*कोरोना की करिना!*
नमस्कार! मी भाई! होय! मी भाईच! नाही हो ते सुप्रसिद्ध भाई नाही! पण मी भाईच! आता नावात साधर्म्य असले म्हणून काय मी त्यांची बरोबरी करावी. हां. आता अजून एक समानता आहे. मी पण विनोदी लेखक आहे. फार काही साहित्याची शिदोरी माझ्या खात्यावर नाही. इतके वर्षे लिहितोय पण अजून पूर्णपणे दहा कथाही लिहिलेल्या नाहीत. पाच-सहा कथांच्या जोरावर मी स्वतःची ओळख महाराष्ट्रातील ज्येष्ठ, सुप्रसिद्ध, प्रतिथयश लेखक अशीओळख करुन देतो. असू द्या.
कसे आहे, सध्या घरकोंडीचा काळ असल्याने बाहेर जाता येत नाही त्यामुळे डोक्यावरचे केस वाढलेत. काही काम नाही. दिवाणखान्यातील सोफ्यावर बसून समोरचा टीव्ही सुरू करावा आणि घंटोनघंटे पाहात बसावे. हेच चालू आहे. फारच कंटाळा आला तर अस्वस्थपणे हातातील रिमोटने एकसारख्या वाहिन्या बदलत राहाव्यात. माकडाने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारल्याप्रमाणे! इथूनतिथून सर्व वाहिन्यांवर एकच एक, तीच तीच बातमी असते हो. मग चिडलेल्या अवस्थेत टीव्ही बंद न करता आवाज बंद करावा आणि स्वतःशीच बोलावे,
'बसा आता स्वगत बोंबलत! वीट आणलाय या करोनाने आणि त्याहीपेक्षा तुमच्या बातम्यांनी! तुम्हाला सांगतो, तेच तेच रवंथ पाहूनच या कोरोनाचे रोगी वाढतील हो. बरे, तुम्ही बातम्यात सांगतात त्याप्रमाणे हा आजार एवढा गंभीर आहे ना मग तुम्हाला काही गांभीर्य आहे की नाही? एखाद्या लग्नसमारंभात किंवा एखाद्या सोहळ्यात जावे तसे तुम्ही सारे निवेदक आणि निवेदिका सजून, नटूनथटून आलेल्या असता. कोरोनाच्या बातम्या पहाव्यात की तुमची रंगलेली तोंडं पहावीत?
मला सांगा, या आजाराचे नाव कोरोनाच का? करिना, कुणिका, करिष्मा अशी साधी नावे का नाही ठेवली? या आजाराचा गवगवा सुरू झाल्यापासून आम्ही एक काम केलेय. तुमच्या मनात लगेच आले असेल की, भाईंनी नक्कीच या आजारावर एखादे औषध शोधले असेल पण मी कुठे शास्त्रज्ञ किंवा संशोधक आहे? मी पडलो साहित्यिक आणि त्यातही विनोदी! आपल्याला अंधानुकरण करायची जुनीच खोड आहे. एखाद्या देशाने एखाद्या शोधाला, एखाद्या आजाराला, एवढेच काय पण घोंघावत येणाऱ्या एखाद्या वादळाला नाव दिले की, आपण काहीही विचार न करता तेच नाव स्वीकारतो आणि वापरतो. मी काय म्हणत होतो, तर आम्ही एक काम करीत होतो. या आजाराचे नाव ऐकल्यापासून आमच्या वाचनालयात असतील तेवढे शब्दकोश काढले. एक अख्खा दिवस कोरोनाचा अर्थ शोधण्यात घालवला. आमची लगबग पाहून गृहमंत्री म्हणाले,
"अहो, एवढे मोठ्ठे लेखक आणि एक साधी गोष्ट समजत नाही का? हे नाव इंग्रजी आहे. त्यामुळे मराठी शब्दकोशात ते सापडेल कसे?" हे ऐकून असा झटका बसला म्हणता विचारूच नका. मग काही क्षणात कधीतरी आणून ठेवलेला 'इंग्रजी- मराठी' हा शब्दकोश शोधशोधूनी काढला पण छे! त्यातही कोरोनाला स्थान नव्हते. बसलो आपला कपाळावर हात देऊन. तितक्यात पुन्हा बायकोबाई हजर होत म्हणाल्या,
"अहो, असा 'कोरोना... कोरोना' जप करीत बसू नका. तो कोरोनेश्वर प्रसन्न झाला ना तर घेण्याचे देणे पडायचे. मी म्हणते त्या नावात पडलेच काय असे? या वयात तासनतास त्या डबड्यात फुटेस्तोर डोळे घालून बसता आणि साधं माहिती नाही का, अहो, त्या गुगलमहाराजाची आराधना करा." असे बजावून बायको आत गेली. मी मनाशीच म्हणालो, कारण असे उघडपणे, तोंडावर बोलायची या भाईंची तरी ताकद नाही. 'शहाणीच आहे की बायको!' अर्थात मी हे कौतुकाने म्हणालो पण समोर म्हणालो असतो तर बायकोला यातले कौतुक न जाणवता तो उपहास वाटला असता हो मग घडले असते... 'कोरोना महायुद्ध!'
आम्ही स्वतः दिसायला स्मार्ट नसतानाही घेतलेला स्मार्टफोन उचलला. लगोलग गुगलमहाराजांकडे 'कोरोना' चा अर्थ काय अशी प्रश्नवजा विनंती टाकली. काय आश्चर्य, अहो, एका मिनिटात त्यावर माहिती आली. त्यात एक अर्थ होता, कोरोना... चंद्र-सूर्य यांचे प्रभामंडळ! आम्ही हरखून गेलो. साहित्यिक असल्याने सूर्य-चंद्रावर विशेष प्रेम होते. अनेक कथांमध्ये या दोघांपैकी एक जण आमचा हक्काचा नायक! आम्ही पुटपुटलो, काय कर्मदरिद्री आहेत ही जगातील हुश्शार म्हणवणारी माणसं! अरे, एवढे चांगले नाव उपलब्ध असताना, दोन्ही नावांना एक प्रचंड असे वलय असताना हे फडतूस नाव का दिले बरे? आम्ही विचारात पडलो की, हमखास आमच्या सहाय्याला धावून येणारी बायको न बोलावता हजर झाली. आमचे ऐकून ती तोऱ्यात म्हणाली,
"कोण विचारतो तुमच्या मराठी नावांना? बघा 'चंद्र-सूर्य प्रभा मंडळ' हे लांबलचक नाव आणि दुसरीकडे कोरोना... अहो, शॉर्टकटचा जमाना आहे. कुणाला वेळ आहे?"
मी तिला म्हणालो,
"अजून एक नाव आहे. कोरोना हा शब्द लॅटीन भाषेतून आला आहे. कोरोना म्हणजे 'मुकूट!' किती छान आहे ना..."
"मी म्हणते, अशा राक्षसी आजाराला सूर्य-चंद्र, मुकूट अशी नावे द्यायचीच कशाला? त्याच्या कर्माप्रमाणे साजेसे नाव द्यावे ना?"
"अग, अजून एक अर्थ सापडला आहे, कोरोनाचा?"
"आता अजून कोणता? बाळाच्या बारशाला त्याला पाळण्यातून खालीवर करताना पाच नावे ठेवतात तसा प्रकार करताय. सांगा लवकर, मी भज्याचं पीठ कालवून ठेवलंय..."
"व्वा! व्वा! क्या बात है! अग, तू करीत असलेल्या गरमागरम, स्वादिष्ट भज्याला साजेसे असे नाव कोरोनासाठी सापडले आहे... एका सुप्रसिद्ध बियरचे!"
"जळ्ळलं मेलं लक्षण! काय तो नावाचा शिमगा." असे म्हणत बायको आत गेली तसा मी पुटपुटलो,
'काय पण वेडी माणसं आहेत आजकाल! कोरोना बियर! एवढे चांगले नाव असतानाही... कोरोना या आजाराला 'कोरोना बियर' हे नाव दिले असते ना तर या आजाराला कवटाळायला लाखो लोक स्वखुशीने, कुणाचाही विरोध न करता घराबाहेर पडले असते. केवढा प्रचंड महसूल सरकारला मिळाला असता हो. जाऊ देत. कपाळकरंटी ही माणसं यांना कुठून कसे उत्पन्न मिळवावे हेच कळत नाही..' मी तशा विचारात असताना बायकोचा आवाज आला,
"अहो, भजी तयार आहेत. लवकर या."
'काय पण नशीब आहे, गरमागरम खुसखुशीत भज्यांसोबत 'कोरोना' असती तर? कोरोनाने कवटाळावे असे कुठले आलेय आपले नशीब. आलीया भज्यासी उतरावे गळ्याखाली... आम्ही जातो स्वयंपाक घरात...!'
०००
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमानवाटिका फेज ०१
क्रांतिवीरनगर लेन ०२
हॉटेल जयमल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
संपर्क ९४२३१३९०७१
सुंदर कथा सद्य परिस्थितीतील विषयावर विनोदी मांडणी.
जवाब देंहटाएंया तणावपूर्ण वातावरणाला विनोदाची फोडणी मिळाली.
जवाब देंहटाएंकोरोना बियर छान नाव आहे.