रविवार, 3 मई 2020

रोज एक लेख :- दिवस पंधरावा आई / माता

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- पंधरावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 03 मे 2020 रविवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- आई / माता*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••
 *मातृदेवता*
मातृपितृदेवो भवः ही शिकवण देणारी भारतीय संस्कृती आणि मर्यादापुरुषोतम श्रीराम यांनी आई वडिलांचे केलेले आज्ञापालन,आणि श्रावणबाळाची मातृपितृभक्ती तसेच विठ्ठलाला उभं करणारा भक्त पुंडलीक कितीतरी  उदाहरणे मिळतील या भूमितील, या मातीतील. मातापित्यांना जपणारी आणि आईला वडिलांना आपलं दैवंत मानणारी. तसेच आईवडिलांची कष्टता तर सर्वच मुलांसाठी असते. असे आई जिजाऊनी शिवाजी घडवला, शिवाजीनं महाराष्ट्र घडवाला माधव ज्युलीयनची मातृ गाथा कवितेच्या माध्यमातून लोकांच्या मनात पोहचली आणि ध्यानात राहिली. शामच्या आईनं शामला घडवलं. पण का कोणास ठाऊक वारं थोडं उलट दिशानेच वाहू लागलं. आज अडगळ वाटतात आई वडील घरामध्ये. लग्नाला आलेली पोरं वाट बघत असतात भविष्यातील राणीची. त्यांना त्यांची राणी मिळते आणि मग चालू होते एक नवीच कहानी.आई वडीलांच्या होरपळीची, त्यांच्या हलापेष्टांची. आणि त्यांच्या उतारवयातील उतारावरून गरंगळण्याची. पोटाला चिमटा घेऊन कष्टात रक्ताचं पाणी करुन आपल्या मुलां बाळांना लहानाचं मोठं करुन मोठा साहेब बनविण्याचं स्वप्न उराशी बाळगून जगणारे आईबाप, पुढं त्या साहेबासाठी आईबाप राहत नाहीत. निमित्त मिळतं नोकरीचं आणि साहेब दूरदेशी अगर दुसऱ्या शहरात जातो.. सोबत राणीला घेऊन.आणि मग चालू होते परवड या जन्म देणाऱ्या आईबापांची. त्या साहेबाला फिकीर वाटत नाही किंवा आठवण राहत नाही काय करत असतील, कसं असतील आईबाप यांची. भोळं स्वप्न बघत आणि त्यातच जगत असतात हे बिचारे......
जन्मदात्री आई कोठे कशी राही
चिंता मुळीच तिची वाटत नाही
होऊ तिची काशी अन उरो फक्त मावशी..!!
बापाची गत मुळीच वेगळी नाही
घरामधे बाप अडगळ म्हणून राही
स्वता:च्या बापाची गत ही अशी
पण...,दुसऱ्याच्या बा साठी काढतील मिशी.....!!
या ओळीप्रमाणे आजची युवा पिढी जगताना दिसते आहे. आईबाप सांभाळणे अवघड आणि अडचणीचे वाटत असते. नातवांनी आजी आजोबा पुस्तकात पहावे, गोष्टीत ऐकवे.पण गोष्टी तरी सांगणार कोण त्यांचे आई बाबा नोकरी करणारे असल्याने त्यांना या आणि आशा गोष्टीनां वेळ नसतो.नाइलाजास्तव आई वडिलांना सांभाळण्याची वेळ आलीच तर... कुजके बोलणे, टाकून बोलणे किंवा अन्य कारणाने घरात सतत कटकटी होत राहतात. मग या युगाची वृध्दांना
मिळालेली मोठी देणगी म्हणजे "वृध्दाश्रम" ही अभिनव हा अभिनव योजना समाजाने स्विकारली. नात्याचे कुजकट बंध तुटत गेले आणि सुरकुतलेले शरीर, धुसर दृष्टी, वृध्दाश्रमात शेवटचे दिवस गोड समजत आणि खरोखरच त्या संशयकल्लोळ घरापेक्षा आनंद देणारे घेणारे वृद्धसवंगडी जीवनाच्या शेवटच्या क्षणांला आणि दिनाला झालर लावत जगत असतात. याच वृद्धाश्रमात वाचायला मिळाले... "सुकलेल्या पानांवरुन चालताना सावकाश चाला कारण याच पानांनी कडक उन्हात आपणाला सावली दिली आहे.... " समजले तर काळजी घ्या. काळजाला भिडणाऱ्या या ओळी मर्मावर बोट ठेवणाऱ्या आहेत. तशाच त्या शिकवण आणि आत्मपरिक्षण करायला लावणाऱ्या आहेत. मला, तुम्हाला आणि तुम्हाला सुध्दा.
                    
     *हणमंत पडवळ*
      *उस्मानाबाद.*
[••••••••••••••••••••••••••••••••••••••
*आई म्हणजे प्रेमाची  सावली*
    
          डॉ हरिश्चंद्र भोईर(शहापूर,ठाणे)

   आईविषयी काय लिहावं, तिच्याविषयी बोलण्यास पुरतील एवढे शब्द  माझ्यासह कोणाकडेच नसतील.ममता,आत्मा आणि ईश्वर या तीन शब्दांचा सुरेख संगम म्हणजे 'आई'.   'आई'या दोन अक्षरी शब्दांतच माणसाच्या पूर्ण  जीवनाचं 'सार' भरलेलं आहे ....!!कारण ती नसती तर आपण या सुंदर जगात पाऊलच ठेवलं नसतं..!म्हणूनच कदाचित
आईचं  यथार्थ वर्णन करणारे कविवर्य फ. मुं. शिंदे यांची ‘आई’ ही  मनाला मोहवून टाकते-

‘आई खरंच काय असते?
लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगडय़ाचा पाय असते!
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही, उरतही नाही!’
 
    अशा कितीतरी शब्दांत आईचं वर्णन केले तरी ते अपुरे पडावे. 'आजच्या स्वार्थी जगात निर्व्याज आणि निखाळस प्रेम फक्त आईच करू शकते....बाकी सर्व नाती दिल्या घेतल्याचीच!!
  'आई ' या शब्दातच किती मोठा भाव भरलेला आहे.'आ' म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर!!ईश्वराला प्रत्येकाच्या घरी राहता येत नाही म्हणून त्या विधात्याने आई दिली असेल!!
   नऊ महिने आपल्या पिल्लाची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेऊन तिचं पिल्लू आपल्या चिमणीला घेऊन तिला सोडून भुर्रकन जरी उडून गेलं तरी तिच्या पिल्ला साठी ,त्याच्या प्रगतीसाठी शुभाशीर्वादाची पाखरण करणारं गाव म्हणजे आई...!स्वतः उपाशी राहून पिल्लांच्या मुखी हसत मुखाने चारा भरवणारी माय म्हणजे आई,संस्कारांची अलगतपणे मुक्त हस्ते पाखरण करणारे वटवृक्षाची सावली म्हणजे आई...!लाख गुन्ह्यांना पोटात घालून सदैव आपल्या बाळाची पाठराखण करणारी प्रचंड मजबूत भिंत म्हणजे आई!!लेकराला यायला थोडाजरी उशीर झाला तरी चातकासारखी वाट बघणारी पक्षीण म्हणजे आई....!!आईची थोरवी कितीही वर्णन केली तरी शब्द अपुरे पडावेत...!
  आई नुसती आईच नसते प्रसंगी आपला 'बाप' ,आपली बहीण,आपल्यावर पाळत ठेवणारी गुप्तहेर, देवाकडे आपल्यासाठी रदबदली करून आपले सुयश चिंतिणारी 'भक्त'अशी कितीतरी रूपे आईची सांगता येतील.'आ 'आभाळावर मायेचा... 'ई ' भुईतल्या ओलाव्याचा.... आईच्या अतूट प्रेमाचं उतराई होण्यासाठी कितीही जन्म घेतले तरी ते अपुरे पडावेत.जिच्यामुळे आपण घडतो,वाढतो ती म्हणजे आई...!हे आईपणा म्हणजे नुसते प्रेम नाही, नुसते लाड नाहीत.केवळ धाक नाही, केवळ कर्तव्यपूर्ती नाही... आईपणा असतो काय असतो हे प्रत्यक्ष आई झाल्याशिवाय कोणालाच समजणार नाही. म्हणूनच कवी यशवंतांनी आपल्या कवितेत म्हटलं असावं--
'स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी"
  खरोखरच ज्याच्या घरी आई नाही त्याला या जगाचं खरं सुख नाही!! असा 'नवकोट नारायण' देखील आईच्या प्रेमाला जर पारखा झाला तर तो स्वतःला भिकारीच समजतो..!!आई मग ती कुणाचीही असू दे...ती महानच म्हणावी लागेल...!शून्यातून स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी राजे यांच्या संपूर्ण यशाचं रहस्य म्हणजे त्यांच्या 'माँसाहेब'जिजाऊ आहेत!!आपल्या बाळाला पोहता यावं म्हणून प्रसंगी कठोर बनणारी आणि आपल्या श्यामला संस्कारशील बनविण्यासाठी शिस्तीचे धडे देणारी माता यांचं वर्णन ऐकलं की साने गुरुजी यांनी लिहिलेल्या
आई माझा गुरू
आई कल्पतरू
सुखाचा सागरू आई माझा।।।
या ओळींची यथार्थता लक्षात येते. 
श्यामला त्याच्या आईनं चांगलं संस्कारशील बनवलं त्यासाठी वेळप्रसंगी श्यामवरील  मायेपोटी हाती लाठी देखील घेतली . अंघोळ केल्यानंतर आपल्या पायाला घाण लागू नये म्हणून पदर पसरायला लावणाऱ्या श्याम ला जेव्हा आई सांगते, ‘श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो!’ किती मोठं तत्त्वज्ञान आणि संस्कार श्यामबरोबर आपल्यालाही या एका वाक्यातून मिळतं.
सानेगुरुजी म्हणत, ‘आईच्या दुधाची चव काही न्यारीच असते. ते नुसते दूध नसते. त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणूनच ते दूध बाळाला बाळसे देते, तजेला देते. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आई-वडिलांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक..खरी शिक्षणदायी ‘आई’च आहे. आई देहही देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारी तीच. त्यांनी ‘ आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे.’ असे म्हणून जगातील सर्व  मातांचा उचित गौरव केला आहे.
क्षमाशील वृत्तीने मुलांचा अपराध पोटात घालणारी, संकटाच्या वेळी मुलांवर मायेचा पदर पांघरून मुलांना कुशीत घेणारी, त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारी आई ही परमेश्वराचेच दुसरे रूप आहे, असेच म्हणावे लागेल.
 ‘पृथ्वीची क्षमता आणि पाण्याची रसता’ पाहावयाची असेल, तर ती ‘आई’ जवळच आहे. ‘आई’ हेच वात्सल्याचे धन. सगळ्याच रसाची अमृतवेली ‘आई’. ‘आई’ नावाच्या अमृतवेलीवर सदाबहार फुले फुलतात. आपल्याला लहानपण पुन्हा पुन्हा हवे असते. कारण त्यात आईच्या प्रेमाची ऊबच आपल्याला 'मोठं' होण्याची ऊर्जा देते.आपले लक्ष गुन्हे माफ करून संस्कारांची जीवनभर पुरणारी शिदोरी मिळते.म्हणूनच पृथ्वीच्या पाठीवर शाश्वत टिकणारे प्रेमाचे आणि मायेचे एकमेव नाव म्हणजे ‘आई!’
  खान्देश भाषेतील गोडव्यांनं जगाला मोहून टाकणाऱ्या सुप्रसिद्ध 
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या पिल्लांसाठी दिवस रात्र काबाडकष्ट करणाऱ्या आईचा महिमा सांगताना  ‘खोप्यामधी खोपा’ या कवितेत म्हटलं आहे 
‘अरे खोप्यामधील खोपा
सुगरणीचा चांगला,
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला।’
  शेवटी जाता जाता एव्हढंच म्हणावंस वाटतं 'जगात साई आणि प्रत्येकाच्या घरात आई हवीच...'! म्हणूनच कदाचित रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. आणि हे सांगताना आपल्या जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात,
"जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी"
        डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
•••••••••••••••••••••••••••••••••••••- 
आई झाल्यावर...

 मे महीन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो.परदेशात अमेरिका, इग्लंडसारख्या देशात मुलं मोठी झाली की आईवडीलांच्यापासून वेगळी राहतात.आईबद्दलचे प्रेम,आदरभाव व्यक्त करण्यासाठी ते आईला भेटवस्तू देतात,एकत्र जेवण करतात.व आईला खूष करतात.नंतर हे लोण भारतात आले. पण भारतीय संस्कृती मध्ये मुले कायम आईवडीलांच्या जवळच राहतात.आता आधुनिक काळात विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये काही ठीकाणी हम दो हमारे दो या विचारसरणीत आईबाबा बाजूला पडले आहेत . मातृत्व ही एक महान शक्ती आहे.प्रत्येक आईच्या मनात आपल्या मुलांच्या बद्दल प्रेमाची भावनाच असते.आई मुलांना ज्या संस्कारात ती वाढवते तशीच मुले वाढतात.माझ्या जीवनात मातृत्वाचा चांगलाच अनुभव आहे.मी ईथे माझा मातृत्वाचा, आईपणाचा अनुभव शेअर करते.
 सन 17 ऑगस्ट 1991 हा दिवस उजाडला माझ्या मातृत्वाला आकार आला. गोंडस परीने माझ्या घरी जन्म घेतला. तिच्या बाललीला पहात तिला मोठं करण्यात माझा वेळ कसा गेला समजले नाही. 12 जुलै 1996 ला माझ्या मातृत्वाला परिपूर्णता मिळाली.  माझ्या घरी माझ्या राजकुमाराचे , मुलाचे आगमन झाले. सर्वजण आनंदात होतो. वर्षे कशी गेली कळलंच नाही.  अतिशय लाडाकोडात  व संस्कारात वाढलेली माझी मुले अभ्यासातही हुशार होती. म्हणतात ना चांगल्या गोष्टीला नजर लवकर लागते!!! अगदी तसेच झाले.  माझ्या पतींचे एका रस्ते अपघातात आकस्मिक निधन झाले.......  मन सुन्न झाले...माझी मुले लहान वयातच पोरकी झाली. माझ्यावर आकाशच कोसळले. काय करावे काही कळत नव्हते. दिशाहीन तारू सारखी माझी जीवननौका हेलकावे खात होती....  सर्वांनी मला धीर दिला.  आई, वडील, भाऊ ,भावजय,दीर जाऊ  सर्वांनी मला आधार दिला,  परिस्थितीची  जाणीव करून दिली. माझ्या दोन मुलांना समोर पाहिल्यानंतर मी भानावर आले. पती गेल्याच दुःख तर होतच पण या मुलांना वाढवण्याचा आव्हान आता माझ्यासमोर होतं. ते तर आता मलाच पेलायचं होतं. मी थोडी सावरले. पण त्यामध्ये एक वर्ष निघून गेले. हळूहळू मी सर्वांच्या मदतीने दैनंदिन कामकाज करु लागले. मुले अगदीच लहान होती. त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दिलं. बापा पाठीमागे मुलांचं कसं व्हायचं ?  हा एक प्रश्न माझ्यासमोर उभा होता. कारण आईबाप असताना सुद्धा अनेक मुलं वाया गेलेली मी पाहिली होती. माझी मुलं जरी लहान असली तरी सुद्धा घरातील परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांना अकाली शहाणपण आलेलं होतं, ही एक जमेची बाजू होती. मुलाची चौथी परीक्षा झाल्यानंतर त्याच्याच मर्जीने आम्ही त्याला वारणा येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी ऍकॅडमी मध्ये भरती केले. पण आजपर्यंत कधीही त्याला बाहेर ठेवलेले नव्हते त्यामुळे मनाची खूपच द्विधा अवस्था झाली होती. भावनातिरेकाने डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.... तसंच हृदयावर दगड ठेवून ती वर्ष मी कशी काढली याचं वर्णन मी कोणत्याही शब्दात करू शकत नाही. तो तिकडे कसा राहत असेल ? याच विचाराने मन नेहमी बेचैन होत असे. महिन्यातून एकदा पालक भेट असे.  जाताना मन फुलपाखरू सारखं हलके होऊन वेगात पुढे जायचं ,पण परत येताना मात्र... मन एवढे जड झालेलं असायचं की पाऊल उचललं जायचं नाही.  मुलगी माझ्याजवळ होती. तिचं शिक्षण चालू होतं.   ती समंजस असल्यामुळे तिच्या शिक्षणामध्ये कोणतीही अडचण आली तरी तिने अत्यंत धाडसाने त्याला तोंड दिले. व आपले शिक्षण पूर्ण केले. तिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातून एम. ई. ची पदवी  प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. इंजिनिअरिंग कॉलेज वर तिला नोकरी करायची होती पण  कुठेही नोकरीची शक्यता नव्हती, किंवा वशिला नव्हता.. असे आपण म्हणू शकतो. आता पुढे काय करायचे? मग तिने निर्णय घेतला कि पुण्याला जाऊन सी-डॅक करायचे. मीही तिला मोठ्या मनाने जाऊ दिलं. तिथे तिने चांगल्या पद्धतीने तो कोर्स पूर्ण केला व त्यांच्या मार्फतच चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला सुद्धा लागली. तिकडे मुलानेही होस्टेलवर राहून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी मिळवून इंजिनीयर झाला. त्याने स्वतः प्रयत्न करून मुलाखत दिली एका चांगल्या कंपनीमध्ये तोही नोकरीला लागला. दोघेही त्यांच्या त्यांच्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. वडिलांचे छत्र नसतानाही कोणत्याही प्रकारचे अवगुण माझ्या मुलांच्या मध्ये नाहीत. खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. पैसा तर मिळतच राहतो, पण संस्कार सर्वात महत्त्वाचे आहेत.मुले जर संस्कारहीन असतील तर आभाळाएवढ्या संपत्तीला काडीची कींमत नसते.आपली सुसंस्कारीत मुले हेच आपले खरे भांडवल असते.आज मीतीला मी खरोखरच सुखी आहे ,समाधानी आहे. मला माझ्या मातृत्वावर गर्व आहे, अभिमान आहे.

 लेखिका
  श्रीमती माणिक नागावे
 कुरुंदवाड, जिल्हा ,कोल्हापूर
9881862530
[••••••••••••••••••••••••••••••••••••••
आई:मायेचा जिव्हाळा

"आई ही पहिली गुरू
सर्वांगसुंदर असं व्यक्तिमत्व
जीवनाला दिशा देतांना
समजूनी घ्यावे तिचेे नेतृत्व"

     'आई' या दोन अक्षरी शब्दात खूप गहन अर्थ भरलेला आहे.आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशी शब्दांची फोड करता येईल.आई म्हणजेच 'ईश्वराचा आत्मा' अशी महत्वपूर्ण उपमा आईला देत असतो.आईची महती जगात खूप आहे म्हणूनच एका कवीने म्हटले आहे की,'स्वामी तिन्ही जगाचा,आईविना भिकारी' असं म्हटलेलं आहे ते अगदी खरं आहे.आईला बाळाला जन्म देत असतांना होणाऱ्या प्रसववेदना कोणाला सांगत नाही.आपल्या पोटच्या गोळ्यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आईच होय.बाळाला जन्म देत असतांना एक प्रकारे मातृत्वाचा पुनर्जन्म झाला असे वाटते.बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला आईचा सहवास व बाळालाही सहवास हवाहवासा वाटतो.आई-मुलांमधील ऋणानुबंध जुळून येतात.अगदी सहा महिनेपर्यंत बाळाचे पोषण आई असह्य वेदना शमवून करीत असते.अगदी मायेचा जिव्हाळा मुलाप्रती असतो.आई नावाचं व्यक्तिमत्व मुलगा,मुलगी असा कोणताही भेदभाव न करता तिच्या दृष्टिकोनातून दोघेही समान असतात.आईच ही मुलांची पहिली गुरू असते.लहानपणापासून तर शाळेच्या पायरीवर चढेपर्यत आईच मुलाची पहिली शिक्षिका म्हणून खंबीरपणे पाठीशी उभी असते.आईच्या व्यक्तिमत्वाविषयी कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील त्यामुळे मुलात येणारे कलाकौशल्याची खाण म्हणजे आईच असते त्यामुळे आईला 'जन्माची शिदोरी' म्हणतो हे उगीचच नाही.
              घरी विविध गोष्टीतून मुलांवर संस्कार देण्यासाठी आई सदोदित प्रयत्नरत असते.मायेच्या ममतेने आपल्या गोळ्याला सांभाळत असते.बोबडे बोल शिकविण्यापासून तर स्वतःच्या पायावर उभे करण्याचे संस्कार आई देत असतो.शिवबाची आई जिजामातेला नानाविध कथामालिकेतून संस्कारमळा फुलविण्यात अग्रेसर ठरल्या त्याचसोबत सानेगुरुजी यांच्या 'श्यामची आई' या पुस्तकातील प्रत्यक्ष घटनेचा उवापोह करण्याचा व त्यातील प्रसंग आई आपल्या बाळाला सांगून संस्कार देत असतात.आई ही एक आपल्या मुलाबाळासाठी अतोनात कष्ट सहन करून प्रेम देण्याचा नि संस्कार देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत राहून जीवनात माणूस बनावा ही आईची प्रथम अपेक्षा असते.जीवनात यशस्वी होण्याकरिता संस्काराचे बीज पेरण्याचे काम जिव्हाळ्याने करीत असते.
"तेल-पाणी चोपडवून
मला त्रासवून काढलेले
वळनावळणाचे कुरळे केस
अजूनही शाबूत आहेत
माझ्या आईचे ते संस्कार आहेत."
      मी लहान असतांना माझ्यावर योग्य संस्कार घडावे यासाठी लहान-सहान गोष्टीपासून संस्कार देत असे.माझी आई अशिक्षित असली तरी अडाणी नव्हतीच.प्रपंच चालविण्यासाठी सुखासवे दुःखही पेलत होती आणि मला मायेच्या जिव्हाळ्याने सांभाळत होती.माझ्या शिक्षणासाठी जीवाचे रान करून शिक्षणासाठी वाट मोकळी करून देणारी माझी पहिली गुरू ही आईच होती.आई ही अशी मूर्ती आहे की,सासू,सासरे,पती,भावजय,दिर,नणंद यांना एका प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवणारी ही आईच असते म्हणून आईची महती सांगतांना किंवा संस्कार देणाऱ्या घटना,प्रसंग लिहितांना सुचत देखील नाही.आपल्या मुलासह इतरांवर देखील मायेच्या ममतेने प्रेम करीत असते.मुलांच्या भल्यासाठी कधी रागावते,मारते पण त्यात देखील प्रेमाचा ओलावा असतोच म्हणजेच मायेची ममता ही सरत ही नाही आणि उरतही नाही.अखेरच्या श्वासापर्यंत संस्काराची शिदोरी मायेच्या ममतेनेच निस्वार्थी वृत्तीने देत असते.
       स्वतःच्या मुलगा कितीही मोठा झाला असला तरी प्रेम संपत नाही.एखाद्यावेळी कामानिमित्य मुलाला बाहेर जायचे झाल्यास त्याची सर्व तयारी बालपणासारखीच करून देत असते आणि सतत मुलांचीच काळजी करीत असते.आईची शिकवण,शिस्त,स्वावलंबन इत्यादी मुलाला दिली असली तर घरी येईपर्यंत चिंतेने व्याकुळ होणारी ती आईच असते म्हणून कवी फ.मु.शिंदे आई विषयी लिहिलेल्या ओळी आठवतात.
"आई मनामनात ठेऊन जाते काही
जीवाचं जीवलाच कळावं असं देऊन जाते काही"

श्री दुशांत बाबुराव निमकर
मु चक फुटाणा, चंद्रपूर
इ मेल:dushantnimkar15@gmail.com
••••••••••••••••••••••••••••••••••••••
*आईची महती*

आई म्हणजे ममता. मायेची पाखरण करणारी एक स्त्री. आई म्हणजे आत्मा आणि  ईश्वर या दोघांचा संगम.  आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य कमी  पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दुर करत नाही.  आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक माझी तब्येत बिघडायची. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती.  माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते. खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.' आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.'
 आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईची माया मिळाली नसेल त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,  'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'. मातेच्या प्रेमाला कशाची तुलना नाही. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे हया आईपुढे व्यर्थ आहेत. म्हणून तर जग जिंकलेल्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. 
स्वराज्यसंस्थापक शिवबाच्या जीवनातही मातेला सर्वश्रेष्ठ स्थान होते. मातेचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच आढळतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करता येत नाही. एखादी श्रीमंत आई आपल्या मूलाचे जेवढे लाड करील, त्याला जेवढ्या उंची किमती वस्तू आणून देईल तेवढया भारी वस्तू गरीब आई आपल्या लेकराला देऊ शकणार नाही. पण म्हणून काही तिच्या प्रेमाची प्रत कमी ठरणार नाही. आपल्या लेकरासाठी आई केवढे साहस करू शकते याचा पुरावा म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज. आई आपल्या लेकरासाठी काय करीत नाही? ती जन्म देते एवढेच नव्हे तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती सर्वतोपरी सांभाळते. ती त्याला खाऊपिऊ घालून त्याचे संगोपन करते व त्याबरोबरच त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगून ती त्याचे मन फुलविते आणि मनाचा विकासही घडविते.
 माझी आई उत्तम गृहिणी आहे. आल्यागेल्यांचे हसतमुखाने आतिथ्य कसे करावे, ते माझ्या आईकडुन शिकावे. स्वंयंपाक करण्यात ती कुशल आहे. शेजारच्या सर्व स्त्रिया अडीनडीला माझ्या आईकडे धावत येतात व आई त्यांना शक्य ती सर्व मदत करते. सदा हसतमुख असणारी ही माझी आई आमच्या घरची 'लक्ष्मी' आहे, असे सारेजण म्हणतात ते उगाच नाही! मातेच्या वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरवते. मातेचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. ते आपल्यावर सदैव कृपाप्रसादाची खैरात करत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. म्हणूनच कवी म्हणतो, 'आईसारखे दैवत साऱ्या जगतामधि नाही.' मातेचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करणे, ही काही अंशाने त्या ऋणांची फेड म्हणता येईल. खरे तर तो आपल्या कर्तव्याचाच एक भाग असतो. काही कृतघ्न करंटे ही फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. म्हातारपणी
 मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावण्यासाठी आसुसलेले असतात. तसे झाल्यास ते त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटते.
________________________
* सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
[••••••••••••••••••••••••••••••••••••••
आई : संस्काराची खाण

          कुटुंब ही मुलांची पहिली शाळा आहे तर आई ही त्याची जीवनातील पहिली शिक्षिका. गर्भात असल्यापासून आई आपल्या मुलांवर संस्कार करीत असते. नऊ महीने नऊ दिवस आपल्या गर्भात बाळाला वाढवित असताना अनेक प्रकारचे संस्कार नकळत होत असतात. याची जाणीव कदाचित आईला असतेच असे नाही. पौराणिक महाभारतच्या कथेमध्ये अभिमन्युची गोष्ट सर्वश्रुत आहे. धनुर्धारी अर्जुन आपल्या पत्नीला म्हणजे सुभद्राला चक्रव्यूह कसे भेदायचे आणि परत कसे फिरायचे ही गोष्ट सांगत असतो. त्यावेळी सुभद्रा ही गर्भवती असते. तिच्या पोटात अभिमन्यु वाढत असतो. सुभद्रा सोबत तो सुद्धा ऐकत असतो मात्र अर्धी कथा ऐकून सुभद्रा झोपी जाते. त्यामुळे अभिमन्युला चक्रव्यूह बाबत अर्धी माहिती मिळते. युद्धाच्या प्रसंगी तो चक्रव्यूह तोडून मध्ये जातो पण बाहेर पडता येत नाही. कारण पुढील क्रिया त्याला माहित नसते. ही एक कथा म्हणून पाहिलो तर लक्षात येईल की, पुरातन काळापासून गर्भसंस्कार खुप महत्वाचे आहे असे सांगण्यात येत आहे. मुलांवर संस्कार टाकण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही आईवर असते. आईचे वर्तन जसे असेल त्याच प्रकारचे वर्तन मुलांचे असते हे आईंनी विसरून चालणार नाही. मुलांना शिकविण्याचे फार कठिण आणि मोठे काम आईंकडून सुरु केल्या जाते. मूल अगदी लहान असताना त्याला चालणे, बोलणे शिकविण्याचे काम आईं करीत असते. त्यासाठी तिला काही पैसे किंवा वेतन मिळते का ? नाही. तिला यातून जे मानसिक समाधान मिळते ते कशातून देखील मिळत नाही. पण आपल्या मुलांना अधिक संस्कारी आणि यशस्वी पुरुष करायचे असेल तर काही गोष्टी मातानी जाणीवपूर्वक करायला हवे असे वाटते. लहान मूल जास्तीत जास्त वेळ कुटुंबातील आपल्या आईंसोबत व्यतीत करीत असतो. त्यामुळे आईंच्या वर्तणुकीचे चांगले वाईट परिणाम मुलांवर होत असतात. टीपकागदप्रमाणे ते प्रत्येक कृतीचे जशास तसे अनुकरण करतात. माझी आईं कशी वागते याचे सूक्ष्म निरिक्षण ते करतात याची प्रचिती घ्यायची असेल तर मुलांची कृती कधी तरी लपूनछपुन बघावे नक्की आपणास कळेल की, मूल आपली नक्कल कशी करते ? म्हणून आईंची जबाबदारी सर्वात मोठी आहे असे म्हटले जाते. शिकलेली आईं घरादाराला पुढे नेई असे बोलेल्या जाते त्यामागे हाच अर्थ लपलेला असेल, नाही का ! शिकलेली आईंच नाही तर समजदार आईं आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून घराला पुढे नेऊ शकते. राजमाता जिजाऊ यांनी राजे शिवाजी यांना लहानपणी रामायण आणि महाभारतामधील गोष्टी सांगून स्फुर्ती निर्माण केल्या म्हणून तर राजे शिवाजी मुगल लोकाविरुद्ध उभे राहिले.
कुटुंबाच्या सोई सुविधा पूर्ण करण्यात आज आईला स्वतः कडे पाहण्यासाठी वेळच मिळत नाही तर ते आपल्या मुलांसाठी कधी वेळ काढतील हा एक मोठा प्रश्न आहे. शालेय आणि कॉलेज जीवनातील अनेक छंद या कुटुंबाच्या व्यवस्थेमध्ये ते विसरले आहेत असे वाटते. पण ज्या माता आपल्या स्वतःसाठी दिवसातून एखादे तास काढतात, त्यांचे छंद अजुन ही चालू आहेत अश्या आईंचे अभिनंदन करावेसे वाटते. कारण त्याच छंदामुळे आज ते स्वतःचे आस्तित्व टिकवून आहेत आणि त्याचा फायदा नकळतपणे मुलांवर होत असतो. पुस्तक वाचन करण्याचा छंद असो किंवा साहित्य निर्मिती करण्याचा त्यातून आत्मिक समाधान मिळते. आपला छंद आपल्या मुलांसाठी प्रेरणा ठरू शकते.
जगात एकच न्यायालय आहे ज्याठिकाणी सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई. परमेश्वराच्यानंतर जर कोण आहेत ती म्हणजे आई. आईशिवाय जीवन म्हणजे पायलटविना विमान होय ते विमान कोणत्या दिशेला जाईल आणि कुठे पडेल याचा नेम नसतो. अगदी तसेच आईविना मूल कोणत्या संस्काराने वाढेल यात शंकाच आहे. एवढ्या दिव्य संकटातून एखादे मूल संस्कारी निघू शकते पण खात्रीलायक सांगता येणार नाही. आईने रोजच्या जगण्यात काही गोष्टी जाणीवपूर्वक चांगले करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा निश्चित असा फायदा होतो. महिलाना टीव्हीवरील सीरियल पाहण्याचा खुप छंद असतो. एखाद्या दिवशी सीरियल पाहण्याचे राहून गेल्यास त्याचे त्यांना खुप दुःख होते. मात्र या टीव्ही पाहण्याचा अप्रत्यक्ष परिणाम घरातील मुलांवर होतो याचा कोणतीही महिला म्हणजे आई विचार करताना दिसत नाही. लहानपणी मुलांना करमणुक म्हणून आपण सर्वचजण या टीव्हीचा आधार घेतो. हीच टीव्ही नंतर आपल्या मुलांचा चांगला मित्र बनतो त्याला त्यापासून दूर करणे खुप अवघड जाते. त्यामुळे या सवयी मुलांना लागणार नाहीत याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी महिलानी म्हणजे आईंनी सर्वप्रथम टीव्ही पाहण्याचा मोह टाळावे. मुले सुद्धा आपोआप यापासून दूर होतील. 
लहान मुले जेवताना खुप किरकिर करतात अशी नेहमी तक्रार ऐकायला मिळते. याची सोडवणूक देखील आईंला करता येऊ शकते. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत आईं आपल्या जेवण्यात काय घेते तेच मुले स्विकार करतात. म्हणून आईंनी आपल्या जेवण्यात सर्व प्रकारच्या आहारांचा समावेश करावा म्हणजे मुले देखील त्याकडे आकृष्ट होतात. सकाळच्या वेळी चहा पिण्याची आपली सवय मुलांना नकळत लागते. चहा पिऊ नका असे कितीही ओरडुन सांगितले तरी त्यांच्यावर काही फरक पडत नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपण चहा पिणे टाळावे लागेल. लहानपणी मुलाना सर्व प्रसंगाचे अनुभव देणे आवश्यक आहे. आपले याच ठिकाणी चुकत असते. आपण मुलांना स्वातंत्र्य देत नाही. त्याच्या मनासारखे काहीच करू देत नाही. जास्तीत जास्त वेळा हे करू नको, तिकडे जाऊ नको असे नना चा पाढा वाचतो. मुलांना त्याच नको म्हणलेल्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता वाढत राहते. त्याऐवजी धोक्याच्या ठिकाणी किंवा खेळताना आपली सोबत राहिली तर मुलांना देखील संरक्षण मिळेल आणि मुलं मनसोक्त खेळतील. लहान मुले जेवढे खेळतील तेवढे त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक असते. घरात बसून टीव्ही पाहणे किंवा मोबाईल वर गेम खेळण्यापेक्षा मैदानावर उडया मारलेले केव्हाही चांगलेच नव्हे काय ? मुलांना मैदानी खेळ खेळवावे. लहान मुलांचे ज्ञानेंद्रिय घरातच तयार व्ह्ययला पाहिंजे अशी प्रत्येक कृती आपल्या कडून होणे आवश्यक आहे. श्रवण प्रक्रिया मुलांची विकसित झाली नाही तर त्यास त्या पुढील भाषा विकासाची कौशल्य विकसित होत नाही. हे शास्त्रीय कारण प्रत्येक मातानी समजून घ्यावे. त्यासाठी मुलांना गाणी आणि गोष्टी सांगाव्यात, त्याच्यासोबत गप्पा मारावे. त्यामुळे मुले काय ऐकतात व बोलतात हे कळते. ज्या आईं आपल्या मुलांकडे जागरूक होऊन लक्ष देतात त्यांची मुले भविष्यात प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी करतात. म्हणूनच आईला संस्काराची खाण असे म्हटले जाते.
​- नासा येवतीकर, विषय शिक्षक
​कन्या शाळा धर्माबाद
​9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••
: *आईची म्हणजे मायेचा पाखरू*
---------------------------------------------
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया* 
     माझ्या आई बद्दल बोलण्यापूर्वी आई हा शब्द किती व्यापक आहे.हे सांगू इच्छिते .मराठीत आईला आई म्हणतो तसेच माय ही म्हणतो.यात किती माया दळली आहे .ते बघा ! परदेशी भाषेत तरी गोडवा नाही. मातेला आई , माय याची  गोडी या भाषेत नाहीतर शब्दात आहे. तिच्या  प्रेमाला तोड नाही. आपण देवाला  माऊली म्हणतो. काही माता म्हणतात . संस्कृतीची शिकवण आई सारखी महिमा जगात दिसत नाही.*साने गुरुजींनी* "श्यामची आई" हे पुस्तक लिहिले आणि महाराष्ट्रातल्या नवे भारतातल्या नव्हे तर संपूर्ण जगातल्या  सर्व मुलांची ती आई झाली आहे. असे म्हणायला काहीच हरकत नाही.आईचे प्रेम मिळत नाही तो खरोखरच अभागी असतो. 
  "आई म्हणोनी कोणी आईसहाक मारी
ती हाक येई कानीमज होय शोककारी"
         आई या दोन शब्दात जी माया,ममता करूणा साठवलेली आहे ती ईतर कोणत्याही शब्दांत नसेल .
सर्वांच्या बाबतीतआईचा अनूभव  एक सारखा असतो.मी याला अपवाद नाहीच. माझ्याबाबतीत आजपर्यंत एकट्या आईनेच  नाही तर बाबांचाही मोठा वाटा आहे.पण आईने काबाडकष्ट करून दोघांनीही  मोलाची भूमिकापार पाडली. दोघेही मला खूप प्रेम द्यायचे. पण तरीही हेच म्हणेल माझी आई तर माझे सर्वस्व आहे. ती माझ्यावर आदर्शाचे पाठ गिरवीत होती.माझ्या साठी कष्ट करून घेत होती. ते पाहून माझे मन अतःकरणही उचंबळून येत असते.
*मायेने भरलेला  "कळस" म्हणजे आई!
मायेने विसावा देणारी  "सावली" म्हणजे आई.!
       गोष्ट आहे माझ्या बालपणीची.
 हे माझ्या बालपणीची . मी तिसरी त असेन .त्यावेळी माझ्यापायाला खुपखुप फोडे   झाले होते. आई पायाला मलम लावून द्यायची .स्वच्छ करून देत असे .मी मात्र मोठ्याने बोंबा मारत असे.अशीच माझ्या पायाची काळजी घेत असतांना  एकदा आई मलम लावून देत असताना मी हात पाय झटकत  होती.त्यावेळी  काहीसा भाग माझ्या डोळ्या पर्यंत पोहोचला.आई खुपखुप  घाबरली .तिला वाटले माझ्या पोरीच्या डोळ्यात औषध गेली असावी. माझी पोरगी आंधळी होते की काय? मला बरोबर दिसते किंवा नाही हे पाहण्यासाठी तिने घरातील सर्व वस्तू(बादली ,लोटा, ग्लास ,वाटी, ताट, चम्मच) माझ्यापुढ्यात ठेवले .वस्तूंची  ची ओळख विचारू लागले. मी मात्र  मोठमोठ्याने ओरडत होती. काय विचारत आहे हे कळत नव्हते? मला तरी कळत नव्हते?
काही वेळानं माझ्या पायाची आग कमी झाली . गोड खाऊने मी दुःखाला पार विसरून गेले.नंतर आई सांगू लागली .की औषध जर काहीअंशी जरी डोळ्यांत गेली असती तर ,तर तू कायमची आंधळी झाली असते.  अशीच असते जगावेगळी प्रेम करणारीआई. अशीच असते आईची माया.


*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
9420516306
••••••••••••••••••••••••••••••••••••••: 
"आई : थोर तुझे उपकार"

"आई माझी मायेचा सागर, 
दिला तिने जीवना आकार"

खरंच आई सारखे प्रेम, वात्सल्य कुणीच देऊ शकत नाही. आपल्या जडण-घडणीत आईचाच हातभार सर्वाधिक असतो.
भारतीय संस्कृतीमध्ये आईचे स्थान सर्वश्रेष्ठ मानले आहे. आईला विशेष महत्व दिलेले आहे. त्यामुळेच तर आपल्या देशाला "भारत माता" म्हणून संबोधले जाते, या भूमीचा "धरतीमाता" म्हणून आपण सन्मान करतो, जी भाषा आपण बोलतो तिचा "मातृभाषा" म्हणून आपण गौरव करतो. जिथे आपला जन्म झालेला असतो त्या भूमीला "मायभूमी" म्हणून सन्मान करतो. 
इतकेच नव्हे तर सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा, महाकाली आदी स्त्री शक्तींना हिंदुसंस्कृतीमध्ये भक्ती-भावाने पुजले जाते.
आई हीच आपली पहिली गुरु असते हे आपल्याला मान्यच करावे लागेल. कारण मूल लहान असतांना आईच त्याला संस्कार शिकवीत असते, तीच त्याला चालायला, बोलायला शिकवीत असते. म्हणूनच तर मूल जेव्हा बोलायला शिकते तेव्हा सर्वप्रथम "आई" हा शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडतो.
आईला जो मान, सन्मान, प्रतिष्ठा भाषणांमधून किंवा लेखनाच्या माध्यमातून दिला जातो तो वास्तविक जीवनात सुद्धा खरंच दिला जातोय का हे बघणे सुद्धा महत्वाचे आहे. कारण, प्रत्येकजण छत्रपती शिवरायांचे गुणगान गातो, त्यांच्या कार्याचा जय-जयकार करतो. प्रत्येकाला वाटते की शिवाजी महाराज परत एकदा जन्माला आले पाहिजे  परंतु त्या शिवरायांना जन्म देणाऱ्या, त्यांना घडविणाऱ्या जिजाऊ जन्माला याव्या असं मात्र कुणाला वाटत नाही. त्यामुळेच तर स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे. यास वेळेवर रोखणे गरजेचे आहे.
जगातला कितीही मोठा व्यक्त असला तरी त्याच्या जीवनात आईचे अनन्यसाधारण महत्व असते. 
म्हणूनच तर म्हणतात ना....
स्वामी तिन्ही जगाचा, 
आईविना भिकारी...!
जन्मदात्या मातेस त्रिवार अभिवादन, मानाचा मुजरा, शतशः प्रणाम... !
हे शब्द सुद्धा अपुरे पडतील इतके मोठे स्थान या मातेचे आहे.
आईचे उपकार पूर्ण आयुष्यात आपण कधीच फेडू शकत नाही हे मात्र खरं. 
गणेश सोळुंके (जालना)
8390132085
••••••••••••••••••••••••••••••••••••••
: आई मायेचा सागर

जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही महान मानली जाते. आई हे नाव आहे ममतेचे, प्रेमाचे, त्यागाचे , वात्सल्याचे, विवेकाचे , करुणेचे, कष्टाचे ,सोशिकतेचे आणि संस्कारांचे !
    आई मायेचा सागर
    दे जीवना आकार 
असे तिचे वर्णन केले जाते. जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सगळे गुन्हे माफ केले जातात ते म्हणजे आईचे हृदय .
  कळत नकळत आपल्या हातून काही चूक झालीच तर ती माफ करणारी आई सारखी महान मूर्ती या जगात दुसरी नाही.
  खरं म्हणजे आपल्यावर आईचे अनंत उपकार असतात. गर्भधारणा झाल्यापासूनच आईच्या कष्टांना सुरुवात होते. तिला अन्न गोड लागत नाही. सारखी मळमळ होते .उलट्या होतात .पोटात असह्य वेदना होतात तरीही ती सहन करते तिच्या बाळासाठी .तिला वेध लागलेले असतात आई होण्याचे !
  पुढे पुढे त्रास वाढत जातो. नऊ महिने एवढे मोठे ओझे वागवणे किती खडतर आहे याची कल्पना न केलेली बरी. पुन्हा प्रसूतीच्या वेदना किंवा सीझर यासारखे दिव्य तिच्या वाट्याला येते .आणि मग तिच्या वाट्याला येते मातृत्व .
पुढेही तिचे कष्ट चालूच राहतात. मलमूत्र काढणे , ओले सुके बदलणे, स्तनपान करणे, बाळाला रुचेल पचेल असा आहार घेणे ही सगळी तारेवरची कसरत करत तिची वाटचाल सुरू असते. कधी रात्ररात्र जागून काढावी लागते. बाळाच्या मुखात घास भरवते. बोट धरून चालायला शिकवते.  एकेक शब्द बोलायला शिकवते. पुढे गेल्यावर अभ्यास घेते. गोष्टी सांगते. आजारपण करते. संस्कार करते. शाळेत सोडते.डबा देते. तयारी करून देते. कितीतरी मोठी यादी करता येईल. ही यादी न संपणारी आहे. म्हणूनच आईला परमेश्वराचे दुसरे रूप म्हटले आहे. परमेश्वराला सगळीकडे राहता येत नाही म्हणून त्याने आपल्याला आई दिली आहे. 
      हीच आई जिजाऊ बनून शिवबाला घडवते. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघते . आणि ते साकार करून घेते. हीच आई करुणा आणि संस्कारांचे रूप बनून श्यामला घडवते. आदर्श शिक्षक आणि आदर्श देशभक्त घडवते. कधी ती यशोदा बनून भगवान श्रीकृष्ण घडवते तर कधी कौसल्या बनून प्रभू श्रीराम सारखा एकवचनी एकपत्नी व्रत अंगिकारणारा  हिरा जन्माला घालते. अशी कितीतरी उदाहरणे देऊन आईची महती वर्णन करता येईल. 
  एक आई चारपाच लेकरांना विनासायास सांभाळते. पालन पोषण करते. तिची कोणतीही तक्रार नसते. पण दुर्दैव म्हणजे चारपाच लेकरं मिळून एक आई सांभाळली जात नाही हे आजचे वास्तव आहे. वृद्धाश्रमांची वाढत जाणारी संख्या आपल्याला अंतर्मुख करते. बंगल्यात राहणाऱ्या मुलांची आई एखाद्या झोपडीत पाहताना मनाला प्रचंड वेदना होतात. 
   माझा मुलगा लौकिक अर्थाने खूप मोठा झाला पाहिजे असे स्वप्न प्रत्येक आई पाहत असते. तो मोठा झाल्यावर या जगात सर्वात जास्त आनंद जर कोणाला होत असेल तर तो होतो आईला ! 
  गावठी दारू गाळून, दारू विकून स्वतःचा मुलगा आय. ए. एस. करणारी आई किती महान असेल हे आपल्याला डॉ.राजेंद्र भारुडे यांचे भाषण ऐकल्याशिवाय कळणार नाही. 'ताई मी कलेक्टर होयनू ' या पुस्तकातील आई देखील स्वतः अशिक्षित असून अत्यंत गरीब परिस्थितीत मुलाला म्हणजेच राजेश पाटील यांना आय.ए. एस. होण्यासाठी प्रोत्साहन देते.
  आणि म्हणूनच आपल्या कातडीचे वस्त्र बनून जरी आईला चोळी शिवली तरी तिचे उपकार फिरणार नाहीत. 
  आणि म्हणूनच आईवर लेखन न करणारा साहित्यिक शोधून सापडणार नाही.  मराठी विश्वातील प्रत्येक साहित्यिकांनी आपापल्या परीने आईची महती वर्णन केलेली आहे.
   सुधाकर रामदास पाटील
ठाणे
7798963063
srp1672@gmail.com
••••••••••••••••••••••••••••••••••••••
 *आई संस्काराची खाण*
➖➖➖➖➖➖➖➖
आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही |
म्हणुन श्री कारानंतर शिकणे अ आ ई ||
  आईची महती पुर्वीपासुनच अनेक ग्रंथ पुरानामधुन वर्णिलेली आहे.आईच्या प्रेमाला कशाचीही उपमा देता येत नाही.जगात निस्वार्थी प्रेम जर कोणते असेल तर ते फक्त आईचे प्रेम आहे.आई आपल्या मुलावर प्रेम करते पण,ते डोळस असावं.मुलांचे हित लक्षात घेवून आईने मुलांना वाढवले पाहिजे.
 मुलाचं लग्न झालं की वेध लागतात नातवाचे.आणी ज्यावेळी ही गोड बातमी कळते तेव्हा घरातील प्रत्येकजन वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करु लागतो. कुणी म्हणतो बालाजी तांबेची औषध घ्या. कुणी गर्भसंस्कारचे पुस्तक आणतो . कुणी आनखी काहीतरी. किती हे सोपस्कार! मुल जन्माला येण्याअगोदर पासुन किती जागरुकता? पण हि प्रक्रिया नैसर्गिक आहे . त्याला नैसर्गिकच राहु द्या .
      आधुनिक तंत्राने हे सिध्द केलय कि मुल जन्माला येताना तो चिखलाचा गोळा नसतो. ते मुल ऐकते ,पहाते,संवेदनशिलता घेवुन ते जन्माला येते. आता गरज असते वयानुसार त्याला योग्य मार्गदर्शनाची.
     आजच्या धकाधकीच्या , धावपळीच्या व विविध प्रदुषणयुक्त वातावरणामध्ये प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या बाबतीत सतर्क आहे . नेमक काय कराव  हा गहन प्रश्न आईसमोर आहे. प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं .आणी ते पूर्ण करण्यासाठी तीअहोरात्र झटत असते. मुलगा डॉक्टर,इंजिनिअर, किंवा मोठा अधिकारी व्हावा हि तीची अपेक्षा असणं चुक आहे असं मी म्हणनार नाही. अपेक्षा जरुर ठेवा पण , त्या दृष्टीने आपले वर्तन, घरातील वातावरण, असायला हवे.  लहान वयातच मुलांचा कल आपल्या लक्षात आला पाहिजे.तो जर अभ्यासात रमत असेल तर मात्र त्याला त्याच्या कलाप्रमाणे घडण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलेच पाहिजे. पण एखादा पाल्य कितीही सांगुन अभ्यासच करत नसेल तर, आपण तेही  स्विकारुन त्याची आवड ओळखुन त्याच्या आवडीनुसार त्याला घडवले पाहिजे.सचिन तेंडुलकर अभ्यासात मागे होता पण , त्याने त्याचं करिअर उज्वल केले.व क्रिकेट क्षेत्रात देशाची मान उंचावली.
   मुलाने फक्त डॉक्टर,इंजिनिअर किंवा उच्चपदस्थ अधिकारी व्हावे या चाकोरीच्या बाहेर आपण पडत नाहीत. आणि आपली मत बळजबरीने मुलांवर लादल्यामुळे कधी कधी खुप वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते. हे मी  या प्रसंगी सांगु इच्छिते.मुलांना  घडवतांना आईच्या मनात काही इच्छा असतात व त्या इच्छा आपल्या मुलाच्या माध्यमातुन पुर्ण व्हाव्यात अशी आईची भावना असते .आणी माझ्या मते ती चुक नाही.
     आमचे एकत्र कुटुंब होते . तीन रुमच्या एकाच घरात आठ दहा माणसं व पै पाहुने असायचे.घरात टि व्ही नाही. आणी त्यावेळी मोबाइल तर नव्हतेच.त्यामुळे शिक्षणातील हे दोन दुष्मण माझ्याकडे नव्हते.दुष्मण यासाठी म्हणेल की,आजची आधुनिक आई ही मुलांपेक्षाही आपल्या आवडी निवडी मोबाईल व त्यामधीलव्हॉटस्अप,फेसबुक, ,या साधनांचा वापर याला जास्त महत्व देते.आई श्रीमंत घरची असेल तर,मुलांची सगळी जिम्मेदारी नोकरावर टाकते.ज्या वयामध्ये संस्कार व्हायचे त्या वेळी आईने मुलांसाठी वेळ देणे फार गरजेचे आहे.आजही खेड्यातील लोक मुलगी करायची असेल तर,त्या मुलीची आई कशी आहे ही चौकशी अगोदर करतात.
 म्हणुन मी तर म्हणेल या टि.व्ही.मोबाईलचा फायदा जरुर असेल पण कितीतरी पटीने तोटा आहे हे विसरता येणार नाही .मुलं तासनतास टि व्ही समोरुन हालत नाहीत. मोबाइल तर कळायला लागायच्या अगोदर मुलं वापरतात लहाण मुलांचं कौतुक वाटतय पण ते किती घातक आहे.याचा कधी विचार केलाय का?मी तर म्हणेल गरज काय आहे मोबाइलची?खरच मुलांना जर शिकवायचे असेल तर या दोन गोष्टी मुलांपासुन दूर ठेवा. खाने पिणे रहाणे या व्यतिरिक्त लहाण वयात त्यांना आजी आजोबा,काकाकाकु,मामामामी आत्या मावशी यांचे सानिध्य मिळुद्या.आपण काय करतो तीन वर्षाचे मुल झाले की प्ले ग्रुप,नर्सरी,एल केजी,युकेजी माझ्या मते अशा शिक्षणाने आपण मुल नाही एक यंत्र घडवतोय. मुलांना कळायला लागेपर्यंत खरतर मातृभाषेतुनच शिकवावे असं माझ ठाम मत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा खेड्यापाड्यापासुन कहर झालेला आहे .काही ठराविक शाळा असतीलही चांगल्या पण, बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांचा विकास चांगला होइल याची शाश्वती नाही.खरं तर मुलांना बालपण उपभोगु द्यावं लहाण वयातील आपण लादलेली बंधन कधी कधी मुलांना शिक्षणाबद्दलची अनास्था निर्माण करु शकतात. मुलांना भरपूर खेळु द्या,बागडु द्या .कुटुंबाचा सहवास त्याला जास्तीत जास्त मिळायला पाहिजे स्वच्छंदी जीवन जगण्याचा काळ आपण हिरावुन घेतोय का?हा ही विचार कधी कधी मनात डोकावतो. कारण आईवडील दोघेही नोकरीला असतील तर ते मुलं सांभाळायला घरचे कोणी असेल तर ठिक ,नसता त्या बालमनावर काय काय परिणाम होत असतील,? याचाही विचार व्हायलाच पाहिजे.आनखी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मुलांच्या जडन घडणी साठी जसं घरातील वातावरण निकोप असावं तसच बाहेर मुलं कोणासोबत खेळतात ,काय खेळतात हे सुध्दा आपण पाहिले पाहीजे. संगत चांगल्या मुलांचीच असावी . कधीकधी वाईट मुलांच्या संगतीत राहुन मुलं बिघडण्याचा धोका असतो.तसेच मुलांना कधीही हिनवु नका तु मठ्ठ आहेस, तुला काही येत नाही, अशा प्रकारची वाक्ये मुलांचे खच्चीकरण करु शकतात. उलट मुलांना प्रोत्साहन देत राहिले पाहिजे.तु हे करु शकतोस, मला खात्री आहे,अशामुळे मुलांमधील आत्मशक्ती जागृत होवून ती प्रयत्नवादी बनु शकतात. तसेच मुले घडत असतांना मुलगा मुलगी समान माना .एकाच कुटुंबात मुलामुलीमधील भेदभाव मुलांच्या बालमनावर प्रभाव पाडु शकतो. मुलाच्या राहणी मानाकडेही आईने जरासे लक्ष दिलं पाहिजे.साधी सोज्वळ राहणी असावी अशा मताची मी आहे.मुलं शाळेत काय करतात.हे आईने सतत पाहिले पाहिजे.आता शाळेत फक्त उपस्थिती साठी जायचे व सगळा अभ्यासक्रम ट्युशन मध्ये शिकुन घ्यायचा ही प्रथाच पडल्यासारखे झालेय की काय असे वाटते.वास्तविक  पाहता एखाद्या शाळेत जर त्या विषयाचे पारंगत शिक्षक असतील तर फक्त शाळेत शिक्षकाने चांगले शिकवावे कारण तोच अभ्यासक्रम शाळेत आणी ट्युशन यात शिकवला जातो व त्यात तुलना केली जाते .सध्या या ट्युशनच्या बाजारात पालकाची ससेहोलपट मात्र होतेय. 
   एका कुटुबात तर मी एक पाटी वाचली *येथे बारावीचा विद्यार्थी आहे ,कामाशिवाय थांबु नये*किती हा अट्टाहास. तेव्हा मुलांना घडवतांना घरातील वातावरणाचा, नैतिक मूल्यांचा,विचार जास्त करावा .मुलांच्या अनावश्यक गरजा जरा जपूनच पुर्ण कराव्यात.असं माझ वैयक्तिक मत आहे. लहानपणापासुनच भरपुर पैसा कमवायचा ,व या पैशासाठीच डॉक्टर ,इंजिनिअर किंवा उच्चपदस्थ व्हायचं हि संकल्पना मनात ठेवुन वाटचाल करु नये .आपण कुणाच्या तरी कामी यावे वआपल्या हातुन थोडीशी का होईना जनसेवा घडावी असा विचार पाल्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना आईबापाच्या कष्टाची जानीव व्हावी. या जाणिवेचे बाळकडु त्यांच्या जीवनात त्यांना कामी येतील. कालच एक बातमी वाचली एका जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या गाडीचे चालक सेवानिवृत झाल्यानंतर त्यांचा सन्मान ज्या पध्दतीने केला ,ते पाहुन खरच मनातील त्यांचा आदर तर वाढला .व दसपटीने त्यांच्यावर संस्कार करणारे त्यांचे आईवडिलांबद्दलचे विचार मनात आले.असे संवेदनशिल अधिकारी  जर असतील तर माणसा माणसातील अंतर कमी होईल. 
      मुलांवर संस्कार करतांना  आपणही हेच पहायचे आहे शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्याचे सबलीकरण करायचे आहे. तसेच त्याची आवड लक्षात घेवून त्या क्षेत्रात त्याला पारंगत करण्यासाठी पालक हे दिशादर्शक असावेत. कधीकधी मुलांना अपयशालाही सामोरे जावे लागते अश्या प्रसंगी मात्र पालकाची भुमिका महत्वाची ठरते. कधीकधी मुलांच्या मनावर खुप दडपन असते. बाबांची हि इच्छा आहे ,मला इतके मार्कस् मिळालेच पाहिजेत,मग यातुन जर मुलांना अपयश आलं तर ती कोणतीही टोकाची भुमिका घेवू शकतात.म्हणुन आई म्हणुन मी एक सुचवु शकते ,आईने त्या मुलांची मैत्रिण बनलं पाहिजे.  माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेला प्रसंग बारावीची मिरिट असलेली माझी मुलगी CET ला एक मार्कावरुन मेडिकलचा नंबर हुकला.वडिलांची खुप इच्छा डॉक्टरच व्हायचे. अशा परिस्थितीत तिने रिपिट करण्याचं ठरले.परंतु मी तिला नेहमी प्रेरणा तर द्यायची पण हेही सांगायची की ,बाळा तु तर शिकलंच पाहिजे पण टेन्शन नाही घ्यायचे. मी तिचे डी एड ला अॅडमिशन घेतले होते. पण तिची जिद्द कायम, कारण वडिलांची इच्छा पूर्ण करायची होती.म्हणुन मी तिची मैत्रिण होते,बहिण होते ,अशा प्रसंगी खरच आईची भुमिका महत्वाची असते हे लक्षात घेतले पाहिजे.
  आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांना वहायला लावू नये.त्यांच्या आवडीचे त्यांना शिकायला मिळावे यासाठी पालकांनी रत्नपारखी व्हावे. मुलांचा कल लवकरच ओळखावा व त्यांना त्या क्षेत्रात प्रेरणा द्यावी. तो शेतकरी झाला तरी चालेल पण सुजान नागरिक झाला पाहिजे .कोणत्याही क्षेत्रात काम केले तरी प्रामाणिकपणे व मेहनतीने काम केले तर काहीही कमी पडत नाही हे त्याच्या मनावर बिंबवले पाहिजे.
       मुलांना व्यसनापासुन दुर ठेवावे.त्यासाठी स्वत:निर्व्यसणी असावे .आपला आहार, विहार,राहणी ही आदर्श असावी. मी ठामपणे सांगू इच्छिते ज्या कुटुंबातील बाप  शिगारेट ,दारु,तंबाखु, बाहेरचे चमचमित अन्न, यापासुन दुर आहे त्यांची मुलं कधीच बिघडणार नाहित .म्हणुन आदर्श पिढी घडवायची तर खुप जागरुक रहा कारण हवा ,पाणी , अन्न यासोबतच शैक्षणिक प्रदुषण खुप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.या प्रदुषणातुन आपल्या पाल्याला वाचवायलाच हवं आणि माझ्यामते हे सर्व एक आदर्श आईच करु शकते.आई ही संस्काराची खाण आहे आणि त्या खाणीतुन आदर्श हिरे मोती रुपी मुलं निपजावीत. ज्या कुटुंबातील आई आदर्श असते ते कुटुंब आहे त्या परिस्थितीत सुखी व समाधानी राहु शकते.मुलांना खुप काही कमवुन ठेवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्याला संस्कारक्षम बनवा.तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होईल यात तिळमात्र शंका नाही मुलांवर आईने असे संस्कार करावेत की तो या जगात कोठेही गेला आणि कसल्याही लोकांच्या सानिध्यात राहिला तरी तो यत्किंचितही डगमगनार नाही.जशी बत्तीस दाताच्या मध्ये जीभ रहाते.तसा तो असेल.
     शेवटी मी एकच सांगेल आई ही आईच असते.ती तिच्या बाळाला वाढवते,पालन पोषण करते,संस्कार करते व या जगात जगण्यास लायक बनवते,पण,मुलांनी आईचे हे उपकार कधीही विसरु नयेत.तिला दु:ख होईल असे वर्तन कधीही करु नका.जसं आईने आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं तसेच म्हातारपणी आईला सांभाळा.कारण हेच खरे संस्कार व हेच खरे तिर्थक्षेत्र आहे हे विसरु नका.आईला तुम्ही कशीही वागणुक दिली तरी ती तुम्हाला आशिर्वादच देईल. म्हणुनच म्हणतात *स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
      सौ.खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
       मुख्याध्यपिका जि.प.प्रा.शा.
      पिठ्ठी ता.पाटोदा.जि.बीड
        9403593764)szsanap@gmel
•••••••••••••••••••••••••••••••••••••• 
_कुठेही न मागता
भरभरुन मिळालेले दान
 म्हणजे आई_

 _विधात्याच्या कृपेचे 
  निर्भेळ वरदान 
  म्हणजे आई_

   स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे कि, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे वाक्य अगदी खर आहे. आपल्याजवळ खूप पैसा असूनही डोक्यावर मायेने हाथ फिरवणारी आई नसेल तर आपले जीवन व्यर्थ आहे.
  _जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी_
जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.'
      आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य कमी  पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही.
      प्रत्येकाच्या जीवनात जर महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर ती म्हणजे – आईची . आई हा एक  सोपा शब्द
 आहे. परंतु त्यामागे किती माया दडली आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे. हे संपूर्ण जगच आई या शब्दामध्ये सामावले आहे.आत्मा आणि ईश्वराचा सुंदर मिलाप  म्हणजे आई .आत्म्याचा प्रकाश आणि ईश्वराचे त्रिकालाबाधित सानिध्य म्हणजे आई. जगात आणणारी आई ही एका देवाचे रूप आहे. आई ही ईश्वराच दुसर रूप आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणजे माझी आई.
      माझा जन्म मध्यमवर्गीय रुढीचुस्त गुजराती घरात झाला. त्या काळा गुजराती कोम म्हणजे व्यापार विनियोग, बिनचुक हिशोब करता आला एवढे शिक्षण पुरेसे आहे, ह्या विचारसरणीचा तो काळ. मुलांना सुद्धा फार शिक्षण कमी देण्याचा तो काळ, आणि तेव्हा मी स्वप्न बाळगले उच्च शिक्षणाचे,डाॅक्टर होण्याचे. माझ्या ह्या स्वप्नपूर्ती साठी माझी आई  माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिच्या पुढाकारामुळे  वडील सुद्धा पुढे सरसावले.  आम्हा सर्व भावंडांना शिक्षणाच्या बरोबर सुसंस्कृत ही केले. आईच्या संस्कारात एक पदर आध्यात्माचा सुद्धा होता. त्या काळी डाॅक्टर होणारी आमच्या समाजातील मी पहिली मुलगी होती. अशा त्या माऊलीला त्रिवार वंदन . 
       डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
••••••••••••••••••••••••••••••••••••••
आई 
_________________________________
        देवाला अवतार घ्यायला 
       छान सापडला उपाय 
       म्हणून त्याने निर्माण केली 
       प्रत्येक घरात एक माय
                अरविंद कुलकर्णी 
    सर्व जग एका पारड्यात आणि आई हा एकच शब्द दुसर्या पारड्यात टाकला तरी जगाचे पारडे हलकेच राहील . आई हा शब्द अमृताहून ही गोड आहे .   आई म्हणजे वात्सल्य ! आई म्हणजे कारुण्य ! आई म्हणजे मुर्तीमंत त्याग !     आई म्हणजे परमेश्र्वराची अप्रतिम कलाकृती ! 
      आई  सुशिक्षित असो अडाणी असो , श्रीमंत असो की गरीब असो ,  ती कशीही असली तर शेवटी आई असते .  आपल्या लेकरावर तीची अमर्याद माया असते .   एका कवितेत एका आई ने आपल्या बाळा वर च्या  प्रेमा पोटी व्यक्त केलेल्या भावना 
        जोवरती या कुडीत राहिल प्राण 
        तोवरी तुज संगोपीन ,
         तदनंतरची करु नको तू चिंता 
         नारायण तुजला त्राता 
 जो पर्यंत आई जिवंत आहे तो पर्यंत मुलांची काळजी घेते .  दिवसभर काम करुन थकून भागून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा आपली म्हातारी आई आपली वाट पाहत असते .  जेवलास का रे बाबा म्हणून आपली प्रेमाचे विचारपूस करते.    आयुष्यभर आपल्यासाठी जिने कष्ट उपसले , आपल्याला झोपी घालण्यासाठी जी ने रात्र रात्र  जागून काढल्या . आपल्या आवडी निवडी लक्षात ठेऊन आपल्याला पोटभर जेवू घातले . आपण स्वत:अर्धपोटी , कधी उपोसपोटी राहिली . त्या आई ला आज आपल्याजवळ देण्यासाठी काहीही नाही . काय पाहिजे तिला ? सोनं नाण ? पै पैसा , साठी चोळी , दागदागिने की बंगला गाडी ? अरेरे तिला यातलं काहीही नको आहे . हे सर्व आपल्याला पाहिजे आहे . आपण पैशाच्या ,  बंगला गाडीच्या भौतिक सुखाच्या मागे धावत सुटलो आहोत . त्या धावपळीत आई , बापाला आपण केंव्हाच  वृद्धाश्रमात नेवून बसवले आहे .  त्यांना फक्त माया , प्रेम पाहिजे . घराच्या एका कोपर्यात त्यांना पडून राहू द्या पण वृद्धाश्रमात पाठवू नका .    
  आई ने लहानपणी आपले बोबडे बोल समजून घेतले . आपल्याला चिऊ काऊ च्या गोष्टी सांगून घास भरवले  आपल्याला शिकून सवरुन मोठे बनवले त्याची परतफेड तिला वृद्धाश्रमात ठेवून करु नका . तिला फक्त आपला थोडा वेळ द्या . बोला तिच्याशी घटकाभर . मग बघा ती कशी उठून बसते ती .  तिला औषधपाणी , डाॅक्टर , दवाखाना यापेक्षा ही तुमच्या आधाराची गरज आहे . तुमच्या गोड बोलण्याची गरज आहे . 
    तिच तुमचे दैवत तीच तुमची पंढरी , तीच तुमची गया ,काशी !  
           आई च्या उपकाराची फेड आपण कशानेच आणि कधींही करु शकत नाही . फक्त परमेश्र्वराकडे तेवढी एकच मागणी आहे व आई कडे ही एकच हट्ट आहे की 
           चे जन्म तू फिरुनी 
          येईन मी ही पोटी 
         खोटी ठरो न देवा 
         ही एक आस मोठी ......

                     अरविंद कुलकर्णी.
                    पिंपरखेडकर 
                    9422613664
                    arkulkarni.1955@gmail.com
•••••••••••••••••••••••••••••••••••••• माऊली

"माय माऊली दुनिया दावली" माझं अस्तित्वच मुळी तिच्यामुळे. काय बोलू तिच्याबद्दल?  म्हणतात ना, देवाला सगळ्यांकडे कसे जाता येईल म्हणून त्याने आई नावाचं त्याचं रूप सगळ्यांकडे पाठवलं. या सुंदर जगात मला आणण्याचं काम तिने केलं. आपली कुठलीही गोष्ट कुठे ठेवली आहे हे बरोबर तिच्या लक्षात असते. कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा समतोल ठेवण्यासाठी प्रयत्न करते ती. झोप, आराम या गोष्टी माहीतच नसतात. नुसतं घरासाठी राबणे. नोकरी करून घर सांभाळताना तिची थोडी चिडचिड होते. पण तरी खूप संयम ठेवण्याचा प्रयत्न असतो तिचा. आपली पहिली गुरु असते. आपण बोलायला शिकतो ते तिच्या सान्निध्यात राहूनच. आपले चांगले-वाईट गुण चांगलेच माहिती असतात तिला. चुकीला माफी नाही. चूक झाल्यावर ओरडते. प्रसंगी मारते सुद्धा. का तर तिला तिच्या लेकराची खूप काळजी असते.आपण असताना किंवा आपल्या पश्चात आपल्या लेकरावर कुठलीच वाईट वेळ येऊ नये म्हणून ती सतत उपदेशाचे डोस पाजत असते. मार्गदर्शन करत असते. पण हे जरी खरं असलं तरी काही मुले वाईट संगतीला लागून चुका करतात. तेव्हा मातेच्या शिकवणीला काहीच अर्थ राहत नाही. तिच्या मनाची काय अवस्था होते हे शब्दात सांगता येणे तरी कठीणच. खूप तुटून जाते ती आतून.  तिने आपल्यासाठी घेतलेले कष्ट आठवले की वाटते किती सोसलं तिने मला आज येथे पोहोचवण्यासाठी. खरंच, विचार येतो कधी कधी ज्यांना आईचं प्रेम मिळालं नसेल, त्यांचं काय? किती दुःखी असतील ते. म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
 परवाचीच गोष्ट घ्या. रव्याचे लाडू करत होते. काही केल्या लाडू वळले जाईना. काय करावे सुचेना. लगेच केला आईला फोन. मग तिने सांगितले थोडासा दुधाचा हात लाव. पाहिलंत ना आपण किती जरी मोठे झालो तरी तिच्यासाठी लहान असतो. आपल्या मुलांचे कौतुक इतरांना सांगताना तिचा ऊर भरून येतो. अभिमानाने तिची मान उंच होते.
पण दुसऱ्या बाजूला चूका मात्र ती झाकण्याचा प्रयत्न करते. वेडी माया. आई आणि मुलाच्या प्रेमाचे उदाहरण द्यायचे झाले तर श्रावण बाळ. खरचं,आपण सारे श्रावण बाळ आहोत. कितीही केले, काही केले तरी तिचे थोर उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. आपण हे लक्षात ठेवून वृद्धाश्रमाचा रस्ता विसरायला हवा. आपणही लहान असताना सगळे केले केले ना तिने. आता आपली वेळ सगळं करण्याची. मूल म्हणजे तिचे विश्व. विश्व जवळ नसल्यावर तिच्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही.

प्रिती दबडे,पुणे
9326822998
••••••••••••••••••••••••••••••••••••••
: !!!! आई !!!!!!!!!!!                         
 " आई " एवढं दैवत जगात दुसरे कोणतेही नाही . आई शब्दच इतका मोठा आहे की त्याची तुलना जगात कोणत्याही वस्तू अथवा दुसर्या कोणत्याही नात्याबरोबर सुद्धा होऊ शकत नाही .                                       आईचे वात्सल्य प्रेम माया फक्त मानवी जीवनातच आहे असे नाही सर्व प्राणी माञामध्ये ते ओतप्रत भरलेले आपल्याला दिसते.                                       याचे एकदम साधे उदाहरण बघा कोंबडी आपल्या पिलाना संकटांच्या काली आपल्या पंखात सर्व पिलाना घेते अर्थात त्यामुळे थोडेच संकट टलते पण तिचा माया देण्यासाठीचा ती प्रयत्न नक्कीच करते                               घार अति उन्च भरारी घेते किंवा मारते परंतू तिचे सर्व लक्ष माञ तिच्या पिलावर असते . " घार हिन्डे अकाशी , चित्त तिचे पिलापाशी ."                                म्हणजे आई म्हणजे आई बिलकुल तडजोड नाही . एखाद्या आईला कितीही लेकरं असू दया सर्व लेकरांवर समान उलट एखादा दिव्यांग असेल तर त्याची तिला जास्त काळजी .                  आई शब्दामध्ये जी ताकद आहे ती मम्मी मध्ये नाही . पाश्चिमात्य देशात मम्मी शब्दाचा अर्थ काय आहे . किंवा काय ते आपणाला सांगणं नलगे .                                 आई ईश्वराचे रूप आहे .तिर्थ तर तिच्या जवळच असते . म्हणून तिर्थरूप हे संबोधन आपण पञात तिला वापरतो . महा वैष्णव माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात " सर्व तिर्थाचिये धूरे ! ती हे माता पित्तरे !!  माता आणि पिता हे निश्चित तिर्थापेक्षा श्रेष्ठ आहेत असे या ओवीवरून आपल्या लक्षात येईल .             ज्या ला माता आहे. आई आहे तो.सुभाषिताने धन्य ठरविलेला आहे . मग तो कोणीही असो , जगाचा चक्रवर्ती जरी असला तरी तो आई
विना व्यर्थ आहे एका थोर कवीने म्हटल आहे " स्वामी तिन्ही जगाचा ! आईविना भिकारी !! आई
ज्याला नसेल त्याचा मायेचा सागर आटला म्हणावा . ज्याची आई गेली त्याचं सर्वस्व गेलं असं समजावं  .म्हणून ठिक ठिकाणी ठिक ठिकाणी थोर कवी नी आईची महती गाईली आहे . वर्णन केलेले आहे . तरीही आईचे महात्म्य वर्णन करून संपले असे म्हणता येणार नाही कारण आई एक झरा असतो कुठूनही झरा सारखा पाझरत असतो तो अखंडीत असतो , कोणी आईला प्रेमाचा सागर म्हटलय , कोणी.हरणी म्हटलय ज्याने त्याने आपापल्या परीने आई व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे .कोणी कोणी आईला आणि मातृभूमीला स्वर्गापेक्षाही महान उपमा दिलेली आहे " जननी जन्म भूमीश्च स्वर्गा धि महि म्हणजे आता उपमेय च नाही मग अशा या मातेचा कितीही महात्म्य्याच्या कथा गाईल्या तरी शब्द क्षीणच होणार
म्हणून या शब्द रूपी पुष्पाद्वारे माता माऊली आईचे कितीही पद कमल पुजीले तरी उपकार फिटूच शकत नाहीत तरी शब्द रूपी पुष्पाचा वर्षाव आई पाञाच्या चरणी समर्पित करून माझ्या शब्द कणाना विराम देतो . 
          भागवत लक्ष्मण गर्कळ
••••••••••••••••••••••••••••••••••••••
आई सुखाची जननी

देवाला प्रत्येकाच्या घरी जन्म घेता येणे शक्य नाही.म्हणून देवाने आईची निर्मिती केली.आईचा रूपाने प्रत्येक घरात भगवंत अवतरत असतो.जगातील सर्वात सुंदर नात म्हणजे आई.नऊ महिने नऊ दिवस दगडाप्रमाणे पोटाशी ओझे वागवते.चेहऱ्यावर मात्र लाखमोलाचा आनंद झळकतो. स्वतःच्या इच्छा आकांक्षाला मारून,बाळाच्या वाढीसाठी लागणारे अन्न व औषधीचे सेवन करते.जगातल्या सर्वात सुंदर व सुरक्षित गर्भात आपल्या बाळाला वाढवते.नऊ महिने नऊ दिवस झाले की,आपल्या बाळाच्या जन्मासाठी असह्य वेदना सहन करते.ती फक्त आईच होय.स्वतःचे दुःख विसरुन बाळाला स्वतःच्या छातीशी कवटाळते.आपला सर्वात पहिला गुरु आई होते.आपल्यावर सर्वप्रथम चांगले संस्कार आई करते.बोलणे,चालणे,अशा प्रत्येक गोष्टी प्रथम आईच शिकवीते.स्वतःच्या पोटाला मारून लेकराच्या मुखात अन्नाचा घास भरवणारी आई प्रत्येकाला देवाने दिली. परिस्थिती कशीही असो त्याची खंत न करता आपल्या बाळाला सुरक्षित व सुखरूप ठेवते.जगातली प्रत्येक चांगली गोष्ट फक्त माझ्याच बाळाला मिळावी.हा अट्टाहास सदैव करत राहते.सकाळी झोपेतून उठतांना तोंडावरून हात फिरविते.अंघोळ घालून स्वतःच्या पदराने ओले अंग पुसण्याचे भाग्य विध्यात्याने तिच्याच पदरी घातले. प्रेमाचा,मायेचा सागर म्हणजे आई.उन्हात सावली निर्माण करते ती आई.कडू घास तिच्या स्पर्शाने गोड लागतो.स्वतः आयुष्यभर दुःख सहन करून लेकराच्या आनंदासाठी, सुखासाठी झटत राहते.ती फक्त आईच होय.आई म्हणजे वाळवंटाच्या उन्हातील पाण्याचा झरा,आई म्हणजे दुधावरची साय,आई म्हणजे देवळातील घंटेचा सुंदर नाद,आई म्हणजे भजनातील सुंदर रामनाम,आई म्हणजे प्रेमाचा अखंड जरा, आई म्हणजे वेदनेची फुकंर,आई म्हणजे संस्काराचा खजिना होय.जगात असे एकच नाते आहे.त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.उत्तम संस्कार व शिक्षण देऊन,आपल्याला उत्तम घडवण्याचे काम ती करत असते.सुंदर बालक घडवणारी ती एक उत्तम कलाकार असते.आई ही मुळात देवाचा अवतार आहे. प्रत्येकाला देवाने स्वतःचा अंश आई रूपाने दिला आहे.तो प्रत्येकाला आयुष्यात जपता आला पाहिजे.संस्कार व शिक्षणाने आयुष्यात कितीही मोठे यश संपादन केले. कितीही पैसा,प्रतिष्ठा प्राप्त केली.तरी आईपेक्षा मोठं कुणालाच होता येत नाही.ही वास्तव परिस्थिती आहे. आईला आपले लेकरू हे सर्व सुखापेक्षा मोठे वाटते. आयुष्यात त्यागाचे प्रतीक बनून ती लेकरासाठी सर्व गोष्टीचा त्याग करत आलेली असते.स्वतः दुःख सहन करून सुखाचा ओलावा निर्माण करण्याची शक्ती फक्त आईला जमते. रंग,रुप याचा मोह दिला नसतो.आपले बाळ कसेही असो. तिला स्वतःच्या जिवापेक्षा अधिक प्रिय असते.आपल्या बालकाला गरिबीची चाहूल लागू न देता.शक्य होईल तेवढे अधिक चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न ती करत असते. प्रत्येक आई आपल्या मुलाला चांगले संस्कार,शिक्षण,उत्तम आरोग्य प्रदान करत असते.आयुष्यात आपणही आईला देवाप्रमाणे जपले पाहिजे.आईचे ऋण एका जन्मात फेडणे शक्य नाही.पण आईला जीवापाड जपणे मात्र शक्य आहे. आयुष्यात आपल्याला यशाची भरारी घेण्यासाठी,आपल्या पंखामध्ये बळ भरण्याचे काम आईनेच केलेले असते. जीवनात यशाचे शिखर गाठल्यावर,त्याच शिखरावरून मागे वळून पाहताना.आपली आई आपल्याला लहान दिसता कामा नये.तिचे महत्त्व त्या उंच यशाच्या शिखरा ऐवढेच मोठे आहे.तिचे स्थान कधीही कमी होत नाही.आईची किंमत आई गेल्यावरच कळते.जसा सुर्य मावळला की, त्याचा प्रखर प्रकाश नाहीसा होतो.सगळीकडे अंधाराचे वास्तव पसरते.तसे आई जीवनातून गेली.की जीवन अंधारमय होऊन जाते.आईच्या कुशीत मिळणारा विसावा जगाच्या कोणत्याच गादीत मिळत नाही.आईचा तोंडावरून फिरणाऱ्या हाताचे प्रेम जगाच्या कुठल्याच शक्तीत मिळत नाही.वात्सल्याचा हा जरा असाच सदैव प्रत्येकाला मिळत राहो.यासाठी आई हे दैवत मानुन सदैव तिला देवाप्रती पुजत रहावे.

राजेंद्र प्रल्हाद शेळके
शिक्षक
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलडाणा
9823425852
rajendrashelke2018@gmail.com
••••••••••••••••••••••••••••••••••••••
 आईच्या छायेत

     माझ्या आईच्या छायेत 
     नसे कशाचीही  भ्रांत 
     राही जीव माझा सुखी 
     या पदराखाली निवांत
              आई लेकरांसाठी तुझं प्रेम पुरतही नाही नि दुसऱ्यांसाठी ते उरतही नाही.तुझ्या नावाचाचं महिमा गाऊ किती वर्षांनुवर्षे तो सरतही नाही.

 'फुलामध्ये फूल | फुल हूंगावे जाईचे|
 सुख भोगावे आईचे |बालपणी  ||
 माऊली माऊली | कल्पवृक्षाची सावली |
 तान्हे बाळालागे दिली |देवाजीने ||

         साने गुरुजींच्या ओव्यांतून आईची महती व्यक्त होते. आईची पूजा म्हणजे वात्सल्यतेने उभ्या असणाऱ्या परमेश्वराची पूजा. माऊली म्हणजे निस्सीम सेवेची मूर्ती. माता म्हणजे मनुष्य जीवनातील गंगाजल, अमृत. मातृत्वाचे पान (पिणे) करून घेण्याचे वरदानच आपणास प्राप्त होते. आईच्या प्रेमापचढे इंद्राचे हे नंदनवनच ओसाड वाळवंट वाटावे. स्वर्गाचा बडेजावही त्याज्य वाटावा. 'मातृदेवो भव' म्हणून ऋषीमुनींनी आईचा केवढा सन्मान केला आहे.'आई हेच दैवत' न मातुपर दैवतम, म्हणून सानेगुरुजी म्हणतात 'माता माझी गुरु माता माझा कल्पतरू' बाळाचे हट्टही न कंटाळता, न  चिडता आईच पुरवू शकते. म्हणूनच लेखक टेलर म्हणतात, "मी  पडताच मला उचलायला धावून येते आणि मला गोड गोष्टी सांगत जी जमिनीवरची माती उचलून'ईडापीडा टळो" म्हणून फुंकर घालून फेकून देते ,ती माझी आई".आई ही वात्सल्य, प्रेम, ममता, सद्गुण शुचिता या गुणविशेषांचे निधान आहे.
      आई मुलाला बोलायला, चालायला शिकवते म्हणून आईला मुलांची पहिली गुरु म्हणतात. समुद्रात अनेक रत्ने असली तरी मोत्याचे रक्षण शिंपल्यामुळे होते. आई हे बालकाचे पहिले जग. या जगात कोणताही अपराध घडला तरी न्यायाधीश प्रेमळ असल्यामुळे शिक्षेचे स्वरूप ही बक्षिसा- प्रमाणे असते. जगात आई आहे म्हणून हे सुंदर जग पहायला मिळते. मातेच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही म्हणूनच कवी म्हणतात," मातेच्या मायेची तुलना कशाची, आई पुढे किंमत शून्य जगाची" आईच्या मायेमुळे सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे क:पदार्थ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या  शूरांना घडवायला हेच कारण आहे. मातेचा दीर्घ सहवास लाभणे हे सुकृताचे फळ म्हटले आहे ."प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी" आईशिवाय स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यातील सारी संपत्ती ही निरर्थक आहे. म्हणूनच कवी यशवंत म्हणतात, "स्वामी तिन्ही जगाचा आईविना विना भिकारी".
       आपल्यावर आईचे अनंत उपकार असतात. ते सात जन्म घेऊनही फिटणार नाहीत. तुझे उपकार आई ध्यानात येई तुझे या जन्मीही फिटणार नाही "शुभंकरोती शिकवी मजला मना लावी लळा" हीच मागणी तुझं श्रीकृष्णा,रक्षावे मज आईला". सानेगुरुजी म्हणतात, 
"आईचा बोल म्हणजे वाऱ्यांचा झोल
आईच्या हातचा घास म्हणजे अमृताची आस"| म्हणूनच जगज्जेत्या सिकंदराला भारतातून परतताना प्रथम दर्शन हवे होते त्याच्या आईचे. प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्रांनी स्वर्गापेक्षा माता श्रेष्ठ वाटते.  उगाचच नाही म्हणत" आईसारखे दैवत साऱ्या जगा मध्ये नाही ". आईचा महिमा सांगताना कवी म्हणतात, "आई ही आई असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते".फळ तयार होताना ते झाडानं आपला जीवनरस ओतल्यानं.मनूष्यरूपी झाडांत जीवनरूपी मंदिराला आईरूपी भक्कम पाया असेल तर यशोशिखराचे काय महत्त्व!
      'हसता मजला पाहून हसते
      मुके मटामट कितीतरी घेते'
      परि अंतरी जी तृप्त न होते
 ती माझी आई .माझी आई असते ती उत्तम गृहिणी असून स्वयंपाकात, विणकाम ,भरतकामात कुशाग्र आणि बोलताना तोंडात साखर घोळवल्याप्रमाणे मधाळ नि रसाळ वक्तृत्व.रस्त्यात ठेच लागली की 
 "आई गं " म्हटल्यानेच कळ कमी होते.आपल्या मुलाने शिकून कुणीतरी मोठे बनावे नि सदाचारी वागावे म्हणून आपल्या डोळ्यांच्या पणत्या करून मुलांना सांभाळते. अशी या आईची थोरवी "आकाशाचा कागद, समुद्राची शाई नि हिमालयाची लेखणी करून लिहिली तरी संपणार नाही" म्हणूनच म्हणतात,"आई ही दोन अक्षरे हृदयात जपून ठेवा"
 सोन्याच्या झळाळीसाठी आधी बसावे लागतात चटके, मूर्तीच्या सौंदर्यासाठी आधी खाव्या लागतात बंदुकीच्या गोळ्या,स्वप्नांच्या पूर्तिसाठी आधी पहावं लागतं मरण,आईच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची प्रचिती येण्यासाठी आधी  पडावं लागतं विरजण".
       आपल्या मुलाच्या सुखासाठी स्वतःचे काळीजसुद्धा काढून देणारी आईच असते. "संसाराचे सार काय तर ममताळू माय "आईची महती सांगताना सानेगुरुजी म्हणतात "आई या अक्षरात माधुर्याचा सागर आहे ,पावित्र्याचे आगर आहे, फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता चंद्राची शीतलता नि रमणीयता, आकाशाची विशालता सूर्याची तेजस्विता, सागराची अमितता हे सारे गुण एकट्या आईत एकवटले आहेत. आईच्या गुणांचे वर्णन किती गाऊ तितके कमीच म्हणूनच म्हटले आहे परमेश्वराला अवतार घेऊन एका घरातच राहावे लागले असते पण कुणाच्या घरात राहायचे हा विचार न झाल्याने त्याने आई निर्माण केली व घराघरात पाठवली. आई हे परमेश्वराचेच रूप आहे. आणि भावाची भुकेली असते आपल्या लेकराच्या कल्याणासाठी ती वाटेल तितके कष्ट सोसते. आपल्या बहारदार लेखणीने आईचे वर्णन करताना कवयित्री इंदिरा संत म्हणतात," आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. 
      ज्याप्रमाणे मुरांबा जास्त दिवस मुरला की त्याची गोडी अविट लागते त्याप्रमाणे आईचे प्रेम मुलांसाठी मुरांब्याप्रमाणे असते.

सौ.भारती सावंत
 मुंबई
••••••••••••••••••••••••••••••••••••••: 
आई --एक विद्यापीठ


      आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही 

      म्हणून श्रीकाराचे नंतर शिक रे अ आ ई 

गदिमांनी आई बद्दलचे उत्कट भाव किती थोडक्या शब्दात नेटके मांडले आहेत . 

        'आई' दोन अक्षरात पृथ्वीचे सार आहे, सौंदर्याचा अभिमान आहे, बुद्धीचे तेज आहे आणि विश्वाचे वैभव आहे.

         आई शब्द उच्चारला तरी मनात आठवांच्या लाटा उचंबळून येतात. किती सांगू अन् किती नको असे होऊन जाते 

       संस्कार आणि शिक्षण दोन्ही आवश्यकच . पण दोन्हीत फरक आहे . शिक्षणातून तुम्हाला ज्ञान मिळते . ते ज्ञान मुद्दाम दिले जाते . आईच्या संस्कारांचे  कुठलेच पुस्तक नाही. संस्कार पुस्तकांच्या  पलीकडचे असतात.  संस्कार हे मुद्दाम करावे लागत नाहीत . ते आपोआप होत असतात . तिचे विचार, तिचे वागणे , बोलणे  हे काळजातून आलेले असते.त्यामुळे मनावर संस्कारांचे प्रतिबिंब अपोआप उमटते. ती संस्कार कशी करते हे कधीच समजत नाही. मुले तुमच्या नकळत तुमच्याकडून शिकत असतात . संस्कारित होत असतात . मूर्तीला सुंदर आखीव रेखीव रूप येत असते . संस्काराचे कुठलेच गणित नसते. संस्कार हे जीवनातले काव्य असते . आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ते काव्य आपल्याला साथ देत असते .      

   आई ही माणसाच्या आयुष्यातील प्रथम गुरु असते , अगदी जन्माच्या आधीपासूनच . आईच्या पोटात गर्भ रूपाने जीव येतो . गर्भारपणात ती जसा विचार करते , ज्या भावनांचा खेळ तिच्या हृदयात चालतो , तिची कर्मे , त्यातूनच गर्भावर संस्कार होत असतात  . त्यातूनच त्याच्या शिक्षणाची पुस्तके तयार होत असतात . म्हणूनच त्या काळात चांगली पुस्तके वाचावीत , चांगले विचार करावे, चांगले संगीत ऐकावे असे पूर्वापार सांगितले जाते 

         आईच्या पोटात गर्भ राहतो ,पोसला जातो . तिच्याशी तो एकरूप असतो . तो तिचाच होऊन बाहेर पडतो. जन्म दिल्यापासून जी नाळ जुळते ती कधीच तुटत नाही. बाहेर आल्यावर हि तो आईजवळ जास्त असतो . हसतो , खेळतो ,दूध पितो ,सर्व आईच्या कुशीत . खरी गुरू आईच असते . आईच्या शिकवण्याची भाषा मायेची, प्रेमाची असते. नुसते शब्द नसतात तर प्रत्येक शब्दात ओलावा असतो. आई बाळाला मन आणि तन दोन्ही देते . जन्माला घालणारी तीच आणि घडवणारी हि तीच . 

     उगाच नाही म्हणत ' जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धरी .' म्हणून कौसल्येचा राम , सुभद्रेचा अभिमन्यू , जिजाऊंचा शिवाजी अजरामर झाले . 

       मुलांचे मन कोरे असते , रिकामे असते . नवनीतासारखे, मातीसारखे असते . द्यावा तसा आकार येतो . त्याचे कोरे ,रिकामे मन जसे वाढीस लागते तसे आजूबाजूचे जे दिसेल ते आधाशासारखे डोक्यात भरू लागते . आजूबाजूचे जग ,सृष्टी सर्वांकडून ते शिकत असते . पण त्यातून काय घ्यावे ,काय घेऊ नये , हे शिकवते फक्त आईच. चांगल्या वाईटतला फरक आई सांगते . मुलाला माणूस म्हणून घडवण्यात तिचा मोठा वाटा असतो. 

  आई माझा गुरु l आई कल्पतरू l सौख्यचा सागरू l   आई माझा l 

      माणसाचा मोठेपणा हा त्याच्यावर घडणाऱ्या संस्कारांवर, शिक्षणावर अवलंबून असतो . त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहान पणीच घातला जातो . ती गोष्ट आहे ना.---  जो पोपट साध्वीकडे वाढला तो ऋचा म्हणू लागला . जो पोपट चोराकडे वाढला तो फक्त शिव्याच शिकला . मुलांचे मन असे असते . त्यांच्यात अनुकरण करण्याचा गुण उपजतच असतो . 

          इतर ठिकाणी मूल वाढतं आणि घरात मुलाला आई वाढविते . हा फरक असतो . मोठे होणे म्हणजे नुसते वय वाढणे नव्हे  किंवा प्रसिद्धी पावणे नव्हे , तर मन व बुद्धी योग्य रीतीने हळूहळू उन्नत होणे . हे फक्त आईच करू शकते कारण तिच्या सान्निध्यात मूल जास्त असते . 

          मुलं आईकडेच गाऱ्हाणी घेऊन येतात . कारण मुलांना तिच्यात कॉन्फिडन्स दिसतो . ती योग्य न्याय निवडा करते आणि ते त्याला पटतेही . आईने मुलांवर दाखविलेल्या विश्वासातून त्यांना योग्य मार्ग चोखंडळता येतो. 

         मुलाचे गुण - अवगुण जाणून , त्याच्या स्वभावाचे बारीकसारीक कंगोरे जाणून आई त्याला घडवत असते .

     आईला कळतं कधी मुलांशी मायेच्या ओलाव्याने शांत माऊलीच्या रुपात बोलायचे , कधी दुर्गावतार धारण करायचा . 

        आईची सहनशक्ती , पोटात चुका घालण्याची क्षमता, संकटात धीर देण्याची कुवत , त्याची चुकलेली वाट सुधारणे , संसारातील काटे मुलांना बोचू न देणे , तिचा मदतीचा पुढे असलेला हात इत्यादी सर्व गोष्टींचे निरीक्षण मुले करीत असतात . आणि नकळत धडा घेत असतात. 

         आई पण अनुभवायला आणि मूल जाणून घ्यायला दोघांमध्ये समंजसपणा असावा लागतो, तो संस्कारातून येतो.

           आई विद्यापीठातील अशी अध्यापिका आहे की, तिला फार शिक्षणाची जरुरीचे नसते. ती आपल्याला कधी शिकवते, तेही कळत नाही. ती हेही कधी म्हणत नाही मी तुम्हाला हे शिकवलं, मी तुम्हाला ते शिकवलं.

तुमचा हा पोर्शन आहे. तिला त्याचा आपण कधी पगार देतो का? ती आपल्याला समाजात कसे वागायला हवे, कसे बोलायला हवे, ते शिकवते. जशास तसे कोणाशी वागावे, प्रेमाचा हात कुणाला पुढे करावा, मदतीचा हात कुणाला द्यावा, न्याहरी काय करावी, काय जेवावे, कधी जेवावे, कुठले पदार्थ खावे, अशाप्रकारे नीतिशास्त्र, राजकारण शास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र हे तर आपण शिकतो. फिजिक्स, केमिस्ट्री, शेती, न्यूट्रिशन हे ही ती नकळत शिकवत असते. विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या विषयां पेक्षा कितीतरी जास्त गोष्टी ती शिकवत असते.

        विद्यापीठातल्या अध्यापकांना ठराविक वयानंतर रिटायरमेंट असते. पण आई मात्र कधीच रिटायर होत नाही हेही तिचे विशेष.

         जाता जाता आठवलं म्हणून सांगते. विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिला 'आई' या एका शब्दाने विश्वविख्यात केलं. ' सर्वात पगार मानसन्मान कोणाला जास्त द्यावा असं तुम्हाला वाटतं '? हा प्रश्न तिला परीक्षकांनी विचारला होता. त्यावेळी तिने एका झटक्यात उत्तर दिलं 'आईला'. आणि ती विश्वसुंदरी झाली . जिच्या बुद्धीच्या तेजाने सौंदर्याला हि तेजाळले!

         आईला प्रत्येक वेळी बोलावं लागतं असेही नाही . न बोलता सुद्धा ती खूप काही बोलून जाते . ती नसतानाही तिचे अस्तित्व कायम जाणवत असते . आई म्हणजे सदोदित येणारी 'आठवण' . म्हणूनच मला माधव जुलियन ह्यांचे शब्द आठवतात,

        प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई 

        बोलावू तुज आज आता मी कोणत्या उपायी

            हे संस्कार घडवण्यासाठी, ती जे काही शिकवते त्यासाठी आई फार उच्च शिक्षित असावी लागते असेही नाही . सुसंस्कारित मात्र हवी.  जिच्यात तेजस्वी , भावुक, रंगीबेरंगी अशी अमोल रत्ने दडलेली आहेत ती म्हणजे आई . आईसारखी आईच ! खरंच 'आई हे एक मोठे विद्यापीठ आहे.

शुभदा दीक्षित 
पुणे
••••••••••••••••••••••••••••••••••••••

आईची महती

आई !  आई हा शब्द ऐकला की प्रत्येकाला आठवते ती आपली जन्मदात्री आई ! 
काळजाला भिडणारा शब्द म्हणजे आई! आईची महती एवढी मोठी असते की कितीही सांगा ती अधुरीच! 
" आईची ही माया, शब्दात होणे नाही
आईची ही ममता, शाईही पुरणार नाही 
आईची ही महती,काव्याला पेलणार नाही 
आईचा हा जिव्हाळा, लेखणीला झेपणार नाही"

आई हा शब्द फक्त  दोन अक्षरांचा नाही. या दोन अक्षरात ईश्वराच्या आत्मा सामावलेला आहे.
,आ, म्हणजे  'आत्मा' आणि  ' ई' म्हणजे 'ईश्वर' ईश्वर प्रत्येकाच्या  घरात आईचा रुपाने वास करत असतो.
सर्वजण आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. देवसुद्धा आईच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. कारण आईच्या कुशीत माया, ममता ,लळा ,जिव्हाळा आणि प्रेम यांचा खजिना असतो, म्हणूनच आईला वात्सल्याचा महासागर म्हटले जाते.आईचं  बाळ कितीही मोठ झाल तरी तिला तो लहानच असतं.
म्हणून दूर कामासाठी , नोकरीसाठी गेलेला मुलगा घरी परत आला की आई त्याच्या तोंडावरुन हात फिरवते.त्याला कुरवाळते. आणि आईच्या पाया पडण्यासाठी मुलाने माथा टेकला की आईचा ऊर भरून येते. व ती भरभरून आपल्या मुलाला आशीर्वाद देते. 'सदा सुखी राहा !'बाळ असं म्हणते. केवढी ती माया केवढे ते अफाट प्रेम.
आई म्हणजे मंदिराचा उंच  कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्याव अस थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी पवित्र टाळी, आणी वेदनेनंतरची पहिली आरोळी. आई म्हणजे त्याग मुर्ती स्वतः उपाशी राहून आपल्या पिलास घास भरवते ती आई.
खरंच ज्यांना आई असते ते किती नशिबवान असतात. एका कवीने म्हटले आहे ' स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' 
म्हणूनच जोपर्यंत आई  आहे तोपर्यंत जीवनात रस आहे. कारण आईशिवाय मुलं म्हणजे उदास, भकास,भयानक आणि कुरूप जीवन. आईचा विरहाच वर्णन करताना  कवी गोसावी म्हणतात
"आई तु गेली अन् घरी रिकाम झालं
गावातल्या एखाद्या उद्ध्वस्त वाड्या सारखं,
आई तू होतीस तेव्हा घर भरून वाहत होतं
खळखळणाऱ्या नदीसारख! "

आयुष्यभर आपली काळजी घेणारी आपली आई ही एक त्यागाची मूर्ती आहे. तिचं वर्णन कितीही केलं तरी थोडंच आहे.लेखणीत सामावणार नाही. 
आई खरंच महान आहे. माझासाठी वंदनीय, पुजनीय आहे. आईची महती सांगताना मला घेले या कवीचा कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा म्हणावयास वाटते.
"काय सांगू  आई, तुला तुझी ग महती, 
तुझ्यासारखी नाही , कुणीच या जगती
रामकृष्ण आले गेले , मीही पामर जाईल 
तुझ्या महतीचा डंका , सार्या जगात गाईल." 
पुन्हा एकदा मी माझ्या आईला भावपूर्ण वंदन अभिवादन  करते व तिचा असाच आशीर्वाद मिळावा हीच इच्छा बाळगते.

 शेवटी एकच सांगाव  असं वाटते की आपली काळजी घेणाऱ्या  आईची  आपण म्हातारपणी तिला जपल पाहिजे  तिची काळजी  घ्यावी. आपण सर्वांनी आप आपल्या आई-वडिलांची सेवा करावी. कारण ज्या मुलाच्या मागे आई-वडिलांचा आशीर्वाद असतो  त्यांची संकटे आपोआप दूर  होतात. म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी आईवडिलांची सेवा करावी. हीच ईश्वर सेवा आहे. 
〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
•••••••••••••••••••••••••••••••••••••
आई

   -------------------------------

काहीच बोलता न येणारी प्रत्येक बाळं आई या शब्दा पासून बोलायला शिकतात. पण बोलायला शिकवलेल्या आईला मात्र लहान प्रसंगावरून कधी कधी खूप खूप बोलतात.
  मला मान्य आहे पहिला संघर्ष हा आईशीच असतो. बोलताना , तिच्या भावनांचा अर्थ  समजून का घ्यायचा नसतो ? लहानपणी ज्या आई वाचून एक मिनिटही करमत नाही, एकही काम तिच्याविना होत नाही, तिच्याशिवाय जवळचे कोणीच वाटत नाही, पण मोठे झाल्यावर तिला गृहीत धरून वागवले जाते.
नको म्हणा , रागवा , तिरस्कार करा हवे तसे बोला , मस्करी करा, ती कायम तुमच्या पाठीशीच असते. कारण तिने हे सुंदर जग आपल्याला दिलेले असते. म्हणून ती आपल्यासाठी वेडी असते. तू नाही जेवला , अभ्यास नाही केला,लवकर नाही उठला , नाराज दिसला अशी सतत विचारपूस करत राहते. कारण ती वेडी असते आपल्या पिलांसाठी.आपल्याला रागावते पण तीच रडते
  मोठे व्हावे तुम्ही ,म्हणून सतत झटते,
स्वतःला विसरते , तुमच्या विश्वात रमते,कारण ती आपल्या मुलांसाठी वेडी असते.
             जिंकलात तर ओल्या डोळ्यांनी हसते.
हरला तर खंबीर बनवते ती आपलीच आई.
तुम्ही असाल कसेही , जीवापाड जपते कारण ती  आपल्या पोटच्या गोळ्यासाठी वेडी असते.
 ती नाही कळणार , नाही उमगणार ,तीच्यामुळे आपण परिपुर्ण घडलो, जगात उभे राहिलो.
हे आज नाहीच आपल्याला पटणार.कारण ती  नाही श्रेय वाटणार.खरं तर ती वेडी नसतेच कधी मातृत्वाची जबाबदारी पेलत पेलत
आपल्याला ही नव्यानं फुलवत असते.
स्वप्नातील दिवस तिचे वास्तव स्वीकारुन आपल्या मध्ये बघत असते ,कारण ती "आई "असते. ती उमगू लागते तेव्हा आपण
  मागे जाऊ शकत नसतो...
ती असेपर्यंत थोडीशी समजली तरी
 यासारखा खरा आनंद नसतो.७० वर्षांच्या माझ्या स्किझोफ्रेनिया झालेल्या आईला सांभाळता सांभाळता मी कधी तिची आई झाली, हे समजलेच नाही. तर कोरोना संक्रमण काळात माझा मुलगा न्यूयॉर्क येथे आहे त्यामुळे मी त्याची आई म्हणून  कणखर कशी झाली, ते मला माहीत नाही, समजलेच नाही.....
    सर्व आई मंडळींना समर्पित.....
  श्रीमती मेघा अनिल पाटील,
 उपशिक्षिका 
 श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
: आई एक आगळेवेगळे विश्र्व.
       मला असं वाटतं की देवाला प्रत्येक घरात जाणे शक्य नसल्यामुळे त्यान आईची निर्मिती केली. तुसत आई हा शब्द मुखातून बाहेर पडल्यावर डोळ्यासमोर वात्सल्य,प्रेम,निस्वार्थि रुपी खळखळ वाहणारे झर्याचे पाणी दिसायला लागते.मुलं जन्माला आल्या पासुन तिचं विश्वच बदलुन जाते. ती इतकी खुश असते की तीला भानच नसते या जगात काय सुरु आहे. तिच्या बाळान थोडं जरी कौतुक केले तर ती सगळ्या शेजारी पाजारी त्याचे वेडेवाकडे चाळे सांगत सुटते.शाळेत जायला लागला की त्याला आवडणारे विविध मेनु ती त्याच्या टिफिन मध्ये देते शाळेतून घरी आल्यावर त्याने टिफिन मधले सगळे खाल्ले की नाही हे आधि बघते. याचाच अर्थ तिचं आपल्या मुलांवर खुप लक्ष असते.मुले‌ मोठे होतात त्यांना नविन जग बघायला मिळते ते हळूहळू बाहेर च्या विश्वात रममाण होतात पण आईचे विश्र्व हे तिच्या मुलांन मध्येच गुरफटलेले असते.असं म्हणतात न स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.ते अगदी खरं आहे. बाहेरून खेळून आलेलं मुल घरात पाय ठेवताच आई,आई करत सगळं घर डोक्यावर घेत . तिथपर्यंत ती दिसत नाही तिथपर्यंत ते शांत बसत नाही. शेजारच्या घरात जाऊन विचारतो माझी आई दिसली का?खरं म्हणजे काम काहीच नसतं पण घरात आई नसली की त्याचा जीव बैचेन होतो.आईने मुलाला लहानपणी दिलेल्या चांगल्या संस्कारामुळे त्याचे भविष्य घडते. जिथपर्यंत शिक्षणाला संस्काराची जोड नसेल तर तेशिक्षण पशु समान असतं. आज आपल्या देशात किती तरी शिकलेले लोक भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले आहेत,ते तर शिकलेले आहेत पण  संस्कारांचा अभाव.जिजाबाईंनी शिवाजींना घडविले.आईच्या संस्काराने परस्त्रि मातेसमान मानुण या महाराष्ट्राला मोगला पासुन स्वतंत्र केले.साने गुरुजी घडले केवळ आईच्या संस्कारातुन .इतके भित्रे आणि लाजाळु असणारे सानेगुरुजी फक्त आईच्या मार्गदर्शनातून भारत मातेला स्वतंत्र करण्याकरिता देशसेवेचा विडा उचलला.उच्चशिक्षित धनाढ्य वडिलांच्या मृत्यूनंतर नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद घडले ते फक्त आईच्या मार्गदर्शनातून आणि संस्काराने.शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यात राहणारी हिरकणी नावाची महिला रोज शेजारच्या गावात दुध विकायला जायची ,तीला परत यायला वेळ झाला किल्ल्याचे प्रवेशद्वार बंद झाले .तीच दुधपीत मुलं तान्ह होत. तीला माहिती होत आपलं मुल रडुन रडुन बेजार होईल. फक्त मुलांच्या प्रेमा पोटी ती माऊली पुर्णगड चढून गेली. हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.या बहादुर हिरकणी चा बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.आज आपल्या राज्यात हिरकणी पुरस्कार दिल्या जातो.मित्रांनोआई आई असते मग ती मनुष्य प्राण्याची असो की पशुपक्षाची असो. दुर दुर जाऊन पक्षी आपल्या पिल्लांनसाठी चारा आणतात आणि त्या पिंल्लाच्या चोचीत भरवतात. गाय दारात आली की ‌तिच वासरू तिच्या मागे मागे हुंदडत असते. थोडं जरी ते वासरू इकडे तिकडे दिसेनासे झाले तर त्या गाईचा आकांत पाहण्यासारखा असतो . ती मा मा करत सैरावैरा पळत सुटते.
 सणाच वातावरण असतांनाच आई घरात गोडधोड पदार्थ करते सगळ्यांना देते पण तिचं एक जरी मुलं आजारी असेल किंवा बाहेर गावि असेल तर तिच्या घश्या खाली घास जात नाही.मित्रांनो सगळं जग जरी आम्हाला पुर्ण ओळखत असेल तरी  ९महिने ती सगळ्यांन पेक्षा आपल्याला जास्त ओळखते.लग्नानंतर प्रत्येक मुलीला आई च्या हातात सत्ता आहे तोपर्यंत रक्षाबंधनाची साडी, दिवाळीची साडी, उन्हाळ्यात आंब्याचा रस,सासरी जातांना शेवया,पापड,लोणचे अगदी कसं भरभरून मिळत, नको असेल तरी तिच्या प्रेमापोटी सोबत घेऊन जावं लागतं.मित्रांनो आई आई आहे.दुधावरची साय आहे.लंगड्याचा पाय आहे.वासराची गाय आहे.मातेसारख प्रेम देणारी भुमाता आहे,नित्यस्वच्छ आणि सतत कार्यरत रहा शिकवणारी गंगामाता आहे.ज्यांना आईचे सुख नसेल लाभले त्यांनी निसर्गालाच माता समजुन तिच्या वर प्रेम करावं शेवटी हि धरनी माताच आपल्या कुशीत घेते.

सौ. मेघा विनोद हिंगमिरे
शिक्षिका,
भारत विद्यालय वेळा, हिंगणघाट
वर्धा
7798159828
••••••••••••••••••••••••••••••••••••••: 
मी पाहिलेली, अनुभवलेलीआजची आई

आई म्हणून मूल जेव्हा आईला हाक  मारते तेव्हा जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती मीच असे प्रत्येक आईला वाटते .आपले मूल दिसायला सुंदर असो व कुरूप प्रत्येक आईला आपलेच मूल जगातील सुंदर मूल आहे असे वाटते आणि हो प्रत्येक मुलाला आपलीच आई आवडते हे खरं आहे.एकदा एका लहान मुलाची आई हरवली तर त्याच्यासमोर  अनेक सुंदर स्त्रिया आणून उभ्या केल्या तरी मुल काही रडायचे थांबत नव्हते त्या मुलाची आई दिसायला सुंदर नव्हती  उपस्थित सर्व स्त्रीया सुंदर होत्या .मूल रडतच होते उपस्थित सर्व स्त्रियांनी त्या मुलाला खाऊ दिला कुणी फिरवून आणले पण मूल कोणाजवळ शांत होत नव्हते अचानक गर्दीतून मुलाची आई आली मुलाने आईला पाहिले आणि तिच्याकडे झेप घेतली आणि त्याचे रडणे थांबले.
आईची माया ,स्पर्श त्या मुलाने ओळखला खरच आहे आईसारखी माया मुलावर कोणी करू शकत नाही.
एखाद्या जोडप्यास  स्वतःचे मूल होत नसेल तर कुटुंबातील सर्वजण व्यथित होतात मग डॉक्टरांकडे जाऊन अनेक उपचार घेतले जातात शेजारी, नातेवाईक जे जे उपाय सांगतात ते ते सर्व केले जातात देवाला नवस बोलले जातात .स्त्रीला अनेक शारीरिक मानसिक यातनेला सामोरे जावे लागते मग मूल दत्तक घेण्याचा विचार मांडला जातो त्यातही नात्यातील मुलंच दत्तक घ्यावे असा घरातील लोकांचा अट्टहास असतो मग नात्यातील नाहीच मिळाले तर शेवटचा मार्ग म्हणून अनाथाश्रमातील मूल दत्तक घेण्यावर शिक्कामोर्तब होते.
दत्तक प्रक्रिया पार पाडून मूल घरी येते आणि आईची परिक्षा सुरू होते .कृष्णाला जन्म देवकीने दिला पण पालन पोषण यशोदेने केले आज जग यशोदेचा कन्हैया म्हणूनच कृष्णाला संबोधते
दत्तक मूल घेतल्यानंतर  आईला चिंता वाटते मोठे झाल्यावर मुलाला समजले तर ते दत्तक  आहे तर स्वीकारेल का ते मला आई म्हणून कधी कधी लहान पणीच  मुलाला माहीत असत की ते दत्तक आहे पण या सर्वात आईला काहीच फरक पडत नाही कारण तिला एकच माहीत असत आई होन्यासाठी मुलाला जन्मच द्यावा लागतो असे नाही तर आई होण्यासाठी काळजात असावी अपार माया आणि मूल घडवण्यासाठी हवा दृढविश्वास आणि मूल वाढवण्यासाठी हवी तयारी कष्टाची अन जिद्दीची.
मी पाहिलेली आहे अशी आई जी आज शेकडो अनाथ मुलांची आई आहे ती म्हणजे सिंधुताई सपकाळ यांच्या रुपात . आज एक किंवा दोन मुलं वाढवताना किती त्रास ,धावपळ सहन करावी लागते आहे असा परिस्थितीत स्वतःला एक मुलगी असूनदेखील सिंधुताई सापकाळ यांनी शेकडो अनाथ मुलांचे आईपण स्वीकारलं आहे.
मी आणखी एक महान आई पाहिली आहे एका तृतीयपंथी व्यक्तीच्या रुपात तृतीयपंथी व्यक्ती शारीरिक अडचणींमूळे मूल जन्माला घालू शकत नाही पण तरीही आईचे प्रेम ते देऊ शकतात आणि आई म्हणून मूल चांगल्या प्रकारे वाढवू शकतात .
हिरकणीची गोष्ट तर सर्वानाच माहिती आहे आपल्या बाळासाठी
अतिशय अवघड असा गड रात्री च्या अंधारात मोठया हिमतीने उतरली आजची स्त्री ही देखील एक हिरकणीच आहे असं म्हणावे लागेल अर्थार्जनासाठी ती नोकरी, शेती, व्यवसाय करत आहे घराबाहेर पडून ती घरातीलही जबाबदाऱ्या पार पाडत आहे व बाहेरच्याही .घार हिंडते आकाशी पण तिचे लक्ष पिलांपाशी अशाप्रकारे ती मूल वाढवताना दक्ष राहते.नोकरी, व्यवसाय करताना कधी कधी पाळणाघरात ठेवावे लागते तिला आपल्या मुलाला .मुलाला वेळ देऊ शकत नाही  याची कधी कधी खंत वाटते तिला ,पण जिद्दीने कौटुंबीक,सामाजिक जबाबदाऱ्या
समर्थपणे पेलून आईपण निभावत आहे आजची आई.
जेव्हा एक धान्याचा दाणा स्वतःला जमीनीत गाडून घेतो 
तेव्हाच नवीन रोप उगवते व धान्याची रास मिळते आईचेही तसेच आहे मूल वाढवताना, त्याला घडवताना आई जीवाचे रान करते व संस्कारी मूल घडवते.मुलाचे यश पाहिल्यावर तिला तिच्या कष्टांचा विसर पडतो.पण मूल चुकत असेल तर शिक्षा करून त्याला सन्मार्गावर आणते ती आईच होय. 
कोणी पाहिला आहे का ईश्वर ?
'"जयाला लाभली आई
ईश्वर सदैव त्याच्याजवळ राही".
हे खरे आहे ज्याला आई लाभली तो सर्वात भाग्यवान व्यक्ती होय.
चुकले तर पाठीवर धपाटा देण्यासाठी हवा आईचा हात,
हरलो लढाईत आयुष्याच्या तर
लढ मी आहे पाठीशी असे म्हणन्यासाठी खांद्यावर हवा आईचा हात,
यश मिळाले तर पाठीवर शाबासकी देण्यासाठी हवा आईचा हात.

सविता साळुंके
श्रीरामपूर 9604241747
salunkesavita42@gmail.कॉम
••••••••••••••••••••••••••••••••••••••
 " आई , हो आता तू जिजाऊ "

    ' आई ' या दोन अक्षरात सारे विश्व व्यापून जाते . ' आई '  ही जगातील प्रत्येक पशू - पक्षी , प्राणीमात्र आदींना प्राणप्रियच असते . कारण आईच्या गर्भातच ह्या बाळाची नाळ एकरूप झालेली असते .म्हणून मूल जन्माला आल्यानंतर लगेचच तो आपल्या आईचा उबदार व मायेचा स्पर्श अचूक ओळखतो ! कारण हा स्पर्श तो नऊ महिने नऊ दिवस आईच्या उदरात मनोमय संवादरूपात अनुभवत असतो . मग या जगात प्रत्यक्षात  बाहेर आल्यावरही तो आपल्या आईला बरोबर ओळखतो , यात शंकाच नाही !

     " खाण तशी माती !! "
      
     " जैसे बीज तैसे फळ !! "

     खरंच ! आईच्या व्यक्तीमत्वाची छाप ही तिच्या मुलांवरती बिंबत असते . म्हणून मुलांच्या जडणघडणीत आईनं आपल्या स्वभावात काही मौलिक सद्गुण अंगीकारणे आवश्यक व क्रमप्राप्त ठरते . तरच ती मुले संस्कारी व सुसंस्कृत निपजतात . शिवाय प्रत्येक मुलांना वडिलांपेक्षा 'आईचं ' अधिक जवळची व विश्वासाची वाटत असते . तिला कारणीभूतही असतो तिचा मृदू मुलायम असा स्वभाव ! तसेच तिचे मुलांप्रती असणारे निःस्वार्थी व निरपेक्ष असे प्रेम ! स्वतःच्या सुखाला जाळून , मुठमाती देऊन ती फक्त आणि फक्त मुलांच्याच सुखाचा विचार करत असते , अगदी जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंही !! अशी ही साक्षात त्यागमूर्ती , वात्सल्यमूर्ती , प्रेममूर्ती , दयामूर्ती , करूणामूर्ती अशी ही  'आई ' सर्वगुणसंपन्न असते . 

     " स्वतः तळपून उन्हात काया
       करी लेकरा उदंड माया
       गरीबीचं जीणं न देई बाळा जीवनी
       चपला बाळा देऊन चालते माऊली अनवाणी !! "

     अशी ही ' आई ' प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी माता सती अनुसयेपोटी भगवान श्री दत्तात्रयही पृथ्वीवर जन्म घेऊन तिच्या वात्सल्यतेच्या पान्ह्याने चिंबचिंब न्हाऊन निघतात !! 

     " जग सारे गाती मातृ गुणगाथा
       स्वर्गसुख लाभे तिज चरणी टेकवीता माथा
       जोवर असे शिरी तिची कृपाछाया
       हे अमूल्य जीवन कधीच न जाईल वाया !! "

     जोपर्यंत आईचा आशीर्वाद आपल्या भाळी आहे तोपर्यंत आपल्याला जीवनात काहीच कमी पडणार नाही . ती एक देवीचे रूप असून तिच्या चरणस्पर्शात साक्षात स्वर्गसुखाची अनुभूती येते !! अशी आई आपणांकडून कधीही उपेक्षित होता कामा नये , ही खबरदारी जगातील सर्व मुलांनी घेतली पाहिजे . कारण सध्या आधुनिक काळात पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे मानव हा फारच संकुचित व आखूडवृत्तीचा बनत आहे . तो लग्नानंतर आपल्या आईला व तिच्या वात्सल्याला विसरत चाललाय ! हे आपल्या सभोवती असणाऱ्या  वृद्धाश्रमातील वाढत्या संख्येवरून दिसून येते . जी आई आपल्या रक्त - हाडामांसातून एका बाळाची निर्मिती करते ती आज ह्या अशा निराधार दशेला प्राप्त होते ! का होतं चालली अशी तरूणपिढी कुसंस्कारी ? कोण जबाबदार अशा गोष्टीला कारणीभूत ? २० - २५ बर्षे ज्या आईचा पदर धरून चालत जाणारा मुलगा अचानक लग्नानंतरच असा का बिघडतो ? एका रात्रीच्या पत्नीच्या मोहात तो आपल्या आईला घराबाहेरच नाहीतर ह्दयाबाहेरही का काढतो ? एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला का अशा दुःखाच्या खाईत लोटून देते ? का नातवंड आजी - आजोबांच्या प्रेम - वात्सल्यापासून वंचित राहिली जात आहेत ? या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे एकच ते म्हणजे सुसंस्काराची कमतरता !! हेच होय . ती भरून काढणारी अशी एका राजमाता जिजाऊची आज सार्थ गरज आहे . म्हणून आईनं आधी स्वतः जिजाऊ बनलजिथे पाहिजे ! 

     " जिजाऊंचे सद्गुण अंगीकारावे प्रत्येक स्त्रीने
       सार्थकी लावावे हे अमूल्य जीने
       बनावे स्वतः राजमाता पाजून बाळाला राजकडू
       स्वर्णाक्षराने लिहावी गाथा ऐसे कार्य हाती घडू 
       अंगी शुरत्वासाठी बनवावे वाघासारखे ह्दय 
       होईल सुसंस्कारी - बलशाही महाराष्ट्राचा उदय !! "        असे " शिवबा जन्मावा पण तो दुसऱ्याअंर्तमनाशी घरी !! " असे न म्हणता प्रत्येक आईनं असे जिजाऊची भूमिका प्रत्यक्षात वास्तविकदृष्ट्या साकारल्यास ' शिवशाही ' यायला काहीच अवधी लागणार नाही !! 

     तात्पर्य , आई ही एक असे  संस्काराचे अक्षयपात्र असते ! अशा या माऊलीला माझा मानाचा मुजरा !!

अर्चना दिगांबर गरूड ( स.शि.)
ता. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र . 9552954415
••••••••••••••••••••••••••••••••••••••: 
*आईसारखे दैवत साऱ्या जगतामधि नाही.*

        कवी यशवंतांनी आईची महत्‍व सांगताना म्हटले आहे, 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!' अगदी खरे आहे ते ! मातेचे प्रेम अतुलनीय आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे या जन्मदेपुढे व्यर्थ आहेत. म्हणून तर कुणापुढेही न वाकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत असे. महाराष्ट्राचे स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज हेही श्रेष्ठ मातृभक्त होते.

   मातेच्या वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरवते. प्रसंगी अपत्याच्या वात्सल्यापोटी माता आपल्या प्राणांचीही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज!

     माता आपल्या लेकरासाठी काय करत नाही? ती त्याला जन्म देते. एवढेच नव्हे, तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती नयनांचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते. ती त्याचे संगोपन करते, त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगन ती त्याचे कसमकोमल मन फुलवते. त्यावर सुसंस्कार घडवते. शिवबा, विनोबा, बापूजी यांसारख्या थोर व्यक्तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक माता ही हजार शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे."

    मातेचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करणे, ही काही अंशाने त्या ऋणांची फेड म्हणता येईल. खरे तर तो आपल्या कर्तव्याचाच एक भाग असतो. काही कृतघ्न करंटे ही फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावण्यासाठी आसुसलेले असतात. तसे झाल्यास ते त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटते.

      मातेचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. ते आपल्यावर सदैव कृपाप्रसादाची खैरात करत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. म्हणूनच कवी म्हणतो, 'आईसारखे दैवत साऱ्या जगतामधि नाही.' त्‍यामुळे माझी आई माझे  आदर्श होते.

*श्री.सुंदरसिंग साबळे*
         गोंदिया 
    मो.9545254856
••••••••••••••••••••••••••••••••••••••
: बेकार असा जन्म जन्म दिलाय
 
            आई माझा गुरु आई कल्पतरु असं सानेगुरुजी म्हणतात.आई गुरुच आहे.कारण ती लहानाचं मोठं करते.आपल्याला उन्हातून सावलीत नेते.दूध पाजते.शिकवते नव्हे तर आपल्यालाही घासही चारुन देते.मायेचा ओलावा देते.आपण रडलोो तर आपले अश्रू पुसते.आणि आपलं सांत्वन करते.कधी वाईट गोष्टी पासून आपल्याला अडवते.संकट आलीच तर स्वतः झेलते.पण आपल्याला काहीही होवू देत नाही.महत्वाचं सांगायचं म्हणजे आई आपल्यासाठी राब राब राबते.
         आपण मात्र स्वार्थी.आपण थोडेसे मोठे झालोच तर आपले विचार मावत नाही आपल्या मनात.मग याच विचारात कु विचारही येतात आपल्या मनात.मग आई कितीही चांगलं सांगत असली तरी तिचे विचार आपल्याला पटत नाही आणि त्याचबरोबर आपण तिच्या विचाराचा त्याग करतो.आपल्याला दुस-याचे विचार चांगले वाटतात.त्यातच ती मुलगी असेल तर मग विचारता सोय नाही.
          ती प्रेयसी आपल्याला हवीहवीशी वाटते.तिच्यासोबत जगावेसे वाटते.तिच्यासोबत आपल्याला राहावेसे वाटते.ती आपल्याला जीव की प्राण वाटते.ती जवळ राहावी असं वाटतं आणि अशातच ते प्रेम वाढत जावून आपण तिच्याशी विवाहबद्ध होतो.
          नवीन आलेली मुलगी.आपण तिच्या इवल्याशा प्रेमावर फिदा झालेले.ती आपलं मन ओळखते.तिला तुमच्या घरी पाय रुतवायचे असतात.रुतबा निर्माण करावयाचा असतो.त्याचाच फायदा ती घेते.ती तुमच्या कानाशी लागते.तुमच्या विश्वासाला तडा जाईल याचा तिला विचार नसतो.त्यातच ती आपला विश्वासघात करते एक दिवस.जी आई.......ज्या आईनं एवढं जपलं.त्या आईला आपण त्या नवीन सुन म्हणून आलेल्या पोरीच्या हातचे बाहुले करीत असतो.ती आदेश देणारी अधिकारी असते आणि आपण तिचे नोकर.मातृप्रेम आपलं विफल होतो.आपण तिनं जे काही आपल्यासाठी केलं,ते सारंच विसरतो आणि या नव्या मुलीला प्रेम देतो.हवं तर तिच्या बोलण्यातून आपल्या आईची रवानगी वृध्दाश्रमात करतो.पण पत्नीला सोडू शकत नाही.
         आज घरोघरी अशाच गोष्टी सुरु आहेत.आपण रामायण मोठ्या आवडीनं पाहतो.पण तसो वागण्याचा प्रयत्न करतो का? त्यातील काही काही गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत.पण आपण तसे वागण्याचा प्रयत्न करतो का? तर याचं उत्तर नाही असेच आहे.
        ज्या रामायणात कैकेयी सावत्र आई जरी असली तरी रामानं तिनं दिलेला वनवास सहर्ष स्विकार केला व हसत हसत जंगलात गेला.किती मोठं मातृप्रेम आणि आपण साधं बोलणं तेही सख्ख्या आईचं सहन करु शकत नाही.त्यानं तर जनतेसाठी सीतेची अग्निपरीक्षा घेतली.आपण आपल्या सीतेसाठी आई सोडतो आणि स्वतः पोरके होवून जातो.
         घरोघरी हाच पोरकेपणा आज कलिकाळात पाहायला मिळतो आहे.कोणीही शिकून मोठा अधिकारी झाला असेल,पण त्यानं जर आईला त्रास दिलाच तर त्याच्या जगण्याचा काहीच फायदा नाही.आई गुरु आहे,कल्पतरुही आहे.पण केव्हा?जेव्हा तिला आम्ही म्हातारपणात मानू.तिचा गौरव करु.तिला  दुःख होणार नाही असे वागू.नव्हे तर आपल्या सुखाचा त्याग करुन आईच्या म्हणण्यानुसार म्हातारपणी वागू.आईला पोरके वाटणार नाही.अशीच आपली रहनसहन असेल.
        आपली आई अनुभवी असते.उन्हाळे पावसाळे तिनं पाहिलेले असतात.म्हणून विवाह करतांनाही आईची पसंती असावी.काही काही महाभाग विवाह करतांना मायबापाची पसंती नसते.आईबापाला समजत नाही याचा विचार करीत ते विवाह करतात.मग फसतात सैराट चित्रपटांच्या कथानकासारखे.शेवटी काय होतं तर विनाश....भांडणं.......ताटातुट व घटस्फोट.हे जर टाळायचं असेल तर मायबाप सांगतात.तसंच वागावं.विवाह करतांना.
         पूर्वीही विवाह व्हायची.मायबाप पोटाला कुंकू लावायचे.पण आता तसं तर नाही.आपल्यालाही मुलगी पसंत अधिकार आहे.पण खरंच आपली पसंती ही आपण रास्त तरी करु शकतो का? करीत असाल तर ठीक आहे.कारण आईला पोरकं वाटायला नको.जेव्हा तुम्ही तिला वृध्दाश्रमात टाकता ना.तेव्हा खरंच आईला जग पोरकं झाल्यासारखं वाटतं.तिला वाटतं की असली मुलं मला नसती झाली तर बरं झालं असतं.मी वांझ असते तर अगदी बरं झालं असतं.बेकार अशा मुलाला मी जन्म दिलाय आणि बेकारच असा जन्म दिलाय.

        अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
•••••••••••••••••••••••••••••••••••••• 
अाई

नऊ महीने नऊ दिवस गर्भात सांभाळून या स्ृष्टीवर जिने जगण्यासाठी मोकळा श्वास दिला ती देवस्वरूप अाई.गर्भात असतानाचं विविध लाड पुरवणारी,संस्काराची शिकवण देणारी महान अशी पुजनिय अाई.देवापेक्षाही श्रेष्ठ जिचे स्थान ती अाई. अाईची थोरवी कितीही गायली तरी अपूरीच राहते.कितीही हिला उपमा दिल्या तर कमीच पडतात.अशी सर्वश्रेष्ठ अशी जननी,जन्मदाञी,माय ,अाई..
    अाई लेकराला संस्कार देत असते.तीच पहिला गुरू असते.म्हणून तर अाईविषयीच जगात जास्त लिहलं जातं.बापही तितकाच महत्वाचा असतो ,त्याची महती फार कमी रेखाटली जाते.तरीपण अाईचे स्थान अाहेच महान..चिऊ काऊचा घास भरवताना प्राणी पक्ष्यांचे प्रेम रूजवत असते.अापलं लेकरू अापल्या संस्कारात वाढावं ,त्याच भल व्हावं,तो एक चांगला माणूस व्हावं हे या बिचार्‍या अाईचं स्वप्न असते.ही अाई या चिमुरड्यासाठी वाटेल ते कष्टाचं काम करत असते,मग ती गरीब असो वा श्रीमंत अाई.शेवटी माया ममतेची ती एक जीवंत मूर्ती असते.अापल्या हाडामासांच्या गोळ्याला अाकार देत असते.तो हिरा व्हावा अस प्रत्येक अाईला वाटतच असते.अाईच प्रेम अगाध असते.ती महान असते.

पण अाज मला ही अाई काही प्रमाणात हरवताना दिसते.जन्म ती बाळाला देते हे खरं अाहे पण त्या बाळाला घडविण्यासाठी तिच्याकडे वेळच नाहीये.सुखसोयी व चैन विलासी जीवन जगण्यासाठी असो की,पोटाची खळगी भरण्यासाठी असो अाज अाई पैशाच्या मागे धावताना दिसत अाहे.धावपळीच्या युगात अगदी छोटस बाळ ती पाळणाघरात ठेवत असते.फुटलेला पान्हा तिचाही कोरडाच होतो अन अमृतसमान ते दूध या बाळाच्या नशिबातही नसते.7/8तास नोकरी किंवा काम करून परत अालेली असते तेंव्हा तीचं ते चिमुरड डोळे मिटून तिची वाट पाहून झोपी गेलेलं असतं.तो मायेच्या ममतेला तिच्या दुधाला हळूहळू परका होत चाललेला अाहे.
एवढेच नाही तर हे युग फॅशनचे अाहे .फॅशनच्या कपड्यामुळे मायेचा पदरच नाहीसा झाला अाहे.सणावाराला साड्या नेसून भरमसाठ फोटो सेल्फी काढून ठेवायची ही एक न्यु फॅशन.इथे फॅशनवाल्या अाईकडे पदराखाली बाळाला दूध पाजण्याची मुभाच नाही.यामुळे मुलातील ममता व प्रेम कमी होताना दिसते.काही अाया तर सौंदर्यासाठी बाळाला दूधही पाजत नाहीत.किव येते अशांना अाई म्हणायची,काही तर पोटचा गोळा कचरा समजून झाडाझुडपात नाल्यात फेकून देतात.यावेळेस राग येतो अशा अाईचा .का हिला अाई केल असेल.अरे तिला वाचारा अाई न होण्याच दुःख काय असते,जी अाजपर्यंत अाई होऊ शकली नाही.तिची वेदना जाणून घ्या!वांझोटेपणाचा कलंक काय असतो ते..
म्हणून प्रत्येक अाईने अाई व्हावं.अाज अापण मुलांनाच कोसत असतो की,खूप हट्टी होत अाहेत,ऐकतच नाहीत कुणाचं,अाईबाबा बहिणभावावर प्रेमच नाही याचं.पण कस असणार??? या बाळाला जर तुम्ही मायबापच असं परक्यासारखं वागवता,पैशासाठी त्याला प्रेमाचा भुकेला ठेवता,मान्य अाहे त्याच्या भविष्यासाठीचं असतं.पण इतकही त्याला परकं नका करू की तो अाईच्याच पोटातून जन्मलो का कुठून अालो हा प्रश्न त्याला पडेल..अाजची बाळं खूप हुशार अाहेत.त्यांना त्यांच्या हक्काचं प्रेम अाईबापानी द्यायलाच हवं.तुमची धनदौलत अमाप असूनही संस्कार चांगले नसतील तर तुम्ही त्याच्या मायेला परकं होऊन बससाल.हल्ली हेच घडताना दिसतयं..

पुर्वीच्या अायांना सर्व काळ लेकरासांठी द्यायची मुभा होती.म्हणून अापली पिढी तरी निदान मायबापाचं,नात्याचं प्रेम ओळखू शकते.पण अगदी काही काळात माञ यांञिक पिढी तयार होईल.म्हणून अायानों जन्म देऊन अाई होणे हा स्ञीचा निसर्गाने दिलेला महान गुण अाहेचं.पण अाज गरज अाहे ती अाईला अापल्यातील अाईपणाला जागवण्याची व अापल्या लेकराला घडविण्याची. इतिहासात बघा जे हिरे घडले त्यावर संस्कार करणारी अाईच होती.अापण ठरवल तर अापलं लेकरू एक महान व्यक्तिमत्व घडवू शकतो.फक्त गरज अाहे तुमच्यातील अाई कधी जिजाऊ व्हावी,कधी राणी लक्ष्मीबाई व्हावी,कधी सगुणा व्हावी,कधीभिमाई व्हावी,कधी अहिल्या व्हावी..
अाई तुझ्याच हाती अाहे ग 
तुझ्या लेकराचं  भाग्य...
देवाहुनी श्रेष्ठ तू या जगती
मातृत्वाच मिळालं तुला सौभाग्य..

श्रीम.रावते ज्योती
    नांदेड
••••••••••••••••••••••••••••••••••••••

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...