गुरुवार, 7 मई 2020

रोज एक लेख :- दिवस विसावा रक्तदान

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- विसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 08 मे 2020 शुक्रवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- रक्तदान*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*अनमोल भेट- रक्तदान*
               
         “दानात दान रक्तदान”
गोष्ट आहे 2005 ची.माझ्या जीवनातील पहिला रक्तदानाचा प्रसंग .आमचे मोठे बंधू (भाऊजी).किडणीच्या आजाराने त्रस्त होते .डायलेशिस प्रक्रियेचा उपयोग करून प्रकृती सुधारण्याच्या डाँक्टर कसोशीने प्रयत्न करू लागले .पण प्रकृती दिवसेंदिवस खालावतच होती. आता वेळ येऊन पोहचली ब्लड- डायलेशिसची.रक्ताच्या शोधात परिवारांची भटकंती सुरू होती.रक्तगट B +  शोधाशोध सुरू होता. मी पहिल्यांदा  रक्तदान करण्याचा मनाचा निर्धार पक्का केला.घरी आपले विचार सांगितले  .घरच्यांनी माझ्या निर्णयाचा आदर केला.आणि आम्ही त्याच दिवशी गोंदिया वरून नागपूरला निघालो. माझ्या रक्तगट पुन्हा तपासला गेला.त्यावेळी डाँक्टरांचा पहिला प्रश्न ,"तुम्हाला कोणी जबरदस्तीने पाठविले का?  भिती वाटते का ?"  मी ,"नाही "म्हणाली . त्यावेळी  माझ्या मनात  एकच विचार सुरू होता .तो म्हणजे भाऊजीं चे प्राण वाचले पाहिजे.  ह्या पहिल्या  रक्तदानानंतर आजपर्यत *5 सप्टेंबर शिक्षकदिन आणि 13 मे श्री श्री चा वाढदिवसाच्या निमित्तानं पंचेवीस वेळा रक्तदान केले आहे. अनेकांना  रक्तदानास प्रवृत्त करून नेत्रदानाचा संकल्प घेतलेला आहे 
         मानवाची निर्मिती ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती आहे. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराने दिलेली मोठी देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करतात .  एका मानवानेच रक्त मानवाचे जीव वाचून शकतो. दुसऱ्यावर मरण्याची पाळी    अपघातात येत असते  अतिरिक्त रक्तस्त्राव ,रक्तक्षय , कर्करोग    आणि इतर गंभीर आजारांमध्ये रोग्याला  रक्त  मिळाले नाही तर, तो रुग्ण  दगावण्याची शक्यता असते .
       अशावेळी एका मानवाचेच  रक्त  दुसऱ्या  मानवाचे प्राण वाचू शकतात .कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही  कोणत्याही प्राण्याचे रक्त  मानवाचे प्राण वाचू शकत नाही. मानवाचे रक्तदान हे  मानवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्तकरून देते. 
 *"रक्तदान आहे जीवनदान ,कारण यामुळेच वाचतात अनेकांचे प्राण "*
        दरवर्षी सुमारे  साडेसात लाख बाटल्या  रक्त लागते  .ही अत्यावश्यक गरज भागविण्यासाठी   फक्त  70 ते 75 टक्के पर्यायी  रक्तदाता  किंवा व्यावसायिक रक्तदान कडू न ही अत्यावश्यक गरज भागविली जात आहे. आता इच्छुक रक्तदातां ची काळाला  गरज आहे.मानवाच्या शरीरात साडेचार ते पाच  लीटर रक्त  शरीरामध्ये असते . केवळ 300ml रक्त काढले जाते . रक्तदानानंतर  छत्तीस तासांनी साधारणता रक्ताची पातळी पूर्ववत होते . साधारणता दोन ते तीन आठवड्यामध्ये रक्तपेशी पूर्ववत होतात .दान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.रक्तदान केल्यानंतर २० ते ३० मिनीटे विश्रांती नंतर ती व्यक्ती पुर्ववत काम करु शकते. रक्तदान करण्यासाठी साधारणतः १८पेक्षा जास्त व ६० पेक्षा कमी वय लागते. वजन ५० कि,ग्रॅ पेक्षा जास्त हवे. हिमोग्लोबिन १२.५% पेक्षा जास्त असावेत. 
काविळ, मलेरिया, टायफ़ाइड, डेंग्यु, चिकनगुनिया, एका वर्षामधे कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास, अनेमिया असल्यास, गुप्तरोग, क्षयरोग, कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे काही असाध्य आजार किंवा वयोपरत्वे आजार असल्यास रक्तदान करु नये. तसेच रक्तदाताच्या हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना नाकारले जाते . अशा वेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी खालील आहार घ्यावा. पालेभाजी- माठ, मेथी, चवळी व पालक, मोड आलेली कडधान्ये, फळे - चिकु, पपई, सफरचंद, आवळा, कलिंगड, केळे, संत्री, मोसंबी, द्राक्षे, ओला खजुर, भाज्या- ओले वाटाणे, भोपळा, सर्व हिरव्या फळभाज्या, पडवळ, परवर, गवार, चहा व पावटे खाण्याचे टाळावे.
रक्तदानास येण्यापुर्वी  रात्री शांत झोपणे,  आपला नियमित अहार घेणे विनाकारण कोणतेही औषध/गोळ्या घेऊ नयेत.
*"आपल्या वाढदिवसाला वाचून एखाद्याचे प्राण ,अनमोल भेट देऊन करूया रक्तदान"*
रक्तदानाचे फायदे : शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते, रक्तदानाचं ‘ब्लड डोनर’कार्ड मिळतं. आवश्यकता पडल्यास त्या कार्डावरून दात्याला विनामूल्य रक्त मिळतं, तुमच्या रक्तदान दुस-या रुग्णांसाठी जीवनदायी वरदान ठरतं.
दान केलेल्या रक्ताचं पुढं काय होतं? : रक्तपेढयांमध्ये दान केलेल्या रक्ताचा गट निश्चित केला जातो. त्यानंतर रक्ताच्या एचआयव्ही, कावीळ इत्यादी आजारांच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांनंतर रक्त रक्तपेढयांमधून वेगळं केलं जातं. काही वेळा रक्तातील विविध घटक वेगळे केले जातात. जसं की, फ्रेश फ्रोझन प्लाज्मा, पॅकसेल ब्लड, सिरम इत्यादी. भाजलेले रुग्ण, अतिरक्तस्राव झालेले रुग्ण, गंभीर अत्यवस्थ रुग्ण यांना हे रक्त दिले जातं.
रक्तदानानंतरची काळजी पुढीलप्रमाणे घ्यावे. रक्तदानानंतर लगेच शारीरिक श्रम, खेळणं, धावणं यापासून दूर राहावं. रक्तदानानंतर कमीत कमी ४८ तासांपर्यंत तरी मद्यपान करू नये. रक्तदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं जड वाहन चालवू नये. भरपूर पाणी प्यावं.
*"रक्त दान करून जोडा नवीन नाते ,असे केल्याने आपले काय जाते ?"*
       रक्तदान कुठे करावं?  कोणत्याही शासकीय रुग्णालयातील महानगरपालिका, रुग्णालय ज्या ठिकाणी रक्तपेढीची सोय आहे, त्या ठिकाणी करावं. मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते.  थॅलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्परोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्त घटक वेगळे केले जातात. (तांबडय़ा पेशी, रक्तिबबीका (प्लेटलेट्स) व प्लाझमा) अशापकारे आपल्या रक्तदानाने १ ते ३ रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

लेखिका 
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
 *( 9420516306  )*
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’*

*"माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दानधर्म म्हणजे रक्तदान”*. 
रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. गरजूंना रक्तदान हे आपल्याकडे नेहमीच उत्तम दान मानण्यात आले आहे. या दानामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. पण सर्वसाधारणपणे रक्तदानाबाबत खूप गैरसमज पहावयास मिळतात. यापैकी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे, रक्तदान केल्याने शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात, किंवा रक्तदानामुळे शरीर अशक्त होते, हा आहे. पण या गोष्टींमध्ये काही तथ्य नसून रक्तदान केल्याने शरीर निरोगी राहते, हे वास्तव आहे.रक्तदान केल्याने शरीरातील धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. तसेच रक्तदान केल्याने वजन कमी करण्यास ही मदत मिळते. वर्षातून दोन वेळा जरी रक्तदान केले, अरी त्यातून शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. रक्तदान केल्यानंतर शरीरामध्ये नव्या रक्तपेशी निर्माण होतात. त्यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा न येता काही प्रमाणात ताकदच येते. रक्तदान नियमितपणे करणाऱ्या व्यक्तींमध्ये लिव्हरशी निगडीत असणाऱ्या समस्या उद्भविण्याची शक्यता कमी असते. बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.शरीरामध्ये जर लोह अतिरिक्त असेल, तर त्यामुळे लिव्हरवर दबाव पडण्याची शक्यता असते. रक्तदान केल्याने शरीरातील लोहाची मात्र संतुलित होते. एक वेळ रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज उर्जा खर्च होत असते. रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.
*“मंदिरात जाऊन करता ईश्वरसेवा, रक्तदान करून करा समाजसेवा”*. 
बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो.
रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे? 
*"सेवाधर्म पुण्य आहे, रक्तदान महापुण्य आहे”*. 
वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत),  वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास, रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास, दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करता येते. जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.
रक्तदान कोण करू शकत नाहीत?
दात्याने आधीच्या ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले असल्यास, रक्तदात्याला मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास, रक्तदात्याला मागील १ वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास, ६ महिन्यापूर्वी त्याची मोठी शस्त्रकिया झाली असल्यास, गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.
ब्लड प्रेशर लो किवा हाय असणाऱ्यांनी रक्तदान करताना रक्तदाबाची चाचणी करून पहावी. उपाशीपोटी किवा खाऊन झाल्यावर अर्धा-तासापर्यंत रक्तदान करू नये. इतरही आजारांची चाचणी करून घ्यावी. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, कावीळ (ब, क प्रकारची), एड्स, मूत्रपिंड रोग, गुप्त रोग, यकृताच्या व्याधी असलेले, हे कायमचे बाद रक्तदाते
*“गंगेचे पाणी कधीही आटणार नाही, रक्तदान करणे आम्ही सोडणार नाही”*. 
स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र व कार्ड दिले जाते. ह्या कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते. रुग्णाचे पाण वाचविल्यामुळे आत्मिक समाधान मिळते. तसेच ३ रुग्णांचे प्राण वाचविल्याचा आनंदपण होतो. समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते.
*“तुम्ही आज करा रक्तदान, उद्या पुढची पिढी ठेवेल तुमचा मान”*
_________________________
*महेंद्र सोनेवाने, गोंदिया*
*मो. 9421802067*
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*रक्तदान*

आजकाल अनेक प्रकारच्या वादातून रक्ताची नाती सुद्धा एकमेकाचे वैरी झालेली आहेत. परंतु हे हेच रक्त अनेकांच्या कामी येणारे असते. आपला वैरभाव सोडून एकमेकाच्या उपयोगात येणारे कार्य जर आपल्या हातून घडले तर ते निश्चितच देशाची सेवा आणि समाजकार्य ठरू शकते. रक्ताच्या नात्यातील वैरभाव वेगळा आणि रक्त दान करणे हा भाग वेगळा. आपण सुशिक्षित म्हणून घेणारे लोक आहोत सुसंस्कृत असे आपण लोक आहोत आणि आज रक्तदान करणे ही काळाची गरज होऊन बसली आहे. मानवी रक्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कुठलेही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. अनेक क्षेत्रांमध्ये मानवाने प्रगती केलेली आहे परंतु मानवी रक्ताला आमच्या पर्याय निर्माण झालेला नाही, मानवी रक्ताचा साठा जास्त दिवस करून ठेवता येत नाही. त्यामुळे आवश्यकतेनुसार मानवाने रक्तदान करावे आणि त्याचा उपयोग दुसर्‍याचा जीव वाचवण्यासाठी करावा. वयाच्या आठराव्या वर्षापासून पुढे आपण जवळपास साठ पासष्ट वर्षापर्यंत रक्तदान करू शकतो. त्यासाठी आपण निरोगी असणे आवश्यक आहे मधुमेहाचा त्रास असाध्य रोगाने आपण त्रस्त किंवा ग्रस्त असू तर आपण रक्तदाते होऊ शकत नाही. आपल्या रक्ताने दोन तीन लोकांचे प्राण वाचवू शकतो.तेव्हा हे दान किती श्रेष्ठ आहे, हे आपल्या लक्षात मध्ये येईल. पंडुरोग, सिकल सेल्स, थॅलसेमिया अशा आजाराने ग्रस्त असणार्‍या बालकांना तसेच कर्करोग ग्रस्त असणाऱ्या रोग्यांना रक्ताची वारंवार आवश्यकता असते. आणि खरं पाहिलं तर कधीही कोणाला बसेल रक्ताची आवश्यकता भासत असेल हे सांगता येत नाही. आज-काल कोरोनाचा हैदोस निर्माण झाला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून काही रक्तदाते आजही पुढे येताना दिसतात परंतु सर्वांची ती जबाबदारी आहे.  परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येकाने रक्तदान करायला हवे. आपण दर तीन महिन्यांनी रक्तदान केले तर काही बिघडू शकत नाही. आपण रेबीज लस घेतली असेल किंवा आपल्याला विषमज्वर किंवा कावीळ असे त्रासाचे विकार असतील तर आपण रक्तदान करू शकत नाही. आपल्याला असाध्य रोग असतील तरीदेखील आपण करू शकत नाही रक्तदान करण्याने आपला देखील फायदा होतो. समोरच्याचा तर होतोच होतो. आपल्या रक्ताची  तपासणी केल्यानंतर आपल्याला  वजन तापमान रक्तातील वेगवेगळे घटक याची माहिती होते. रक्तगट, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण इत्यादी माहिती आपल्याला रक्तदान केल्यामुळे मिळू शकते. शिवाय नवीन रक्त तयार होत असताना आपली प्रतिकारशक्तीही वाढीस लागते. रक्तदान हे आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण पार पडत असताना केवळ आपण दुसऱ्याचा फायदा करतो असे नाही तर आपला देखील त्याच्यामध्ये फायदा आहे ही गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचले तर मिळणारे समाधान आणि आनंद निश्चितच अद्वितीय असतो. सामाजिक बांधिलकी म्हणून आपण रक्तदान केलेले कधीही वाया जात नाही कधीकाळी आपल्याला जर रक्ताची आवश्यकता भासली तर आपण दिलेले रक्त त्याबदल्यात मिळालेले प्रमाणपत्र दाखवून  त्याचा उपयोग आपण आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी निश्चित आणि करू शकतो. परंतु काही ठिकाणी व्यावसायिक रक्तदाते निर्माण झालेले आहे. सामाजिक बांधिलकी पेक्षा पैसे कमावणे हा यांचा हेतू  असतो. योग्य ठिकाणी किंवा रक्तदान शिबिरामध्ये आपण रक्तदान करून इतरांचे प्राण वाचवू शकतो. सामाजिक बांधिलकीचा वसा आपण पुढे चालवण्यासाठी रक्तदानाचा निर्धार करूया आणि रक्तदान करूया कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.

     *हणमंत पडवळ, उस्मानाबाद*
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
जागतिक रेडक्रॉस दिन 08 मे निमित्त प्रासंगिक लेख 

*रक्तदान : सर्वश्रेष्ठ दान*

 सृष्टीमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे मनुष्य. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने अनेक शोध लावले आहेत आणि संशोधन केले आहेत. त्यामुळे मानवी जीवन सुखदायक होणे शक्य झाले आहे. मात्र अजूनपर्यंत कोणत्याच शास्त्रज्ञाने मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या रक्ताचा शोध लावू शकला नाही. भविष्यात त्याचा शोध लागेल की नाही या याबात आत्ताच काही सांगता येणार नाही. रक्ताची निर्मिती कोणत्याही प्रयोगशाळेत शक्य नाही तर ते फक्त जिवंत माणसाच्या शरीरात तयार होऊ शकते. म्हणजे एखाद्या रुग्णास रक्ताची गरज भासली तर ते मनुष्यच पुरवठा करू शकतो. म्हणूनच सर्व दानात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणण्यास हरकत नाही. निरोगी माणसाच्या शरीरात पाच ते सहा लीटर रक्त नेहमी फिरत असते. त्यापैकी रक्तदान करताना फक्त 350 मिली एवढेच रक्त काढल्या जाते. काही कालावधीनंतर आपले शरीर ते रक्त लगेच भरून काढते. त्यामुळे रक्तदान विषयी आपल्या मनात असलेली भीती सर्वप्रथम दूर होणे अत्यावश्यक आहे. आज ही कित्येक लोकाना रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण न कळाल्यामुळे ते रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत. अनेक प्रकारच्या अनामिक भीती आणि शंका लोकांच्या मनात असल्यामुळे रक्तदान करण्यास पुढे येत नाहीत असे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वात प्रथम लोकांच्या मनातील ही भीती किंवा शंका दूर करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. रक्त दिल्याने आपल्या शरीरावर कुठलाही प्रतिकूल परिणाम होणार नाही. काही काळ थकवा आल्यासारखे वाटेल परंतु डॉक्टरांच्या सल्याने जर आपण वागलो तर लगेच पूर्ववत होता येते. तीन महिन्यानंतर परत एकदा रक्तदान करता येते. म्हणजे वर्षातुन चार वेळा आपण रक्तदान करू शकतो. आपण दिलेले रक्त कुण्या एकाचे नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून बऱ्याच जणाचे जीव वाचवू शकते. एखादे वेळेचे अन्नदान त्या भुकेल्या व्यक्तीचे एक किंवा दोन वेळच्या भुकेचे शमन करू शकते. एखाद्याला दिलेली आर्थिक मदतीची दान त्याचे जीवन दोन दिवस सुखाचे करू शकते मात्र रक्तदान हे एखाद्या व्यक्तीला आयुष्य प्रदान करू शकते, जे की सर्वात महत्वाचे आहे, असे वाटते. एखादा गंभीर अपघात झालेला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव होतो. अश्यावेळी त्यास खरी गरज असते रक्ताची. आजकाल तर अपघाताची संख्या भरपूर वाढली आहे. मग ऐनवेळी जर रुग्णास रक्त मिळाले नाही तर त्याच्या जीविताला धोका होऊ शकतो. महिलाना प्रसुतीच्या वेळी प्रचंड रक्तस्राव होतो. अश्या रक्तस्रावासारख्या समस्येला प्रत्येक महिलेला तोंड द्यावे लागते. वेळेवर रक्त मिळाले नाही तर बाळाच्या आईला आणि बाळाच्या जीवितेला धोका असू शकतो. एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला असेल त्यावेळी ही रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. लढाईच्या दरम्यान सैनिक जखमी झाल्यास त्यास रक्ताची गरज भासते. तो आपल्या जीवाचे रक्षण करतो तर त्याच्या जीवाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली नव्हे काय ? जेव्हा आपल्यावर रक्त मिळविण्याचे संकट निर्माण होते त्याच वेळी रक्तदानाचे महत्त्व लक्षात येते त्याशिवाय रक्ताचे महत्त्व लक्षात येत नाही. कुणी रक्तदानच केले नाही तर रक्तपेढ्यात रक्त कुठून येणार ? समाजात प्रत्येक ठिकाणी जात, धर्म, पंथ, अमका, तमका असे वर्गीकरण केल्या जाते मात्र रक्त मागणी करताना हे रक्त कुणाचे आहे ? हे विचारल्या जात नाही. कारण सर्वांचे रक्त लाल आणि लालच असते. तसे रक्तात सुद्धा प्रमुख चार गट आहेत. ए, बी, एबी, आणि ओ असे चार रक्तगटाचे प्रकार आहेत. ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त कोणालाही चालते म्हणून या रक्तगटाला ' जागतिक रक्तदाता ' असे संबोधिले जाते. अश्या लोकांची संख्या एकूण लोकसंखेच्या 40 ते 46 टक्के एवढी आढळून येते. आपला जो रक्तगट आहे तेच रक्त आपणास दिले जाते.अपवाद ओ रक्तगट सर्वाना दिला जातो मात्र त्या ओ रक्तगटाच्या व्यक्तीला त्याच रक्तगटाचे रक्त द्यावे लागते. वेळेवर रक्त मिळण्यासाठी प्रत्येकजण शहरातील रक्तपेढ्याकडे धाव घेतात. शिबिराच्या माध्यमातून रक्तपेढ्या रक्त संकलित करीत असतात. म्हणून आपणास वेळेवर रक्त उपलब्ध होत असते. या रक्तपेढ्यात मोठ्या प्रमाणावर रक्त संकलित होण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन होणेे आवश्यक आहे. महापुरुषाच्या जयंत्या, पुण्यतिथ्या किंवा काही विशेष कार्यक्रम असेल तेंव्हा डीजे लावून नाच गाणे करण्यापेक्षा रक्तदान शिबीराचे आयोजन करून त्याठिकाणी दहा लीटर रक्त संकलन केल्यास खरी जयंती वा पुण्यतिथी साजरा केल्याचा आनंद मिळेल. वर्षातुन एकदा येणाऱ्या जन्मदिवशी बहुतांशजण आपल्या आणि मित्रांच्या आनंदासाठी बर्थडे पार्टीचे आयोजन करून हजारो पैश्याची उधळपट्टी करतात. त्याऐवजी मित्रांसह सर्वानी रक्तदान करण्याचा निर्णय घेतल्यास बर्थडे बॉयला किंवा गर्लला दीर्घायुष्य तरी लाभेल. एका व्यक्तीने शंभर वेळा रक्तदान करण्यापेक्षा शंभर जणानी एक वेळा केलेले रक्तदान जास्त चांगले ठरेल. रक्तदान केल्यामुळे असंख्य असे फायदे देखील आहेत. सर्वात पहिल्यांदा आपल्या रक्ताची यनिमित्ताने चाचणी होते. त्यामुळे आपणास आपल्या निरोगी शरीराची माहिती होते. आपला रक्तगट कळण्यास मदत होते. रक्तदान केल्याने आपणास एक प्रमाणपत्र दिले जाते ज्याच्यामुळे आपणास कधी रक्ताची गरज भासली तर पहिल्या प्रथम प्राधान्याने आपला विचार केला जातो. सर्वात महत्वाचे म्हणजे मानसिक समाधान मिळते. रक्तदान करणाऱ्या कर्मचारी व्यक्तीला अर्ध्या दिवसाची पगारी सुट्टी मिळते. सुशिक्षित आणि सज्ञान लोक सुद्धा रक्तदानाच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. म्हणून प्रत्येक कर्मचारी वर्षातुन एकदा तरी रक्तदान करावे अशी यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. भविष्यात रक्तदान करणाऱ्या कर्मचारी लोकांना एका दिवसाची पगारी सुट्टी दिली जावी आणि रक्तदान करणाऱ्या कर्मचारी लोकांचा वर्षातुन एकदा जागतिक रेडक्रॉस दिनाच्या दिवशी किंवा अन्य दिवशी यथोचित सत्कार आणि सन्मान केल्यास रक्तदान विषयी लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत मिळू शकेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा सेवाभावी संस्थेने रक्तदान केलेल्या लोकांचा सर्वासमक्ष नागरी सत्कार करावा म्हणजे लोकांत याविषयी जागृती निर्माण होईल. प्रत्येकाने वर्षातुन कमीत कमी एकदा तरी रक्तदान करण्याचा संकल्प केल्यास हजारों लीटर रक्त संकलन होऊ शकते. रक्तदानामुळे नकळतपणे आपल्या हातून एक चांगले कार्य घडते. म्हणून जीवनात रक्तदान करण्यापेक्षा कोणतेच दान श्रेष्ठ नाही हे समजून घेऊन 18 ते 60 वयोगटातील निरोगी लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

 - नागोराव सा. येवतीकर स्तंभलेखक, मु. येवती ता. धर्माबाद 9423625769
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*रक्तदान:श्रेष्टदान*

"सामाजिक बांधिलकी जाणा
आणि विनासंकोच करा रक्तदान
आजारी व्यक्तीच्या कामी येणार
तुमच्या रक्ताने वाचेल त्याचे प्राण"

       'रक्तदान हेच श्रेष्टदान' असं प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी घोषवाक्य नेहमीच ऐकतो तरीपण ज्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी जागृती या विशाल लोकसंख्येच्या देशात व्हायला हवी त्यापेक्षा खूप कमी लोक रक्तदान करतांना दिसतात.रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील रक्त कमी होते अशा काही भ्रामक समजुती असल्या कारणाने रक्तदान करायला व्यक्ती पुढे धजावत नाही पण अशा समजुती त्यांच्या मनातून काढून रक्तदानाची भीती काढण्यासाठी समाजात जाणीवजागृती होणे गरजेचे आहे.वेगवेगळ्या आजाराने बाधित असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासते.सिकलसेल हा आजार असलेल्या व्यक्तीला दर महिन्याला रक्ताचा पुरवठा करावा लागतो यासाठी रक्तपेढीमध्ये रक्त असल्यास रुग्णाला देऊ शकतो पण रक्तच रक्तपेढीत उपलब्ध नसल्यास त्या रुग्णाला प्राणाला मुकावे लागू शकते.आपल्या एकवेळच्या रक्तदान केल्याने त्या रुग्णाचा प्राण वाचू शकतो यासारख पुण्यवान कार्य कोणतं असू शकत नाही यासाठी दरवर्षी व्यक्ती,संस्था,महापुरुष यांच्या जयंती,पुण्यतिथी निमित्याने रक्तदान शिबिर आयोजित करून रक्ताचा संग्रह रक्तपेढीत करण्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करणे गरजेचे आहे.
        सर्व मानवासाहित प्रत्येक प्राण्यांचे रक्त हे रंगाने लाल असते.मनुष्यात वेगवेगळे जात,धर्म,पंथ असले तरी सर्वांचे रक्त समान असते.मानवी शरीरातील रक्त हा घटक सर्वाना एका धाग्यात बांधून ठेवण्याचे कार्य करीत असतो म्हणून स्वतः दरवर्षी वाढदिवसाचे निमित्य,वेगवेगळे दिनविशेष ध्यानात घेऊन रक्तदान करावे.आपल्या शरीरात जवळपास 5 ते 6 लिटर रक्त असते जरी आपण रक्तदान केलं तर फक्त 300 मिली रक्त घेतले जाते आणि तेवढेच रक्त काही दिवसात भरून निघते.जवळपास वर्षातून तीन महिन्यांच्या अंतराने चारदा रक्तदान करता येऊ शकते यात आपला खूपच फायदा आहे.रक्तदात्याच्या रक्ताची तपासणी विनामूल्य होते,कोणताही असाध्य आजार असल्यास कळविले जाते.ज्याप्रमाणे आपण दिलेले रक्त दुसऱ्याचा प्राण वाचवू शकते त्याप्रमाणे आपल्याला देखील आजार असल्यास माहिती मिळते.रक्तदान केल्यानंतर रक्तगट कोणता याची आपल्याला माहिती मिळते.ए, बी,एबी आणि ओ असे रक्ताचे चार गट आहेत.ज्या व्यक्तीचा 'एबी' रक्तगट आहे त्याला 'सर्वयोग्य ग्राही' रक्त म्हटल्या जाते तर 'ओ' रक्तगट असलेला व्यक्ती कोणत्याही गटातील व्यक्तीला रक्त देऊ शकतो पण घेतांना केवळ ओ गटाचीच आवश्यकता असते आणि ज्यां रुग्णाला रक्ताची आवश्यकता आहे त्यांचा जो गट असेल तेच रक्त द्यावे लागते यासाठी सामाजिक संस्थेने रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तपेढीत रक्त संग्रह करून आवश्यक त्या रुग्णाला देता येऊ शकते.रक्तदान केलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र मिळते आणि दोन महिन्यात तेच रक्त त्यांच्या कुटुंबियातील,नातेवाईक यांना गरजेनुसार दिलेल्या कार्डनुसार रक्त मोफत मिळू शकते म्हणून कोणताही मनात संकोच न ठेवता रक्तदान करू या व इतरांना देखील प्रोत्साहित करू या.
         आज कोरोनासदृश परिस्थिती असल्याने रक्ताची खूप गरज आहे.टाळेबंदी-1 ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे यांनी रक्तपेढीत केवळ आठवडाभर रक्त पुरेल यासाठी राज्यातील युवक,युवती,संस्था,सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधवांना रक्तदान करण्याचे आवाहन केले परंतु कोरोना नावाचा अदृश्य सूक्ष्मतम विषाणूने भारतासह जगात हाहाकार माजविल्यामुळे कोणीही बाहेर पडून रक्तदान करत नव्हते.अशा कठीण प्रसंगात देखील शारीरिक सामाजिक अंतर पार पाडून रक्तदान केलंय अशा सर्व व्यक्तीचे अभिनंदन करतो कारण संकट काळात मदत करून सामाजिक बांधिलकीची जपणूक करतो तोच खरा व्यक्ती आहे त्यामुळे कोणतीही अनामिक भीती मनात न ठेवता रक्तदान करावे.
         संचारबंदीच्या काळात मा. राजेश टोपे यांच्या आवाहनाला साथ देत गोंडपीपरी ओबीसी युवा मंचच्या द्वारे रक्तदान शिबिर आयोजित करून 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले असाच प्रकारे आर्थिक मदतीपेक्षा सर्वाधिक महत्व रक्ताला दिलं जाते कारण रक्त कोणत्याही प्रयोगशाळेत तयार केल्या जात नाही तर जिवंत व्यक्तीच्या शरीरातूनच द्यावे लागते त्यामुळे आपला समाजात जन्म झाला,समाजात राहतो,समाजाशी नाळ जुळलेली असल्याने स्वतः,संस्था,संघटना यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करून सन्मान वाढवावा.प्रत्येक व्यक्तीने संकल्प करावा की स्वतःच्या वाढदिवसाला रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचवावे.रक्तदान केल्याने रक्त कमी होते अशा अनाठायी गोष्टीपासून दूर राहावे व स्वतःसाहित इतरांना देखील रक्तदान करण्यास प्रोत्साहित करावे.व्यक्तिशः मी माझ्या वाढदिवशी व शिक्षक दिनाचा औचित्य साधून नियमितपणे रक्तदान करीत असतो असाच संकल्प प्रत्येकांनी करावा व इतरांचाही जीव वाचविण्यात आपले योगदान द्यावे.

✒ श्री दुशांत बाबुराव निमकर
     चक फुटाणा, चंद्रपूर
dushantnimkar15@gmail.com
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
रक्तदान- श्रेष्ठदान

 माणूसच माणसाला वाचवतो. पैशाने नाही तर रक्ताने. बऱ्याचदा कर्करोग, प्रसूती अपघाता दरम्यान रक्ताची गरज भासते. त्यावेळी रक्त उपयोगी पडते. काही लोक पैशासाठी, स्वतःचे पोट भरण्यासाठी पण रक्तदान करतात. रक्तदान करताना प्रथम रक्तदान करणाऱ्यांचे हिमोग्लोबिन तपासले जाते. ते जर योग्य प्रमाणात असेल तरच रक्तदान करता येते. साधारण चार ते पाच लिटर रक्त मानवी शरीरात असते. त्यातील ५० ते ३०० मिली लिटर एवढेच रक्त एकावेळी काढले जाते. आपली कधीकधी ओळख पण नसते त्या व्यक्तीशी. पण त्याचं रक्त आपल्या उपयोगी पडते. रक्तदान केलेल्या रक्ताची प्रयोगशाळेमध्ये विविध रोगांसाठी चाचणी केली जाते. मग ते रक्त रुग्णाला दिले जाते. आजकाल बऱ्याच रक्त पेढ्या पुढाकार घेऊन हे कार्य अनेक सोसायट्यांमध्ये राबवतात. लोक उत्स्फूर्तपणे आपला या गोष्टीसाठी हातभार लावतात. साधारण तीन महिन्यातून एकदा रक्तदान करायला काहीच हरकत नाही. रक्तदान केल्यानंतर एक दोन आठवड्यात परत रक्ताची पातळी पूर्ववत होते. रक्तदान केल्यानंतर लगेच खूप जड शारीरिक कामे करू नयेत. वेगळेच समाधान मिळते रक्तदान केल्यानंतर. कोणाला तरी उपयोगी पडलो याचे.

प्रिती दबडे, पुणे 9326822998
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
!!" रक्तदान " !!                              " देणारानी देत जावे , घेणार्याने घेत जावे , घेता घेता देणार्याचे हात ही घ्यावे ." हे आपण नेहमी ऐकतो पण ऐकताना त्यातील अर्थ समजावून घेतोच असे नाही म्हणून त्याकडे विशेष असे लक्ष देऊन देण्यासाठी जे पुढे येत असतात त्यांची दातृत्वाची सवय आपल्या हाताला आली पाहिजे म्हणून देण्यार्याचे हात ही घ्यावे हा भाव त्यामध्ये आहे .            आता दान देणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे . काय काय दान दिले जाते पूर्वी भूदान देणे महत्त्वाचे मानले जायचे , कारण भूदान म्हणजे जमिन दान देणं म्हणजे ती एखाद्याला बक्षीस दिली जायची . कालांतराने तसे दान बंद झाले असो नंतर सवर्ण दान देणं हेही महत्त्वाचे मानले जायचे . आता .तेही बंद झाले कारण भाव गगनाला भिडले आहेत . जाऊद्या ते ही आता शक्य नाही . मग गो दान देणं हेही महत्त्वाचे मानले जायचे .पण आता जनावरे दुर्मिळ झाले तेही आता इतिहासात जमा झालं . आता राहीले कन्यादान भारतीय संस्कृतीमध्ये कन्यादानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे .
अशी दानाची भूदान, सुवर्णदान, गो दान, आणि कन्यादान ही स्वरूपे असताना ही संकल्पना अपुरी राहते म्हणून ही संकल्पना दृढ करण्यासाठी दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान होय .             
वरील मी चर्चा केलेली दानं ही दान देण्यासाठी पाञ सतपाञ असावी लागतात . जर दान देणारे देत राहीले आणि दान जर आऊट गेले तर फसगत होऊ शकते . म्हणून वरील दान देताना थोडा विचार केला पाहिजे कारण त्या दानामूळे आर्थिक नुकसान होत असते , झल सहन करावी लागते .
पण रक्त दान देणं म्हणजे जीव दान देणं होय म्हणून या दानाला वरील दानापेक्षा हजार पट जास्त महत्व आहे . रक्त दान प्रत्येक माणसाने दिले पाहिजे केले पाहिजे .
एखादे इच्छित दान जरी एखाद्या दात्यांने दिले नाही तर एवढा म्हणावा एवढा फरक त्या मध्ये पडणार नसतो पण.रक्तदानाचे तसे नसते एखाद्याच्या दानाने एखाद्याचे नक्कीच प्राण वाचला जाऊ शकतो .म्हणून महात्म्ये म्हणून गेलेत " दाता तोचि जाणा ! नारायणा स्मरवी ! " मी असे म्हणेन " दाता तोचि जाणा जगी ! जो जगता जगता दुसर्याला जगी ! (जीवंत ठेवी )     
      रक्ताला दान देताना कोणत्याही गोष्टीचे बंधन नाही नाही .जात, धर्म, पंथ वंश , उच्च निच , सान - थोर असं कोणत्याही प्रकारचा अडसर रक्त देणाराला किंबहुना घेणाराला नाही . माणूसपण , माणूसकी हाच काय तर त्या मधील मुख्य धागा आहे सुञ.आहे .
       रक्त दिल्याने रक्त दात्याचे रक्त कमी होत नाही विद्या दान दिल्या सारखी अंतरक्रिया तेथे घडते जसे ज्ञान दिल्याने वाढते न दिल्यास नष्ट होते तसे रक्त. न दिल्याने जरी नष्ट होत नसले तरी ते वाढत नाही पण रक्तदान केले कि लगेच ते वाढते . हा अनुभव आहे . म्हणून रक्त दान सर्व दानात " उत्तम दान " समजले जाते.रक्ताला जगात अतिशय महत्व आहे कारण मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने खूप अशी प्रगती साधलेली आहे निसर्गावर सुद्धा मानव विजय मिळवू पाहत आहे काही काही गोष्टींत अंकुश प्राप्त मानवाने केला ही आहे पण रक्त तयार करणं कदापिही शक्य होणार नाही .
म्हणून मानवी रक्तासाठी मानवच हवा म्हणजे कृञिम निर्मिती नाही .विज्ञान येथे हतबल !
रक्त ..रक्त....रक्तदान..ही कल्पनाच अतिशय भावनिक आणि जीव ..जीवन या शी संबंधित आहे . रक्त दुसर्याचा जीवच वाचवते . कित्येक आजार असे आहेत की ते ज्या कोणाला जडलेत त्यांना रक्त वृद्धी होऊच देत नाहीत अशा वेळी सदर रूग्णाला कृञिम रक्त घालावे लागते .आणि अशा वेळी रक्ताचे महत्त्व सर्वाना समजते . रक्त एक प्रकारची संजीवनीच आहे म्हणून रक्तदान श्रेष्ठ दान , उत्तम दान . स्वातंत्र्यकालात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी रक्ताला अतिशय महत्त्वाचा भाग मानले , आणि म्हणून पर्यायाने त्या " आझाद हिंद सेने मध्ये" सामील होण्यासाठी माणसांची गरज असताना नेताजी माणसे द्या नाही म्हणत तर ते म्हणतात " तूम   मुझे खून दो ! मै तूम्हे आझादी दुंगा !! याचा अर्थ असा रक्त सांडणारे सैनिक सशक्त सैनिक जर भेटले तर स्वातंत्र्य नक्कीच मिळेल .
या रक्ताला अतिशय अशी किमंत आहे ती पैस्या मध्ये मोजता येत नाही सर्व माणसांचे जगातील रक्त लालच आहे कोणत्याही माणसाचे रक्त पांढरे हिरवे नाही ते लालच आहे म्हणून रक्त हे जीवन आहे , रक्त सर्वस्व आहे म्हणून ज्यांना कोणाला यथामति रक्त दान करता येईल त्याने स्वत ईच्छा शक्तीने देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे न देता येईल त्याने या मोहिमेत सामिल झाले पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगेन  धन्यवाद!!

          भागवत लक्ष्मण गर्कळ बीड
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°





कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...