*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- एकविसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 09 मे 2020 शनिवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- पाप किंवा पुण्य*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
----------------------------------------------------
*पाप आणि पुण्य*
सुख -दुःख, पाप- पुण्य, चांगले-वाईट, साधक -बाधक असे अनेक शब्द समतोल दर्शवणारेच वाटतात. झपाटयाने विकास वाटेवर धावत सुटलेला माणूस स्वार्थापोटी कोणत्याही थराला जाऊ शकतो. याची आपण वाचून ऐकून तर कधी पाहून प्रचिती घेत असतो. त्या माणसासाठी पाप- पुण्य ही गोष्ट अगदी डोक्यातही नसते. शिक्षण घेऊन उच्चशिक्षित झालेला माणूस सुसंस्कृत झाला असं म्हणता येत नाही. परंतु शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो हे आपण आजपर्यंत ऐकत आलेले असतो. तेव्हा कधीतरी आपल्याला प्रश्न पडतो की शिक्षण घेतलेल्या माणसाबद्दल आपण चुकीचे तर विधान करत नाही ना..? पण वस्तुस्थिती आपणास असे विधान करण्यास भाग पाडते. कारण शिक्षण हे पवित्र क्षेत्र म्हणताना तेथेही अनेक अपवित्र आणि अप्रिय घटना घडत असतात. मुळात सुसंस्कार रूजवणाऱ्या केंद्रातच अशा असंस्कारीत गोष्टी घडू लागल्या तर विश्वासाला तडे नव्हे विश्वासच उडून जाईल. आता या ओळीत सरसकटपणे सर्वाना बसवता येत नाही.परंतु या गोष्टीकडे कानाडोळाही करून चालणार नाही.आपण नाही बोललो तरी त्याकडे कोणाचेच लक्ष नाही असे म्हणता येत नाही. आता येवढा उहापोह करण्याचे कारण येवढेच की, माणूस जेव्हा सुशिक्षीत नव्हता तेव्हा पाप आणि पुण्याचा अधीक विचार करायचा. अंधश्रद्धा सांभाळत अदृश्य शक्तीला भिवून आपला आचार चांगला ठेवायचा.नातीगोती यांचे बंध आदर आणि सन्मानामध्ये करकचून बांधलेले होते. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागण्याचे धाडस त्या काळी कोणाला होत नव्हते. आज या मर्यादा निरंकुश तर झाल्याच झाल्या नव्हे त्या उरल्यात की नाही अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सख्या भावाकडून बाहणीवर होणारा अत्याचार असेल. नात्यातील जवळच्या लोकांकडून महिला मुलीवर होणारा अत्याचार असेल, आणि यातही कळस म्हणजे जन्मदात्या बापाकडून पोटच्या मुलीवर होणारा अत्याचार असेल. या साऱ्या घटनांना पाप या संज्ञेत आपण बसवू शकत नाही का...? आपण बसवू शकतो पण शिक्षणाने सांगितले की पाप पुण्य ही केवळ संकल्पना आहे. अस्तीत्व नाही. मग तोच प्रश्न निर्माण होतो, शिक्षण केवळ शिक्षित बनवते, सुशिक्षित नाही. खरं तर मी शिक्षणाला वारंवार दोष देतोय असं नाही. पण माणसाने शिक्षणाचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला नाही असे मला म्हणायचे आहे. अध्यात्माचा वसा सांभाळत जगणारा आणि पाप पुण्याचा विचार करणारा समाजात आज एक घटक आहेच. ते आपण नाकारू शकत नाही. आई वडिलांची सेवा करणे आणि त्यातून पुण्य मिळविणे हे भक्त पुंडलिकाने दाखवून दिले. तसेच श्रावणबाळाने आईवडिलांची सेवा करत इच्छापूर्तीसाठी तिर्थयात्रा घडवून भक्तीतून पुण्य साधण्याचा मार्ग दाखवला. तर अनावधाने घटलेल्या घटनेला पापाच्या पारड्यात तोलून दशरथाला भोग भोगावा लागला. अशी अनेक उदाहरणे पुराणात सापडतात. आता या पौराणिक गोष्टी खऱ्या खोट्या हा मुद्दा शिक्षण घेणारे निर्माण करू शकतात. पण पाप पुण्य यातील फरक दाखवत दिलेले दाखले समाज घडवण्यासाठी किंवा नैतिकता सांभाळण्यासाठी त्या काळी नक्कीच उपयोगी पडणारे होते आणि म्हणूनच जुन्या काळात वृद्धाश्रम काढण्याची आवश्यकता भासली नाही. सत्कर्माची गोडफळे ही संकल्पना, ही भावना पाप पुण्याच्या जमिनीतूनच अंकुरली आहे. समाजाला बाधक असणारी, समाज न स्विकारणारी, किंवा सामाजीक स्वास्थ बिघडवणारी गोष्ट म्हणजे पाप ही समजूत खरं पाहता आजही आस्तित्वात आहे.आपण कितीही शिकलो तरी कांही गोष्टी नाकारूच शकत नाही. शब्द बदल झाले असतील पण भावना त्याच आहेत.व्याख्या बदलल्या असतील पण संकल्पना तीच आहे.पाप- पुण्याविषयी वेगळ्या पद्धतीने चर्चा होत असतील पण ते मानणारे आहेतच.दुर्दैव्य फक्त येवढेच की पुण्याचे आकर्षण सर्वाठायी दिसत नाही, आणि पापाविषयी भय शिल्लक नाही.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
----------------------------------------------------
*पाप-पुण्याई*
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
पाप -पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात. आणि जर पूर्ण झाले नाही तर पुढच्या जन्मात भोगावे लागतात . पुण्याची आपसात वजा होऊन उरलेले पाप किंवा पुण्य भोगावे लागतात ,अशी एक सामान्य पणेचुकीची समजूत दिसून येते .पाप -पुण्याची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही .संशय व दारिद्र हे ज्या ठिकाणी वास करीत असतील त्याला पाप समाजावे .आणि संतुष्ट होणे व सदा सुखी राहणे याला पुण्य समजावे .अशाच पद्धतीने सर्वांनी आचरण करावे पापाचे क्षालन झाल्यावर पुण्याची वाढ होते .
जीवनात शांती समाधान निर्माण होते .असे समाधान जेव्हा जीवनात प्राप्त होते तेव्हाच आयुष्य वर्धन होते .
प्रत्येक मनूष्यात दोन प्रवृत्ती वास करीत असतात .एक सात्त्विक प्रवृत्ती दुसरी राक्षस प्रवृत्ती .पाप कर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती कुकर्माकडे वळतात . सुधारण्याची शक्यता फारच कमी असते . मनूष्याला जन्मताच पाप-पुण्याची कल्पना येते ..मानवाचे जन्म मिळाल्या वर मानवाने निती-नियमानुसार वागावे .आचरण करावे . त्यादृष्टीने सर्व लोक समान आहेत . कधी चुकत नाही कर्म करेल त्याला चांगला कुळात जन्म मिळेल .पाप-कर्म केल्यानेही त्याला जन्म मिळतो ,पण तो फक्त दुःख भोगण्यासाठी असतो .आणि हेच नेमके सामान्य लोकांना समजत नाही जरी सर्व सारखेच असले तरी पापपुण्याचा पात्रतेचा विचार झालेला असतो.कोणत्याही कुळात का असेना ? मनूष्य जन्म मिळाल्याबद्दल देवाचे आपण आभारच म्हणावयास हवे . पण असे मानले जाते की त्यांचा जन्म हा केवळ मागील जन्माची पापे फेडण्याकरिता झालेला आहे .म्हणून ते उध्दाराचा कोणताही प्रयत्न करत नाही . जीवन जगत असतात चुका होतात न कळत मोठे अपराधही घडतात . काहीच्या मनात पश्चात्तापाची भावना असते, परंतु योग्य परिमार्जन होत नाही म्हणून सतत मनात बोचतअसते .धर्मग्रंथाचे वाचन केल्याने फायदाच होतो . धर्माचा अंतिम उद्देश *तत्वावर* आधारित असतो.धर्म लोकांना निती- नियमाप्रमाणे वागण्यात शिकवितो, जर चुका झाल्या असतील तर पापक्षालनाचा मार्ग दाखविणे हाच उपाय असतो .आपल्याकडून चूक झाली तर श्रीगुरूचे अथवा देवाचे नामस्मरण करावे.सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाही.
*पुण्य* छप्पर फाड कर देता है !
*पाप* थप्पड मार कर लेता है!
चांगले कर्म आणि साधना यांचे फळ, चांगल्या कर्मामुळे पुण्यफळ मिळते , आणि त्यामुळेच खूप समाधान मिळत असते . साधना केल्याने अध्यात्मिक उन्नती होते .पाप- पुण्य आणि सुख-दुःख यांच्या पलीकडील आनंद मिळतो आणि आनुषंगिक फळ म्हणून सुख मिळत असते . जे कार्य चांगले असते ते करत राहणे . चांगल्याचा मार्गावर चालणे दुसऱ्याचा मनाला दुःख ना देणे हेच पुण्यकर्म आहे.गरीबाची सेवा करा हेच पुण्यकर्म होय समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करणे त्यांची आवश्यकता पूर्ण करणे हेच पुण्यकर्म आहे याचीच कास धरावे.
काम के विना धन !
अतःरात्मा के बिना सुखा!
मानवता का बिना विज्ञान !
चरित्र के बिना ज्ञान !
सिद्धांत के बिना राजनिती !
नैतिकता के बिना व्यापार !
त्याग का बिना पुजा !
वरील उक्तीप्रमाणेच सत्कार्य करीत राहणे हेच सत्मार्ग आहे.
लेखिका
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
( 9420516306 )
----------------------------------------------------
पाप आणि पुण्य..
मनुष्य जीवन जगतांना त्याने विशिष्ट नियमाने आणि नितीमत्तेने जगावे ज्यायोगे मानवता टिकून राहील नव्हे तर माणसाच्या अंगी मानवताच असावी या उद्देशाने मानवी मनाला सारासार विचार कळतात. यातून या विचारातून सार असे विचार म्हणजेच पुण्य होय आणि असार तत्व म्हणजे पाप म्हणजे.
मानवी जीवन इतर प्राणीमात्रांना हा सार असारचा विचार नक्कीच कळत असेल की या बद्दल मनात शंकाच आहे.
आहार निद्रा भय मैथुन।
सर्व योनी समसमान।
परी मनुष्य देवीचे ज्ञान।
अधिक जाण तू पार्था।।
या भावार्थ दिपीकातील ओव्यांनुसार मानवाला नक्कीच चांगल्या आणि वाईटाचा विचार करता येतो. यातूनच माणसाने चांगल्या नियमांनी जगावे म्हणून प्रत्यक धर्मग्रंथात पाप आणि पुण्य याविषयी विचार मांडले आहे.
या विचारावर अगदी साधेपणाने पाप या शब्दाची व्याख्या करतांना संत तुकाराम म्हणतात की,
पाप त्याचे नाव न विचारिता नित।
भलतेची उन्मत्त करी सदा।।
यावरून नितीमत्ता विचारात न घेता भलत्यापणे जे केले जाते त्याला 'पाप'असे म्हणतात.
पाप ते परपीडणाम।।।
म्हणजे दुसऱ्या ला त्रास देणे याचा अर्थ पाप होतो. दुसऱ्याचे मन दुखावणे म्हणजेच पाप ही संकल्पना मानून आपले आचरण पापमुक्त केल्याने नक्कीच जीवन आनंदी होईल हे सांगायची गरजच उरत नाही, कारण दुसऱ्याला आनंदी ठेवतांना अगोदर स्वतःला आनंदी राहावे लागते म्हणून
पापाची वासना नको दाऊ डोळा।
त्याहुनी आंधळा बराची मी।।
असं म्हणतांना पाप किती वाईट आहे मनुष्याला कळेल.
पुण्य ते परोपकार.....।
दुसऱ्यावर परोपकार करणे म्हणजेच पुण्य कमावणे असा सोपा मंत्र संतांनी दिलेला आहे.
अडलेल्या,नडलेल्या, गरजूला मदत करणे म्हणजेच पुण्य होय.. अश्या सोप्या शब्दाने हे समजावून घेणे गरजेचे आहे.
तहानेल्या पाणी भुकेल्या अन्न.. हेच करून पुण्य मिळवता येते..
'पाप आणि पुण्य या जरी अमूर्त संकल्पना असल्या तरी नक्कीच मनुष्य म्हणून जगायला हितकारक आहेत. यातून एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ... असं आनंदी जीवन जगायला मदत होईल.
श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी(वाकदकर)
----------------------------------------------------
*पाप व पूण्य समज गैरसमज*
वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्यांमध्ये अडकतो म्हणून पाप-पुण्याकडे पहाण्याची एक नवी दृष्टी लाभावी आणि पाप-पुण्याच्या पलीकडे जाऊन आनंदप्राप्ती करून घेण्यासाठी सदैव साधना करण्याची प्रेरणा मिळावी.
थोडक्यात पाप-पुण्याच्या अशा भ्रामक कल्पनांची लोकमानसात आज जी पकड आहे त्या सर्वांची यादी करायचे ठरविले तर मारुतीची लांबच लांब शेपूट तयार होण्यास वेळ लागणार नाही. येथे एक प्रश्न निर्माण होतो तो हा की पाप पुण्य कशाला म्हणायचे? जे कर्म करणाऱ्याला व इतरांना सुख देते ते पुण्य याच्या उलट जे कर्म करणाऱ्याच्या व इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरते ते पाप होय.
पाप पुण्य समज गैरसमज :-
पाप आणि पुण्य यासंबंधी जनमानसात रूढ झालेल्या कल्पना हा अंधश्रद्धेचा फार मोठा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला जमीनदोस्त केल्याशिवाय जनमानसातील अंधश्रद्धेचा प्रभाव नष्ट होणार नाही या संबंधित संबंधीच्या लोकांच्या कल्पना अतिशय भन्नाट असून त्या संबंधीच्या त्यांच्या भावना सुद्धा अत्यंत तीव्र असतात. कोण कशाला पुण्य म्हणेल व कोण कशाला पाप म्हणेल हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा सांगू शकणार नाही. सर्वसामान्य लोकांच्या मनातील भयगंड व त्याचा आधार घेऊन त्यांची फसवणूक करणारे धूर्त लबाड लोक त्यांच्या पाप-पुण्याचे विविध प्रकार निर्माण झाले. पाप झाले की तेथे प्रायश्चित्त आलेच तथाकथित पाप करणारे भाविक लोक व त्यांना प्रशिक्षण देणारे दांभिक धर्म मार्तंड यांच्या मिलनातून पाप-पुण्याच्या अनेक प्रकारांना पूर आला. जीवनात काही अडचणीचे प्रसंग आले त्या सर्वांचा संबंध पाप आणी पुण्याची जोडला जातो व त्या तथाकथित पाप-पुण्याच्या संबंध देवा धर्माशी जोडला गेल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा बुवा, बाबा, भगत, फकीर, देवऋषी व पुरोहित या सर्वांनी घेतला .
पाप व पुण्य यासंबंधी जनमानसात असलेले गैरसमज : -
चलनी नाणी वापरून इतकी गुळगुळीत होतात की मोल राहत नाही. त्याचप्रमाणे पाप व पुण्य शब्द पुरातन काळापासून पुराण सांगणारे पुराणिक व इतर सामान्य लोक यांनी ढसाळपणे वापर केलेला आहे की आज ते शब्द जवळजवळ अर्थहीन झालेले आहेत. पाप पुण्या या शब्दांचे अर्थ न समजताच बहुसंख्य लोक या शब्दाचा वापर करतात. कोणीही कशालाही पाप किंवा पुण्य समजतात. एकादशीचे दिवशी एकादशीचा उपवास करणाऱ्या माणसाने जर त्या दिवशी चुकून कांदा खाल्ला तर त्याला आपण फार मोठे पाप केले असे वाटून तो अगदी व्याकूळ होतो. संकष्टी करणाऱ्या माणसाचा काही कारणाने जर उपास मोडला तर आपल्या हातून फार मोठे पाप घडल्याचे महासंकट येईल या भीतीने तो कष्टी होतो. घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करण्यास जर तो विसरला तर देव आपल्याला शिक्षा करणार म्हणजे आपल्यावर देवाचा कोप होणार असे असे वाटून तो व्यथित होतो.
याच्या उलट कल्पना पहा. चोऱ्यामाऱ्या करणारा भिक्षा मागण्याचा जोड धंदा करणाऱ्या भिकाऱ्याला एक रुपया दिला तर आपण फार मोठे पुण्य केले असे वाटते . दोन रुपयाचा हार देवाला घातला ही फार मोठे पुण्य संपादन केले असे वाटणारे पुष्कळ लोक आहेत. तीर्थात स्नान केल्याने सर्व पापे धुऊन जाऊन बहुत पुण्य मिळते. अशा भ्रमात असणाऱ्या थोडेथोडके नाहीत. अनवाणी भर उन्हात देवा दर्शनाच्या जाण्याने महापुण्य मिळते या भ्रमात असणारे अनेक लोक आहेत. त्याचप्रमाणे अन्य धर्मीयांच्या देश व तिरस्कार करणे म्हणजे पुण्य किंवा अन्य धर्मियांना मारणे म्हणजे पुण्य किंवा अन्य धर्मियांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे स्वतःच्या धर्मात खेचून आणणे म्हणजे पुण्य. आचरट गैरसमजुती च्या आहारी गेल्यामुळे पुण्य या शुद्ध व दिव्य संकल्पनेचे विडंबन झालेले दिसून येते. त्याचे प्रमुख कारण असे की पाप पुण्य या संकल्पनांचा मूळ पायाच भुसभुशीत आहे. मुळात परमेश्वर ही संकल्पनाच चुकल्यामुळे एका बाजूने धर्म या शुद्ध संकल्पनेला तडा गेला व दुसर्या बाजूने संस्कृतीवर विपरीत परिणाम होऊन ती विकृतीकडे झुकली.
या सर्व चुकीच्या गोष्टीमुळे पाप-पुण्याच्या कल्पनासुद्धा चुकीच्या झाल्या परिणामी पापाला पुण्य व पुण्याला पाप समजेपर्यंत संस्कृतीची वाटचाल चुकीच्या दिशेने होत गेली.
थोडक्यात पाप-पुण्याच्या अशा भ्रामक कल्पनांची लोकमानसात आज जी पकड आहे त्या सर्वांची यादी करायचे ठरविले तर मारुतीची लांबच लांब शेपूट तयार होण्यास वेळ लागणार नाही. येथे एक प्रश्न निर्माण होतो तो हा की पाप पुण्य कशाला म्हणायचे? जे कर्म करणाऱ्याला व इतरांना सुख देते ते पुण्य याच्या उलट जे कर्म करणाऱ्याच्या व इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरते ते पाप होय.
पाप व पुण्य या संकल्पना मागचे वास्तव्य जनमानसात रूढ असलेल्या पाप-पुण्याच्या कल्पना या केवळ मनाच्या कल्पना आहेत. त्यांना काही महत्त्व नसून निसर्गाच्या नियमांना महत्त्व आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाच्या त्रिकालबाधित नियम आहे. या नियमाप्रमाणे दुष्कर्मांची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया दुःख व सत्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया सुख ही घडणारच व याला अपवाद सुद्धा नाही . थोडक्यात सर्व धर्मातील सर्वलोक पाप-पुण्याच्या खुळचट कल्पनांच्या आहारी गेल्यामुळे व्यक्ती समाज राष्ट्र व जग या सर्व स्तरावरचे जीवन पूर्णपणे गढूळ झाले आहे. याचा दुष्परिणाम असा होतो की ही तथाकथित धार्मिक माणसे स्वतः निर्माण केलेल्या मानसिक पिंजर्यात स्वतः येतात व स्वतःच स्वतःला अडकवून घेतात. व स्वतःचा अध:पात घडवून आणतात. या सर्व चुकीच्या प्रकारामुळे या तथाकथित धार्मिक माणसात कमालीचा अहंकार अभिमान व भयगंड निर्माण होऊन त्याची परिणती ती माणसे दहशतवादी क्रूर किंवा दैववादी बनतात. म्हणून कर्मकांडाच्या आहारी न जाता कर्माला चांगले करण्याचा प्रयत्न करा. जे कर्म स्वतःच्या व इतरांच्या सुखाला कारणीभूत ठरते ते कर्म म्हणजे पुण्यकर्म होय. शुभ चिंतन करणे , इच्छा करणे, शुभ बोलणे व शुभ करणे यालाच चांगले कर्म असं म्हणतात. असे कर्म केल्याने एका बाजूने माणसाला देव प्रसन्न होतो. त्याच्याकडून धर्माचे पालन व रक्षण होते. तो सुसंस्कृत होतो. त्याला अगणित पुण्याईची प्राप्ती होते. व दुसर्या बाजूने त्याला सुख-शांती-समाधान सुयश व समृद्धी प्राप्त होऊन तो कृतार्थ धन्य होतो.
”पाप निसंदेश बुरा है, लेकिन उससे भी बुरा है पुण्य का अहंकार"
_________________________
*महेंद्र सोनेवाने, गोंदिया*
*मो. 9421802067*
----------------------------------------------------
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
लेख......
कर्माची पुण्याई, पापाचे फलित
माणसाने दुसऱ्या बद्दल चांगला विचार करणे हे पुण्याचे काम आहे. व दुसऱ्या बद्दल वाईट विचार करणे म्हणजेच पापाचे भागीदार होय. इतरांच्या कल्याणात पुण्यकर्म असतं, व इतरांना दुःख देण्यात पापकर्म ठरतं. आपण स्वतः ठरवायचे आपण कसे वागायचे ते आणि आपल्या पदरात पुण्य पाडायचे का पाप पाडायचे ? हे ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न आहे. माणसाने सर्वांशी चांगले वागावे व आपल्या प्रमाणे योग्य प्रकारे वागावे. इतरांचे सुखदुःख हानि लाभ हे आपलेच आहे असे समजून वागणे श्रेष्ठ प्रकारचे असून पुण्य मिळवणे होय, याउलटचे वागणे जे आहे हे वर्तन वाईट आहे असे समजून पापकर्म होय.
ज्या कर्मात आपण हृदय ओततो ते कर्म श्रेष्ठ होय. दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेले कर्म हे पुण्यकर्म समजाव. अशी कर्मफुल घेऊनच आपण समाजाच्या सेवेसाठी कार्यरत असाव. आणि ही सेवामय कर्मफुलांची उधळण जिवंत आहे तो पर्यंत करत राहावी. आणि पुण्याचे वाटेकरी व्हावे. ' कर्मे करावी चांगु' हा संत ज्ञानोबांचा विचार आपले जीवन जगत असताना सदैव ध्यानीमनी असावा. आपल्या हातून घडणारी कामेच चांगली आहे की वाईट आहेत हे पाहूनच विचार करून वर्तन करावे. ज्या चांगल्या कर्माने जगावर चांगले पडसाद उमटतात ते कर्म करणे म्हणजे पुण्य होय. आणि हानिकारक कर्म करणे म्हणजे पाप होय. जे कर्म केल्याने आपला आत्मा प्रसन्न राहतो म्हणजेच आपल्यामध्ये भीती, शंका ,लज्जा निर्माण होत नाही अशी कर्म म्हणजे पुण्य होय.
जे आपल्या हृदयात सतत सलत राहते आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते शंका निर्माण होतात लाज वाटते अशा गोष्टी म्हणजे पाप करणे होय. हे पाप जरी प्रथमतः प्रातःकाला सारखे लखलखणारे चमकत असले तरी त्याचा शेवट मात्र रजनीसारखा काळोखरुपी असतो. पाप हे असे विघ्न आहे की ज्याने आपले साहस, धैर्य आपला मान ,सन्मान अगदी क्षणार्धातच नष्ट करते.
आपल्या वाईट कर्माचा परिणाम वाईटच असतो. आणि चांगल्या कर्माचा परिणाम चांगलाच असतो. इतरांना सहकार्य करणे म्हणजे चांगले कर्म, व इतरांना मदत न करणे म्हणजे वाईट कर्म. एखादी म्हातारी व्यक्ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली तर त्या व्यक्तीला हाताला धरून उठवून त्या व्यक्तीचीे मदत करणे म्हणजे पुण्यकर्म होय, उलट पडलेल्यांना तुडवत जाणे म्हणजे पाप कर्म होय.
सत्याच्या बाजूने उभे राहून न्यायाची भूमिका मांडणे म्हणजे पुण्य होय, आणि अन्यायाशी तडजोड करणे म्हणजे पाप होय. 'पापाचा घडा भरला की तो फुटल्याशिवाय राहत नाही' असं म्हणतात म्हणूनच आपणच आपल्या पाप-पुण्याचे भागीदार असतो. आणि या आपल्या हातून घडून येणाऱ्या चांगल्या पुण्यरुपी कर्माला सेवेची किनार लाभली असेल तर पुणे कर्म चिरंजीव ठरतात. आणि अशा कर्मातच माणसाला अमरत्व प्राप्त होते. अशा या पुण्य कर्माच्या घड्याने आपले जीवन सार्थक होते.
आणि पाप रुपी कर्माने आपले जीवन निरर्थक ठरते. आणि हे निरर्थक जीवनात आलेले पाप आपल्याला शांत राहू देत नाही समाधानी आयुष्य जगू देत नाही.आपल्याला सदैव दुःख वाटते. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचे मूळ कापले तर ते वृक्ष नष्ट होते, त्याचप्रमाणे पापाचा त्याग केल्याने दुःख नष्ट होते. आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक जीव कर्म करण्यात स्वतंत्र आहे. जेव्हा तो पाप करतो तेव्हा तो ईश्वराच्या व्यवस्थेमध्ये पराधीन असल्यामुळे आपल्या पापाची फळे भोगतो. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचे पाप अथवा पुण्याचे फळ भोगावे लागते.
आपल्या जीवनातील दुःख नष्ट करायचे असेल तर आपल्याला पुण्यकर्म घडून येईल असेच वर्तन करावे लागेल.
आपले हे जीवन सार्थकी लावायचे असेल तर आपल्या हातून पुण्यकर्म घडायला हवे. या जगण्यावर ज्यांना अभिमान वाटतो या जगण्यावर ज्यांच प्रेम असेल त्यांनी आपल्या हातांच्या या कर्माच्या सामर्थ्यावर ही पुण्य कर्माची फुलं भरभरून वहावीत. व आपले जीवन चांगल्या पुण्य कर्माने अमरत्व ठेवावे.
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍लेखिका.....
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
तालुका हादगाव जिल्हा नांदेड.
----------------------------------------------------
पाप व पुण्य
"लहानपणी आई सांगायची बाळा खोटं बोलु नये देव पाप देतो" खरं बोलावं म्हणजे देव आपल्या पाठीशी पुण्याची साथ ठेवतो.नेहमी पुण्यसंचय करावा
वाडवडिलांचा पुण्यसंचय किती दिवस पुरणार आपल्याला पण पुण्य करून पुण्य साठा वाढवावा लागतो.मला नेहमी प्रश्न पडत असे मग आपण काय केले म्हणजे पुण्य साठा वाढेल.?..आई म्हणायची व्यंकटेशस्तोत्र वाच,गणपती अथर्वशिर्ष वाच,उपवास कर,त्याप्रमाणे केला पुण्याचा साठा...खर बोलणे तर आपल्या गाठीशी
बांधलेले होतेच ..खोटे कधी बोलु नये
हा नियम लहानपणापासून गाठीशी बांधलेला.
जसजसे वय वाढत गेले पाप-पुण्ण्याची संकल्पना वाढत गेली फक्त पूजापाठ केली म्हणजेच पुण्य लाभते का?हा प्रश्न मनात डोकावु लागला
आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्या खूप आहे.प्रत्येक माणुस श्रीमंत नाही परंतु काही लोक काही थोड्या अवधी मध्ये
श्रीमंत होतात?कसे काय ?काय कष्ट करतात ते ?या गोष्टीचा सखोल अभ्यास करायची गरज नाही ..याचे सरळ व खरे उत्तर आहे खोटे बोलुन भ्रष्टाचार करून
पैसे लुबाडुन लुबाडुन स्वतःची घरं भरतात
सतरा पिढ्यांना पुरेल एवढा पैसा जमा करून ठेवतात.हे पाप आहे का?पुण्य?
फेडणारे मात्र रिटायर होईपर्यत बॅंकांचे
लोण फेडत बसतात.असा फरक व्यक्ती व्यक्ती मध्ये आहे.पुण्यसंचय करणा-या
व्यक्तीने त्याना नाव पण ठेवायचे नाही
म्हणे नसता ...पुण्य करणा-याला पाप लागते.या पाप पुण्याच्या फे-याचा हिशोब काही लागत नाही अजून
आपण खरं बोलावं आणि लोकानी त्या गोष्टीचा हश्या उडवावा... अस कुठं असतं का?म्हणावं..त्यावेळेस पुण्यवंताची अवस्था काय असेल.?अस म्हणतात,"नितीधर्माने वागणा-या माणसाला अधर्माने त्रास द्यावा "म्हणजे तो पण अधर्माने वागायला भाग पडतो.
आपण अनेक स्वच्छ मनाने नोकरी करणारे शिक्षक अधिकारी पाहिले आहेत.
नियमाने ..म्हणजेच पुण्यवंतासारखे वागणारे परंतु ते लोका ना आवडतं नाहीत तो जास्त शहाणा आहे अस म्हणतात.पुण्य म्हणजे...नितीनियमाने वागणे."कर्मण्येवाधिकारस्ते मा फुले शु कदाचन".कर्म करा फळाची आशा ठेवु नका.ते मिळतंच असते.
उगीच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्यासाठी कोणकोणते कागदं लागतात ते जमा करू नका. कर्म आहे शाळेतील मुलांना शिकवा.ते जर आपण केले तर नक्कीच पुण्य प्राप्त होईल.
जगाच्या बाजारात पैसा प्राप्तीसाठी अनेक लोक भटकताना दिसतात.पैसा स्व कमाईचा ,कष्टाचा असावा त्यालाच वाढ असते असे म्हणतात.
चांगले संस्कार,विचार करून चालत नाही तर ते आचरणात आणावे लागतात . नुसतं खरं बोलून आश्वासनं देऊन लोकांच्या खरेपणाचा फायदा घेणारे लोक पापी..तेच पाप."बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले "तोच खरा पुण्यवान.
सध्या कलियुग चालु आहे पाप-पुण्याचा हिशोब द्यावाच लागणार आहे.ती उर्जा तो देव ..ती शक्ती पाहत आहेच ..तराजुचे संतुलन बिघडत आहे ..कदाचित एक दिवस ओझं एवढं वाढणार आहे की,तराजुचा काटा भार सहन नाही करू शकणार व काटा तुटेल ..आपण सर्व या मापात बसलेलो आहोत..आपली अवस्था काय होणार आहा?"नौहाची नौका.".
सापडावी लागेल बसण्यासाठी.
पाप-पुण्याचेसंतुलन बिघडुन देऊ नका
मित्रानो..सख्यानो..नितीधर्माने वागा
खरेबोला...संपत्तीच्या मागे धावु नका...
जगण्यासाठी..भाजी भाकरी लागते हो पैसा नाही...हेच तर पाप-पुण्य.ही संकल्पना कसे म्हणावे...जगण्याचे सत्य आहे ते...पैश्यामुळे नितीधर्म ढासळतोय
तो जेवढा आवश्यक आहे तेवढाच.
केलेल्या कामाचा मोबदला जो आहे तोच
प्राप्त करा.खोटेपणाने व भ्रष्टाचाराने जमा करू नका.पिढीसाठी पैसा जमा करू नका त्याना संस्कार व संयमी बनवा
ते आपोआप सक्षम होतील.
***************************
स्नेहलता कुलथे बीड
7588055882
Kulthe.lata@gmail.com
----------------------------------------------------
!! " पाप / पुण्य " !!
माणूस श्रद्धेवर जगणारा प्राणी आहे . श्रद्धा ही भाबडी असते ती चूक किंवा बरोबर ज्याची त्याला समजत नाही .
!! " पाप / पुण्य " !!
" जैसी करनी , वैसी भरणी " अशी एक म्हण सर्व सामान्यपणे आपल्या कडे ऐकली जाते .
पेराल तेच उगते असं ही म्हटलं जातं . म्हणजेच जसे आपण करू ना त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात . म्हणून ज्याने त्याने धोरणात वागावे, प्रमाणात चालावे , असा एक दंडक घालून दिलेला आहे . प्रत्येकाने या प्रमाणे वागले पाहिजे असा हा आदर्शवाद आहे .
आता जो तो न्यायाने राहीला , वागला तर अजिबात तेढी तिपडी समाज व्यवस्था राहणार नाही . कोणीही वाईट प्रवृत्ती अंगिकारणार नाही हे सत्य आहे .
वाईट वागणं चांगले नाही , त्या पासून वाईट घडते हे त्याचे त्याला जाणवेल आणि एकदा कि हि जाणिव स्वत:ला झाली कि तोच ठरवितो कि हे वाईट करणं चांगलं नाही ते " पाप " आहे .
पाप करणे म्हणजे वाईट करणे अगदी सहज आपण बोलून जातो . मग त्याचे अनेक भाग आपणाला दाखवता येतील , दुसर्याला ञास देणं , त्याच्या वाटेत बाधा निर्माण करणं , एखाद्याची निंदा नालस्ती करणं हे सर्व पापंच की .
थोडक्यात कायम वादग्रस्त राहणं दुसर्याबद्दल कायम आकस ठेवून राहणं सुद्धा पापी पणाच लक्षण आहे .
हे ज्या ला त्याला समजून सुद्धा ते त्याकडे कानाडोळा करतात हे विशेष होय.
संत महात्मे यांना समजावतात. त्यांचा खलपणा नाहीसा करण्याचा प्रयत्न करतात संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत पसायदान मागतात आणि त्या पसायदानात खळाची व्यंकटी सांडो म्हणतात खल मरो असं नाही म्हणत जर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी खल मरो असं म्हटलं असतं तर ते माऊली झाले नसते .
पापी लोकांना सुधरवण्याची त्यांची बरीच उदाहरणे आपणाला माहिती आहेत जास्त विस्ताराने सांगणे न लगे .
पाप एक प्रकारचं माणसाचे संचित असतंय. आणि मग मणुष्य त्या प्रमाणे वर्तत असतो. जगद्गुरु विश्ववंदनीय संत तुकाराम महाराज म्हणतात " भोग तो घडेना ! संचिता वाचूनी !" जसे आपले कर्म आहे ना तसेच आपल्याला फल प्राप्त होते .
म्हणून आपण पाप- पुण्याचा विचार जरी नाही करून वागलो तरी चांगले- वाईट याचा विचार करून वागले पाहिजे . वाईट वागणं पाप आणि चांगले वागणे पुण्य समजावे .
सत्ययुगात तप करणे, परमेश्वराचे नाम स्मरण करुन पुण्याचा साठा आणि पापाचा नाश करणे या गोष्टीला थारा होता , आता ही आजही असेल नाही असे नाही . पण भूकेलेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान जाणनं म्हणजे पुण्यं करणं असं आज तरी मी म्हणेन . हे करत असताना एखादा नामस्मरण करीत असेल गोष्ट अतिशय दुर्मिळ समजावी .
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांनी देव प्राणीमाञात पाहीला आणि समाजकार्य करत राहीले ते अजरामर ठरले पुण्यवंत ही ठरले .
पैठणचे थोर संत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज यांनी देव गाढवात पाहिला आणि काशिविश्वेश्वरावरून रामेश्वराला चाललेल्या कावडीचे पाणी त्या गाढवाला पाजले .म्हणजे प्राणी माञामध्ये एकनाथ महाराज यांनी देव पाहिला .
" जे का रंजले, गांजले ! त्याशि म्हणे जो आपूले ! तोचि साधू ओळखावा! देव तेथेचि जाणावा !! अशी वृत्ती जो माणूस ठेवतो त्याच्या कडून निश्चित पुण्यं घडत असेल . कारण पाप कशात आणि पुण्यं कशात घडत असतं असे आपण.तर ठरवू शकत नाही . पण दुषकृत्य पाप आणि चांगले कृत्य पुण्यं अशी.मनाची धारणा बनववली पाहिजे . कधी कधी पुण्य करो जाता नजाणे अनावधानाने पापही घडू शकते . अशा गोष्टी क्षम माणून कर्तव्या धर्म मानावे मनोभावे तेचि करावे ! काम करणे आणि ते मन लावून केले तर पुण्य घडेल आणि कसर राहत असेल तर निश्चित पाप घडेल हा भाव ठेवून काम करणे हे उचित ठरेल . "कामा मध्ये काम , कोणी म्हणा राम राम .
सुख होईल दु:खाचे
शेवटी कितीही पाप करणारा का असेना त्याला पाप नकोच वाटते , म्हणून पुण्याची आपण वाट धरूया चांगले काम करूया शेवटी निकाल पर हाती असतो . धन्यवाद.
भागवत लक्ष्मण गर्कळ बीड
----------------------------------------------------
कोरोना;पाप पुण्याचा बाजार
कोरोना व्हायरस आता तर कहरच बरसवायला लागलेला असून आज सगळे घाबरलेले आहेत.त्यामुळं असं वाटायला लागलेलं आहे की हा कोरोना व्हायरस जग संपवतो की काय?कारण या कोरोनाच्या साथीत कित्येक मंडळी मृत्युमुखी पडलेली आहेत.
जागतिक आकडा पाहिला.तर विचार करायला लावणारी वस्तुस्थिती आहे.कोणी म्हणतात की या कोरोनाला रोखण्यासाठी लाकडाऊनची प्रक्रिया ही एक महिना आधीपासून राबवायला हवी होती.बरोबर आहे त्यांचं.कारण ज्यावेळी विदेशात कोरोना सुरु झाला होता,तेव्हाच जर विमान उड्डाण बंद झालं असतं तर खरंच चित्र काही वेगळं असतं.
महत्वाचं म्हणजे जरी ही लाकडाऊनची प्रक्रिया एक महिना उशिरा जरी सुरु झाली असली तरी लाकडाऊनच्या माध्यमातून पुर्णतः कोरोनावर कंट्रोल करण्याचा सरकारनं बरेचदा प्रयत्न केला.कधी घंटानाद केला.तर कधी मेणबत्ती लावून जनजागृती केली.काही लोकांनी घंटानादही केला आणि मेणबत्ती ही लावली.पण काही लोकांनी मात्र लाकडाऊन पुरेपूर पाळलंच नाही.ते जर पुरेपूर पाळलं असतं तर आज ही वेळ आली नसती.परंतू लोकांनी लाकडाऊन बरोबर पाळलाच नाही.नाही तर अजून चित्र काही वेगळंच असतं.
कोरोनाचे लाकडाऊन तिसरा टप्पा सुरु आहे.आता वाटते की चौथाही टप्पा करावा लागेल काय? कारण प्रत्येक टप्प्यात लाकडाऊन करुनही कोरोना वाढलाच.कमी झाला नाही आणि लाकडाऊन समाप्त जर केला तर लोकांमध्ये कोरोना एवढा वाढेल की सांगता येत नाही.कारण जेव्हा लाकडाऊन असूनही लोकं या ना त्या कारणानं बाहेर पडले.प्रसंगी पोलिसांचा मार खाल्ला.कोणी क्रिकेट खेळले.तर कोणी पत्ते खेळत बसले.सुरक्षीत अंतर न ठेवता वागत राहिले.कोणी आपसूक वाढवला कोरोना.तर कोणी अनवधानाने.......
महत्वाचं सांगायचं म्हणजे कोरोना व्हायरसने पापपुण्याचा बाजार मांडला आहे.या कोरोनाच्या आंधीत जे पापी आहेत,तेही मरत आहेत.तर जे पुण्यवान आहेत.तेही मरत आहेत.असे वाटायला लागलेले आहे.कोरोनजवळ भेदभावच नाही.त्याला पापपुण्य समजतच नाही.फक्त या लाटेत कोणत्या माणसालाच नाही तर वस्तूला सुद्धा हात लावणे गुन्हा आहे.ज्याचा कोरोनाच्या जंतूला हात लागेल,तो मरेल.
पापपुण्याबाबत सांगतांना एक गोष्ट नक्की मांडतो की आमच्या शहरात एक बावीस वर्षाचा तरुण कोरोना ग्रस्तांना मदत करीत होता.नव्हे तर तो आणि त्याची चमू जेवण वाटत होती.त्याला लागण होवून तो मरण पावला.तर जेही या उपक्रमाला मदत करीत होते.त्याही लोकांना कोरोना पाजिटिव्ह निघालेला आहे. ते मरण पावले नाहीत.पण कोरोना पाजिटिव्ह निघालेला आहे ही विचार करायला लावणारी बाबच आहे.कोरोना सांगत आहे की केव्हापर्यंत लाकडाऊन ठेवाल.मी आजाराने मारील नाहीतर उपासमारीने.अगदी तशीच परीस्थिती सध्या सुरु आहे.सरकारही केव्हापर्यंत लाकडाऊन ठेवेल.यावर विचार करण्याची गरज असून आपण स्वतःच आपली स्वतःची सुरक्षा करावी.लाकडाऊन आहे.तेव्हापर्यंत तरी लाकडाऊन पाळावे.घरातच राहावे किंवा सुरक्षीत अंतर तरी ठेवून वावरावे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
----------------------------------------------------
पाप आणि पुण्य
सुप्रतिष्ठित कुटुंब होतं. पण घरातील मुलीने वीस वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला. रागाच्या उद्वेगात तिच्या आईच्या तोंडून वाक्य निघाले,"कोणते पाप केले होते की आजचा दिवस पाहायला मिळाला." पण त्या मुलीच्या दृष्टीने तिने आपला जीवनसाथी स्वतः निवडणे ह्यात तिला काही गैर वाटत नव्हते.
थोडक्यात काय तर ज्यामुळे आपली, आपल्या प्रतिष्ठेची समाजासमोर हेळसांड होईल, नाचक्की होईल असे कर्म करणे, माणसाच्या हातून कळत-नकळत होणाऱ्या चुका म्हणजे पाप. चुका लक्षात आल्या, त्याचा पश्चाताप झाला, प्रायश्चित्त घेतले की आपोआपच पुण्यकर्म झाले असे म्हणायला हरकत नाही. पण कधीकधी आपण काही चुकीचे करत आहोत ह्याचा गंधही नसतो काही व्यक्तींना. मग त्यांचे काय? देशावर आपल्या देशद्रोही हल्ले झाले. जो करतो त्याला कधीच वाटत नाही तो पाप करत आहे. पाप म्हणजे वाईट कर्म. पण एखाद्याला वाटणारे वाईट कर्म हे इतरांच्या दृष्टीने वाईट असेल असे नाही. परिस्थिती, येणारे अनुभव यातून कृती घडते. एखाद्याच्या उपयोगी पडले की आपण म्हणतो पुण्यकर्म झाले. तहानलेल्याला पाणी देणे, रक्तदान करणे, संकटाच्या वेळी मदतीला धावून जाणे. या कर्मातून पुण्यकर्म घडले असे आपण म्हणतो. पुण्य म्हणजे चांगले कर्म. पापाचा घडा भरला की तो इथेच फेडायचा असतो असं म्हटलं जातं.
रिटा त्यावेळी एम्.एस्.सी.ला होती. त्यावेळी युनिव्हर्सिटीमध्ये सॅम्पल टेस्टिंगसाठी द्यायचे होते तिला. हेडने परमिशन लेटर दिले. युनिव्हर्सिटीमध्ये टेस्टिंगसाठी ते सॅम्पल दिल्यावर ते म्हणाले, "सॅम्पल ची कॉनटीटी खूप कमी आहे.नाही करू शकत टेस्टिंग." तिचं मन खूप दुखावलं गेलं. तिने विचार केला की हे सॅम्पल लॅबमध्ये दिलं तर. परमिशन लेटर वरचा पत्ता व्हाइटनरने पुसला आणि लॅबचा पत्ता टाकला आणि दिले सॅम्पल टेस्टिंगला. तसं पाहिलं तर नकळतपणे रीना कडून चूक घडली. पण तिचा उद्देश चांगला होता. वाटलंच नव्हतं की तिच्याकडून काही चुकीचं घडलं.जेव्हा बोललं की तू असं व्हाइटनर लावून जे कृत्य केले ते चुकीचं आहे मग तिच्या लक्षात आले.
शक्यतो चुकीच्या गोष्टी हातून घडू नये असे प्रत्येकाला वाटते. पण कधीकधी वेळ वाईट असते, कधी गरज असते म्हणून अशा गोष्टी इच्छा नसताना देखील कराव्या लागतात.
आजवर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तुम्हाआम्हांकडून. पण इथून पुढे त्या न घडू देणे, हेच आपल्या चुकांचे प्रायश्चित्त समजा.
प्रिती दबडे,पुणे
9326829898
----------------------------------------------------
पाप-पुण्याची भाषा
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
हीच खरी पाप आणी पुण्याची व्याख्या. जे काम उजेडात खुलेआम होते ते पुण्य किंवा पवित्र. जे अंधारात लपून छपून केले जाते ते पाप, अपवित्र, वाईट काम, किंवा दुष्कृत्य.
पाप आणि पुण्य मनाचा भाव आहे. मी एका चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर माझ्यादृष्टीने ते पुण्य काम होईल. पण त्याच्या दृष्टीने ते वाईट काम किंवा पाप असेल. संशय आणि दारिद्रय हे ज्या ठिकाणी वास करीत असतील त्याला पाप समजावे. जेथे विश्वास, संतोष असेल ते पुण्य समजावे.
अष्टादश पुराणेषुव्यासस्यवचनद्वयम्
परोपकारायपुण्यायपापायपरपीडनम्
अठरा पुराणात हीच दोन वचे सांगितली आहेत की, दुसऱ्यांना त्रास देणे पाप आहे आणि गरजवंताला मदत करणं हे पुण्य आहे.
जशी नदी जात- पात कसलाही भेद न करता नि:स्वार्थपणे सगळ्यांना पाणी देते. तसा परोपकार माणसाने केला तर ते पुण्य आहे. त्यात स्वार्थ, अहंकार नको.
जे आपल्याला आवडत नाही त्याला पाप म्हणतो. जे आपल्याला आवडतं त्याला पुण्य म्हणतो. आज आवडणाऱ्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात. पण उद्या त्याने आपले ऐकले नाही तर तीच व्यक्ती आपल्या दृष्टीने वाईट बनते.
पाप आणि पुण्य आपल्या डोळ्यात पण वास करतात. एखाद्या सुंदर स्त्रीला पाहून एखादा म्हणेल, इतकी सुंदर रचना करणाऱ्या देवाचे मी आभार मानतो. पण दुसऱ्या एखाद्याच्या, त्या सुंदर स्त्रीला पाहून मनात पाप येईल, वाईट विचार येतील. म्हणजे पाप आणि पुण्य
एकाच गोष्टीचे वेगवेगळे भाव आहेत जे आपल्या नजरेत आहेत.
पाणी रंगहीन आहे. त्याच्यात जसा रंग मिसळू तसा त्याचा रंग होतो. तसेच पाप-पुण्याचे असते. सगळी कामे त्याच्या मागील भावना नुसार चांगली किंवा वाईट ठरतात. चांगल्या उद्देशाने विवेकपूर्ण, सद्भावनेने केलेली चोरी, हिंसा, कपट वाईट ठरत नाही. पण अविवेकाने वाईट उद्देशाने, केलेली सत्कर्मे पण वाईट म्हणजे पाप ठरतात. अशी ही पाप-पुण्याची भाषा.
आपल्या जीवनात पाप-पुण्याचा मोठा रोल आहे. पुण्याचा योग असतो तेव्हा जीवन एकदम शिखरावर असते. पण पापाचा प्रकोप होताच आपण खाली आपटतो. हा एक विचित्र खेळ आहे. हे जो माणूस जाणतो, त्याच्या जीवनात सहजता आणि स्थिरता येते.
आपण म्हणतो, "मी पुण्य कमविन." आपण पैसा कमवू शकतो. तो आपल्याला दिसतो. पण आपण कमावलेलं पुण्य कधी डोळ्याला दिसते का?
आपण पैशाकरता उद्योग करतो. त्यात उत्साह आणि उल्हास असतो. तसे पुण्य कमावण्याचा कधी उत्साह असतो? गोडी वाटते ?
जितके महत्त्व आपण पैशाला देतो, तितके महत्व पुण्याला आपल्या जीवनात देतो का?
पैशाचा उपयोग आपल्याला दिसतो, तसा पुण्याचा कधी दिसला का?
पुण्य कमवायला शिका. म्हणजे पाप- वाईट कृत्ये करू नका. मनात शुद्ध भाव ठेवून, सत्पात्री दान करा. भगवान- गुरुची पूजा करा. सदाचरण करा. सेवा करा. पुण्य करणे ही एक विचारधारा असली पाहिजे. म्हणजे पाप घडण्याचे कमी होईल.
पुण्य भोगू नका. पुण्याचा त्याग करा. पुण्याच्या फळाचा त्याग करा. म्हणजे पुण्याचा आणखी संचय होतो. अनासक्त, विनम्र भावाने तुम्ही पुण्य भोगू शकता. तुम्ही मनसोक्त कमवा आणि मोकळ्या मनाने ते वाटा.
निसर्गनियमाप्रमाणे आयुष्यात कधी ग्रीष्म येणार, कधी श्रावण येणार. पण ग्रीष्मातही- वाईट परिस्थितीतही धैर्य ठेवणे , हे सत्कर्म- पुण्यकर्म.
एखाद्याने आपले वाईट केले म्हणून मी त्याचे वाईट करीन, अशी सूड उगवण्याची पाप भावना नसावी.
अशी भाषा नसावी. राग आला तरी रागावू नये. दुसऱ्याला लुबाडून पैसे मिळवू नये. आहाराची शुद्धता, शरीराची शुद्धता लक्षात घ्यावी. इंद्रिय निग्रह शिकायला हवा. कुठल्याही गोष्टीत प्रामाणिकता समजली की मनाला पाप शिवत नाही. क्षमाशील असावे. अशी आपली विचारधारा असावी.
एक अधिकारी वाममार्गाने खूप पैसा कमवीत असे. तो धार्मिक वृत्तीचा, पूजा करणारा होता. 'ईश्वर कृपेने' माझे सगळे चांगले चालले आहे, असे तो म्हणायचा. पण खरेतर 'भ्रष्टाचार कृपेने' याचे चांगले चाललेले असायचे. अशा माणसाने केलेल्या पूजा- अर्चेला काही अर्थ आहे का ? त्याचे कर्म, पुण्यकर्म म्हणायचे का? पाप-पुण्याची भाषा करताना तारतम्य बाळगावे.
पाप-पुण्याचा हिशेब मेल्यानंतर चित्रगुप्ताने करण्याऐवजी आपणच जिवंत असताना जिवंतपणे करावा. एवढेच आहे की पाप पुण्याची बेरीज वजाबाकी होत नसते. त्यामुळे विशुद्ध मनाने सत्कृत्य करणे, फक्त आपल्या हाती असते.
पाप आणि पुण्याच्या कल्पना आपण मानल्या आहेत. एकोणिसाव्या शतकापर्यंत स्त्रीला शिक्षण देणे व मासिक पाळी येण्यापूर्वी तिचे लग्न न करणे ही आईबाबांसाठी नरकाची वाट मानली जायची. ते पाप समजले जायचे. पण आता नीती बदलली. आता शिक्षण देणे पुण्यकर्म. आज-काल अठरा वर्षाआधी लग्न करणे कायदेशीर रित्या गुन्हाच आहे.
आपल्याला ईश्वराप्रती काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना मदत करणे. हे पुण्य काम करणे ही ईश्वराप्रती व समाजाप्रती खरी कृतज्ञता होय!!
शुभदा दीक्षित
पुणे
----------------------------------------------------
पाप आणि पुण्य, म्हणजे जैसी करणी वैसी भरणी
मित्रांनो प्रत्येक युगात पाप,पुण्यांची भाषा बदलली आहे.कारण मनुष्य प्राण्याला काळानुसार चालावं लागतं हा काळाचा महिमा आहे.पुर्वि पाया खाली मुंगी जरी मेली तर पाप लागायचे . खोटं बोलले,शब्द पाळले नाही, कोणाला लाथ लागली ,असे अनेक प्रकार सत्ययुगात मानल्या जाई आणि त्या वेळेस लोक सुध्दा पाप, पुण्यांवर विश्वास ठेवत असे.आज या कलीयुगात मानसाची नितिमुल्ये ढासळली आहे.विज्ञान युगात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात स्वार्थि बनला आहे.स्वताच्या सुखासाठी तो कोणत्याही मार्ग पत्करायला तयार आहे.पाप म्हणजे काय तर,आपल्या हाताने होणारा दुसऱ्या चा विनाश,कींवा वाईट कृत्ये, म्हणजेच पाप होय. आज भाऊच भावाचा घातकी झाला आहे.दिवसाढवळ्या मालमत्तेसाठी खुन होतात.पाप म्हणजे काय तर आपल्या कडुन कुणावर अन्याय होता कामा नये,कोणाचे अंतःकरण दुखवू नये,प्राणी मात्रावर दया करावी,या पुण्य म्हणजे जमेल तेवढी सहकार्याची भूमिका ठैवा, दान करा पण सपात्री दान करा,दारात दारू पिऊन आलेल्या माणसाला दान केले तर ते नक्कीच पापात जाईल पण खंरच गरजु व्यक्तीची मदत केली तर त्याचे भले होईल.कलीयुगातील पुण्य मिळविण्यासाठी हे करा. वृक्षारोपण करून वृक्षांची जोपासना करा,पाण्याची व विजेची बचत करा., प्रदुषणाला आळा घाला, नद्या स्वच्छ ठेवा, आई-वडिलांची सेवा करा,त्यांना वृध्दाश्रम दाखवु नका, गरजवंताला दान करा.अन्याय सहन करू नका. एवढे जरी केले तर या कलीयुगात भरपूर पुण्य मिळते शिवाय आपल जे कोणतं आराध्यदैवत असले त्यांचे नामस्मरण सतत करा.
सौ मेघा विनोद हिंगमिरे वर्धा
----------------------------------------------------
पाप आणि पुण्य तराजूची दोन पारडी
छोटा शशांक आणि श्रद्धा आजीबरोबर रोज शुभंकरोती म्हणतात ,रामरक्षा म्हणतात, देवाजवळ दिवा लावतात, हात जोडतात, घरातील सर्वांना संध्याकाळी नमस्कार हे करताना आजी म्हणते अशीच माझी गुणी नातवंड संस्कारी राहू दे रे देवा, पापाचा स्पर्शही त्यांना व्हायला नको .
आजी म्हणाली,मला तर वाटते आता नक्की जगबुडी होणार जगात पापी लोकांची संख्या काही कमी नाही पाप करतच राहतात आणि त्याची फळे संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. कधी महामारी, कधी कधी महायुद्ध, कधी असूया, भांडण दुष्काळ, निसर्गाचा प्रकोप अशा विविध रूपांमध्ये पापाची शिक्षा भोगावी लागत आहे.
छोटा शशांक म्हणाला आजी पाप म्हणजे काय ग? तशी श्रद्धा म्हणाली आणि जगबुडी म्हणजे काय? आम्हाला समजेल असं सांग ना .अरे बाळांनो पैसा संपत्ती सौंदर्य याची लालसा यामुळे माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कृती करत आहे जसे; आपल्याला राहण्यासाठी जंगल तोड करणे ,जागा मिळवणे व वन्यप्राणी पशुपक्ष्यांची शिकार करणे ,त्यांच्या अनेक प्रजाती नष्ट करणे ,असे वर्तन करणे बेसुमार पैसा कमावण्यासाठी प्रदूषण पसरतील अशी कारखाने उभे करणे .कारखान्याचा सांडपाणी, सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतो की नाही हे तर मानव बघतच नाही हेच पाणी नद्या प्रदूषित करीत आहे ह्याच पाण्यामुळे समुद्र देखील प्रदूषित होत आहे. जंगलतोड वाढली आहे प्रदूषण वाढले आहे त्यामुळे जगातील तापमान वाढत आहे. बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे .समुद्रातील प्रदूषणामुळे मासे मरत आहेत अनेक मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणामुळे शुद्ध हवा मिळत नाही त्यामुळे फुप्फुसाचे आजार बळावत आहे .अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पिकांना कीड लागू नये म्हणून अतिशय उच्च दर्जाची प्रतिजैविकं फवारली जात आहेत ;त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर देखील होतो व कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. मानवाला जंगलातील प्राण्यांचे मांस खाण्याची चटक लागली आहे; त्यामुळे अनेक वन्य प्रजाती नष्ट होत आहेत तर वन्य प्रजातींना होणारे आजार मांस खाण्यामुळे माणसालादेखील होत आहे. नैसर्गिक अन्नसाखळी ला त्यामुळे बाधा पोहोचत आहे. वाघासारखा प्राणी त्याचा अधिवास जंगलात अधिक असतो माणसाने जंगल तोडून तिथे बांधकाम करायला सुरुवात केल्यामुळे त्याला त्याचे अन्न तिथे मिळेनासे झाले, त्याचा सुरक्षित निवारा माणसांनी नष्ट केला म्हणून वा बिबट्या यासारखे प्राणी मानवी वस्तीत येत आहेत; आणि नरभक्षक बनत आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात मानव अन्न,औषध ,सौंदर्यप्रसाधने अशा अनेक वस्तुत भेसळ करत आहेत त्यामुळे सामान्य लोकांचे आरोग्य धोकादायक बनत आहे. कष्ट म्हणजेच काम करण्याचा लोकांना कंटाळा येत आहे त्यामुळे कमी श्रमात अधिक पैसा मिळतो असे कोणते वर्तन ते करत आहेत तर ते चोरी करत आहेत त्यामुळे कमी श्रमात अधिक पैसा त्यांना मिळत आहे परंतु हे सुख क्षणिक असले तरी त्यामुळे जो श्रम करतो त्याचे मात्र परिश्रम वाया जात आहेत
प्रामाणिक कष्ट करण्याऐवजी माणूस वडिलोपार्जित इस्टेट मिळवण्यासाठी भावाशी बहिणीची आईवडिलांशी भांडत आहे व्यसनांच्या आहारी जात आहे पैसा असेल तरच नातीगोती जपली जात आहे पैसा नसेल तर त्या व्यक्तीला कुठलेही नातलग जवळचे राहत नाही आजीचे बोलणे मध्येच थांबवत श्रद्धा म्हणाली आजी किती वेळ पापा याविषयी सांगते आहेस पण पुण्य कुणी करतो की नाही आणि पुन्हा पुण्य कशाला म्हणायचं हे तरी सांग आजी म्हणाली हो हो सांगते पुण्य कशास म्हणावे? गरजवंत व्यक्तीला मदत करणे त्याचा आधार बनणे म्हणजे पुण्य कमावणे होय .आपण समोरच्या व्यक्तीला त्याची गरज पाहून जमेल तशी मदत करावी ही मदत आर्थिक रूपात असू शकते, मानसिक आधाराचे रूपात असू शकते .आज वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहे जसं ;कला क्षेत्र' वैद्यकीय क्षेत्र' संशोधनाचे क्षेत्र या क्षेत्रांमध्ये प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले तर हे पुण्यकर्म आहे असे म्हणता येईल. दुसऱ्याच्या कामात मदत करणे त्याचा अडसर दूर कसा होईल हे पाहणे म्हणजे पुण्यकर्म. परंतु; दुसऱ्याची चहाडी करणे त्याचे काम कसे बिघडेल असे वर्तन करणे म्हणजेच पाप होय. मोठ्यांचा आदर करणे व लहानांना प्रेम देणे म्हणजे पुण्यकर्म होय. आई-वडिलांच्या इच्छांचा सन्मान करणे त्यांची सेवा करणे म्हणजे पूर्ण कर्म होय. आजकाल मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात त्यांची काळजी घेत नाही म्हणजेच पाप कर्म होय. तुम्हा मुलांना प्राणी-पक्षी खूप आवडतात प्राणी पक्ष्यांना आसरा देणे त्यांना अन्न पाणी पुरवणे हे पुण्याचे काम. परंतु; कुत्र्याची शेपटी बांधून त्याला ओढणे ,चिमणीला दगड मारणे ,हत्तीचे दात मिळवण्यासाठी त्याची शिकार करणे ,मगरीचे कातडे ,सापाचे कातडी मिळवण्यासाठी त्यांना मारणे हे पापच होय. पृथ्वीवरील प्रदूषण कमी होण्यासाठी झाडे लावणे 'त्यांचे संगोपन करणे, त्याचप्रमाणे पावसाचे प्रमाण वाढुन ते जमिनीत जास्त प्रमाणात मुरावे यासाठी डोंगरांवर झाडे लावणे, जमिनीची धूप थांबवणे,आधुनिक पद्धतीने शेती करीत असताना पाण्याचा अपव्यय टाळणे ,जैविक पद्धतीने शेती करणे ,कीटकनाशकांचा वापर जपून करणे देखील पुण्याचे काम आहे बर का! शिक्षण घेणे प्रेम मिळवणे हा लहान मुलांचा हक्क आहे परंतु ;त्यांच्यावर अन्याय करून त्यांना भीक मागण्यास लावणे 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास भाग पाडणे त्यांच्याकडून काम करुन घेऊन त्यांना अर्धपोटी ठेवणे हे देखील पापच आहे आई वडील ,पत्नी, मुले यांची जबाबदारी नाकारून व्यसनाधीन होणे म्हणजे देखील पाप होय. एखाद्या कडून श्रम करून घेणे काम करून घेणे व त्यास त्याच्या कष्टाचा मोबदला न देणे म्हणजे देखील पाप. अनाथ व्यक्तीस सहाय्य करणे त्याचा आधार बनने त्याला स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत करणे म्हणजे सर्वात मोठे पुण्यकर्म होय श्री जन्माचे स्वागत करणे मुलींना शिकवणे,त्यांच्या पायावर उभे करून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे, सर्व स्त्री जातीचा आदर करणे म्हणजे देखील पुण्यकर्म होय.
आजीने अगदी सोप्या शब्दात आपल्या नातवंडांना पाप-पुण्याची संकल्पना समजावून सांगितली आणि मुलांना देखील ती समजली आपण मोठी माणसे आपल्यालाही पाप-पुण्याची ही संकल्पना नक्कीच सोप्या शब्दात समजली असेल
सविता साळुंके
9604231747
salunke savita42@gmail. com
----------------------------------------------------
पाप-पुण्य
पापपुण्य या मानवी संकल्पना आहेत. मनुष्य जातिवंत बुद्धिवान प्राणी आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो बरेच शोध लावतो. आधुनिक तंत्रज्ञान वापरतो. आतातरी विज्ञान फारच पुढारलेले आहे. तरीही पापभीरू वृत्ती पूर्वीपासून जोपासत आला आहे. कारण आपल्या पूर्वजांनी आपल्या मनावर पापपुण्याच्या संकल्पना चांगल्याच ठसविल्या आहेत. त्यामुळेच सत्कर्म केले तर पुण्य मिळेल आणि कूकर्मानंतर पाप हे गृहीत धरूनच आपण जीवन जगत असतो.त्या पाप-पुण्याचा हिशोब करायला 'परमेश्वर' नावाची एक मूर्ती असते. ती उघड्या डोळ्यांनी आपले कर्म पाहत असते.
आपण पाप करतो की पुण्य भले घरातल्यांना इतरांना माहित नसते पण परमेश्वरदरबारी याची नोंद आहे असे समजून आपण या जगात वावरत असतो. 'करावे तसे भरावे' 'जैसी करणी वैसी भरणी' या म्हणीही या समजुतीतून बनल्या आहेत. पूर्वी बोलायचे गेल्या जन्मीच्या या पापपुण्याचे संचित या जन्मी फेडावे लागते. परंतु आता बोलले जाते. या जन्मीचे पापपुण्य याच जन्मी फेडावे लागते. परंतु प्रत्येकाला असे वाटत असते की आपण पुण्यकर्मच करतो.इतर लोकं पापं करतात. आपण खरे बोलणारे हरिश्चंद्राचे अवतार आहोत. खोटे कधीच बोलत नाही. त्यामुळे नक्की पाप कोणते नि पुण्य कोणते याचा काहीच ताळमेळ लागत नाही. काही वेळा लोक देवधर्म करतात, धार्मिक ग्रंथ वाचतात. उपासतापास, दानधर्म करतात. त्यामुळे त्यांना वाटते की पापाचा भाग कमी होऊन पुण्याचा हंडा भरेल पण असे कुठेही वाचन, लेखनात आलेले नाही.
दानधर्माने पुण्य मिळते हेही कुठेच लिखित नाही. परंतु एवढे मात्र खरे की सजीवाची मग ते प्राणीपक्षी असोत की मानव. त्यांची हत्या करणे पाप समजले जाते.कारण या पृथ्वीतलावर जसा आपणास जगण्याचा अधिकार आहे तसाच सर्व जीवजंतुंना आहे.आपण बुद्धी नि ताकद यात प्रबळ आहोत म्हणून पशूंचा जीव घेण्याचा अधिकार आपणास कोणी दिला? इवल्याशा मुंगीपासून प्रचंड अशा देवमाशापर्यंत सर्वजण परमेश्वराची लेकरे आहोत. मग आपण त्यांच्यावर अत्याचार का करावे? चोरी, अफरातफर करणे हेही पापकर्मच आहेत. परंतु हल्ली हे सर्व सर्वसामान्य झाले आहे. अफरातफर करणे किंवा लाच घेणे हा गुन्हा नसुन जणू आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे असे समजले जाते. त्यातून समोरच्याच्या मनाचा विचार केला जात नाही.त्यामुळे मनानेच देवाला, कूकर्म करण्याला जरा घाबरावे यासाठी ही संकल्पना तयार झाली असावी. जो भीत नाही तो निडर म्हणावा लागेल किंवा नास्तिक.
सौ.भारती सावंत
मुंबई
----------------------------------------------------
पाप व पुण्य
मानवाच्या जीवनात जसे सुख व दुःख येतच असते, त्याप्रमाणे मानव हा पाप व पुण्य यांची गोळाबेरीज आपल्या आयुष्यामध्ये सतत करत असतो. पाप म्हणजे वाईट काम. जी गोष्ट केल्याने स्वतःलाही त्याचा काही उपयोग नसतो व दुसऱ्यालाही त्यापासून त्रास होतो. व पुण्य म्हणजे चांगले काम, चांगले वागणे चांगले बोलणे, लोकांच्या मनात स्वताबद्दल आदराचे स्थान निर्माण करणे होय. थोडक्यात पाप म्हणजे हिंसा व पुण्य म्हणजे अहिंसा होय.
जेव्हा एखादी वाईट पद्धतीने, क्रूरपणे वागत असते तेव्हा लोकांच्या व्यक्तीला सहजच म्हणतात, " आता तुझ्या पापाचा घडा भरला आहे." म्हणजे वाईट वागणे यालाही काही मर्यादा आहेत.पण पुण्य आपण कितीही करू शकतो. पुण्य करण्याला मर्यादा नाहीत. कारण जेवढे पुण्य आपण करू म्हणजे चांगले काम करू तेवढे आपल्याला समाधान मिळते. व आपला लोकसंचय वाढतो. हे सर्वांना माहीत असते. पण ते कुणाच्या अंगवळणी पडत नाही. त्यासाठीच याला देवा धर्माची जोड दिली तर मानव थोड्या प्रमाणात का होईना कमी प्रमाणात पाप व पुण्य जास्त करण्याचा प्रयत्न करतो. मानव हा पापभिरू प्राणी आहे. आपण पाप केले की देव आपल्याला त्रास देईल एक भावना त्याच्या मनामध्ये रुजलेली असते. पण प्रत्यक्षात तसे काहीही नसते.
जी व्यक्ती पुण्याने वागते ती व्यक्ती सतत समाधाने, आनंदी राहते. कारण त्या व्यक्तीने कधी पापच म्हणजेच वाईट काम केलेले नसते त्यामुळे त्याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना कधी येणे शक्य नसते.तो नेहमी तणावरहित राहतो व समाधानी जातो. जीवनामध्ये शक्य होईल तेवढे आपण चांगले काम करावे ,गरजू लोकांना मदत करावी. दुसऱ्याच्या प्रती कधीही मनामध्ये वाईट भावना आणली नाही तर आपला पुण्यसंचय वाढत जातो. पाप व पुण्य हे नेहमी निराकार असते. ते आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही.ती एक अनुभवायची गोष्ट आहे.
म्हणून नेहमी सत्कर्म करा. दुसऱ्याच्या उपयोगी पडले म्हणजे आपलाही अनुभव वाढतो. आपल्यामध्ये एक आत्मविश्वास येतो, सकारात्मकता अंगी वाढते.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
----------------------------------------------------
*पाप आणि पुण्य*
प्राचीन काळात कमी शिकलेला समाज असून देखील त्यांचे वर्तन योग्य असायचे पण आज समाजातील प्रत्येक माणूस शिक्षणाकडे वळला असून शिक्षित झाला असला तरी सुसंस्कृत झाला नाही त्यामुळे शिक्षित व्यक्तीकडून देखील अनेक चुकीचे वर्तन होऊ घातले आहे.आजच्या तंत्रज्ञानी युगात सत्कार्य करणाऱ्या व्यक्तीला 'पुण्यवान' आणि दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीला 'पापी' समजले तर चुकीचे होणार नाही.स्वातंत्र्यावीर वि. दा. सावरकर म्हणत असत की,'स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास' यावरून दुसऱ्याचे हीत ध्यानात घेऊन समाजात वर्तन करणारी व्यक्ती ही पुण्यवान आहे असंच मी समजेल.भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक थोर पुढारी व क्रांतिकारक यांनी प्राणाची आहुती देऊन देश स्वातंत्र्य करण्यात मोलाची भूमिका वठविली ते खरे पुण्यवान आहेत त्यामुळे आज आपण स्वातंत्र्याची फळे उपभोगत आहोत.सामाजिक विषमता दूर करण्यासाठी फुले,शाहू,आंबेडकर,म.फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या अनेक समाजसेवकांनी पुण्याची कार्य केल्यामुळेच शिक्षणाची द्वारे खुली झाली आहेत आणि आजही समाजसुधारणा व शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी झटणाऱ्या समाजसेवक देखील कमी नाहीत.स्वतःचा स्वार्थ,लोभ सोडून इतरांच्या हितासाठी कार्य करणारी व्यक्ती ही पुण्यवानच असते.याउलट कार्य करणारे समाजकंटक 'मनात एक आणि बोलतात एक' वाममार्गाने जाऊन खून,दरोडे,चोरी,लुटेरे यासारखे कृत्य करणारे व्यक्ती माझ्या मते पापी आहेत असं मी समजतो.
पूर्वीच्या काळी अशिक्षित कुटुंब असून देखील वृद्धाश्रम नव्हते.आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचे पालन पोषण करणे हे मुलांचे आद्य कर्तव्य आहे असं समजून काळजी घेत असत पण आज सध्या वृद्धाश्रमची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे म्हणजेच समाज शिक्षित असतांना देखील संगोपन न करता माता-पित्यांना वृद्धाश्रमाचे द्वार खुले करीत आहेत म्हणजेच हे पापाचे लक्षण आहे ना!!!यामुळे पिढ्यानपिढ्या पाप करत चालले आहे.समाजात नातेगोते सांभाळून आपल्या आई,ताई,आत्या,मावशी यांच्याशी दुरवर्तन केलेल्या बातम्या आपण वर्तमान पत्रात वाचतो.भावाने बहिणीची अब्रू लुटली, पित्याने आपल्याच मुलीवर अत्याचार केले,स्वतःच्याच घरी चोरी करणे,खून करणे यासारखे कृत्य हे पापाचेच लक्षण आहे.दुसऱ्याला दुःख पोहचेल असं आचरण देखील पापाच्या गणतीत मोडल्या जाते.
संपूर्ण समाजाला दोष देता येणार नसले तरी सर्वाना सुपरिचित असलेले नाव म्हणजे सिंधुताई सपकाळ...सिंधुताई सपकाळ गरोदर असतांना तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार केले...तिच्या जीवनाचा त्यांना जराही विचार आला नाही हे कृत्य त्यांचे पापाचे लक्षण आहे पण आता मात्र सिंधुताई सपकाळ आपल्या सत्कार्याने अख्या देशातील अनाथ,अपंग,मागास असलेल्या हजारो मुलांची 'माई' आहे हे विसरता कामा नये.माईचे कार्य खरोखर अभिनंदनीय व पुण्याचे आहे.तसेच बाबा आमटे यांनी समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग असलेल्या मुलांना घर दिले,राहण्याची व्यवस्था केली,त्यांचे पालनपोषण करीत आहेत.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन प्रकाश आमटे हे आदिवासींच्या मागासलेल्या परिस्थितीला सुधारण्यासाठी केलेले कार्य पुण्यात गणले जातात.आज आपण राहत असलेल्या ठिकांणी गरजू व्यक्तीला केलेली मदत,रक्तदान हे पुण्याच्या श्रेणीत मोडले जातात.
यावरून पाप आणि पुण्याविषयी बोलत असतांना आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असले पाहिजे.आपलेच कर्म हे पाप आहे की पुण्य आहे हे समजते.मनुष्य शिक्षित झाला तर फक्त पुण्याचेच कार्य करतो ही संकल्पना पूर्णपणे चुकीचे आहे.कारण त्यासाठी शिक्षित माणसाने स्वार्थी वृत्ती सोडून निस्वार्थपणे सत्कार्य करीत राहावे.ज्या कार्यापासून स्वतः,समाज यांना आत्मिक समाधान लाभेल असेच वर्तन करायला हवे तेव्हाच पापमुक्त व पुण्यवान समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
✒श्री दुशांत निमकर,चंद्रपूर
----------------------------------------------------
संकल्पना पाप-पुण्याची
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
मानवी जीवनात अनेक प्रसंग येत असतात. या प्रसंगांना सामोरे जाताना अनेक घडामोडी घडत असतात. मुळातच मानवी जीवनातील अनेक ऐहिक व्यवहार करताना कळत नकळत अनेक बाबी आपल्या कडून घडत असतात या सर्व बाबी पाप आणि पुण्याच्या संकल्पनेत बसविल्या जातात.
मुळात मनुष्य स्वभावाचे दोन पैलू पडतात.'आस्तिक' व 'नास्तिक' जे निसर्ग शक्तीला देव मानतात ते 'आस्तिक' आणि ह्या जगाचं रहाटगाडं असेच चालतं त्यामागे कोणतीही शक्ती नाही असं मानणारा गट म्हणजे 'नास्तिक' ...ईश्वर शक्ती मानणारे अध्यात्मिक विचाराचे असतात.आणि म्हणूनच कदाचित पाप आणि पुण्य ह्या संकल्पना बहुतांशी अध्यात्माशी निगडित मानल्या जातात.
खरं तर पुण्य आणि पाप ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असतात.एखादी गोष्ट किंवा कृती करतांना माणसाच्या मनात नैतिक व अनैतिक या प्रकारचा द्वंद्व सुरू होणे म्हणजेच नकळत पाप आणि पुण्याच्या गोष्टींची रुजवात मनात सुरू होणे होय.
मनुष्य देह हा नाशिवंत आहे... या नरदेहात आत्मा रुपी ईश्वर वास करत असतो.आणि या देहाकडून बऱ्याच गोष्टी घडत असतात.चांगल्या गोष्टी घडल्यास पुण्य आणि वाईट गोष्टी घडल्यास पाप अशी संकल्पना अध्यात्माकडून सहजच मानवी मनामध्ये रंजी घालू लागते.चांगले काम केल्यास 'स्वर्ग' आणि वाईट कृती केल्यास 'नरक' या संकल्पना यातूनच निर्माण झाल्या असाव्यात.
पाप पुण्य,स्वर्ग-नरक ह्या सगळ्याच शब्दांमुळेच कदाचित सामाजिक शिस्त राहण्यासही मदत होते.मनुस्मृतीमध्ये लिहिल्याप्रमाणे धर्मानुसार 10 प्रमुख पुण्य आणि 10 पाप आहेत. त्यांना जाणून घेऊन त्यांचे अनुसरण केल्यास कोणीही आपल्या आयुष्यात क्रांतिकारक बदल आणू शकते.
धृति: क्षमा दमोऽस्तेयं
शौचमिन्द्रियनिग्रह:।
धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ॥
मानवी जीवनच क्षणभंगूर असल्याने कदाचित पाप पुण्य ही संकल्पना सगळ्यांना मान्य असेलच असे नाही.परंतु खरे की खोटे याचा किस काढीत बसण्यापेक्षा सर्वांनी सदैव मनोभावे उत्तम कार्य करीत राहणे गरजेचे आहे...!!
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.co
----------------------------------------------------
#"पाप व पुण्य"#
"पाप-पुण्याचा हिशोब,
कराया मी बसलो,
दोहोंच्या असमतोलाने,
स्वतःशीच मग हसलो..!"
(शुभा-कंदी पेढा)
"माणूस जन्माला आला की,पाप-पुण्य ह्यांची सोबत येतेच.चांगलं कर्म केलं की ते "पुण्य"म्हणून गणले जाते तर,वाईट कर्म केलं की ते "पाप"ठरवलं जात.असा साधा सरळ हिशोब. मग चांगलं वागलं की पुण्यसंचय होतो,नी वाईट वागलं की पापाचे धनी बनून नरकात जाण्याचा मार्ग सुकर होतो.अस उपहासात्मक बोललं जातं.
"पापाचा घडा भरला की,त्या व्यक्तीला नियती,देव,प्रारब्ध, जगनियंता,काळ कठोर शासन करतोच. असे म्हंटले जाते.त्यातील खरे-खोटेपणा देवच जाणे असे दुर्दैवाने बहुतांश वेळा म्हणावे लागते.कारण,खूप पापकर्म जी, चोरी,वाईट कर्म,निंदा,हिंसा,वाईट वर्तन,व्यसन,भ्रष्टाचार, खून,मारामारी, चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती ह्यातून घडलेली असतात,घडत असतात तीच लोक सुखनैवपणे जगत-वागत असतात. त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा त्यांना न मिळता उलटपक्षी ते सुखाच्या-ऐश्वर्याच्या जगात लक्ष्मीकांत बनून लोळण घेत असतात. अन दुसरीकडे, पापभिरू, सामान्य,सरळमार्गी व्यक्ती मात्र आयुष्यभर खस्ता-टक्केटोनपे खात जगणं जगत असतात.
तेव्हा मनाला प्रश्न पडतो,असे का बरे होत असावे?इथे पाप पुण्याला वरचढ ठरतंय....!!तर तसे नसते,तो एक कालखंड असतो,"अति तिथे माती"या उक्तीनुसार, प्रत्येक गोष्ट चिरकाल राहतं नाही. त्यामुळे उशिरा का होईना पाप-पुण्य म्हणजेच ,मानवी वर्तनाच्या दोन बाजू कधीतरी घातक अथवा चांगल्या बनून आयुष्य वेगळ्या वळणवाटांवर येते.
जग तर ह्या दोन्ही बाबींवर चाललं आहे."पाप "आहे म्हणून" पुण्याला "महत्व आहे.जगाची घोडदौड त्यामुळेच तर चालली आहे.सगळं कसं सुकर नि सरधोपट सुरू असत तर मानवी जीवनालाही अर्थ उरला नसता ना?
आता हे पाप -पुण्य जगाच्या बदलत्या स्वरूपानुसार विविधांगी रूपे धारण करून आपल्या सामोरं येत आहे.पण शेवटी त्यातील काय स्वीकारून आयुष्याचे मार्गक्रमण करत राहायचे हे आपण आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून ठरवलं तर सगळंच चांगलं घडेल ना?
शेवटी काय तर पाप-पुण्य आपण स्वीकार करण्यावर आपल्या जवळ येते.कोणी त्या दोहोंतील कोणा एकाचा कसा स्वीकार करतील हे ज्याच्या-त्याच्या विचारसरणीवर अवलंबून राहील नाही का?
😃©️✒️शुभांगी विलास पवार,(कंदी पेढा)-सातारा
----------------------------------------------------
सर्वात मोठे पुण्य
एक राजा होता.तो प्रजेवर खूप प्रेम करायचा.प्रजेसाठी त्याने त्याचा घरसंसार सोडला.प्रजेची सेवा करण्यात आनंद मानू लागला.एक दिवशी राजा जंगलात जात असताना त्याला एक साधू दिसले.राजाने साधू ला प्रणाम केला आणि म्हणाला साधू महाराज आपल्या हातात काय आहे ,त्यावर साधू म्हणाले यात जे लोक भजन करतात त्याची नावे आहेत.राजा म्हणाला माझ नाव आहे का यामध्ये ? साधू म्हणाला नाही.राजा म्हणाला बरोबर आहे. भक्ती करायला मला वेळ कुठे आहे .मी प्रजेमध्ये असतो.राजा पुन्हा राज्यात गेला.आणि एकदा पुन्हा राजा जंगलात गेला तेव्हा पुन्हा साधू दिसले.राजाने पुन्हा विचारले साधू महाराज आज काय आहे तुमच्या हातात? तेव्हा साधू म्हणाले आज जो ईश्वराचे काम करतो त्यांची नावे आहे.मग पुन्हा विचारले माझ नाव आहे का तेव्हा पहिल्याच पानावर राजाचे नाव होते ,राजा आश्चर्यचकित झाला,मी तर ईश्वर सेवा नाही करत मग माझे नाव कसे आले.त्यावर साधू महाराज म्हणाले, राजा तू प्रजेची सेवा करतो.प्रजेची सेवा हीच ईश्वरसेवा.. परोपकार करा.अनाथ ,विधवा ,कष्टी लोकांची सेवा करणे हीच भक्ती आहे.यातून पुण्य मिळते.निस्वार्थ काम करा त्यापेक्षा मोठे पुण्य नाही.परोपकार करणे हेच पुण्य आहे ...
निलम गायकवाड (पुणे)
9/5/2020
----------------------------------------------------
" पाप - पुण्य : मानवी मनाचे दर्पण "
मित्रांनो , आपण आपल्या बालपणापासूनच थोरा - मोठ्यांच्या तोंडून पाप - पुण्य हे शब्द ऐकत आलोय . घरात आजी एखाद्याला चुकून जरी लाथ लागली तरी म्हणायची " पाया पड , नाही तर देव पाप देईल ! " तसेच एखाद्या गाय , कुत्रा , मांजर यांना जरी डिवचून त्रास दिला तरीही मोठे माणसं म्हणतात , " असे करू नाही ! मुक्या प्राण्यांत देव असतो , तो तुला पाप देईल ! " म्हणजेच काय तर ' पाप ' ही संकल्पना ' वाईट कृत्य ' याच्याशी निगडीत आहे .
एखाद्या गरीब भूकेल्या - तहानलेल्या माणसाला जर अन्न - पाणी दिले तर ' पुण्य ' मिळते . शिवाय आर्थिक दानधर्म करून कुणा गरीब होतकरू मुलाची शैक्षणिक गरज भागवील्यास ' पुण्य ' लाभते . अर्थात ही ' पुण्य ' संकल्पना ' चांगल्या कृतीशी ' निगडीत आहे .
ह्या पाप - पुण्य संकल्पना आपल्या मानसिक श्रद्धेवर आधारित असतात . त्या आपल्या नैतिकतेवर अवलंबून असतात . त्यांच्या प्रमाणावरच मानवाच्या व्यक्तीमत्वाची ओळख होते . जसे , ' राम ' नाव उच्चारले की डोळ्यासमोर थोर पुण्यात्माची मूर्ती दिसून येते . तर ह्या उलट ' रावण ' नाव उच्चारले तर डोळ्यासमोर दुष्ट पाप्यात्माची किळसवाणी मूर्ती दिसू लागते . हे ' राम - रावण 'दोन्ही थोर शूरवीर लढवय्ये होते पण त्यांचे कृत्य त्यांना ' देव - दानव ' या संज्ञेस प्राप्त ठरविले . म्हणजे मानवांचे कृत्य ह्यावरून त्याची प्रतिमा आकारास येत असते .
" जैसी करनी , वैसी भरनी ! "
मानव हा आपल्या हातून नेहमी कोणते ना कोणते काम करतच असतो . मग जर त्याने आपला विवेक जागृत ठेवून फक्त समाजमान्य व समाज हितावह कार्य केले तर तो समाजात 'आदर्श व्यक्ती ' निश्चितच होणार . त्यामुळे सामाजिक कल्याण होईल . याउलट जर मानवाने वाईट मूल्ये अंगीकारली तर तो ' समाज विघातक ' होणार यात शंकाच नाही . तेव्हा आपल्या हातात आपले व्यक्तीमत्व असते . म्हणतात ना , " ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप ! "
म्हणून असे म्हणावे वाटते की , हे ' पाप - पुण्य ' मानवी मनाचा आरसाच होय ! ह्या आरस्यातून प्रत्येकाला स्वतःची प्रतिमा सुस्पष्ट पाहता येते . हा आरसा कधीच खोटे रूप दर्शन करवित नाही . चला तर मग आपण आपल्या हातून भरपूर ' पुण्यकर्म ' करून आपली प्रतिमा उजळून टाकूया . जर ' पापकर्म ' केले तर ती मलिन होऊन कुकलंंकित होईल . म्हणून ' पाप - पुण्य ' हा मानवी अंर्तमनाचे दर्शन करविणारा एक ' दर्पण ' होय !
अर्चना दिगांबर गरूड
मु. पो. किनवट , जि. नांदेड
मो. क्र . 9552954415
----------------------------------------------------
कर्मफळे चाखता ....
कर्मंण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
श्रीमद्भगवद्गीता मध्ये ,
पाप आणि पुण्याची परिभाषा समजावताना
भगवंत अर्जूनला सांगतात , हे अर्जून फक्त कर्मावरच तुझा अधिकार आहे कर्म फळावर नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्माचे चांगले वाईट फळ जरुर मिळते .
कर्माचे चार प्रकार आहेत , १) पुण्यकर्म , २) विकर्म ,
३) अकर्म ४) पापकर्म ,
५)सु कर्म .
आता आपण प्रत्येक कर्माचे फळ कसे व केव्हा मिळते ते पाहू.
१) पुण्यकर्म -- पुण्यकर्म म्हणजे गरजूंना कोणत्या परत फेडीची सुक्ष्म अपेक्षाही न ठेवता निष्काम मदत करणे. हे सर्वात मोठे पुण्य आहे .
त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते या जन्मात किंवा पुढच्या जन्मी. जसे भरपूर अन्नदान केले तर पुढचा जन्म धनधान्यानी संपन्न कुटुंबात होतो . पण तुम्ही अन्नदान केले आणि स्वतःची स्तुती व्हावी यासाठी स्वतः च प्रचार केला तर त्याचे फळ कमी होऊन फक्त क्षणीक स्तुतीचा आनंद मिळतो .यालाच म्हणतात कच्चे फळ खाणे. पुण्यकर्माचे चांगले गोडफळ मिळते पण त्यासाठी निष्काम सेवेचा भाव मनात असावा लागतो .
२) सु कर्म --- याला आपण चांगले कर्म देखील म्हणू शकतो . आता वरील उदाहरण कोणी जर
स्व- स्तुतीच्या अपेक्षेने तुमच्याजवळ केलेल्या कर्माचे वर्णन करत असेल तर आपणही मनापासून शुभभावना ठेवून स्तुती करून समोरच्या व्यक्तीलाआंनदीत करुन सुकर्माचे खाते जमा करु शकतो. यामुळे समोरच्या व्यक्तीला आनंदीत केल्याचे फळ आपल्याला मिळते . ते फळ म्हणजे समोरच्याच्या मनात आपल्यासाठी निर्माण होणारे प्रेम आणि विश्वास. यातच सुक्ष्म आशिर्वाद सामावलेले असतात. ह्या सुकर्माचे फळ आपल्याला लगेच मिळते.
आपले मन स्वच्छ आणि शुध्द राहते व आपण नेहमीच आनंदी व उत्साही राहतो .
३) विकर्म ---- जसे सुकर्म असते त्याच विरुद्ध विकर्म असते . त्याचे फळही तात्काळ मिळते .
आपण नेहमी पाहतो काही लोकांना नेहमीच पर चिंतन , परनिंदा करण्याची सवय असते काही लोकं तोंडावर निंदा करतात तर काही माघारी निंदा करतात. आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे कि कधीतरी हे समोरच्या पर्यंत जाईलच. आपण केलेली पर निंदा किंवा पर स्तुती , दुसर्याचे मनात केलेले वाईट चिंतन हे आपल्या भोवताली त्याचे विशिष्ट प्रकारचे अदृष्य वलय तयार होत असते. आणि हेच वलय नकारात्मक भावनांना जन्म देत असते .म्हणूनच आपण निरुत्साही आणि अपयशी होतो .
४) अकर्म --- अकर्म म्हणजे ह्याचे फळ सुख दुःख देत नाही .
जसे तुम्हाला तहान लागली .
तर तुम्ही एक पेला घेऊन माठा जवळ जाऊन त्यातले पाणी पिऊन पेला पुन्हा जागेवर ठेवाल .हे झाले अकर्म म्हणजे तुमच्या कर्माने माठा ला काही सुख किंवा दुःख झाले नाही आणि तुमचे समाधानही झाले . ह्याचे फळ समाधान हे असते
५) पापकर्म --- कोणत्याही प्रकारची हिंसा करुन दुसर्याला शारिरिक मानसिक , आर्थिक हानी पोहचवणे हे पाप कर्म.
ह्याचे फळ तात्काळ मिळते असे नाही ते नंतर किंवा दुसर्या जन्मी देखील मिळते.
काही कर्माचे फळ तात्काळ मिळते तर काही कर्मांचे फळ उशिरा मिळते.
कधीकधी चांगल्या कर्माचे फळ मिळायला ही उशीर होतो ह्याला कारण आपला मागील पापकर्मांचा हिशोब बाकी असतो.
समजा कोणाला कॅन्सर झाला तर काहींना पैसा असून इलाज होत नाही .याला कारण तुमचे मागचे कर्म . कर्मफला नुसारच माणसाला नातेवाईक मित्रमंडळी भेटत असतात .कारण त्यांच्याशी आपला पाप आणि पुण्यकर्मांचा हिशोब बाकी असतो.
काही लोकांना मलमलच्या गादीवर देखील शांत झोप येत नाही तर काहींना दगडाच्या उशीवर देखील लगेच झोप लागते .
जिथे पापाचे पारडे जड असते आणि पुण्याचे कमी असते . तिथे दुःख अपयश जास्त असते आणि सुख कमी असते .
आणि जिथे पुण्याचे पारडे जड आणि पापाचे कमी असते तिथे सुख आणि यश जास्त असते आणि दुःख कमी असते.
म्हणूनच जमेल तसे पुण्य केलेच पाहिजे संकल्पानी सुध्दा कोणाला दुखावू नये .जेणे करुन आपले पुण्याचे पारडे जन्मोजन्मी जडच राहिल.
आपण जे चांगले वाईट देतो तेच आपल्याला दुप्पट होऊन मिळते .
म्हनूनच म्हणतात ना , वरच्याला डोळे आहेत , तो पाहतोय ..
🖋 सौ सुवर्णा सोनावणे
चाळीसगाव
७७४४८८००८७
----------------------------------------------------
पाप आणि पुण्य
मुलांनो वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी कसा झाला हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. जंगलातून जाणाऱ्या प्रत्येक माणसाचे तो धड व शिर वेगळे करीत असे आणि त्याबदल्यात एक खडा रांजणात टाकीत असे. किती तरी रांजणे त्याच्या घरी भरून होती म्हणजे त्याने किती लोकांना ठार केले होते याचा अंदाज आपणाला येऊ शकतो. त्याच जंगलातून एकदा नारदमुनी पायी चालले होते. त्यांच्यावर सुद्धा त्यांनी हात उगारला. त्यावेळी त्यांनी एक प्रश्न विचारला होता की, या पापात किती जण भागीदार आहेत ? यावर घरी जाऊन वाल्या कोळी प्रत्येकाला तो प्रश्न विचारला. पण सर्वांनी या पापात भागीदार होण्यास नकार दिला. त्यावेळी वाल्या कोळींचे डोळे उघडले. त्यांनी नारदमुनीचे पाय धरले व यावर पश्चातापाचा मार्ग विचारला असता, त्यांनी राम राम नावाचा जप करण्यास सांगितले. पण वाल्या कोळीला ते म्हणता येत नव्हते, तेव्हा मरा मरा असे म्हणत म्हणत वाल्या कोळी रामायणाचे रचियेता बनून वाल्मिकी ऋषी बनले. अशीही ही आख्यायिका. यातून आपणास पाप व पुण्य दोन्ही गोष्टी कळतात. मात्र घरात व समाजात वावरताना हे करू नको अन्यथा पाप होते आणि असे कर म्हणजे पुण्य मिळते ही वाक्ये पदोपदी आपणाला ऐकण्यास मिळतात. तेव्हा आपण बुचकळ्यात पडतो आणि पाप म्हणजे काय ? पुण्य म्हणजे काय ? याचा विचार करतो. आपणाला समजेल, रुचेल व पटेल अशा भाषेत वेदव्यास ऋषींनी पुण्य व पापाचे विवेचन करताना म्हटले आहे की इतरांचे कल्याण करणे म्हणजे पुण्य आहे तर दुसऱ्यांना दुःख देणे पापकर्म आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे इतरांना आपल्या वागण्याने, बोलण्याने, कृतीने दुःख होणार नसेल तेच पुण्य आहे. दररोज देवळात जावून देवाला नमस्कार करणे, एवढ्यानेच पुण्य प्राप्त नाही. घरात आई-वडील, भाऊ-बहीण शाळेत मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत प्रेमाने वागणे, चांगले बोलणे इत्यादी क्रियांमधून आपणाला पुण्य मिळविता येऊ शकते. प्राणीमात्रावर दया दाखविणे, लुळे, पांगळे, आंधळे, असहाय्य लोकांना मदत करणे यातून सुद्धा पुण्य मिळविता येऊ शकेल. संत तुकाराम महाराज म्हणतात की, परपीडा परनिंदा हे खरे पाप तयाचे । पुण्य ते जाणा रे भाईनो परउपकाराचे ।। इतरांना दुःख देणे किंवा निंदा करणे हेच खरे पाप आहे आणि इतरांवर उपकार करणे हेच खरे पुण्य आहे. आपल्या मनात सदोदित पुण्याचा विचार येण्यासाठी ज्ञानाचा वापर करावा कारण ज्ञानाच्या प्रकाशाने पापरूपी अंधकार नाहीसा होतो असे प्रख्यात कवी कालिदास यांनी म्हटले आहे. त्यामुळे खूप ज्ञान मिळवा आणि आपले घर कुटुंब समाज गाव राज्य आणि देशाला विकासाकडे न्या, हेच खरे पुण्य आहे.
- नासा येवतीकर 9423625769
साभार :- पाऊलवाट
----------------------------------------------------
----------------------------------------------------
----------------------------------------------------
----------------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें