*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- बाविसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 10 मे 2020 रविवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- जन्म आणि मृत्यू*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म आणि मृत्यू
आत्मा आणि शरीराच्या संयुगाचे नाव 'जन्म'असून त्याच्या वियोगाला 'मृत्यू' असे म्हणतात.खरंतर माणूस जन्माला आला तेव्हाच मृत्यूही घेऊन येतो. माणसाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत तो कसा वागतो, जगतो त्यावरून त्याला मोक्ष प्राप्ती होते.
परंतु मनुष्य कसा मरतो हे महत्त्वाचे नाही; पण तो आपले जीवन कसे जगतो हे महत्वाचे आहे. मनुष्याच्या स्वतःच्या सत्कर्म पुण्यधिक्याच्या बळावर त्याला मुक्ती प्राप्त होते. आपला जन्म म्हणजे कर्तव्याने भरलेला घडा आहे. माणूस स्वतःच्या जीवनात आपली कर्तव्य जितकी प्रामाणिक व योग्य प्रकारे पार पाडतो तितका तो आपल्या जन्माचे सार्थक करतो. कारण माणसाचं आयुष्य हे चैन नसून एक कर्तव्य आहे. व हे कर्तव्य तो जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे पार पाडतो.
माणूस जीवन जगत असताना त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात. ही जीवनात येणारी संकटे म्हणजे ते शाप नव्हेत तर त्याच्या जीवनात प्रथमता उद्भवणारी अडथळे होय. ही जीवनात उद्भवणारी संकटे म्हणजे त्याच्या उज्ज्वल भवितव्याची निदर्शक आहेत. माणसाचा जन्म,जीवन म्हणजे संग्राम आहे , यज्ञ आहे , सागर आहे.जखमांशिवाय संग्राम असत नाही.ज्वाळांशिवाय यज्ञ होत नाही . लाटांशिवाय सागर असत नाही. हे सर्वकाही हसतमुखानेच स्वीकारायला हवे.कारण जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे. माणूस जन्माला येतो व या जन्माला आलेल्या माणसाच्या जीवनाचं सार दोनच शब्दात सांगता येईल.
' आला आणि गेला .' काही माणसं मरत - मरत जगत असतात तर काही माणसं जगत - जगत मरत असतात.जन्मकाळाप्रमाणे मरणकाळ हा देखील एक आनंदसोहळा आहे. कारण शरीर पिंजऱ्यातून आत्म्याचा पक्षी मुक्त होऊन अनंतात विलीन होतो.
हे सार जग नियतीच्या अंगा - खांद्यावर खेळत असतं. नियती कधी हसते , कधी रडते. माणसाचं जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय.माणसाचं मरण म्हणजे नियतीचं रुदन होय. ' जीवन सरे मरण उरे ' हे सूत्र जगताना ध्यानात ठेवावं लागतं.
〰〰〰〰〰〰〰〰
✍लेखिका
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव, जि. नांदेड.
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
शतजन्म शोधीताना.....
हिन्दू धर्माच्या मान्यते नुसार , चौर्यांशी लक्ष योनी फिरुन झाल्यावर आपल्याला मानवाचा जन्म येतो . जन्म कधी घ्यायचा ? कुठे घ्यायचा ? कुणाच्या पोटी घ्यायचा ? श्रीमंताच्या महालात घ्यायचा की गरीबाच्या झोपडीत घ्यायचा ? स्रीच्या रुपात घ्यायचा की पुरुषाच्या रुपात घ्यायचा हे आपल्या हातात नसते . आपला देह , आपले शरीर पंचमहाभुतांच्या अंशापासू (पृथ्वी , आप , तेज , वायू आणि आकाश) या तत्वांपासू बनलेले आहे .
आत्मा किंवा जीव ही दिव्य चेतना त्या शरीरात प्रवेश करतील झाली की आपण जीवंत होतो . या जीवाला नऊ महिने परमेश्वर आई च्या पोटात ठेवून त्याचे पालनपोषण करतो . नऊ महिन्यानंतर तो जेंव्हा आई च्या पोटातून बाहेर येतो तेव्हा त्याचे "जीवन " सुरु होते .
बाळाचा जन्म झालेला समजताच त्याची वाट पाहत बसलेल्या नातेवाईकांना आनंद होतो . पेढे , जिलबी , मिठाई वाटली जाते . सर्व नातेवाईक , मित्र , आप्तेंष्टांना फोन करुन ही आनंदाची बातमी सांगितली जाते .
बाळाचा टॅहा .. हा रडण्याचा आवाज ऐकल्याबरोबर नातेवाईक आनंदाने हसू लागतात . या जगात एक नवीन जीव जन्माला आल्याचा आनंद साजरा केला जातो . ते बाळ जसजसे मोठे होत जाते तसतसे वयानुसार व प्रत्येक धर्मांनुसार त्यांच्यावर संस्कार केले जातात .
लहान मूल हे खरोखर परमेश्वराचेच रुप असते . कीती निष्पाप , निर्व्याज ! त्याला काहीही समजत नसते . जात , धर्म , गरीब , श्रीमंत , उचनीच , काळा गोरा , कशाचाच गंध नसतो . कळीचे फुल होऊन ते जसे सर्वांना आनंदीत करते तसे या बालकाकडे पाहून सर्वजण आनंदीत होतात . त्यांच्या बाललीलांनी हरखून जातात .
जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो काळ असतो तेच आपले जीवन होय . हे जीवन चिरकाल टिकणारे नसते . पाण्यावर येणारा बुडबुडा अल्पकालीन असतो तसेच हे जीवन ही अशाश्वत असते . हे कधी संपेल या बद्दल कुणालाच सांगता येत नाही .
जन्म आणि मृत्यू या मधे काही फार अंतर असते असे नाही . तर या मधे फक्त एका श्वासाचे अंतर असते . तुम्ही किती श्वास घेऊन जन्माला आला आहात आणि शेवटचा श्वास कधी घेणार आहात हे तुम्हाला तर नाहीच पण कुणालाही सांगता येणार नाही .
एकदा हे जीवन संपले की पुन्हा हा मनुष्य जन्म येणार नाही . म्हणून चांगले कर्म करावे . तेच आणि तेवढेच आपल्या बरोबर येईल .
नर जन्मला मधी नरा करुन घे नर नारायण गुढी !
पुण्य आणि पाप म्हणजे दुसरं काय असतं .? पुण्य परउपकार पाप ते परपीडा इतकी सोपी व्याख्या संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितली आहे .
वय परतलेले जेव्हा माणूस शेवटचा श्वास घेतो तेव्हा त्याला नैसर्गिक मरण आले असे म्हणतात . अपघातामुळे किंवा आत्महत्ये मुळे आलेले अकाली मरणामुळे त्याच्या आत्म्यास शांती मिळत नाही व तो अतृप्त आत्मा भटकत राहातो असे गरुड पुराणात सांगितले आहे .
"मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास" हे एक मोठे प्रकरण गरुडपुराणात आहे . माणूस जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याचा आत्मा त्या मृत शरीरा भोवती फिरत असतो . प्रेता भोवती बसलेली माणसे , रडणारी माणसे तो पहात असतो . अंत्यविधी च्या वेळी मटक्यात पाणी भरून त्याला छिद्र पाडतात व प्रेताभोवती तीन प्रदक्षिणा घालून ते हटके खांद्यावरुन पाठीमागे सोडून देतात हटके फुटल्यावर पालथी मुठ तोंडावर ठेवून बोंब मारायला लावतात . याचा अर्थ असा की आता तुमचा आमच्याशी , आमच्या घराशी असलेला संबंध संपला .! तुम्ही आता पुढील प्रवासाला निघा .
तेरा दिवसांचा खडतर प्रवास करुन आत्मा चित्रगुप्ता पाशी येतो . तिथे त्याच्या पाप पुण्याचा हिशोब होतो व त्याला स्वर्गात अथवा नर्कात पाठविले जाते .जन्म मृत्यू हा विषय अतिशय गहन आहे . त्याचे अनेक पैलू आहेत .
आरंभ आणि अंत हे सृष्टीचे चक्र आहे . ईथे जन्म घेतलेल्या प्रत्येक प्राणी मात्राला , जीवजंतूला वनस्पती ला जन्म आहे तसा मृत्यू आहे , आरंभ आहे तसा लय आहे . हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच आहे . शेवट झाला की पुन्हा नव्याने सुरुवात होतच असते. सृष्टीचे ज्ञान आणि विज्ञान अगम्य आहे . अनेक रहस्यं यात दडलेली आहेत . अनेक जन्म घेतले तरी या रहस्याचा उलगडा होत नाही . म्हणूनच म्हणतोय शतजन्म शोधीताना ... शत आरती व्यर्थ झाल्या .. शत सुर्य मालिकांच्या दिपावली विझाल्या ..
अरविंद कुलकर्णी
पिंपरखेड कर
9422613664
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जीवन-मृत्यू :
जीवन-मृत्यूचा फेरा हा सतत चालणार फेरा आहे असं म्हणतात. त्यामुळेच कदाचित राज कपूर यांच्या चित्रपटातील हे गीत सुद्धा खूप काही सांगून जात असावे.
"जिना यहां, मरना यहां, इसके सीवा जाना कहां."
जन्म झाला की मृत्यू हा अटळ असतो. जन्म हि सुरुवात असेल तर मृत्यू हा शेवट आहे. मानवाच्या मृत्यूनंतर स्वर्ग-नर्क, पुनर्जन्म या संकल्पना सांगितल्या जातात. या खऱ्या की खोट्या ? वास्तविक की काल्पनिक, श्रद्धा की अंधश्रद्धा देव जाणे. पण या संकल्पना चांगल्याच आहेत कारण, स्वर्गात जाण्यासाठी मनुष्य वाईट कृत्य कारण्यापासू परावृत्त होतो तर चांगल्या कर्मासाठी प्रवृत्त होतो. चांगले कर्म असले की पुढच्या जन्मी सुखी आयुष्य जगता येते हि एक भावना मनात असते. असो, पुनर्जन्म असेल-नसेल माहिती नाही. पण मानवाने केलेल्या कर्माचे फळ त्याला याच जन्मात फेडावे लागते. त्यासाठी पुढच्या जन्माची गरज पडत नाही. त्यामुले मनुष्याने नेहमी इतरांशी सौजन्याने, आदराने, इमानदारीने राहिले पाहिजे तेव्हाच त्याला समाधान मिळते. चेहऱ्यावर एक भाव आणि मनातून कपट ठेवणाऱ्याला कधीच समाधान लाभत नसते.
त्यामुळे मनुष्य जन्म परत मिळेल की नाही माहिती. त्यामुळे याच जन्मात मजा,मस्ती, धमाल करा. चांगली माणसं जोडा.
हे गीत कुणी लिहिले ते माहिती नाही पण या प्रसंगी त्यातल्या काही ओळी यावेळी लिहाव्याशा वाटताय...
"चलो चलो ए राही, अपनी मंजील आसान नहीं
रुको नहीं तुम पल भर, अब रुकने का अरमान नहीं."
गणेश सोळुंके, जालना
8390132085
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म आणि मृत्यू
सृष्टीचा नियमच आहे की,पृथ्वीवर जन्म घेतलेल्या सर्व सजीवांचा मृत्यू हा अटळ आहे.वनस्पती,प्राणी व सूक्ष्मजीव हे देखील जन्माला आल्यानंतर कालांतराने त्यांचाही अंत होत असतो.फरक एवढाच आहे की,जन्म होत असतांना देखील आपल्याला माहीत नसते त्याचप्रमाणे मृत्यू झाला हे देखील कळत नसते त्यामुळे जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये केलेले कार्य म्हणजे 'जीवन' असं आपल्याला म्हणता येईल.या सृष्टीमध्ये प्रत्येक सजीवांची आयुर्मान ठरविण्यात आला आहे जर त्या सजीवांचे नैसगिक मृत्यु होत असेल तर पण अचानक आत्महत्या,अपघात होऊन मरणाऱ्याची संख्या कमी नाही.जन्माला आल्यानंतर आपण केव्हा संपणार???याची देखील माहिती नसते.बऱ्याचदा आपल्या आईवडिलांच्या तोंडून शब्द निघतात की,टाटा बिर्ला,अदाणीच्या घरी जन्माला का आला नाहीस..पण या साऱ्या गोष्टी जन्माला कोणाच्या घरी यावे हे आपल्या हातात नसतेच मुळी... आपल्या हातात जन्म झाल्यानंतर कसे वागावे?कसे जीवन जगावे याविषयी असते.यासाठी आपण आपली जीवनवेल फुलवण्यासाठी सत्कर्माची जोड ठेऊन कार्य केले पाहिजे आणि इतरांना करायला प्रोत्साहित करायला हवं.जीवनात कोण किती वर्षे जगतो? हे कोणालाच माहिती नसते त्यामुळे जेवढे वर्ष आपण जिवंत आहोत तेवढे वर्ष हसत-खेळत जीवन जगायला हवं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत की,'शंभर वर्ष शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा' म्हणजेच जीवन जगत असतांना देखील किती वर्ष जगले यापेक्षा कसे जगले??या गोष्टीला खूप महत्व आहे.जीवन हे क्षणभंगुर आहे.मृत्यू हा अटळ आहे त्यामुळेच आपल्या जगण्याची नीती सुसंस्कृत व इतरांना प्रेरणा देणारी असली पाहिजे.भारतीय स्वतंत्र्य लढ्यासाठी झटणारे योद्धे आज जगात नसले तरी त्यांची कीर्ती आजही अजरामर आहे.कारण 'व्यक्ती हे मरत असतात पण व्यक्तीचे विचार हे अजरामर असतात' यासाठी आपण या जगात नसतांना देखील आपल्या कार्याने अमर असतात.हे सांगण्याचा मूळ उद्देश हाच की,जीवन जगतांना माणूस म्हणून जगायला हवे.
जन्म आणि मृत्यू याविषयी चर्चा करीत असतांना समाजात नेहमीच स्वर्ग व नरक यात द्वंद्व निर्माण होत असतो.सत्कर्म केल्यावर स्वर्गात व दुष्कृत्य करण्याऱ्यास नरकात ढकलले जाते या साऱ्या आख्यायिका आहेत.जन्म आणि मृत्यू हे पाप-पुण्याशी जोडले गेले आहेत.यासाठी मनुष्य जीवनात वावरत असतांना स्वतःच्या कर्माशी प्रामाणिक राहून कार्य करायला हवे.काही जण संकुचित विचार करतील की,पाप व पुण्य करणाऱ्या दोघांचाही मृत्यू अटळ आहे. हे जरी खरं असलं तरी स्वतःच्या कर्म व कर्तव्य जाणून जीवनात वागायला हवे.जीवन असतांना शरीर व मन यात वेगवेगळे विचारचक्र सुरू असते आणि त्याप्रमाणे वर्तन करीत असतो पण जेव्हा श्वास बंद होते तेव्हा जीवनचक्र बंद होते.अनमोल असं शरीर त्यावेळी बॉडी ठरत असते तेव्हा आपलं शरीर हे मातीमोल ठरत असते त्यामुळे मेल्यानंतर ही जिवंत राहण्यासाठी मानवी जीवनाचा ढाचा व त्यांचे विचार अभ्यासाकरिता कोणत्याही वैज्ञकीय महाविद्यालयात दिल्यास पुढील पिढी अभ्यास करू शकते असे सत्कार्य करायला हवे.
✒ श्री दुशांत निमकर
चंद्रपूर
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
*जन्म आणि मृत्यू*
जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे असे चक्र आहे की, जे अविरत चालू राहते. ज्या व्यक्तीने जन्म घेतला त्याचा एक दिवस मृत्यू निश्चित आहे. जन्म घेणे व मृत्यू पावणे या दोघांच्या मध्ये जो काळ असतो तोच आपला जीवन असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला विविध कार्य करावे लागतात. या कार्यासंबंधी ऋषी-मुनी आणि विद्वानांनी विविध प्रथा परंपरा तयार केले असून यांचे पालन करणे अनिवार्य मानले गेले आहे. जीवन जगताना तसेच मृत्यूनंतर काही प्रथांचे पालन मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना करणे अनिवार्य मानले गेले आहे . याच प्रथांमध्ये एक प्रथा घरातील सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराण वाचण्याची व ऐकण्याची आहे. गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत . ज्यांच्या घरी एखाद्याची मृत्यू झाली असेल तर त्या घरातील सर्व लोक दुखी असतात तेव्हा त्यांना गरुड पुराणामध्ये लिहिल्याप्रमाणे जन्म-मृत्यूची शास्त्रोक्त माहिती मिळाल्याने त्यांचे दुःख कमी होते व मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो.
मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे.
जन्म हा आपल्याला नऊ महिन्या आधी माहीत असतो पण मृत्यू कुणालाही कुणाची माहित नसते. तेव्हा जन्म आणि मृत्यू यामधील आपल्या जीवनाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करून घेणे योग्य. आपल्या जीवनातील केलेल्या कर्मानुसार आपल्याला मृत्यू येत असतो.
एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नाचे तीन दृष्टिकोनांतून विश्लेषण करता येते. :- वैद्यकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि तिसरे आध्यात्मिक दृष्टिकोनातून.
वैद्यकीय दृष्टिकोन :
शरीरान्तर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू’ अशी ढोबळ व्याख्या करता येते. श्वासोच्छ्वास बंद होणे, नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडणे, दृष्टी स्थिर होणे, शरीरावरील केस ताठ होणे, शरीराचे तापमान घसरणे व शरीर थंड पडायला लागणे, संपूर्ण मेंदूच्या प्रक्रिया थांबणे, शरीर कुजायला सुरुवात होणे आणि बाह्य जगताशी संपर्क कायमचा तुटणे ही मृत्यूची लक्षणे समजली जातात. मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते, आणि दुसर्या व्यक्तीच्या शरीरात ते अवयव बसवता येतात.
धार्मिक दृष्टिकोन:
माणसाचा मृतदेह पुरणे, जाळणे, पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी प्रथा निरनिराळ्या समाजात रूढ आहेत. हा अंत्यविधी करण्यापूर्वी मृत देहावर अखेरचे कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक संस्कार करण्यात येतात. या विधींच्या मागे मृत व्यक्तीला आपल्या सद्भावना, श्रद्धा, आपले सन्मान पोहचावेत अशी इच्छा असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जिवाला किंवा आत्म्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे गृहीत धरलेले असते. मृतात्म्याला सद्गती लाभो, किंवा शांती मिळो, त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होवो अशी इच्छा त्या मृत जिवापर्यंत पोहोचते अशी लोकांमध्ये समजूत असते.
आध्यात्मिक दृष्टिकोन:
ज्यू, पारशी, ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्मातले अनेक पंथ आणि व्यक्ती यांच्या तत्त्वांप्रमाणे माणसाला पुनर्जन्म नसतो. त्यामुळे मृत्यूनंतरची अवस्था म्हणे काहीही नसणे, भूतयोनीत जाणे किंवा स्वर्गप्राप्ती वा नरकवास एवढीच मर्यादित असते. हिंदू, जैन, शीख, बौद्ध आदी भारतीय धर्मांनी मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत वेगळे सांगितले आहे, हा या धर्मांचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाला पंचकोश (म्हणजे पाच आवरणे वा देह) असतात. या आवरणांना कोश म्हणतात. अन्नकोश, प्राणकोश, मनकोश (किंवा कार्मिककोश), विज्ञानकोश आणि आनंदकोश असे हे पाच कोश आहेत. तिबेटी बौद्ध मतानुसार किंवा थिऑसॉफिकल मतानुसार वासनाकोश आणि निर्वाणकोश असे आणखी दोन कोश आहेत.
अन्न्कोश आपण डोळ्याने पाहू शकतो, प्राणकोश, वासनाकोश आणि मनकोश यांची फक्त कल्पना करता येते. सामान्य माणसापाशी विज्ञानकोश, आनंदकोश आणि निर्वाणकोश हे केवळ बीजरूपाने असतात. उच्च बुद्धि्मंत, कलावंत आणि धार्मिक वा आध्यात्मिक उच्च साधक यांच्या बाबतीत या कोशांचा थोडाफार विकास झालेला असतो. या पाच वा सात कोशांव्यतिरिक्त माणसाला एक कारण-देह असतो. मात्र त्याचे अस्तित्व केवळ बिंदुरूप असते.
मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही. सर्व सुखाच्या, दु:खाच्या संवेदना संपून गेल्या असतील. मी म्हणत आज आपण मी माझे असे स्वतःला बजावत असतो पण हा मी च नंतर शिल्लक रहात नाही. सर्व जाणीवा संपून जातात.
कधी कधी फावल्या वेळात मी स्वतःच्या मृत्युनंतर जग कसे असेल याचा विचार करतो. पण स्वतःच्या जाणीवांना वगळून विचार करणे का अवघड जाते हे समजत नाही. स्व ला वगळता जगाची कल्पना करणे अवघड जाते. स्व भोवतीच सर्व जग फिरते. नातलग, मित्र, शत्रु सर्व सर्व स्व भोवतीच गिरक्या मारते. स्व ला बाजुला काढता येतच नाही. काढले तरी तटस्थपणे विचार करताच येत नाही. लप्पकन काळीज हलते आणि घशाला कोरड पडते. पाणी पिण्यासाठी हात हलतो आणि पुन्हा वास्तवाच्या जाणीवेने स्व अस्तित्व आकारात येते. बरे वाटते.
मृत्युची कल्पना करणे फार अवघड आहे. त्यापासुन वाचणे फार अवघड आहे. तरी मन पुन्हा पुन्हा मृत्युचाच विचार करते.
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
मी पाहिलेला मृतदेह
उन्हाळ्याची सुट्टी लागली होती.बाहेर फिरायला जाण्याचा आनंद होता.निसर्ग पाहायला भेटणार.बर्फाळ प्रदेश शिमला कुलू मनाली...मनात नवी स्वप्ने..river rafting, paragliding करणार.adventure अनुभवणार.दादर ते दिल्ली AC प्रवास .आतापर्यंत दिल्ली फक्त नकाशात पहिली होती.आणि tv वर.रेल्वे स्टेशन ला थांबलो.दिल्ली पहिली अंधारात .त्यानंतर पुन्हा कार ने प्रवास..पंजाब ,चंदिगढ ,हरियाणा एक एक राज्य लागत होते.संपूर्ण घाट ..भयाण वळणे...अंधार ...सुसाट वारा.. किरकिरणारा आवाज ,मधेच डोळ्यांवर येणारा प्रकाश, सर्व काही चित्तथरारक 😟...तरी मनात आनंद मी निसर्ग अनुभवणार... पहाटे 4 ला अचानक उचक्या चालु झाल्या. मनात म्हटलं पोहचले की लगेच मम्मी 'पपा ना कॉल करणार. तरी काही उचक्या थांबेना...पहाट झाली होती.सूर्य दिसू लागला होता.आता भूक लागली होती.नाश्ता केला तर घाटात पुन्हा उलट्या होतील म्हणून तसाच निघालो.ह्यांना 9 ला कॉल आला.हे शांत ,काहीच सांगितलं नाही.मग 11 वाजले आता काही भूक कंट्रोल होईना.शेवटी कार थांबवली.आणि आम्ही नाश्त्याला थांबलो. नाश्ता केला आणि मग मला side ला बोलावले.आणि जे सांगितले ते 😭😭😭😭😭😭😭😭😭'papa नाहीयेत.कानावर विश्वास बसेना.तशीच कार मध्ये बसले.खूप प्रवास झाला होता.मुले दमली होती खूप.बाळ सव्वा वर्षाचं... अंगावर पिणार.. त्याला मांडीवर घेऊन शरीर पूर्ण दमला होता.त्यात हा धक्का स्वीकारतच नव्हता.समोर दिसत होता निसर्ग,झाडे,बर्फ,दऱ्या, दमलेली मुले...मुलांसाठी विश्रांती घेणे गरजेचे होते.पुन्हा प्रवास करायचा होता...मनाली ला पोहचलो..रूम भेटेना... घरून पुन्हा एक कॉल आला.कधीपर्यंत याल. लोक जमली इथे ...मग मी हंबरडा फोडला, तात्या नका ना नेऊ, मी येते ना, मला पप्पांना पाहायचं आहे,बघू द्या न एकदा, लोक वाट पाहून कंटाळली आणि निघून गेली.मी आणि माझा आर्मी वाला भाऊ घरी जायचो राहिलो होतो.भावाला flight मिळेना,त्याला अडचणी येऊ लागल्या.आम्ही दोघे एकाच timing ला 10 वाजता दिल्ली ला पोहचलो,मी ट्रेन ने येणार होते कारण बाळाचे birthcertificate नव्हते त्यामुळे flight ने जमणार नव्हते,आणि भाऊ एअरपोर्ट ला वाट पाहत थांबला, मला 'पपा भेटणारच नव्हते....छोट्या भावाला कॉल केला,सोनू तुझ्या पाया पडते मला पप्पांना एकदा बघू दे,नाही भेटणार ते मला, मला पाहायचय ,रडत होते ,ओरडत होते मी,ट्रेन मध्ये लोक पाहत होती.दुपारचे 3.30 वाजले आणि मला विडिओ कॉल आला, मी shock झाले.विडिओ मध्ये माझे पप्पा नव्हते😭😭😭😭 एक काळा पडलेला चेहरा,नाकात कापूस, कपाळावर गुलाल, पांढऱ्या कपड्यात बांधलेले.... हे माझे papa नव्हते....मी आणखी मोठ्याने हंबरडा फोडला...भावाला ओरडू लागले सर्व, मयत न्यायची आणि तू विडिओ कॉल करतोस, किती काळजावर दगड ठेवला माझ्या भावाने, papa नाही भेटणार पाहायला दिदीला... दुसऱ्या भावाला ते पण पाहायला मिळाले नाही...भाऊ पोहचला तोपर्यंत अग्नी देऊन झाला होता, काय नशीब आम्हा भावंडांच. आम्हा दोघांना papa भेटले नाही पुण्यात तिसऱ्या दिवशी पोहचले. स्मशानात गेल्यावर जे दिसले ते पाहून आणखी धक्का...जाडजूड माझा बाप आज राख झाला होता. स्मशानातून हाडे उचलताना इतक्या वेदना झाल्या ना जणू माझा बाप माझ्या हातात आहे आणि तो पण राख झालेला....ज्या बापाच्या हातात हात धरून मोठे झालेआज त्या बापाची हाडे माझ्या हातात होती..
निलम गायकवाड पुणे
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म आणि मृत्यू
जेव्हा माणसाचा जन्म होतो, तेव्हा त्याचा मृत्यू कसा आणि कधी होणार हे ठरलेलं असतं. जन्म आणि मृत्यू मधील अंतर म्हणजे आयुष्य होय. कोणाच्या घरी जन्म घेणार हे पण माहिती नसतं. नियतीने जे लिहिलं असेल ते ते होत राहते. अपघात, वृद्धत्व, रोग, चिंता यामुळे मृत्यू होतो. मृत्यू अटळ आहे. मग आपण मृत्यूला का घाबरतो? आपला जन्म झाला की आपोआपच आपल्यात प्रेम, मोह या भावना निर्माण होतात आणि आपला जीव आपल्या लोकात गुंतत जातो. म्हणून मरणाचे भय वाटते. मृत्यूनंतर माणसाचे शेवटचे दर्शन घेणे आणि संस्कृतीमध्ये लिहिलेले विधी केले की आपली श्रद्धा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली तसेच त्याच्या आत्म्याला शांती लाभली असे मानले जाते. सीमाला उचक्यांचा त्रास सुरू झाला. नैराश्यामुळे कदाचित. एवढा की दिवसाला चारशे ते पाचशे उचक्या देत होती. तिला वाटले आपली अंतिम वेळ आली. डॉक्टरांनी पण बऱ्याच टेस्ट केल्या. पण निदान झाले नाही. पण त्यातून ती वाचली. म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी.' जन्म म्हटले की आनंद, सुख, समाधान. तर मृत्यू म्हटले की दुःख, नैराश्य. उद्या काय होणार काहीच माहित नाही. म्हणून आत्ताच जगून घ्यायचं. ते ही आनंदात आणि दुसऱ्याला न दुखवता. तुम्ही मेल्यानंतरही लोकांनी तुमचे नाव काढावे असे कार्य करावे. जीवनाचे कल्याण करावे. माणसाचा जन्म मिळाला आहे तो सत्कारणी लावावा. जन्ममरणाचा फेरा कुणाला चुकलेला नाही. म्हणून जगूया आजच्यासाठी.
प्रिती दबडे
9326822998
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
!! जन्म आणि मृत्यू !!
येणे-जाणे, सारख रहाटा प्रमाणे फिरणं हे प्रत्येक जीवाला लावलेले काम, याला काम म्हणाव कि शाप म्हणाव काही पण ठरवा पण ते असेच आहे . जन्मणे ठराविक कालावधी नंतर किंवा लगेच सुद्धा कधी कधी मरा व लागत . एकदा जन्म झाला कि त्याला मरावच लागत हा शास्त्र सिद्धांत आहे . आरंभ , प्रारंभ झाला कि त्याचा समारोप असतोच , शेवट हा त्याचा होतोच .
माऊली सांगतात उपजे तो नासे ! नासे तो पूनरपि दिसे ! घटिका यंञ जैसे परिभ्रमेगा !! म्हणजे जन्म ले ते मरते ते पुन्हा जन्म घेतं . म्हणजे ऋतू चक्रासारखं तो जीव फिरत रहातो माऊलींनी त्याला घड्याळाची उपमा दिली . घड्याळात जसे रोज- रोज 1 --12, 12--1 वाजतात तसे . जीव नुसता या शरीरातून निघायचे आणि दुसर्या शरिरात वास करायचा हेच काम त्याचे कारण प्रत्येक प्राणीमाञाचा आत्मा अविनाशी आहे . आत्म्याला मरण नाही , मरण फक्त शरीर टाकून देणं होय म्हणून आत्म चिदरूप आहे अविनाशी आहे तो ज्या शरिरात प्रवेश करतो ते जन्मणे आणि ज्या शरिराचा संग करून काही कालखंड व्यतीत करून पुन्हा शरीर टाकून देणं म्हणजे मृत्यू होय .
जन्मणे- मरणे , जन्मणे- मरणे या ला विदनान काहीही म्हणो इतर कोणत्याही धर्मात काहीही म्हणो पण वारकरी संत या फिरण्याला फजिती म्हणातात .संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात " किती वेळा जन्मा यावे! किती व्हावे फजित ! म्हणोनिया जीव भ्याला ! शरण गेला विठूशी.!! किती वेळा सारख फिराव देवा मला मुक्त कर
जन्म घेणं तसं कोणा हाती नाही . अमूक प्राण्याचा जन्म पाहिजे , अमुक देशात जन्म पाहिजे , अमूकच कुलात जन्म पाहिजे असे पर्याय येथे नाहीत . इतर प्राण्याचा जन्म घेऊन तुम्हाला कर्तृत्वाचा ठसा उमठवताच येईल असे माञ निश्चित नाही. म्हणून मानवेत्तर जन्म घेऊन किर्ती रूपी तुम्हाला उरता येणार नाही .
पण मानवी देह धारण करून बर्याच गोष्टी तुम्ही करू शकता किर्तीरूपी उरण येथे शक्य आहे म्हणून मृत्यू चांगला येईल शेवट चांगला होईल असे.मानतात .
जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे थोडा तरी परोपकार ! बाबारे सदगृहस्था मानवी देह मिळणं कठीण आहे आणि या बहुमोल अशा मिळालेल्या नर देहाच सोनं करायचे असेल तर दुसर्याला मदत कर , दुसर्याच्या कामी थोडं तरी ये ! जीवन सार्थ होईल .
मृत्यू एक मृत्यूलोकातील देणगी आहे . मृत्यू आहे म्हणून जगण्याला किमंत आहे . मृत्यू आहे म्हणून एकमेकांना एकमेकांचा आदर आहे . जर मृत्यू नसता तर जगण्याला आकर्षणच राहीले नसते .
जन्म आणि मृत्यू यांचा तुलनात्मक विचार केला तर मृत्यूला कमी लेखून चालणार नाही .
अंधार आहे म्हणून प्रकाशाला महत्व आहे , पाप आहे म्हणून पुण्यं लोक करण्याचा प्रयत्न करतात .
उन्हाळा नसता ना पावसाळ्याला कोणीच विचारले नसते . राञ नसती तर सूर्य महत्त्वाचा वाटला नसता म्हणून मृत्यू हा अटल असणारा पाहुणा आहे .
जगात शाश्वत जे सत्य आहे त्याचा उदो उदोउदो केला जात नाही. तर जे खोटं आहे लटके आहे त्याचा उदोउदोउदो केला जातो . आपल्याला मरायचं आहे आणि ते नीट मरायचं आहे असं फक्त थोर पुरुष , महात्म्येच ठरवू शकतात इतराचे ते काम नाही
"शूर ओळखावा रणी!! साधू ओळखावा मरणी !! कारण त्यांनी कालावर विजय मिळाविलेला असतो इच्छामरण हा भाग त्यामधीलच आहे मृत्यूला ते सामोरे जातात.संजीवन समाधी इच्छित मरणच म्हणावे लागेल . असो या जन्म मरण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत दोन्हीही महत्त्वाच्या आहेत दोन्ही शिवाय एकिला नगण्य महत्व !
भागवत लक्ष्मण गर्कळ बीड
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म आणि मृत्यू
जन्म आणि मृत्यू सजीवाच्या आयुष्यातील जीवनचक्र आहे. ते अखंड चालूच असते. जन्माला आलेला जीव एक ना एक दिवस मरणारच हे अटळ सत्य आहे. मनुष्य रिक्त हस्ते जन्मास येतो नि रिक्त हस्तेच मरतो. जीवनातील सर्व सुखलोलुपता जिवंत असेपर्यंतच असते. माझे माझे असे वाटणारे सर्व काही इथेच ठेवून परतायचे असते. पण जीवनातील आसक्ती मनुष्यातील प्रेम, माया, मोह, मत्सर, अहंकार या गुणांना जन्माला घालत असते. मनुष्याने जन्म कधी नि कुठे घ्यायचा जसे त्याच्या हातात नसते तसे मरणही नसते.
सर्व विधात्याची कृपा! तो जन्माला घालतो, मारतो, कर्ता करविताही तोच. त्यामुळे आपण जीवनाची आसक्ती न बाळगता जेवढे आपले आयुष्य असेल ते मजेत, आनंदात जगून घालवावे. माझे म्हणून त्याचा मोह करतो, साठवून ठेवतो. ते माझे नसतेच असे गृहीत धरून राहिले तर जीवनाचा मनमुराद आनंद लुटता येतो.नाहीतर जिवंत मरण भोगल्याप्रमाणे
आहे.जन्माला गरीबाच्या घरात यायचे की श्रीमंतांच्या हे जसे आपल्या हातात नसते तशाच प्रकारे मरण कसे,कुठे येईल हे ही आपणास माहीत नसते. लोकसंख्यावाढ नि आधुनिकतेच्या नावाखाली बऱ्याच रोगांनी शरीरात घर केलेले दिसते. त्यामुळे मरणालाही आपणच ओढवून घेतो हेही तितकेच खरे.
आजचा दिवस आपलाच आहे तर तो चांगला म्हणून जगले तर जीवन सुसह्य होईल, नाहीतर रोगग्रस्त, चिंतेने ग्रासलेले जीवन काहीच कामाचे नसते. म्हणून जीवन ऋषी मुनीप्रमाणे जगावे. जसे ते कंदमुळे खाऊन एक वस्त्रावर जीवन कंठत परमेश्वराचे चिंतन करत होते. ना पैशाची चिंता, ना बचत खर्चाची काळजी. तसेच जीवन मनुष्याला सुखकारक ठरते. हल्ली पैशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तरीही सुखकर जीवन जगणे आपल्या हातात असते. त्यामुळेच जीवन आनंदी होईल.
सौ. भारती सावंत
मुंबई
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म आणि मृत्यू
निसर्गाचा नियम आहे ज्या गोष्टीची निर्मिती होते त्याचा अंत होतो ;म्हणजेच प्राणी' पशु 'पक्षी वनस्पती यांचे जन्म होतात तसेच त्यांचे मृत्यू देखील होतात.
"मनुष्याचा जन्म ही त्याला निसर्गाने दिलेली एक सुंदर देणगी आहे". मनुष्याचा जन्म हा निसर्गाने ठरवून दिलेल्या वेळेत व निसर्गाच्या इच्छेनुसार होतो याचे उदाहरण द्यायचे झाले तर असे देता येईल एखाद्या श्रीमंत घरातील जोडप्याला कधीकधी मूल होत नाही त्यासाठी ते दवाखाने ,आयुर्वेदिक उपचार अशा कितीतरी पद्धती वापरून बघतात उपचार करून देखील त्यांना मूल होतेच असे नाही ,तेच एखाद्या गरीब घरी किंवा आदिवासी भागांमध्ये अनेक मुलं जन्माला येताना दिसतात ;म्हणजे एकीकडे मुलासाठी हव्यास असतानाही तिथे मुलाचा जन्म होतो असे नाही; आणि एकीकडे एवढ्या मुलांची गरज नसताना देखील सहज मुलांचा जन्म होतो आहे की नाही निसर्गाचा चमत्कार!
याठिकाणी मुलांचे पालन-पोषण करण्यासाठी खूप पैसा 'आर्थिक सुबत्ता आहे अशा ठिकाणी मुलाचा जन्म होतोच असे नाही परंतु जिथे रोजचे खायची पंचायत आहे अशा ठिकाणी मात्र मुले दोन पेक्षा अधिक जन्माला येतात. जन्म श्रीमंताच्या घरात व्हायचा हि गरिबाच्या हे आपण ठरवू शकत नाही परंतु ;जन्माला आल्यानंतर मात्र कष्टाने प्रामाणिकपणाने जिद्दीने आपले आयुष्य जगायचे हे मात्र आपण ठरवू शकतो. जन्माला आल्यावर किती काळ जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचे. कोणाचा मृत्यू कसा होणार? केव्हा होणार? हे आपण ठरवू शकत नाही आणि सांगू शकत नाही परंतु आयुष्य कसे जगायचे हे मात्र आपण ठरवू शकतो मिळालेले आयुष्य ,आलेली संकटे न कुरकुरता स्वीकारत त्यांचा सामना करत गेलो तर आयुष्य जगणे सुसह्य होते. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू कधी ना कधी होणार असतो परंतु आयुष्य संपणार आहे या भीतीने आपण आज जगण्याची जिद्द व आशा सोडून दिली तर आयुष्य काय कामाचे! प्रत्येकाला मृत्यूचे भय वाटते आपल्याला मृत्यू येऊ नये आपल्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून संपत्ती ,सत्ता, आरोग्य हे मलाच मिळावे असा हव्यास आजकाल प्रत्येकाला दिसतो आहे परंतु ;हा हव्यास करताना तो हे विसरतो मृत्यूनंतर ही सत्ता, संपत्ती कोणाच्या कामी येणार आहे? एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याने कमावलेली संपत्ती जसे घर ,पैसा, दागिने ,वाहने आपण त्याच्याबरोबर पण अंत्य संस्कारात जाळतो का ? किंवा जमिनीत दफन करतो का?नाही ना ? मृत्यू होणार आहे म्हणून कुणी जगायचे सोडतो का किंवा मृत्यू होणार आहे म्हणून संपत्ती जमवायची नाही असे कुणी ठरवतो का? मृत्यू म्हणजे फक्त शरीर जाळले जाते परंतु आपण केलेले कार्य ,कमावलेली संपत्ती मात्र जशीच्यातशी शिल्लक राहते. आपण केलेले चांगले कार्य आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतरही आपले अस्तित्व जगाला दाखवून देते चांगले कार्य केले असेल तर ती व्यक्ती अमर झाली असे म्हणतात. मृत्यू तर सर्वांनाच येतो परंतु एखाद्या आजाराने मृत्यू होणे आणि देशासाठी लढता लढता मृत्यू येणे यातील फरक आपल्याला कळला तर जन्माचे सार्थक झाले असे म्हणता येईल. अपघात आजार यामुळे मृत्यू झाला तर स्वर्गवासी झाला असे म्हणतात ;परंतु देशासाठी लढता लढता मृत्यू झाला तर तो अमर झाला असे शब्द आपणास ऐकावयास मिळतात ;म्हणजेच मृत्यूनंतरही अमर रहायचे असेल तर सत्कार्य होणे गरजेचे आहे. अमरत्व नको असे म्हणणारा कोणीही सापडणार नाही मग अमर कसे होणार? आपली संपत्ती किंवा आपले कार्य एखाद्याच्या कामी आले त्याच्या अडचणीत त्याला मदत झाली तर आपल्या जगण्याचा फायदा इतर कोणाला झाला तर आपण अमर झालो असे नक्कीच समजावे. मृत्यूनंतरही अमर होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे मृत्यूनंतर देहदान करणे होय आपल्या शरीरातील हृदय ,किडनी ,डोळे यासारखे अवयव आपण दान करू शकतो गरजवंताला हे मिळाल्यास आपण मृत्यूनंतरही त्या गरजवंताच्या रुपात अमर होऊ शकतो . जगाव तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे स्वाभिमान ,स्वराज्यहित ,प्रजेचे कल्याण यासाठी शिवाजीमहाराज आयुष्यभर झटले क्षणाचीही उसंत घेतली नाही म्हणून म्हणतात जगावे तर शिवाजी महाराजां सारखं आणि मरावे तर छत्रपती संभाजी महाराजांसारखे. साक्षात मृत्यू समोर असताना स्वराज्य, स्वधर्म,
प्रजेचे कल्याण यासाठी प्राणांची
पर्वा न करता हसत हसत मृत्यूला आलिंगन दिले. संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण संपूर्ण जगासाठी किती बोलके आहे वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून जगाला मोठा ज्ञानाचा ठेवा देऊन त्यांनी समाधी अवस्था स्वीकारली ; म्हणजेच आयुष्य किती जगावे यापेक्षा कसे जगावे हे ज्ञानेश्वर माऊली कडून शिकावे. जन्माला आलो म्हणजे मृत्यू होणार ,कधी होणार हे माहीत नाही परंतु; मृत्यु येईपर्यँत हसत हसत जीवनाची आव्हाने पेलावी त्याग, समर्पण, सेवा या वृत्तीने जगाची सेवा करावी आपली ध्येये प्राप्त करण्यासाठी कठीण परिश्रम करावे .एक आदर्श जगासमोर ठेवावा आणि मृत्यूनंतरही आपल्या विचारांच्या रुपात अमर व्हावं.
सविता साळुंके, श्रीरामपूर
salunkesavita42@gmail. com
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म आणि मृत्यू
जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती कधीही अजरामर नसते. मृत्यू अटळ आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू ची साखळी अखंड चालत असते. मानव जन्म मिळणे म्हणजे भाग्य होय. पृथ्वीवर मानव हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याच्या कडे बुद्धी आहे. बुद्धीचा वापर करून तो या जगावर राज्य करत आहे.
जन्म म्हणजे आपण या भुतलावर शरीर रूपाने येत असतो. जन्म झाला की घरातील व्यक्ति आनंद व्यक्त करतात. सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला आनंदोत्सव साजरा केला जातो.काही समाजामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला रडण्याचा कार्यक्रम सुद्धा होतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर हळूहळू मोठा होतो, आईवडिलांचा हात सोडून समाजामध्ये वावरायला सुरू करतो. शिक्षण घेऊन नोकरी करतो. व पैसा मिळवून स्वतःला सिद्ध करतो. ज्याच्या-त्याच्या कर्तृत्वा प्रमाणे समाजामध्ये व्यक्तीला महत्त्व, श्रेष्ठत्व प्राप्त होत असते. श्रीमंताच्या घरी जन्माला आलेली व्यक्ती व गरिबांच्या घरात जन्माला आलेली व्यक्ती या दोघांच्या जीवनामध्ये भरपूर फरक असतो.जन्माने श्रीमंत व्यक्ती यशस्वी होतेच असे नाही किंवा गरीब घराण्यात जन्माला आलेली व्यक्ती ही आयुष्यभर गरिबीत खितपत पडते असेही नाही. कारण पैशाबरोबर काम करण्याची वृत्ती, सहनशीलता, श्रमाला महत्व देण्याची मानसिकता हे ही महत्त्वाचे आहे. अशा अनेक व्यक्ती आहेत की त्या जन्मल्या जरूर पण आयुष्यभर कोणतेच भरीव कार्य न करता निष्क्रिय पणे जीवन जगून स्वतःचे स्थान निर्माण न करताच मृत्यूने त्यांना कवटाळलेले असते.
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू यायच्या आधी व मृत्युनंतरही आपले नांव निघावे असे वाटत असेल तर त्या पद्धतीचे काम आपण जिवंत असताना केले पाहिजे. ज्या पद्धतीने जन्माला येणे आपल्या हातात नाही तसे मृत्यूला नाकारणे हे ही आपल्या हातात नाही. जन्ममृत्यूच्या फेर्यात अडकलेला हा मानव सतत पैशाच्या, सुखाच्या मागे लागलेला असतो. बराच वेळा पैसा मिळवत असताना तो अनेक मानसांना जोडतो तर काही माणसे तोडतोही. पैशाबरोबर माणसांचा संग्रह करणारी माणसे सतत लोकांच्या लक्षामध्ये राहतात. त्याचबरोबर मरणोत्तर देहदान करणाऱ्या,अवयव दान करणाऱ्या व्यक्ती मृत्युनंतरही या जगामध्ये विविध रूपाने जिवंत असतात." मरावे परी कीर्तिरूपे उरावे." या उक्तीप्रमाणे मानव आपल्या कर्तव्याने ,कर्तृत्वाने समाजामध्ये अमर राहतो. ज्या व्यक्ती मरणोत्तरही प्रशंसनीय असतात, या व्यक्तींचे जीवन हे सतत प्रेरणादायी असते. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आपण कोणतेही चांगले कार्य करू शकतो. मरणानंतर कुणीही काहीही करू शकत नाही कारण हे शरीर आपल्याजवळ नसते ते केव्हाच नष्ट झालेली असते. मृत्यूनंतर या देहाची विल्हेवाट प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार करत असतात. कोण दहन करतात, तर कुणी दफन करतात. शरीर हे नश्वर आहे. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते. जन्मावेळी मिळालेले सुंदर, गुटगुटीत शरीर मरताना कृश,जरारर्जर झालेले असते. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या शरीराची चिरफाड केली जाते. दुर्धर आजाराला सामोरे जाणाऱ्या व्यक्ती सतत मृत्यूची आळवणी करत असतात. जीवाला इतके वैतागलेले असतात की त्यांना त्यांच्या आजारापासून मिळणारा क्लेश, वेदना असहनीय असतात. जर आपल्याला मृत्यू चांगला , वेदनारहित यायचा असेल तर जीवनामध्ये आहार, व्यायाम यांची साथ कायम धरली पाहिजे. काही ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती इतक्या निडर असतात की त्यांना मरणाची अजिबात भीती वाटत नाही. जसे की स्वातंत्र्यवीर,स्वातंत्र्यसैनिक, आपल्या देशाचे जवान ते आपल्या देशासाठी नेहमी मरणाला कवटाळायला तयार असतात. देशासाठी लढता लढता त्यांचा मृत्यू होतो. त्यांना आदयानज "शहीद" झाले असे म्हणतात. देशासाठी लढता लढता शहीद झालेल्या लोकांना त्यांच्या मृत्यूनंतर मानवंदना दिली जाते. त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला जातो.
जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढे आपण सेवा केली पाहिजे. मरणानंतर मी अशा प्रकारे सेवा केली असती मी असं केलं असतं मी तसं केलं असतं या म्हणण्याला काडीचाही अर्थ उरत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत चांगल्या पद्धतीने वागून सर्वांशी प्रेमाने व्यवहार करत राहिलो तर मरणानंतरही आपण जिवंतच राहणार आहोत. तेव्हा विचार करा मरणानंतरही जिवंत राहायचे आहे की जिवंत असतानाच मेल्यासारखे जगायचे आहे...
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म - मृत्यू
जन्मा नंतर मृत्यु
मृत्यू नंतर जन्म
अव्याहत चालतो
जीवन मरणाचा फेरा.
मृत्यू म्हणजे काय? मृत्यु का आहे?त्याचे प्रयोजन काय? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात येतात आणि अनुत्तरीत राहतात.
कल्पना करून बघा,मृत्यूचे अस्तित्व संपून जाईल तर काय होईल? आपण असेच जगत राहू.
मरणाची भिती नसल्याने गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढतील, कारण कुणालाही मृत्यूदंड होणार नाही.
ह्याहून जास्त भीषण परीस्थिती म्हणजे वय वाढत जाईल, वयानुसार होणारे आजार
अशक्तपणा , त्यानुसंगाने येणारे शारीरिक अपंगत्व हे वाढेल. एक वेळ अशी येईल कि सगळेच आजारी, लकवा ,ह्रदयरोग ,केंसरच्या असहनीय वेदना भोगत मानव जात अतिशय दुःख कष्ट भोगत मृत्यूचा धावा करत जगतील.
आज जे मृत्यू श्राप वाटते त्याच मृत्यूच्या वरदान मिळावे म्हणून लोकं जंग जंग पछाडतील.
*मृत्यू हे श्राप नाहीच किंबहुना ईश्वराचे वरदान च आहे*
प्रत्येक जन्मात कळत नकळत
मानवाची प्रगती होत असते. गुहेत राहणाऱ्या त्या आदिमानवाची आजवर झालेल्या प्रगती कडे एक नजर तर टाका,आश्चर्य चकित व्हाल. ही उत्तरोत्तर प्रगती मानवाने स्वबळावर साधली आहे .अजूनही साधत च जाणार आहे
मित्रांनो मृत्यू कितीही कष्टदायक असला तरी कितीतरी संभाव्य कष्टातून आपली सुटका करणारे दैवी अस्त्र आहे.
आत्म्याच्या उत्क्रांती करीता देवाने रचलेला एक सोनेरी पाश आहे. ही जाणीव ठेवून जगलो तर जीवन तर सार्थकी लागेलच पण मृत्यू सुद्धा अमरत्वाचे महाद्वार वाटेल. कारण परत नव्या शरीरात नव्या प्रदेशात नवजीवनाची मुहूर्तमेढ रोवली जाईलच
डाॅ.वर्षा सगदेव
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
*शिक्याचे दोन बाजू जन्म- मृत्यू*
*सौ.यशोधरा सोनेवाने*
मानवाला सत्कार्य करण्यासाठी या भुमीवर जन्म मिळालेला आहे .या जन्माचे सार्थक करण्यासाठी जीवनावर शतदा प्रेम करावे .जो पर्यत आपण आपल्यावर जीवनावर प्रेम करणार नाही तो पर्यत ईतरांवर आपण प्रेम करूच शकत नाही.
*आज मदर्स डे* यानिमित्ताने सकाळी सकाळी सामाजिक संस्थेशी जुळलेल्या ताईंचा फोन आला.
बाई गंगाबाई रुग्णालयामध्ये जाऊन बिस्किट वितरण करण्याचे ठरविले. दोन तीन मैत्रिणी मिळून बिस्कीट आणि फराळ खरेदी केले. गरोदर मातांना मदर्स डे च्या निमित्ताने फराळ व बिस्किट वितरण केले. दवाखान्यातून बाहेर पडतांना गरीब गरोदर महिला समोर बसून होत्या त्याच्यातच एक दीनवाण्या चेहर्याची , .परिस्थिती तिची खुपच हलाखिची दिसत होती. ती दवाखान्यातच पण बाहेर बसली होती.आम्ही तिची माहिती घेतली. पाच -सहा दिवसापासून ती भर्ती होती .
विचारपूस केल्यावर कळले पाच दिवसापासून तिची डिलिव्हरी झालेली नाही. कारण काय तर आँपरेशनसाठी रक्तहवे होते .ते मिळत नव्हते. रक्ताची आवश्यकता होती . सर्वानीच विचारणा केली. आपआपल्या परीने रक्त मिळविण्यासाठी विचारणा केली . रक्त मिळेल का?
फोन लावून बघितला. रक्ताची व्यवस्था ,पर्याय शोधू लागले .दीन असलेली गरोदर महिला केविलवाण्या चेहऱ्याने आस लावून बसली होती. मी विचारले केली?कोणता ब्लड ग्रुप हवा आहे,? बी पॉझिटिव्ह ब्लड ची आवश्यकता होती . योगायोगाने माझा ब्लडग्रुप B+असल्यामुळे रक्तदान करण्यासाठी मी तयार झाले. मनात विचार येत होता ,जन्म देण्यासाठी आई तातकळत बसलेली होती.जीवनमरणाच्या वाटेत बसून आस लावून बसली होती. एकीकडे बाळ जन्माला येण्यासाठी आणि दुसरीकडे मरणप्राय यातणा भोगून नवीन जीव या जगात येण्याची वाट बघणारी माता .सर्वत्र शुकशुकाट .मी मनाचा निरधार पक्का केला .आणि आज रक्तदानाची *सिल्व्हर ज्युबली ओलांडत , ब्लड डोनेट* करण्याचे मन बनविले. .डाँक्टर वारंवार विचारणा करीत होते बरं वाटते ना.मला मात्र त्या गरोदर मातेचा चेहरा समोर दिसत होता.जी नवीन जीवाला हे सुंदर जग बघण्यासाठी या जगात आनण्यास आतूरतेने वाट पाहत होती .शेवटी आज मातृदिनी सव्वीस वा रक्तदान करून त्या मातेला चातकासारखी वाट बघण्यातून मोकळे केले.
"जगावे परी किर्ती रूपी उरावे." मागता जे नाव मिळे ,टाळल्याने नटळे,
जीवमात्रा सोडिना हे , जन्म-मृत्यूचे जाळे.जन्म असतो अंध अगदी मृत्यू लाआहेत डोळे,डोळसाचा हात धरूनी
वाट चाले आंधळे जन्मलेल्या जीवास वाटे त्यास दिसे ते खरे आंधळ्याची स्वप्न माळा सत्य त्यात साजिरे , भास स्वप्नातील काही सुखविती त्यांचा मनात त्याच मनातील भीती त्याच्या मला त्याच मनातील दुःख त्यात जीवनातील मना .प्रेम,नाती ,लाभ हानी कीर्ती सुद्धा कल्पना . दैव व देव याही सत्य ना संकल्पना .ह्याना
सोडवितांना हात मृत्यू सहजतेने गृप्त होई.जीवनाचे शुन्य अंती, होऊनी शुन्यात राही.
जीवनातील एक सत्य कधी हलक्या पावलांनी दबकत येतहलकेच झडप घालणार तर, सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखे ते उडवून लावणार .कधी तो यावा असा वाटते ,तर कधी त्याने होऊ नये असे वाटते ,पण तो येणार! नक्की येणार! हे प्रत्येकाला ठाऊक असते . मृत्यू फक्त कधी येणार म्हटले की अनेक कल्पना मनात अगदी सोसाट्याचा वारा जसा यावा तसे विचार मनात येतात. जगाचा अंतीम सत्य "मृत्यू" नक्की तो असतो . मेल्यावरही जग चालूच राहणार असते .अगदी मानववंश संपले तरीही प्राण्यांचा अंत झाला तरीही , जीवन चालूच राहील .त्या दृष्टीने जीवन संपले असेल अशी जाणीव सुद्धा होणार नाही. सर्व सुखाच्या दुःखाच्या त्यातील " मी- मी" म्हणत आज आपण मी माझे त्याला बजावत असतो. पण हा "मी" तर शिल्लक राहत नाही. सर्व जाणीवा शिल्लक राहतात . मग नंतर जग चालू राहिली काय किंवा न राहिले काय ?
मग अशी जाणीव झोपेत सुद्धा होते . झोप हे सुद्धा सर्व जाणिवांना विलीन करून टाकते . पण झोपेतून परत जागे होतो. तेव्हा माझे " मी"ही जाणीव पूर्वक डोके वर काढते .सुखदुःख, विलीनीकरण, आंनदमयी अवस्था असते. ती संपून जाते . मृत्यु ही झोपेची एक अवस्था म्हणावी का?आनंदमयी अवस्था म्हणावी ? सांगता येत नाही .झोपेपलीकडची अवस्था? जिथे झोप आहे, मग झोप हवी वाटणारा जीव मृत्यूच्या जाणिवेने का घाबरतो.
"मृत्यु हे जगण्याचे प्रमाणपत्र आहे." जीवन कसे जगला आहात हे जर समजायचे असेल तर मृत्युवरून समजते की माणसाने कसे आयुष्य जगले असेल. जगात मृत्यु नसेल तर काय झाले असते? ही वृद्धावस्त, होणारा त्रास किती वेळा पर्यंत सहण करत बसले असते. मृत्यू हा शाप नाही तर वरदान आहे. जर मृत्यु आयुष्यात नसेल तर हे आयुष्य निरर्थक आहे. मृत्यु अटळ आहे, जो या जगात आला आहे तो एक ना एक दिवस जाणार आहे.
चांगले जीवन जगत असतांना सत्कार्य करा.समजा तुम्ही अमर झालात तर कसे जगणार, मृत्युची वाट तर पाहालच ना. मृत्यु या पृथ्वी तलावावर नसता तर किती दिवस वृद्धपकाळ, आजार घेऊन फिरला असतात. हा वृद्धपकाळ हा तुम्हाला ओझं बनला असता. जर मृत्यु नसता तर दुःखापासून तुमची मुक्ती पण झाली नसती. मृत्यु वाईट गोष्ट नाही तर चांगली गोष्ट आहे. ज्या प्रकारे मोबाईलची बॉडी खराब झाली तर आपण मोबाईल फेकून न देता त्याची नवीन बॉडी टाकून घेतो. त्याप्रमाणे मृत्यु देखील हेच काम करत असतो. जून्या बॉडीला सोडून नव्या बॉडीला अंगी कारत असतो. त्यामुळे मृत्यु ही चांगली गोष्ट आहे. जीवनात पद मिळो ना मिळो, धन मिळो ना मिळो, मोठे बनून मोठे व्यक्ती बनो ना बनो, जगात काही मिळो ना मिळो पण मात्र मृत्यु जरून मिळणार आहे.
जन्म-मृत्यू प्रपंचात न पडता जे जीवन आम्हास लाभले आहे,त्यास सत्कर्मी लावू या.
लेखिका
*सौ .यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म आणि मृत्यू
" या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे"
जीवनामध्ये जन्म व मृत्यूचे जीवनचक्र सदा चालू राहते,असे जर नसेल तर सृष्टीचा बॅलन्स कसा राखला जाईल, आपण जन्म घेऊन पृथ्वीवर आलोत,पण या विश्वाची जन्मबद्दलची वेगळीच कहाणी आहे,या भूतलावर एक स्त्री व एकच पुरुष या दोघांचे अस्तित्व होते,त्यांच्यामुळे मानवजातीचा उदय झाला.
जन्मदर जितका जवळपास तितकाच मृत्युदर आढळतो,म्हणजेच जन्माला येणारी बालके,आणि वृद्धत्व,आजार,अपघात या ना त्या कारणांनी मृत्यू पावणारे यांचे प्रमाण तितकेच असते,म्हणजेच समतोल साधण्यासाठी पृथ्वीवर सजीवांची "उत्पत्ती व नाश" हे जीवनचक्र चालू असते.
सध्या चालू असलेल्या आजाराचे कारण म्हणजेच प्रदूषणे,शहरीकरण,लोकसंख्या वाढ या सर्वांचा जगभर झालेला हव्यास आणि म्हणून याचे भाकीत आपल्याला काही पुस्तकातून ऐकावयास मिळते,जागतिक पातळी पहाता दरवर्षी किती तरी लाखो लोक मरण पावतात परंतु त्याचा नक्की आकडा आपल्याला माहीत नसतोच, परंतु भयानक रोग संक्रमणाचा आकडा आपल्याला समजत आहे.
म्हणजेचं किती तरी असाध्य रोग पूर्वी म्हणजेच काही वर्षांपूर्वी होते,आणि त्याचे निदान होऊन लसी निर्माण झाल्या, काहिचा मृत्यूही झाला,स्वतः आनंदीबाई
जोशी डॉक्टर होत्या परंतु त्यांना सुद्धा असाध्य रोगाने मृत्यू आला.
जन्माचे स्वागत आपण आनंदाने करतो, पण मृत्यूच्या वेळेस दुःख,भयावह वातावरण असते,काही साधू,संत यांनी स्वतः मृत्यूला कवटाळले याची भारतीय इतिहासात नोंद आहे,हसत हसत मृत्यूला कवटाळणे, ही भावनांचं विचार करण्यासारखी आहे,म्हणूनच त्यांना संत,महात्मे म्हटले जाते.
सुजाता जाधव
नवी मुंबई
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
" जन्म - मृत्यू "
ह्या जीवसृष्टीत कोणताही जीव शाश्वत नाही . जो जन्म घेतो तो एखाद्या दिवशी तरी मृत्यू पावतोच . जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्या अस्तित्वाचा मोह असतो . तो आपले अस्तित्व दिर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी अविरत झटत असतो . मग तो जीव मानव, प्राणी , पक्षी , किटक , जिवाणू , विषाणू ( कोरोना ) , वृक्ष - वेली कोणीही असोत . सर्वांना आपला जीव हा प्राणप्रियच असतो ना.....
मानव हा साधारणतः आईच्या उदरात नऊ महिने नऊ दिवस राहून जन्म घेतो . बाळाचा जन्म म्हणजे त्या माऊलीसाठी एक पूर्नजन्मच असतो .... कारण बाळाला आई आपल्या स्वतःच्या हाडामासांतून व रक्तातून आपल्या गर्भाशयात वाढवीत असते . बाळाची नाळ ही तिच्या नाभीनाळेशी जुळलेली असते . तो तिचा श्वास असतो .... तो तिचा प्राण असतो .... अशा प्राणप्रिय बाळाला जन्म देतांना येणाऱ्या अकल्पित भयावह प्रसवपीडा ती धैर्याने सहन करते ... आणि या हाडामासांच्या पोटच्या गोळ्याला धक्का न लागू देता फुलासम जन्माला आणते . अशावेळी अनेक मातांची ह्या प्रसववेदनेत प्राणज्योतही मावळते ....
मानवी मूल जन्माला आल्यावर मात्र एका वर्षापासून चालणे शिकते . पण गाय , शेळी आदी प्राण्यांची अपत्य मात्र जन्मल्या नंतर लगेचच धावायला लागतात . पक्षीवर्गातील पिले अंड्यातून बाहेर निघून काही अवधीत उड्डाण भरतात . फुलपाखरासारखे जीव मात्र अंड्यातून स्वतः निघून स्वतःच कुणाच्याही मदतीविना आपल्या अस्तित्वासाठी झटतात ....
भलेही प्रत्येक प्राण्यांचा जीवीत कालावधी हा निश्चित असला तरीही तो त्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो ... आपण पाहतो की निरोगी आरोग्य ही दिर्घायुषी बनवीते . आपला मृत्यू हा अटळ असतो म्हणून आपण काय जगणे सोडून द्यावे का ? नाही ना ! फुलांचे आयुष्य एक - दोन दिवसांचे असते पण ते किती आनंदाने हासत - हासत फुलते . त्याला पाहून आपल्याही आनंद होतोच ना ! मग या मृत्यूची भिती दूर करण्याचा एकमेव महामंत्र म्हणजे , " आनंदानं जगायचं " हाच होय ....
जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला हासत - हासत आनंदानं सामोरे गेल्यास जीवन सार्थकी होते ... मानवाने मृत्यूची भिती ठेवून कुढत - रडत कधीच जगू नये ... कारण पाळण्यातील बाळाचेही मृत्यू पावलेल्या आईवाचून अडत नाही ... ते बाळ परिस्थितीशी सामना करून आपले जीवन जगतेच ना ... म्हणून या पृथ्वीवर कुणीही अजरामर नाही ... सर्वांना मग तो जगजेत्ता सिंकदर असो की एखादा पामर...... साधूसंत असो की महाथोर व्यक्ती सर्व आपण या पृथ्वीवर प्रवासी आहोत ... म्हणून मानवप्राण्याने केवळ पैसा , श्रीमंती , गाडी - बंगला , दाग - दागिने , मानपान , प्रतिष्ठा ह्या सर्व गोष्टींचा व्यर्थ अभिमान बाळगू नये .....
" चार दिसाची जिंदगी " ही आपण आनंदानं , स्वच्छंदीपणे , परस्परांशी प्रेमानं , एकोप्यानं , सहकार्यानं , शांततेनं , सदाचारानं जगूया ... फुल होऊन इतरांच्या जीवनात आनंदाचा सुगंध देऊया... मोर होऊन रंगीत पिसार्याच्या रंगात सर्वांना न्हाऊ घालूया .... चला मग आजपासून आत्ताच आपले पाऊल या नश्वर जीवनात आनंदाच्या मार्गाने नेऊन जीवन सार्थकी व यथार्थ बनवूया ....
अर्चना दिगांबर गरूड
मु . पो . ता . किनवट , जि. नांदेड
मो . क्र . 9552954415
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म मृत्यूच्या चक्रातून कोरोना वाचवेल का?
कोरोना दहशत रान माजवल्यासारखी भावना.सगळे घाबरलेले.कोणी कोरोना गो म्हणतात.पण कोरोना जा म्हटल्यास जावू शकते का?तर याचं उत्तर नाही असंच आहे.कोरोना कधी जा म्हटल्याने जाणार नाही.ये म्हटल्यानं येणार नाही.
कोरोनावर लसी काढणं हमखास सुरु आहे.इटलीनं दावा केलाय.अमेरिकेला टेस्टींग साठी पाठवलाय.नव्हे तर लस शोधण्याचे प्रयत्न सर्वतोपरी होत आहेत.पण असे असतांना हा कोरोना लोकांची सुटका जन्ममृत्यूच्या फे-यातून करेल काय? की बस सर्वांनाच यमसदनी पोहोचवेल.हा प्रश्न जनमाणसासमोर उभा ठाकलेला आहे.
जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून जो जन्म घेईल,तो मरणार असा नियमच आहे.मग तो प्राणी असो की जीवजंतू.सगळा नशिबाचा खेळ.कोणी म्हणतात.कोरोना विधीलिखीत होता.तो येणार होता.त्याची दहशत माजणार होती.त्याच्यानं माणसं मरणार होती.हे सगळं लिहिलेलं होतं.जन्माच्या सहाव्या दिवशी येवून सटवीनं नशिबात जे अक्षर लिहून दिले,ती अक्षरे कोणी मिटविणार नाही.ते घडेल ते घडेलच.कोरोनान मरणं असेल तर मरेलच.बरोबर आहे त्यांचं मत एका अर्थानं विचार करता.
जन्म आणि मरण हे सटवीनं लिहिलेली अक्षरे.मग कोरोनाच्या साथीत लोकं मरणार हेही सटवीनं जर लिहिलं तर लोकांनी खुशाल बाहेर पडावं.लाकडाऊनची गरज नाही.लोकांना उपासमारीनं मरण्याचीही गरज नाही.तसेच लोकांसाठी जेवनाची व्यवस्था करण्याची गरज नाही.
डॉक्टर बाबासाहेबांनी जर विचार केला असता की आम्हा दलितांचा जन्म हा सटवाईनं लिहिलेला असून तो जन्म बदलविण्याची आम्हाला गरज नाही.तर ते समाजसुधारणा करुन अस्पृश्यता निवारण करु शकले नसते.
आज कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले असून लाकडाऊन जरी असला तरी लोकं सुरक्षीत अंतर पाळत असलेले दिसत नाहीत.एकमेकांना हाथ लावतात.एकमेकांच्या घरी जातात जाणूनबूजून पाहुणे म्हणून नव्हे तर या माध्यमातून कोरोना पसरवतात.कोरोनाची साथ जरी महाभयंकर असली तरी ह्या कोरोनाला रोखता येत असतांना आम्ही त्याला रोखण्याचा विचार न करता वाढविण्यास मदत करीत आहोत.काय होते? म्हणत तसेच नशिबाचा खेळ म्हणत आमचं असं वागणं.त्यातच प्रचंड गर्दी करणं हे कुठतंरी आम्हाला विचार करायला लावणारी बाब आहे असंच जर सुरु राहिलं तर कोरोना आमच्यावरही वार करेल.मग सटवीनं आमचं कितीही चांगलं नशीब लिहिलं तरी जाणूनबूजून च्या आमच्या वागण्यानं आम्ही जन्ममृत्यूच्या फे-यात सापडून मरुन जावू हे विसरता कामा नये.
मस्तकावर कोणतीही सटवाई अक्षर टाकत नसून कोरोनाच्या लढाईत तसं समजण्याची गरज नाही.असं जर असतं तर आजही त्याच जुन्या परंपरा रुढी सुरु राहिल्या असत्या.लोकांनी आपरेशन न करता दहा दहा बारा बारा मुलं पैदा केली असती.बालविवाह झाले असते व कित्येक लहान मुलींना लोकांनी सती म्हणून पतीच्या चितेवर पाठवलं असतं.
कोरोनाला हद्दपार करायचे आहे.सामुहिक ताकद लावून.निव्वळ कोरोना गो म्हटल्यानं कोरोना जाणार नाही.त्यासाठी कोरोना गो चे सर्व नियम पाळावे.जेणे करुन अल्पावधीतल्या मृत्यूपासून तरी आपली सुटका होईल.
अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
#"जन्म आणि मृत्यू"#
"जन्म आणि मृत्यू,
यातील" जीवन "नावाचा प्रवास,
सुख-दुःखाचे हिंदोळे अन,
नात्यांतील अनुबंधाचा सुगंधी सुवास"
~शुभा(कंदी पेढा)
जन्माला आलेला प्रत्येकजण मृत्यूला सोबत घेऊन वावरत असतो.जणू काही अतूट ,घट्ट नाते आहे जन्म आणि मृत्यू यांचे...!!सदा सोबतीने जगत असतात.ह्या दोहोंच्या मध्ये प्रत्येक सजीव जगत असतात.
जन्म आणि मृत्यू हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग आहेत.म्हणून तर आनंद अन दुःखही सोबत विहरत असते.जर जन्मानंतर मृत्यू नसता तर,अमरत्वाच्या अहंकाराने मानव प्राण्याने जो काही उच्छाद मांडला असता त्याने सकल विश्वच हाहाकाराच्या गर्तेत बुडून गेले असते.
जन्म कोठे आणि कोणत्या परिस्थिती मध्ये,कोणाच्या पोटी,जाती-धर्म-वंशात होईल हे कोणाच्याही हातात नसते.जीव जन्माला आला की त्याने मिळालेले आयुष्य सुखा-समाधानाने जगावे.
चौऱ्यांशीच्या फेऱ्यातून जीवात्मा फिरून येत असतो.मग त्याला मानवी जन्म लाभतो.त्यामुळे आत्मघात करून जे मरण पावतात त्यांनी मानवी जीवन व्यर्थ घालवले असे म्हणतात.
जन्माला तर किड्या-मुंगी पण येतात,त्या सुद्धा जिद्दीने व हिकमतीने जगतात.मग आपण तर मानव प्राणी मग आपल्याला मिळालेला एव्हढा सुंदर मानवी जन्म आत्महत्या,सारखे कृत्य करून का बरे वाया घालवायचा ना?कारण मृत्यू तर अटळच आहे तो कधी कोणत्या रुपात येईल हे आपण सांगू शकत नाही.
पण जन्म-मृत्यू या दोहोंच्या मध्ये लाभलेले सुंदर आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगून-वागून,आनंद-दुःख,यश-अपयश,सौख्य-निराशा सारे काही हसत-खेळत व्यतीत केले तर जन्म-मृत्यूतील "जीवन"अधिक सुखकर व आनंददायी होईल हे निश्चित....!!
😃©️✒️शुभांगी विलास पवार,(कंदी पेढा)-सातारा
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म -मरण
ईश्वराने निर्मिलेली एक अनमोल साखळी.
जन्म आणि मरण या दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या घटना ..नक्कीच जन्माने आनंद आणि मृत्यने दुःख समाजात पसरते हे साहजिकच,पण या दोन्हीही घटना या सृष्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याश्या साजेशा आहेत.
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे... या संत तुकाराम महाराजांच्या ओळींतून असं सुचतं की प्रत्येक जीवाला म्हणजे त्यातील अमर असलेल्या आत्म्याला त्याच्या वासनेनुरूप जन्म घ्यावा लागतो.
लक्ष लक्ष योनी ,कोट्यानकोटी फेरा...
असं सांगण्याचा अर्थ वैदिक विचार आणि संतविचार यांनी पुनर्जन्म ही संकल्पना स्पष्टपणे मांडली आहे. या विश्वात प्रत्येक योनीमध्ये असलेला आत्मा हा कधीच मरत नसून तो फक्त एका जन्मयोनीतुन दुसऱ्या जन्मयोनीत प्रवेशित होतो असं मानलं जातं. याला विज्ञानातील ऊर्जा अक्षयतेचा नियम सुद्धा लागू होतो.
मनुष्य किंवा कोणताही जीव मरतो याचा अर्थ तरी काय घ्यायचा...? भौतिक दृष्टीने बघितल्यास मृत व्यक्तीचे आपल्याला परिचित असे सर्वच शरीर जाग्यावरच पडलेले असतांना , आजपर्यंत आपण ज्या देहाच्या परिचयाने त्या मनुष्याला किंवा प्राण्याला ओळखत होतो, ते तर अगदी जसेच्या तसे निपचित पडलेले असते आणि मग मृत्य झालाय असं संबोधतांना नेमकं त्या देहातून काय गमावलेले असते....? याला वेगवेगळ्या विचारधारांनी वेगवेगळे नाव दिलेले आहे कोणी मृत्यू होणे म्हणजेच देहातील वायू, प्राण , आत्मा, चैतन्य निघून जाते असं सुचवतात. याचा अर्थ आजपर्यंत आम्ही ज्याला ओळखले ते जाग्यावरच पडलेले असतांना आम्ही आजपर्यंत ज्याला पाहिले नाही, ओळखले नाही ते तत्व निघून गेले... ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगतो की, ऊर्जा नष्ट करता येत नाही आणि निर्माण करता येत नाही तर विश्वातील एकूण कॉन्स्टंट असते याचाचं प्रत्यय येतो.
किडा,मुंगी, प्राणी आणि वेगवेगळे जीव योनी भोगून मग मनुष्यजन्म प्राप्त होतो असे अनेक संतांनी त्यांच्या ग्रंथातून नमूद केले आहे..
लक्ष लक्ष योनी ,कोट्यानकोटी फेरा।
तेव्हा लागे वारा मनुष्यदेह..।
किंवा
घेईन मी जन्म याजसाठी देवा।
तुझी चरण सेवा साधावया।।
असे तुकोबाराय म्हणतात.
यावरून जन्म मृत्यू हा सृष्टीचा रहाट मानवा लागेल...
मृत्यू ही जरी अप्रिय घटना वाटत असली तरी सुद्धा मृत्यने हे चक्र समांतर ठेवले आहे ,अन्यथा या पृथ्वीवर असंख्य भारही वाढला असता आणि 'आता मला मरायचंय...अशी आर्त हाक सगळीकडे ऐकायला मिळाली असती...
एकंदरीत जन्म आणि मृत्यू हे निसर्गाच्या हातातील दोनही अत्यंत महान घटना आहे... आज आपण जन्म या घटनेला प्राप्त आहोत तर मग कधीतरी एके दिवशी मरावे लागणार आहे म्हणून जातांना सुद्धा आपल्याला फक्त आपल्या चांगल्या कामाची पावती सोडून इतर काहीच सोबत नेता येणार नाही..
'क्या लेकर तू आया जगमे, क्या लेकर तू जयेगा...
खाली हाथ आया था बाबा, खाली हाथ जायेगा....।।
म्हणून....
जगण्यातला आनंद घेऊया .....आणि जन्म मृत्यू या घटनेला सकारात्मक पणे घेऊया....
-ज्ञानेश्वर झगरे गुरुजी (वाकदकर)
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
*जन्म आणि मृत्यू*
निसर्गाची अद्भूत लिला, त्याची ही अद्भूत सृष्टी पाहण्यासाठी आपले अवतरणे म्हणजे आपला जन्म होणे ही एक नैसर्गिक घटना म्हणजे आपल्याला मिळालेले खूप खूप मोठे वरदान आहे. आपण जन्मतो आणि या भूतलावर आपले अस्तित्व निर्माण करतो. स्वतंत्र अस्तित्व. या स्वतंत्र अस्तित्वाचा आनंद आपण मनमुराद घेत असतो. आपल्या येण्याचे संकेत मिळाल्यापासून घरात आनंदाचे वातावरण असते. आपण आल्यानंतर घरात जो उत्सव निर्माण होतो. जो उत्साह निर्माण होतो त्याचे वर्णन आपल्याला तर करता येत नाही किंवा त्याबाबत आपल्याला कांही कळतही नाही. कारण आपण अर्भक असतो. जोपर्यंत आपण अशा स्थितीत असतो अर्थात आपले येण्याचा आनंद आपल्यापेक्षा इतरांना झालेला असतो आणि ते आपला आनंद व्यक्त करत असतात. त्यांच्या आनंद घेण्याचे आपल्याला काहीही घेणे देणे नसते परंतु एक गोष्ट आपले जन्मामुळे निश्चित झालेली असते. आपण उद्या एखाद्या गोष्टीवर हक्क सांगायला आणि आपले अस्तित्व म्हणून हक्क मागायला तयार झालेलो असतो. भले पुढे आपला जन्म म्हणजे खायला काळ आणि भुईला भार झाला तरी हरकत नाही. आता जन्माच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपल्या येण्यामुळे खरोखरच सर्वांना आनंद झालेला असतो काय.? हां तुम्ही मुलगा म्हणून जर जन्म झाला असेल तर त्यांच्या वारसाचा दिवा म्हणून आनंद होतोच होतो. म्हणून मुलगा बनून पोटी जन्म होणे अत्यंत महत्त्वाचे. परंतु ही गोष्ट आपल्या हातामध्ये नाही. जर आपण मुलगी म्हणून जन्म घेणार असेल तर सर्वांना आनंद होईलच हे सांगता येत नाही.कारण जन्मा आधीपासूनच मुलीवर अन्याय अत्याचाराला सुरुवात होते. तीचे अस्तित्व नाकारण्याचे पातक आज सुशिक्षित लोकही करताना आपल्याला दिसतात. जसे मुलगा किंवा मुलगी होऊन जन्मला येणे आपल्या हातामध्ये नाही.तसे कोणते आई-बाप आपल्याला मिळावे हे देखील आपल्या हातामध्ये नाही. कोणते घराणे आपल्याला मिळावे ही देखील आपल्या हातामध्ये नाही.कोणती जात,कोणता धर्म आपल्याला मिळावा हे देखील आपल्या हातामध्ये नाही..कुठला प्रांत कुठला देश कुठला भाग काही काहीच आपल्या हातामध्ये नसते. दैवं देते आणि आपण घेत असतो. ज्या घरात आपण जन्मतो त्या घराच्या रितीरिवाजाप्रमाणे आपले नामकरण होते. आणि मग घरातील आवाज घरातील लोकांचे चेहरे त्यांचे स्पर्श आपल्याला जाणवू लागतात आणि आपल्या जाणिवा जागृत होतात. रोज रोज दिसणारे रोज अपल्याशी खेळणारे रोज आपल्याशी बोलणारे लोक आपल्या नजरेला परिचयाचे होतात. आणि दिवसागणिक आपण शहाणे बनायला लागतो. दिवसामागून महिने, महिन्या मागून वर्ष सरतात आणि वर्षानुवर्षे घरातील रीतीरिवाज समाजातील देणीघेणी समाजातील व्यवहार समाजातील लोकांचा प्रभाव आपल्यावर पडत राहतो आणि मग आपण शहाण्याचे अतिशहाणे बनायला सुरुवात होते. आपला जन्म कदाचित नवसाचा म्हणूनही झालेला असू शकतो. घराण्याचा वारसदार म्हणून आपण जन्माला आलेलो असतो. परंतु समाजातील घटकांचा आणि इतर बाबींचा, संगतीचा आणि प्रवृत्तीचा आपल्यावर प्रभाव पडतो. आपल्या जन्माच्या अगोदरपासून ज्या आई-वडिलांनी आपल्याबद्दल स्वप्न साकारली होती डोळ्यांमध्ये सजवलेली होती ती सारी स्वप्न आपण काही क्षणात कांही मिनिटात चकणाचुर करत असतो. वाढत्या वया मधे आई वडिलांचा आधार होण्यापेक्षा आपण त्यांच्यावर भार बनून जातो. कृतज्ञतेचा भाव आपल्यामधून नाहीसा होतो आणि कृतघ्नता आपल्यामध्ये रुजली जाते. आई-वडील वृद्ध झाल्यानंतर ते घरात आपल्याला अडचण वाटू लागतात. मी आणि माझा संसार एवढेच आपले जग सीमित आहे, असे आपल्याला वाटू लागते. आणि मग आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात होते. कदाचित मालिकेतील हा दुसरा भाग असू शकेल तिसरा भाग असू शकेल. आणि अशा लोकप्रिय मालिका साधारणता ऐंशीच्या दशकानंतर सुरू झालेल्या आहेत. आपल्या समाजामध्ये वावरायला सुरुवात होते त्या वेळेला आपल्याला अनेक जाती धर्म, भेदभाव, उच्चनीच, चांगले-वाईट, आपले दुसऱ्याचे या साऱ्या गोष्टी कळू लागतात.आणि आपल्या जन्माचे सार्थक असते ते विसरून जातोआपण. जन्मानंतरची चार दोन वर्षे सोडली तर नंतर आपली निरागसता संपून गेलेली असते. वय वाढत जाते आणि वार्धक्याकडे झुकू लागतो. आपल्याबद्दल जी आई-वडिलांनी स्वप्नं पाहिलेली असतात तीच स्वप्ने आपल्या मुलांकडून आपण पाहिलेली असतात. परंतु ती साखर होत नाहीत बाह्य संस्कृतीच्या प्रभावामुळे सारी स्वप्न आणि आपल्या संस्कृतीला मूठमाती देण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली पाहून आपले मन उद्विग्न होते. परंतु पश्चाताप आणि अंतर्दाह सोसण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही. थरथरणारे शरीर दुसऱ्याच्या आधाराशिवाय उभे राहू शकत नाही. आपले जीवन परावलंबी होते. सरणावरती जळताना एवढेच मला कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. हा अनुभव आपल्याला रोज येत राहतो. आणि मग आपण वाट पाहतो ती मृत्यूची .. छळातून आणि या खेळातून सुटका होण्याची आपण सदैव वाट पाहत असतो. या अशा संसार सुखातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा होते. आणि मोक्षप्राप्तीसाठी आपली देवाकडे डोळे झाकून एका कोपऱ्यामध्ये प्रार्थना सुरू असते. आयुष्य आयुष्याच्या सर्व चित्रपट आपल्या डोळ्यापुढे येत असतो. कारण तो पाहणारे फक्त आपण एकटेच असतो. हृदयात चाललेला कल्लोळ आणि मोठा कर्कश आवाज कोणापर्यंतही पोहोचत नाही. त्याचे केवळ आणि केवळ स्वतः आपण साक्षीदार असतो. मरणाची इच्छा अत्यंत तीव्र होत असते. कारण सध्या मृत्यू पेक्षाही भयंकर यातना सहन कराव्या लागत असतात,अवहेलना आणि अपमानही सहन करावा लागतो. खरं पाहिलं तर जन्म आणि मृत्यूच्या मध्ये केवळ श्वासाचे अंतर असते. परंतु भयंकर यातना कष्ट आणि अवहेलना सहन केल्यानंतर हे अंतर कधी कमी होईल या प्रतीक्षेमध्ये आपण शेवटचे दिवस जगत असतो. आणि मग काल्पनिक मोक्ष हा आपल्या चांगल्या आणि वाईट गुणांचे फळ असते. त्याचा हिशोब ठेवणारा ठेवील परंतु त्या फळाची ओढ आणि अपेक्षा लागलेली असते. सत्कर्माची गोड फळे या भरवशावरती आपण डोळे मिटायला हरकत नाही.
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
'जन्म आणि मृत्यू':एक शाश्वत सत्य
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जन्म आणि मृत्य जगातील शाश्वत सत्य आहे.कदाचित जन्माची वेळ सांगता येईल पण मृत्यूची वेळ कोणालाच सांगता येत नाही हे वास्तव सत्य आहे.आणि म्हणूनच 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ....!!'असं म्हटले जाते ते उगीच नाही.
राजा असो वा रंक, श्रीमंत असो वा गरीब,सज्जन असो वा दुर्जन,सान असो वा थोर,अबाळ असो वा वृद्ध कोणालाही जन्म आणि मृत्यूचा फेरा चुकला नाही.कितीही प्रिय व्यक्ती असो जसा जन्म तसा मृत्यू अटळच..... !!हे वैश्विक सत्य आहे.
संपूर्ण निसर्गचक्रच या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यावर अखंडपणे सुरू आहे.जर मृत्यच नसता तर पृथ्वीवर काय भयानक चित्र दिसलं असतं....याची कल्पनाच न केलेली बरी!!
ज्याला 'जन्म त्याला मृत्यू' हे सूत्र फक्त मानवालाच आहे असं नाही. पृथ्वीतलावर असा एकही सजीव नाही कि ज्याला जन्म आहे पण मृत्यू नाही. म्हणून म्हणतात, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कोणाचीही सुटका नाही.
'नाशिवंत देह जाणार जाणार....' या संत वचना प्रमाणे हा नरदेह नाशिवंत असून एक दिवस काळाची उडी पडणार आहे. या जन्माचं सार्थक करण्याचं काम आपल्या प्रत्येकाच्या हाती आहे.माणसाला जेव्हा जन्म मिळतो तेव्हा त्याच्याकडे श्वास असतो नाव नसते...जेव्हा तो मृत्यू पावतो तेव्हा त्याच्याकडे नाव असते श्वास नसतो...श्वास आणि नाव यांच्यात जे अंतर आहे त्यालाच जीवन असे म्हणतात...म्हणून मनुष्याने जीवनात असे कर्म करावेत की श्वास नसला तरी चालेल...नाव असले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या या जीवनात आपल्या हातून चांगलं काम घडावं आणि 'मरावे परी किर्तीरूपी उरावे...!!' ही उक्ती सार्थ करण्याचं भाग्य आपल्याला लाभावं.या जगात कोणीही अमृताची कुपी घेऊन जन्माला आलेलं नाही हे लक्षात घेऊन सतत कार्य घडायला हवं.
कोण दिवस येईल कैसा...
नाही देहाचा भरवसा...
इतके स्पष्ट असतानादेखील माणसे स्वार्थभाव सोडण्यास तयार नाहीत. मानव रूपाने मिळालेली ही सेवेची एक संधीच आहे असं प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे.जन्माबरोबरच प्रत्येकाच्या मृत्यूची सोय निसर्गाने केली आहे कदाचित आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला दुःख होते परंतु जर या जन्ममरणाचे फेरेच नसते तर आज आपल्या पृथ्वीतलावर कितीतरी प्रकारचे सजीव दिसले असते की ज्यांच्या कडे आपल्याला बघावेसेही वाटले नसते. या अर्थाने मृत्यूकडे पाहिल्यास...'मृत्य' वरदानच वाटेल.
जन्म ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे. या देणगीचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहे. आपल्यावर आलेल्या क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसण्यापेक्षा 'दुःखीतांचे दुःख घालवण्यासाठी आपण आंधळ्याचा डोळा व्हावे, लंगड्याचा पाय व्हावे, अनाथाचे पालकत्व स्वीकारून दुसर्याला आनंद देण्यासाठी सदैव तत्पर असावे.स्वतः आनंदाने जगावे आणि दुसऱ्याला जगवावे!!!
मंगेश पाडगावकर यांच्या या ओळीप्रमाणे 'या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे ....!!' कारण हेच जीवनाचे शाश्वत सत्य आहे.
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.co
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म आणि मृत्यू
जन्म आणि मृत्यू हे मानवी जीवनाचे सत्य आहे.जो जन्माला येणार तो एक दिवस मृत्यू पावणार हे अंतिम सत्य आहे.जरी विज्ञानाने खूप प्रगती केलेली असली तरी अजूनही जन्म आणि मृत्यू ह्या गोष्टी आपण ठरवू शकत नाही.किंवा ते आपल्या हातात नसते.नवीन जीव जन्माला येणे म्हणजे आनंदाची पर्वणी वाटते पण मृत्यू आणि तोही आपल्या जवळच्या व्यक्तीचा असहनीय असतो.मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच प्रत्यक्ष मृत्यू पाहिला.तसे आपण चित्रपटात अनेकदा मृत्यू पाहतो.ते सर्व खोटे असते हे आपण जाणतो.परंतु जेव्हा प्रत्यक्ष मृत्यू होताना पाहणे हे खूपच दु:खदायक असते.
दहा वर्षांपुर्वीची गोष्ट आहे.माझे सासरे दम्याच्या आजाराने त्रस्त होते.तसा आम्ही सर्वांनी मिळून खूप उपचार केले.पण यश आले नाही.खरे तर त्यांनी दवाखाना आणि औषधोपचाराच्या भीतीने आमच्यापासून आजार लपवला.त्यामुळे आजार विकोपाला गेला.शेवटी डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले.मला तर काही कळेनाच.मग आम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना गावी घेऊन गेलो.ऑक्सिजन वर त्यांचा श्वास चालू होता.ॲम्ब्युलन्सने घरी पोहचलो.ॲम्ब्युलन्सचा तो आवाज आणि रात्रीची वेळ अजूनही माझ्या स्मरणात आहे.घरी गेल्यानंतर ऑक्सिजन सिलिंडर काढण्यात आले.पण तरीही त्यांची प्रकृती स्थिर वाटत होती.माझ्याशी ते बोलत होते.माझ्या मनात कुठेतरी आशा पल्लवित झाली.
अचानक दुपारी बारानंतर ते जास्तच बोलायला लागले.प्रत्येकाचे नाव घेऊन कोणी काय करायचे हे सांगू लागले.मी हे पाहत होते.पण त्यावर कसे व्यक्त व्हावे ते कळेना.सासुबाई,नणंदबाई रडायला लागल्या.त्यामुळे तर आणखीनच दु:खाणे वातावरण निर्माण झाले.आणि तो क्षण आला.सासऱ्यांचा प्राण जात असताना मी पाहत होते.माझा विश्वासच बसत नव्हता.त्यावेळी त्यांची जीवन जगण्याची ओढ जाणवत होती.त्यांची एकेक गात्रे शिथिल होत गेली."आता मी जातो"असे बोलून त्यांनी डोळे मिटले.मला तर खूप धक्का बसला.
मरण हे प्रत्येक प्राणिमात्रासाठी अटळ आहे.परंतु आपल्या आप्तजणांचा मृत्यू प्रत्यक्ष पाहणे हे अतिशय दु:खद असते.जे मी अनुभवले ते अजूनही विसरू शकले नाही.
©सौ.गौरी ए.शिरसाट
मुंबई
१०/५/२०२०
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म मृत्यू चा फेरा
'तो' दिवस माझ्यासाठी फार कठीण होता. कारण एका दिवशी मला अशा दोन ठिकाणी जाणे भाग होते, की दोन्ही प्रसंग अगदी परस्पर विरुद्ध असे होते. एका घरात बऱ्याच वर्षानंतर लहान मूल जन्माला आले होते. त्यामुळे तिथे आनंद साजरा केला जात होता. सनईच्या मधुर स्वरांनी वातावरण अगदी प्रसन्न होते. आणि दुसरीकडे त्याच वेळी मित्राचे अचानक निधन झाल्यामुळे जीवाच्या आकांताने घर रडत होते. मला मात्र मनावर दगड ठेवून आनंदाबरोबर आनंद साजरा करावा लागला होता आणि दुःखा बरोबर दुःख.
दोन्ही गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत. पण याच गोष्टी सत्य आहेत हेही तितकेच खरे. म्हणून गीतेतला हा श्लोक मला मनापासून भावतो.
' जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुध्रुवं जन्म मृतस्य च
तस्माद अपरिहार्येsर्थे न त्वम् शोचितुमर्हसि' l
जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून ह्या उपाय नसलेल्या गोष्टींविषयी शोक करणे योग्य नाही.
पण आपण हाडामासाची, भावना असणारी, साधी माणसे असतो म्हणून असं घडत नाही.
सूक्ष्म देह म्हणजे आत्मा स्थूल देहात प्रवेश करतो तेव्हा जन्म होतो. सूक्ष्म शरीर- आत्मा आणि स्थूल शरीर (म्हणजेच जन्म ते मृत्यू पर्यंत) यांचा मधला जो सेतू तो म्हणजे प्राण. हा सेतू जेव्हा तुटतो तेव्हा तो मृत्यू असतो.
उपनिषदानुसार पुनर्जन्म असतो. आत्मा एक शरीर सोडून लगेच दुसरे शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो. अगदी त्याचप्रमाणे हे शरीराचे घडते.
जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा नियमच आहे. ज्याची उत्पत्ती होते, त्याचा नाश अटळ आहे. ह्या जगात भौतिक वस्तू आहेत, त्या पण जुन्या होतात, नंतर क्षीण होतात आणि काही काळानंतर नष्ट होतात.
उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्ग नियम मोडला तर, विचार करा, जगाची परिस्थिती कशी होईल? समजा मृत्यू येणे बंद झाले, तर पृथ्वीवर लोकसंख्या किती वाढेल? त्यांच्या सर्व गरजा पुरवणे निसर्गाला तरी शक्य होईल का? त्यामुळे जुन्या ची जागा नवीनने घेणे योग्य नाही का? जन्म-मरणाचा फेरा आपल्याला वरदानच नाही का?
जन्म आणि मृत्यू ला जोडणारी वाट म्हणजे जीवन- आयुष्य. या वाटेवर येणारे काटेकुटे कसे तुडवतो, हिरव्गायार हिरवळी वरून कसे पुढे जातो, गुलाबाची फुले आपल्या जीवनात किती फुलतात, आलेली फळे किती गोड आहेत, ह्या सगळ्याला फारच जीवनात महत्त्व आहे.
माणसाचा जन्म अगदी अनमोल आहे. तो आपल्याला मिळाला आहे ते काहीतरी चांगले करण्यासाठी. मदतीचा हात पुढे करणे, दुसऱ्याचे अश्रू पुसणे, मातृभूमीची सेवा करणे, अशी कामे केली तर आपले जीवन उजळून निघेल. मग मृत्यूचे भय कसले? मरण आले तर आले. 'मरावे परी कीर्तिरूपे उरावे'
असाध्य रोगामुळे पछाडलेला माणूस नेहमीच मृत्यूची याचना करतो. मृत्यूला गळामिठी घालण्याची वाट बघत असतो. जवळचे प्रियजन म्हणतात, "देवा, ह्याला सोडव रे." कारण सगळ्यांना कळून चुकलेले असते. या यातना तून मृत्यूशिवाय सुटका नाही. मृत्यू हेच त्रिकालाबाधित सत्य .
मृत्युला घाबरणारे पेक्षा, मी तर असे म्हणेन,
पैल नेते वाट मज जी
देखणी आहे किती
मज पुढे साक्षात मृत्यू ....
भासतो सुंदर अती
शुभदा दीक्षित पुणे
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
जन्म आणि मृत्यू
जन्म आणि मृत्यू हे दोन्ही सजीवांची प्राथमिक लक्षण आहेत. प्रत्येक सजीव आपल्यासारखाच सजीव जन्माला घालण्यासाठी सामर्थ्यवान असतो. गरजेपेक्षा जास्त जीवांची निर्मिती करणे हेसुद्धा सर्व सामान्य लक्षण आहे. प्रत्येक सजीव आपल्यासारखाच सजीव निर्माण करण्यासाठी सदैव धडपडत असतो. आपली ही निर्मिती याच लक्षणा द्वारे झाल्याचे आपल्या लक्षात येते. जे सजीव जन्माला येतात आणि बलशाली असतात तेच सजीव जिवंत राहतात व दुर्बलांचा नैसर्गिक रित्या नाश होतो त्यालाच आपण मृत्यु असे म्हणतो.
अनुवांशिकशास्त्राचा जनक जॉन ग्रेगर मेंडेल याने त्याच्या संशोधनात सजीवांच्या उत्पत्ती म्हणजेच जन्म व मृत्यु याबाबतीत सखोल अभ्यास करून जे निष्कर्ष दिले आहेत ते आजही जगमान्य आहेत. आज जगात सर्वत्र मेंडेलियनलियन थिअरीचा अभ्यास केला जातो. जो जगण्यासाठी समर्थ असतो तोच जीवन सामर्थ्य पणे जगू शकतो . जो दुर्बल असतो तो आपले जीवन समर्थपणे जगू शकत नाही. दुर्बलांना या जगात स्थान नाही . रोगाचे असंख्य जंतू आपल्याभोवती पसरलेले आहेत , परंतु जर आपण दूर दुर्बल असलो आणि आपले स्वर शरीर अस्वस्थ असेल तर आपण जगु शकत नाही. तसेच आपले मन जर कमकुवत असेल असेल व शरीर अस्वस्थ असेल तर जीवन जगण्याचे सामर्थ्य आपल्यात असणार नाही.
सामर्थ्य हेच जीवन म्हणजेच जन्म आणि दुर्बलता हाच मृत्यू हे एक महान सत्य आहे. म्हणून आपण शारीरिक मानसिक आर्थिक सामर्थ्यवान प्रश्न जगण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे.
माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर यश मिळवण्यासाठी मनस्वास्थ्य, शरीर स्वास्थ्य, आर्थिक स्वास्थ्य, समाजस्वास्थ्य बिघडणार नाही एवढी काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे पण रोजच्या काही सौख्य क्षणांना सुंदर क्षणांना त्याग न करता जीवन जगणे म्हणजेच जन्माचं सार्थक होणे होय. मृत्यु तर काय कोणत्याही सजीवाला येणारच आहे, मृत्यू अटळ आहे म्हणून मृत्यूचा विचार न करता आलेला प्रत्येक क्षण सुखाचा कसा होईल याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे . मृत्यू मृत्यु हा केव्हाही येणारच पण तो चोरपावलाने नव्हे तर आक्रमकतेने यावा तरच जगण्यातली खरी शान आहे.
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
*जन्ममृत्यू*
मनुष्य जन्माचा गोडवा काही औरच प्रभु रामानी देखील मनुष्य जन्म घेतला.
"किती आनंदाने गायिले,राम जन्म ला गं सखे राम जन्म ला...
आईच्या पोटी जन्म होतो आणि सर्वाना
आनंद मिळतो .नवीन बाळ पृथ्वीतलावर जन्माला येणा-या प्रत्येक माणसाचा जन्म असेल पशुपक्ष्याचा असेल..सर्वत्र आनंदोत्सव असतो आगमणाचे स्वागत जल्लोषात होते. सर्वत्र आनंदीआनंद असतो.सृष्टी मध्ये उमलणा-या फुलाला पाहून देखील नेत्रात किती मोहक आनंद असतो.हे फुल आता मी देवाला अर्पण करू की डोक्यात माळु..मैत्रिणीला देऊ किती आनंदात असतो आपण .आपल्याला माहित असते की,थोड्या वेळाने ते फुल सुकणार आहे.
जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मृत्यू पावणार आहे.परंतु या सर्व गोष्टी आपण विसरतो जगात जन्माला येतो आणि या निसर्गसौदर्याने मनोमन एवढे भारावून व आनंदून गेलेलो असतो की ,"मृत्यू अटळ सत्य"या गोष्टीला माणुस मात्र विसरत जातो .मधल्या काळात जीवन जगत असताना तो एवढा रमून जातो या सुंदर संसारात की,"जीवन-मृत्यू "या प्रवासाचे आपण फक्त सहप्रवाशी आहोत या गोष्टीचा विसर पडतो माणसाला व सुंदर गोष्टीचा आस्वाद घेण्यात रममाण होतो.
जन्म व मृत्यू यामधील प्रवास म्हणजेच "जीवन".जीवन खूप सुंदर आहे त्याची गोडी अवीट आहे सौंदर्य मनमुराद आहे त्याचे वर्णन करण्यात कवीची हयात गेली.तरी अजून ही शब्द संपले नाहीत.प्रत्येकाला तो चाखण्यात जो आनंद मिळतो त्याचे वर्णन कवीने खूप सुंदर केले आहे."हे जीवन सुंदर आहे,
नितळ निराळी आकाशाची
क्षितिजाची लाली ,ढगात भिजल्या
वाटेवरती किरणांची रांगोळी "हे जगतो आपण परंतु .
जगत असताना विसर पडतो तो मृत्यू चा
जगण्याचे सुंदर दिवस कधी संपून जातात
व वार्धक्याच्या जाळ्यात माणुस कधी गुरफडतो ते त्याचे त्यालाच कळत नाही.
विविध व्थाधीनी ग्रासलेले शरीर घेऊन रोजचा प्रवास सुरू होतो .गोळ्या औषधाचा भर पडते अन्न कमी व गोळ्या मात्र नियमीत घ्याव्या लागतात.जीवन जगत असताना शरीराचे प्रमाणा पेक्षा जास्त लाड करून शरीर अवजड बनवून ठेवतो माणुस आवश्यकता नसताना देखील नको त्या त्या गोष्टी तो सेवन करतो व मनमुराद जगण्याच्या व्याख्येत शरीराचे मात्र हाल करून ठेवतो." जीवन सुंदर आहे परंतु ते तेवढ्याच सौंदर्याने जगा"
तरच ते तुम्हाला मृत्यू पर्यंत चांगले ठेवता येईल..मृत्यू तर येणारच आहे तोअटळ आहे .सत्य आहे .त्याचे स्मरण ठेऊन जर आपण वागलो तर जग खूप सुंदर होईल.
मृत्यू येणार आहे .तीन प्रकारचे मृत्यू आहेत आधिभौतिक मृत्यू..जो गोळ्या औषधाने बरा होतो आटोक्यात राहतो.
गडांतरीत मृत्यू..जो परमेश्वराच्या नामस्मरणाने दुर होऊ शकतो.आध्यात्मिक मृत्यू...वयपरत्वे येणारा मृत्यू,आणि हा मृत्यू जर आला तर सर्व समाधानी असतात.आणि त्यासाठी ठेवलेल्या ज्या शिड्या आहेत..कर्मबंधाची
जीवनाच्या सत्याची जाण ठेवण्याची गरज असते.जीवन सुंदर आहे विशिष्ट मर्यादेच्या अकुंशाला डोक्यावर टोचून ठेवून जर आपण जगत राहिलो तर जीवन खरच सुंदर होईल व जीवन-मृत्यू चे हे अंतर व शेवट सुखकर होईल.
****************************
स्नेहलता कुलथे बीड
मोबा.7588055882
Kulthe.lata@gmail.com
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
खेळ जन्म मृत्यूचा .....
आपण चालतो ,बोलतो , पाहतो, ऐकतो म्हणजे आपण जिवंत आहोत. पण कधी विचार केलाय का ?
मी ऐकतो ,मी बोलतो , मी चालतो ,मी पाहतो , मी मी म्हणणारी अस कोण म्हणतो . आपण म्हणतो माझे हात माझे पाय , माझं माझं म्हणणारी असं कोण आहे. मी मी म्हणणारी एक शक्ती म्हणजे मी आत्मा मी आत्माच म्हणतो हे माझं ते माझं .
आत्मा हा पाच तत्वाचे शरीर चालवणारी चैतन्य शक्ती आहे . आत्मा शरीर रुपी रथाला चालवतो .आत्मा शरीरात आहे म्हणून तो 'रथ' आहे. आत्मा शरीरातून बाहेर पडतो तेव्हा हेच शरीर 'अर्थी' बनते. आईच्या पोटात बाळ असते. सहाव्या महिन्यात ते पोटात हालचाल करायला लागते म्हणजे त्या शरीरात प्राण ऊजा येते आत्मा शरीरात प्रवेश करतो.आत्मा म्हणजे प्राण शरीराला चालवणारी ऊर्जा . हीच ऊर्जा मन आणि बुद्धीच्या आधारे कर्म करते. चांगल्या वाईट केलेल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी आपल्याला जन्म आणि मृत्युच्या फेर्यात यावेच लागते .
आपले कर्मच ठरवतात .आपल्याला जन्म कुठे घ्यायचा आहे . कोणत्या ठिकाणी कोणत्या कुटुंबात घ्यायचा हे आपण आपल्या कर्माच्या हिशोबांच्या आधारावर ठरवतं आत्मा मृत्यू नंतर त्याच घरात जन्म घेतो जिथे त्याचा कर्माचा लेखा जोखा असतो . असं म्हणतात आत्मा खाली हात येत आणि खाली हात जाते .
नाही आत्मा न खाली हात येते न खाली हात जाते .आत्मा नेहमी आपल्या कर्मांच्या हिशोबाने संस्कार सोबत घेऊन जाते आणि घेऊन येते.
आपण सर्वांनाच ठाऊक आहे .आपल्याला दोन मनं असतात .
एक बाह्यमन आणि एक अंतर्मन बाह्यमन बुध्दीला जोडलेलं असतं त्यात बुद्धी च्या विचार शक्तीवर भावना असतात. पण अंतर्मन हे पूर्णपणे भावनिक असते .त्यात दृढतेची शक्ती असते जी ईच्छा अंतर्मनात जागृत होते ती दृढ असते . त्यात खुप शक्ती असते . यालाच आपण आत्मिक शक्ती म्हणतो. ह्यातच संस्कारांचा साठा असतो .हेच संस्कार जन्मोजन्मी आपल्या सोबत असतात . चांगले वाईट संस्कार आपल्या वृत्तीने बनतात .जशी वृत्ती तसे संस्कार आणि जसे संस्कार तसे आपले कर्म आणि जसे आपले कर्म तसेच आपले कर्मभोग. आत्मा कर्म भोग सोबत घेऊन शरीराच्या आधारानेच जन्म आणि मृत्यूच्या फेर्यात येते. आत्माच एक शरीर सोडते आणि दुसरे शरीर घेते .
आपले कर्म चांगले तर आपला मृत्यूही सहज काहीही त्रास न होता होतो आपले कर्म वाईट तर आपल्याला मृत्यू च्या वेळी त्रासदायक पिडा होतात .
म्हणूनच मृत्यूच्या वेळी किंवा नंतर दान पुण्य करण्याची प्रथा असावी .
जेणे करुन मृत आत्म्यास शांती मिळेल .
म्हणूनच नेहमीच चांगलेच कर्म करत राहावे आपल्या कडून होईल तेवढे दुसर्याचे भले करावे . .
ओम शांती !!!
🖋 सौ सुवर्णा सोनावणे
चाळीसगाव
७७४४८८००८७
♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀--♀♀
धन्यवाद ......!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें