सत्यमेव जयते हेआम्ही राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले आहे .हे वाक्य देवनागरी लिपीमध्ये लिहिले आहे. चलनी नोटांवर आढळते. तसेच सर्व शासकीय कागदपत्रांवर ही आढळते.
सत्यमेव जयते या वाक्याचा अर्थ होतो सत्याचा शेवटी जय , विजय होतो.
सत्य शब्दाला अनेक अर्थ आहेत. याविषयी अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केले जाते. त्यावेळी सत्य म्हणजे वास्तव शब्दाचे भाषांतर असते. सत्य वापरले जाते तेव्हा त्याचा अर्थ प्रामाणिकपणा ,सत्यवादी, ज्ञानमीमांसा सत्य आणि असत्य हे जाणिवेचे किंवा विधानाचे गुणधर्म असतात. कोणतेही वास्तव याची आपल्याला होणारी जाणीव या मतानुसार असते. तसेच आलेल्या अन्य जानिवाचाही संवाद साधता येतो, तर ती जाणीव सत्य आहे याचा अर्थ आहे प्रमाणभूत आहे. असे आपण मानतो. तसेच ती जाणीव ज्या विधानातून व्यक्त केली जाते ते विधान ही सत्य यथार्थ प्रमाणभूत ठरवितो.याउलट एखादी जाणीव वास्तवावर नसल्यास ती बाद ठरवित असतो.
सत्य आहे म्हणजे नेमके काय आहे ?कुठे आहे ?हे ठरविण्याची निकष कोणते? या प्रश्नांची चर्चा तत्वज्ञानाच्या ज्ञानमिमांसा या शाखेतून केली जाते . भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत हे प्रश्न प्रमाणशास्त्राच्या कक्षेत येतात .
*सत्यतेचा अर्थ व निकष पूर्वीपासून जे सिद्धार्थ रचले गेले आहेत .त्यात दोन महत्त्वाचे सिद्धांत आहेत. 1) सत्यविषयक सुसंवाद सिद्धांत 2) सत्यविषयक अन्वय सिद्धांत .सुसंवाद सिद्धांतानुसार असे म्हणले जाते की, एखादे विधान सत्य असते .तरीही ते एकटेच सत्य नसते.तर इतरही सत्य विधाने असतात. ज्यांचाशी ते सुसंवादी असतात .परंपरावादी विधानाची एक प्रणाली असते व त्या प्रणालीचा भाग असल्यामुळे ते विधाने सत्य असतात .
सत्य विधाने हे परस्पर संवादावर आधारलेले असते. वास्तवाशी सांगड असलीच पाहिजे .असे नाही या क्षेत्रांना सुद्धा सत्य म्हणून स्वीकारताना प्रस्थापित सिद्धांत सुसंवादी आहे किंवा नाही ते पाहिले जाते.
रामदास असोत की तुकाराम संतांनी एकमुखाने सत्याची महती गायिली आहे .एवढेच नव्हे तर.प्रत्येक धर्मात सत्याचे गोडवे गायलेले दिसतील. सर्वच विधी आणि न्याय व्यवस्था आज सुद्धा नागरिकांकडून सत्य वर्तनाची अपेक्षा ठेवतात.
सत्य हा शब्द सत पासून बनला आहे. चांगले सदाचरण या शब्दात सत अधिक आचरण असे दोन शब्द असून त्याचा अर्थ चांगले वर्तन असे होतो.
महाभारतातील युधिष्ठिराच्या गोष्टीत त्यांची नेमकी व्याख्या सापडते .युधिष्ठिराला नेमके माहीत होते- अश्वत्थामा नावाचा हाथी मारला गेला आहे. द्रोणाचार्यांचा मुलगा नाही. त्याने द्रोणाचार्यांच्या प्रश्नावर ,"हो अश्वत्थामा मेला हे खरे आहे "असे म्हटले आणि मग द्रोणाचार्यांना ऐकू न जाईल अशा आवाजात पुटपुटला ."माणूस की हत्ती माहित नाही. नरो वा कुंजरो वा .इथे त्याने सत्याची पूरी वाट लावली .द्रोणाचार्यांच्या युधिष्ठिराचा सत्य प्रिय ते वर पूर्ण विश्वास होता. आणि तो फसला .
अनेक जन सत्याचा वापर हित पाहून करावा असे म्हणतात. म्हणजेच आपले हित साधत असले तर खोटे बोलण्यास हरकत नाही ."अशाच सोयीचा सत्तेवर माझ्या बिलकुल विश्वास नाही. खरे बोलणे तेच योग्य आहे .तेच सत्य आहे .
असे म्हणतात ,खरे बोलण्याचा एक फायदा असतो. आपण काल काय बोललो होतो हे लक्षात ठेवायची गरज लागत नाही.! त्याच त्या विचारात गुंतुन राहण्याची आवश्यकता पडत नाही. पण तरीही सत्याचा आग्रह किती धरावा !हा ही विवेकाची भाग आहे .विवेकशक्ती ही माणसाला मिळालेली मोठी देणगी आहे. तिचा त्याग केला तर सावरकरांच्या भाषेत सद्गुणाचे रूपांतर -विकृतीतहोणे अवश्य व्हायची!यात तीळ मात्र शंका नाही .म्हणून सत्याचा आग्रह धरा.
आजची परिस्थिती बघता मानवी वृत्ती ही लोभी,स्वार्थी झालेली आहे.माणूस माणसापासून दूर जात आहे आणि माणुसकी जपण्याऐवजी हरवत जात आहे.जीवन जगत असतांना आपला स्वार्थ हेतू साधून मनुष्याने खोटं बोलणे सुरू केले आहे पण खोटे अधिक काळ टिकू शकत नाही.आपण शिकत असतांना एक सुविचार नेहमी ऐकत,बोलत,शिकत होतो.'नेहमी खरे बोलावे' पण हा सुविचार माझ्या मते,योग्य वाटत नाही कारण मानवाने 'परिस्थितीनुरूप खरे किंवा खोटे बोलावे'.आपल्या एकाच्या खोटे बोलण्यामुळे त्याचा जीव वाचत असेल तर खोटे बोलायला काहीही हरकत नाही पण असं न होता स्वार्थ साधण्याकरिता नेहमी खोटे बोलते उचित होणार नाही म्हणून आपल्याला तेथील परिस्थिती बघून खरे किंवा खोटे बोलावे.आपल्या भारत देशाचे वचन देखील 'सत्यमेव जयते' हाच आहे याचा अर्थ असा आहे की,नेहमी सत्याचाच विजय होतो.
स्वतः वास्तविक जीवनात जीवन व्यतीत करीत असतांना बघत असतो.खून,चोरी,दरोडे,गुन्हेगारी यामध्ये पोलीस विभागात सदैव चोर हा अगोदर खोटेच बोलत असतो पण नंतर सत्य बोलत असतोच म्हणजे नेहमीच सत्याचाच विजय होतो व सत्य हे अंतिम आहे.प्रत्येक चित्रपटात देखील खलनायकाची भूमिका करणारा व्यक्ती दुसऱ्याला खोटे बोलण्यास प्रोत्साहन देत असतो पण शेवटी नायकाला सत्य माहीत पडल्यावर मात्र नक्कीच विजय होतो आणि सर्वाधिक खोटे बोलण्याचा प्रसंग व घटना न्याय विभागात घडत असतात.न्यायालयात वकील कधी सत्याच्या बाजूने तर कधी असत्याच्या बाजूने आपला न्याय मांडत असतो.वकील खऱ्याची खोटं तर खोट्याचं खरं करण्याचा प्रयत्न करीत असतो पण विलंबाने का होईना सत्याचाच विजय होतो.म.गांधी यांनी 'माझे सत्याचे प्रयोग'या त्यांच्या आत्मचरित्रात सत्याची बाजू मांडलेली आहे.'सावधान इंडिया' यात नवनवीन वास्तवात असलेल्या कथा सांगून जनतेला सावधानता बाळगण्यास सांगत असतोच.या अनेक अशा कथांमधून बघितल्यावर लक्षात येते की,सत्याचाच अंतिम विजय होत असतो.
'सत्य नेहमी कटू असते' असं नेहमीच बोलत असतो.जर सत्य सांगितलं तर मित्र,नातेवाईक,समाज यांचा माझ्याशी असलेला संबंध तुटेल या भीतीने सत्य सांगण्यात कचरत असतो.अनेकदा आपल्या संसारात आपण पत्नीला पुष्कळ बाबीविषयी खोटे बोलत असतो पण ज्या वेळी वेळ येते त्यावेळी सत्य तिच्या लक्षात आलेच की,तिचा आपल्यावर असलेला विश्वास उडून जातो आणि संसारात दरी निर्माण होण्याला या खोटे बोलण्याच्या प्रवृत्ती ही कारणीभूत ठरू शकते म्हणून सातत्याने परिस्थितीनुरूप सत्य बोलावे.आपल्या आजूबाजूला तरुण-तरुणी प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी खोटे बोलतात म्हणजेच खोटं हे क्षणापूरतेच आत्मिक समाधान होते पण दीर्घकाळ टिकत नाही म्हणून सदैव सत्याची कास धरून जीवनात यशस्वी व्हावे.
लहानपणापासून आपणाला एक धडा वारंवार शिकविला जातो ते म्हणजे नेहमी खरे बोलावे, खोटे कधी बोलू नये. शाळेत जाण्यापूर्वी घरात आई-वडील, भाऊ-बहिण यांच्याकडून नेहमीच खरे बोला याची शिकवण घेऊन आपण जसे ही शाळेत जातो तेथे शिक्षक ही आपणाला तेच धडा शिकवितात. खरोखरच खरे बोलणे एवढे महत्वाचे आहे काय ? निश्चितच त्याचे उत्तर होय आहे. एक खोटे (असत्य) लपविण्यासाठी हजारदा खोटे बोलावे लागते. तेंव्हा सत्य बोलण्याची सवय ठेवा म्हणजे कसलीही चिंता करावी लागणार नाही आणि आपण काय बोललो हे लक्षात ही ठेवावे लागणार नाही, असे आर्य चाणक्यानी आपणाला फार पूर्वी उपदेश दिलेला आहे. शाळेत असताना आपणाला याचा वारंवार अनुभव आलेला असेलच. शाळेला यायला उशीर का झाला ? गृहपाठाची वही का आणली नाही ? यासारख्या प्रश्नांची खरी उत्तरे दिल्यास आपणाला कशाची ही भीती वाटत नाही मात्र त्याची खोटी उत्तरे दिली तर आपल्याला नेहमी काळजी लागून राहते की, माझा खोटेपणा उघडे तर पडणार नाही ना ! अशी शंका नेहमी मनात राहत होती. खोटे बोलणाऱ्याची स्थिती चोरांच्या मनात चांदणे या म्हणीप्रमाणे असते. कधी कधी आपली खोटे बोलणे पकडल्या गेली की, खुप वाईट वाटते. खोटे बोललेले दीर्घकाळ टिकून राहत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. एक दोन वेळेस खोटे बोलून चालून जाईल मात्र यामुळे खोटे बोलण्याची सवय लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोट्याचा जरी विजय झाला, तरी तो क्षणभंगुर असतो असे प्रसिद्ध विचारवंत लियोनार्ड यांनी म्हटले आहे. याचा अनुभव जीवन जगताना आपणास अनेक वेळा येतो. खोटे बोलल्यामुळे क्षणभर आनंद ही मिळतो पण त्याचे परिणाम आयुष्यभर सोबत राहतात. वारंवार खोटे बोलू लागलो तर त्याचा परिणाम असा होतो की, एखादे वेळी जरी आपण खरे बोलत असू तरी ते पुढच्याना खोटेच वाटत राहते. म्हणजे ही " लांडगा आला रे आला " गोष्टीतील मेंढपाळासारखी अवस्था होते. शेख सादी यांनी म्हटल्याप्रमाणे खोटे बोलणे हे तलवारीने केलेल्या जखमेप्रमाणे असते. जखम तर भरून येते मात्र त्याची खूण कायम राहते.
खरे बोलण्याची सवय ही घरातून होत असते. घरातील प्रत्येक व्यक्ती खरे बोलण्याविषयी जागरूक असणे अत्यंत महत्वाचे आहे. लहान मुलांवर खरे बोलण्याचे सा संस्कार घरातूनच दिले जातात. घरातील प्रत्येक सदस्याच्या बोलण्याचे आणि वागण्याचे सूक्ष्म निरीक्षण करतात आणि त्याच पध्दतीने वागण्याचा प्रयत्न करतात. विशेष करून माता भगिनी यांनी खरे बोलण्याचा कटाक्ष पाळावा. मुले जास्तीत जास्त वेळ आई च्या सोबत असतात त्यामुळे त्यांनी मुलांवर खोटे बोलण्याचे संस्कार होणार नाहीत याची काळजी घेतली तर मुले खरी बोलणारी निघतात. आजकाल ची मुलं आई-वडिलांना बनवाबनवी करण्यात पटाईत आहेत. या बाबीचा कुठे तरी आत्मपरीक्षण होणे अत्यावश्यक आहे. तसे राजकारणी लोकांना खोटे बोलण्या चे सांगावे लागत नाही म्हणून लहानपणी कोणी खोटे बोलले की, हा भविष्यात नेता बनेल असे हसण्यावरी नेऊन बोलत असे. राजकारणात खरे बोलणाऱ्या नेत्यांची काहीच किंमत नसते असे आजवरच्या अनुभवावरुन लक्षात येते. मात्र जो जनतेला विसरतो किंवा खोटी आश्वासने देतो जनता अश्या नेत्यांना त्यांची खरी जागा दाखवितात हे ही सत्य आहे. काही मंडळी आपल्या व्यवसायाशी निगडित खोटे बोलतात. ते त्यांचा व्यवसाय असतो, त्याशिवाय त्याची भरभराटी होत नाही. मात्र तेथे देखील त्याचा अतिपणा वाढला की एक ना एक दिवस माती होणार हे ठरलेले आहे. म्हणून जे सत्यमेव जयते चा अर्थ समजून घेतात तेच जीवनात यशस्वी होतात. तुमच्या जवळ पैसा, संपत्ती, मोठे घर, जमीन, जुमला, दागदागिने किती मोठ्या प्रमाणात आहे याला काहीच किंमत नाही. तर तुमचे बोलण्यावर किती जण विश्वास ठेवतात हे महत्वाचे आहे. लोकांचा आपल्या वरील विश्वास पैश्याला बघून नसतोच तो असतो आपल्या सत्य बोलण्यावर. राजा हरिश्चंद्र यांना आपण सर्वजण सत्यवान राजा म्हणून ओळखतो कारण त्यांनी जीवनात नेहमी सत्यच बोलत राहिले, खोटे कधीच बोलले नाहीत. आपण सुध्दा खरे बोलण्याची सवय लावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. गौतम बुध्दांनी सर्वाना सत्यं वद: म्हणजे खरे बोला याचे आचरण करायला सांगितले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी इंग्रजा विरुद्ध लढा देताना नेहमी सत्याचा आग्रह केला. माझे सत्याचे प्रयोग हे त्यांचे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या जीवनात सत्य किती महत्त्वाचे आहे हे कळून येईल. काही वेळा नकळत चूका होऊ शकतात मात्र वारंवार तीच चूक करणे म्हणजे ते घोडचूक होते. म्हणून फ्राउड यांचा उपदेश म्हणतो की, जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो, तो कशालाच घाबरत नाही हे ध्यानात घेऊन आपण यापुढे खरे बोलू या आणि आपले जीवन निर्भय बनवू या.
!!! सत्याचा विजय असो !!!
"सत्य हे कडू असते " असे म्हणतात खरे बोलल्या वर सख्या आईला राग येतो असे ही संबोधिले जाते . खरे थोड अवघड असते कठोर असतं . खर्या गोष्टीचे परिणाम दीर्घ काल टिकणारे असतात . तर खोट्या गोष्टीचे परिणाम लवकर दिसणारे क्षणिक असतात , लटके असतात . इतिहासात कुठेही कधी ही खरी गोष्ट टिकलेली आहे तर खोट्या गोष्टी तरलेल्या नाहीत .म्हणून कोणी खरे बोलणं , खरं राहणं , वागणं सोडू नये कारण आपल्या देशाने " सत्यमेव जयते " सत्याचा विजय असो . हे ब्रीद वाक्य स्विकारलेले आहे .माणूस कधी लोभासाठी, स्वार्थासाठी नकळत का होईना खोटं बोलतो . परंतु ते विवेक बुद्धीला कधी तरी स्पर्श करतं कि नाही आपणा कडून अमुक एका वेळी चूक झालेली आहे . माणूस खूप विचारांती निर्णय घ्यावा आणि चूक किंवा खोटं टालले पाहिजे . चूक किंवा खोटं कधी कधी नक्किच माणसाला. समजून येत नसते परंतू ती चूकीची गोष्ट टाकणे किंवा सोडून देणं हा त्या वरील रामबाण उपाय आहे. कबीरदास महाराज काशी ठिकाणी राहायचे एक दिवस ते एका चौकात बसले होते तेंव्हा तेथे एक कसाई एका गायीच्या मागे धावत येतो गाय चौकात रस्ता चूकविते त्या वेळी तो कसाई कबीरदास महाराज यांना विचारतो ( महाराजानी गाय गेलेली पाहीलेली पण असते ). क्या अपने इधर कुछ गौ जाते देखा है ? आता कबीरदास महाराज यांना खूप मोठा प्रश्न पडतो कि आता काय उत्तर दयाव ? खरं सांगावं तर गायीचं पातक लागेल नाही सांगाव तर खोटं बोलण्याचं पातक लागेल म्हणून ते खूप विचारांती निर्णय घेतात आणि तो माणूस सारखाच विचारतो सांगा - सांगा मग कबीरजी सांगतात भैय्या " गो जिस ऑखोने देखी है ना उन्हे बताना नही आता और जिस मुह को बताना आता है ना उसे देखना नही आता ! तो आप.समज लिजिए गो किधर गयी है ! या उदाहरण मधून आपल्याला थोडा युक्तिवाद लक्षात येईल कि खोटं बोलणं आपण टालू शकतो. जर. एखादा बाका प्रसंग आपणाला अडचण निर्माण करत असेल अशा वेळी आपण सावध असलं पाहिजे . बुद्धी जागृत आणि आपण डोळस विचाराने त्यामधून मार्ग निवडला पाहिजे. इतिहासातील आणखी एक प्रसंग सांगेन मी आपणाला ज्या वेळी महाभारतीय युद्ध आता अटल आहे कोरव आणि पान्डव यांच्यामध्ये युद्ध होणार अशा वेळी दुर्योधन वज्र देही होण्यासाठी गुरू द्रोणाचार्याना युक्ती विचारतो आणि गुरू द्रोणाचार्य हीच गोष्ट दुर्योधनाला जेष्ठ पान्डव धर्मराज म्हणजेच.युधिष्ठीर यांना विचार असे सांगतात त्यावर दुर्योधनाला राग येतो गुरूजी तुम्ही काय सांगता आपली अंतर्गत गोष्ट तुम्ही विरोधी गटातील माणसाला विचार सांगता . मी तुमचा धिक्कार करतो . त्यावर गुरू बोलतात तसे नाही सुयोधन " माझा धर्म अर्थात युद्धिस्ठिर कधी खोटं बोलत नाही . बोलला नाही , बोलणार नाही . पुढील कथा भाग आपणास माहित असेल . थोडक्यात गुरू जरी विरुद्ध दलात होते , तरी त्यांनी व्यक्त केलेला विश्वास माझा धर्म कधी खोटं बोलतच नाही हे अतिशय मोलाचे आहे . तेव्हा आपणही जीवन जगत असताना जसे जमेल तसे खरे बोलण्याचा , खरे वागण्याचा , खरे राहण्याचा जरूर जरूर विचार करावा , प्रयत्न करावा , कितीही उदाहरणे देऊन खरे जीवनच सत्य आहे बाकी सर्व काही मिथ्य आहे आपणाला पटवून देता येईल
खोटं फार काल टिकून राहत नाही . कारण ते क्षणिक असतं .म्हणूनच म्हणतात दिसत तस नसत . म्हणून अवघं जग फसत . उदाहरण द्यायचे झाले तर बघा नाटका मध्ये आपण राजा -राणी बनवलेले पाञे , सकाळी ते दुसरे सामान्य झालेले असतात . खरे राजा - राणी तसे नसतात तात्पर्य खरे ते खरेच म्हणून सत्य हे सूर्य प्रकाशा सारखे असते म्हणून संगत माणसाला खर्याचीच असावी . खोटं ही बेगडी असते चिरकाल टिकून राहणारे नसते
श्री भागवत लक्ष्मण गर्कळ ( बीड)
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सत्याची बाजू
"सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही...!"
सत्य हा शब्द ऐकला किंवा वाचला तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चेहरा नजरेसमोर नक्कीच येतो. तुमच्याही नजरेसमोर त्यांचाच चेहरा आला ना ? त्यांनी नेहमीच सत्याचा आग्रह धरला होता. महात्मा गांधी हे लहानपणी खूप खोटं बोलायचे परंतु एके दिवशी त्यांच्या मनालाच वाईट वाटले म्हणून त्यांनी आयुष्यात कधीही खोटं न बोलण्याची शपथच घेतली.
आपल्या बालपणापासूनच आपल्यावर खरं बोलावे, सत्य बोलावे, खोटं बोलू नये हे संस्कार टाकले जातात. खोटं बोलणं चांगलं नसतं हे दर्शविण्यासाठी "झूट बोले कौआ काटे" हि म्हण आपण नेहमीच वापरली जाते. मनुष्य मात्र हे सत्यवादी मार्गाचे संस्कार आपल्या स्वार्थासाठी विसरून जातो.
“खोटं बोलणं हे मानवाच्या मूळ स्वभावातच आहे असं म्हणता येईल.” लोक सहसा स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटं बोलतात. कदाचित त्यांच्या हातून एखादी चूक किंवा गुन्हा घडलेला असेल तर तो गुन्हा किंवा ती चूक लपवण्यासाठी तो खोटं बोलत असतो. आणि एक खोटं लपविण्यासाठी शंभर वेळेस त्याला खोटं बोलावे लागते.
मनुष्य आपली चूक लपविण्यासाठीच खोटं बोलतो असं नाही. राजकीय पुढारी आपली पोळी भाजून घेण्यासाठी असं खोटं बोलतच असतात. बऱ्याचदा खोट्या अश्वासनांवरच तर हे पुढारी जिंकून येत असतात. खोट्याचा आधार घेऊन जनतेची दिशाभूल करत असतात. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हा एक गुणधर्मच असतो यांच्यात. अर्थात याला काही पुढारी अपवाद सुद्धा आहेत. जे केवळ सत्याच्या मार्गानेच जनतेची सेवा करत असतात. खोटं बोलून धार्मिक तेढ निर्माण करणे व सामाजिक वातावरण दूषित करण्याचे काम सुद्धा काही लोकं करत असतात.
आपला व्यवसाय चांगला चालण्यासाठी बरेच व्यावसायिक खोट्या जाहिराती करून आपल्या वस्तू विकून ग्राहकांची फसवणूक करत असतात.
कितीही सत्यवादी व्यक्ती असला तरी नेहमी खरं बोलणं शक्य नसते. वेळ प्रसंगी प्रत्येक मनुष्याला जाणूनबुजून खोटं बोलावं लागतंच त्यामुळेच तर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की खोटं बोलून जर कुणाचं भलं होणार असेल तर कधी-कधी खोटं बोललेलं सुद्धा चांगलंच असतं.
शेवटी मनुष्य आपल्या स्वार्थासाठी कितीही खोटं बोलत असला तरी...
"झूठ का कद कितना भी ऊँचा क्यो न हो, सत्य के मुक़ाबले में छोटा ही होता है…!"
-------------------
गणेश सोळुंके (जालना)
8390132085
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सत्य एक अग्निपरीक्षा
'नेहमी खरे बोलावे' हे वाक्य उच्चारायला जितके सोपे आहे तितकेच ते आचरणात आणायला अवघड आहे.
सत्य हे श्रेष्ठ आहेच. सत्याला परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते. पण प्रसंगानुरूप कधीतरी खूप लोकांना या प्रवृत्तीला छेद द्यावा लागतो.
एकदा एक शेतकरी शेतातील शुद्ध पालेभाजी विकत बसला होता. त्याच्याच बाजुला दुसरा एक युवक रासायनिक खते आणि केमिकल्सची फवारणी केलेली हायब्रीड पालेभाजी विकत होता. परंतु बोलताना असा आव आणत होता की याचीच भाजी अस्सल गावरान असावी अशी ग्राहकाची खात्री व्हावी. अखेर व्हायचे तेच झाले खरी भाजी संध्याकाळ पर्यंत विकली गेली नाही .हायब्रीड भाजी मात्र अर्ध्या तासात संपली. काही वेळेस सत्य मार खाते ते याच मुळे.
,गांधीजी सत्य या शब्दावर विलक्षण जोर देतात. त्यांच्या मते खोटे बोलण्यासारखे दुसरे पाप नाही .पण बऱ्याचदा खोटेच जिंकते आणि मग खरे बोलणाऱ्याचा संयम राहत नाही. एकदा मला माझ्या सहकारी शिक्षकांनी ऐकवलेली सत्य कथा आहे. खरी की खोटी मला माहित नाही . एकदा एका शाळेत तीन शिक्षक कार्यरत होते. शाळा आड वळणाला असल्यामुळे या शाळेत सहसा कोणाची म्हणजे वरिष्ठांची भेट होत नसे. त्याचा फायदा शिक्षक मंडळी घेत असे.
एके दिवशी मधल्या सुट्टीत दोघे शिक्षक स्वतःच्या कामासाठी रजा न घेता तसेच निघून गेले. एकच शिक्षक सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळा सांभाळत होते . नेमकी 5 मिनिटे आधी त्यांनी शाळा सोडली आणि अचानक त्याचवेळेस जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट दिली. शिक्षणाधिकाऱ्यांनी असमाधान व्यक्त केले. फार काही बोलले नाहीत .परंतु दुसऱ्या दिवशी शाळेतल्या तिन्ही शिक्षकांना नोटीस बजावली व खुलासा मागवला. जे दुपारीच निघून गेले होते त्यांनी मजेशीर खुलासा केला.त्यातील एकाला जुलाब सुरू झाले आणि म्हणून दुसरे शिक्षक त्यांना घेऊन तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले .तसे सर्टिफिकेट देखील सोबत जोडले .त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. पाच मिनिटे लवकर शाळा सोडली म्हणून बिचाऱ्या तिसऱ्या शिक्षकाचे एका दिवसाचे वेतन मात्र कापले गेले.अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
सत्याला अनेक सत्व परीक्षेला सामोरे जावे लागते. खोटे मात्र बिनबोभाट खपवले जाते. खोटे हे पाप असले तरी हल्ली पाप आणि पुण्याच्या संकल्पनेवर कोणाचा विश्वास राहिला नाही. श्यामच्या आईने श्यामवर सत्याचे संस्कार केलेत. रामायणात कौसल्या मातेने आणि गुरूंनीही रामावर सत्याचे संस्कार केलेत. या सत्य वचनापायी रामाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. महाभारतात आयुष्यभर सत्यवचनी असलेल्या धर्मराजाला प्रसंगानुरूप 'नरो वा कुंजरो ' अशी असत्य भूमिका घ्यावी लागली.
सत्याचे संस्कार हे लहानपणीच रुजवावे लागतात. यासाठी लहानग्यांना अनेक ऋषीमुनींच्या, रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या जातात. पण ऐकलेल्या कथा आणि प्रत्यक्ष कुटुंबातील व्यक्ती, परीसरातील समाज ,शाळा, मित्र याठिकाणी येणारे प्रत्यक्ष अनुभव यामध्ये मात्र तफावत जाणवते आणि याचा बालमनावर निश्चितच प्रतिकूल परिणाम होतो.
अगदी शुद्ध दूध असल्याची बतावणी करणारा शेतकरी पाणी घालूनच दूध विकतो. दुकानदार भेसळ केल्याशिवाय राहत नाही. गुणवत्ता डावलून एखाद्याला नोकरी दिली जाते. पैसे दिले तर कायद्याचा भंग केला तरी चालतो. या सर्व घटनांचा परिणाम बालमनावर होणे स्वाभाविक आहे.
सत्याला न्याय मिळतो पण त्याला अनेक कसोट्यातून जावे लागते. म्हणूनच की काय 'सती दारी कुती, आणि पापीच्या दारी हाती' अशी ग्रामीण भागात एक म्हण नेहमी वापरली जाते.
गांधीजींनी व्यायाम शाळेत येण्याचे खरे कारण सांगितले म्हणून त्यांना शिक्षा झाली पण त्यांनतर ते आयुष्यात कधीच उशिरा गेले नाहीत ही जी त्यांच्यात सुधारणा झाली ती आहे सत्याची ताकद. रामाकडे सैन्य नव्हते. रानातील वानरे जमवून राम शक्तिशाली रावणाशी लढला पण अखेर विजय सत्याचा झाला. म्हणूनच म्हटले जाते, 'भगवान के घर देर है,अंधेर नही | '.
सुधाकर रामदास पाटील
ठाणे
7798963063
srp1672@gmail.com
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
*सत्याचे अर्थ व महत्त्व*
सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. या विश्वाच्या मुळाशी असलेले तत्त्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केले जाते, त्यावेळी सत्य हे हे एक नीतिमूल्य म्हणून येते, तेव्हा त्याचा अर्थ प्रामाणिकपणा, सत्यवादित्व (टथफुलनेस) असा असतो. ज्ञानमीमांसा व तर्कशास्त्र या प्रांतांत सत्य आणि असत्य हे जाणिवेचे किंवा विधानाचे गुणधर्म असतात. कोणत्याही वास्तवाची आपल्याला होणारी जाणीव, त्या वास्तवाबरहुकूम असेल, तसेच आपल्याला झालेल्या अन्य जाणिवांशी सुसंवादी असेल, तर ती जाणीव सत्य आहे, यथार्थ आहे, प्रमाणभूत आहे असे आपण मानतो. तसेच ती जाणीव ज्या विधानातून व्यक्त केली जाते, ते विधानही सत्य / यथार्थ / प्रमाणभूत ठरवितो. याउलट एखादी जाणीव वास्तवाबरहुकूम नसल्यास किंवा अन्य प्रस्थापित जाणिवांनी तिला बाध येत असल्यास, ती जाणीव तसेच ती जाणीव व्यक्त करणारे विधान आपण असत्य / अयथार्थ / अप्रमाण ठरवितो. एखादी जाणीव किंवा विधान सत्य आहे म्हणजे नेमके काय, ती किंवा ते सत्य आहे, हे ठरविण्याचे निकष कोणते, या प्रश्नांची चर्चा तत्त्वज्ञानाच्या ज्ञानमीमांसा (एपिस्टेमॉलॉजी) या शाखेत केली जाते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत हे प्रश्न प्रमाणशास्त्राच्या कक्षेत येतात. येथे आपण प्रथम पाश्र्चात्त्य ज्ञानमीमांसेतील सत्यविषयक उपपत्तींचा आढावा घेणार असून त्यानंतर भारतीय प्रमाणशास्त्रातील प्रामाण्यविषयक ठळक मतांची नोंद घेणार आहोत.
ज्ञानाची सत्यता कशी पारखायची यासंबंधी तत्त्वज्ञात अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. साधारणपणे हा प्रश्न प्रथम प्रत्यक्षज्ञानाच्या संदर्भात निर्माण झाला असावा, असे तत्त्वज्ञानाच्या इतिहासावरून वाटते. वाळवंटात दिसणारे मृगजळ हे सत्य नाही, ते आभास आहे किंवा कावीळ झालेल्या माणसाला साऱ्या वस्तू पिवळ्या दिसतात, पण वस्तुत: त्या पिवळ्या नसतात, असे सर्वसामान्य व्यवहारात म्हटले जाते. इंद्रियांना प्रतीत होणाऱ्या या गोष्टी इंद्रियदोष किंवा इतर व्यत्यय यांमुळे खोटया प्रतीत होतात परंतु मी ज्या टेबलावर कागद ठेवून लिहीत आहे, ते टेबल खरे आहे (त्याचे मला होणारे ज्ञान सत्य आहे) हे तरी कसे ठरविले जाते, असल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी तत्त्वज्ञांना बरेच खोलात उतरावे लागते.
विस्मयचकित करणारे, विश्वसाहित्याचा भाग बनलेले, अज्ञेयवादी सत्ताशास्त्रीय विचार व्यक्त करणारे ‘नासदीय सूक्त’ (ऋग्वेद) ज्या भारतात निर्माण झाले; तिथेच शिष्याच्या पात्रतेच्या गाळणीमुळे पुरुषसूक्तातील वर्णव्यवस्थेची अवैज्ञानिक उत्पत्ती स्पष्ट करणारे श्लोक हेच सामाजिक सत्य मानले गेले आणि येथे वर्णजातिलग हे उपमुद्दे महत्त्वाचे ठरले.
‘मग सांग तर, सत्य म्हणजे काय?’ पायलेटने प्रश्न विचारला आणि उत्तरासाठी तो प्रभुपुत्र येशूकडे पाहू लागला. येशू नि:शब्द. हा प्रसंग आहे येशूच्या शिक्षेचा. न्यायनिवाडा करतो तो तत्कालीन रोमन सम्राट टिबेरियस याचा सुभेदार पाँटीअस पायलेट. येशूने दिलेल्या उत्तरावर त्याने केवळ खांदे उडवून येशूचा आणि त्याच्या उत्तराचा उपहास केला. पायलेटचा प्रश्न तात्त्विक असून त्याचे वैशिष्टय़ हे की एका धुरंधर शासकाने तो उपस्थित केला. कुठलाही राजकारणी अशा तऱ्हेचा तात्त्विक प्रश्न; तोही थेट सत्याविषयी कधी उपस्थित करीत नसतो.
सत्य म्हणजे जे आहे, असतेच, ‘जे नाही, असे म्हणता येत नाही’ असे. सत्याचे असणे म्हणजे सत्तावत्, सत्तावान असणे. ‘सत्’पासून ‘सत्ता’ शब्द होतो. म्हणून सत्य हीच सत्ता. अस्तित्व हा सत्य या शब्दाचा समांतर शब्द मानला गेला. या सत्तेच्या ज्ञानाची सुव्यस्थित रचना करणे, याचा अर्थ सत्ताशास्त्र रचणे. पाश्चात्त्य परंपरेत सत्ताशास्त्राला Metaphysics (मेटॅफिजिक्स) अशी संज्ञा आहे. ती ऱ्होडचा अँड्रोनिकस (इ.स.पू. ६०) या पंडित ग्रंथपालाने प्रचारात आणली. स्वत: अॅरिस्टॉटल मेटॅफिजिक्सचा उल्लेख ‘आदितत्त्वज्ञान’ (The First Philosophy), ‘प्रज्ञान’ (Wisdom), ईश्वरविद्या असा करतो.
मेटॅफिजिक्स या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून संस्कृत, मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये अतिभौतिकी, अस्तित्वशास्त्र, तत्त्वमीमांसा, अध्यात्मशास्त्र, सत्ताशास्त्र, सद्वस्तूशास्त्र या संज्ञा मराठीत उपयोगात आणल्या जातात. यातील अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र याविषयी भारतीय मनाचे बरेच स्वतंत्र समज-गरसमज आहेत.
सत्ताशास्त्र ज्यांना सत्य मानते ते दोन प्रकारचे आहे. पहिला प्रकार हा निसर्ग नियम आणि सामाजिक नियमरूपी तत्त्वांचा आहे. दुसरा प्रकार जग, माणूस आणि त्यांचा परस्परसंबंध यांचा आणि त्या संबंधातून व्यक्त होणाऱ्या, पण निसर्गाचा व समाजाचा घटक नसणाऱ्या तत्त्वांचा आहे. त्यांना परतत्त्वे म्हणता येईल. ही सारी तत्त्वे म्हणजे अमूर्त संकल्पना असतात. या सर्वाचा अभ्यास, चिकित्सा हा सत्ताशास्त्राचा विषय आहे. सत्ताशास्त्र तीन सत्ता स्वीकारते : (१) अनुभवास येणारे जग आणि माणसासह सर्व प्राणिजात (२) अमूर्त संकल्पना आणि (३) परतत्त्वे. या तत्त्वांना मान्यता दिली, त्यांचे अस्तित्व स्वीकारले किंवा नाकारले तर काय होईल? या संकल्पनांना, परतत्त्वांना खरेच अस्तित्व आहे काय? त्यांच्या असण्या-नसण्याचा समाजावर परिणाम काय होईल? यांचा अभ्यास सत्ताशास्त्र करू पाहते आणि निष्कर्ष मांडते.
अनुभवास येणारे जग निसर्गनियमाने चालते. ते नियम म्हणजे काही मूलभूत भौतिकतत्त्वे असतात. त्यांना गृहीत धरले तरच निसर्ग अभ्यासता येतो, विज्ञान शक्य होते. उदाहरणार्थ, निसर्गात कार्यकारणसंबंध असतो; असे पदार्थविज्ञान गृहीत धरते. प्रत्येक विज्ञानाची अशी गृहीतकृत्ये असतात आणि त्याप्रमाणे आपल्या विषयाचे वर्णन करण्यासाठी त्यांचा उपयोग ते करीत असते. किंबहुना त्यांचा उपयोग केल्याशिवाय कशाचेही वर्णन करणे, त्याच्याविषयी विधाने करणे अशक्य असते. अशा मूलभूत संकल्पना म्हणजे ‘वस्तू’ किंवा ‘सत्’, ‘वस्तुप्रकार’, ‘द्रव्य-गुण’, ‘कार्यकारणभाव, ‘संबंध’, ‘अवकाश’ किंवा ‘दिशा’, ‘काल’, ‘संख्या’ इत्यादी. व्यवहारातील विधाने व वैज्ञानिक विधाने यांना आधारभूत असलेल्या या संकल्पनांचे विश्लेषण करणे, त्यांचे आशय, परस्परसंबंध स्पष्ट करणे हे काम कोणतेही विशिष्ट विज्ञान करीत नाही. जसे की ‘कार्यकारणसंबंध सत्य आहे काय?’ किंवा ‘कार्यकारणसंबंध सत्य आहे असे मानायला काय आधार आहे?’ असे प्रश्न विज्ञान उपस्थित करीत नाही. हे प्रश्न त्या विज्ञानातील प्रश्न नसतात, तर त्या विज्ञानाविषयीचे प्रश्न असतात. पण स्वत: ते विज्ञान हे प्रश्न सोडवीत नाही. पण ते सोडविले, त्यांची चर्चा, चिकित्सा केली तरच विज्ञान शक्य होते. तेव्हा अशा सर्व विशिष्ट विज्ञानांना आणि ज्ञानशाखांना आधारभूत असलेल्या गृहीतकृत्यांची चिकित्सा करणारे शास्त्र म्हणजे तत्त्वमीमांसा.
आता, समाज जीवन जगताना माणूस समाज, राज्य, कुटुंब, प्रेम, ज्ञान, आदर्श इत्यादी आणि स्व: आत्म, (री’ऋ), मन, आत्मा (र४’), चतन्य (रस्र््र१्र३) या संकल्पना वापरतो. विश्वाबद्दल विचार करताना अस्तित्व म्हणजे काय, त्याचे मूलभूत घटक कोणते आणि त्याचे गुणधर्म कोणते, हे प्रश्न विचारतो. माणसाचे विश्वाशी काय नाते आहे, हे शोधताना आणि भौतिक जगात कार्यकारण संबंध आढळल्याने; या विश्वाचे कारण म्हणून तो धर्म, ईश्वर, परमात्मा, अंतिम सत्य (व’३्रें३ी फीं’्र३८) अशा संकल्पना निर्माण करतो. या साऱ्या संकल्पनांना तो सत्य समजतो.
ही तत्त्वे स्वीकारली की चिद्वाद, नाकारली की जडवाद आणि तटस्थ राहिले की अज्ञेयवाद या विचारसरणी निर्माण होतात. ईश्वरवाद, निरीश्वरवाद यातूनच येतात. ईश्वर मानला की मग तो पुरुष की स्त्री की निर्लिग की उभयिलग कि बहुिलगीय? हे प्रश्न आलेच. सत्ताशास्त्र केवळ आस्तिकांचेच असते असे नव्हे, तर तुम्ही नास्तिक असला तरी तुम्हाला तुमचे नास्तिक सत्ताशास्त्र निर्माण करावे लागते. जसे की, लोकायतांनी इहलोकाचे सत्ताशास्त्र मांडले, हे लक्षात घेतले पाहिजे.
सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा आणि सामाजिक न्याय-अन्याय, शोषण, विषमता यांचा संबंध काय, असा प्रश्न विचारू.
त्याचे इतिहास देतो ते उत्तर असे : परत्त्वांचे ज्ञान ही सर्व समाजाचा हक्क नाही, तो केवळ पात्र शिष्यांना लाभणारा दुर्मीळ हक्क आहे. हे सर्व संस्कृती मान्य करतात आणि येथून विषमतेची बीजे पेरली जातात. भारतात हे अधिक ठळकपणे, जोमदारपणे आणि निर्दयतेने मांडले गेले. वैदिक सत्य म्हणजे केवल ब्रह्म. या ब्रह्मसत्याचे मुख सुवर्णपात्राने झाकलेले आहे, (हिरण्यमये पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्- ईशोपनिषद १५.) ही संकल्पना शिष्याच्या पात्रतेचा मुद्दा उपस्थित करते.
उपनिषद या संज्ञेचा अर्थ ‘गुरूच्या सान्निध्यात खासगी बठकीत केलेला गुप्त उपदेश’ असा आहे. उपनिषद ग्रंथांमधील उपदेश गुप्त मानल्यामुळे अनधिकारी व्यक्तींकडून त्याचा विपरीत अर्थ लावला जाईल किंवा त्याचा दुरुपयोग होईल म्हणून त्यांच्यापर्यंत तो जाऊ नये, याबाबत विशेष दक्षता घेतली गेली. कठोपनिषदात नचिकेतस्च्या बुद्धीची शुद्धता आणि सामथ्र्य यांची कसोटी घेतल्यानंतरच यम त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. साहजिकच तिथे पात्रतेचा मुद्दा, निकष लागू झाला. पात्रापात्रतेचा विचार न करता सर्वाना अंतिम सत्याचे ध्यान देण्याची अनिच्छा केवळ भारतातच होती, असे नाही तर ती सर्वच प्राचीन मानवांमध्ये होती. उदाहरणार्थ ‘ज्यांना सोने हवे असेल त्यांनी त्यासाठी खणण्याचे श्रम केले पाहिजेत, नाहीपेक्षा त्यांनी तृणांवरच समाधान मानले पाहिजे’ असे प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता हेराक्लीटस म्हणतो, असे एम. हिरियण्णा हे तत्त्ववेत्ते नमूद करतात.
चार्वाकांचा वगळता सर्व दर्शनांच्या अध्यात्मशास्त्रांनी शोषणाचा पाया रचला. ब्रह्म सत्य असो वा नसो पण भौतिक जगाचे ज्ञानसुद्धा मक्तेदारी बनली. परिणामी आजच्या राजकारणाला ‘केवल धर्म-वर्णजातीयवादाचे स्वरूप’ लाभले, हेच सत्य समोर उभे ठाकलेले आहे.
‘सत्य मेव जयते नानृतम।
सत्येन पन्था वितितो देवयान:’
या वचनातील ‘सत्य’, क्रूसस्थ येशूप्रमाणे केवळ अशोक स्तंभाचे मानकरी ठरले आहे!
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सत्यं ब्रुयात प्रियं ब्रुयात
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् ।
प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥
सत्य बोलायला पाहिजे पण सत्य हे मृदुतेनी बोलायला पाहिजे. सत्य बोलताना अप्रिय नाही बोलु नये आणि प्रिय बोलताना असत्य नाही बोलु नये. हाच सनातन धर्म आहे.
खरे बोलणे याचा अर्थ फटकळपणे किंवा उर्मटपणे बोलणे असा होत नाही. आपण आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवरणे आवश्यक आहे .माणसाची “जीभ तीक्ष्ण वस्तऱ्यासारखी” आहे अपमानास्पद किंवा हिणवणारे शब्द बोलून इतरांच्या भावना दुखवणार नाही असे सत्य बोलणे अभिप्रेत आहे. मनमोकळेपणाने, पण त्याच वेळी मर्यादा न ओलांडता बोलणे ,इतरांचे मन न दुखवता मनातल्या भावना व्यक्त करणे होय. अशा प्रकारे, आपण देवाचा सन्मान करतो.
अनेकदा वाद होतो तेव्हा सुद्धा दृढतेने,पण धीराने,नम्रपणे सत्य परिस्थिति समजावुन सांगणे महत्वाचे आहे .
मुण्डकोपनिषद्
"सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयान: | येन आक्रमन्ति ऋषय: हि आप्तकामा: यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्" ||
सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही, सत्याचा मार्गावर चालून मानवाला दिव्यत्व प्राप्त होते. ऋषि मुनींना सत्याचा मार्गावर चालून ईश्वर प्राप्तीचा आनंद मिळाला आहे.
सत्याबद्दल आजही लोकांची अनेक परस्परविरोधी मते आहेत. खरे म्हणायचे तर पूर्ण सत्य परम सत्य ह्या पार्थिव जगात अस्तित्वात नाही च. सत्याचा नावावर युधिष्ठिरांच्या _नरोवा कुंजरोवा_सारखे अर्धसत्य, तोडमोड केलेले सत्य किंवा विकृत सत्यच ह्या जगात अस्तित्वात आहे. आज
प्रत्येक व्यक्ती आपापल्या सोयीप्रमाणे सत्याचा वेगळा अर्थ लावते. काही जण, सोयीस्कर असते किंवा फायद्याचे असते तेव्हाच खरे बोलतात. बहुतांश लोकांचे मत “प्रामाणिकता एक उत्कृष्ट गुण आहे, पण अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी माणसाला इतका संघर्ष करावा लागतो की तो या गुणाला फारसे महत्त्व देत नाही. जगण्यासाठी खोटे बोलावेच लागते. खोटं बोलणे हे मनुष्य स्वभावच आहे जणू. एक खोटं लपवायला शंभर वेळा खोट बोलावे लागते आणि तरी ही धाकधूक असतेच की आपलं खोटं उघडकीस तर नाही येणार, सरत शेवटी खोट पकडले जातेच. व्यवहारीक जीवनात सुद्धा खरे बोलणारा शांत आणि स्वस्थ चित्ताने जगू शकतो.
” सहाव्या शतकातल्या अॅल्केयस नावाच्या एका ग्रीक कवीने म्हटले: “मद्यातच खरे सत्य आहे.” त्याच्या म्हणण्याचा अर्थ, एखादी व्यक्ती मद्याच्या प्रभावाखाली आल्यावर भरभरून बोलू लागते व आपल्या मनातले सत्य उगळू लागते.
कित्येक लोकं मनात दुष्ट हेतू बाळगून खोटे बोलणारे असतात, सहसा, दुष्ट हेतूने खोटे बोलणाऱ्या या लोकांना इतरांचे नुकसान व्हावे, त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास व्हावा किंवा मनःस्ताप व्हावा असे वाटत असते. यामध्ये इतरांची दिशाभूल करण्यासाठी लहानसहान गोष्टींत खोटे बोलणे किंवा एखादी गोष्ट वाढवून सांगणे यांव्यतिरिक्त आणखी बरेच काही गोवलेले असते. अर्थात, सर्वच प्रकारची लबाडी वाईट आहे. नाही. यास्तव, एखाद्या व्यक्तीला दुष्ट हेतूने, जाणूनबुजून खोटं बोलण्याची सवय झाली आहे हे अशा व्यक्ती पासून दूर रहावे.
आपण अशा एका काळात जगत आहोत ज्यामध्ये असत्याचाच बोलबाला आहे. राजरोसपणे बेइमानी केली जाते. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी बेइमानी करण्याच्या प्रलोभनाचा विरोध करणे कठीण जाऊ शकते. नोकरीसाठी अर्ज करताना कित्येक जण अगदी सर्रासपणे खोटे बोलतात. उदाहरणार्थ, चांगली व लठ्ठ पगाराची नोकरी मिळवता यावी म्हणून नोकरीसाठी अर्ज करताना ते आपले शिक्षण व नोकरीचा अनुभव वाढवून सांगतात. तर इतर काही जण, नोकरीच्या ठिकाणी काम करत असल्याचे दाखवतात, पण खरेतर, कंपनीच्या नियमांविरुद्ध ते आपली खासगी कामे करत असतात. जसे की, ते आपल्या कामाशी संबंधित नसलेले साहित्य वाचतात, खासगी फोन कॉल करतात, इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवतात किंवा इंटरनेटचा वापर करतात.
हे जरी असले तरी एक मात्र खरे की खोटे दिर्घ काळ टिकून राहत नाही हे लक्षात ठेवावे. आताच्या टेक्नॉलॉजीच्या काळात नक्कीच नाही. आणि म्हणुनच लहानपणापासूनच सत्याची सवय असावी.मुलांवर खरे बोलण्याचे संस्कार करावे. _सत्यमेव जयते_ शेवटी सत्याचाच विजय होतो. येणारा काळ परत सत्याची कास धरणारा राहावा आणि किंबहुना राहिलं अशी आस्था बाळगावी. डाॅ.वर्षा सगदेव नागपूर.
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सत्याला पैशामुळे मरण आहे!
सत्याला मरण आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.कारण सत्य रोजच्या रोज मरत असतं.कधी लाचार बनून तर कधी बदनाम होवून.कारण आज स्वार्थीपणा जास्त वाढलेला अाहे.स्वार्थीपण व पैसा कमविण्याचा हव्यास यामुळं सत्य मरत चाललेलं असून त्याला वाचवतो म्हटलं तर आपलंच मरण होत असतं.म्हणून सत्याला वाचवायला कोणीही पुढं येत नाही.
घर असो की न्यायालय,शाळा असो की कार्यालय सर्वच ठिकाणी काही ना काही खोटं बोलणं असतंच.न्यायालयात तर हमखास खोटं बोललं जातं.कारण त्याशिवाय न्यायालयात पक्षकारांना न्याय मिळवून देता येत नाही.मग या खोटे बोलून खटल्याची बाजू मांडण्यात जो आरोपी असतो,तो जिंकूनही जातो.तसेच ज्याची बाजू खरी असते,तो हारुनही जातो.अशाचवेळी ज्यांची बाजू खरी असल्यास आणि त्याला पराभवाचा सामना करावा लागल्यास तो केव्हा जीव सोडेल हे सांगता येत नाही.अर्थात तो केव्हा आत्महत्या करेल हे काही सांगता येत नाही.
एक उदाहरण देतो.एका व्यक्तीला काहीतरी आरोप लावून मारहाण केली.त्यात जबर दुखापत तर झाली,अपमानही झाला.तो आपल्या मारहानीवर व अपमानावर दाद मागण्यासाठी न्यायालयात गेला.नव्हे तर न्यायालयात वकीलामार्फत दाद मागण्याचा प्रयत्न केला.पण ज्याप्रमाणे पक्षकारानं वकील आपली बाजू मांडायली उभा केला.त्याचप्रमाणे प्रतीपक्षकारानेही आपली बाजू मांडायला वकील उभा केला.साक्षपुरावे तपासण्यात आले आणि तो खटला खारीज झाला.पक्षकाराचा झालेला अपमान व मारहाण धुळीस मिळाली.सत्य टिकलं नाही.कारण बरोबर तपास झाला नाही.पिरतिपक्षकारानं निव्वळ पैशाच्या भरवशावर सत्याला मारलं.साक्षीदार विकल्या गेले.पोलिस विकल्या गेले.वकील विकल्या गेला.न्यायाधीशही.सत्य पैशासमोर मरण पावलं.त्यानंतर काही महिण्यातच प्रतिपक्षकारानं पक्षकारावर खटला भरला.खटल्यात बाजू मांडली की जो पुर्वी पक्षकार होता,त्यानं त्याला बदनाम करण्यासाठी खटला टाकला होता.आता त्या झालेल्या अपमानाचा मुहावजा म्हणून त्याने काही पैसा द्यावा.
कसा लढायचा खटला? ज्याच्याजवळ पैसा अतोनात,त्याचं ठीक आहे.पण ज्याच्याजवळ पैसा नाही.त्याच्यावर अत्याचार झाल्यास त्यानं कोणाकडं दाद मागावी? सत्याला जर असं पैशाच्या शस्रानं मारलं जात असेल तर.
काल मनुस्मृतीच्या माध्यमातून स्पृश्य मंडळी अस्पृश्य आणि स्रीयावर अत्याचार करीत होती.आज मात्र न्यायालयाच्या माध्यमातून श्रीमंत आणि असत्य बोलणारी मंडळी गरीबावर व स्रीयांवर अत्याचार करीत आहेत.कितीतरी स्रीयांवर आज बलत्कार होतांना दिसत आहेत.त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून बरोबर शिक्षा मिळत नसल्याने.जर बलत्कार करणा-या लिंगपिसाटांची लिंगच कापून टाकण्याचे आदेश न्यायालयाने प्रत्येक बलत्कारपिडीतांच्या न्यायाच्या वेळी दिला असता तर आज बलत्कार करणा-यांच्या संख्येत वाढ झाली नसती.पण न्याय करतांना वकील म्हणतात की ही सुई मी फिरवीत आहे.ह्यात धागा कसा जाईल? बलत्कार होतांना पिडीता चूप बसली नसेल..मग बलत्कार झालाच कसा?
सत्य इथंच हारत असते.पैशाची थैली दिली जाते आधीच वकिलांना.न्यायाधीशही विकत घेतले जातात रात्रीच्या अंधारात.इथे जो गुन्हेगार असतो........श्रीमंत गुन्हेगार,त्यांच्यासाठी रात्रीला न्यायालय खुलतं.तसेच बलत्कार पिडीतेच्या खटल्यात आरोपींना फाशी देतांना दहा वेळा तारखा दिल्या जातात.न्याय असंगत तर नाही असं तपासून पाहतांना.सर्व सिद्ध होवूनही.आरोपींना पुर्ण स्वतंत्र्य आणि जर अशा केसेस बलत्कार पिडीता हारल्यास आमची बदनामी केली म्हणून उलटा चोर कोतवाल को दाटे अंतर्गत पुन्हा पिडीतेंवरच केस दायर होते.आधीच पैशानं आणि बदनामीनं मेलेली पिडीता.मग अशी केस दायर झाल्यास तिनं काय करावं?
बलत्कार पिडीता अरुणा शानबाग.बावीसव्या वर्षी बलत्कार झाल्यानंतर कोमात गेली.आरोपी पकडला गेला,त्यानं शिक्षा भोगली.त्यानंतर सुटका झाली.त्याचं लग्नही झालं.दोन मुलंही झाली.तरीही ती कोमातच.शेवटी कोमातच मृत्यूही झाला.अजूनही तो जीवंत आहे.इथेही सत्य हारलं आणि असत्य जीवंत राहिलं.
शेतीत काम करणारा शेतकरी सत्याचं प्रतिक आहे.त्याला जो भाव दिला जातो.तो घेतो व गुपचूप बसतो.नियतीही त्याच्या सत्यावर विश्वास करीत नाही.तर कधी जास्त दुष्काळ तर कधी कमी. कधी ओला तर कधी सुका.मात्र भाव करणारा तो दलाल,खोटं नाटं बोलून मालाचा भाव करतो.कमी पैशात अंटवतो आणि जास्त पैशात विकतो आणि खोटं बोलूनच जास्त पैसा मिळवतो.अन् मेहनत करणारा कास्तकार मागंच राहतो.
महत्वाचं सांगायचं म्हणजे सत्याला पैशापुढं मरण असलं तरी सत्य कधीच मरत नाही.हं पराजीत नक्कीच होते.ते कधी ना कधी बाहेर येतेच आपलं मुंडकं काढत.तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सत्य, सत्यनिष्ठता
सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार सत्य आचार आणि सत्य उच्चार होय.
सत्य आणि प्रामाणिकपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण नेहमी खरं बोलावं आणि प्रामाणिकपणान वागाव. आपण स्वतः प्रामाणिक आणि खरेपणाने वागलो तर या भूतलावरील एक अप्रामाणिक आणि खोटारडा माणूस कमी झाला असं म्हणावं. परंतु काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी खरे लपविण्यासाठी 'माझं तेच खरं' असं म्हणतात. पण ' खरं तेच माझं' अस म्हणणारी माणसं या जगी अल्पच आहेत. एका विचारवंताने म्हटले आहे 'कोण खरे ती गोष्ट महत्वाची नाही; परंतु खरे काय आहे ते महत्त्वाचे आहे.'
'कोण खरं बोलत कोण खोटं बोलतंय' हे महत्वाचं नाही. परंतु खरे काय हे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाची खरी गुणसंपदा ही आपल्या खरेपणात, प्रामाणिकपणात, वास्तविकतेत दडलेली आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सत्याचा वापर करून आपले दैनंदिन जीवन तेजोमय, प्रसन्न, टवटवीत, हर्षउल्हासित करू इतके आपण सुखी होऊ. यशस्वी होऊ.आपण जितके सत्यवादी असू वास्तविक असू प्रामाणिक असू तितके समाजप्रिय असू.
कारण समाज हा सत्याचा आदर करतो, प्रामाणिकपणाची कदर करतो. हे शाश्वत खरे आहे. म्हणून आपल्याला आपल्या गुणांची जाणीव जरी नसली तरी दोष मात्र आपले आपल्याला माहित असावेत. कारण माणसाला सत्य शिकवावे लागत नाही, मानवजातीला सत्य शिकवण्याची आवश्यकता नाही; त्याच्या खरेपणाची अनुभूती त्याला स्वतःला होत असते. म्हणून त्याने आपला स्वार्थ पणा सोडून निस्वार्थीपणे जीवन जगावं व आपला आदर्श प्रत्यक्षात कृतीद्वारा, आपल्या हातून घडणाऱ्या कर्मातून ,वाणीतुन इतरांना दाखवावा. सत्य हे आपल्या यशाचे मूळ आहे.
सत्यनिष्ठेसाठी आपल्याला निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच आपले अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ".
महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". माणसाच्या अंगी नम्रता असेल तर तो सर्वांच्या ह्दयात राहतो. अशा नम्र व्यक्तीसच सत्य सापडते कारण अस म्हणतात
'पूर्ण नम्रता अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.'
जीवनात खरे यश मिळवण्यासाठी सत्य आणि प्रामाणिकपणा अंगी असणे आवश्यक आहे, गरजेचे आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सत्याची एक सुरुवात
फोन खणखणला घरातील. कदाचित नको असलेला होता तो. वडिलांनी मुलाला फोन घेऊन म्हणायला सांगितले की सांग पप्पा घरात नाहीत म्हणून.सांगितले त्याने फोनवर तसे. अन् विचारात पडला की पप्पा तर घरात आहेत. मग असे का म्हणायला सांगितले?घराघरात ही परिस्थिती आपणास पहावयास मिळते. कधी कधी कळत नकळत आपण खोटे बोलून जातो आणि आपले अनुकरण आपली मुलं केव्हा करतात हे आपल्यालाच कळत नाही.
भारताच्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' देवनागरी मध्ये लिहिले आहे.
लहानपणापासूनच आपल्याला खोटे बोलू नये. नेहमी खरं बोलावं असं शिकवलं जातं. परिस्थितीनुरूप ते बदलत जातं. खरं किंवा सत्य आणि खोटं किंवा असत्य ह्या नाण्याच्या दोन बाजू. कोणत्या नाण्याच्या बाजूचा खूप आणि योग्य वापर करायचा हे प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार ठरवते. सत्य पचायला जड, बोलायला अवघड, पण चिरकाल. तर खोटे बोलायला सोपे, वेळ मारून नेणारे, क्षणिक. एका गोष्टीसाठी खोटे बोलले तर ती झाकण्यासाठी अजून एक खोटे. परत ते झाकण्यासाठी अजून एक आणि असे कित्येक. शृंखला वाढत जाते. सत्य जरी दुखवणारं, परखड, कडवट असलं तरी विजय नेहमी सत्याचाच होतो. नेहमी सत्याच्याच मार्गावर चालावे. कामाच्या ठिकाणी लोक बऱ्यापैकी खोटं बोलतात. खोटं बोलून अशी पातळी गाठतात की काही प्रामाणिक लोकांना त्यांच्या नोकरीला मुकावे लागते. पण न्याय होतोच कधी ना कधी. पापाचा किंवा असत्याचा घडा भरतो आणि परत तीच वेळ त्या खोटारड्या लोकांवर येते. थोड्या पैशांसाठी बेईमानी करणारे, खोटे बोलणारे लोक आपल्या अवतीभोवती दिसतात. आपण अशा लोकांना ओळखायला शिकायचे आणि त्यांच्यापासून चार हात लांब राहायचे. त्यांचे पितळ कधी ना कधी उघडे पडते. खोटे बोलणे म्हणजे आपणच आपल्यासाठी खड्डा खणणे. कधीतरी खड्ड्यात जाऊन पडणे. खोटे बोलणाऱ्यांची छाप जरी तात्पुरती पडत असली तरी त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवत नाही. नेहमी सत्य बोलणाऱ्या माणसाकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. एक प्रकारचा आदर दिला जातो. त्याच्या मागे पण त्याचे नाव घेतले जाते.
चला आज पासून नव्हे आत्ता पासून ठरवू. आपणही कोणाशी खोटं बोलत असाल तर सोडून द्या.चांगले विचार बाळगू. सुरवात आपल्यापासून करू. तो खरं बोलत नाही किंवा ती खोटं बोलते हे पाहण्यात वेळ नको घालवायला.दुनिया खऱ्याची नाही असे म्हणण्यापेक्षा आपण खरे आहोत ह्याची मजा लुटुया. मग बघा कसे मानसिक समाधान लाभेल.आत्मविश्वास वाढेल.
सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रविः ।
सत्येन वायवो वान्ति सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ॥
प्रिती दबडे
9326822998
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
*विवश सत्य*.......
"सत्यमेव जयते",नेहमी खरे बोलावे,
सत्याची कास सोडुन नये,सत्याचा विजय एक ना एक दिवस होतच असतो...एक ना अनेक वाक्य आपण "सत्य बोलण्यासाठी
वापरतो".आणि ते खरे आहे हो...
सरळमार्गानेच आपण सुखदायी प्रवास करू शकतो.वेड्या वाकड्या वळणांचा वापर करून आपण काय मिळवतो?
लवकर घरी पोहचण्याचा आनंद ..परंतु कधी कधी या वळणाने आपले माकड हाड पण मोडु शकते हे मात्र आपल्या लक्षात येत नाही.देवाने दिलेल्या बुद्धीचा वापर खरोखर सत्य मार्गाने केला तर किती सुंदर व निर्मळ होईल हे जग.
नाही तर आज पहा निर्मळ करण्यासाठी रस्ते ,घर,दार,कार्यालय,गाड्या कसे सॅनिटायझर् करत आहोत आपण खरच साबणाने स्वच्छ केले तर मन स्वच्छ होऊन सत्याची कास धरेल का हो?
मी पणाने ,भौतिक सुविधाने, मीच मोठा म्हणून घेण्याच्या अहंकाराने माणसाला ग्रासलेले आहे. हाच मी पणा
जगात सर्वाना आज नडतो आहे.
प्रत्येकाने ठरवले....काय गरज आहे ठरवले म्हणण्याची..जे आहे ते आहे
परमेश्वराने जन्माला घातलेल्या या नरदेहाला तुम्ही कोण आहात अजून वेगळ्या वळणावर नेणारे.जो तो खुलेपणाने खरेपणाने शिखरावर जाईल ना! खोटे बोलुन प्राप्ती करण्याची काय गरज? शेवटी जेवण केल्याशिवाय ..व ते ही भाजी भाकरी खाल्ल्याशिवाय पोट भरतं का? एवढंच लागतं ना पोटाला?
कशाला पंचाईती..
"जगा जगू द्या"...नाहीतरी लोकशाही राष्ट्र आहे ना आपले."लोकानी लोकांसाठी चालवलेले लोकां चे राज्य".हा आपला भारत देश ..तरी देखील सामान्य माणसाच्या ,शेतक-याच्या ,कर्मचा-याच्या गरजा काही पूर्ण होत नाहीत.तो नेहमीच हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत असतो
दोन वेळच्या जेवणासाठी कायम रडत असतो.श्रीमंत लोकांचा गरीब देश हे श्रीमंत तरी एवढे साठवून साठवून इन्कमटॅक्सला पळवाट दाखवत दाखवत
खोटे बोलुन बोलून शेवटी भरती कुणाची करतात....
हा भाग वेगळा..
माणसाने पृथ्वीतलावर जन्म घेतला तोच मुळी तो खूप पुण्यवान होता म्हणून ..आणि जन्माला आल्यावर मात्र विसरला ...खरे बोलायचे..सत्यानी वागायचे.धान्याचे चार पाॅकेट दान केले म्हणजे खरेपणा का...?पुन्हा चार पाच फोटो इकडे तिकडे....सगळे थोतांड..
मोठेपणाचा रोग झाला आहे माणसाला
प्रामाणिक पणे कमाई करा खरे बोलुन संसार करा आईवडिलाना फसवु नका
आजकाल आईवडिलाना खोटे बोलणारे महाशय आहेत.सफाईदारपणे गरीब अशिक्षीत आईबापाची फसवणूक करणारे लेकरं ...काय म्हणावं याना
आईवडिलानी काही संस्कार केलेच नाहीत का त्याच्यावर..परंतु व्यसनाधिनतेच्या आहारी जाणारे तरूण..आईवडिलाचा सांभाळ करण्यास देखील नाकारत आहेत आज ...एवढा खोटेपणा..सत्य सत्य असतं...त्याला हातपाय नसतात .सुंदर गंध असतो ..ओठावर एक स्मित असत.
थोड परेशान असत ते...कारण खरं बोललं की कुणालाही राग येतो.परंतु समोरच्यानी माझ्याशी चांगले बोलावे म्हणून मी त्याच्या
चुका लपवून त्याला गोड बोलत राहावे असे त्याला वाटत असेल तर मी तो असत्यतेचा गाढव पणा कधी करू नये असे मला वाटते...एक ला एक च म्हणावे
विनाकारण असत्य लपवण्यासाठी सत्याची साथ सोडुन नये.कोंबडा लपवला म्हणजे दिवस उठवायचा राहत नाही.
धर्माची शिकवण आहे सत्याने वागा .
मित्र तुटतील,नातेवाईक तुटतील मुल बाळ तुटतील कारण खरे बोलणा-या आईचा बाबांचा देखील राग येत असतो.
बाळा सकाळी लवकर उठावे प्राणायाम करावा दूध प्यावे अभ्यास करावा तुझे भविष्य उज्जवल होईल तू खूप मोठा साहेब होशील ...मुलगा पुन्हा तुमच्या जवळ पण येत नाही खरं कुणाला पटलं आहे का?
मला सकाळी उठावं वाटतं नाही ,चहा पिल्याशिवाय जमतंच नाही माझ्याने ते होत नाही...हे आपल्याला ऐकावे लागते.
खरे बोलून काही साध्य होत असेल तर तो स्वतःचा बी.पी.नाॅर्मल व आरोग्यमय जीवन...चैतन्य..
एक वेगळीच शक्ती असते त्या सत्यामध्ये
दुसरे असं खोटे का बोलतात याचा मात्र कधी कधी त्रास पण होतो.
सत्य स्वीकारले पाहिजे ते कडु असो अंबड गोड कसे ही...असत्याचा प्रतिकार करण्याची ताकद आहे त्यात हे विसरू नका. आपल्याला सध्याची पडताळणी करण्यासाठी सर्टिफिकेटची गरज असते
हसू येतं काही वेळेस...लोक एवढे कसे पुढे गेले.की सत्य स्पष्ट पणे नाकारतात
त्याला खोट ठरवण्याचा प्रयत्न करतात
भगवान के घर देर है अंधेरी नही
वो तो इन्साफ करेगा ना |
म्हणून मी नेहमी म्हणत असते
"सत्य कुछ पल के लिए विवश
हो सकता पराजित नही"|
**************************
स्नेहलता कुलथे बीड
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
" सत्य " मुखी वदावे सर्वकाळ
मानवी जीवन संस्कार व संस्कृतीने घडलेले असते.संस्कार व संस्कृतीचे पालन करताना,अनेक चांगल्या गोष्टीचे पालन केले जाते.चांगल्या सवयी माणसाला उत्तम घडवतात.चांगल्या सवयी व चांगली माणसं हे समाजाची प्रतीक आहे.माणूस अनेक कलागुणांनी नटलेला असतो.अनेक चांगल्या सवयींनी घडलेला असतो. मानवाची प्रतिमा ही त्याच्या सत्यावर अवलंबून असते.सत्याची परीक्षा ही कठोर असते.परंतु त्याचा विजय दीर्घकाळ टिकणारा असतो.माणसाला जगत असतांना पावला पावलावर सत्याची परीक्षा द्यावी लागते. माणसाला चांगल्या सवयी बालपणापासून अंगवळणी पडलेल्या असतात.यातीलच एक चांगली सवय म्हणजे खरे बोलणे.सत्य बोलणारी माणसं नेहमी सूर्याच्या प्रकाशा सारखे उठुन दिसत असतात.सत्य हे नेहमी सूर्यासारखे प्रखर व गंगेच्या पाण्यासारखे नितळ असते.सत्याचा सुगंध हा चोहीकडे सदैव दरवळत असतो.आयुष्यात नेहमी सत्य बोलावे. माणसाच्या वाणीतून निघणारे शब्द हे त्याचे प्रतिबिंब उमटवत असतात. माणसाचे कर्तव्य मान-सन्मान अबाधित राखण्यासाठी मनुष्य हा सत्यवचनी असावा.समाजात माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या खऱ्या बोलण्यावरून ठरत असते.सत्य बोलणारी माणसं ही समाजाला आवडणारी असतात.जीवनात कितीही संकटे आली,कितीही मोठा स्वार्थ, फायदा असला तरी सत्य वचनाचा मार्ग सोडू नये.सत्य नेहमी परीक्षा घेत असते.पण सत्याचा निकाल हा आबाधित टिकणारा असतो.समाजात सत्य बोलणाऱ्या लोकांना त्रास झालेला आहे.संत महात्म्य, समाजसुधारक,राजे-महाराजे,थोर विचारवंत यांना अनेक गोष्टीचा त्रास झाला.अनेक संकटांना तोंड द्यावे लागले.परंतु त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही.सत्याचा जीवनात सदैव प्रकाश तेवत ठेवला.त्यामुळे ते आज समाजात आदर्श ठरले.समाजात न्याय, नीती व धर्म टिकून आहे तो सत्यावरच. जेव्हा जेव्हा समाजात अन्याय वाढतो. सत्याला किंमत राहत नाही.असत्य वाढू लागते.तेव्हा क्रांती घडल्याशिवाय राहत नाही.आज देशात धर्म टिकून आहे.संस्कृती टिकून आहे.याच्या मुळाशी सत्य हे खोलवर रुजलेले आहे. या देशात राहतांना संस्कार व संस्कृती बरोबरच स्वतःमध्ये सत्य सुद्धा ठासून भरले पाहिजे.तरच माणसाचे व्यक्तिमत्त्व उत्तम घडेल.सत्य हीच माणसाच्या जीवनाची खरी परीक्षा आहे.आयुष्यात जन्माला येताना सोबत काही आणले नव्हते.व जाताना सुद्धा सोबत काहीच येणार नाही. येथेच मिळवलेले ज्ञान,देह,शरीर सर्व एक दिवस येथेच सोडून जायचे आहे. पण सत्यांनी कमावलेली कीर्ती तुमच्या सोबत येणार आहे.माणसाच्या पश्चात त्याची कीर्तीच त्याची ओळख बनून राहते.माणसाने आयुष्यात सदा सर्वकाळ सत्य बोलावे,सत्य वागावे. येणाऱ्या काळात सत्याची मधुर फळं चाखायची असेल.तर जन्माला आलेल्या मुलामध्ये चांगले संस्कार व खरे बोलण्याची सवय बालपणीच रुजवली पाहिजे.
राजेंद्र प्रल्हाद शेळके
सहशिक्षक
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलडाणा
9823425852
rajendrashelke2018@gmail.com
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सत्य हेच शिव आहे.
सत्य सत्य आहे. मित्रांनो सत्ययुगात फक्त आणि सत्यच बोलल्या जात होतं. त्या साठी कधी कधी सत्ययुगातला मनुष्य आपल्या प्राणांची आहुती देण्याकरिता भीत नसे. प्रत्येक मनुष्यालच्या शब्दाला मान होता.शब्दात ताकद होती. प्राण जाये पर वचन न जाये. प्राणा पेक्षा दिलेल्या वचना कींम्मत होती.राजा हरिश्चंद्र यांना विश्वामित्राने स्वप्नात दान मागितले आणि त्यांनी स्वप्नांत दान दिले पण जेव्हा त्यांना साक्षात जाग आली तेव्हा ते प्रत्यक्ष विश्वामित्राकडे गेले आणि आपल्या जवळ असलेली सर्व संपत्ती ,राज्य दिले एवढंच नव्हे तर काही संपत्ती कमी पडली तर ते व त्यांची पत्नी दुसऱ्या राजाच्या दरबारात कामाला राहुन त्यांनी विश्वामित्राला दिलेले वचन पाळले.रामायणात कैकयी ने वचन मागितले प्रभु रामचंद्रांना आणि 14वर्ष वनवासात राहुन ते वचन श्री रामाने पाळले.सत्य बोलण्याने माणसाचे कर्म चुकत नाही. समोरच्या व्यक्तीची फजिती होते नाही. आणि आपल्या शब्दाला मान राहातो. लोक कुठल्याही संकटात धावून येतात. समाजात एक मानाचे स्थान मिळते.पण अलीकडे इच्छा नसतांनाही खोटं बोलावं लागतं.उदा.एखाद्याने गाडी मागितली तर देण्यास काही च हरकत नसते. पण त्याने जर बरोबर चालवली नाही, अपघात केला तर गाडी आपल्या नावाची असल्यामुळे उगाचच आपल्या मागे झंझटि लागेल म्हनुन खोटं बोलावं लागतं. नौकरी मध्ये आवश्यता असतांनाही साहेब रजा मंजूर करीत नाही.त्यामुळे कोणी तरी नातेवाईकांना देवाज्ञा झाली म्हनुन खोटं बोलावं लागतं. घरात अभ्यास करीत असणार्या मुलांचे मित्र आले तर तो घरी नाही म्हनुन खोटं बोलावं लागतं. शाळेत उशीर झाला तर अचानक पाहुणे आले म्हनुन खोटं बोलावं लागतं. मित्रांनो आता काळच असा आला की इच्छा नसतांनाही दुसऱ्याची मन राखण्यासाठी ही खूप खोटं बोलाव लागत. पण माझ्या मते आपली घरची परिस्थिती कशाही प्रकारची असो पण बडेजाव सांगून कधीच खोटं बोलुन नये. मुला,मुलींचे शिक्षण व नौकरी बाबत स्थळ शोधतांना कधीच खोटं बोलुन नये. कारण इथे आयुष्याचा प्रश्न असतो.सत्य कटु असतं.त्या वेळेस लोकांना आपला राग येतो. पण पुढे येणारे संकट टळल्या जाते हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. कधी कधी एखाद्याचा जिव वाचत असेल तर खोटं बोलायला काही हरकत नाही.पण नेहमी नेहमी लहान गोष्टी साठी जर खोटं बोललो तर आपल्या शब्दाला किंमत राहात नाही. समाजात मान मिळत नाही. आणि महत्वाच्या प्रसंगाला लोक काहीही पडत नाही.आणि म्हनुनच लहान मुलांसमोर आपणही खोटे बोलू नये व निर्भिडपणे आपले मत मांडावे व सत्याचाच स्विकार करावा. शेवटी सत्य सत्य च असतं. जिथे सत्य आहे तिथेच परमेश्वर आहे.
सौ. मेघा विनोद हिंगमिरे. शिक्षिका भारत विघालय वेळा. त.हिंगनघाट जि.वर्धा.
7798159828
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~* आले पाहिजे ...
➖➖➖➖➖➖
चतुर्थी चा दिवस होता .सुमी ची आई गणपती च्या नैवैद्यासाठी मोदक बनवत होती .चार वर्षांची सुमी सारखी आईजवळ लुडबुड करत होती. आई जवळ मोदक मागत होती. आई ने सांगितले बाळा आता नाही मिळणार मोदक पूजा झाल्यावर मी देईन. एकवीस मोदकांचे ताट गॅस जवळ भरुन आई तशीच पुजेच्या तयारीला देवघरात गेली . इकडे सूमीला राहवले नाही तीने ताटातील एक मोदक उचलला व पटकन तोंडात टाकला . इकडे सुमीच्या आईची पूजेची तयारी नैवेद्याचे ताट घ्यायला गॅस जवळ आली .
व ताटातील मोदक मोजून पाहिले तर फक्त वीस मोदक त्यात होते . तीने सूमीला विचारले एक मोदक कुठे गेला . सुमी ने पटकन उत्तर दिले मी खाल्ला . सुमीच्या आईने रागात सुमीच्या गालावर फटका मारला व म्हणाली तुला सांगितले होते ना पूजा झाल्यावर देते तुला मोदक. तरी तु पुजेच्या आधी उष्टा का केला? सुमी लहान निरागस मुलगी तीला कळले नाही आईने मला का मारले. नैवेद्य , पूजा हे तीला समजण्या पलिकडे होते .ती लहान तीला फक्त खायची वस्तू नवीन दिसली तीच्या ने रहावले नाही .म्हणून तीने मोदक खाल्ला .
यात दोन गोष्टी सत्य होत्या एक सुमी नासमज लहान मुलगी आणि दुसरे नैवेद्य उष्टा झाला. सुमीच्या आईने फक्त एकच सत्य स्वीकारलं नैवेद्य उष्टा झाला .पण सुमी लहान आहे अजून नासमज आहे हे सत्य तिला पटकन स्वीकारता आले नाही.
सत्य हे नेहमीच कटू असते हे जरी खरं असलं तरी ते समोरच्याला न दुखवता त्याला सत्याची जाणीव करून देणे ही पण एक कला आहे . आपण पाहतो आजकाल लहान मुलं पटकन खोटं बोलून आपलं काम भागवून घेतात
पालकांची नेहमी तक्रार असते आमची मूलं आजकाल खूप खोटं बोलायला लागले आहे .
याला जबाबदार कोण ? मुलं की आजूबाजूचे वातावरण ? असं म्हणतात पाच वर्षांपर्यंत लहान मूल हे ओल्या मातीचा गोळा असतो त्याला आकार देणं हे पालकांच्या हातात असते. नंतर मूल जसे जसे मोठे होत जाते तसे त्याचे संस्कार पक्के होत जातात. मुल जेव्हा सुरवातीला चुक करत आणि आपली चुक स्वीकारुन खरं बोलतं तेव्हा ते सत्य आणि त्यामागचे कारण आपण समजावून न घेता आपण चिडचिड करतो त्याला मारतो.त्याला शिक्षा करतो .लहान मुलांसाठी आपल्या आई वडीलांशिवाय जवळच दुसरं कोणी नसतं ते चुक झाल्यावर मोठ्या विश्वासाने आईवडीलांना समोर आपली चुक कबूल करतात. त्यांना अपेक्षा असते माझे आई-वडील मला समजून घेतील .
इथेच आई-वडीलांची खरी कसोटी असते ते आपल्या मुलाला किती समजून घेतात त्याची मुलगा जेव्हा चुकतो आणि ती चुक खरं सांगून कबूल करतो त्यावेळी जर पालकांनी त्याला मारलं किंवा टाकून बोललं तर पुन्हा कधीही ते मुल आपल्या पालकांजवळ खरं बोलत नाही काहीतरी खोटं बोलून आपलं काम भागवून घेतो. आणि मग आईवडीलांपासुन मुलं मनाने दुरावत जातात .
लहान असो वा मोठे चुका प्रत्येकाकडुन होतात . पण खरं बोलण्याचं धाडस तिथेच होते जिथे आपल्याला मनापासून समजून घेणारं कोणी आहे हा विश्वास जिथे निर्माण झालेला असतो.
ज्या कडून चुक झालेली आहे तो आधिच खूप खचलेला असतो. त्याला गरज असते धीर देण्याची त्याला विश्र्वास देण्याची त्या त्यावेळी जास्त प्रेमाची गरज असते .
जर त्याने चुक कबूल केली तर त्याने खूप हिंम्मत केलेली असते पण, समोर येणार्या परिणामांचा सामना करायची हिम्मत त्याच्यात नसते. चुक कबूल केल्यावर जर त्याला समजून घेतले तर तो तीच चुक पुन्हा करणार नाही पण जर त्यावेळी याला समजून घेतले नाही तर तो पुढच्या वेळी खोटं बोलेल व तीच चुक पुन्हा पुन्हा करत राहील . असं म्हणतात ना वाईट म्हणून कोणी जन्माला आलेलं नसतं त्याच्या भोवतालची परिस्थिती त्याला वाईट बनायला भाग पाडत असते.म्हणून प्रत्येक पालकाने हे लक्षात घेतले पाहिजे मुलं चुकतात तेव्हा त्यांना प्रेम आणि सांत्वन या दोघांची गरज असते ते जर पालकांकडून नाही मिळाले तर ते तेच प्रेम आणि सांत्वन मित्र मंडळीत शोधतात . मग पुढे जाऊन आपल्या आई वडीलांपेक्षा त्यांना मित्रमंडळी जास्त जवळचे भासू लागतात . मित्रांची सोबत चांगली असेल तर ठीक नंतर वाईट संगतीला लागून मुलं वाईट मार्गकडे वळतात घरच्यांच ऐकत नाहीत. म्हणूनच पालकांनी मुलांच्या खोटं बोलण्याच्या मागचे कारण जाणून घेतले पाहिजे त्याच्या अशा चुकीच्या वागण्या बोलण्यातील बदला मागे कुठेतरी मीच जबाबदार नाही ना हे ही पालकांनी वेळीच तपासून पाहिले पाहिजे .
आपलं मुल म्हणजे एक छोटंसं रोपटं त्याला वेळीच प्रेमाचे पाणी आणि सांत्वनाचे खत मिळाले की ते रोपटे आपल्याला म्हातारपणी वटवृक्ष बनून प्रेमाची छाया नक्कीच देईल .
म्हणून मुलांना समजून घ्या तो खोटं बोलला म्हणून लगेच त्याला शिक्षा देऊ नका . त्यामागचे कारण जाणून घ्या .आणि तो खरं बोलला तर त्याला प्रेम द्या त्याच्या खरे पणाचे कौतूक करा .
त्याच्या मनात आपल्यासाठी विश्वासाची जागा निर्माण करा म्हणजे ते लहानसे रोपटे तुमच्या साठी पुढे जाऊन वटवृक्ष बनून प्रेमाची छाया नक्कीच बनेल.
🖋 सौ सुवर्णा सोनावणे
चाळीसगाव
७७४४८८००८७
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
" सत्य - एक संस्काराचा मोती "
मानवी जीवनात अनेक संस्कार व नीतीमूल्यांचे एक अविभाज्य स्थान असते . सामाजिक घटकांचा व वातावरणाचा प्रभाव हा मानवी व्यक्तीमत्वामध्ये परिस्थितीसापेक्ष दिसून येतो . हे एक निर्विवादीत अटळ कटू सत्य आहे !!
" जे पेराल तेच उगवेल ! "
ह्या उक्तीनुसार आपण आपल्या पाल्याला जसे आपण सत्य - असत्य बोलतो , तसेच तो बोलण्याचे कसब आत्मसात करीत असतो . कारण ती मूलतः निष्पाप व प्रांजळ मनांची असतात . कपट , ईर्षा , हेवा , स्वार्थ , इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती इत्यादी दुर्गुण ही मूले मोठ्यांच्या वर्तनशैलीतूनच नकळत स्विकारतात .
" जेव्हा पाणी आपल्या गळाशी येते तेव्हाच मानवाचे डोळे उघडले जातात ! "
वडिलांचे छत्र हरवलेला एक गरीब मुलगा आपल्या आईसह एका झोपडीत राहतो . तो दररोज शाळेत जातो . शाळेतील श्रीमंत मुलांची दप्तरे , पोशाख , बुट , इत्यादी गोष्टी पाहून तो मोहून जातो . एके दिवशी सर्वांची नजर चुकवून एक पेन चोरून घरी आणतो . आणि आपल्या आईला म्हणतो , " आई ! हे बघ , ही पेन मला रस्त्यावर सापडली . " मग आई त्याच्या असत्य बोलण्यावर विश्वास ठेवून , " घे ठेऊन ! छान आहे ! " असे म्हणते . मग असेच तो मुलगा एक - दोन दिवसातून अशीच लहान - मोठी चोरी करून आईला ही वस्तू सापडली वा कुणी दिली अशी थाप मारत असतो . असेअसते करत करत तो या असत्याच्या आधारे श्रीमंती मिळवीत एक चोर - गुन्हेगार बनतो . एका अशाच चोरीच्या प्रसंगी त्याच्या हातून खूण होतो व फाशीची शिक्षा देण्यात येते . तेव्हा फाशीला जाण्यापूर्वी अंतिम इच्छा म्हणून तो आईला काही बोलायचं आहे असे म्हणतो . जेव्हा आई जवळ येते तेव्हा तो आईच्या कानाचा कडाडून चावा घेतो . जेलर विचारतो , " तू आईशी असे का वागलास ? " तेव्हा तो मुलगा म्हणतो , " मी जेव्हा खोटे बोलून घरी वस्तू चोरून आणत होतो , तेव्हा जर या आईनं हे कुठून आणले याची सत्यता पडताळून वेळीच सत्याचे मार्गदर्शन केले असते तर आज ही शिक्षा मला मिळाली नसती! "
तात्पर्य , एका असत्य बोलण्याच्या सवयीमुळे मानव अनेकदा संकटांच्या जाळ्यात गुंतत जातो . शिवाय एक खोटे लपविण्यासाठी अनेक खोटे बोलणे हे ओघानेच येते ! परिणामी अशा व्यक्ती जीवनात इतरांच्या दृष्टीने वाईट ठरतात . वेळीच संस्कार करून जीवनात सत्याचे महत्त्व निदर्शनास आणून द्यावे , फार उशीर करू नये .....
राजकारण वा वस्तूंच्या जाहिराती यात मात्र हमखास खोटे बोलले जाते . सामान्य जनतेची दिशाभूल केली जाऊन त्या खोट्या बतावणीला ती बिचारी बळीही पडतात . आणि फसगत होते . अनेक सौंदर्य प्रसाधने हे कमी दर्जाची असली तरी खोटी लेबल लावून विकून समाजातील घटकांची लूट केली जाते ही कुठंतरी थांबायला पाहिजे ना !
" बोलणारा मातीही विकतो पण न बोलणारा सोन्यासारखे गहूही विकू शकत नाही !"
हे एक वास्तविक खरंच आहे ! तसेच " सत्य ही एक मानवाला निर्भीड व आत्मविश्वासू बनवतो . " कारण सत्याचा मार्ग हा काटेरी व खाचखळग्याचा असा खडतर असतो ! " जो बालपणीच आपल्या संस्कारात हे सत्याचे बालकडू प्राशन करतो त्याला जगात काहीच अशक्य नसते !! "
" सत्य असा संस्काराचा मोती
अंगीकारता होई विश्वी किर्ती
दिव्य ज्ञानाकडे नेई ही ज्योती
सर्व मानवांमध्ये फुलवी प्रिती !!
चला तर मग आपण सारे मिळून ह्या सत्यरूपी मोत्यांच्या माळा बालपणीच बालकांना घालून सुसंकारीत करूया ! आणि एका सुंदर अशा सुसंस्कृत व सुसंस्कारी समाजाच्या निर्मितीला हातभार लावूया !!
अर्चना दिगांबर गरूड (स.शि.)
प्रा. शा. पांधरा , कें. मोहपूर
मु. पो. किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552954415
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
'आधुनिक सत्याची संकल्पना'
डॉ. हरिश्चंद्र भोईर,शहापूर(ठाणे)
' सत्य हे सुर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आणि स्वच्छ असतं' असे म्हटले जाते.कारण ते कधी ना कधी तरी बाहेर पडतच!!म्हणूनच कदाचित 'कोंबड झाकलं तरी उजेडायचं राहत नाही'अशी म्हण प्रचलित झाली असावी! खरे बोलणे ही प्राचीन काळा मध्ये संस्कृती मानली जायची....असत्य कथन केल्याने अनेकांना 'शापित'व्हावं लागल्याची बरीच उदाहरणे पुराणात सापडतात.
'नेहमी खरे बोलावे' असं कितीही ओरडून सांगितलं तरीही सांगणारा आणि ऐकणारा दोघांनाही ते जीवनात आत्मसात करणं जवळपास अशक्य आहे.आजच्या काळात तर ते व्यवहार्य होईलच असे नाही...!!
मुळात माणूस सत्य बोलण्याचं का टाळतो याची जर कारण मीमांसा पहिली तर लक्षात येतं बऱ्याचदा वैयक्तीक स्वार्थापोटी सत्य झाकण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.तसेच वैयक्तिक 'मोठेपणा'चा बडेजाव करताना किंवा कधी कधी आपण इतरांच्या पेक्षा कसे महान आहोत हे दाखविण्यासाठी किंवा दुसऱ्याची मर्जी प्राप्त करण्यासाठी सर्रास खोटेपणाची परिसीमा गाठली जाते... आणि मग एक खोटं लपविण्यासाठी शंभरवेळा खोटं बोलावे लागते.ज्यांचा उल्लेख 'धर्मराज' म्हणून केला जातो व ज्यांना सत्यवचनी संबोधले जाते असे महाभारतातील पांडव पुत्र युधिष्ठीर यांनाही 'नरो वा कुंजरोवा' म्हणत थोडाफार का होईना असत्याचा सहारा घेतलाच होता.परंतु स्वप्नात दान देणारा 'राजा हरिश्चंद्र' ,याचक म्हणून साक्षात देवेंद्र आलेले आहेत हे माहीत असूनही आपली 'कवच कुंडले' हसत हसत काढून देणारा दान वीर "कर्ण' अशा अनेकांनी मरेपर्यंत सत्याच्या वाटेवर जाऊन आपल्या सत्यवचनाची मिसाल जगापुढे अमर ठेवण्याचं काम केलं आहे.म्हणूनच कदाचित 'सत्य त्रासदायक ठरू शकते पण पराभूत होऊ शकत नाही' असं म्हटलं जातं असावं!!
आज माणूस इतके खोटं बोलतो की त्याला मर्यादा राहिलेल्या नाही. मोबाईल वरुन तर सहजपणे खोटं बोलले जाते.आपल्या मुलांच्या समोर खोटे बोलून त्यांच्यावरही खोटेपणाचे नकळत संस्कार होतील हे सोयीस्कर पणे विसरले जाते. सत्य हे बऱ्याचदा कटू असते पण आपल्या प्रिय व्यक्तींना वाचविण्यासाठीही याचा वापर सहजपणे केला जातो.तसं पाहिलं तर सत्य लक्षात ठेवावं लागतं नाही मात्र काय खोटं सांगितलं ते मात्र लक्षात ठेवावेच लागते. असं असूनही आजच्या कली युगात मात्र सत्य वचनी माणसांना खूप त्रासांना सामोरे जावे लागते म्हणूनच आधुनिक काळात 'खोट्याच्या कपाळी गोटा' ही म्हण कालबाह्य होऊन 'खऱ्याला खय आणि खोट्याला जय'अशी म्हण प्रचलित झाली असावी!!
आज जीवन व्यवहारात जर सत्याने वागायचे ठरवले तर घरीदारीच नव्हे तर जिथे जाऊ तिथे किती संकटांना वा त्रासांना सामोरे जावे लागू शकते याची गणतीच करता येणार नाही.... कायम स्वरूपी नाही पण फक्त एक दिवस जरी खरे पणाने वागायचे ठरवले तरी दिवस भरात कितीतरी भांडणे आणि गंमती जमतींना सामोरे जावे लागेल याची गणतीच न केलेली बरी!!म्हणून आजच्या काळात 'कालाय तत्समै नमः' म्हणत दुसऱ्याना फार नुकसान वा पीडा होणार नाही इतकं मर्यादित खोटं बोलून 'सत्यवादी हरिश्चंद्र ' होण्यापेक्षा 'आधुनिक हरिश्चंद्र' बनण्याचा प्रयत्न करूया!!!
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~* सत्य असे गोड
सत्यवादी लभेतायुरनायासमथार्जवम् l
अक्रोधनोsनसूयश्च निर्वृत्तिम् लभते पराम् ll
जो नेहमी खरे बोलतो, त्याला इतरांपेक्षा जास्त आयुष्य लाभते. अशा माणसाला कुठल्याच गोष्टीचे भय नसते, लालसा नसते. सत्य बोलणारा क्रोधी नसतो. अशा माणसावर नेहमी देवाची कृपा असते.
'सत्य' शब्दाचा अर्थ साधारणपणे खोटे न बोलणे असा घेतला जातो. सत्य शब्द सत् आणि तत् धातू मिळून बनला आहे. म्हणजे हे आणि ते सुद्धा. कारण सत्य एका बाजूने पाहिल्यास त्याचे पूर्ण रूप कळेलच असे नाही. दोरीला पाहून साप म्हणणे सत्य नव्हे. पण दोरीला पाहून भीती वाटली हे सत्य आहे. म्हणजे दोरी साप नाही, पण भीती खरी आहे. याचा अर्थ आपण खोटे बघितले नाही, तर चुकीने एका खोट्याला खरे मानले. आणि त्यामुळे मन भीतीयुक्त झाले. सत्य समजण्यासाठी तार्किक बुद्धी हवी.
जीवनात सुख आणि दुःख सत्य नाही. तर तुम्हाला त्याची जी प्रचिती येते ती सत्य असते. एकाला वाटणारे सुख किंवा दुःख दुसऱ्याला तसेच वाटेल असे नाही.
असत्य बोलण्याची बरीच कारणे असतात. त्यातले मुख्य कारण लोभ. त्यात काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. बरेचदा विक्रेता खराब वस्तूंना चांगले म्हणून आपल्या माथी मारतो. कारण त्याला पैशाचा लोभ असतो. स्वार्थ साधायचा असतो.
खोटे बोलण्याचे दुसरे कारण भीती. जेव्हा खरे बोलण्यामुळे माणसावर काही आपत्ती येईल, त्याचा तोटा होईल, हानी होईल, असे वाटते, तेव्हा भीतीने तो खोटे बोलतो. खोटे बोलून त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपल्या बॉसला लाच घेताना पाहिलेले असते. पण तसे खरे सांगितले, तर नोकरी जाईल, या भीतीने खरे बोलणे टाळले जाते. खोट्याची मदत घेतली जाते.
खोटे बोलण्याचे तिसरे कारण मनोरंजन, किंवा दुसर्याची मजा करणे, खिल्ली उडवणे. काही वेळा खोटे बोलून माणसाला गोंधळात टाकले जाते आणि बाकी लोक त्याची मजा घेत असतात. एप्रिल च्या एक तारखेला एप्रिल फूल च्या गमती आठवा.
सत्य बोला, दुसऱ्याला आवडेल असे म्हणजे गोड बोला, पण कटू सत्य बोलू नका, असे म्हणतात. ते खरेच आहे. समोरच्या माणसाला "तू गर्विष्ठ आहेस" असे कटू पण सत्य सांगितलेले आवडेल का? असे बोलण्याने आपण शत्रुत्व ओढवून घेऊ. तेव्हा असे बोलणे टाळलेले बरे.
धर्मराजाने 'अश्वत्थामा पडला' म्हटल्यावर द्रोणाचार्य दुःखाने मूर्छित झाले. तेव्हा त्यांना घोडा अश्वत्थामा पडला की द्रोण पुत्र,ते स्पष्ट सांगितलेले नव्हते. तो खोटे बोलला नाही पण पूर्ण सत्यही नाही. त्यापासून नरो वा कुंजरो वा असे म्हणण्याचा प्रघात पडला.
सत्यवचनी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर श्रीराम आणि राजा हरिश्चंद्र ही दोन नावे येतात. कायम सत्य बोलणारे म्हणून यांच्या गोष्टी लहानपणापासून आपण ऐकत आलो. इतकी युगे झाली तरी त्यांच्या सत्य वचनामुळे दोघे अजरामर झाले. स्वप्नात दिलेले वचन राजा हरिश्चंद्र याने पूर्ण केले. असा हा सत्यवचनी राजा.
खरे बोलण्यासाठी कसलीही तयारी करावी लागत नाही. ते अंतःकरणातून आपोआप बोललं जातं. त्याचे संदर्भही पाठ करून, लक्षात ठेवावे लागत नाही. कारण ते तसेच घडलेले असतात त्यामुळे आपोआप मेंदूत जाऊन बसतात.
खोटे बोलण्यासाठी तयारी करावी लागते. ते तसेच्या तसे लक्षात ठेवण्यास त्रास होतो. एक खोटे बोलले की त्या अनुषंगाने आणखी खोटे बोलावे लागते. अशी खोटे बोलण्याची शृंखला तयार होते.
खून, दरोडे, चोऱ्या अशी अपकृत्य करताना माणूस कुठे ना कुठे काही तरी धागा किंवा पुरावा तेथे सोडून जातो. त्यामुळे अशा गोष्टींचा तपास करता येतो. खरा अपराधी सापडतो. आणि मग आंधळी न्यायदेवता खरा न्याय देते. तेथे सत्याचाच विजय होतो.
खोटे बोलणाऱ्या चा स्वभाव शंकेखोर असतो. त्याचा कोणावर विश्वास नसतो, अगदी स्वतःच्या मुलावर सुद्धा. पण खरे बोलणाऱ्याचे तसे नसते. त्याचा चष्मा खऱ्या चा असतो. त्यामुळे त्यातून जे दिसते यावर त्याचा विश्वास असतो. त्यामुळेच त्याचे आत्मबल, आत्मविश्वास वाढतो. कुठली गोष्ट सहज रित्या confidently केली जाते. खरे बोलणाऱ्या ला अंधारातही सत्याचा प्रकाश वाट दाखवीत असतो. पण खोटे बोलणारा अंधाराच्या गर्तेत खोल जाऊ लागतो.
सत्य सुरुवातीला कटू वाटते. पण काही काळानंतर सत्यता समोर येताच गोड वाटू लागते. एखाद्या बाळाचे व्यंग एखाद्याच्या लक्षात येते. ते कटू पण सत्य सांगताच बाळाच्या आई वडिलांना राग येतो. त्या माणसाला अद्वातद्वा बोलतातही. न राहवून ते डॉक्टर कडे जातात. डॉक्टरही तेच सांगतात. लवकर वेळेत, औषधोपचार झाल्याने ते बाळ पूर्णपणे बरे होते. नंतर तोच माणूस त्यांना आवडू लागतो. त्याची क्षमा मागितली जाते.
सत्य बोलणे केव्हाही चांगलेच. पण त्यामुळे एखाद्याचा जीव जात असेल, तर तसे करणे योग्य ठरेल का? या आधुनिक युगात सत्याची कास धरून वागल्यास प्रत्येक वेळी योग्य ठरेलच का?
लाचलुचपत, खोटे बोलून दुसऱ्याला लुबाडून, मिळालेला पैसा टिकत नाही. लाभत नाही. 'सत्याने मिळतं, तेच टिकतं'.
स्नाना मुळे शरीर निर्मळ, स्वच्छ होते. साबण लावल्याने वस्त्र निर्मळ होते. तशी वाणी सत्य बोलण्याने निर्मळ होते. सत्य तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे. म्हणूनच म्हटले आहे 'सत्यमेव जयते'.
शुभदा दीक्षित
पुणे
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
खरं बोलणं... !!
माझ्या मते सांगायचं झाल्यास माणसाचे प्रेमाचे खरे दोन शब्द जगण्याला सार्थक आहेत. माणूस पैश्याने कितीही मोठा असला तरी तो लोकांशी न बोलता राहू शकत नाही. आणि पैश्याच्या गर्वात राहून लोकांशी संवाद साधत नसेल तर त्याला माणूस म्हणूनही काही अर्थ नाही. कारण माणसांनी माणसाशी बोलणं हेच जीवन आहे.
त्यात बोलण्याचे दोन प्रकार आहे. खरे आणि खोटं.
खरे बोलून दुरच्या व्यक्तीला जवळीक करता येतो,तर खोटं बोलून जवळच्या नात्याला किंवा माणसाला दूर करता येतो, बोलण्यामध्ये एवढी ताकद असते की मोठं मोठे वक्ते आपल्या बोलण्याने बहुतांश व्यक्तीचे मन आणि भविष्य बदलवून टाकतात.
हल्ली तर अस झालं आहे की किती ही आपल्या जवळचा मित्र असो काही दिवस बोलणं नाही झालं ना, तर अलगतच कुणीतरी आपली जागा घेतो,, त्यामुळे आपण कधीही नात्यात स्पष्ट स्पष्ट बोलत गेलो ना तर कसल्याही प्रकारचं प्रॉब्लेम होत नाही व झाला तरी पण ते बोलूनच solve करू शकतो. आपण अबोल राहिलांन , तर गैरसमज हा विषाणू सारखा वाढत जातो, आणि कितीही जवळीक नात असो त्यात दुरावा निर्माण होतो.
एखादा आपला पार्टनर कुणाच्या सांगण्याने किंवा काही गैरसमजीने दुरावत असेल तर त्याच्याशी सवांद साधून त्याला जवळ घेणे हा एकमेव पर्याय आहे, बोलण्यानेच प्रत्येक प्रॉब्लेमचे उत्तरे मिळू शकतात,,
एखादी वेळी कुणी तुम्हाला वाईट बोलले किंवा समजले तर त्यांना वाईट समजू नका, होऊ शकते त्यांचे विचारचं त्या पद्धतीचे असतील.त्यामुळे तुम्ही स्वताच्या मनालाही लावून घेऊ नका आणि त्याला स्पष्टीकरण देऊन आपलं वेळ पण वाया घालु नका. आपण चांगले असेल ना तर चांगलेच राहा. वेळच एके दिवशी त्यांना नक्की उत्तर देतो.
आजकाल इंटरनेट च्या या युगात माणूस माणसापासून दूर होत जात आहे, याच कारण म्हणजे माणसाचे सवांद कमी झाले. माणसाला आपल्या माणसाशी बोलायला वेळच मिळत नाही, मिळत नाही म्हटल्यापेक्षा आपण काढत नाही म्हटलं तरी चालते, सर्वच नाही पण बहुतांश व्यक्ती, सकाळी उठलं अंघोळ, नास्ता,पाणी करून ऑफिस , या कामाला जातो, तिथे 5 ते 6 वाजेपर्यंत काम केलं. मग घरी आल, की ऑफिस मध्ये मोबाईल पाहायला वेळ मिळाली नाही म्हणून सर्वात आधी घरी आल्यापासून तर जेवून झोपेपर्यंत मोबाईल, इंटरनेटवरच चिपकुन असतात, आणि मजेदार गोष्टी ही की आजकाल ताणतणाव कमी करण्याच साधन म्हणजे लोक इंटरनेट म्हणून बसले आहे. आणि हे खरे असेलही,पण त्यांना कधी कळेल एक दिवस हे ताणतणाव कमी करण्याचे साधन व्यसन बनून जाईल. आणि हे खरे आहे,, कधी थोडं विचार करून घरच्यांशी, मित्रांशी बोलून कधी टूर, तर कधी जुन्या आठवणी ताज्या करायला आजकाल लोकांकडे वेळच उरलेली नाही.
खर सांगायचं म्हटलं आयुष्यात काही कमवायचे असेल तर मानस कमवा,पैसे तर कुणीही कमवू शकते, विश्वासाचे माणस कमविण्यात खूप ताकद लागते, खूप सहन करा लागते, कारण जीवनाची खरी मजा या माणसात आहे , आणि हे विकत किंवा असंच मिळत नाही, त्यासाठी त्यांच्याशी छान सवांद साधून विश्वासात बसवणं हेच एकमेव साधन आहे.
मी माझ्या आयुष्यात पैसे काहीच नाही कमवले, मात्र मानस खूप कमावली, हहहहह.... मानतो की थोडं attitude मुळे काही गमवावी लागली.. तर हा attitude कसला तर माझ्या कडे छान छान माणस होती तेच माझें सर्वकाही होते.. त्यांना आता खूप आठवतो पण पाहिले सारख राहू शकत नाही, कुठंतरी एक गाठ पडली आहे.. पाहिले बोलू शकलो नाही,, आणि आता बोलण्यात काही अर्थ नाही..
आणखी एक गोष्ट म्हणजे आपण सर्वात जास्त कशाला भितो माहिती आहे का.? लोक आपल्या विषयी काय म्हणतील किंवा काय बोलतील.? पण सांगायचं हे की यावर आपल्याला काही विचार करायची गरज नाही, फक्त आपण इतकंच करायचं की स्वतांवर विश्वास ठेवून छान कार्य करायचं, छान राहायचं आणि छान बोलायचं, कारण कुठंतरी वाचल माणसाची जीभ जर गोड असेल ना, तर त्याच्यात जग जिंकायची शक्ती असते...!!
धन्यवाद.......
कु.महेंद्र संगावार
गडचिरोली
(९०११५६०४९८)
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सदा सत्य बोला....
__________________________
ओं री मैया मोरी मैं नहीं माखन खायो ..,.. असे हे लाडीक बाळकृष्णाचे बोल . यशोदा मातेला ही खरे वाटत नाहीत . तिला माहित असते लोणी खाणारा हा बाळकृष्ण च आहे . नंद यशोदेला या बाळकृष्णाच्या बाललिलांनी आनंदीत केलं असेलही . तरी यशोदा माता या बालकृष्णाला शिक्षा देतच होती .
सांगायचा मुद्दा हा की आपल्यालाही लहानपणी खोटे बोलायची सवय होतीच की .आणि मोठे झाल्यावर तरी काय फरक पडलाय आपल्यात ? फोनवर बोलताना आपण किती सहज पणे खोटे बोलून जातो . प्रवासात असताना कुठे आहात ? असे जर कोणी विचारले तर आपल्या सोई प्रमाणे आपण त्याला अलिकडचे किंवा पुढचे स्टेशन सांगतो . माणूस खोटे का बोलतो ? भिती पोटी किंवा स्वार्थापोटी .
लहानपणी गुरुजींनी विचारले की काल शाळेत का नाही आलास ? तर आमचे उत्तर ठरलेले असायचे गुरुजी माझे पोट दुखत होते .!
मोठा झाल्यावर नौकरी लागली . साहेबांनी विचारले ऑफिस ला यायला उशिर का झाला ? उत्तर तयार सर ट्रॅफिक जॅम होते , अडकलो . , गाडी पंग्चर झाली वगैरे वगैरे .
एकदा तर हद्द झाली . माझा सहकारी मित्र अचानक गावाला निघून गेला . बाॅस ने फोन करून विचारले कुठे आहात ? पलिकडून मित्र बोलला , सर माझे वडील वारल्यामुळे मला गावाकडे यावे लागले .
सर अचंबित झाले , व मित्राला फोन वर म्हणाले अहो तुमचे वडील तर मागच्या वर्षीच वारले ना ?
मागच्या वर्षी तुम्ही १५ दिवस त्यासाठी रजा काढून गेला होता ना ?
सदा सत्य बोला ..... ही शिकवण आहे . उपदेश आहे ... फक्त समोरच्यानेच सत्य बोलावे अशी आपली अपेक्षा असते .
खोटे सांगून , खोटे वागून फायदा होईल ही पण तो तात्पुरता असतो . खोटेपणा कधी ना कधी उघडा पडटतोच . सत्य हे अमर असते . सुर्यप्रकाशा सारखे प्रखर , तेजस्वी . खोटे हे बिथरले असते , दांभिक असते तर सत्य हे निडर असते त्याला कशाचीही भिती वाटत नाही . खोटे हे मिंधे असते . कोणाच्या तरी दबावाखाली मुके बनते . सत्य कोणाला भित नाही .
सत्य बोलणार्यास वाईट पणा घ्यावा लागतो . लोकं त्यांच्या पासून दूर राहातील त्याला त्रास देतील पण सत्य हेच अंतीम आहे . त्याचा अंगीकार करा
सदा सत्य बोला .....
अरविंद कुलकर्णी . पिंपरखेडकर
9422613664
arkulkarni.1955@gmail.com
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~* सत्य किंवा खरे बोलणे
सत्यमेव जयते ह्या उक्तीनुसार नेहमी सत्याचा विजय होतो.हे प्रकाशाइतके स्वच्छ आणि खरे आहे.खरे बोलण्याची शिकवण आपल्याला घरात, शाळेत दिली जाते.आपण त्या गोष्टीचे नेहमी पालन करायला हवे.एक वेळा खोटे बोलले की मग ते खोटे लपवण्यासाठी प्रत्येक वेळी खोटे बोलावे लागते.आणि ही खोट्याची मालिका सतत चालत राहते.खोटे बोलण्याच्या सवयीमुळे योग्य गोष्टींची परिणामकारकता घटते.आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा विपरित परिणाम होतो.
त्यापेक्षा खरे बोलणे प्रत्येक वेळेस मनाला खंबीर बनवत जाते.प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याची मनाची तयारी होते.खरे बोलल्याने कसलीही लपवाछपवी करावी लागत नाही.खोटं लपवण्यासाठी दरवेळी नवीन शक्कल लढवताना मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते.त्यामुळे मनामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते.
त्यामुळे कधीही खरे बोलणेच श्रेयस्कर असते.खरे बोलणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नेहमी उज्ज्वल असते.खरे बोलताना जास्त श्रम लागत नाहीत.आणि त्याचा पराजय सुद्धा होत नाही.
© सौ.गौरी ए.शिरसाट
मुंबई;
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*सत्य
सत्याचा मार्ग नेहमी पोटातून जातो नि असत्याचा डोक्यातून. सत्य पटकन तोंडातून बाहेर पडतं. पण असत्य बोलायला डोकं वापरावं लागतं. योजना आखावी लागते. सत्याचा मार्ग काटेरी असतो. परंतु त्यातून हिरवळ फूलते
असत्याचा मार्ग शेवटी खाईतच ढकलतो. म्हणून खोटे बोलताना खूप विचार करण्यात शक्ती वाया घालवावी लागते. सत्यवचनी राजा हरिश्चंद्र,युधिष्ठीर,श्रीराम ही नावे आजही आपल्या मनपटलावर कोरलेली आहेत. त्यांचा सत्य बाणा आपणास आदर्शवत वाटतो. त्यातील थोडा जरी अंश आपण आचरणात आणला तरी मनुष्यजन्माचे सार्थक झाल्याप्रमाणे वाटेल.
श्रीलंकेचा राजा रावण जन्माने दानव होता परंतु तोही सत्यवादी होता. लहान मुले खूप कारणांसाठी खोटे बोलतात. कधी चोरून लाडू, चॉकलेट खाल्ले तर कधी गृहपाठ केला नाही तर. ते खोटे बोलून वेळ निभावून नेतात परंतु मोठ्या लोकांचे हे काम आहे की त्यांना खोटे बोलणे हानिकारक असते हे उदाहरणासह पटवून देणे. त्यासाठी त्यांनी स्वतः खोटे बोलायला नको. शाळेत शिकवताना गुरुजी नेहमी "खरे बोलावे" असे शिकवतात. खोटे बोलणे एखाद्या व्यसनाप्रमाणे असते. एकदा खोटे बोलण्याची सवय झाली तर ती निघता निघत नाही. खोटे बोलण्यासाठी दहा वेळा खोटे बोलावे लागते हेही तितकेच खरे. ऑफिसमधील बॉसचा फोन आला आणि बाबांनी त्यांना मी घरी नाही हे छोट्या मुलांसमोर सांगितले तर त्या मुलाच्या मनावर विपरित परिणाम होतो.एकतर तो मुलगा खोटे बोलायला शिकतो किंवा खोटे बोलणाऱ्या बाबांचा राग राग करतो. त्यामुळे ज्याप्रमाणे शब्द जपून वापरावेत याप्रमाणे खोटे बोलताना नेहमी वास्तवतेचे भान ठेवावे.यांत नुकसान नाही होत. झाला तर फायदाच होईल.
सौ.भारती सावंत
मुंबई
*~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~*
सत्यमेव जयते
इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मोहनचा शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर आला आणि त्याला
बक्षीस म्हणून 'सत्याचे प्रयोग'हे महात्मा गांधीजींचे पुस्तक मिळाले घरी आल्यावर सर्वांना त्याने पुस्तक दाखवले आजी म्हणाली अरे वा छान बक्षिस मिळाले मोहनला. गांधीजी खरे बोलत, खरे वागत त्यांचं हेच आचरण आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात आचरणात आणायला हवे बर मोहन.आजोबा म्हणाले मग काय मोहन आजपासून सर्वांनी खरे बोलायचे बर का.
आई म्हणाली बघा बर सर्वांनी खरेच बोलायचे आहे कठीण आहे ह खरे बोलणे बघा विचार करा आणि मगच ठरवा इतकयात पप्पा म्हणाले काय अवघड आहे त्यात खर तर बोलायचं आहे ते तर सर्वच बोलतात .आजी म्हणाली ठरलं तर मग आजपासून सर्वांनी खर बोलायचं.
हा संवाद चालू असताना पप्पांचे मित्र सदुकाका घरी आले आणि म्हणाले अरे जरा तुझी गाडी देतोस का माझ्या गाडीच पेट्रोल संपल आहे जरा किराणा सामान आणायचं आहे आणि येताना पेट्रोल घेऊन येतो माझ्या गाडीत टाकायला.पप्पांचा गाडीमध्ये भारी जीव गाडी कुणाच्या हातात द्यायला ते तयार होत नाहीत ,पप्पांना सदू काकांना गाडी द्यायची नव्हती मग ते म्हणाले अरे सदू दिली असती रे गाडी पन मला जरा लवकर जायचं आहे बँकेत आज .सदुकाका म्हणाले ठीक आहे बघतो दूसरी काही सोय
आणि ते गेले .आई हे सर्व ऐकत होती आई म्हणाली मी म्हटलं होतं ना नाहीच जमणार खर बोलायला
बघा तुम्ही खोटंच बोललात ना आत्ताच तुम्हाला आज लवकर जायचं नव्हतं तरी लवकर जायचं असे म्हणालात, तसे पप्पा ओरडले अरे माहिती आहे ना तुम्हाला मला माझ्या गाडीला कोणाच्या हातात द्यायला नाही आवडत म्हणून मी तस सांगितलं.
अरे पण तू त्याच्याबरोबर जाउन पेट्रोल आणून दिल असतस तर तुझी गाडी तूच चालवली असती आणि सदूचीही पेट्रोलची गरज भागली असती तू उगीच खोट बोललास.पप्पा म्हणाले ए आई
अग जाऊ देना तुम्ही दोघी काय मागे लागल्या माझ्या एवढं तेवढं खोट चालत ग. तेवढयात आजोबा म्हणाले अरे माझी साखर वाढली वाटत चेक करू जरा ,पप्पांनी आजोबांची शुगरलेवल चेक केली ,अरे बापरे यांची तर शुगर वाढलीय आजी म्हणाली वाढणार नाही तर काय चार दिवसांपासून सांगते आहे गोड लाडू खाऊ नका पण तुम्ही ऐकलं नाही बघा आता त्याचा परिणाम ,आजोबा म्हणाले अरे मी एकही लाडू खाल्ला नाही, बघितला सुद्धा नाही उगाच खोटे आरोप करू नका माझ्यावर
मोहन मध्येच म्हणाला खोट नका बोलू आजोबा मी पाहिलंय तुम्हाला डब्यातून लाडू घेताना दोनदा.आता आजोबांचं खोट बोलणं उघड पडलं होतं तसे आजोबा चिडले म्हणाले हो बोललं मी खोट पण माझ्या खोट बोलण्याने तुमचं कुठं नुकसान झालं ज्याने कुणाचं नुकसान होत नाही असं खोट बोललेले चालत समजलं का?आजी म्हणाली अरे वा तुम्हीच ठरवलं होतं ना सर्वांनी खर बोलायचं म्हणून मग तुम्हीच खोटे बोललात. आता आई कशी गप्प बसणार आई म्हणाली मी
म्हटलं होतं ना खर बोलणं कठीण आहे.हे सर्व मोहन बघत होता
त्याने मात्र खरे बोलायचं ठरवलं होतं.मोहन शाळेत गेला आज मॅडमने सर्वांना गणित दिली होती सोडवायला .सर्व मुले गणित सोडवत होती मोहनला काही गणित सोडवायला जमत नव्हते
काही मुलांनी ज्या मुलांची गणिते बरोबर सोडवली होती त्यांची पाहून गुपचूप गणिते सोडवली होती मॅडमने सर्व मुलांची गणिते तपासली एकट्या मोहनला गणित सोडवायला जमले नव्हते मॅडम रागावल्या का रे मोहन तुला का नाही जमले गणित सोडवायला
मोहन म्हणाला मॅडम मला समजले नाही म्हणून मला गणित सोडवता आले नाही ठीक आहे मधल्या सुट्टीत माझ्याकडून पुन्हा समजाऊन घे .मधली सुट्टी झाली
मोहनचे मित्र त्याला म्हणाले अरे आमच्यासारखं पाहून गणित सोडवलं असत तर मधल्या सुटीत आमच्यासारखी मौजमजा करता आली असती आता तुला गणित आल्याशिवाय मॅडम तुला सोडणार नाहीत बस सोडावीत गणित आणि मुले हसू लागली
मुले हसल्याने मोहनला वाईट वाटले घरी आल्यावर त्याने ही गोष्ट आईला सांगितली आई म्हणाली मोहन सत्य बोलणे आणि वागणे तुला कठीण वाटत आहे का मोहन म्हणाला हो ग कारण मी एकट्यानेच खरे सांगितले बाकी मुले खोटे बोलली आणि त्यांना मॅडम रागावल्या नाहीत शिवाय त्यांना मौजमाजही करता आली आणि मी खरे सांगितले म्हणून मला बोलणी ऐकावी लागली शिवाय जास्त वेळ अभ्यासही करावा लागला.आई म्हणाली अरे आज ज्या मुलांनी दुसऱ्याचं पाहून गणित सोडवली त्यांना परिक्षेत जमेल गणित सोडवायला ?तुला मात्र जमेल मग सांग कोणाला मार्क मिळतील
परीक्षेत तुलाच ना आता मात्र मोहनचा चेहरा खुलला आणि त्याला सत्य बोलण्याचे वागण्याचे महत्व पटले.खरच आजच्या पिढीला खरे बोलण्याचे वागण्याचे संस्कार कसे देणार आहोत आपण ?सर्वप्रथम आपण स्वतः कितपात सत्याचा मार्ग स्वीकारू शकतो याचा विचार व्हायला हवा.
मोहनसारख्या असंख्य बालमनाला कसे सत्याच्या मार्गावर आयुष्यभर चालण्यासाठी प्रेरित करायचे.
कारण आजूबाजूचे जग खोटेपणाच्या आहारी गेले असल्याने सत्याच्या मार्गावर एकटे अविरतपणे मार्गक्रमण
कसे करणार आपली आजची पिढी.
आपल्या इतिहासात डोकावले असता लक्षात येईल खोटेपणा फार काळ टिकत नाही एक ना एक दिवस सत्य बाहेर येतेच
असे म्हणतात सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटे गावभर हिंडून असलेले असते खरच आहे ना काही अफवा म्हणजेच असत्य यावर किती पटकन विश्वास ठेवतात लोक खर मात्र पटकन पचत नाही ,रुचत नाही अशा वेळी
खोटे वागन्याचे, बोलण्याचे काय नुकसान होते पाहूया आपण नेहमी खोटे बोललो तर आपण आपल्याच लोकांच्या विश्वासाला पात्र राहत नाही मग एखादे वेळी खरे बोललो तरी कुणाला खरे वाटत नाही .एकदा खोटे बोललो की सत्य लपवण्यासाठी सतत खोटेच बोलावे लागते .खोटे बोलल्याने क्षणिक आनंद मिळतो पण दीर्घकालीन दुःख भोगावे लागते .खोटे बोलल्याने स्मरणशक्तीवर विनाकारण ताण येतो कारण काय काय खोटे बोललो हे लक्षात ठेवावे लागते
हे झाले खोटे बोलण्याचे तोटे आता खरे बोलण्याचे फायदे बघू
खरे बोलल्याने आपण विश्वासास पात्र ठरतो , खरे बोलल्याने मानसिक तणाव कमी होतो ,
निर्णय घेताना आत्मविश्वासाने घेता येतात , खरे बोलल्याने कोणाला काय खोटे बोललो हे लक्षात ठेवावे लागते नाही
अंतिम विजय सत्याचाच होतो
मग विजयी ,यशस्वी होण्यासाठी बोलणार ना खरे कारण सत्य मेव जयते आपुले जीवनाचे ब्रीदवाक्य आहे
सविता साळुंके
9604231747
श्रीरामपूर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें