*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- छत्तीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 24 मे 2020 रविवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- पत्रलेखन*
( सासरी गेलेल्या मुलीचे आई बाबास पत्र )
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
सासुरवाशीण मुलीचे आईवडिलास पत्र
तीर्थरुप. आई बाबा,
शि.सा.नमस्कार ,
पत्रास कारण की माहेर दिशेनं वारं वाहतं आणि मी सैरभैर होतेय, तुमच्या सर्वांच्या आठवणी आणि जणू सांगावाच वारं घेऊन येतो वाटतय. सासर आणि माहेर या दोन घरांची दुवा म्हणून वावरताना मी आनंदी तर आहेच पण भाग्यवानही समजतेय स्वतःला. कारण आईवाडिलांची जागा इथं सासू सासरे पुरे करतात. माझ्या घरातील सर्वच माणसं आपापली नाती अगदी आपुलकीनं जपतात. मी पण त्यांच्या कसोटीला आणि घराण्याला साजेसं वर्तन ठेवलं आहे. शेवटी आपले संस्कार, ते मी कशी विसरणार...? मी आनंदात आहे. तरीही आठवणीचा कल्लोळ डोक्यात थैमान घालतोच ना.माहेरची माणसं , तिथल्या आठवणी ...... सारं सारं हैरान करुन सोडते जीवाला. आई, मी थोडं वेगळं आणि तुला विचित्र वाटेल पण बोलू का...? आई हे असं का गं असतं, मुलीनंच आई वडील माहेर सोडून नांदायला जायचं. अनोळख्या माणसांच्या सहवासात त्यांना आपलं करुन उर्वरित आयुष्य जगायचं. नवी नाती नवी माणसं नव्या जागी नव्यानं सांभाळत मुलीनं नवं रूप घ्यायचं. हे मी तुझ्याकडून शिकलेच आहे. पण आई ,आठवणी थोपवता नाहीत गं येत. माहेरचं गावपण सदैवं डोळ्यापुढं असतं माझ्या, चार खोल्याचं आपलं साधंच घर. पण प्रेमानं ओतप्रोत असणारं. तू सकाळी सकाळी शेणसडा टाकून रांगोळीनं सजवलेले आंगण.दारातील तुळशीचा चौथारा... घराच्या बाजूला असणारं मोठं चिंचेचे झाड,त्यावरील पक्षांचा किलबीलाट,सारं डोळ्यामोरं
आणि कानामधे साठवलं आहे. तेच ते आठवून उमाळा येतो गं आई. आकाशातील थव्याला पाहिलं की शब्दांची गुंफण होते आणि आपसुख ओठावर ते शब्द नाचू लागतात.....
दारात रांगोळी रेखिते मी
किलबील पाखरांची ऐकिते मी
कामात गुंतले असू दे घाई
आठवण तुझी येते गं आई.....
ताटातुट लेकराची कशी गं होते
माहेर सोडून लेक सासरी जाते...
नव्या माणसात नव्या या घरात
दचकतो जीव अन भय दाटते उरात...
दूर आकाशी बघते पाखरांचे थवे
वाटते भेटीस यावे तयांच्या सवे...
दारात रेंगाळतो लाडीक वारा
भास तुझाच होई,जीव माझा बावरा...
आठवाचा पूर ओसंडे डोळयातूनी
डोळे माझे पदराने देना गं पुसूनी...
गालावरुनी हात फिरुदे गं तुझा
बेचैन जीव भेटीसाठी यडापिसा...
वादळाशी लढणारे बाबा आहेत कसे
घामाघुम चेहरा त्यांचा डोळयात बसे....
माझे तुझे करत भांडणार कोण नाही
नकोस करु चिंता दादा खुशाल आहे ताई...
आज बहिणाबाईंची आठवण झाली, लेकीला माहेर मिळावं म्हणून आई सासरी नांदते हा त्यांचा विचार तू आचारलास आणि त्याचा वारसा मी स्विकारला. कांही परंपरा पाळाव्या लागतात समाजभान ठेवून आणि सामाजिक स्वास्थआणि स्थैर्य राखण्याकरिता
परंपराची राखण करावीच लागते. मी आपल्या संस्कारात वाढले मोठी झाले, आपल्या लौकिकाच्या मोठेपणात माझं बालपण गेलं आहे. आणि सुदैवानं मला सासरची माणसं मोठया मनाची आणि समजून घेणारी मिळाली. मी जाणीवपूर्वक आणि मुद्दामच सुदैव हा शब्दप्रयोग करते आहे आई. कारण आजकाल वेळ नसणाऱ्या कुटुंबात संस्काराची जडणघडण होणं तसं आवघडच आहे. त्यासाठी कोणी गंभीरपण असत नाही. अशा विचित्र काळात येवढी चांगली माणसं मिळणं नशिब नव्हे काय.. ?
माझ्या येवढया वाक्यावरून तूला कळलेच असेल मी सुखात आहे ते. असो, फक्त आठवणी येतात मला छळतात हे मात्र नक्की.मी तुला बोलते, बाबांना आठवते आणि दादाला जपते. अर्थात तुम्ही माझ्या ऱ्हदयात आहात.. माझी चिंता न करता स्वतःची काळजी घ्या.. थांबते.
कळावे
तुमची लाडकी लेक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*📕पत्रलेखन*📕
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*विषय: सासुरवाशीण मुलीचे आईवडिलास पत्र*
******************************
सौ.लक्ष्मी
अहमदनगर
दि.24.5.2020
ति, आई बाबा,
साष्टांग दंडवत
वि.वि.पत्र लिहीण्यास कारण की, मी अगदी आनंदात आहे.चार दिवस झाले माझ्या लग्नाला पण मला असे वाटतेय की ,किती दिवसापासुन मी तुमच्यापासुन दुर आहे .म्हणुन आज वेळ मिळताच पत्र लिहायला बसले.
आई,खरच तु मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेस. आणी माझे कन्यादान करतांना मी तुझा थरथरणारा हात पाहिलाय. तु मला लहानपणापासुन कोणतीच उणीव भासु दिली नाहीस.माझे हट्ट पुरवतांना तु कधी स्वत:ची काळजी घेतली नाहीस.मला सक्षम बनवण्यासाठी तु सतत काळजी घेत होतीस.मी खुप शिकावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे, म्हणुन सतत दक्ष असणारी माझी आदर्श आई माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही.असो.......
आई माझी काहीही काळजी करु नको .माझे सासर खुप चांगले आहे.सगळे खुप प्रेमळ आहेत.सासुसासरे मला आईवडिलांसारखेच वाटतात.दीर तर खुप समजदार आहेत.वहिनी वहीनी म्हणुन सतत छोटी नणंदबाई मागेमागे असतात.यांचा स्वभाव तर खुपच छान आहे.खरच आई पुर्वजन्मीची पुण्याई म्हणुन असे सासर मला मिळाले.
सासर म्हणजे त्रास देणारे कुटुंब असते असे मैत्रिनीकडुन ऐकले होते. पण आई ,मैत्रिनी चुकीच्या निघाल्या बघ. आई तु दिलेले संस्कार माझ्यासाठी खुप बहुमोल आहेत.तु नेहमी म्हणायचीस,लग्न म्हणजे बाईच्या जातीचा पुनर्जन्म असतो.पण आई,माझे माहेरी जे नाते होते तेच नाते मला सासरी मिळालेत फक्त पात्र बदललेत.त्यामुळे मी खुप आनंदात आहे.तु दिलेल्या संस्काराच्या शिदोरीतुन मी माझ्या सासरच्या घरात सुख समाधान निर्माण करनार.
तु तुझी व बाबांची काळजी घेत जा.वेळेवर जेवन ,औषध घेत जा.उगीचच सगळ्यांची काळजी करत जावू नकोस.तु आयुष्यभर खुप कष्ट केलेले आहेस आम्हाला वाढवतांना व प्रपंच्याचा ताळमेळ बसवतांना तुझी फार ओढातान झालेलीआहे.लवकरच दादाचे लग्न होईल व तुझ्या सुनेच्या रुपात मीच परत घरी आल्याचा अभास तुला होईल.
बरं आई आता पुरे करते आता हे येतील.आम्ही आज बाहेर फिरायला जायचा बेत केलेला आहे. बाबांची व तुझी दोघांचीही तु काळजी घे.
तुझीच लाडकी
सौ.लक्ष्मी
सौ.खेडकर सुभद्रा बीड
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
(39)
सौ.भारती दिनेश तिडके
गोंदिया.
* सासरी गेलेल्या मुलीचे आई बाबास सासर-माहेर यातील फरक सांगणारे पत्र.*
ति. आई बाबास
भारतीचा साष्टांग नमस्कार.
पत्र लिहिण्याचे कारण की माझ्या मनातील भावना व सासर-माहेर यातील फरक तुम्हास सांगण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. आई बाबा तुमची मला खुप आठवण येते. माहेरी मी स्वच्छंद होते. कधीही मला एकटे वाटत नव्हते. परंतु आता लग्न झाल्यावर मी सासरी आली तेव्हा येथे सगळे नवीन, लोक नवीन, घर नवीन सर्व काही नवीनच. माझी सकाळ साडेपाच वाजता पासून सुरू होते. त्यात सकाळी झाडलोट करणे, अंगणात सडा टाकणे, रांगोळी टाकणे, नाश्ता ,जेवण, कपडे भांडी इत्यादी करणे यातच पूर्ण दिवस जातो. त्यात सर्वांना गरमागरम पोळ्या जेवायला हव्यात. मी मात्र रोज थंड जेवण करते. सासरी सासू आजारी पडली तर तिची काळजी घेणे, सेवा करणे इत्यादी कामे करावी लागतात. पण जेव्हा मला बरे नसते तेव्हा कुणीही माझ्याजवळ नसते. मी मात्र एकटीच पडते. मग स्वतःची काळजी स्वतः घेते. घरातील सर्वांच्या गरजा पूर्ण करताना त्यात नवऱ्याची मर्जी सांभाळताना व कामे करताना केव्हा रात्र होते समजतच नाही. मनमोकळेपणाने कुणाशी बोलता येत नाही. सासरी आल्यावर ननंद, सासू-सासरे, दिर यांची सर्वांची ऐकावे लागते. तेव्हा मला माहेरची खुप आठवण येते. माहेर व सासर यात जमीन आस्मानचा फरक आहे. मी देवाजवळ रोज प्रार्थना करते की देवा दोन्ही घरांना जोडून ठेव. मुलगी म्हणजे परक्याचे धन असते असे आई-बाबा तुम्ही मला नेहमी म्हणत होते. खरोखरच सासर-माहेर यात इतका फरक आहे कि काय सांगू. माहेरची महत्व सासरी आल्यानंतरच कळते.
"माहेर हि सुखाची सावली
सासर हे कामाने कावली".
माहेर पैशाने विकत घेता येत नाही. माहेरी कोणी माझ्या कडून अपेक्षाही करीत नव्हते. तेथे मला कधीही एकटेपणाची जाणीव झाली नाही. निखळ हसणे खिदळणे असे माझे माहेर जीवन होते. माहेरची स्थान या पुरुषांना कधीच कळणार नाही. आई-बाबा तुम्ही माझ्यासाठी इतकी मेहनत केली आहे की की ती शब्दात व्यक्त करता येत नाही. दिवसभर कष्ट करून खडतर जीवनात मला लहान रोपट्याचे मोठे वृक्ष बनवले. आई तू तर माझी पुण्याई आहे. बाबा तुम्ही आयुष्य कमावलेली पुंजी आहे. आई-बाबा तुम्हीच मला आयुष्य जगण्यासाठी पाठबळ दिले. तुम्ही अनुभवाचे भांडार आहात.
"नारी नर की खान, नारी से उपजौ भगवान श्रीराम.
वाटले होते की नवीन घरात सुन म्हणुन आली तर सर्वजण सामावून घेतील. वेणी गुंफतांना एक एक फुल विणावे तसे सर्वांची सासरी नातीगोती संभाळली. परंतु सासर सासरच असते. व माहेर माहेरची असते. नवऱ्याचा सहवास प्रेमाचा आहे परंतु तेही दिवसभर थकून आल्यावर चिडचिड करायला लागले आहेत. नंदीची हौस पुरी करता करता पुरेवाट होते. माझे लहानपण ,रुसवे-फुगवे स्वच्छंदी जीवन इत्यादी सर्व मला माहेरची आठवण करून देतात. माहेरी माझ्यावर कोणत्याही जबाबदार्या नव्हत्या. कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. सासरी आल्यावर डोक्यावर इतक्या जबाबदारी आल्या की स्वतःची ओळख मी विसरून गेले. आई तुझी मला पदोपदी आठवण येते. आई-बाबा तुम्ही निखळ प्रेमाचा झरा आहात. आई तू नेहमी म्हणायची की सासरी गेल्यावर सासूबाईंना आई समजायचे. परंतु माझ्या सासुबाई तर खूपच जुन्या विचारांचे आहेत. त्यांचा आणि माझा मेळ कुठेही बसत नाही. त्यांच्या भाज्या करण्याची पद्धत, त्यांच्या आवडीनिवडी, पदार्थ बनवण्याची पद्धती अगदी निराळ्या आहेत. आपलं नागपूर येथे गोंदिया माझे सासर, इथे बोलणे चालणे खाणेपिणे यात खूप फरक आहे. असो घरची माहेरची मंडळी कशी आहे? गौरी कशी आहे ती आता एक वर्षाची झाली असेल? मी मी लावलेले रातराणी चे झाड मोठे झाले काय? असो माझे रडगाणं सांगत असेल तर पत्र देखील अपुरे पडेल.
"रोज मरे त्याच्यासाठी कोण रडे". तुम्ही मात्र माझी काळजी करू नका. आता हळुहळू माझा पाया भक्कम होत चाललेला आहे. आणि ही सर्व तुमचे संस्कारांची देण आहे. तुम्ही दोघे जण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आईबाबा तुम्हीच माझे दैवत आहात. वहिनी ,दादा कसे आहेत? गौरीला माझा गोड गोड पापा.
तुमचीच लाडकी लेक
भारती.
सौ. भारती दिनेश तिडके
गोंदिया.
8007664039
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
✍️पत्रलेखन✍️
*श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)*
----------------------------------------
सासुरवाशीण मुलीने पत्राद्वारे व्यक्त केलेल्या भावना..
----------------------------------------
तिर्थरूप आई-बाबा
सस्नेह साष्टांग नमस्कार!!!
पत्र पाठविण्याचे प्रयोजन हेच आहे की,लग्न होऊन सासरी आल्यानंतर इकडच्या खुशाली कळविण्यासाठी पत्र लिहायला घेतले.आई,तुझ्या छत्रछायेत लहानाचे मोठे झाले.छान-छान छोट्या गोष्टीतून उत्तमोत्तम संस्कार मला दिलेत.'मुलगी शिकली,प्रगती झाली'असे म्हणतात ते निश्चित आहे त्याचप्रमाणे तुम्ही दिलेले प्रत्येक संस्कार माझ्या नसानसात भिनलेले आहेत.मी एक सुसंस्कारी मुलगी घडावी यासाठी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि मी शिक्षण ही पूर्ण केले.शिकत असतांना एक वाक्य मला आठवते ते म्हणजे महात्मा फुले म्हणत असत की,"जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाची उद्धारी" हे अगदी खरं आहे.समाजाच्या विकासासाठी समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून जीवन व्यतीत करणारे थोर समाजसुधारक यांचे आजच्या समाजात खूप योगदान आहे.अग!! आई, तुला वाटत असेल की,सासरी गेल्यावर मुलीला खूप त्रास वगैरे असेल पण तसं वगैरे काहीच नाही.मी खूप आनंदी आहे याचीच खुशाली कळावी यासाठी माझ्या लेखणीबद्ध भावना तुझ्यापर्यंत पोचवत आहो.
'मुलगा-मुलगी एक समान,दोघांनाही शिकवू छान' याप्रमाणे माझ्या भावात आणि माझ्यात कोणताही भेद न करता बाळकडू दिले तसेच बाळकडू सासरी देखील त्याचे अनुकरण करतो आहे.माझे सासरे आणि सासू अगदी मनमोकळे पणाने बोलून आणि बोलण्यातून प्रेम दिसून येते.अगदी सासू-सासरे बोलतांना सुध्दा आई तुझी आणि बाबांचीच आठवण येते.मी सासरी नांदायला आली असं मुळीच वाटत नाही.सासर आणि माहेर छानच वाटते.नणंद व दीर यांच्याशी नेहमीच शाब्दीक वाद निर्माण करतोय केवळ हास्यासाठी... जसं अंकित सोबत भांडण करत होतो ना!!! अगदी तसंच.. आणि तुम्ही माझ्यासाठी बघितलेला पतीदेव तर खरोखरच देवच आहे.सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत ही वस्तू कोठे??ती वस्तू कोठे??घरातील वातावरण अगदी मन मोकळं आणि प्रसन्न वाटते.मी तर सासरी आल्यावर देखील कोणताही भेदभाव न करता माहेरी ज्याप्रमाणे वर्तन होतं अगदी तसाच वर्तन नि सोज्वळ स्वभावाने नवीन घरी नांदत आहेत त्यामुळे घरातील सर्व व्यक्ती मला देखील आपलेच वाटते आहे म्हणून मुलगी कशी आहे,काय करत असेल असे नाना चिंता तुला सतावत असेल नाही का???काहीही काळजी करू नको..स्वतःची काळजी घे.
मी सासरी खूप मजेत आहे आणि हो..या दिवाळीला मी नक्की येणार आहे बरं का..अंकीतशी भांडायला...मी खूप आनंदात आहे.तुम्ही देखील सर्व आनंदात राहा आणि हे पत्र मिळताच माझ्या पत्राला उत्तर द्यायला विसरू नको हं आई..
आय लव्ह यू आई-बाबा
तुमचीच लाडली लेक
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*📚पत्रलेखन📚*
*विषयः सासुरवाशीन मुलीचे आईवडीलास पञ.*
(दि. 24- 05-2020)
*श्री*
तीर्थस्वरूप आई-बाबास चरणी
श्रीसाष्टांग नमस्कार.वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की आईबाबा मी बरेच दिवसा नंतर आपणास पत्र लिहीत आहे. क्षमा असावी. आईबाबा मला तुमची फार आठवण येते ग. तुम्ही खुशाल आहात ना! इकडे माझ्या सासरची सर्व मंडळी व मी कुशलपूर्वक आहे. ईश्वर कृपेने आई-बाबा तुम्ही पण कुशलपूर्वक असालच. आई बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत जा. वेळेवर जेवण करीत रहा. मी इकडे खूप आनंदात आहे. माझी काळजी करत जाऊ नका. माझ्या घरची मंडळी अतिशय चांगली आहे. माझे सासू-सासरे, व तुमचे जावई हे सर्व जण मला खूप लाडात ठेवतात. मी सासरी आहे की माहेरी आहे हा भास सुद्धा मला होऊ देत नाहीत. अगदी लाडाने मला वागवतात. आई तू बाबा ची काळजी घेत जा, त्यांना वेळेवर औषधी देत जा. बाबा तुम्ही आईची काळजी घेत जा. तुम्हाला माझी आठवण आली तर मनाला दुःख करून घेत जाऊ नका. मलाही तुमची फार आठवण येते. परंतु काय करावं मुलीचे लग्न झाल्यावर आपल्या घरी सासरी नांदायला प्रत्येक मुलगी जाते. तिचा जन्म ज्या घरात झाला , ती लहानाची मोठी जिथे झाली तिथेे तिचे सर्व लाड आई-वडिलांनी पुरवले तिला लहानाची मोठी करून शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करून शेवटी तिला ते घर सोडून लग्न करून सासरी जावं लागतं. बरं असो. आई बाबा ही तर जगाची रीतच झाली.
मी इकडे खुप आनंदात जरी असली तरी मला तुमच्या सर्वांची खुप आठवण येते. तुमच्या आठवणीचा कल्लोळ माझ्या हृदयात सारखा होत असतो. आपल्या चाळीतील मित्र-मैत्रिणींसोबत खेळणे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे . त्यानंतर आई तू मला गरम गरम जेवायला देणे. माझे आवडते पदार्थ तू किती आनंदाने करत होती.बाबा माझ्यासाठी किती खाऊ आणीत होते. हे सर्व आठवले की मी बालविश्वात हरवून जाते ग आई!
असो
आई बाबा तुम्ही प्रेमाचा सागर आहात. आपल्या लाडक्या लेकीच्या मायेचा पाझर आहात. तुमच्या आठवणी हृदयात मी जपणार, घायाळ त्या मनावर पत्र लिहून फुंकर मी मारणार.
*आईबाबा*
*"राहून मी तुमच्या दूर सुद्धा*,
*सदैव तुमच्यासोबत आहे,*
*सासरमाहेर माझे एकच*
*समजून मी खूप सुखी व आनंदात आहे."*
कळावे तुमचीच लाडकी
सोनु
प्रमिलाताई सेनकुडे.
ता. हदगाव जि.नांदेड.
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
#भाग्य
नव्यानेच सासरी गेलेल्या मुलीचे आईस पत्र
प्रिय आई,
साष्टांग दंडवत.
विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की, आज मला तुझी फारच आठवण येत होती. का ? कोण जाणे ? तुझ्याशी जरा बोलावे वाटलं म्हणून घरातील सारे कामे संपवून माझ्या खोलीत येऊन तुला मनातलं पत्र लिहीत आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असते ? हे सासरी आल्यानंतर कळाले. माझ्यावर तुझं रागावणं किंवा बोलणं त्याचे मला तेवढं काही वाटायचं नाही. पण आज पदोपदी तुझ्या त्या बोलण्याचा अर्थ कळायला लागलंय. सकाळी लवकर उठलं नाही तर तू माझ्यावर रागावत होतीस, सासरी गेल्यावर कशी करतेस ? असं तुला कोणी उशिरा पर्यंत झोपू देईल का ? नाही गं आई, आज मी गेल्या सहा महिन्यांपासून सकाळी साडेपाचलाच उठते आहे. सकाळची सारी कामे मला एकटीलाच करावी लागतात. मला कामाचा कंटाळा नाही आहे गं, पण हे लोकं एवढे कसे आळशी आहेत ? याचाच मला प्रश्न पडतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी देखील मलाच आवाज देतात. मीच ते करावं लागतं. आई, तू एकदा म्हटली होतीस बघ, सासरी आराम करायचं असेल तर माहेरी खूप काम करावं. हे तू कोणत्या उद्देशाने म्हटली होतीस मला माहित नाही पण मी तुला कोणत्याच कामात मदत केली नाही म्हणून सासरी मला एवढा त्रास सोसावा लागत आहे वाटतं. साखरेची चव गुळाला येत नाही त्याप्रमाणे सासू किती ही आई समान असेल तरी आई नसतेच मुळी. आईच्या कुशीत झोपणे असेल किंवा तिच्याशी मनमोकळे बोलणे असेल आपल्या सासूशी करता येत नाही. कित्येक जण म्हणतात की, माझी सासू आई सारखी आहे. त्यांचे बोलणे वरवरचे वाटते. आईची जागा अन्य कोणीच घेऊ शकत नाही. आई, आज किती तरी दिवस झाले माझा आवडती मालिका तारक मेहता का उलटा चष्मा पाहिला नाही. एके दिवशी सहजच ती मालिका पाहत होते आणि जोरजोरात हसत होते. तर सासू आणि सासरे माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. थोड्या वेळासाठी मी विसरले होते की, मी माहेरी आहे सासरी. लगेच टीव्ही बंद केला आणि माझ्या खोलीत येऊन पडलो. त्यादिवसापासून मी ती मालिका पाहिलेच नाही. माझ्या अश्या अनेक गोष्टीवर बंधने आल्यामुळे मी स्वातंत्र्यातुन पारतंत्र्यात गेल्यासारखे भासत आहे. आई, सर्व काही चांगले आहे. जेवायला काही कमी नाही पण भूक लागतच नाही. पैसा भरपूर आहे मात्र काही खरेदी करावेसे वाटत नाही. घरात माणसांची संख्या खूप आहे पण माझ्या मनाला समजून घेणारे कोणी नाही. डोळ्याला दिसायला सुख, समृद्धी, पैसा, अडका भरपूर आहे मात्र माझे मन अजून आनंदी झालं नाही. तुझी प्रत्येक शिकवण लक्षात ठेवून मी वागत असते मात्र ह्यांना त्याचे काही देणेघेणे नसते याच अविर्भावात वागत असतात. मला घराच्या बाहेर जाता येत नाही की मनासारखे काही करता येत नाही. मी पूर्णपणे कळसूत्री बाहुली बनली आहे. हे ही दिवस जातील आणि भविष्यात चांगले दिवस येतील, माझे भाग्य नक्की उजळेल याची मला खात्री आहे, या एका आशेवर जगत आहे. बाबा कसे आहेत ? तब्येतीला जपायला सांग आणि हो यातलं काहीपण बाबांना कळू देऊ नको. उगीच ते काळजी करतात. बाकी सर्व खुशाल आहे. दिवाळीला घेऊन जायला नक्की या, एक पंधरा-वीस दिवस राहणार आहे यावेळी. घरी आल्यावर भरपूर बोलायचं आहे तुझ्याशी. पत्र थांबविते. पत्राचे उत्तर पाठव, मी वाट पाहत आहे.
तुझीच लाडकी
नयना
- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
07 पत्र
सासरी गेलेल्या मुलीचे आई बाबास पत्र
माणिक,
कुरुंदवाड,
जिल्हा.कोल्हापूर
तीर्थरूप आई बाबास,
माणिक चा साष्टांग नमस्कार,
विनंती विशेष.
पत्रास कारण की, आजच्या मोबाईलच्या, संगणकाच्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात पत्र लिहिणे ही संकल्पना फारच मागे पडली आहे. जवळ जवळ नष्टच झालेली आहे. मला अजूनही आठवते आमच्या लहानपणी जेव्हा पोस्टमन काका एखादे पत्र घेऊन यायचे त्या वेळेला ते वाचण्यासाठी आम्हा भावंडांच्या स्पर्धा लागायची.ती आठवण ताजी झाली म्हणून मी हे पत्र आपल्याला लिहायला घेत आहे.
लिहायला सुरुवात करताना मनामध्ये खूप विचार जे खूप दिवस साठून राहिलेले होते, ते शब्दात कसे व्यक्त करायचे? लवकर कळेना. तुमच्या बद्दलच्या भावना माझ्या मनामध्ये ओथंबून आलेल्या होत्या त्यामुळे नेमक्या कोणत्या शब्दाने सुरुवात करावी हे कळत नाही
तुम्ही सगळेजण खुशाल ,आनंदी, समाधानी, आरोग्यपूर्ण असाल याची मला खात्री आहे. आई बाबा तुम्ही दोघेही या सध्याच्या काळामध्ये स्वतःला फार जपून राहायला हवे. कारण कोरोना या महामारी मुळे संपूर्ण जग हवालदिल झालेले आहे. अशा या कालावधीमध्ये तुम्ही दोघे कुठेही बाहेर जायचे नाही. स्वतःला जपायचे आहे. तुम्हाला दोघांनाही बरं नसतं हे मला चांगलं माहिती आहे. व तुम्ही जपून राहता हे ही माहिती आहे. तरीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दोघेही हार्ट पेशंट आहात. बाबा तुम्ही दररोज थोडावेळ का होईना बाहेर फिरून येता, पण आईला हे होत नाही. कारण तिला लगेच धाप भरते, दम लागतो. तरीही आई तू तुला जमेल त्या पद्धतीने हालचाल करत जा. जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा पुस्तके वाच, विविध कागदी फुले करण्यामध्ये आपला वेळ घालव. वेळही जाईल व एक नवीन वस्तू तयार केलेला आनंद पण मिळेल.
परवा तू माझा एक मोठं काम हलकं केलंस. वर्तमानपत्रांमध्ये आलेले माझे लेख, कविता, बातम्या इत्यादी आलेले पेपर मी माझ्या जवळ गेले चार वर्षे जपून ठेवले होते. ते कटिंग करून वेगळ्या कागदावर चिटकवायचे माझ्याकडून होत नव्हते. पण महिन्याभरात तू ते सगळं व्यवस्थित वेगवेगळ करून चिटकवून तयार करून दिलंस. मला खूप बरे वाटले. कारण ते मला खूप मोठे काम वाटत होते. तू ते काम हलके केले केलेस. मला खूप आनंद झाला की माझे सगळे आज पर्यंतचे कामकाज मी एकत्र करू शकले, ते फक्त तुझ्यामुळे. तसेच आई जेंव्हा जेंव्हा मला कोणत्याही गोष्टींमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते तेंव्हा कोणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज असते तेंव्हा तेंव्हा मला तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो व मी माझ्यावर आलेले संकट तुझ्यासमोर बोलून दाखवते आणि तू क्षणार्धात ते संकट मला योग्य सल्ला देऊन घालवतेस. मला तुझा खूप मोठा आधार आहे.तो असाच अखंड राहू दे.
बाबा तुम्हीही माझ्या शिक्षणाकडे पहिल्यापासूनच लक्ष दिला होतात, त्यामुळेच आज आम्ही शैक्षणिक क्षेत्रात एवढी प्रगती करू शकलो. त्याचबरोबर समाज कार्याची सुद्धा आवड मला तुमच्यामुळेच लागली. तुम्ही कविता करायचा, लेख लिहायचा ते पाहून पाहून मला ही कविता करण्याची,लेख लिहिण्याची ,भाषण करण्याची, निबंध लिहिण्याची आवड निर्माण झाली. आज माझे साहित्य क्षेत्रामध्ये जे नाव झालेले आहे ते तुमच्यामुळे. याचे सगळे श्रेय मी तुम्हाला देते.
घरातील सर्वजण व्यवस्थित आहेत ना? संकल्प ,भक्ती चा अभ्यास कसा चालू आहे? दादा वहिनींचे काय चालू आहे? तिकडे सर्व व्यवस्थित असणार. कारण तुम्ही तिथे आहात ना? सगळे व्यवस्थित असणार याची मला खात्री आहे. इकडे मी व प्रियांका अतिशय आनंदात आहोत. आमची काळजी नसावी.
नाही म्हणता म्हणता मनातील भावना कशा मोकळ्या झाल्या पहा!! छान, मन खूपच हलके झाले. बरं झालं मी पत्र लिहायला घेतलं. प्रत्यक्ष न बोलता येणाऱ्या काही गोष्टी पत्राद्वारे मी आता निसंकोचपणे बोलू शकले. आता मी पत्र लिहायचे थांबवते. तुमचा आशीर्वाद नेहमीच माझ्या कार्याला प्रोत्साहन देत राहील.
कळावे, असाच लोभ असावा.
तुमचीच लाडकी लेक
माणिक
पत्र
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*📕पत्रलेखन*📕
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*सासुरवाशीण मुलीचे- आईवडिलास पत्र*
******************************
सौ.यशोधरा सोनेवाने
गोंदिया
दि.24.5.2020
तिर्थरूप आई बाबांना
शिरसाष्टांग दंडवत.वि.वि.
पत्र लिहिण्यास कारण की, मी अगदी आनंदात आहे. सात दिवस झाले माझ्या लग्नाला, पण मला असे वाटतेय की ,किती दिवसापासून मी तुमच्यापासून दुर आहे .म्हणून आज वेळ मिळताच पत्र लिहायला बसले.
आई, माझ्या आयुष्याची सुरूवात "आई"या दोन शब्दापासून झाली .या दोन शब्दांचा अर्थ समजत नव्हता मला,आणि आता अर्थ काढायला शब्द कमी पडतात .जे शब्द तू मला शिकविले .त्याच शब्दांनी मी बोलायला लागले .तुझ्याच डोळ्यातून मी ह्या जगाकडे पाहिले. त्याच प्रेमळ नजरेतून आजही तसंच पाहण्याचा प्रयत्न करते आहे. मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेस. आणि माझे कन्यादान करतांना मी तुझा थरथरणारा हात पाहिलाय. तु मला लहानपणापासून कोणतीच उणीव भासु दिली नाहीस.माझे लाड पुरवतांना तु कधी स्वत:ची काळजी घेतली नाहीस.मला सक्षम ,सृदृढ बनविण्यासाठी तु सतत काळजी घेत होतीस.मी खुप शिकावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे, म्हणुन सतत दक्ष असणारी माझी आदर्श आई माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही. आई आज सासरी आहे पण मनाने मी तुझ्यातच गुंतले आहे.
बाबा मी सासरी येतांनी माझा हात आपण किती प्रेमाणे ह्यांच्या हातात देत म्हणाले ,"आता तुम्हीच सांभाळा"ती नजर ,आसनांच्या धारानी ओलाचिंब झालेला आपला सदरा ....मी कधीच विसरणार नाही.
मी इथे आनंदी आहे ,पण आपल्या आठवणीनी माझा उर भरून येत आहे.आपण लहानपणापासून माझे विश्व निर्माण करून स्वाभिमानाने जगण्यासाठी आमच्यात उभारी निर्माण केलेली आहे. मी शिकून काहीतरी समाजासाठी कार्य करावे असे आपण आपल्या *टीपणवहीत*नोंद करून ठेवलेले मी नकळत वाचले होते.माझ्साठी आपली धडपड पाहून मी आपले स्वप्न नक्कीच पूर्ण करणार.आपल्या विचारांचा व संस्काराचा ठेवा मी हृदयी साभाळून आहे. "वडील" हा शब्द अधिकाधिक कठोरपणा दर्शवितात पण आपल्या सारखा आणि दयाळू कोणी नाही आपण आम्हा सर्व भांवडासाठी नारळासारखे आतून मऊ आहात .आपल्या या आठवणीत,जगण्याच्या धडपडीत घर सुटत ,पण सासरी असूनही आठवणी कधी सुटत नाही. माझ्या जीवनभर "वडील" नावाचे पान काही झालंतरी मिटणार नाही.
सासरी जातांना मुलींच्या डोळ्यांत अश्रूंचापाट वाहतो.
तेव्हा तरी कुठे बापाचा कणा ताठ असतो.
माझ्याजवळ अनमोल गोष्ट काय तर,माझे आई-बाबा आहेत.
आई माझी काहीही काळजी करु नको .माझे सासर खुप चांगले आहे. सगळे खुप प्रेमळ आहेत.सासुसासरे मला आईवडिलांसारखेच वाटतात. सर्वच खुप समजदार आहेत.वहिनी म्हणुन सतत छोटी नणंदबाई मागेमागे असतात.यांचा स्वभाव तर खुपच छान आहे.खरच आई पुर्वजन्मीची पुण्याई म्हणुन असे सासर मला मिळाले.
सासर म्हणजे त्रास देणारे कुटुंब असते असे अनेकाकडून ऐकले होते. पण आई ,मैत्रिनी व इतराचे विचार चुकीचे निघाले. आई ,बाबा तुम्ही दिलेले संस्कार माझ्यासाठी खुप अनमोल ठेवा आहेत.तु नेहमी म्हणायचीस,लग्न म्हणजे बाईच्या जातीचा पुनर्जन्म असतो.पण आई,माझे माहेरी जे नाते होते तेच नाते मला सासरी मिळालेत .फक्त नाटकात जसे पात्र बदलतात,त्त्याप्रमाणे माहेर-सासर चे पात्र बदलले आहेत.यामुळे मी खुप आनंदात आहे.तु दिलेल्या संस्काराच्या शिदोरीतून मी माझ्या सासरच्या घरात संस्काराची वेल फुलविणार. सुख समाधान निर्माण करणार
आई आपली व बाबांची काळजी घेत जा.वेळेवर जेवण ,औषध घेत जा.उगीचच सगळ्यांची काळजी करू नको.तू आयुष्यभर खुप राबून कष्ट केलेले आहेस. आम्हाला वाढवतांना,सृदृढ नागरिक घडवितांना ,प्रपंच सांभाळतांना, ताळमेळ बसवतांना तुझी फार तारांबर उडत होती .आजही अशीच स्थिती आहे .म्हणून माझी काळजी करू नका.. लवकरच लहान्याचं लग्न होईल व तुझ्या सुनेच्या रुपात तुझी *सुनीच* परत घरी आल्याचा आभास तुला होईल.
बरं आई आता पुरे करते आता हे येतील.आम्ही आज कचारगड पाहडीवर जाणार आहोत.ही पाहडी आशिया खंडातील सर्वात मोठी पाहडी आहे म्हणतात .
. बर आता लिहणं थांबविते. बाबांची व तुझी दोघांचीही तु काळजी घे. संतोष व अनिला शुभआशिष व प्रेम
तुमच्या पत्राच्या उत्तराच्या प्रतिक्षेत
आपल्या दोघांची लाडकी
सुनी
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
📚 *पत्रलेखन* 📚
*विषय: आई-वडिलांना पत्र*
*श्री*
दि. २५-०५-२०२०
तिर्थस्वरुप आई-बाबा, काका-काकुस,
सा. न. वि.वि.
अचानक तुम्हाला हे पत्र पाहून आश्चर्य वाटले असेल ना. पण खरं सांगू का? पत्राच्या माध्यमातून जे व्यक्त होता येतं ते व्हाट्सअप च्या जमान्यात इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्त होता येत नाही. आणि म्हणूनच आज ठरवलं तुम्हाला पत्रचं लिहायचं. पत्राच्या माध्यमातून मनातलं काही सांगता येतं तसं वाॅटस् अॅपवर नाही जमतं.
कधी कधी मला तुम्हा सर्वांची अगदी तीव्र आठवण होते....... असं वाटतं मला जर पंख असते तर उडत उडत एका क्षणात तुमच्यापर्यंत आले असते. आज जेव्हा मी माझ्या मुलींकडे पाहते तेव्हा मला माझे बालपण आठवते.... किती सुंदर होते ना ते दिवस..... किती मजा करायचो आपण..... सर्व मिळून क्रिकेट खेळायचो ,कॅरम ,विटी-दांडू ,पत्ते असे कितीतरी खेळायचो...... कधी गोष्टी रंगायच्या तर कधी जादूचे खेळ असायचे..... छोटे काका काकू तर खूप हसवायचे.त्यातच कधी आत्या आली तर त्यात दुधात साखर........ आपण सर्व मिळून राहात असल्यामुळे तेव्हा जी गंमत यायची ती परत कधीच अनुभवायला मिळाली नाही....कधी कधी वाटते आपण उगाचच मोठे झालो....लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.....संत तुकाराम महाराज का म्हणतात हे आज समजतंय.
आज माझे लग्न होऊन सतरा वर्षे पूर्ण झाली आहेत....पण तरीही व तुमच्याजवळ रहावं असं नेहमी वाटतं. माझ्या घरातील सर्व माणसे चांगली असूनही तुमची उणीव मला नेहमी भासते.सतत वाटत तुमच्याजवळ यावं.... तुमच्या कुशीत डोके ठेवून झोपाव....मी जर मुलगा असते तर मला हे सुख कायम मिळालं असतं....पण शेवटी मी एक मुलगीचं....
मुलगी असली म्हणून काय झाले... तुम्ही माझ्याजवळ राहू शकताच नां....मुलीलाही तेवढाच हक्क आहे... असं तुम्हीच मला शिकवलंय नां....विसरलात का?
सध्या लाॅकडाऊनमुळे इच्छा असूनही मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही याची खंत वाटते.लाॅकडाऊन संपल्यानंतर मात्र आपण सर्वजण असेच एकत्र येऊ......एकत्र राहू.... आणि तोच आनंद परत मिळवू.
तुमचीच सर्वांची लाडकी लेक,
मनिषा
मनिषा पांढरे सोलापूर (४०)
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
(08) *महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*पत्रलेखन - सासरी गेलेल्या मुलीचे आपल्या आई-बाबांस पत्र*
प्रिय आई बाबांस
साष्टांग नमस्कार.
आज मी एकटीच घरात आहे. मला आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं. माझं लग्न होऊन मला दोन वर्ष कशी का या घरात झाली काही कळलं नाही. तुम्ही दिलेले प्रेम व या घरात मिळत असलेले प्रेम काही सारखेच आहे. मला लहानपणची आठवण झाली की मी जेवणासाठी कधी तयार होत नसे, तेव्हा आई मला हे काऊचा घास, तो म्याऊचा घास अशी करत फिरवत फिरवत जेवण द्यायची आणि मी नाही नाही म्हणत मजेत खाऊन घ्यायची. आता मी आपल्या मुलालाही त्याच पद्धतीने खाऊ घालते, तेव्हा मला आई तुझी आठवण येते. माझे लहानपणीचे सर्व चाळे बाबा कसे पूर्ण करायचे आणि आपल्यासोबत गाडीवर फिरायला न्यायचे तसेच आता माझ्या मुलालाही त्याचे पप्पा फिरायला घेऊन गेले. त्याची आवडी निवडी आणि व्यवहार बघून तर मला माझ्या बालपणाची आठवण येते.
बाबांनी आणून दिलेले खेळणे सुद्धा त्याने खेळू खेळू तोडून दिले नाही तर तोडू तोडू खेळत आहे. माझे इथले आई - बाबा (सासू-सासरे) सुद्धा फार प्रेमळ आहेत. त्यांनी मला कधीच सुने सारखे व्यवहार केले नाहीत. आपल्या मुलीप्रमाणे मला सुद्धा फार प्रेम करतात. मला काहीही झालं तर पूर्ण घर डोक्यावर घेतात. बाबा तुमच्या निवडीसाठी तुम्हाला फार धन्यवाद देते कारण माझ्या दोन मैत्रिणींनी आपल्या आई बाबांच्या मनाविरुद्ध आपल्या पसंतीने मुलगा पसंत करून आंतरजातीय विवाह केला आणि त्यांना फार त्रास होत आहे हे मी बघत आहे. आता त्या दोन्ही फार पश्चाताप करीत आहेत. आपल्या आई-बाबांचं घर सुद्धा त्यांनी नेहमीसाठी सोडलेलं आहे. जेव्हा त्यांचे लग्न झाले होते तेव्हा समाजातील दबावामुळे माझं लग्नही लवकरच झालं होतं. कारण की मी माझ्या मैत्रिणींनी जे केलं कदाचित मी तसं करायला नको म्हणून. पण बाबा, मला तसं काही करायचे नव्हतं. जे माझ्या आई-बाबांना योग्य वाटेल तेच मी करणार होती. आणि आज मी आपल्या घरी फार सुखी आहे. म्हणतात ना जो आपल्या आई बाबाचे ऐकतो तो नेहमी सुखी राहतो. त्याच्यावर त्याच्या आईबाबांचा आशीर्वादही असतो.
बाबा तुम्ही आपल्या तब्येतीकडे लक्ष देत राहा. ब्लडप्रेशर ची गोळी नियमीत घेत चला. मला काय होते म्हणून तुम्ही गोळी खात नाही, ही सवय चांगली नाही. मी होती तेव्हा तुम्हाला एकही दिवस गोळी सुटू देत नव्हती बाकी तर तुम्ही आपले सर्वच कामे व्यवस्थित करता. सकाळ-सायंकाळ फिरायला जाता ते तुमचं सुटलं नाही, चांगला आहे . त्यात प्रकृती नीट राहते. सोबत आईलाही फिरायला घेऊन जात जा. ती घरीच राहते तिच्याकडे ही विशेष लक्ष द्या. कारण आता तुमच्या सोबतीला ती एकटीच राहते. तीला कामही अधिकचे होत असतील. मी होती तेव्हा तीला कामाचं टेंशन नव्हते. कधी गरज पडली तर मला बोलून घ्यायचं. तुम्ही दोघी सुखी राहा, व्यवस्थित राहा. मलाही मग काही काळजी नसते. आणि माझ्या बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसाला तुम्ही दोघेही या.
तुमचे जावई फार चांगले आहेत. मला कशाची ही कधीही कमी पडू देत नाही. प्रेमळ आहेत. आज ते आपल्या बाळाला घेऊन आई-बाबांसोबत फिरायला गेले आहेत. घरी वरच्या माळीचं काम सुरू असल्यात्यामुळे मी आज घरीच थांबली आहे. मलाही सोबत घेऊन जाणार होते, पण मीच म्हटलं की, आज काम वाल्यांना पेमेंट करायचा असल्यामुळे मी घरी थांबते आपण फिरून या.
आई-बाबा माझी इथली काळजी करायची नाही. मी फार सुखी आहे. सर्व माझी ऐकतात व मला प्रेमही देतात. मला इथं जास्त काम करावं लागत नाही. कामासाठी सोबतीला एक बाई ठेवलेली आहे. ती धुणं-भांडी, झाडूपोछा आणि दिवसभर लहान-सहान कामे करीत असते. त्यामुळे मला अभ्यासासाठी आणि वाचण्यासाठी खूप वेळ मिळत असते मी यावर्षी एमपीएससी चा फॉर्म भरलेला आहे. त्याची तयारी पण सुरू आहे. तुमचे जावई मला फार मदत करतात. त्यांच्या प्रेरणेमुळेच मी हा फॉर्म भरलेला आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्यांचा चांगला बोलबाला आहे. त्यांचे सर्व ऐकतात व त्यांचा मान ठेवतात. सणाच्या दिवशी त्यांच्या ऑफिसमधले इतर कर्मचारी घरी येतात आणि मग त्यांची पार्टीत होते. आता होळीला होळी मिलन कार्यक्रम आमच्या घरी त्यांनी ठेवला होता व त्यात त्यांच्या ऑफिसचे सर्व कर्मचारी आले होते व सर्वांनी मिळून रंग खेळले, जेवण केलं आणि खूप मज्जा घेतली त्यात आम्ही पण सहभागी होतोच.
आई मला तर असं वाटतं नाही की मी माझ्या सासरी आहे कारण मी तुमच्या घरी जेवढे स्वतंत्र होती , तेवढीच स्वतंत्र इथेही आहे . हा घर मला माझाच वाटतो आणि ईथली माणसे ही माझीच आहेत. आई-बाबा या दोन शब्दातच जणू आपलं सारं विश्व सामावलेलं आहे. बाबा तुम्ही माझ्या जीवनातील एक आदर्श व्यक्ती आहात. तुमच्या पासून मी विनम्रतेची आणि शांतीचे धडे घेतले आहे. तेच माझ्या जीवनात मला यशस्वी बनवत आहेत. आणि आई तर मायेनं भरलेला कळसच आहे. तिच्या प्रेमाची आठवण तर पावलोपावली होते. तिने सांगितलेले सगळे विचार माझ्या जीवनात कामात येत आहेत.
आई तुझ्या चरणी वैकुंठ, तूच माझा पांडुरंग | आई उच्चरानेच होई, सगळ्या वेदनांचा अंत ||
आपलीच लाडली
________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
मुलीचे आई वडिलांना पत्र
ll श्री ll
पुणे
ता. 24.5.2020
ती. आई व दादांन शि.सा.न.
पोस्टमन कडून पत्र म्हंटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. त्यात ते पत्र माझ्याकडून, म्हणजे तर तुम्हाला मोठा भूकंपाचा धक्काच बसला असेल. फोनवर आपण नेहमीच बोलतो. पण काही भावना अशा प्रत्यक्ष बोलून दाखवता येत नाही. त्यासाठी लेखणीच्या आधाराने पांढऱ्यावर काळे केलेले बरे वाटते. मनात उचंबळून आलेल्या भावना कागदावर उतरल्या की शांत वाटते. माझ्या पोटातून बोटात, नंतर कागदावर उतरलेले शब्द, त्या कागदाला येणारा माझ्या बोटांचा आणि मनाचा सुगंध तुम्हालाही खूप आवडेल म्हणून हा पत्राचा प्रपंच.
माझ्या काही मैत्रिणींनी सासरच्या लोकांबद्दल, इतके नकारात्मक विचार माझ्या मनात भरवून दिले होते. त्या लोकांबद्दल मनात अढी धरूनच मी सासरी पाऊल टाकले होते. प्रशांत नेहमी म्हणत असे, "तुला आमच्याकडे आल्यावर माहेरची आठवण येणार नाही. इतके माझे आई-वडील चांगले आहेत". पण मी मात्र मान उडवून त्याला नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. पण मी किती चुकत होते हे तेव्हा मला कळले नव्हते.
लग्नानंतर काही दिवसातच संकष्टी चतुर्थी आली. माझा कडक उपास असतो, हे तुम्हाला माहीत आहेच. त्या दिवशी नेमके ऑफिसमधून यायला रात्रीचे साडेनऊ झाले. भुकेमुळे माझा पारा थोडा चढलेला होताच. पण घरात पाऊल टाकताच उकडीच्या मोदकांचा घमघमाट सुटला होता. माझ्यासाठी सगळेजण जेवायला थांबले होते. सासूबाईंनी मला पटकन हात-पाय धुऊन पानावर यायला सांगितले. स्वतः उभे राहून गरम-गरम वाढत होत्या. तेव्हा त्यांच्यात मी तुला पाहिले. बाबा पण माझ्या ऑफिस ची चौकशी अगदी मनापासून करत होते. त्यात मला दादांचा भास झाला. या एकाच प्रसंगाने माझ्या मनाचा एक कप्पा उजळून निघाला होता. मी झोपताना हळूच प्रशांतला सॉरी म्हटलं व काही न बोलता झोपी गेले. माझे मन आई बद्दलच्या ह्या दोन ओळींची व्यापले.
लाभेना तुझं हातचे गरिबीचे स्वादिष्ट ते जेवण
की जेणे मूठ मूठ मास भरुनी यावे मला मी पण
ह्या ओळी 'अहो आईं'च्या बाबतीतही तितक्याच खऱ्या आहेत. तू 'ए आई' आणि त्या 'अहो आई' बरं का!
मध्यंतरी प्रशांत कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. ऑफिसचे ऑडिट वगैरे चालू असल्यामुळे मला काम खूप पडत होते. घरी आल्यावर माझ्या अंगात अगदी त्राण नव्हते त्या दिवशी. मी जेवून कोचावर जराशी लवंडले, तर मला गाढ झोप लागली. नंतर काही वेळाने मला जाणवले, आई मला पांघरूण घालत आहेत. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला. मी तोच हात त्यांचा पकडला आणि पटकन हाताचा पापा घेतला. मला तुझ्या हाताची उब आणि गंध त्यात जाणवला. त्या हेही बाबांना सांगत होत्या, "दमते हो पोर अगदी." मला मनापासून अगदी लाज वाटत होती. त्याही दिवसभर घरची कामे करून मदत असतातच की. तुमच्या संस्कारामुळे मी असा साधा,सरळ चांगला विचार करू शकले.
तो वेडा आग्रह भीती हि खुळी ती माझिया कारणे तो पाठीवर हात जीर्ण फिरणे एकेरी हाकारणे
ह्या ओळीतही किती माया भरली आहे.
माझ्या बहुतेक सगळ्या मैत्रिणींना सकाळी स्वत:चा डबा स्वतःच करून घ्यायला लागतो. मी पण म्हटले आईंना , " मी डबा करत जाईन दोघांचा." पण त्यावर त्यांच्या उत्तराने व कृतीने माझ्या मनावर लोण्याचा हात फिरवल्यासारखे वाटले. "प्रशांत साठी इतकी वर्षे डबा करून देतच होते ना? मग अजून दोन पोळ्या लाटल्याने हातांना कष्ट काय फार होणार आहेत?" आई, त्यांचं सर्व करणं तुझ्यासारखं नीटनेटकं आणि चविष्ट. तू मला, "स्वयंपाक शिकून घे" म्हणून कानीकपाळी ओरडायचीस. याची जाणीवही मला प्रकर्षाने होते आणि मी दुर्लक्ष करायची याचा पश्चात्तापही होतो आहे. मी त्यांच्याकडून शिकून सगळं आत्मसात करीनच. त्यांना बोलायची संधी मी देणार नाही. आई खरं सांग, 'मी झाले आहे ना शहाणी मुलगी?'
तू आणि दादा बाहेर गेल्यावर, येताना तुम्ही नेहमी कॅडबरी चॉकलेट व मोगर्याचा गजरा घेऊन यायचा. अगदी तसेच ते दोघे पण करतात. ही माझी आवड त्यांना कशी समजली कुणास ठाऊक? पण खरंच hats off to them.
अगं साधी गोष्ट सांगते. परवा मैत्रिणीबरोबर कुठलेतरी प्रदर्शन बघायला त्या गेल्या होत्या. माझी नणंद नीता, चा वाढदिवस होता. म्हणून काहीतरी तिला आणतील ह्याची खात्री होतीच. पण तिच्याबरोबर मलाही त्यांनी सुंदर ड्रेस आणला. मला मिळालेल्या अनपेक्षीत गिफ्ट मुळे खूप आनंद झाला. मनातला आणखीन एक कप्पा उजळला.
ते दोघे असे प्रेम जागोजागी पेरत गेले. तसं ते माझ्यातही उमलत गेले. माझ्या मनातली सासर बद्दलची अंडी, किल्मिषे, जळमटे सगळी निघून गेली. खरं असं आहे, 'देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी'. मी पण 'ह्या प्रेमाची, मायेची परतफेड तितक्याच चांगल्या रीतीने करीन'. अशी ग्वाही मी तुम्हाला देते. माझे कुठे चुकत असेल तर तुम्हीच सांगा.
'माहेर' या शब्दातच इतक्या वेगवेगळ्या भावना गुंतल्या आहेत. त्यामुळे तुमची आठवण नव्हे, तुम्ही कायम माझ्या मनात असताच. मला ना त्या कवि निकुंबांची ती कविता सारखी आठवते.
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
तेव्हा आई-दादा तुम्ही माझी काळजी अजिबात करू नका. 'आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन' अशी माझी स्थिती आहे. देवाने मला भरभरून दिलेले आहे. ते तसेच राखून ठेवण्याचा प्रयत्न करीन.प्रशांतला तर तुम्ही ओळखताच. त्याच्याबद्दल मी काही जास्त सांगावं असं नाही. आपल्या तब्येतीची काळजी घ्या. रजा मिळाली की आम्ही सर्वजण चेंज म्हणून तुमच्याकडे येऊच. आपल्या टॉमीचा माझ्या तर्फे एक पापा घ्या. मनीमाऊ ला आज एक कप दूध जास्त दे. आई, तो कोपऱ्यातला गुलाब फुलला का गं? छान फुले आली असतील ना? अगं किती लिहू? पत्र संपतच नाही.
पण आता बाय.
सगळ्या शेजारच्या काका-काकूंना नमस्कार सांगा.
तुमची लाडकी
XXX
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
विषय - पत्रलेखन
(सासरी गेलेल्या मुलीचे आई बाबास पत्र)
ती.आई आणि बाबांना
प्रेमपूर्वक सा.न.वि.वि.
लग्न होऊन मी सासरी आले तुमच्या कष्टाचे मेहनतीचे स्वरूप मनःपटलावर साकार झाले. आम्हां पाच भावंडांना वाढविताना,शाळा कॉलेज शिकविताना तुम्हाला किती खस्ता खाव्या लागल्या! तुमच्या साऱ्या जबाबदाऱ्या तुम्हीं आनंदाने पार पाडल्यात. घरातल्या चणचणीची आम्हां लेकरांना कधी झळही लागु दिली नाहीत.तुमचे मनोधैर्य नि मुलांना सुखी ठेवण्याची धडपडही गौरवास्पद आहे.आम्हा पाच भावंडांपैकी एकालाही तुम्ही काहीच कमी पडू दिले नाहीत हे विशेष.
तुम्ही आयुष्यभर खूप कष्ट केलेत, खस्ता खाल्ल्यात. त्याचे मधुर फळ आज आम्ही खात आहोत. सर्वजण उच्चशिक्षित होऊन आपापल्या पायांवर उभे आहोत. परंतु तुम्हाला त्याचा काय लाभ! तुमच्या आयुष्यात तुम्ही कष्टातच घालवलेत. आमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही तुमचा भूत, वर्तमान व भविष्यकाळ पणाला लावलात. आम्ही आनंदी होण्यासाठी झटलात. खरेच आईबाबा आम्हा भावंडांची पूर्वपुण्याई म्हणून तुम्ही आम्हाला आई-बाबांच्या रूपात मिळालात. मला आजही तो दिवस आठवतो बाबा! मला दहावीला ८० टक्के मार्कस् मिळाले होते. तेव्हा तुमचा ऊर माझ्याविषयीच्या अभिमानाने भरून आला होता. आई तू तरी पेढेच बनवायला सुरुवात केली होती. तुम्ही आपला आनंद
गावभर पेढे वाटुन द्विगुणीत करत होता. माझ्याविषयी अभिमानाने तुम्हाला आभाळ ठेंगणे झाले होते.
तुम्ही दोघे पुन्हा पुन्हा सांगत होता शिकवणी नसतानाही आमच्या लेकीने एवढ्या मार्कांचा उच्चांक गाठला आहे. पहा ती किती हुशार आहे !आणखी काय लिहू? इतके लिहितानाही माझ्या डोळ्यांतील आसू थांबले नाहीत. आम्ही पाच भावंडे तुमची पंचरत्न आहोत. तुमच्या संस्काराखाली वाढलो आहोत. तुमच्या भविष्याची चिंता आम्ही करूच. तुम्हाला कधीही दुखावणार नाही.
कळावे,
तुमच्या पत्राचे आतुरतेने वाट पाहणारी तुमची लाडकी लेक
सौ. भारती सावंत
मुंबई
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
पत्रलेखन
सासरी गेलेल्या मुलीचे आई बाबास पत्र
तीर्थरूप आई बाबा
साष्टांग नमस्कार
वि. वि .पत्रास कारण की
बरेच दिवस झाले माझे तिकडे येणे झाले नाही व बाबा किंवा तुमच्यापैकी कोणीही मला भेटायला आले नाही मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येते आहे सासरी मी मजेत आहे कपडालत्ता खाण्यापिण्याची काहीच कमतरता नाही पण तुमच्या मायची कमतरता मला सदैव भासत आहे .आई-वडिलां प्रमाणे सासू-सासर्यांना मानते व त्यांची सेवा ही करते पण कौतुक मात्र होत नाही आई तू नेहमी म्हणायचीस जिवंतपणी कधी कोणी कौतुक करत नाही हे खरं कौतुक होतं ते सरणावर गेल्यावर. मला इथे पदोपदी त्याचाच अनुभव येत आहे .भाजी छान झाली असून ;रांगोळी छान काढली असून कोणीही छान केलं असं म्हणत नाही. असं का बरं? तिकडे मात्र माहेरी ताई मस्त रांगोळी काढलीस; फक्कड चहा झालाय शब्द अजूनही आठवतात. इथे मात्र फक्त काम काम आणि काम कौतुक हा विषयच नाही . कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळाले की कामाचा ताण हलका होतो आई पण सासरी हे कसं कुणाला समजत नाही. सकाळी उठल्याबरोबर अंगण झाडलोट. अंघोळ. सासरेबुवांना लगेच चहा लागतो. सासूबाईंचा पाणी तापवून ठेवावे लागत .यांना सगळं काही हातात द्याव लागत. त्यावेळी दीर कॉलेजात जातात त्यांचाही डबा असतो. मला जेवण करायला फुरसत मिळत नाही. स्वतःच्या हातचं जेवण कधीकधी जेवावे वाटत नाही पण; सासूबाईंना कसं म्हणणार आज तुम्ही भाजी बनवा. नाही उचलत जिभ माझी, आई तुला मात्र म्हणायची ;आई आज मी काहीही करणार नाही तूच बनव जा. आता मी चालले मैत्रिणीकडे. इथे मात्र तसे करता येत नाही मन मोकळं बोलता येत नाही काही बोलायला गेलो तर, सासुबाई हजर असतात म्हणतात बरा वेळ आहे बाई गप्पा मारायला. आमच्या वेळी तोंड वर काढायला फुरसत नव्हती एवढं काम असायचं ; आता मिक्सर आलय पाटा-वरवंट्याची कटकट नाही वेळ वाचतो ;तर गप्पा मारायला वेळ हवाय .मला तर कसंसच होतं. संध्याकाळी हे ऑफिसमधून आले की गरम गरम चहा सर्वांचा चहा होतो पण हे कधी म्हणत नाही तुझ्या हातचा चहा फक्कड म्हणून. आणि कधीही म्हणायचा प्रयत्न केलात तर सासूबाई म्हणतात बस झालं कौतुक नाहीतर डोक्यावर बसायचं बाकी राहिले आहे. सकाळी वेणी घालताना अगदी लक्षपूर्वक घालावी लागते नंनंदबाईंची नाहीतर म्हणतात काय वहिनी साधी वेणी घालायचं शिकल्या नाहीत का तुम्ही? प्रत्येक काम नीटनेटकं आणि जागृत राहून करावे लागतं .कौतुक नाही वरून बोलणे ऐकून घ्या. तिकडे आई माझ्या आवडीच्या भाज्या करायची पण इकडे मात्र नवरोबा सासरेबुवा ,सासुबाई सगळ्यांच्या आवडीच्या भाज्या कराव्या लागतात .माझ्या आवडीची भाजी करायला मला वेळ नसतो. तिकडे आजी मला डोक्याला तेल लावून द्यायची किती मस्त झोप यायची इथे मात्र नंदेच्या डोक्याला तेल लावावे लागते सासूबाईंच्या पायाला रात्री ते लावावे लागते हात घेऊन दुखून येतात पण मला डोक्याला तेल लावून द्या असं कोणाला म्हणता येत नाही. आजी तुझी आठवण येते ग.
तिकडे घंटागाडी दारावर यायची आणि कुल्फी ची घंटी ऐकून मी पळत जायची बाबा माझ्यासाठी दोन दोन कुल्फी घेत .इथे मात्र घंटागाडीचा आवाज ऐकूनही मला गप्प बसावे लागते एकदा यांना म्हटलं अहो कुल्फी खावीशी वाटते तर सासूबाई म्हणतात लहान आहेस का कुल्फी खायला. बाबा आता मी तिकडे आल्यानंतर भरपूर कुल्फी खाणार तुम्ही घेणार ना माझ्यासाठी कुल्फी. माझं सगळं लिहीत बसले, आई तू कशी आहेस ?आई बाबा कसे आहेत? आजी बाबांची तब्येत कशी आहे? माझी छोटी मनी कशी आहे? तुम्हा सर्वांना माझी आठवण येते का ग?
इकडील सर्व मंडळी हुशार आहे आपल्याकडील खुशाली जरूर कळवा .
तुमची लाडकी सविता
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
पत्रलेखन "सासरी गेलेल्या मुलीचे आई बाबास पत्र".............. तीर्थस्वरूप आई व बाबाना सा.न.वि. वि. आई आणि बाबा प्रथम मी तुमची माफी मागते कारण की तुम्ही माझे लग्न ठरविण्याचा एक जबाबदार पालक म्हणून जो प्रयत्न केलेला होता पण मी तुम्हाला ब-याच वेळा सांगितले होते की माझ्या लग्नाचा विचार करु नका माझे पसंती नुसार मी स्वतः त्याचा निर्णय घेतलेला होता हे सर्व मी आईला सांगितलेले होते एवढेच नव्हे तर आई जेव्हा पुण्याला मला भेटायला आली होती तेव्हा तिला ज्या मुलाशी लग्न करणार आहे त्या मुलाशी समक्ष भेट करून दिली होती. तो मुलगा चांगल्या विज्ञान महाविद्यालयातून पदवीत्तर पदवी प्राप्त केलेली असून एका खाजगी शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करीत आहे छान स्मार्ट आहे आणि महत्वाचे म्हणजे कसल्याहि प्रकारचे व्यसन नाही त्यांचे कुटुंब सुध्दा चांगले सुशिक्षीत आहे मुलाचे वडील शासकीय सेवेतून निवृत झालेले आहेत मुलाची आई गृहिणी आहे एक मोठा भाऊ एका वर्तमानपत्राचा उपसंपादक आहे मूळ गावी आवश्यक लागणा-या सुख,सोयी युक्त घर आहे मुलाचे आई वडील प्रेमळ आहेत ही माहिती दिलेली होती व हे सर्व बाबाना पटवून सांग असे सांगून सुध्दा बाबाना न सांगता अचानक मला कसल्याहि प्रकारची आगाऊ सूचना न देता आई आणि बाबा तुम्ही मला गावी घेऊन जाणेसाठी पुण्यात मी ज्या ठिकाणी राहत होते तेथे तुम्ही माझ्या मैत्री बरोबर चर्चा करीत माझे येण्याची वाट पहात असताना मी जेव्हा तेथे पोहचले तेव्हा तुम्ही मला सांगितले आम्ही तुला गावी घेऊन जाणेसाठी आलो आहोत कारण पाहुणे पाहणेसाठी येणार आहेत पटकन आवर गाडी खाली थांबवली आहे.तेव्हा म्हटले मागे बोलेल्या मुलाबाबत बाबाना का सांगितले नाही.मी तिस-या मजल्यावर रहात होते बाबाना मी म्हटले कोणती गाडी दाखवा म्हणत जात असताना बाबा मला म्हटले मला तुझा विचार मान्य आहेत पण हे तुझ्या आईला मान्य नाही.वेळ रात्रीची ९-०० ते१०-००असेल पटपट मी बाबाना मागेच ठेवून ग्राऊड फ्लोरला मुलगा होता त्याला सर्व सागतले पटकन येथून आपण निघाले पाहिजे कारण माझे आई बाबा घेऊन जाणेसाठी आलेले आहेत अजिबात वेळ वाया घालवयचा नाही पटकन आपण आता पुणे पाहिजे अन्यथा आपल्या स्वप्नावर पाणी सोडावे लागेल त्या योजने नुसार रेल्वेने मुंबईतील मित्राच्याकडे पोहचलो पण तुम्ही मात्रं पोलीसांची सुध्दां मदत पण आम्ही दोघेही सज्ञान म्हणजे माझे वय २७वर्षे तर मुलगा २९ वर्षे होती त्यामुळे मुल़ीला फुस लावून पळवून नेली आहे त्याचा काही उपयोग होणार नव्हता शेवटी आम्ही मुंबई येथे कोर्टात वकीलाच्या साक्षीने नोंदणीक्रत लग्न केले आहे.तुम्ही माझी करु नका.मी स्वतः निर्णय घेतल्या मुळे तुम्हाला वाईट वाटणार पण माझा सुध्दा नाविलाज होता. कारण तुम्हीच मला शिकलेले होते कोणालाहि धोका देवू नये.त्याचेच मी पालन केलेले आहे आणि मी आता सुखी आहे माझे उलेले शिक्षण पूर्ण करीत आहे मला तुमचीच दोघांची काळजी वाटते.नोंदणी केलेले विवाहांत ख़र्चला फाटा देता येतो लगग्नात होणारा खर्च वाचला आहे.अशाच पध्दतीनेच लग्न केले विना कारण पालकांना मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी व्हावे लागते कर्ज फेडता येत नसेल तर काही पालकांनी सुदा केलेल्या आहेत.आणि महत्वाचे म्हणजे मी जे केले ते योग्यच आहे.पत्रिका पाहुन गुण जुळतात का पाहून लग्न ठरविणे अशा थोंताडावर माझा अजिबात विश्वासच नाही.पत्रिकेतिल गुण जुळण्यापेक्षा एकमेकांची मने जुळली पाहिजेत.त्यांमुळे ठरवून केलेल्या विवाहा पेक्षा प्रेम विवाहच सध्या योग्य आहेत.कारण प्रेम विवाहात एकमेकाचे स्वभाव जवळून पाहता येतात अनुभवता येतात पण अचानक नविन केवळ पत्रिका या थोतांडावर गुण जुळवून विवाहास होकार दिला तर तो व्यसनी आहे का नाही त्याचा स्वभाव कळत नाही त्यामुळे मुलीला नाविलाज म्हणून सर्व इच्छा आकाक्षाना मुरड घालावी लागते तसे तर माझ्या सासरी नाही.मी आनंदी आहे.मी व माझे पती आणि माझे सासू सासरे आम्ही चौघे एकत्र राहतो.मी आणि पती रोज नोकरी करण्यास जात असतो.आम्ही कुटुंबात वेगळया सामाजिक क विषयावर चर्चा करीत असतो. माझ्या सासरे यांना लेख लिहणे कविता करणे कवि संमेलनास जाणे विविध शाळेवर जाऊन विना मानधन व्याख्यानातून प्रबोधन करणेचा छंद आहे.बाबाच्या सारखी वाचनाची व इंग्लीस बोलण्याची आवड आहे.परवाच आम्ही फोरव्हीलर घेतली आहे. त्या मधून गावच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आलेलो आहोत. माझे चांगले आहे. बाबा तुम्हीच एकमेकांची काळजी घेत चला.मोठी ताई व छोटा भाऊ माझेवर रागावलेलेच असतील त्याना सुध्दा मी घेतलेला निर्णय काही दिवसांनी पटेल याची मला खात्री आहे. तुम्ही दोघांनी झाल गेल विसरून माझे वाढदिवसाला आला तर मला आनंदच वाटेल कारण वाढदिवसाची भेट म्हणून माझे साठी नविन टूव्हीलर घेतली आहे दोघांना नाही जमले तर बाबा तुम्ही तरी याल अशी मला आशा वाटते.माझ्या पत्रातील सर्व विवेचना वरून माझेवरचा राग नक्कीच मावळला असेल.काहीहि झाल तरी रक्ताची नाती कधी तुटतात काहो आई बाबा ... आपलीच लाडकी मुलगी.. लेखक..जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
(37)
*सांसारिक जीवनात रुळलेल्या मुलीचे पत्र*
दि. 24/5/2020
||ॐ||
तिर्थरुप आई व दादाजीस,
शिर साष्टांग नमस्कार.
आज खूप दिवसानंतर मी पत्र पाठवत आहे त्याबद्दल क्षमस्व. पण या सांसारिक जीवनात मी एवढी व्यस्त झाली आहे की वेळच मिळत नाही. असो, आई, दादाजी तुम्ही कसे आहात? मी जरी दुर असले तरी तुम्हा दोघांच्याही प्रकृती ची काळजी वाटते. मी इकडे सुखरूप आहे. खुप दिवसांपासुन ठरवलं होतं की यावर्षी उन्ळ्याच्या सुट्टीत गावाकडे येऊन आपल्यासोबत किमान आठवडा घालवेन पण आता ते शक्य वाटत नाही. संपूर्ण जगाला कोविड19 ने ग्रासलेले असतांना कुणाचंही घराबाहेर पडणे योग्य नाही. जो जिथं आहे तो तिथेच सुरक्षित आहे. आपण सुद्धा आपली काळजी घ्या. घराबाहेर पडू नका, गरज भासत असेल तरच बाहेर जा पण मास्कचा वापर आणि योग्य डिस्टन्स ठेवा सॅनिटायझर चा वापर करा. 50च्या वर वय असलेल्यांना रोगप्रतिकारक शक्ति कमी असल्यामुळे जास्त दक्षता घेणे आवश्यक आहे.
माझ्याकडे सुद्धा लाकडाऊन च्या दोन दिवसा आधीच पायल आणि शिरीष दोघेही आलेले आहेत. बरंच झालं नाही तर कसं झालं असतं त्यांचं पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी कल्पना करूनच अंगावर काटे येतात. त्यांची दोघांचीही प्रकृती अगदी ठणठणीत आहे. लाकडाऊन आणि कोरोना व्हायरस आजार आल्यापासून तर घरकामाला येणाऱ्या बाईला पण सुट्टी दिली आहे त्यामुळे पुर्ण दिवस कसा जातो कळतच नाही. दिवसभर भांडी, धुणी व स्वयंपाक आणि स्वच्छता. त्यात मला असलेला लेखन व वाचनाचा छंद. जेव्हा कधी वेळ मिळाला तर लगेच पुस्तक वाचन करते नुकतीच ग.दी.माडगुळकरांची 'गीतरामायण 'वाचून झाली. त्यातील तुमच्या आवडीचं ते गीत मला पाठांतरच झालं आहे. तुम्हाला आठवतं उन्हाळ्यात मी गावाला आले की तुम्ही मला हमखास हे गीतम्हणून दाखव म्हणायचे. 'दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा......' हे गीत वाचतांना मी अगदी तुमच्यापुढे बसून मी गात आहे व तुम्ही डोळे बंद करून तल्लीन होऊन ऐकत असल्याचा भास झाला. आपल्या प्रत्येक आठवनीने मन भरुन येतो. कधी वाटतं आताच धावत जावं आणि तुमच्यापाशी राहावं पण हे फक्त आता कल्पनेतच राहिले. आता शाळेत अलगीकरण केंद्रात ड्यूटी लागली आहे. त्यामुळे सलग आठ तास शाळेत यावं लागतं. हे पत्र सुद्धा मी आता थोडा वेळ मिळाला तेव्हा लिहायला घेतलं.
मला आता जाणवत आहे की आईची जबाबदारी, तिची मुलांविषयी ची काळजी काय असते. जेव्हा मी यांना रागावते, काळजी घेते तेव्हा मी लहान असतांना तुम्ही माझ्याशी कसे वागायचे ते आठवतं व त्याचा अर्थ आता कळत आहे.
आई तु जरी अशिक्षित असलीस तरी आम्ही शिकावं मोठं व्हावं म्हणून राब राब राबली. मला आजही आठवतं जेव्हा आम्ही चौघेही भावंडं शाळेत जायचो तेव्हा पहाटे पासून आमच्या उठायचे आधीच स्वयंपाक आणि घरची सर्व कामे करून शेतात जायची. मी सर्वात लहान असल्यामुळे मला तशी घरकामाची सवयच लागलेली नव्हती.
तुम्हाला आठवतं मी जेव्हा सासरहून यायची दिवस दिवस भर झोपायची. मला सासर तसं चांगलं मिळालं पण तरिही माहेरची सर कधीच सासरला आली नाही. सासर एवढे मोठे की दिवस कसा जायचा कळतंच नव्हते. पण सगळं शिकून घेतलं.
दादाजी तुम्हाला आठवतं सासरी जातांना तुम्ही मला म्हटलं होतं, "तुझे गार्हाणे यायला नको, जर असं झालं तर मी तुझ्या सासरी कधीही येणार नाही." आजही माझं जर का चुकलं असेल किंवा नसेलही तेव्हा तुमचे जावई मला नेहमी म्हणतात, "गावी चल तुझ्या वडिलांनाच सांगतो." त्यांना आपल्या वडिलांना सांगतो असं बोलल्याचं मी कधीच ऐकलं नाही. त्यांचा तुमच्या वर एवढा विश्वास आहे की तुम्ही मला समजावणार म्हणून असं बोलतात.
मला माझ्या सासरच्या नावातने आणि तुम्ही ठेवलेल्या नावाने हाक दिली जाते तेव्हा मला तुम्ही ठेवलेल्या 'इंदिरा' या नावाने हाक मारली की या नावातही मला तुमच्या प्रेमाचा आभास होतो. मी जगासाठी कितीही मोठी झाली तरी तुमच्यासाठी तुमची लहानगी इंदिरा राहणार.
तुम्ही केलेल्या संस्कारामुळे मी आज फक्त सासरीच नव्हे तर सासरच्या सर्व नातलगांमध्ये लाडकी सुन, लाडकी वहीणी, लाडकी जाऊ म्हणून मान मिळत आहे आणि या सगळ्यांचं श्रेय तुम्हा दोघांना जातो.
आज मी नोकरी करतांना ज्या शाळेत नोकरी केले त्या प्रत्येक गावाशी माझा ऋणानुबंध जुळलेला आहे. आजही माझ्या गावातील पालक व विद्यार्थ्यांचे फोन येतात व मॅडम तुम्ही पून्हा आमच्या गावच्या शाळेत परत या असं म्हणतात तेव्हां तुमचा शिक्षकी पेशातील अनुभवच मी अनुभवत आहे याचा मला भास होतो. मी सुद्धा आपल्या पावलांवर पावलं टाकत पुढे जाण्याचा पुर्ण प्रयत्न करीत आहे.
यावर्षी आमचं निष्ठा प्रशिक्षण झालं. त्यात प्रत्येकाने आपल्या जीवनातील एका मार्गदर्शक ठरलेल्या व्यक्ति विषयी माहिती सांगायची होती. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त एकच मुर्ती आली ती म्हणजे तुमची मुर्ती. तुमचं वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, निर्णय क्षमता, दृढनिश्चय, प्रत्येक विषयावरील पकड व मंच संचालन करणे मी हे सगळं सांगितलं तेव्हा असं वाटलं की तुम्ही अगदी माझ्या पुढे बसून हे सगळं ऐकत आहात. मी सुद्धा तुमच्याकडून मिळालेले हे गुण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करते आहे आणि माझं सुद्धा या सगळ्या वर प्रभुत्व आहे याचं कारण म्हणजे तुम्ही दिलेली शिकवण.
दादाजी आई मला तुमची खुप आठवण येते. वाटतं पुन्हा लहान व्हावं. मुलीचा जन्म नसता घेतला तर मला कायमचं तुमच्याजवळ राहाता आलं असतं.मला आजही ते दिवस आठवतात आपण सगळे मिळून अंताक्षरी खेळायचो. तुम्ही संस्कृत श्लोक म्हणायचे. तुम्हाला तुमच्या बालपणीच्या कविता अगदी पाठांतर आणि ते सुद्धा कवि च्या नावासह. आम्हाला नवल वाटायचं. पुन्हा ते दिवस कधी परत येणार? मी कधी तुम्हाला भेटेन असं झालंय. 'येतील का ते दिवस मजेचे, आनंदाचे, बागडण्याचे.'
तुमच्या पोटी जन्माला येणे हे माझं सौभाग्यच आहे. मला तुम्ही दिलेल्या शिकवणीमुळे, संस्कारामुळे आज मी इथवर यशस्वी प्रवास केलेला आहे व पुढे करणार या माझ्या यशस्वी जीवनातील खरे मार्गदर्शक आपण दोघेही आहात.
याच जन्मी नाही तर जन्मोजन्मी मला तुमच्याच पोटी जन्माला घालावं अशी देवाकडे प्रार्थना करते. तुमचे हे उपकार मी कधीच फेडु शकणार नाही.
'आई, तुझ्या मुर्ती वाणी या जगात मुर्ती नाही.
अनमोल जन्म दिला गं आई तुझे उपकार फिटणार नाही.
बाबा, तुमच्या मुर्ती सारखी या जगात मुर्ती नाही.
अनमोल शिकवण दिली हो बाबा तुमचे उपकार फिटणार नाही.'
खुप खुप बोलायचं आहे काय बोलू आणि किती बोलू असं झालंय. भेटल्यावर फक्त फक्त तुमच्या मांडीवर डोके ठेवून शांत झोपावं वाटतं. आई, दादाजी खुप आठवण येते हो तुमची. दोघेही एकमेकांची काळजी घ्या. घरातच रहा, सुखरूप रहा. आपला आशीर्वाद नऊही माझ्या व माझ्या कुटूंबातील असू द्या. पत्र मिळताच पत्र पाठवून खुशाली कळवा.
ता. क. - दादाजी हे पत्र आईला नक्की वाचून दाखवा.
आपली लाडकी
इंदिरा
(सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे)
गोंदिया
9423414686
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*पत्र लेखन*
सासरी गेलेल्या मुलीचे पत्र
प्रिय आईस
नमस्कार
माझ्या सासुबाई गेल्या तीन महिन्यांपासून अतिशय आजारी होत्या. मला पहिले तर थोडे टेंशनच आले होते. पण मग तुझी ती प्रार्थना आठवली, ती प्रार्थना दीपस्तंभ सारखी माझ्या सोबत होती, क्षणाक्षणाला मार्गदर्शन करीत होती. कालच आम्ही डॉक्टरांना दाखवून आलो आणि आता त्या पूर्ण नॉर्मल आहे. गेल्या कित्येक दिवसानंतर माझा सारा ताण गेला. त्यात माझ्या सासरे ,कौस्तुभ दोघांनी त्यांच्या बरे होण्या पूर्ण श्रेय मला दिले. एरवी आपण फोनवर बोलत असतो. पण आज पत्र लिहून मन मोकळे करावेसे वाटले. आज मी खूप समाधानी आहे , संतुष्ट आहे म्हणून विचार केला की माझ्या भावनांचा , जाणीवेचा अमोल ठेवा शब्दरुपाने तुझ्या पर्यंत पोहोचावा.
मी होस्टेल मधे राहत होती तेव्हा तू मला एक दिवसा आड पत्र लिहायची खूप काही गमती जमती लिहायची .
तुझ्या पत्रातून तुझे प्रेम ओसंडून वाहत असायचे. मी त्या पत्रांचे पारायण करायची. तुझे एक अगदी छोटेसे , पण
माझ्या दृष्टीने जाणीवेचा, आत्मबोधाचा अनमोल ठेवा असे एक पत्र मी आज ही जपून ठेवले आहे.
ते पत्र म्हणजे तुझ्या माझ्या विषयीचे प्रेम,मी सदैव सुखात रहावे ,मला कुठल्याही अडचणींना तोंड द्यावे लागू नये अशी आई सुलभ भावनांच्या बरोबरच एक स्त्री म्हणून माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी तू किती जागरुक होती ह्याची पावती आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे ते पत्र खूपच गमतीशीर आहे. पण तुला एक सांगते की तुझे ते तथाकथित गमतीशीर पत्र माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा दुवा आहे. माझा आयुष्याप्रतिचा दृष्टी कोन बदलवणारा मैलाचा दगड आहे .
" तू लिहिले होते की तू देवाला माझ्यासाठी प्रार्थना करती आहे . तू सर्वात पहिले देवाला प्रार्थना केली की माझ्या मुलीला सदैव सुखी ठेव,तिला कुठल्याही दुःखाची झळ लागू देऊ नको. पण लगेच तुला जाणिव झाली की सुख आणि दुःख एकामेकांचे सांगाती एका शिवाय दुसर्याचे अस्तित्वच नाही."
"मग तू देवाला प्रार्थना केली की "*देवा माझ्या मुलीला तिच्या आयुष्यात कुठलाही प्रोब्लेम येऊ नये*." लगेच तूला जाणीव झाली की हे शक्य नाही . प्रत्येकाच्या आयुष्यात काहीनाकाही प्रोब्लेम येणारच. आणि समजा देवानी माझी ही प्रार्थना मान्य केली तर माझ्या मुलीचा उत्कर्ष, प्रगती कशी होणार. आणि लगेच तू ती प्रार्थना डिलीट केली."
*शेवटी तू एक अगदी छोटीशी प्रार्थना केली देवा माझ्या मुलीला एवढे सक्षम कर की ती तिच्या आयुष्यातील कुठल्याही परिस्थितीचा धीरोदात्त पणे सामना करू शकेल*.
तुझी ती प्रार्थना माझ्या आयुष्यात तुझा सजीव आशीर्वाद झाली आहे. दीपस्तंभ बनून सदैव मार्गदर्शन करीत आहे. तू मला शिकवले की समस्या खऱ्या अर्थाने आपल्या विकासाची संधी असते. आपल्याला आव्हान स्वीकारता आले पाहिजे. ते किती खरे आहे ह्याचा मला पदो-पदी अनुभव येतो आहे.
आई आता मला स्वतः बद्दल एवढी खात्री वाटते की कुठल्याही, कितीही गंभीर परिस्थितीत मी कधीही गांगरून जाणार नाही. अगदी धीरोदात्त पणे परिस्थितीचा सामना करीन. त्यासाठी तू मला सुसज्ज केले आहेस. मी माझ्या मुलांना सुद्धा असेच सक्षम सबल आणि धीरोदात्त पणे
परिस्थितीचा सामना करु शकतील असेच तयार करीन. त्यानाही प्रत्त्येक समस्येकडे आव्हान म्हणून बघायचे. शिकविल.
प्रत्येक अडचण,समस्या कडेआपल्या विकासाची
सीडी म्हणून बघीतले तर *Than sky is only limit*..
तुझीच लाडकी
ऋचा
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
34
*श्री.सुंदरसिंग साबळे गोंदिया*
मो. 9545254856
सासरी गेलेल्या मुलीचे आईस पत्र..........
==============
प्रिय आई,
शिरसाष्टांग त्रिवार दंडवत...
शाळेत असतानाही कधी मला पत्र लिहायला जमले नाही, त्यामुळे तुला कधी पत्र लिहिन असे माझ्या मनाच्या दारी देखील डोकावले नव्हते, पण आजकाल मी बऱ्यापैकी तोडकं-मोडकं का होईना लिहीत असते. त्यातलाच एक भाग म्हणून तुला पत्र लिहीण्याचा हा घाट घातला खरा, पण आता तुझा विषय आला की काय लिहावं हेच सुचत नाही कारण, तुझ्याकडे एवढं बारकाईने लक्षच नाही दिलं गं कधी! जेवढं तू जन्मापासून ते आजपर्यंत केलंस किंवा पुढेही करशील त्यातलं काही अंशी तरी मी तुझ्यासाठी करु शकले तर ते माझं भाग्यच असेल. तुझ्यासाठी काव्य स्फुरणे म्हणजे महादिव्यच..! कारण तुला कशाची म्हणून उपमा द्यावी..? चराचरात तुझं अस्तित्व आहे, तरी या काही ओळी तुला अर्पण....
"मला राहू दे गं आई
सदैव तुझ्याच ऋणात,
कशी होऊ सांग उतराई
भरलेस श्वास या देहात.."
आई तू नेहमीच त्याग केलास अगदी माझ्या जन्मापासून म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष जन्माच्या अगोदर पासूनच उदरातील मला निरोगी व सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून आवडत्या अन्नपदार्थ/गोष्टींचा त्याग, मग मी जन्माला आल्यावर कित्येक रात्री तुला जागून काढाव्या लागल्या असतील माझ्या शांत झोपेसाठी, मी लहानाची मोठी हो असताना माझ्या शैक्षणिक आणि वैयक्तिक गरजा पूर्ण करताना स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा त्याग करावा लागला असेल, मला उत्तम कपडे मिळावे म्हणून स्वतःसाठी कधी साडी घेतलीच नसशील, मला वेळच्या वेळी खाऊ मिळावा म्हणून तू स्वतःच्या आवडी निवडी बाजूला सारल्या असतील, आमची शिक्षणं व्यवस्थित पार पडून नोकरीसाठी म्हणून स्वतःची दागदागिने गहाण टाकलेस, दादाचे लग्न झाल्यावर वहिनीने त्याला घेऊन वेगळे राहण्याचा हट्ट केला तेव्हा त्यांच्या सुखी संसारासाठी स्वतःच्या आनंदावर विरजण घालून सुन आल्यावर आरामदायी जीवन जगण्याची जी स्वप्ने पाहिली होती त्यांचा किती सहज त्याग केलास. तुझा त्याग इतका महान आहे की तुझ्यापुढे हजारदा नतमस्तक झाले तरी कमीच.
चार नमुन्याचे चौघं आम्ही भावंडं. त्यातली मी तर फारच मुडी, हट्टी, कसल्याच कामाला कधीच हातभार न लावणारी; पण हे अवगुण सुद्धा लग्न झाल्यावरच समजले. आता जेव्हा सकाळी पाचला उठून आंगण झाडावं लागतं, रांगोळी घालावी लागते, पोरांना शाळेसाठी तयार करून सर्वांचे चहापान पहायला लागते तेव्हा तुझी बरोबरी होऊच शकत नाही हे लक्षात आले.
बाबांच्या व्यसनाला कंटाळून गेलेली तू आम्हाला कधीच कशी निराश दिसली नसशील हा प्रश्न आता खुपच सतावतो. सारं काही सहन करून हसतमुखाने संसाराची नाव आमच्या ओझ्यासहीत किती सहजपणे तुझ्या जीवनाच्या सागराच्या ऐलतीराकडुन पैलतीराकडे नेलीस, त्यात आलेल्या वादळ वाऱ्याची थोडीही झळ आम्हास न लागू देता.
अजून खुप काही आहे जे की तुला सांगावसं वाटतं पण राहून जातं. या पत्राद्वारे ही बरंच सांगण्याची इच्छा आहे पण, तुझ्या तुझ्या या त्यागाच्या मुर्ती समोर शब्दांची सुद्धा समाधी लागली आहे गं आई. असो एवढंही बोलणं कधीच झालं नसतं आपलं. या पत्राच्या सहाय्याने थोडाफार भार हलका झाला एवढंच.
शामची आई मधे साने गुरुजींनी जसे आईचे चित्रीकरण केले, अगदी तंतोतंत तु तशीच आहेस. हे जग पाहण्यासाठी अथवा चांगले,वाईट हे पारखण्याची
दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा देह झिजवलास
तुझी थोरवी मी कुठवर वर्णू? हे शब्दभांडार तोकडे पडले आहे. तुझे प्रेम, कृतज्ञता, कर्तव्यबुद्धी, माधुर्य, सोशिकता, काहीअंशी तरी माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो. तुझ्या देहाचे परीस झाले, तुझ्या स्पर्शाने माझ्या जीवनाचे सुवर्ण होवो.
तुझ्यासाठी दोन ओळी
"ममतेची खणी तू गं आई, मानले देवास तुझ्या ठायी
रिती झालेली तुझी जागा, कशानेच भरणार नाही..!"
पत्र मिलताच आठवणी लिहून पाठव.
तुझीच लाडकी, पूनम
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*पत्रलेखन*
(सासरी गेलेल्या मुलींचे आई बाबास पत्र. )
प्रिय आई बाबा,
आई बाबा कसे आहात मजेत न...बर सगळ्याची काळजी घेताना स्वतःची पण काळजी घेत आहेत ना..? ते सर्वात महत्त्वाचं आहे . हे लक्षात ठेवा ...माझी काळजी कराय चं कारण नाही माझ सगळं छान चाललयं..
माझ लग्न होऊन दोन वर्ष झाली आपल चार जनाच कुटुंब आई बाबा दादा आणि मी किती मजा यायची ना आपन किती प्रसंग एकत्र अनुभवले आहेत. मग दादाच प्रमोशन असो किवा माझ्या परीक्षेचा निकाल. सेलिब्रेशन चं एकही कारण आपण सोडलेल नाही. आई ,तू आणि बाबानी अचानक दिलेलं सरप्राईज..
आई बाबा , आज पत्र लिहिण्याचा एक खास कारण नाही. तक्रार नाही, खूप मस्त आहे मी सासरी....
तुम्ही खुशाल आहात ना! इकडे माझ्या सासरची सर्व मंडळी व मी कुशलपूर्वक आहे. ईश्वर कृपेने आई-बाबा तुम्ही पण कुशलपूर्वक असालच. आई बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत जा. वेळेवर जेवण करीत रहा. मी इकडे खूप आनंदात आहे. माझी काळजी करत जाऊ नका. माझ्या घरची मंडळी अतिशय चांगली आहे. माझे सासू-सासरे, व तुमचे जावई हे सर्व जण मला खूप लाडात ठेवतात. मी सासरी आहे की माहेरी आहे हा भास सुद्धा मला होऊ देत नाहीत. अगदी लाडाने मला वागवतात. आई तू बाबा ची काळजी घेत जा, त्यांना वेळेवर औषधी देत जा. बाबा तुम्ही आईची काळजी घेत जा. तुम्हाला माझी आठवण आली तर मनाला दुःख करून घेत जाऊ नका. मलाही तुमची फार आठवण येते. परंतु काय करावं मुलीचे लग्न झाल्यावर आपल्या घरी सासरी नांदायला प्रत्येक मुलगी जाते. तिचा जन्म ज्या घरात झाला , ती लहानाची मोठी जिथे झाली तिथेे तिचे सर्व लाड आई-वडिलांनी पुरवले तिला लहानाची मोठी करून शिक्षणाची जबाबदारी पूर्ण करून शेवटी तिला ते घर सोडून लग्न करून सासरी जावं लागतं....बर आई बाबा काळजी घ्या...
तुमची लड़की,
"yoga"
- अमित प्र. बडगे, नागपुर
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
पत्र लेखन
"सासरी गेलेल्या मुलीचे आई वडिलांना पत्र"
प्रिय तीर्थरूप बाबा,
स.न.वी.वी.
बाबा मी तुझी लाडाची लेक एकुलती एक मुलगी.बाबा तूम्ही मला लहान असताना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले. माझी प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण केली.मी लहान असताना.तुम्ही मला चिमणी,चिमुकली म्हणायचे तो क्षण आठवला की आजही कंठ दाटून येते .तुम्ही माझ्या शिक्षणा साठी खूप मेहनत घेतली.माझ्या अभ्यासात खूप लक्ष दिलं आणि मला तुमच्या सहावसातला प्रत्येक क्षण अनमोल वाटत होतं.पण तुम्ही माझ्यावर ची डायचे तेंव्हा मला तुमची भीती पण वाटायची.मी तुमचा प्रत्येक शब्द पाळला.मला लहानच मोठं केलं तुम्ही भाऊ मध्ये आणि माझ्या मध्ये कोणताच फरक केला नाही आणि तुम्ही माझा आधार आहात.तुम्ही आणि आई नि मला अतोनात प्रेम दिलं भाऊ मध्ये आणि माझ्यामध्ये भांडण झाल्यावर तुम्ही आवर्जून तुम्ही माझी बाजू घेत होतात.मला आनंद वाटत होता.मला एकडची मंडळी पण छान मिळाली आहे.तुम्ही मला भरल्या कुटुंबात कसं राहावं हे उत्तम संस्कार तुम्ही माझ्यावर केलात.त्या मूळ माझ्या घरात देखील खूप लोकांची वर्दळ असते.आणि सर्व लोकं माझ्या सोबत छान राहतात.तुमच्या जवयांचा स्वभावही मन मिलाऊ असल्या मुळे घरातील लोकं कंटाळवाणे होऊ देत नाही.मला माझी सासू देखील आई प्रमाणे प्रेम करणारी मिळाली आहे. घरातील लोकं समजदार आणि सुशील आहेत.
माझ्या दोन नणंद आहेत त्याही स्वभावाला छान आहेत. माझ्या सोबत मोठ्या बहिणी प्रमाणे वागतात माझे देर पण छान आहेत.मला ताईच म्हणतात.
बाबा माझी एक मनापासून इच्छा आहे की आई आणि तुम्ही माझ्या घरी एकदा यावं आणि माझ्या सुखी संसाराचा गाडा आपण पहावं.
बाबा मला तुमची आणि आईची ,भाऊची नियमित आठवण येते.पण होती ला पर्याय नाही.
आपण आपली काळजी घ्या.व आईची पण काळजी घ्या
पत्र लिहिताना बाबा कंठ आले दाटून
बस जास्त लिहीत नाही.
मला अशा आहे की नक्कीच आपल्या लाडक्या मुलीला भेट द्याल
तुझीच लाडकी
सोनू
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
प्रिय आई बाबांस
शि.सा.नमस्कार
आज सकाळीच तुळशी वृदांवनाला पाणी टाकत असतानाच काही पाखरे शीळ घालताना आकाशात दिसले.आणि मला तुमची खूप आठवण झाली नकळत सातवी आठवीत असतांना मराठीमध्ये शिकलेल्या 'माझिया माहेरा जा रे' या कवितेच्या ओळी आठवल्या
'माझिया माहेरा जा रे 'माझिया माहेरा जा रे ,माझिया माहेरा,पाखरारे, माझिया माहेरा।।
देते तुझ्या संगतीला उतावीळ माझे मन,वाट दाखवाया नीट माझी वेडी आठवण ।।माझिया माहेरा...
खूप दिवस झाले तुम्हा सर्वांची खूप आठवण मनात दाटली आहे.
कदाचित तुम्हाला वाटेल मला इथं सासुरवास आहे की काय..!पण तसं काहीच नाही.प्रेमळ सासूबाई,आणि बाबा तुमच्या इतकेच माझी काळजी घेणारे प्रेमळ सासरे लाभलेत...!पण तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आपल्या सर्वांना सोडून इथं आल्याची हूर हूर मनाला चाटून जाते.आणि मन भूतकाळातील आठवणीनंमध्ये रममाण होते.
जेव्हा कधी सासूबाई प्रेमाने जेवताना आग्रह करतात त्यावेळी मला आईच्या प्रेमळ दटावणीची आठवण येते,बाबांनी केलेल्या कोड कौतुकांच्या उबदार शब्दांची आठवण आली की मन कसं व्याकुळ बनते.मग कधीतरी वाटतं स्त्रियांनाच का बरं आपल्या माणसांना सोडून जाण्याची शिक्षा...! बरे असो.!
आपण दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीने मी इथल्या सर्वानाच आपलेसे करण्यात यशस्वी झाले आहे.माझ्या नकळत कानावर पडणारे गावातील बायांचे 'चांगली संस्कारशील सुनबाई मिळाली हो...' असे शब्द ऐकले की मन तुम्हा दोघांनी केलेल्या सांस्काराच्या अभिमानाने फुलून जाते. तुम्ही दिलेल्या संस्कारांच्या फुलोऱ्याचा
सुगंध इकडेही दरवळत ठेऊन माझी वाटचाल सुरू आहे.
आणि आई, हो तू ,बाबांना सारखी 'लाडाऊन ठेवलेत पोरीला....सासरी कसं होणार काय माहीत' असं बोलायचीस...पण बाबा तुमची 'लाडो' आपल्या आशीर्वादाने सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत झाली आहे.दररोज सकाळी लवकर उठण्याची आईने लावलेली सवय मला इथं उपयोगी पडत आहे...'लवकर उठून कामाला लागणे, म्हणजे वेळेची बचत..'हा आईचा शिरस्ता इथं आल्यावर मला पटायला लागला आहे.
इथला माझा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होऊन रात्री दहा वाजता संपतो.लवकर उठून घरातील आवरून ऑफिसला जाण्याची लगबग असते.किती वेगळं जीवन असतं हे....आईचं 'बाईपण' स्वतः बाई झाल्याशिवाय कळत नाही हेच खरं...! आता जबाबदारी पडल्यावर आपली आई किती ग्रेट 'व्यवस्थापक' होती ते लक्षात आलं!!
बाबांना असणारी झाडे लावण्याची हौस , त्यांची रोपांची काळजी घेण्याची पद्धत आठवली की त्यांनी माझ्यावर केलेल्या मायेची पाखरण आणि दिलेला खंबीर पाठींबा यांची सय आल्याशिवाय राहत नाही.'मुलगी शेवटी परक्याचं धन...'अशी सारखी टूम तू लावायचीस तेव्हा बाबाचं डोळ्यातलं दुःख कुठं तरी आता समजायला लागलं आहे.पाठवणीच्या वेळी बाबांनी दिलेल्या मोगऱ्याचं रोपटं खूप छान बहरले आहे..त्याच्या फुलांच्या सुगंधात दररोज तुम्ही माझ्या सोबत असल्याचा भास होतो.आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात असे हे पत्र तुम्हाला लिहिते याचं कदाचित आश्चर्य वाटत असेल....पण मनातील उत्स्फूर्त भावना व्यक्त करण्याचं इतकं प्रभावी माध्यम दुसरं कोणतंच नाही असं मला वाटतं. असो..!!काका काकूंना नमस्कार सांगा.काळजी घ्या!!
तुमची
-----------------------------------------------
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर(ठाणे)
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
पत्रलेखन (28)
विषय-सासरी गेलेल्या मुलीचे आई-बाबांस पत्र
प्रति,
आई,बाबा
मु.पो. माहेरनगरी
प्रिय,
आई,बाबा यांसी सप्रेम नमस्कार व चरणस्पर्श, तुमची आठवण सदा येत असते,पण काय करणार! दिल्या घरी सुखी रहा!असा आशीर्वाद तुम्ही दिलात आणि त्याचेच पालन करीत आहे. येथे सर्व ठीक आहे,तुम्ही दिलेल्या संस्कारा नुसार वागत आहे,चिंता नसावी.
सकाळी उठल्या पासून दिनक्रम सुरू होतो,आणि दिवस कधी संपतो हेच समजत नाही,माहेरी किती वेगळे असते.मनातील भावभावना व्यक्त करू शकतो,पण इथे बंधन आहेत, मी शिक्षिका म्हणून नोकरी करते पण घरात स्वतंत्रता कुठे?,पण पती जरी मनमोकळे असले तरी सासू,नणंद सर्व आपले नसतात,कितीही जीव टाकला तरी, सख्खे नाते कुठे असते,छोट्या गोष्टीने किती अर्थाचा अनर्थ होतो,मने जपावी लागतात,मी शाळेत शिक्षिका म्हणून मिरवत असेन पण घरी मी फक्त सामान्य स्त्री असते.मोठयाने बोलले, किंवा कधी मिश्किल हसणे तरीदेखील अंगठ येते,किती व काय काय सांभाळून वागायचे. घर, मुले,नोकरी आणि आलेले नातेवाईक यांची सरबराई,घरोघरी म्हणे मातीच्याच चुली,खरंच असं असतं मला नाही वाटत,कारण माझ्या मैत्रीणींच्या घरी असे नाही,त्यांचा घरी देखील दरारा आहे,आम्ही मात्र घाबरून आ....देखील काढायचे नाही,साधेपणाचा इतका त्रास होऊ शकतो का,पण शेवटी स्त्रियांना दोन्ही घरे सांभाळावी लागतात,पती स्वभावाने चांगले आहेत,म्हणून निभावून जाते,माहेरची आठवण आली तरी फक्त सुट्टीत व कार्यक्रमाला येणे,बाकी सासर हेच मानावे लागते.त्यातल्या त्यात माझा काळ तरी बरा होता,पण तु ही एक स्त्री असून तू अशा कधी तक्रारी केल्या नाहीस आणि तुझे कुटुंब तर बरेच मोठे होते,खरच त्या मानाने आपण सुखी आहोत या भावनेने जगले पाहिजे.
तुम्ही दोघांनी स्वतःची काळजी घ्या!मी आनंदात आहे,मन व्यक्त करावेसे वाटले, म्हणून पत्र लिहिले,घरातील सर्वाना नमस्कार सांग,छोट्यांना आशीर्वाद!
तुमचीच लाडकी लेक,
सुजू
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
पत्रलेखन
सासरी गेलेल्या मुलीचे आपल्या आई वडीलास पत्र.
--------------------------------------------
श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
(वाकदकर)
[१७]
................
तीर्थस्वरूप आई बाबा
सनविवि ,
बरेच दिवस झाले कधी पत्र लिहिण्याचा योग आला नाही,परंतु आज मला यांच्या कपाटात एक जुना अंतर्देशीय पत्र सापडलं आणि ते मुद्दाम मी लिहिण्यासाठी घेतल. आई तुला सोडून मी तुम्हाला पत्र लिहिणार म्हणून तुमच्यासाठीच हा लेखन प्रपंच.
आई मी सासरी आले आणि अगदी आनंदाने संसारात घडून गेले. पण तू दिलेली शिकवण मला मात्र घडोघडी ला मदत करत असते. आई तुझी आठवण येत नाही असा कोणता दिवस नाही आणि असं कोणतंच काम नाही.अगदी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी तू मला घाई गडबडीत उठून जे काम करायला लावायची आणि त्याची मला जी सवय पडली खरंच आई आज मला या सवयीमुळे माझ्या घरच्या लोकांचे मन जिंकण्यात फार मदत झाली.तुळशी बाबांसाठी सकाळीच उठून घरातील सडा-सारवण करून गरम पाण्याने तापलेली गुंडी आंघोळीला टाकायची आणि मग बाबांना ठेवायची, अगदी तसंच सकाळी उठून मी माझ्या साऱ्यांसाठी करते, आणि यातूनच मी त्यांचं मन जिंकून घेतलं. सकाळी उठणे शेणाने घर सारवणे चुलीला पोतराज घेणे दारासमोर रांगोळी काढणे तुळशीला पाणी घालून देवाची आंघोळ घालने, या सगळ्या गोष्टी माझ्या सासरच्यांना आवर्जून आवडतात.
आई तु मला लहानपणापासूनच डोक्यावर भांग कसा पाडायचा कपाळाला टिकली किंवा कुंकू कसं लावायचं हे सगळं शिकवलं आणि त्यामुळे आमच्या घरच्यांना सुद्धा माझे संस्कार फार आवडतात. आई आपण तसे परिस्थितीने गरीब आहोत, मला तर माझं जसं माहेर होतं तसंच सासर सुद्धा आहे. तीच गरिबी नशिबानं आपल्या पाचवीला पुजलेली. पण आई तु संसारांमध्ये शिकवलेली काटकसर मला मात्र माझ्या संसाराला पूर्तता करण्यासाठी कामी पडत आहे बर का...! कमी तेलात भाजी कशी बनवायची..., कमी साखरेत परंतु जिभेला गोड वाटणारा चहा कसा बनवायचा... घरात जे आहे तेच अगदी मोजकंच पण आवडीने कसं खायचं... एक गोड परंतु चौघांमध्ये वाटून कशा पद्धतीने खायची... तू माझ्याकडे उतरलेलं मला माझ्या संसारासाठी फार कामी पडते बघ...
माय म्हणजे संस्काराचीे मोठी शिदोरी म्हणतात ना ते अगदी खरच आहे बघ, ती शिदोरी मला दरोरोज खायला मिळत आहे.
माहेरी असताना मी थोडं जरी चांगलं काम केलं ,की तू लगेच माझ्या तोंडावरून हात कुरवाळायची आणि माझ्या केलेल्या कामात खूप कौतुक करायची ;पण आई माझी सगळं कौतुक बघायला तू इथे कधीच नसते ना याचं मनात दुःख वाटतं. आणि इथे मात्र मी कितीही केलं तरी तुझ्यासारखी कौतुकाची थाप मला कधीच मिळत नाही.
आई आता तू माझ्या जवळ नाही, परंतु माझ्या मनात मात्र तो सतत असतेस. आई घरी बाबांची काळजी घेत जा बरं का....माझ्या बाबांना मी सकाळी उठायची आंघोळीला पाणी घालायची त्यांची सुंदर इस्त्री केलेले कपडे आणि डोक्यावरची टोपी दिले की बाबा फार खुश ठेवायचे हां.... नक्कीच त्यांना माझी उणीव जाणवत असेल... पण तू माझ्या बाबांची काळजी घेत जा असं तुला सांगायची तरी गरज नाही आहे... कारण तूच मुद्दामून आम्हाला हे संस्कार दिलेत..
लहानपणी पोलका घालून असलेली तुझी छबी आज साडी जरी नेसते तरीसुद्धा तिला मात्र तिचं बालपण काय पाठवत राहते... तू आपल्या गरिबीला सावरून मला आवर्जून शाळेत पाठवायची, फाटक्या लुगड्यात असणारी तू माझ्यासाठी मात्र शाळेच्या चांगला ड्रेस आणायची... सुट्टीच्या दिवशी मला आवर्जून शेतात घेऊन जायची.... या सगळ्या गोष्टी मला माझ्या संसाराला साठी नक्कीच पूरक ठरत आहेत. तुझी मुलगी म्हणून मला सुद्धा माझा अभिमान वाटतोय....
तुझे संस्कार आणि बाबांची पुण्याई माझ्यासाठी मला आयुष्यात कमी पडत राहील... खूप लिहावं वाटतं परंतु लिहिण्याची मर्यादा आहे...
आई तूच माझे शब्द
आणि बाबा माझे पत्र
जगायला कसं पाहिजे
हे तुम्हीच शिकवलं सूत्र...
आपला आशीर्वाद असावा. पत्र पुरे करते.
तुमचीच -
छबी.
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
(15)
सासरी गेलेल्या मुलीचे आपल्या आई-बाबांना पत्र
तिर्थस्वरूप आई-बाबास साष्टांग नमस्कार,
पत्र लिहिण्यास कारण की,
आम्ही इकडे सगळे आनंदात आहोत तुम्ही सुद्धा आनंदात असाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते.
बऱ्याच दिवसांपासून पत्र लिहायचे होते पण वेळच मिळत नव्हता. 'पिंकी' नेमकीच झोपी गेलीये आणि 'हे' दोन दिवसांसाठी ऑफिसच्या कामानिमित्त औरंगाबादला गेलेत. माई (सासू) आणि अण्णा (सासरे) सुद्धा त्यांच्या खोलीत झोपलेत त्यामुळे आज पत्र लिहिण्यास घेतले.
मी इकडे खूप सुखा-समाधानात नांदत आहे. यांना नुकतीच पुढच्या पदावर बढती मिळाली आहे. माईंची तब्बेत थोडी खराब असते हल्ली पण इतकंही काळजी करण्यासारखे काही नाही. अण्णा पिंकीला रोज संध्याकाळी शेतात फेरफटका मारायला नेत असतात. पिंकीला त्यांच्या गोष्टी खूपच आवडतात. अगदी तुम्ही सांगायचा तशा. अण्णांची गोष्ट ऐकल्याशिवाय ती झोपतच नाही. तिच्याकडे बघितले की मला माझेच बालपण आठवते. तुमच्यासोबत शेतात जाणे, आईच्या कामात अडथळे आणणे, दादांसोबत भांडणे असं सगळं सगळं आठवायला लागतं. पिंकी सुद्धा बंटी सोबत (देराचा मुलगा) खूप खेळत असतो. दोघे अगदी संख्या बहीण-भावाप्रमाणे सोबत खेळतात, भांडतात. दोघांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही.
तुम्ही जस मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं अगदी तसंच 'हे' सुद्धा माझी व पिंकीची खूप काळजी घेत असतात.
आमची अजिबात काळजी नसावी. पिंकीच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या की आम्ही तिकडे नक्की येऊ. काळजी घ्या तब्बेतीची.
दादा आणि वहिनींना सुद्धा तब्बेतीची काळजी घ्यायला सांगा.
तुमचीच अनघा (छकुली)
गणेश सोळुंके, जालना
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
" पत्र लेखन "
" सासरी गेलेल्या सासुरवासीण मुलीचे आईस पत्र " [ 14 ]
तीर्थरूप आईस ,
तुझ्या बायडूचा शि . सा . नमस्कार .
विनंती विशेष पत्रास कारण की , मी इकडे सासरी येऊन जवळपास एक महिना झालाय . दिवस कसे भुर्रकन उडून जातात हे कळलेही नाही . आई मला माहीत आहे , तू खूपच हळवी व भोळी आहेस गं ! म्हणून तू मला तुझ्यासारखीच समजतेस हो ना ! पण मी खूपच धीट कोल्हीण आहे , हे तू माझ्या विवाहात पाहिलेस ना ! कशी हसलीस आता तू ! तो पाठवणीचा प्रसंग आठवून .... खरंच ! आई त्यावेळी अगदी सर्वच नातेवाईक , मैत्रीणी , वर्हाडीमंडळी रडत होते .... नी माझ्या डोळ्यात पाण्याचा थेंबही नाही ! अगदी नावालासुद्धा ? किती हसत हसत मी तुला निरोप दिलाय ! अशी मी अपवादात्मक मुलगी असेल नाही ? ते सर्व जाऊदे ! माझे भाऊ अनिल व सुनिल कसे आहेत गं ? ते माझी आठवण काढतात की नाही ? की दोघेही धिंगामस्ती करून तुला त्रास देतात ... अजूनही ते दोघेही नासमज आहेत गं ... कसं आहे बघ... बाबा देवाघरी जाऊन फक्त साडेतीन महिनेच तर झालेत ना ! काय उत्साहानं माझा साखरपुडा केला बाबांनी ! नि लग्नाच्या सर्व तयारीत असतांना अचानकच दुर्दैवाने ३ /०१ /२००१ ला अनपेक्षित मावशी व काकासह माहेरी पाठवून दिले .. कारण मलाही डि . एड . पाठाच्या लागोपाठ दोन सुट्या आल्या होत्या . व नंतर लग्नाच्या घाईगडबडीत तुझं माहेरी जाणे राहून जाईल म्हणून मीही तुला मामाकडे पाठविले . पण ? काय माहीत ती तुम्हां दोघांची शेवटची अशी भेट ठरेल म्हणून ! त्या दिवशी बाबा ड्यूटीवरून गस्त घालून आले नि दूध पिऊन झोपले . आणि बहुतेक माझ्या लग्नाची स्वप्नं रंगवीत रंगवीत बिदाईच्यावेळी ते खूपच रडले असणार ... कारण मी त्यांची एकूलती एक लाडकी बायडू होते ना ! खूपच लाडात तळहाताच्या फोडावानी जपलं मला ! आणि आता हा काळजाचा तुकडा बाहेर लग्न करून सासरी जाणार ! या विरहविचारांनेच जणू त्यांना पहाटे चार वाजता ह्दयविकाराचा खूपच मोठा झटका आला आणि ते कायमचे आपल्याला सोडून गेले ... पण या दुःखद प्रसंगी मी खचले नाही ! मीच मोठी असल्यामुळे सर्व जबाबदारी अंगी स्विकारून सर्वांना सावरले ...
आणि आता सासरीही तेच करीत आहे सर्वांना सावरत सावरत जीवन आनंदाने जगणे . माझ्या निर्भीड व धीटपणामुळे तू बिनधास्त रहा ! मी सर्व गोष्टी बरोबर हँडल करते गं ! आई तुला माहीत आहे का ? मी इकडे कुपटीला चुलीवर स्वयंपाक करण्यास शिकले . शिवाय दोन रूम शेणाने सारवायलाही शिकले . तू माझी अजिबात काळजी करू नकोस ! मी सर्व गोष्टी हसत खेळत शिकून घेत आहे . दादा व बाई दोघेही मायाळू व प्रेमळ आहेत गं ! शिवाय तुझा जावई तर अनमोल कोहीनूर हीराच आहे बघ ! शांत व समजूतदार स्वभाव आहे त्यांचा ! शिवाय निर्व्यसनी व शाकाहारी ! मग काय सात्विकवृत्ती , भांडण ना तंटा ! फक्त विनोद असतो इकडे ! सासरेही सूरेल आवाजात गाणी म्हणतात ... शिवाय नवीन आधुनिक विचारांचे .. माझा चतुर्थीचा उपवासही त्यांनी अंधश्रद्धा म्हणून सोडवायला भाग पाडले ...
आई मी खूपच मस्त मजेत आहे ... तू फक्त स्वतःच्या व भावांच्या तब्येतीची काळजी घे .. बरं मग पुरे करते गं पत्रलेखन ! भावांना माझा आशीर्वाद व तुला पुन्हा एकदा दंडवत ! ओके आई मी काही दिवसांत लवकरच येईल किनवला जावयांसह ! बाय आई !
तुझीच लाडकी
बायडू .
अर्चना दिगांबर गरूड
ता . किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552963376
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें