शुक्रवार, 22 मई 2020

रोज एक लेख : दिवस चौतीसावा प्राथमिक शिक्षण

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- चौतीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 22 मे 2020 शुक्रवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- प्राथमिक शिक्षण*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
प्राथमिक शिक्षण : शिक्षणाचा पाया की मोहमाया ?
प्राथमिक शिक्षण हा शिक्षण प्रक्रियेचा पाया समजला जातो. प्राथमिक शिक्षणाला आपण मूलभूत शिक्षण सुद्धा म्हणू शकतो.
प्राथमिक शिक्षणामध्ये इयत्ता पहिले ते पाचवी पर्यंतच्या शिक्षणाचा समावेश असतो. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीचे करण्यात आलेले आहे.
RTE कायद्यामुळे आपली शिक्षण पद्धती हि शिक्षक केंद्री न राहता विद्यार्थी केंद्री बनली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल यासाठी बऱ्याच योजना शासन राबवत आहे. या विविध योजना राबवितांना यामागचा मूळ उद्देशच बाजूला राहतोय की काय असे वाटायला लागले आहे. कारण, मध्यान्न योजना हि मुलांना सकस आहार मिळावा या हेतूने सुरु करण्यात आली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेणे यासाठी सुद्धा शासन स्तरावर विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना, अस्वच्छ परिसरातील कामगारांच्या बालकांसाठी शिष्यवृत्ती योजना, अपंग शिष्यवृत्ती तसेच सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मुलींसाठी उपस्थिती भत्ता यासारख्या विविध योजना प्राथमिक शिक्षणामध्ये राबविण्यात येत आहेत. या योजना विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असल्यातरी या योजना राबविण्यासाठी शासनाकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी भरती झालेली नसते. या योजना राबवितांना शिक्षकांचीच त्रेधातिरपीट उडत असते. 
मध्यान्न भोजन आहाराचा तपशील ठेवणे, विविध योजनांची मुलांचे बँक पासबुक जमा करणे, आधार कार्ड जमा करणे, शाळाबाह्य मुले शोधणे, मुलांची सर्व माहिती ऑनलाईन करणे, टपाल बघणे, विविध योजनांच्या मिटींगला हजार राहणे यासारख्या अध्यापन करण्याव्यतिरिक्त सागळी कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे अध्ययन-अध्यापन व्यवस्थेत अडथळे निर्माण होत आहेत. 
'हे नसे थोडके' म्हणून की काय, जनगणना, मतदार यादी, मतदान प्रक्रिया यासारख्या अशैक्षणिक कामातच शिक्षकांचा वेळ जातोय. अध्यापन सोडून बाकी सर्व कामात शिक्षक गुंतलेले दिसत आहेत. 
मुलांना खरंच प्राथमिक शिक्षण द्यायचे असेल, त्यांना शिक्षणात गोडी लावायची असेल तर शिक्षकांना फक्त अध्यापन करण्याचेच काम दिले गेले पाहिजे. व अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली पाहिजे. अन्यथा अशा कितीही योजना आल्या तरी यातून काही साध्य होणार नाही. शासनाने शिक्षण व्यवस्थेबद्दल गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे नसता 'ये रे माझ्या मागल्या' असं व्हायला नको.
प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा 'मूळ पाया' असं आपण म्हणत असलो तरी याच मुळावर जर घाव घातल्या जात असेल तर हाच पाया 'मोहमाया' ठरू नये म्हणजे मिळवलं... 
गणेश सोळुंके, जालना
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 *प्राथमिक शिक्षण: शोध*
शिक्षण हे आयुष्याला एका उंचीवर घेऊन जाणारे साधन आहे. पण आजकाल शिक्षण क्षेत्रात होत असणारे अमुलाग्र बदल आणि शाळा प्रशासन यांचेकडून होत असणारी लूट बघता शिक्षण घेताना विद्यार्थीच्या आणि ते मिळवून देताना पालकांच्या नाकीनऊ येत आहे. नावारूपाला आलेल्या शाळा आणि शिक्षण संस्था स्वतःच्या मनाप्रमाणे फीस उकळून पालकांची कोंडी करताना दिसतात. कांही
वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. शाळा प्रवेश सहज आणि सुलभ होते,पणआज शाळा प्रवेश मग ते पूर्व प्राथमिक स्तर असो वा प्राथमिक माध्यमिक वा उच्च माध्यमिक सर्वच ठिकाणी अत्यंत गुंतागुंती दिसून येते. ज्युनियर के. जी. मध्येही प्रवेश घेताना आईवडिलांची दमछाक होते. शाळेत प्रवेश घेणे जसे कठीण वाटते आहे तसेच त्यांच्या नियमाचे बंधनही भलतेच कठीण आहे. एकदा प्रवेश मिळाला की निवांत असे समजण्याचे कारण नाही. कारण प्रत्येक शाळेचे अनोखे आणि विचित्र नियम असतात. साधारण शहरातही पूर्व प्राथमिकसाठी हजारोंच्या घरातच फिस असते.. नंतर त्या शाळेचा आगळावेगळा गणवेश त्याचा खर्च, आठवड्यातून दोन किंवा तीन ड्रेस, बुट आणि स्वतंत्र पुस्तीका शिस्तीच्या नावाखाली नवे नवे प्रयोग यामुळे मुले आणि पालक दोघेही त्रस्त होतात. पालक पुरवठा करुन आणि मुलं नियमात अडकून. गॅदरिंग नावाच्या प्रकारात तर हेतू बाजूला राहतो आणि कलागुणांना वाव हे फक्त नावापुरतेच राहते. इथेही शाळांच्या पुढाकारातूनच पालकांनी ड्रे परी इ. बाबत वागावे लागते. हे पूर्व प्राथमिक बाबत झाले. प्राथमिक शाळेत प्रवेश घेतानाही पालकांची अवस्था पाहण्याजोगी असते.जिल्हा परिषदेच्या शाळा अगदीच नाविन्यपूर्ण असूनही लुभावणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या आणि शहरातील शाळा गाडयांच्या लवाजमा घेऊन गावोगावी धावत असतात. त्यांच्या या झगमगाटाकडे पालक आकर्षित होतात आणि आपल्या पाल्यांना त्या शाळेत पाठवतात. खूप असा भूर्दंड सहन करून आणि लगेच दुसऱ्या वर्षी परत तेच पालक आपल्या पाल्यांना  जिल्हा परिषद शाळेत घेऊन येतात. ही द्विधा अवस्था पालकांची त्रेधा उडवणारी आहे. खरं पाहता आजकाल जिल्हा परिषद शाळा अत्यंत चांगल्या विकसीत झाल्या आहेत. त्यांची गुणवत्ता नावाजन्याजोगी नक्कीच झालेली आहे.पूर्वी मनपा किंवा जिपच्या शाळाबाबत ओरड असायची आता जिपच्या शाळेत पुढील कांही वर्षाचे प्रवेश आजच निश्चित झालेले आहेत. अत्यंत नावारूपाला आलेल्या आणि केवळ बाहय अंगच नव्हे तर अंतरंगही जबरदस्त असणाऱ्या शाळा आहेत. आणि प्राथमिक मध्येच घडणारे पुढे बिघडू शकत नाहीत. म्हणून पालकांनी चोखंदळ बनून आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करावेत. पण पालकांची भपकेगिरीकडील ओढ पाल्यांच्या भवितव्यासाठी अडचण निर्माण करते. उच्च शिक्षण घेत असताना तर पालकांची अवस्था खूपच दयनिय झालेली असते.आरक्षण, फी, आणि ऑनलाईन पद्धती या सर्व गोष्टीचे सखोल ज्ञान मुळात पालकांना नसते. आणि पाल्यांना या गोष्टी नविन असतात. घराजवळ अगर जवळच्या शहरात असे उच्च शिक्षण मिळत नाही. मेट्रोसिटीत जाऊन असे शिक्षण पैशाने परवडत नाही, आणि ते दिल्याशिवाय गत्यंतरही नसते. मग पालक व्याजाने रकमा काढून प्रसंगी मालमत्ता विकून शिक्षण देण्याचा प्रयास करतात. पण त्याचं फलीत काय आणि किती हा संशोधनाचा विषय आहे. एकंदरीत शिक्षण हे कोणत्याही स्तरावरचे असो प्रवेश प्रक्रिया किचकट होताना दिसते. अर्थात ती आवश्यकता झालेली आहे. सर्वत्र नसेल पण झाली आहे .आणि पालकाच्यासाठी ही प्रक्रिया आवघड आणि त्रासदायी आणि क्लेषदायी आहे. तेव्हा बालक आणि पालक सावधान व्हा, धैर्यानं घ्या. या प्रक्रियेतून जायचे आहे. जुन महिना आलाच आहे. प्रवेश प्रक्रिया आता सुरू होत आहे. आपणास माझ्या शुभेच्छा... !!
                 
          *हणमंत पडवळ, उस्मानाबाद
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
*प्राथमिक शिक्षण*
दुशांत निमकर,चंद्रपूर (02)

"प्रगतीचे आहे लक्षण
सर्वांनी घ्यावे शिक्षण"
         मानवाने जीवन कसे जगावे??यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे.भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असतांना केवळ उच्चवर्णीयांचीच शिक्षणावर मक्तेदारी होती.बोटावर मोजण्या इतपतच लोक शिक्षण घेत असत.बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नव्हताच त्यांना सांगितलेले कार्य व परंपरागत व्यवसायात गुंतलेले असायचे.इंगजांच्या सावटाला न जुमानता गोपालकृष्ण गोखले,महात्मा ज्योतिबा फुले,लोकमान्य टिळक,गोपाळ गणेश आगरकर,महर्षी धो.के.कर्वे या सारख्या समाजसुधारकांनी समाजप्रबोधन करून जागृती निर्माण करायला सुरुवात केली.त्या काळात पुरुषांना देखील शिक्षण घेण्यावर मज्जाव केला होता आणि महिलांना तर घराचा उंबरठा ओलांडने पाप समजले जायचे.अशावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे जिल्ह्यात मुलींसाठी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.मुलींच्या शाळेत शिकविण्यासाठी कोणीही पुढे धजावत नव्हते अशा कठीण स्थितीत महात्मा फुले यांनी आपल्या अशिक्षित पत्नीला साक्षर केले आणि शैक्षणिक क्रांती निर्माण करतांना अनेक हालअपेष्टा सहन करून शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केले त्यामुळे देशातील पहिली महिला मुख्याध्यापक व शिक्षिका म्हणून आजही गौरविल्या जाते.1882 साली म.फुले यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात यावे अशी साक्ष हंटर कमिशन ला दिली होती. त्यानंतर 1910 साली गोपाळ कृष्ण गोखले यांनी 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी कायदा करावा असे ठणकावून सांगितले होते त्या द्रष्ट्या समाज सुधारकांची मागणी भारत देश स्वातंत्र झाल्यानंतर एक शतक वाट बघावे लागले.आज प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले असून 6 ते 14 वयोगटातील बालकांचे शिक्षण देणे शासनाला बंधनकारक आहे.कोणताही बालक शाळाबाह्य राहू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सर्वतोपरी चालू आहेत.
        प्राथमिक शिक्षण बालकांना देण्यासाठी RTE-2009 नुसार शिक्षण देणे बंधनकारक दिलेले आहे.प्रत्येक मूल शिकू शकते.मुलांना त्या त्या इयतेतील क्षमता प्राप्त व्हाव्या यासाठी शिक्षकाला प्रयत्न करायचे आहे.प्राथमिक शिक्षण सर्वांना घेता यावे यासाठी 'गाव तेथे शाळा' निर्माण करून विद्यार्थ्यांना शासनाने दिलासा दिला आहे.शाळेत मूल शिकले पाहिजे,टिकले पाहिजे आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गळती व स्थगिती होऊ नये,विद्यार्थ्यांची उपस्थिती सदैव 100 टक्के असावी यासाठी बालकांना शालेय पोषण आहार दिला जातो. ग्रामीण भागातील मुलांना समतोल आहार मिळत नाही वा शाळेची उपस्थिती टिकावी यासाठी 15 ऑगस्ट 1995 पासून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सर्व बालकांना मध्यान्हमध्ये शालेय पोषण आहार दिला जातो.पाठ्यपुस्तके देखील मोफत दिले जाते.प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या बालकांना मोफत गणवेश,शिष्यवृत्ती दिल्या जाते.मानव विकास मिशन अंतर्गत बाहेरगावावरून येणाऱ्या मुलींसाठी मोफत सायकल दिली जाते त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना,अस्वच्छ कामगार पाल्याकरिता शिष्यवृत्ती,अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना यासारख्या अनेक योजना पुरवून शासन प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी बालकांना प्रोत्साहित केल्या जाते.
         हसत,खेळत बालक शाळेत रमायला हवं यासाठी आनंददायी वातावरणात शिक्षण दिल्या जाते.विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे शिक्षणात भर टाकली जाते.पूर्वीच्या परिक्षापद्धतीला छेद देत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापणद्वारे बढती दिल्या जाते.कोणत्याही बालकाला नापास न करण्याचे धोरण अवलंबिले आहे.विद्यार्थ्यांच्या मनावर परीक्षेचे दडपण येऊ नये यासाठी 'ओपन बुक टेस्ट' द्वारे दोन संकलित चाचणी व पेपर घेतल्या जाते.उर्वरित वर्षभराच्या त्याच्या वर्तनावरून,कार्यावरून मूल्यमापन केले जाते.शिक्षक हा बालकांचा मित्र,मार्गदर्शक,सुलभक म्हणून कार्य करीत असतो.विद्यार्थ्यांच्या मनावर कोणतेही ओझे होऊ नये यासाठी दप्तराचे वजन देखील कमी करण्यात आले असून अधिकाधिक 6 ते 14 वयोगटातील बालक म्हणजे इयत्ता 1 ते 8 वी पर्यंतचे शिक्षण घेणे मोफत व सक्तीचे केले असल्याने कोणताही बालक शाळाबाह्य नाही.स्थलांतरित बालकांसाठी देखील तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृह देखील निर्माण केले आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणे सर्वांना सोयीचे आणि आनंदाचे झाले आहे.
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
*प्राथमिक शिक्षणाचे महत्व*
मानवी जीवन सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे शिक्षण होय. शिक्षण ही एक पवित्र गंगा आहे. या पवित्र गंगेतून शिक्षणाचे पवित्र आपण राखले पाहिजे, जपले पाहिजे. मानवी जीवनात प्राथमिक शिक्षण ही माणसाची प्राथमिक गरज आहे. प्राथमिक शिक्षण यशस्वीपणे घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाचे  उद्दिष्ट गाठू शकते. कारण प्राथमिक शिक्षणाची पहिली पायरी सफलतापूर्वक पार केल्यामुळे व्यक्तीस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते. खरं तर शिक्षण हे जीवन विकासाचे साधन आहे. माणसाला माणूस बनवण्याचं शिक्षण एक माध्यम आहे. “आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.” असे डाॕ.जॉन या विचारवंताचे मत आहे. कोणत्याही व्यक्तीचा प्राथमिक शिक्षणाशी जेवढा घनिष्ठ संबंध असतो तितका फारसा संबंध माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाशी येत नाही. प्राथमिक शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान अनंतकाल टिकून राहते. सदा स्मरणात राहते. प्राथमिक शिक्षणातूनच व्यक्तीची जडणघडण होते. व्यक्तीचा जीवनस्तर उंचावयाचा असेल तर प्राथमिक शिक्षणातून  योग्य संस्कार होणे  आवश्यक आहे. शिक्षणामुळे चांगल्या वाईटाची कल्पना येते, भावनिक परिपक्वता येते. प्राथमिक शिक्षणाचा माध्यमातून बालकाचा भावनिक समतोल , सवयी आणि वृत्ती, बालकाचे शारीरिक, मानसिक आरोग्य, तसेच त्याच्यामध्ये असलेली सुयोग्य अभिरूची हे जाणून घेऊन त्यांच्या या विकासावर अधिक भर दिला जावा. प्राथमिक शिक्षणात लेखन-वाचन या ज्ञाना सोबतच वरील बाबींचा विचार अधिक प्रमाणात करण्यात यावा. तरच प्राथमिक शिक्षण यशस्वी होईल. विनोबा भावे यांनी म्हटले आहे 'यशस्वी  शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.'  
कोणत्याही व्यक्तीचा यशाचा पाया म्हणजेच प्राथमिक शिक्षण होय. 
शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा चौफेर विकास घडून येतो. सारा समाज ज्ञानी, स्वावलंबी झाला तरच समाजात शांतता, सुव्यवस्था व बंधुभावाचे वातावरण असेल, दिसेल. म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित होणे आवश्यक आहे. सामान्य माणसास  शिक्षणापासून वंचित ठेवणे योग्य नाही.प्रत्येक  व्यक्तीस शिक्षण  मिळायलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे आहे. कारण शिक्षणामुळे व्यक्तीला समाजात विशिष्ट प्रकारचा दर्जा प्राप्त होतो. शिक्षणामुळे मानवी जीवन सुरक्षित व संस्कारशिल बनते.
योग्य संस्कार आणि योग्य शिक्षण यांची सांगड घालून समाजबांधणीसाठी चारित्र्यसंपन्न नवीन पिढी निर्माण करता येणे हेच खरे शिक्षणाचे काम आहे. 
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍लेखिका
©️श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता. हदगाव जि.नांदेड.
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
*प्राथमिक शिक्षणाचा ठसा-हाच राष्ट्रविकासाचा वसा*!
*(09) सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
        प्राथमिक  शिक्षण म्हणजे  फक्त वही-पेन नव्हे,तर बुद्धीला सत्याकडे ,
भावनेला माणुसकी कडे ,शरीराला आश्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे प्राथमिक शिक्षण होय.
         आपले शैक्षणिक धोरण उत्तम आहे. बालकांचा शिक्षणाचा मूलभूत हक्क आपण मान्य केला आहे, अत्यंत समग्र आणि सर्वसमावेषक असा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी काही बाबी समान ठेवून स्थानिक गरजेनुसार या आराखड्यात बदल करण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. २१व्या शतकातला नागरिक बनवण्याची ताकत असलेली रचनात्मक शैक्षणिक पद्धती स्वीकारली आहे.प्राथमिक  शिक्षण केवळ पुस्तकी न राहता वर्गाबाहेरील घडामोडींचा समावेश कसा होईल, विद्यार्थ्याच्या भविष्यातील जीवनात ते प्रत्यक्ष उपयोगी कसे पडेल, विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व घडवले जाईल यादृष्टीने त्याचे अनुभव विश्व कसे समृद्ध करता येईल या सर्वाचा विचार प्राथमिक शिक्षणात  केला आहे.
*शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे
आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे  प्राथमिक शिक्षण होय*.
               महाराष्ट्र शासनाने १० मे २०१० रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करून प्राथमिक शिक्षणाचा समावेश मूलभूत अधिकारांत केल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारने २७ ऑगस्ट २००९ च्या राजपत्रात ‘राइट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अॅण्ड कम्पल्सरी एज्युकेशन अॅक्ट, २००९’ प्रसिद्ध केला आहे. त्यात ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू आणि काश्मीर वगळता) लागू केल्याचे नमूद केले आहे. या कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटांतील सर्व बालकांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची, त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्याची, उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनावर आली आहे. *शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे*,जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलतांना बघू शकता.    
        महाराष्ट्रात मात्र या नियमाची सक्तीने अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील सहाव्या वर्षी पहिलीत असलेला मुलगा दहाव्या वर्षी चौथी पास करतो. या पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षणाला महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण असे म्हटले जाते. उत्तरी भारतात, विशेषत: दिल्लीत पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण समजले जाते. भारतीय राज्यघटनेनुसार केवळ सहा आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी नियम आणि नियंत्रणे आहेत. प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात जाणाऱ्या  मुलाचे वय सहा असले पाहिजे असा सरकारी नियम आहे.हा नियम फक्त सरकारी शाळेपूरताच मर्यादित न ठेवता  प्रत्येक्ष  सर्वच शाळांसाठी लागू करायला पाहिजेत .
             शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक कि. मी.च्या आत व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन कि. मी.च्या आत मोफत शाळेची सोय उपलब्ध करून देणे सरकारला अनिवार्य असून, त्यापेक्षा अधिकच्या अंतरासाठी वाहतूक सुविधाही सरकारने करावयाची आहे .
       महाराष्ट्रात इयत्ता पाचवी ते सातवी (आणि उत्तरी भारतात सहावी ते आठवी) हे माध्यमिक शिक्षण समजले जाते. त्यापुढील दहावीपर्यंतचे शिक्षण हे हायस्कूलचे शिक्षण समजले जाते. इयत्ता ११ आणि १२ या वर्गांचे शिक्षण महाराष्ट्रात कॉलेजांमध्ये मिळते. या कॉलेजांना कनिष्ट महाविद्यालये असे म्हणण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राबाहेर मात्र, हेही शिक्षण शाळेत मिळते. अशा शाळेला उच्च माध्यमिक शाळा म्हणतात. त्यापुढील शिक्षण मात्र संपूर्ण भारतात बहुधा महाविद्यालयांत घ्यावे लागते. अपवाद म्हणजे, भारतातील काही विद्यापीठे हेही शिक्षण घरबसल्या पत्रोत्तरांद्वारे देण्याची सोय करतात.
        महाराष्ट्र राज्यात ७५ हजार ४६६ इतक्या प्राथमिक शाळा सुरू आहेत. त्यापैकी ६५ हजार ३२४ मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. त्याचप्रमाणे १९ हजार ७६७ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी १५ हजार ४६६ मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. महाराष्ट्र राज्यातील एकूण शाळांची तुलना करता मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचे प्रमाण एकूण शाळांच्या ८७ टक्के मानसिक गुणाचे संवर्धन आणि दोषांचे उच्चाटन जे करते ते शिक्षण. जगात वावरण्यासाठी, स्वत:चा सर्वांगिण विकास करून घेण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान म्हणजेच शिक्षण. पूर्वीच्याकाळी प्रत्येक वर्णासाठी भिन्न स्वरूपाचे शिक्षण होते. ब्राम्हणवर्ग  वेदविद्येचे, क्षत्रिय शस्त्रविद्येचे, आणि वैश्य व शुद्र हे आपापल्या वाडवडीलां कडून चालत आलेल्या कलेचे शिक्षण घेत असत. पण आज ही चातुर्वर्ण्य पद्धती नाहीशी झाली. त्यामुळे शिक्षण पद्धती बदललेली आहे.
      आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पुस्तकी माहिती ठराविक वेळेत पुन्हा उतरवून काढणे याला आजकाल ‘परीक्षा’  म्हटले जाते. पुस्तका बाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची मुभा विद्यार्थ्याला आणि शिक्षकालाही नसते. त्यामुळे विद्यार्थ्याची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट होते.  स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही. पदव्यांना अवास्तव महत्व प्राप्त होवून त्या मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरु होते.   शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वकष विकास साधण्यासाठी शिक्षणपद्धतीत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे. भाकरी मिळवून देणारे सुसंस्कार घडविणारे, स्वदेश, स्वभाषा, स्वदेशबांधवांच्याविषयी नितांत अभिमान निर्माण करणारे शिक्षण हे खरे प्राथमिक शिक्षणआहे. व्यक्तीविकासाबरोबरच   समाज विकास होईल. व राष्ट्र सर्व दृष्टीने संपन्न होईल असे शिक्षण मिळणे  जरुरीचे आहे. भारत सरकारने यादृष्टीने टाकलेली पावले स्वागतार्ह आहेत असे म्हटले पाहिजे. आजच्या शिक्षण पद्धतीतून मनुष्य सुशिक्षित होतो पण तो सुजाण, सुसंस्कृत होतोच असे नाही. वास्तविक शिक्षण हा पवित्र संस्कार आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती सुसंस्कृत असायला हवी. दुर्दैवाने तसे फारसे दिसत नाही. उलट अधिकतर  माणसे आत्मकेंद्रित, स्वार्थ व संकुचित वृत्तीची झालेली आढळतात. हुंड्याची राक्षसी प्रथा सुशिक्षितांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरी त्याची पत्नी ही गृहलक्ष्मी मानली जाते. बहुसंख्य सुशिक्षितांमध्ये घरी येणारी नववधू ही केवळ एक उपभोग्य वस्तू, माहेराहून खूप मोठा हुंडा घेवून येणारी व्यक्ती ,असेच समजले जाते. कोणताही मोठा त्याग करण्याची वेळ आली तर अडाणी, अशिक्षित माणूस मागचा- पुढचा विचार न करता कर्तव्य भावनेने त्याग करतो. उलट अश्या प्रत्येक गोष्टीचे स्वार्थासाठी भांडवल करण्याची वृत्ती सुशिक्षितात आढळते. गुन्हेगारीचे प्रकार व प्रमाण सुशिक्षितांतच अधिक आढळतात आजच्या शिक्षणपद्धतीची ही शोकांतिका आहे.तरीही मी म्हणेन प्राथमिक  शिक्षणाचा ठसा-हाच राष्ट्रविकासाचा वसा आहे .
लेखिका 
    *सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया* 
       *(9420516306 )*
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 ‌ *प्राथमिक शिक्षण **
     (  ३९  ) सौ. भारती दिनेश तिडके गोंदिया.
         " A good Teacher is like a candle .It consumes itself, To light, the way for others."
        शिक्षणाचा अर्थ पहावयाचा म्हणजे जीवनाचा अर्थ पाहण्यासारखा आहे. औपचारिक शिक्षण व अनौपचारिक शिक्षण हे शिक्षणाचे दोन प्रकार आहेत. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण जीवनाचा पाया आहे. घराचा पाया मजबूत असेल तर घर भक्कम सुरक्षित राहते. त्याच प्रमाणे 6 ते 14 वयोगटातील मुलांचा पाया मजबूत असेल तर तो एक सुजाण नागरिक बनण्यास मदत होते. शालेय शिक्षण हा संपूर्ण शिक्षण प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकेल अशा प्रकारची अभ्यासक्रमाची रचना हवी. प्राथमिक शिक्षणामध्ये १) पूर्व प्राथमिक २) प्राथमिक ३) उच्च प्राथमिक असे विभाग येतात. त्यापैकी प्राथमिक शिक्षण हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
         स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानाच्या कलम 45 नुसार प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी आपण सर्वजण सतत प्रयत्नशील आहोत. केवळ शाळेत जाणे म्हणजे शिक्षण ही शिक्षणाविषयीची समजूत चुकीची आहे. शिक्षण हे केवळ शाळेच्या चार भिंतीच्या आत मिळणारी बाब नव्हे. माणसाला जीवनात जे अनुभव येतात त्यानुसार त्यांच्या वागणुकी मध्ये, विचारांमध्ये जे परिवर्तन सुधारणा होत असते त्याला शिक्षण असे म्हणतात. यावरून जन्मापासून मरेपर्यंत चालणारी शिक्षण ही एक अखंड प्रक्रिया आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हे सार रूपाने शिक्षणाची ध्येय आहे. शाळा हे समाजाच्या विकासाचे साधन आहे.ज्ञान व बुद्धिमत्ता यासोबतच विद्यार्थ्यांच्या निराळ्या आवडीनिवडी, सत्प्रवृत्ती, सदभिरूची, सौंदर्यदृष्टी या विविध प्रकारच्या क्रियाशील शक्ती या सर्व घटकांचा प्राथमिक शिक्षण या सज्ञेत अंतर्भाव होतो. या सर्व गोष्टींचा विकास म्हणजे शिक्षण. 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, क्षमताधिष्ठित अभ्यास शैक्षणिक गुणवत्ता विकास त्यानंतर सर्व शिक्षा अभियान इत्यादी कार्यक्रमाद्वारे बालकांना शाळेत आणणे, त्यांना शाळेत टिकवून ठेवणे, गळती व स्थगिती थांबवून त्यांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण देणे हेच उद्दिष्ट आहे. शिक्षण मोफत व सक्तीचे झाले आहे.
        6 ते 14 वयोगटातील सर्व मुले मुली प्राथमिक शाळांमध्ये दाखल झाली व ती टिकली पाहिजे या सर्वांना दर्जेदार शिक्षण लाभले तरच प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले असे आपल्याला म्हणता येईल.आता RTE अंतर्गत अनेक परिवर्तनाची मालिका घेऊन शिक्षण हक्काचा कायदा आला आहे. शिक्षणाशिवाय कोणतीही व्यक्ती आणि समाज समृद्ध परिपूर्ण व स्वाभिमानी जीवन जगू शकत नाही."प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण हा या कायद्याचा ध्यास आहे'. 1 एप्रिल 2010 पासून हा कायदा अमलात आणला गेलेला आहे. त्यानुसारच नवीन मूल्यमापन देखील होत आहे. प्राथमिक शिक्षण ही बालकांची पहिली भाकरी आहे. 100% पटनोंदणी उपस्थिती आणि दर्जेदार शिक्षण प्रत्येक मुला मुलींना मिळावे यासाठी जनसंपर्क अतिशय आवश्यक आहे. गावातील लोकसंख्येचे सर्वेक्षण करून सहा ते चौदा वयोगटातील भरती पात्र विद्यार्थी व शाळाबाह्य विद्यार्थी यांच्या पालकांच्या भेटी घेऊन त्या पालकांना मुलांना प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत मुले म्हणजे पुढे मोठे होणाऱ्या वृक्षाचे मूळ होय.
           "गुरू तेथे ज्ञान !ज्ञानी आत्मदर्शन"
गुरू च्या ठायीअखंड ज्ञानगंगा सामावलेली असते. घडा आणि घडवा हा शिक्षकांचा मंत्र आहे.घटनेमध्ये तेरा गाभाभूत घटक व मूल्ये सांगितलेली आहेत. याचा उपयोग करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम केला पाहिजे. केवळ अध्यापन कार्य करणे म्हणजे शिक्षकांची जबाबदारी आहे असे नाही तर अध्यापन करण्यासोबतच विविध उपक्रम कार्यक्रम घेणे आवश्यक आहे.तेव्हाच विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांचा विकास करून त्यांना प्रेरणा देता येईल. तेव्हाच सर्वांगीण विकास होईल.
      **प्राथमिक शिक्षण दर्जेदार करण्यासाठी मी केलेले प्रयत्न:-
१) दररोज शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती कशी टिकवता येईल यासाठी मुला-मुलींना शाळेविषयी गोडी निर्माण केली.
२) शाळेमध्ये मी परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांना जो दिवस असेल त्याचा पाढा म्हणायला सांगते तसेच त्या दिवसाची स्पेलिंग सुद्धा स्टेजवर मोठ्याने विद्यार्थी सांगतात जो दिवस तो पाढा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर तर पडतेच तसेच अभ्यास सुद्धा घेतला जातो.
३) शाळेत विविध जयंत्या पुण्यतिथी, विविध दिनविशेष साजरे केले जातात. त्यामध्ये गीत गायन स्पर्धा घेणे, बाल सभा आयोजित करणे इत्यादी.
४) विजेता स्पर्धकांना बक्षीस सुद्धा दिले जाते. त्यामुळे इतरही विद्यार्थ्यांना त्यात आवड निर्माण होते.
५) दर महिन्याला सामान्यज्ञान स्पर्धा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जनरल नॉलेज वाढीस लागते.
६) शाळेतील मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांची सहकार्य घेऊन मी आम्ही करू संचालने हा उपक्रम राबविते. यामध्ये संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन मुले मुलीच करतात.
७) रक्षाबंधन हा उपक्रम शाळेत राबविला जातो. वृक्ष वाचविण्यासाठी वृक्षांना देखील राख्या बांधल्या जातात.
८) गावातील तंटामुक्त समिती, सामाजिक समाज सुधारक, श्रीमंत गाणी व्यक्ती यांच्या मार्फत आर्थिक मदत घेतली जाते.
९) सर्वांगीण विकासास पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात येतो.
१०) बाल सभा, सरस्वती पूजन दर शुक्रवार ला आयोजित करून त्यामध्ये सामूहिक प्रार्थना श्लोक व मूल्य संवर्धनाच्या गोष्टी घेतल्या जातात.
११) वाढदिवस साजरा केला जातो.
१२) शुद्धलेखन, अनुलेखन सराव घेतला जातो.
१३) विद्यार्थी दत्तक व गटप्रमुख योजना हा उपक्रम कार्यान्वित केला जातो. या उपक्रमामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास, विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला चालना मिळण्यास वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मदत होते.
१४) शासनाच्या विविध योजना पालकांना सांगितल्या.
१५) स्वयंशासन दिन साजरा केला जातो.१६) स्वच्छतेचे उपक्रम घेते.
प्राथमिक शिक्षण सर्वांगीण विकासाची धोतक आहे. असे विविध उपक्रम मी शाळेत घेते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सांस्कृतिक इत्यादी विकास होण्यासाठी विविध उपक्रमाची सांगड असावी.
         "घराला शोभा आहे अगणाची.
आकाशाला शोभा आहे चंद्राची
आणि मला समाधान वाटते
प्राथमिक शिक्षण दर्जेदार देऊन
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सर्वांगीण विकास करण्याच्या संधीची."
     सौ भारती दिनेश तिडके 
    गोंदिया.
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
*शिक्षणाचा पाया - प्राथमिक शिक्षण*
         *प्राथमिक शिक्षण हे सर्व  शिक्षणाचा पाया आहे म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.*
            शिक्षण ही काळाची गरज आहे शिक्षणामुळे मानतात खुप मोठया प्रमाणावर बदल झाले आहे शिक्षण घेतल्यामुळे मानवाला आपल्या हक्काचे महत्त्व समजते आजच्या कळात पैसा संपत्ती याला महत्त्व न देता फक्त आणि फक्त शिक्षणाला महत्त्व दिले गेले आहे सुशिक्षित व्यक्ती आपल्या गरजा आवडी निवडी आपले हक्क होत असलेला भ्रष्टाचार थांबवू शकतात. 
                आपले शैक्षणिक धोरण उत्तम आहे. बालकांचा शिक्षणाचा मूलभूत हक्क आपण मान्य केला आहे, अत्यंत समग्र आणि सर्वसमावेषक असा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी काही बाबी समान ठेवून स्थानिक गरजेनुसार या आराखड्यात बदल करण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. २१ व्या शतकातला नागरिक बनवण्याची ताकत असलेली रचनात्मक शैक्षणिक पद्धती स्वीकारली आहे. शिक्षण केवळ पुस्तकी न राहता वर्गाबाहेरील घडामोडींचा समावेश कसा होईल, विद्यार्थ्याच्या भविष्यातील जीवनात ते प्रत्यक्ष उपयोगी कसे पडेल, विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व घडवले जाईल यादृष्टीने त्याचे अनुभव विश्व कसे समृद्ध करता येईल या सर्वाचा विचार त्यात केला आहे.
मात्र हे आपण प्रत्यक्षात उतरवू शकलेलो नाही.
२०११ च्या जनगणनेनुसार राज्यातले सुमारे ५५% लोक २९ वर्षाच्या खालचे आहेत, आणि सुमारे २८% लोकसंख्या १५ ते २९ या वयोगटातच मोडते. ही तरूण पिढी आज नोकरी-व्यवसायाच्या शोधात आहे. मात्र या तरूणांकडे आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्ये वा शिक्षणच पुरेसे नाही.  हे केवळ पोटा-पाण्यापुरते पैसे कसे कमवावेत हिच विवंचना अधिक आहे  . गरिबीचे प्रमाण अशिक्षितांपेक्षा शिक्षितांमध्येच अधिक आहे. मागासवर्गीय आणि आदिवासींमध्ये तर ही समस्या अधिकच गंभीर आहे.
           आज सर्वांपर्यंत प्राथमिक शिक्षणच पोचत नाही. बालकांचा मोफत आणि सक्तीचा हक्क मान्य करून आज आपल्याला वर्षे झाली. तरीही राज्यातले प्रत्येक मूल शाळेत येते, शिकते होते आणि निदान आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करते अशी परिस्थिती आज नाही. राज्यात राहणार्यान सर्व समाज घटकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण व्यस्त दिसते. काही मोजके निकष पाहू या.
साक्षरता- प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे तर सोडा, राज्यातल्या काम करणार्या प्रत्येक व्यक्तीला साधे लिहीते-वाचते करण्यातही अनेक अडचणी आहेत असे दिसते. 
        शिक्षणाच्या प्रक्रियेत समावेश – पहिलीत १००% प्रवेश होत असले तरी अकरावीत शिक्षण घेणार्यांयचे प्रमाण निम्म्यावर आहे. म्हणजेच माध्यमिक शिक्षण अजूनही सार्वत्रिक झालेले नाही 
गळती - पात्र झालेल्या प्रत्येक बालकाला आपण शाळेत दाखल करत असलो तरी त्याला टिकवू शकत नाही. पहिलीत प्रवेश घेतलेल्या १०० विद्यार्थ्यांपैकी सुमारे २५% विद्यार्थी दहावी पूर्ण करतात.
गुणवत्ता - गेल्या १० वर्षात आपण पुष्कळ प्रगती केली आहे पण ती पुरेशी नाही. पात्र वयोगटानुसार प्रवेश घेणार्यां चे प्रमाण आपण सुधारले आहे. पण मुलांना शिकते करण्यात, उपयुक्त असलेले शिक्षण देण्यात मात्र आपण सातत्याने कमी पडत आहोत. शाळा कुठलीही असो – शासनाची किंवा खासगी, साधे लिहीता-वाचता येणे, गुणाकार-भागाकार सारख्या गणिती क्रिया करता येणे हे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावरही अनेकांना येत नाही. 
शिक्षणाचे व्यवस्थापन - सरकार हजारो शाळा चालवते. लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनावर आहे.  त्यात शासन-संचलित शिक्षण संस्थांची कार्यक्षमता कमी होत चालली आहे, त्यांचा पट घरसरतो आहे; या शासन संस्था आपला कारभार सुधारतील यावरचा विश्वास कुणालाच राहिला नाही; सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुरेसे पैसेच शासनाकडे नाहीत; या व अशा कारणांमुळे शासनाने शिक्षण क्षेत्रातून मुक्त व्हावे व राज्यातील बालकांना शिकवण्याची जबाबदारी खासगी संस्थांकडे सुपूर्द करावी अशी मागणी अलिकडच्या काही वर्षात जोर धरू लागली आहे. त्यात या जबाबदारीचा अर्थही मर्यादित स्वरूपात पाहिला जात आहे – प्रत्येक बालकाला शाळेत पोचवले आणि प्रवेश दिला, सर्व शाळांमध्ये कायद्याने आखून दिलेल्या सुविधा पुरवल्या की शासनाने आपली जबाबदारी पूर्ण केली, असा समज उच्च-स्थित अधिकार्यां मध्ये तसेच संबंधित राजकीय नेत्यांमधेही दृढ झाला आहे. शाळेत आलेला प्रत्येक विद्यार्थी शिकतो का, अपेक्षित मूलभूत कौशल्ये प्राप्त करतो का, आपण ठरवलेली शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण होतात का याकडे आज आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत.
               एकेकाळी राज्याची ओळख शिक्षणाचे माहेरघर म्हणून असली, देशभरातून विद्यार्थी आजही जरी महाराष्ट्रात शिकायला येत असले, तरी शिक्षण क्षेत्राकडे, विशेषकरून प्राथमिक शिक्षणाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्राथमिक शिक्षणासाठी असलेला राज्य शासनाचा निधी कमी-कमी होत गेला. शिक्षण शास्त्र कितीही प्रगत झाले असले, त्यात कितीही संशोधनांची आणि प्रयोगांची भर पडली असली तरीही आपण मात्र शिकवणे अत्यंत सोपे आणि सहज करण्याची गोष्ट समजलो. शिक्षकांच्या गुणवत्तेकडे, त्यांच्या प्रशिक्षणाकडे, त्यांची कौशल्ये विकसित करण्याकडे फार लक्ष दिले नाही. शाळेच्या रोजच्या व्यवहारातला राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे, शाळेतल्या कर्मचार्यांाना (त्यात शिक्षकही आले!) राजकीय आश्रय मिळाल्यामुळे शाळेचे व्यवस्थापन ढिसाळ झाले, वर्गातली गुणवत्ता ढासळत गेली.
         २०११ साली राज्याने बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (RTE) मान्य केला; पण त्यातही शाळांमधील पायाभूत सुविधा आणि गरिब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५% आरक्षण देण्यापुरती त्याची अमलबजावणी सिमीत ठेवली. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचा आधार घेऊन राज्यासाठीचा आराखडा तयार केला पण त्याची अमलबजावणी म्हणावी तशी प्रभावी होताना अजून तरी दिसत नाही. RTE ची अमलबजावणी करण्याचा हा प्रयत्न म्हणजे दाखवायचे पण मनापासून मात्र करायचे नाही असाच एक प्रयत्न वाटतो आहे.
             प्राथमिक शिक्षणाचा हेतू हा राज्यातील प्रत्येक मुलाला आपल्या पायावर उभे करणे, त्याचबरोबर नवीन युगाचा स्वीकार करून आपले योगदान देता यावे यासाठी त्याला तयार करणे हा असायला हवा.
________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
प्राथमिक शिक्षणात मूल्यवर्धन कार्यक्रम ठरतोय प्रेरणादायी
 जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्य घटनेतील स्वातंत्र्य,न्याय,समता,बंधुता मूल्य रुजविण्यासाठी महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे. सामाजिक क्षेत्रात तिन दशकाहून अधिक वर्ष कार्यरत असलेल्या श्री शांतिलाल मुथ्था यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूल्यवर्धन चे बीज रोवले आहे.या बीजापासून छोटेसे रोपटे तयार झाले.आज हळूहळू हेच रोपटे एका महाकाय वटवृक्षाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांनी सुरुवातीला सन 2009-10 या शैक्षणिक वर्षांत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 159 मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला.सन 2009-10 या वर्षात हा कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये काही बदल दिसून आले.येणाऱ्या शैक्षणिक वर्षात 2010-11 मध्ये शिक्षक पालकांचा सकारात्मक प्रतिसाद या कार्यक्रमामध्ये दिसून येऊ लागला.शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये या कार्यक्रमाविषयी उत्सुकता दिसून येऊ लागली.त्यामुळे बीड जिल्ह्यातील पाटोदा व त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील एकूण 500 शाळा व 38000 विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली.वर्ष 2011-12 मध्ये इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ञांकडून बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा व आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाची पाहणी करण्यात आली.काही निवडक शाळेत जाऊन शिक्षक,विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यात आला. शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयीचे मत जाणून घेण्यात आले.वर्ष 2012-13 मध्ये शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रमाचे संस्थेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आले.केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ञांकडून आणि एनसीईआरटी तील तज्ञांकडून करण्यात आलेल्या परीक्षणातून असे दिसून आले की,मूल्यवर्धन कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांत सकारात्मक बदल दिसून आले. याउलट मूल्यवर्धन कार्यक्रमात सहभागी नसणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा सहभागी असणार्‍या विद्यार्थ्यात सकारात्मक बदल दिसून आले.यानंतर बीड जिल्ह्यातील पाटोदा व आष्टी या ठिकाणी राबवण्यात आलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे अनुभव व प्रचलित शैक्षणिक धोरणे तसेच एनसीईआरटी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त धोरणे यांच्या अनुषंगाने मूल्यवर्धन कार्यक्रम आराखड्याची निर्मिती करण्यात आली.सन 2014-15 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ अधिकारी,शिक्षण विभागातील अधिकारी यांनी आष्टी व पाटोदा तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांन मध्ये झालेले बदल लक्षात आले.यामध्ये विद्यार्थ्यांन सोबत संवाद साधण्यात आला.विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी विचारण्यात आले.विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन या कार्यक्रमाविषयी काय वाटते हे जाणून घेण्यात आले.यातून विद्यार्थ्यांची सकारात्मक विचार,मते दिसून आली.यानंतर मूल्यवर्धन कार्यक्रमाचा महाराष्ट्र शासनाकडून प्रथम प्रायोगिक तत्त्वावर बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा तालुक्यातील राबवलेला हा मूल्यवर्धन कार्यक्रम कायमस्वरूपी स्वीकारण्यात आला.यामध्ये शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या परिषद यांच्यामध्ये करार झाला.सन 2015 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला.2016-17 मध्ये महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यांमध्ये,35तालुके,63केंद्र,724 शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.शांतीलाल मुथ्था फाउंडेशन मार्फत निरनिराळया टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.मूल्यवर्धन कार्यक्रम शिक्षकांना कळावा,मूल्यवर्धन कार्यक्रमाचा हेतू, उद्देश हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सुरुवातीला तालुक्यातील प्रत्येक केंद्रातुन एका शिक्षकाला प्रेरक म्हणून नेमण्यात आले.तालुक्यातील सर्व केंद्राच्या प्रेरकांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यानंतर या प्रेरकामार्फत केंद्रातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले.राज्यघटनेतील मुल्ये शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये रुजावित आणि हीच विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक व्हावेत हा या उपक्रमामागील उद्देश आहे.या उद्देशाने शाळासाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.मराठी भाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी आणी उर्दू भाषेमध्ये हा कार्यक्रम उपलब्ध केला आहे.इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनसाठी हा कार्यक्रम असुन यामध्ये शिक्षक उपक्रम पुस्तीका व विद्यार्थी उपक्रम पुस्तीका तयार करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र विद्या प्राधिकरण मार्फत या पुस्तिका शाळेवर पुरविण्यात येतात.मूल्यवर्धन उपक्रम कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना नियमितपणे आपल्या वर्गात काही उपक्रमांचे आयोजन करायचे आहे.यासाठी या पुस्तीका मार्गदर्शक ठरतात.तसेच घेतलेल्या उपक्रमावर आधारित कृती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून उपक्रम पुस्तिका सोडवुन सराव घेतला जातो.शिक्षक उपक्रम पुस्तिकेमध्ये पाच विभाग करण्यात आलेले आहेत.मी आणि माझी क्षमता,माझ्या जबाबदाऱ्या, माझे नातेसंबंध,मी आणि आपले जग,सहयोगी खेळ असे पाच विभाग आहेत.प्रत्येक विभागात अभ्यासक्रमाशी निगडीत,सुसंगत असे उपक्रम दिलेलेआहेत.हे उपक्रम इयत्ता निहाय शिक्षकांनी आपल्या सोयीनुसार आठवड्यात किमान तीन तासिका घेऊन हे उपक्रम घ्यायचे आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेच्या माध्यमातून स्वतः उपक्रमांमध्ये भाग घेऊन या पुस्तिकेतील उपक्रम विद्यार्थी स्वतः शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करतात.गेल्या चार वर्षापासून हा मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.आजच्या घडीला मूल्यवर्धन कार्यक्रम हा महाराष्ट्रातील 36 जिल्हे,405 तालुके,5487 केंद्र, 67000 शाळा,3784000 विद्यार्थी,192000 शिक्षक यात सहभागी आहेत.यामुळे शाळास्तरावर विद्यार्थी उपस्थिती शंभर टक्के आढळून येत आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण होत आहे.शाळा व शिक्षक यामध्ये मैत्रीपूर्ण नाते संबंध प्रस्थापित होताना दिसत आहे.शाळेची पटसंख्या टिकुन ठेवण्यात मदत होत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील पटसंख्या वाढतांना दिसत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाल्यांनी शिकावे असा निश्चय पालक करत आहे.
विद्यार्थी एकमेकांशी सुसंवाद,गटचर्चा करतात. वाडी,वस्ती, तांडा,गाव याठिकाणी जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून नकळत मूल्य रुजत आहे.विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहे. घटनेतील मुल्ये लादण्याची गोष्ट नाही.तर ती नकळत अंगीकारायची गरज आहे.मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात बालवयापासून स्वातंत्र,न्याय,समता,बंधुता ही मुल्ये रुजतांना दिसत आहे.विद्यार्थी अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून, अनुभवातून मुल्य अंगीकारत आहे. अशाप्रकारे आनंददायी शिक्षण प्रक्रियेत मुल्ये रुजत राहिली तर, आजचे विद्यार्थी उद्याचे भारत देशाचे उत्तम नागरिक म्हणून समोर येतील. भारतीय राज्य घटनेचा व भारतीय लोकशाहीचा आनंदाने,आदराने स्वीकार करतील.यातून भारतीय राज्यघटना व लोकशाही अधिक मजबूत व बळकट राहील.यामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा निश्चितच सिंहाचा वाटा राहील.आज मात्र समाज,शाळा,शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम प्रेरणादायी ठरतोय.
राजेंद्र प्रल्हाद शेळके रा.किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा जि.बुलडाणा
9823425852

~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
श्री.सुंदरसिंग आर. साबळे 
मो. 9545254856
       गोंदिया 
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच पाहिजे यात तीळमात्र शंका नाही."
 ==============  
        गेल्या दहा वर्षातील शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापनाच्या अनुभवावरून मी हा लेख लिहीत आहे. हा लेख लिहिण्याची गरज का भासावी ? तर सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे झुकलेला पालकांचा कल.आमचा इंग्रजी शिकण्याला विरोध नाही पण इंग्रजी वयाच्या किंवा शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावर शिकावी याचा सुद्धा विचार केला पाहिजे.
       या भारत देशात एखाद्या गोष्टीला (क्षेत्राला) इतके महत्व दिले जाते की कालांतराने त्या   
 क्षेत्रामध्ये शून्य उरेपर्यंत लोकांना समजत नाही की आपला तोटा होतोय.आपण महाराष्ट्र राज्यापुरता विचार केला तर एके काळी डी.एड. ,बी.एड ला खूप विद्यार्थी प्रवेश घ्यायचे पण आता कोणी ढुंकून सुद्धा पाहत नाही. तीच अवस्था सध्या इंजिनिअरिंगची झाली आहे आणि पुढील दहा ते पंधरा वर्षात हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा फुगा सुद्धा फुटणार आहे.
                 पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलाचा प्रवेश घेताना पुढील कारणे सांगतात.
        आपल्या मुलाला इंग्रजी बोलता यावे,लिहिता यावे,वाचता यावे.
        आमच्या शेजारची सगळीच मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात.
        मुलगा/मुलगी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असतील तर समाजात आपल्याला कमी लेखतात.
        इंग्रजी माध्यमात शिकल्याने उच्च शिक्षण घेणे सोपे जाते.
        इंग्रजी ही जगाची भाषा आहे.इंग्रजी आल्याशिवाय मुलांची प्रगती होत नाही.
    अशी कारणे पालकांकडून सांगितली जातात. आता एक एका कारणाचे विवेचन करू आणि पालकांच्या मनातील गैरसमज दूर करू.
           आपल्या मुलाला इंग्रजी बोलता यावे यासाठी जर पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा आग्रह धरत असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की , कोणतीही भाषा बोलता येण्यासाठी ती ऐकणे गरजेचे आहे. भाषा शिकण्याच्या पुढील टप्पे आहेत.श्रवण,भाषण,वाचन आणि लेखन.म्हणजे भाषा बोलण्यासाठी ती अगोदर ऐकली पाहिजे.पण तुमच्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आणि घरी तरी इंग्रजी ऐकण्याची संधी मिळते का? ग्रामीण भागामध्ये तर बहुतांश इंग्रजी शाळामध्ये इंग्रजी बोलता येणारे शिक्षकच नसतात.
    आता राहिली गोष्ट वाचन आणि लेखनाची तर या शाळामध्ये इंग्रजीचा तास असतो ४० मिनिटांचा. त्या ४० मिनिटांमध्ये शिक्षक ३० मुलांचे वाचन घेऊच शकत नाही. मग हे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी खाजगी क्लासेस वर अवलंबून राहतात. इंग्रजी शाळेमध्ये फक्त पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असतात. उत्तम मैदान,गणवेश,स्वच्छतागृह इ. मग शिक्षण सोडून केवळ या गोष्टीसाठी तुम्ही मुलाला शाळेत पाठवता का?
       आता दुसरी गोष्ट , शेजारचा मुलगा इंग्रजी शाळेत जातो म्हणून तुम्ही पण तुमच्या मुलाला त्याच शाळेत पाठवले पाहिजे का? मानसशास्त्राने एक गोष्ट सिद्ध केली आहे की,प्रत्येक व्यक्ती , तिचे गुण ,तिची बुद्धिमत्ता सारखी नसते.मग शेजारचा मुलगा इंग्रजी शिकू शकतो म्हणून तुमचा पण मुलगा शिकू शकतो का? दोघा मुलांची बौद्धिक कुवत आणि पालकांची आर्थिक कुवत सारखी असते का?
        सध्या इंग्रजी शाळेत शिकणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे.पण मुलगा कोणत्या माध्यमात शिकतो याचा आणि समाजातील प्रतिष्ठेचा काडीमात्र संबंध नाही. शिक्षण हे उत्तम माणूस घडावा यासाठी असते. माध्यम कुठलेही असो, इंग्रजी वा मराठी मात्र संस्कार, शारीरिक व मानसिक सक्षमता,नैतिक मुल्ये,व्यवहार ज्ञान ,सामान्य ज्ञान , जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्ये यांचा विकास शिक्षणातून व्हायला हवा.
           इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे हे मान्य आहे. आय टी कंपन्यांमध्ये काम करताना कॉमप्युटर पासून ते गाड्यांच्या नावापासून ते सुट्या भागापर्यंत सगळ्यांची नावे ही इंग्रजी मध्येच असतात ,पण फक्त ही इंग्रजी नावे शिकण्यासाठी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला बालपण जगू न देता दप्तराचे भले मोठे ओझे देणे कितपत योग्य आहे? इंग्रजी भाषा ही नंतर सुद्धा शिकता येते. लांबचे उदाहरण कशाला मागे चांद्रयान-2 मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करणाऱ्या इस्रो या संस्थेचे प्रमुख के. सिवान यांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे , विश्वास नांगरे पाटील , भरत आंधळे विजय सूर्यवंशी यांचे सुद्धा प्राथमिक शिक्षण सुद्धा मातृभाषेतूनच झाली आहे.मग प्राथमिक स्तरावर इंग्रजी शिकल्याने प्रगती होते हा तुमचा समज की गैरसमज तुम्हीच ठरवा.
         काही पालक म्हणतात इंग्रजी ही जगाची भाषा आहे.म्हणजे जगातील सर्वाधिक लोक इंग्रजी बोलतात तर ही तुमची अंधश्रद्धा आहे.जगात एकूण २७०० भाषा आहेत आणि ७००० पेक्षा जास्त  बोलीभाषा आहेत आणि त्यात क्रमाने सर्वाधिक चीनी त्यानंतर स्पैनिश त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर इंग्रजी आहे.मग जगाची भाषा चीनी मानायची की इंग्रजी ?
इंग्रजी शिकूच नये असे माझे मत नाही.पण ती अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षी शिकण्याचा आग्रह धरणे हे निव्वळ चुकीचे आहे.
          जगातील प्रगत देशांमध्ये म्हणजेच रशिया,फ्रान्स,जर्मनी,जपान व चीन या बलाढ्य व आर्थिक दृष्ट्या प्रगत देशांमध्ये इंग्रजी किंवा कोणत्याही परकीय भाषेला महत्वाचे स्थान नाही. शिक्षणतज्ज्ञ व भाषातज्ज्ञ यांनी संशोधनाच्या आधारावर स्पष्ट केले आहे की, मुलाच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषेतूनच व्हायला पाहिजे.कारण मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हृदयापर्यंत पोचते तर परकीय भाषेतून घेतलेले शिक्षण फक्त मेंदूपर्यंत पोचते. शेवटी पाल्य तुमचा आहे आणि निर्णय सुद्धा तुमचाच आहे.
"द्या शिक्षणाला गती, व्हा फूले सावित्री."
"मुला मुलीचे शिक्षण - प्रगतीचे लक्षण"
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
प्राथमिक शिक्षण हे आनंददायी हवं

प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया मानला जातो. सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तेनुसार ठराविक अभ्यासक्रम तयार केलेला असून तो वर्षभरात शिक्षकांनी पूर्ण करणे अपेक्षित असते. यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांवर तो अभ्यासक्रम वर्षभरात पूर्ण करण्याचे बंधन असते. मला वाटते की विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे बंधन नसावे. मुलांना मुक्त पद्धतीने शिक्षण दिले तर ते लवकर शकतात हा माझा अनुभव आहे. 
    मुळातच मुल म्हणून हुशार असतात त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज असते. काही गोष्टी विद्यार्थी शिक्षकांना शिकवता याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यांना जाणून घेतले ,आपलेसे केले, की मुलांचे शिक्षण सहज ,आनंददायी वातावरणात पार पडत. परीक्षेचा ताण न घेता ते सहजरीत्या त्याला सामोरे जातात.
शिक्षकांनी मुलांना समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. त्यांच्यात मिसळून त्यांना त्यांच्या घरचे जवळचे वाटलं की मुलं अधिक अभिव्यक्त व्हायला लागतात मनातील प्रत्येक गोष्ट ते शिक्षकांशी मनमोकळेपणाने बोलतात.
बाल शिक्षण हे आनंददायी, विद्यार्थी केंद्रित असावे लागते. विद्यार्थी केंद्रित या शब्दाचा खरा अर्थ असा होतो की विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून अध्यापन करणे म्हणजे विद्यार्थी केंद्र पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.
मुलांना समजून न घेता फक्त शिकवण्याचे काम केले जाते यामुळे विद्यार्थी केंद्रीत अभ्यासक्रम न राहता तो शिक्षक केंद्रीय बनला आहे.
मुळातच मुल हे कृतीतून  शिकत असत. त्याच्या बाल्यावस्थेत बालकाप्रमाणे जगण्याचा प्रत्येक बालकाला हक्क आहे. बालकांचे बालपण हरवणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे आचार आणि विचारला त्यापेक्षा ते कृतीतून शिकवले तर ते विद्यार्थी त्याचे लगेचच अनुकरण करतात. त्यामुळे त्याला स्वतःच्या क्षमता नुसार गतीनुसार व स्वतःचा कल लक्षात घेऊन प्रगती करण्यास वाव मिळतो.
मनिषा पांढरे
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 प्राथमिक शिक्षण ,बालकांचा हक्क
2010 साली बालकाचा प्राथमिक शिक्षणाचा हक्क कायद्याने संमत झाला व प्रत्येक सहा ते चौदा वयोगटातील बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क या कायद्याने मिळाला. सक्तीचे शिक्षण तर याआधी होते परंतु या कायद्यामुळे नक्की बदल तरी काय झाला ?बालकांना तो हक्क आहे आणि तो हक्क डावलला गेल्याने ज्याच्याकडून तो डावलला जातोय त्याला शिक्षेची तरतूदही या कायद्यामध्ये झाली हे या कायद्याचे नाविन्य. त्याचप्रमाणे बालकाला त्याच्या गतीने शिकता यावे यासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षक अगदी सक्तीने त्याला उपलब्ध व्हायला हवा हे देखील या कायद्याचा नवीन नियम.
या कायद्या पूर्वी मूल पाच वर्षाचे झाले की त्याचे आईवडील त्याला इयत्ता पहिली मध्ये दाखल करत असत, कधीकधी तर चार वर्षाचे मुल देखील शाळेत आणत असत. पूर्वी जन्मदाखल्याची सोय नव्हती त्यामुळे एखाद्या मुलाचा त्याच्या डोक्यावरून कानापर्यंत हात पोहोचला की हा पहिलीत घेण्याजोगा झाला असा ठोकताळा असे आणि मग त्याला दाखल करून घेतले जात असे. शिक्षण क्षेत्रात अनेक संशोधने झाली त्यानुसार वयोगट सहापासून मुलाच्या हातामध्ये पेन्सिल पाटी यावी व त्याच्या शिक्षणाला सुरुवात व्हावी असा नियम आला. त्याबाबत अनेक संशोधने झाली त्यामुळे या कायद्यानुसार सहा वर्षाचे मूल झाल्यानंतरच इयत्ता पहिलीत दाखल करता येते; म्हणजेच वयोगटानुसार मुलाला शिक्षण दिले जाते .त्याच्या बुद्धीवर अधिक ताण येत नाही. शहरी भागांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत पालक अधिक आग्रही दिसतात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून नर्सरी नंतर मग बालवाडीचा छोटा ग्रुप, मधला, मोठा गट आणि नंतर पहिली असे समीकरण पालकांचे असते. ग्रामीण भागात मात्र असे चित्र दिसत नाही अधिक पालक  हे शेतकरी किंवा बहुदा आर्थिक स्थिती बेताची असलेले,मोलमजुरी करणारे असतात ग्रामीण भागात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मूल अंगणवाडित दाखल होते तिथे पोषण आहारा बरोबरच अंगणवाडीताईंकडून पूर्वप्राथमिक गटाचे काही शिक्षण मुलांना दिले जाते. अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते दुपारी एक अशी असते बहुतांश ग्रामीण भागात आई-वडील, आजी-आजोबा ,घरातील इतर लोक मोलमजुरी करतात किंवा दिवसभर शेतीच्या कामामध्ये व्यस्त असतात अशावेळी पालकांना वाटते की मूल दिवसभर जर शाळेत घातले तर आपण आपली कामे व्यवस्थित करू शकतो .म्हणून काही पालक अगदी चौथ्याच वर्षी मुलाला पहिलीत दाखल करून घ्या म्हणून आग्रह करतात परंतु; पहिलीचा अभ्यासक्रम हा वय वर्ष सहा असलेल्या मुलाला झेपेल अशा दृष्टीने बनवलेला असतो चार वर्षाचे मुल कसा काय हा अभ्यास पेलू शकेल? मग पालक गुरुजींशी किंवा बाईंची भेट घेतात त्यांना सांगतात आम्ही दिवसभर कामाला जातो याचा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण शाळेत आहे त्याच्या जवळ यालाही बसू द्या. आणि मग बळजबरीने त्या चार वर्षाच्या मुलाला शाळेमध्ये बसवले जाते. आता सकाळी आठ ते एक या वेळेत हे मूल अंगणवाडीत बसलेले असते तिथून पुढे आपल्या भावंडांसोबत प्राथमिक शाळेत बसते म्हणजे मग सकाळी आठ ते पाच पर्यंत हे मूल जवळजवळ शाळेतच असल्यासारखे असते. मग त्याला दुपारी झोप येते, त्याला सु शी लागते त्यासाठी त्याच्या भावाचा किंवा बहिणीचा ही वेळ या कामांमध्ये जातो .अर्थात त्याच्या मोठ्या भावाच्या शिक्षणावर किंवा बहिणीच्या शिक्षणावर या गोष्टीचा परिणाम होतो परंतु हे पालकांना लक्षात येत नाही गुरुजींनी किंवा बाईंनी हे त्या पालकांना समजून सांगितले असता त्यांची ओरड अशी असते की तुम्हाला काय जाते, तुम्हाला कशाचा पगार आहे मग सांभाळले आमच्या मुलाला तर काय फरक पडतो ,आणि जर बाई किंवा गुरुजींनी त्याला शाळेत बसू देण्यास विरोध केला तर मग त्याच्या मोठ्या भावाचे किंवा बहिणीचे शिक्षणही बंद होते. लहान भावाला सांभाळायला मोठ्या बहिणीला किंवा भावाला घरी ठेवले जाते आणि मग शिक्षणाचा हक्क मिळूनही हे मूल शिक्षणापासून वंचित राहते. गुरुजींना बाईंना हे पाहवत नाही ते मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्या मुलाच्या लहान भावासह किंवा बहिणीसह ते त्याला सांभाळतात; आणि त्याला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात .व शाळेत त्याला बसू देतात परंतु या सर्वात अतिरिक्त ताण त्या मुलावरही येतो आणि त्या गुरुजींवर आणि बाईंवर येतो  पण हे समजून कसे घेणार सर्वजण.?
आज बऱ्याच ठीकाणी द्विशिक्षकी शिक्षकी शाळा आहेत या शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापक पद, वर्गशिक्षक, त्याचप्रमाणे जनगणना, मतदार याद्या नोंदणी तसेच शालेय पोषण आहाराचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणे ही देखील कामे आहेत खाजगी शाळांमध्ये या कामांसाठी क्लार्क किंवा शिपाई ची नियुक्ती असते; परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये मात्र वेगळ्या व्यक्ती या कामासाठी मिळत नसतात त्याचा अतिरिक्त ताण गुरुजी व बाईंवर येतो तरी तो ते सहन करतात आणि आपली आणि आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता दाखवतात. आलेली मूल शाळेत रमावी, टिकावी यासाठी विविध अध्यापन पद्धतींचा वापर करतात .काही मुले वयोगटानुसार इयत्ता दुसरी किंवा तिसरीत दाखल होतात त्यांचाही मागील इयत्तेचा अभ्यास पूर्ण करून घेतला जातो .ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वेगळी साखर शाळाही असते काही पालक वीटभट्टी साठी स्थलांतरित होतात अशाही मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात. याखेरीज पालकांच्या भांडणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कौटुंबिक वादही गुरुजी सोडवतात हे निराळे सांगायला नको.      
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती, समाज कल्याण च्या शिष्यवृत्ती ,दत्तक पालक योजना ,सावित्रीबाई फुले उपस्थिती भत्ता  योजना, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती शिष्यवृत्ती योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पुस्तक वाटप योजना या सर्व योजनांचे लाभ विद्यार्थ्यांना देणे त्यांचे फॉर्म भरून केली ही सर्व कामे शिक्षक करतात इथे पालकांचे सहकार्य जरा कमीच असते या शिष्यवृत्तीसाठी मिळणारे कागदपत्र पालकांना सांगता सांगता त्यांच्याकडून मिळवता मिळवता शिक्षकांच्या अगदी नाकीनऊ येते. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक यांच्याशी संपर्क साधून त्यांना बँकेत खाते उघडण्यास सांगणे, पासबुक क्रमांक घेणे, आधार कार्ड बनवून, आधार कार्ड नंबर घेणे उत्पन्नाचे दाखले आणा असे वारंवार सांगणे.जर पालक ऐकत नसतील, दुर्लक्ष करत असतील व त्यांना त्यातील काही समजत नसेल तर ग्रामसेवक सरपंच यांच्याशी संपर्क साधून वारंवार विचारणे, त्याचप्रमाणे दारिद्र रेषेखालील कुटुंबांचे क्रमांक घेण्यासाठी वारंवार ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्याची चौकशी करून ते मिळवणे, ही कामे शिक्षक बिन बोभाट करतात. ही सर्व कामे करत असतानाच शिक्षक गुणवत्तेकडे दुर्लक्ष अजिबात होऊ देत नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळेमध्ये परिपाठ असो, स्वच्छता असो, विद्यार्थ्यांच्या जेवनाबाबत च्या सवयी असोत ,अभ्यासाच्या सवयी असोत,त्यांना आजच्या आधुनिक युगाशी डिजिटल पद्धतीने जोडणी करणे असो या सर्वात शिक्षक कुठेही मागे नाहीत. आपल्या कामाचा ताण कुठेही चेहऱ्यावर जाणून न देता विद्यार्थ्यांची समरस होतात आणि विद्यार्थ्यांना घडवतात ते प्राथमिक शिक्षक .मुलेही त्यांना खूप साथ देतात आणि आपली चुणूक दाखवतात कविता गायन, कथा, वक्तृत्व, हस्ताक्षर, शुद्धलेखन पाठांतर, शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा या सर्वांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही श्रम घेऊन आपले यश नक्कीच संपादन करत आहेत. हे चित्र आहे ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचे, परंतु शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे काय इथे तर पालकही शाळेत जातात आणि विद्यार्थीही त्यांना एकतर 
शिकवणी लावली जाते इतर वेगवेगळ्या क्लासेसला घातले जाते आणि मुलं या सर्वांमध्ये प्रफुल्लित असतात का आणि पालकांनाही मुलांमध्ये अपेक्षित बदल दिसतो का ?ग्रामीण भागातील इयत्ता चौथीचा मुलगा व शहरी भागातील इयत्ता चौथी चा मुलगा दोघेही बुद्धिमत्तेने सारखेच असतात परंतु बौद्धिक ताण शहरी भागातील विद्यार्थ्यांवर अधिक जाणवतो याला कारण म्हणजे पालकांकडून येणारा अतिरिक्त अपेक्षांचा ताण हे विद्यार्थी सहन करत असतात. शहरी भागात स्पर्धा अधिक असते पालकांना जणू काही आपण शाळेत जात आहोत असे वाटत असते. मुलांच्या बुद्धिमत्तेचे ते स्वतःच्या सांपत्तिक स्थिती व बौद्धिक स्थितीशी तुलना करीत असतात यामधून मुलांवर अधिक ताण येतो. या पालकांना सांगावेसे वाटते मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे ते तो बजावणार आहेत त्यांना आनंदाने हे शिक्षण घेऊ द्या अन्यथा त्यांचे आयुष्य पूर्ण तणावग्रस्त होईल आणि अशा त्या तणावग्रस्त अवस्थेतील मुल मोठे झाल्यानंतरही ताण तणावाला कसे सामोरे जाईल. प्रत्येक मूल हे वेगळे असते हे शहरातील पालकांना समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे या मुलाला कशामध्ये रस आहे हे जाणून घेऊन त्याला फुलवायला हवे त्याला तसे शिकवायला हवे. पालकांना वाटते आम्ही फी भरलेली आहे सर्व सुविधा मुलाला पुरवलेल्या आहेत मग त्याने गुणवत्तेमध्ये पुढे राहिलेच पाहिजे. परंतु अभ्यासात पुढे असणे म्हणजे प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे काय? खेळ ,'संगीत ,'कला हे देखील  प्राथमिक शिक्षणामध्ये अंतर्भूत आहेत त्याचाही आस्वाद आपल्या मुलांना शहरी भागातील पालकांनी घेऊ द्यायला हवा.
सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळाला आहे तो ते बजावतीलही फक्त आपण त्यांना मार्गदर्शन करायचे आहे ढकलायचे नाही शिक्षक आणि पालकांची भूमिका मार्गदर्शकाची आहे हे सर्वांनी लक्षात घेतले की प्राथमिक शिक्षणाचा हक्क बजावणे सर्व बालकाला सोपे जाईल नाही का?
सविता साळुंके, श्रीरामपूर, कोड नंबर 13
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
*ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण*
ग्रामीण भागात शिक्षणाची अवस्था खुप वाईट स्थितीमध्ये असल्याचे प्रत्येकांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. आज राज्यात गाव तेथे शाळा आहे म्हणजे प्रत्येक गावात कमीत कमी चौथ्या वर्गापर्यंतची शाळा अस्तित्वात आहे. जिसका कोई नहीं उसका सरकारी स्कूल ही आधार है, अशी सध्या तरी स्थिती आहे. इंग्रजी माध्यमाच्या किती ही शाळा रोज नव्याने जरी निर्माण झाले तरी सरकारी शाळेचे महत्त्व काही कमी होत नाही. याच सरकारी शाळेत शिकलेले अनेक अधिकारी आज मोठ्या पदावर काम करीत आहेत. माणसाच्या संपूर्ण जीवनात प्राथमिक शिक्षण जेथे पूर्ण झाली ती शाळा कधीही विसरु शकत नाही. योग्य संस्कार करण्याचे एक संस्कारी केंद्र म्हणजे प्राथमिक शाळा. जेथे जीवनातील अनेक लहान सहान बाबी शिकविल्या जाते. अभ्यासात हुशार असो वा नसो पण व्यक्ती सुसंस्कारी असेल तर यशस्वी जीवन जगु शकतो. माणसाचे चारित्र्य शुध्द असेल तर त्यास कुठे ही सन्मान आणि गौरव मिळू शकते. चारित्र्य मिळविण्याचे काम शिक्षणातून मिळते. पण आज मुलांना प्राथमिक शिक्षण योग्य प्रकारे मिळत नाही अशी ओरड समाजातून होत आहे. त्यात तथ्य असू शकते आणि ते खरे असेल तर त्यास कारणेदेखील असू शकतात. ग्रामीण भागातील शाळेत त्या सुविधा मिळत नाहीत जे शहरी भागातील शाळेत मिळतात. तिथे विद्यार्थी संख्या भरपूर असून देखील तेथील मुले सर्व बाबतीत सर्वगुणसंपन्न असतात. इथे मात्र विद्यार्थी संख्या 10 च्या घरात असून देखील त्यांची स्थिती तेवढी चांगली नसते. कारण अपुरी शिक्षक संख्या असल्यामुळे एकाच शिक्षकांवर सर्व गोष्टीचे भार पडते. मुलांचे पालक जागरूक नसतात. खाजगी शाळेत मुलांना पाठवित असताना त्याची पूर्ण काळजी घेणारे पालक सरकारी शाळेत पाठविताना बेफिकिर राहतात. असे का ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे असे वाटते. समाजात आज असे ही पालक भेटतात मुलगा इंग्रजी शाळेत पाठवितात आणि मुलगी सरकारी शाळेत असे का ? असे जर विचारले तर फारच गमतीशीर उत्तर देतात. मुलीने किती शिकून काय फायदा आहे सर शेवटी ती लग्न झाल्यावर दुसऱ्यांच्या घरी जाणार ना. मुलगा शिकला, त्याला नोकरी लागली तर आपल्या घराची प्रगती होणार नाही काय ? अशी विचारधारा ठेवणाऱ्या पालकामुळे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आज कित्येक मुलीं शिकून मोठ्या पदावर काम करीत आहेत. त्यांचे पालक असे विचार केले असते तर समाजातील आजचे चित्र बघायला मिळाले असते काय ? सध्याच्या सरकारी शाळेत एक नजर फिरविली तर आठव्या वर्गापर्यंत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. अभ्यासात सुद्धा मुलीं हुशार दिसून येतात. दहावी आणि बारावीच्या निकालावर एक नजर फिरविली तर लक्षात येईल की मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी देखील मुलांपेक्षा जास्त आहे. म्हणजे मुलाकडे विशेष लक्ष देऊन सुद्धा त्याची प्रगती लक्षणीय नाही आणि मुलगी दुर्लक्षित असून देखील गुणवत्तेत ती पुढे आहे. म्हणून पालक वर्गानी या मुलामुलींत भेद न करता शिक्षण द्यायला पाहिजे ते ग्रामीण भागात दिसत नाही. गावात ज्या वर्गापर्यंत शाळा आहे तेथ पर्यंत मुलींचे शिक्षण पूर्ण होते. पुढील शिक्षणासाठी दुसऱ्यां गावी मुलींना पाठविले जात नाही. येथे सुद्धा विविध कारणे आहेत त्यावर आपणास बोलायचे नाही. तो एक स्वतंत्र विषय होऊ शकते. याचाच अर्थ त्या प्राथमिक शिक्षणावर ज्यांची गाडी थांबते त्यांची जीवनात काय प्रगती होणार ?. ते साक्षर असुन देखील निरक्षरा प्रमाणेच वागतात. मुलांना शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते मात्र त्याचे वैयक्तिक अभ्यासावर मुळी लक्षच नसते. त्यामुळे देखील प्राथमिक वर्गात गुणवत्ता दिसून येत नाही. ग्रामीण भागात मुळात शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे मुले रोजच्या अभ्यासापासून दूर राहतात. आई-बाबा शेतात काम करून सायंकाळी दिवे लावणीच्या वेळी घरी येतात. घरातले काम उरकुन जेवण केल्यावर शारीरिक थकव्यामुळे आपल्या मुलांना आज शाळेत काय झाले हे न विचारता झोपी जातात. ही एका दिवसाची कथा नसून रोजचीच कथा आहे. मुलांच्या शिक्षणाविषयी हे पालक खुपच बिनधास्त असतात. त्यांना काहीच काळजी वाटत नाही. वेळ निघुन गेल्यावर मात्र पश्चाताप करतात. तेंव्हा काहीच करता येत नाही. इथे शाळेत जेवढे शिकायला मिळाले तेच त्यांच्यासाठी अंतिम असते. 
शहरातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेला बालवाडी किंवा अंगणवाडी जोडलेली असते जेथे तीन वर्षा पासून ते सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्राथमिक वर्गास अनुकूल असे शिक्षण दिल्या जाते. त्यामुळे पहिल्या वर्गात प्रवेश घेणारे येथील विद्यार्थी प्रगत असतात. त्या उलट ग्रामीण भागात बघायला मिळते. ग्रामीण भागात देखील अंगणवाडी आहेत. तेथे सुध्दा तीन ते सहा वर्षातील मुले दररोज येत असतात. मात्र येथे मुलांना कुठलाही अभ्यासक्रम नसल्यामुळे अंगणवाडी उरल्या खाऊपुरते असेच म्हणण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता अंगणवाडीमध्ये प्राथमिक माहिती मुलांना करून दिल्यास पहिल्या वर्गात काही कठिन जात नाही. पण अंगणवाडी आणि शिक्षण विभाग यांचे काहीही संबंध नसल्यामुळे पहिल्या वर्गात प्रवेश घेणारी मुले प्राथमिक माहिती देखील नसलेले मिळत आहेत. रोज शाळेत जाण्याची सवय लावणे हे काम देखील अंगणवाडी नीट करू शकत नाहीत हे अचानक केलेल्या अंगणवाडीतपासणी च्या वेळी अधिकारी लोकांना निदर्शनास आलेले आहेत. जोपर्यंत ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये सुधारणा होणार नाही तोपर्यंत प्राथमिक शाळा पूर्णपणे प्रगत होईल याबाबत शंकाच आहे. शाळेच्या नियंत्रणाखाली अंगणवाडीचे कार्यक्षेत्र आल्या शिवाय त्यांच्यात काही सुधारणा होईल असे देखील वाटत नाही. सगळ्या गावात शाळेच्या आवारात अंगणवाडी भरविले जाते. मात्र शाळेचा आणि अंगणवाडीचा काही एक संबंध नाही. काही गावात अंगणवाडी शिक्षिका खुप मेहनत घेऊन मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे देतात. तेथील मुलांची प्रगती शासनाने जसे ठरविले आहे अगदी तसेच तंतोतंत होत असते. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगती मध्ये अंगणवाडीमधील शिक्षण खुप महत्वाचे आहे, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर,
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 "प्राथमिक शिक्षण"             
प्राथमिक शिक्षण म्हटले की आपल्या समोर आपले शालेय जीवन आठवल्या शिवाय रहात नाही. इयत्ता पहिली ते पाचवी  पर्यन्त प्राथमिक शिक्षण तर इयत्ता शवि ते आठवी पर्यन्त उच्च प्राथमिक शिक्षण असे समजले जाते.प्राथमिक शिक्षण हे मुलाच्या शिक्षणरूपी इमारतीचा पाया समजला तर चुकीचा नाही. त्यासाठी सदर शिक्षण रूपी इमारतीचा पाया भक्कम करण्याचे महत्वाचे काम प्राथमिक शिक्षकाना करावे लागते कारण पालक आपला पाल्य एक प्रकारचा चिखलाचा गोळा त्यांच्या ताब्यात दिलेली असतात त्यावर शिक्षक   त्याना ज्ञान देण्याचे काम करतात.त्यांच्या शिक्षणरूपी इमारतीचा पाया पक्का करतात.जेने करुण भविष्य काळात येणाऱ्या संकटाला तो न भीता आपल्याला मिळालेल्या प्राथमिक शिक्षणाच्या आधाराने  जीवनात पुढील शिक्षण पूर्ण करु शकतो त्या करिता प्राथमिक शिक्षण किती महत्वाचे आहे.प्राथमिक शिक्षण हे मातृभाषा मधूनच दिले तरच ते मुलाना पोषक म्हणजेच त्याना शिकवलेले चांगले आकलन होऊ शकते,परन्तु सदया ज्या पालकांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते पालक या जि.प./नगर पालिका/ महानगर पालिका मार्फ़त चालवणाऱ्या शाळे मध्ये आपल्या पाल्या स नाव न घालता खाजगी शालामध्ये लाखो रूपयाची फ़ी भरून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्या पाल्याच्या मानसिकतेचा अजिबात विचार पालकांनी केलेला नाही केवळ त्या बालकावर अन्याय केलेला आहे. कारण मातृभाषेत शिक्षण न मिळाल्यामुळे त्याच्या मनात जे प्रश्न  किवा शंका निर्माण होतील त्याला विचारता येणार नाहीत कारण तेवढे आकलन भाषेचा बदल  झालेमुळे होत नसते ती आकलन शक्ति येण्यासाठी तीन चार वर्षे जाऊ लागतात त्या मुळे मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेणारे  सरकारी शालेतीलच मुले हुशार असलेचे अलीकडील संशोधनावरुन सिध्द झालेले आहे.त्यामुळे काही मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जि.प. सारख्या सरकारी शाळेच्या पट संख्येत पुन्हा वाढ होत आहे.या वरून प्राथमिक शिक्षण महत्वाचे आहे.शासन सुध्दा मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होणेसाठी मध्यांन भोजन दिले जाते. त्या शिवाय आर्थिक दुर्बल व घटकासाठी शिष्यवृत्ती, तसेच अस्वच्छ परीसरातील कामगाराच्या बालकासाठी शिष्यवृत्ती ,अपंग शिष्यवृत्ती तसेच सावित्रीबाई फुले दत्तक योजना,मुलीसाठी उपस्थिती भत्ता या सारख्या विविध योजना प्राथमिक शिक्षणामध्ये सध्या राबवल्या जात आहेत. तसेच वय वर्षे ६ ते १४ पर्यन्त च्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत दिल जाते.प्राथमिक शिक्षण हा मुलाचा मूलभूत हक्क आहे  शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली  ते पाचवी पर्यंतच्या मुलाना त्याच्या घरापासुन १ कि.मी.अंतराचे आत व ६वी ते आठवी च्या विध्यार्थी यांना त्यांच्या घरापासून ३ कि.मी. आत मोफत शाळेची सोय सरकारने करणे सरकारवर बंधनकारक आहे.यापेक्षा अधिक अंतर असल्यास सरकारने वहातूक सुविधा सरकारने करावयाची आहे.त्या साठी केंद्र आणि राज्य सरकारने कायदे केलेले आहेत. यावरुन " प्राथमिक शिक्षण" किती महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येते.....
लेखक..जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
   07 प्राथमिक शिक्षण
      शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. बाळ पोटात असल्यापासून ते मरेपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण घेत असते.तरीही शिक्षणाचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, पूर्व माध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे प्रकार पडतखत.वयोगटानुसार हे टप्पे पाडले आहेत.प्राथमिक शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. पूर्व प्राथमिक मध्ये मूल हे पूर्णपणे आईवडिलांच्यावर,शिक्षकांवर अवलंबून असते.शाळेची गोडी वाटावी,वाढावी यासाठी हा टप्पा उपयोगात आणला जातो.पण प्राथमिक शिक्षण घेणारे बालक हे बऱ्यापैकी स्वावलंबी झालेले असते.त्यामुळे ते स्वतःची मते मांडू शकते,विचार करच शकते.शिक्षकांचे ऐकते.मग हे प्राथमिक शिक्षण म्हणजे नेमके काय? हे आता आपण बघूया.
प्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण होय. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार सहा ते 14 वर्ष वयोगटातील सर्व बालकांच्या साठी  त्यांच्या शिक्षणाची तरतूद या अधिनियमात केलेली आहे. या वयोगटातील मुलांचे शिक्षण हे प्राथमिक शाळा व पूर्व माध्यमिक शाळा मध्ये होत असते. बालकाचा सक्तीच्या शिक्षणाचा हक्क या अनुसार सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत ते शिक्षण त्या मुलाला मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क असेल असा होतो.
 प्रत्येकाचे प्राथमिक शिक्षण हेच त्यांच्या गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा मध्ये बहुतकरून होत असते.तशी तरतूदच कायद्याने केली आहे. या वयोगटातील प्रत्येक मूल हे शिकलेच पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे.या वयोगटातील शिक्षण अतिशय आनंददायक द्यावे लागते. कारण हे निरागस व लहान मुले कंटाळा करू नयेत यासाठी रंगतदार व आनंददायी पद्धतीने त्यांना शिकवावे लागते. प्राथमिक शिक्षण घेणारी मुले ही आपल्या शिक्षकांच्या बरोबर रंगून गेलेली असतात. या मुलांना आपल्या शिक्षकांच्या वर खूप भरोसा, आस्था व प्रेम असते. या शिक्षणाची जबाबदारी सरकारने उचललेली असल्यामुळे, या वयोगटातील मुलांना शासनाकडून सवलती पुरवल्या जातात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी सरकार कडून युनिफॉर्म, सकस शालेय पोषण आहार, विविध शिष्यवृत्त्या मिळत असतात. जेणेकरून कोणतेही मुल हे कोणत्याही कारणाशिवाय शिक्षणापासून वंचित राहू नये हा या पाठीमागे हेतू असतो. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे. कारण हे वयच असे असते की या वयात अभ्यासाची गोडी लागली तर आयुष्यभर त्या विद्यार्थ्याला ती साथ देत असते व यश काबीज करण्यास  त्याला सहाय्य करते. या वयामध्ये मुलांना त्या वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो तेवढे ते लक्षात ठेवतात. नवनवीन शिकण्याची ऊर्मी त्यांच्यात असते. अनेक ज्ञानरचनावादी नवीन उपक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी होतात. कोणत्याही कृत्रिम घटकावर अवलंबून न राहता ते केंव्हाही, कशाही कोणत्याही प्रकारे न लाजता प्रत्यक्ष कृती करून पाहण्यात त्यांचा कल असतो."छडी  लागे छम छम, विद्या येई घम घम."  असे पूर्वी म्हणजे जायचे, पण आता आर.टी.ई ऍक्ट नुसार विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची  शारीरिक इजा करणे यावर बंदी आहे. आणि त्याच बरोबर इयत्ता आठवीपर्यंत नापास न करणे या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील अभ्यासाची भीती निघून गेली पण अभ्यास करण्याची सवय मात्र मोडली आहे. कारण त्यांना शिक्षकाच्या माराची भीती नाही किंवा नापास होण्याची शक्यता नाही, त्यामुळे अभ्यास कशाला करायचा ? एक मानसिकता या मुलांच्या मध्ये निर्माण झालेली आहे.ही एक धोक्याची घंटा आहे. सर्वांनी पुढे येऊन कोणत्यातरी दुसर्‍या सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे.
 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणा पेक्षा  आजही मला माझे प्राथमिक शिक्षणच  खूप आवडते. कारण ते इतके आनंददायी होते की ते अजूनही स्पष्ट माझ्या लक्षामध्ये आहे. म्हणूनच कवीसुद्धा म्हणतात, " रम्य ते बालपण "  शिक्षकांची एवढी जवळीकता निर्माण होते विद्यार्थ्याला ते शिक्षक आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती आहेत असे वाटते.त्यामुळे मुलांचा विकास भरपूर वेगात होतो.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 प्राथमिक शिक्षण : आत्यंतिक गरज
        प्राथमिक शिक्षण यात अंतर्भूत असलेला अर्थच सांगतो, जे शिक्षण व्यक्तीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मूलभूत शिक्षण म्हणून दिले जाते ते .तेव्हा व्यक्तीचे मन अतिशय संस्कारक्षम व कुतूहल जन्य बुद्धी सगळे ज्ञान शोषण्यास समर्थ असते.
           आपल्याकडे सक्तीचे प्राथमिक शिक्षण त्यामानाने उशिरा आले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकार भारतीय जनतेच्या शिक्षणाच्या बाबतीत फारच उदासीन होते. भारतीय जनतेला शिक्षित केल्यास राष्ट्रीयत्वाची, देशभक्तीची भावना जागृत होऊन त्यांना आपल्या हक्काची जाणीव होईल. या भीतीने ते जनतेला शिक्षित करण्यास उत्सुक नव्हते. त्यांना लिपिकांची जास्त गरज होती. तेवढेच ते शिक्षण ते देत होते. स्वातंत्र्यानंतर मात्र 'शिक्षण हे सक्तीचे असावे', ह्या विचाराने जोर धरला व तसे अमलात आणले गेले.
             पण सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्या. आपल्याकडच्या बर्‍याच बोलीभाषांना लिपी अस्तित्वात नाही. त्यामुळे घरी बोलली जाणारी भाषा, शाळेत माध्यम म्हणून वापरली जात नसल्याने मुलांना शाळेचा कंटाळा येत असे. शाळेबाबत आकर्षण वाटत नव्हते.
           तसेच प्राथमिक शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित नसल्याने, त्यांच्या सृजनशीलतेचा विकास होत नसे. तसेच व्यावहारिक शिक्षणही मिळत नसे. म्हणून शिक्षणात विद्यार्थ्यांना गोडी वाटत नसे.
          या सर्वांवर उपाय म्हणून उत्तम नागरिक घडवण्यासाठी रचनात्मक शैक्षणिक पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. शिक्षण केवळ पुस्तकी न राहता वर्गा बाहेरील घडामोडींचा समावेश कसा करता येईल, विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जीवनात ते प्रत्यक्ष कसे उपयोगी पडेल, त्याचे अनुभवविश्व कसे समृद्ध करता येईल, या सर्वांचा विचार त्यात केला आहे.
           पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे आरटीई म्हणजे राईट ऑफ एज्युकेशन या कायद्या अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे.
           विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात.  भोजन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांसाठी शिष्यवृत्ती, कामगारांच्या बालकांसाठी शिष्यवृत्ती, अपंगांसाठी शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मुलींसाठी उपस्थिती भत्ता, अशा योजना राबवल्या जातात. 
           'राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अंड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट, 2009' प्रसिद्ध केला गेला. हा अधिनियम संपूर्ण भारतात 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला .
            1950- 60- 70 पर्यंत मराठी शाळांना बरे दिवस होते. महापालिका शाळेत जाणे म्हणजे 'कमीपणा' मानला जात नव्हता. जास्तीत जास्त पालक मराठी माध्यमाचा व शाळेचा पर्याय निवडत. मराठी माध्यमातून शिक्षण शिकणाऱ्या मुलांना कुठलाही 'न्यूनगंड' त्यावेळी नव्हता.
            पण नंतर जसजशा सुधारणा होत गेल्या. कम्प्युटर, आयटी, कम्युनिकेशन, ग्लोबलायझेशन यामुळे नव्या पिढीची मानसिकता बदलली. इंग्रजी माध्यमातून शिकले तर आमची मुले 'जगाचे आव्हान' पेलू शकतील हा सार्वत्रिक समज झाला. पाच-सहा वर्षाच्या विद्यार्थ्याची कोवळी, कोरी बुद्धी. त्यावर मातृभाषेतून शिकवले तर लवकर आत्मसात होते. पण आपण विचार न करता मुलांवर इंग्रजी चा बोजा टाकतो. त्याचा कायमचा भार मुलांना वहावा लागतो. बरेचदा असे होते ना मातृभाषेबद्दल आत्मीयता, आवड, ना इंग्रजी बद्दल. त्यामुळे कुठल्याच भाषेतले वाचन आवडीने, मनापासून केले जात नाही, फक्त अभ्यासक्रमातील पुस्तकांचे वाचन होते. 'ज्ञान निर्मित' समाज हा फक्त इंग्रजीतूनच घडवला जातो असा एक (गैर!)समज. त्यामुळे कष्टकरी, कामगार, उपेक्षित घटकातील मुले, महापालिकेच्या शाळेत जातात व बाकीचा तथाकथित उच्चभ्रू समाज इंग्रजी शाळेत असे चित्र सर्वत्र दिसते. इंग्रजी शाळांची फी अवाच्या सव्वा असते. ती भरता भरता पालकांना नाकीनऊ येते. पालकांना जर इंग्रजी येत नसेल तर त्यांच्या पाल्याचा अभ्यास घरी घेण्यास कठिण जाते. आणि मग स्पेशल ट्युशन ठेवावी लागते. तोही खर्च वेगळा. मुलं अभ्यासा खाली दबून जातात. पण 'लक्षात कोण घेतो?'
           विद्यार्थ्याचा प्राथमिक शिक्षणाचा काल हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. तेव्हाच पुढील आयुष्याचा पाया रचला जातो. त्याकाळात शिक्षणाची गोडी लागायला हवी. उत्तम शिक्षणाचा पाया व उत्तम संस्कार घडवले गेले पाहिजेत. हे केव्हा घडेल? जर शिकवणारे शिक्षक 'हाडाचे शिक्षक' असतील तर. मला वाटते त्यासाठी प्राथमिक शिक्षकांना पगार चांगला द्यावा. त्यांना इतर कुठलीहि  कामे देऊ नयेत. समाजात त्यांचा योग्य तो मान राखला जावा. म्हणजे चांगला माणूस या व्यवसायाकडे वळेल. त्यामुळे येणारी पिढी सर्व क्षेत्रात भारताची मान उंचावेल अशीच घडेल...
शुभदा दीक्षित (11)
पुणे
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
*38)*
*प्राथमिक शिक्षण*

प्राथमिक शाळा ही एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्याची सर्व विषयाची तोडओळख होते. हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे शिक्षण असते. म्हणूनच व्यक्तीच्या ,अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजासोबतच शिक्षण व आरोग्य यांचाही आलीकडे नव्याने मुलभूत गरजेत समावेश केले जाते.
          शैक्षणिक प्रक्रिया ही पूर्व प्राथमिक-प्राथमिक-उच्च प्राथमिक-माध्यमिक-उच्च माध्यमिक आशा वेगवेगळ्या स्तरातून चालते. या विविध शैक्षणिक स्तरात प्राथमिक शिक्षणाला सर्वांत जास्त वा अनन्य  साधारण महत्त्व आहे. प्राथमिक शिक्षण म्हणजे "मुलांच्या जीवनाचा पाया" असेच काहीसे म्हणावे लागेल. प्राथमिक शिक्षणामध्ये इयत्ता पहिली सातवी म्हणजेच ६ ते १४ वर्षे  वयोगटातील मुलांच्या समावेश असतो.
           स्वातंत्रपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्राथमिक शिक्षणावर खुप विचार झालेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक आयोग व समित्या नेमल्या गेले व वेळोवेळी सर्वेक्षणही करण्यात आले आणि सर्वेक्षणनुसार विविध अहवालही समोर आले.त्यानुसार अनेक प्रयोगही झाले परंतु या सर्व प्रयत्नातून अपेक्षित वा समाधानकारक परिणाम दिसून आलेला नाही. म्हणूनच सध्याची शिक्षण पद्धती टिकेचं  लक्ष बनलेले दिसून येते.
          लोकशाही प्रधान राष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा आपल्या हक्काची आणि त्याच  बरोबर कर्तव्याची जाणीव करून घेण्याइतपत शिक्षित असला पहिजे हे स्पष्ट आहे. आपल्या देशात निरक्षरांना साक्षर करण्याचे प्रयत्न स्वातंत्र प्राप्तीनंतर निरनिराळ्या प्रकारे जोमाने चालू आहे. साक्षरतेचा प्रश्न हा फक्त प्रौढ़ाच्या पुरताच मर्यादित नसून आज जी मुले शाळेत अजिबात जात नाहीत किंवा गेली तरी मध्येच शाळा  सोडतात अशा मुलांशीही निगडीत आहे.
            प्राथमिक शिक्षण हा सर्व शिक्षणाचा पाया आहे. त्याच्या संख्यात्मक व गुणात्मक प्रगतीवरच पुढील शिक्षणाची प्रगती अवलंबून आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजाच्या अपेक्ष्या सर्व दृष्टिने उंचावने अगदी स्वभाविकच आहे. त्या दृष्टिने शैक्षणिक पुनर्रचना होणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही.
         युगपुरूष महात्मा फुले यांनी भारतात प्रथम प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण्याचा पुरस्कार केला. १८४८ साली पुण्यात बुधवार पेठेत मुलींची पहिली प्राथमिक शाळा सुरू केली. आद्याशिक्षिका क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितिल पहिली भारतीय शिक्षिका म्हणून मान मिळऊन जोमाने कार्य करून महात्मा जोतिबांना तितक्याच सार्थपणे साथ दिली.
तर प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व :-
भारतीय शिक्षण व्यवस्थेत  प्राथमिक  शिक्षणाला अनेक दृष्टिणे महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेत समाविष्ठ असलेले सर्व शैक्षणिक स्तरावरिल विद्यार्थी , शिक्षक,लेखक,प्रकाशक आणि शिक्षणाशी सबंधीत कार्यकर्ते यांचा बाबतितील विचारांचा एकत्रित विचार केला तर देशाचा एकून लोकसंख्येपैकी जवळ जवळ एक चतुर्थाश लोकसंख्या  शिक्षण क्षेत्रात गुंतलेले आहे. त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील संख्या ही सर्वात जास्त आहे.
         लोकशाहितील प्राथमिक शिक्षणाचे स्थान त्या दृष्टिने  विशेष महत्त्वाचे  आहे. कारण प्रत्येक नागरीकाला जे किमान शिक्षण मिळाले  पाहिजे ते प्राथमिक शिक्षण आहे. कारण लोकशाहितील प्रत्येक नागरीक हा डोळस बणुन  त्याने आपल्या स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचा व् राष्ट्राच्या विकासालाही हातभार लावला पाहिजे. या दृष्टिने प्राथमिक शिक्षणाचा विचार केला तर प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक नागरिकाला आवश्यक असे किमान किंवा मुलभुत शिक्षण होय.
          शिक्षण हे राष्ट्रविकासाचे प्रभावी साधन आहे हा सिद्धांत आता जगतमान्य झालेला आहे. तेंव्हा देशाचे भवितव्य हे देशातील नागरिकांना मिळणाऱ्या शिक्षणावर अवलंबून असते हा विचार महत्त्वाचा ठरतो
- अमित प्र. बडगे, नगपुर
  (7030269143)
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
प्राथमिक शिक्षण-खेळीमेळीचे (28)
      शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही,हे ओळखूनच महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीस शिक्षण दिले, घरातील एक स्त्री जरी शिकली,तरी ती आपल्या कुटुंबियांना शिक्षित करते,शिक्षणाची गोडी निर्माण होते,त्याबरोबरच इतर मान्यवरांनी शिक्षण कसे व का महत्वाचे हे पटवून दिले,आणि आता पहाता शिक्षण जगभर आहे,प्रत्येक माणूस त्यात समरस झाला आहे.
         प्राथमिक शिक्षण हे शासन अधिनियम 2009 पासून लागू करण्यात आले प्राथमिक शिक्षणाशिवाय काहीच नाही, असे म्हणावे लागेल कारण हे 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफतचे शिक्षण असल्याने सर्व तळागाळातील, कामगार,आर्थिक दृबल घटक,सर्वच वर्गासाठी आहे,त्यात भेदाभेद नाही,या शिक्षणामुळे जेमतेम शिक्षण साधले जाते,तसेच मुलांसाठी पोषक आहार याची सोय, मोफत पुस्तके,मिळतात,त्यामुळे पालकांचा बराचसा शैक्षणिक वाटा शासन उचलते,त्यामुळे किमान शिक्षण साधले जाते.
            पोषक आहारातुन मुलांना उपयुक्त अशी जीवनसत्वे मिळतात,आणि हे बनवणारे महिला बचत गट यांना देखील कामे मिळतात,म्हणजे प्राथमिक स्तरावर त्याची आर्थिक गरज देखील भागते.प्राथमिक शिक्षणासाठी शासन बरेच उपक्रम राबवत आहेत,विदयार्थी या टप्प्यावर संस्कार घेत असतात,त्यांच्या मनावर संस्कार रुजवले जातात,आणि हे काम शिक्षक करतात,आणि या शिक्षकांची भरती माध्यमिक शिक्षकांच्या तुलनेत अधिक असते.
            बालकांचा मोफत विकास या अनुशंगाने RTE नियमानुसार शाला बाह्य विद्यार्थ्यांचा देखील शोध घेतला जातो,समाजातील कोणतेही मूल शिक्षणा शिवाय मुकणार नाही,हा त्याचा उद्देश असतो, म्हणूनच जे फिरतीवर असतात,ज्यांचे कुटुंब सतत स्थलांतरित होत असते,जागोजागी भटकी जमात यांना देखील शिक्षणात सवलत मिळते,असे विदयार्थी शाळेत प्रविष्ट होतात.
         शासन,शिक्षक हे करतच आहे,परंतु यासाठी पालकांचा देखील तितकाच पाठिंबा असायला हवा,तरचं शिक्षण हे सक्तीचे न रहाता खऱ्या अर्थाने खेळीमेळीचे शक्य होईल!!

सुजाता जाधव
नवी मुंबई
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
प्राथमिक शिक्षण घर : प्राथमिक शाळा
           मूल जन्मले की त्याच्या प्राथमिक शिक्षणाला सुरुवात होते. दोन तीन महिन्याच्या मुलासमोर आपण खुळखुळा वाजवतो, "इथे इथे बस रे मोरा" असे गाणे गातो. अंगाई गीत म्हणतो. म्हणजे घरातच त्याची प्राथमिक शाळा सुरू होते. पुराणात एक कथा होती.श्रीकृष्णाची भगिनी आणि अर्जुनाची पत्नी सुभद्रा अभिमन्यूच्यावेळी गरोदर असतानाचे संस्कार किंवा चक्रव्यूहाचे ज्ञान आईच्या पोटातच मिळाले होते. पण चक्रव्यूहातून बाहेर येण्याचे ज्ञान मिळाले नसल्याने पांडव कौरव युद्धावेळी दुर्योधनाने केलेल्या चक्रव्यूहात अडकून अभिमन्यूला आपले प्राण गमवावे लागले.बाळ आईच्या पोटातून संस्कारांची, ज्ञानाची शिदोरी घेऊन जन्मते. जन्मल्यावर थोडक्यात हि आपला चेहरा पाहून हसायचे काळात बाळाला आपला चेहरा पाहून रडायचे की हसायचे हे बाळाला चांगलेच कळते. म्हणजेच प्राथमिक शिक्षण हे खास द्यावे लागत नाही ते अनुभवाने प्राप्त होत असते. जे आयुष्यभराच्या संचिता साठी पुरेसे असते.
        जीवन जगण्यासाठी लागणारे प्राथमिक शिक्षण हे बालवाडीपासून चौथीपर्यंत शाळेतुन मिळते. तिथे गुरूकडून विषयानुरूप ज्ञानाचे भांडार प्राप्त होत असते. त्यातून तावून सुलाखून निघालेले बालक पुढे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यास सक्षम बनते. प्राथमिक शिक्षणाद्वारे बालकांना मूल्यशिक्षणाचेही धडे दिले जातात. मानवाच्या अन्न-वस्त्र-निवारा या या प्राथमिक गरजा आहेत. त्या गरजा भागविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य ही तितकेच महत्त्व पूर्ण आहे. हे पटवून देणे महत्त्वाचे आहे. मिळालेले ज्ञानच उपयोगी पडते आणि त्यासाठी प्रथम आई-बाबा आजी-आजोबा यांचाच हातभार लागतो.एखादी वस्तू गरम किंवा धारदार असेल तर त्यापासून बालकाला धोका आहे हे आई,आजी अभिनयाने दाखवितात.अशा अनेक गोष्टी मूल वाढता वाढता मनाने आणि ज्ञानानेही विकसित होत असते.
         जगात वापरण्याचे ज्ञान बालकाला मित्र,गुरू यांच्याकडून मिळते, अनुभवाने कळते.पूर्वी मुलींना शाळेत घालणे किंवा साक्षर बनविणे सनातनी लोकांसाठी नियमबाह्य होते.परंतू इंग्रज राजवटीत भारतातील समाज सुधारक महात्मा फुले, रानडे, आगरकर, सावरकर, भांडारकर, राजा राममोहनराय हे शिकले. शहाणे ससरते झाले आणि साक्षरतेनेच मानवाचा  खरा विकास होतो. त्यामुळे मुलांसारखे मुलींनीही साक्षर व्हावे या विचारापर्यंत येऊन पोहोचले. फक्त पोहोचलेच नाहीत तर महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यात शाळा उघडली. जाती-धर्माचे स्तोम माजवून अस्पृश्य लोकांनाही शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता त्या विरोधाला न जुमानता आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा उघडल्या. यात फुले यांच्या  पत्नी सावित्री बाईंनी मोलाची साथ दिली. त्यामुळे आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात.  घराबाहेर पडून आपल्या तसेच परिवाराच्या चरितार्थासाठी अर्थार्जनही करू शकतात. आज जगातील कानाकोपऱ्यात शिक्षण सक्तीचे केले आहे. इतकेच नव्हे तर मुलींच्या शिक्षणासाठी समाजाची असलेली उदासीनता पुसली जावी म्हणून सर्व मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत दिले जाते.  गरीब श्रीमंत यांना सरकारकडून पाठ्यपुस्तके मोफत वाटली जातात. जेणेकरून पैशासाठी समाजातील दुर्बल घटक निरक्षर राहून मागे पडू नये असा सरकारचा प्रांजळ हेतू आहे. हल्ली गावागावात सरकारकडून शाळेतील मुलांना दुपारचे जेवणही पुरवले जाते. म्हणून फक्त गरज आहे समाजमनाच्या आरशाची आणि स्वच्छ प्रतिमेची.
        देशातील प्रत्येक बालकाला किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळावे म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असते. पैशासाठी किंवा इतर कारणांसाठी बालकांचा शिक्षणाचा हक्क डावलण्याचा कोणी प्रयत्न केला तर कायद्याचा बडगाही दाखवला जातो. परंतु स्थलांतरित समाजात आजही मुलांच्या शिक्षणाकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही. साक्षरतेला प्राधान्य दिले जात नाही ही भारतीय समाजाची खरी शोकांतिका नव्हें का ?

सौ भारती सावंत 
मुंबई
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 ........प्राथमिक शिक्षण..........
        भारतात प्राथमिक शिक्षणाचा पाया छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी घातला.प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे असा सिद्धांत त्यांनी मांडला. प्राथमिक शिक्षण हा समाज दृढीकरनचा पाया आहे.प्रत्येक मूल शिकले पाहिजे .या साठी शाहू महाराजांनी 1913पासून गभिर्याने विचार करावा या साठी इंग्रज सरकार ला ठणकावून सांगितलं स्वतः  राजधानीतून शिक्षणातून निधी काढून ठेवत आणि 27सप्टेंबर 1917रोजी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा तयार करून सक्ती chya शिक्षणाचा पाया घातला.पुढे महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे पुण्यातील उपेक्षाच मुला मुलींसाठी मोफत शिक्षणाचा हट्ट धरला.आणि पुढे वेगवेगळे आयोग आयोग निर्माण करून लोकचळवळ उभारण्यात आली आणि मोफत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आले .शिक्षणाच्या विविध तज्ज्ञांनी विविध संकल्पना मांडल्या.आणि लोकांना शिक्षणाचे महत्व पटून दिले .लोकसहकराला यश मिळाले आणि शिक्षणाचा चांगल्या प्रकारे प्रसार होऊ लागले.लोकांना शिक्षणाचे महत्व कळू. लागले आणि बाहेरचे जग समजू लागले .
      प्राथमिक शिक्षण कसे असावे?
       मुल हा लहान असताना आई चे पोटात असताना पासून शिकत असते.असे तज्ज्ञांचे मत आहे.मुल जन्माला आल्या पासून परिसरात मुल शिक्षण घेत असते.मुल जसा जसा मोठा होतो तशी तशी मुलाची शारीरिक परी पक्वता वाढत जाते .या काळातच वय वर्ष ५पर्यंत मुलाची बुद्धी मता वाढत जाते.व मुले परिसरातील व्यक्ती प्रमाणे मुल मोठ्या व्यक्तीचं अनुकरण करत अस तात. श्रवण,भाषण,संभाषण या संकल्पना वयाच्या ५ वर्षा पर्यंत  पक्व होतात.मधल्या काळामध्ये मुलं ५वर्ष पर्यंत घरी असायची आणि परिसरातच अनुकरणीय शिक्षण घ्यायची आणि ६ वर्षात प्राथमिक शिक्षणाचे प्रवेश घेण्यासाठी शाळेत जायचे तेंव्हा शिक्षक, मुलाचा उजवा  हात डोक्यावरून डाव्या कानाला पुरवायला लावायचे आणि कानाला हात पुरला म्हणजे पहिल्या वर्गात प्रवेश द्यायचे.तेंव्हा पासून आनंद दाई जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण असायचं शिक्षकांचा धाक तर असायचाच पण शिक्षणाची गोडी पण असायची.शिक्षकांचा धाक म्हणजे आदर युक्त भीती असायची. मोकलिक्ता असायची ,मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र असायचं . मुले दाडपणात नसायची त्या मुळे मुलांच्या संकल्पना परिपूर्ण व्हायच्या.ज्या संकल्पना अध्यापणातून पूर्ण होत नसतील त्या शिक्षकांच्या आचरण,देहबोली,संभाषणातून पूर्ण व्हायच्या.परंतु हल्ली काळात ज्ञानार्जन करणारा घटक विद्यार्थी आहे .परंतु विद्यार्थी पेक्षा पलकमध्येच जास्त स्पर्धा तयार झाली आहे .  मुलाच्या स्वातंत्र्य संकल्पनेला वाव मिळत नाही.मुलांची मस्कत दाबी केल्या जाते.शेजारचा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकतो म्हणून आपल्याही मुलाला इंग्रजी माध्यम  शाळेत टाकतात आणि वेळ,पैसा,या गोष्टी गमावून बसतात आणि शेवटी पस्तावा तेवढं शिल्लक राहतो. पुढे इंग्लिश मध्यामामध्ये अभ्यासक्रम वाढतो आणि फीस सुद्धा वाढते .त्यामुळे घरच्या लोकांना इंग्लिश वाचताही आणि लिहीता ही येत नाही त्या मुळे मुलांच्या संकल्पना स्पष्ट होत नाही.शेवटी मुलाची अध्ययनाची आवड नष्ट होते .आणि मराठी माध्यमात प्रवेश घेण्या शिवाय पर्याय नसतो.मग त्या विद्यार्थ्यांना मराठी पण समजत नाही आणि इंग्रजी पण समजत नाही.निरागसता हाती ये ते हे सारे आई वडिलांच्या हत्तपाई होते.कारण इंग्लिश माध्यमिक मधल्या काही शाळा फक्त गोरख धंदा मांडून बसले आहेत.पलका कडून अतोनात पैसे लुटत आहेत.ज्या शाळेची फी जास्त ती शाळा चांगली असा गैर समज पालकांचा असल्यामुळे संस्थापक लोकांनी फी वा ढवण्याची स्पर्धा तयार झाली.मुख्य म्हणजे या शाळेत प्रशिक्षत लोक नाहीत.याचा परिणाम शिक्षणावर  होतो.म्हणून पालकांनी आपल्या पाल्याचे प्रथम प्रवेश घेतांना आपल्या पाल्याला सर्वांगीण विकासाचे शिक्षण ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी प्रवेश घ्यावे पालक ,विद्यार्थी ,शिक्षक यातील संबंध जिव्हाळ्याचे असावे.शिक्षकाने शाळेतला प्रत्येक विद्यार्थी आपला समजून अध्ययन अध्यापन करून सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहित करावे.म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अवडी निवडी ओळखून अध्यापन करावे व कृती युक्त अध्यापन करून  म्हणजे.प्रत्येक मुलाचा क्षमता पूर्ण होतील आणि एक सक्षम भारत निर्माण होईल.
      भारतातील ७०/ लोक ग्रामीण भागात राहतात तांडा ,वाडी, गुडा,वस्तीवर राहतात या साठी शासनाने गाव तिथे शाळा प्रकल्प रबवला होता परंतु आता याच शाळा शासनाने दहा पट संख्या पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा  बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या मागे शासनाला गोर गरीबांचे मुलांची चिंता नाही आहे .त्या साठी गावकऱ्यांनी आपल्या गावाची पुढील पिढी सक्षम तयार कण्यासाठी वेळीच जागरूक असायला पाहिजे .अन्यथा शिक्षणाचा खेळ खंडोबा होऊन निरीक्षकाची गुंड तयार करण्याची शासनाची मानसिकता आहे.त्या साठी समाजाने सतर्क असणे अनिवार्य आहे.
     जीवन खसावत
        भंडारा .9545246027
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 प्राथमिक शिक्षण: काल आणि आज

  शिक्षण ही सर्व बालक,तरुण व वृद्धांना सर्वांगीण विकासाकडे नेणारी जागतिक चळवळ आहे ह्या चळवळीची सुरुवात 1990 साली जागतिक शिक्षण अभियानात झाली.इतक्या वर्षात अजूनही आपण निश्चित ध्येय प्राप्त करू शकलो नाही.अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये शिक्षण ही देखील आपली अनिवार्य गरजच मानली जाते.त्या दृष्टीने भारतीय राज्य घटनेत 2009 मध्ये शिक्षण हक्क अधिनियम कायदा अस्तित्वात आला.त्या जोगे सर्वानाच प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आले आहे.
  सहा ते चौदा वर्षां पर्यंतच्या वयोगटाचा समावेश या प्राथमिक शिक्षणात केला असून इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे केले आहे.ज्यात पहिली ते पाचवी निम्न प्राथमिक तर सहावी ते आठवी उच्च प्राथमिक असे दोन गट करण्यात आले आहेत. घटनेच्या कलम 21 अ अंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतुद बालकांसाठीच्या मोफत  आणि सक्तीच्या अधिनियमात सांगितलं आहे.1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क असल्याचे मान्य करणाऱ्या 135 देशांत भारताला स्थान मिळाले.
  खरे तर प्राथमिक शिक्षण म्हणजे भावी पिढीला घडविण्याचा खरा पायाच.हा पाया मजबूत झाला तरच कळस मजबूत होऊन देशाला विकासाकडे नेणारे नागरिक तयार होतील. परंतु दुर्दैवाने शिक्षण हमी कायदा येऊनही 100 टक्के दाखल झालेली मुले आपली किमान उपस्थिती 95 टक्के ठेवून दाखल पूर्णच्या पूर्ण मुले प्राथमिक शिक्षण  आजही पूर्ण करताना दिसत नाहीत.प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून की इंग्रजीतून हा कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकतो ..!परंतु प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी आणि तेही दर्जेदार हवं याबाबत कुणाचेही दुमत असणार नाही.
    स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक आयोग,अनेक शिक्षणविषयक आराखडे तयार झाले त्यातूनही प्राथमिक शिक्षणाबाबतची अपेक्षित ध्येय प्राप्ती न होऊ शकल्यानेच शिक्षण हमी कायदा शासनाला करावा लागला हे नाकरून चालणार नाही.प्राथमिक शिक्षण न घेणाऱ्या,दाखल होऊनही शाळेत न येणाऱ्या किंवा अनियमित उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक मुलाची समस्या कदाचित वेगळी असू शकेल त्या साठी सर्व शिक्षा अभियाना पासून समग्र शिक्षण अभियान असे विविध उपक्रम राबविले गेले त्याचा सकारात्मक परिणाम झाला असला तरीही अपेक्षित लक्ष्य आजही प्राप्त होऊ शकले नाही हे नाकारून चालणार नाही.प्राथमिक शिक्षण ही प्रत्येक बालकाची गरज आहे हे नुसतं मान्य करून चालणार नाही तर या शिक्षणापासून वंचित राहण्याची  कारणे शोधून त्यावर वस्तुनिष्ठ आणि भरीव स्वरूपाच्या  उपायांची गरज आहे.तर आणि तरच आपल्याला अपेक्षित ध्येय प्राप्ती होईल अन्यथा फक्त कागदावरच 'शिक्षण हमी ' दिसेल.
        डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
      शहापूर ,(ठाणे)9226435827
      harilbhoir74@gmail.com
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 37 *प्राथमिक शिक्षणात पालकांची भूमिका*
            आज सगळीकडे प्राथमिक शिक्षणाचे बाजारीकरण करण झालेले आहे. मुल जन्माला येण्याआधीच होणारे आई वडील येणाऱ्या अपत्याला कोणत्या शाळेत टाकायचं, कसं शिकवायचं, सर्वात चांगली शाळा कोणती याचा विचार करु लागतात. जे मुल अजून जन्माला सुद्धा आलेलं नाही, ज्याने जगात पाऊल ठेवले नाही त्याच्या भविष्याचा निर्णय पालक घेऊन टाकतात.त्याचं कारणही तसंच आहे सगळ्या जगात सर्वात पुढे जाण्याची जणू काही शर्यत लागली आहे. आमचं होणारं मुल इतरांच्या तुलनेत कुठेही मागे पडू नये म्हणून पालकांचा हा खटाटोप असतो.
    अशावेळी पालक हे विसरूनच जातात  की येणाऱ्या बाळाचं स्वतःचं काही अस्तित्व आहे. फक्त या शर्यतीत सर्वात पुढे जातांना ते आपल्या बाळाचा पाहिजे तोच विचार करतांना दिसत नाही. प्रत्येक मुल हे सारखं नसतंच. प्रत्येक मुलात बौद्धिक क्षमता, शारीरिक व मानसिक क्षमता यामध्ये तफावत असते. एकाच आईवडीलांच्या पोटी जन्माला आलेली दोन जुळी मुलं सुद्धा सारखी नसतातच मग इतरांच्या मुलांमध्ये आणि स्वतः च्या मुलांमध्ये साम्य राहुच शकत नाही परंतु अपेक्षा मात्र सारखीच असते. आपल्या पाल्यावर चांगले संस्कार घडवायलाच पाहिजे. त्याला समाजात जीवन जगतांना आदर्श व्यक्ती म्हणून स्थान मिळायला पाहिजे हे ठीक आहे पण त्याकरिता जबरदस्ती नको. मनापासून केलेल्या गोष्टी व जबरदस्ती ने करवून घेतलेल्या गोष्टी यात खूप फरक आहे.कधीही पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतरांसोबत अजिबात करू नये. आपल्या मुलात असलेल्या क्षमता, गुण, कौशल्य सर्वात आधी जाणून घ्यायला हव्यात. शेजारच्या मुलाला इंग्रजी शाळेत टाकलं म्हणून मी पण आपल्या मुलाला इंग्रजी शाळेतच टाकणार ही आता एकप्रकारे फॅशन झालेली आहे.
 शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा खाजगीकरणाचे, इंग्रजी शाळेत मुलाला टाकण्याचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ही वाढ फक्त पालकाच्या मनातील स्पर्धेच्या भावनेतून आहे. त्या निरागस कोवळ्या मनाच्या बाळाला काय कळतं स्पर्धा, चढाओढ, शर्यत या सगळ्या पासून तो दुर असतो. त्याला तर फक्त आवडतं मनसोक्त खेळणे आणि आनंदी राहणे. परंतु आज आपल्या बाळाचा आनंद हिरावून घेणारे हे पालकच आहेत. तितक्याशा लहानग्या चिमुकल्यांच्या पाठीवर त्यांच्या पेक्षा जास्त वजनाचं ओझं लादलं जातं. त्याचा तर कुणी विचारच करायला कुणीही तयार नाही. माझी पालकांना विनंती असेल की आधी आपल्या बाळाला समजून घ्या. त्याच्या आवडीनिवडी त्याच्या अंगी असणार्‍या सुप्त गुणाचा शोध घ्या आणि मगच काय करायचं तो निर्णय घ्या.
 प्राथमिक शिक्षण म्हटलं तर यामध्ये इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत चं शिक्षण येतं प्रत्येक मुलाचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हायला पाहिजे. प्रत्येक च व्यक्ति शिकून नोकरी करेल याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. आपल्या मुलाचा कल जिकडे आहे त्याचा विचार करा आणि त्याच गुणाचा विकास करण्यावर फोकस करायला हवा.
एखाद्या मुलाला फक्त लिहायला आवडतं आणि तो लिहिण्याचा सराव जास्त करतो त्याला  इतर विषयांमध्ये गोडी नसतेच मग तो नेहमी इतर विषयांमध्ये मागे पडतो पण लिहायचा भरपूर सराव झाल्याने त्याची अक्षरं इतकी सुंदर निघतात की प्रत्येक व्यक्ति पाहतच राहतो. अशामुलाच्या लेखन कौशल्या कडे क्ष पुरविणे आवश्यक आहे. आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीची, मातृभूमी ची व इतिहासाची ओळख मातृभाषेतून होऊ देत. असं झालं नाही तर फक्त पोपटपंची व परीक्षा पास पण प्रत्यक्षात माहिती मात्र शुन्य. पालकांनी पाल्यास शाळेत टाकतांना आपली भाषा, परिस्थिती याचा सुद्धा विचार करायलाच पाहिजे. आपण असेही पालक बघतो की इतरांनी खाजगी शाळेत टाकलं आपण टाळू शकत नाही काय या स्पर्धेत उतरण्याकरिता आपल्याला झेपणार नाही एवढी फी भरून खाजगी शाळेत नाव टाकतात. पण जेव्हा निकाल येतो तेंव्हा मुल खुप मागे असल्याचे जाणवते त्याचे कारण म्हणजे पालक आणि मुलाच्या शाळेत असलेल्या भाषेतील तफावत. मुलाला  न समजलेली गोष्ट तो पालकांनाही विचारू शकत नाही व विचारलं तरी पालकांना त्याचं ज्ञान नसते.
   स्पर्धा करण्यात पालक एवढे गुंतलेले असतात की त्यांना आपल्या मुलाचं अंधकारमय भविष्य दिसत नाही आणि अशाच अवस्थेत मुलात न्यूनगंड निर्माण होतो. मला काहीच येत नाही ही त्या कोवळ्या जीवनाचं बालपण हिरावून बसतं व आनंदाच्या ठिकाणी नैराश्येचे प्रमाण वाढीस लागते.
 म्हणून माझ्या मते पालकांनी आपल्या पाल्यांना प्राथमिक शिक्षण देतांना सर्वात मोठी व महत्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पडली असेल तरच त्यांना मुलाच्या भविष्याची चिंता करायची गलज भासणार नाही.
 एकंदरीत प्राथमिक शिक्षण हाच शिक्षणाचा मुळ पाया आहे. म्हणून पालक हो विचार करा अजून वेळ गेलेली नाही. पण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या मुलांचं तुम्ही हिसकावून बसलेलं निरागस बालपण पुन्हा परत येणार नाही. प्राथमिक शिक्षण देणे आवश्यक आहे च पण ते तुम्ही कसे देता हे मात्र फक्त आणि फक्त पालकांच्या हातात आहे.
 सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
9423414686
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 "प्राथमिक शिक्षण"
  *प्राथमिक शिक्षण म्हणजे संपूर्ण आयुष्याचाच  नव्हे  तर देशाच्या भविष्याचा सुद्धा  पाया आहे*. प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते. देशाच्या मुलांसाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्थापित शिक्षण प्रणालीच्या गुणवत्तेवर कोणत्याही देशाचा विकास आणि वैभव अवलंबून आहे. 
        प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्कानुसार बालवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण. पहिली ते पाचवी प्राथमिक शिक्षण. सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शिक्षण. प्राचीनकाळी प्राथमिक शिक्षण हे शिक्षककेंद्रित होते. अलीकडील काळात त्यामध्ये बदल होवून ते शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थीकेंद्रित बनले आहे. विदयार्थ्याना प्राथमिक शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.  प्रत्येक मुलाने निश्चितपणे त्यांच्या योग्य वयात शाळेत जाणे आवश्यक आहे कारण सर्वांना जन्मापासूनच शिक्षणासाठी समान अधिकार मिळतात. 
         ज्ञान, कौशल्या, व्यक्तिमत्त्व निर्माण करुन प्रत्येकाच्या आयुष्यात सुधारणा करुन सभ्य मानवी जीवन तयार करण्यास शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे एखाद्या व्यक्तीस चांगले आणि वाईट बद्दल विचार करण्याची क्षमता देते. गोष्टी आणि परिस्थितींचे विश्लेषण करण्यासाठी ते आपले कौशल्य, वर्ण आणि संपूर्ण व्यक्तिमत्व विकसित करतात. एखाद्या व्यक्ती जीवनात ध्येय निश्चित करुन शिक्षणाचा माध्यमातून  वर्तमान आणि भविष्याकडे पोचते. शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे.
            भारतात प्प्राथमिक  शिक्षणाची फारच दुरावस्था आहे. 2012च्या सर्वेक्षणात हे लक्षात आले होते की, पाचव्या वर्गातील 50% पोर फक्त दुसरी कक्षाचे पुस्तकच वाचू शकत होते. सर्वात  मोठी समस्या आहे शिक्षकांची गुणवत्ता. कमी गुणवत्ता असलेल्या शिक्षकांमुळे शिक्षणाचा  दर्जा खूप खालावला जातो. आपल्या इथे *आधीच उत्साह वर फाल्गुन मास* अशी अवस्था आहे .योग्य दर्जेदार  प्रशिक्षणची  सुद्धा वानवा आहे. जर शिक्षकांना दर्जेदार  प्रशिक्षण दिले  गेले तर  त्यांचा शिकवण्यात आणि शिक्षणाचा दर्जात सुधारणा होइल. असे प्रशिक्षण सुद्धा नियमितपणे दिले गेले पाहिजेत.  दर वर्षी दिले गेले पाहिजेत. असलेले  शिक्षक मिळणे .ग्रामीण भागात ही  अजून जास्त विकट समस्या आहे. 
      मला असे वाटते की  प्राथमिक शिक्षणा विषयी सरकारने खूप गंभीरतापूर्वक विचार करायची गरज आहे. 
सर्वात जास्त खर्च प्राथमिक शिक्षणावर करण्याची आवश्यकता आहे. प्राथमिक शिक्षणात प्रचंड बदल करण्याची आवश्यकता आहे. नुसती साक्षरता वाढवून काही साधणार नाही . दर्जेदार प्राथमिक शिक्षण  फक्त विद्यार्थ्यांची नाही, तर *देशाची सुद्धा दशा आणि दिशा बदलेल*. 
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
 " व्यक्तीमत्व विकासाचा पाया प्राथमिक शिक्षण " ( 14 )
     " शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रकिया आहे ! " ती मानवा जन्मापासून प्रारंभून मृत्यूनंतरच संपते . भलेही तिचे स्वरूप विभिन्न असोत . मात्र उद्देश एकच तो म्हणजे व्यक्तीमत्व विकास ! कोणतीच व्यक्ती ही पूर्णपणे सर्वगुणसंपन्न नसते . ती स्वतःला आयुष्यभर पूर्णत्वप्राप्तीसाठी धडपडत असते . ह्या धडपडीचा पाया हा या प्राथमिक शिक्षणातच दडलेला असतो .
     " प्राथमिक शिक्षण म्हणजे 6 ते 14 वयोगटातील दिले जाणारे पहिले ते आठवीपर्यंतचे शिक्षण ! " असे आपण म्हणतो . पण हेच शिक्षण समाजातील सर्व घटकांतील सर्व विद्यार्थ्यांना समान स्वरूपात मिळते असेच काही नाही .... कारण आर्थिक , सामाजिक , जातीय , वंशिक , लैंगिक , भौगोलिक , वैचारिक इत्यादी कारणपरत्वे घटकांवर ते अवलंबून असते ना ! म्हणून सुजाण व शिक्षणप्रेमी अर्थसंपन्न वर्गातील लोकांचीच मुले ही या ज्ञानधारेत ओथंबून गेलेली दिसतात . तर ह्या उलट आर्थिकदृष्ट्या अठराविश्व दारिद्रयात खितपत पडलेल्या वर्गांतून पोटाचीच भूक न शमवणारा ही ज्ञानभूक कशी शमवेल ? आपण पाहतोच की खेड्यातील प्राथमिक शिक्षणाला कशी उतरती कळा लागली आहे ते याच स्वरूपाच्या विविध कारणांमुळेच ना ! 
     घरी लहान भावंडांना सांभाळून ही दीनवाणी ग्रामीण मुले शिक्षणधारा प्राशनासाठी शाळेत येत असतात . कधीकधी ती आपल्या दोनतीन वर्षाच्या भांवडासह शाळेत बसतात . जे वय खेळण्याबागडण्याचे आहे त्याच वयात ती जबाबदार पालकाची भूमिका साकारतात ... कधी शेतात कापूस वेचणी तर कधी गुरे चारणे असे अनेक कामात ती शालेय वयातच जुंपली जातात . परिणामी इच्छा असूनही मनसोक्तपणे या ज्ञानगंगेत पोहू शकत नाहीत ... कारण पायी ही आर्थिक विषमतेची बेडी अडकवून असते ना ... शिवाय लिंगभेदांमुळेही मुलींना बौध्दिक गुणवत्ता असूनही पुढे शिक्षण प्रवाहात भरारी घेता येत नाही ... ही उदासिनदृष्टी मानवी मनातून मूळासकट दूर उपटून टाकली पाहिजे ... भलेही त्यासाठी संविधानाधारे एकदम कडक शासन करून तशी पावलेही उचलल्या गेली पाहिजेत ... तरच हा लिंगभेद समूळ नष्ट होऊन मुलींना स्वइच्छेने यथोच्छ ज्ञानामृत प्राशन करता येईल ... आणि या विश्वसंसारी रथाचे दुसरे चक्र म्हणून आत्मनिर्भर व सक्षम निःशंक बनेल !
     प्राथमिक शिक्षणातून व्यक्तीमत्वविकासातील भावनिक , क्रियात्मक , बोधात्मक ही उद्दिष्टे साध्य केल्या जाते . मुलांना अभ्यासक्रमातून अज्ञान , अंधश्रद्धा , अघोरी प्रथापरंपरेची बालमनीच जाणीव करून दिल्यास भविष्यात तो एक उत्तम विज्ञानवादी व डोळसवृत्तीचा नागरिक हमखास बनेल .... शिवाय इतिहासातील हुतात्म्यांची छाप बालमनींच बिंबवल्यांस एक आदर्श देशभक्त व देशप्रेमी निर्माण होईल ... आणि भविष्यात देशाचे भवितव्य उज्ज्वल करून देशाचा भार सक्षमपणे सांभाळणारा एक मजबूत खांदा उदयांस येईल ... म्हणून प्राथमिक शिक्षण हे व्यक्तीच्या व्यक्तीमत्वविकासाचे एक अविभाज्य अंगच बनते ...
     मुले स्वभावतःच खेळकर वृत्तीची असतात ... आणि आता तर आनंददायी हसतखेळत कृतीयुक्त शिक्षण आल्यामुळे मुलांच्या सर्वांगिण विकासाला भरपूर वाव मिळतो . पण सरकारी मोफत शिक्षणाकडे संस्थांच्या तौलनेत बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कधी बदलणार ? कारण फुकट मिळते त्याला किंमत नसते .... जे विकत मिळते ते मौल्यवान असते असा गोड गैरसमज मानवी मनांतून कधी निघून जाईल .... तेव्हाच ही ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची ओहोटी थांबेल .... कारण याच शाळेतील शिक्षक हा बौद्धिक गुणवत्ताधारक असतो .... तो काळा पैसा देऊन नोकरीस लागलेला नसतो ना ... तर बौध्दिक तहान शमवून जीवनप्रवाहात वाहणारा एक सक्षम जबाबदार व्यक्तीमत्व साकारण्याचे प्राथमिक शिक्षक हा एक केंद्रच असतो ना ... पण या केंदावरील शाळेव्यतिरिक्त अगाऊ भारही कमी व्हायला हवा ... मतदान , जनगणना , व्यसनमुक्ती अभियान , शालेय पोषण आहाराची जबाबदारी , अशा बहुसंख्य कामांमुळे तो या मौल्यवान हिरारूपी मुलांना व्यवस्थितरित्या पैलू पाडण्यात त्याची बिचाऱ्याची दमछाक होत आहे ..... हेही कुठंतरी थांबून ह्या शिक्षक वर्गाला योग्य न्याय मिळाला पाहिजे ... तरच तो प्रसन्नमुखाने कोणत्याही मानसिक दडपणाविना आनंदाने ज्ञानार्जन करेल ... आणि एक सुसंस्कृत व सुसंस्कारी पिढी असलेल्या व्यक्तीमत्वाचा कारखानाच निर्माण करेल .... 
     अशा पद्धतीने प्राथमिक शिक्षण हे माणसाला एक " खरा माणूस " बनवितो . म्हणून तो व्यक्तीमत्व विकासाचा पायाच आहे .... कारण या पायावरच देशाचे भवितव्य आधारलेले आहे .... देशाचा कणा , आधारस्तंभ म्हणून ह्या प्राथमिक शिक्षणाकडे पाहिले जाते ....

अर्चना दिगांबर गरूड 
मु . पो . किनवट , जि . नांदेड 
मो . क्र . 9552963376
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~
प्राथमिक शिक्षण आणि कोरोना
-श्री ज्ञानेश्वर झगरेे गुरुजी
 (वाकदकर) [१७]
'कोणत्याही इमारतीची मजबुती ही तिच्या उभारलेल्या पायावर अवलंबून असते' हे सरासरी व्यावहारिक गणित आहे. याच उद्देशाला जाणून कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत बनवणे आवश्यक असतेे.शैक्षणिक तत्वज्ञान,शिक्षण प्रशासन आणि शासन या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून खऱ्या अर्थाने शिक्षणाची धुरा सांभाळली जाते. यासाठी प्राथमिक शिक्षण ही माणूस घडण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असल्याची जाणीव सगळ्यांना झालेली आहे.यासाठी प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये काही अंशी बदल करणे सध्याच्या काळात तरी अपेक्षित आहे.
कोरोना संकटाच्या नंतर प्राथमिक शिक्षणात सुद्धा काही प्रकारचे बदल घडवून आणणेे अपेक्षित आहे.परंपरेनुसार आपल्याकडे चालत आलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला शाळेमध्ये शिक्षण मिळते आणि त्यानंतर त्यांचे मूल्यमापन हे शाळेतच करून घेणे ही पद्धती आपल्याकडे प्रचलित आहे. परंतु कोरोना रोगाच्या संसर्गाच्या धरतीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून नव्याने शाळा केव्हा उघडणार आहेत.... प्रश्नचिन्ह समोर असतांना या विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन कशा प्रकारे करावे यावर वेगवेगळे चिंतन होणे अपेक्षित आहे. 
प्राथमिक शिक्षण हे खऱ्या अर्थाने सर्व शिक्षणाचा पाया मानल्या जाते परंतु शिक्षणव्यवस्था सोडल्यास पालकांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तेवढी  जिज्ञासा आजही दिसून येत नाही. ग्रामीण भागामध्ये तर मॅट्रिकच्या परीक्षेला आणि बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व दिले जाते,या दोनही इयत्तांमध्ये मिळालेले गुण म्हणजेच आपल्या पाल्याची प्रगती असा गैरसमज पालकांच्या मनात आजही दिसून येतो.इयत्ता नववी पर्यंत आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष न देणारे पालक इयत्ता दहावी आणि बारावी साठी वेगवेगळ्या शिकवण्या,चांगली शाळा निवडण्यासाठी धडपड करतात.परंतु या मुलांचा प्राथमिक पायावर पक्का झाला नसेल तर या वेळेला केलेली धडपड म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी घातल्यासारखेच आहे. 
शेतकरी शेतामध्ये उत्पादन घेण्याच्या उद्देशाने अगोदर करण्यापूर्वी त्या क्षेत्राची चांगल्या पद्धतीने मशागत करतो भुसभुशीत केलेल्या जमिनीमध्ये योग्य बियाण्याची निवड करून त्यामध्ये पेरणी करतो रोपट्याच्या अवस्थेमध्ये असलेल्या पिकांवर कुठल्याही प्रकारची कीड आणि रोग येऊ नये यासाठी अतोनात प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या खऱ्या अर्थाने त्या पिकाला फळ प्राप्त होते आणि त्याच्या उत्पन्नात त्याला नफा मिळतो. अगदी किंबहुना त्याच समांतर पद्धतीने शिक्षण क्षेत्रातही मांडले तरी वावगे ठरणार नाही.उच्च शिक्षणामध्ये आपल्या पाल्याने प्रगती करावी हे अपेक्षित असणाऱ्या पालकांनी आवर्जून बालवयापासूनच शिक्षणाचे संस्कार त्या लेकराच्या मनावर बिंबवणे अपेक्षित आहे.हाच विचार करून वाबळेवाडी सारख्या प्राथमिक शाळेत बालवाडीचे वर्ग जोडून त्यांना प्रगत करण्याचे काम मोठ्या झपाट्याने सुरू आहे.
बालवाडी म्हणजेच शिक्षणाची पूर्वमशागत आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे बियाणांची रुजवणूक अशी उपमा दिल्या योग्य ठरेल.केवळ पुस्तक वाचणे आणि लिहिणे म्हणजेच शिक्षण नाही ही संकल्पना खऱ्या अर्थाने शिक्षण व्यवस्थेबरोबरच समाजामध्ये सुदृढ होणे अपेक्षित आहे.मुलांचे शिक्षण म्हणजेच त्यांना सर्वांगीण बाबतीत स्वयंपूर्ण करणे हाच अर्थ स्वयंपूर्ण वाटतो.यासाठी अलीकडच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आलेले असून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, ज्ञानरचनावाद,सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यासारख्या संकल्पना शिक्षण क्षेत्राला यशोशिखरावर पोहोचू पाहात आहे.असेच का..? आणि तसेच का ...?हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे म्हणजेच त्याच्या जीवनात शिक्षणाची ठिणगी पडली असा अर्थ प्राथमिक शिक्षण काळातच त्याच्या मेंदूवर करणे गरजेचे आहे. यासाठी प्राथमिक शिक्षण सहज आणि आनंददायी पद्धतीने हसत-खेळत मिळणे गरजेचे आहे.
प्राथमिक शिक्षणामध्ये आता कोरोणाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर... काही बदल सुद्धा स्वीकारणे अपेक्षित आहे. पालकांनी त्यांच्या पाल्यांना त्यांना घरच्या वातावरणातच जीवन शिक्षणाची उपलब्धता करून देणे अपेक्षित आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षण प्रक्रियेतील मुलांचं मन एकाग्र करण्यासाठी मुलांना आवर्जून डाळ आणि तांदूळ वेगळे करणे, बॉटलमध्ये पाणी भरणे, फुलांचे हार तयार करणे, आईला घरकामात मदत करणे, घरातील वस्तूंची योग्य पद्धतीने रखरखाव ठेवणे, प्राणिमात्रांवर दया करणे, मोठ्या माणसाची चांगल्या पद्धतीने बोलणे,यासारख्या अनेक छोट्या-छोट्या कृतींतून शिक्षणाचे संस्कार मुलांच्या मनावर घरच्या घरीसुद्धा कोरले जाऊ शकतात.केवळ पुस्तकी शिक्षणावर अवलंबून न राहता शिक्षणाचा परिचय विद्यार्थ्यांना सतत देत राहणे हे पालकांना घरच्या घरी करता यावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा उपयोग करणे तेवढे सोपे नसून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जरा कठीणच असले; तरीसुद्धा पालकांनी जाणीवपूर्वक काळजी घेऊन विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण देणे गरजेचे आहे.अंडा आणि शालेय अभ्यासक्रमात रोड झालेली ऑनलाइन शिक्षण पद्धती ही जाणीव आणि गरज पालकांनी स्वीकारणे अपेक्षित आहे.यासाठी प्राथमिक स्तरावरील पाल्यांना पालकांनी योग्य ते चॅनल ॲप्स वापरण्याची जाणीव त्यांच्या पाल्यांना द्यावी.
दीक्षा ॲप, बोलो अॅप आणि अन्य शैक्षणिक ॲप्स चा वापर पालकांनी घरच्या घरी करावा.तसेच शासनस्तरावरून नव्याने सुरू होणाऱ्या दूरचित्रवाहिनी चॅनल्सचे स्वागत करून आपल्या पाल्याच्या योग्य वयोगटानुसार त्यातील प्रोग्राम त्यांना जाणीवपूर्वक दाखवावे,दूरचित्रवाहिन्यांवरील प्रोग्राम वर आधारित साधकबाधक चर्चा घरामध्ये पालकांनी त्यांच्या आपल्या सोबत करावी तरच या चॅनल्सचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल.तसेच शिक्षकांनी सुद्धा पालक व विद्यार्थी यांच्याशी संपर्कात राहून दूरचित्रवाहिन्यांवरील प्रोग्राम आणि त्यावर आधारित चर्चा कशी घ्यावी याविषयी मोबाईल किंवा पालकांचे समुपदेशन करणे अपेक्षित आहे.
प्राथमिक शिक्षण ही जबाबदारी शासनाप्रमाणे ,शिक्षण व्यवस्था, पालक, समाज, विद्यार्थी  या सर्वांचीच आहे..चला तर सर्वांनी मिळून तोरणाच्या या संकटांमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक इमारतीचा पाया करण्यासाठी सर्वांनी हातभार लावूया.....या वयोगटातील विद्यार्थ्यांना आवर्जून सर्वांनी शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ या आणि प्राथमिक शिक्षणाला बळकटी देऊया.....
श्री ज्ञानेश्वर झगरेे गुरुजी (वाकदकर)
~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~~


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...