शुक्रवार, 15 मई 2020

रोज एक लेख :- दिवस सत्ताविसावा कुटुंब / परिवार

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- सत्ताविसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 15 मे 2020 शुक्रवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- कुटुंब / परिवार*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सुधारणा ह्या घरापासूनच व्हायला हव्या
           *कोणत्याही प्रकरणावर दोष काढावे.दोष काढणे अपेक्षीत आहे.त्याशिवाय चूक लक्षात येत नाही.पण नाहकच कोणाला त्रास देण्यासाठी दोष काढू नये.असे केल्याने फालतूची तेढ समाजात निर्माण होते.जेणेकरुन समाजसुधारणा करणा-यांचा भ्रमनिरास होतो व सुधारणा घडत नाही.*
          आपण आपल्या घरी राहतो.प्रेमाने वावरतो.एकमेकांची इज्जत करतो.आदर,मानसन्मान राखतो नव्हे तर एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो.
          घरातील नात्याने ओवलेल्या सर्व मंडळी मिळून परीवार बनतो.या नात्यात थोडा जरी दुरावा आला की परीवार तुटतो.मग चटके बसतात.ते चटके आपल्यालाच सहन करावे लागतात.
       नातेसंबंधातील परीवाराच्या या दलदलीत एका सदस्याला जरी इजा झाली,तर त्याची झळ सर्व सदस्यांना बसते.थोडाफार त्रास त्यांनाही सहन करावाच लागतो.जरी सदस्य घरुन निघून गेला तरी.म्हणूनच आपले नाते बळकट असायला हवे.
        अलिकडे व्हाट्सअप फेसबूकचा जमाना आलाय.या नादात लोकं आपले वैयक्तीक कामंही विसरलेले आहेत.लोकांना फेसबुक व्हाट्सअप पाहतांना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.यामुळे की काय?घरातील छोट्या छोट्या कामावर दुर्लक्ष होते.चिडचिड निर्माण होते.यातच घरातील एखादा सदस्य रागावलाच तर एवढा महाभयंकर राग येतो की टोकणा-या माणसाचा जीव घ्यावासा वाटतो.पण परीवाराच्या नातेसंबंधांच्या व्युहरचनेत तसे करता येत नसल्यानं आपली वेगळी पोळी शिजवावी म्हणून काही सदस्य घर सोडून जातात.पण व्हाट्सअप फेसबुक सोडायला तयार होत नाहीत.काही सदस्य तर याहीपलिकडचे असतात.ते आपल्या घरातील सर्व मंडळींना झोपू देतात.मग अर्धरात्री उठून व्हाट्सअप फेसबुक पाहात बसतात.तर काही सदस्य हे अंगावर पांघरुन घेवून व्हाट्सअप पाहात बसतात.पण व्हाट्सअप पाहतांना कितीही लपून पाहण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या दिवशी ती चोरी पकडलीच जाते.
          परीवारात एक जबाबदार व्यक्ती असतो.त्याचेवर परीवाराची भिस्त अवलंबून असते.जरी सदस्य घरातून निघून जरी गेला असेल तरी त्या जबाबदार व्यक्तीला अतीव दुःख होते.त्याच्या सुखात परीवाराचे सुख अवलंबून असते.परीवारातील प्रत्येक सदस्य सुखी तर तो सुखी अशी त्याची अवस्था असते.परीवारातील सदस्य दुःखी तर तोही दुःखी होत असतो.कारण तो परीवाराच्या आनंदासाठी जगत असतो.पण परीवारातील सदस्याला याची जाणीव नसल्याने त्याला कोणीतरी दुःखाच्या खाईत ढकलल्यासारखे वाटते.त्यातच तो तुटतो व त्याला कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो याची कल्पनाही करता येत नाही.यानंतर हा जबाबदार व्यक्ती अशा घरुन निघून गेलेल्या सदस्याला परत माघारी आणण्यासाठी प्रयत्न करतो.त्यांना मिळविण्यासाठी प्रयत्न करतो.कधीकधी तो यशस्वी होतो.कधीकधी होत नाही.
         परीवारातील सदस्यांच्या बाबतीत विचार केल्यास तेही सुखी नसतात.आत्मीक बळ देणा-या व्यक्तीचं मन तोडल्यानं ते अशा खाईत जावून पडतात की कधीकधी त्यांना त्या खाईतून परत येता येत नाही.कारण तिथे दलदल असते.शिवाय आपल्या घरचं भांडण बाहेरची मंडळी पाहात असतात.त्यांना अशा भांडणातून खुप आनंद मिळतो.ते तर वाटच पाहात असतात की दुस-याच्या घरात भांडणं केव्हा होतील.अशावेळी पारीवारीक सदस्यांनी अत्यंत जोखमीचं पाऊल टाकावं लागतं.
        काही लेखक मंडळी हिरीरीनं लेख लिहितात.कधीकधी वाईट चालीरीतीवर हल्ला चढवतात.मग त्या परीवारातील का असेना किंवा समाजातील का असेना.त्या वाईट कुप्रथा बदलायला हव्या असं वाटतं.जर या वाईट प्रथा वा सवयी बदलल्या नाही तर परीवार नासतो.तसेच असल्या वाईट प्रथा समाजात असल्या तर समाजही नासतो.पण परीवार किंवा समाज सुधरंवायचा असेल तर लेखकाला भिवून चालत नाही.त्याला या वाईट रुढी प्रथा परंपरा बदलविण्यासाठी असे लेख नाईलाजानं लिहावेच लागतात.मग ते परीणामाचाही विचार करीत नाहीत.
         आमचा भारत देश सुजलाम होता.सुफलाम होता.या भारतावर वाईट परंपरेचं अधिराज्य होतं.पण या वाईट प्रथा त्यावेळच्या इतर समाजालाही घातक वाटत नसल्या तरी त्या आमच्या समाजासाठी घातक होत्या.सतीप्रथा,बालविवाह,केशवेपन यासारख्या वाईट प्रथा.......काही समाजसेवकांनी यावर हल्ला चढवला की त्या वाईट प्रथा बंद व्हाव्या.त्यामुळे त्या काळच्या लोकांना याची झळ सोसावी लागली.पण या कुप्रथा बंद झाल्या.त्याचा फायदा समाजालाच झाला.कित्येक स्रीयांच्या सतीप्रथा थांबल्या.केशवेपन,बालविवाह थांबले.त्यामुळं कित्येक स्रीयांना त्यांचा हक्क मिळवता आला.
         कोणताही लेखक फक्त आपल्या प्रथा सुधरला पाहिजे नव्हे तर आपला देश सुधारला पाहिजे.तसेच आपला समाज सुधारला पाहिजे या दृष्टीने लिहित असतो.मीही एक लेख लिहिला.अंधश्रद्धा निर्मूलनाचा.त्यात विषय लिंबू मिरचीचा होता.लिंबू मिरची ही प्रथा वाईट प्रथा नाही.पण लोकांनी या प्रथेला वाईट केल्यामुळे ही प्रथा वाईट ठरते.तसेच कोंबड्या बक-याचा बळी देणे ही तर वाईटच प्रथा.हे दोन विषय माझ्या लेखाचे होते.यात कोणत्याही धर्माचा विषय नव्हता.पण काही महाभाग या विषयाचा बाऊ करुन विषय वाढवतात.नव्हे तर वाद उत्पन्न करतात.असेच काहीसे कमेंट माझ्याही लेखावर आले.प्रत्यक्ष कोंबडा बकरा बळी देण्याची प्रथा ही इतर धर्मात असूनही त्याचा हिंदू धर्माशी संबंध लावून वाद उत्पन्न करणारे काही महाभाग या देशात आहेत.ते वाद उत्पन्न करतात आणि वाद उत्पन्न झाल्यावर त्यातून निघून मजा पाहतात.ही इंग्रजांची नीती असून त्यांनी जसा हिंदू मुस्लीम वाद उत्पन्न करुन हिंदू मुस्लीम भांडण सुरु केले होते.त्याच प्रकारची ती कमेंट मला अनुभवायला मिळाली.मात्र त्यांना स्वतः तशा प्रकारचा लेख लिहा म्हटल्यावर ते गप्प झाले.
        काही काही महाभाग स्वतः तर काहीच करीत नाहीत आणि दुसरा काही करीत असेल तर त्यांनाही करु देत नाहीत.मग कशी होईल समाजसुधारणा.जेव्हा दलितांना याच देशात पशुप्रमाणे वागणूक होती.असे असतांना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या गोष्टीला विरोध केला नसता तर आजही दलितांची गत पशुप्रमाणे राहिली असती.केशवेपन,सतीप्रथांचंही तेच झालं असतं.विरोध करायला हवा.पण ज्या गोष्टीला विरोध करणे गरजेचे आहे त्या गोष्टीचा.फालतूच्या गोष्टीचा विरोध करुन त्या गोष्टीचा घटनेशी संबंध लावून विरोध करणे बरे नाही.हिंदू,मुस्लीम,शिख, इसाई हे सर्व धर्म वेगळे जरी असले तरी प्रत्येकाच्या धर्माचे आचरण वेगवेगळे आहे.त्या त्या समाजाने त्या त्या समाजातील आपल्या कुप्रथाचा विचार करावा.विरोध करावा.कारण आपला धर्म आपले एक घर असते.म्हणून प्रत्येकाने दुस-याच्या घराकडे बोट दाखविण्यापुर्वी प्रथम आपले घर सुधरवावे.त्यानंतरच दुस-यांच्या घराकडे बोटे दाखवावीत.कारण आपण एक बोट जरी दुस-याच्या घराकडे दाखवले तरी चार बोटं आपल्या घराकडे असतात.घर सुधारलं पाहिजे.सदस्य सुधारले पाहिजे.प्रत्येकाने आपले घर सुधरवले तर उद्या देशही सुधरेल व कोणत्याही कुप्रथाचे समुळ उच्चाटन करता येईल.त्यासाठी आपले घर सुधारणे महत्वाचं आहे.याचा प्रत्येकाने विचार करावा.दोष काढावे पण विचार करुन.फालतूचे दोष काढून लिहिणा-यांचा भ्रमनिरास करु नये. 
          अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*कुटुंब:एक वास्तव*
*श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)*

" संयुक्त कुटुंब आता
  देशात विरळ होत आहे
  नात्यातला गोडवा हा
  कमी कमी होत आहे."
          प्राचीन काळात शेतीचा शोध लागण्यापूर्वी मानव भटकंती करीत असत पण सध्या शेतीचा,चाकाचा,आगीचा शोध लागल्यानंतर एकत्र राहू लागले.कुटुंब म्हणजे काय???कुटुंबात का राहायचे???असे अनेक प्रश्न भेडसावत असत. मनुष्यप्राणी हा समाजशील प्राणी आहे.प्रत्येक व्यक्तीला काही ना काही एकमेकांची गरज पडते.वस्तू विनिमय,देवाणघेवाण या सर्व बाबी चुटकीसरशी सोडविल्या जाव्यात हा शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेऊन एकत्र राहणे पसंद करीत असत.समाज म्हणजेच एक प्रकारचा कुटुंबच होय म्हणूनच तर 'विश्वची आमुचे घर' असे म्हणतो ते उगीचच नाही पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता कुटुंबाची व्याख्या मर्यादित केलेली दिसून येते.व्यापक दृष्टिकोनातून विचार न करता केवळ संकुचित विचार करून कुटुंब हे मर्यादित केले आहे.मागील दोन ते तीन दशकांपूर्वी कुटुंबात आजी,आजोबा,आई,बाबा,काका,काकू त्यांची नातवंडे असा व्यापक कुटुंबाचा आवाका बघायला मिळत होता त्यामुळे आजी आजोबांच्या सानिध्यात वेगवेगळ्या कथा,गोष्टींतुन छान संस्कार दिल्या जात होते.कुटुंबाचे संयुक्त व विभक्त असे दोन प्रकार फक्त दिसून येतो आहे.आज कुटूंबाचे देखील अत्यंत संक्षिप्त रूप म्हणजे विभक्त कुटुंब सर्वाधिक बघायला मिळतो आहे.कुटुंब हाच एकमेकांना आधार,सुरक्षितता,प्रेम,आपुलकी,गोडवा वाहणारा अखंड झरा असा उल्लेख केल्यास चुकीचे होणार नाही पण विभक्त कुटुंबीपद्धतीमुळे वरील सर्व गोष्टींने मुकावे लागत आहे असे सध्या परिस्थिती दिसते आहे.
          संयुक्त कुटुंबपद्धतीत कुटुंब प्रमुख आजी-आजोबा यांच्या नेतृत्वात आजचा युवक राहू पाहत नाही तर विचारांमध्ये मतभेद होत आहे.कुटूंबात असे मतभेद होणे साहजिक आहे.'मतभेद व्हायला हवे पण मनभेद असू नये' असं असलं तरी कुटुंबात मतभेद विकोपाला जात आहेत.वृद्ध आई-वडील देखील आपल्या मुलांचे वाईट व्हावे असे कधीच चिंतत नाही तरी देखील आज त्यांच्या विचारांचा विचार केला जात नसून त्यांच्या भावनेशी खेळण्याचे महाभयंकर प्रकार दिसून येत आहे.दोन दशकांपूर्वी मुलींना मनात भीती वाटत असायची की माझ्या नशिबात सासू कशी मिळणार पण आता सासुलाच मनात अनामिक भीती वाटते की,सून कशी मिळणार?? असा फरक झालेला आहे.सासू-सून यांचे छोट्या-छोट्या कारणाने घरात भांडणे व्हायची हा नित्याचाच बाब त्यामुळे पत्नीच्या प्रेमापोटी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचे पालन-पोषण करण्याचे मुलांचे कर्तव्य विसरत जात आहे असं दिसून येते. मुलाला फक्त वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क आहे असं ठामपणे बोलतो त्याप्रमाणे वृद्ध आई-वडिलांचे देखील पालनपोषण करणे हे आद्य कर्तव्य आहे याचा मात्र विसर पडलेला दिसतो.जेवढया हक्काने अधिकाराची भाषा करतो त्याप्रमाणे कर्तव्याची जाणीव ठेवल्यास वाढणाऱ्या वृद्धाश्रमाची संख्या घटण्यास मदत होईल.
         आज मर्यादित स्वरूपात पती-पत्नी आणि आपली मुले एवढाच हा गोतावळा म्हणजे कुटुंब समजला जातो.'माझी गाडी,माझीच माडी अन माझ्याच बायकोची गोलगोल साडी' याव्यतिरिक्त करतो तरी काय?? म्हणून या एकविसाव्या तंत्रज्ञांनी युगात आजच्या तरुणाईला कुटुंब,गोतावळा,पूर्वीचा मनोरंजन व संस्काराचा काळ येण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच गरज आहे.पूर्वी नात्या-गोत्यातील सुट्टी,सण-समारंभकाळात नातेवाईकांकडे जाण्याची जी झुम्मड दिसायची ती आज दिसेनाशी होत आहे.आज संयुक्त कुटुंब पद्धती विरळ होत असून विभक्त कुटुंब पद्धतीचा ससेमिरा अधिकच वाढलेला दिसून येत आहे त्यामुळे जर असंच चालू राहिले तर तेच सुसंस्कार आपल्याच मुलांवर पडणार आणि ते देखील आपल्याला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणार?? त्यामुळे वेळीच जागृत होऊन कुटुंबातून प्राप्त होणारी मूल्यांची जपणूक करण्यासाठी दुरावा,मतभेद दूर सारून प्रेम,आपुलकीने,मनाने,विचाराने एकत्र येऊन राहण्याची गरज बनली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 आजची कुटुंब व्यवस्था
कुटुंब ही एक सामाजीक संस्था असून
तीचे स्वास्थ चांगले राहिले तर संपुर्ण
समाजाचे स्वास्थ उत्तम राहू शकते.पण आजकाल बदलती विचारसरणी आणि स्वतंत्र्याची संकल्पना ही कुटुंब व्यवस्था उलथून टाकत आहे.लग्न झाले की लगेच विभक्त राहण्याची प्रवृती ही कुटुंब व्यवस्थेला लागलेली कीड आहे.विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आम्ही दोघं राजा राणी या चंगळवादी विचारसरणीमुळे घरात संस्कार देणारी आजी आजोबाची शाळा उध्वस्त झाली.आणि त्याची जागा विकृत विचारांची पेरण करणा-या व सतत गुरफटून ठेवणा-या टी.व्ही.च्या कोचींगमध्ये मुलं दाखल झाली.आई वडील कामानिमित्त सतत बाहेर राहू लागली तसं मुलं 'त्या' कोचींग मध्ये रमू लागली.रमता रमता बिघडू लागली.बघडलेली मुलं पुढं आई वडीलांना रडवू लागली.आणि वृद्धाश्रमात धाडू लागली.आणि आम्ही पिढी बघडली म्हणून नावं ठेवू लागलो.पण आम्ही न कळत काय पेरत गेलो हेच आम्हाला कळले नाही.
एकत्रीत कुटुंबात आम्हाला घरातील सदस्याची आडचण वाटत राहिली आणि विभक्त कुटुंब व्यवस्था अस्तीत्वात आही.विभक्त कुटुंबाबरोबर मनंही विभक्त झाली.
माणसं माणसापासून दुरावत गेली.नात्यात अंतर पडत आणि वाढत गेले.ऐक्याचे महत्व एकत्रीत कुटुंबातून
अपसूक समजून येत होतं.रक्ताच्या नात्याला अर्थ होता.आता नात्यात कमालीचा दुरावा आणि निव्वळ औपचारिकता आली आहे.हे मी सांगण्याची आवश्यकता नाही,आपणासही याचा ठायी ठायी अनुभव इल्या वाचून राहत नाही.बिघडलेली सामाजीक व्यवस्था सुधारण्यासाठी बिघडलेली मानसीक आवस्था सुधारणे गरजेचे आहे.व्यक्तीमत्व घडण्याची पहिली शाळा म्हणून कुटुंबाकडे पाहिले जाते,इणि ती जर कमकुवत किंवा स्वार्थाच्या बजबजीत राहत असेल तर
वर्तमानापेक्षा भविष्य कठीण आहे.आणि भविष्य सोसण्याची बारी आणि वेळ आपलीच आहे.चंगळवादाला दूर सारून आणि एकत्रीत राहून कुटुंबाला उन्नत करू आणि स्वत:बरोबर सामाजीक स्वास्थ चांगले ठेवू.
             हणमंत पडवळ, उस्मानाबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
21 संस्काराचे बिज कुटुंबातच रुजवा
महाराष्ट्र हे संतांचे,समाजसुधारकांचे व विचारवंतांचे राज्य आहे.महाराष्ट्रासारख्या राज्यात संस्कार मिळण्याचे ठिकाण कुटुंब,शाळा आणि समाज हे आहे.पूर्वीच्या काळात संस्कार कुटुंब,समाज व गुरुकुलामधून मिळायचे.मग ते आध्यात्मिक संस्कार असो वा शैक्षणिक संस्कार असो.आज मात्र परिस्थिती थोडीशी बदललेली दिसते.संस्कार ही फक्त शाळेतूनच मिळावे किंवा मोठ्या शिकवणी वर्गातून मिळावे ही पालकांची भूमिका झाली आहे.मुलांना मोठी-मोठी पुस्तके मिळाली,चांगला गणवेश मिळाला व शहराच्या नामांकित शाळेत ऍडमिशन मिळाले.म्हणजे मुलगा सुसंस्कारित व उच्चशिक्षित होणार असा मोठा गैरसमज आजकालच्या पालकाचा झाला आहे.कुटुंबाची व आई-वडिलांची भूमिका मात्र सगळेजण विसरत चालले आहे. आपल्या मुलावर संस्कार करायला आई-वडिलांकडे वेळ नाही.शहरी भागात आई-वडील दोघेजण नोकरी करतात.तर ग्रामीण भागात आई-वडील दोघे शेतात काम करतात.तसेच शहरी व ग्रामीण भागात आई-वडील दोघेही व्यावसायिक आहेत.अशा परस्थितीत कुटुंबाचा वेळ कामामध्ये विभागलेला आहे.प्रत्येक कुटुंब ही व्यस्त झालेली आहे.त्यामुळे मुलांनवर संस्कार करायला आजकाल वेळ मिळत नाही.हे सत्य आहे.घरामध्ये मुलांकडे लक्ष देणारी आजी-आजोबा कुटुंबातून गायब झालेली पाहावयास मिळत आहे.याचे कारण म्हणजे कौटुंबिक व्यवस्था ही एकत्रित राहिली नाही.विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई-वडील आणि मुले असा छोटा परिवार निर्माण झाला आहे. कुटुंबातून घरातील मोठी व्यक्ती म्हणून आजी-आजोबा नातवांना संस्कार देऊ शकतात.वेळ देऊ शकतात.मात्र विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे आजी-आजोबांचे वेगळे कुटुंब पहावयास मिळत आहे.याउलट थोडे मागे वळून पाहिले तर,ग्रामीण भागात एकत्र कुटुंबपद्धती होती.कुटुंबात आई-वडील,आजी-आजोबा,काका-काकू,चुलत भाऊ,चुलत बहीण असे सर्व जण एकत्र राहायचे.सणवार,उत्सव,रुढी परंपरा एकत्र साजरे करायचे.त्यामुळे साहजीकच आई-वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर राहिले तरी,आजी-आजोबा नातवंडांना वेळ द्यायचे.नातवंडा सोबत खेळायचे.रात्री आजी आपल्या नातवांना रामायण-महाभारतातील कृष्ण,बळीराम,राम-लक्ष्मण,अर्जुन, कर्ण,तसेच इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांच्या गोष्टी सांगायच्या.यातून मुलांवर चांगले संस्कार घडायचे. गोष्टी,गाणी,पाळणा यासारख्या गोष्टींमधून मुलांवर चांगले संस्कार व्हायचे.चांगल्या गोष्टी,वाईट गोष्टीची जाणीव मुलांना लहान वयातच व्हायची.चांगला आणि वाईट हा फरक मुलांना लहानपणीच कळायचा.नकळत मुलांवर वाढत्या वयाबरोबर चांगले संस्कार व्हायचे. कुटुंबातील मोठी व्यक्ती म्हणून आजी-आजोबा नातवंडांचे लाड करायचे,त्याचबरोबर शिस्त सुद्धा लावायचे.व शिस्त मोडल्यावर शिक्षा सुद्धा करायचे.यामुळे अंगात साहजिकच शिस्त भिंनली जायची.आजकाल मात्र कुटुंबात मुलांचे लाड होतात.शिस्त मात्र मुलांमध्ये फारशी दिसत नाही.कारण आजकालचे पालक मुलांना शिक्षा करण्यापेक्षा,लाडच अधिक करतात.आणि म्हणून आजकालची मुलं शिक्षणाने सुशिक्षित होतांना दिसतात.परंतु संस्कारांनी अशिक्षित असल्याचे जाणवते.आजच्या पिढीतील तरुण मुलांच्या वर्तनावरून तरी हेच दिसत आहे.कॉलेजच्या नावाखाली व फॅशनच्या नावाखाली संस्कार व संस्कृती पायदळी तुडवतांना दिसत आहे.फॅशनच्या नावाखाली अर्धवट अंग झाकणारी कपडे घालायचे.अंग उघडे ठेवले म्हणजे फॅशन,वेगवेगळे व्यसन केले म्हणजे फॅशन,मैत्रीच्या नावाखाली पार्टी,नाच-गाणी,व्यसन केले म्हणजे मैत्री.अशा अनेक गैरसमजुतीने किंवा पुढारलेल्या विचारसरणीने तरुणाई भरकटलेली दिसत आहे.आणि यातूनच सामाजिक भान विसरून हीच तरुणाई भारताचे नागरिक म्हणून समोर येत आहे.आपण पाहतो समाजाचे वैचारिक संतुलन बिघडत चाललेले आहे.याला कारणीभूत समाज, फॅशन, चित्रपट,तंत्रज्ञान,मोबाइल,राहणीमान व पुढारलेली विचारसरणी याबरोबच कुटुंब सुद्धा याला जबाबदार आहे.आज समाजात गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात व महाराष्ट्र बरोबर संपूर्ण भारत देशात ज्या काही वेगवेगळ्या घटना घडत आहे.यामध्ये बलात्कार,छेड काढणे, मुलींना त्रास देणे,विवाहीत स्त्रियांचा छेळ करणे अशा घटना मनाला सुन्न करणाऱ्या आहे.सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्राचे पान उलटल्या बरोबर अशा घटना वाचावयास मिळतात.टीव्हीचे बटन दाबून न्यूज चैनल सुरू करताच क्षणी अशा घटनांच्या बातम्या कानावर ऐकायला येतात.यामुळे या घटना माणसाच्या मनाला प्रचंड वेदना देणाऱ्या व उच्चशिक्षित म्हणून घेणाऱ्या समाजाला काळीमा फासणाऱ्या आहेत.जेव्हा अशा घटना घडतात.तेव्हा साहजिकच प्रत्येक जण समाजाला, प्रशासनाला,पोलिस यंत्रणेला,सरकारला जबाबदार धरतात.अनेकांकडून पोलिसांचे लक्ष नव्हते का?, सरकार काय करते?,महिला आयोग कुठे आहे? असे प्रश्न उपस्थित केले जातात.पण प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की,समाजातील ज्या मुलीवर,महिलांवर अत्याचार होत आहे.ज्या महिलांचा छळ होत आहे.त्या कुणाच्या तरी आई,बहीण, मुलगी आहे.आणि अत्याचार करणारे सुद्धा कोणाचेतरी वडील,भाऊ,काका,मामा,दादा आहे.शेवटी या वाईट घटनांमागे समाजातीलच कुणाच्या तरी कुटुंबातील व्यक्ति आहे.म्हणजे समाजातील कुटुंबाच्या संस्कारा अभावी अशा घटना घडतात असे म्हणता येईल.यासाठी प्रत्येक कुटुंबातुन आपल्या मुला-मुलींना जर चांगले संस्कार दिले.तर या घटना कुठेतरी कमी होताना दिसेल.मग मुला-मुलींचे राहणीमान,मैत्री करणे, शिक्षण घेणे,सण-उत्सव साजरा करणे,यासारख्या गोष्टी करण्याअगोदरच उत्तम संस्कार घालून दिले.तर वाईट घटना घडणे निश्चितच थांबेल.प्रत्येक कुटुंबातील आईने आपल्या मुलाला लहानपणापासून चांगले संस्कार दिले,तर त्याला समाजातील प्रत्येक स्त्री आई,मावशी,बहिण वाटेल. समाजातील स्त्री ही स्वतःच्या आई व बहिणी प्रमाणे वाटायला लागेल.असे संस्कार मुलांमध्ये रुजवायला प्रत्येक आईने व वडिलांने समोर आले पाहिजे.समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टीवर चर्चा करत बसण्यापेक्षा त्याची कारणे शोधून,जर प्रत्येकाने स्वतःला बदलवले तर वाईट घटना घडणारच नाही.संस्कार कुठे विकत मिळत नाही.किंवा संस्काराची कुठे क्लासेस सुद्धा चालत नाही.ती प्रत्येकाला स्वतःमध्ये रुजवावी लागतात.पालक या नात्याने प्रत्येकाची जबाबदारी आहे की,आपल्या मुलांमध्ये आपण चांगले संस्कार रुजवले पाहिजे.यासाठी प्रत्येक आई-वडीलाने आपल्या मुलांनसोबत वेळ दिला पाहिजे.व्यवसाय,नोकरी, काम धंदा याबरोबरच मुलांनासुद्धा पुरेसा वेळ देणे,हे गरजेचे आहे.हे उच्चशिक्षित पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. संस्कृतीची,परंपरेची ओळख करून दिली पाहिजे.मुलांना चांगली कपडे,चांगली खाद्यपदार्थ याबरोबरच चांगली पुस्तके घेऊन दिली पाहिजे.संस्कार घडवणारी पुस्तके मुलांना वाचायला सांगितली तर निश्चितच मुलांवर चांगले संस्कार होतील.सण,उत्सव,परंपरा यांची मुलांना योग्य ओळख करून दिली पाहिजे.मुलांना योग्य वेळी,योग्य ठिकाणी,योग्य मार्गदर्शन करून योग्य ती बंधने घातली.तरच येणारी पिढी सुसंस्कारित व संस्कृतीला जोपासणारी निर्माण होईल.यासाठी समाज,सरकार,प्रशासन यांना दोष न देता प्रत्येक पालकाने संस्काराचे बीज कुटुंबातच रुजवले पाहिजे.

राजेंद्र प्रल्हाद शेळके, सहशिक्षक
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलडाणा
9823425852
  rajendeashelke2018
@gmail.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 (5) निर्माण झालेली कुटुंब अवस्था

आपल्या भारतीय  संस्कृतीत फार पूर्वीपासून एकत्र कुटुंब पद्धती नांदत आहे. परंतु ही एकत्र कुटुंब पद्धती बहुतांशी लोप पावत आहे.  प्रत्येक मनुष्याला आपल्या कल्पनाविश्वात एक सुंदर कुटुंब असाव असं वाटतं. ज्यावेळी कल्पनाविश्व सत्यात उतरते  त्यावेळी त्याची कुटुंबाची  अवस्था हि त्याने पाहिलेल्या कल्पना विश्वातील कुटुंबासारखी कदाचित असेलही नसेलही. आजची परिस्थिती पाहता आपल्याला बहुतांशी विभक्त कुटुंब पद्धती दिसत आहे. संयुक्त कुटुंब हे फार मोजक्याच ठिकाणी आपल्याला बघावयास मिळते. प्रत्येकाची विचारसरणी, त्यांच्या अडीअडचणी व उद्भवणार्‍या बऱ्या-वाईट परिस्थितीचा विचार केला असता आजकाल विभक्त कुटुंब पद्धती जास्त अवलंबिली आहे. परंतु पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती दिसून येत होती. या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात आनंदी आनंद वाटायचा. या एकत्र कुटुंब पद्धतीत लहान मुलं ,मोठी माणसे ,आजी आजोबा, बहिण ,भाऊ , काका काकू, आई बाबा हे सर्वजण एकत्र राहत असल्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण तसेच सुखदुःखात आपली माणसे दिसत होती. प्रेम ,आपुलकी ,आणि जिव्हाळा या त्रिवेणी संगमावर कुटुंब आनंदाने वास करतो. अशावेळी आपलं कुटुंब आपलं घर आपल्याला मंदिरासारखंच वाटतं. या कुटुंब मंदिरातील माणसं देवासारखे वाटतात. मुलं फुलासारखी  वाटतात. अशा या आनंददायी कुटुंबातून शांतता,समाधान आणि सुखाचा सुगंध येत असतो. म्हणूनच आम्हाला आमचं कुटुंब सुंदर असाव असं वाटतं. ज्या कुटुंबात आनंद वाटेल ते कुटुंब घराला घरपण देतात.
याउलट आजची विपरीत परिस्थिती म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत 'हम दो हमारे दो'
हेच पाहायला मिळते. घरात जास्त माणसांची वर्दळ या कुटुंब पद्धतीत नको वाटायला लागते. आपला छोटासा परिवार व आपण असे एवढ्यापुरतेच मर्यादित राहायला आवडते. त्यात नको आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना ना त्यांचा कुरवाळीत असलेला हात. या सर्व सुखापासून लहान मुलं फार पारखी होऊन जातात. आपल्या कुटुंबात आजी आजोबा काका काकू असावेत आपले लाड त्यांनी पुरवावेत असं लहान मुलांना फार वाटतं. 
परंतु हे सर्व एकत्र जमण्याचा प्रसंग या विभक्त कुटुंबात फार कमी अनुभवाला येतं. एखादा सण, उत्सव, लग्न प्रसंग अशा विविध प्रसंगी पाहायला मिळते.
कुटुंबाच्या ह्या निर्माण झालेल्या  दुरावस्था बदलत्या काळाप्रमाणे जरी बदल्या तरी कुठेतरी कुटुंब व कुटुंबातील नात्यांची जपणूक व्हायला हवी. आपापसात प्रेम ,जिव्हाळा, आपुलकी व नात्यातील  एकोपा राहायला हवा, दिसायला हवा,असायला हवा. कारण
आपली भारतीय संस्कृती ही एकत्र कुटुंब पद्धतीची आहे. ही आपली संस्कृती जपत जपत माणसाने जगावे आणि जगत जगत आपली संस्कृती जपावे
✍लेखिका 
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता. हदगाव जि. नांदेड.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 *वसूदेव कुटुंब कम्,*
(09) सौ यशोधरा सोनेवाने गोंदिया*
                मुलांची  जडणघडण लालणपालन त्यांचे सामाजिक स्वास्थ्यसुधारण्यासाठी ,व्यक्तीमत्वातील सकारात्मक बदलासाठी  संस्काराचे केंद्र- म्हणजे कुटुंब होय.संस्कार रूपी वेल वाढण्साठी खतपाणी आवश्यक आहे .परंतु  वाढलेल्या गरजा आणि अपुऱ्या संसाधनामुळे   माणसाचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे.  वाईट सवयीमुळे संपूर्ण कुटुंबाने गावचे गाव देशोधडीला लागत चालले आहे. पाश्चिमात्य  संस्कृतीमुळे वाडे आणि खाटल्यांचा फाटल्याने  कुटुंबाला सुरूंग लागले  आहे. पाश्चात्त्यता, काळाची गरज आहे ते खरं आहे, पण यामुळे गाववागावात असलेली एकत्रित कुटुंबव्यवस्था  सामाजिक एकोपा  बंद होत चाललेला आहे.
 एकेकाळी भारतीय कुटुंब व्यवस्था ग्राम कुटुंब योजना  समाजरचना अगदी सुसंस्कृत होती   . त्यामुळे संताचे उपदेश पुष्कळ लोकांचा आचरणात प्रत्यक्ष परिवर्तनशील  होते. 
*वसूदेव कुटुंब कम्* याविचाराने भारावलेल्या श्री श्री च्या कार्याला सलाम.“ हे विश्वची माझे घर” या संत ज्ञानेश्वरांच्या  विचाराप्रमाणे आपले गावात सुद्धा करावे .गावात त्यासाठी ग्रामगीता चे वाचन  झाले  पाहिजे. गावापासून विकास साधत पुढे विश्वापर्यंत आपले प्रगतीचे पाऊल पाडावे .किशोरांना धर्माचे रहस्य कसे कळणार? हे श्रेष्ठत्व करण्यासाठी ब्राह्मण नको  तर  गावाने देशाला पोषक वातावरण द्यावे.  या उद्देशाने जगाचा घटक म्हणून सहाय्य बनावे अशात सर्वस्वी गावच जडणघडण करणे आवश्यक आहे.  जो गावाचा सर्वांगीण उन्नती चाहे .एकाने पण इतरांचे घरे मोडून पडले असतील तर त्याने आमची कीर्ती  झाली.म्हणणे वेडेपणाचे राहील .सेल्प कल्याण होते तो जगा साठी काही विषयी परोपकाराची भावना ठेवीत नाही  आनंदापुढे गरीब-श्रीमंत हा भेद मिटवून टाकला पाहिजे .आज गावाच्या  विकास करण्यासाठी जेणेकरून सर्व गाव एक कुटुंबातील सर्व सदस्य  असं साऱ्या गावात पाहायला मिळेल असे कार्य झाले की सर्वांच्या आधी व्याधी नष्ट होतील .
          बुद्धीमान लोक उत्पन्नाचा मार्ग काढतील .पाईक प्रयत्नाने कणाकणात समर्थ येईल  . भारतीय कुटुंब व्यवस्था   आजही सुदृढ आहे. पण सध्या ती वेगवेगळ्या सामाजिक गरजांच्या पद्धती ने बांधली गेली आहे.पूर्वी  बाबांचे बाबा खापर पणजोबा पासून ते एकाच कुटुंबात राहत असत.शेती भरपूर असायची घरातील मोठे लहानांना सांभाळून घेत .सर्वच  सदस्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या जात . सर्वजण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जबाबदारी  पार पाडीत असेल  त्यामुळे  आर्थिक स्थान मजबूत होत जाते. 
                महिलांना विशेषता मुलींना घरातील जाणकार महिलांकडून योग्य कोणत्या प्रसंगात कसे सामोरे जायचे याचे ज्ञान मिळत.  ग्रामीण भागात सर्वकाही मुबलक प्रमाणात मिळत असे .शहरात प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात . फक्त शहरात राहण्याची समाजाची   फँशन ,गरज बनली. पूर्वी चा आनंद आता कामाच्या व्यस्ततेमुळे लयास जात आहे.
      एकमेकांना मानसिक आधार  आणि कठीण प्रसंगांवर मानसिक आधाराने उपचार चालते ते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीतच हजारो-लाखोंच्या लाखो रुपये खर्च करूनही पूर्वीसारखे नैसर्गिक समुपदेशनाचे धडे मिळत नाही कुटुंबामध्ये दिवसभर कोणीतरी सदस्य घरी असतात .आला गेल्यावर तर जंगी स्वागत होत आसे.सद् स्थितीत पाहूणा वा पाहूणचार व्हायचा त्यांना आठवडाभर आधीच पूर्व कल्पना द्यावी लागते .कधी येणार? आणि परत निघणार कधी? याची वेळ आधीच सांगावे लागते ,तर पाहुणा येणार, तर नाही .अचानक   पाहुना आला तर आतापर्यंत सर्वच बाबतीत तारांबळ उडते.  प्रगती आणि चंगळवाद यात भारतीय कुटुंब व्यवस्था रसातळाला चालली आहे हे मात्र खरं तरीही कुटुंबात  स्त्रियांचे स्थान महत्त्वाचे आहे. कौटुंबिक उत्साहाने  गावात आनंदी वातावरण निर्माण होते .आज कोरोणामुळे गावातील च नाहीतर शहरातील  जीवात्मा हेलावून गेलेला.आहे. यामुळेच जनसामान्याःच्या संसारात  ईडा पिडा संकटाचा तोंडावरआहे .अशावेळी सामाजिक बांधिलकी  चे प्रतीक  असलेले कुटुंब च कर्तव्याचे यथार्थ दर्शन घडवितात .फुलपाखराप्रमाणे आणि मधमाश्या  ज्याप्रमाणे प्रत्येक पाना फुलातून थोडा थोडा मध गोळा करते.त्याप्रमाणे परिवाराकडून   आनंदासाठी तेथे ते छोटे चिमुकले क्षण स्वतःबरोबर कुटुंबातील इतरांचेही जीवन आनंदी करत आहेत.
       एक स्त्री तिच्या कुटुंबाचा कणा आहे .ती दोन कुटुंबाला सर्वधित करीत असते. ती  दोन कुटुंबात सहजता आनीत असते. एक म्हणजे माहेर आणि दुसरे म्हणजे सासर. ज्या घरात तिचा जन्म झाला त्या घरातील मुल निखळ निरागस प्रेम वडिलांना भावंडांना देत असते. प्रेमरूपी नंदनवन फुलवत असते. लग्नानंतर तिच्या आयुष्यात नवीन घेण्याची समायोजन करण्याची प्रचंड ताकद लाभलेली आहे. घराला आणि अनोळख्या व्यक्तींना या नात्यांना प्रेमाचा ओलावा देते .तिच्या सर्वात जवळचा व्यक्ती म्हणजे तिचा पती असते.वेळेनूसार ती शक्ती बनते , सहचारिणी बनते ,मैत्रिण बनते  तेव्हा स्त्री ही काही काळाची पत्नी असून   अनंत काळाची माता आहे . वटवृक्षाची शाखा बनवून संसारा करत असताना माहेर आणिक सासर  यांच्यातील दुवा बनवून दोन्ही कुटुंबांना जोडून ठेवते.तिला मुलांचा जन्म घडवण्याची जबाबदारी  तिच्या वाट्याला येते .पण तिला मातृत्वाची भूमिका सर्वात कठीण पण अधिक प्रिय ही असते . 
   पूर्वी कुटुंबात स्त्रियांना   चूल आणि मूल पर्यत च जीवन सीमित होते . परंतु आता तिच्या कक्षा रुंदावल्या आहेत .तितकीच कुशाग्र बुद्धिमान असणे काळाची  गरज आहे. मित्र मैत्रिणी साठी वाटेल ते करण्याची तयारी असणारी कर्तुत्वाचा क्षितिजाकडे झेपावणारी अशी आहे. आजची स्त्री नवे ते घडवायला नवे आकाश  कवेत घ्यायला तितकीच सक्षम आहे .हवा आपल्या  कुटुंबात  अगदी समतोल साधत असते.   त्यातूनही कुटुंबातील सण-समारंभ उत्साहानेपार पाडते. दीर्घायुष्यासाठी उपवास व्रत वैकल्य करणारी स्त्री कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीवर आध्यात्मिक संस्कार करण्याचे प्रयत्नही करीत असते. हे वडाला फेर्‍या मारणारी  पासून  अंतराळाला गवसणी घालण्यासाठी कल्पना चावला ला सारखी  झेप घ्यायला शिकविणारी ,विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणारी कुटुंबाला सर्वोच्च स्थानावर घेऊन जात आहे.
लेखिका 
*सौ यशोधरा सोनेवाने गोंदिया*
    *(9420516306 )*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
06 'एकत्र कुटुंब'...यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली
 आपण सर्वच जण ह्या संसारिक जीवनात आपल्या परिवारासह राहत असतो.परिवारातील मायेची ऊब,एकमेकांना आनंद आणि दुःखात  दिलेली साथ,एकमेकाला दिलेले प्रोत्साहन,केलेली मौज मस्ती ह्या सगळ्या गोष्टीतुन आपल्या सर्वांचे व्यक्तिमत्त्व फुलत जाते. आपल्या सर्वांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हणजे आपले कुटुंब होय.
  व्यक्ती समाजात काय आहे हवं ठरविणारी पहिली पायरी म्हणजे आपले कुटुंब. सामाजिक विकासाची पहिली पायरी म्हणजे परिवार.जसे सात वार महत्वाचे तसेच ',परिवार'हा देखील महत्वाचा घटक आहे.परिवारातून जी जडण घडण होते ती व्यक्तीच्या भावी  काळातील सामाजिक भावनेची चुणूक असते.तुमचा जन्म कोणाच्या पोटी झाला आहे त्यापेक्षा तुमचं कुटुंबाचे संस्कार कसे आहेत ते अत्यंत महत्वाचे असतात.एखाद्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती एखाद्या सोज्वळ कुटूंबात जर वाढली तर त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला दिसतो या उलट एखादी सोज्वळ कुटुंबात जन्मलेली व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीच्या कुटुंबात वाढली तर ती व्यक्तीही गुन्हेगार होण्याची शक्यता अधिक असते.थोडक्यात जसा सहवास तसा तुमचा जीवन प्रवास होण्याची शक्यता अधिक असते.
   प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग म्हणजे परिवार.परिवारातून मिळणारे संस्कार हीच खरी शिदोरी असते. अगदी मुलींवर कुटुंबातून केलेले संस्कार भावी  काळातील तिच्या सांसारिक जीवनाची गुरुकिल्ली असते.पूर्वीच्या काळी असलेली संयुक्त कुटुंब पध्दती मध्ये दोन -दोन चार- चार पिढ्या एकत्र राहत असायच्या त्यातून एकप्रकारचा सामाजिक जिव्हाळा अपवाप निर्माण होत असे.आता मात्र 'हम दो, हमारे दो 'च्या जमान्यात सर्वच गोष्टी बदलल्या आहेत. स्वतःच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत दिला जाणारा संस्कार भावी काळात आपली मुलेही आपल्याला  ह्याच वृद्धाश्रमाची वाट दाखवतील हे विसरून चालणार नाही.आज आपल्या स्वतःच्या मुलांना पाळणा घरातले  संस्कार दिले जाणार असतील तर भावी पिढीकडुन कोणत्या प्रकारची अपेक्षा ठेवता येतील .शेवटी जे 'पेरू ते उगवते' हे शिकविणारी आपली संस्कृती आहे .आजी- आजोबा,काका-काकी ,नणंद-भावजया या विविध नात्यांतील कधी कधी हसवणारी,खट्याळपणे एकमेकांची खेचा खेची करणारी मधुरता आज हरवत चालली आहे.कुटुंब म्हणजे केवळ मुले आणि आई वडील ही संकल्पना सामाजिक जीवनातील पहिल्या पायरीसाठी घातक ठरत आहे.जेव्हा केव्हा अपयश येते तेव्हा माणसाच्या नात्यातील हीच गुंफण एकमेकांना आधार देण्याचं काम करते.हाच आधार ढासळ्याने अपयशाच्या भीतीने आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे आई वडील दोघेही आपापल्या कामांत बिझी,मुलांशी संवाद साधायला वेळ नाही त्यामुळे अति लाडाकोडात मुलांना वाढवण्याच्या  नादात पिढीच्या पिढी 'बिघडत 'आहे.कुटुंबात कुणाचाच धाक उरला नसल्याने मुलं मनमानी पध्दतीने वागत आहेत.खरे म्हणजे परिवार म्हणजे एक घड्याळ आहे..  घड्याळात जसा मिनिट, तास आणि सेकंद प्रत्येक काटा महत्वाचा असतो.. !अगदी  तसाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते..!त्यांच्यातील सामंजस्याने आणि एकमेकांशी असणाऱ्या समन्वयानेच कुटुंबाचा रथ ,संसाररुपी सागराचा भव सिंधू यशस्वीपणे पार पाडू शकतो.

          डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
           34 *कुटुंब*

     ' कणा ' कुसुमाग्रज यांच्या कवितेतील शेवटची ओळ "पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा" या ओळीचा माझ्या जीवनावरही प्रभाव पडला आहे. पण सध्याच्या परिस्थितीला अनुसरून काहीतरी लिहावं वाटलं. कुसुमाग्रज यांनी कवितेत एका गरीबाची परिस्थिती मांडलेली आहे आणि माझा हा लेख पण अशाच एक गरीब कुटुंबावर आधारित आहे.
           एका खेडेगावातील कुटुंब आधीपासूनच गरिबीमध्ये असलेले त्यांच्याकडे फक्त राहण्याकरिता घर होते. तेही काही वर्षांपूर्वी घरकुल लागून आले म्हणून. पण छोटसं घर चारी बाजूंनी विटींच्या भिंती बाहेरून आतुन प्लास्टर न केलेल्या घराच्या वरती लाकडी फाटे टाकून घराच्या मागील भाग कवलाने झाकलेला आणि समोरील भागवरती टीना  टाकलेल्या.
त्यांच्या मुलींचे लग्न होऊन आता बरीच वर्षं झालीत मुलींच्या लग्नाच्या काही वर्षांनंतरच त्यांची आई वारली. नंतर घरात फक्त दोन मुलं आणि त्यांची वडील आई वारल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या वडिलांवर आली. पण पत्नी वरल्यामुळे ते ही काही महिन्यातच बिमार झाले. अचानक कमाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे घरातील मोठा मुलगा हा कामाला घरा बाहेर निघाला, आपले शिक्षण करत तो काम करू लागला घर सांभाळू लागला. लहान भावाचे शिक्षण सुरू होते. मात्र ' कमाई त्यात मूठभर दोन वेळचे खायला मिळायचे  पोटभर ' पण प्रश्न होता आता त्यांच्या वडिलांची तब्येत ती मात्र बरी होत नव्हती. पैशांच्या अभावी ते आपल्या वडिलांना चांगल्या डॉक्टरला पण दाखवू शकले नाही. त्यांचे शरीर खराब होत गेले पाय, हात व सर्व शरीरावर न बसणाऱ्या बऱ्या न होणाऱ्या अशा जखमा होऊ लागल्या. कालांतराने म्हणजे दीड - दोन वर्ष मध्ये त्या न बऱ्या होणाऱ्या जखमांमुळे त्यांची दोन्ही हातांची बोटे गळू लागली. नंतर त्यांची प्रकृती अचानक सुधारत गेली मात्र ते आपले हातांची बोटे गमावून बसले.एका हाताची चार बोटेगेली  अंगठा फक्त राहिला, तर दुसऱ्या हाताची दोन बोटे गेली अशा अवस्थेमध्ये त्यांना कामाला जाणे आता शक्य नव्हते.
 मोठ्या मुलाने बारावीपर्यंत कसेबसे आपले शिक्षण पूर्ण केले. आणि गावातच मिळते काम करायला लागला. लहान भावाला बारावीपर्यंत शिक्षण झाले नंतर दोघेही आता कामाला जात. काही दिवसांनी मोठा मुलगा कामाला गावाबाहेर  गेला आणि नंतर लहान मुलगा व वडील दोघाच. सर्व कामे लहान मुलाला करावी लागत. पण मोठ्या मुलाचे बाहेर तेवढे काहीच जमले नाही. म्हणून तो पुण्याला गेला व कंपनीमध्ये काम करू लागला. तिथे त्याला बऱ्यापैकी म्हणजे अकरा - बारा हजार पगार मिळत. पण आता तो पुणे वरून काही दिवसांकरिता गावी आला आणि सुरु झाले लॉकडाऊन आता होते ते पैसे खर्च होऊ लागले. आणि गावामध्ये पण काम मिळणे अशक्य झाले.
पण गावाकडे छोटी मोठी शेतीची कामे असतेच म्हणून आले ते काम करू लागला. पण त्यांना सर्व विकत घ्यावे लागत.
      कारण त्याच्या कडे शेती नाही. परंतु राशन मिळत म्हणून फारस धान्य विकत घ्यावं लागतं नाही. तरी सुध्धा बाकी आवश्यक गोष्टी लागल्याचं आहे! आता दोन दिवसा आधी गावातील बचत गटाच्या महिलांनी गावातील गरीब कुटुंबांना छोटीसी मदत या कोरोनाच्या महामारी मध्ये करायची ठरविले. त्यात मीठ, तिखट, हळद, तुरदाळ, तेल इत्यादी वस्तू पाव अर्धा किलो या प्रमाणे सर्वांनी द्यायचे ठरवले. मात्र जेव्हा बचत गटातील महिला त्यांच्या घरी ही सामग्री घेऊन गेले तर त्या घरातील मुलाने स्पष्ट नाही म्हटले. आणि म्हणाला तुम्ही दुसऱ्या कोणत्या गरीब कुटुंबाला ही सामग्री द्या. पण तुमच्याकडे शेतीतील किंवा दुसरे कोणतेही काम असेल तर सांगा. तुम्ही फक्त मला काम द्या, गरीबी जगायचं कसं ते मला येत. लोकांना तर आज या कोरोना ने हे दिवस दाखवले. पण मी तर या दिवसांमध्ये लहानाचा मोठा झालो. गरिबाला काम देऊन पुढे चल म्हणा. येवढी विनंती केली.
    श्री.सुंदरसिंग आर.साबळे
          9545254856
             गोंदिया
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कुटुंब - व्यवस्था
        मानव हा सामाजिक प्राणी आहे . तो एकटा राहूच शकत नाही . मानव जेव्हा फार विकसित झाला नव्हता तेव्हा तो टोळी किंवा समुदाय करून रहात असे .तेव्हा कुटुंब संस्था  अस्तित्वात नव्हती. टोळी हेच त्यांचे कुटुंब असायचे . मनुष्य भटक्या अवस्थेत होता. शिकार, कंद, मूळं मुबलक प्रमाणात जिथे मिळेल अशा जागेच्या शोधात भटकत रहायचं. अशी जागा मिळाली की तेथील  अन्नपाणी संपेपर्यंत तिथे रहायचं. तेथील अन्न संपले की पुनश्च भटकंती  सुरु. हाच घटनाक्रम वर्षानुवर्षे चालू असायचा. मनुष्य जीवन माणसांपेक्ष्या प्राण्यांच्या जवळचं होतं.  हवापाणी , परिसर , जीवनशैली , विचारसरणी ह्यावरून टोळ्या  बनायच्या . टोळी प्रमुख हा त्यांचा कुटुंब प्रमुख असल्याचा .
          पुढे कधीतरी  शेतीचा शोध लागला. आणि  मग एकाच  जागी  राहूनही  अन्न मिळवता येते, हे माणसाच्या लक्षात आले. मग भटक्या माणूस स्थिर झाला. शेतीच्या शोधाला कारणीभूत झाली ती स्त्री. याचाच अर्थ असा की मनुष्यप्राण्याला माणूस म्हणून ओळख मिळवून दिली ती स्त्रीने. शेतीचा शोध हा उत्क्रांतीतील अतिशय महत्त्वाची घटना ठरली . कारण प्राण्यासारखा जीवन जगणारा माणूस इथून पुढे मनुष्य म्हणून जगू लागला. भटक्या मनुष्य स्थिर झाला आणि कुटुंब संस्था अस्तित्वात आली.  स्त्री कुटुंबाचा कणा बनली. 
           देवाने पुरुष व स्त्रियांना एकाच प्रकारचे बनवले नाही हे कोणालाही दिसेल. तरी पण बऱ्याच बाबतीत ते सारखे आहे हे खरे. तथापि त्यांच्या शारीरिक व लैंगिक घडणीत लक्षात येण्यासारखा फरक आहे. तसेच त्यांच्यामध्ये भावनात्मक फरक आहे. ह्यांना वेगवेगळ्या भूमिका पार पाडण्यात सुलभता यावी या हेतूने देवाने यांची अशी निर्मिती केली. त्यांची कामे एकमेकांशी पूरक असतात.                
        जीवनशैली विकसित होत गेली . अवशक्यतेनुसार व्यवस्था होत गेल्या . परस्पर नाती , परस्पर व्यवहार शैली, परंपरा निर्माण होत गेल्या . जगभर पसरलेल्या ह्या टोळ्या किंवा मानव समुदाय भिन्नतेच्या आधारावर आपली ओळख व वैशिष्ठ्ये ह्यांच्या आधारावर ओळखल्या जाऊ लागल्या . भारत वासीही आपल्या वैशिष्ट्या निशी ' हिंदू ' शब्दाने ओळखले जाऊ लागले . 
         कुुुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह . माणसांमधील नाती जन्मावरून , विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात .  कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते . एकत्र कुटुंब पद्धती जास्त विस्तारीत असते. त्यात दुय्यम नाते संबंधांचा अंतर्भाव असतो. म्हणजे आजी- आजोबा,  काका- काकू अशा नात्यांचही अंतर्भाव असतो. विभक्त कुटुंबात आई ,वडील व त्यांची मुले ह्याचाच फक्त अंतर्भाव असतो . ' छोटे कुटुंब ,सुखी कुटुंब ' हे त्यांचे ब्रीद . 
              एकत्र कुटुंबात प्रत्येक जण एकमेकांच्या भाव भावनांचा , विचारांचा आदर करतो . प्रत्येक जण दुसऱ्याचा विचार करतो . एक तीळ सात जणात वाटून घेण्याची सवय लागते . येथे फक्त स्वतः पुरता विचार करून चालत नाही . इथे कामाची विभागणी होते . एक टीम वर्क तयार होते . एका कुणावर कामाचा भार येत नाही . सुखात वा दुःखात एकमेकांचा आधार असतो . एकटेपणा कधीच नसतो. मानसिक - भावनिक  रित्या मोकळे होण्यास एकत्र कुटुंबच मदत करते . येथे बरोबरीचे  बहीण असे कोणीतरी असतेच.  त्यामुळे डिप्रेशन वगैरेला कधी वावच नसतो . आणि म्हणून मन मोकळे करण्यासाठी डॉक्टरांना पैसे मोजावे लागतात नाहीत . घरात आपल्या बरोबरची व्यक्ती असते . तिथे आपण व्यक्त होऊ शकतो .  आपली मते, गुपिते, ताण तणाव सगळे काही कुणाशीतरी जवळच्या व्यक्तीशी बोलू शकतो .  घरात गप्पांना रंग चढतो. त्यातून प्रत्येक जण  आपले मन मोकळे करतो. वादही होतात पण त्याला भांडणाचे स्वरूप येत नाही.   घराला कधीच कुलूप नसते . आपल्या दिमतीला कधीही माणसे हजर असतात. एकमेकांची काळजी आपोआप घेतली जाते . आर्थिक ताण हा मोठा असतो . पण एकत्र कुटूंबात आणखी हात जोडीला असल्याने एकावर पडत नाही .  
          ' Man is judged by his language ' .  ही भाषा आपण नकळतपणे आपल्या कुटुंबा कडून शिकत असतो . ते संस्कार आपल्यावर कुटुंबाकडून घडत असतात . कुटुंबाचे संस्कार च आपले जीवन घडवत असतात . माणूस म्हणून जे काही आपण घडतो ते कुटुंबाकडून.
         ' मन मोठं असलं की सारं काही सामावून जातं ' हा धडा एकत्र कुटुंबात मिळतो . 
          सणवार मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्याची मजा काही औरच . घरच्यांच्या पाठिंब्या मुळे नवी कामे करण्यास नवा हुरूप येतो . 
           प्रत्येक कुटुंबाला आपल्या कुटुंबाचा सार्थ असा अभिमान हि असतोच. प्रत्येक कुटुंबाच्या चालीरीतीतही  फरक असतो . अन तेच त्या त्या कुटुंबाचे वैशिष्ट्य असते
. आपण किती सहज कुटुंबाना लेबले चिकटवत असतो. ते अगदी कंजूष , ते घमेंडखोर, ते उंच, ते बुटके कुटुंब , ते घारे ,ते जाडे, ते मदतीचा हात देणारे, ते हुशार कुटुंब. प्रत्येक  कुटुंबाचे गुण अवगुण त्याच कुटुंबातील माणसांच्या वागण्यातून जगास दिसत असतात.
     आज परिस्थिती बदललेली दिसते . आज एकत्र कुटुंबे खूप कमी दिसतात. आपली जीवनशैली बदलेली आहे . Fast - life झाले आहे . प्रत्येकाला easy-money खूप प्रमाणात हवा आहे . ऐहिक सुखा मागे समाज धावू लागल्यामुळे adujustment कोणीही करायला तयार नसते. त्यामुळे विभक्त कुटुंबे वाढत आहेत. अर्थात सर्वच विभक्त कुटुंबे अशी असतात असे नाही. कारण काही कामापरत्वे , आपली प्रगती करण्यासाठी , अपुऱ्या जागेमुळे विभक्त कुटुंबात राहू लागतात . काही चौकोनी कुटुंबे ही आदर्श असतात . ह्या छोट्या कुटुंबात ज्येष्ठ लोकांचा अभाव असतो. 
             रक्ताच्या नात्यांपलिकडेही प्रेम आणि मायेने जोडलेल्या नात्यातील मानवतेच्या कुटुंबात राहणाऱ्यांची संख्याही कमी नाही .  
              आई आणि बाबा दोघेही नोकरीनिमित्त बाहेर जातात . त्यांना आपल्या मुलांकडे पाहण्यासाठी वेळ नसतो . त्यातून पाळणाघर ही संकल्पना पुढे आली . त्यातली  ' आई ' तेथील मुलांची कुटुंबा प्रमाणेच काळजी घेते. अगदी मनापासून ह्या गोष्टी केल्या जातात.  हे रक्ताचे नसलेले नातेही मोठेच आहे . 
           ज्या कुटुंबामध्ये सतत भांडणे, निष्काळजीपणा आणि वाईट वर्तणूक असते. अशा कुटुंबांना विस्कळित कुटुंब म्हणतात. अशा कुटुंबात मुलांशी वागणूक नीट नसते. त्यामुळे मुलांना असे वाटते सगळ्यांच्याकडे असेच असते. त्यामुळे त्यांना विस्कळीत कुटुंबातील वेगवेगळ्या प्रश्नांना कसे सामोरे जावे ते कळत नाही.
            Nuclear family च्या ट्रेंड मध्ये जेष्ठ लोकांना जागाच नसते . मग सेकंड इनिंग मध्ये एका नव्या कुटुंबाच्या शोधात बाहेर पडावे लागते . असे एक कुटुंब म्हणजे वृद्धाश्रम . येथे खाणे - पिणे , मनोरंजन , आरोग्य , अशा तऱ्हेच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते . त्याच बरोबर रक्ताच्या पलीकडचे नाते एकमेकांशी जोडले जाते ते प्रेमाचे - मायेचे . त्यानेच निम्मे पोट भरते .
           अशा प्रकारची आणखीही काही कुटुंबे आहेतच . उदा . अनाथ महिलाश्रम , अनाथ विद्यार्थी गृह इत्यादी . त्यात पक्ष आले , काॅलनीज् आल्या, वेगवेगळ्या संस्थाही  आल्या.  
           विश्वातील समस्त जीवांच्या हिताचे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनी ' विश्वची माझे घर ' मानून सगळ्या विश्वालाच एक कुटुंब मानले . ' वसुधैव कुटुंबकम् ' . 
11 शुभदा दीक्षित पुणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(08) *" अतुट नाती कुटुंबाची"*

*कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचं नातं नाही,  तुम्हाला गरज असतांना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब.*
कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडिल, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. एकत्र कुटुंबपद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचा अंतर्भाव होतो. साधारणतः पुरुष (वडिल) हा कुटुंबाचा प्रमुख असतो.एकत्र कुटुंब म्हणजे साक्षात स्वर्गच म्हणावे लागेल. आपल्याकडे कुटुंब परिवार कुटुंबपद्धती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण सशक्त समाज त्यानेच घडत असतो. हल्ली कुटुंब फार आखीवरेखीव चौकोनी-त्रिकोणी झाली असली तरी एकत्र कुटुंबाचे फायदे तरुणांच्या लक्षात येताहेत.
कोणतेही धन कुटुंबापेक्षा जास्त नाही. आपले वडील हे आपल्याकरिता सर्वोत्तम सल्लागार असतात. आईच्या मायेची सावली आकाशाएवढी असते. सुखदु:ख सांगण्याकरिता ऐकण्याकरिता भाऊ हा एकमेव भागीदार असतो. आपले कायम शुभ चिंतणारी बहीणच असते आणि जन्मभराची मैत्रीण फक्त बायकोच असू शकते. कुटुंबाबाहेर जीवन असू शकत नाही. तेथे जे प्रेम, विश्वास असतो तो फक्त तेथेच असतो. येथे कायदे नाहीत तर अनुशासन आहे. येथे भय नाही विश्वास आहे. आपला आनंद ज्यात आहे त्यातच सबंध कुटुंबाचा आनंद असतो. कुटुंबात सूचना दिल्या जात नाहीत तर एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आहे. कुटुंबाचे दुसरे नाव प्रेम आहे. ते आपणही कुटुंबातील व्यक्तींना दिले पाहिजे. बाहेरील लोकांप्रमाणे येथे संपर्क कॉन्टॅक्ट नसतो तर एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. या सर्व गोष्टी कुटुंबापासून दूर राहिल्यानंतरCH KADTAT. 
neha बरीच वर्षे शिक्षणानिमित्ताने घरापासून आईवडील, भाऊ  सगळ्यांपासूनच दूर राहिली होती. वसतिगृहाच्या ठरावीक जेवणाचा तिला कंटाळा आला होता. रोज नवीन छानसं खमंग खायला, कधी थोडंसं बरं नसेल तर औषध द्यायला, गरम मऊ भात द्यायला, पाठीवरून हात फिरवायला आई जवळ नसायची. फिजिक्ससारखा ड्राय विषय गंमतजंमत करीत शिकवायला दादा नसायचा. स्वत:च त्यात डोके खुपसून अभ्यास करावा लागे. एखादी गोष्ट आईने नाकारली तर घेऊन द्यायला बाबा नसायचे. पिकनिक खरेदी रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेण्याचे लाड करायला बाबा नसायचे. अशा असंख्य बाबींना आपण मुकलो आहोत हे तिला फार जाणवायचे. एखाद्या सुटीच्या दिवशी मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना या गोष्टींचा उल्लेख व्हायचाच.
सगळ्याच मुलींना माहीत होते की शिक्षण संपल्यानंतर घरचे लग्नासाठी आपल्यामागे लागणार आहेत. अशा वेळी आपण आपला जोडीदार कसा असावा याचा विचार करून ठेवला तर तो शोधताना सर्वाचेच काम सोपे होईल. nehaम्हणाली ‘मला आईसारख्या सासूबाई, वडिलांसारखे सासरे, दादाप्रमाणे भावोजी, छोटीशी नणंद ज्या घरात आहे त्याच मुलाशी लग्न करायला आवडेल. बरीच वर्षे वसतिगृहात राहून कुटुंबात राहण्याचा आनंद मला मिळालाच नाही, तो सासरी गेल्यावर मिळविण्याचे ठरविले आहे.’ 
हम दो हमारे दो चा नारा बर्याच वर्षापूर्वी आला आणि तो यशस्वी पण झाला, आता त्या ही पुढे हम दो हमारा/हमारी एक ची संकल्पना सर्वत्र राबवली जाते, काळ बदलत गेला तस लोकांच्या कुटुंबाच्या व्याख्या ही बदलत गेल्या, एकत्र कुटुंबाच चौकोनी कुटुंब झाल, आज कौटुंबिक  चित्रपट बघताना आमच्या डोळ्यात पाणी येते, पण तेच आपल कुटुंब  एकत्र चालवण्याची तसदी आम्ही घेत नाही,  पूर्वी  आजी-आजोबा, काका, काकू, आत्या, मामा, मामी, मावशी सगळे गुण्या गोविंदाने रहात, आलेल्या गेलेल्याच पाहुणचार होई, कधी कोणाला एकटेपणाची भिती नाही वाटायची, जे काही कमी जास्त भेटायच ते सगळे मिळून मिसळून खायचे, घरातल्या एखाद्या कार्याक्रमाला बाहेरच्या कोणाची गरज नाही भासायची, मोठ्याना लहानाबद्दल प्रेम होते तर लहानना  मोठ्यांबद्दल आदरयुक्त भिती, काळाप्रमाणे चौकट बदलत गेली, हे विश्वची माझे घर बोलणारे आपण मीच माझे विश्व समजून जगू लागले, आपला जग आपल्यापुरते. आता आपण दुसर्यांशी  स्पर्धा न करता आपल्याच कुटुंबातील व्यक्तीशी स्पर्धा करताना  दिसतो, मी त्याचापेक्षा जास्त पुढे कसा जाईन, त्याच्यापेक्षा जास्त पैसा  कसा कमवेन याचाच विचार करतात, त्यात कुटुंब मुल्य पायदळी तुडवली जातात, मी म्हणजे देव माझाच सगळ्यानी ऐकला पाहिजे अस pratyekala वाटते, संपतीसाठी भाऊ एकमेकांचे वैरी होतात, नातेवाईक आपल्याच जवळच्या माणसाचा खून करताना दिसतात, पैसा, प्रतिष्ठा यापुढे सगळी नाती फिकी पडतात. त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे नाही, ते मला शोधायचं त्याच्याच मागे धावत सुटतात सगळी नाती बाजूला ठेवून खोटा अहंकार जपत आपली वाट चालत राहतात, त्या अहंकारात कोणी हि दुखावलं गेलं तरी त्याची पर्वा नसते. सिनेमातलं आई मुलाचं प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते, पण जेव्हा स्वताच्याच आई वडिलांना अनाथ आश्रमात टाकतात तेव्हा मनात कसलीच खंत नसते. सार काही पैशाने विकत घेता येते, पण कोणत्याच नात्यातील प्रेम नाही विकत घेता येत. आई वडील, भाऊ, बहिण यांच प्रेम  पैशाने विकत नाही घेता येत. लोक एकमेकाशी, का रुसतात, का बोलायचे बंद होतात एकमेकाशी, साता जन्माच वैर असल्यासारखा एकमेकांशी वागतात,  जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा अंत हा होणारच असतो, पण तरी हि आपण इतरांना दुख देत जगत राहतोच.
आज आपण रहात असलेल्या फ्लॅट संस्कृतीत बाजूला कोण राहते हे ही माहित नसते, एखाद्या च्या घरात वाईट प्रसंग घडला तरी आपल्याला माहित नसते. प्रयतेक जण एकमेकांपेक्षा वरचढ व्हायला बघतो. एकत्र कुटुंब काय हेच आजच्या पिढीला माहित नाही, आपल्या बालपणात एकत्र कुटुंबात वाढलेली पिढी मात्र आपल्या मुलाना एकत्र कुटुंब महणजे काय याचच बाळकडू द्यायला विसरले, लहानपणी एकमेकांसोबत खेळणारे, एकमेकांसाठी खोट बोलणारे, काहीही करायला तयार असणारे भाऊ बहिण मोठे पनी एकमेकांची तोंड पण बघायला तयार नाही होत. जर मोठ्यानीच आपल्या कुटुंबाशी नाळ तोडली तर नवीन पिढी तरी कशी शिकणार, त्याना ही दोष देऊन काय उपयोग कारण त्याना लहानपणा पासूनच एकत्र कुटुंब म्हणजे काय हेच कळले नाही तर ते तरी एकत्र कुटुंबाची संकल्पना कशी राबावतील. फक्त फोटो आणी लेख वाचून कुटुंब नाही  बनत तर त्यासाठी मनातून एकमेकांबद्दल आस्था, प्रेम, आपुलकी असावी लागेल, तरच आपल्या कुटुंबा बद्धल  प्रेम वाटेल.
*ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे, परंतु एकत्र कुटुंब हे जीवनाचे मुळ आहे.*
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 संस्काराचे बीज कुटूंबातच  
पूर्वापार चालत आलेली एकत्र कुटुंब पद्धती आज काळाच्या ओघात संपुष्टात येताना दिसत आहे.सुरवातीच्या काळात चार चार भाऊ एकत्र त्याचा प्रत्येकाचा परिवार एकत्र होता .सर्वाचा व्यवहार एकच मोठा भाऊ पाहत असे.आजी आजोबांनी लहान लहान मुलांना सांभाळणे व झालेल्या  घडामोडी त्याच्या बाबा काकाच्या लहानपणीच्या गमतीजमती त्याना ऐकवणे घरातील थोरामोठ्याशी कसे वागावे त्याचा आदर कसा करावा या विषयी वारंवारमाहिती देणे समज देणे अशा अनेक गोष्टी मोठ्यानकडून आजी आजोबाकडून लहान मुले शिकत असायची.
लहान लहान मुल बारा पंधरा असायची कुटुंबात. खेळण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गल्लीत फिरायची गरज नसायची मुलं कशी घरातच.. कारण वाडे मोठमोठाली असायची जागा भरपूर असायची खेळायला जागा असायची.
वरचेवर कुटूंब मोठ मोठी झाली.शिक्षण वाढले ,नौकरी निमित्त बरीच कुटूंबं शहराच्या दिशेने निघाली,काही ठिकाणी दुष्काळाची झळ पोहचली व पर्यायाने ब-याचजणाचे गाव सुटले.शेतजमीनी विकून लोक व्यवसायाच्या दृष्टीने स्थलांतरीत झाले.तरूण मंडळी नोकरी साठी शहराकडे ओढली गेली आणि एकत्र कुटुंबातील लोकांची संख्या कमी होवु लागली.गावाकडे फक्त आजी आजोबा नसता काही दिवसांनी गावाकडची वाडे विकून सर्व जण छोट्या छोट्या प्लॅट मध्ये शहरातच राहु लागले लहान मुलाची मात्र 
संस्कारासाठी फरफट होऊ लागली जे सुख जी सुविचारांची खाणं एकत्र कुटुंबात होती ती मात्र हळु हळु कमी होऊ लागली.
आजी आजोबांची जागा घ्यायला कुणी ही नव्हते
मुलांना संस्कारासाठी इकडे तिकडे कोचिंग क्लासकडे धाव घ्यावी लागली
आजीच्या कुशीत बसून ज्या गोष्टी ऐकायची सवय होती ती आज पैसे देऊन 
शिस्तीत ऐकावी लागु लागली.
       एकत्र बसून जेवण ,सणावाराचे मूल्य
थोरामोठ्याचा मानपान रीतिरिवाज सर्व गोष्टी न पासून दूर जावे लागत होते .मनाला बोचणारा हा एकाकी पणा
मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण करू लागला.मुलं खेळण्याच्या वयात अबोल झाली.मोबाईल व टिव्हीच्या नादात अनेक नको त्या गोष्टी शिकायला लागली.
एकत्र कुटुंब पद्धती मध्ये या गोष्टी ना थारा नसतो.नको ते व्हायला सुरवात झाली .
प्रत्येक जण स्वतंत्र विचारसरणीचे विचाराने जगण्याचा प्रयत्न करू लागला .
एकत्र कुटुंब पद्तीतील एकोपा ,विचाराची देवाणघेवाण व महत्वाचे म्हणजे..एखाद्या गोष्टीला लागणारे पाठबळ ते तर अतुलनीय असते.एकत्र कुटुंबात ते मात्र एकाकी झाले आज .एकत्र कुटुंबातून होणारे संस्कार आज मात्र एकाकी झाले आहेत.खरे संस्कार खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने सोबतीने मिळत असतील तर ते एकत्र राहूनच
*****************************
स्नेहलता कुलथे बीड
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
" वसुदैव कुटुंबम "
कुटुंब म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते एक असे चित्रं ज्यात आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काकू आणि इतर मंडळी असा जवळपास दहा ते पंधरा लोकांचा समूह. या कुटुंबात वावरत असताना मिळतो अनेक गोष्टीचे संस्कार जसे की वडिलांनी एखादी वस्तू घरात आणली असेल तर ती सर्वांनी मिळून मिसळून खावी. यामूळे मुलांवर समानता या मूल्यांची नकळत रुजवण होते. घरात वाडवडिलांचा वावर असल्यामुळे घरातील सर्वच जण दबक्या आवाजात संवाद करतात. म्हणजे नवरा-बायको, भाऊ-बहीण यांच्यात होणारे भांडण किंवा धुसफुसला आळा बसतो. कोणी मोठ्या आवाजात बोलत नाही. घरातील सर्व कामे विभागली जातात. ज्यांना जे काम जमते ते काम कुणी सांगण्याच्या अगोदर केली जातात. काही जण तर वडील मंडळीकडून शाबासकी मिळविण्यासाठी पुढे पुढे येऊन काम करतात. जणू त्यांचामध्ये स्पर्धा लागली असते. घरातल्या प्रत्येक बाबींवर नियंत्रण असते. ते मग खरेदी करण्याचे असेल वा कुठे गावाला जायचे असेल. प्रत्येक गोष्ट वाडवडील मंडळींना विचारूनच करावे लागते त्यामूळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चैन किंवा ऐश आरामच्या बाबीला एकप्रकारे लगाम घातल्या जाते. एकत्रित कुटुंब पध्दतीमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतात. लहान मुलांना घरातील आजी अन् आजोबा व्यवस्थितरित्या सांभाळ करतात. त्यांना रामायण  व महाभारत इसापनीती किंवा इतर गोष्टी सांगतात. आजी गाणे ऐकवते त्यामूळे मुले भविष्यात चांगले व्यक्ती बनू शकतात. आजोबा व्यवहारज्ञान देतात, ज्यामुळे मुले व्यावहारिक होतात. 
म्हणून कुटुंबव्यवस्थेतील सर्वच घटक अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे सर्वाशी आदरपूर्वक, सन्मानपूर्वक वागणे आपले कर्तव्य आहे. चला आपण ही सर्वच जण या गोष्टीचा अंगीकार करू आणि संपूर्ण देश सुखी कुटुंब करू या
- नागोराव सा. येवतीकर
लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील शिक्षक आहेत. 
  मु येवती ता धर्माबाद
  9423625769
nagorao26@gmail.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 17 *कुटुंबवृक्ष सांभाळणारी मामाची माडी*
श्री.ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
_____________________
पूर्णा नावाच्या नदीला जाऊन भेटणारी एक मोठी उपनदी आणि त्या नदीच्या तीरावर वसलेलं सावरगाव हे मामाचं गाव.  अलीकडेच मेळात दोन छोट्या नद्यांचा संगम, महादेवाचं मंदिर आणि इथूनच उंच वाड्यावर असलेली माझ्या मामाची माडी...तिला आमच्या भाषेत 'माढि' किंवा 'मढी'  हा सुद्धा शब्द प्रचलित होता.. या माडीनं आजपर्यंत खूप मोठा कुटुंब वृक्ष पोसलेला होता... 
अलिकडून फारच मोठ्या पायऱ्या चढून जाऊन उजव्या बाजूला वळायचं आणि पुन्हा उजव्या बाजूला वळून अगदी रायगडाच्या प्रवेशद्वारासारखं न दिसणारं प्रवेशद्वार म्हणजे मोठा दरवाजा.. या दरवाजाला मुख्य दरवाजा म्हटलं जायचं... घरात एकदा प्रवेश केल्यावर फारसं बाहेर पडायची गरजच नव्हती. आतंच चौक, स्नानगृह, बैठक, स्वयंपाक, झोपायची खोली, माजघर, देवघर, आणखी धान्याचे पेव, वरून जिना चढून मढी होती..
ही निखळ ढवळ्या मातीपासून बांधलेली मढी म्हणजे अनेक पिढ्यांचा इतिहास व अनेक गोतावलळयांना   सांभाळणारी इमारत उभी होती. यामध्ये राहणारं सर्वात मनाचं पात्र म्हणजे आमचे पणजोबा, पणजी,.....कारभार पाहणारे कारभारी म्हणजे मोठे आजोबा, शेतातील कामांची जबाबदारी सांभाळणारे मधले आजोबा आणि तालुक्याला जाऊन घेणं देणं, पाव्हने राव्हणे तसेच मातीचा आणि तेराव्याचा कार्यक्रम, लग्न ,बारसं हे सगळं लहाण्या आजोबांकडे असायचे... आमच्या आठ मामांनी सुध्दा त्यांच्या परंपरागत आलेल्या जबाबदाऱ्या अगदी चोखपणे पार पडायच्या.... आम्ही भाऊ बहिणी ३०-३५ लहानमोठे खेळगडी... कोणताही खेळ खेळायचा म्हटलं तर दोन गट सहजच घरातच तयार व्हायचे.. 
आम्हा सर्व भावंडाना सख्खे आणि चुलत हे कधी कळालंच नाही...कारण आमच्यासर्वांसाठी खाऊ म्हणजे भातकं आणायचं काम लहाण्या बाबांकडे होतं आणि मोठी थैली भरून आणलेला चिवडा असो की डमणीत टाकून आणलेले टरबुजं असो ...अगदीच भरपेट मिळाल्याचं समाधान आम्हा प्रत्येकाला असायचं.... त्यामुळेच आम्हाला आपलं आणि परकं कधी कळलंच नाही....
मोठ्या मामीन दररोज दह्याचं घुसळण करायला बसलं की मी अंडी आमचा ईनु अगदी मामीजवळच बसायचो... लोणी हा माझा फार आवडता एटम होता.. वाट्टेल तेव्हढं  ताक, हवं तेव्हढं दही सगळं काही भरपेट....
कपड्यांचं तर न संगीतलेलंच बरं... कोण्हीही आणि कोणाचेही कपडे घालायची मुभा असायची, त्यामुळे अनेक कपड्यांचा आस्वाद घ्यायला मिळायचा. संध्याकाळी झोपायला फक्त बच्चेकंपनी आपापल्या आईंकडे जायची ,नाहीतर आम्ही थोडे समजदार मंडळी सगळेच मधल्या घरात नाहीतर मधीवर लहाण्या मामासोबत झोपायचो... सगळं काही आनंदाचं ... कोण्ही गोष्ट सांगायची किंवा कोण्ही कहाण्या, कोडे सांगायचे, कोण्ही दिवसभरातील गप्पागोष्टी सांगायच्या...कधी कधी मोठया बाबांचे पाय चेपायची मजा म्हणजे एका झाडावर दहा वानरं उडया मारल्यासारखी मजा असायची.... 
कधी सासू सुनाचं भांडण नाही की कधी रुसवा नाही...अशी आमच्या मामाची मढी म्हणजे मोठा कुटुंब वृक्षच होता... दिवाळीच्या सुटीत आणि पूर्ण उन्हाळ्यात आम्हाला अश्याच मोठ्या कुटुंबात राहायचा योग आलाय ....हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल.....
एकत्र कुटुंब पद्धतीचा वटवृक्ष माझ्या मामांकडे बघायला मिळायचा. देवपूजा, सांजवात, व्यायाम, खेळ, गप्पागोष्टी  आणि नात्यांची वीण आणि संस्काराची शिदोरीच जणू इथे होती. आलेल्या पाहुण्यांसाठी केलेला पाहुणचार कुणीकडे व्हायचा हे कोणाचं कोणालाच कळायचं नाही....आणि त्यातल्या त्यात ...गाईला नैवद्य, कुत्र्याला भाकरी, सालदाराला म्हणजे काम करणाऱ्या गड्याला दररोज भाकरी सालन....जणू काही तो सुद्धा आमच्याच कुटुंबाचा भाग असायचा.....
पण आमचे पणजोबा स्वर्गवासी झाले आणि तसेच त्यांच्यामध्ये या मढीची धुरा सांभाळणारे मधले आजोबा अचानक हृदय विकाराच्या झटक्याने तडकाफडकी निघून गेले आणि या मढीला खिंडार पडलं...
नव्याने सगळया गावात आलेली विभक्त कुटुंब पद्धतीची प्रथा आता या माडीला सुद्धा गिळायला लागली होती....आणि घरात कुजबुज सुरू होऊन ....वेगळवेगळ  राहण्याची तय्यारी झाली....आणि काही दिवसातच हा कुटुंब वृक्ष वेगवेगळ्या फांद्यांमध्ये दुभंगला.…..
ज्याने त्याने बरडावर आता स्वतःच छोटंसं टुमदार घर बांधलय... जशी घरे विखुरली तशीच आता सगळ्यांची मने सुद्धा विखुरल्या सारखीच झाली...
एकेकाळी सहजपणे चार दोन पाहुणे वेळेवर जरी आली तरी जेवून जायची इतका स्वयंपाक असायचा त्या ठिकाणी आता कुत्र्याला सुद्धा भाकरी आणि तुकडा द्यायचा कंटाळा यायला लागल्याचं दिसतंय....
आता एकत्र गप्पा बंद पडून घरात टीव्हीवर बोलणारीच माणसे दिसतात आणि आता प्रत्येकजण मोबाईलवर गुंतलेला दिसतोय.….. 
या छोट्याश्या घरांच्या भिंतीला सारवायची गरज नाही पण माडीमध्ये असलेला प्रेमाचा ओलावा सुद्धा या घरात बघायला सुद्धा मिळणे अश्यकच....
 हम दो आणि हमारे दो अश्या अविर्भावात राहणारी ही विभक्त कुटुंबे बघून सगळ्या कुटुंबाचा वटवृक्ष सांभाळणारी मढी मात्र आजही रडतांना दिसते.... वसुधैव कुटुंबकम... सांगणारी भारतीय संस्कृती आज स्वतःच विभक्त कुटुंब व्यवस्थेत विभागतेय.....!
-श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
14 " कुटुंब : एक विविधरूपी केंद्र " 
     मानव हा एक समाजशील प्राणी आहे . तो समुहाशिवाय राहूच शकत नाही . म्हणून मानव हा आपल्या घरात आपल्या परिवारातील सदस्यांसह एकत्रित वास्तव्य करीत असतो . भलेही मग ते कुटुंब संयुक्त वा विभक्त असू शकते . पण तो एकटा मात्र राहू शकणार नाही ....
     " परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही 
       वडीलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही 
       आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही 
       भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही 
       बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही 
       मित्रांशिवाय आयुष्य नाही 
       परिवाराशिवाय जीवन नाही ! "
     उपरोक्त पंक्तीतून ' परिवार ' ही किती व्यापक संकल्पना आहे हे आपणांस स्पष्टपणे जाणवते . " कुटुंब म्हणजे केवळ मानवी शरीर एकत्रित राहणे नसून मानवी मने एकत्रित राहणे होय ! " एक असे ठिकाण की जेथे माणसाला ' खरा माणूस ' बनवीले जाते .... तेही विनामूल्य संस्कार देणारे संस्कारकेंद्र म्हणून ..... एक 24 तास सेवा देणारे मोफत सेवाकेंद्र म्हणून ... एक काळजीवाहू आरोग्यकेंद्र म्हणून ... एक मायेचा स्पर्श करणारे भावनाकेंद्र म्हणून ... सामाजिक चालीरीतींचे दर्शन घडवून आणणारे एक समाजकेंद्र म्हणून .... जगाचे अनमोल ज्ञान शिकवीणारे एक जागतिक विद्यापीठ म्हणून ... देशभक्ती निर्माण करून मनात  देशप्रेमाची ज्योत तेवणारे एक देशभक्तीकेंद्र म्हणून .... एखाद्या वडाच्या झाडावत सर्व लहान - थोर प्राणीमात्रांना आपल्या अंगाखांद्यावर घेऊन ... भार - ओझ्याची कसलीही कुरबुर न करता सांभाळणारा एक आधारवड म्हणून .... आपल्या देहातील रक्त - मांस गोठवून व हाडाची काडे करून जीवाची परवा न करता निरपेक्ष भावनेने अविरत कार्य करणारे एक परोपकारी केंद्र म्हणून ....नेहमीच सत्य व सद्मार्गाने जाण्यास प्रेरित करणारे एक व्यक्तीमत्वविकासकेंद्र म्हणून .... अशा एक नाही अनेक गुणांची खाण म्हणजेच हे ' कुटुंब केंद्र ' होय !
     ह्या कुटुंबातच आपल्याला जागतिक शर्यतीसाठी अस्तित्व टिकवून ठेवण्यास सक्षम बनविले जाते ... त्यासाठी मानसिक व शारीरिक बळ निर्माण केल्या जाते ... जरीही या स्पर्धेत धावतांना अडखळलो , ठेचाळलो , तरीही ऊठून पुढे जाण्याची हिंमतही याच कुटुंबात मिळते ... शिवाय दृढ आत्मविश्वास व नवऊर्जाही याच तर कुटुंबात मिळते ... अपयश , अपमान पचविण्याची ताकदही येथेच तर मिळते ना ... शिवाय उत्कर्ष , भरभराटीने हुरळून अहंकार मनात न आणण्याचे शिक्षणही येथेच मिळते ... असे कुटुंब हे एक आदर्श केंद्रच होय ...
     चला तर मग आज 15 मे ' फॕमिली डे 'अर्थात ' कुटुंब दिन ' या शुभदिनी आपण आपल्या कुटुंबातील सर्व मोठ्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेऊत ... नि लहानांना सुसंस्कारित व सुसंस्कृत करूया ...  " पिंडी पिंडी ते ब्रह्मांडी " या उक्तीनुसार आपल्या कुटुंबातील यथोचित हितात सृष्टीचे हित सामावले आहे ह्याची प्रचिती घेऊया ...म्हणून " कुटुंब एक विविधरूपी केंद्र " आहे !
अर्चना दिगांबर गरूड 
मु. पो. ता. किनवट , जि. नांदेड 
मो. क्र. 9552954415
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(15) कुटुंब म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी
समाजाने घालून दिलेल्या रीती-रिवाजाप्रमाणे एका घरात दोन किंवा दोन पेक्षा अधिक सदस्य एकत्र राहतात त्याला आपण कुटुंब म्हणतो. हि एक मोघम व्याख्या कुटुंबाची करता येईल. पण, पण ही व्याख्या करत असतांना त्या चार निर्जीव भिंतीच्या आत राहणारी माणसे एका समान भावणीकतेने एकत्र आलेली असतात, एकमेकांची सुख-दुःखे जिथे मनापासून समजून घेणारी असतात त्याला खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणता येईल. पण ही व्याख्या आताच्या कुटुंब पद्धतीमध्ये लागू होतांना दिसत नाही. संयुक्त कुटुंब पद्धती चे विभक्त कुटुंबामध्ये रूपांतर झाले. त्यानंतर हम दो, हमारे दो असे रूप आले. आता तर हम दो और हमरा एक यावर आताचे कुटुंब येऊन ठेपले आहे. हे काही वाईट नाही. पण, एका घरात इन मिन तीन माणसे राहत असतांना सुद्धा तिघांचे एकमेकांना बोलणे नसते, एकमेकांची विचारपूस नसते. आई ऑफिस ला जाते संध्याकाळी दमून घरी येते, वडिलांचं तसंच मुलगा शाळेत जातो, शाळेतून घरी, नंतर परत विशिष्ट क्लास ला जातो. जो-तो आप-आपल्या कामात व्यस्त आहे. थोडा फार वेळ मिळालाच तर मोबाईल, टीव्ही यावर जातो. एकमेकांसोबत मनसोक्त गप्पा मारण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. वेळ आहे पण तो आपण देत नाही. त्यामुळे कुटुंबातील भावणीकता कमी होतांना दिसून येते.
सध्या तरी हम दो और हमारा एक अशी परिस्थिती असतांना. कुठे-कुठे तर पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण सुद्धा व्हायला लागले आहे. त्यात काही वर्षांसाठी किंवा महिन्यासाठी एकत्र राहायचं जेव्हा वाटेल तेव्हा एकमेकांना सोडून दुसरा जोडीदार बघायचा. त्याला leave and relationship असं आपण म्हणतो. अशी परिस्थिती जर असली तर येणाऱ्या पिढीला कुटुंब हि संकल्पना कशी होती हे फक्त इतिहासाच्या पुस्तकातच वाचायला मिळेल.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याने प्रत्येकाला वेळ देणे गरजेचे आहे, प्रत्येकाला समजून घेणे गरजेचे आहे. तेव्हाच हि कुटुंब व्यवस्था टिकेल.
एका कवितेमध्ये कुटुंबाचा अर्थ छान विशद केलेला आहे.
"घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती,
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती."

गणेश सोळुंके, जालना
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कुटुंब जगण्याचा आधार
नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर सुरभी नावाची मालिका दाखवायचे. या मालिकेत भारतातील नाविन्यपूर्ण अशा गोष्टी दाखवल्या जायच्या  . अतिशय सुंदर संस्कृतीचे दर्शन घडवणारी मालिका होती .याच मालिकेमध्ये शंभर जणांचे एक कुटुंब दाखवले होते. आपल्या भारतामधील असे हे कुटुंब होते मी त्यावेळी खूप लहान होते ते पाहून मला फार गंमत वाटली होती. शंभर जणांचे कुटुंब एकत्र राहते बापरे! जेवण कसे बनवत असतील? किती मोठे जेवण बनवावे लागत असेल? कपडे धुणं, घरातील सर्व काम कसे काय करत असतील या कुटुंबात? छोट्या बाळापासून तर नव्वद वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश होता. सर्वजण मिळून काम करत होते प्रत्येकाला निश्चित असे काम होते. भांडण-तंटा नव्हता. सर्वजण प्रेमाने होते शिवाय; कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची होती म्हणजेच एकत्र कुटुंबाला खूप पैसा लागतो असे नाही तर साधारण परिस्थितीचे कुटुंब देखिल एकत्र राहू शकते.
कुटुंबात अर्थव्यवस्थेचा भार बाहेर काम करणाऱ्या व्यक्ती सांभाळत होत्या तर घरातील कामे सर्वजण वाटून करत होते. घरातील काम करण्यात पुरुष देखील सहभागी होते; त्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नव्हता. आजारपण, सण-समारंभ, मुलांच्या शाळेचा खर्च, लग्न, नातेवाईकांची उठबस, लहान मुले सांभाळणे याचा भार कोणा एकावर नक्कीच नव्हता, त्यामुळेच हे कुटुंब एकत्रितपणे टिकू शकले. कुटुंबप्रमुख व्यक्ती घरातील सर्वांची मते जाणून घेऊन निर्णय घेत असे त्याचा निर्णय अंतिम असे. एकमेकांसाठी त्याग करणे, एकमेकांसाठी वेळ देणे, स्वतःच्या कामा इतकेच दुसऱ्याच्या कामाला महत्त्व देणे, एकमेकात कोणतीही असूया स्पर्धा नसणे यामुळे चांगुलपणाचे संस्कार नकळत या कुटुंबात घडत होते. आजही भारतामधील एकत्रित कुटुंब पद्धतीचा संपूर्ण जग आदर्श घेत आहे .पाश्चिमात्य देशात तुलना केल्यास विभक्त कुटुंब पद्धती आढळते वयाच्या सोळाव्या वर्षापासून मुलांच्या हातामध्ये पैसा खेळू लागतो मुले स्वावलंबी होऊ लागतात त्यामुळे आई वडिलांचे महत्व थोडेसे कमी झाल्यासारखे होते. आई-वडील आजी-आजोबा हे सर्व  एकत्र राहत नाही. घटस्फोटांचे प्रमाण या देशांमध्ये अधिक प्रमाणात आहे त्यामुळे मुले असुरक्षित होत आहेत, त्यातूनच मुले हिंसक प्रवृत्तीची बनतात कितीतरी गोळीबाराच्या घटना घडतात मुलांमध्ये सहनशीलता असत नाही ,आपली वस्तु शेअर करणे, भावना जुळवून घेणे ह्या गोष्टी त्यांना जमत नाही कितीतरी वृद्ध लोक एकाकी आयुष्य कंठत असतात .
सध्या भारतात काही वेगळी परिस्थिती आहे असे नाही  तर सध्याच्या काळामध्ये भारतातदेखील विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे .त्याची अनेक कारणे आहेत मुलांचे शिक्षण, आर्थिक परिस्थिती, मलाच पैसा हवा ,मला सर्व सुख साधने हवी ही भावना, दूरवरची नोकरी, परदेशात खूप पैसा मिळतो या समजुतीने मुलांचे उदरनिर्वाहासाठी परदेशात स्थलांतर होणे आई-वडील भारतात असणे, आई-वडील वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला किंवा वास्तव्यास असणे ,घटस्पोट अशा अनेक कारणांमुळे भारतात देखील कुटुंबे विभक्त होत चालले आहेत त्याचा परिणाम म्हणूनच वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. बाल मनावर याचा परिणाम होऊन मुले एकलकोंडी बनत चालली आहे .समाजात स्वतःला सामावून घेऊ शकत नाहीत, अनेकांची  मानसिक स्थिती ठीक नसते.
कुटुंब म्हणजे रक्तातील नात्यातील लोक एकत्र राहतात असा समूह असा नाही तर वेगवेगळ्या उद्देशाने देखील समूह एकत्र येतात व एकत्रित जीवन कंठीत करतात याला देखील कुटुंब म्हणता येते उदाहरणार्थ अनाथ आश्रमातील मुले; आई-वडील आजी-आजोबा भाऊ-बहीण हे रक्ताची नाती नसताना देखील एकत्र राहतात ; तसेच गरज म्हणून पाळणा घरांमध्ये देखील अनेक मुले एकत्र असतात त्यांची काळजी घेणारे लोक तिथे असतात त्यांचा समूह. वृद्ध ,अपंग यांची काळजी घेणारा समूह, निराधार महिलांची काळजी घेणारा समूह यांनादेखील कुटुंब असे संबोधता येते. कुटुंबामुळे प्रेम मिळते. त्यागाची शिकवण मिळते. घेणे यापेक्षा देण्यात आनंद आहे हे समजते. जबाबदाऱ्या वाढल्या जातात त्यामुळे त्या निभावताना दुःख नाही तर आनंद होतो मानसिकदृष्ट्या खंबीरपणा येतो निर्णय घेताना सर्वजण मदत करतात .एकलकोंडेपणा जाणवत नाही .नैराश्य येत नाही. आत्महत्येचे विचार दूर पळतात. मायेची प्रेमाची सावली कुटुंबात  मिळते. कुटुंब म्हणजे सुख आनंदाची अत्तराची कुपी आहे ; त्यातील सुगंध जाणवत राहतो तो असतो विश्वास व प्रेमाचा . कुटुंब म्हणजे व्यक्त होण्यासाठीचे एक सुंदर व्यासपीठ आहे  .
एखाद्या व्यक्तीला कुटुंबाचे महत्त्व कुटुंबापासून दूर गेल्यावर कळते. हॉस्टेलमधील मुले-मुली यांना कुटुंबाचे प्रेम खऱ्या अर्थाने होस्टेलला गेल्यावरच कळते आईच्या हातचे जेवण मिळत नाही. आजी-आजोबांची मांडी मिळत नाही. बहिणीशी भावाशी हितगुज करायला मिळत नाही. शिक्षणाच्या निमित्ताने दूर झाल्यापासून विद्यार्थ्यांना कुटुंबाचे महत्त्व अधिक समजायला लागते; तसेच परदेशात केलेल्या व्यक्तींना देखील आपले मित्र-मैत्रिणी, आपले आप्त या पासून दूर राहावे लागते व कुटुंब या सुखाला थोडे पारखे व्हावे लागते.
सुखदुःखाचे उन्हाळे येतीअन जाति;
प्रेमाच्या नात्यांची सर त्यांना चिंब करून  जाती.
संकटाचे कंटक जरी पायी रुतती; त्याग अन आधार त्यास काढुनी टाकती.
तीन अक्षरी कुटुंब शब्द मायेची महती गाती
सविता साळुंके श्रीरामपूर
कोड13
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 कुटुंब 
        "वसुधैव कुटुम्बकम" म्हणजे वसुंधरा वरील आपण सर्वच देवाजीची लेकरे आहोत आणि मिळून सारे कुटुंबिय आहोत. मूल जन्मल्यानंतर प्रथम कुटुंबात संस्कार घडवले जातात घरात आजी, आजोबा, आई-बाबा बाळाला एकेक गोष्ट शिकवत, पटवत असतात. त्यासाठी उदाहरण देखील देतात. मुले घरातून ज्ञानाचा, शिकवणुकीचा साठा घेऊन शाळेत जाऊ लागते.शाळेतील बाईंकडून, मित्रांकडून कळत-नकळत संस्कारित होत असते.संगत चांगली असेल तर सुसंस्कार, नाहीतर मुल कुसंस्कारी बनते. लालन पालन करताना आई त्याला हे करू नको, ते करू नकोस असे सांगून आई त्याची जगात वावरण्यासाठी तयारी करून घेत असते.सायंकाळी जेव्हा आजी भोवती कोंडाळे करून मुले बसतात. आजीही आपल्याकडील गोष्टींचे, ज्ञानाचे भांडार त्यांच्यासाठी उघडत असते. त्यामुळे घरातील लोक, कुटुंबच मुलाचे पहिले गुरू असतात.
              त्यानंतर शाळेतील शिक्षक,मित्र शाळेतून सुसंस्कारित होऊन कॉलेजला किंवा जग ओळखायला बाहेर पडते त्यावेळी त्याला बऱ्यापैकी व्यवहारज्ञान मिळालेले असते. त्यामुळे यश अपयश ते पचवू शकते. एकत्र कुटुंबात मुलांवर चोहोबाजूंनी संस्कार घडत असतात. शिवाय जगात वावरण्याचे तंत्रही समजते. बर्‍यावाईट प्रसंगी काय कसे बोलायचे, वागायचे हेही समजते. काही पालक, आईवडील दोघेही नोकरी करत असल्याने मुलासाठी तितकासा वेळ देऊ शकत नाहीत. ती मुले बाहेर डोकावू लागतात.ती थोडीफार भरकटली जाऊ शकतात. काही ठिकाणी मोलकरणीच्या जिवावर मुलाला टाकून आई-वडिलांना बाहेर पडावे लागते. पालकांनी मुलांवर करडी नजर ठेवावी. कारण मोलकरणी मुलांवर कसे संस्कार करतात हेही महत्त्वाचे असते. जास्तीत जास्त वेळ मुले आपल्या सहवासात ठेवून उरलेल्या वेळासाठी मोलकरणीच्या भरवशावर ठेवावे. जास्त वेळ ते त्यांच्यासोबत राहिल्यास ते चोरी करायलाही शिकते.भरकटली जाते. त्यावरही पालकांनी नजर ठेवावी. मुलासाठी मैत्रीचा हात पुढे करावा, म्हणजे मूल मनात न ठेवता सर्व काही आपल्या आई-वडिलांना सांगेल एवढा विश्वास निर्माण करावा.
      मोठी झाल्यानंतर ही मुले कुसंगतीत पडून खोटे बोलते, चोरी करते. यावेळी त्याला पाठीशी न घालता चुकीच्या गोष्टी किती घातक असतात हे विश्लेषण करून सांगावे. काही मुले व्यसनाची बळी होतात. डिस्को, तमाशाच्या नादाला लागतात. काही पालक वेळ देऊ शकत नाही म्हणून मुलाला खूप सारे पैसे देतात. त्यामुळे मुलाच्या सवयी बिघडतात म्हणून पैसे देताना मागील पैशाचा हिशोब मागितला तर मुलावर थोडा वचक राहील व आपल्या पालकांचे आपल्यावर लक्ष आहे हे मुलाला समजेल. फक्त पैसे देत गेले तर मुलगा दुर्व्यसनी होऊन पैशाचा अपव्यय करेल. तेव्हा पालकांना समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे कुटुंबात प्रेम जिव्हाळा असेल तर मुलांना चांगले वळण लागेल. त्यासाठी गरज आहे आईवडिलांच्या समजूतदारपणाची नि ऐक्याची. कुटुंबात समजूतदारपणा नसेल, भांडणं असतील तर त्या मुलांवर विपरीत परिणाम होऊन ती मुलंही भरकटली जातील. एकदा मुलांची जडणघडण नीट बसली तर त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यामुळे कुटुंबाची इज्जतही हातात राहील.
सौ.भारती सावंत, मुंबई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 'घर असावे घरा सारखे 
घर म्हटलं की त्यातील सुखी कुटुंबाचे चित्र मनात उभे राहते. कुटुंब म्हणजे काय
विचार केला असता एकच व्याख्या मनात येईल 'सेन्ह प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफलेली मोत्यांची माळ' . त्या माळेतला एक जरी मोती गळून पडला तरी त्या माळेचे शोभा नष्ट होते.‌
एकत्र  कुटुंब पद्धती आता लोप पावत चाललेली आहे. 
पूर्वी वधू साठी वर पाहताना एकत्र आणि मोठे कुटुंब पाहत असतं. आपल्या पूर्वजांची धारणा होती , मुलीला खटल्याच्या घरी(एकत्रीत कुटुंबात)  दिले की मुलगी उपाशी राहणार नाही आणि जर कधी  आजारी पडली तर तीला सर्वजण सांभाळून घेतील .तीला एकटे वाटणार नाही .
याउलट आताच्या पिढीचे विचार झाले आहेत . एकटाच मुलगा बघतात शहरात एकटा राहणारा नोकरी करणारा जवाई पसंत करतात . मग तो कोणी शिपाई का असेना. फक्त त्याचे कुटुंबीय जवळ नको. आजकाल लोकांनी पुस्तकी  शिक्षण घेतले. पण मनाचा मोठेपणा गमावून बसले‌‌. लोकं फक्त स्वतःचाच विचार करायला लागले. स्वार्थी मनात फक्त स्वार्थी नात्याला जागा दिली जाते. गरजे पुरते आणि व्यवहारी  नाते आता फक्त शिल्लक राहिले आहे. घरात फक्त नवरा बायको आणि त्यांची मुले असतात .
आजी आजोबा फार कमी घरात पहायला मिळतात. आजी आजोबांचा खर्च परवडत नाही म्हणून त्यांना गावीच किंवा वृध्दाश्रमात ठेवले जाते. आणि एकी कडे दोघे नोकरी करतात म्हणून मूलांना पाळणा घरात किंवा त्यांना आया सांभाळते .किती विचित्र मानसिकता निर्माण झाली आहे आजच्या पिढीची ! 
पूर्वी लोकं कमी शिकलेली होती गरीब होती पण, त्यांच्या जवळ मनाची श्रीमंती होती .
त्यांच्याजवळ उच्च विचारांची श्रीमंती होती. स्नेह प्रेमाच्या छायेत वाढलेली होती .
घरात सर्वत्र गोकुळ नांदत होते . घरातील मुलं आजीच्या कुशीत झोपून रामायण महाभारतातील गोष्टी ऐकून झोपी जात घरात जीव ओतून प्रेम करणारे आजोबा सोबत राहत असत. कळत न कळत मुलं दया क्षमा समाधानाचे संस्कारात घडले जात असत. म्हणूनच पूर्वीची पिढी संस्कारक्षम होती.
नंतर हळूहळू काळ बदलत गेला.शैक्षणिक क्षेत्रात कालांतराने प्रगती होत गेली . शिक्षणासाठी मुले व मुली घराबाहेर पडू लागले.त्यांची जीवन  पध्दती हळूहळू बदलत गेली . कामानिमित्त शहरात राहू लागले मग सुरुवात झाली विभक्त कुटुंब पद्धतीची. सुरुवातीला जरी एकत्र कुटुंबात राहत नसत अथवा राहता येणं शक्य नसलं तरी मनं मायेच्या  धाग्यात गुंफलेली होती . आठ चार दिवसांत एकमेकांना पत्र लिहून खुशाली कळवली जात असे.
पोस्टमन काकांच्या सायकलची घंटी वाजली की आजीचा आतून आवाज यायचा माझ्या बाळ्या ने  पत्र लिहून धाडले. आजी आनंदाने बाहेर यायची आणि पोस्टमन कांकांकडूनच  पत्र वाचून घ्यायची. काकांचे पत्र पूर्ण 
वाचून होई पर्यंत आजीच्या डोळ्यातील मोत्यांचे थेंब गालांवर टपू लागायचे .
त्या पत्रातून बाळ्या ने ओतलेले प्रेम आजीच्या डोळ्यात उभे राहायचे . ती पत्र भेट आज दिसेनाशी झाली आहे . आज जमाना स्मार्ट फोनचा आहे . हव तेव्हा फोन करून चौकशी करू शकतो.पण पंन्नास हजारांच्या फोन मध्ये ते पत्रातील प्रेम आता लोप पावले आहे . फोन करायला वेळ नाही फोन केला तर फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी . 
आज सर्व जग डिजिटल बनले आहे . आणि नाते स्वार्थी बनले आहे. तु मला दिलं तितकंच मी तुला देणारं किंवा दिलं असेल मी कशाला देऊ . हाच स्वार्थ आता नात्यांमध्ये दिसतो .
मग ते नातं आई मुलांचं असो वा नवरा बायको चं असो किंवा भावंडांचं असो. लोकांकडे दोन दोन मजली घरं आहेत पण त्या घरातील प्रेम आणि आपुलकी सर्वार्थाने भरलेली आहे. 
घराला घरपण घरात प्रेमानं एकत्र राहणाऱ्या माणसांनीच येते. थकून घरीच येतो  कारण प्रेमाने वाट पाहणारी आपली माणसं घरात असतात म्हणून . जर घरात स्वार्थी प्रेम करणारे माणसे असतील तर मनं घराकडे न जाता एखाद्या हॉटेलमध्ये किंवा बियर बार कडेच जाईल हे नक्कीच. 
जिथं प्रेमाची आपुलकीची 
माणसे राहतात तेच खरं घर 
नाहीतर फक्त डेकोरेट केलेल्या चार भिंती . 
म्हणूनच म्हटले आहे ,
'घर असावे घरा सारखे 
नकोत नुसत्या भिंती 
नाते असावे प्रेमाचे 
नकोत स्वार्थाचे ओझे'.
🖋 सौ सुवर्णा सोनावणे 
चाळीसगाव 
७७४४८८००८७
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*परीवार  - कुटुंब*
परीवारत विहरतो आनंदघन.
मनसोक्त बरसतो आनंदघन. 
 ह्रदयातून ओसंडून वाहतो आनंद घन.
अवचित उचंबळून येतो आनंदघन.
तन-मन-प्राणात पाझरतो आनंदघन .
आनंदघनातच  बहरतो परीवार . 
     
    आम्ही संयुक्त कुटुंबात वाढलो. आजी आजोबा काका काकू आत्या.आम्ही बालगोपाल खूप मज्जा करायचो. पण
हे सर्व जास्ती दिवस नाही टिकले. कामधंदाच्या निमित्ताने सगळे वेगवेगळ्या दिशांनी गेले . मैलोगणिक दूर गेले. तरीही  उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास सगळे जमायचे. मग काय धमाल असायची. गावातल्या नदी वर पोहायला जाणे , पोहता येत नसल्यास, नुसते पाण्यात डुंबणे.
    दिवस भर खेळणे आणि रात्री उशीरापर्यंत गप्पा गोष्टी, अंताक्षरी, ह्यात ऊन्हाळ्याची सुट्टी केव्हा संपायची कळायचे पण नाही.  परत पुढच्या उन्हाळ्यात भेटणाऱ्याचे, काही वेगवेगळ्या खेळाचे प्लॅनिंग करून घरी परतायचो. पण नंतर वरच्या वर्गात  अभ्यास वाढला, शाळेच्या सुट्ट्या कमी झाल्या ,आणि आमच्या सगळ्यांच्या भेटी गाठी कमी कमी होत गेल्या.
         हळुहळू एकत्र कुटुंबाची पद्धत कमी कमी होत गेली, त्याला सर्वात महत्वाचे कारण म्हणजे  शिक्षण  नोकरीच्या निमित्ताने मुलं परदेशी जाउ लागली, देशातही वेगवेगळ्या शहरात राहु लागले. पण तरीही  सणासुदीला सुट्टी त जाणे येणे चालुच होते. नंतर  नंतर  परिवारात अंतर पडू लागले. छोट्या मोठ्या कुरबुरी सगळीकडेच असतात पण आता काट्या चा नायटा व्हायला लागला. परिणामी कुटुंब संस्था  ढासळु लागली. विभक्त कुटुंब पद्धत रुजली. बराच कालावधी गेल्यावर विभक्त कुटुंब पद्धतीचे दुष्परिणाम नजरेस पडु लागले. म्हाताऱ्या आईवडिलांना कोणी वाली  नव्हते. वृद्धाश्रमाची संख्या वाढू लागली .
       विभक्त कुटुंबाचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम लहान मुलांवर होऊ लागला. त्याच्या कडे लक्ष द्यायला आईवडिलांना वेळ नसल्याने, त्याच्या अभ्यासावर, संस्कारांवर, वागण्यावर झालेले अनिष्ट परिणाम बघून बरेच  माता-पिता हवालदिल झाले. त्यांना घरात वडीलधाऱ्याची गरज भासू लागली. पण सासु सुनेचे सगळी कडे  जमेलच असेही नाही. त्यामुळे आताच्या पिढीने नवीन सुवर्णमध्य शोधला आहे.   दोघांन मधून एकाचे आई बाबा त्याच बिल्डींग मध्ये वेगळे बिऱ्हाड करून राहतात. कधी कधी तर आजुबाजुलाच राहतात ह्यात दोघांची सोय होते. दोघांची प्रायव्हसी ही जपली जाते . अडीअडचणीला एकाएकामेकांची मदत ही होते.अर्थात हे सर्वांना साधण्या सारखे नसले तरी बरीच कुटुंबे गुण्यागोविंदाने राहतात.   
   ह्या कोरोनाच्या संकट काळात माणसाला माणसाची किंमत कळली आहे. अगदी पहिल्या सारखी नाही तरी काही अंशी कुटुंब व्यवस्था परत येईल असे मला  नक्की 
वाटते.
डाॅ.वर्षा सगदेव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
07 वृद्धाश्रम -- एक वेगळी कुटुंब संस्था
  आज 15 मे जागतिक कुटुंब दिन म्हणून सर्वत्र उत्साहाने,आनंदाने साजरा केला जात आहे. प्रत्येकालाच आपल्या आई-वडिलांच्या बरोबर, आपल्या भावा-बहिणीच्या बरोबर, घरातील सर्व लोकांच्या बरोबर एकत्र दिवस घालवणे आवडते.आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीसाठी शिक्षणासाठी, इतर कामासाठी परगावी गेलेल्या मुलांच्या बरोबर एकत्र राहणे मुश्किल झालेले आहे. कधीतरी सण समारंभाच्या निमित्ताने ते सर्वजण एकत्र येतात. पण वेळ नसल्यामुळे जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत. सध्याचा काळ हा लॉकडाऊन चा काळ असल्यामुळे,बऱ्याच कुटुंबांमध्ये सर्व कुटुंबीय एकत्र राहण्याचा योग आलेला आहे.ते सर्वजण खूप दिवसांनी इतक्या निवांतपणे आपल्या कुटुंबातील लोकांच्याबरोबर रहात आहेत.हे जरी खरे असले तरीपण असेही काही दुर्दैवी लोक आहेत.त्यांना स्वतःच्या कुटुंबातील सर्व लोक असूनसुद्धा परक्या ठिकाणी म्हणजेच वृद्धाश्रमांमध्ये आपल्या स्वकीयांची वाट पाहात असहाय्यपणे जीवन जगणे त्यांच्या नशिबी आलेले आहे.
 कोणत्याही वृद्धाश्रमांमध्ये आपण गेलो तर तिथे असलेल्या असहाय्य वृद्धांच्या चेहऱ्यावरचा केविलवाणा भाव पाहिल्यानंतर खरोखरच  गलबलून यायला होते. डोळे आपसूकच पाणावतात. कारण तिथला प्रत्येक वृद्ध  मग ती स्त्री असो की पुरुष ,येणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला, आपल्या नातवंडांना शोधत असतात.माझा मुलगा असाच दिसत असेल, माझी मुलगी अशीच असेल किंवा माझी नातवंडं आता एवढी मोठी झाले असतील असे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात.व तशाच नजरेने ते  मदत द्यायला आलेल्या व्यक्तींच्या कडे पहात असतात.
 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घोसरवाड येथे जानकी वृद्धाश्रम आहे. आश्रमात स्त्री-पुरुष मिळून जवळ जवळ 34 जण एकत्र रहात आहेत. सर्वप्रथम आमच्या काकूच्या वर्ष श्राद्धा च्या कार्यक्रमावेळी  आम्ही तिथे भेट द्यायला गेलो. तिथले संचालक बाबासाहेब पुजारी यांच्याकडून सर्व माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या वृद्धांच्या कथा ऐकून अंगावर शहारे आले. कुटुंबामध्ये मुले, मुली असूनसुद्धा त्यांनी आपल्या आई-बाबांना, कोणी फक्त आईला ,कोणी आपल्या बाबांना  विविध कारणे सांगून वृद्धाश्रमात आणून सोडले होते.ते आजपर्यंत आपली मुले आपल्याला न्यायला येतील या वेड्या आशेवर जगत आहेत.
 हे सर्व पाहिल्यानंतर आजची कुटुंब व्यवस्था किती खालच्या थराला गेलेली आहे हे लक्षात येते. ज्या आई-बाबांनी आपल्या हाडाची काडे करून मुलांना वाढवले, खस्ता खाल्ल्या, अनेक हालअपेष्टा सहन केल्या. तेच आई बाबा त्यांच्या उतारवयात मुलांना नकोसे होतात. यामध्ये एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे जोपर्यंत मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो आपल्या आईवडिलांच्या बरोबरच असतो. त्यांचे सर्व ऐकतो.कींबहुना त्यांच्याशिवाय त्याला कुणीच नसते. पण जेव्हा लग्न होते, घरामध्ये त्याची बायको येते, तेव्हापासून मात्र घरांमध्ये हळूहळू कुरबुरी सुरू होतात. यामध्ये  त्या मुलीचा दोष असू शकतो किंवा म्हाताऱ्या आई-बाबांचाही दोष असू शकेल.पण या सर्वांमध्ये मुलाचे हे कर्तव्य आहे की त्याने दोंन्हीच्यामध्ये सुवर्णमध्य हा काढलाच पाहिजे. नवरी म्हणून आलेली मुलगी ही आपले घर सोडून आलेली असते तिलाही आधार दिला पाहिजे व आपल्या आई-वडीलांना दोघांनी मिळून समजून घेतलं पाहिजे.
   कुटुंब म्हटलं की कुटुंबामध्ये अनेक नाती आली. आई-वडील,भाऊ बहीण, आजी आजोबा,नातवंडं, नातेवाईक इत्यादी. हे सर्व जण एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहात असतील तर ते कुटुंब सुखी-समाधानी आहे असे समजले जाते. आज " हम दो हमारे दो,"  "छोटे कुटुंब सुखी कुटुंब " ही संकल्पना वाढीस लागली आहे. त्यामुळे उतारवयात गेलेले आपले आई-वडील नकोसे झालेले आहेत. त्यामुळे काही मुले निर्लज्जपणे आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमांमध्ये आणून सोडतात. आपल्या आई वडिलांच्या भावनांचा ते थोडाही विचार करत नाहीत.पण या कुटुंबाला काहीही अर्थ राहत नाही. यावेळेला त्यांची लहान मुले  हे सर्व पहात असतात व त्यांच्या मनावर ही तसेच संस्कार होतात. व आईवडील मोठे झाल्यावर ते ही आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. हे चक्र मग चालूच राहते.
 त्यामुळे मोडत चाललेली ही कुटुंब व्यवस्था वृद्धाश्रमासारख्या संस्थेमध्ये रुजू पाहत आहे. त्या ठिकाणी त्यांचा यथायोग्य सांभाळ जरी होत असला तरी त्यांची मनं आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या कडेच ओढत असतात. त्यामुळे वृद्धाश्रम ही संकल्पना बंदच पडायला हवी. हे मला एकटीला वाटून चालणार नाही तर समाजातील प्रत्येक मुलाला असे वाटले पाहिजे. सून म्हणून येणारी मुलगी कोणाची तरी मुलगी असते.त्यामुळे तिलाही याचा विचार करणे गरजेचे आहे.जर तिला आपल्या आई-बाबांना आपल्या भावाने बघावे असे वाटत असेल तर तिनेही तिच्या सासु-सासर्‍यांना आईवडिलांच्या प्रमाणेच प्रेम देऊन सांभाळले पाहिजे. त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू नये.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 .,.........कुटुंब...........                    
कुटुंब ही एक महत्वाची  संस्कार घडवणारी संस्था आहे.प्रत्येक व्यक्ती  कुटुंबातच जन्म घेतो. जन्म घेतल्या पासून लहान बाळावर चांगले वाईट संस्कार होत असतात.कुटुंब संस्कारित असेल तर समोरची पिढी पण संस्कारित घडत असते. कुटुंबात चांगले लोक असतील तर समाज चांगले घडत असते.        
 सुरुवातीच्या काळात लोक जंगलात भटकत असतं मानवाला जशी जशी बुध्दिमत्ता वाढत गेली तशी तशी मानवाने समाजाची आणि स्वतःची प्रगती केली मानव समूहाने राहत होता.गुफेत असायचा.नंतर हळू हळू पाणी असेल त्या ठिकाणी वास्तव्य करू लागला .एकत्र कुटुंब पद्धतीने राहू लागला. मानवाची बुध्दी विकसित  झाली .लहान मुलाला प्रेम,द्वेष, हट्टी,राग,अनुकरण या सर्व संकल्पना. कुटुंबातून मिळत असतात. आणि त्या नुसार समोरची पिढी घडत असते.कुटुंब प्रत्येक व्यक्तीला जन्म जात लाभत असते. कुटुंब पूर्वी खूप मोठे असायचे. तरीही पण सर्व लोक आनंदात असायचे.कुटुंबात  एकमेकांचा सन्मान केल्या जात असे.कुटुंब प्रमुखाला सर्व कुटुंबातील सदस्य मदत करत असत.कुटुंब प्रमुखाची भूमिका घरचे वडीलधारी व्यक्ती पार पाडत असतं . घरात म्हातारे आई वडील ,दोन तीन भाऊ.,त्यांच्या पत्नी आणि त्यांचे मुल आणि मुली अशी सर्व लोक एकत्र राहत असत त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणत.पण आता तंत्रज्ञानाच्या युगात या संकल्पना लोप पावत आहे.आई वडिलांना कितीही मुले असतील तर ती आता लग्न झाल्या बरोबर काही दिवसच कुटुंब आणि आई वडिलंबरोबर घालत असतात आणि काही काळानंतर वेगळे होतात.असे सगळेच मुले लग्न झाल्या पासून काही काळानंतर वेगळे होतात व शेवटी आईवडिलांना एकटे ठेऊन देतात.ज्या आई वडिलांनी लहानाचे मोठे केले.आपल्या साठी हाल अपेश्ठा सहन केल्या . दगडा दगडाची ठेस खाऊन प्रेम दिलं,आपुलकी दिली त्याच आई वडिलांच्या हातात फक्त मुलांना पोस न्या साठी केलेल्या हाल अपेष्ठा अठून दुःख माथी मारल्या शिवाय पर्याय उरत नाही.शेवटी आयुषयभर झीजनाऱ्या आईवडिलांना वरुद्धा आश्रमात जाऊन राहावे लागते .समोरची पिढी तयार करून जगण्याची क्षमता निर्माण करणाऱ्या निष्पाप जीवाला  उतरत्या वयात ऐवढे सहन करावे लागत आहे.याचा वाली कोणी समाज  ही नाही आणि शासनही नाही.                    
 लहान मुलांच्या भावनिक उत्तेजना, प्रोत्सान असा विविध प्रकारचा  व्यकीमत्व विकास ,अशा अनेक गुणाचा कळत न कळत विकास  घडावण्यात कुटुंब मदत करत असते. स्वामी विवकानंद,महात्मा गांधी,इंदिरा गांधीं,लोकमान्य टिळक ,डॉक्टर बाबााहेब आंबेडकर, अशा महान व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबातच संस्कार झाले त्या लोकांनी देशासाठी बलिदान देऊन समाजासाठी जगले.कुटुंब एक पतंग उडवणारे साधन आहे. जशी पतंग आकाशात सोडून योग्य दिशा देऊन पतंगाला मोकळे उडण्या साठी संधी दिल्या जाते परंतु हातात दोरी पकडून एसंन घातली जाते त्या प्रमाणे बंधनात राहून आपले उद्दिष्ट पूर्ण करणारी परी संस्था म्हणजे कुटुंब होय.                                        
कुटुंब हे जेवढे चांगले आहे .तेवढेच वाईट आहे. कुटुंबात सख्खे भाऊ पक्के वैरी पण होतात.सम जदांरीचा अभाव  कमी असल्या मुळे छोट्या छोट्या गोष्टी मुळे खून खराब होते.कुटुंब उद्ध्वस्त होतात.त्याच बरोबर एखादी आपत्कालीन घटना येते तेंव्हा प्रथम कुटुंबाच्या लोकांचीच आठवण येते. या वरून एक गोष्ट सांगता येईल एकदा एका कुरणात चार गाई चरत  होत्या .त्या दररोज एकत्र चारायच्या तेंव्हा त्यांना एका सिंहाने पाहिले तर सिंह गाईंची शिकार करण्यासाठी आला तर सगळ्या गाई नी मिळून सिंहाला हुसकावून लावले .आणि सिंह पाळला.पुन्हा त्या चार गाई मध्ये भांडण झाली आणि आता त्या वेगळ्या वेगळ्या चरू लागल्या .आता सिंहाला संधी मिळाली होती त्याने संधीचे सोने केले .आणि दररोज एक एक करून चारही गाई फस्त केल्या.म्हणून कुटुंबात एकजूट असणे आवश्यक आहे.एकीचे बळ खूप मोठे असते.                        
 जीवन खसावत भंडारा 9545246027
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...