सोमवार, 29 जून 2020

9 शुभांगी पवार

👦👧बालकथा(आत्मिक समाधान)👧👦

"राघव आणि रहीम दोघे खूप जीवाभावाचे मित्र होते.शाळेत जाणे,अभ्यास करणे,एकत्र खेळणे, कोडी सोडवणे,नदीत सूर मारणे,घरात आईला मदत करणे अशी कामे ती मनापासून करत.गावात तर त्यांच्या मैत्रीची सदैव चर्चा असायची.खरच खूप गोड स्वभावाची मुलं होती ती,कोणाच्याही मदतीला लगेच धावून जायची व मदत करायची.सगळ्या कार्यक्रमात,उपक्रमात ती सहभागी असायची.
                  एकदा काय झाले,शाळेत दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली होती.सगळी मुले आपापले डबे घेऊन जेवायला मोठा गोल करून बसली होती,पण,राघव व रहीमच्या वर्गातील बबन मात्र एकटाच त्यात सामील न होता बुजून आंब्याच्या झाडामागे बसला होता.हे राघव व रहीमने पाहिले.बबन हा त्यांचा वर्गमित्र होता.तो कधीही जास्त बोलायचा नाही .नेहमी गप्प गप्प राहायचा.तो या वर्षी नवीनच त्यांच्या शाळेत दाखल झाला होता,त्यामुळे त्याच्या विषयी कोणालाच काही ठाऊक नव्हते. 
            मात्र त्याचे रोजचेच असे जेवणाच्या सुट्टीत गायब होणे राघव व रहीमच्या नजरेतून सुटले नाही दोघांनी आज त्याला गाठलेच.बबन त्या दोघांना अचानक समोर पाहून चांगलाच घाबरला. पण,राघव म्हणाला,"अरे बबन ,तू जेवायला येतोय ना चल लवकर आम्ही सगळे थांबलोय तुझ्यासाठी आणि तू इथे येऊन बसला आहेस."यावर बबन खूपच रडवेला चेहरा करून म्हणाला ,"मला भूक नाही आहे,तुम्ही सगळे जेवा."अरे अशी कशी भूक नाही तुला?रहीम म्हणाला.रोजच तू जेवायला येत नाहीस.आज तू आमच्यासोबत जेवायचेच.
                यावर बबन ओक्साबोक्शी रडू लागला व म्हणाला,मी खूप गरीब आहे माझे आईबाबा मजुरी करायला जातात.रोज डबा आणणे मला जमत नाही.त्यामुळे मी रोज जेवणाच्या सुट्टीत या झाडामागे लपून बसतो.सगळ्यांचे डबे खाऊन झाले की,हळूच पाण्याच्या टाकीवर जाऊन पाणी पिऊन माझी भूक भागवतो आणि मग वर्गात येऊन बसतो.मला तुम्ही सगळे हसाल, माझ्या गरिबीची थट्टा कराल म्हणून मी कोणाला माझ्याविषयी काही सांगत नाही व कोणाशी बोलतही नाही.असे म्हणून बबन खूपच रडू लागला.त्याचे हे बोलणे ऐकून राघव व रहीम चे डोळेही पाणावले.रहीम म्हणाला,"अरे बबन फक्त एव्हढेच ना,सांगायचं तरी आम्हाला तुही आमचा मित्रच आहेस".तू पहिला जेवायला चल.कोणीही तुला रागावणार नाही की तुझ्यावर कोणी हसणार नाही.
                 राघव व रहीमने मनोमन ठरवले होते की उद्यापासून एक पोळी जास्त आणायची आपल्या नव्या मित्रासाठी.सगळे जेवायला बसले. बबनच्या चेहऱ्यावर खुप आनंद होता एवढे चांगले मित्र मिळाले ह्याचा आणि दुसरीकडे राघव व रहीमलाही आनंद झाला होता,नवा मित्र मिळाल्याची व त्याची गरज ओळखून त्यावर उपाय शोधल्याचा.
                   हेच असते "आत्मिक समाधान",जे दुसऱ्याच्या आनंदात त्याच्या गरजेत शोधलं ह्या तीनही मित्रांनी.आपण सुध्दा असेच वागूया. स्वतःच्या आनंदासोबत दुसऱ्याच सुध्दा मन जाणूया.

😊✍शुभांगी विलास पवार(कंदी पेढा)सातारा

1 टिप्पणी:

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...