रविवार, 17 मई 2020

रोज एक लेख : दिवस एकोणतिसावा समजदार नागरिक

 *साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- एकोणतिसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 17 मे 2020 रविवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- समजदार नागरिक*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*समजदार नागरिक*
कोणताही देश त्याच्या क्षेत्रफळावरून तो मोठा ठरत नाही. किंवा केवळ लोकसंख्यावरून तो मोठा ठरत नाही. देशाची एक परंपरा, देशाची एक संस्कृती असते. त्या त्या देशातील चालीरीती रूढी आणि परंपरा या त्या देशाची ओळख निर्माण करून देत असतात. घरांमध्ये चार माणसं असतील तर चारही लोकांचे विचार वेगळे असू शकतात आणि या चार लोकांना एकत्रित बांधून ठेवणे ते सुद्धा एका विचाराने, ही गोष्ट साधी नाही. आपल्या भारत वर्षाचा जर विचार करायचा असेल तर या भारतामध्ये अनेक जाती धर्म पंथ आणि विविध परंपरा जपणारे लोक आहेत. देशसेवेच्या निष्ठेने आणि समतेच्या विचारांने सर्वांना बांधून ठेवणे साधी गोष्ट नाही. तरीही आम्ही वर्षानुवर्षे येथे राहत आहोत. देशावर येणार्‍या संकटाचा एकजुटीने परतवून लावण्यासाठी कटिबद्ध आहोत. माणसाने माणसाच्या वेदना जाणणे, माणसाने माणसाला माणुसकीला धरून मदत करणे. या गुणांनी परिपूर्ण माणूस जबाबदार माणूस म्हणता येईल. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या कर्तव्यविषयी काही सांगू नये असे वाटत असते. परंतु हक्काबाबत आपण अनेक वेळेला जागृत असतो. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आपण सर्व भारताची नागरिक आहोत आपण सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे सांगितले. भारतीयांच्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या निर्धाराविषयी संविधानामध्ये सांगितले आहे. आणि या गोष्टीची पूर्तता करणारा नागरिक म्हणजे जबाबदार नागरिक होय. बंधुभाव आणि व्यक्तीप्रतिष्ठान याचा जवळचा संबंध आहे. व्यक्ती प्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो सन्मान जात, धर्म, वंश, लिंग, भाषा किंवा पंथ यावर ठरत नसतो. ज्या पद्धतीने आपल्याला लोकांनी सन्मान द्यावा असं वाटत असेल तसेचआपल्याशी लोकांनी आदराने वागावे असे वाटत असेल, तसाच आदर आणि सन्मान आपणही इतर व्यक्तींना दिला पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे. आणि हीच खर्‍या अर्थाने जबाबदार व्यक्तीची वैशिष्ट्ये आहेत. व्यक्तीप्रतिष्ठा निर्माण होण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान केला पाहिजे. आणि जबाबदार व्यक्ती मध्ये असे गुण प्रस्थापित झाल्यानंतर बंधुभाव हे सहजरीत्या वाढीस लागेल न्याय आणि समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे काम हे अधिक सोपे होईल आणि भारतामध्ये विविधतेत एकताही दिसून येइल. आणि संविधानामध्ये दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ती होईल. आपल्याला मिळालेले मूलभूत हक्क याविषयी आपण जागरूक असतो. आणि लोकशाहीमध्ये जागरूकही असले पाहिजे. परंतु जबाबदार व्यक्ती म्हणून  आपली काही कर्तव्य आहेत ती देखील आपण पार पडायला पाहिजेत. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरती कुठलाही कायदा आपल्याला हातामध्ये घेता येणार नाही प्रत्येकाने संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शाचा आदर केला पाहिजे. जबाबदार व्यक्तीचे कर्तव्य आहे की देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्नशील असावे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा येईल अशा प्रथांचा त्याग केला पाहिजे त्यांना सामान गेला पाहिजे. देशाच्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे आपण जतन केली पाहिजे मिसर पर्यावरणाचे जतन केले पाहिजे सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगली पाहिजे, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि हीच खरी जबाबदार व्यक्तीची वैशिष्ट्य आहेत. हीच खरी जबाबदार व्यक्तीची ओळख आहे. या आणि अशा मूलभूत कर्तव्याचा आपण विसर न पडू देता जबाबदार  नागरिकांबरोबरच आदर्श नागरिक बनून देशोन्नतीच्या कार्यात सहभागी होऊया.
        हणमंत पडवळ, उस्मानाबाद.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 चला सुजाण नागरिक होऊया....!
  'समजदारपणा' याचा ज्याच्या  त्याच्या दृष्टीने अर्थ वेगवेगळा घेतला जातो. आपण जे इष्ट अनिष्ट  सांगू ते ऐकणारा पण 'समजदार' आणि सद्सद्विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेणाराही समजदारच!!पण समजदार नागरिक ही  मात्र अतिशय व्यापक संकल्पना आहे. आपल्या स्वार्थासाठी निर्णय घेऊन सामाजिक स्वास्थ्याला हानी पोहचवणाऱ्या तथा कथित सुशिक्षिताना काय म्हणावे हा यक्ष प्रश्न आहे.
  सुजाण नागरिक  बनण्यासाठीचे धडे लहानपणापासूनच नागरिक शास्र व समाज शास्र विषयातून दिले जातात. लोकशाही मूल्य,सामाजिक भान राखण्याविषयी बाबी अगदी बेंबीच्या देठा पासून ओरडून ओरडून पाठ केल्या जातात. या विषयांतील गुण मिळविण्याचे प्रमाणही जवळपास 90 टक्केपेक्षा जास्त असते.काहींना तर 100 टक्केच्या आसपास गुण मिळतात.परंतु प्रत्येक्ष जीवनात या बाबीचा वापर किती होत असेल हा संशोधनाचा विषय आहे.बरेचसे सनदी अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार बघितला की प्रश्न पडतो..!!की समजदार नागरिक म्हणण्यासाठी 'भ्रष्टाचार हाच शिष्टाचार' हा मंत्र देखील  यांच्या नागरिकशास्त्र विषयातील भाग आहे की काय..!
  भारतीय राज्य घटनेतील प्रत्येक कलम मुखोदगत असणारे जेव्हा त्यातूनच पळवाट शोधण्याची कल्पकता दाखवतात तेव्हा तर खऱ्या समजदार नागरिकाला तोंडात बोट घालायला लागते. नागरिक शास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण घेणारे विद्यार्थीच जेव्हा सार्वजनिक ठिकाणी कचरा करताना किंवा सार्वजनिक वास्तूंवर नावे कोरताना दिसतात तेव्हा नक्की समजदार कोणाला म्हणावे असा प्रश्न पडतो.
  असे सुशिक्षित अडाणी पण स्वतःला समजदार नागरिक म्हणणारे आपल्याला गल्लोगल्ली दिसतील. स्वतःच्या घराला लागून रस्ता असल्यास रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करणारे, बाजूला सार्वजनिक मोकळ्या जागेवर अतिक्रमण करणारे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेदरकारपणे वाहने हकणारे, इतकेच कशाला रांग मोडून पुढे जाणारे,रस्त्यावरच गाडी पार्क करून खुशाल बाजार हिंडणारे अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील.मग प्रश्न पडतो 'सार्वजनिक ठिकाणी नियम पाळण्याचे महत्त्व ' मुद्देसुदपणे  लेखन करणाऱ्या प्रगाढ पंडितांपेक्षा काटेकोरपणे नियम पाळणारे अशिक्षित अडाणी परवडले!
 लोकशाहीने  ज्या पद्धतीने काही हक्क दिले आहेत तसेच काही कर्तव्येही सांगितलेली आहेत. हक्क आणि कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.मात्र याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसून येतो. स्वतःच्या हक्कांसाठी तावातावाणे भांडणारे कर्तव्याची वेळ येते तेव्हा मात्र त्याकडे बऱ्याचदा पाठ फिरवताना दिसतात.आपल्या कुटूंबाची काळजी घेणे आणि ती घेत असतानाच सामाजिक बांधिलकी ठेवणे हे देखील सुजाण नागरिकांचे कर्तव्ये आहे.पण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना त्रास होईल असे वर्तन करणाऱ्या कितीतरी व्यक्ती आपल्याला समाजात दिसतात .स्वतःच्या आई वडिलांसह आपल्या भावंडांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे कितीतरी बेजबाबदार नागरिक आपल्याला दररोज दिसतील.
  खरे तर सुजाण नागरिक असणे हे निकोप लोकशाहीचे वैशिष्ट्ये आहे.असे समजदार नागरिकच आपल्या कुटुंबासह,गावाचाच नव्हे देशाचा खऱ्या अर्थाने उद्धार करू शकतात. पण स्वाभिमान गहाण ठेऊन काही क्षुल्लक पैशाच्या लोभापायी आपली मते विकत देणाऱ्या तथाकथित पांढरपेशा लोकांनीच लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू केलं आहे.
  एरव्ही लोकप्रतिनिधींच्या  नावाने शिमगा करणारे मतदानाच्या वेळी मात्र मस्त पैकी सुट्टी एन्जॉय करत मतदानाकडे पाठ फिरवतात.मतदान करणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे हेच विसरले जाते...! सुजाण नागरिकत्वाचे धडे इतरांना देण्यापेक्षा त्याची सुरुवात स्वतः पासून करण्याची गरज आहे.  प्रत्यक कृती करत असतानाच त्या कृती बद्दल स्वतःच्या मनाला योग्य अयोग्य असा प्रश्न पडणे, सार्वजनिक जीवनात स्वयंशिस्त राखणे,आपल्या सामाजिक ,व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील कर्तव्ये काटेकोरपणे पाळणे, स्वहित लक्षात घेण्यापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य देणे,नेमलेले काम सचोटीने ,श्रध्दा पूर्वक व प्रामाणिकपणे पूर्ण करणे,आपल्याकडून जाणीवपूर्वक दुसऱ्यावर अन्याय होणारी कृती न करणे इत्यादी  गोष्टीचे पालन करणारी व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने समजदार नागरिक म्हणावी लागेल.या सर्वच गोष्टींचे पालन करून चला सुजाण नागरिक होऊया....आणि लोकशाही बळकट करून आदर्श देश घडवूयात!!
         डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
(08) 
*समझदार नागरिक*
        खरंच, वंदे मातरम् म्हणायचं कुणी ? भारतमातेचे गुणगान करायचे कुणी ? पान खाऊन रस्त्यावर थुंकायचं अन् भारतमाता की जय म्हणायचं ! वर पुन्हा, आपला देश कसा घाणेरडा आहे, बेशिस्त आहे, असं म्हणत नाकं मुरडायची. मग अर्थ काय उरतो देशभक्तीच्या बाता हाणण्यात? या देशातल्या प्रत्येक नागरिकाला विदेशाचं आकर्षण आहे. तिथली स्वच्छता, तिथला झगमगाट, तिथली श्रीमंती, ती शिस्त, त्यांनी साधलेली तंत्रज्ञानातली ती नेत्रदीपक प्रगती... या सार्याचेच अप्रूप असते इथे सर्वांना. तिथल्या कठोर नियमांचं आणि त्याच्या काटेकोर पालनाचंही मग कौतुक थांबता थांबत नाही. फक्त सुई आपल्या देशावर येऊन थांबली की मात्र तंत्र बिघडते. मग तो कायद्याचा दंडकही नको असतो नि स्वच्छतेचा आग्रहही. भ्रष्टाचारमुक्त राजकारणाची, पारदर्शी कारभाराची तर्हा, त्यांची त्यांच्या देशात. त्याचं तोंड भरून कौतुक करायला ना नाहीच कुणाची.
पण, आपल्या देशात मात्र "चलता हैं सब कुछ," असं म्हणत आपल्या बेछूट वर्तनाचं निलाजरेपणाने समर्थन करत राहायचं अन् तुलना मात्र त्यांच्याशी करायची. अपेक्षा मात्र स्वच्छ, चारित्र्यवान, महान, कर्तबगार, भ्रष्टाचारमुक्त देशाची करायची... चालेल असं? कसं चालेल, सांगा!
समजदार नागरिक ही देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे. जर देशातील नागरिक हे जबाबदार आणि सभ्य असतील तर देशाचाच विकास होऊ शकतो. एक समजदार नागरिक हा एक सर्वात प्रथम एक आदर्श व्यक्ती असतो.
तसेच समजदार नागरिक हा आपल्या समाजाचा पाया आणि गौरव असतो. या नागरिकांकडे अनेक गुण  असतात. आदर्श व्यक्तीची वागणूक ही केवळ दुसऱ्या व्यक्ती बरोबर असणारा व्यवहार आणि देशासाठी असलेले प्रेम यातून दिसून येते.
समजदार नागरिक हा प्रत्येक देशाचा आधार आणि सौंदर्य असते. त्याच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल देशप्रेम असते.
समजदार नागरिक हा आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो. त्याला आपल्या देशाबद्दलच्या त्याच्या कर्तव्याची त्याला जाणीव असते. तसेच ते नेहमी आपल्या देशाच्या विकासासाठी कोणतेही कार्य करण्यास तत्पर असतात. 
समजदार नागरिकाचा अर्थ –
समजदार नागरिक म्हणजे एक देशवासी ज्याचा व्यवहार देशातील लोकांच्या हितामध्ये असतो.
ईमानदारीची भावना असे अनेक गुण असतात. आपल्या देशाचा विकास करण्यासाठी ईमानदारी असणे खूप गरजेचे आहे. एक समजदार नागरिकांमध्ये ईमानदारीची भावना असते. हे ऑफिसचे काम असो किंवा अन्य कोणत्याही कामामध्ये ईमानदारी बाळगतो. 
एक समजदार नागरिक हा सुशिक्षित आणि जागरूक असतो. हे आपल्या देशातील लोकांचे आणि देशाचे भले करण्यासाठी प्रयत्न करत असतो.  त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना ही भरलेली असते.
संकटाच्या वेळी सुद्धा तो आपल्या मातृभूमीसाठी आपले प्राण देण्यास सुद्धा तयार होतात. सर्वांसोबत मिळून राहणे, गरीब लोकांना मदत करणे आणि कल्याणकारी वृत्ती ही एखाद्या चांगल्या समजदार नागरिकाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.
देशाच्या समृद्धीसाठी योगदान
एक समजदार नागरिक म्हणून लोकांच्या हित हेच आपले हित मानतो. एक समजदार नागरिक हा सहनशील, संयम ठेवणारा, खरे बोलणारा, कष्टाळू असतो.
तो कोणावरही भार ठेवत नाही. तो स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाचे पालन – पोषण करतो तसेच देशाच्या समृद्धीसाठी आपले महत्वपूर्ण योगदान देतो.
नैतिक आणि धार्मिक - 
 हा अन्याय, हिंसाचार, बेईमानी, फसवणूक, भ्रष्टाचार इ सर्व गोष्टींना विरोध करतो.   हा खरोखरच नैतिक आणि धार्मिक असतो. तो सर्व धर्मांचे आणि पंथांचे पालन करतो. तो इतर धर्माच्या आणि पंथातील लोकांच्या उत्सवामध्ये सहभागी होतो.
शिस्तेचे पालन करतो. हा नेहमीच आपल्या इच्छेनुसार शिस्त पाळतो. तो आपल्या कर्तव्यांबद्दल नेहमी सतर्क असतो.
समजदार व्यक्ती हा सहिष्णुता, आत्मविश्वास आणि देशभक्ती दर्शवितो.  हा देशाच्या सर्व नियमांचे पालन करतो.
आपल्या स्वार्थासाठी कधीच कार्य करत नाही. त्यांचे मुख्य लक्षण हे त्याचा देश आनंदी आणि समृद्ध करणे हाच असतो.
आपल्या भारत देशामध्ये असे काही महान व्यक्ती होऊन गेलेत. जसे की महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, शिवाजी महाराज इ अनेक महान व्यक्ती आज या जगामध्ये नाही आहेत.
परंतु आपल्या देशासाठी ते एक आदर्श व समजदार नागरिक होते. त्यांनी आपल्या देशासाठी जे कार्य केले आहे ते कार्य अन्य कोणीही करू शकत नाही. म्हणून एक समजदार नागरिक बनण्यासाठी या आदर्श व महान पुरुषांचे सर्वगुण प्राप्त केले पाहिजेत. तेव्हा आपण एक समजदार नागरिक बनू शकतो.
निष्कर्ष:
देशातील प्रत्येक व्यक्तीने एक समजदार नागरिक होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच देशाबद्दलची आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी.
प्रत्येक व्यक्तीने अहिंसा करू नये आणि कोणत्याही संकटाच्या वेळी लोकांची मदत केली पाहिजे. आपण आपली संस्कृती ही टिकवून ठेवली पाहिजे आणि आदर्शवादी झाले पाहिजे. जेव्हा देशातील सर्व लोक हे समजदार नागरिक बनतील तेव्हाच आपला देश महान बनू शकेल.
_________________________
*महेंद्र सोनेवाने*
*गोन्दिया*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 *समजदार नागरिक*
*✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)*
           समाजातील प्रत्येक समजदार नागरिकाने जनतेचे हीत लक्षात घेऊन वर्तन करायलाच पाहिजे.मानवाची वृत्ती जरी स्वार्थी, लोभी असली तरी समाजात समजदार व्यक्ती असलेल्या व्यक्तिमत्वाची कमी नाहीच.भारत देश हा खेड्यामध्ये वसलेला आहे.खेड्याचा विकास म्हणजे देशाचा विकास होय त्यासाठी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी समजदार नागरिकांची अत्यंत गरज आहे.समजदार नागरिकांचे वर्तन देखील शुद्ध,निर्मळ, पवित्र असतेच त्याच्या वागण्यात एखाद्या व्यक्तीविषयी किंतु-परंतु मुद्दाम ठेवलेला नसतो.भारतीय संविधानामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क,कर्तव्य दिली आहेत.समजदार नागरिक हक्कासोबत कर्तव्याची देखील योग्य पद्धतीने जपणूक करून आचरण करीत असते.कुटुंबात देखील सासू-सून,पती-पत्नी,भाऊ-बहीण,बाप-लेक यांच्यात असलेला दुरावा दूर करून गोडवा निर्माण करण्यासाठी असलेली तडजोड स्वतःहून करीत असतो.जेणेकरून कुटुंब,समाज,गाव यात होणारा भेद होऊ नये आणि वाद विकोपाला जाऊ नये यासाठीचे समजदार व्यक्तीचे आचरण इतरांसाठी खरोखरच प्रेरणादायी,मार्गदर्शक ठरणारे असतात.
       'जगा आणि जगू द्या' हा त्यांच्या जीवनाचा अंगभूत घटक असतो.समजदार नागरिक स्वतःची वैयक्तिक काळजी ज्याप्रमाणे घेतो त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्याची देखील काळजी घेण्यास अग्रेसर ठरत असतो. 'sound mind in sound body' चांगल्या शरीरात चांगले मन वास करीत असते.स्वच्छतेचे महत्व पटवून देतो.अस्वच्छतेने होणाऱ्या आजारांची सर्व समाजातील नागरिकांना जागृत करतो.समाजातील दुर्बल,वंचित घटकांना न्याय मिळवून देतो.शासकीय योजना व त्याचा इतरांना होणारा लाभ याविषयी मार्गदर्शन करीत असतो. शेती व शेतीसंबंधीत शासनाच्या योजना यात बळीराजाचे होणारे फायदे यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असतो.कोणत्याही व्यक्तीचा त्यांच्या मनात वाईट विचार येत नसून इतरांचा भला तोच आपला भला या नात्याने सर्वोपरी कार्यरत असतो.
           सार्वजनिक संपत्तीचे जतन करण्यासाठी इतरांना प्रोत्साहीत करीत असतो.सध्या तरुणाई मध्ये मोबाईलचे खूप मोठे आकर्षण आहे.जेवढा या मोबाईलचा फायदा आहे तेवढाच दुरुपयोग देखील होऊ शकतो त्यामुळे तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या व्यक्तींना त्यापासून परावृत्त होण्यासाठी समजदार नागरिक म्हणून कार्य करतो.'अती तिथे माती' या म्हणीप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो याची प्रचिती व अनुभवाच्या आधारे मत व्यक्त करू शकतो.वाम मार्गाकडे मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तीला समजदार नागरिक या नात्याने वठणीवर आणून चांगल्या मार्गाने जाण्याचा रस्ता दाखवीत असतो.समजदार नागरिक गावातील वेगवेगळ्या कारणाने होणारी भांडणे सोडविण्यासाठी नेतृत्व,तडजोड करून पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ देत नाही.कुटुंबासारखेच इतरांना देखील मार्गदर्शन करीत असतात.
कधी कधी दुकानदार देखील अवाजवी भावाने मालाची विक्री करीत असतांना त्यांना जॉब विचारण्याचे धाडस समजदार व्यक्तिमध्येच असतात त्यामुळे शिक्षण व अनुभूती याची योग्य सांगड असायला हवी.
       आज महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास 'भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली एक कीड आहे'.यासाठी कोणतेही काम करावयाचे असल्यास पैशाची देवाण-घेवाण न करता काम केले पाहिजे हा अट्टाहास नेहमीच असतो.अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथील रहिवासी असलेले पद्मभूषण अण्णा हजारे यांचा नामोल्लेख करता येईल.समाजावर अन्याय होत असल्यास वेळीच जनतेची,समाजाची बाजू मांडून समजदार नागरिकांची छाप सोडली आहे.आपला खेडा 'सुजलाम सुफलाम' करण्यासाठी झटणारे दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे पोपटराव पवार यांचे देखील वर्तन समजदार,जागरूक नागरिक म्हणून घेतल्या जाते म्हणून प्रत्येकाने सजग राहून समजदार पद्धतीने दुसऱ्याला वाईट न संबोधता,आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही या पद्धतीने सर्वांनी वागण्याचा प्रयत्न करू या.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*सुजाण नागरिक घडविण्याचे केंद्र- शाळा*
*(09)*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
          सामाजिक जीवनात अनेक ठिकाणी आपण, आपल्या काही सामाजिक जबाबदा-या पार पाडतो का? आपल्या आजूबाजूला आपण ब-याच वेळा चिमुकल्यांना विविध ठिकाणी राबताना पाहतो. काम करण्याचे वय नसतांना अनेक धोकादायक आणि कठीण कामे त्यांना करताना पाहतो. आपल्यापैकी किती जण या विरोधात आवाज उठवतात? एकीकडे लहान मुले म्हणजे *‘देशाचे आधारस्तंभ*’ म्हणायचे आणि दुसरीकडे याच ‘आधारस्तंभांना’ राबताना पाहून गप्प बसायचे, हे कितपत योग्य वाटते? आपण ‘जबाबदार नागरिक’ असाल तर आपल्या आजूबाजूला असलेल्या एनजीओंना, सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती नक्कीच दिली पाहिजे.. एक ‘जबाबदार नागरिक ’ म्हणून आजूबाजूला दिसणा-या अशा काही चुकीच्या गोष्टींची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात अगदी निर्धास्तपणे दिली पाहिजे किंवा तसे करण्यास भीती वाटत असेल ,तर अनेक पत्रकार, एजनीओ आपले नाव गुप्त ठेवून त्या विरोधात त्यांच्या परीने लढा देतात. आवश्यकता आहे ती आपण एक ‘जबाबदार नागरिक’ म्हणून पुढे येण्याची.        
         सध्या भारत व जगभर पसरत असलेल्या कोव्हिड-१९ (कोरोना व्हायरस)चा संसर्ग एकमेकांना होऊ न देण्यासाठीआपण जबाबदार नागरिक म्हणून  काळजी घेणे सद्य परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहे . यासाठी
१. दोन व्यक्तीमध्ये १ मीटर अंतर राखून व्यवहार  करणार.
२. आपली थुंकी हवेत उडू देणार नाही.
३. रस्त्यात किंवा इतर ठिकाणी थुंकणार नाही .
४. स्थानिक सरकारकडून घालून दिलेल्या सगळ्या अटी ,शर्थी ,नियम व कायद्यांचे काटेकोर पालन करणार.
.            माझी शाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला जि.प.गोंदिया येथील वर्गात नागरिकशास्त्राचा तास चालू  असतांनाचा माझा अनूभव  आहे.        मुले शिकण्यात रंगून गेली होती. शिक्षक उत्साहाने शिकवत आहेत.. असं दृश्य काल्पनिक वाटतं ना? बरोबरच आहे. अभ्यासक्रमांतील काही विषय शिकणे मुलांसाठी अगदीच कंटाळवाणे असते आणि म्हणूनच असे विषय वर्गात शिकवताना शिक्षक म्हणून खरी कसोटी लागते. असाच कसोटी पाहणारा एक विषय म्हणजे नागरिकशास्त्र. यातले सारे धडे मुलांना उपदेशपर वाटतात. त्यातील शासनव्यवस्थे विषयक धडे निरस वाटतात (म्हणजे ते तसे असतातही!). एक तर आपल्या भारतात  लोकशाही,  यात राष्ट्र, स्वातंत्र्य, हक्क  कर्तव्ये इ.. अमूर्त संकल्पना भरपूर असतात. त्या समजावून सांगताना भाषणबाजी केली की, मग वर्गात जांभयांचे देणारे  भरघोस पीक उत्पादित येणारच.
         लोकशाही हा विषयशिकवताना निवडणुका का अपरिहार्य आहेत?, त्या कशा पद्धतीने होतात? अशी चर्चा सुरू झाल्यावर मी  मुख्याध्यापक या नात्याने पाचवी ते सातवीच्या वर्गप्रतिनिधींच्या निवडणुका जाहीर केल्या. तशा निवडणुका बहुतेक सर्वच  वर्ग व शाळांमध्ये होतातच, पण मी हा विषय नुसता प्रतीकात्मक निवडणुकांपुरता ठेवायचा नाही, असे ठरवून त्याला अभ्यासाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करायचे  मनी ठरवले. उमेदवार ठरवणे, सूचक- अनुमोदक, बोधचिन्ह, मतदान, मतमोजणी, अंतिम निकाल या सर्व पाय-यांवर टप्याटप्याने चर्चा झाली. त्यानुसार मुलांनी अर्ज भरले. स्वत:ची चिन्हे ठरवली. कल्पकतेने वर्ग-वर्गात प्रचार केला. हक्क आणि कर्तव्य यावरील चर्चेच्या वेळी आम्हाला शाळेत कोणते हक्क आहेत व आमची कर्तव्ये काय आहेत, याची मुलांनी एक यादीच केली. त्यातून त्यांना जबाबदारीची जाणीव झाली. शिवाय वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्यांनी कर्तव्य बजावले नाही, तर काय करावे, याचाही विचार करण्यात आला. सरते शेवटी आमच्या  शाळेच्या  निवडणुका मजेत पार पडल्या.
           याच वेळी महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या होत्या . त्या दिवाळीच्या सुटीत असल्याने या वर्षी पाचवी ते सातवीच्या मुलांना दिवाळीच्या सुटीत विधानसभा निवडणुका हाच विषय अभ्यासासाठी दिला. त्यासाठी त्यांना त्यांच्या इयत्तेनुसार प्रश्नही काढून दिले. ‘पालकांची मदत लागली तर घेऊ शकता, पण स्वत: वृत्तपत्र, टी.व्ही., रेडिओ यांचा वापर करून  माहिती जाणून घ्या’, असे सांगितले. बरीच मुले सुट्टीत गावी जातात. त्यांना तिथेही हा अभ्यास करता येणे शक्य होते. प्रश्नावलीत ‘ही कितवी विधानसभा निवडणूक आहे,?तुझ्या मतदारसंघात कोण उभे होते,? त्यांची  बोधचिन्ह निशान काय ?  त्यांनी प्रचार कसा केला?  प्रत्यक्ष निवडणूक कधी झाली? कोण निवडून आले? कोणाला सर्वाधिक जागा मिळाल्या? सत्ताधारी पक्ष म्हणजे कोण? विरोधी पक्ष म्हणजे काय? मुख्यमंत्री कोण झाले? मंत्रिमंडळ केव्हा स्थापन झाले? कुणाला काय खाती मिळाली?’ यासारखे अनेक प्रश्न होते. मुलं सुट्टीभर सर्व साधनांचा वापर करून उत्साहाने माहिती मिळवत होती. यामध्ये मुद्दामच पालकांचा सहभाग असावा, असे सांगितले होते.
सुट्टीनंतर मुलं शाळेत आली तेव्हा समजले की, सुरुवातीला पालकांचा प्रतिसाद नकारात्मक होता. ‘तुला काय कळणार आहे राजकारणातलं? राजकारण म्हणजे घाणेरडा विषय, त्यावर कशाला बोलायचं?’ एवढया लहान वयात कशाला पाहिजे ?अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या होत्या, पण मुलांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि पालक मुलांशी बोलायला लागले.  प्रसारमाध्यमांचाही मुलांनी चांगला उपयोग केला. सर्व माहिती स्वत:च जमवल्याने त्यांना हा विषय वर्गात न शिकवताही उत्तम समजला‘   सुट्टीत कशाला हो  अभ्यास’?, असे म्हणणा-या मुलांनी सर्वात आधी आपला प्रकल्प सादर केला! त्यात त्रुटी एकच होती, ती म्हणजे मंत्रिमंडळ जाहीरच झालेले नसल्याने मुलांचा एक प्रश्न अपुरा होता. अर्थात त्यात त्यांचा काही दोष नव्हता. मराठीतून शपथ घेणे, त्या वेळी झालेली मारामारी. यावरही वर्गात हिरीरीने चर्चा झाली. हा रूक्ष विषय पाहता-पाहता एवढा बोलका ,परिणाम आणि रोचक बोलका झाला,की मुलांच्या प्रकल्पाच्या वह्या अगदीच सज्ज झाल्या .
          मुलांनी केवळ निवडणुकीचीच माहितीच मिळविली नाही तर आई-वडिलांना मतदान करण्यास प्रवृत्त केले. *मी मतदान करणारच*म्हणून मुलांनी पालक,आजी-आजोबा आणि गावातील सर्व अठरा वर्षावरील  नागरिकांचे *संकल्प पत्र* भरून आणले  . सहावी,सातवीच्या मुलांनी विचारपूर्वक उत्तरे लिहिली, शिवाय स्वत:ची मतेही मांडली. उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा, पैसे देऊन मत विकत घेऊ नये, लाऊडस्पीकरचा वापर कमी करावा, अशी मते मुलांची या विषयाबाबतची सजगता दर्शवणारी होती. या प्रकल्पातून आम्हाला काय मिळाले, याचा विचार केला तर "ही मुले लहान आहेत, यांना काय कळते", हा आमचा आणि पालकांचा भ्रम दूर झाला. मुलं टी.व्ही.वर बातम्या पाहू लागली. वर्तमानपत्रे वाचू लागली. दैनंदिन घडामोडींची माहिती आपल्याला असायला हवी, हे त्यांना पटले. सहावीतल्या हर्षाने तर तिच्या घराजवळील मैदानात खेळतांना होणा-या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविषयी त्या भागातील ग्रामपंचायत सदस्याकडे  तक्रार करून त्यांचा बंदोबस्त केला! हा प्रश्न घरापर्यंतही जाऊ न देता मुला-मुलींनी स्वत: सोडवला. यापेक्षा नागरिकशास्त्र हा विषय मुलांना चांगला समजला याची कसोटी कुठली असू शकेल?
          पालक ब-याचदा मुलांशी राजकारणाबद्दल चर्चा करत नाहीत. तसं न करता मुलांना राजकारणाबद्दल समजेल अशा भाषेत माहिती द्यायला हवी. निवडणुकीच्या प्रचारसभांना त्यांना घेऊन जायला हवं. याबाबत पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. वृत्तपत्र वाचन, टी.व्ही.वर बातम्या बघणं या गोष्टींमध्ये मुलांना आवर्जून सहभागी करून घ्यायला हवं. दैनंदिन घडामोडींची माहिती मुलांना द्यायला हवी. त्यांनी पुढाकार घेऊन एखादी गोष्ट केली तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. त्याच्यातील नेतृत्वगुणांना वाव द्यायला हवा. त्यातूनच सुजाणआणि जबाबदार  नागरिकांची निर्मिती होईल यात तीळमात्र शंका  उरणार नाही.   देशाला सुजाण नागरिक घडविणारा कारखाना -शाळा नक्कीच ठरेल
लेखिका 
*सौ यशोधरा सोनेवाने गोंदिया*
  *(9420516306 )*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
    .  सुजाण नागरिक..
सुजाण नागरिक ही एक भारतासाठी नाही तर जगाला सुजाण नागरिक ही एक महत्वाची संकल्पना आहे सुजाण म्हणजे सर्व गोष्टींची जान असणारा.सुसंस्कृत आपण लहान मुलांना. भारत स्वातंत्र्य झाल्या पासून दररोज परिपाठ मध्ये ,,"भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.माझ्या देशावर माझे प्रेम आहे. असे दररोज मुलांकडून लहान पणापासून म्हणून घेतो पण  पण प्रात्यक्षिक संकल्पना रुजवत नाही .आणि त्याची पोपट् पंची होते.तेंव्हा लाहांमुळे जेंव्हा दैनिनंदिन जीवनात कार्य करत असतात तेंव्हाच या संकल्पना लहान बाळात रूज वावे लागतात.खूप लोक असे आहेत की खूप शिकलेले आहेत.नागरिक शास्त्र ,जीवशास्त्र,मानसशास्त्र, 
समाजशास्त्र, अशा विविध विषयात भरपूर गुण घेऊन डिग्री प्राप्त केलेली असते पण प्रत्यक्षात मात्र अनुकरण करत नसतात.समाज शास्त्रात चांगले गुण घेणारे  एखाद्या सार्व जनिक रांगेत लागा म्हटल्यास ते रांगेत न लागता आपले काम करण्यासाठी मधल्या कलुरिप्तीचा शोध घेण्यात वेळ घालतील पण रांगेत उभे राहण्यात वेळ घालत नाही.दररोज हरी पाठ भजन करणारे महाराज सार्व जनक स्थळी रांगेत लगण्या साठी कमी पणा दाखवेल. शस्त
.          भारत हा सुजाण सोज्वळ नागरिकांचा संस्कृत भारत आहे.त्यात भारताच्या नागरिकाचे रक्तच शांत आहे.महाराष्ट्रात अनेक महान संतांनी जन्म घेतला म्हणून महाराष्ट्राला संताची भूमी म्हटले जाते.महाराष्ट्राला संताची वंश परंपरागत संस्कृती लाभलेली आहे.राष्ट्र संत तुकडोजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज,संत गाडगेबाबा,अशा महान संतांनी ,पूर्ण आयुष्य समाज घडवण्यासाठी घातले आहे.त्यात समाजात अनेक अमुलाग्र बदल घडून आला.त्याच बरोबर शिक्षणाची मूल्ये रुजाऊन काही बदल घडून येत आहे .भारतात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत .विविध भाषिक असून सुद्धा प्रेमाने राहतात .हाही एक सुजाण नागरिकाचा भाग आहे.काही जात धर्मात वादविवाद जरी घडून आले तरी मध्यस्थी करून सोडवल्या जाते
   कोणत्याही व्यक्तींचे  एखाद्या कुटुंबात जन्म घेने हे नैसर्गिक असते पण त्या बालकाची जडण घडण ही समाज प्राकृतिक आहे.प्रत्येक कुटंबातील व्यक्ती जर समजदार असेल तर प्रत्येक कुटुंबाची प्रगती होईल ,प्रात्यक गावात समजदार व्यक्ती असेल तर गावाची प्रगती होईल,व सगळी कडे शांतता लाभेल.कारण शांतता ही काळाची गरज आहे.समजदार नागरिक जगाची खरी संपत्ती आहे.प्रत्येक गाव खेडे भागात समजदार व्यक्ती असतो.त्याच्या कडे कोणाचेही वाईट न होण्याची ,सर्व समाजाचे चांगलं पाहण्याची तसेच समजदार व्यक्तींचे आधी दुसऱ्याचे भले होईल व मग  आपले बरे व्होईल अशी बुद्धिमत्ता असते.तसेच चांगल्या व्यक्तीचे अंतःकरण शुद्ध असते.अशा व्यक्ती पासून कुणाचीही फसवणूक होत नाही.अशी व्यक्ती समाजातील प्रत्येक घटकाला हवी हवी सी वाटतात व अशा व्यक्तीच्या सहवासात गेलेले सारे लोक सुधारतात.असे व्यक्ती संयम ठेऊन आपले कार्य करत असतात .अशा व्यक्तीचे व्यक्िमत्त्व विकास घडून आलेले असते.
  म्हणून सर्व नागरिकांच्या मनात एकमेका विषयी आपुलकी,प्रेम,अस्था, संकटकाळात मदत करणे .माणुसकीचा मंत्र जपने,अशा भावनांचा सर्व लोकांचा विकास झाल्यास भारत देशाचा जागतिक पातळीवर एक वेगळा ठसा उमटवला जाईल.........
जीवन खसावत  भंडारा 
9545246027
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 समजदार नागरिक होऊ या
माणूस एकटा किती काळ जिवंत राहू शकतो ? याचे उत्तर फार काळ जिवंत राहू शकत नाही, समुहात राहिला तर जास्त काळ जिवंत राहू शकतो. म्हणूनच फार पूर्वीपासून मनुष्य वस्ती करून समुहात राहत होता, असे दिसून येते. समुहात राहायचे असेल तर समूहाचे काही नियम ठरवले जातात आणि त्याचे पालन करावे लागते. नियमाचे पालन केले नाही की वाळीत टाकले जाते, त्या व्यक्तींना कोणी काही मदत करत नसे असे चित्र पूर्वीच्या काळात होते. आज असे चित्र कुठे ही दिसत नाही म्हणजे समूहाचे काही नियम नाहीत, असे नाही. तर आज व्यक्तीला स्वनियम तयार करून समुहात आपली नाचक्की होणार नाही असे वर्तन करत असतो. जी व्यक्ती बेजबाबदारपणे वागते त्याला समूहाकडून वेळीच ताकीद दिली जाते किंवा शिक्षा केली जाते. आपला कुटुंब आणि परिवार याची समाजात प्रतिष्ठा राहावी, मानसन्मान राहावा आणि पत राहावी म्हणून माणूस जागरूकपणे वागत असतो. देशाला अश्याच समजदार नागरिकांची खरी गरज असते. जपान देशातील लोकं खूप कष्टाळू आहेत अशी त्यांची ख्याती तेथील समजदार नागरिकांच्या वर्तनावरून सांगितली जाते. भारत देशातील लोकं जबाबदारीने वागत नाहीत अशी आपल्या लोकांची प्रतिमा बाहेरच्या देशात का निर्माण झाली असेल तर ते ही आपल्या वागण्यावरून. एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या देशात लोकशाहीने काही हक्क आणि कर्तव्य दिले आहेत. आपण आपल्या हक्कावर नेहमीच दावा सांगतो त्याचवेळी आपले कर्तव्य मात्र साफ विसरतो. देशाची प्रतिमा मालिन होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. सरकारने तयार केलेल्या अनेक नियमांची आपल्या हातून पायमल्ली होते. कधी कधी आपण सरकारने तयार केलेले कायदे कलम लक्षात न घेता वर्तन करत असतो त्यामुळे समजदार नागरिक ठरू शकत नाही. घरात शांती आणि समृद्धी राहावी म्हणून कुटुंबप्रमुखांच्या नियमाचे पालन आपण करतो म्हणून तर घरात वातावरण सुरक्षित आणि आनंदी असते. त्याच पद्धतीने देशाचे काही नियम असतात आणि त्याचे पालन केल्यास देशात देखील आनंदी व समृद्धीचे वातावरण दिसू शकते. शालेय जीवनात सर्वाना नागरिकशास्त्र विषयातून बरीच बारीकसारीक माहिती दिली जाते. ती सर्व माहिती परीक्षेतील मार्कापुरते मर्यादित ठेवल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण होत आहे. आपण किती नियमाचे पालन करतो हे कोरोना संकटाने दाखवून दिले आहे. मी माझ्या मनाचा राजा आहे, माझे जीवन मी कसे ही जगतो अशी विचारधारा देशाला तर कधीच पुढे नेणार नाही. ते तर सोडा, या वृत्तीमुळे व्यक्तीचा देखील विकास होत नाही. आपण टाकलेले एक जबाबदारीचे पाऊल दुसऱ्यासाठी जीवनदायी ठरू शकते. या सकारात्मक विचाराने देशातील प्रत्येक नागरिक वागला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आपणाला यापुढे कोरोना सोबत जगावे लागणार आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायचे असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे काही नियमावली तयार केली आहे त्याचे तंतोतंत पालन करावे लागेल. तेंव्हाच खरे आपण समजदार नागरिक बनून आपल्या सोबत इतरांना जिवंत ठेवू शकू. म्हणून आता तरी जागे होऊ या आणि समजदार नागरिक बनू या. 
- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 मी , समजदार नागरिक!!
          'आधी केले, मग सांगितले' अशी मी एक समजदार, जबाबदार नागरिक म्हणून वागते का? असा प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का? उत्तर नका सांगू!!
          मला चांगली नोकरी मिळाली. माझं बाळ तान्हे आहे. घरात सासूबाई आहेत. पण त्यांना सबंध दिवस बाळाला सांभाळणे जमले नसते. एखादी बाई घरात बाळासाठी ठेवावी म्हणून मी तिच्या शोधात होते. एक मुलगी आली. मोठी दिसत होती. पगार ठरला आणि "उद्यापासून ये", असे मी तिला सांगितले. तेवढ्यात मी तिला वय विचारले. ती 14 वर्षाची होती. नकळत तिला कामावर ठेवून मी कायद्याचे उल्लंघन करणार होते. तिच्या शिकण्यावर, खेळण्यावर, नकळत मी गदा आणणार होते. मनाला एक प्रश्न विचारला जिथे बालकामगार दिसतात, तिथे कधी मी जाऊन चौकशी केली आहे का? माझ्या कर्तव्याला जागले आहे कधी?
             नगराचा रहिवासी तो नागरिक. ह्या नागरिकाला राजकीय दर्जा प्राप्त झाला की नागरिकत्व मिळते. त्या नगराचे शासन व्यवस्थित चालावे, नागरिकाला गुन्हेगारी पासून संरक्षण मिळावे, इत्यादी गोष्टींसाठी शासन संस्थेने काही नियम कायदे करुन नागरिकावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत त्याचे पालन करणे समजदार, जागरुक नागरिकाचे कर्तव्य आहे.
             कर्तव्या बरोबर हक्क आलाच. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू. 'अंगणात खेळणे' हा हक्क आहे. पण 'फार गोंगाट न करणे' हे माझे कर्तव्य आहे. हा कर्तव्य आणि हक्कातील फरक. सामाजिक नैतिकते मध्ये कायद्याचा अंतर्भाव आता रूढ होऊ लागला आहे. साधारणपणे माणूस हक्काबद्दल कर्तव्य बजावण्यापेक्षा जास्त जागरूक असतो.
            एक समजदार नागरिक म्हणून ओला व सुका कचरा वेगळा करते. प्लास्टिकच्या पिशव्या, काचेच्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या एकत्र करून कचरा नेणार्‍या महिलांना मी देते. ओला कचरा शक्यतो मी आमच्या बागेतल्या खड्ड्यात टाकते. त्याचे चांगले खत बनते.
        प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळते. कुणालाही बुके देण्याऐवजी मी तुळशीचे किंवा फुल झाडाचे रोप नेहमी देते. वटपौर्णिमेला वडाच्या फांद्या तोडत नाही. उलट कुठेतरी जाऊन वडाचे रोप लावते.
         आमच्या घरी शाडूच्या मातीने बनवलेली गणपतीची मूर्ती आणली जाते. ती आम्ही आमच्या अंगणात मोठ्या बादलीत विसर्जन करतो. निर्माल्य बागेतच खड्ड्यात टाकतो. प्रदूषण कमी करण्यात हा माझा खारीचा वाटा असतो.
           15 ऑगस्ट, 26 जानेवारी, या दिवसाचे महत्त्व पटवून देऊन, मी माझ्या मुलांना त्या कार्यक्रमांना जाण्यास प्रोत्साहित करते. जेणेकरून देशाप्रती त्यांची निष्ठा वाढेल. राष्ट्रगीत ऐकताच मी स्वतः जेथे असेल तेथे थांबते. राष्ट्रध्वजा विषयी, देशाविषयी माझी निष्ठा मी प्रदर्शित करते.
          एक समजदार, जबाबदार नागरिक म्हणून मी समाजाचे काही देणे लागते, असे मी मानते. नोकरी, घर सांभाळून दरवेळी बाहेर जाऊन सामाजिक काम करणे जमतेच असे नाही. म्हणून घरबसल्या मी हे काम करते. मी अंध मुलांसाठी काम करते. आज अंध मुले युपीएससी-एमपीएससी, बीकॉम, बँकांच्या परीक्षा अशा सर्व परीक्षांना सामोरे जातात. त्यासाठी मी त्या अभ्यासक्रमाची पुस्तके रेकॉर्ड करते.  त्यांच्या CDs  बनवून त्यांच्यापर्यंत पोचवणारी 'यशोवाणी'  ही संस्था आहे.
         सध्या कोरोना बाबतीत मी माझे कर्तव्य बजावायचा प्रयत्न करीत आहे. दोन महिने मोलकरीण  कामाला येत नसूनही मी तिला पूर्ण पगार देते आहे. तिला दोन महिने पुरेल एवढे धान्य दिले आहे. शक्यतो मी घराबाहेर पडत नाही. पडले तर मास्क लावूनच बाहेर पडते. सारखे हात साबणाने धुते. एक दिवसाचा पगार मी मुख्यमंत्री फंडात जमा केला आहे. कुठे गेले तर सोशल डिस्टन्सिंग पाळते.
            एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करतेच करते. शक्यतो टाळत नाही. मी ज्या व्यक्तीला मत देणार असेल त्याच्या विषयी माहिती करून घेते आणि मग मत कोणाला द्यायचे ते ठरवते.
            पुण्याचा ट्रॅफिक सगळीकडे प्रसिद्ध आहे. 'ट्रॅफिकचे नियम न पाळण्यासाठी असतात' असा पुण्याचा अलिखित नियम असावा. 'पुढे ट्राफिक नसताना रेड लाईट असेल तर सिग्नल तोडून गेलेच पाहिजे'. मी हा नियम पाळत नाही. म्हणून मागून हॉर्न वाजवून लोकं बेजार करतात. जाता जाता असभ्य बोलतात. मी त्याकडे कानाडोळा करते. मला हवे तेच मी करते. ग्रीन लाईट लागल्याशिवाय मी हलत नाही.
          पचापचा फुंकणाऱ्या रिक्षावाल्यांशी माझे हमखास भांडण ठरलेले. त्यामुळे बरेचदा मैत्रिणी माझ्याबरोबर रिक्षातून येण्याचे टाळतात. पण काय करू? स्वभावाला औषध नाही.
         माझ्या समानतेवर विश्वास आहे. मी गरीब-श्रीमंत जात-पात ह्यात भेदभाव करत नाही. श्रावणातील शुक्रवारी, गौरी जेवणाला मी माझ्या मोलकरणीची ओटी खणा नारळाने भरते. सासू-सासरे, आई-वडील यांच्या श्राद्धाच्या दिवशी गरजू व्यक्तींना पैशाची मदत करते.
         कानाला फोन लावून वाहने चालवणे, सिग्नल तोडणे, गाडी भरधाव चालवणे, रस्त्यात खाल्लेल्या पदार्थांचे रॅपर्स टाकणे, कचरा टाकणे, रांगेची शिस्त न पाळणे, अपघात झाला की जखमी व्यक्तीला मदत न करता व्हिडिओ शूट करत बसणे, बिले, टॅक्स वेळेवर न भरणे, जिथे-तिथे वशिल्याने कामे करून घेण्याचा प्रयत्न न करणे, लाच न देणे असे कितीतरी कायदे पाळणे आपली जबाबदारी नाही का? हीच आपली माणसे परदेशात गेली की तिथे कणभरही न चुकता सगळ्या कायद्यांचे पालन करतात. मग आपल्या देशातच त्याबाबत इतकी उदासीनता का?
         माझा अनुभव असा आहे की पाश्चिमात्य देशात नागरिक अधिक जागरूक आहेत. मुलांमध्येही देशाप्रती निष्ठा अगदी ठासून भरलेली दिसते. तेथे कायद्याचे उल्लंघन कोणीही करताना दिसत नाही.
          फक्त आंदोलने करून, मोर्चा काढून, घोषणाबाजी करून, देशप्रेम दाखवायचे का? मला तर हा निव्वळ पोकळ आवेश वाटतो. मी जेव्हा नैतिकतेचे पालन करून, कायदे पाळून, एक उत्तम, समजदार, जबाबदार नागरिक बनेन तेव्हाच मी खऱ्या हक्काने म्हणू शकेन, 'जय हिंद, जय महाराष्ट्र'.

शुभदा दीक्षित (11)
पुणे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
समजदार नागरिक , सुजान नागरिक
माणूस हा समाजशील प्राणी आहे.
समाजात वावरताना माणसाने थोरामोठ्यांचा आदर करणे , सर्वांशी  मानसन्मानाने वागणे, लहानास न दुखावणे, सर्वांशी प्रमाणिकपणे वागणे या समजदारी च्या गोष्टी माणसांमध्ये असणे आवश्यक आहे. व्यक्ती आणि समाज जेव्हा विविध चांगल्या गुणांनी युक्त होतात तेव्हा समाजाचा विकास साधतो. याउलट सद्गुण लोप  पावून  दुर्गुण शिरले की समाजाचे पतन होते व प्रगती खुंटते. 
सुजान नागरिक म्हणजे ज्या गुणांमुळे, तत्त्वामुळे व्यक्ती समाज आणि विश्व यामध्ये परस्पर सुसंवाद साधून मानवाचा विकास होतो. असे सुजनात्व ज्या नागरिकामध्ये आहे तो नागरिक म्हणजे समजदार नागरिक  होय. आपण जीवनात कसं वागावं? तर सर्वांशी चांगलं वागावं. हे समजणे म्हणजे समजदार नागरिकाचे लक्षण होय. नम्रता ,सौजन्य , सभ्यता, शिष्टाचार आणि आर्जवता ही जीवनमूल्ये  ज्याच्या अंगी असते ती व्यक्ती समजदार व्यक्ती होय. सभ्यता आणि सौजन्य हे समजदारीचे दोन चक्षू आहेत. आपल्या जीवनात सर्वांशी मर्यादशील वागणं हे शिष्टाचार होय. ह्या शिष्टाचाराचे सुवर्णसूत्र ज्याच्यामध्ये आहे ती व्यक्ती सुजान नागरिक होय.सुजाणता म्हणजे सदाचाराचे वळण.ज्या
परिसरात आपण वाढतो व वावरतो त्या परिसरातील सामाजिक एकसंघता बाळगणे व टिकून ठेवणे तसेच निसर्ग प्राणी पक्षी यांचे संरक्षण व जोपासना करण्यासाठी प्रेरित होणे व साऱ्याबद्दल प्रेम,आपुलकी निर्माण होणे म्हणजे सुजान नागरिक होय. आपला आत्मसन्मान जागृत ठेवून आत्मोद्धारासाठी  प्रयत्नशील राहून आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनाची जबाबदारी चांगल्याप्रकारे पेलणे म्हणजे समजदार नागरिक होय.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍लेखिका
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता. हदगाव जि. नांदेड.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 ( 4 ) समजदार नागरीक.....
सज्जन, समजदार, सामंज्यस, शहाणपणा हे शब्द उच्चारायला जरा धाडसपणा किंवा ते धाडसाने उच्चारायला हवेत असं उगीचच वाटून राहीले आहे. 
     म्हणजे ते उच्चारायला थोडीशी भिती वाटते. कारण जीवन हे धावपळीचे आणि अति जलद झालेले आहे.  
   कोणाचा कोणावरही भरवसा उरला नाही.
म्हणून जो तो आप आपल्या परीने नाका समोर पाहून चालतो चालण्याचा प्रयत्न करत असतो.  याचा अर्थ असा होत नाही कि सर्व व्यर्थ आहे किंवा सर्व गोष्टी बरोबर आहेत
जीवनात जगात असताना मानवी जीवनातील काही माणके महत्त्वाची आहेत, प्रत्येकाने एक भूमिका निभावली पाहिजे. ती म्हणजे प्रत्येकानी एकमेकांशी समभाव, सत् विचाराने वागण्याची . एकमेकांना समजावून घेण्याची आणि त्या दृष्टीने कृती करण्याची, समोरच्या ला समजावून घेणे म्हणजे समजदारी होय. 
         सहविचाराने, समुपचाराने वागणे ही मानवाशिवाय इतर प्राणी माञाची जबाबदारी नाही. ती मानवाची आहे.
आता राहिला प्रश्न नागरीक, नागरिकत्वाचा, जो माणूस मग तो  स्ञी असो अथवा पुरुष आपल्या नेमून दिलेल्या जबाबदार्या आणि कर्तव्य योग्य 
 पार पाडतो तो नागरीक.
समजदारपणा प्रत्येक अशा नागरिकाचा एक मौल्यवान दागिणा असतो.  दागिणा शक्यतो मौल्यवान धातूचाच बनवितात मग सोने  चांदी या पासूनच ते बनविले जातात. शक्यतो साध्या धातू पासून कोणी दागिणे बनवित नाहीत. त्याला फारशी किंमत नसते.
म्हणून किमंती वस्तू ,अलंकार,दागिणे हे आपण साध्या ठिकाणी जसे ठेवत नाही तसे समजदार पणा जपण्यासाठी, सांभाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे.
समजदार माणूस नेहमी समजूतदार पणे वागतो , आपले बोलणे  चालणे व्यवस्थित असावे, 
     वाद निर्माण होईल असे बोलणे नेहमी टाळावे. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणे फायद्याचे ठरते ते एक समजूत दारपणाचे लक्षण आहे. 
        अतिवाद शास्ञात निशेद मानलेले आहे ते समजूतदार दार पणाचे अजिबात लक्षण नाही.
थोडक्यात निती न्यायाने, कायद्यादवारे प्रतिष्ठित अशा प्रकारची वर्तणूक पार पाडणे म्हणजे समजदारी होय.  कुणाही बदल आकसभाव नसणं हे समजदार पणाचे लक्षणच म्हणावे लागेल. 
    पुरोगामी विचारसरणी आणि समजदार पणा प्रत्येक नागरिकांच्या ठिकाणी आला तर भावी समाज रचना समजदार नागरिकांच्या भारताची तयार होईल अशी आशा करू या! 
                भागवत लक्ष्मण गर्कळ बीड
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 " सुजाण नागरिक - काळाची गरज " [ 14 ]
     मानव हा एक समाजशील प्राणी आहे . तो समूहाशिवाय एकटा राहूच शकत नाही . समाजातील चालीरीती , प्रथापरंपरा या सर्वांनी तो बांधील असतो . जर त्याने सामाजिक नियमांचे तंतोतंत पालन केले तरच तो सामाजिक स्तुतीस प्राप्त होतो . याउलट समाज विघातक कृत्य करून सामाजिक नियमभंग केल्यास तो सामाजिकदृष्टया दोषीपात्र ठरतो . अर्थात ह्या गोष्टी मानवी वर्तनावरून ठरत असतात . ह्या वर्तनाचा संबंध हा मानसिकतेशी असतो . कारण मन आणि वर्तन ह्या एका नाण्याच्या दोन्ही बाजूसारख्या असतात . मनातील विचारांचा प्रभाव हा शारीरिक क्रियेत दिसून येत असतो . 
    ' सुजाण ' या शब्दाचा अर्थ जाणिव असलेला . मग ती दोन्ही प्रकारची . समाजहित व समाजविघातक काय आहे हे स्वतःच्या विवेक बुद्धीने समजून घेणारा . त्यानुसार फक्त समाजमान्यच वर्तन करून सामाजिक उत्कर्षास हातभार लावणारा . समाजात आदर्शवाद निर्माण करणारा मानव हाच खरा सुजाण नागरिक असतो . तो स्वतःसह इतर दुर्गुणी व्यक्तींनाही सुधारून आपल्यासारखा सुजाण बनवतो . न की त्याला वाईट म्हणून समूहापासून दूर लोटतो . सुजाण व्यक्ती ह्या सुसंस्कृत व सुसंस्कारी असतात . सर्वगुणसंपन्न असतात . नैतिक मूल्ये अंगीकारून जीवन यथार्थतेने व्यतीत करत असतात . क्षमाशील , संयमी , स्वच्छताप्रिय , परसहिष्णू , उदात्त व व्यापक दृष्टीचे असतात . एक सच्चे देशभक्त असून देशहितास्तव प्राणार्पणासहही सज्ज असतात . " आधी केले मग सांगितले " या उक्तीचा प्रत्यक्षात जीवनात तंतोतंत पालन करणारे असतात . अशा सुजाण नागरिकांवरच देशाची धुरा आधारित असते . म्हणून सध्या अशा सुजाणांची देशाला नितांत गरज आहे .
     आपल्या देशातील भ्रष्टाचार , प्रदूषण , बेकारी , गुन्हेगारी , व्यसनाधिनता , हुंडाबळी , स्त्रीभृणहत्या , वाढते स्त्री अत्याचार , भरकटलेली मॉर्डन पिढी , ढासळणारी नितीमत्ता इ . अनेक समस्यांचे मूळस्थान हे सुजाण नागरिकाचा अभावात दडलेले आहे . म्हणून भारतमातेला निर्मळ व पवित्र करण्यासाठी या सुजाण नागरिकांची अत्यंत निकड आहे . 
     चला तर मग , " शुभस्य शिघ्रम " उक्तीप्रमाणे आपल्यापासूनच ही सुजाण ज्योत पेटवूया . एकमेकांना हस्तांतरित करत देशभर अखंड तेवून देश लख्ख प्रकाशित करून जागतिक स्तरावर उंचावून तिरंगा फडकवूया . शिवाय कोरोनाची लढाईतही यशस्वी विजय मिळवूया . आणि सुजाण नागरिक होऊन आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद व सुख निर्माण करूया .

अर्चना दिगांबर गरूड 
मु. पो. ता. किनवट , 
जि. नांदेड 
मो. क्र . 9552963376
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
समजदार  नागरिक म्हणजे कर्तव्यदक्ष नागरिक* 
 आपल्या देशात प्रजातंत्र आहे . लोकांचे, लोकांद्वारे ,लोकांच्या करीता राज्य म्हणजे लोक तंत्र /प्रजातंत्र. प्रजातंत्र चे सर्वात महत्वाचे अंग म्हणजे कर्तव्य आणि अधिकार. आज आपल्या देशाचे नागरिक  माझा अधिकार, my privilege , my right , आणि मानवाधिकाराच्या  बद्दलच बोलत असतात. माझ्या देशा प्रति माझे  कर्तव्य पण आहे याची जाणीव किती जणांना जाणीव आहे?  माझ्या देशाने मला काय दिले ह्या ऐवजी मी आजतागायत माझ्या देशाला काय दिले ? हा प्रश्न स्वतःला किती जण विचारतात? साध ट्राफिक सिग्नल सुद्धा  पाळणे आपल्या देशातील नागरिकांना नको असतात.
    जो नागरिक अशा अगदी छोट्या  छोट्या गोष्टींचे पालन करतो. आपल्या  कार्यालयात आपले निर्दिष्ट कर्तव्य अगदी जबाबदारीने पार पाडतो,तो समजदार नागरिक. आजच्या कसोटीच्या काळात सफाई कामगार,पोलिस,विज कर्मचारी,  बँक कर्मचारी,डाॅक्टर्स नर्सेस सर्व  आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या,  ह्या कोरोना वाॅरियर्स प्रती सन्मान तर सोडा ,सतत त्यांच्या कामात  अडथळे निर्माण करतात  त्यांना मारहाण करतात हे सर्व  नागरिक म्हणवणाच्या लायकीचे सुद्धा आहेत का?
     ज्यांना लिहता वाचता येतं ते साक्षर आणि ज्यांना त्या साक्षरते मुळे बरे वाइट समजते , ते शिक्षित आणि जो जाणीवपूर्वक समाजात सौहार्द टिकवण्यासाठी 
सजगतेने कार्यरत राहतो. देशप्रेम असतो ,  देशाकरीता काहीही  करायची तयारी असते. स्वतः तर देशाला समर्पित असतोच पण बाकीच्या लोकांनाही प्रेरित करतो 
तो समजदार, सुजाण नागरिक. 
   आज आपल्या देशाला गरज आहे अशा सुजाण  समजदार नागरिकांची. तरच आपल्या देशातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गरीबी, व्यसनाधीनता ह्या सर्व गोष्टींचे निर्मुलन करण्यात तेव्हाच यश मिळेल , जेव्हा देशात समजदार नागरिकांची संख्या वाढेल. 
     Each one Teach one  च्या धर्तीवर प्रत्येक सुजाण नागरिकांनी निदान एका नागरिकाला सुजाण  बनवले तरी ही बराच मोठा पल्ला गाठाला  जाईल.

डाॅ.वर्षा सगदेव
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 ".समजदार नागरिक"          
  समजदार नागरिक म्हणजे जो आपल्या सरकार ने ठरविलेल्या नियमांचे पालन करून इतर लोकांना सुद्धा त्याप्रमाणे पालन करणेसाठी प्रयत्न करीत असतो.तसेच आपण आपले दैनंदिन काम करीत करीत इतरांना आपणा कडून कशी मदत करता येईल याचा प्रयत्न करीत असतो.दुस-यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर ऊपाय किवा मार्ग काढन्याचा प्रयत्न करीत असतो आपले काम आदर्श कसे होईल याचा प्रयास कृत असतो आपल्या बोलण्यात नम्रता व विनयशीलता कशी कायम राहिल असा नेहमी प्रत्येक ठिकाणी अनुभव लोकांना येत असतो.आपल्याला जे जे चांगले माहिती आहे ते ते इतराना सांगावे.म्हणजे जे जे आपणाशी ठावे ते ते इतराना सांगून शहाणे करून सोडावे सकल जन.अशा संत वचनाचे पालन केले पाहिजे. आपण" आधी केले मग सांगीतले"अशी सवय प्र त्येकाने स्वतः लावली पाहिजे.चांगल्याला चांगले तर वाईटाला वाईट म्हणले पाहिजे. आपली चांगला विचार करणारांची एकी किवा संघटन कसे निर्माण होईल त्याचाच समजदार नागरिक विचार करीत असतो. थोर युग पुरुषांच्या विचारा प्रमाणे आचरण कसे ठेवता येईल त्याचा प्रयत्न अहोरात करीत असतो तो समजदार नारिक असतो.आपली योजना कोणती फायद्याची असेल तर त्याचा लाभ सर्वाना मिळावयास हवा."आधी पोटोबा मग विठोबा "असा विचार समजूतदार नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. ज्याचे ध्येय सुंदर..         त्याचे विचार सुंदर..      ज्याचे वागण सुंदर...      ज्याचे बोलणं सुंदर    त्याचे जगण सुंदर          ज्या च मन सुंदर       त्याचे जग सुंदर ....  ज्याचे जग सुंदर            तो जगातला सुंदर।          तो समजदार नागरीक                        लेखक.जी.एस.कुचेकर पाटील.मोनं.७५८८५६०७६१
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 समजदारपणा हे एक भूषणच..
~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
वाकदकर 【17】
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'समजदारपणा' हे खऱ्या अर्थाने कोणत्याही व्यक्तीचे भूषण आहे. समजदारपणा ही परिस्थिती सापेक्ष संकल्पना आहे.. नेमकं कोणत्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने परिस्थिती हाताळावी हे ज्याला जमलं तर त्यालाच समज आली असं म्हणावं लागेल.. जागरूक आणि सुज्ञ या संकल्पना वेगळ्या यापेक्षा समजदारपणा ही फारच मोठी आणि सर्वांगीण संकल्पना वाटते. 
एकदा एका भरगच्च भरलेल्या बसमध्ये एक स्टेशनवर अनेक प्रवासी चढले त्यामध्ये बिच्चारी एक आजीबाई सुद्धा होती, बस अगोदरच खचाखच भरलेली असल्याने रिकाम्या सीट चा विषयच नव्हता... अश्यावेळी सीट मिळवण्यासाठी धांदल करत एक तरुण चिडीमार मुलगा बसमध्ये चढला आणि आपल्या ताकदीच्या जोरावर ज्याला त्याला बाजूला करून पुढे आणि पूढेच जाऊ लागला...त्याच्या या मग्रुरीच्या तालात समोर उभ्या असलेल्या अजीबाईला सुद्धा त्याने जोराचा धक्का मारून बाजूला फेकले...बिचारी म्हातारी धपकन खाली पडली, चष्म्याचा काच फुटला, थैली सटकली, आणि बिचारीची अवस्था दयनीय वाटू लागली...त्याचवेळी तिची ही अवस्था बघून कोणालाही त्या मग्रूर इसमाचा रागच आलेला असणार ...पण या उनाड मुलांच्या नादाला लागून कशाला रिकामा उद्योग या  विचाराने सगळेच मनातच विचार करत होते..भारतीय संविधान, नागरिकशास्त्र वगैरे सगळंच शिकलेली काही माणसं सुद्धा या बसमध्ये बसलेली होती.... यातच एक मानसशास्त्रतज्ञ मनात विचार करू लागला की, या म्हातारीला आता मानसिक आधाराची गरज आहे.तर वकील मनात कुढू लागला की या मग्रूर मुलावर भा द वि अमुक अमुक नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.... एक महिला विभागाची कर्मचारी महिला विचार करत होती की, बस मध्ये महिलांसाठी असलेल्या राखीव सिटांवर कधीच पुरुषांना बसू देऊ नये.....वगैरे वगैरे सगळे जण आपापल्या पद्धतीने भारतीय नागरिक बनून विचार करत असतांनाच एक तिशीतला तरुण उठला आणि त्या मग्रूर मुलाकडे जाऊन त्याने लगेचंच त्याच्या कानाशीलावर चांगला दोन तीन वेळेस जाळ काढला....त्याने विरोध केला तरी सुद्धा हा नवतरुण त्याच्यावर भारी बनून त्याला विचारू लागला की, तू असं इथे या बसमध्ये का वागला...? म्हातारीला तू अशी वागणूक का दिली? तुला आई बहीण नाही का? या जागी  तुझी आजी किंवा आई असती तर तू काय केलं असतं...?पुन्हा असं वागशील का? त्याने वापरलेल्या पर्यायाने आणि विचारलेल्या प्रश्नाने ती मग्रूर मुलगा खजील होऊन....खाली मान घालून बसला होता.... त्याला त्याची चूक सुद्धा कळाली होती आणि सजा सुद्धा मिळाली होती.... या प्रसंगात बसमधील प्रत्येकाला काहींना काहीतरी शिकायला मिळालं होतं...
मित्रहो आपल्या देशात घटना, कायदे कानून निर्माण होऊन बरीच वर्षे झालीत परंतु आजही समजदार नागरिक हे तुलनेने कमीच भासतात...
जागरूक, जाणकार, ज्ञानपंडित , व्याख्याते, प्रबोधनकार, नेते, नोकरदार ,गरीब, श्रीमंत अशी सगळीच माणसे भेटतात परंतु यांच्यामध्ये समजारपणा कोन्हात हे नेमकं अचूकपणे सांगणं जरा कठीणच आहे, संत तुकाराम महाराजांच्या भाषेत , 
हवे तरी देऊ कासेची लंगोटी। 
नाठाळाच्या माथा हाणू काठी।।
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास।
कठीण वज्रास भेदू वेगे।।
अश्या पध्दतीने माणूस म्हणून जगतांना मानवता व नैतिकता जपून स्वार्थातून परमार्थ साधण्याचे ज्याला जमेल तोच समजदारपणाच्या आभूषणाला परिधान करण्यास पात्र ठरेल...
-श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
(वाकदकर)
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
34 जबाबदार नागरिक बनण्यासाठी...
    वर्गात नागरिकशास्त्राचा तास चालू आहे. मुले शिकण्यात रंगून गेली आहेत. शिक्षक उत्साहाने शिकवत आहेत.. असं दृश्य काल्पनिक वाटतं ना? बरोबरच आहे. अभ्यासक्रमांतील काही विषय शिकणे मुलांसाठी अगदीच कंटाळवाणे असते आणि म्हणूनच असे विषय वर्गात शिकवताना शिक्षक म्हणून खरी कसोटी लागते. असाच कसोटी पाहणारा एक विषय म्हणजे नागरिकशास्त्र. यातले सारे धडे मुलांना उपदेशपर वाटतात. त्यातील शासनव्यवस्थाविषयक धडे नीरस वाटतात (म्हणजे ते तसे असतातही!). एक तर यात लोकशाही, राष्ट्र, स्वातंत्र्य, हक्क इ. अमूर्त संकल्पना भरपूर असतात. त्या समजावून सांगताना भाषणबाजी केली की, मग वर्गात जांभयांचे भरघोस पीक येणारच.
   लोकशाही हा विषय शिकवताना निवडणुका का अपरिहार्य आहेत, त्या कशा पद्धतीने होतात अशी चर्चा सुरू झाल्यावर मी पाचवी ते सातवीच्या वर्गप्रतिनिधींच्या निवडणुका जाहीर केल्या. तशा निवडणुका बहुतेक शाळांमध्ये होतातच, पण मी हा विषय नुसता प्रतीकात्मक निवडणुकांपुरता ठेवायचा नाही, असे ठरवून त्याला अभ्यासाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले.
उमेदवार ठरवणे, सूचक- अनुमोदक, बोधचिन्ह, मतदान, मतमोजणी, अंतिम निकाल या सर्व पाय-यांवर चर्चा झाली. त्यानुसार मुलांनी अर्ज भरले. स्वत:ची चिन्हे ठरवली. कल्पकतेने प्रचार केला. हक्क आणि कर्तव्य यावरील चर्चेच्या वेळी आम्हाला शाळेत कोणते हक्क आहेत व आमची कर्तव्ये काय आहेत, याची मुलांनी एक यादीच केली. त्यातून त्यांना जबाबदारीची जाणीव झाली. शिवाय वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्यांनी कर्तव्य बजावले नाही तर काय करावे, याचाही विचार करण्यात आला. निवडणुका मजेत पार पडल्या.
याच वेळी महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या. त्या दिवाळीच्या सुटीत असल्याने या वर्षी पाचवी ते सातवीच्या मुलांना दिवाळीच्या सुटीत विधानसभा निवडणुका हाच विषय अभ्यासासाठी दिला. त्यासाठी त्यांना त्यांच्या इयत्तेनुसार प्रश्नही काढून दिले. ‘पालकांची मदत लागली तर घेऊ शकता, पण स्वत: वृत्तपत्र, टी.व्ही., रेडिओ यांचा वापर करून जाणून घ्या’, असे सांगितले. बरीच मुले सुट्टीत गावी जातात. त्यांना तिथेही हा अभ्यास करता येणे शक्य होते. प्रश्नावलीत ‘ही कितवी विधानसभा निवडणूक आहे, तुझ्या मतदारसंघात कोण उभे होते, त्यांची निशाणी काय होती, त्यांनी प्रचार कसा केला, प्रत्यक्ष निवडणूक कधी झाली, कोण निवडून आले, कोणाला सर्वाधिक जागा मिळाल्या, सत्ताधारी पक्ष म्हणजे कोण, विरोधी पक्ष म्हणजे काय, मुख्यमंत्री कोण झाले, मंत्रिमंडळ केव्हा स्थापन झाले, कुणाला काय खाती मिळाली’ यासारखे प्रश्न होते. मुलं सुट्टीभर सर्व साधनांचा वापर करून उत्साहाने माहिती मिळवत होती. यामध्ये मुद्दामच पालकांचा सहभाग असावा, असे सांगितले होते.
सुट्टीनंतर मुलं शाळेत आली तेव्हा समजले की, सुरुवातीला पालकांचा प्रतिसाद नकारात्मक होता. ‘तुला काय कळणार आहे राजकारणातलं? राजकारण म्हणजे घाणेरडा विषय, त्यावर कशाला बोलायचं?’ अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या होत्या, पण मुलांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि पालक मुलांशी बोलायला लागले. मुलांनी प्रसारमाध्यमांचाही मुलांनी चांगला उपयोग केला. सर्व माहिती स्वत:च जमवल्याने त्यांना हा विषय वर्गात न शिकवताही उत्तम समजला.
‘सुट्टीत कशाला हो ताई अभ्यास’, असे म्हणणा-या मुलांनी सर्वात आधी आपला प्रकल्प सादर केला! त्यात त्रुटी एकच होती, ती म्हणजे मंत्रिमंडळ जाहीरच झालेले नसल्याने मुलांचा एक प्रश्न अपुरा होता. अर्थात त्यात त्यांचा काही दोष नव्हता. मराठीतून शपथ घेणे, त्या वेळी झालेली मारामारी यावरही वर्गात हिरीरीने चर्चा झाली. हा रूक्ष विषय पाहता-पाहता बोलका झाला.
मुलांनी केवळ निवडणुकीचीच माहितीच मिळविली नाही तर आई-वडिलांना मतदान करण्यास प्रवृत्त केले. सातवीच्या मुलांनी विचारपूर्वक उत्तरे लिहिली, शिवाय स्वत:ची मतेही मांडली. उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा, पैसे देऊन मत विकत घेऊ नये, लाऊडस्पीकरचा वापर कमी करावा, अशी मते मुलांची या विषयाबाबतची सजगता दर्शवणारी होती.
या प्रकल्पातून आम्हाला काय मिळाले, याचा विचार केला तर ‘ही मुले लहान आहेत, यांना काय कळते’ हा आमचा आणि पालकांचा भ्रम दूर झाला. मुलं टी.व्ही.वर बातम्या पाहू लागली. वर्तमानपत्रे वाचू लागली. दैनंदिन घडामोडींची माहिती आपल्याला असायला हवी, हे त्यांना पटले. सहावीतल्या कुणालाने  तर त्याच्या घराजवळील मैदानात खेळताना होणा-या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविषयी त्या भागातील नगरसेवकाकडे तक्रार करून त्यांचा बंदोबस्त केला! हा प्रश्न घरापर्यंतही जाऊ न देता मुला-मुलींनी स्वत: सोडवला. यापेक्षा नागरिकशास्त्र हा विषय मुलांना चांगला समजला याची कसोटी कुठली असू शकेल?
   पालक ब-याचदा मुलांशी राजकारणाबद्दल चर्चा करत नाहीत. तसं न करता मुलांना राजकारणाबद्दल समजेल अशा भाषेत माहिती द्यायला हवी. निवडणुकीच्या प्रचारसभांना त्यांना घेऊन जायला हवं. याबाबत पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. वृत्तपत्र वाचन, टी.व्ही.वर बातम्या बघणं या गोष्टींमध्ये मुलांना आवर्जून सहभागी करून घ्यायला हवं. दैनंदिन घडामोडींची माहिती मुलांना द्यायला हवी. त्यांनी पुढाकार घेऊन एखादी गोष्ट केली तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. त्याच्यातील नेतृत्वगुणांना वाव द्यायला हवा. त्यातूनच सुजाण नागरिकांची निर्मिती होऊ शकेल, केवळ घोकंपट्टी करून नव्हे!
श्री.सुंदरसिंग आर.साबळे 
गोंदिया 
9545254856
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 सुजाण नागरिक
छोटी नेहा आजीबरोबर एसटीमधून आपल्या मामाच्या गावाकडे चालल्या होत्या. दोघींनाही दोन सीट ची जागा मिळाली .नेहा बस मधे बसल्यावर बाहेर मागे पडणारी झाडी पाहत होते ;तेवढ्यात तिचे लक्ष सीटवर रेघोट्या मारलेल्या जागेवर गेले ती आजीला म्हणाली एवढी छान बस आणि हा रेघोट्या कोणी मारले असतील ग ? आजी म्हणाली ,ज्यांना आपल्या नागरिकत्वाची जाणीव नाही, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्याची जाण नाही अशाच एखाद्या समाजकंटकाने ह्या रेघोट्या मारलेल्या असतात. बस चालू होती कंडक्टर जवळ आले आजीने दोघींचे तिकीट काढले
तेवढ्यात कुठून तरी सिगारेट ओढण्याचा  वास आला.आजी म्हणाली; अहो समजत नाही का सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढू नये इतरांनाही त्रास होतो . तसे कंडक्टर काका त्या माणसाला म्हणाले अहो ती सिगारेट फेकून द्या नाहीतर खाली उतरा बरं. 
बस मधून उतरल्यावर मामाच्या घरी जाण्यासाठी आजीने रिक्षा ठरवली व आजी नाती दोघीही रिक्षात बसल्या रिक्षा सिग्नलवर आली. सर्व रिक्षा ,वाहने थांबलेली होती परंतु ;एक मोटारसायकल स्वार जोरात चाललेला होता सिग्नल पडलेला असताना देखील तो सरळ निघून गेला पोलिसांनी त्यांना पकडले आणि दंडही केला. आजी म्हणाली सिग्नल पाळावे एवढे साधे नियम समजत नसावेत का काय म्हणावे या नागरिकांना? गाडी चालवणं हा आपला हक्क आहे हे निश्चित; परंतु ट्रॅफिकचे नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे हे कधी कळणार नागरिकांना ?कधी होणार आपण सुजाण नागरिक ?हे ऐकल्यावर नेहा म्हणाली आजी सुजाण नागरिक म्हणजे काय ग? तेव्हा आजी म्हणाली अगं सुजाण म्हणजे जाण असलेला म्हणजे कुठली गोष्ट करायची कुठली गोष्ट करायची नाही आपला फायदा तो आपल्याला करतो परंतु ;कधीकधी आपल्या फायद्यामुळे इतरांचे नुकसान होते हेदेखील काळायला हवे हे ज्याला कळते ना तो सुजाण नागरिक. मग नेहा म्हणाली मग सांग सुजान नागरिक कोणाला म्हणावे? आजी म्हणाली ,आपल्या भारतीय संविधानामध्ये आपल्‍याला नागरिक म्‍हणून काहीअधिकार दिले आहेत ,तसेच काही कर्तव्य देखील सांगितलेले आहेत. आता हेच बघ ,आपण बसमध्ये बसलो होतो बस ही सार्वजनिक मालमत्ता आहे आपल्या सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे तिची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. बस मध्ये बसायला मिळणे हा आपला हक्क आहे. हक्क आणि कर्तव्य समजतात तो म्हणजे सुजाण नागरिक.
आपल्या भारत देशात विविध धर्माचे ,जातीचे, बोली भाषा बोलणारे लोक राहतात प्रत्येकाला आपला धर्म आपल्या आपली संस्कृती जपण्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपले शोषण कोणी करत असेल तर त्यापासून संरक्षणाचा आपला हक्क आहे .आपण विविध धार्मिक ,सण ,उत्सव साजरे करतो त्याचाही आपल्याला हक्क आहे परंतु सण उत्सव साजरे करताना त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, गणपती उत्सवात जेव्हा आपण डीजे लावतो तेव्हा त्याचा त्रास इतरांना होणार नाही हे ज्याला समजले तो सुजाण नागरिक होय. घर बांधण्याचा, शेती घेण्याचा, प्रत्येकाला अधिकार आहे त्याचप्रमाणे आपण रस्त्यामध्ये जर एखादे  अतिक्रमण करत असो तर ते मात्र चुकीचे आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी मिळणे आपला हक्क आहे त्याचप्रमाणे प्रदूषण होऊ न देणे नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे ,हे ज्याला समजेल तो सुजाण नागरिक होईल. प्राणिमात्रांवर बद्दल दयाबुद्धी आपण दाखवली पाहिजे ते आपले कर्तव्य आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज याचा आपण सन्मान केला पाहिजे. देशाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने उभे राहिले पाहिजे. आपले संरक्षण करण्यासाठी सीमेवर  सिद्ध जवान आहेत परंतु; आपली अंतर्गत सुरक्षा यासाठी आपण सतत सतर्क राहिले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी बेवारस पडलेल्या वस्तूंना हात लावू नये, त्याची माहिती पोलिसांना द्यावी म्हणजे हे सुजाणपणा चे लक्षण आहे. सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे या मुलांना आपण वीटभट्टी, हॉटेल, घरगुती कामे या कामासाठी जुंपणे हे मात्र चुकीचे आहे या विद्यार्थ्यांना शिकु देणे म्हणजे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे जसे गड-किल्ले त्याचप्रमाणे पर्यटन स्थळे, जंगले, वने ,धरणे ही आपल्या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे तिचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. या ऐतिहासिक वारशाची जपणूक करणे म्हणजे सुजाणपणा चे लक्षण आहे. आजी म्हणाली अगं नेहा तुला माहित आहे का तीन जानेवारी हा संविधानातील कर्तव्य दिन म्हणून आपण साजरा करतो .कर्तव्यशील असणे हा आपल्या संविधानाचा प्राण आहे. नेहा म्हणाली आजी तू जे जे सांगितले आहेस ना ते मी सर्व लक्षात ठेवेन आणि मी सुद्धा भारताचा सुजाण नागरिक नक्की होणार. छोट्या नेहाला सुजाण नागरिकत्वाचे धडे आजीकडून मिळाले आपण देखील सुजाण नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करूया. आज भारतामध्ये  कोरोना  आजाराची साथ सुरू आहे या आजारामुळे  लॉक डाऊन जाहीर झालेला आहे. अशा काळामध्ये पोलीस ,डॉक्टर, शिक्षक ,परिचारिका, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी ताई , सैनिक आपली काळजी घेत आहेत आपल्याला या आजाराची लागण होऊ नये म्हणून ते बाहेर आहेत ;परंतु या आजाराची लागण होऊ नये म्हणून आपण घरात राहणे, मास्क चा वापर करणे, घरात राहूनच व्यायाम प्राणायाम याआधारे प्रतिकार शक्ती वाढवणे, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टींचे पालन करून एक सुजाण भारतीय नागरिक बनूयात.
सविता साळुंके श्रीरामपूर कोड नंबर 13
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 समजदार नागरिक
 भारत हा लोकशाही देश आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मताप्रमाणे वागण्याचा हक्क आहे. पण त्यासाठी संविधानाने काही मर्यादा, कायदे घालून दिलेली आहे. जेणेकरून हे राष्ट्र एकसंघ रहावे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य जर पार पाडले तर देश विकासाकडे नक्कीच वाटचाल करतो. समजदार नागरिक म्हणजे जो स्वतःच्या हिता बरोबर देशाच्या हिताचा विचार करतो.व त्याप्रमाणे वागतो.
 भारताला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आज अनेक जण वैचारिक पारतंत्र्यात रममाणआहेत. विचारांची खोली व विस्तृतता जेवढी जास्त तेवढा मानव जास्त समजदार होत असतो. पण अनेक जण कूपमंडूक वृत्तीने जगत असतात. अशा व्यक्ती फक्त स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा,  कुटुंबातील माणसांचा एवढाच स्वार्थी विचार करत असतात. त्यांना बाकी कुणाचंही कशाचंच देणंघेणं नसतं.अशा व्यक्तींच्यामुळे देश पुढे जात नाही. या व्यक्तींचे वागणे पाहून कुटुंबातील बाकीच्या सगळ्या व्यक्तींच्या मनावर तसाच परिणाम होतो. व तेही पुढे तसेच वागू लागतात.
 ज्या व्यक्ती समजदार असतात, त्या नेहमी आपल्याबरोबर आपल्या देशाच्या हिताचे कार्य कसे होईल याचाच विचार करत असतात. त्यामुळे नेहमी वादादित गोष्टीमध्ये सुवर्णमध्य काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात असलेल्या व्यक्तीसुद्धा समजूतदारपणे वागतात. आज समाजामध्ये अशा समजूतदारपणे वागणाऱ्या लोकांची वानवा आहे. समजूतदार व्यक्ती स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण तर करतातच पण सार्वजनिक मालमत्ता जसे की, सार्वजनिक बस मधील सीट कव्हर न फाडणे, सार्वजनिक बल्ब न फोडणे, सार्वजनिक इमारतींना नुकसान न पोहोचणे, पर्यावरण संवर्धन करणे, पर्यावरण रक्षण करणे या गोष्टी सतत करतात. त्याचप्रमाणे समाज हिताच्या कामामध्येही सहभाग घेणे, गरजूंना सहकार्य करणे, देणगी देणे अशी कार्येही ते करतात.
समजदार  नागरिक नेहमी आपल्या जीवनाचा विकास करत असतो,त्याच्या जीवनात नेहमी सुख-समाधान नांदत असते. त्याच्या घरातील लोकसुद्धा नेहमी आनंदी व समाधानी असतात. अशा व्यक्तींची मुले हुशार व समंजस असतात. तीसुद्धा सर्वांना समजून घेतात. सर्वांना मदत करतात. चांगल्या गुणांमुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांत सुद्धा ते चांगल्या गुणांची पेरणी करतात. समजदार नागरिक आपली बुद्धी वापरून मतदान प्रक्रियेच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता  योग्य त्या उमेदवारालाच ते मत देतात,व निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात.पण अशा समजदार नागरिकांची संख्या सध्या रोडावत चाललेली आहे. व त्याचा परिणाम देश हितावर व देश विकासावर होत आहे.
 आज कोरोणा सारखी महामारी, महा महाभयंकर हा रोग देशाला, नव्हे संपूर्ण जगाला भंडावून सोडत आहे त्यांमध्ये काही बेजबाबदार नागरिक पोलीस प्रशासनाला , शासनाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत. त्यामुळे ह्या महामारी पासून बचाव करण्यास आपण काहीअंशी असमर्थ ठरत आहोत.
 त्यामुळे समजदार नागरिकांचे जीवन सुद्धा बेहाल झालेले आहे. तरीही काही समजूतदार नागरिक जसे की पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा पुरवणारे कर्मचारी ,सफाई कामगार, शासनाचे कर्मचारी हे सर्व जीव तोडून ह्या रोगाला समोर नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत म्हणून काही अंशी आपण या रोगावर अंकुश ठेवू शकत आहे. देशाला समजदार नागरिकाची नितांत गरज आहे.
 चला तर मग समजदार बनूया आणि देशाला विकासाकडे नेऊ या.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
(15) हरवत चाललेला समजूतदारपणा...!
सध्याचे अवती-भोवती घडणारे प्रसंग बघून समाजातील समजूतदारपणा लुप्त होत चालला आहे की काय असं वाटायला लागलंय.
कोरोना विषाणूमुळे सगळे जगजीवन विस्कळीत झालेले असतांना. अजून सुद्धा बऱ्याच नागरिकांना या परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
घरात बसा, स्वच्छता ठेवा, कामाव्यतिरिक्त बाहेर जाऊ नका अशा कितीही सूचना दिल्या असतांना सुद्धा नागरिक मात्र गैरजाबाबदरपणे वागतांना दिसतात.
परिसर स्वच्छ ठेवा, कुठेही केरकचरा टाकू नका, प्लास्टिकचा वापर टाळा, पाणी जपून वापरा, निसर्गाची काळजी घ्या, प्रदूषण टाळा या सारख्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगण्याची गरज पडत असेल तर आपण खरंच समजूतदार आहोत का ?
मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा ग्लास साखळीने बांधून ठेवलेला असतो त्यावरून आपल्या समजूतदारपणावर किती विश्वास आहे हे लक्षात येते. मतदानाचे कर्तव्य बाजवतांना सुद्धा पैसे घेतल्याशिवाय किंवा दारूची सोय झाल्याशिवाय मतदानच करत नाही. कुठे हरवत चाललाय आपला समजदारपणा ?
या परिस्थतीत सगळ्यांनी समाजदारीने वागण्याची गरज आहे. तेव्हाच आपण या संकटावर मत करू शकतो.

गणेश सोळुंके, जालना
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सुजाण नागरिक 
             बालक जन्मले की शाळेत जाईपर्यंत घरातील पालक,काका काकू, आजीआजोबा त्याच्यावर संस्कार करत असतात. ही त्याची पहिली शाळा असते. ही संस्काराची शिदोरी घेऊन बालक शाळेत पाऊल टाकते. तिथे बाई, गुरुजी आणि मित्रांच्या सहवासात त्याच्या ज्ञानात भर पडते आणि त्याची व्यवहाराची शाळा सुरू होते. इतिहास, भूगोल, गणित, हिंदी सोबत शाळेत ते नागरिकत्वाचे धडे गिरवू लागते. त्यातून परिसराची, घराची, स्वतःची स्वच्छता राखण्याचे शिक्षण मिळते. देशाचा विकास होण्यासाठी हातभार लावणे, कायद्यानुसार, शिस्तबद्ध नियमानुसार जीवन जगणे या गोष्टींचे सर्व ज्ञान शाळेतून मिळते. त्यातूनच गरीब-श्रीमंत उच्च-नीच किंवा स्त्री-पुरुष भेदभाव नसतो  हेही शिकायला मिळते.आपण या देशाचे नागरिक आहोत आणि देशाच्या तसेच स्वतःच्या जडणघडणीसाठी, विकासासाठी आपण कसे वागावे हे इथेच शिकून ते मूल तावून सुलाखून बाहेर पडते. रस्त्यावरून जाताना किंवा प्रवास करताना कसे वागावे, नियमांचे पालन कसे करावे हे पाहते.  आपल्यामूळे  इतरांना त्रास होत नाही ना? या गोष्टींची खबरदारी घ्यायला शिकते. स्वतःच्या चरितार्थासाठी उज्वल भविष्य घडवण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा याचा विचार करत त्यादृष्टीने प्रयत्न करते,पाऊल उचलते. स्वतःसोबत कुटुंबालाही घातक ठरेल असे होऊ नये यासाठी ते जागरूक राहते.
               स्वत:चर्या चरितार्थासाठी जे हवे जे उपयुक्त असते तसेच सारे समजून चुकते. त्यामुळे देशात राहताना गैरकृत्य होऊ नये यासाठी सजग राहते. "एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ" या मार्गांने आपली वाटचाल करताना आपल्यावर, दुसऱ्यावर आलेल्या आपत्तीचे निवारण कसे करता येईल यासाठी विचार करते.या सर्व बाबी सुजाण नागरिकत्वासाठी उपयुक्त असतात. त्यातून मानसिक आनंद मिळतो, परंतु वैचारिक पातळी समृद्ध होते. नैतिक अधःपतन न होता आपण एका चाकोरीतून आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेतुन चालू, वागू लागतो.
               एकमेकांचे मैत्रीचे नाते निर्माण होते. यातून देशाविषयी प्रेम, आत्मियता निर्माण होते. धर्म, जात वगैरे सर्व समाज  विघातक कृत्ये आहेत हे  निदर्शनास येताच आपणास सुजाण नागरिक बनून राहायचे आहे असे हे मूल समजते. त्यानुसार व्यवहार करू लागते. राष्ट्राप्रती असणारी त्यांची मूलभूत कर्तव्ये, हक्कही वाढीस लागतात.म्हणूनच शाळेतील नागरिकशास्त्र या विषयामधूनही शिकवले जाते की आपल्या देशातील पुरातन किल्ले किंवा लेणी जी आपल्या राष्ट्राची बहुमूल्य अशी संपत्ती आहे, त्यांचा विध्वंस करू नये,त्यावर आपली नावे लिहू,कोरू नयेत किंवा त्यांची तोडफोड करू नये.ही आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, त्या गोष्टींची आपण विल्हेवाट लावू नये किंवा त्यांची नासधूस करू नये, त्यांचा गैरवापर करू नये कारण हे बनवण्यासाठी, त्यांची निर्मिती करण्यासाठी त्याची भरपूर मेहनत घेतलेली असते आणि ती निर्मिती पुन्हा होऊ शकणार नाही. म्हणून देशातील साधनसंपत्तीवर आपला हक्क असतो पण तो जतन करण्यासाठी. तोडफोड करण्यासाठी नाही हे नेहमी ध्यानी धरावे.
सौ.भारती सावंत
मुंबई
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
लेख:समजदार नागरिक (28)
          प्रत्येक माणूस समजदार असणे,गरजेचे आहे,कारण जग हे विश्वासावर व समजदारपणावर आधारले आहे,समोरची व्यक्ती कितीही तापट असली तरी, आपल्यात तो सजूतदार पणा असल्यास भांडण,तंटे होत नाही.
           आताच्या पिढी मध्ये या गोष्टीचा अभाव असतो,त्यांचा स्वभाव अग्रेसिव्ह असतो,झटपट बदल,समोरच्याने आपले म्हणणे ऐकावे,असं काहीसं  या तरुणाईला वाटत असते.म्हणूनच सामंजस्य फार कमी लोकांमध्ये आढळते.
         सामंजस्य असल्यास न होणारी कामे देखील होऊन जातात,कामाला गती मिळते,समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकणे,आणि ती कृतीत आणणे, यालाच समजदार म्हणणार,नागरिक म्हणून समाजात रहाताना शासन अखत्यारीत चालणे हे महत्वाचे असते,आपल्याला लोकशाही द्वारे बरयाच अधिकाराची जाणीव असते,विरोध केव्हा करायचा हे सुद्धा ठाऊक असते,परंतु शासकीय कामात उगीच व्यत्यय आणणे हे मूर्खपणाचे ठरते,आपले मत मांडण्यासाठी सरकार मदत करतेच,परंतु उगीच गोंधळ घालणे,अडथळे निर्माण करणे,हे बुद्धीमत्तेचे काम नव्हे.
           समजदार व्यक्ती शासन निर्णय पाळते,त्याचे उल्लंघन कधीच करत नाही,जे काही होते ते आपल्यासाठीच आहे,याचा विचार ते नागरिक करतात, उदाहरण दयायचे झाले तर,सध्या,लॉक डाऊन मध्ये संचारबंदी आहे,जे नियमांचे काटेकोर पालन करतात, त्यांना समजदारच म्हणणार!
सुजाता जाधव
नवी मुंबई
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...