*लघुकथा*..........
*कुटुंबवृक्ष सांभाळणारा पणजोबांचा वाडा*
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
_____________________
वाघ नावाच्या नदीला जाऊन भेटणारी एक मोठी उपनदी आणि त्या नदीच्या परीसरात वसलेलं,पांढऱ्या शुभ्र दगडांच्या फांथरगाव वाटेवरून येणारे गाव *सोगलपूर* हे आईच्या -मामाचं गाव. अलीकडेच उंचवटा समोर आंब्याची राई .मेळात महादेवाचं मंदिर आणि इथूनच उंच वाड्यावर असलेली माझ्या आई-मामाची माडी...तिला आमच्या भाषेत 'वाडा किंवा 'मढी' हा सुद्धा शब्द प्रचलित होता.. या माडीनं आजपर्यंत खूप मोठा कुटुंब वृक्ष पोसलेला होता...
अलिकडून फारच उंचवटा पायऱ्या चढून जाऊन उजव्या बाजूला वळायचं आणि पुन्हा उजव्या बाजूला वळून अगदी महाराजांच्या प्रवेशद्वारासारखं न दिसणारं प्रवेशद्वार म्हणजे मोठा दरवाजा.. या दरवाजाला मुख्य दरवाजा म्हटलं जायचं... घरात एकदा प्रवेश केल्यावर फारसं बाहेर पडायची गरजच नव्हती. आतंच समोर-मागे मोठा आंगण , स्नानगृह,जवळच मोठ्ठा तांब्या,ज्यात घरातील सर्वासाठी पाणी व्हायचं गरम, स्वयंपाक, झोपायची खोली, माजघर, देवघर, जशे रेल्वे खालील पुल अगदी तसेच आजची एसी सारखे गार ढोले ,आणखी वरती मोठमोठे धान्याचे कोठार , वरून जिना चढून जायचं आणि धान्य कोठारात लपंडाव खेळायचं .
ही निखळ ढवळ्या मातीपासून बांधलेली (वाडा) म्हणजे अनेक पिढ्यांचा इतिहास व अनेक गोतावलळयांना सांभाळणारी इमारत उभी होती. यामध्ये राहणारं सर्वात मोठ्या मनाचं पात्र म्हणजे आमचे पणजोबा, आईची आजी .खूपच गोरीपान,मायाळू,आणि तेवढीच तरतरीत होती पणजी,..आईची मामी आमची आजी .खुप मोठ्या मनाची. कारभार पाहणारे कारभारी म्हणजे मोठे आजोबा, शेतातील आणि इतर कामांची सर्व जबाबदारी सांभाळणारे मधले मामा आम्हा सर्वाचे आवडते रेवामामा.खुप हूशार तल्लख बुद्धीचे .ह्यांचाकडे बाजारहाट,पाहूण्या पासून घरचे सर्व यांच्यासाठी खरेदीचे काम, आणि तेराव्याचा कार्यक्रम, लग्न ,बारसं हे सगळं रेवामामाच्यांकडेच !. आमच्या आठ मामांनी सुध्दा त्यांच्या परंपरागत आलेल्या जबाबदाऱ्या अगदी चोखपणे पार पडायच्या.... आम्ही भाऊ बहिणी -लहानमोठे खेळगडी... कोणताही खेळ खेळायचा म्हटलं तर दोन गट सहजच घरातच तयार व्हायचे..
आम्हा सर्व भावंडाना सख्खे आणि चुलत हे कधी कळालंच नाही...कारण माझे बाबा(दादाजी) तिथले आवडते भांचेजावई.त्यांचा खुपखुप मान व्हायचा .आणि दादाजी व रेवामामा जणू जिवलग मित्रच.मग काय नवी पर्वणीच. आमच्या सर्वांसाठी खाऊ आणायचं काम रेवा मामांकडे होतं आणि मोठी थैली भरून आणलेला खाऊ असो की पिकलेले टुमदार पिवळेधम्मक आंबे वा डमडमणीत टाकून आणलेले हिरवेकंच पण अतिशय गोड असे टरबुजं असो ...अगदीच भरपेट मिळाल्याचं समाधान आम्हा प्रत्येकाला असायचं.... त्यामुळेच आम्हाला आपलं आणि परकं कधी कळलंच नाही....
आई- मामीन दररोज दह्याचं घुसळण करायला बसल्या की, मी अगदी मामीजवळच बसायची ... लोणी हा माझा फार आवडता एटमच होता.. वाट्टेल तेव्हढं ताक, हवं तेव्हढं काश्याचा वाट्याभर दही ,ताटभर शेवया-आंब्याचा रस,सगळं काही भरपेट....खाण्याची चंगळच असायची ...दररोजच पंगत...
कपड्यांचं तर न सांगितलेलंच बरं... कोणीही आणि कोणाचेही कपडे घालायची मुभा असायची, त्यामुळे अनेक कपड्यांचा आस्वाद घ्यायला मिळायचा. उन्हाळ्याची मज्जा तर विचारूच नका.... संध्याकाळी झोपायला उन्हाळ्यात फारच मज्जा ! पांढऱ्या शुभ्र आसमंताखाली सडा-सारवण असलेल्या मोठ्या आंगणात ,दोरीच्या खाटांवर पांढऱ्या शुभ्र वाखरांवर ,थंडगार झाडांपानांच्या हवेत काय तो गारवा ! मधातच एखादा पडल्याच.. आवाज आला की लागलीच आंबा पडला म्हणून धावणे, शुद्ध हवा !निराळेच!तारे मोजण्याची मज्जा !फक्त बच्चेकंपनी आपापल्या आईंकडे जायची .. सगळं काही आनंदाचं ... कोणी गोष्ट सांगायची किंवा कोणी कहाण्या, कोडे सांगायचे, कोणी दिवसभरातील गप्पागोष्टी नाहीतर चिंचोक्याचा बियां सोबत चंगा-पो ...काय सांगायच्या...कधी कधी मोठंयाचे,आणि बाबांचे पाय चेपायची मजा ...म्हणजे एका झाडावर दहा वानरं उडया मारल्यासारखी मजा असायची....
कधी सासू सुनाचं भांडण नाही की कधी रुसवा नाही...अशी मज्जा . आमच्या आई -मामांचा वाडा म्हणजे मोठा कुटुंब वृक्षच होता... दिवाळीच्या सुटीत आणि पूर्ण उन्हाळ्यात आम्हाला अश्याच मोठ्या कुटुंबात राहायचा योग आलाय ....हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल.....
एकत्र कुटुंब पद्धतीचा वटवृक्ष माझ्या मामांकडे बघायला मिळायचा. देवपूजा, सांजवात, व्यायाम, खेळ, गप्पागोष्टी आणि नात्यांची वीण आणि संस्काराची शिदोरीच जणू इथे होती. आलेल्या पाहुण्यांसाठी केलेला पाहुणचार कुणीकडे व्हायचा हे कोणाचं कोणालाच कळायचं नाही....आणि त्यातल्या त्यात ...गाईला नैवद्य, कुत्र्याला भाकरी, सालदाराला म्हणजे काम करणाऱ्या गड्याला दररोज जेवण-भाकरी ...जणू काही तो सुद्धा आमच्याच कुटुंबाचा भाग असायचा.....
पण आमचे पणजोबा स्वर्गवासी झाले आणि तसेच आणि या वाड्याला खिंडार पडलं...गोठ्यात गणना करता न येऊ शकणारे गाई-म्हशी जणू त्यासोबतच जायला लागले आणि बोटावर मोजण्या इतपत राहिले.
नव्याने सगळया गावात आलेली विभक्त कुटुंब पद्धतीची प्रथा आता या माडीला सुद्धा गिळायला लागली होती....आणि घरात कुजबुज सुरू होऊन ....वेगळवेगळ राहण्याची तय्यारी झाली....आणि काही दिवसातच हा कुटुंब वृक्ष वेगवेगळ्या फांद्यांमध्ये दुभंगला.…..
ज्याने त्याने आता स्वतःच छोटं -मोठ्ठसं टुमदार घर बांधलय... जशी घरे विखुरली तशीच आता सगळ्यांची मने सुद्धा विखुरल्या सारखीच झाली...
एकेकाळी सहजपणे चार दोन पाहुणे वेळेवर जरी आली तरी जेवून जायची इतका स्वयंपाक असायचा . त्या ठिकाणी आता..... दिसतंय....
आता एकत्र गप्पा बंद पडून घरात टीव्हीवर बोलणारीच माणसे दिसतात आणि आता प्रत्येकजण मोबाईलवर गुंतलेला दिसतोय.…..
या छोट्याश्या घरांच्या भिंतीला सारवायची गरज नाही पण माडीमध्ये असलेला प्रेमाचा ओलावा सुद्धा या घरात बघायला सुद्धा मिळणे अशक्यच ....
हम दो आणि हमारे दो अश्या अविर्भावात राहणारी ही विभक्त कुटुंबे बघून सगळ्या कुटुंबाचा वटवृक्ष सांभाळणारा वाडा-मढी मात्र आजही रडतांना दिसते.... ...
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
-----------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें