बुधवार, 13 मई 2020

रोज एक लेख :- दिवस सव्वीसावा मोबाईल / स्मार्टफोन

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- सव्वीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 14 मे 2020 गुरूवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- मोबाईल / स्मार्टफोन*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769

~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~

 *"मोबाईल:"*

माहिती आणि तंत्रज्ञानाच्यायुगात झपाट्यानं होत असलेली प्रगती आणि क्रांती आपणास स्विकारावी लागणार आहे.कोणत्याही बाबीला दोन बाजू असतात.आपले विचार आणि आपली क्षमता त्या बाजू पडताळुन घेऊ शकतात.दैवं वादावर चालणारी कांही माणसं असतात तर कांही विज्ञानवादी माणसं असतात.पण दोघांनाही आपापली बाजू भक्कम वाटत असते.तरीही त्यांच्या या विचाराचा होणार्‍या घटनेच्या क्रियांवर फारसा परिणाम दिसत नाही.कारण जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे अशक्य आहे ते होणारही नाही.पण आपण आपली दृष्टी बदलून आचरण ठेवले तर ते सर्वांसाठी सुकर होणारी बाब असते.घातक विघातक वा विधायक हे सर्व आपल्या आचार आणि विचारावर अवलंबून असते.कारण बदलांचा प्रवाह हा सर्वांना सोबत घेऊन चालत असतो.पण कोणाला या प्रवाहाबरोबर यायचे आहे की नाही हे ज्याने त्यानी ठरवावे.परंतू स्वत:वर विश्वास आणि ताबा असणार्‍याला जगातील वाईट अशा बदलाच्या वार्‍याचा परिणाम विचलीत होऊ देणार नाही.म्हणून आज मोबाईल ही गरज झाली आहे.

एखाद्या वस्तूचा वापर आपण कसा करतो यावर त्या त्या वस्तूचे महत्व अवलंबून असते.प्रत्येकाच्या घरात टि.व्ही.असतो त्याच्या वापराने कांहीच्या मते मुलं आणि माणसं बिघडू लागली आहेत.पण हे खरंच सत्य नसून अर्धसत्य आहे.कारण घडणं बिघडणं हे केवळ विचारसरणीवर अवलंबून असते.कारण टिव्हीवर काय पहावे आणि काय पाहू नये यासाठी रिमोट आपल्या हातात असतो.

पण सुसाट मनाला रिमोट काय करणार.प्रथम चांगलं वाईट ओळखण्याची प्रगल्भता आपणात

आली पाहिजे.जगाच्या कानाकोपर्‍यात आपले

आप्त नातलग वा स्नेही कोणी असतील तर सहज

संपर्क साधून प्रत्यक्ष भेटीचा आनंद आपण याच

मोबाईलमुळे घेत असतो.आज मोबाईल हा केवळ

संपर्काचे साधन म्हणून उपयोगी पडत नाही.तर आज अनेक उपयोगासाठी खिशात बसणारा तो

एक कॉम्प्युटर आहे.अनेकविध उपयोगी पडणारा मोबाईल विघातक असतच नाही.कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतातच त्या मर्यादेचा विचार करुन व मर्यादेतच राहून आपण कोणत्याही गोष्टीचा उपयोग किवा उपभोग घेतला तर तो आनंददायीच असतो. तेव्हा आचाराचा आणि विचाराचा मेळ घालून वागाल तर मोबाईलच काय

पण कोणतीच गोष्ट विघातक असत नाही.पण विनोदानं आजकाल सर्व तरुणांच्या हातातील मोबाईल बघून असंही म्हणतात,  

                अन्न वस्र निवारा आता

                मोबाईल चौथी गरज झाली...

                गरज म्हणता म्हणता सर्वत्र

                मोबाईलची रिंग वाजू लागली....!!

बदलला जमाना आपणही बदलू,विचाराने आचरन करू.आम्ही घडलो तुम्ही बी घडाना..म्हणत म्हणत प्रगती साधू.साधक आणि

बाधक मते मांडत असताना लोकांमध्ये मतांतीक वादविवाद होत असतात.पण मित्रानों लक्षात घ्या

माझ्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर असेल तर माझे मत वा बोलने समोरच्या व्यक्तीला पटणारच नाही...एखादा डॉक्टर सिगारेट ओढत

ओढत धुम्रपानाचे दुष्परिणाम सांगत असेल तर ते

किती योग्य आणि पटण्यासारखे आहे.तद्वतच मला माहित आहे मोबाईलचे दुष्परिणाम वा विघातकता मोबाईलवरुनच आपल्याला काही मित्र पटवून देतील.मग मला सांगा हे सांगणारे

विघातकअसणारे मोबाईल सारखे खेळने का बाळगतात.असो,आपण थांबलो तर जग थांबणार

नाही,आणि आपल्या उलट दिशेने धावण्याने

जगही धावणार नाही.तेव्हा चला चालत राहू

जगाबरोबर चालत राहू, कारण बदल हा सृष्टीचा

नियम आहे.मग तो कोणताही असो,कोणत्याही

स्वरुपातील असो.


     *हणमंत पडवळ*

       *उस्मानाबाद.*

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

34 "मोबाईलचा किती महत्व आहे"*

       आजच्या काळात सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि ती एक मोठी क्रांतीच झालेली जाणवते. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. घराघरातील प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल पहावयास मिळत आहे. त्यातही विलक्षण अशी विविधता आलेली आहे. घरातल्या फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली आहे. अशा या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे कधी-कधी मोबाईल नकोस वाटू लागतो. त्यातूनच प्रश्न निर्माण होतो – ‘ मोबाईल किती गरजेचा आहे?’

    ज्यावेळी एखादे नवीन तंत्रज्ञान निर्माण होते तेव्हा ती मानवी सुखसोयी या दृष्टीनेच उदयास येते. मानवाचे कल्याण साधणे हाच एकमेव हेतू या तंत्रज्ञानामागे असतो. मोबाईलसुद्धा एक विकसित स्वरुपाचे तंत्रज्ञान आहे, ते शाप कसे असेल? ते एक फार मोठे फायद्याचे आहे. फक्त मोबाईलचा नको तितका आणि नको तसा अतिरिक्त वापर केला जातो, त्यावेळी हा मोबाईल शापच वाटू लागतो, मग तो दुसऱ्याचा असो किंवा आपलाच असो. आपल्याच मोबाईलवर येणारे ते कॉल्स, ते एस. एम. एस. रात्रीअपरात्री केव्हाही येतात. अक्षरश: पिच्छाच पुरवितात. अर्थात, स्विच ऑफ ने त्याचा बंदोबस्त होऊ शकतो परंतु हे प्रत्येक वेळी स्विच ऑफ चालत नाही किंवा कधी कधी स्विच ऑफ करणे राहूनच जाते. हे झाले आपल्या मोबाईलचे पण दुसऱ्याच्या मोबाईलची तर बातच अलग…

कसले हि भान न राखता, तासनतास मोबाईलवर गप्पागोष्टी करणारे पुरुष, महिला आपल्याच मस्तीत गुंग असतात. अगदी सुखानेच वार्तालाप चालू असतो. महिला वर्ग तर कित्येकदा आजचा मेनू काय इथपासून त्याची आख्खी रेसीपी मोबाईलच्या माध्यमातून घेत असतात अशा वेळी त्या मोबाईलचा आपल्याला होणारा त्रास,दुसऱ्याला होणारा त्रास. कितीतरी वेळ बोलत राहिल्यामुळे स्वतःलाच भरावे लागणारे बिल, स्वतःच्या व इतरांच्या ही आरोग्यावर होणारा परिणाम, होणारे प्रदूषण हे सारे अटळच असते. पण लक्षात कोण घेतय. कळते पण वळत नाही. तीच गत मोबाईलच्या वापराची असते. तसे पाहिले तर पुर्वीच्यासारखी मोबाईल हि चैनीची वस्तू राहिलेली नाही.

     मोबाईल हा आजच्या काळातील प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटकच बनला आहे. एक अत्यावशक घटक! युवावर्ग, महिलावर्ग यांच्याकडे मोबाईल,सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यकच असतो. कोणतीही अप्रिय घटना, प्रसंग, अपघात घडल्यास घरच्या मंडळीशी संपर्क साधता यावा या दृष्टीने मोबाईल सारखे दुसरे जलद व प्रभावी साधन नाही. एकाक्षणात एकमेकांशी संपर्क साधून व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य तो निर्णय त्वरित घेता येतो, त्यावेळी मोबाईल वरदान नाही असे कोण म्हणेल? वेळ, पैसा, श्रम वाचविण्यासाठी  व त्यांचा अन्य चांगल्या कामांसाठी वापर करता येऊ शकतो. जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी कुठेही मोबाईलच्या माध्यामातून आपण पोहोचू शकतो. आज तर असे काही मोबाईल तंत्रज्ञान विकसित केले आहे कि मोबाईल हँडसेटच्या त्या छोट्या स्क्रीनवर आपण संवाद साधलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहू शकतो. केवढी ही मोबाईल क्रांती झाली आहे, बर?

      एखाद्या दूर देशीच्या, दूर ठिकाणाची इत्यंभूत माहिती मोबाईलवरून घेऊ शकतो. मोबाईलद्वारे एखाद्या ठिकाणचे हवामान, तापमान आपण समजू शकतो,आवडते संगीत ऐकु शकतो. मोबाइलवरच कॅमेराची सोय असल्यामुळे कुठेही अगदी कसलेही (निसर्गाचे वा सभा-संमेलनाचे) फोटो काढता येतात. इतके सारे फायदे पाहिल्यावर मोबाईल ‘वरदान’ नाही असे कोण म्हणेल? पण त्याचा वापर मात्र योग्य तऱ्हेनेच केला गेला पाहिजे हे ही तितकेच सत्य आहे. मोबाईलचा नको तितका व नको तसा अतिरिक्त वापर करणे सर्वार्थाने चूक आहे.

      तसा वापर करणे हे नुसतेअयोग्यच नव्हे तर कित्येकदा ते घातकच आहे. कित्येकदा मोटरमेन  किंवा मोटारसायकलस्वार आपले वाहन चालविताना खुशाल मोबाइलवर बोलत असतो. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असते. तरीही हे सारे घडतेच आहे. नियम धाब्यावर बसवून कायद्याचे उल्लंघन करून वाट्टेल तिथे मोबाईलचा  वापरकेलेला दिसतो  हे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. परवाच मी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याला बाईक चालवत असताना फोनवर बोलताना मी पहिले आहे. त्यावेळी मी त्याला हटकण्याचा प्रयत्न ही करेन पण तो वेगाने गाडी चालवत होता अन मी एका ‘पादचारी सडकपार’ अशा अवस्थेत होतो. सांगायचे तात्पर्य इतकेच कि असा हा मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. मोबाईलवरचा एस. एम. एस. प्रकार तर किती तरी गुन्हयांना निमंत्रण देणारा असतो. कधी कधी तर पोलिस स्टेशनचे खेटेही घालावे लागतात. हे सारे प्रकारअसतात मोबाईलचे – मोबाईल धारकांचे!

    मोबाईलवरून सारखे फोन करत राहणे, एखाद्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार असू तर त्यासाठी कमीत कमी ५ ते ७ फोन्स तर आवश्यकच होत असतात. खर तर मोबाईल नसतानाही भेटी गाठीचे प्लानिंगअगदी पद्धतशीरपणे होत असे. मोबाईलमुळे अधिक कार्यक्षम होतो हे हि खरेच! कित्येकदा मोबाईलचा खूप त्रास हि होतो, वाट्टेल त्या ठिकाणी मोबाईलवरून मोठ्यामोठ्याने बोलले, सभासद्स्थानी ही मोबाईल चालूच ठेवले. कधी कधी  तर मोबाईलवरून इतक्या मोठ्या आवाजात बोलतात कि बोलणाऱ्याला सांगावेसे वाटते “अरे बाबा, आणखीन जरा आवाज वाढविलास तर तो मोबाईल न वापरताही तुझे नुसते बोलणेही त्याला ऐकू जाईल. मोबाईल सगळीकडेच असतो पण त्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. मोबाईलवरचा कॅमेराही कधी कधी कुरापत काढणारा; गुन्ह्यात भर टाकणारा ठरतो. मिस्सड कॉल हा ही त्यातलाच एक प्रकार!

     याशिवाय मोबाईलचा अतिरिक्त वापर हा अनेक शारीरिक व्याधींना निमंत्रण देणारा असतो. मेंदू, किडनी,हृदय इ. अवयवावर हि मोबाईल फार मोठा परिणाम करू शकतो. एकूणच काय, तर मोबाईलचा योग्य वापर केला तर मोबाईल चांगले  आहे नाही तर वाईट !

"आकाशाला भिडणारे प्रेम 

आता कानाला भिडले 

ह्रदयात शिरणारे प्रेम 

मोबाईल मध्ये घुसले "


लेखन 

श्री सुंदरसिंग आर.साबळे

 मो.9545254856

गोंदिया

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

*मोबाईल वापरणे व्यसन की फॅशन तुम्हीच ठरवावे*

श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)


"मोबाईलची उत्क्रांती

 मानवी जीवनाचा शोध

वापरकर्त्यांनी घ्यावा

मोबाईल मधून बोध"

           एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे युग आहे.मानवाने मोबाईलचा शोध लावला आणि जग जवळ आल्यासारखे वाटते आहे.आज गरीब असो वा श्रीमंत या सर्व व्यक्तीकडे मोबाईल आहेत.मोबाईल द्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मित्र-मैत्रिणी,नातेवाईक यांच्याशी थेट बोलणे शक्य होत आहे.एवढेच नाही तर व्हिडिओ कॉलिंग द्वारे समोरासमोर बोलणे होत आहे यावरून मानवाचा हा एक नवीन शोधच आहे.'प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात' त्याप्रमाणे मोबाईल देखील त्याचा योग्य वापर केल्यास फायदेशीर व त्याचा वाईट वापर केल्यास वाईटच होईल म्हणून मोबाईल वापरकर्त्यावर अवलंबून आहे.आज प्रत्येक खेड्यापाड्यात देखील मोबाईल मधील प्रकार म्हणजे स्मार्टफोन आलेले आहेत.जगात घडलेली बातमी क्षणाचाही विलंब न होता लगेचच आपल्याला कळते.टीव्हीवर येणाऱ्या बातम्या देखील आज प्रत्येकाच्या खिशात असलेल्या मोबाईलमध्ये 'ब्रेकिंग न्युज' म्हणून येत असते.आज युवकांना मोबाईलचे इतके वेड लागले आहेत की,मोबाईलविना राहू शकत नाही अशी स्थिती त्यांची निर्माण झाली आहे म्हणूनच म्हणता येईल की,मोबाईल वापरणे हे 'व्यसन आहे की फॅशन' हा प्रश्न आजच्या युवक पिढीला पडलेला आहे.

           लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच मोबाईल हवाहवासा वाटतो आहे.लहान मुलांना मोबाईलवरील कार्टून,गेम,बडबड गीत खूप आवडतात तर शाळकरी मुले अभ्यासक्रमातील ज्ञानाचा खजिना शोधण्याचं काम करतात तर काहीजण पब्जीच्या गेमने बेचैन झालेले आहेत.महाविद्यालयीन युवक युवती तर सोशल साईट्स चा वापर करून प्रेमाचे चाळे करण्यात जास्तच रस घेतांना दिसते आहे.फेसबुक,वॉट्सअप्प,ट्विटर च्या माध्यमातून जगाच्या कोपऱ्यात असलेल्या मित्र-मैत्रिणीचे शोध घेण्यात वेळ घालवीत आहेत त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेला मोबाईल आहे.आज मोबाईलसाठी युवक वाम मार्गाने पैसे कमविण्याची वेळ आलेली आहे म्हणून तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असतांना दिसते आहे.आज प्रत्येक शाळेत अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून अध्यापन वर्ग देखील होत आहे म्हणजेच डिजिटल वर्ग देखील चालत आहेत म्हणून मोबाईलचा वापर कसा करायचा हे सर्वस्वी वापरकर्त्यावर अवलंबून आहे असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.

         आज प्रत्येकाकडे मोबाईल असून देखील त्याचे वाईट परिणाम देखील होतांना दिसते आहे. दिवसभरात अधिक काळ मोबाईच्या सानिध्यात असल्यास इलेक्ट्रानिक किरणे प्रत्यक्षात मेंदूवर परिणाम करत असतात त्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो.मोबाईल नसतांना पूर्वीच्या काळात संवाद चांगल्या पद्धतीने घडून येत होता पण सध्या दोन वा दोनपेक्षा अधिक मित्र जवळपास बसले असले तरी आपापल्या मोबाईलमध्ये मेसेज फॉरवर्ड करीत किंवा मेसेज वाचत असतात पण समोरासमोर असून देखील बोलतांना दिसत नाही तेव्हा असं वाटतं की,खरोखरच आज संवादच संपावर गेल्यासारखं वाटते.आज एखादया व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,अभिनंदन,श्रद्धांजली वॉट्सअप्प,फेसबुक,इन्स्टाग्राम वर देण्याची शर्यतच लागली आहे असं वाटते. मोबाईलद्वारे परीक्षेतील गैरवापर देखील चव्हाट्यावर आलेला आहे.

          नवनवीन माहिती शोधण्यासाठी मोबाईलचा वापर करीत असतो त्याचप्रमाणे सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत मोबाईलच्या सानिध्यात राहण्याचे व्यसन तरुणपिढीला लागले आहे.कोणत्याही कामानिमित्य बाहेर गेल्यावर फोनवर बोलणे,वॉट्सअप्प वरील मेसेज वाचत रस्त्यावरून चालणे,गाडीवर असतांना बोलणे,गाणे ऐकत जाणे त्यामुळे अनवधानाने मागे पुढे लक्ष नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.तरुणाईत कोणाकडे अधिक महागडा मोबाईल आहे याची एकमेकांमध्ये शर्यत लावणे यासारख्या अनेक गोष्टीमुळे मोबाईलचा व्यसन लागलेलं आहे असं दिसून येते.तरुणाईला विचारलं असता सांगतात की,एकवेळचे जेवण मिळाले नाही तरी चालेल पण त्यांना हाताळण्यासाठी मोबाईल हवा असतो या सर्व गोष्टीवरून निदर्शनात येतो की,मोबाईल हे व्यसन आहे की फॅशन आहे हेच कळायला मार्ग नाही.

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

 मोबाईल


   अलवार उलगडावीत

    आयुष्याची ही पाने

    भूतकाळात जावे रमून

    जुळतील दुरावलेली मने

               मन कितीही भूतकाळात रमले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि केशवसुतांच्या 'तुतारी' कवितेतल्या 

       "जुने जाऊ द्या मरणालागुनी, 

        जाळूनी किंवा पुरुनी टाका 

        सडत ना एक्या ठायी ठाका,

        सावध ऐका पुढल्या हाका"

                 काळ बदलला,पिढीही आता बदलली. शारिरीक श्रम करणाऱ्यांची संख्या रोडावली. चुटकीसरशी गोष्टी उपलब्ध होऊ लागल्या. फायदे खूप झालेच परंतु नवीन तंत्रज्ञानाने नवनव्या दुखण्यांना रोगांना जन्माला घातले. निसर्गाने आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून दिली आहे.कोरोनाने देशालाच नव्हे तर जगालाच घेरले आहे. विषाणूच्या विरोधात लसीकरण प्रक्रिया चालू आहेत.परंतू त्या ताबडतोब होऊ शकत नाहीत.कोरोना संसर्गजन्य रोग असल्याने संपर्क टाळण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला.

          कालच माझ्या पुतण्याचा अमेरिकेहून फोन आला. शिक्षणासाठी गेलेल्या पुतण्याचे परतीचे मार्ग बंद झालेत. मनुष्यप्राणी कितीही बुद्धिमान असला तरी संकट नि दु:खाच्यावेळी आपली माणसे सोबत असावीत असे वाटते. पुतण्याचे नाव राकेश. राकेश बोलला," काकी, फार आठवण येते हो देशाची आणि तुम्हा सर्वांची! पण परत येण्यासाठी माझ्याजवळ पर्यायच उरलेला नाही". त्याचे जडवलेले शब्द माझ्या मनावर आघात करून गेले. मनाशी विचार केला,"काय गरज होती राकेशला अमेरिकेला शिकायला जाण्याची? पण मित्रांच्या संगतीने मुले हल्ली हट्ट करतात आणि आपल्या माणसांपासून दुरावली जातात". भारताची संस्कृती जगप्रसिद्ध आहे. इथे आजही आजी, आजोबा, काका, काकी, आई-बाबा असा मोठा परिवार गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना दिसतो. आपल्या देशातही शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध असताना आजच्या पिढीला काय अवदसा आठवते नि ते परदेशात शिकायला जातात. आता परदेशात शिकायला जाण्याची फॅशनच होऊन बसलीय. नव्हे ते स्टेटस् सिम्बॉलच झाले आहे. 

        अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाने लोकं कीडा-मुंगी सारखी मरताना दिसत आहेत. तरीही राकेशला धीर देत मी समजावले," हे बघ राकेश, विमानसेवा बंद झाली आहे. आता फक्त सुरक्षिततेसाठी तुला तिथेच घरात बसून राहायचे आहे.स्वतःची काळजी घे, आणि अन्नसाठा घरात भरपूर ठेव, त्यामुळे तुला बाहेर जावे लागणार नाही". आणि माझ्या लक्षात आले, विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे की दूर त्या सातासमुद्रापार असणाऱ्या आपल्या लोकांशी आपण व्हिडिओ कॉल किंवा वेबकॅमद्वारे संपर्क साधू शकतो आणि समोरासमोर बसून गप्पा मारू शकतो ही नवलाईच नव्हे काय! विज्ञानयुगाने मनुष्यप्राण्याला दिलेले हे गोड वरदानच नव्हें का?

     आज लॉकडाऊनच्या काळातही हा मोबाईलच आपला सगा,साथी होऊन बसला आहे. त्यामुळे आपल्याला घरात बंदिस्त असण्याचे जास्त दुःख किंवा वेदना न होता आपण त्या परिस्थितीशी मात करत, आपल्या छंदांना जोपासत असतो. मी मनोमन मोबाईल आणि लॅपटॉप यांचा शोध लावणाऱ्या संशोधकांचे आभार मानले की त्यांनी एवढे अद्ययावत संशोधन करून आपणास नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून दिला आहे.


सौ.भारती सावंत

मुंबई

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

 घरातील कामे आणि स्मार्टफोन 

       अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०(संस्कार)

         सध्या जग आधुनिक बनत चाललंय.त्यानुसार भारतही.स्मार्टफोनचा शोध तसा विदेशातला.पण तो भारतात पोहोचला आणि भारतातीलही पिढी गारद करु लागला.कारण या स्मार्टफोनचा वापर करणारा माणुस वेडा झाल्यागत दिवसभर या मोबाइल वर टिच टिच करीत राहतो.यात त्यांना बाकीची कामं सुचत नाहीत.

        स्मार्टफोनमध्ये आज फेसबुक व्हाट्अप मेसेंजर ट्विस्टर असल्याने दिवसभर तासन् तास मित्रांशी वेळ कसा जातो ते तर कळत नाही.पण महत्वाचं म्हणजे त्याच्या आनलाईन येण्याची आपण वाट पाहात असतो एवढी हुरहुर आपल्याला लागलेली असते.कार्यालयातही आपण कामे न करता स्मार्टफोन वरील फेसबुक व्हाट्अप मेसेंजर सतत पाहात असतो.याच स्मार्टफोन च्या अति वापरातुन व बोलण्यातुन घरातही संशयाचं भुत निर्माण होवुन कित्येकाचे संसारही तुटू शकतात.ही शक्यता नाकारता येत नाही.या स्मार्टफोनच्या वापराची एक लतच आपल्याला लागलेली असुन हा छंद दारु पिण्यापेक्षाही मोठा आहे.आज आबालवृद्धांपासुन तर लहानग्या बाळापर्यंत निव्वळ आज जन्मणा-या बाळापर्यंतही या मोबाइलचा असर झालेला जाणवत आहे.लहान मुलाला प्रसंगी बोलता येत नाही.पण त्याला हा स्मार्टफोन पाहायला न दिल्यास तो रडतो.आपला राग दाखवतो.एवढे आपण स्मार्टफोनचे गुलाम.

      महत्वाचं म्हणजे मोबाइलचा वापर आपण करीत असतांना आपल्या घरादाराकडे दुर्लक्ष करणारी माणसे भरपुर दिसतात.काही मंडळी तर एवढी स्मार्टफोन च्या वापरात गर्क असतात की त्यांना दुस-या कोणत्याच गोष्टीचं भान राहात नाही.मग एक लक्ष स्मार्टफोन वर तर दुसरं लक्ष आपल्या कामावर असल्याने नेमकी कोणती चुक आपल्या हातुन घडते याचा विचार आपण करीत नाही.मग कधी या गुंताळ्यात असतांना पाय घसरुन आपण पडतो.कधी पोळपाट पायावर पडतं तर कधी आपलं लेकरु आपल्या हातातुन पडतं तर कधी ते पाण्यात पडतं.कधी आपणच सेल्फी काढतांना पाण्यात पडतो.एवढे आपण स्मार्टफोनच्या आहारी गेलो आहोत.निव्वळ स्मार्टफोनवरील मेसेज पाहता यावे म्हणुन आपल्या घरी बाकीची धुणी भांडी करायला मोलकरणी लावतो.एवढे आपण विद्वान.पण आपण ती साधी कामं करीत नाही.यामुळंच की काय व्यायाम न झाल्यानं आपण एखाद्या असाध्य आजारानुसार अंथरुणाला खिळतो.तरीही आपला हा मोबाइल छंद आपला पिच्छा सोडत नाही.

       मित्रांनो,निदान घरातील कामे करतांना तरी मोबाइल,स्मार्टफोन दूर करा.कपडे,भांडे स्वतः करा.वाटल्यास जेवणही बनवा.तुमचंच आरोग्य चांगलं राहील.पोट सुटणार नाही. मोबाइल पाहायला चांगला जरी असला तरी तो हाताळतांना खबरदारी घ्यावी.काही काही तर महाभाग हे मोबाइलच्या नादात अगदी देहभान विसरतात.पत्नी काय म्हणते.मुलं काय म्हणतात पती काय म्हणतो याकडेही दुर्लक्ष करतात.काही काही प्रेमीयुगल तर रात्री अंगावर गोधडी ओढतात आणि बोलत असतात.

         खरं तर आमच्या कामात व्यत्यय आणणा-या स्मार्टफोनचा आपण त्याग करायला पाहिजे.पुर्ण वेळ नाही तर काही वेळ.त्याचं नियोजन करुन.दिवसभर स्मार्टफोन पाहण्यापेक्षा त्याचीही वेळ नियोजन करतांना बांधुन घ्यायला हवी.चोवीस तासापैकी मी एवढाच वेळ स्मार्टफोन पाहाल असे मनात पक्के ठरवायला हवे.तसा प्रणच करायला हवा.घरातील कोणतीही कामे करतांना स्मार्टफोन बंदच असायला हवा.ग्रुपची संख्या कमी करावी.नेमकेच बोलण्यासाठी मित्र ठेवावे.त्या मित्रांनाही सुचना द्यावी की त्यांनी त्याच वेळेत बोलावे.बाकी वेळ नकोच.यामुळे तुमचे बरेच फायदे होतील.तुम्हाला हुरहुर वाटणार नाही स्मार्टफोनची आणि कामातही लक्ष लागेल.छान.कोणी पडणार नाही.कोणाचा सेल्फी काढतांना जीव जाणार नाही.कार्यालयातही कार्यालयीन कामे करतांना ती व्यवस्थीत होतील.कामे चुकणार नाहीत.आरोग्याच्याही समस्या सतावणार नाही.महत्वाचं म्हणजे आपल्या स्मार्टफोनच्या वापराने कोणी अस्वस्थ ही होणार नाही.

         खरं तर स्मार्टफोन निघाला आमच्या फायद्यासाठी.आम्ही आमच्या ओळखीच्या माणसांना जवळ आणण्यासाठी स्मार्टफोन कामाचा आहे.शिवाय एकसंध विचाराच्या माणसांसाठी हा फोन अति महत्वाचा आहे.कलाकारासाठी तर हा फोन अति फायद्याचा आहे.आपली कला ही जगाला कळावी म्हणुन स्मार्टफोन महत्वाचा आहे.साहित्यीकांसाठी तर स्मार्टफोन आनंदाची पर्वणीच आहे.दुरदूरची मंडळी आपल्याला ओळखु लागतात.पण याचा अर्थ असा नाही की संबंधीत सर्व मंडळीनी आपलं घरदार विसरावं आणि स्मार्टफोनच पाहात बसावं.स्मार्टफोन जरुर पाहा.त्यात नुकसान नाही.पण स्मार्टफोनच्या जे आपण आहारी गेलोय ना.ती गोष्ट मात्र कायमची बंद करा.स्मार्टफोन पाहण्याचा आजार आपल्याला जडायला नको.निदान घरगुती कामं करतांना तरी स्मार्टफोनचा वापर टाळा.जेणेकरुन घरात तुमचं लक्ष लागेल.तुमच्या हातची भाजी तिखट किंवा खारट किंवा अळणी बनणार नाही.भाजीला चव येईल.जेवण रुचकर लागेल.त्यासोबत परिवारही सुखी होईल.शिवाय परिवारात वाद निर्माण होणार नाही.आपला परिवार सुखी तर जग सुखी हे नक्की लक्षात ठेवावं.घराचं घरपण जपायलाच हवं.त्याशिवाय देशाचाही प्रगती होणार नाही.कारण देशाला संस्काराची गरज आहे आणि संस्कार घरातुन निर्माण होतात.बाहेर परिसरातुन नाही.याचा विचार प्रत्येक मायबापांनी करायला हवा.स्मार्टफोन जरुर वापरा.पण सावधान राहुन.अन्यथा आपलीच नाही तर देशाचीही हानी होवु शकते.

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

21 हॅलो मी मोबाईल बोलतोय


हॅलो मी मोबाईल बोलतोय.मी आज तुम्हाला माझी ओळख करून देतो.मला सगळे जण ओळखतात.मला मराठीत भ्रमणध्वनी व इंग्रजीमध्ये मोबाइल फोन किंवा सेल फोन असे म्हणतात.माझा वापर संभाषणासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी करतात.जगात सर्वप्रथम मला मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कपूर ह्या व्यक्तीने 1973 मध्ये विकसित केले.माझा वापर करून पाहिले गेले.हळू हळू माझी वाढ होत गेली.मी अनेकांच्या जवळ गेलो.माझी वाढ झपाट्याने होत गेली.आज विकसित देशांमध्ये 100 व्यक्तीपैकी 97 जणांकडे मी आहे.तर जगात 100 व्यक्तीपैकी 45 व्यक्तीजवळ मी आहे.भारतात सर्वप्रथम माझा वापर करून 1995 मध्ये संभाषण साधण्यात आले. सुरुवातीला शहरी भागातच माझे वास्तव्य होते.हळूहळू शहरी-ग्रामीण सर्व ठिकाणी मी वास्तवात आलो.अगोदर माझा वापर फक्त बोलण्यासाठी व्हायचा.मी अगदी लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचो.माझा वापर होत असतानाच माझ्यात काही बदल केले गेले.मी संभाषण साधण्याबरोबरच गाणे ऐकण्यासाठी कामी येऊ लागलो. माझ्या मध्ये मेमरी कार्ड च्या रूपाने ऑडिओ गाणी भरून माझ्यात साठवले जाऊ लागले.वाटेल तेव्हा,वाटेल त्या ठिकाणी गाणी वाजवली जाऊ लागली.माझ्यामुळे अनेकांना जुनी-नवी मराठी,हिंदी गाणी ऐकायला मिळू लागली.तेवढ्यावर न थांबता मानवाने माझी आणखीन प्रगती करायचे ठरवले.मोठी स्क्रिन, कॅमेरा,ऑडिओ बरोबरच व्हिडिओ पाहण्याची सुविधा निर्माण करून मला नवीन रुपात प्रगट केले.यामुळे अनेक जण माझा वापर फोटो काढण्यासाठी करू लागला.माझ्यामुळे मी अनेकांना फोटोच्या रूपाने एकत्र करू लागलो.छोटी छोटी गाणी ऐकण्या बरोबरच आता दिसू लागली होती.मोठ्या मोठ्या कॅमेर्‍याची जागा आता मी घेतली होती.वेगवेगळ्या समारंभात,वेगवेगळ्या आनंदाच्या क्षणी वाटेल तेव्हा माझ्यामुळे मी अनेक क्षण टिपू लागलो.याबरोबरच टेक्स मेसेजच्या रूपाने शुभ सकाळ,शुभ रात्री,वाढदिवसाच्या शुभेच्छा,अभिनंदनाचे मेसेज दुसऱ्या पर्यंत जाऊ लागले. दिवसभरात न भेटलेल्या माणसाला मेसेज च्या रूपाने शुभेच्छा मिळू लागल्या.गाणी,फोटो,मेसेज असा वापर होऊ लागला.पण माणूस एवढ्यावरच समाधानी नव्हता.त्यांने त्याच्या शोध वृत्तीनुसार माझ्यात पुन्हा बदल करावयाचे ठरवले.मला आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये जोडायचे ठरवले.सिम कार्ड व मेमरी कार्ड याबरोबरच इंटरनेट जोडायचे ठरविले.मला नवीन रुपात अँड्रॉइड मोबाईल म्हणून लोकांसमोर आणले गेले.आधुनिक तंत्रज्ञानाच्या व विज्ञानाच्या युगात मी अत्याधुनिक सुविधेसह सर्वांसमोर नवीन रुपात प्रकट झालो.या नवीन रूपात बटणाच्या जागी स्क्रीन टच पॅड आला.मोठा आधुनिक कॅमेरा,टीव्ही, व्हिडिओ,संगणका प्रमाणे लिहिण्यासाठी कीपॅड,गेम्स अशा अनेक ॲप्ससह माझी निर्मिती झाली.या बदलांमध्ये माझी साठवण क्षमता वाढविण्यात आली होती.मी आकाराने व क्षमतेने सुद्धा मोठा झालो होतो.आता मी आधुनिक तंत्रज्ञानाचा शक्तिशाली इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये प्रिय असा झालो.या बदलानुसार माझ्यात अनेक नविन गोष्टी जोडल्या गेल्या.ह्या गोष्टी मानवांना एकमेकांशी जोडत गेल्या.यामध्ये व्हाट्सअप,फेसबुक,ट्विटर,इन्स्टाग्राम यासारख्या नवीन गोष्टी माझ्यात निर्माण करण्यात आल्या आहे.या माध्यमातून जग एकमेकांशी जोडल्या गेले.अगदी जवळ आले.या माध्यमाचा वापर करताना मी प्रचंड लोकप्रिय झालो.फोटो,गाणी,व्हिडिओ,लेखन साहित्य आदी सर्व गोष्टींची देवाणघेवाण सुरू झाली.ज्ञान व माहितीची देवाणघेवाण या गोष्टींसाठी आता वापर होऊ लागला. चालता-फिरता ज्ञानाचा खजिना म्हणून मला सोबत घेऊन फिरणे सहज शक्य होते.त्यामुळे मी लोकांना हवाहवासा वाटू लागलो.प्रत्येकाजवळ माझा वापर वाढला.अगदी तरुणांनी मला खूप लोकप्रिय केले.आज लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत माझा वापर सर्वजण करतात.मी अगदी सगळ्यांना माझ्यात खूप गुंतून ठेवतो.मी एका टचवर जगातील माहिती देतो.संभाषण,माहितीची देवाण-घेवाण याबरोबरच ज्ञान मिळवण्यासाठी माझा वापर होत आहे. इंटरनेट जोडणीमुळे मी जगातील कोणतीही माहिती लवकर,अचूक देण्याचा प्रयत्न करतो.माझा ऑनलाईन वापर करून अनेक महत्त्वाची कामे आज केली जात आहे. माझा होत असलेला वापर व मानवाच्या हितासाठी मी उपयोगी येतो.याचा मला आनंद आहे.पण कधीकधी अनेक जण माझा चुकीचा वापर करतात.त्यामुळे मी फार दुःखी होतो.अनेकजण माझा वापर चुकीच्या कामासाठी करतात.अनेकांची चुकीची फोटो काढणे,बँकेचे पैसे चोरण्यासाठी माझी मदत घेणे,महत्वाच्या फाईलची चोरी करणे,चुकीची माहिती व्हायरल करणे.याबरोबरच जातीय तेढ निर्माण करणे.धर्माधर्मात चुकीची माहिती पसरविणे. असे प्रकार माझ्या माध्यमातून केले जातात.मला बदनाम केले जाते.याबरोबरच लहान मुलं गेम्सच्या माध्यमातून माझा अति वापर करतात.मैदानावर खेळली जाणारी खेळ,अंगणात खेळले जाणारे खेळ,घरामध्ये खेळले जाणारे खेळ हे सर्व माझ्यात साठवले असल्यामुळे ही सर्व खेळ आता माझ्यातच खेळली जातात.मुले आधुनिक खेळाच्या मोहात पडुन त्याचा अतिवापर करतात.या आधुनिक खेळामुळे अनेक जण आत्महत्या करतात.माझ्यासाठी पालकाकडे अट्टाहास करतात.घरच्यांनी मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला.तर आत्महत्या करतात.माझ्यामुळे जेव्हा लोकांचा जीव जातो.त्यावेळी मी फार व्यथित होतो.माझ्यासाठी कोणी जीव गमावला तर मला दुःख होते.मला फार वाईट वाटते.मी मुळात चांगलाच आहे.माझा चांगला वापर करून अनेक फायदे मानवाने करून घावे. माझा चुकीचा वापर,अति वापर करू नये.अनेक जण माझा अति वापर करतात.यामुळे येणाऱ्या काळात त्याचे परिणाम मानवाला भोगावे लागतील.मोबाईलवर जास्त बोलणे, मोबाईलवर जास्त वेळ काम करणे,मोबाईलचा अतिवापर यामुळे येणाऱ्या काळात दुष्परिणाम होऊ शकतात.डोळे, कान यांची क्षमता कमी होणे,या बरोबरच मुले एकलकोंडी, स्वमग्न होण्याची भीती आहे.म्हणून माझा योग्य तेवढाच वापर करा.मला लहान मुलांच्या हाती फारसे देऊ नका.मी जेवढा चांगला आहे.तेवढाच वाईट सुद्धा आहे.माझा वापर सर्वांनी समजून उमजून व परिणामाचा विचार करून करावा.माझ्या अतिवापरामुळे मी नष्ट होऊ नये.मी या एकविसाव्या शतकात टिकलो पाहिजे.मानवासाठी मी फायद्याचा ठरावा असे मला वाटते.चला काही दिवसांनी पुन्हा आधुनिक बदलाने मी तुमच्या सेवेत हजर होईल.तुम्ही पुन्हा एकदा माझा आनंदाने स्विकार करसाल असी मी अपेक्षा करतो.


राजेंद्र प्रल्हाद शेळके

शिक्षक

मु पो किनगाव राजा

ता सिंदखेड राजा

जि बुलडाणा

9823425852

rajendrashelke2018@gmail.com

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

( 5) मोबाईल

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल ही आजच्या काळाची गरज बनली आहे. संगणक, लॅपटॉप, मोबाईल हे माहिती तंत्रज्ञानाचे संप्रेषणाचे साधन आहेत. इंटरनेटचा वापर करून आपण मोबाईल, संगणकाद्वारेे आपणअनेक नवीन नवीन माहिती मिळू शकतो. 

संगणक ,मोबाईल, लॅपटॉप म्हणजे यंत्रयुगाने मानवाला दिलेला कल्पवृक्ष आहे. इंटरनेट प्रत्यक्षातील कल्पवृक्ष आहे. आजच्या जगात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मोबाईल हे वस्तू आवश्यक झालेली आहे. आपल्या मनात कोणत्या चिंता दुःख, सुख आनंदाच्या व इतर घडलेल्या घटना आपल्याला आपल्या नातेवाईकांना क्षणार्धात पोहोचण्यासाठी मोबाइल हे उत्तम साधन आहे. मोबाईल द्वारे आपण सर्व आवश्यक कामे करू शकतो तेही घर बसून. खरं तर मोबाईल ही फार आवश्यक गोष्ट आहे आणि महत्त्वाची सुद्धा आहे. जीवनाचे प्रत्येक तसेच व्यापाराचे प्रत्येक क्षेत्र मोबाईलशिवाय, संगणकाशिवाय अपूर्ण आहे. असे वाटते की आज मोबाईलचे अधिराज्य आले आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंतचा यांना  मोबाईल ने वेडे लावलेले आहे. खरंतर मोबाईलचा  योग्य आणि चांगलाच वापर केला पाहिजे.

परंतु कोणी मोबाईलचा योग्य वापर करत नाही. मोबाईल वर असलेल्या विविध ॲप्स चा वापर प्रत्येक जण आपापल्या विचारसरणी नुसार करत असतो. मोबाईल द्वारे आपण अत्यावश्यक कामे एका क्षणात पार पाडू शकतो. व्हिडिओ कॉल करून आपण प्रत्यक्ष एकमेकांना बोलू शकतो. म्हणजे बघा मोबाईल हे किती महत्त्वाचे साधन आहे.मोबाईल या वस्तूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य एक व्यक्ती जगातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क प्रस्थापित करू शकते. ती व्यक्ती कुठेही असो . या मोबाईल मुळे आपण  क्षणार्धात सहस्त्रावधी किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याशी गप्पाही करू शकतो. आपले अनुभव आपली मते इतरांना कळवू शकतो किंवा आपल्या प्रश्नांची सोडवणूक सुद्धा करून घेऊ शकतो. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोबाईलचा किती मोठा वाटा आहे. काही तोटे विचारात घेतले तर फायद्याचे पारडे जडच आहे. म्हणून तंत्रज्ञानाने मोबाईलच्या माध्यमातून मानवाने जी प्रगती घडवून आणली ती मानवी जीवनाला खरोखरच लाभदायक आहे असं मला तरी वाटतं.  कारण मोबाईल ही आजच्या काळाची गरज बनली आहे. मोबाईल ही अत्यावश्यक सेवा बनलेली आहे. आज प्रत्येकाजवळ मोबाईल आपल्याला दिसतो. मोबाईलचा वापर जवळजवळ शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंतची लोक करीत आहेत.  माणसाला अन्न ,वस्त्र व निवारा या गरजा बरोबरच  मोबाईलची ही गरज आजच्या युगात आहे. अगदी पाळण्यातल्या बाळापासून ते वयस्क असलेल्या  व्यक्तीजवळ मोबाईल आपल्याला पाहायला मिळतो. काहीजण तर पाळण्यातल्या बाळाला  मोबाईल वर गाणे लावून देतात , त्याच्या हातात मोबाईल देतात व त्यानंतर तो बाळ  छान झोपतो. परंतु इतक्या लहान वयात लहान बालकास मोबाईल हातात दिला तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ही विघातक सवय त्या बाळासाठी लहान वयापासून योग्य नाही.

योग्य कामासाठी, चांगल्या व उपयुक्त माहितीसाठी , समज पूर्वक  मोबाईलचा वापर करावा. मोबाईल ही आवश्यक सेवेसाठी वेळोवेळी चांगल्या कामासाठी वापरली जाणारी वस्तू आहे. आणि ह्या मोबाईलचा सर्वांनी उपयोग घ्यावा.

चला तर मग

“ विज्ञान-तंत्रज्ञानाची

धरूया कासं,

संगणक,मोबाईलचा वापर करूया खास.”

〰️〰️〰️〰️〰️〰️

✍लेखिका

श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे

ता. हदगाव जिल्हा नांदेड.

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

 *जग जवळ आलय मोबाइलमुळे* 

*(09) सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*


                      माझ्या आयुष्यात मोबाइल जेव्हा आला त्यावेळी मला सतत भिती वाटायची की ,खराब तर होणार नाही ना?आज मात्र प्रत्येक काम सुकर केंलय  मोबाइल ने.

लाँकडाउन मध्ये आपणा घरात असूनही मित्र -मैत्रीण ,नातेवाईक ,सगेसोबती,आपले विद्यार्थी या सर्वाची खबरबात , खुशहाली सतस कळत राहिली ती फक्त मोबाइल मुळेच .कोरोणावर मात देण्यासाठी ही मोबाइल च  खुपखुप साथीदार ठरला.  नयनमनोहर विडीयो का़ँलींगने  आपल्याला प्रत्यक्ष अनुभुती येते.

                  मोबाइल हा आवश्यक घटक आहे . भ्रमणध्वनी हे एक  इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतातमोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुळे अपघात होत आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. तरीसुद्धा हा धोका ओळखून अनेक मोठ्या भ्रमणध्वनी निर्माण करणाऱ्या कंपन्या या यावर अधिक लक्ष ठेवून आहेत व त्यावर संशोधन कार्यही सुरू आहे.

        आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे, काढणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. नोकिया, मोटोरोला, अॅपल, सीमेन्स, सॅमसंग या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. मोबाईल वापर प्रणालीचे प्रकार खालीलप्रमाणेआहेत.   ॲड्रॉईड ,ब्लॅकबेरी ,विंडोज ,आयफोन ,एम आय ,लाव्हा ,नोकिया दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेली आहेत. मोबाईलमुळे सर्व जग जवळ आले आहे.

                मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुळे अपघात होत आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. तरीसुद्धा हा धोका ओळखून अनेक मोठ्या भ्रमणध्वनी निर्माण करणाऱ्या कंपन्या या यावर अधिक लक्ष ठेवून आहेत व त्यावर संशोधन कार्यही सुरू आहे.

        मोबाइल वापराचे दुषपरिणाम -गर्भवती महिलांसाठी आणि  त्यांची मुले यांना  विशिष्ट धोका असतो, म्हणूनच सेल फोनचा वापर कमी करण्याची त्यांना शिफारस केली जाते. पुरुष प्रजनन  संस्थेमध्ये फोनचे हानिकारक प्रभाव होतात.  म्हणून पुरुषांनी त्यांच्या पायघोळ्यांच्या खिशात फोन घेऊन जाऊ  नये. मोबाइल फोनवर मजकूर पाठवणे आणि विविध खेळ खेळणे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. विशेषतः  किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आक्रमकता येते .डोकेदुखी, लक्ष कमी लागणे, स्वभाव चिडचिडेपणा होणे, झोपे कमी लागणे आणि नैराश्य इ. विकार होऊ शकतात.

               मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहेत. त्यातूनच सोयीपेक्षा हा मोबाइल आपलं जगणंच हैराण करुन सोडताना दिसतोय.

आई-वडिलांनी मोबाइल काढून घेतल्यामुळे हरियाणातील चौथीतल्या मुलाचा हाताच्या नसा कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.. अलीकडेच प्रसिद्ध झालेली ही बातमी. या प्रकरणात तो मुलगा वाचला पण इतक्या क्षुल्लक गोष्टीमुळे इतक्या टोकाला जाण्याचा विचार चौथीतल्या म्हणजे साधारण नऊ-दहा वर्षांच्या मुलाच्या डोक्यात येतो कसा? मोबाइलच्या अतिवापराचं हे टोकाचं उदाहरण अर्थात एकमेव उदाहरण नाही.  गोंदिया मध्ये राहणारा दहावीत शिकणारा मुलगा. त्याने खूप हट्ट केल्यामुळे त्याला आयफोन दिला होता. तो दहावीत नापास झाला. नंतर त्याच्या पालकांना असं लक्षात आलं की तो अभ्यास न करता मोबाइल आणि लॅपटॉपवर गेम्स खेळायचा. आणखी चौकशी केल्यावर डॉक्टरांना माहिती मिळाली की तो आठवी आणि नववीत असतानासुद्धा मित्रांच्या फोनमधून असे गेम्स खेळायचा. त्याला गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय खूप कठीण वाटत होते. या विषयांचा मुद्दा आला की तो गेम्स खेळायला लागायचा. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की,तो धड बोलायचा नाही. हिंसक व्हायचा. त्यामुळे त्याला तीन आठवडय़ांसाठी दवाखान्यात दाखल केलं. त्यानंतर तीन महिने तो सुधारगृहात होता. तिथे त्याचं कौन्सिलिंग केलं गेलं. आता तो मुलगा बीईच्या शेवटच्या वर्षांमध्ये शिकत आहे. आणि पार्ट टाइम नोकरीही करतोय. आणखी एक २१ वर्षीय मुलगा एका फायनान्स कंपनीत इंटर्नशिप करत होता. तिथे त्याला काहीच काम नसायचं. तो इतका कंटाळायचा की वेळ घालवण्यासाठी तो दिवसभर चॅटिंग करायचा. हळूहळू तो डेटिंग साइटकडे वळला. त्यानंतर तासन्तास फोनवरबोलणं, चॅटिंग करणं असं सुरू झालं. रात्रभर तो बोलत बसायचा. अजिबात झोपायचा नाही. त्याच्या पालकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. त्याने कौन्सिलिंगला चांगला प्रतिसाद दिला. आता तो त्यातून बाहेर आला आहे.

          आपल्या आसपास मोबाइलच्या अतिवापराची अशीच उदाहरण आपण बघत असतो. मोबाइलचा सामान्यांच्या रोजच्या जीवनातला वापर जसजसा वाढला तसतसं त्यासाठी विविध सुविधा-सवलती देणं सुरू झालं. अशा प्रलोभनांमध्ये ग्राहक अडकत गेला. यामध्ये सगळ्यात सोपं लक्ष्य होतं तरुणांचं. त्यामुळे त्यांना आकर्षित करतील अशा कॅमेरा, म्युझिक  आणि सद्यस्थितीत "टिकटाँक"ने तर तरूण वर्गाला भुरळ घातली आहे . महत्त्वाच्या सुविधा त्यात तयार केल्या. असं एकेक करत काळानुरूप मोबाइलमधल्या सुविधा वाढत गेल्या. वय, काम, आवडनिवड, प्राधान्यक्रम यांनुसार मोबाइलमध्ये आकर्षक सुविधा आणल्या गेल्या. या सगळ्यात फक्त मोबाइल आकर्षक वाटून चालणार नव्हते. मोबाइलचं नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांचीही इथे महत्त्वाची भूमिका होती. हे लक्षात आल्यानंतर त्यांनीही आकर्षक सुविधांचा सपाटाच लावला तरुण अशा रीतीने मोबाइलच्या आहारी जाण्यामागे मोबाइल बनवणाऱ्या कंपन्या आणि मोबाइलचं नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्या या दोघांचाही मोठा हातभार आहे .


लेखिका 

*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*

        *(9420516306 )*

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

*मोबाइल काळाची गरज*

*(08)महेन्द्र सोनेवाने गोंदिया*


      मानवाच्या विकासात तंत्रज्ञानाने मोलाची भूमिका बजावली आहे. माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा झाला आहे. मोबाईल फोन ही त्यापैकीच एक आहे. संवादाचं महत्वाचं साधन बनलं आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून केला जातोय. मोबाईल फोन हे त्यापैकीच एक. आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे. मोबाईलमुळं जग जवळ आलं आहे. पण मानव संस्कृतीच्या इतिहासात डोकावल्यास माणसाने संवादासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केल्याच लक्षात येईल.

     मानव संस्कृतीच्या हजारो  वर्ष उलटून गेली आहेत. सुरुवातीच्या काळात संवादासाठी मानवाने विविध प्रकारच्या आवाजाचा वापर केला. कालांतराने भाषा अस्तित्वात आली. संवादासाठी भाषेचा वापर सुरु झाला. मानवाने माध्यम म्हणून प्राणी आणि पक्षांचा वापर केला. पुढं दूत अस्तित्वात आला आणि आधुनिक काळात त्याला पोस्टमन ही ओळख मिळाली. पहिल्या विश्वयुद्धात संपर्कासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला. तर दुस-या विश्वयुद्धात टेलिफोन अस्तित्वात आला. त्यावेळी रेडिओ टेलिफोनचा वापर करण्यात आला होता 

                  १९४०च्या दशकात वाहनातील फोनची सुविधा उपलब्ध झाली.जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.

       ‘मोबाइलचे अनेक फायदे आहेत म्हणूनच जगभरात मोबाइल इतक्या मोठय़ा संख्येने वापरला जातो. नेट बँकिंग, कॅब बुकिंग, सिलेंडर बुकिंग, संबंधित व्यक्तींशी संपर्कात राहणं अशी अनेक महत्त्वाची कामं मोबाइलमार्फत होतात.’ मोबाइल वापरण्याचं सर्वाधिक प्रमाण तरुणांचं आहे. तरुण वर्ग दिवसातले कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त आठ तास मोबाइलवर असतो. पण खरं तर तज्ज्ञांच्या मते हे प्रमाण २० मिनिटं इतकंच असायला हवं. काम, विश्रांती, झोप, कुटुंबासमवेत वेळ, मित्रपरिवारासोबत गप्पा, वाचन, सिनेमा बघणं अशा अनेक गोष्टी १६ तासांमध्ये होणं शक्य नाही. शिवाय यात पुरेशी झोप झाली नाही तर त्या व्यक्तीचं दुसऱ्या दिवशीचं वेळापत्रक कोलमडून गेलंच म्हणून समजा. म्हणूनच तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही, हा फरक लक्षात घ्यायला हवा.

            माणसाच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सोयीच्या व्हाव्यात यासाठी तंत्रज्ञान विकसित होत गेलं आहे. त्यात नवनवीन शोध, प्रयोग होत ते आता प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलं आहे. तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सोपं केलं. पण त्याचा अतिवापर, अतिरेक माणूस करत असेल तर तो तंत्रज्ञानाचा दोष नाही. याच तंत्रज्ञानातला मोबाइल हा महत्त्वपूर्ण घटक आहे मोबाइल वापरण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. फोन करणे, फोटो काढणे, गाणी ऐकणे, इंटरनेट सर्फिग, चॅटिंग करणे, गेम्स खेळणे, व्हिडीओ बघणे अशी मोबाइल वापरण्याची विविध कारणं आहेत. पण हीच कारणं मोबाइलच्या अतिवापराची निमित्तंही ठरताहेत.मोबाईल फोन आज प्रत्येकाची गरज बनला आहे.कारण मोबाईलमुळे कोणत्याही व्यक्तीशी.कधीही आणि कुठेही तुम्ही सहज संपर्क करु शकता.त्यामुळे संवादाचं हे साधन जगभर लोकप्रिय ठरलं आहे.गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन पहायला मिळतो.सुरुवातीच्या काळात केवळ संवादाचं माध्यम म्हणून मोबाईल फोनचा वापर केला गेला. स्मार्ट फोनमध्ये आज अनेक एप्लिकेशन्स उपलब्ध असून कॉम्प्यूटरपेक्षाही जास्त एप्लिकेशन्स हे स्मार्ट फोनसाठी तयार केले जात आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण, आरोग्य, कला, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रासाठी मोबाईल फोनला महत्वाची भूमिका बजावणार आहे. मोबाईल फोनमुळे आवघं जग मुठीत आलं असून भविष्यात मानवाच्या विकासात त्याचं महत्व आणखी वाढणार आहे..

कधी काळी चैनीची वाटणारी वस्तू आता जीवनावश्यक बनलीय.. मोबाईल ही आता प्रत्येकांची गरज बनलीय.नव्या पिढीचा मोबाईल म्हणजे अत्यावश्यक असं एक अविभाज्य अंग बनलय.पण सदैव तुमच्या हातात असणारा मोबाईल हा तुमचा सर्वात मोठा शत्रू बनलाय. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.पण हा मोबाईल आज सत्तर कोटी लोकांच्या आयुष्याशी खेळतोय.

नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे मोबाइलच्या वापरालाही दोन बाजू आहेत. प्रवासात काही महत्त्वाची गोष्ट आढळून आली तर त्याचा फोटो काढला जातो. एखादी महिला एकटीने प्रवास करत असतील तर ती ज्या वाहनाने प्रवास करतेय त्याचा नंबर मोबाइलमध्ये नोंदवून तो कुटुंबीयांना ती पाठवू शकते. एखाद्या ठिकाणी पहिल्यांदा जाताना गुगल मॅप अतिशय उपयुक्त ठरतो. मोबाइलचं रिचार्ज संपलं असेल आणि बॅलन्सची गरज असेल तर विशिष्ट अॅप्सवरून बॅलन्स भरला जातो. शिवाय मोबाइल बँकिंगही करता येते. नव्या शहरात आपल्याला घ्यायला येणाऱ्या व्यक्तीशी मोबाइलद्वारेच संपर्क साधता येतो. कॅबचं बुकिंगसुद्धा मोबाइलवरून होतं. एवढंच काय तर प्रवासात काही अडचणी आल्या तर त्यासंदर्भातला फोटो काढून संबंधितांना टॅग करून ट्विटरवर ट्वीट करता येतं. उदाहरणार्थ परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ट्विटरवर सक्रिय असतात. त्यांचं नाव टॅग करून अनेकदा परदेशात अडचणीत असलेल्यांबद्दल माहिती दिली गेली आहे. त्यांनीही वेळोवेळी त्यातून अडकलेल्यांना सोडवलं आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही अशा रीतीने ट्विटरवरून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ मदत केल्याची उदाहरणं आहेत. एखाद्याचा मित्र/मैत्रीण परदेशात अडचणीत असेल तर त्याबद्दलची माहिती फेसबुकवर पोस्ट केली जाते. यामुळे एकाच वेळी अनेकांना त्यांच्या समस्येविषयी समजतं. शिवाय त्यापैकी अनेक जण मदतीस पुढे सरसावतात. मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया अशांचा चांगला आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापर नक्कीच केला जाऊ शकतो. आणि बरेच लोक याचा अशा प्रकारे वापर करतातही. त्यामुळे मोबाइल वाईटच कसा असं एकतर्फी बोलणं उचित ठरणार नाही. त्याचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम दिसून येतातच. आणि हे दुष्परिणाम जीवावर बेतणारेही ठरले आहेत. गेल्या वर्षभरात गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणाऱ्यांच्या मृत्युचा आकडा वाढतच चालला आहे. मुंबईत लोकल ट्रेनचा ट्रॅक मोबाइलवर बोलत, ऐकत ओलांडणारे इतके आपल्याच नादात असतात की ट्रेनसारखं धूड अंगावर आलेलंही त्यांना समजत नाही. अशा अपघातांच्या संख्येतही अलीकडे वाढ झाली आहे.

*महेन्द्र सोनेवाने गोंदिया*

*[9421802067]*

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

स्मार्ट फोनचा स्मार्ट वापर 


' परीराणी परीराणी गेला तुझा जमाना

स्मार्ट फोन आल्याने सापडे नवा खजाना '

   माझी पाच वर्षांची नात जोर जोरात ठसक्यात गात होती . लहान मुले पण किती त्या फोनच्या आहारी गेली आहेत बघा . हे जरी खरं असलं तरी सुरी कशी वापरायची ते आपणच ठरवलं पाहिजे . 

     २१ व्या शतकात आलेल्या स्मार्ट फोनने ह्या विज्ञान युगात एकच धम्माल उडवून दिली आहे . स्मार्टफोन  हा विज्ञान जगातील संपर्क क्षेत्रातील अद्भुत चमत्कार आहे.

    जग किती जवळ आलंय असं वाटतं . बसल्या जागी हजारो मैल दूर असलेल्या माणसाशी आपण सहज बोलू शकतो अगदी त्याच्या डोळ्यात पाहून ! 

      एका click वर पाहिजे ती माहिती मिळवू शकतो . हवं ते वाचू शकतो . गुगल, युट्युब वरून आपण कुठलीही माहिती मिळवू शकतो. कुठलीही गोष्ट शिकू शकतो.

       आता नोकरीसाठी चप्पल झिजवावी लागत नाही . एका click वर आपल्या योग्य नोकरीची माहिती मिळते . लगेच एका click वर CV पाठवू शकतो . कुठेही apply करू शकतो . मुलाखतहि conference call द्वारे एकदम 3-4 लोकं घेऊ शकतात अगदी घर बसल्या.         कुण्या पेशंटचे डॉक्टर परदेशी आहेत . No problem . तुम्ही तुमचे रिपोर्ट्स , x-rays वगैरे एका क्लिक ने द्या पाठवून . लगेच ट्रीटमेंट सुरु . 

      कुठेही designs , photos , documents पाठवण्यात वेळ जात नाही .घर बसल्या business करता येतो . शेतकरी , सुतार , plumbar असे रोजगार मिळवणाऱ्या लोकांना काम अगदी सहज मिळते . 

     घर बसल्या सामाजिक काम हि करता येते . उदाहणार्थ , अंध मुलासाठी घरी वाचन करून रेकॉर्ड करता येते . ते mp3 cd chya स्वरूपात पाठवून देता येते . त्यांना अभ्यास करताना उपयोगी पडते . 

      बँकेत जाण्यासाठी पायपीट करणे , तास न तास रांगेत उभे राहणे ह्या गोष्टी आता जुन्या झाल्या . घर बसल्या पैशांचे सर्व व्यवहार करता येतात . मोदीजी आपको सलाम ! 

      स्मार्ट फोन वरच्या whatsapp, face book etc. मुळे जेष्ठ नागरिकांच्या हाती जादुई कांडी च आली आहे . लोकांचा एकाकी पणा कमी झाला आहे . खूप खूप वर्षानंतर मित्र - मैत्रिणी एकमेकांना भेटू शकत आहेत , गप्पा गोष्टी करू शकत आहेत . जणू त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा वसंतच बाहेरून आला आहे . 

     स्त्रियांना ऑफिस मध्ये निर्धास्त नोकरी करता येते . कारण फोनवरून आपल्या बाळाकडे त्यांना लक्ष ठेवता येते . आजकाल appliances चे रिमोट कंट्रोल फोनमध्ये असल्यामुळे आणखीनच सोपे झाले आहे . मुलांच्या हातात हा फोन दिला कि आई- वडील आपले काम करायला मोकळे . मुलांनाही वेग वेगळ्या गोष्टींमधून , बडबड गीतां मधून नकळत शिकायला मिळते . हा वापर किती करायचा ते आपण ठरवायचे !! 

      आपल्याकडे बरेच छुपे रुस्तम असतात . प्रत्येकाला पुढे जाऊन प्रसिद्धी मिळतेच असे नाही . पण whattsapp , किंवा face book वरून आपली कला जगासमोर ते आणू शकतात . Likes द्वारा त्यांची पाठ छान थोपटली जाते . 

      स्मार्ट फोन म्हणजे आपल्याला एक anchor मिळाला आहे असे मला वाटते . आपण कुठेही गेलो तरी uncomfortable होत नाही . हा मित्र आपल्याबरोबर असतोच. आज काल हा फोन बरोबर नसेल तर handicap झाल्यासारखे वाटते . इतकी ही वस्तू गरजेची झाली आहे . प्रवासात GPS मुळे वाट अगदी सुकर रस्ता न चुकता अशो झाली आहे . जीपीएस द्वारे लोकेशन घरच्या लोकांशी शेअर केले की रात्री मुलींना नोकरीवरून टॅक्सी ने निर्धास्तपणे घरी येता येते.

        सध्या लॉक डाउन मध्ये स्मार्ट फोन हे वरदान ठरले आहे. बरेच जणांचे वर्क फ्रॉम होऊन चालू आहे. फोन द्वारा कॉन्फरन्स व्हिडिओ कॉल करता येतात. फोनवर कुठलेही सिनेमे,नाटके बघता येतात. आरोग्य सेतू ॲप द्वारे जवळपास कोरूना पेशंट असल्यास आपल्याला हिंट दिली जाते.

        सृष्टीचा नियमच आहे . उन्हं तिथे सावली , सुखं तिथे दुःख , फायदे तिथे तोटे असणार च. फोनच्या अती वापरामुळे माणसे एकमेकांना दुरावली आहेत. फोनवरून सातासमुद्रा पलीकडे असलेल्या माणसाशी चॅटिंग होते. पण घरात असलेल्या माणसांची मात्र दिवसभरात ही चॅटिंग होत नाही. आमच्या वेळी शाळेतून घरी आले की खेळायला बाहेर जायची घाई असायची. आता मुले शाळेतून आल्या आल्या मोबाईल फोन घेऊन बसतात. त्यावर गेम्स खेळत बसतात. गेम्सच्या मुलं इतकी आहारी गेली आहेत की त्यांना वेळेचे भान राहत नाही. अभ्यासही सूचत नाही काही. काही गेम्स मुळे मुलांचे जीवही गेले आहेत. कुठल्याही गोष्टीची 'अति तिथे माती'. मुले मोकळ्या अंगणातले खेळ, व्यायाम विसरली आहेत.

त्यामुळे  मुलांचे वजनही अवाजवी वाढत असते. मुलांच्या बौद्धिक विकासावर व कल्पकतेने वर परिणाम झाला आहे. मुले  चंचल होत चाललेली आहे. माणुसकी पण हरवली आहे का? अती वापरामुळे माणसाची बुद्धीच बधिर झाली आहे का? मुलांचे आई-वडीलही मोबाईल फोनमध्ये डोके घालून बसल्यामुळे त्यांनाही मुलांसाठी कमी वेळ देता येतो. त्यांचे आपापसातले संवाद कमी होतात.

          Cyber गुन्हेही वाढले आहेत . बरेच जण अश्लील गोष्टी पोस्ट करतात . त्यामुळे बदनामी होते . 

मेजवानी , get- togethe हे कशासाठी असते ?  तुम्ही फोन मध्ये डोकं घालून बसलात तर काय उपयोग?

         फोनमधून बाहेर पडणाऱ्या चुंबकीय लहरीसुद्धा चांगल्या नसतात . त्यामुळे झोपताना फोन जवळ ठेवू नये .

        असे अनेक तोटे आहेत .पण शेवटी ग्लास अर्धा भरलेला बघायचे का रिकामा ग्लास बद्दल दुःख करायचे ते आपण ठरवायचे .

          जगात सतत उत्क्रांती होत असते . बदल हा सृष्टीचा नियम आहे. पण जेव्हां हे बदल घडतात तेव्हां माणूस तो accept करायला तयार नसतो . जेव्हां काही शतकांपुर्वी कागद ,प्रिंटिंग प्रेस चा शोध लागला ,

तेंव्हाही तो बदल accept करणे लोकांना जड गेले. 

नवीन tv आले तेव्हा असेच झाले . आता ती  जीवनातील आवश्यक गोष्ट झाली आहे . तसेच स्मार्ट फोनचे झाले आहे असे म्हणू का ? 

शुभदा दीक्षित 

पुणे

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

(15)

मोबाईल : बंदिशाला की मुक्त द्वार...?


आजचे युग हे मोबाईलचे युग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हजारो किलोमीटर दूर असलेली माणसं मोबाईलमुळे काही क्षणात एकमेकांना बोलू शकतात, बघू शकतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास एका क्षणात कनेक्ट होऊ शकतात. हजारो किलोमीटर दूर असलेल्या माणसांसोबत आपण जोडल्या जातो हा मोबाईलचा फायदा दिसत असला तरी आपल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माणसांपासून मात्र आपण दुरावत चाललोय असं नाही का वाटत ? 

मोबाईल हि काळाची गरज आहे हे मान्य आहे. पण ही गरज आपले व्यसन बनत आहे. आपण लहान असतांना तहान-भूक विसरून मैदानावर आपला दिवस कसा जायचा हे कळत नव्हते. आत्ताची पिढी पण तहान-भूक विसरून खेळतांना दिसते पण घरातल्या एका कोपऱ्यात बसून. हा खेळ लवकर नाही थांबला तर या भावी पिढीचा खेळ-खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही.

मोबाईल मुले जग आपल्या खिशात आलंय आणि तंत्रज्ञान आपल्या हातात. या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे समजून घेणे गरजेचे आहे. कोणतीही निर्मिती वाईट नसते. वाईट आहे वापर करणाऱ्यांची पद्धत.

साध्या माचीस चा विचार केला तर तिचा उपयोग अन्न शिजविण्यासाठी अग्नी निर्माण करण्यासाठी सुद्धा करता येतो आणि घराची राख-रांगोळी करण्यासाठी सुद्धा. मग यात माचीसचा काय दोष ?

कोणत्याही तंत्रज्ञानाचा शोध हा मानवाच्या प्रगतीसाठी केलेला असतो. तंत्रज्ञान माणसांसाठी आहे, माणसं तंत्रज्ञानासाठी नाही. हे केव्हा कळेल आपल्याला.

तंत्रज्ञान आपल्या हातात आहे. आता विचार आपल्याला करायचा आहे याचा एक व्यसन म्हणून वापर करून एका चौकटीत राहून तुरुंगात असल्याप्रमाणे चार भिंतीतले जीवन जगायचे की याचा चांगला वापर करून गरुड झेप घेऊन आकाशाला गवसणी घालायची.


गणेश सोळुंके (जालना)

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

आज डीजीटल  आणि तंत्रज्ञान युग अगदी चरम सीमेवर आहे. नानाविध प्रकारचे छोटे मोठे रोबोट तयार होत आहे . जेथे माणसाच्या जीवाला धोका आहे तिथे हे रोबोट कार्य करतात. ह्या तंत्र युगाची सर्वात मोठी देणगी  म्हणजे मोबाईल फोन  भ्रमणध्वनी . ह्या मोबाईल फोन मुळे टेलीमेडीसीन अस्तित्वात आले. दूरवर खेड्यातील रुग्णाचे रोगनिदान होऊन योग्य उपचार करणे शक्य  झाले आहे.  ह्या मोबाईल फोनमुळे आख्खे जग जवळ आलं एकत्र आलं. आज ज्येष्ठ नागरिकांचा वेळ सुद्धा  मोबाईल फोन आणि वाट्सअॅप मुळे आनंदात व्यतीत होतो आहे . ज्येष्ठ मंडळी मोबाईल मुळे आपल्या परदेशस्थ मुलांसह,  नातवंडांना सह, आणि अन्य नातलगां सोबत संवाद साधताना  दिसतात. दुधाची तहान ताकावर भागते. नेट बँकींग आणि डिजीटल व्यवहाराच्या मुळे वेळची बचत  होते .मोबाईलचे खूप फायदे तर आहेच  त्यात वाद नाही पण मला नेहमीच असे वाटते मोबाईल मुळे माणुस  इम्मोबाइल झाला आहे. 

     प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. मोबाईल फोनचेही तसेच आहे. मोबाईल फोन मुळे माणसं दूरावत आहे. काही  तरूण मोबाईलच्या इतकी आहारी गेले आहेत की त्यांना  दुसरे काही सुचतच नाही. *पबजी* ,*ब्लु व्हेल* सारख्या जीव घेण्या प्रकारात कित्येक युवकांनी जीव गमावले आहे.  मोबाईल फोन वर रोज नवीन *फ्राड* ऐकायला मिळतो. मोबाइलवर अश्लील चाळे, *ब्लुफिल्म*  *पोर्नोग्राफी* हे प्रकार ही खूप वाढले आहे नको त्या वयात ह्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्याचे दुष्परिणाम सुद्धा दिसायला लागले आहे.

       काहीही म्हणा पण मित्रांनो आज आपण एकत्र येऊन हे लिहितो आहे ते ही मोबाईल मुळेच ना. मोबाईल फोन एक 

*necessary evil* झाला आहे ह्यात वाद नाही. 


डाॅ.वर्षा सगदेव

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

( 4 ) !! मोबाईल !! 


  मोबाईल म्हणजे तरंग किंवा भ्रमण आणि त्यामधून आवाजाचे वहन होणं इथपर्यंत आपण या साधनाचे उपयोग होतील असे मानायचो किंवा आपल्या ला  तसे वाटायचे, याच्या अगोदर आपण टेली फोन पाहिला होता आणि काळातंराने तो आपल्या ला वापरायला भेटला.  त्याच्या बद्दल कुतूहल होते ते थोडं माहिती होऊन संपले . त्या फोन ला  तारा लागत पण पुढं बिगर तारा, फोन आला, म्हणे कुठं ही आणि केव्हाही फोन करता येतो लावता ही  येतो.  शिवाय खिशात घेऊन चलता बोलता येते.  असे सर्व बोलत असत. 

         म्हणजे निरोप देणं आणि घेणं सोपं झालं दुनिया बदलली असा सूर जिकडे तिकडे येऊ लागला. 

      समाजातील ठळक मंडळी कडेच ते येतील आपल्या सारख्याकडे कशाचा काय येतो तो मोबाईल छे..छे..! 

     बरं एवढ्यावर तरी थांबेल असे आपल्या ला तसे वाटायचे पण नाही त्या मध्ये सारखा बदल होतच राहिले सामन्यातील सामान्य अगोदर मोबाईल धारी  झाले आणि नंतर हे झाले कोण तर ते म्हणजे थोडे ऐपत्तीवाले . 

       असो आज सर्व जग मोबाईल धारी बनलेला आहे.

अशा रितीने अगोदर टि. व्ही .नव्हती ती आली, पुढे टेली फोन  नव्हते, ते आले, नंतर साधे मोबाईल फोन नव्हते तेही आले आणि आता तर काय सांगायचे सर्व प्रकारचे भारी भारी मोबाईल फोन आलेत. आपण त्यांचा उपभोग घेत आहोत . हा झाला मोबाईल फोन चा प्रवास. 

          जे नसते त्याचे आकर्षण असते.  हेही काळ ओघात संपले.  आता प्रश्न येतो मोबाईल असणं किंवा वापरणे चांगले कि वाईट. 

       येथे माञ आता सर्व साधक आणि बाधक गोष्टीची चर्चा होणं अपेक्षित आहे. 

       अगोदर मोबाईल वापरणे चांगले हे आपण पाहू यात.जर मोबाईल नसता तर आपण आज भेटलो नसतो आपण समोरासमोर एकमेकांना पाहिले नाही, म्हणजे आपली आणखी भेट झाली नाही, ती मोबाईल ने घालून दिली.  दुसरे म्हणजे आपण कुठल्या ही कुठे खुशाली किंवा अडचण समजावून घेतो . कमी श्रमात कार्य करू शकतो आणखी नविन पध्दतीनुसार बॅंक व्यवहार उरकू शकतो.  घरून कुठलीही राखण करू शकतो, वैद्यकीय सुविधा देऊ किंबहूना घेऊ शकतो कोणतेही कार्यालयीन काम करणे आणि त्याचा निपटारा करू शकतो म्हण जे आज मोबाईल आपल्या सुविधा पुरविण्याचे साधन बनले आहे  आपण कोणत्याही मालाची खरेदी घरी बसून करू शकतो अडचण नाही किंवा  खिसेजाणे, मारणे या पासून सुटका करू शकतो.  असे अनेक न होणारे  कामं आपण करून घेतो , 

.आता आपण मोबाईल बाधक कसा ते पाहूयात. मोबाईल  वर बोलायचं झाल्यावर आपण हळूहळू बोलत नाही, मोबाईल आपणाला कोठे ही असताना येतो. त्याला  बंधन नाही . त्यावर खरे बोलल्या वर फसगत होऊ शकते . ( खरे बोलू नये असा अर्थ लावू नये) हळू सांगावे.

  बॅंकिंग व्यवहार व्यवस्थितच होईल असे नाही, अंक दाबण्यात चूक झाली माफी नाही.  बॅंक मधील ठेव असेल, एटीएम वापरणारा ग्राहक असेल आणि पिन कोड  नंबर सांगितला तर धोका होऊ शकतो.  वाहन चालवताना काहीजण मोबाईल फोन वापरतात अशा वेळी अपघात होतो.  अशी कित्येक उदाहरणं आहेत.  जीवन बरबाद होतं . किंवा कायमचे अंपगत्व येऊ शकते . अशा गोष्टी मोबाईल वापराणे होतात. 

      मोबाईल वापराणे हानी होते  मग नाहीका वापरायला पाहिजे तो. तर याचं उत्तर नकारार्थी येणार नाही. जरूर अगदी जरूर वापरला पाहिजे मोबाईल फोन पण कसा  ? तो आपल्या साठी आहे.  आपण त्याच्या साठी नाही त. वाहन चालवताना तो बंद करून ठेवावा.  बोलत असताना दुसर्याला कळू नये काय बोलतो आपण ते. थोडक्यात मोबाईल फोन प्रमाणातच वापरायला पाहिजे.

अति तिथे माती, प्रमाणा पलीकडे जाऊन कोणत्याही गोष्टीचा जर वापर झाला तर आपणाला तोटेच जास्त पहायला मिळतील म्हणून सुंदर जीवन जगायचे असेल तर जशी नाव पाण्यात असून पाणी आत येऊ देत नाही तसे सर्व गोष्टी जीवनात करीत असताना निर्धोक कशा करता येतील त्या न्यायाने जीवन  व्यतीत व्हावे मग मोबाईल फोन वापर असो कि वाहन वापर असो! शेवटी ते आपणासाठी आहेत 

        भागवत लक्ष्मण गर्कळ बीड

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

: ...,...... मोबाईल....................


     अन्न, वस्त्र,निवारा. या मानवाच्या मुख्य गरजा आहेत. त्या प्रमाणे मोबाईल ही मानवाची एक अत्यंत गरज झाली आहे.

विज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे.ते जेवढे शाप आहे .तेवढेच वरदान ही आहे.मोबाईल मुळे अनेक काम करणे सोपे झाले आहे.मानवाने तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती केली आहे.बँक,शाळा,महाविद्यालय,दवाखाना,रेल्वे,विमान,शेती,कारखाने,बसस्थानक,अशा सर्व विभागात मोबाईल ने प्रचंड प्रभुत्व गाजवले आहे.वाढती लोकसंख्या ची गती लक्षात घेता मोबाईल ची प्रगती वरदान ठरली आहे . कारण बँकेत पैसे काढणे ,पोस्ट ऑफिस मध्ये कामासाठी लांब लांब रांग लागत असतं.आणि छोट्या छोट्या कामासाठी पूर्ण दिवस संपत असतं.1998/1999 चा काळ होता.माझे गाव डोंगरगाव.पण प्रत्येक कामासाठी तालुक्याच्या ठिकाणीं यावं लागतं होत.त्या काळात नोकरी साठी निघालेल्या जाहिराती पाहण्या साठी सकाळीच निघाव लागत असत ग्रामीण भागातून येण्यासाठी गाड्याही मोजक्याच असायच्या ,पर्याय महनुन काही एखादी गाडी मिळलीतर मिळून जात होती नाहीतर वाट पाहिल्याशिवाय पर्याय नव्हता.शेवटी तालुक्याच्या ठिकाणीं पोहचण्यासाठी 12वाजत असतं तो पर्यंत खूप लांब रांग तयार होत असे .आपण रांगेत लागल्यापासून आपला नंबर येई पर्यंत संध्याकाळ होत असे.व शेवटी सारे काम राहून जायचे आणि रिकामे परत यावे लागत असे.पण आता सर्व लहान पासून मोठ्या पर्यंत तर अडाणी पासून ज्ञानी पर्यंत सर्व लोक मोबाईल मूळ सुखी झाले आहेत.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल मुळे वेळ वाचत आहे.व सर्व कामे लकर होत आहेत .कितीही दूर असतील तरीही भिंतीच्या अडून बोलल्या सारखे भासत आहे. सर्व वस्तू ऑनलाईन बोलावता येत आहेत. माणसाला कुठेही जाण्याची गरज नाही.                                                            मोबाईल  जेवढे वरदान आहे तेवढेच शाप ही आहे.मोबाईल मुळे आपण मनातल्या भावना प्रकट करायला विसरत चाललो. माणसा माणसा तील ,नात्यातील मित्रातला या सर्व आपुलकीच्या भावना माणूस विसरला आहे.या lockdown मध्ये तर अख्खा जग मोबाईल मागे भिडला आहे.लहान मुलांचा अभ्यास करण्याची क्षमता मोबाईल मुळे कमी झाली आहे .कोणत्याही वस्तूच जास्त प्रमाणात वापर केल्यास अतिरेक होतो.म्हणून घरच्या मोठ्या व्यक्तींचे अनुकरण लहान मुले करत असतात.आपण कोणत्याही वस्तूचे वापर मर्यादा राखून केल्यास मुलेही करतात.मुलांनी मोबाईल वापरणे काही गैर नाही पण काळाची गरज आहे पण मर्यादा हवी. मानव तंत्रज्ञानाच्या साह्याने मंगळावर जाण्यास सज्ज झाला आहे.पृथ्वीवर काही मानव निर्मित  तर काही नैसर्गिक आपत्तीचा प्रादुर्भाव होत आहे त्या करिता माणसाला पर्याय शोधण्या शिवाय मार्ग नाही. पण या. तंत्र युगात सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा पण सध्याची पिढी. मान मर्यादा,संस्कार या गोष्टी पासून दुरावत जात आहे.नवीन नवीन pabji सारख्या खेळामुळे अनेक तरुणांनी जीव गमावला आहे.लहान मुले कसरत, व्यायाम,मेहनतीची कामे अशा गोष्टी पासून दुरावल्या मुळे आजच्या पिढीची शारीरिक व मानसिक क्षमता कमी होत चालली आहे .मानसिक आजारात वाढ होणाऱ्यांची संख्या  वाढली आहे.म्हणून मोबाईल चा वापर कमी व योग्य करायला हवा...                                         जीवन खसा्वत  भंडारा.                       9545246027

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

" मोबाईल : अतृप्त तृष्णा " ( 14 )

    असे म्हणतात की , " गरज ही एक शोधाची जननी आहे ! " अशा गरजुवंत मानवाने आपल्या अलौकिक बुद्धीच्या जोरावर अनेक चमत्कारिक शोध लावले . त्या शोधामुळे मानवाने आपल्या जीवनात अगदी जलद गतीने आमुलाग्र अशी प्रगती हस्तगत केली . आणि जीवन सुखासिन व आरामदायी केले . मग तो शोध रेडिओ , दूरदर्शन , फ्रिज , रोबोट , विमान , आदी भरमसाठ आहेत . पण त्याच पैकी  एक असा शोध आहे की , तो मानवाची मूलभूत गरजच बनली आहे .... तो म्हणजेच आपल्या सर्वांचा जीवलग व आवडता असा ' मोबाईल ' होय !  

     " मोबाईल माझा सखा सोबती 

       दोस्त असे खरा करामती

       जरीही असला हा निर्जीव 

       तरीही गुंततो त्याच्यातच जीव ! "

     या चार काव्यपंक्ती वाचून आपण जाणले असालच की , " मोबाईल काय चिज आहे ते ! " खरंच ! आज प्रत्येक मानवाची ही मोबाईल एक गरज बनली आहे . अशी गरज की , " ती एक अतृप्त तृष्णाच होऊन बसलीय ! " कितीही पिले तरीही प्यावच रहावे अशी न शमणारी एक तहान ! " आज मानव हा एक ' मोबाईलवेडा ' झालाय ... सकाळी ऊठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो आपल्या हातात एखाद्या जपमाळेसम बाळगून तिच्या साधनेत तल्लीन होऊन जातो ..... की तहान - भूकही विसरून जातो ... हे व्यसन अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील स्तरावरील कमी - जास्त प्रमाणात आढळून येते . त्यातील घातकी लहरींमुळे कित्येकदा लोकांना आपले मौल्यवान डोळे कमजोर होऊन प्रसंगी नेत्रदृष्टी कायमची गमवावीही लागली .... काहींना हेडफोनमुळे कर्कश आवाजात गाणी ऐकून कर्ण बधिरताही आलीय ... शिवाय सतत मानेवर धरून कित्येकांच्या मानाही वाकड्या झाल्यात ! कित्येक अपघात होऊन मानव प्राणास मुकलाय ! तरूणांना अश्लिलतेस वावही यामुळेच मिळाला . . आणि तो एखाद्या बुजगावण्यासम विनोदी ढंगाचा दिसत आहे .... 

     " बोलणे झाले बंद 

       संपले ऋणानुबंध

       एका या मोबाईलने

       हैराण झाले जीणे !! "

     हा मोबाईल मानवाला घरातील मानवापासून दूरावा निर्माण करत आहे ... आपापसात संवाद - चर्चा कमी होऊन तो एकांगी स्वभावाचा होत आहे .... आज आपण वर्तमानपत्रात पाहतो की यामुळे विविध घातक गेम्समुळे अनेकांना जीव गमवावा लागला ... शिवाय अतिरेक वापराने मेंदूच्या शक्ती कमकुवत होऊन मानसिक व शारीरिक आजार बळावलाय . मानव हा अती आहारात चिडखोर , क्रोधी , आक्रमक , निरूत्साही , उतावीळ , असंयमी होत चाललाय .....

     म्हणतात ना , " कळतं पण वळत नाही ! " सर्व दुष्परिणाम जाणूनही तो ही आपली तहान मर्यादित ठेवत नाही .... त्यासाठी मानवाला प्राणायाम , योगासने व ध्यानधारणेने आपल्या!  मनावर विवेकाचा अंकूश ठेवावे लागेल .... तरच तो या मोबाईलच्या विपरीत परिणामापासून स्वतःचा बचाव करू शकेल ....

     हा कोरोनाकाळ तर मानवाला लॉकडाऊनमुळे जास्तच मोबाईलशी संगती करण्यास भाग पाडत आहे .... भलेही या साधनांचा वापर अनेक हितावह होत असला तरीही .... ही व्यसनरूपी अतृप्त तृष्णा एक गंभीर भिषण समस्या होऊन बसलीय ....


अर्चना दिगांबर गरूड 

मु . पो . ता . किनवट , जि . नांदेड 

मो . क्र . 9552963376

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

मोबाईल


         मोबाईल ही सध्या जीवनातील एक अत्यावश्यक गोष्ट झाली आहे.खर तर हे संदेशवहनाचे साधन आहे.पण आता त्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत शिरकाव केला आहे.मनुष्याच्या इतर गरजांबरोबर मोबाईल ही एक महत्त्वाची गरज बनलेला आहे.पुर्वीच्या काळी संदेशवहनाची साधने म्हणजे माणसाकरवी निरोप पाठवला जायचा.त्यानंतर कबुतराचा यासाठी उपयोग होऊ लागला.परंतु जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी दूरध्वनीचा शोध लागला व पाठोपाठ मोबाईलचा शोध लागला.मोबाईल हे अतिशय जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी उपयोगात येऊ लागला.

            आता दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी मोबाईलचा सर्रास वापर होत आहे.त्यामुळे जगाशी संपर्क वाढला आहे.नवनवीन तंत्रज्ञान मोबाईल द्वारे समजता,शिकता येऊ लागले आहे.हा मोबाईलचा खूप मोठा उपयोग आहे.परंतु जितके उपयोग आहेत तितके तोटे सुद्धा आहेत.मोबाईलवरच प्रत्येक गोष्ट होऊ लागल्याने जनसंपर्क कमी झाला आहे.माणसामधील संवाद कमी झाला आहे.त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा वाढत आहे.माणसाचे माणसांशी प्रत्यक्ष बोलणे कमी झाल्याने माणूस आत्मकेंद्री बनू लागला आहे.त्यामुळे अनेकदा प्रत्यक्ष संवाद साधणे हे कौशल्य कमी होऊ लागले आहे.

       मोबाईलच्या सतत वापरामुळे अनेकदा डोळ्यांचे विकार उद्भवतात.तसेच अनेक आजारांना मी माणूस बळी पडत आहे.लहान मुले देखील मोबाईलच्या अति वापराने चंचल बनले आहेत.त्यामुळे त्यांची निरीक्षणवृत्ती कमी झाली आहे.मोबाईलवरील खेळांमुळे मुले मैदानापासून लांब गेली आहेत.मुलांमध्ये, तरुणांमध्ये हिंसक वृत्ती वाढत आहे.

        कोणत्याही तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात वापर झाला तर ते जीवनासाठी वरदान ठरते.त्याचप्रमाणे मोबाईलचेही आहे.मोबाईलचा वापर योग्य प्रमाणात केल्यास ते आपल्यासाठी एक सुंदर वरदान ठरेल.


©सौ.गौरी ए.शिरसाट

    मुंबई

कोड क्र.३५

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

मोबाईल वापरा पण जरा जपून..!


          डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)

          शहापूर ,(ठाणे)9226435827


 एक काळ होता .....त्यात एकमेकांचे सर्व निरोप व ख्याली खुशाली  बरोबर समजायची.आठवण आली की माणसं वाट वाकडी करून एकमेकांकडे जायची.भेटण्याच्या वेळा फिक्स नसल्यातरी राहाटगाड्यात आवर्जून भेट व्हायची.एकमेकांना अचानक एकमेकांना भेटून स्वर्गीय आंनद व्हायचा.जगातील सर्व व्यवहार बरोबर सुरु असायचे. कुणाचंच काहीही आडत नव्हतं....एकमेकांना भेटल्यावर माणसं पोट भरून बोलायची.हे सगळं घडायचं जेव्हा कुठलाही मोबाईल किंवा स्मार्ट फोन नव्हता तेव्हा...!!माणसं बिझी नव्हती एकमेकांची काळजी घेत सुख दुःखाचे संवाद साधत आनंदाने दिवस घालवायचे.एकमेकांसाठी भरपूर वेळ होता.दूर असूनही दररोज संवाद नसूनही मना मनांत सुसंवाद होता.कुठल्याही प्रकारे मोबाईल वा स्मार्ट फोन नसूनही सगळे सुरळीत सुरू होते.

  आज स्मार्ट फोन आले.घरा घरात मोबाईल क्रांती झाली. जितकी माणसं त्याच्या दीडपट मोबाईल घरात आले.प्रत्येक जण घरी आल्याबरोबर बिझी राहू लागला. दूरच्या माणसांशी संवाद साधता साधता जवळच्या ,घरच्या माणसांशी सुसंवाद मात्र हरवला. जवळ असूनही प्रत्येकजण कुठेतरी भलत्या ठिकाणी हरवून....जवळच्या माणसांना विसरत गेला. खोट्या झगमगाटात स्वतःला मिरवता मिरवता आपल्या माणसांनाच पारखा होत गेला.साता समुद्रा पलीकडच्या मित्रांना हाय,बाय करता करता आपल्या जवळच्या मित्रांना हारवत गेला.सोशल मीडियावर अभिनंदन,शुभेच्छा देता देता प्रत्यक्ष भेटीनंतर साधा स्माईल द्यायला विसरू लागला.कोणे एके काळी मित्रांच्या कोंडाळ्यात राहणारा माणूस आभासी दुनियेच्या मित्रांमध्ये हरवून गेला.तासंतास चॅटिंग आणि गुगलच्या वेढ्यात गुरफटून रात्रीचा दिवस करत रात्रीची झोप दिवसा घेऊ लागला.झोपण्यासह खाण्या पिण्याच्या कामाच्या वेळा बदलत गेल्या. इतके अनर्थ मोबाईलमुळे घडले.

   स्मार्ट फोनमुळे दुनिया हातात आली. एका क्लिकवर कोणतीही माहिती सेकंदात मिळू लागली.देशा विदेशात लागलेले शोध व नाविन्यपूर्ण माहिती मिळू लागली.व्यक्ती जगभरात  कुठेही असली तरी एकमेकांशी टच राहू लागली., अगदी सर्वसामान्यांपासून उच्चभ्रूपर्यंत,गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांनाच ज्ञानाची कवाडे खुली झाली.कोणी ओंजळभर तर कोणी कणा कणाने ज्ञान गोळा करू लागले...!पण 'अति सर्वत्र वर्ज्यते!!'या उक्तीचा सर्वांनाच विसर पडला.आणि 'अति झाले आणि हसू आले' असा प्रकार घडायला लागला.पूर्वी दूर दूरचा प्रवास करताना होणाऱ्या ओळखी, मायेचा ओलावा कुठं तरी मोबाईलमध्ये हरवत गेला.शेजार पाजार मागे पडत जाऊन व्यवहाराची  श्रीमंती वाढत गेली. हातात स्मार्ट फोन आल्याने सगळेच जण स्मार्ट होऊ लागले पण जीवनातला खरा स्मार्टनेसपणा विसरले.मोबाईल हे साध्य नसून गरज पूर्ण करणारे साधन आहे याचा विसर पडत गेला आणि सारचं हरवलं!बालपण हरवलं,माणुसकी हरवली,जिव्हाळा हरवला,मैदानावर तासंतास खेळणे हरवले.... सारं काही अतिरेकाने हरवलं गेलं....!! म्हणून मोबाईल वापरा पण जरा जपूनच..!

          डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर

         शहापूर ,(ठाणे)9226435827

         harilbhoir74@gmail.com

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

लॉकडावून मधील आजोबांचा दोस्त-मोबाईल

श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी

क्रमांक 【17】

_____________________

कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या धोक्याने देशभर लॉकडावून सुरू झाले, एव्हाना गजबजून जाणारी रस्ते,बाजारपेठा, शाळा आणि सगळकाही चिडीचूप झालं. प्रत्येकाने आपापली गावे, शहरं आणि कॉलण्या आणि गल्ल्या बंदिस्त केल्या . एवढंच नाही तर एकमेकांकडे सुखदुःखला , भेटायला जायला सुद्धा ती दरवाजे आता बंदी झालीत. फक्त जीवनावश्यक वस्तू सोडून काहीच मिळायला तयार नाही...दररोज कित्येकांना भेटायची बोलायची सवय असलेल्या माणसांना हे काही रूचलं नाही...परंतु हेही दिवस जातील या आशेने काही दिवस घरात धुसमुस करून काढले. Tv वर असलेले तेच तेच कार्यक्रम आणि बतम्यांतील कोरोना मायाजाल सोडून बाकीच काहीच बघायला मिळत नसल्याने जाम वैताग आला...त्यातल्या त्यात लॉकडावून चा दुसरा हंगाम सुरू झाला आणि माझं आता काही खरं नाही असंच वाटायला लागलं..

असलं जीवन नकोरे बाबा , अशी अवस्था झाली ....आणि असल्या उद्विग्न परिस्थितीत एक नवीन यंत्र , अगदी ५-६इंचाच मला माझ्या लहाण्या मुलाने माझ्या हातात दिलं आणि माझं विश्वच बदलून गेलंय.... या यंत्राचं नाव म्हणजे मोबाईल,ज्याला मी आजपर्यंत कानाड्या म्हणायचो. याचा उपयोग फक्त एकमेकांना बोलायला आणि रिकाटेकडेपणा करायलाच होत असेल अशीच माझी काहीशी धारणा होती...पण आता या लॉकडावून मध्ये मला खरी साथ मिळाली तर ती मोबाईलचीच...

हो हो या मोबाईल ने हा लॉकडावून काळ अगदी मनोरंजन आणि सगळं काही देऊन मला 'करलो दुनिया मुठठी में..' असाच अनुभव दिलाय.!

मी तसा निवृत्त झालेला म्हातारा माणूस..कसाबसा घरातून जेवण खाऊन गावात ,कुच्चर ओट्यावर गप्पा मारणे , पेपर वाचणे हाच माझा अजकालचा धंदा असायचा... पण कोरोना व्हायरस आला आणि आता दररोज घरीच आणि घरातच राहायचं असल्याने थकून गेलेल्या शरीराला आणि मनाला याचं कानाड्याने (मोबाईल ने) अगदी रमवून टाकले. सकाळीच घरातील हालचाली कशा पद्धतीने कराव्या याच्या माहितीसाठी मोबाईलवर यूट्यूब च्या माध्यमातून सुंदर योग आणि प्राणायाम तसेच व्यायाम बघायला मिळाला.. ऐकायला रेडिओ आणि जुनी ,नवी गाणी , भक्तिगीते आणि सगळीच गाणी एका क्लिकवर मिळू लागल्याने तो माझा सोबतीच बनून जाऊन लागला.

वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंपाक रेसिपी बनविण्यासाठी सूनबाई मोबाईलवर बघून मस्त नविन नवीन पदार्थ तयार करू लागल्या तर , जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीची गावातील दुकानदारांना मोबाईलवर मागणी करून त्यांना ऑनलाइन पैसे पाठवणे अगदी कस परींच्या राज्यातील जीवन वाटायला लागलं.  

आमच्या नातू आणि नातीचा अभ्यास व्हाट्सअप्प आणि झूम मिटिंगच्या साहाय्याने मोबाईलवरच होऊ लागला तर मस्त जुने नवे फोटो बघून मन पुन्हा आनंदायला लागलं.. वाटलं तेव्हा मित्रांना फोन करा किंवा पाहुण्यांना बोला यातच व्हीडिओ कॉलिंग करून आम्ही प्रत्यक्षच एकमेकांना बघायला लागलो....

लहान लहान मुलं सुद्धा मोबाईलवर कार्टून काय, चित्र काय आणि वेगवेगळ्या भाषांतील अभ्यास काय , कागदकाम करणे, चित्र रेखाटने,रंग भरणे ,गेम खेळणे, या सगळ्याच गोष्टी पटापटा करायला लागलेली बघून स्वप्नवत वाटायला लागलं होतं.

घरातील म्हातारी सुद्धा रामायण, महाभारत यातील भाग मोबाईलवर पाहून जाम खुश व्हायची आणि यावर तर जाहिरात सुद्धा येत नाही म्हणून नवल व्यक्त करू लागली. तर कधी भक्तिगीते आणि अभंग ऐकून पंढरपूरच्या विठुरायचे दर्शन मोबाईलवरच घेऊ लागली.

मोठा मुलगा त्याचा शेतातील माल मोबाइल च्या मदतीने विकतोय, सूनबाई तिच्या मैत्रिणींना दररोज मोबाईलवरच भेटतेय, नातवंड मोबाईलवर अभ्यास करतात, म्हातारी भजन पूजन कीर्तन भागवत श्रवण सुद्धा मोबाईलवर करतेय.

हवामानाचा अंदाज, रेल्वे गाडी तिकीट, ठिकाण , देश विदेशातील घडामोडी, बँक पैसा, शेअर मार्केट, खरेदी विक्री सगळकाही मोबाईलवर होतंय हे मला माझ्या लहाण्या मुलाने शिकवले यामुळे माझा लॉकडावून काळातील हा मोबाईल तर आता माझा पक्का मित्र बनलाय. मला बाहेर भेटणारी मंडळी सुद्धा आता घरातच या मोबाईलवर भेटतात आणि माझा आवडता पेपर सुद्धा मी दररोज इथेच वाचतो.... यामुळे माझं काहीच हरवलं नाही आणि मला नवीन बरंच काही मिळालंय असंच सांगावस वाटतंय....

परवा तर हद्दच झाली, सखातात्याच्या पोरीचं लग्न त्यांनी त्यांच्या घरातच सोशल डिस्टन्स पाळून पार पाडलं आणि चक्क आम्हाला घरातूनच मोबाईलवर अक्षता टाकायचा सुंदर योग घडवून आणला...थेतील मंगलाष्टके आणि सगळं काही आम्ही आमच्या घरातच बसून पाहत होतो.

आमच्या मोबाईलवर घेतलेले आरोग्य सेतू अँप तर आपल्याला कोरोना संकटापासून कसं दूर राहावं याची जाणीव सुद्धा करून देतंय म्हणे..म्हणजे आता घरच्या घरी आमची काळजी घेणारा डॉक्टर सुद्धा आमच्याच घरात मिळाला. अगदी वर्तमानपत्र, कॅलेंडर, टीव्ही, केमेरा, व्हीडिओ शूटिंग, बँक, टपाल पत्र, टेपरेकॉर्डर, सिनेमागृह, जगातील बाजारपेठ, गूगल सर्च सारखा प्रश्नाचं उत्तर देणारा महागुरू, यूट्यूब व्हीडिओ, नकाशा, जमिनीची कागदपत्रे, ऑनलाईन तिकीट, शेअर मार्केट, हवामान अंदाज ,ज्ञान,विज्ञान आणि मनोरंजन...सगळं काही माझ्या हातात आल्याने ..हा मोबाईल म्हणजे जणू काही जादूची कांडी असल्याचा भास होतोय..खुल जा सिम सिम चा पेटाराच जणू माझ्या खिशात आलाय असं वाटतंय..

नक्कीच या मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा असतीलच...याची चार्जिंग रिस्क आणि बॅटरी फुटण्याचे दुष्परिणाम, याचा मोठा आवाज, हेडफोन चा अतिरेकी वापर, इंटरनेटवर असलेल्या घटक वेबसाईट, पासवर्ड सुरक्षा, सायबर क्राईम,कॉपी राईट नियमांचे उल्लंघन, नेट व्हायरस, लहान मुलांचे डोळे खराब होणे किंवा फोबिया सारखा आजार, मोबाईलचा जास्त वापर केल्याने एकलकोंडेपणा, घातकी स्वभाव, अति चंचळता आणि सहज खोटे बोलण्याची प्रवृत्ती जरा जास्तच वाढत असल्याचे नक्कीच निदर्शनास येत आहे...परंतू मोबाईलचा फायदाही अनमोल आहे म्हणून आता त्याचा एक चांगला माणूस म्हणून आपल्या सुलभतेसाठी वापर करूया आणि असा हा तंत्रज्ञानाचा अनमोल खजाना म्हणजे मोबाईल ला दोस्त बनवूया..

- श्री. ज्ञानेश्वर झगरे गुरुजी

           ( वाकदकर)

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

 23 नव्या युगाचा आविष्कार:  स्मार्टफोन


       सुधाकर रामदास पाटील ठाणे

मो.7798963063

       

           एकविसाव्या शतकातील सर्वात मोठा विज्ञानाचा अविष्कार म्हणजे स्मार्टफोन! कोण्या एकेकाळी जो संदेश पोहोचायला आठवडा किंवा पंधरा दिवस लागायचे तोच संदेश अगदी चुटकीसरशी काही सेकंदात पोहोचविण्याचा चमत्कार आपण स्मार्टफोनमुळे करू शकतो. याच स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टींचे महत्व कमी झाले, किंबहुना अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या. पूर्वीच्या काळी मनोरंजनासाठी गावागावात व्हिडिओ आणले जायचे. व्हिडिओ वर पिक्चर बघण्याची मजा काही औरच असायची. अलीकडे स्मार्टफोनवर युट्युब वर हवा तो पिक्चर हवा तेव्हा पाहण्याची संधी उपलब्ध झाले आहे. परिणामी व्हिडीओ आणायची आवश्यकता राहिलेली नाही. हातावर दिसणारे घड्याळ बऱ्यापैकी कमी होत चालले आहे कारण, खिशात मोबाईल असताना पुन्हा स्वतंत्र घड्याळाची आवश्यकता भासत नाही. शाळा-शाळांमध्ये स्पर्धा आयोजित करताना स्टॉप वॉच ची आवश्यकता असे. अलीकडे याच स्मार्टफोनमध्ये स्टॉप वॉच असते. परिणामी त्याचीही आवश्यकता आता भासत नाही. सार्‍या गोष्टी या स्मार्टफोनमुळे बसल्याजागी शिकता येतात. अगदी स्वयंपाकाच्या रेसिपी, गणिताची अवघडात अवघड उदाहरणे, कठीण शब्दांचे अर्थ, मराठी व्याकरणातील घटक, मोठमोठे नेते , संशोधक यांची माहिती, देशोदेशींचे नकाशे, अनाकलनीय संकल्पना हे सारे पाहत असताना 'कर लो दुनिया मुठ्ठी मे' हे ब्रीद वास्तवात साकार झाल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही . व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडिया वरून काही क्षणात बातमी जगभर पोहोचत असल्याने वर्तमानपत्रांचे महत्त्व देखील कमी होत चालले आहे. इतकंच काय कधीकाळी टीव्हीसमोर मॅच बघायला जी गर्दी होत असायची तीही अलीकडे दिसत नाही ,त्याचं कारण याच स्मार्टफोनमध्ये लाईव्ह मॅच पाहता येते. गावापासून शेकडो-हजारो किलोमीटर लांब असलेली व्यक्ती आपल्या कुटुंबातच असल्याचा भास होतो किंबहुना त्याचा विरह जाणवत नाही. व्हिडिओ कॉल केल्यावर त्याचं सर्व कुशल मंगल काही क्षणात जाणून घेता येतं.

         अगदी दिवस दिवसभर रेल्वेचं बुकिंग करावे लागायचं पण तेच बुकिंग अगदी काही सेकंदात आपल्याला स्मार्टफोनवरून करता येते. ऑनलाइन शॉपिंग हा तर अलीकडील खूपच वाढलेला ट्रेंड दिसून येतो. हातामध्ये स्मार्टफोन असतो जोडीला क्रेडिट कार्ड असते. फक्त ऑर्डर करायची. लगेच माल घरपोच. एवढ्या साऱ्या सुविधा या स्मार्टफोनने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत परंतु त्याचबरोबर दुष्परिणामांची चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. नकळत नेट बॅलन्सचा खर्च वाढलेला आहे . त्याशिवाय वेळेचा अपव्यय होतोय. नको त्या वस्तू खरेदी करण्याचा मोह असे खुप सारे दुष्परिणाम आपण अनुभवत असतो .2g ,3g ,4g अशी उत्क्रांती कालसापेक्ष असलीतरी वास्तवाचे भान असणे काळाची गरज आहे. एकंदरीतच दुष्परिणामांचे भान ठेवत स्मार्टफोनचा विधायक वापर केल्यास शैक्षणिक क्रांती, औद्योगिक क्रांती, कृषी क्रांती, तंत्रज्ञानातील क्रांती अशा कितीतरी क्रांत्या करण्यास स्मार्टफोन आपणास साहाय्यभूत ठरू शकतो.

   स्मार्टफोन हा शाप न ठरता वरदान ठरायचा असेल तर त्याचा वापर विधायक करणे गरजेचे आहे.

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

 मोबाईल जग


आज इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या निकिताचा काही मूड बरोबर नव्हता. रुसु बाई रुसु कोपऱ्यात बसु अशी निकिता ची अवस्था झालेली होती. दुपारी आजी म्हणाली, चला सर्व जेवायला निकिता काही जेवायला आली नाही आजीने विचारले; काय ग निकिताला काय झाले? आई म्हणाली तिला मोबाईल हवाय. तिला कशाला हवाय मोबाईल? घरात आहे ना मोबाईल? हो आई तुमचं बरोबर आहे पण पण तो साधा मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल नाही .आणि तिचा बाबांकडे हट्ट आहे की मला अँड्रॉइड मोबाइल हवा आजी म्हणाली नसते लाड कशाला हवेत अँड्रॉइड मोबाईल चार हजार रुपयांना मिळतो आणि मुलांना कशाला हवेत  असे लाड ?काय बाई काय काय ऐकायला येतं, अँड्रॉइड मोबाईल वर मुले गेम खेळतात त्याच्यामुळे त्यांची दृष्टी अधू होते त्याचप्रमाणे; मोबाईलमुळे मुले मैदानी खेळ खेळत नाही मग त्यांचा व्यायाम होत नाही परिणामी सतत आजारी पडतात मी तर अस ऐकला आहे की मोबाईल मुळे मेंदूवर ताण येऊन कधीकधी हातापायांच्या हालचाली मंदावतात. विचार क्षमता नाहीशी होते, झोप लागत नाही. काय सुनबाई मी बरोबर बोलते आहे ना! हो आई वाटतय मला तुम्ही अगदी बरोबर म्हणत आहात पण तिचं म्हणणं अस आहे की तिच्या शाळेतल्या शिक्षकांनी व्हाट्सअप ग्रुप केला आहे. आता ती पाचवीत आहे मग तिला शिष्यवृत्ती चा अभ्यास काही महत्त्वाच्या सूचना मोबाईलवर पालकांना  व विद्यार्थ्यांना दिल्या जातात. मोबाईल मुळे तिचा अभ्यास होईल त्यावर वेगवेगळ्या लिंक वर अभ्यास होईल. गुगल वर अभ्यास सर्च करता येतो. त्यामुळे तिचा हट्ट आहे की बाबांनी अँड्रॉइड फोन घ्यावा; असं तिचं म्हणणं आहे. सासु सुनेचा हा संवाद चालू असताना शेजारच्या  सुमा आजी आजींचा  रडायचा आवाज आला ;आईने खिडकीतून आवाज दिला आणि विचारले काय झाले काकू का रडताय ?आणि सुमा आजी म्हणायला लागल्या अहो काय सांगू मुंबईला माझ्या भावाचा हार्ट अटॅकने अचानक मृत्यू झाला परंतु सध्या करोना आजार चालू आहे मुंबई हॉटस्पॉट आहे मलाही तिकडे जाता येईना काय करावे? आणि त्या रडू लागल्या तितक्यात त्यांचा मुलगा आला आणि' म्हणाला आई चल बरं व्हिडिओ कॉल लावला आहे मामाला शेवटचं बघून घे. आणि त्याने व्हिडिओ कॉल लावून मामाचे अंत्यदर्शन आईला घडवले त्या खूप रडू लागल्या. काय वेळ आली आहे या कोरोनाने एकमेकांच्या सुखदुःखात  आपल्याला सामील होता येईना; परंतु या मोबाईल मुळे माझ्या भावाचे अंत्यदर्शन झाले निदान शेवटचे त्याला बघता आले हे बरे. एवढ्यात आजोबा म्हणाले निकिता जेऊन घे बरं मोबाईलच पाहू नंतर घ्यायचं की काय आजी म्हणाली अहो तुम्ही तर बँकेत जाणार होतात ना पैसे काढण्यासाठी आजोबा म्हणाले; अगं गाडीवर दूर जाण्याची परवानगी नाही या करोना आजाराच्या काळात आणि पायी माझ्याने चालवत नाही आता काय करायचे? तेवढ्यात निकिता म्हणाली अहो आजोबा, मोबाईल ने पैसे एकीकडून दुसरीकडे पाठवता येतात आजी म्हणाली मोबाईलवर पैसे पाठवता येतात का? निकिता म्हणाली हो हो आता मोबाईल वर देखील पैसे दुसरीकडे पाठवता येतात .माझ्या मैत्रिणीचे पप्पा असे पैसे पाठवतात तिने मला शाळेत सांगितले होते. आजोबांनी समजूत काढल्यामुळे निकिता आली आणि तिने जेवण केले. जेवणानंतर सर्वांनी रेडिओ लावला व रेडिओवर बातम्या ऐकू लागले. बातमीमध्ये मोबाईलवर बोलत गाडी  चालवताना एका दुचाकीस्वाराची ट्रकला धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आजीने ऐकली आणि म्हणाली, बघ ह्या मोबाईल ने हे असं होतं .तेवढ्यात आई म्हणाली अहो वाहन चालवताना मोबाईल वापरण्यास कायद्याने मनाई आहे तरीदेखील लोक कायदा का मोडतात बरे? आणि जीव गमावतात त्याचा जीव मोबाईल नाही तर त्याच्या निष्काळजीपणामुळे गेला .अशा प्रकारचे संवाद आपण आजूबाजूला नेहमीच बघतो मग प्रत्येकाला प्रश्न पडतो की मोबाईल ने फायदेही होतात आणि नुकसानही मग मोबाईल वापरायला हवा की नको आजचे जग इंटरनेटचे आहे. दळणवळणाच्या अनेक सुविधा सध्या उपलब्ध आहेत संभाषणाच्या देखील अनेक सुविधा आता उपलब्ध आहेत जग जवळ आले आहे आपल्याला प्रगती करायची असेल तर निर्णयही पटपट घ्यावे लागतात त्यानुसार वागावे लागते म्हणून आज मोबाईल ही जवळपास सर्वांची गरज आहे निरोप पोहोचवणे किंवा मोबाईलवरून काही महत्त्वाची कामे करणे हेदेखील गरजेचे झाले आहे यामुळे वेळ वाचतो पैशाचीही बचत होते परंतु मोबाईल वापरताना निष्काळजीपणा झाल्यास काही नुकसानही होते उदाहरणार्थ जर मोबाईल बँकिंग आपण वापरत असाल आपला एटीएम कार्डचा पिन कुणाला आपण मोबाईल वर शेअर करू नये .त्यामुळे आपल्या बँकेतून पैसे कायब होऊ शकतात किंवा आपल्या आर्थिक व्यवहाराची इतर कुणाला माहिती होऊ शकते व ;आपली फसगत होऊ शकते मोबाईल वर ऑनलाइन शॉपिंग देखील केली जाते परंतु; त्यावेळी मोबाईलच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या माल हा अगदी तशाच प्रकारचा असेल असे नाही म्हणून; कधीकधी मोबाईलमुळे चुकीची माहिती मिळाल्यास आपण त्याची शहानिशा किंवा खात्री न केल्यास आपले नुकसान होऊ शकते मोबाईल मुळे माणसातील प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे त्यामुळे माणसे दुरावत देखील चालली आहे .घराघरांमध्ये आईवडील व मुले, नवरा-बायको यांच्यामधील संवाद हरवत चालला आहे मोबाईलचा अतिवापर घरांमधील संवाद संपवत आहे. असे म्हणतात अति तेथे माती मोबाईल हे विज्ञानाचे एक वरदान जरी असले तरीही त्याचा अतिवापर आपल्याला धोकादायक ठरू शकतो योग्य वापर केल्यास मोबाईल हा मनुष्यासाठी वरदानच आहे निकिता सारख्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे महत्त्वाचे साधन म्हणून मोबाईल उपयोगी आहे परंतु पब्जी ,ब्ल्यू व्हेल असे गेम या मोबाईलवर खेळले गेले तर आजच्या पिढीसाठी ते धोकादायक आहे .मग हे मोबाईल कसे हाताळायचे हे तुमच्या आमच्या हातात आहे .लहान मुलांनी मोबाइल हाताळत असताना त्यावर मोठ्या माणसांचे लक्ष हवे म्हणजे त्यावर आपोआप प्रतिबंध ठेवता येतो मोबाईलवर दिवसभरातील किती वेळ घालवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे शेवटी जग मोबाईल झाले आहे परंतु मनुष्याने मात्र  मोबाईल बरोबर स्वतः मोबाईल  व्हायचे की नाही हे ठरवायचे आहे.

सविता साळुंके श्रीरामपूर

कोड नं 13

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

मोबाईल


मोबाईल आजच्या युगाची एक जीवनावश्यक वस्तू बनून राहिली आहे.आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे.संगणकाचे युग आहे.मोबाईल चे खूप प्रकार आहेत.साधा फोन,स्मार्ट फोन,टॅब,इ.प्रत्येक कंपनीप्रमाणे मोबाईल ची वैशिष्ट्ये बदलत असतात.आपल्या कंपनीचाच मोबाईल ग्राहकांनी विकत घ्यावा यासाठी प्रत्येक कंपनी विविध योजना,सोयी,सवलती देत असते.त्याचप्रमाणे आजचा युवक जो मोबाईल चा चाहता व मोठा वापर करणारा वर्ग आहे. त्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने आवडत असतात.

मोबाईल आज जिवनावश्यक वस्तू बनली आहे.आज मोबाईल शिवाय जगणे ही आश्चर्यकारक गोष्ट बनली आहे. कारण मोबाईल शिवाय आज कुणाचाही दिवस उगवत नि कींवा मावळत नाही. मोबाईल चा वापर इतके अंगवळणी पडले आहे की आज बाकी काही नसले तर चालेल पण मोबाईल पाहीजेच अशी अवस्था आहे.एक छणभरही मोबाईल बाजूला ठेवायचे म्हटले तर आज युवावर्गाला अडचणीचे जात आहे.

आच जन्मलेल्या बाळांपासून ते वयस्कर लोकांच्या पर्यंत हे मोबाईल प्रेम कीती आहे यावर अनेक जोक्स, व्हिडीओ येत आहेत ते  पाहून आपली हसता हसता पुरेवाट होते.पण तेवढेच वैषम्यपण वाटते.कारण आजचघ पिढी कुठल्या दिशेला चालली आहे हे कळायला मार्ग नाही. आजची आधुनिक आई मुलांच्या त्रासापासून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देतात.मग हे खेळण त्या मुलांच्या जीवनाचे अविभाज्य घटक कधी बणून जातो कळतचं नाही. मग ही मुले मोबाईल च्या व्यसनाच्या आहारी जातात की मोबाईल त्यांच्यापासून बाजूला काढणारा वाईट ठरतो.कीतीतरी अशा घटना घडल्या आहेत की मोबाईल वापराला बंदी घातल्यामुळे काही मुलांनी आत्महत्या केल्या आहेत तर काहींनी आपल्या घरच्या लोकांचे खून केले आहेत.मुले,मुली अभ्यासाचा महत्त्वाचा वेळ मोबाईल वरील गेम खेळण्यामधेच व्यतीत करतात.

सतत मोबाईल ची स्क्रीन डोळ्यासमोर असल्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहेत. अंशतः कींवा कायमचे अंधत्व येणे,डोळ्यांचे बाकी विकार उद्भवणे,डोळे चुरचुरणे,दृष्टीपटलावर परिणाम होणे.अशा अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात.हे विद्यार्थी व लहान मुलांच्या बाबतीत झाले. त्याचबरोबर घरातील स्त्रीयांच्याबाबतीतही अशाच घटना घडतात. जास्तीत जास्त वेळ मोबाईल वर घालवल्यामुळे घरांतील कामांवर परिणाम होऊन घरात कलह निर्माण होत आहेत.काही ठिकाणी तर घटस्फोट देखील झाले आहेत.त्यामुळे याचा वापर जपूनच केला पाहिजे.

मोबाईल वाईट आहे असे नाही. मोबाईल मुळे ,त्यातील इंटरनेट सेवामुळे आज जग आपल्या मुठीत आले आहे. कीतीही लांब असलेल्या व्यक्तीशी आपण प्रत्यक्ष बोलू शकतो,व्हिडीओ द्वारे पाहू शकतो.महत्वाची कागदपत्रे एका क्षणात या देशातून त्या देशात पाठवू शकतो.आपला कीतीतरी वेळ व पैसा या मोबाईल मुळे वाचला आहे.

आजतर या लॉकडाऊनच्या काळात या मोबाईल मुळे कीतीतरी लोकांची सोय झाली आहे. कामधाम नाही, घराबाहेर पडायचं नाही, कुणाला भेटायचं नाही अशा अनेक निर्बंधामुळे सगळे घरीच आहेत.अशावेळी सर्वांच्याकडे मोबाईल असल्यामुळे सर्वजण सुस्थितीत दिसतात. नाहीतर मानसिक संतुलन बिघडून कोण कायकाय केले असते याची कल्पनाच न केलेली बरी.

त्यामुळे मोबाईल हा योग्य कारणासाठी, योग्य वेळेपुरता,जर वापरला तर आपल्याला खूप फायदेशीर आहे. आपले जीवन कसे बनवायचे आहे ते आपल्या हातात आहे..


श्रीमती माणिक नागावे

कुरुंदवाड

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

मोबाईल (28)

           मोबाईलची उत्क्रांती खरंच आपल्याला मिळालेले वरदान आहे,जगाशी संपर्क येतो,जग जवळ आले आहे,विविध माहिती मिळते, तंत्रज्ञानाने केलेली प्रगती म्हणजेच मोबाईल आणि तो सर्वसामान्य व्यक्ती देखील हाताळू शकतो,सार जग व त्याची माहिती केवळ मोबाईलवर आपण पाहू शकतो, विविध दुर्मिळ माहिती,चित्र,प्रवास वर्णन,शहराला भेट,नकाशा, संकेतस्थळ सर्वसर्व घरबसल्या मोबाईल आपल्याला माहिती पुरवतो.

              मोबाईल आपल्या जीवनाचा हिस्सा झाला आहे,आणि त्याच्याशिवाय जगणे म्हणजे निर्थक आहे,सकाळी उठल्या उठल्या आपल्या हातात मोबाईल असतो,आणि त्याशिवाय आपण स्वस्थ बसू शकत नाही, विविध ग्रुप जोडले जातात,ते यामुळेच मोबाईलचे फायदे आहेत तसे तोटे आहेत,लहानपणी आपल्याला मोबाईल नव्हते,पण आताच्या मुलांच्या हाती ते दिसतात,आणि आता तर लाँक डावुन मध्ये मुलांना ऑनलाइन पद्धती ने अभ्यास शिकवणार!

             म्हणजे अजूनच मोबाईलचे साम्राज्य!पण परिस्थितीनुसार वागणे हे कधीही योग्यच!

सुजाता जाधव नवी मुंबई

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~

*हमें तो लूट लिया ...........*


मोबाईलमुळे आज जग बदलल्यासारखे आणि जवळ आल्यासारखे वाटत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोबाईलची क्रांती संपूर्ण इतिहास बदलून टाकली आहे. आजही ते पोस्टातील पत्रव्यवहाराचे दिवस आठवले की " डाकिया डाक लाया " हे गीत आठवण आल्या शिवाय राहत नाही. पोस्टमन गावात आला म्हटले की, लोक उत्साहाने त्याच्याकडे पाहायचे कोणाचे पत्र आले म्हणून....? सासरी गेलेल्या मुलींचे पत्र आले काय म्हणून आई वाट पहायची तर, माहेराहुन काही खुशाली आहे काय म्हणून मुलगी वाट बघत असायची. महिनोनमहीने आई-मुलींची बातचीत व्हायची नाही. पत्राद्वारे काय ते ख्यालीखुशाली कळायचे. त्यामुळे महिन्यात कधी भेटले तर दिवसरात्र गप्पा मारायच्या, पण आज काळ बदलला. मोबाईलच्या सुविधेमुळे आज मुलगी सासरी आहे असे वाटतच नाही कारण दिवसातुन दोन-तीन वेळा तरी मोबाईल वर त्यांचे थेट बोलणे होत असते. त्यामुळे पूर्वी असलेली तळमळ आणि आस्था हे दोन्ही आज दिसत नाही, हे ही सत्य असेल कदाचित. बाहेरगावी शिकायला असलेला मुलगा दर महिन्याला पैसे पाठविण्यासाठी घरी पत्र पाठवायाचा. तब्बल 15 - 20 दिवसा नंतर त्याला ते मिळायचे. आपला अभ्यास आणि निकाल मुले पत्राद्वारे कळवायचे. पण आज मुलांच्या अगोदर आई-बाबाना त्यांचे गुण कळत आहेत. हे सर्व मोबाईल मुळे शक्य होत आहे. म्हणजे मोबाईल चांगले आहे तर....! आम्ही ही त्यास काही नावे ठेवत नाही, मात्र याच मोबाइलने आज कित्येक लोकांना तंगुन सोडले आहे. सोडता ही येत नाही अन धरता ही येत नाही अशी कात्रीत सापडल्यासारखी स्थिती झाली आहे. फोनचा प्रवास ही थक्क करून टाकणारी आहे. पूर्वी घरात ट्रिंग ट्रिंग करणारी फोन हळूहळू मोबाईल चे रूप कधी घेतले हे कळले देखील नाही. एवढेच नाही तर मोबाईल स्मार्ट फोनचे रूप धारण केले हे ही कळले नाही. आज प्रत्येक जण यामुळे स्मार्ट झाला आहे. क्षणात त्यांना हवी ती माहिती मिळत आहे आणि एकमेकांना संपर्क करणे अधिक सोपे झाले आहे. मात्र याच स्मार्ट फोनमुळे त्याला अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे, हे ही विसरून चालणार नाही.

स्मार्ट फोन चांगले जरी वाटत असेल तरी यामुळे लोकं आता चुप झाली आहेत. पूर्वीसारखे बडबड करेनाशी झाली. कारण चोवीस तास त्यांचे डोके त्या मोबाईलच्या स्क्रीन वरच चिकटुन राहत आहे. कधी गाणे पाहणे, तर कधी चित्रपट पाहणे यामुळे मोबाईल सदैव त्यांच्या हाती दिसत आहे. तरुण आणि युवकाना तर या स्मार्ट फोनने अक्षरशः वेड लावले आहे. मागे काही दिवसा पूर्वी एक बातमी वाचण्यात आली होती की, वडिलांनी स्मार्ट फोन घेऊन देण्यास नकार दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काय म्हणावे या तरूण पिढीला .....! आपले अभ्यास आणि मेहनत करण्याच्या या वयात कशाला पाहिजे आपणास स्मार्ट फोन ? त्यांचे उत्तर फार मजेशीर असते ते म्हणतात की माझे सारे मित्र फेसबुक आणि व्हाट्सएप्पचा वापर करतात आणि मी एकटाच वापरत नाही त्यामुळे सर्व मुले माझी टिंगल उडवतात. मला ही फेसबुक आणि व्हाट्सएप्पचा वापर करायचे आहे आणि मित्राशी सदा कनेक्टेड राहायचे आहे. यापेक्षा त्यांना अभ्यास महत्वाचे वाटत नाही ही आजची युवा पिढी. त्यांचे पुढील भविष्य कसे असेल काही कल्पनाही करवत नाही. याचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर ठीक आहे अन्यथा ती पिढी बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेसबुक वरुन युवकास काही भविष्याचे मार्गदर्शन मिळेल असे वाटत नाही कारण निव्वळ करमणुकीचे एक माध्यम म्हणजे फेसबुक. ज्याला निवांत वेळ आहे, ज्याला कशाचीही काळजी किंवा चिंता नाही अश्या लोकांनी हे वापरावे म्हणजे त्यांचा वेळ मित्रासोबत घालाविता येईल आणि वेळ निघुन जाईल. तेंव्हा युवकानी आपला वेळ संपविण्यासाठी स्मार्ट फोन वापरायचे का ? याचा प्रथम विचार करणे आवश्यक आहे. फेसबुकने सर्वात जास्त भुरळ घातली आहे ती नवयुवकांना. दिवस रात्र फेसबुकवर चैटिंग करत फिरताना घरातील कोणत्याच व्यक्ती सोबत बोलत नाहीत. चिडिचुप व्यवहार चालू असतो. आईने जेवायला बोलावले तरी 'आत्ता एका मिनिटात आलो' म्हणत एक तास उलटतो तरी त्यांची जेवण करण्याची तयारी नसते. म्हणजे तहानभूक विसरून ते या फेसबुकचा वापर करतात. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यासाठी तरुणाचे याबाबतीत समुपदेशन करणे आवश्यक आहे. वेळेचे काही बंधन स्वतः ला लावून याचा वापर केल्यास हे माध्यम आपणास देणगी ठरु शकते.

फेसबुकच्या नंतर वापरली जाणारी सर्वात जास्त लोकप्रिय झालेली सोशल साइट म्हणजे व्हाट्सएप्प होय. यामुळे तर आबालापासून वृद्धापर्यंत पुरुष आणि स्त्री सारेच जण वेडे बनले आहेत की काय अशी शंका मनात येते. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत येथे एकमेकांच्या गप्पा न बोलता गपगुमान चालू राहते. घरात कोण आले ? कोण गेले ? याचे त्यांना काही सोयरसूतक नसते. ते आपल्या धुंदीत मदमस्त होऊन रंगून गेलेले असतात. सध्या भारतात जेवढे मोबाईल धारक आहेत त्यातील पाऊण टक्के हे व्हाट्सएप्प चा वापर करतात नव्हे करावेच लागते.

सरकार म्हणते व्हाट्सएपचा वापर करा आत्ता सर्व माहिती यावरच मिळणार, घरी गेल्यानंतर बायको म्हणते पहिले ते व्हाट्सएप बंद करा, घरात काय चालले आहे याकडे तुमचे अजिबात लक्ष नाही, लेकराचे अभ्यास घेणे नाही, बाजारात जाऊन काही सामान आणने नाही, घरातल्या कामात कसलीच मदत नाही,  दिवसरात्र त्या मोबाईल मध्येच डोके खुपसून बसायची सवय लागली, नाही रोगच लागलाय. स्त्री कर्मचारीच्या बाबतीत यापेक्षा काही वेगळे नाही. दिवसभर मोबाईल बघितल्यावर खायला कधी करणार ? या प्रश्नाने ती जागी होते. अन कामाला लागते. हे संवाद कर्मचारी वर्ग असलेल्या घरात सध्या ऐकू येत आहे. कोणत्याही कार्यालयात जावे तेथे हे दोन माध्यम चालूच राहतात. शाळा-महाविद्यालययात सुध्दा हेच चालू असते. त्यामुळे ' शांतता मोबाइल चालू ' असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

सोशल मिडीया मध्ये पालकानी खुप जागरूकपणे पाऊल उचलायला हवे. आपला जास्तीत जास्त वेळ जर पालकानी सोशल मिडीया तील फेसबुक किंवा व्हाट्सअप वर घालवू लागले तर आपले पाल्य बिघडणार नाही हे कश्यावरुन. म्हणून दिवसातील ठराविक वेळ यासाठी देऊन बाकी च्या वेळी आपल्या घरातील पती, पत्नी आई वडील आणि मुले यांच्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. आज घराघरात अशा तक्रारी ऐकायला येत आहेत की, आमचे हे सदानकदा मोबाईलवरच असतात. घरातल्या कोणाकडे मुळी लक्षच नसते. घरी तेच आणि बाहेरही तेच काय करावे कळत नाही. हे स्मार्ट फोन आल्या पासून ना खुप गप्प गप्प असतात. त्यांचे पूर्वी सारखे बोलणे आत्ता खुप कमी झाले आहे. खळखळुन हसणे आणि हसविणे देखील कमी झाले. जेवताना देखील ते बोलत नाहीत. नेहमी त्यांच्या डोक्यात कश्याचे तरी विचार चालूच असतात. सायंकाळी बाहेर फिरायला जाणे कमी झाले आहे. मित्रासोबत बोलणे कमी झाले. नातेवाईकासोबत वागणे विक्षिप्त झाले. हे सर्व या सोशल मिडीया तील फेसबुक आणि व्हाट्सअप मुळे घडत आहे. मुलांचे संगोपन करण्याची फार मोठी जबाबदारी पालकावर आहे म्हणून सोशल मिडीया चा वापर करीत असताना जरा स्वतः ला जपणे आवश्यक आहे. पालक असलेल्या माता भगिनी यांनी सुद्धा या माध्यमापासून दूर रहावे. महिलांचे व्हाट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मिडीया वर जास्त वावर नसेल ही कदाचित मात्र फोनवर बोलण्याचे प्रमाणा वर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. काही महिला फोनवर एक-एक तास संभाषण करतात. त्याचे देखील परिणाम कुटुंबावर होतात. त्यामुळे फोनचा वापर शक्यतो कमी करावा. आजच्या काळात फोन जवळीक आणणारे साधन असले तरी फोनच्या माध्यमातून काही जरी गैरसमज पसरले तर दुरावा निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे त्याचा वापर योग्य पध्दतीने करणे पालकासाठी खुप आवश्यक आहे.

व्हाट्सएपचा वापर करण्यावर काही घरात वादविवाद भांडणतंटे होत असल्याचे ऐकू येत आहेत. यावरून लक्षात येईल की, लोकांना या सोशल मीडियातील फेसबूक आणि व्हाट्सएप किती वेड लावले आहे. एखाद्या दिवशी जर इंटरनेट बंद असेल तर मानसिक स्वास्थ्य बिघडेल की काय अशी शंका सध्या मनात निर्माण होत आहे. याशिवाय मी जगूच शकत नाही असे सध्या ज्याला त्याला वाटत आहे. पण ते आभासी आहे. तेंव्हा फेसबुक आणि व्हाट्सएप व्यसन होणार नाही यांची काळजी आजपासून प्रत्येकानी घ्यावे. येणारा काळ अजुन कठिण येणार आहे. यावर एक जुने गीत आठवते ते म्हणजे ' हमें तो लूट लिया मिलके ......' याच गीतास ऐका वेगळ्या शब्दाने असे म्हणता येईल.

*हमें तो लूट लिया मिलके सोशल मीडियाने*

*फेसबुकवालोंने और व्हाट्सएपवालोंने*

- नागोराव सा. येवतीकर

   स्तंभलेखक

9423625769

~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~~~


धन्यवाद



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...