बुधवार, 13 मई 2020

रोज एक लेख :- दिवस पंचविसावा स्वछता

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- पंचविसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 13 मे 2020 बुधवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- स्वछता*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
१)
*स्वच्छता*

स्वतंत्र भारतामध्ये स्वच्छता अभियानाच्या संदर्भात बऱ्याच वेळेला प्रयत्न करण्यात आलेला आहे कारण स्वच्छता हे सर्वांसाठी आवश्यक बाब आहे सर्वांसाठी गरजेची बाब आहे. जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला आपला भारत देश आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा असणारा आपला देश. या साऱ्या गोष्टीचा विचार करता आपल्या देशामध्ये स्वच्छता असणे अनिवार्य आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी स्वच्छता अभियानाला निर्मल भारत अभियान नावाने सुरुवात केलेली होतीच. परंतु या अभियानाकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही आणि लोकांनीही ती गोष्ट जास्त मनावर घेतली नाही. पुढे याच अभियानाला लोक लोक चळवळीमध्ये बदलण्याचे कौशल्य नरेंद्र मोदी यांनी दाखवले आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर 2014 ला स्वच्छ भारत अभियान ही जन चळवळ उभी केली. या चळवळीचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी अगदी तळापासून सर्वांचे सहकार्य घेण्यात आले. चित्रपट सृष्टीतील काही दिग्गज कलाकार, तसेच अनेक लोकप्रिय खेळाडू या सर्वांचा सहभाग घेऊन ही चळवळ पुढे नेण्याचा जोरखास प्रयत्न करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणजे लोकांना अधिक महत्त्व कळून आले आणि हगणदारीमुक्त मुक्त गावे, खेडी होण्यास मदत झाली. भारताच्या या कामगिरीचे जागतिक पातळीवर कौतुकही झाले. सरकारने केलेले हे काम पुढे नेण्यासाठी आपण सुद्धा सावधान असलं पाहिजे आणि पुन्हा पुन्हा ही स्वच्छता आपल्यामध्ये उतरली पाहिजे आपण ती पाळली पाहिजे आपण ती प्रकर्षाने जाणीवपूर्वक अवलंबिली पाहिजे.
स्वच्छतेमध्ये आपला परिसर प्रथमतः आपण स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे. परिसरामध्ये वाहत येणारे पाणी, आपल्या घरातील सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करून दिली पाहिजे. साठवलेल्या पाण्यावरती कीटक जमा होतात, डास जमा होतात आणि हिवताप यासारखे  जीवघेणे रोगही निर्माण होऊ शकतात. त्यासाठी सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे स्वच्छतेच्या दिशेने पहिले पाऊल आपण जाणीवपूर्वक उचलले पाहिजे. आपल्या घराची योजना सुंदर रीतीने केलेली पाहिजे.घरामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. आपल्याला उत्साह वाटला पाहिजे आपल्यावर दडपण येता कामा नये, आपल्याला गुदमरल्यासारखे वाटता कामा नये. म्हणून घराची रचना सुंदर असली पाहिजे. कारण की आरोग्याशी मिळती-जुळती बाब आहे. घरामध्ये आपण पाळीव प्राणी सांभाळत असतो त्या प्राण्यांची काळजी घेणे हे आपले काम आहे कर्तव्य आहे. कारण त्यांच्या आरोग्याबरोबरच आपल्या आरोग्याचा संबंध येत असतो. म्हणून घरातील पाळीव प्राण्यांची देखभाल योग्य रीतीने केली पाहिजे. त्यांनाही स्वच्छ ठेवले पाहिजे. आपण शहरात राहणारे असो वा खेड्यात राहणारे बाहेरच्या जाणे टाळले पाहिजे. वैयक्तिक आणि घराची स्वच्छता झाल्यानंतर परिसराची स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता सुद्धा ठेवण्याचे कर्तव्य आपण बजावले पाहिजे. पान तंबाखू गुटका या आरोग्यास घातक असणाऱ्या सवयींपासून दूर राहिले पाहिजे. आणि ज्यांना या गोष्टीची सवय आहे त्यांनी कोठेही थुंकता कामा नये. हा कटाक्ष जाणीवपूर्वक पाळला पाहिजे. कोरोनाच्या भयानक संकट समयी स्वच्छतेचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेलच. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांशिवाया अनेक लोक घरांमध्ये स्वच्छ राहत होते. त्यामुळे खासगी दवाखान्यांमध्ये फारशी गर्दी दिसून आली नाही, आणि लोकही फारसे आजारी पडल्याचे जाणवले नाही. शाळाशाळांमधून गावांमधून हे स्वच्छतेचे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवल्या गेल्यामुळे लोकांमध्ये चांगलीच जागृती झालेली आहे. परंतु कोणतीही योजना संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी मानसिक तिची आवश्यकता असते आणि तीसुद्धा सकारात्मक मानसिकतेची. जोपर्यंत एखादी गोष्ट किंवा एखादी योजना जनचळवळ म्हणून उभे राहत नाही आणि ती लोकांनी स्वतःहून स्वीकारली जात नाही तोपर्यंत ती योजना यशस्वी होत नाही. आता बहुतांशी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटलेले आहे. तीन अस्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु काहींचे मस्तक आपण स्वच्छ केले पाहिजे कारण कितीही सांगून त्यांच्यामध्ये बदल होताना दिसत नाही अर्थात ती एक प्रवृत्ती असते. स्वच्छता अभियाना बरोबरच ही प्रवृत्ती स्वच्छ करण्याचेही काम आपण केले पाहिजे. स्वतःची, घराची, परिसराची आणि मनाची सुद्धा आपण सदैव स्वच्छता ठेवूया.
        *हणमंत पडवळ, उस्मानाबाद*
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
( 5) स्वच्छता हीच ईश्वर सेवा

माणसाने जीवन जगत असताना जीवनाची सार्थकता जाणली पाहिजे. स्वच्छता ही आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे जाणून माणसाने वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेची जपणूक केली पाहिजे.
स्वच्छता हा आरोग्यसंपन्न जीवनाचा महामंत्र आहे. माणसाने स्वतः पासून स्वच्छता सुरू करावी व मग सामाजिक स्वच्छतेकडे वळावं. दीर्घायुष्य लाभण्यासाठी स्वच्छतेचा वसा घेणे फार आवश्यक आहे. स्वच्छता म्हणजे प्रसन्नता ,स्वच्छता म्हणजे आनंद, पवित्रता ,निर्मळता, सुंदरता. 'स्वच्छता म्हणजे परमेश्वर होय. '
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे म्हणत असलेले संत गाडगे बाबा एक महान संत होऊन गेले. स्वच्छतेचा वसा उचलून जन माणसातील अंधकार दूर करण्यासाठी संत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. 
संत गाडगेबाबांनी लोकांच्या मनातील अंधश्रद्धा बुरसटलेले विचार दारिद्र हे सर्व दूर करण्यासाठी प्रभावी माध्यम वापरून ते दूर करण्याचा अतोनात प्रयत्न केला आणि दिवसा गावातील रस्ते झाडून स्वच्छतेचा जणू वसा हाती घेतला. कारण आपलं जीवन अनमोल आहे. या अनमोल जीवनात आनंदाचे तरंग निर्माण करण्यातच खरा मर्म आहे. जीवनात स्वच्छता आचार विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. संत गाडगेबाबा यांनी अखंड पन्नास वर्षे लोकांच्या पायाखालील रस्ते स्वच्छ करण्यासाठी घालवली. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनातील द्वेषभाव दूर करण्यासाठी लोकांच्या मध्ये असलेलीअंधश्रद्धा दारिद्र्यता दूर करण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम वापरले. 
स्वातंत्र्य ,स्वालंबन, स्वाध्याय आणि स्वाभिमान ही तर स्वच्छतेच्या पुस्तकातील पाने आहेत. आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यायची असते. निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आयुष्यात आपण आयुष्यभर स्वच्छतेचा विचार करायला हवा. आपला जीव ओतून आयुष्यभर जिवाची पर्वा न करता संत गाडगेबाबांनी जपलेला , आचारलेला स्वच्छतेचा जीवनमंञ आपल्यालाही आज आचारता येईल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनी स्वच्छतेचे स्फुल्लिंग निर्माण झाले तर आपल्या सुखी आणि संपन्न देशाचं भाग्य उजळायला वेळ लागणार नाही असं म्हणायला हरकत नाही. स्वच्छतेच्या ध्येयापर्यंत जायचे असेल तर घर, शाळा हे स्वच्छतेच्या संस्काराचे, सर्वात मोठे केंद्रबिंदू आहेत.
त्यातून परिसरांत गावाच्या स्वच्छतेचा कृतिशील विचार रुजावा. कारण स्वच्छता ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता हा संस्कार आहे. स्वच्छतेचे बीज मुळापासून रुजायला हवे. प्रत्येकात भिनायला हवे. मोठ्यापासून ते लहानापर्यंत साऱ्यांनीच स्वच्छतेचे महत्व आंतरिकदृष्टीने समजावे. कारण, स्वच्छता ही जबरदस्ती नाही. एक जगण्याचे सूत्र आहे. म्हणूनच स्वच्छता ही ईश्वराचे दुसरे नाव आहे. या सजीव सृष्टीचे सौंदर्य खूलवायचे असेल तर स्वच्छतेचे महत्त्व समजावे. अन् अवघ्या समाजाचे पाऊल स्वच्छ क्षितिजाकडे वळावे. आणि ही सृष्टी मंगलमय, हिरवीगार, प्रदूषणमुक्त बनावी हेच आपले ध्येय.' ज्यांच्या अंगणात उमटेल स्वच्छतेचे पाऊल., नाही लागणार त्यांच्या घरी रोगराईची चाहूल' म्हणूनच सांगून गेले संत गाडगेबाबा ,'स्वच्छतेचा घेऊ वसा हाच निर्धार ठेवू जीवनाचा' ' स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे' गाडगेबाबांचा एकच मंत्र जाणूया आपण स्वच्छतेचे तंत्र. 
स्वच्छतेचे तंत्र जाणून आपण  स्वतः आपल्या घरापासून, गावापासून, शहरापासून ते देशापर्यंत स्वच्छतेचा मंत्र ठेवून कार्य आपण करूया व, स्वच्छ निर्मळ, सुंदर भारत करुया.
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता .हदगाव जी. नांदेड.
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
21 नंबर
लेख

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज

महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले.यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज,संत नामदेव महाराज,संत तुकाराम महाराज,संत नाथ महाराज,संत एकनाथ महाराज,संत रामदास स्वामी, संत तुकडोजी महाराज असे अनेक संत होऊन गेले.या संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर महाराज होत.संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला.नामदेव महाराजांनी त्याचा भारत भर विस्तार केला.तर संत नाथ महाराजांनी त्यावर इमारत बांधली व देहूच्या महान संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला.समाजाला नास्तिकते कडुन श्रद्धेच्या मार्गावर,दयेच्या मार्गावर संतांनी आणले.समाजाच्या उध्दारासाठी संतांनी स्वतःचे आयुष्य घालवले.असेच एक संत ज्यांनी संत मालिकेचा विचार गावोगाव नेऊन माणसाच्या मनात भरविला.ते म्हणजे स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज होय.महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव या छोट्याशा गावी १३ फेब्रुवारी १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला.संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते.त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर हे होते.झिंगराजी शेतीचे काम करून त्यावर उपजीविका करत होते.त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती.संत गाडगेबाबांना लहानपणी डेबूजी म्हणत असत. डेबुजी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे सखुबाई यांनी आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी स्वतःच्या भावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. सखुबाई भावाकडे राहण्यासाठी आल्या.डेबुजी मामाच्या घरी राहत असताना जनावरे सांभाळणे,जनावरांना चारा पाणी करणे हे काम करत असत.लहानपणापासून अंधश्रद्धा,भोंदूगिरी,फसवणूक यांचा त्यांना खूप राग येत असत.संत गाडगे महाराजांना आंधळे-पांगळे,लंगडे-लुळे, कुष्ठरोगी यांच्या विषयी नेहमीच कळवळा वाटे.डेबुजीचे वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न झाले होते.संसाराचा वेल फुलला व गाडगे बाबांच्या घरात कन्या रत्न जन्माला आले.अतिशय आनंदात संसार सुरू होता.यातच दुसरे अपंत मुलगा जन्माला आला.पण काही दिवसांनी मुलगा लहान असताना मरन पावला.सुखी संसारात मात्र डेबुजीचे मन रमेना दुसऱ्यांचा दुःखमय संसार सुखी करण्याची इच्छा सदैव त्यांच्या मनात होती.अशातच एक दिवस सकाळी पहाटे तीन वाजता १ फेब्रुवारी १९०५ या दिवशी जगाचा संसार सुखी करण्यासाठी डेबुजी घराबाहेर पडले.पुन्हा मात्र त्यांनी स्वतःच्या संसारात,स्वतःच्या सुखात कधीच डोकावून पाहिले नाही.शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी समाजातील रंजले-गांजले,दिन-दुबळे,अपंग,अनाथ यांच्यासाठी आयुष्य झिजविले.डोक्यावर झिंज्या,त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी,एका कानात कवडी,तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीचा काच,एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा वेश परिधान करून संत गाडगे महाराजांनी अनेक गावात जाऊन समाजाचे प्रबोधन केले.गावात जायचे व हातातील झाडुने गाव स्वच्छ करायचे.रात्री माणसांना एकत्र करून कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोके स्वच्छ करायचे.संत गाडगे महाराजांनी समाजातील लोकांच्या मनात असलेल्या रूढी-परंपरा,अंधश्रद्धा,भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा यांना विरोध केला.या गोष्टी सुधारण्यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला.कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांना आवाहन करत असत चोरी करू नका,सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका,देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असे.मी काही देव नाही.मी कोणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही.असे ते ठामपणे सांगत असे.लोकांनी त्यांना विचारले बाबा तुमचे नाव काय तर ते म्हणायचे तुम्हाला पाहिजे त्या नावाने मला हाक मारा.मला तर नावच माहित नाही.म्हणून त्यांना कित्येक नावे पडले.लोक त्यांना अनेक नावांनी हाक मारत असे.त्यातूनच हातात गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले.तेव्हापासून संत गाडगेबाबा हे नाव नावारूपास आले.महाराष्ट्रातील अनेक संतांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.मात्र संत गाडगेबाबांनी भक्तीच्या नावाखाली होत असलेल्या अंधश्रद्धेला दूर करण्यासाठी प्रयत्न केले.देवावर श्रद्धा ठेवा परंतु ही श्रद्धा अंधश्रद्धा होता कामा नये हे संत गाडगेबाबा नेहमी सांगायचे.गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन करुन लोकांना ते सांगत असे देव दगडात नाही,देव देवळात नाही देव तुमच्या आमच्या हृदयात आहे.माणसातील देव ओळखायला शिका.प्राणीमात्रांवर दया करा. निसर्गावर प्रेम करा.असे ते कीर्तनातून लोकांना सांगत होते.गाडगेबाबांच्या हातातील झाडूंनी कमाल केली.स्वच्छतेचा मंत्र त्याचबरोबर लोकांच्या वैचारिकतेला स्वच्छ केले.दिवसभर गाव स्वच्छ करायचे तर रात्री स्वतःच्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोकी लोकांचे विचार स्वच्छ करण्याचे काम संत गाडगेबाबांनी त्या काळामध्ये केले.समाज सुधारण्यासाठी समाजातील तळागाळात त्यांनी वैचारिकतेचा प्रकाश टाकला.भुकेल्यांना जेवण,तहानलेल्यांना पाणी,बेघरांना घर, मुला-मुलींना शिक्षणाची सोय,आजारी रोगी माणसांना औषध,मुक्या प्राणी,पक्ष्यांना अभय यातच त्यांनी खरा धर्म आहे असे मानले.यालाच ईश्वराची सेवा समजून समाजाची सेवा करत राहिले.समाजाची सेवा करत करत 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव जिल्हा अमरावती येथे अखेरचा श्वास घेतला.संत गाडगे बाबांचे गाडगेनगर अमरावती येथे स्मारक आहे.ज्यांनी या समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला.त्या संत गाडगेबाबांच्या नावाने आज महाराष्ट्र शासनातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवले जाते.व महाराष्ट्रातील स्वच्छता अभियाना अंतर्गत अनेक गावांची निवड करून राज्य शासनातर्फे पुरस्कार दिला जातो.या योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक गावे स्वच्छ झाली.संत गाडगेबाबांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या समाजात विचारांना स्वच्छ केले.हे मात्र लाख मोलाचे होते आणि म्हणून संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबांच्या विचारांना व कार्याला स्मरण करून संत गाडगे बाबाचा स्वच्छतेचा मंत्र आपण सर्वजण हाती घेऊया व महाराष्ट्रातील प्रत्येक गावा गावाला स्वच्छ करूया.स्वच्छ गाव स्वच्छ महाराष्ट्र हा संकल्प मनात पक्का करुया.

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु.पो.किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा
जि.बुलढाणा
9823425852
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
*स्वच्छतेतून समृद्धी कडे* 

    (09) *सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
 *स्वच्छता* हा शब्द वाचताच  मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न रहाते. या स्वच्छतारुपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्यामचे मोलाचे काम शाळा करते. समृध्द भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे आहे. “Cleanliness is next to Godliness” या महात्मा गांधीच्या घोषवाक्यानुसार मा.पंतप्रधान श्री. मोदीजींनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन 
*स्वच्छ भारत अभियानाची*’ घोषणा केली.
      यावर्षी 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छ भारत मोहीम पंधरवडा घोषीत करण्यात आला. मोदींनी ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी’ चे आवाहन केले होते. यानुसार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला केंद्र-खमारी  तालूका जिल्हा गोंदिया  या आमच्या शाळेने या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी फुलांच्या रांगोळीतून स्वच्छ भारत अभियानाचा लोगो रेखाटला. शाळेच्या फलकावर समाजजागृतीसाठी फलक लेखन करण्यात आले. विद्यार्थ्यांची चित्रामध्ये रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. प्रोजेक्टरवर स्वच्छतेविषयी माहितीपट दाखविण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली व या सर्व उपक्रमांचा व्हिडीओ तयार करुन Youtube व इतर प्रसार माध्यमांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांपर्यत पोहोचवून ‘स्वच्छ भारत अभियान’ याबाबत जाणीवजागृती करण्यात आली. *स्वच्छता*"माणसाचे आत्मदर्शन घडविते.त्याबरोबर परिपाठाच्या वेळी वेळोवेळी नखे, कपडे, दात, केस इ. ची नियमितपणे पाहणी केली जाते व मार्गदर्शन केले जाते. तसेच पालक सभांमधूनही पाल्याच्या वैयक्तीक आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार पालक आपल्या पाल्याच्या स्वच्छतेची काळजी घेतात. त्याचबरोबर या सर्वांमुळे विद्यार्थ्यांनीही स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगल्या आहेत.
तसेच शालेय परिसर स्वच्छतेसाठी परिपाठाच्या अगोदर नियमितपणे शालेय परिसराची स्वच्छता केली जाते. शालेय वर्ग, शौचालय, स्वयंपाकगृह, पाण्याची टाकी इ. ची वेळोवळी स्वच्छता ठेवली जाते तिसरीच्या वर्गाच्या मराठीच्या प्रवास कच-याचा पाठाच्या आशयानुसार सर्व विद्यार्थ्यांना ओला व सुका कचरा म्हणजे काय? त्याच्या व्यवस्थापनाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. शालेय परिसरातील ओल्या व सुक्या कच-याची योग्य पध्दतीने हाताळणी केली जाते. या कच-यापासून तयार होणा-या खताचा वापर शालेय परसबागेसाठी केला जातो.
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य लसीकरण करण्यात येते. जंतनाशक गोळयांचे विद्यार्थ्यांना योग्यवेळी वाटप करण्यात येते. वृक्षरोपण, सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून शाळेचे सौंदर्य वाढवण्याचा व विद्यार्थ्यांचा स्वच्छतेतून सौंदर्याकडे याप्रकारचा दृष्टीकोन वाढवला  जातो.
 *स्वच्छ शाळा करा हातांनी ,
सुंदर गाणी गाऊ मुखांनी*.
        तसेच शाळा हा समाजाशी नाते सांगणारा घटक आहे. त्यानुसार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शाळा व शिक्षकातर्फे गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रथमत: गावातील शौचालय नसलेल्या कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांच्या वारंवार कुटुंबभेटी घेण्यात आल्या. गुड मॉर्निंग पथक, प्रभात भेटी, मार्गदर्शन यांमधून त्यांचे उद्बोधन करण्यात आले. त्यानुसार राहिलेल्या सर्व कुटुंबानी शौचालये बांधली व त्याच्या नियमितपणे वापर करुन लागली. या सर्व प्रयत्नांमुळे गाव हागणदारीमुक्त झाले.
अशा विविध उपक्रमांमुळे आम्ही आमची शाळा ‘स्वच्छ शाळा-सुंदर शाळा’ निर्माण केली. तसेच विद्यार्थीरुपी मातीच्या गोळयाला स्वच्छतेचे बाळकडू पाजून त्यांना उज्वल भारताच्या भविष्याचे भावी सुजाण नागरीक निर्माण करण्याकडे आमच्या शाळेची वाटचाल अशीच चालू रहाणार आहे.  महात्मा गांधीजीच्या, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींजीच्या स्वप्नातील स्वच्छ भारत नक्कीच साकार होणार आहे.
 *स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती.*

तसेच वर्षभर विद्यार्थ्यांमध्ये शौचालयाचा वापर, हातधुण्याच्या सवयी आणि अन्य स्वच्छता सवयी अंगीकारुन स्वच्छताविषयक सवयीमध्ये वर्तनबदल घडुन आणण्यासाठी विविध दैनिक उपक्रम राबविले जातात. अस्वच्छ हातांमुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते म्हणून स्वच्छ हातासाठी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्व व हात धुण्याच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या. त्यानुसार मुले वेळोवेळी जेवणाअगोदर, शौचालयावरुन आल्यानंतर, खेळानंतर साबणाने किंवा हँडवॉशने आपले हात स्वच्छ करतात. 
जेथे स्वच्छता असते तेथे ईश्वराचा वास असतो असे म्हणतात. म्हणजेच स्वच्छता ही भक्तीचा किंवा देवत्वाचा मार्ग दाखविते. ज्याप्रमाणे ईश्वराच्या भक्तीने मन स्वच्छ होते त्याचप्रमाणे पुरेशा स्वच्छतेच्या माध्यमातून आपण स्वतःला शारीरिक आणि  मानसिकदृष्ट्या स्वच्छ ठेवू शकतो.
स्वच्छता आपल्याला खरोखरच एक चांगली, सभ्य आणि निरोगी व्यक्ती बनवते. स्वच्छता आपल्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक        कल्याणाची भावना देखील जागृत करते आणि एक चांगले व्यक्तिमत्त्व घडविण्यास मदत करते. स्वच्छतेमुळे आपले पर्यावरण नीटनेटके ठेवण्यास मदत होते.  
        *पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू*.
        स्वच्छतेविषयक सवयी एखाद्या व्यक्तीचे चांगले चरित्र दर्शवतात. चांगले चरित्र असलेले लोक त्यांच्या जीवनात नैतिक आणि धार्मिक असतात, म्हणूनच त्यांच्या यशामध्ये स्वच्छता देखील महत्वाची भूमिका बजावते. म्हणूनच स्वच्छता हीच ईश्वराची सेवा आहे किंबहुना अधिक महत्त्वाची आहे.
लेखिका 
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
   *(9420516306 )*
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
*स्वच्छता*
       सर्वस्व स्वच्छता....
अहो,ऑफीस मधून आला आहात डेटाॅलने हातपाय धुवा स्नान करा ,दिवस भर बाहेर असता अंग कसं घामेजून जातं ना ! शरीरावरील रंध्र देखील मोकळी होतात मग रक्ताभिसरण दे खील चांगलं होतं झोप पण छान येते ...एक ना अनेक सूचना दिल्यावर कुठे महाशय तयार ...रोजचा अध्याय घरोघर..नवरे मात्र वेड्यात काढतात .काय कटकट आहे म्हणून ..बायका मात्र स्वच्छतेचा पिच्छा सोडत नाहीत.घरातली स्वच्छता हे तर व्रत असते त्यांचे त्याचबरोबर ..परिसर स्वच्छ ता देखील त्याच्याशिवाय होत नाही.मला
तर असे वाटते प्रत्येक गावात जवळ जवळ 50%स्वच्छता महिला करतात 
दररोज घरासमोरील परिसर झाडणे सडा टाकणे रांगोळी काढणे हे काम प्रत्येक घरातील महिला करते होतं की नाही आपलं गाव स्वच्छ..गावात ग्रामपंचायत तालुक्याला नगरपरिषद असते सफाई साठी त्याचे काम आहे स्वच्छता करणे ते किती टक्के करतात ते आपणा सर्वांना माहित आहे.
        ग्राम स्वच्छता अभियान राबवण्याची
गरज आपल्याला का पडते?भारतातील लोका ना स्वंयस्फुर्तीने स्वतःहून काही गोष्टी करण्याची थोडी कमी सवय आहे.
जेव्हा कायदा ,अभियान,बक्षीस योजना
येतात तेव्हा मात्र आपण झटकून बक्षीस मिळवण्याच्या मागे लागतो मग आपल्याला स्वच्छता करायची असते का ?बक्षीस मिळवायचे असते याचा आपण विचार करू शकतो..सांगण्याचा उद्देश असा की स्वच्छता अभिमानाची जागृती संपूर्ण देशा मध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यानी केली व भारत भर प्रत्येक माणसाला स्वच्छेतेचे महत्व वेगवेगळ्या प्रकारे समाजावून  सांगण्याचा त्याची प्रयत्न केला.लोकानी देखील प्रतिसाद दिला.खरोखर स्वच्छता अभियान 
सुरळीत चालु झाले.देशातला प्रत्येक नागरिक स्वच्छतेच्या नादी लागला .
शाळा ,कार्यालय,चांगल्या प्रकारे स्वच्छ होऊ लागले.आपापल्या ग्रुप वर हातात झाडु घेऊन फोटो टाकु टाकु लोक आनंदी झाले किती छान वाटतं होत.शाळेतून रॅली काढून लोकांची मनं जागृत करण्याची कामं शिक्षकांनी केली.अस्वस्थता आपल्या घरात रोगराई आणते .डास होतात गाडीचे साम्राज्य ठेवु नका प्लास्टीकचा वापर टाळा ज्यामुळे पर्यावरण बिघडत आहे.जमिनी नापिक
होत आहेत .देवाचे निर्माल्य विहिरीत किवा नदीत टाकु नका ज्यामुळे पाणी अशुद्ध होईल असे कृत्य करू नका.
अशुद्धता टाळा..शुद्धतेचा विचार करा म्हणजे या पर्यावरण स्वच्छ राहिल व आपल्याला बहुमोल असा ऑक्सिजन श्वसनासाठी उपलब्ध होईल.अशाप्रकारचे उदबोधन वर्ग प्रबोधन वर्ग ..रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे पथनाट्य सदर करण्यात आली.शिक्षकांनी वेगवेगळ्या कलाकारांनी गाण्यातून देखील जागृती केली.प्लास्टिकवर बंदी आली नियम झाला बरेच सुशिक्षीत लोक काटेकोरपण पंतप्रधानांच्या म्हणण्याचा आदर ठेवु लागले.स्वच्छतेची महती हळुहळु लोकांच्या पचनी पडली.
          आज तर कोरोनाचा शिरकाव झाला व अशिक्षीत माणुस देखील खडबडून जागा झाला आहे.शिक्षणाच्या
अभावामुळे थोड्या प्रमाणात समजण्यास थोडे अवघड जाते परंतु एकदा का एका विषयावर आम्ही भारतीय ठाम झालो की मग मात्र आम्ही निश्चयी करतो 
      तसेच आज आम्ही स्वच्छ तेचे महत्व 
खूप मोठ्या प्रमाणात पचनी पाडून घेतले आहे .स्वच्छ तेचे धडे खूप चांगल्या प्रकारे
आम्ही मिरवत आहोत.जगण्यासाठी जशी अन्न,वस्त्र ,निवारा,शिक्षण याची गरज आहे तशी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज आहे .आपण ते जाणून घेऊ या व स्वच्छ तेने आपले जीवन उजळून टाकु या
*****************************
स्नेहलता कुलथे बीड 
मोबा.7588055882
Kulthe.lata@gmail.com
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
           स्वच्छता एक संस्कार



'जिथे स्वच्छता, तिथे वास ईश्वराचा' 

'जिथे फिरे हात लक्ष्मीचा(झाडूचा), तिथे वास लक्ष्मीदेवीचा'

           हे मी अगदी लहानपणापासून ऐकत आली आहे. आईची हीच शिकवण असायची. म्हणायची, "घर कसं लख्ख स्वच्छ पाहिजे. सकाळी आणि तिन्ही सांजा च्या आत, दोन्ही वेळा घरातला केर काढला गेला पाहिजे. स्वच्छ घरात लक्ष्मी नांदते".

           जशी स्वच्छता घर, समाज, गाव आणि देश येथे राखली पाहिजे. तशीच स्वच्छता स्वतःच्या शरीराची, हृदयाची आणि मनाची पण राखली पाहिजे.

         वैयक्तिक स्वच्छता दोन प्रकारची असते. एक शारीरिक स्वच्छता आणि दुसरी आंतरिक स्वच्छता.                 शारीरीक स्वच्छता आपल्याला बाहेरून स्वच्छ ठेवते. रोज स्वच्छ साबण लावून अंघोळ करणे. बाहेरून आल्यावर हात-पाय धुणे. जेवायच्या खाण्याच्या अगोदर हात स्वच्छ धुणे. आपले केस, कान, नखे, नाक वगैरे सर्व अवयव स्वच्छ ठेवणे. खोकताना, शिंकताना रुमाल समोर धरणे. स्वच्छ धुतलेले कपडे घालणे.  नुसते परफ्युम , डीओडरंट मारून स्वच्छ होता येत नाही. अशाप्रकारे आपण स्वतःला स्वच्छ ठेवू शकतो. स्वच्छ राहिल्याने आपला आत्मविश्वास वाढतो. स्वच्छता हा संस्कार आहे. तू रुजवला गेला पाहिजे.

           आंतरिक स्वच्छतेमुळे आपल्याला शांतता मिळते व काळज्यां पासून दूर राहता येते. डोक्यात असलेले वाईट आणि नकारात्मक विचार काढून टाकल्यास आंतरिक स्वच्छता राखली जाते. आपल्या बाजूला वातावरण स्वच्छ म्हणजे प्रसन्न असल्यास स्वास्थ्य लाभते.

          पूर्वी रोगराई गावात आली की देवीचा प्रकोप झाला असे म्हटले जाई. पण जसजसे शोध लागत गेले तेव्हा लक्षात आले की, घराच्या आसपास साचलेल्या घाणीमुळे बॅक्टेरिया, विषाणू, किटाणु, फंगस, यांची पैदास होते. त्यामुळे रोग होतात. पण ठेवला, 'स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य नांदेल निरंतर'.

             आत्ता कोविद नाईंटीनची जगभरात साथ आली आहे. ह्याच्याशी शी दोन हात करायचे असतील तर स्वच्छताच महत्त्वाची. हात साबणाने कमीत कमी वीस सेकंद तरी धुवावे. वरचेवर सॅनीटायझर वापरावे. बाहेरच्या कुठल्याही वस्तू धुतल्याशिवाय घेऊ नयेत किंवा सॅनीटाइज कराव्यात. कायम धुतलेले कपडे घालावेत. बाहेरचे कपडे लगेच धुवावे. मास्क वापरून झाल्यावर तो लगेच धुवावा. अशी स्वच्छता राखली तरच आपण ह्यातून बाहेर पडू शकू.

           सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासूनच झाली पाहिजे. घर आतून स्वच्छ ठेवायला हवे. तसेच घराच्या आसपासचा परिसर म्हणजे अंगण स्वच्छ ठेवले पाहिजे. कचरा घरासमोर न टाकता योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी. ओला कचरा शक्यतो एका खड्ड्यात आणून टाकावा. त्यात थोडे गांडूळाचे कल्चर टाकले तर खत बनू शकते. घरातला संडास, मोरी स्वच्छ ठेवलीच पाहिजे. पाण्याची टाकी, ड्रेनेज सिस्टीम च्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. अशा स्वच्छ घरात शिरता शिरताच मन प्रसन्न होते. घरात ल्या सदस्यांनी काम वाटून घेतल्यास स्वच्छता सहज राखली जाते. स्वच्छता अंगी बाणवली गेली पाहिजे.

           घरा नंतर रस्ते, ऑफिस ची जागा, पर्यटन स्थळे, देवळे, शाळा-कॉलेजेस सगळ्यांची स्वच्छता राखली गेली पाहिजे. आपल्या घरा आसपास जागा असेल तर झाडे लावावी तुळस लावावी म्हणजे हवा शुद्ध राखली जाईल. कारण वायु प्रदूषण, जल प्रदूषण कमी झाले पाहिजे. पिण्याचे पाणी स्वच्छ हवे, नाहीतर रोगराई वाढेल.

            आपल्या देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी पर्यटन व्यवसाय वाढवला पाहिजे. पण त्यासाठी स्वच्छता महत्त्वाची. जगात अस्वच्छतेमुळे आपल्या देशाचे नाव खराब होते. त्यामुळे सर्व ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

         राष्ट्रसंत गाडगेबाबांनी निकोप समाज रचनेसाठी प्रथम स्वच्छतेची मोहीम काढली. त्यांनी दिवसा गावातील घाण काढली आणि रात्री डोक्यातील घाण काढली- प्रवचने देऊन. ते स्वतः झाडू घेऊन घाण उपसू लागले. ते पाहून इतर गावकरीही त्यात सामील होत असत. असे त्यांचे स्वच्छतेचे अभियान पूर्णत्वास गेले.

            स्वच्छता म्हटले की आणखी आठवण होते ती महात्मा गांधींची. ते स्वतःच्या आचरणातून 'स्वच्छता ही सेवा आहे' हे दाखवून द्यायचे. त्यांचे हे ब्रीदवाक्य होते. ते पहाटे उठून स्वतः आश्रम झाडायचे. त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व देशवासीयांना पटवून दिले.स्वच्छ भारत हे त्यांचे स्वप्न होते.

         महात्मा गांधींचे हे स्वच्छतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा वसा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. महात्मा गांधींच्या 145 व्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 2014 च्या मुहूर्तावर मोदींनी 'स्वच्छ भारत अभियान" सुरू केले.

          या अभियानाद्वारे बऱ्याच गोष्टी केल्या गेल्या. मोकळ्यावर शौच करण्यास बंदी केली. त्यासाठी त्यांनी अकरा करोड 11 लाख व्यक्तिगत शौचालये व सामूहिक शौचालये बांधली. स्वच्छतेचे महत्त्व पटवून जनतेची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला. गावे स्वच्छ ठेवली जावे ठेवली. गावातून पाईपलाईन टाकल्या. त्यामुळे लोकांना घरात पाणी मिळू लागले. लोकांच्या वस्त्या फुटपाथ, रस्ते,  स्वच्छ ठेवले गेले.  स्वच्छते प्रति जागरूकता निर्माण केली गेली. 

           साधारणपणे पश्चिमेकडच्या कुठल्याही देशात गेले, तर प्रथम नजरेत भरते ती तेथील स्वच्छता. स्वच्छतेमुळे सुंदरतेला बढावा मिळतो. त्यामुळे उत्स्फूर्तपणे म्हटले जाते, "काय सुंदर देश आहे"! असेच आपल्या भारता बाबतीत ही म्हटले जावे. अर्थात हे एकट्या दुकट्या चे काम नव्हे. हे प्रत्येक भारतीयाचे काम आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, "परिसर स्वच्छ ठेवू, सुंदरतेचे गीत गाऊ".


शुभदा दीक्षित (11)
पुणे
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
*स्वच्छता*

  *स्वच्छता म्हणजे काय*?
*स्वच्छता अभियान सुरू व्हायच्या आधी भारत म्हणजे अतिशय गलिच्छ देश अशी कुख्याती होती*
        भारतातील ग्रामीण आरोग्या करीता एक समिती स्थापन करण्यात आली होती त्याच्या सिफारिशीनुसार आता वैयक्तिक स्वच्छता आणि सवयींवर जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय? 
 वैयक्तिक स्वच्छता, घरातील स्वच्छता,अंगणातील स्वच्छता, परिसरातील स्वच्छता.स्वचूछतेचे वेगळे वेगळे पदर आहेत.  आपण ते एक एक करून  उलगडून बघु,आणि त्याचे परिणाम ही समजून घेउ.
 सर्वात पहिले  वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यदाई सवयीचे काटे कोर पणे पालन म्हणजे  दात घासण्यापासून,अंघोळ, अंघोळीसाठी वापरलेले पाणी, टाॅवेल आणि कपडे. अंघोळीला पाणी स्वच्छ  नसेल तर  शरीर स्वच्छ तर नाहीच  होणार  उलट काही  नवीन  कीटाणु अंगाला चिकटतात. रोज घुतलेले स्वच्छ कपडे घालावे.
   आता घरातील स्वच्छता. केर फरशी किंवा सारवणानी घर स्वच्छ ठेवणे आंगण आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे अतिशय आवश्यक आहे नाहीतर ती सर्व  घाण आपल्या पायाने आपल्या घरात येते.
 पाण्याची साठवण स्वच्छ  माठात करावी माठ किमान दर दोन दिवसांनी स्वच्छ करावा , पाण्याचा माठ, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावे . आता  कोरोनाच्या  भीती मुळे ज्या प्रमाणे हाथ स्वच्छ ठेवतो ती सवय कायमस्वरूपी बिंबवावी.
         असा अंदाज आहे की दरवर्षी सुमारे .7 37..दशलक्ष भारतीय असुरक्षित  पाणी मुळे आजाराग्रस्त होतात. दशलक्ष मुले एकट्या अतिसारामुळे मरण पावतात आणि दरवर्षी जलयुक्त आजारामुळे 73 दशलक्ष दिवस कामकाजाचे नुकसान होते. 
  *जरा विचार करा की ह्या सर्व आकडे वारीनी आपल्या खाजगी आणि देशाच्या समृद्धी वर किती परीणाम झाला  असेल*
गेल्या दशकभरात भारतातील पिण्याच्या पाण्याच्या सुधारित स्त्रोतांमध्ये भरपुर वाढ झाली आहे, पाण्यातील सूक्ष्मजीव प्रदूषण देखील रोगाच्या ओझेसाठी जबाबदार आहे. विशेषत: खराब  वैयक्तिक  अस्वच्छता ,स्वच्छतेच्या चुकीच्या पद्धतींमुळे, आणि वैयक्तिक हाॅइजिन  मुळे आरोग्यावर असुरक्षित पाण्याचा विपरित परिणाम अजूनही  आहे. 2016 ते 2017 मधे जलजन्य आजारपणची खूप कमी झाली आहे डायरियामुळे years,५११४ मृत्यूमुखी पडले, भारतामध्ये या कालावधीत झाले. इतर मारेकरी विषाणूजन्य हिपॅटायटीस (२,१33), टाइफाइड (२,०0१) आणि कॉलरा (२०) होते.
     आता भर द्यायची गरज आहे 
  *स्वानुशासनाने स्वच्छता*
     *स्वच्छते कडून आरोग्य*
        *आरोग्या कडून समृद्धी*

डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
२२) स्वच्छता 

 एक जुनी म्हण आहे , हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे ! 

     पुर्वीच्या काळी  वाढल्याची घरे व मातीच्या भिंती असायच्या !    जमीन ही मातीची असायची !           दर आठ दिवसांनी जमीन शेणाने सारविली जायची . सण वार आले की  भिंतीही पांढर्या मातीने सारविल्या जात . 
 सुगीच्या दिवसात आम्ही शेतात राहायला जायचो . पत्र्याचे घर त्याला पडली व पुढे पटांगण असायचे . रोज सकाळी  पुढचे पटांगण स्वच्छ झाडून  त्यावर शेणाचा सडा टाकून रांगोळी काढली जायची. पडवी ही शेणाने स्वच्छ सारविली जायची. त्यावर सकाळची कोवळी सुर्यकिरणे पडायची . जणू काही सर्वत्र सोन्याचा सडाच पडला आहे असे वाटावे . खरेच स्वच्छते मुळे मनाला प्रसन्नता वाटते .   आपल्या जीवनात स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व आहे . मग ती स्वच्छता , वैयक्तिक असो , सार्वजनिक असो वा परिसर स्वच्छता असो ! 
     सांप्रत काळात तर स्वच्छतेला पर्यायच नाही . कोरोना  विषाणू पासून बचाव करायचा असेल तर , वैयक्तिक स्वच्छते बरोबर , परिसर स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता  ही कटाक्षाने पाळली पाहिजे .

   आपण आपल्या घरातील केर कचरा  घराबाहेर रस्त्यावर टाकतो , तो सर्वत्र पसरला जातो ,     नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी येतात आपला परिसर झाडून स्वच्छ करतात म्हणून  आपण केर कचरा रस्त्यावर टाकायचा का ?      कचरा कुंडीत तो गोळा करावा . 
  तसेच सार्वजनिक ठिकाणी , बागेत , सिनेमा थिएटरमध्ये  कागदाचे बोळे , बिसलेरी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या जागोजागी फेकलेल्या दिसतात .  , सिगारेट ची मोकळी पाकीटे रस्त्यावर फेकली जातात .   हे दृष्य पाहून असे वाटते की आज ही आपण किती बेशिस्त वागतो आहोत . अजून ही आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व समजले नाही .
                      २२)   अरविंद कुलकर्णी.
                               पिंपरखेड कर 
                            9422613664
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
*स्वच्छतेकडून समृद्धीकडे*

✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)

"निरोगी,प्रसन्नतेसाठी
स्वच्छता सर्वांनी पाळावी
वैयक्तिक नि सार्वजनिक
जीवनात सुद्धा राखावी"

       'स्वच्छता हीच ईश्वर सेवा' आहे.यासाठी वैयक्तिक पातळीवर स्वच्छता पाळतो त्याप्रमाणे देश स्वच्छ राखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने कार्य करायला हवे.आपण अध्ययन-अध्यापन करीत असतांना शिकत होतो की, "sound mind in sound body" चांगल्या सुदृढ शरीरात स्वच्छ मन वास करीत असतो.प्रथमतः आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे.कुटुंबातील प्रत्येक सदस्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले पाहिजे.भारत देश खेड्यामध्ये वसलेला आहे.प्रत्येक खेडा स्वच्छ झाला तर भारत देश 'सुजलाम सुफलाम' व्हायला वेळ लागणार नाही.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 'ग्रामगीता' पुस्तकात स्वच्छतेविषयीचे महत्व अधोरेखित करून गावातील तरुणांना ग्रामीण भागातील सुधारणा म्हणजे देशाचा विकास याबद्दल माहिती दिली आहे त्याचसोबत त्यांच्या भजन,कीर्तनाच्या ओघवती वाणीतून स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन समृद्धीकडे जाण्याचा यथोचित मार्ग विशद केला आहे.

         महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक संतांनी अभंग,कीर्तनातून स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे.संत गाडगेबाबा यांना 'चालती बोलती पाठशाळा' म्हणून ओळखले जातात.ज्या गावात जायचे त्या गावात कोणासोबत ही वार्तालाप न करता स्वयंप्रेरणेने गाव स्वच्छ करायचे आणि रात्री गावातील नागरिकांचे जेवण उरकल्यानंतर कीर्तन ठेवत असत.गाडगेबाबांचे कीर्तन म्हणजे प्रश्नोत्तरे पद्धती असायची.दिवसा झाडूने गावातील घाण साफ करीत असत आणि रात्री गावातील लोकांच्या मनातील घाण बाहेर काढण्याचे काम गाडगेबाबा करायचे.अगदी सोपे सोपे प्रश्न विचारून त्यांच्याकडूनच उत्तरे ही मिळवीत असत.अस्वच्छतेमुळे डास, कीटक निर्माण होऊन तेच डास चावले की इतर आजार होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेची कास धरली पाहिजे.संत गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आली होती.केंद्र वा राज्यशासनाने स्वच्छता राखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे तेव्हाच आपला देश,राज्य,जिल्हा तालुका स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेऊ शकतो.स्वच्छता पाळणाऱ्या गाव,तालुका,जिल्हा यांना राज्य व देश पातळीवर पुरस्कार देऊन गौरविले जाते त्याचसोबत रोख रक्कम देखील दिल्या जाते.

          भारत हा जगातील लोकसंख्याने दुसऱ्या क्रमांकाचा देश असल्याने स्वच्छता राखण्यासाठी केंद्र शासनाने 'स्वच्छ भारत अभियान' राबविण्यात येत आहे.सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करून अनेक स्मार्ट शहरे निर्माण केली आहे.महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारत देश हागणदारीमुक्त व्हायला हवा यासाठी स्थानिक पातळीवर युद्धस्तरावर कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येऊ लागले.'स्वच्छ भारत अभियान' या केंद्र शासनाच्या योजनेची अमलबजावणी प्रत्येक राज्यात निर्माण केली यामध्ये मिळणारी रोख रक्कमेची राशी प्रत्येक ग्रामपंचायत,नगर परिषद,महानगर परिषद,जिल्हा परिषद मार्फत जनजागृती करण्यात आली.जिल्हा परिषद अंतर्गत पथनाट्ये याद्वारे अस्वच्छतेमुळे होणारे नुकसान यांची प्रात्यक्षिक प्रत्येक खेड्या-पाड्यात करविली गेली त्याचसोबत सेलिब्रिटी मधील अभिनेते-अभिनेत्री यांना स्वच्छतेचे दूत बनवून जागृती करण्यात आली त्यामुळे प्रत्येक कुटुंबात शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात आले आणि 'दरवाजा बंद' यासारखे अभियान राबविल्यामुळे प्रत्येक खेडे स्वच्छतेकडे वळले आहे.स्वच्छता राखल्यामुळे आजारात होणारी वाढ रोखता आली. आज संपूर्ण भारत देश हागणदारी मुक्त होणारा पहिला देश ठरला आहे.स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग आहे.
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
स्वच्छता आरोग्याचा मूलमंत्र 

लहानपणी मामा मावशीच्या गावाला जायला कोणाला नाही आवडत? त्यात त्या मावशीच्या गावाला आंबे असतील ,चिंचा असतील आणि मस्त नदीत डुंबायला मिळत असेल ;तर तुम्ही म्हणाल अरे वा मलाही आवडेल अशा मावशीच्या गावाला जायला. हो लहानपणी आम्ही मावशीच्या गावाला जायचो वर सांगितलेल्या गोष्टींची मजा लुटायला आमचे काका मावशी आम्हाला म्हणायचे , सुट्टीला चला. आमच्याकडे चला पण; एकच गोष्ट मावशीच्या गावची आम्हाला आवडत नव्हती 'तिच्या घरी मुक्काम करावासा वाटत नसे. आम्ही आईला म्हणायचो आई काही केलं तरी मुक्काम मामाकडे करायचा कारण मावशीकडे शौचालय नव्हते 'उघड्यावर शौचाला जावे लागायचे मावशीचा एक जुना पडका वाडा होता त्या वाड्यामध्ये जायचे सगळेच शौचासाठी .आम्हाला मात्र ते आवडत नसायचे .प्यायचे पाणी देखील अस्वच्छ असायचे त्यावर तुम्ही तुरटी फिरवा ,काही करा परंतु; त्याला मात्र वास येत असे गावाजवळून नदी वहायची या नदीवर धुणे धुतले जायचे, जनावरांना आंघोळ घातली जायची लहानथोर त्याच पाण्यात  पोहण्याची मजा लुटत असत. पहायला मजा वाटायची परंतु पाण्यामुळे आणि शौचालया च्या दुरवस्थेमुळे आम्हाला मावशीकडे रहावेसे वाटत नव्हते.
या गोष्टीला साधारण पंचवीस एक वर्ष झाले असतील परंतु; आज गावाची स्थिती बदलली आहे प्रत्येक घरात शौचालय आहे. नदी देखील स्वच्छ आहे. सर्वजण धुने आप-आपल्या घरामध्ये धुतात. नळाला भरपूर पाणी येते आणि तेही स्वच्छ. आज गावाची अवस्था बदलली आहे आज मात्र आम्हाला मावशीच्या गावाला राहावेसे वाटते पण आता मोठे झालो आता  ती लहानपणीची मजा नाही. मी वर्णन केलेले हे चित्र फक्त माझ्या मावशीच्या गावाचे नाही तर पंचवीस वर्षांपूर्वी चे संपूर्ण भारताचे चित्र असेच होते मग कसे बदलले हे चित्र? कशी झाली सुधारणा? तर स्वच्छता अभियानाने या अभियानाची सुरुवात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये झाली संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या नावाने महाराष्ट्रात अभियान सुरू झाले स्वच्छ गावासाठी  स्वच्छ सुंदर गाव पुरस्कार देण्यात येईल असे जाहीर झाले. त्यामुळे गावागावांमध्ये स्वच्छ राहण्याची चुरस निर्माण झाली .उघड्यावर शौचालयास बसल्याने काय काय दुष्परिणाम होतात ते गावागावांमध्ये शाळा आरोग्य केंद्र याद्वारे समजावून सांगण्यात आले. दूरदर्शन, वर्तमानपत्र या माध्यमातूनही जाहिरात करण्यात आली  . शाळा, महाविद्यालय त्याचप्रमाणे काही स्वयंसेवी संस्थांनी देखील नृत्य, नाट्य, पथनाट्य याद्वारे समाजामध्ये स्वच्छते विषयी जागरूकता निर्माण केली. सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी धुने धुणे, भांडी घासणे , जनावरांना पाणी पाजणे ह्या गोष्टी करू नये म्हणून लोकांचे प्रबोधन करण्यात आले. याबाबत लोकांचे मतपरिवर्तन झाले आणि लोकांना स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणता आल्या. काही गावांमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी  गटारी नाहीत परंतु; तेथे मात्र शोष खड्ड्याच्या रूपांमध्ये ही सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात आली. काही ठिकाणी सांडपाण्याचा पुनर्वापर करून परसबाग देखील केली आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावे निर्मल ग्राम म्हणून घोषित झालेली आहेत. स्वच्छतेमुळे आजार दूर होतात' मन प्रसन्न राहते, आजारपणा वरील पैशाचा खर्च कमी होतो आणि हाच पैसा आपल्या समृद्धीसाठी वापरता येतो हे लोकांना आता कळू लागले आहे.
महाराष्ट्राने तर संत गाडगेबाबा यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वच्छता अभियान राबवले आता संपूर्ण देशाची जबाबदारी होती म्हणूनच 2014 मध्ये पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान राबवले. यामागे महात्मा गांधीजींची प्रेरणा देखील आहे.
घराची ,शाळेची, सार्वजनिक ठिकाणांची, कारखान्यांची सर्व ठिकाणांची स्वच्छता करायची आणि जमा झालेला कचरा टाकायचा, कुठे बरं कचरा टाकायचा हा? टाकणार तिथे मोठा कचरा निर्माण होणार त्याच्या आजूबाजूला दुर्गंधी सुटणार तिथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार मग याला उपाय काय ?तर ओला कचरा, सुका कचरा असे जर विभजन केले तर ओल्या कचऱ्यामध्ये भाजीपाला ,फळे यांच्या साली खाद्य पदार्थही असतात यापासून पुन्हा माती बनू शकते. ओल्या कचर्‍याचा उपयोग गांडूळ खतामध्ये गांडूळांना अन्न म्हणून देखील होतो व त्यापासून खत निर्मिती देखील होते.  ही माती झाडांना खत म्हणून वापरू शकतात .त्यामुळे ओल्या कचर्‍याचा असा पुनर्वापर करता येऊ शकतो. सुक्या कचऱ्यामध्ये कागद' प्लास्टिक 'लोखंड, धातू अशा वस्तू येतात कागदाचा पुनर्वापर करून लगद्या पासून वेगवेगळ्या सुंदर गोष्टी बनवू शकतात परंतु ;प्लास्टिकचे करायचे काय ?काही प्लास्टिक पुनर्वापर करता येण्याजोगे नसते जाळले, तर आणखी प्रदूषण होते मग प्लास्टिक वर उपाय काय तर ज्या प्लास्टिकचा पुनर्वापर करता येत नाही अशा प्लास्टिकच्या वाप रावर बंदी घातली गेली त्यामुळे देखील प्लास्टिकचा वापर आणि कचरा कमी झाला लोखंड किंवा धातू त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो .
घर-अंगण, सार्वजनिक ठिकाणी, कारखाने ही तर बाह्य सफाई झाली .स्वतःच्या शरीराची बाह्य सफाई देखील साबणाने होते परंतु आता मनाच्या स्वच्छतेचे काय? साने गुरुजींच्या श्यामच्या आईच्या पुस्तकात श्यामची आई श्यामला म्हणते श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप. बरोबर आहे जसे शरीराच्या स्वच्छतेची, परिसराच्या स्वच्छतेची आपण काळजी घेतो त्याचप्रमाणे मनाची स्वच्छता करायला हवी .कशी करणार ही मनाची स्वच्छता ?तर ध्यान-धारणा, कटून न बोलणे, मन मोकळे राहणे मित्र-मैत्रिणी जमवने ,छंद जोपासणे, इतरांना मदत करने यामुळे मनाची स्वच्छता नक्कीच होऊ शकते चला तर मग तन व मन दोन्ही स्वच्छ ठेवू या

"स्वच्छता असे आरोग्याचा मूलमंत्र, समजेल ज्याला तो शिके जगण्याचे तंत्र".

सविता साळुंके
श्रीरामपूर 
कोड नं 13
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
स्वच्छता 

             स्वच्छतेचे जीवनात फार महत्त्व आहे. स्वच्छता शरीराची असो की परिसराची रोजच करावी. स्वच्छतेने शरीराचा मळ निघून जातो. त्वचेवरची रंध्रे मोकळी होतात. त्यातून वायूंचे चलनवलन होते. शरीर स्वच्छ असेल तर आपण रोगांना बळी पडत नाही. वेळोवेळी सॅनिटायझरने किंवा डेटॉलने हात धुतले की आरोग्यास धोका होत नाही. कारण हात निर्जंतूक केल्याने हातावरील जंतू नष्ट होतात नि रोग होण्याचा संभव टळतो.
             हल्ली कोरोना नावाचा नवीन विषाणू मनूष्याच्या मुळावर येऊन बसला आहे. तो संसर्गजन्य असल्यामुळे हात तसेच संपूर्ण शरीरच स्वच्छ करणे नित्याचे होऊन बसले आहे. घरा अंगणाची स्वच्छता म्हणजे देवी लक्ष्मीचे आगमन.स्वच्छ, सुंदर घरातच लक्ष्मीमाता वास करते. घर धनधान्य, संपत्तीने भरते हे परंपरेने समजले जाते. त्यामुळे सण सोहळ्यापूर्वी गृहिणी घराची स्वच्छता आरंभतात.घरांची रंगरंगोटी केली जाते. अंगणे सडा-सारवण करून चमकवले जाते. रांगोळीने सजवले जाते. घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी वेळोवेळी घासून स्वच्छ केली जातात. कारण पाण्यातून विषाणूंचा प्रवेश होऊन अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
           आपल्या वैयक्तिक स्वच्छतेने जसे शरीर निर्मळ, ताजेतवाने होते. घर-अंगण ही सुशोभित होते, तशी स्वच्छता हरेकाने परिसराची केली तर तोही स्वच्छ, निर्मळ होईल. आपणास कचराकुंडी जवळून जाताना नाकाला रुमाल लावावा लागणार नाही. काही लोकांना घर साफ करून कचरा खिडकीतून बाहेर फेकण्याची वाईट सवय असते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच. परंतु दुर्गुणांचा समावेशही होतो.त्यामुळे कचराकुंड्या, सार्वजनिक शौचालय नेहमी स्वच्छ असावे. तर देश स्वच्छ राखण्यात आपला हातभार असेल. यामुळे जगात देशाचा नावलौकीक वाढेल. अशिक्षित असणारे गाडगेबाबा हाती खराटा घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करत. त्यामुळे ते पाहून गावकरीही त्यांच्या साह्यास जात. एक अज्ञानी अवलिया कुठूनतरी येतो नि आपला गाव साफ करतो.संध्याकाळी कीर्तनातून मनही साफ करतो. त्याला जे ज्ञान होते ते आपणासारख्या उच्चशिक्षिताला नसावे का?
              लोकं रेल्वे किंवा  बसने प्रवास करत असताना शेंगा भेळ किंवा काही असे पदार्थ खातात नि टरफले किंवा कागद  रेल्वेच्या खिडकीतून बाहेर टाकतात. त्यामुळे आपले गैरवर्तन तरी दिसतेच पण परिसरही घाण होतो. काही लोक पाणी पिऊन पाण्याच्या बाटल्या बाहेर टाकतात. पण अंधारात त्या बाटल्यावरून घसरून बाईकवाले नाहक आपला जीव गमावतात. देवाने आपणास बुद्धिप्रधान बनवले आहे. काम करायला हात, पाय,नि संवेदनाशील डोळे, कान असे असताना सुंदर मानवी जीवन जगण्याऐवजी पशूसम जगण्यात काय अर्थ?. माणसाने माणसासारखे वागले तरच त्या बुद्धीचा कस नाहीतर त्यांची वर्णी पशूतच होणार हे ध्यानात घ्यावे.

सौ भारती सावंत
मुंबई
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
कोरोना व्हायरस;स्वच्छता मनाची की तनाची

       कोरोनाची आजच्या परीस्थीतीत दहशत असून जो तो स्वच्छता पाळा,हात धुवा.हात साँनीटायझरने धुवा असं सांगतात.कोणी कोणी खरंच स्वच्छता पाळतात,तर कोणी कोणी बिलकुल स्वच्छता पाळतांना दिसत नाहीत.रोग एवढा पसरत असतांना आजही खर्रे खावून पचकन कुठेही रस्त्यावर थुंकतात.त्यांना माहितही आहे की या अशा थुंकल्याने रोग वाढतो.तरीही.......
         तंबाखुजन्य पदार्थाचं उत्पादन जवळजवळ बंद झालं.जेव्हापासून लाकडाऊन झाला तेव्हापासून.तरी आज ही तंबाखू लपूनचोरुन बाजारात विकला जात आहे.नव्हे तर या थुंकणा-यावर जबरदस्त दंड आहे.तरीही काही लोकांचे थुंकणे बंद झालेले नाही.
            थुंकी थुंकणारे नेमके कुठे थुंकतील याचा काही नेम नाही.ते शौचालय,लिफ्ट,तसेच ऑफिस मध्ये लोकं जिने चढताना थुंकत असतात.यावर उपाय म्हणून काही लोकांनी या जिने चढण्याच्या जागेवर देवी देवतांचे फोटो लावले.तरीही थुंकणारे या देवी देवतांच्या फोटोवर थुंकतातच.कारण त्यांची माणुसकी मरण पावलेली आहे.मन तर पार मरुन गेलं आहे.
          नेहमी काही काही लोकं ज्ञानाचं बाळकडू पाजतांना दिसतात.म्हणतात की स्वच्छता पाळा.पण स्वतः मात्र स्वच्छता पाळतांना दिसत नाहीत.ते लोकां सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडे पाषाण याप्रमाणे वागत असतात.त्यांना जर विचारलं तर सांगतात की आम्ही बिघडलो.म्हणून तुम्हाला सांगतोय.
         देश विकासाकडे जात असतांना आमचं हे स्वच्छता अभियान इथंच खुंटतं.जेव्हा आमच्यातीलच गोष्टी सांगणारी मंडळी स्वच्छता न बाळगता वागत असतात.स्वच्छतेसाठी संतांनी आपली आपली कवने लिहिली.संत गाडगेबाबांनी तर स्वच्छतेला वाहूनच घेतलं.ते संपुर्ण महाराष्ट्र फिरले.गावं दिवसा झाडूनं स्वच्छ केले.रात्री कीर्तने केली.तरीही लोकं सुधारले नाहीत.कारण त्यांची मनं ही सुधारणावादी नव्हतीह.आताही मोदी साहेबांनी सांगितलं तरी आम्ही सुधरायला तयार नाही.कारण आमची मनं आजही सुधारण्यासाठी तयार नाहीत.
         खरंच या कोरोनाच्या साथीत तरी स्वच्छता पाळायची गरज नाही काय?आहे.पण कोण ऐकतंय.जिथे सरकारच ऐकत नाही.तिथे आम्ही तर सामान्य माणसं.
         लाकडाऊन काळात सरकारच्या आदेशानुसार दारुबंद होती.पण सरकारला लाभ होत नाही.नुकसान होत आहे म्हणून दारु सरकारने सुरु केली.त्यातच दोन दिवसात कोरोना एवढा वाढला की आता दुकानं बंद झाली व दारु ऑनलाईन पिण्याची सोय सरकारनं करुन दिली.खरंच जिथं सरकार सुधरु शकत नाही.तिथं लोकं कसे सुधरणार.खरंच यामुळंच लोकांची हिंमत वाढते व लोकं स्वतःचे मन सुधरंवायला तयार नाहीत.
          आमची आजही मनं सुधारली नसल्यानं जागोजागी बलत्कार,खुन,आत्महत्या होतांना दिसतात.कोणी स्वतःच्या मुलीवर अत्याचार करतात.कोणी मालमत्तेसाठी भांडतात.कोणी बहिणीला मारतात.तर कोणती बहिण भावाला.इथं तर राखीच्या दिवशी हत्या करणारे भाऊबहिण आहेत.कोणी पत्नीला हुंड्यासाठी मारुन टाकतात.तर कोणी आपल्या प्रियकरासाठी संशयावरुन पत्नीला मारतात.कोणत्या कोणत्या महिलाही याला अपवाद आहे.त्याही आपल्या प्रेमासाठी केव्हा आपल्या पतीला मारतील याचा नेम नाही.
         सगळी मनं खराब.रस्त्यावरची धुळ केव्हाही दुरुस्त करता येते.पण मनातील धुळ स्वच्छ करता येत नाही.महत्वाचं म्हणजे कोरोना हा फक्त एक माध्यम आहे.आपण या कोरोनाच्या पासून तरी बोध घेवून स्वच्छता पाळायला हवी.शारीरिक स्वच्छतेबरोबरच मानसिक स्वच्छता सुद्धा करायला हवी.जेणेकरून कोरोनाला दूर पळवून लावता येईल.

      अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३९४७४९२
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
34
        *स्वच्छता*
      "आरोग्यरक्षण व रोगाला प्रतिबंध करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे स्वच्छता होय".
         स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे रूप आहे, हा सुविचार अनेक ठिकाणी वाचायला मिळतो .ईश्वराची जशी आपण मनोभावे साधना करतो तसे स्वच्छतेची का असू नये? अस्वच्छता केलीच नाही तर स्वच्छतेची वेळच येणार नाही ,आजार झाल्यावर उपचार करीत बसण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजने केव्हाही महत्वाचे असते. तोच न्याय स्वच्छतेला ही लावता येईल .प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे कचरापेटीत गेला पाहिजे स्वच्छतागृहात पाणी ओतले गेले पाहिजे, शिंकताना खोकताना खिशातून रुमाल निघालाच पाहिजे ,मग रस्तेही राहतील स्वच्छ स्वच्छतेशी अशी ओढ वाटली म्हणजे मग *स्वच्छ भारत* हे स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही.
    उत्तम आरोग्य ही संपत्ती आहे हे आरोग्य मिळवण्यासाठी काही सवयी  संस्कार असावे लागतात.या सवयी संस्कार अनुकरणातून, निरीक्षणातून, कृतीतून अंगी बाणले जातात.काही सवयी सहज उचल्या जातात. आरोग्यासाठी स्वच्छतेची सवय हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आरोग्याचे पोषण करणारी किंवा आजारांना प्रतिबंध करणारी परिस्थिती स्वच्छते ने होते ही स्वच्छता दोन स्तरावर राखावी लागते एक वैयक्तिक स्वच्छता दूसरी सार्वजनिक स्वच्छता , आरोग्य संवर्धनासाठी स्वच्छतेची नितांत गरज असते. सर्वांनाच हवीहवीशी वाटते स्वच्छता सवयीतून राखली जाते तसेच संस्कार घडून तिचे संवर्धन करावे लागते मुला नसताना त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळल्या बरोबरच दात घासणे, आंघोळ करणे, केस विंचरणे, स्वच्छ पोशाख परिधान करणे, शरीर स्वच्छ ठेवणे इत्यादी बाबीकडे लक्ष दिले पाहिजे त्यामुळे व्यक्तीचा तो परिपाठच बनून जातो. केर काढणे, आणि  सडा टाकणे ,रांगोळी काढणे इत्यादीतून घराची स्वच्छता होते त्याचे रूप साजरे गोजरे होते हेनी हातांना मुल शाळेत दाखल होते.
      जे आयुष्याची जोडले जाते आणि चांगल्या जगण्याची दिशा देते खरे शिक्षण त्यामुळे शालेय स्तरापासून हवाच श्रमसंस्कार पूर्वी तो शाळांमधून न सांगता मिळत होता काळाच्या प्रवाहात पुस्तकी शिक्षणाला महत्त्व येत गेले खरे पण स्वच्छतेचा जीवन संस्कार तरी बालपणापासूनच रुजवायला हवा , 

लेखन-
 श्री.सुंदरसिंग आर.साबळे 
9545254856
गोंदिया
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
चला मनालाही स्वच्छ करूया...
_____________________
लेख-श्री.ज्ञानेश्वर झगरे गुरुजी (वाकदकर)【17】
_____________________
कोणे एके काळी एक साधू एक नगरात भिक्षा मागणीसाठी जायचा..त्या साधूला एक स्त्री दररोज न चुकता भिक्षा वाढायची आणि महाराज मला उपदेश करा असे दररोजच म्हणायची... असे बरेच दिवस निघून गेले तरी सुद्धा तिला महाराजांनी काहीच उपदेश केला नाही. शेवटी एके दिवशी तिने धीराने महाराजांना विचारले,"आपण मला कधी उपदेश करणार....?" त्यावेळी महाराजांनी तिला अगोदर भिक्षा वाढण्यास सांगितले. आज मला डाळ आणि तेल द्या असं बजावलं.. त्यावेळी नाईलाजाने ती बाई घरात डाळ व तेल भिक्षा म्हणून देण्यासाठी घेऊन आली. त्यांनतर महाराजांनी आपल्या झोळीतील एक मळलेला कटोरा आणि ठिदिफ6मळलेली लोटी काढली....ती पाहताच क्षणी ती स्त्री म्हणाली,  "महाराज ...ही पात्र तर एकदम स्वच्छ नाहीत...थोडीफार मळलेली वाटतात., मीच स्वच्छ धुवून देते... नन्तर त्यामध्ये भिक्षा वाढते..." महाराजांनी त्या स्त्रीकडे हसून बघितले आणि म्हणाले ...., "माते, साधी भिक्षा घेण्यासाठी घायचे पात्र हे अगदी स्वच्छ लागतं... अगदी तसंच उच्च उपदेश घ्यायचा असल्यास मन सुद्धा अगदी स्वच्छ आणि पवित्र असावं लागतं...


वरील कथेतून माणसाला चांगल्या विचारांच्या रुजवणुकीसाठी अगदी स्वच्छ मन हवं असतं, हे महत्वाच आहे. 
"मन चंगा तो कठोटी में गंगा।।

यासाठी माणसाने मन निर्मळ करणे फारच गरजेचं आहे. आपण स्वच्छता करतांना भौतिक वस्तू, शरीर आणि इतर स्वछता सहज किंवा इतरांकडून करून करून घेऊ शकतो परंतु मनाची स्वच्छता हा फार जिकरीचा आणि जोखमीचा विषय आहे.

मन के हारे हार है,
मन के जितें जीत....

मन स्वच्छ आणि प्रसन्न राहून आनंदी असेल तर सगळीकडे आनंदी आनंदच असतो..म्हणूनच आवर्जून मनाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करूया...

नाही निर्मळ मन,
काय करील साबण।।
बाह्यांगाची कितीही सुंदरता केली तरी अंतर्मनाची निर्मळता फार मोलाची आहे...
आपले नाते संबंध, जिव्हाळ्याचा विषय, सुख, दुःख , आनंद ,भीती ,विचार, वेदना, संवेदना या सगळया ज्या सागरातून निर्माण होतात आणि ज्या सागरात तरळतात तोच सागर म्हणजे मन आणि म्हणून या मनसागरात कसलीही घाण पडता कामा नये...यासाठी मनाला स्वच्छ  ठेवूया..

जगातल्या सगळ्याचं गोष्टी ज्याला त्याच्या गाळणीतून गाळून घ्यावा लागतात त्या मनाला स्वच्छ करून सगळ्या स्वच्छतेचा पाया स्वतःपासून रचूया....


श्री. ज्ञानेश्वर झगरे गुरुजी 
(वाकदकर)
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
स्वच्छता

  आपल्या जीवनात स्वच्छतेला फार महत्व आहे. आदिम काळापासून आजपर्यंत मानव आपली परिसराची स्वच्छता ठेवणे हे एक आपले महत्त्वाचे कार्य आहे असे समजतो. स्वच्छता म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा नसणे , निरोगी वातावरणअसणे होय.सन 1919 ला भारत सरकारने निर्मल ग्राम योजना चालू केली होती. परंतू 2014 साली  सन्माननीय पंतप्रधान मोदीजींनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. व खऱ्या अर्थाने भारतामधील स्वच्छतेला सुरुवात झाली. कारण प्रत्यक्ष पंतप्रधानांनी आपल्या हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाकीचे लोकसुद्धा स्वच्छतेला महत्त्व देऊ लागले.
 दररोज सकाळी लवकर उठून सडा सारवण करून ,रांगोळी घालून पूर्वीची स्त्री घराचे अंगण सुशोभित करत होती. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहत असे. स्वच्छ व धूळ विरहित रहावे म्हणून सण समारंभाच्या आधी स्वच्छता करणे गरजेचे मानत व घराची स्वच्छता केली जायची. त्यामुळे घरामध्ये स्वच्छता असायची व निरोगी वातावरण असायचे. निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करते असे म्हटले जाते. व निरोगी राहण्यासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. सर्व संत महंतांनी स्वच्छतेचे महत्त्व जनतेला आपल्या अभंगातून ,रचनेतून कीर्तनातून सांगितले आहे. संत गाडगेबाबांनी तर आपले सारे आयुष्य स्वच्छतेसाठीच वाहिले. व ते लोकांना स्वच्छतेचे महत्व स्वतः परिसराची स्वच्छता करून पटवून देत.
 परिसराची, नदीची, नदी किनाऱ्याची स्वच्छता ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जर आपण नदीमध्ये मैला घाण पाणी सोडले तर नदीची गटारगंगा होऊन जाईल. नदीतील जलचर मरतील. हेच पाणी जर मानवाने प्राशन केले तर मानवाला अनेक रोगांना सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर मानवाला आपल्या सभोवती असणारे वातावरण प्रदूषित न करता स्वच्छ व निरोगी ठेवले पाहिजे. 
  मानवाला स्वतःची वैयक्तिक स्वच्छता नेहमी ठेवली पाहिजे.टापटीप व नीटनेटकेपणाने असणारी व्यक्ती ही नेहमीच दुसऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेली असते. व्यक्ती स्वतः स्वच्छ असली आपोआपच ती आपला परिसर स्वच्छ ठेवते.म्हणून स्वच्छतेचे महत्त्व जाणा ,जाणून घ्या दुसऱ्यांना जाणवुन द्या.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
,..स्वच्छता.                               .दैनंदिन जीवनात स्वच्छता अतिशय महत्वाची आहे.जिथे स्वच्छता असते तिथे सुख समृध्दी ,शांती असते. भारताची लोकसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे.स्वच्छतेची  काळजी प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवी आपले घर ,आपले परिसर ,आपले गाव,आपले शहर,सार्वजनिक स्थळ स्वच्छ ठेवण्याची प्रत्येक व्यक्तीची जवाबदारी आहे. लहान मुलांनाही लहान पणापासून स्वच्छतेची सवय लावायला हवी.शासन स्तरावरही स्वच्छतेबाबत कडक प्रतिबंध कायदा व्हायला हवा.प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वच्छते बाबत नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जसे प्रकल्प राबवले तसे प्ररकल्प राबवायला हवे. भारतातच नाही तर अख्या जगात भेडसावत समस्या कचरा समस्या आहे. "वापरा आणि फेका" या वस्तू मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहे.त्यामुळे प्रत्येक वस्तू वापरण्याची मानसिकता सर्वांची आहे त्या प्रमाणात  कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मानसिकताही हवी.दररोज दवाखान्यात ,रेल्वे स्थानक,बसस्थानक प्रत्येक घरी निघणारा कचरा,कारखान्याचा कचरा, गूळ उत्पादनाचा कचरा अशा प्रकाच्या सर्व प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावायला हवा. महाराष्ट्र शासनाने २००५ या वर्षा पासून आदर्श ग्राम स्वच्छ अभियान सुरू केले आहे.यात ग्रामीण भगतील लोकांनी या लोकं चळवळीत भाग घ्यायला हवा .व आपले गाव प्रत्येकानी स्वच्छ ठेवल्यास रोगराई पसरणार नाही.व प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम  झाल्या शिवाय राहणार नाही.व भारत महाप्रजास्त्ताक होण्याचे स्वप्न पूर्ण करेल. राष्ट्रसंत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,महात्मा गांधी ,कस्तुरबा गांधी या महान संतांनी तर समाजाला स्वच्छते कडून समृद्धी कडे नेण्या साठी लोकं चळवळ करून कीर्तन,भजन ,संभाषण अशा अनेक माध्यमातून समाज परिवर्तन घडवू न आणण्याचा प्रयत्न केला ."निरोगी मनात ,तंदुरुस्त मन वास करत असतो.म्हणून प्रत्येकाने जर स्वच्छतेकडे लक्ष दिले तर एक आदर्श निरोगी सदृढ समाज तयार होईल. लोकांना दवाखान्यात लागणारा पैसा आपल्या मुला बाळांच्या शिक्षणवर खर्च करता येईल.व एक आदर्श ,सुसंस्कृत पिढी तयार होईल.भारतात खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी शहरात होत असते.शहरात मोठं मोठ्या झोपडपट्ट्या आहेत.त्या लोकांना कचरा टाकण्या साठी जागा राहत नाही.शेवटी त्यांना आपल्या घरातच कुठेतरी कचरा साठून ठेवावा लागतो .त्या मुळे डास,जीव ,जंतू कीटक निर्माण होतात व ते हवे मार्फत परिसरात पसरत असतात.त्या मुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येऊन संसर्ग रोग पसरत असतात . कष्टाने कमावलेला पैसा रुग्णालयात टाकल्या शिवाय  पर्याय उरत नाही .त्यामुळे गरिबी वाढत जाते.व सामाजिक आर्थिक परिस्थिती सुध्धा ढासळते.खेड्यातून शहरात लोकाची गर्दी वाढली आहे .त्या मुळे शहरात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे.उन्हाळ्यात पाण्याच्या प्लास्टिक बाटली पासून खूप मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो .त्या मुळे पाण्याच्या बाटल्या पावसाळ्यात नाल्या मध्ये वाहतात .वाहता अलेणाही तिथे थांबतात .त्या मुळे  नाल्यांचे पाणी अडून डास जंतू तयार होतात.व रोग राई पसरते. म्हणून प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची खबरदारी व्हायला हवी .पृथ्वी तलवार प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे.साचलेल्या कचऱ्यावर गुरे ढोरे जातात आणि तेथील पिशव्या खातात त्या मुळे पाळीव प्राण्यांचे सुद्धा जीवन अस्तित्व धोक्यात आले आहे.मानवाने प्रत्येक प्राण्याची काळजी घ्यायला हवी.............."स्वच्छ भारत ,स्वस्थ भारत ,सुदृढ भारत,निरोगी भारत....ही संकल्पना प्रत्येक भारतीयांनी जोपासायला हवी.....चला घ ड ऊया निरोगी भारत...                          
जीवन खसावत भंडारा 954524602
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!

स्वच्छता आणि आरोग्य या दोन गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. जेथे स्वच्छता असेल तेथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगलेच असते. मात्र आपण पाहतो की आजूबाजूला किती अस्वच्छता केली जाते. हे लोक असे का बरे वागत असतील ? याचा शोध घेतले असते असे दिसून येते की यांना शालेय जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणी सांगितले नाहीत त्यामुळे ही मंडळी अशी गैरवर्तणुक करीत असतील कदाचित. म्हणून भविष्यात भारत स्वच्छ दिसावा यासाठी आजच्या शालेय मुलांना याबाबतीत माहिती देणे आवश्यक वाटते. म्हणून लहान मुलांमध्ये स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी दोन वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे बालदिनी देशात बाल स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. स्वच्छ भारत 2019 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बालस्वच्छता मोहीम अधिक व्यापक करण्याची गरज तज्ज्ञांमधून आज व्यक्त होत आहे. कारण दोन वर्षे झाली मोहीम सुरू होऊन पण अजूनही सशाळेतील मुले, शिक्षक आणि जनता याबाबतीत जागृत झाले नाहीत. स्वच्छतेचे बीज लहान मुलांमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण चालू असतानाच रुजवले पाहिजे. शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वच्छता आणि आरोग्य विषयक त्यावर आधारित गोष्टी नियमित परिपाठच्यावेळी आवर्जून सांगायला हवे. आठवड्यातून एक दिवस मुलांच्या स्वच्छतेविषयी तपासणी व्हायलाच हवे. मुलांची नखे पाहणे, दात पाहणे, त्याचा पोशाख या सर्व बाबी सप्ताहातून एक दिवस पाहत गेल्यास मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजल्या जातील. स्वच्छताविषयक प्रार्थना, गीते, क्रमिक पुस्तकामधील  उपक्रमांमधून लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे शक्य आहे आणि शिक्षक मंडळी हे करू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO अहवालानुसार हात स्वच्छ धुवून जेवण केल्यानंतर मुलांच्या आरोग्यात 60% सुधारणा होते. जेवण्यापुर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजे. कारण जेवण्याच्या पूर्वी आपले हात कोणत्या कोणत्या बाबीशी संपर्कात आले याची आपणास कल्पना नसते. काही बाबी मुलांना सांगत असताना पालकांनी आणि शिक्षकांनी त्याचे पालन स्वतः करायला पाहिजे अन्यथा त्या बोलण्याचा त्याच्यावर काही एक परिणाम होणार नाही. स्वछतागृहाचा नियमित वापर करणे आणि शौचास जाऊन आल्यानंतर हात पाय स्वछ धुण्याची सवय मुलांच्या आरोग्यासाठी हितकारक असते. त्याचबरोबर ही सवय योग्य असल्याचे मुलांच्या मनावर बिंबवणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता आणि आरोग्य या बाबतचे धडे त्यांना सांगणे गरजेचे आहे. स्वच्छतेची ही गोष्ट तळागळातील मुलांमध्ये रुजविण्यासाठी गावापासून जिल्हास्तरापर्यंत विविध कार्यक्रम घेऊन स्वच्छतेचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. स्वच्छता आणि आरोग्य विषयक संदेश लोकांपर्यंत पोहोचता पोहोचण्यासाठी प्रसिद्धी माध्यम किंवा सोशल मीडियाचा वापर करणे ही आजच्या काळाची गरज आहे. सर्वात पहिल्यांदा माझ्यात बदल केला पाहिजे आणि नंतर दुसऱ्यांना सांगितले पाहिजे. आपली विचारधारा बदलली की समोरच्याची आपोआप बदलत असते. म्हणून ज्याप्रमाणे पालक आपल्या मुलांना घर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना करतात त्याचप्रमाणे आपला परिसर, आपली शाळा, आपले गाव, आपले शहर, राज्य, आणि आपला देश स्वच्छ ठेवण्याचेही शिक्षण बालवयात देणे अत्यंत गरजेचे आहे.  स्वच्छ भारत संकल्प साकार करण्यासाठी बाल स्वच्छतेसह स्वच्छ किल्ले, स्वच्छ शहर आणि स्वच्छ परिसर त्या त्या स्तरावर करणे गरजेचे आहे. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे स्वच्छतेचे हे ध्येय गाठण्यासाठी देशातील प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे की, आपला देश स्वच्छ असायला हवे. कुण्या एकट्याने जागे होऊन चालणार नाही तर एकाने दुसऱ्याला सांगून आपण सर्वजण स्वच्छतेचे महत्व जाणून घेणे आवश्यक आहे. देशात युवावर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने स्वच्छता मोहिमेसाठी त्यांनी जरूर पुढाकार घ्यावा कारण युवकांमध्ये जी शक्ती असते किंवा धमक असते ते अन्य कोणा मध्ये दिसून येत नाही. चला तर मग लहान लहान चिमुकल्या मुलांसह, शिक्षक, पालक, जेष्ठ नागरिक आणि युवकांनी स्वच्छ भारतासाठी एक पाऊल पुढे टाकू या. एक पाऊल स्वच्छतेसाठी ....!

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
(15)
स्वच्छतेसाठी मनाची स्वच्छता महत्वाची...!

स्वच्छता म्हटलं की आपल्या अवती-भोवती पसरलेली दुर्गंधी, अस्वच्छता आपल्याला दिसते. आपला परिसर स्वच्छ असलाच पाहिजे त्यास दुमत नाही. पण याठिकाणी एक विशेष बाब नमूद करावीशी वाटते ती म्हणजे 'मनाची स्वच्छता'. मनाची स्वच्छता असेल ना तर परिसर सुद्धा स्वच्छ राहील आणि माणुसकी सुद्धा.
स्वच्छ भारत अभियान, ग्राम स्वच्छता अभियान यासारख्या वेगवेगळ्या योजना शासन राबवित असते, त्यावर खर्च करत असते.पण या किती दिवसात बंद पडतील सांगता येत नाही. त्यासाठी मनाची स्वच्छता होणे गरजेचे आहे. 
कोरोनामुळे आज सगळे जग थांबलेले असतांना प्रदूषण झाल्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसत आहे. याचा अर्थ काय ? आपण अस्वच्छता केलीच नाही त्यामुळे स्वच्छता ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्यावर खर्च करण्याची गरज सुद्धा उरत नाही. त्यामुळे मानवाने आता तरी निसर्गाचे सौंदर्य जपले पाहिजे, आपला परिसर अस्वच्छ होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे नाहीतर आज कोरोनामुळे आपण त्रस्त आहोत येणाऱ्या काळात अस्वच्छतेमुळे व प्रदूषणामुळे हि जीवसृष्टी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.
स्वछता ठेवायची म्हणजे देशाची स्वच्छता करायची का ? असं मुळीच नाही. प्रत्येकाने आपले घर व आपला परिसर स्वच्छ ठेवला की झालं. अशी मानसिकता प्रत्येकाची निर्माण झाली की स्वच्छ भारत मिशन सारख्या अभियानांवर खर्च करण्याची गरज पडणार नाही. 

गणेश सोळुंके, जालना
8390132085
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
स्वच्छता (28)

              स्वच्छतेचा मंत्र साऱ्या समाजाला देणारे गाडगेमहाराज हे प्रणेते ठरले,आपला घर, परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रकृतीच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे,जिथे स्वछता असते,तेथे आरोग्य नांदते,म्हणून तर लहणपणापासुन स्वच्छतेचे धडे दिले जातात,शालेय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्याचे महत्व सांगितले जाते,समाजसेवा,गाईड,तसेच स्वछता कार्यक्रम राबवला जातो. 
      विविध जयंती,सण समारंभ यातून स्वछता  कार्यक्रम राबविला जातो,आपण पाहतो की झोपडपट्ट्या मध्ये दाटीवाटीने लोक रहातात,त्यामुळे स्वच्छतेचा अभाव दिसून येतो, आणि लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते,असे होऊ नये,म्हणून शासनातर्फे विविध योजना,पथनाट्ये यांचे आयोजन केले जात आहे,ग्रामीण भागात हगणदारी मुक्त गाव म्हणून योजनेचा फायदा करून दिला जातो,त्यामुळे घरोघरी टॉयलेट झालेत,आणि त्यामुळे मोकळया जागी घाण करणे,अशा समस्या आता उदभवत नाहीत.
        भारताने स्वच्छतेच्या संदर्भात ठोस पावले उचलली आहेत, रेल्वे स्टेशन,एसटी स्टँड इत्यादी गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत.
       सुजाण नागरिक या नात्याने चला,आपणही हातभार लावूया!स्वच्छतेचे महत्व सांगून,कृतीने दाखवुया!

सुजाता जाधव
नवी मुंबई
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
" स्वच्छता एक व्रत " [ 14 ]

     मित्रांनो , " स्वच्छता " हे एक आजन्म पाळले जाणारे असे एक पवित्र व सुंदर व्रत आहे ! हे व्रत फक्त मानवा पर्यंत मर्यादित नसून सृष्टीतील इतर घटकही स्विकारत असतात . आपण पाहिले असेलच की सुगरण पक्षी आपल्या पिल्ल्यांची काळजी घेण्यासाठी कशी स्वतःच खोपा स्वच्छ ठेवते . तद्वतः गायही आपल्या वासराला जन्म दिल्यानंतर कशी मायेने आपल्या जिभेने चाटून - पुसून स्वच्छ करते ... अर्थात ही स्वच्छता व्यापक स्वरूपाची आहे ....

     ' स्वच्छता ' या शब्दांत ' स्व ' आणि ' अच्छता ' अर्थात ' स्वतः स्वतःहून केलेले चांगले कार्य " असा अर्थ अभिप्रेत होतो . ही स्वच्छता अनेक अंगांनी व्याप्त असते . (1) शारीरिक , (2) मानसिक , (3) भावनिक , (4) वैचारिक , अशा स्वरूपात आपल्याला या स्वच्छतेचे दर्शन पहावयांस मिळते ...

     आपल्या भारत देशात अनादिकाळानुरूप अनेक संत , महंत , साधू , महापुरूष , क्रांतिकारी आदींनी ह्या व्यापक स्वच्छतेचे व्रत आजन्म पाळून देशात लाक्षणिक क्रांती व प्रगती घडवून आणली . त्यात संत म्हाइंमभट्ट , संत बसवेश्वर , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत नामदेव , छ. शिवराय , राष्ट्रसंत तुकडोजी , स्वच्छतेचे पूजारी संत गाडगेबाबा , म . गांधीजी , म. फुले , डॉ . आंबेडकर , आदींनी हे व्रत आजन्म पाळले . त्यांनी आपापल्या कार्यक्षमतेने व मतप्रवाहाने मानवी मनातील अज्ञानरूपी घाण , धूळ दूर सारून मानवी जीवन सुंदर व यतार्थ बनवीले . त्यांच्या या अखंड व कडक व्रतामुळेच आज आपण यशोमार्गाने वाटचाल करत आहोत .... आपणही त्यांचे वारसदार म्हणून हे स्वच्छतेचे व्यापक व्रत अंगीकारून एक खरे देशभक्त होऊया ...

    " भारताची वाढविण्या शान
       राबवूया स्वच्छता अभियान
       घरेदारे करूया कचरामुक्त
       परिसर बनवूया रोगमुक्त ! "

     अशा या स्वच्छतेतून आपण परिसरातील घाण बाहेर काढून आरोग्याची बीज पेरूया ... ही स्वच्छता आधी मनात आली पाहिजे ... तरच नंतर ती आपल्या हातात म्हणजे कृतीत येईल .... स्वतःतील वाईट व्यसने आपोआपच दूर होऊन सामाजिक प्रदूषण निर्माण होणारच नाही ... वैचारिक स्वच्छतामुळे इतरांना समान लेखून सामाजिक ऐक्याची भावना निर्माण होऊल ... त्यामुळे देशात एक सुसंस्कृत व सुसंस्कारी आदर्श पिढी निर्माण होऊन देश प्रगतीमार्गे अग्रेसर होईल ...

     तर मग मित्रांनो , अंगीकारणार ना हे व्यापक स्वच्छतेचे व्रत ... तेही आजन्म अविरत .... अखंड .... शेवटच्या श्वासाखेरपर्यंत ... आणि आपल्यासह आपल्या देशाचाही विकासास हातभार लावून खरे देशभक्त होणार ना .... चला तर मग आजच , आत्ताच , या क्षणी हे स्वच्छतेचे व्रत मनोभावे स्विकारून एक आदर्श सुजाण नागरिक होऊया . ही कोरोनाची लढाई या स्वच्छतेच्या ढालीने आपले व देशाचे संरक्षण करूया ...

अर्चना दिगांबर गरूड 
मु .पो . किनवट , जि . नांदेड 
मो . क्र . 9552954415
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
स्वच्छता हीच संपदा

         डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06)
         शहापूर ,(ठाणे)9226435827

  स्वच्छता मानवी जीवनाचे अनिवार्य अंग आहे.स्वच्छता ही एक सवय आहे. मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्वच्छता अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.'स्वच्छ भारत अभियान' देशभरात राबविण्यात आले त्याचे कारणही हेच आहे.वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छता अतिशय महत्वाची आहे.
   प्रत्येक व्यक्तीने पाहिल्यांदा स्वतःची
 वैयक्तिक स्वच्छता व स्वतःच्या घराचा परिसर स्वच्छ केल्यास गाव स्वच्छ होऊन पुढे पंचक्रोशी,तालुका,जिल्हा ,राज्य आणि पर्यायाने देश स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही.कित्येक व्यक्ती स्वतःपुरती स्वच्छता पाळण्यात खूप अग्रेसर असलेल्या दिसतात मात्र ह्याच व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मात्र त्याचे पालन करताना दिसत नाहीत.सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे जणू आपले कामच नाही अशा अविर्भावात खाल्लेल्या वस्तूचे कागद रस्त्यावर,बागेत फेकणारे अनेक सुशिक्षित पांढरपेशी लोकं दिसतात.खरे तर शालेय जीवनापासूनच स्वच्छते विषयी जागरूकता करूनही आज इतक्यावर्षातही स्वच्छताविषयी म्हणावी तशी स्वयंशिस्त लोकांच्या पचनी पडत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.
   आज आपल्या पंतप्रधान,मुख्यमंत्री यांना कचरा कुठे टाकावा,शौचालयाचा वापर कसा करावा याविषयी पुन्हा पुन्हा लोकांना आवाहन करावे लागते .या पेक्षा मोठे दुर्दैव काय असावे.स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे अडाणी जेव्हा आपल्या घरातील ओला व सुका कचरा रस्त्यावर सोडतात,नदीवर आपले कपडे धुणे, जनावरे धुणे आदि काम करताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही.
   रोजच्या ये जाण्याच्या रस्त्यात एक ओढा किंवा नदी असेल तर त्यात रात्री सामूहिक कचरा फेकण्याचा दैनंदिन कार्यक्रम  दररोज राजरोस पणे सुरू असतो.अशी सार्वजनिक ठिकाणे जणू काही निर्माल्य टाकण्याची हक्काची जागाच प्रत्येकाल वाटते.
    हे सगळं बघून शिक्षण केवळ गुण मिळवण्यासाठी नक्कीच नसते. हेच आम्ही विसरलो आहोत. आमची सार्वजनिक स्थळे, स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. कोण करतात ते घाण? रेल्वेमधील शौचालयातील डबा देखील डबल साखळीने बांधून ठेवावा लागतो.यातच उत्तर आहे.आपण जोपर्यंत हे मान्य करत नाही की आपणच ही भूमीअस्वच्छ करतो तोवर हा प्रश्न सुटणार नाही. आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे. स्वच्छता व त्याचे महत्व आपल्या संस्कृतीने देखील सांगितलेले आहे.स्वच्छता केवळ उत्साही वातावरणासाठीच नाही तर आरोग्यासाठी आवश्यक आहे.मग शालेय अभ्यासक्रमात समावेश करूनही लोक अस्वच्छता का करत असावीत? याचे प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.खरे तर
स्वच्छता ही सरकारची जबाबदारी नाही. हे आपल्या सर्वांना समजतेच..... नव्हे मान्यही आहे . तरी सुध्दा अस्वच्छता दिसली की त्यावरून सरकारच्या नावाने बोटे मोडण्याचे काम आपणच करतो. पण कचरा नेमकं करतंय कोण? याचा विचार कधी केला आहे का?
 खरे तर ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. प्रत्येकानेच काळजी घेतली तर अख्खा देश स्वच्छच राहील. ह्यात कोणतच रॉकेट सायन्स नाही.
जनता ही ह्या देशाची मालक आहे. मालकाने आपली मालमत्ता जपायला काय हरकत आहे?गांधीजींनी खेड्याकडे चला असं सांगताना 'नई तालीम स्वच्छता से शूरु होती है..' असं विधान केलं होतं.मराठीत एक म्हण आहे 'हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे..!'म्हणजेच स्वतःच्या मनाला प्रसन्नता लाभावी आणि आपल्या जीवनात संपदा यावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने स्वछता पाळण्याची शपथ घेणे आवश्यक आहे.
  ``गांवाचे जरी उत्तम नसलें।तरि देशाचे भविष्य ढासळले

ऎंसे मानावे जान त्याने भले।हृदया माजी।।''

   संत तुकडोजी महाराजांनी रचिलेल्या ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातीलही ५० वी ओवी. आपले गाव किंवा शहर चांगले असेल तरच देशाचे भविष्यही चांगले होते,  असा त्यांचा संदेश. हा संदेश प्रत्येकाने लक्षात ठेऊन स्वच्छतेची कास धरली पाहिजे.

          डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**
                   धन्यवाद ..........!
**•**•**•**•**•**•**•**•**•**•**•**

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...