सोमवार, 11 मई 2020

रोज एक लेख :- दिवस तेविसावा गुरू महती

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- तेविसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 11 मे 2020 रविवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- गुरू महती*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
गुरूमहती

  शीर्षक -गुरूं माझा कल्पतरू

       ज्ञानसागरातुनी अक्षर मोती
       वेचलेत मी अंजूली भरुनी
       चरणी अर्पण गुरू दक्षिणा
       सुमनांची ज्ञानार्जन करूनी

      ‌‌.    'गुरुविना कोण दाखविल वाट' या उक्तीप्रमाणे गुरु म्हणजे शिक्षण देणारा, ज्ञानाची वाट दाखवणारा व प्रसंगी शिक्षा देणारा शिक्षक होय. पुराण काळापासून गुरु-शिष्याची परंपरा चालत आली आहे. 'गुरु म्हणजे माऊली' ' गुरु म्हणजे कल्पतरू' जन्मल्यावर बोट धरून चालायला शिकवणारी माऊली म्हणजे पहिला गुरू होय. ती लहानपणापासून आपणास संस्कारांचे, सदाचाराचे धडे देते. चुकल्यास समजावून सांगते, ओरडते आणि काठीने मारते देखील. पण तिच्या सद्वर्तनाचे धडे देऊन आपण शाळेत पाऊल टाकतो. गुरूजवळील ज्ञानाचा साठा शिष्याला वाटुन वाढतच जातो.
     गुरुची महती सांगून सरणार नाही. प्रत्यक्ष ब्रम्हा-विष्णू-महेश याचे एकत्र रूप म्हणजे गुरू .आपणा सर्वांना गुरुबद्दल नितांत आदर असतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे फल म्हणून आपण गुरुपौर्णिमेला त्यांना फूल किंवा एखादी भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच एकलव्यासारखे शिष्य गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या उजव्या हाताचा अंगठा क्षणाचाही विचार न करता कापून देतात.
 'धन्य ते गुरु ,धन्य ते शिष्य आणि धन्य त्यांची गुरुभक्ती'‌. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी आश्रम शाळा चालवायचे.त्यामुळे शिष्यांना आश्रमातच रहावे लागे. त्यानुसार सर्व कामे  स्वावलंबी पद्धतीने करावी लागत. त्यामध्ये सरपण गोळा करून आणणे,सडासारवण, साफसफाई व स्वयंपाक पाण्यात ऋषिपत्नीना मदत करणे या कामांचा समावेश असे. त्यांना वेद ,शास्त्रे, पुराणे तसेच धनुर्विद्या ,सदाचार यांचे  ऋषी धडे देत. वरचेवर परीक्षा देऊन शिष्याच्या बुद्धिमत्तेची चाचणी होई.
      चाचणीत  पास होणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होऊन आश्रमातून आपल्या घरी जात असे. महाभारत कालीन मोठे विद्वान वेदव्यास हे प्रचंड प्रसिद्ध आचार्य होते. त्यांचे इतके ज्ञानी, व्यासंगी गुरु आजपर्यंत झालेले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे. आपण ज्यांच्याकडून ज्ञानार्जन करतो त्यांचा आदर राखणे, त्यांना मान देणे व त्यांच्या कार्याची कीर्ती वाढवणे  हे प्रत्येक विद्यार्थ्याचे परम कर्तव्य आहे. गुरूंनी दिलेल्या विद्येमुळे आपण समाजात, कुटुंबात राहायला आर्थिक प्राप्ती करण्यास सक्षम झालेलो आहोत याचे सदोदित स्मरण रहायला हवे.
            आपली प्रगती कुठवर आली किंवा पुढच्या शिक्षणाविषयी माहिती आपल्या गुरूला सांगणे किंवा आपल्या सद्वर्तनाचे दर्शन गुरूला दिल्याने गुरूला ते सुखावह वाटते. आपल्या शिष्याची प्रगती गुरूला त्याचे कार्य करण्याची प्रेरणा देते. पूज्य साने गुरुजींनी म्हटले आहे की गुरू आपणास ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो व ज्ञानाशी एकरूप करून टाकतो. विद्यात विद्या आत्मविद्या, गुरुत गुरु अध्यात्म गुरु,गुरूपूजन ,गुरु स्मरण म्हणजे सत्याचे, ज्ञानाचे पूजन होय. हीच गुरूच्या महान कार्याची, महान स्थानाची ऋणमुक्तता होय. 

सौ.भारती सावंत
मुंबई
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*09 गुरू-शिष्य परंपरासमाजकल्याण*

            आपल्याला केवळ गुरु आणि संत हेच शब्द माहीत असतात. गुरुंच्या अध्यात्मिक स्तरानुसार गुरु, सद्गुरु परमार्थ हे प्रकार आहेत .आपणास त्या प्रत्येक प्रकारच्या गुरु चा सहवास लाभावा . स्वतःला आणि इतरांना येणाऱ्या अनुभूतीची साक्ष स्वतःची साधना ,त्यांच्या ते शिष्याकडून साधना कशी करून घेतात? त्यांची शिकवण्याची पद्धत त्यांचे कार्य ?शब्द आणि शब्दातील शिकवणे त्यांच्यातील त्रिगुणांचा प्रमाण. याबरोबरच अध्यात्मिक गुणांचे प्रमाण, स्वभाव, निर्मळ नेतृत्व , प्रीती याविषयीची तुलनात्मक माहिती  आपल्याला असायला हवी. ही माहिती, गुरूंचे अध्यात्मिक कार्याची व्याप्ती आणि महत्व लक्षात घेण्यासारखे आहेत .
         *गुरू*  मायेने  ज्ञान गुरूतील तत्व  याची जाणीव  करून देणारे ज्ञानगुरू आहेत. आत्मानुभूती देणारे सर्वत्र ब्रह्म आहे . याची जाणीव करून देणारे दीक्षा गुरु आहे . अद्वैताची अनुभूती देणारे मुक्ती गुरु आहे.
      सात्विक , राजसिक आणि तामसिक   हे शब्द सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात लागू पडतात. एकदा व्यक्तीची अध्यात्मिक पातळी 50% होऊन जास्त झाली की तिची वृत्ती अंतर्मुख होते. मग प्रकृतीतील त्रिगुणांना  महत्त्व उरत नाही.

 *गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
 गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

                  गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णू, आणि गुरू हे शंकर आहेत .एवढेच नव्हे तर ते साक्षात परब्रम्ह आहे . अशा गुरूंना मी नमस्कार करते. 
      हिंदू शास्त्रामध्ये वरील श्लोक सांगितलेला आहे . एकदा एक विदेशी व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्न विचारले, “ भारतात एका वाक्यात वर्णन  करावयाचे झाल्यास कसे कराल ? " तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सांगितले," गुरु शिष्य परंपरा" गुरु शिष्य असा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मिती अनेक उदाहरणे पुरातन काळापासून इतिहासा पर्यंत पाहायला मिळतात. श्रीराम आणि गुरू वशिष्ठ ,पांडव आणि श्रीकृष्ण यांनी  एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली . समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले . हिंदवी स्वराज्याची स्थापना केली . हे आपले आदर्श .इंग्रजांनी किंवा त्यांच्या आधी मुघलांनी केलेल्या राज्य कारण ते आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेले राज्य होते .चैतन्य वगैरे गोष्टींपासून ते फार लांब होते
आपण जीवनात शिकत असताना  ज्या  ज्यागोष्टीकडून  शिकतो ते आपल्यासाठी गुरु स्वरूपच असतात .त्यामुळे प्रत्येकाला गुरुची आवश्यकता जीवनात पदोपदी असतेच . या तत्वावर विचार करताना?   आपल्या लक्षात येते की  गुरू शिष्य  परंपरा  हाच महान हिंदू संस्कृतीचा पाया आहे.
             जन्माला  आल्यापासून मृत्यू 
 पर्यंत स्वतः शिकत राहावे लागते .  बोलायला चालायला पुढेपुढे सायकल किंवा दुचाकी किंवा चारचाकी चालवण्या पासून तर शाळेतील शिक्षण घेऊन उच्चपदस्थ नोकरी मिळणे .या सर्व गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात . त्याहून पुढे जीवनातील चढ-उतार कळाल स्वतःला सावरण्यासाठी प्रत्येक गोष्ट शिकवीत असतात.हे सर्व करण्यासाठी आपल्याला आई-वडील नातेवाईक मित्र-मैत्रिणी सहाय्य करतात ,मदत करतात. ते  एकप्रकारे आपले  गुरु असतात . एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता लागत असते. तर त्याही पुढे जाऊन स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल समाजाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर, आपल्याला आध्यात्मिक गुरूंचे नितांत आवश्यकता असते.
               राष्ट्राला धर्मापासून निराळे करून संपूर्ण समाजाची मोठी हानी होत असते . आजची भारताची स्थिती काय आहे पाश्चात्यांचे अंधानुकरण संस्कृती मुळे समाजात आधीचे काहूर माजले आहे  . हे सर्व का होत आहे? उत्तर काळापासून भारताच्या कोणत्याही शासनकर्त्यांनी देशाला योग्य पद्धतीने चालवण्यासाठी धर्मगुरू किंवा संत यांचे मार्गदर्शन घेतले नाही. देशाला धर्मनिरपेक्ष असल्याची संज्ञा देऊन देशातील जनतेला धर्मापासून दूर केले. धर्माचरण केल्याने राष्ट्र बलशाली होते ,कारण त्याला ईश्वरी अधिष्ठान प्राप्त होते .देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व एका धर्मा राष्टाची उभारणे केले नाही. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीच्या प्रचार प्रसार करून धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्याची आले .देशाला धर्मापासून निराळे करून संपूर्ण समाजाची मोठी हानी झाली त्यामुळे आजचा समाज हा विवंचनेत सापडलेल्या पाहायला मिळतो .लोकांना धर्माचरण आणि त्यांच्या महिमा यासंबंधी योग्य शिक्षण दिले गेले पाहिजे. हिंदू धर्मात सांगितलेल्या कृती आणि त्या योग्य पद्धतीने कशा करायच्या या संदर्भाने शिक्षण देणारे गुरु समाजामध्ये नाही .त्यामुळे प्रश्न असणाऱ्यांना त्याची उत्तरे न मिळाल्यामुळे त्यांच्यात गोंधळ निर्माण होतो आणि द्वेष करणाऱ्या त्याची संधी मिळत असते . त्यामुळेच  राष्ट्र ची मोठी हानी होते..

          भारतावर आक्रमण करणार्‍या प्रत्येक आक्रमान कर्त्यांनी ने याचा पाया आणि भारताची आजची स्थिती आपल्या समस्या आहे "मी  प्रवास केला तेव्हा या काळात मी कुठेही दारिद्र्य किंवा चोर पाहिले नाही. अशी संपन्नता आणि असे वैभव याठिकाणी आहे . इतकेच नाही तर येथील लोकांची नितीमत्ता आणि गुण पाहता या लोकांवर आपण शासन करू शकतो असे मला वाटते"  लॉर्ड मेकॉले याचे वाक्य आहे . या लोकांवर शासन करण्यासाठी आपल्याला त्यांच्या गुरू -शिष्य परंपरा ,संस्कृती शास्त्र आणि अध्यात्मिकता यांच्या वर आघात करावा लागेल. यासाठी शिक्षण पद्धतीला गुरू-शिष्य परंपरेला हटवावा लागेल. त्यासाठी येथील लोकांच्या मनात असा समज आणि श्रद्धा निर्माण करावा की ,जे इंग्रज आणि विदेशी आहेत ते भारतीयाहून चांगले अन्  उच्च आहेत. अन्  चांगले शाषण  करू शकतात.यातून ते स्वतःचा आत्मसन्मान आणि संस्कृती विसरतील आणि त्यातून आपले वर्चस्व स्विकार करतील आणि  आपण त्यांच्यावर शाषण अंकित करू शकतो .
*लेखिका सौ .यशोधरा सोनेवाने*
 *(9420516306 )*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*गुरुची महती*    (8)

  भारतीय संस्कृतीत गुरु परंपरेला खूप महत्त्व आहे. मातृदेवो भव ! पितृ देवो भव ! आणि आचार्य देवो भव ! म्हणजेच माता पिता आणि गुरु यांचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात परमेश्वरा इतके अनन्यसाधारण असते. कोणताही कलावंत हा तो हा परमेश्वरा खालोखाल आपल्या गुरुलाच मानत असतो.  गुरु म्हणजे ईश्वर अशीच प्रत्येक परम भक्तांची भावना असते.  तरीही गुरुची आवश्यकता अपरिहार्यता असते का?  असा प्रश्न एका शिष्याने रामकृष्ण परमहंस यांना विचारला. तो म्हणाला ठाकूरजी, शिष्याच्या जीवनात गुरूचे कार्य,  स्थान काय असते ?  गुरुपासून लाभ कोणता? रामकृष्ण म्हणाले, "ती समोर दिसणारी होळी पहिलीच? आपल्या या आश्रमापासून कलकत्त्यास पोहोचण्यास त्या होळीला किती वेळ लागेल?” शिष्य म्हणाला लागतील चार तास. रामकृष्ण म्हणाले पण समज ही होळी एका मोठ्या बोटीला जोडली तर? शिष्य म्हणाला तसं झालं तर आपण फक्त अर्ध्या तासात कलकत्ता येथे पोहोचू. रामकृष्ण म्हणाले, गुरुची महती अशीच आहे बेटा ध्येयप्राप्तीचा प्रवासात आपल्या जीवन नौकेला गुरु रुपी बोटीची जर शक्ती लाभली तर जी प्रगती करण्यास शिष्याला वर्षानुवर्षे लागतात ती गुरु च्या कृपेने सहज व चटकन प्राप्त होते.
“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः”
“गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः”
भारत देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात. आपणत्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थसमजून घेऊया. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात.
आपल्यावर निरनिराळे संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई-वडील हे आपले पहिले गुरु ! बालपणात आई-वडील आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतात. योग्य काय आणि अयोग्य काय, याची जाणीव करून देतात. तसेच चांगल्या सवयी लावतात, उदा. सकाळी लवकर उठावे, भूमीला वंदन करावे, ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ हा श्लोक म्हणावा.  मोठ्यांना नमस्कार का आणि कसा करावा. सायंकाळी ‘शुभंकरोती’ म्हणावे, दिवा लावावा; कारण दिवा हा अंधकार नष्ट करतो. आपण आपल्या मित्रांना भेटल्यावर नमस्कार करावा; कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे. तसेच आपल्या घरी कोणी पाहुणे आले की, त्यांचे देवासमान स्वागत करावे. अशा सर्व गोष्टी आई-वडील आपल्याला सांगतात, म्हणजे आपले पहिले गुरु आई-वडील आहेत; म्हणून आपण त्यांचा आदर करायला हवा आणि प्रतिदिन त्यांना नमस्कार करायला हवा. 
आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक, हेच आपले दुसरे गुरु :
खरेतर आपण शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करून या दिवशी त्यांना भावपूर्ण नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा. गुरु म्हणजे आपले शिक्षक आणि शिष्य म्हणजे आपण असतो; म्हणून आपण शिक्षकदिन याच दिवशी साजरा करायला हवा.
शिक्षक आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात. आपला राष्ट्राभिमान जागृत करतात. आपण आपल्यासाठी जगायचे नसते, तर राष्ट्रासाठी जगायचे असते, हा व्यापक विचार आपल्याला देतात.. ‘त्याग हा आपल्या जीवनाचा पाया आहे, हे आपल्याला शिक्षक सांगतात. त्यागी मुलेच राष्ट्राचे रक्षण करू शकतात. आपल्यामध्ये मातृभाषेचा अभिमान जागृत करतात आणि रामायण, महाभारत, दासबोध अशा ग्रंथांचा अभ्यास करण्याची आवडही निर्माण करतात. यातून ते आपल्याला आपल्या संतांची ओळख करून देतात आणि ‘त्यांच्यासारखे आपण घडावे, यासाठी प्रयत्न करतात. समाजाचे ऋण आपल्यावर असते, याची जाणीव शिक्षक आपल्याला करून देतात. योग्य मार्गाने (धर्माने) पैसा मिळवावा आणि अयोग्य मार्गाने (अधर्माने) पैसा मिळवू नये, हे शिकवतात. नाहीतर आज आपण पहातो आहोत की, सारा देश भ्रष्टाचाराने ग्रासला आहे. हे सर्व आपण पालटावे, असेच शिक्षकांना वाटते.‘शिक्षक आपल्याला जीवनातील अनेक मूल्ये शिकवतात. आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
आध्यात्मिक गुरूंनी आपल्याला जीवनाचा खरा अर्थ विषदकरणे :
गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील.
आतापर्यंत आपण या भौतिक जगासंदर्भात मार्गदर्शन करणारे गुरु पाहिले. आता आपण आध्यात्मिक गुरु कसे असतात, ते पाहूया. तिसरे गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु ! प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरु येतात. जसे श्रीकृष्ण-अर्जुन, श्री रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद, समर्थ रामदासस्वामी-शिवाजी महाराज अशी गुरु-शिष्य परंपरा हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे.
आध्यात्मिक गुरु आपल्याला आपली खरी ओळख करून देतात. आपल्याला अज्ञानामुळे असे वाटते की, मी एक व्यक्ती आहे; पण खरे पहाता आपण व्यक्ती नसून आत्मा आहोत, म्हणजे देवच आपल्यात राहून प्रत्येक कृती करतो; पण अहंकाररूपी अज्ञानामुळे आपल्याला वाटते, ‘आपण प्रत्येक कृती करतो.’ समजा, आत्मा आपल्यापासून वेगळा केला, तर आपण काही करू शकू का ? तेव्हा देवच सर्व करतो. तो अन्न पचवतो, तोच रक्त बनवतो, याची तीव्र जाणीव गुरु आपल्याला करून देतात.
अहंकारामुळे व्यक्ती स्वतःला देवापासून वेगळी समजते आणि जीवनात सतत दुःखी रहाते. तेव्हा आपल्या जीवनात जर आध्यात्मिक गुरु यायला हवेत, तर आपण आपल्या जीवनाला प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप यांची जोड द्यायला हवी. आपण कोणतेही काम हातात घेतले की, प्रथम कृतज्ञता व्यक्त करावी. तसेच ती कृती चांगली व्हावी; म्हणून प्रार्थना करावी. आपल्यावर गुरूंची कृपा व्हावी; म्हणून प्रतिदिन आपल्या हातून घडणार्या चुकांची नोंद करावी आणि त्यामागील दोष शोधावा. यामुळे आपले दोष लवकर जातील आणि आपल्यात देवाचे गुण येतील अन् आपण आनंदी होऊ.
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
05) गुरुची महती, गुरु महिमा

मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. आज आपण अन्न, वस्त्र, निवारा यावर जगत असलो तरी, शिक्षण आपल्या जीवनाचा प्राणवायू आहे. ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ म्हणजे शिक्षण होय. हे मानवी जीवन सुरक्षित व संस्कारशील बनवण्याचे काम गुरु करतात. गुरु म्हणजे माणसाच्या रूपात एक परमात्माच आहे. हा गुरुरूपी परमात्मा शिक्षणातून संस्कार घडविण्याची  कार्य करतो. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे, जिथे ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे, आणि जिथे आत्मदर्शन आहे तिथेे सुख, समाधान आणि शांती नक्कीच आहे.  जो आपल्याला ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो आणि ज्ञानाशी एकरूप करून टाकतो त्यास आपण गुरु म्हणतो. जो सर्व भूतकाळ दाखवतो वर्तमान काळाची ओळख करून देतो भविष्यकाळाची  दिशा सांगतो तो म्हणजे गुरु. 
गुरु म्हणजे ज्ञानाचा आगरच होय.
आपल्या जीवनाचे भांडे जेवढे मोठे असेल त्या मानाने आपल्याला गुरूकडून ज्ञान घेता येते. गुरुहा बुद्धीने पाहिले तर माणसासारखा दिसते आणि हृदयाने पाहिले तर आपल्याला परमात्मा सारखा अनुभवते. शिक्षणातून संस्काराची गंगा आसेतु हिमालयापर्यंत पोहोचवायचे कार्य गुरु करतो. या जगात मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी मानला जातो. काही माणसे चांगले असतात तर काही वाईट असतात. चांगला आणि वाईट ठरवण्यासाठी आपल्याला शिक्षणाची गरज असते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे , आणि या शिक्षणाच्या माध्यमातून चांगला  संस्कार आणि शिक्षण यांची सांगड घालून देतो ते गुरु.
माणसाच्या जीवनात प्रत्येकाला गुरु असणे आवश्यक असते. खरा गुरू स्वतः च सारं ज्ञान  शिष्याला देत असतो.
शिष्यापासून गुरु काही लपवून ठेवत नाही. गुरु तोच असतो जे आपल्या पुढे जाणाऱ्या शिष्याचे सदाही कौतुकच करत असतो. गुरूचा आनंद आपल्या शिष्याकडून पराजय होण्यातच असतो. खरा गुरू तोच जो आपल्या शिष्याच्या विजयातच आपला विजय मानत असतो. गुरु आणि शिष्य यांचे अतूट नाते असते. गुरु म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ असते. तर शिष्य म्हणजे ते ज्ञान ग्रहण करण्याचा उपासक असते.

खरे बोलावे, नीतीने वागावे, राष्ट्रावर प्रेम करावे, आपापसात माया, ममता करावी हे सर्व गुरू आपल्याला शिकवते. आपली पहिली गुरु आपली आईच असते. त्यानंतर आपण शाळेत गेल्यावर शिक्षक म्हणजेच गुरु यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतो. ज्यांच्या ज्यांच्या कडून आपणास काहीतरी शिकावयास मिळते ते सर्व आपले  गुरु आहेत. शाळेतून घेतले जाणारे शिक्षण आपल्याला गुरूकडून प्राप्त होते. शिक्षणाचे ध्येय शिक्षणाचा उदात्त हेतू चांगला माणूस निर्माण करणे हेच असते. मानवी मनावर संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे विद्येचे दळण नव्हे, तर मनाला लावायचे ते एक वळण आहे. आणि हे वळण लावण्याचे काम गुरु करतात. माणसाला माणूसपण प्राप्त होण्यासाठी, योग्य गती , योग्य मती आणि त्यातून प्रगती साधण्यासाठी शिक्षणातून सुसंस्कार करण्याचे कार्य गुरु करतात. चांगला माणूस ज्ञानाने सुधारतो. आणि ही ज्ञानप्राप्ती करून समाजात चांगली . समाजबांधणी निर्माण करतो. 
गुरूचा महिमा अपार आहे. हा गुरु महिमा माझ्या स्वकाव्य निर्मितीतून मी खालील ओळीतून मांडलेला आहे.

 " चिखल मातीच्या गोळ्यास
आकार तू देतोस 
 ज्ञानदीपाची ज्योत पेटवून
अंधकार दूर सारतोस 

शतशः नमन मी करिते
गुरुवंदन करुनी 
आशीर्वाद मी घेते
आयुष्यभर ऋणी राहूनी
वंदन मी नित्यनेमाने करिते.

गुरुवर्य आहे ज्ञानाचा भांडार
अज्ञानाचा नाश करून
 होतील संहार
घडवतील मनुष्यजीवना
अपूर्ण जीवन आपले....

कर्तव्याचे बीजांकुरण करुनी
पेटतील समाजमनाच्या उदरी
ज्ञानार्जनाची शिदोरी वाटुनी
वसतील शिष्यांच्या मनमंदिरी"

गुरुमहिमा हा अपार असतो. गुरुहा आपल्याला सत्यसृष्टीत घेऊन जातो. आपल्या जीवनातील अंधकार दूर करतो. आपल्या जगण्याच्या दाही दिशा उजळून टाकतो. आपले जीवन सुंदर करतो. जीवनात कसं वागावं कसं राहावं कसं बोलावं कसं चालावं हे सर्व ज्ञान  गुरूकडून मिळतं. अशा या अनंत ज्ञानाच्या तळमळीस मी वंदन करून शतशः नमन करते.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍लेखिका
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जि.नांदेड.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••02) गुरुशिवाय तिमिरातून-तेजाकडे जाण्याचा दुसरा मार्ग नाहीच...*

✒श्री दुशांत निमकर,चंद्रपूर

"गुरू हा ज्ञानाचा वसा
 मार्ग दाखविते सर्व
गुरुविना पर्याय नाही
शिकण्याचे नवनवे पर्व..."

        प्राचीन काळापासून गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे हे आपण सर्वजण जाणतोच.पूर्वी आश्रमात राहून गुरू आपल्या शिष्याला ज्ञान देत असत.आज सध्या घडीला गुरूला वेगवेगळ्या नावाने बोलावीत किंवा ओळखत असतात.आज आचार्य,गुरू, वरून सर,मॅडम,शिक्षक असे बदलले असले तरी त्यांचे महत्व कमी झालेले नाही.पूर्वी आचार्य हा शब्द अधिकाधिक वापरात आणत असत.'गुरू-शिष्य परंपरा' या शब्दातच खूप अर्थ भरलेला आहे.आजपर्यत होऊन गेलेले संशोधक, योद्धे, अध्यात्मिक व नाना क्षेत्रातील पारंगत व्यक्ती यात गुरू शिष्याच्या जोडीनेच ओळखला जात असत.आज शिक्षण,आरोग्य,क्रीडा,अवकाश,राजकारण,समाजकारण,अर्थशास्त्र, इतिहास,समाजशास्त्र या सर्व क्षेत्रात उंच भरारी घेणारे देखील गुरुच्याच पावलावर पाऊल ठेऊन पुढे मार्गक्रमण केलेली आहे.द्रोणाचार्य-एकलव्य,श्रीकृष्ण-अर्जुन,साक्रेटिस-प्लेटो,गोखले-म.गांधी,स्वामी रामदास-शिवाजी महाराज यासारख्या गुरू शिष्याच्या जोड्या सांगता येईल.आता जरी गुरुकुल पद्धती बंद झाली असली तरी गुरुची महती कमी झालेली नाही.आजही आषाढी पौर्णिमेला गुरूच्या महात्म्याचे महती सांगून त्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करीत असतो.समाजात गुरूला आदराचे स्थान आहे.'गुरू' या शब्दाची फोड केल्यास 'गु' म्हणजे अंधःकार आणि 'रु' म्हणजे अंधार नाहीसा करणारा म्हणजेच गुरू हा शिष्याच्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे नेणारा चमकता तारा आहे असं म्हटल्यास वावगे वाटणार नाही.एकंदरीत गुरुशिवाय तिमिरातून-तेजाकडे जाण्याचा दुसरा मार्ग नाहीच.

        महाभारतात आई-वडिलांच्या पूर्वी गुरूला प्रथम स्थान दिलेलं आहे पण आजच्या युगात मात्र मूल जन्माला आल्यानंतर शाळेत जाईपर्यत निरनिराळ्या बोधपथ कथांतून आई-वडील मुलांवर संस्कार देत असतात.पालनपोषण करण्यापासून तर चालणे,बोलणे,आचरण या साऱ्या गोष्टीवर माता-पिता लक्ष केंद्रित करून योग्य सन्मार्ग दाखवीत असतात.मातृदेवो भव!!!,पितृदेवो भव!!!,गुरुदेवो भव!!! असं म्हटल्या जाते.प्रथम आपले गुरू आई-वडील असून नंतर जीवनाचे सार प्रात्यक्षिकातून गुरू देत असतो.गुरू शिष्याला मार्ग दाखवीत असतांना केवळ बौद्धिक विकासच नाही तर समाजात आचरण कसे असावे??? या विषयी देखील मार्गदर्शन करीत असतो.समाजात जीवन जगत असतांना पाळावयाचे नियम,शिस्त,कौशल्य,नैतिक मूल्ये यांचेही अवलोकन करून प्रत्यक्ष धडे देत असतो.गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्याला जीवनात एखादी गोष्ट सांगितली तरी तो गुरू होत असतो त्यामुळे कृतज्ञता म्हणून त्या दिवशी उतराई होण्याचा थोडी संधी मिळते.गुरूच्या ऋणातून आपण कधीही उतराई करू शकत नाही पण गुरू आपल्यात असलेल्या सर्व ज्ञान,कला कौशल्य निस्वार्थपणे शिष्यात याव्या यासाठी अतोनात कष्ट वेचत असतो त्यामुळे आजन्म गुरूच्या ऋणात राहून आदर करायला पाहिजे.

        आज जगातील सर्व क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केलेली तरुण पिढी हे गुरूच्या मार्गदर्शनातूनच घडत आले आहे.म्हणून जोपर्यत सागरातील पाणी आटत नाही तोपर्यत गुरुचे माहात्म्य कमी होऊ शकत नाही.म्हणून म्हणता येईल की,'गुरुशिवाय मार्ग नाही' हेच दिसून येते.तिमिरातून तेजाकडे घेऊन जाण्याचा यथोचित सन्मार्ग म्हणजे गुरुच होय.पूर्वी निसर्गाच्या सानिध्यात शिक्षणाचे धडे देण्यात येत होते.रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रत्यक्ष जीवनानुभव देण्याचा प्रयत्न होता.आजच्या घडीला शिक्षण वर्गावर्गातून घडत आहेत.प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्याची प्रयोगशाळा म्हणून शाळा उदयास आल्या आहेत आणि त्यात विद्यार्थ्याला त्याच्या कलाकौशल्य ओळखून इच्छेनुसार क्षेत्र निवडण्याचे कार्य गुरूकडून होऊ घातलेले आहे म्हणून म्हणेन की,गुरुची महती शब्दात वर्णन करता येणार नाहीच आणि गुरुशिवाय तिमिरातून-तेजाकडे जाण्याचा दुसरा मार्ग नाहीच.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
४)! ! " गुरू " ! ! 

 गुरू माझे तारू , उतरी पैलतिरी गुरू माझे .
   मानवी जीवन फलद्रुप 
होण्यासाठी , त्याला पूर्णता येण्यासाठी , त्याला जे उमगत नाही ते शिकविणे , माहिती करून देणं किंवा आपल्या सारख बनविण्यासाठी प्रयत्न करणं नव्ह अहोरात्र झटणं आणि सिद्ध बनविणं , मग ते क्षेत्र कोणतेही असो . जे जे अपणाशी ठावे ते इतराशी सांगावे , शहाणे करूनी सोडावे सकळ जन . हे गुरू चं मुख्य लक्षण युक्त काम ते स्वत: समजतात . 
           गुरू हा खूप व्यापक शब्द आहे . माणसाच्या चतुररतेचे किंवा अ चतुररतेचे दर्शन समोरच्याला झाले कि ते ओळखतात हा / ही सामान्य गुरूचा चेला नाही किंवा याचे / हिचे गुरू सामान्य आहेत .
        म्हणजे गुरूवरून पारख शिष्यांची केली जाते , आणि चेल्यावरून गुरूची योग्यता ठरविली जाते . हा सिद्धांत प्राचिन काळापासून आज पर्यन्त लागू पडतो .
गुरू आणि शिष्य, चेला , विद्यार्थी हे नाते अतिशय जिव्हाळ्याचे सौहार्दाचे अतूट असे आहे. गुरूपरंपरा ही जगात विशेषत: भारतीय उपखंडात खूप प्राचिन काळापासून चालत आलेली परंपरा आहे . 
         अदिनाथ गुरू सकळ सिद्धाचा मच्छिन्द्र तयाचा मुख्य शिष्य , मच्छिन्द्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती , गहिनी प्रसाद निवृत्ती दातार , ज्ञानदेवा सार, चोजविले ! म्हणजेच पूर्वी पासून ज्ञान हे एकाने दुसर्याला दुसर्याने तिसर्याला द्यायचे कुठं पर्यंत ज्ञानेश्वर महाराजा पर्यंत पण माऊलींनी माञ सकळ लोकांना ते वाटून टाकले धन्य माऊली हे सर्वाचे महागुरू ठरले , सदगुरू ठरले .
भारत देशाला महान गुरूमंडळीची परंपरा लाभलेली आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या घराण्याला वशिष्ठ मुनी , जनक राजाच्या घराण्याला गुरू याज्ञवल्क्य लाभले .पान्डवाचे गुरू धोम्यॠषी असे महान गुरू परंपरेने नटलेली ही भूमी अतिशय पावन झालेली आहे .
त्याशिवाय महायोद्धा धनूर्धर अर्जून यांना महागुरू द्रोणाचार्य, भगवान श्री कृष्ण स्वत; जगद्गुरु असताना गुरू महात्म्य वाढावे म्हणून सांदिपनी ऋषींच्या आश्रमात राहीले आणि गुरू सेवा करून विद्या ग्रहन केली .
      या ठिकाणी गुरूचा आदर आणि महत्त्व पुढे रहावे हाच मुख्य मुद्दा येथे महत्त्वाचा आहे .
गुरूविन ज्ञान न कळे संदेह . गुरूशिवाय ज्ञानी होणं, सुजाण होन हे अशक्य आहे . कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारची कला गोष्ट क्षमता जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी वाटाड्या किंवा मार्गदर्शकाची नितान्त गरज लागते  . मार्गदर्शनाशिवाय मिळाविलेल्या ज्ञानाला अजिबात महत्त्व नाही ते ज्ञान पुरेसे नसते . ते फसवे किंवा कुचकामी ज्ञान समजावे ." गुरूविन अनुभव त्या कैचा पावेल ? तर नाही
भारतीय संस्कृतीमध्ये गुरू ला खूप मोठं स्थान प्राप्त करून देण्यात आलेलं आहे " मातृदेवो भव: पितृदेवो भव: , आचार्यदेवो भव: !! माता पित्याला जितके महत्त्वाचे स्थान किंबहुना तेवढंच महत्वाचं आणि आदराचं स्थान गुरूजी यांना  देण्यात आले आहे .
तिमिराकडून तेजाकडे , अधोगतीकडून प्रगतीकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे माणसाला एकच शक्ती घेऊन जाते , ती शक्ती म्हणजेच गुरू माऊली होय . कधी कधी गुरू चे स्वरूपं वेगवेगळे असू शकतात जसे जूने गुरू आधुनिक गुरू कदाचित शब्द प्रयोग बदललेले असू ही शकतात परंतू त्यामधील थोडीही थोरवी किंवा मोठेपणा कमी झाल्याचं बिलकूल  नाहीच .
      गुरू म्हटलं कि ओतप्रत ज्ञान आणि ज्ञान म्हटलं कि आत्मदर्शन , आपण आत्म दर्शनाला सध्याच्या युगात आत्म कल्याण समजूया .          आपले कल्याण केवळ गुरूजनाच्या त्यागातूनच झालेले असते . 
              गुरूला सर्व गोष्टी येत असतात पण ते ज्या. वेळी अनुभव देतात तेव्हा ते गुरू शिष्य भेद विसरून अनुभूती देतात प्रसंगी आपल्या शब्दात बोलतात , खेळतात आणि आपल्याकडून ते करून घेतात .संत तुकाराम महाराज म्हणतात " पंते हाती धरीली पाटी ! ऐसे अक्षर ओळवी ! क्रिया करूनी दाविती अंगी ! वास्तविक पाहता त्यांना ते अवगत असताना ते आपल्या शिष्यासाठी अशी क्रिया करतात . 
      धन्य त्या गुरू जनांना कारण आता सर्व गुरूजन आठवणं शक्य नाही आणि नसतेही पण त्यांचे योगदान माञ कमी नाहीत .
        पाऊस पडतो आणि पाऊस पडला कि जमिन हिरवीगार होते , गवत, झुडपे उगतात तसं ज्ञानाचं नाही ज्ञान संक्रमित करावे लागते आणि गुरू नेमके तेच करतात .म्हणून गुरू महती थोरच आहे .गुरूला तोड नाही.
सध्याचा प्रचलित पद्धतीनूसार सुद्धा गुरूचे महत्त्व कमी झालेलं नाहीच आहे फक्त मानसिकता न बदलू देणं हे महत्त्वाचे आहे. बदलत्या काळानुसार राहणं हे होऊन जाते .
      थोडक्यात गुरू काल ही पूज्य , आजही पूज्य आणि उद्याही गुरू आणि गुरूस्थान पूज्य राहो ही सद्भावना !!!! 
            भागवत लक्ष्मण गर्कळ    
                         बीड
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*34*
*गुरु-शिष्य परंपरा’ होय ! गुरूंशिवाय तरणोपाय नाही*
        गुरु शिवाय शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील. एक होता लोहार .बाण बनवण्यात अत्यंत निपून, असे बाण बनवायचा की बघतच राहावे! एकदा तो बांध तयार करण्यात तल्लीन झाला होता , त्याच्या दुकानावरून एक वाजत गाजत लग्नाची मिरवणूक गेली, पण त्याचे काही लक्षात नव्हते , थोड्या वेळाने त्याच्या दुकानासमोर अत्रेय ऋषी आले. लोहाराचा बाण तयार झाला होता , त्यामुळे एखादा साधू जसा समाधी घेताना शांत असतो तसा तो शांतपणे विश्रांती घेत होता, अत्रेय ऋषींनी विचारले बंधू , तुझ्या दुकानावरून एक रात गेली ,किती वेळा पूर्वी गेली ,मला जरा सांगशील का ? महाराज , मी माझ्या बाणाच्या कामात मग्न होतो. मला वरात केव्हा कुठून गेली वगैरे काहीच माहित नाही.अरे तू ढोल-ताशांचा आवाज तुतारीचा निनाद तरी ऐकला असशील ना?.
        अजिबात नाही, माझ्या व्यवसाय हीच माझ्या दृष्टीने माझी ईश्वराची पूजा उपासना आराधना आहे मी कामाला लागलो की मला कशाची शुद्ध नसते, तेव्हा मी वरात केव्हा गेली किती वेळा झाला वगैरे काहीच सांगू शकणार नाही, मला आपण क्षमा करा, ते ऐकून अत्रेय ऋषी इतके प्रभावित झाले की , त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले,व ते  म्हणाले आज पासून तुला मी गुरु केले आहे माझ्या साथ देत आता मी तुझ्या प्रमाणे एकाग्र व तल्लीन होईन.
    शेवटी येथे सांगण्यात येईल की गुरु हे कोणीही बनू शकतो, *"ज्याच्या कडे ज्ञान आहे तो गुरु"* वयाने लहान असेल तरीही तो गुरु बनू शकतो.

       *शब्दांकन*
श्री.सुंदरसिंग आर.साबळे (स शि) 9545254856
जि गोंदिया.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
गुरु

जीवनातील गुरुचे महत्व आणि संस्कार , संस्कृती

गुरुर्ब्रम्हा , गुरुर्विष्णू , गुरुर्देवो महेश्वरा , गुरुःसाक्षात परब्रम्हं , तस्मैश्री गुरुवेनमः

   गुरु ब्रम्हा , विष्णू , महेश आहे. अशा गुरुंना वंदन    गुरुची महानता अवर्णनीय आहे . अज्ञानाचा अंधःकार दूर करुन ज्ञानाच्या प्रकाशाची वाट गुरु दाखवतो.

  प्राचीन काळी गुरुगृही शिष्य अध्ययनासाठी , विद्या ग्रहण करण्यासाठी  जात असे.तेथे त्याला शिक्षणासोबत सर्व प्रकारची कामे करावी लागत.त्यामुळे आपोआपच नैतिक मूल्य व श्रमप्रतिष्ठा हे गुण अंगी बाणले जायचे.गुरुंना तेव्हा राजदरबारीही मान होता.

   गुरु ज्योतिसारखा आहे, कारण तो सन्मार्ग दाखवतो. शिष्याच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश पसरवतो.गुरु म्हणजे जो " लघु " नाही. गुरु संस्काराची खाण आहे.

  आई  ही पहीली गुरु असते.साने गुरुजींनी आपल्या आईलाच गुरुस्थानी मानले होते . त्यांनी  " श्यामची आई " हे मातृप्रेमाचे महन्मंगल स्त्रोत्र असलेले व संस्कारमोतींनी  भरलेले पुस्तक लिहून आईला परमोच्चस्थानी नेऊन ठेवले व तीला सा-या जगात प्रसिध्द व अजरामर केले. आपल्या आईचे संस्कार अंगी बाणवले व त्याप्रमाणे ते वागले.

   निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही गुरुचे म्हणजेच शिकवण्याचे व संस्काराचे काम करते . पशुपक्षी , वृक्षवल्ली आपले गुरुच आहेत.ते आपल्याला दातृत्व शिकवतात.आपल्या दोन्ही हातांनी भरभरून देतात.वृक्ष आपल्याला    "जगा व जगू द्या " हा संदेश देतात.ग्रंथही आपले गुरुच आहेत.ते आपल्याला जीवनात सफलता प्राप्त करण्याचा मार्ग सांगतात.चांगल्या वाईटाची जाणीव करुन देतात.ज्यांच्याकडून आपल्याला घेण्याची भावना होते ते सर्व आपले गुरुच असतात.तसे पहायला गेले तर मुंगी व भुंगा हे दोघेही आपले गुरुच आहेत.कारण ते आपल्याला सतत कार्यरत राहण्याचा संदेश देतात.

  गुरुवरील आपले प्रेम व निष्ठा प्रकट करण्याकरीता गुरुंचा सत्कारच करायला पाहीजे असे नाही , तर गुरुच्या शिकवणुकीचा अंगीकार केला म्हणजे गुरुचा सम्मान केल्यासारखे आहे.

   गुरु संस्कारदेवता आहे.आपल्या आचरणाने आपल्या शिष्यांवर संस्काराचे काम तो करीत असतो.आजच्या युगात जरी अनेक साधने आली तरी गुरुचे महत्व काही कमी झाले नाही.कारण ती साधने चालवायला , शंकांचे निरसन करायला गुरुची गरज आहेच.अद्ययावत ज्ञानाने युक्त गुरु शिष्यांचा विकास सहज घडवून आणू शकतो.शिष्यानेही गुरुची शिकवण अंमलात आणून आपल्यातील चुका जर बाजूला केल्या तर गुरुज्ञान सत्कारणी लागेल.

    अशा या गुरुच्या चरणी लीन होऊया व आदरभावे वंदन करुया.

    लेखिका श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
,**********. गुरू महती..***  भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन संस्कृती आहे.भारतात पुरातन काळापासूनच गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे .पुरातन काळात शिक्षणाची सुद्धा आश्रम पद्दती होती .समाजाचे विविध स्तर पडलेले होते .विशिष्ट स्तराच्याच लोकांना शिक्षण घेण्याची मुभा होती.विशिष्ट स्तरातील मुले आश्रमात जाऊन शिक्षण घ्यायचे .तेथे त्या मुलांना सामाजिक, धार्मिक ,आत्मज्ञान ,राज्य चालवण्याचा ज्ञान अशा प्रकारे सर्व गुण संपन्न ज्ञान त्या मुलांना आश्रमात मिळत असे. व ती मुले आपल्या ज्ञानात पारंगत झाली की त्या मुलांना परत पाठवल्या जात असे.                                     गुरु म्हणजे काय? तर गुरुची व्याख्या खूप दांडगी आहे ."  गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशा कडे नेणारा एक तेजोमय काजवा होय..... "    गुरु म्हणजे  आत्मिकशक्ती वाढवणारा ,दुधापासून दही दह्यापासून लोणी ' लोण्यापासून तूप   बनऊन तयार केलेला सार म्हणजे गुरु होय.गुरु ची महती खूप महान असते. चांगला गुरु समाज घडाऊन आणतो.गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होतं नाही. आपल्याला चांगले ज्ञान हवे असेल तर चांगल्या गुरूच्या संपर्कात असायला पाहिजे. चांगल्या गुरूच्या संपर्कात असलेल्या लोकांनी खूप मोठे नाव कमावले आहे.गौतम बुध्द,स्वामी विवेकानंद ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु तर त्यांच्या आई जिजाबाई होत्या ह्या महान व्यक्तींनी गुरु वर पूर्ण विश्वास ठेऊन जगात नाव कमावले .गुरु शिष्याचे नाते खूप दृढ असायला पाहिजे जसे लोणी मध्ये साखर टाकल्यावर साखर आणि लोणी वेगळे करता इत नाही त्या प्रमाणे गुरु शिष्याचे नाते असायला पाहिजे गुरु वर शिष्याची श्रद्धा असला पाहिजे  निष्ठा असायला हवे आणि गुरूचे आचरण  चांगले असायला हवे  . घार उडते आकाशी पर चित्त तिचे पीला पाशी अशी अवस्था गुरु शिषाची असावी लागते. एकदा तीन मित्रांनी तीर्थ यात्रा करायचे ठरवले. त्या पैकी एक होता देवावर विश्वास ठेवणारा. दुसरा होता गुरु वर अत्यंत निष्ठा ठेवणारा .व एक होता नास्तिक. त्यांनी रात्री ठरवले आणि सकाळी लवकर उठून यात्रेला पायी निघाले .उन्हाळ्याचे दिवस होते .उन्हाचे चटके बसत होते.तिघेही थकले असतांनाही न थकल्या सारखे दाखवत .सन सन पावले टाकत चालत होती .सूर्य जसा जसा डोक्यावर येत होता तसे तसे उन वाढत गेले. व नंतर दिवसाला तिरीप लागली .तिसरा पहर झाला .आणि अचानक ढग कडाडू लागले. मेघ खूप दाटून आले ,मुलांचा जंगलातला प्रवास सुरू होता.पायाखालून कधीही न गेलेला रस्ता होता .उन्हाचे चटके मुलांनी सहन केले होते पण .अचानक सुटलेला थंड वारा सहन होत नव्हता.अचानक जोराचा पाऊस सुरू झाला.नद्या नाले तुडुंब वाहत होते .अचानक समोर एक मोठे ओहोळ आले . मुले ओहोळात्त जाताच  ओहोळला पूर आले आणि मुले घाबरली. आता काय करावे हे मुलांना सुचले नाही ज्या मुलाची गुरुवर निष्ठा होती त्या मुलाला एक युक्ती सुचली त्याने आपल्या दोन्ही मित्राचे हात धरले व त्यांना सांगितले की माझे हात जो कोणी सोडेल त्याची मी नदी पार करण्याची हमी घेणार नाही. त्या मुलाला गुरूने संकट काळात वापर करण्याचा मंत्र दिला होता.त्या मंत्राचा जप करत गुरूला स्मरण करत दोन्ही मुलांचे हात पकडत धाडसाने निघाला सोबतचा एक मुलगा देवावर विश्वास ठेवणारा होता . तो देवाचे नाव घेत होता. पण योग्य ज्ञान नव्हते .एक मुलगा नास्तिक होता .तो शांत त्यांच्या सोबत घाबरत घाबरत चालत होता.आणि अचानक नास्तिक असणाऱ्या मुलाचा हात सुटला आणि पाण्यात पडला . सरवा सावर करून पुन्हा त्या मुलाचे हात पकडले व  तिन्ही मुलांनी नदी पार केली .एवढी शक्ती गुरु नामात असते .गुरुवर निष्ठा असणाऱ्या मुलाला गुरूने काही दिले नाही तर फक्त त्या मुलाचा आत्मिक विकास वाढवला होता.गुरु नमामध्ये जगाला योग्य मार्गावर वाहून नेण्याची ताकद आहे. .  स्वामी विवेकानंद सारख्या महान व्यक्तींनी तर खरे गुरु शोधण्यातच  आपल्या आयुष्याचा बराच वेळ खर्च केला तेंव्हा त्यांना खरे गुरु परमहंस रूपाने लाभले.  पण अताच्य काळात शिषांची गुरुवर असणारी निष्ठा कमी झाली आहे .संत कबीर यांनी आपल्या दोह्यात ही गुरु पहाचान कर करो. सांगितले आहे.       अशी गुरु महती खूप महान आहे...                    जीवन खसावत भंडारा 9545246027
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
तस्मै श्री गुरवे नमः 

         डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(6)
         शहापूर ,(ठाणे)9226435827
                                                                  

गुरु हा संतकुळीचा राजा

गुरु हा प्राण विसावा माझा
       
     माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो .मानव जन्म ते मृत्यूपर्यंत  विद्यार्थी दशेत असतो कारण मरतानाही मरण यातना काय असतात हे तो शिकत असतो . निसर्गापासून आयुष्यभर आपल्या वळणावर अनेक व्यक्ती आपल्याला मार्ग दाखविण्याचे काम करतात .निसर्ग तर खऱ्या अर्थाने आपला महागुरू आहे जो आपल्याला सतत वास्तवतेचे भान देत असतो. प्राणी सुद्धा आपले गुरू असतात कारण मुंगी कडून शिस्त ,कुत्र्याकडून प्रामाणिकपणा ,झाडांकडून औदार्य,पाण्याकडून शीतलता,ऋतूचक्रातून वक्तशीरपणा इत्यादि गुणांची पाखरण होत असते .
  जो लघुला मोठा बनवण्याचं कार्य करतो  तो गुरू!! गुरु एक प्रकाशमय तारा  आहे. गुरूंचे  आगमन झाले की मनातील सर्व किल्मिष व सर्व शंकारूपी  अंधःकार नाहीसा होतो.
गुरु म्हणजे सुमधुर संगीताचा नाद आहे ज्याच्या एका झंकाराने मनमोहक ध्वनी लहरी निर्माण होऊन ज्ञानाचे सुमधुर गीत  ऐकू यायला सुरुवात होते. 
गुरु म्हणजे शाश्वत ज्ञानाची प्राप्ती की जे ज्ञान मिळाल्या बरोबर  मनातील भीतीरुपी राक्षस कुठच्या कुठे पळून जातो . गुरु ही एक अशी उपासनेची स्थिती  आहे की ज्याला ती लाभली की  तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा. गुरु ही एक अशी निखळ वाहणारी महागंगा आहे जी सतत आपल्याल्या प्रगतीपथावर वाहत जाणारी वाट दाखवते गुरु म्हणजे असा स्वप्रकाशीत आनंद आहे जो आपल्याल्या आपल्या 'स्व' ची जाणीव निर्माण करून देतो.
गुरु म्हणजे एक निर्व्याज अव्यक्त प्रेम करणाऱ्या माऊलीचे दुसरे रूप आहे जिच्या नुसत्या असण्याने व दिसण्याने मना मध्ये कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते.
गुरु म्हणजे अमृताची  साक्षात धाराच जे प्राशन केल्याने ज्ञानाची अखंड शिदोरी जीवन जगण्यासाठी प्राप्त होते.
गुरु म्हणजे एक अशी संतकृपा असते जी मिळून आपलं भाग्य उजळवता येते.गुरु म्हणजे  ज्ञानाचं अक्षय्य भांडारच आहे त्या खजिन्याचे मोल कुबेराच्या धनाशीही होऊ शकत नाही.
गुरू म्हणजे महाप्रसाद आहे.ज्याला मिळाला त्याला कुठेही याचना करून काहीही मागण्याची गरज नाही.
     भारतीय गुरुपरंपरेत अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.ज्ञानदेवा पासून तुकोबारायांपर्यंतच  नव्हे तर आजही गुरु शिष्यांची ही परंपरा रमाकांत आचरेकर - सचिन तेंडुलकर आशा जोडीच्या रुपाने आधुनिक काळात पहायला मिळते. खरे म्हणजे आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
        आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग घडतात की ज्यावेळी कोणीतरी आपल्याला योग्य मार्ग दाखविणारा वाटाड्या भेटतो. जीवनाच्या प्रत्येक वळणावर विविध रुपात गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात.  आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान हे नेहमीच अढळ मानले आहे. भारतीय संस्कृतीत देव देवतांना जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्त्व गुरूंना आहे .मानवी जीवनातील जडण घडणीमध्ये गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे.ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो योग्य वळण मिळते.  गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु ज्या प्रमाणे भांडे थोडे वाकविल्याशिवाय पाणी भांड्यात भरता येत नाही अगदी त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ’ ही उक्ती अगदी यथार्थ ठरते .
          सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर शिष्य चालत राहिला, तर सद्गुरूंना आनंद होतो.  शिष्याला मिळालेल्या कीर्तीनेही गुरूला खरा आनंद होतो. आपल्यापेक्षाही आपला शिष्य मोठा होण्यात गुरूला धन्यता वाटत असते. पुरातन काळापासून गुरूला शिष्याकडून आपल्यापेक्षा जास्त ज्ञान प्राप्त करणारा शिष्य आवडतो . 
        म्हणूनच गुरूंचे खरे पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जी शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे.सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन. कारण पुरातन काळापासूनच आपण हा श्लोक  अनुभवत आलोयेत -     
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमःll

          डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
23)
  गुरू म्हणजे परीस

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा 
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः 
तस्मै श्री गुरुवे नमः 
      आदरणीय गुरुजनांना सादर वंदन !
गुरु म्हणजे शिष्याच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा करणारा तेजस्वी तारा. गुरु म्हणजे ज्ञानाचा महामेरू. अशा गुरूंच्या चरणी लीन होण्याचा दिवस, म्हणजे गुरुपौर्णिमा !आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत. 
गुरुविण कोण दाखविल वाट 
जीवनपथ हा अवघड डोंगर घाट |
       काही नाती रक्ताची असतात तर काही नाती रक्तापेक्षा ही घट्ट असतात. असंच एक घट्ट , अतूट व अविस्मरणीय नातं म्हणजे गुरु-शिष्य हे नाते होय. आयुष्याला योग्य दिशा व अर्थ लाभतो तो गुरु मुळेच. त्यामुळेच जिथे जिथे संस्कृती रुजली तेथे तेथे गुरु-शिष्य परंपरा ही वृद्धिंगत होत राहिली. आपल्या संस्कृतीत गुरू-शिष्य परंपरेचा हा इतिहास हजारो वर्षांपासून रुजलेला आहे. या हजारो वर्षांच्या इतिहासात कित्येक शिष्यांनी आपल्या गुरुप्रती श्रद्धा व्यक्त करून त्यांच्या गुणांनी ते अजरामर झाले .यातीलच काही परंपरा म्हणजे सांदीपनी -कृष्ण , विश्वामित्र-राम लक्ष्मण, द्रोणाचार्य -अर्जुन एकलव्य, जनार्दन स्वामी- संत एकनाथ या आहेत. गुरु हे आपल्याला ज्ञान देतात. आपल्या जीवनाला योग्य दिशा व ध्येय निश्चित करून देण्यासाठी सातत्याने झटत असतात. आपल्यावर चांगले संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई-वडील हे आपले पहिले गुरू. योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव करून देत जीवनाला आकार देणाऱ्या मातापित्यांच्या चरणी मनोभावे वंदन करुया!  त्यानंतर आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देत असतानाच अनेक नीतिमूल्यांची रुजवण करून आपले जीवन सुगंधित करणारे शिक्षक हे आपले महान गुरू. आपण आपल्यासाठी नाही तर राष्ट्रासाठी जगायचे असते. 'त्याग हा जीवनाचा पाया आहे', असे निस्वार्थी विचार पेरणाऱ्या गुरूंना प्रणाम!
     केवळ व्यक्तीच आपल्या आयुष्यात गुरुस्थानी आहेत असं नाही तर,
 जो जयाचा घेतला मी गुण 
तो तो गुरु केला मी जाण |
      या उक्तीप्रमाणे आपल्या भोवतालचा निसर्ग हा देखील आपला गुरूच आहे. भरभरून देणाऱ्या झाडे वेली परोपकार शिकवतात. साऱ्यांची तृष्णा भागवणाऱ्या नद्या भेदभाव नाहीसा करतात. उंचच उंच डोंगर मनाच्या विशालतेचं दर्शन घडवतात. आकाशातील सूर्य चंद्र नियमितपणाचे धडे देतात, म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण हीच निसर्गाला खरी गुरूदक्षिणा ठरेल. समाजात ज्या ज्या घटकांपासून आपल्याला ज्ञान मिळते, त्या साऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस ! अनेक शिष्यांनी गुरुभक्तीचा आदर्श घालून दिला आहे व गुरुभक्ती चे महत्व पटवून दिले आहे. आपणही हेच व्रत अविरत आचरणात ठेवणे व जोपासणे तितकेच महत्त्वाचे आहे .खरे तर,' आपण कोणाचे तरी शिष्य आहोत' या भावनेत एक कृतज्ञता असते. शेवटी एकच सांगेन,' गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
 आम्ही चालवू हा पुढे वारसा |

  सुधाकर रामदास पाटील, ठाणे
7798963063
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
२२)   अरविंद कुलकर्णी पिंपरखेड कर  
गुरुविण कोण दाखविल वाट ................

दिशा न कळती या अंधारी 
नसे आसरा नसे शिदोरी 
कंठ दाटला आले भरुनी 
लोचन काठोकाठ 
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट
 गुरुवीन कोण दाखविल वाट..    

       गुरु ! 
  आयुष्यात पहिला गुरु असते आपली माय ... 
 आपली दिवसरात्र काळजी घेणारी ,  आपले बोबडे बोल समजणारी , आपली भूक तहान जाणणारी आपली आईच आपली गुरु असते . तिच्या बोटाला धरुनच आपण चालायला शिकतो .  उन्हातान्हात चालताना आपल्या डोक्यावर पदराची सावली धरणारी , स्वत: अनवाणी चालून आपल्याला कडेवर घेणारी आईच आपली गुरु असते .  आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी आईच आपली पहिली गुरु असते .

      शाळेत  नांव घातल्यावर शिक्षक हे आपले गुरु असतात .  ज्ञानामृत पाजून  , स्वाभिमानाने जगण्या लायक  आपल्याला शिक्षण देतात. प्रसंगी थोडे कठोर होतात पण आपल्याला  शिस्त लागावी , चांगले संस्कार व्हावेत याची  गुरुजन काळजी घेतात . एक चांगला माणूस घडविण्याचा ते प्रयत्न करीत असतात .    

   अध्यात्मिक गुरु तर आपली आई सारखी काळजी घेतात म्हणूनच त्यांना माऊली म्हणतात . 
   गुरुंची महती सांगताना  संत कबीर दास म्हणतात 

            गुरु गोविंद दोऊ खडे 
            काके लागू पाय. |
            बलीहारी गुरु आपने
            गोविंद दिसतो बताय |

 जर  गुरु आणि  देव स्वत: समोर येऊन उभे राहिले तर आधी कोणाचे दर्शन घ्यावे ? सर्वात आधी कोणाला नमन करावे ?   असा प्रश्न  पडल्यावर   संत कबीर दास म्हणतात की ज्यांच्या मुळे मला देव दिसले ,   त्या सद् गुरुंचेच मी आधी दर्शन घेईन आणि नंतर देवाचे दर्शन घेईन .  देव काही तुम्हा आम्हाला दिसत नाही पण संत आणि सद् गुरु दिसतात , आपली काळजी घेतात .
             ऐसी कळवळ्याची जाती
             करी लाभावीन प्रतिती
 आपल्या शिष्यावर गुरुंचे नितांत प्रेम असते . आणि ते प्रेम निस्वार्थी असते . कसलाही लाभाचा , लालसेचा विचार त्या प्रेमा मागे नसतो .
              जनतेला ऐहिक सुखापासून परावृत्त करुन  शाश्वत सुखाची ओळख करुन देतात ते सद् गुरु! 
    अडमार्गी चालणाराला सन्मार्गावर आणतात ते सद् गुरु ! 
      देवाला जर प्रसन्न करुन घ्यायचे असेल तर संताची संगत पाहिजे .
  संतांचे संगती , मनोमार्ग गती , काळाला श्रीपती  येणे रीती ! 
         लोखंडाला जर परीसाचा स्पर्श झाला तर त्याचे तात्काळ सुवर्ण होते . तसेच आपल्याला गुरुंचा सद् संग झाला तर आपल्या जन्माचे सार्थक होते .कारण संत , सद् गुरु 
 आपणा सारीखे करीती तात्काळ ! 
  सद् गुरु हे परमेश्वराचे रुप आहे , म्हणूनच त्यांना वंदन करताना 
  गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:   

२२) अरविंद कुलकर्णी पिंपरखेड कर 
                       9422613664
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*गुरू महती*
"आई माझा गुरू आई कल्पतरू
  सत्याचा सागर आई माझी".
        लहान मुलाचा प्रथम गुरू आईच 
काय महती आहे "आई"ची जगातल्या कुठल्याही दुस-या पटाईत गुरूशी तिची तुलना करता येत नाही.
         आपला पहिला गुरू आईच असते .
तिच्याच मार्गदर्शनाखाली आपण घडत असतो.लहानपणी चाललेल्या प्रत्येक चवीला व संस्काराला आपण विसरत नाहीच..(कदाचित काहीजण विसरतात ते आईवडिलाचे दुर्दैव असते )ते संस्कार 
मनात व शरीरात ते रुजलेले असतात
आई हाताला धरून शाळेत नेऊन सोडते 
व शाळेत गुरूजीना मुलांना संस्कार व पुढील अभ्यासाचे धडे द्यावे लागतात .
      पूर्वीच्या काळी कसे आश्रमात जाऊन शिक्षण घ्यायचे व विद्यार्थीदशेतच मुलांना 
स्वावलंबनाचे धडे देऊन सक्षम बनवण्याचे पाठ होते .मूल्यसंवर्धनाने परिपूर्ण असा शिष्य त्यातून निपजत असे बनत असे.
गुरू त्याना सर्व शिक्षण देऊन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतं. त्यावेळेस गुरू म्हणजेच आईवडिल असतं तेच सांभाळ करत असत मुलांचा. 
   युगामागुन युगे गेली मनुष्याच्या गरजा 
बदलल्या शिक्षण पद्धती बदलली गुरूजी बदलले शिकवण्याच्या पद्धती बदलल्या
परंतु गुरू तर गुरूच त्याचा आदर त्याची महती मोठेपणा काही वेगळाच 
       ग्रामीण भागात तर गुरू बद्दल एवढा आदर होता कधीकाळी गुरू शिवाय लोकां चे पान हालत नसे.प्रत्येक गोष्ट शिक्षणापासून ते लग्नापर्यंत गुरुजींनी सांगावे व सर्वानी ते ऐकावे .परंतु गुरुजींनी 
सर्वाना ज्ञानी केले .समाजात वावरण्याचे ज्ञान ,एकमेकांशी वागण्याचे ज्ञान,जगातील घडामोडींचे ज्ञान,ख-या खोट्याची जाण,नातेसंबंधातील जवळच्या एक ना अनेक गोष्टी आज आपल्याजवळ आहेत .या सर्व गोष्टी आपल्या गुरुजींनी गुरूनी आपल्या शिकवल्या प्रसंगी कान पिळून शिकवल्या परंतु आज आपण आपले निर्णय घ्यायला सक्षम झालो.
कुणामुळे तर गुरू. काळ बदलत जात आहे आज अजून आपल्या गुरू मध्ये वाढ झाली आहे प्रसंगानुसार आपण मोबाइलचा वापर करत आहोत .उच्च शिक्षण व सरावासाठी आपण मोबाईलवर देखील शिक्षण घेत आहोत.
      आजच्या प्रसंगी तर मोबाईल आपला गुरू झाला आहे केवढे श्रेय आहे आज लाॅकडाऊन च्या काळात या मोबाईल ला 
विद्यार्थी याच्या सांगण्यावरून अभ्यासमाला सोडवत आहेत व ज्ञानात भर टाकत आहेत .शालेयस्तरावर शाळेने विद्यार्थी ग्रुप बनवून त्याना अभ्यास वितरित करण्याची नियमावली काढली आहे व अगदी शिस्तीत घरी बसून विद्यार्थी अभ्यास करत आहे.
        अस म्हणतात दत्तगुरूला तेहेतीस 
गुरू होते .अगदी हेच लागलेल्या दगडाला देखील ,मुंगीला सुद्धा त्यानी गुरू मानले होते .कारण त्यानी लक्ष ,चिकाटी
या गोष्टी शिकवल्या.आज आपल्याला असे अनेक गुरू भेटतात . आपण देखील त्याचा आदर करायला शिकले पाहिजे कारण गुरूचा महिमा फार मोठा
  "गुरूविण कोण दाखविल वाट "
माहिती असते पण योग्य अयोग्यतेच्या
सुचना व मार्गदर्शन गुरू च करू शकतात
आपण नेहमी गुरूच्या चरणी असावे 
कारण गुरू तिन्ही देवाचे रूप आहे
"गुरुर्ब्रम्हा गुरूर्विष्णू गुर्रदेवो महेश्वरा
  गुर्रसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवेन नमः"
****************************
स्नेहलता कुलथे बीड
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
              माझे गुरु


          'गु' शब्दस्तु अंधकार: स्यात् 'रु' शब्दस्तान्निरोधक:

          अंधकारनिरोधत्वात् गुरु किती अभिधीयते ll

     ' गु' कार म्हणजे अज्ञानरूपी अंध:कार आणि 'रु'कार म्हणजे त्या अंध:काराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज. म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंध:कार घालविणारा. 

          म्हणूनच जीवनात गुरूचे स्थान सर्वात महत्त्वाचे आहे. अर्थात गुरु योग्य असणं महत्त्वाचं. जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तींपासून काही ना काहीतरी शिकत असतो, जे आपल्याला जगण्यायोग्य बनवतात. आपली पहिली गुरु आई असते. जसा अभिमन्यु चक्रव्यूहाचा भेद करायला मातेच्या गर्भात शिकला. तसेच आपलंही शिक्षण तेव्हापासूनच सुरू होतं. तेव्हा पासूनच आई आपल्यावर संस्कार करीत असते. प्रथम जन्मल्यावर आपल्याला चोळून- माखून, व्यायाम करून घेते. शारीरिक शिक्षणाचे महत्व नकळत आपल्याला देते. हात धरून चालायला शिकवते अगदी शब्दशः! आणि नंतरही आपण तिचा हात धरून जन्मभर शिकतच असतो. आई म्हणजे एक अगम्य असं विद्यापीठ असतं. धन्य ती माता!

            निसर्गातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला काही ना काही शिकवत असतात. आई नंतर सूर्य, पृथ्वी, वारा, अग्नि,जल, नद्या, झाडे, फुले, ढग, डोंगर हे ही मला बोध देतात. त्यांच्याकडून कित्येक गोष्टी मी शिकले आहे.

         सूर्य, माहित नाही, किती युगानुयुगे आपल्याला न कंटाळता, अंधारातून उजेडाकडे आणतो. सूर्यप्रकाश देऊन सारी पृथ्वी चैतन्यमय करतो. 

      पृथ्वीची सृजनता, सर्वांचा भार वाहण्याची ताकद, सहनशीलता, तेही कुरकूर न करता, सगळे वाखाणण्याजोगे. 

     वारा आपल्याबरोबर सुगंध पसरवित वातावरण प्रसन्न ठेवतो. ढगांचा वाहकही तोच असतो.म्हणून पाऊस वेळेवर पडतो.

         अग्नी आपल्याला लक्ष्मण रेषा चे महत्व पटवून देतो.आणि अग्नि मुळे आपल्याला शिजवून चांगले अन्नग्रहण करता येते. 

         नद्या स्वतः पाणी न पिता, वाहत वाहत सगळ्यांना  सगळ्यांना जलपान, जलदान करीत असतात.  तिला किती अस्वच्छ केले, कचरा टाकला, तरी आपलं काम ती सोडत नाही. 

         झाडे दिवसभर स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली देतात. त्यांची फुले, फळे, पाने सर्व दुसऱ्यांसाठी असतात.  

       डोंगरावर झाडे असतात. त्यामुळे ढग आकर्षित होतात. तेथील गार हवेमुळे ढगांच्या डोळ्याला धार लागते. पाऊस पडतो. निसर्गचक्र पावसाचे सुरू राहते.               जल म्हणजे जीवन.  पाणी  बिचारे रंगहीन. घालू त्या रंगासारखा दिसतो. ही केवढी मोठी शिकवण.

          असा हा निसर्गही मला गुरुस्थानी आहे.

          हल्लीच्या ह्या कलियुगात गुरुही योग्य मिळायला हवा. पुराण काळातील गुरु-शिष्यांच्या जोड्या अगदी आदर्शच आहेत. वशिष्ठ-राम, द्रोणाचार्य-अर्जुन, द्रोणाचार्य-एकलव्य. असे गुरु आणि असे शिष्य आता होणे नाही. 

        योग्य गुरु मिळणे या बाबत मात्र मी अगदी भाग्यवान आहे असेच म्हणावे लागेल. शाळेच्या कालखंड हा कोऱ्या पार्टी सारखा असतो. त्यावर लिहिलेल्या संस्कारांनीच मला घडवलं. बालमनाला पैलू पाडण्याचे काम त्या गुरुंनीच केले. बालमन म्हणजे मातीचा गोळा. द्यावा तसा घेतो आकार. शिक्षकाची जीवन पद्धती आदर्श हवी. त्यांचे आचरण चांगले हवे. आज-काल तंबाखू खाणारे, दारू पिणारे शिक्षक, आपल्या मुलांसमोर कुठला चांगला आदर्श ठेवू शकणार? पण आमच्या वेळचे शिक्षक तसे नव्हते. त्यांना शिकवण्याची तळमळ असे. ते हाडाचे शिक्षक होते. शाळेतल्या माझ्या सर्व गुरूंना शतशः प्रणाम.

            पूर्वीची गुरुकुल पद्धती खरंच चांगली होती. मुलांना आठव्या वर्षी गुरुंकडे, ऋषीमुनीं कडे, अरण्यात, आश्रमात रहायला पाठवले जायचे. तेथे गुरु त्यांना स्वावलंबनापासून सगळ्या कला गुणांमध्ये पारंगत करीत असत. स्वतः आचरणातून आदर्श घालून देत. गुरु आज्ञा पाळली नाही तर कडक  शिक्षा असे .पालकांचा गुरूंवर पूर्ण विश्वास असे. 

     आता शिक्षक शिक्षा ही करू शकत नाही. केली तर पालक येतात भांडायला. त्यामुळे शिक्षकांचा वचक राहत नाही.

        पुढे माझे ग्रंथ हे गुरु झाले. ग्रंथ माझी साथ कधीच सोडत नाही. ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार. त्यातून ज्ञान  घ्यावे तितके  तितके कमीच. गीता वाचनामुळे, रामदासांचा दासबोध वाचल्यामुळे, माझा विचार पद्धतीला योग्य दिशा मिळाली. जीवनाला वेगळे वळण लागले.या ग्रंथांची शतशः मी आभारी आहे.

          गुरूंचे आदर्श आचरण कसे असावे, याबाबत समर्थ रामदास स्वामींची एक गोष्ट सांगतात. रामदासां कडे एक स्त्री आली. तिने रामदासांकडे आपली मुलगी गूळ खात असल्याची तक्रार केली. "गुरूंनी मुलीला गूळ कमी करण्यास सांगावे" अशी विनंती केली. तेव्हा रामदास काही बोलले नाही. त्या बाईस पुन्हा काही दिवसांनी येण्यात सांगितले. ती पुन्हा आल्यावर त्यांनी मुलीला उपदेश केला. तेव्हा त्यांनी सांगितले, "तुम्हाला मी परत येण्याचा त्रास दिला. कारण तोपर्यंत मी गूळ खात होतो.त्यामुळे मी मुलीला गूळ खाऊ नकोस, असे कसे सांगणार? आपण ती गोष्ट आचरणात आणल्या शिवाय नुसता उपदेश करण्याचा मला काय हक्क आहे?" असे आदर्श गुरु समर्थ रामदास. 

            जीवनाच्या वाटेवर असे कितीतरी लोक भेटतात. ज्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी शिकत असतो. पण आता मला जो गुरु भेटला आहे तो वयानेही माझ्यापेक्षा खूप लहान आहे. तो गुरू म्हणजे माझी नात. तिनेच मला कंप्यूटर, स्मार्टफोन टेक्नॉलॉजी ची माहिती करून देऊन कम्प्युटर सॅव्ही बनवले. हे सगळे श्रेय तिला. तिलाही माझा प्रणाम.

      नाही तर आजच्या एकविसाव्या शतकातली मी अशिक्षित व्यक्ती असते. कारण कम्प्युटर, स्मार्टफोन शिवाय कोणाचे पान हलत नाही.

         ह्या माझ्या नाती मुळे मला आता आणखी एक नवा गुरु मिळाला आहे.  घर बसल्या तुम्हाला शिकवतो. तो म्हणजे स्मार्टफोन. त्यावर यू ट्यूब वरील वेगवेगळी भाषणे मी विनायास ऐकू शकते. माझ्या मनातील शंका, अडचण सगळ्याचा उपाय येथे सापडू शकतो.

            गायक श्रेष्ठ भीमसेन जोशी यांसारखे साधकही आजच्या जगात होते. गुरुगृही काबाडकष्ट करून, मेहनतीच्या जोरावर ते शिकले. त्यामुळेच ते भारतरत्न होऊ शकले. असा साधक विरळाच. 

     साधकाचा गुरुप्रती पूर्णपणे समर्पित भाव असला पाहिजे. एका साधकासाठी गुरुं पेक्षा श्रेष्ठ दुसरी कोणती शक्ती नसली पाहिजे. गुरुचे स्थान सर्वात उच्च असते. मनात एकच पाहिजे,    "गुरु: परम् दैवतम् "

शुभदा दीक्षित पुणे 
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*सत्य घटना*
      माझे गुरु

    आज अचानक एक बातमी समजली की,गुरुजींनी आत्महत्या केली.आणि मन सुन्न झाले.एका गुरुचा अंत असा व्हावा ही मनाला न पटणारी गोष्ट होती.पंचचाळीस वर्षापूर्वी गुरुजी आमच्या गावात म्हणजे माझ्या माहेरी नोकरी निमित्य रहात होते.बाई म्हणजे त्यांच्या पत्नी या पण शिक्षिका.त्या काळी महिला सहसा नोकरीला नसायच्या.पण बाई या सावित्रीबाईच्या रुपात दिसायच्या.नऊवारी साडी,कपाळावर भले मोठे कुंकू त्यांना शोभुन दिसायचे.अगदी मनमिळावु जोडपे.मुला मुलींनी घर संसार अगदी गोकुळासारखा होता.गुरुजी गावातील प्रत्येक सुखदु:खात सहभागी असायचे.कुणाच्या घरी शुभकार्य असो की,काही दु:खद घटना असो गुरुजी तत्परतेने पुढे असायचे.
     गुरुजीचे हे गोड कुटुंब आमच्या वाड्यात रहायला होते.आमचे एकत्र कुटुंब व आमचे  कुटुंब शेतात वस्तीवर रहायला होते.आम्ही सर्व भावंड शेतातुन शाळेत यायचोत दुपारी दप्तरात फडक्यात बांधुन आनलेली चटनी भाकरी आमच्या वाड्यातील ओसरीवर येवुन खायचोत.शाळा सुटली की पळत यायचे व गुरुजी घरी येण्याच्या अगोदर भाकरी खायचोत.कारण गुरुजी आम्ही असे ओसरीवर जेवतांना पाहुन आम्हाला उठवुन स्वत:च्या ताटाशेजारी जेवायला बसवायचे.पण आम्हाला गुरुजीसोबत जेवायला संकोच वाटायचा.आमच्या जडणघडणीत गुरुजींचा सिंहाचा वाटा.कारण आईवडील अशिक्षीत सधन शेतकरी पण आम्हाला शिक्षणाची गोडी लागली ती गुरुजींच्या मार्गदर्शनामुळेच.
      आज गुरुजींचे अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी आहेत. शिक्षणासोबतच गुरुजींना व्हॉलीबॉल खेळाची आवड होती.शाळा सुटली की,हॉलीबॉलचे खेळ शाळेच्या मैदानावर सुरु असायचे.मला बाई पहिलीला शिकवायला होत्या.त्यावेळी सर्व गाव व विद्यार्थी त्यांना बाईच म्हणत असत मॅडम हा शब्दच नव्हता.बाई या शब्दाचा ओलावा मॅडम या शब्दात नाही हे मला आता अनुभवावरुन कळतेय.बाई पहिलीपासुन चौथीपर्यंत मला शिकविले व त्यांच्या संस्करातुनच आमची जडणघडण  झाली.मी बाईंची खुप लाडकी होते.आमच्या कुटुंबातील हे कुटुब एक सदस्य होते.एकदा आमच्या कुटुंबात निर्णय झाला की,प्रत्येकाने आपले एक मुल शाळेतुन शेतात काम करण्यासाठी काढायचे तेव्हा माझा छोटा भाऊ दुसरीत व मी चौथीत होते वडिलांसमोर प्रश्न पडला आता कुनाला शाळेतुन काढावे.कुटुंबात तर निर्णय झाला होता.तेव्हा माझ्या वडिलांनी बाईंचा व गुरुजींचा सल्ला घेतला.तर गुरुजी म्हणाले नाना, पोरगी हुषार आहे तुम्ही तीला शाळा शिकवा.किती विचारपूर्वक सांगितलेला तो निर्णय.आज मुख्याध्यापक पदावर यशस्वीपणे कार्य करतांना बाईंची व गुरुजींची आठवण आल्या शिवाय रहात नाही.
    पुढे माझे लग्न ठरवतांना सुध्दा गुरुजी व बाई सक्रीय होते.नववीत असतांनाच माझे लग्न झाले.पुढे मी ही माझ्या प्रपंचात रमले व गुरुजी रिटायर्ड झाले व स्वत:च्या रहायला गेले.कालांराने गुरुजींच्या मुलींचेही लग्न झाले तिन्ही मुली अगदी चांगल्या घरी गेल्या.मुलाचेही लग्न झाले.एक मुलगा नोकरीला(इंजिनिअर) व दुसरा मुलगा काहीच करत नव्हता पण सर्वात छोटा असल्याने खुप लाडाचा होता.
    एक दिवस मला कळाले बाई खुप आजारी आहेत.मी भेटायला गेले.बाई अंथुरनाला खिळल्या होत्या.त्यांना दुर्धर कॅन्सरने गाठले होते.आणि याच आजारात त्या गेल्याचे कळाले खुप वाईट वाटले.
     गुरुजींना खुप दु:ख झाले.अंर्धांगिनी त्यांना सोडुन गेली होती.पण गुरुजी फार खंबीर होते.
     बाईंना जावुन पंचवीस वर्ष झाले होते.व परवा अचानक कळाले गुरुजींनी आत्महत्या केली.असे काय घडले असावे की इतक्या खंबीर व्यक्तिमत्वावर ही वेळ यावी......?...?...? सर्व प्रश्न अनुत्तरीत.
      या प्रसंगाने काही प्रश्न पडलेत की,
इथे कोण चुकतेय?.म्हातारपणी आईवडीलांचा सांभाळ करणे ही जबाबदारी खरतर मुलांची असते.त्यांना असा कोणता त्रास झाला असेल? कि त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.गुरुजी तुम्ही हा निर्णय घ्यायला नको होता.पण तुमच्या सारख्या स्वाभिमानी व्यक्तिला हे सहन झाले नसावे..
    खरतर भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ट आहे इथे संस्काराचे अलिखीत नियम आहेत.महाराष्ट्र ही संताची भूमी आहे.संतांनी देवापेक्षाही आईवडिलांना श्रेष्ठ मानले आहे.भक्त पुंडलीकासाठी पांडुरंग युगानुयुगे वीटेवर उभा आहे.त्यामुळे पंढरपुरला नाही गेलात तरी चालेल पण आईवडीलांची सेवा करा.देव तुमच्याकडे येईल.असे संतांनी ठणकावुन सांगितले आहे.
       गुरुजींच्या अशा जाण्याने जे विचार मनात आले तेच लेखनीत उतरले.गुरुजींच्या आत्म्याला परमेश्वर चिरशांती देवो हिच प्रार्थना🙏🙏🙏
  गुर्रुब्रम्हा गुर्रुविष्णु गुर्रुदेवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मैश्री गुरुवेन महा: ||
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
   सौ.खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
     मुख्याध्यापिका जि.प.प्रा.शा.
     पिठ्ठी ता.पाटोदा जि.बीड
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*गुरू महती*
आचार्य देवो भवं असा वेदाचा आदेश,तमसो मा ज्योतिर्गमय असा उपनिषदाचा उपदेश तर नहि ज्ञानेन सदृश्य पवित्रमिह विद्यते असा भगवद्गीतेचा
संदेश जोपासणारी आपली संस्कृती.....
आपली जडणघडण आणि आयुष्याचा मार्ग चालण्याचं पायात ज्यानी बळ दिलं अशा मनात
आणि ध्यानात असणा-या सर्वांप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा दिवस आपल्या स्मृतीत राहतो याचाच अर्थ आपण घडलेलो आहोत. बिघडलेलो नाही.पदोपदी अवहेलना झेलावी लागते आहे...मान सन्मान आणि आदर या गोष्टी
हळुहळू संपत चालल्या कि काय असा समज दृढ
होत असताना खरा मार्गदर्शक शोधने महाप्रयासाचे काम आहे.पण खरा मार्गदर्शक कसा असतो,त्याची लक्षणं काय हे तरी आपण जाणले पाहिजे.मार्गदर्शक वा गुरु एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.पण आजच्या धावत्या जगात प्रत्येकाच्या जीवनात फक्त प्रश्नचिन्ह उमटलेली दिसतात.या प्रश्नचिन्हाच्या जाळयातून बाहेर काढणाराच खरा मार्गदर्शक. समजून घेणारे शिक्षक विद्यार्थ्यामध्ये लोकप्रिय असतात.विद्यार्थ्याना त्यांच्या वयाचं होऊन शिकवलं तर त्यांना लवकर समजतं शिवाय
त्या शिक्षकांना आदरही मिळू शकतो.मात्र हा आदर मिळवणं मोठं आवघड काम आहे.हा आदर
मिळवण्यात यशस्वी होणारा खरा मार्गदर्शक होऊ शकतो.मार्गदर्शन करत असताना समोरच्याची समजून घेण्याची पद्धत वा मार्ग वेगळा असू शकतो तो मार्ग गुरुने जाणला पाहिजे.पण गुरुचे कर्तृत्व किंवा त्यांच्या प्रयासाला ध्यानात ठेवलं जात नाही.नाही तरी संतानी म्हटल आहेच,....
   "अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात,
    वरी घालतो धपाटा,आत आधाराचा हात..||
    आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
    ओल्या मातीच्या गोळयाला येई आकृती वेगळी
    घट थोराघरी जाती,घट जाती राऊळात....||
    कुणी चढून बसतो गाव गंगेच्या मस्तकी
    कुणी मद्यपात्र होतो राव राजाच्या हस्तकी
    आव्यातली आग नाही कुणी पुन्हा आठवत..||
    कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
    देता आकार गुरुने,ज्याची त्याला लाभे वाट
    घट पावती प्रतिष्ठा,गुरु राहतो अज्ञात...||
शिष्याला प्रतिष्ठा देऊन अज्ञात राहिलेला गुरु आपले कार्य करुन मोकळा झालेला असतो.एखाद्याचे जीवन घडविण्याचे काम येवढेही सोपे नाही. तरीपण खरा मार्गदर्शक, गुरु, शिक्षक अखंडपणे हे काम करत असतो.सद्य स्थितीकडे पाहता असे म्हणता येईल,'शिक्षकाचे मन आकाशापेक्षाही मोठे असावे,त्याचे चिंतन
महासागराइतके खोल असावे, बुद्धी सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि स्वभाव चंद्राप्रमाणे शितल असावा.शिक्षणक्षेत्र ही एक तपोभूमी मानून विद्यार्थ्याशी समरस झाल्यास आपली तपश्चर्या आपोआप फळाला येते.या प्रयासास खरेपणाने उतरणारे शिक्षक बांधव आहेत....त्यांची महानता
श्रेष्ठ तर आहेच पण गुरु विन कोण अधारु हे तत्व
सर्वस्वी अंगिकारून आपण वागले पाहिजे.प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु येत असतो आपली घडण त्याच्या कर्तृत्वातूनच होत असते.कोणाच्याही दातृत्वाची
कतृज्ञतापुर्वक नोंद घेणं हे संस्कृतीचे लक्षण आहे.ज्यानी आपल्या अध्ययन निष्ठेने विद्यार्थ्याच्या जीवनाला आशय निर्माण करुन दिला.त्या मार्गदर्शक गुरुना वंदन करण्याचा गुरुपोर्णीमा हा दिवस.आपणही जीवन जगत असताना लहान लहान गोष्टीतून आनंद घेतला पाहिजे....भविष्यात एखाद्या दिवशी मागे वळून
पाहाताना याच गोष्टी खूप मोठ्या होत्या याची जाणीव होईल.कदाचीत आपणास घडवणा-या मध्ये अनेक जणांचा वाटा असू शकतो,पण आपला कोणीतरी गुरु मार्गदर्शक नक्कीच असतो.त्याला आपण कधीच विसरू शकत नाही. तोच खरा आपल्या जीवनाचा मार्गदर्शक.पुन्हा प्रश्न येतो की जीवनाचा खरा मार्गदर्शक कोणास म्हणावे,आपणास बाह्य जग जिंकताना अंतरिक बळ आणि आत्मविश्वास जागृत करणारा खरा मार्गदर्शक.
"कपाळावरील रेषेचे भाग्य शोधण्यापेक्षा
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची वेळ कधीच
येत नाही".तेव्हा कामात राम शोधण्यास लावणारा खरा मार्गदर्शक होय.आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञाननिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान सहकार्य, समाजाभिमुखता, साहस या गुणांनी युक्त असणारी व्यक्तीमत्वे आवश्यक आहेत.ती घडवणारा खरा मार्गदर्शक. नवचैतन्याने डवरलेल्या, निरागस, अवखळ, जिज्ञासू अशा उद्याच्या भारताचा सहवास शिक्षकांना लाभतो. तो शिक्षक ख-या अर्थाने गुरु
मार्गदर्शक आहे..!
"गुरु हा सुखाचा सागरु | गुरू हा प्रेमाचा आगरु
गुरु हा धैर्याचा डोंगरु | कदाकाळी डळमळी ना ||
गरु हा घली ज्ञानांजन | गुरु हा दाखवी निजधन
गुरु हा सौभाग्य देऊन | साधू बोध नांदवी ||
गुरु हा भक्तीचे मडंण | गुरु हा दुष्टाचे दंडण
गुरु हा पापाचे खंडण | नानापरी वारीतसे ||
गुरुचा महिमा अगाध आहे..माझ्या जीवनाला आकार देणा-या मला माणूस बणविणा-या त्या गुरुवर्याना माझा अंतकरणपुर्वक नमस्कार आणि वंदन...!!
घराचं अंगण असो,शाळेचं प्रांगण असो वा विद्यालयाचे क्रिडांगण असो,विद्यार्थी जीवनाच्या
नभांगणात गुरुजीचे स्थान ध्रुवता-यासारखे
अढळ आहे..अढळच राहिल......!!

      *हणमंत पडवळ*
        *उस्मानाबाद*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शिक्षक हेच शिल्पकार

भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून गुरूला समाजात मानाचे स्थान आहे. येथील संस्कृतीने शिक्षकाला ब्रह्मा, विष्णु आणि महेश एवढेच नाही तर परब्रह्म असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीने शिक्षकाला एवढे मोठे मानाचे स्थान का दिले असेल ? या प्रश्नाचा सद्सद्विवेक बुद्धीने थोडासा विचार केला तर लक्षात येते की, शिक्षक हाच फक्त आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. ज्याप्रमाणे पाथरवट दगडावर घाव टाकून टाकून सुंदर मूर्ती तयार करतो. पाथरवटा शिवाय दगडाची मूर्ती दुसरा कोणी करू शकत नाही. कच्या मातीला आकार फक्त कुंभार देऊ शकतो. अगदी तसेच व्यक्तीचे जीवन यशस्वीरीत्या जगण्यासाठी शिक्षकाची प्रत्येकाला गरज असते. त्याशिवाय आपण यशस्वी जीवन जगू शकत नाही.
पूर्वीच्या काळी गुरुगृही म्हणजे आश्रमामध्ये जाऊन शिकावे लागत असे. धनुर्विद्या असो किंवा इतर विद्या हे शिकणे फक्त राजघराण्यातील लोकांचे काम होते. त्यामुळे एकलव्यासारख्या कनिष्ठांना गुरु द्रोणाचार्यांनी शिकविण्यास नकार दिला. मात्र त्या गुरूंच्या पुतळ्यानेच एकलव्याला बरेच काही शिकविले. आज तशी स्थिती नाही. शिक्षक आज कोणाला विद्या घेण्यापासून रोखू शकत नाही. उलट सर्वांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर टाकलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांच्यासारखी आई आणि गुरू मिळाली म्हणूनच राजे शिवाजी घडले. त्यांनी तलवार चालविणे, घोडेस्वारी करणे इत्यादी रणनीती तर शिकविल्याच तसेच रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगून शिवाजी महाराजांना त्यांनी माणुसकीचे धडे ही दिले. डॉक्टर बाबासाहेब यांना आंबेडकर आणि केळुस्करासारखे चांगले शिक्षक मिळाले म्हणून आपणाला महामानव मिळाले. त्यांच्या शिक्षकाने आपल्या शिष्यांना आडनाव दिल्याची घटना कदाचित पहिलीच आहे. परमपूज्य साने गुरुजी यांनी तर जगालाच प्रेमाचा संदेश देऊन शिक्षकांचे समाजात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ज्यांच्या जीवनात चांगले शिक्षक येतात त्यांचे जीवन फळाला येऊन नक्कीच यशस्वी होते. म्हणून सर्वांनी चांगल्या शिक्षकाचा शोध घ्यावा, कारण शिक्षक हाच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. शिक्षक ते भारताचे राष्ट्रपती अश्या पदापर्यंत पोहोचणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्व शिक्षकांसाठी एक आदर्श होय. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. 

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
13) गुरुची महती

"गुरु विना ज्ञान नाही " असे म्हटले जाते ते खरेच आहे आपली सर्वात पहिली गुरु म्हणजे आपली आई होय आपल्या उदरातून ती मुलाला जन्म देते व ही दुनिया आपणास पहावयास मिळते. आपली भूक आई सर्वप्रथम भागवते. वस्तू गरम आहे त्यापासून सावध रहा हे हे तीच सर्वप्रथम आपणास सांगते. सर्वांचा आदर करावा हे ती सांगते. आईपासूनआपण सहनशीलता शिकतो.
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आपला दुसरा गुरु म्हणजे आपले शाळेतील शिक्षक होय.  शिक्षक आपणास मार्गदर्शन करतात. स्वतःचा स्वार्थ विसरून योग्य मार्ग दाखवतात. पूर्वी गुरुकुल पद्धती होती; गुरूच्या घरी जाऊन शिक्षण घेतले जात असे .एकदा एका गुरूंनी आपल्या शिष्यास वनामध्ये गायी चरावयासाठी पाठवले व त्यास निक्षून सांगितले गायी दिवसभर राखायच्या परंतु; दूध मात्र प्यायचे नाही कितीही भूक लागली तरी दूध प्यायचे नाही. शिष्य दररोज गायींना वनांमध्ये घेऊन जाऊ लागला आश्रमात परतल्यानंतर देखील तो उपाशी झोपत असे परंतु आपल्या गुरूच्या वाणीवर त्याचा विश्वास होता गुरूंनी आज्ञा केली म्हणजे ती पाळायची त्या मार्गावर चालायचे असे त्यांनी ठरवले होते दुसऱ्या दिवशीही तो राना मध्ये गायी  घेऊन गेला त्याला भूक लागली परंतु आता गुरूंनी तर सांगितले होते दूध प्यायचे नाही. त्याने आपली भूक भागवण्यासाठी रुईची पाने तोडली, त्यास पांढरा चिक होता तो चिक पिऊ लागला परंतु ;तो डोळ्यात गेला आणि तो आंधळा झाला अंध झाल्यावर त्याला पुढे काही दिसेनासे झाले, तरीही तो चालत राहिला एका विहिरीत पडला; आता त्याला वाटले आपल्या गुरूने आपल्याला आज्ञा केली' भूक लागली तरी आपण गायचे दूध पिलो नाही, आपण त्याप्रमाणे वागलो; मग आपण अंध झालो , विहिरीत पडलो तरीही त्याचा गुरुवर विश्वास होता अचानक त्याला आवाज आला. गुरु म्हणाले' वर बघ मी आलो आणि त्यास दोर टाकून त्यांनी विहिरीतून बाहेर काढले ,त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याची दृष्टी परत आली. शिष्य गुरुंसमोर हात जोडून म्हणाला, गुरुजी हे कसे शक्य झाले माझी दृष्टी कशी परत आली ?तेव्हा गुरु म्हणाले मी तुझी परीक्षा घेतली. माझी आज्ञा तू किती पाळतो हे मी पाहिले म्हणून तुझी दृष्टी परत आली. आपण गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळली तर आपले कल्याण नक्कीच होते. गुरु नेहमीच योग्य मार्ग दाखवतात ग्रंथ हे एक चांगले  गुरु होय. ग्रंथा मधील भाषा कधीही बदलत नाही त्यामुळे आपल्या मतांवर ठाम राहण्याचे ग्रंथ शिकवतात.
गुरु वयाने लहान किंवा वयाने मोठी असू शकतात एवढीशी मुंगी आपणास सतत उद्योगी राहण्याचे शिकवते .आळसे कार्यभाग नासतो हे आपण मुंगी कडून शिकावे. संत चांगदेव हे वयाने ज्ञानेश्वरांपेक्षा मोठे होते कितीतरी वर्ष त्यांनी तपश्चर्या केली होती, सिद्धी प्राप्त केली होती; तरीदेखील सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली व चांगदेवांचा अहंकार गळून पडला. मुक्ताबाईने चांगदेव यांना कच्चे मडके म्हटले आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली ,अहंकाराने ज्ञानाचा नाश होतो .तुम्ही कितीही ज्ञानी असा, अहंकारामुळे भले होत नाही, आणि गुरू हाच अहंकार संपवतात म्हणून गुरुपदेश महत्त्वाचा आहे.
गुरु शिष्याला फक्त ज्ञान देत नाही तर हे ज्ञान कितपत शिष्याच्या गळी उतरले याची परीक्षा देखील घेतात यामुळे आपण जीवनात यशस्वी होतो. गुरुला सदैव आपल्या शिष्याच्या भलेपणाचे पडलेले असते, जीवनात जेव्हा शिष्य दुःखी कष्टी होतो तेव्हा गुरु स्नेहाने मायेने त्याला जवळ करतात. त्याचे दुःख दूर करण्यास त्यास मार्गदर्शन करतात शिष्य चुकीच्या मार्गाने जात असेल तर गुरु कठोर शब्दात त्याची कानउघडणी करतात ,व त्यास शिक्षा देखील करतात शिक्षेमुळे सन्मार्गावर राहण्याचे शिष्य शिकतो .आपल्या शिष्याची कुवत गुरूला माहिती असते म्हणून गुरु 'तू हे करू शकतोस' या शब्दाने बळ देतात व शिष्याला जग जिंकण्याचे साहस देतात. असे म्हणतात" सबसे बडा गुरू ,गुरूसे बडा गुरू का ध्यास "संकटकाळी गुरूंचे स्मरण केल्यास त्यांच्या शिकवणीचे स्मरण केल्यास आपली अडचण दूर होण्यात व आपल्याला अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य मिळते हा आहे गुरूचा महिमा. गुरु म्हणजे एक पाणपोई आहे .जसे एखादा वाटसरु चालून चालून दमल्यावर आपली तहान भागवण्यासाठी पाणपोईवर थांबतो; पाणपोई त्याची पाण्याची तहान भागवते व त्यास ताजेतवाने करते. त्याचप्रमाणे गुरु देखील आपण आपल्या आयुष्यात सन्मार्गावर चालताना थकलो तर उपदेश करून आपणास त्याच सन्मार्गावर मार्गावर चालण्याचे बळ देतात हे निश्चित.

सविता साळुंके,श्रीरामपूर
कोड नंबर 13
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
गुरू 

ज्या शब्दाचा अर्थच महान आणि मोठा असतो असं व्यक्तमत्व म्हणजे गुरू....
आचार, विचार आणि मनाने जो मोठा असतो तो गुरू...
असं मानतात की आयुष्यात माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला गुरू भेटावा किंवा करावा लागतो..
ज्याच्याकडून आपल्याला नवीन जीवन ज्ञान मिळते त्याला गुरू असे म्हंटले जाते.प्रत्यकला आयुष्यात बरेच गुरू भेटतात...परन्तु ज्याने जीवनाला सार्थक बनविले त्यालाच गुरू हा दर्जा द्यावा असं वाटतं.. 
जन्मतः मिळालेले मायबाप हे सुद्धा गुरुच असतात कारण आमचं पाहिलं पाऊल त्यांच्याकडूनच आणि पहिला शब्द त्यांच्याकडूनच शिकलेलो असतो..
त्यांनतर शाळेतील अक्षर ज्ञान देणारे, पोट भरण्यासाठी आवश्यक कौशल्य ज्ञान देणारे, विविध व्यवसाय, राजकारण, समाजकारण आणि जीवन कला शिकवणारे अनेक गुरू आयुष्यात मिळत असतात....  सचिनचे गुरू आचरेकर सर हे सुद्धा सचिनचे मनातील सर्वोच्च स्थान आहे.. काहींनी तर भावाला, बायकोला आणि मित्राला सुद्धा गुरू मानले हे विशेषच....
यामध्ये संत तुकाराम महाराज असे म्हणतात की ,
 सद्गुरू वाचूनी सापडेना सोय। धरावे ते पाय आधी आधी।।
सत्य गुरुराये कृपा मज केली।
परी नाही घडली सेवा काही।।
यावरून संत तुकाराम महाराज यांना स्वप्नात बाबाजी चैतन्य यांचा दृष्टांत होतो आणि स्वप्नातील या गुरूला ते कायमचे गुरू मानतात. 
संत ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तिनाथ यांना गुरू मानून ...ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो...आता उद्धरीलो गुरुकृपे असं म्हणतात... 
याचा अर्थ माणसाला पोटाच्या खळगी भरण्यापेक्षा जीवाचा उद्धार करण्यासाठी गुरुची गरज असते असच म्हणावे लागेल. आणि म्हणून जगाला मार्गदर्शन करणाऱ्या साक्षात विष्णूने सुद्धा प्रत्येक अवतारात गुरू केले आहेत असे पुराणात उल्लेख आहे. यामध्ये श्रीकृष्ण आणि सांदीपनी, राम-वशिष्ठ, परशुराम-शंकर यांचे संवाद तर आजही मार्गदर्शक आहे.
पूर्वकाळापासून गुरूला वेगवेगळ्या  विशेषणांनी संबोधण्याची प्रथा आहे..
यामध्ये.. जसजशी  ज्ञानसाखळी वाढते तसतसे गुरूचा अधिकार आणि पदभार व जबाबदारी वाढत असते.
यातून गुरुजी, आचार्य, गुरू, सद्गुरू अशी ही ज्ञानोत्तर साखळी वाढत जाते.
पुराणातील प्रसिध्द धौम्य ऋषी आणि त्यांचा शिष्य अरुनी या पासून ते आजच्या आपल्या जीवनात गुरुचे स्थान अनमोल आहेच....
ज्याला आपल्या शिष्याची प्रगती व्हावी वाटते आणि त्यासाठी त्यांची धडपड सुरू असते त्यांनाच खरे गुरू म्हणावे लागेल... नाहीतर अलीकडच्या काळात अनेक लोभी गुरू आणि लालची चेले वाढल्याने या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या काही गोष्टी नजरेस पडतात आणि आपण या देशातील आपल्या गुरू शिष्य परंपरेला विसरत चाललो आहोत असे वाटते.
खरोखरच दुर्लभ असे सद्गुरू जीवनात प्राप्त झाले ते या नश्वर जगात आनंदाने आणि समाधानाने जीवन जगल्यााचे समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ...असे स्वतः स्वामी विवेकानंद त्यांच्या रामकृष्ण परमहंस या गुरुंविषयी लिहतात...
शेवटी ज्याला असे सद्गुरू मिळाले त्याचा जन्म सुफळ झाला असेच म्हणावे लागेल...
आणि जर आयुष्यात गुरू नसेल मिळाला तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण यांचे विचार वाचून नक्कीच सदगुरू अनुग्रह मिळाल्याचा आनंद मिळेलच...

कृष्णम् वंदे जगतगुरुं...।

श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी (वाकदकर)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*गुरुची महती*

आपल्या शास्त्रात गुरुला साक्षात परब्रम्ह च मानल्या गेले आहे . संत कबीरनी तर गुरुला देवापेक्षा जास्त  श्रेष्ठ मानले आहे  
    *गुरु गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय*।
     *बलिहारी गुरू अपने गोविन्द दियो बताय*।।

      गुरू शब्दाची उत्पत्ति संस्कृत भाषेतून झाली आहे. 
गु म्हणजे अंधकार , अज्ञानारुपी अंधकार . आणि रु म्हणजे तेज प्रकाश  ज्ञानाचा प्रकाश. जो आमचा अज्ञान रुपी  अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश दाखवितो तो गुरु. 
संत कबीर गुरुचा महिमाचे  वर्णन करताना म्हणतात गुरू विना ज्ञान मिळत नाही . 
संत कबीर म्हणतात 
*गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष*।
*गुरू बिन लखै न सत्य को गुरू बिन मिटै न दोष*।
अशी आहे गुरु ची महती.
 *ह्या जगातील आद्य गुरू आहे महर्षी वेदव्यास*.
गुरू  तो आहे जो ज्ञान  देतो आपल्या  शास्त्रात  गुरूचे पाच प्रकाराचे  वर्णन केले आहे. 
१•शिक्षक शाळेत शिक्षण देणारा. शिक्षण देऊन  आजिविका चालवणारा.
२•आचार्य  जो स्वतःच्या आचरणाने शिष्यांवर संस्कार करतो, त्यांना शिकवतो.
३•कुलगुरू जो त्याकाळी  वर्णाश्रमानुसार आजिविके करीता ज्ञान देत होता.
४•दीक्षागुरू जो आपल्या गुरूच्या आदेशानुसार  आध्यात्मिक उन्नती साठी  मंत्र दिक्षा देत होता.
५•*परम गुरू*  परम ज्ञानी चैतन्य पुरुष जो खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवण्यात समर्थ असायचा
   आता प्रश्न हा पडतो की गुरे कोणाला मानावे.आपली प्रथम गुरू माता आहे , आपली आई आहे. ती एक असा महान गुरू आहे की ती आपले जीवन दिप्तीमान करू शकते.आमच्या जन्मा आधी सुद्धा आई आपल्या वर सुसंस्कार करू शकते. आधीच्या  काळी गर्भवती स्त्रीला चांगले पुस्तके वाचावे ,चांगल्या  वातावरणात रहावे, रामायण वाचावे ,गीता वाचण्याचा सल्ला  दिला जायचा. आता विज्ञानाच्या  साह्याने हे सिद्ध झाले आहे की ह्या सर्व  गोष्टी त तथ्य आहे. जोरा जोरात  बोलण्याने, भांडण तंट्या ने गर्भस्थ शिशु घाबरतो . आकुंचन पावतो ,तेच मधुर संगीताने आनंदित होतो हे सोनोग्राफी मध्ये दिसते .त्यामुळे आई आपल्या गरोदरपणातच आपल्या बाळाला सुसंस्कृत करु शकते. गर्भसंस्कारात  ओमकारचे खूप महत्व आहे. आईने कर्णमधुर संगीत ऐकावे किंबहुना म्यूझिक चालु ठेवावे बाळावर त्याचे चांगले परीणाम होतात. बाळाशी संवाद साधताना सुद्धा आई बाळाला छान  गोष्टी सांगु शकते. आई ही प्रथमच नाही तर परम गुरू असते,अगदी जन्मा आधी पासून. नंतरच्या आयुष्यात  सर्व  शिक्षक सुद्धा गुरुच आहे.
       पुढच्या आयुष्यात शिक्षक रुपी गुरू मिळतात ,आम्ही  शिकतो .पदवीधर होतो ह्या सर्व शिक्षणाच्या माध्यमातून आमचा उत्कर्ष होतो ,आम्ही नावारूपास येतो. पण जसे जसे वय वाढते तशी पैलतीराची ओढ लागते आणि मग आम्हाला हवा असतो एखादा असा सदगुरू जो आम्हाला  आत्मकल्याणाचा मार्ग दाखवेला .भाग्यशालीना असा गुरू भेटतो हीं. पण सर्वचजण असे भाग्यशाली नसतात.
    सध्याच्या परिस्थितीत गुरु म्हटले की भितीच वाटते , आजकाल सच्चा गुरु भेटणे दुर्मिळ च झाले आहे. भोंदू बाबांचे इतके पेव फुटले आहे कि गुरूच्या नावानेच धडकी भरते. हे असे आहे कारण आम्ही गुरूचा खरा अर्थच विसरलो आहोत. गुरू म्हणजे गुरू तत्व, ते ज्ञानरुपी चैतन्य. देहरुपी गुरू असला पाहिजे हे आवश्‍यक नाही आपला गुरू आपल्या आत च आहे त्याचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे. *ओशो म्हणतात तुझा गुरू तुझ्या आतच लपलेला आहे* . *भगवान बुद्धाने ही सांगितले आहे अत्त दीपो भव*. आतल्या गुरूची ओळख करून घ्याला फक्त आपल्याला बाह्य गुरू लागतो. त्याचा आहारी जाऊ नये. नंतरची वाट चाल आपला आत्मचैतन्याच्या, ज्ञानाचा प्रवास आपसुक होत जाईल. कुठेही अडलो तर ईश्वर कुठल्या न कुठल्या रुपात मार्गदर्शन करेल.
        अनेक लोकं दासबोध वाचतात, गुरूचरीत्र वाचतात, गजानन महाराजांची पोथी वाचतात. काही लोक नेमाने गीता पाठ करतात. आमच्या संताची ग्रंथसंपदा साक्षात ज्ञान संपदा आहे. त्याचे ते ज्ञानामृत ते चैतन्य,  अक्षर चैतन्य होऊन अवतरले आहे . ते साक्षात अक्षरब्रम्हच आहे.आजही कित्येक मंडळीना त्याच्या  प्रश्नाचे उत्तर ह्या ग्रंथातून  मिळत आहे.
   जसे श्री दत्तात्रय म्हणतात माझे चोवीस गुरू आहेत . तसेच आपणही ज्याच्या कडून जे शिकायला मिळेल ते आयुष्यभर  शिकत राहावे.
  आपल्याला आयुष्यात गुरूचे स्थान सर्व श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच आपण म्हणतो 
*गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः* । 
*गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः* ॥
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
" गुरू एक संस्कार केंद्र " (14 )

     पृथ्वी ही सर्व चराचराचे वस्तीस्थान होय . येथे समस्त प्राणीमात्रांना थारा असतो . येथील सर्वच जीव नांदत असतात . त्यापैकी सर्वांत बुद्धीमान प्राणी म्हणून मानव हा मानकरी ठरतो . तो या सृष्टीतील प्रत्येक गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करून काहीतरी बोध घेत असतो . हा बोध म्हणजेच अनुभव होय .... ज्ञान होय ... म्हणून ही सारी सृष्टीच एक प्रकारे गुरूच होय , असे म्हणणे वावगे ठरणार नाही ..... 

     मानवी जीवनात तीन गोष्टी खूपच मानाच्या मानल्या जातात . त्या म्हणजे 1. आई , 2 . वडील , 3 .गुरू . ह्यापैकी दोन व्यक्ती ह्या त्याच्या परिचित असतात . त्यांच्या सहवासात तो राहून नित्य ज्ञान घेत असतो . पण तिसरी व्यक्ती म्हणजे गुरू ही त्याला मात्र घराबाहेर पडावे लागते ... 

     ' गुरू ' या शब्दाचा शब्दशः अर्थ 'गु ' म्हणजे ' गुण ' व ' रू ' म्हणजे ' रूजवणे ' असा होतो . अर्थातच ' गुरू ' म्हणजे ' गुण रूजवणारा ' असा होतो . गुरू हा माणसातल्या चांगल्या गुणांना हेरून त्याला विकसित करून योग्य वाट मोकळी करून देतो .... मानवाचे अंतरंग बदलून त्यात यथोचित आकार देतो ....म्हणून माणसाला खरा माणूस फक्त गुरूच बनवितो ....

     " लागे गुरूविण शरण एका जनार्दन ! "

     " गुरू हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतो ! "

     मानवाचा प्रथम गुरू ही तिची आई असते . आपल्या अनुभवी गाठोड्याची शिदोरी ती आयुष्यभर लेकराला पुरवीत असते ... तसेच वडील हाही एक गुरू असून तो लेकराला बाह्य जगाची ओळख करून देतो . काय बरे - वाईट यांची जाण करून देऊन जगण्यास सक्षम बनवीतो . आई व वडील हे दोन्ही गुरू आपल्या मुलांचे अनुभवविश्व वृंद्धीगत करून त्याला सुसंस्कृत व सुसंस्कारीत करीत असतात . पण हे ज्ञान झाले जगण्यापूरते .... पण त्याला व्यावहारिक व उपजैविक ज्ञान मात्र गुरूकडूनच घ्यावे लागते ... तरच तो या जगात आपले अस्तित्व अबाधित ठेवून यथोचित मार्गाने जीवन व्यतीत करू शकतो ...

     आपल्या देशाची संस्कृती ही इतर देशाच्या मानानं खूपच अमूल्य आहे ... कारण आपल्या भारतात हे " गुरू महात्म्य " अनादी कालांपासून चालत आलेले आहे ... ते आजही अविरतपणे निरंतर चालूच आहे .... आणि पुढेही असेच चालू राहणार .... संत - महात्म्ये , थोर पुरूष आदींनी ही परंपरा नित्य चालू ठेवून सामाजिक प्रबोधन व सामाजिक हिताची  जोपासना केली आहे ... 

" गुरू हा गुरूच असतो 
मुक्ताईचा गुरू ज्ञानोबा
जनाईचा गुरू तुकोबा
नामाईचा गुरू विसोबा !! "

     गुरू आपल्या शिष्याशी पुत्रवत प्रेम करून त्याचा भावनाविष्कार घडवून आणतो . तो अनाथ - असहारांचा जनक होतो , पालनकर्ता होतो ... गुरू शिष्याची सुख - दुःख जाणवून त्याला सहानुभूती व धैर्याने वागवतो . त्याच्या डोळ्यांतील आसवे पुसून ओठी हास्य फुलवीतो ...तो जिज्ञासू बनवून स्वाभिमानी बनवीतो ...

     " गुरू महिमा असे असा
        अधुमना करी टणक 
        परिसाने होई कनक
         अनाथाचा राही जनक !!"

     गुरू हा अज्ञानास डंख मारून नवक्रांतीचा शंख फुंकून प्रगती मार्गे झेपावण्यास बळकट पंख बनवीतो ....
     
      " गुरू रूप असे असते 
        डोळा दर्शवी दिव्यदृष्टी
        शिष्या वर्षवी ज्ञानवृष्टी
        सामावे गुरूत ही सृष्टी  !! "

     असा असतो गुरूचा महिमा . ती कधी माऊली होऊन शिष्याच्या शिरी कृपासावली धरते . आणि फक्त नि फक्त सुमार्ग दिशेने शिष्याची पावले वळविते .... अशा थोर गुरूंचे महात्म्य व महिमा वर्णन करतांना आयुष्यही कमी पडून जाईल ....

अर्चना दिगांबर गरूड 
मु. पो. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र . 9552954415
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद





कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...