय. राधा आणि आदित्य श्लोक म्हणत नाहीयेत." शाळे च्या मधल्या सुटीत अधूनमधून ऐकू येणारा हा गोड आणि तितकाच आर्जवी स्वर. निकिताची दररोज मध्यंतरात मुले जेवायली बसली कीअशी प्रेमळ तक्रार कानी पडायची. निकिता तिसरीत शिकणारी अतिशय चुणचुणीत मुलगी. अगदी टापटीप व नीटनेटकेपणाने तयार होऊन नियमित शाळेत यायची. मी सांगितलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करायची. दिलेला अभ्यासही व्यवस्थित करायची. खेडेगावातील अतिशय दुर्गम अशा वस्तीशाळेत शिकत असूनही ती शिस्तीत शाळेत येत असे. तिच्याकडे पाहून ही नक्कीच सुशिक्षित व सधन कुटुंबातील असावी असे वाटायचे. पण खरे तर ती एका साध्या मजुरी करणा-या गरीब कुटुंबातील होती. मोलमजूरी करूनसुद्धा निकिताच्या आईला तिला खूप शिकवून मोठे करायचे होते.निकिताची आई सुनीता नेहमी शाळेत यायची, निकिताच्या अभ्यासाबाबत चौकशी करायची. "मॕडम, खूप शिकवणार आहे मी निकिताला. लक्ष द्या बरं का तिच्याकडे." असे शाळेत येऊन सांगत असायची. खेडेगावात राहूनही तिची तळमळ पाहून कौतुक वाटायचे मला. एकदा न राहवून सुनीताला मी विचारलेच, " खूप काळजी घेता तुम्ही निकिताची, अभ्यासही छान घेता तिचा, किती शिक्षण झाले आहे तुमचे?" या माझ्या प्रश्नावर सुनीताने सांगायला सुरुवात केली. "मॕडम, मी नववीपर्यंत शिकले, मला आईवडील नाहीत. मी लहान असतांनाच दोघेही वारलेत. मामाकडे राहून घरकाम व शेतमजूरी करतच शिक्षण घेत होते. अभ्यासातही हुशार होते.पण नववी पास झाले की, मामाने माझे लग्न करून दिले. निकिताचे वडीलसुद्धा मिळेल ते काम करतात, मी पण मजुरी करून कुटुंबास हातभार लावते. दोन मुली आहेत मला. या दोघींना मात्र मला खूप शिकवून मोठे करायचे आहे. कितीही कष्ट करण्याची माझी तयारी आहे." सुनीताचे बोलणे ऐकून मला तिचे कौतुक वाटले आणि परिस्थितीमुळे माणसाला किती संघर्ष करावा लागतो हे पाहून मन विषण्ण झाले.
असेच काही दिवस निघून गेले निकिताला शाळेत सोडायच्या निमित्ताने सुनीता आली. "मॕडम, काही दिवस निकितासोबत धाकट्या अंकितालाही शाळेत पाठवू का? " " ती अंगणवाडीत जाते ना? मग पुढच्या वर्षी घेऊया ना तिचे नाव पहिलीला." मी उत्तरले. " हो. पण एक अडचण होती......!" माझे बाळंतपण जवळ आले आहे. बाळ झाल्यावर थोडे दिवस अंकिताकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून अंगणवाडी संपली की दुपारनंतर निकितासोबत बसू देता का अंकिताला? ती काही त्रास नाही देणार .." मी जरा वैतागूनच होकार दिला. "अहो,पण तिसरे मूल हवे कशाला? सुशिक्षित आहात ना तुम्ही ? " कुटुंब नियोजन आॕपरेशन करायला हवे होते अंकिताच्या पाठीवर." "तुमचे बरोबर आहे मॕडम, माझी तीच इच्छा होती, पण नवरा ऐकायला तयार नव्हता. मुलगा पाहिजेच म्हणून अडून बसल्यामुळे माझा नाइलाज झाला."
खाली मान घालून सुनीता सर्व सांगत होती. "ठीक आहे पाठवत जा अंकिताला". मी होकार दिला आणि कामात व्यस्त झाले. दरम्यान काही दिवसांतच सुनीता बाळंत झाली. अपेक्षेप्रमाणे मुलगा न होता तिसरी मुलगीच झाली. मुलगी झाल्याचे ऐकून सुनीताचा नवरा नाराज झाला.मुलीचे तोंडही पाहिले नाही. सरळ दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसला. रात्रभर घरी आला नाही . शेजा-यांनी सुनीताच्या विनवणीमुळे शोधाशोध केली तर तो एका मोठ्या नाल्यात पडल्याचे दिसले. दारूच्या नशेत नाल्यात पडून तो वारला. सुनीतावर दुःखाचा पहाड कोसळला. हा प्रसंग ऐकूनच सर्वांचा थरकाप उडाला. माझ्या नजरेसमोरून सुनीता, निकीता, अंकीता यांचे आकांत करणारे चेहरे हलत नव्हते. दुर्दैवाची परीसीमा काय असते ते या प्रसंगावरून लक्षात येत होते.
असाच एक महिना निघून गेला. सुनीताचे नातेवाईक आल्या पावलांनी निघून गेले. शाळेतील शिक्षकांनी व आजूबाजुच्या लोकांनी केलेल्या मदतीवर कशीबशी गुजराण चालू होती . एके दिवशी अनपेक्षित पणे सुनीता शाळेत आली. तिचा भकास व शून्यात हरवलेला चेहरा व कृश शरीर पाहून माझ्या मनात कालवाकालव झाली. काय बोलावे हे न सुचून मी स्तब्ध उभी होते. सुनीतानेच बोलायला सुरुवात केली. "मॕडम, एक विचारू का ? "हो, विचारा ना !" मी उत्तरले. उद्यापासून मी शेतावर मजुरीसाठी जाणार आहे. निकीताला सोबत घेऊन जावे लागेल. बाळ थोडे मोठे होईपर्यंत तिला मदतीला न्यावे लागेल मला. पण अंकिताला मात्र बसू द्या शाळेत, वळण लागेल आणि अभ्यासाची सवय लागेल तिला. निकीताचाही अभ्यास मी घेईन घरी दररोज संध्याकाळी. अधूनमधून पाठवेन शाळेत. तेवढे सांभाळून घ्या. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरारले. काय उत्तर द्यावे सुचेना. आवंढा गिळून मी म्हणाले कुठून आणले एवढे बळ? कसे सांभाळणार तीन तुम्ही लेकरांना? त्यावर सुनीता उत्तरली. माझ्या तीनही मुलींना खूप शिकवणार आहे मी. मी अनाथ म्हणून वाढले. पण मुलींना आई व बाप दोघांचे प्रेम देईन खूप शिकवेन. मुलीच झाल्या म्हणजे आभाळ कोसळले असे वाटून माझा जन्माचा साथी संसार अर्ध्यावर सोडून निघून गेलाय. पण मी हिंमत हरणार नाही मॕडम. सर्वांना माझ्या मुलीच कौतुक वाटेल असे घडवेन मी त्यांना. पाहत राहतील सर्वलोक असे वाढवेन माझ्या लेकींना. फक्त खूप शिकवा मॕडम तुम्ही त्यांना असे म्हणत सुनीता निर्धाराने गेली. तिच्या कृश पण दृढनिश्चयी पाठमो-या आकृतीकडे पाहत मी नतमस्तक झाले. सुनीताचे सर्व मनोरथ पूर्ण होवो म्हणून परमेश्वराची मनोमन प्रार्थना केली....
सौ. रूपाली गोजवडकर नांदेड .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें