लघुकथा :- आदर्शांची मूर्ती
https://drive.google.com/file/d/13fyNCpVZijVH9gzz-4-2SIwbDGdqvPRZ/view?usp=drivesdk
लॉकडाऊनच्या स्तब्ध वातावरणात आज विविध स्तरावर जीवनाच्या विविध पैलूंचं दर्शन आपल्याला होतंय. एकीकडे भाकरीचं स्वप्न उराशी बाळगून झोपी जाणारे देह, शेवटी भाकरीच्याच मूक साक्षीने निष्प्राण झालेत, तर एकीकडे 'कोरोना' ऐवजी 'किराणा' संपवण्याची वृत्ती काही कुटुंब आवरू शकत नाहीयेत. अशाच एका कुटुंबातील एका गृहिणीची कथा मी तुमच्यासमोर आज मांडत आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे सगळे घरीच असतात एरवी, म्हणून सगळेच लोळत पडतात सकाळी मनसोक्त. पण समिधाची धांदल मात्र कायम तशीच अगदी. आजही ती सकाळी उठली पहाटेची कामे चालू होती. आणि नंतर सुमित उठला, सुमित तिचा नवरा. एव्हाना समिधा स्नान वगैरे करून सगळ्यांच्या नाश्त्याच्या तयारीला लागली होती. सुमित उठला फ्रेश झाला. आणि समिधाने प्रसन्नवदनाने त्याच्या पुढ्यात चहा ठेवला. सुमित आपल्याच मोबाईल मध्ये मग्न झाला. आणि "उद्यापासून साखर कमी घाला चहात" अशी सूचना केली. समिधा आपल्या कामात पुन्हा गढून गेली. आता दोन्ही मुली उठल्या. दोन वर्षांच्या असणाऱ्या दोन जुळ्या मुली सिया आणि रिया. दोघींचा ब्रश वगैरे समिधाने करवून घेतला. एवढ्यात तिला गॅसवर ठेवलेल्या दुधाची आठवण झाली; लगेचच किचन मध्ये येऊन तिने दूध वाचवलं. आणि मुलींसाठी बोर्नव्हीटा घालून दुधाचे दोन कप तयार करून ठेवले. सासूबाईंच्या पायात आज सकाळपासून फार दुखतंय..... त्यांना काही हवंय का तिकडेच म्हणून एकदा विचारून घ्यावं म्हणून ती पोर्चमध्ये बसलेल्या सासूबाईंना विचारायला गेली. तर तिने काही विचारायच्या आधीच सासूबाई बोलल्या, "केव्हाची वाट बघतेय तुझी. तुझ्या हाताजवळ माझ्या पानाची टोपली असेल दे तेवढी." तिने सासूबाईंना सांगितले आई नाश्ता तयार आहे. आधी खाऊन घ्या थोडं, नंतर पान खा. त्यावर सासूबाईंचं उत्तर -, "आता काय जेवणाचीच वेळ होईल एवढ्यात." तेवढयात आतून काहीतरी फुटल्याचा आवाज आला. ती धावतच आत गेली तर सियाने म्याऊ दूध नाही पिली म्हणून कप फेकून दिलेला. तिने सियाला समजावून सांगितले आणि सांडलेले दूध आणि फुलटलेल्या कपाचे तुकडे साफ केले. तुकडे साफ करता करता एक अणकुचीदार तुकडा खसकन तिच्या बोटात खुपसला. तो बाहेर काढताच. त्यातून भळाभळा रक्त वाहायला लागलं. आईच्या हाताला रक्त बघून दोघी पण मुली घाबरल्या आणि निमुटपणे दूध पिऊन टाकलं. समिधाने पोरींना शाबासकी दिली आणि नाश्त्याच्या प्लेट्स तयार केल्या. सासू सासऱ्यांना आधी पाणी आणि नाश्ता नेऊन दिला आणि नंतर सुमितला. सुमित सोफ्यावर पाय ताणून बसला होता तिने प्लेट ठेवली आणि सुमित गरजला, "आठवड्यातून तीनदा उपमा करायचं तू काय व्रत घेतलंस का गं?" समिधा बोलली, "उद्या मटकी करेल. ओके?"
समिधा परत आपल्या कामाला लागली. हाताला लागले असल्यामुळे कणिक नीट मळता येईना. पण कसंबसं निभावलं. आणि स्वयंपाक तयार झाला.. मध्येच दोन्ही लहानग्या आईजवळ बसून स्वयंपाक करायची ईच्छा व्यक्त करीत होत्या तर कधी मध्येच भांडत होत्या. त्यांना सांभाळत तिची सगळी कामे तिने आटोपली आणि ताट वाढणार एवढ्यात दरवाज्याची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर एक 22 -23 वर्षे वयाची उत्साही आणि चैतन्याने भरलेला चेहरा असलेली मुलगी उभी होती. तिने तिला हसतमुखाने आत बोलावले आणि अनोळखी होती कारण तोंडाला मास्क लावलेले होते म्हणून तिची चौकशी केली. एव्हाना पाय दुखत असणाऱ्या सासूबाई, टीव्ही मध्ये गुंतलेला नवरा आणि न बोलता सगळं पाहत असलेले सासरे दरवाज्याजवळ आलेही होते. क्षणभर समिधा गोंधळली पण सवयीचं झालं होत हे सगळं त्यामुळे सावरली. आता सगळे आलेत म्हटल्यावर तिचं आतिथ्य हे लोक व्यवस्थित करतील म्हणून समिधा पाणी आणायला आत जायला निघाली तोच त्या मुलीने आवाज दिला, "समिधा मॅडम, मी तुम्हालाच भेटायला आलेय. " समिधाला आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की ही अनोळखी मुलगी कोण? जी समिधाला नावासहित ओळखते. समिधाच्या नजरेतील प्रश्नचिन्ह तिने ओळखलं आणि समिधाच्या प्रथम पाया पडली. समिधाला काहीच कळत नव्हतं.
नंतर तिने हात न मिळवता मन मिळवून समिधाचं अभिनंदन केलं. समिधाने तिला एकाच वेळी तिच्या मनात उठलेले सगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावर ती म्हणाली, "मॅडम, मी श्रिया, बारावीला असतांना तुमच्याकडून इंग्लिश शिकले.तुमच्या लग्नाआधी. तेव्हा तुम्ही आम्हांला फक्त एक भाषा नाही शिकवलीत तर जगण्याची भाषा शिकवलीत." श्रिया म्हणताच समिधाच्या चेहऱ्यावर आपुलकीचे आणि आनंदाचे भाव झळकू लागले. तिने अतिशय आप्ततेने तिला आत यायला सांगितले. आत आल्यांनतर श्रिया पुढे बोलू लागली. "मॅडम, तुमच्यामुळेच आज मी माझ्या आयुष्याचा सदुपयोग करून घेत आहे. याची मुख्य प्रेरणा तुम्हीच आहात. त्यावर सासूबाईंनी त्यांच्या ठेक्यात विचारलं, "असं कोणतं महत्कार्य करता आपण? " त्यावर ती म्हणाली, " मॅडम मी एकदा बारावी च्या सुट्ट्यांमध्ये आजोबांसोबत माझ्या वाढदिवशी एका अनाथालयात गेले. त्या मुलांशी बोलले. तुम्ही जसं सांगत होत्या की इतरांची दुःखे आपल्याला आपली वाटावीत इतकी समजून घेता आली तर बघावं. मी पण तेच केलं. आणि मला त्यांचं दुःख नंतर दिवसरात्र अस्वस्थ करत राहिलं. मी नंतर सिनियर कॉलेजला गेले, तेव्हा मला त्या अनाथालयासाठी काहीतरी करावंस वाटत होतं. म्हणून मी तुम्हाला भेटायचं ठरवलं पण तुमचं लग्न झालंय असं तेव्हा कळलं. तुम्ही भेटल्या नाहीत. तुमचा नवीन कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे नव्हता ; पण तुमचे विचार मात्र माझ्या नसानसात भिनले होते. मग मी पार्टटाइम जॉब शोधला. माझ्या परीने मी जेवढं होईल तेवढं त्या मुलांसाठी करते आणि माझ्या भोवती असणाऱ्या संवेदनशील माणसांना सुद्धा त्यांना मदत करण्यास प्रोत्साहित करते." श्रियाचं सगळं बोलणं ऐकून समिधाला अतिशय आनंद झाला.
श्रिया पुढे बोलू लागली, "मॅडम, माझी त्या मुलांविषयीची तळमळ पाहून अनाथालयाच्या संचालकांनी मला तिथलं सदस्यत्व दिलं. आज संचालकांनी मला सांगितलं की "अखिल महाराष्ट्र अनाथ आधार मंचा"कडून समिधा सुभेदार यांची निवड निःस्वार्थ सेवक म्हणून करण्यात आलेली आहे." सगळे आश्चर्यचकित झाले. आणि समिधाच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. श्रियाच्या टिपक नजरेतून ते सुटलं नाही. ती पुढे बोलू लागली, " मॅडम, आज नथीचा नखरा करून मीडियावर मिरवणाऱ्या सगळ्या बायकांना तुम्ही एक वेगळा आदर्श घालून दिलाय. तुम्ही जरी हे सगळं गुप्त पद्धतीने करीत होत्या तरी संस्थेला तुमच्या या कार्याचं एवढं कौतुक वाटलं की त्यांनी तुमची संपूर्ण माहिती काढली आणि नावासाठी मदतकार्य करणाऱ्या लोकांना या आदर्शाच्या मूर्तीची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला. " यावर सगळेजण आश्चर्यचकित झाले. आणि श्रियाला कुतूहलाने समिधाच्या कार्याविषयी विचारू लागले. समिधाने आजवर स्वतःच्या घरखर्चातून पैसे वाचवले होते, त्यातून ती दरवर्षी संस्थेतील मुलांसाठी झाली तेवढी पुस्तकं खरेदी करत होती. घरची कामे विनातक्रार लवकर पार पाडून शिलाईमशीनवर बसून गरजू मुलींसाठी ड्रेस शिवायची. स्वतःचा जॉब सांभाळून संस्थेतील मुलांना मोफत शिकवणी वर्ग उपलब्ध करून देत होती, हे सगळं कुठलाही मोबदला न घेता आणि वरून तिची ईच्छा एकच की या कार्याबद्दल कोणी कुठे एक अवाक्षर सुद्धा काढू नये.
सध्या बायकांचे वेगवेगळे ट्रेंड्स सोशल मीडिया वर चालू असताना या गृहिणीने अनाथ मुलांच्या भविष्याचा विचार करावा, त्यांना मोफत मास्क तसेच त्यांच्या जेवणासाठी स्वतःकडून झाली तेवढी मदत करण्याचा तिचा कायम प्रयत्न होता आणि तो प्रयत्न देखील इतका निरपेक्ष ही खरोखर अभिमानाची गोष्ट होती. आता मात्र सुमितच्या डोळ्यात एका वेगळीच चमक दिसू लागली. त्याने समिधाला विचारले, "तू कुठल्या मातीची बनली आहेस गं? मी कितीतरी वेळा तुला रागावतो, बरेचदा तू भान्डावीस माझ्याशी असं देखील वाटतं मला. पण इतकी शांत कशी तू? तुला माझ्या किंबहुना आमच्या सगळ्यांच्या वागण्याने दुःख नाही का गं होतं कधी? " समिधा अतिशय शांतपणे उत्तरली माझं सुख-दुःख मी कधीच कुणावर विसंबून ठेवत नाही. तिच्या सासूने विचारलं, " तू एवढी सुशिक्षित आणि चुणचुणीत मुलगी, पण नकळत माझ्या हातून तुझ्यावर अन्याय झाला, पण तू तो का सहन केलास? " समिधाने अतिशय सुंदर उत्तर दिलं,"आई, माझ्यावर अन्याय वगैरे झाला असं मला नाही वाटत. मला त्या गोष्टींसाठी कधी वेळच मिळाला नाही. त्यामुळे अन्याय वगैरे सहन करायची वेळच माझ्यावर आली नाही ;किंबहुना मीच येऊ दिली नाही. ज्यांच्यावर जीवनानेच अन्याय केलाय अशा निरागस लेकरांचे चेहरे मला जास्त अस्वस्थ करून जात होते......."
सगळेजण अभिमानाने समिधाकडे बघत होते, तिच्या दोन्ही मुली येऊन तीला बिलगल्या. आणि रिया आईच्या कापलेल्या बोटावर फुंकर घालू लागली तर सिया आईच्या डोळ्यातले आनंदाश्रू आपल्या नाजूक बोटानी टिपायला लागली........
श्वेता अंबाडकर
कविठा बु ||
ambadkarshweta@gmail.com
कथा खूप छान आहे सुमिधा सुमेधा ची किंमत घरच्या लोकांना किती उशिरा समजले सुमित देखील तिला टाळत होता काहीही बोलत होता कथा शैली खूप छान मांडली आहे. आशयाची मांडणी पण खूप छान आहे. सासू-सासर्यांना ही तिची किंमत कळली. श्रेया ही मुलगी आल्यामुळे सगळ्यांचे मत परिवर्तन झाले
जवाब देंहटाएंसुंदर लेख!आयुष्यात केलेली सर्व चांगली कामं अशी पावती केव्हांतरी नक्की देतात हे कथेतून दाखवून दिलय!मनापासून अभिनंदन
जवाब देंहटाएंकथानक खुपच सुंदर..
जवाब देंहटाएं