मंगलवार, 19 मई 2020

रोज एक लेख : दिवस एकतीसावा सहल

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- एकतिसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 19 मे 2020 मंगळवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- पर्यटन / सहल*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*"सहल"*
खरं खरं बोलावं माणसांनी. त्यातल्या त्यात मोठं झालेल्या माणसांनी, कारण सहल ही शालेय जीवनात आणि आता कौटुंबिक जीवनातही जात असते.पण खराआनंद तेव्हाचा होता की आताचा.
हे खरं सांगताना बहुतेकांचे म्हणणे नक्कीच... तेव्हाचा म्हणजे शालेय जीवनाचाच खरा सहल अनुभव आनंद देणारा होता. हे असणार आहे. मी तर अगदी ठामपणे हे सांगेन की शालेय जीवनातील सहल अनुभव निव्वळ आनंद देणाराच नव्हे तर अविस्मरणीय असाच असतो. कारण सहलीनिमित्त आपणास हिरो बनता येते, तर मोकळं मोकळं वावरताना कोणाच्या बंधनाशिवाय हवं तसं वागायला मिळतं.सरांचा धाक असतो पण भिती नसते. पण ज्यांची धास्ती, धाक, भिती  बंधनं असतात ते आई बाबा आपणास बंधनं घालण्यासाठी नसतात. हा वेगळा आनंद असतो.. शिवाय नजरेचे तीर जुळत असताना, आपलं कोणी सहलीत तीर मारणारं नि तीर झेलणारं असेल तर आनंदाला उधान येतं... सागर किनारी सहल असेल तर हे उधान सागर लाटांनाच जणू आव्हान देतं. ही तर अंदर की बात झाली. पण सहल म्हणजे केवळ मौजमजेसाठीच नाही तर ज्ञान वृंदिगत होण्यासाठी पण असते. खूप दिवसापूर्वी म्हणजे साधारण तीस वर्षापूर्वी आमची सहल दक्षिण भारतात गेली होती.आम्ही जवळपास पंचेवीस तीस विद्यार्थी होतो... फक्त मुलेच होतो. त्यामुळे स्वछंद पणाला खूपच वाव होता.. सोबत फक्त आवड असणारे म्हणजे हौसे सर होते. समुद्रकिनारी मनमोकळे आणि स्वच्छंदपणे वावरताना फॉरेनर हे खास आकर्षण असायचं. आम्हाला वा आमच्या सरांना कोणालाच अस्खलित इंग्रजी धड बोलता येत नव्हते. फक्त कामापुरतेच येत होते. फॉरेनर बरोबर फोटो काढण्याची आमची धडपड असायची पण संवाद कसा साधावा हेच कळत नव्हते दक्षिण भारत हिंदी नाकारणारा आणि इंग्रजी स्विकारणारा भाग. तिथंही मोडकं इंग्रजी बोलून आम्ही खूप हसायचो. खरं तर तेव्हा हसायला जास्त यायचं, जेव्हा आमच्या सरांनाच
बोलताना इंग्रजीचा अडथळा यायचा. आंध्र प्रदेशातील श्री.बालाजी दर्शनाला आम्ही सर्वजन गेलो आणि सरांसह आम्ही सर्वच विदयार्थ्यानी
केशवपन केले.. आम्हाला कोणीही ओळखणारे नाही हे ओळखून आम्ही.. म्हैसूरकडे जाताना अंगात टी शर्ट आणि फक्त लुंगी नेसून हातात सुटकेस घेऊन प्रवास करत होतो. लोक नवलाईनं आमच्याकडं पाहत होते, सुरवातीला आम्हालाही नवलच वाटले की इकडे सारे लुंगीवालेच असूनही आमच्याकडे असे नवलाईने का बघतात ? पण नंतर कळले की आम्ही पंचेवीस तीस केशवपन केलेले टकले एकत्र होतो..
नऊ दहा दिवसाच्या या सहल प्रवासातून अनेक
नवे आणि अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन आम्ही परतलो.. आजही स्मरणात आहे ती ट्रिप,
ते अनुभव आणि ती मज्जा. उसळत्या लाटाच्या सानिध्यात काढलेले फोटो, म्हैसूरचा राजवाडा, वृंदावन गार्डनमधील नाचणारी कारंजी, मनात तशीच नाचतात.विवेकानंदाच स्मरण देणारी कन्याकुमारी आणि तिथला सनराईज आणि सनसेट पारणे फेडून जातो.रामेश्वरमचे भव्य मंदिर
शिल्पकलेचा उकृष्ट नमूना, सारं सारं मनात जपलय. आणि फोटो रुपानं पेटीतही जपून ठेवलय. अथांग सागर आणि तसाच विस्तारलेला माझा भारत याचा आणि मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मी सहलीतून दाक्षिण भारत फिरलो तर माझी सौ. उत्तर भारत फिरली आहे.तिचे वडील आर्मीत होते, त्यांच्या ड्यूटीमूळे
त्यांना उत्तरेकडे फिरता आले. आम्हा दोघा उभयताने  मिळून भारत भ्रमण पूर्ण केले आहे.

                 *हणमंत पडवळ*
                  *उस्मानाबाद*
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*सहल:एक परमोच्च आनंद*

*✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर(02)*

"प्रत्येक व्यक्तीने घ्यावा
सहलीचा हा आनंद
जोपासावा ज्ञानासाठी
नित्याचाच हा छंद"

        सहल म्हटले की,प्रत्येकाच्या आनंदाचा परमोच्च क्षण असतो.आपण ज्या ठिकाणी वावरत असतो त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती ज्ञात असते.म्हणून जगातील माहिती जाणून घेण्यासाठी व आनंद मिळविण्यासाठी दरवर्षी सहलीला जाण्याचे नियोजन करावे.विदेशातील संस्कृती ज्ञात करण्यासाठी विदेश दौरे करून पर्यटनाचा आनंद उपभोगता येतो.बालकांसह मोठ्या व्यक्तींना देखील सहलीला जावेसे वाटते.शाळा,महाविद्यालय मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जवळच्या स्थळी सहलीचे आयोजन करतात व करायलाच हवे.शाळकरी मुलांना तर खूप उत्साहाने सहलीला जावे वाटते.पालकांच्या मागे तगादा लावून पैसे मिळवून व सोबत खर्चासाठी पैसे घेऊन तयार असते.सहल केवळ मौजमजा,करमणूक यातच सीमित नसून भिन्न-भिन्न ठिकाणे,पोशाख,खाण्याच्या सवयी,तीर्थस्थळे,देवस्थान,गडकिल्ले याविषयीचे ज्ञान देखील मिळते त्यामुळे सहलीला जाण्यासाठी प्रत्येकजण तयार असतो.निसर्गाचा आस्वाद घ्यायला मिळते नि घ्यावेसे वाटते.

        शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन त्यांचे शिक्षक करीत असतो.त्यांना सहल म्हणजे काय??किती दिवसांसाठी यावर त्याचे नियोजन ठरत असते.सहलीला जात असतांना कोणकोणत्या वस्तू सोबत बाळगायचा,स्वतःची काळजी कशी घ्यायची..त्याचसोबत सर्वांनी एकत्र राहून एकमेकांना मदत करायची यातून सहकार्याची भावना देखील वाढीस लागते.सहल ही एक दिवस वा त्यापेक्षा जास्त दिवसासाठी देखील नियोजन करतात.महाविद्यालयीन युवक-युवती स्वतः नियोजन करतात आणि वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन बघितलेल्या वस्तूची टिपणे घेतात यातून अभ्यासदौरा देखील होते.काही शैक्षणिक संस्था शासकीय कार्यालय,आदर्श गाव,आदर्श संस्था येथे भेटी देऊन तेथील संपूर्ण माहिती ज्ञात करीत असतात.अहमदनगर मधील राळेगणसिद्धी, हिरवेबाजार,बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे सहल म्हणून भेट दिल्यास आदर्श गावाची संकल्पना कशी असावी याची माहिती मिळते. जेणेकरून त्याचा अनुभवावरून आपल्या ठिकाणी येऊन त्याचे नियोजन करू शकतात.आपल्यापेक्षा थोडी वेगळी माहिती मिळत असते त्यामुळे ज्ञान मिळविण्यासाठी तरी जीवनात प्रत्येकांनी सहलीचा परमोच्च आनंद घ्यावा.निसर्गरम्य वातावरणात जाऊन तेथील संस्कृतीची माहिती मिळविता येते.निसर्ग कोणताही भेद न करता सर्वाना निसर्ग समान न्याय देत असतो त्याचे अनुकरण मानवी जीवनात अत्यावश्यक आहे.मानवाच्या स्वार्थी वृत्तीवर अंकुश निर्माण होईल अशी प्रेरणा स्वतः घ्यावी आणि त्यानुसार आचरण करावे. एवढेच नाही तर थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळ्यात सहलीच्या हेतूने गेल्यास मनाला वेगळाच आनंद मिळतो आणि जीवनात नव्या दमाने कार्य करण्यास प्रफुल्लित होते सोबत सर्व आपल्या मनातील नकारात्मक बाबी बाजूला सारून सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन आनंदात घालवू शकतो.

      सहलीच्या निमित्याने भूतकाळामध्ये बांधले गेलेले अनेक गडकिल्ले,जलदुर्ग,डोंगरी किल्ले यांना भेटी दिल्यानंतर त्या काळात सोयी सुविधांचा अभाव असतांना देखील तेथील कलाकृती पाहून मन थक्क होईल.पूर्वी ज्यांच्याकडे अधिक किल्ले तो श्रीमंत राजा समजला जायचा म्हणून राजांनी बांधून ठेवलेले कलात्मक नमुने बघून मनाला हायसे वाटेल. त्यांची कला व कलाकृती वाखाणण्याजोगी होती.औरंगाबाद मधील बीबी का मकबरा,आग्रा येथील ताजमहाल,दिल्ली मधील कुटूंबमिनार,हैद्राबाद मधील चारमिनार,गोलकोंडा किल्ला,अमृतसर मधील सुवर्णमंदिर,जालियनवाला बाग हे ऐतिहासिक वास्तू बघून त्याचा तुलनात्मक,टीकात्मक अभ्यास देखील आपल्याला करता येतो त्यामुळे वेगवेगळी आपल्या आवडीच्या ठिकाणी व्यक्तिशः,कुटुंब,मित्रपरिवार,समाजातील अभ्यासू व्यक्तीने सहलीचा परमोच्च आनंद घ्यावा आणि छंद जोपासावा.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
ते डी एड चं जीवन
   
    सहल
       सहल विद्यार्थी जीवनात अतिशय आवडीची गोष्ट.तसं पाहिल्यास आम्ही विद्यार्थीच होतो.म्हणुनच आम्हाला सहलीबद्दल विरंगुळा वाटत होता.तसा सहलीचा बेत जाहीर होताच आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.
     यापुर्वीही आम्ही आमच्या शालेय जीवनात सहलीला गेलो होतो.सहलीचे अनुभव होतेच.त्यामुळे आम्हाला सहल म्हटल्यास नवीन नव्हतं.पण इथे मोठमोठी समवयस्क मुलं थोडं का होईना आश्चर्यजनक स्थिती होती.
       आमची सहल प्रथमवर्षी अंबाखोरी जबलपुर चित्रकुट भेडाघाट म्हैहर इथे जाणार होती.पाणवठ्याजवळ कोणी जाणार नाही.कोणी बोटींग करणार नाही.याची सूचना आधीच क्षिरसागर गुरुजींनी आम्हाला दिली होती.कारण गोव्याला एकदा जी सहल गेली होती.त्यात बोटींगची मुभा असल्याने एक डी एड शिकणारा मुलगा मरण पावला होता.झाले असे की महाविद्यालयात मस्ती करणारे भरपुर.ते नावेवर तर बसले.पण दंगामस्ती करीत.त्यातच एका बाजुला नावेचा तोल जाताच नाव उलटली व एक मुलगा पाण्यात पडला.त्याला पोहता येत नव्हते.म्हणुन त्याला वाचविण्यासाठी दुसरा.पण वाचणारा मुलगा हा मृत्यु च्या धाकाने त्याला चिपकला.त्या पोहणा-या मुलाने त्याला तर वाचवले.पण स्वतःचा जीव तो वाचवु शकला नाही.मग मोठी दगदग झाली.हा एक हादसा होता.त्यामुळे बोटींगची मनाई होती.
       ठरल्याप्रमाणं आमची सहल ज्या दिवशी आयोजित केली होती.त्या दिवशी निघाली.लागलेली हुरहुर आता संपली होती.आम्ही बसमध्ये बसलो.आमची खाजगी बस होती.गाडी तेवढी नवीन नव्हती.पण वाहक चांगला होता.गाडी अंबाखोरी ओलांडत थेट जबलपुरला लागली.जंगलाचा रस्ता कापत तसेच नागमोडी वळणे घेत घेत गाडी चालली होती.गाडी जेव्हा पहाड फोडुन खाली आली.तेव्हा हा कोणता पर्यावरणाचा भाग आहे.हे क्षणभर समजले नाही.मग एक धबधबा दिसला.हीच अंबाखोरी.विदर्भातही अशा जलप्रपाताचं दर्शन होतं.याचा प्रत्यय त्या दिवशी आला.खुप उंचावरुन एक बारीक धार सारखी पडत होती.
      अंबाखोरी संपलं होत.पुढे जबलपुरचं जैन मंदीर पाहिलं.मग टाईमपास करत करत आम्ही निघालो भेडाघाटला.तर भेडाघाटला पोहोचत पर्यंत पहाट झाली होती.थोडा अंधारच होता.आम्ही बसच्या बाहेर पडलो.काही वेळ तसेच आम्ही स्तब्ध जसा बगळा पाण्यात मासोळ्या खातांना जसा एका पायावर मौन डोळे लावुन राहतो.अगदी तसेच आम्ही स्तब्ध.थोड्या वेळाने अंधार संपलेला.अंधाराला चिरत सांजप्रकाशाने पृथ्वीची जागा व्यापली होती.सुर्य अद्याप दिसला नव्हता.पण थंडीचे दिवस असल्याने वातावरणात नक्कीच गारठा होता.आम्ही जलप्रपातापासुन बरेच अंतर लांब होतो.धार पडतांना दिसत नव्हती.पण आवाज मात्र कानात नक्कीच येत होता.आम्हाला सुचना होत्याच.धबधबा सावकाश पाहायचा.स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची.समुहाने राहायचं.जेणेकरुन काही अनर्थ होणार नाही.अनर्थ झाल्यास सांभाळला जाईल.
       आम्ही सावकाश त्या धबधब्याच्या दिशेने निघालो.थोडे जवळ गेलो तर पाहातो काय,त्या जलधारा एवढ्या जोरात खाली पडत होत्या.त्या खाली कुठे समाविष्ट होतात हे काही दिसत नव्हतं.कारण त्या धारेच्या जोरात पडण्यानं तिथे धुकं पसरलं होतं.जणु राजनर्तकी त्या धुक्यातील पडणा-या जलधारेवर जणु नृत्यच करते की काय असे जाणवत होते.आम्ही जे पाहात होतो.त्याचं सौंदर्य.अन् ती वनराजी धुक्याच्या मागे असलेली आमच्यावर हासत होती. कदाचित आम्हाला लाजवत होती.वरुन थंडीचा गारवा आणि समोर अप्रतिम सौंदर्य तसेच धबधब्याचा पडुन होणारा मंजुळ आवाज आमच्या डोळे,कान,त्वचा या तीन ज्ञानेंद्रियांचे पारणे फेडत होता.
      भेडाघाट पाहुन भेडाघाटवरुन गाडी आज चित्रकुटला निघाली होती.इथे एक आश्रम आहे.त्या आश्रमाच्यासमोर एक तलाव.याचे पुढे गेल्यावर रामाचे मंदीर.बहुतेक वनामध्ये जातांना राम इथे आला होता अशी आख्यायिका.येथुनही एक नदी वाहते.या नदीच्या या बाजुलाही मंदीर.त्या बाजुलाही मंदीर आहेत.ही नदी म्हणजे दोन राज्य जोडणारी रेषाच.या बाजुला मध्यप्रदेश तर त्या बाजुला उत्तरप्रदेश असं कोणीतरी सांगितलं.पण पलिकडे जाण्यासाठी नावेने जावं लागतं.कोण जाणार.आधीच नावेत बसायची बंदी.पोरं विचारत होती आम्ही जातोय.चांगले बसुन जावु.दंगामस्ती करणार नाही.पण गुरुजी ऐकायला तयार नव्हते.मग आम्हाला मोठा प्रश्न.इथंपर्यंत आलो आणि या पावन भुमीत उत्तरप्रदेश च्या भुमीवर प्रवेश करायचा नाही.आमचं अस्तीत्व जागृत झालं.शेवटी आम्ही प्रवेश करायचे ठरविले.विचार करायला लागलो क्षणात आठवलं.आमच्याकडे काही ढाली आणि तलवारीही आहेत.त्या केव्हा कामात येणार.
       ढालींना विचारलं,"तुमची इच्छा काय?"ढालींनी होकारार्थी उत्तर दिलं. मग तलवारींना विचारलं,"तुमची लढायची इच्छा आहे का?"त्यांनीही हो म्हटलं.झालं तलवारी व ढालींना गुरुजीजवळ पाठवलं.सुरुवातीला त्यांनी आढेवेढे घेतले.पण नंतर तलवारी अहिंसक बनल्याने गुरुजींनी सहज परवानगी दिली व आम्ही उत्तरप्रदेश ची सीमा लंका पार करणा-या हनुमानासारखी लांघु शकलो.ह्या ढाली तलवारी दुस-या तिस-या कोणी नसुन आमच्या वर्गातील मुली होत्या.त्यांनी खरंच त्यावेळी ढालीतलवारी सारखंच काम केलं होतं.म्हणुन त्यांना मला ढालीतलवारी म्हणावसं वाटते.
      आम्ही तो किनारा  पाहुन परत गाडीजवळ आलो तर लक्षात आलं की गाडीचा समोरचा आरसा माकडांनी नेला.नेला नसेल फोडला असेल.पण नेला असे सांगण्यात आले.मग गाडीला आरसा नव्हता.आमची गाडी गुप्त गोदावरीला निघाली होती.रस्ता थोडा संकरी होता दुसरी गाडी समोर निघणार नाही असा.तरी ही वाहकाने ठरवलं तर ती मागची गाडी समोर जावु शकेल.
       आमच्या बसला आरसा नव्हता.विघ्न यायचं होतं.ते अशाचवेळी येतं.मागे पोलिसाची गाडी होती.ती रस्ता द्यावा म्हणुन गाडीचा हार्न वाजवत होती.आम्ही मशगुल होतो आपल्याच तालात.आम्हाला ती पोलिसांची गाडी दिसलीच नाही.शिवाय आरसाही नाही.त्यातच चालकाने कानात मोबाइलचा वायर टाकलेला.तोही गाणे ऐकत गाडी चालवत होता.मग थोडा रस्ता मिळाला पोलिसाच्या व्हनला.ती समोर आली व आमच्या थेट बसच्या पुढे येवुन थांबली.पोलिसांची व्हन पाहताच आमची बोबडी वळली.कोणी हसायला लागले तर कोणी बोलायला लागलं.त्यातच कोणीतरी म्हणालं.चुप बसा.सगळे चिडीचुप बसले.पोलिसांनी बाजु ऐकुन घेतली.आरसा विचारला.चालकान् खरं खरं सांगितलं.मग ही सहल आहे हेही सांगीतले अनर्थ टळला.यावेळी ढाली तलवारी कामात आल्या नाही.कारण त्यांचा वापर कुठेही करु नये नाहीतर युद्धाची पाळी उद्भवते.इथे युद्ध करायचं नव्हतं.म्हणुन आम्ही पोलिसांना ढाली तलवारी दाखवल्या नाहीत.
       आज कबाडा होणार होता.एका आरशाने समस्या तीही गंभीर निर्माण झाली असती.पण नशिबाने साथ दिला व अनर्थ टळला होता.पुढे गुप्त गोदावरी पाहिली.तिथे असणा-या जलधारेत आंघोळ आटोपुन आम्ही पुढील प्रवासाला लागलो.पुढचं स्थळ होतं खजुराहो.
      गाडी जशी खजुराहो ला पोहोचली.खजुराहो म्हणजे नेमकं नाव का लोकं घेत असतात.त्याचं साक्षात दर्शन इथे झाल्या शिवाय राहात नाही.लैंगिक आणि अश्लीलतेचं साक्षात दर्शन या खजुराहोत आहे.अश्लीलता मनामनात आहे.माणसात आहे, प्राणीमात्रात आहे.पण त्याचं असं प्रदर्शन ही कुठंतरी असेल असं कधी वाटलं नव्हतं.इथे कोरलेल्या शिल्पात माणसेच माही तर कुत्रा,गाय,बैल,हत्ती,घोडे याशिवाय कोणत्याही प्राण्यांना सोडलेले नाही.अश्लीलतेशिवाय जीवन नाही असं या एकंदरीत शिल्पावरुन लक्षात येतं.पण या अश्लीलतेचा बाहु करु नये.हे शिल्प म्हणजे अश्लील भावना भडकंविण्यासाठी नाही तर त्या भावना शांत करण्यासाठी राजाने कोरलेल्या असाव्यात.कारण रोज रोज पुरणपोळी खाणा-याला जशी पुरणपोळी आवडत नाही.तसे रोज रोज हे शिल्प पाहणा-याला अश्लीलतेच्या भावनेचं आकर्षण उरत नाही.ही शिल्पे जणु पिवळी साडी परिधान केल्यागत वाटतात.कारण याला पिवळा रंग मारलेला आहे.ब-याच वर्षापुर्वी राजा चोळ यांनी ही शिल्पे कोरलेली असल्याचे कळले.खजुराहो ची शिल्पे ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
      दुपार झाली होती.आम्ही नाश्ता केला होता.सायंकाळी आम्ही गाडीत बसलो.आज परतीचा प्रवास होता.आमची गाडी म्हैहरला येणार होती.तिथे शारदा देवीचं मंदीर होतं.या मंदीरातील देवी ही पहाडावर आहे.पहाड चढतांना आता खाचखळगे नसुन आता त्या ठिकाणी पाय-या बनविल्या आहेत.तिथे एक मुल्लीम व्यक्ती गुलाबाचं फुल चढवुन जातो.असे कोणीतरी सांगितले.या मंदीरातील दरवाजा रात्री बंद होतो.पण सकाळी जेव्हा केव्हा उघडतो.तेव्हा इथे गुलाबाचे फुल चढलेले असते.असे लोकांचे म्हणणे.सत्य आहे की माही हे मलाही माहीत नाही.आम्ही पाय-या चढु लागलो.दिड तासात आज मी पाय-या चढलो होतो.परत खाली उतरलो होतो.
       आम्हाला जे जे स्थळ दाखवु असे जे आश्वासन दिले होते.ते आश्वासन पुर्ण झाले होते.आम्ही परतीला फिरलो होतो.पण त्या प्रवासादरम्यान आलेले अनुभव अजुनही माझ्या स्मरणात आहे.बोटीवर चढायचे नाही.अशी ताकीद देणारे गुरुजी त्या ढालीतलवारी पुढे का हारले ते समजले नाही.पण आजही मला त्या खजुराहो लेण्यातील पिवळी साडी चांगली आठवते आहे.आजही भेडाघाटचा तो धबधबा,आणि ऐन वेळी माकडलीलेतुन आरशानं केलेली फजिती अजुनही आठवते आहे.तसेच या प्रवासादरम्यान मुलांची टिंगल टवाळकी आठवते आहे.तसेच या प्रवासादरम्यान त्या जयाचे त्या लावडीनसारख्या जटा आणि शितलमधील ती कालिमातेची छबी आजही आठवते आहे. बसमध्ये बसलेली जया तिचे कुरळे केस मला एखाद्या लावडीनसारखे दिसत असले तसेच शितल बसमध्ये काली अवतारात जरी दिसत असली तरी याच जया शितलन् केलेलं ढाली तलवारीचं काम आजही फिकं वाटत नाही.ही शितलच क्रिडामहोत्सवामध्ये कालीच्या रुपात दिसली होती.
        अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
"पर्यटन/सहल"........    सहलीची आठवण  झाली की लहानपणी शाळेत असताना गेलेली सहल डोळयासमोर जसेच्या तसे प्रसंग आठवतात.मी  सन १९६७-६८ साली मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवी मध्ये  शिकत असताना आमच्या शाळेची सहल  ढेबेवाडी ता.पाटण येथून फेब्रुवारी च्या महिन्यात आयोजित केली होती. सहलीचा मार्ग ढेबेवाडी ,पाटण,कोयनानगर, पोफळी, चिपळूण, रत्नागिरी, मलकापूर,पन्हाळा गड,जोतिबा ,कोल्हापूर,कराड,ढेबेवाडी असा मार्ग ठरविण्यात आलेला होता.आज आपला विश्वास बसणार नाही पण त्या वेळी प्रत्येकी फक्त र.रु.१०/-(दहा) सहलीचा प्रवास खर्च घेतलेला होता.आमची सहल एस. टी.ने आयोजीत केली होती.आमची सहल एस टी ने ढेबेवाडीहून पाटण मार्गे कोयनानगरला पोहचली त्या क
ठिकाणी आम्ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण पाहिले.अफाट पसरलेला जलाशय ज्याला शिवसागर समजतात तेथून वीज निर्माण करण्यासाठी ज्या ठिकाणाहून पाणी सोडलेले ठिकाण पाहिले.नंतर आम्ही घाट रस्त्याने वेडीवाकडी वळणे घेत दाट जंगलातून शेवटी आमची सहल पोफळी जल विध्युत केंद्र की ज्या ठिकाणी कोयना धरणाच्या मधून पाणी आणून वीज निर्मिती केली ते ठिकाण पाहणेसाठी पोहचलो. ते ठिकाण डोंगर पोखरुन तेथे वीज तयार करणारी यंत्रे पाहून अंचबितच झालो सर्व डोंगराच्या पोटात होते. सध्याचे बोगदे पाहून आता काही वाटणार नाही पण ७०-८०वषार्पूर्वी चा विचार केला तर अवघड काम होते. नंतर तेथून पुढे आमची सहल चिपळूण येथून कोकण महामार्गावर रत्नागिरी कडे जात असताना कोकणातील जनजीवन जवळून पाहता आले. त्याच मार्गावर गरम पाण्याचे झरे पाहण्याचा आनंद घेतला रुमालामध्ये तांदूळ बांधून त्या गरमपाण्याच्या झ-यात  रुमाल सोडला तर तांदूळ शिजून त्या चे भात काही मिनिटात तयार होतो असे तेथील लोक सांगत होते.तेथून पुढे निसर्गाचा आनंद घेत मुक्काम साठी रत्नागिरी येथे पोहचलो एस.टी.बसस्थानकवर एका मोठया इमारती मध्ये सोय करणेत आली होती. तेथून दुस-या दिवशी सकाळी आम्हाला अरबी समुद्राच्या किना-यावर गेलेलो होतो पहिल्या प्रथमच आम्ही समुद्र पाहत होतो आमचे गुरूजी म्हटले सर्वानी समुद्राच्या पाण्याने चुळ भरावी.त्याप्रमाणे चूळ भरल्यानंतर आम्हाला ते खारट आहे ते आम्हाला त्यावेळी कळले. नंतर आमची सहल परतीच्या प्रवास सुरु झाला त्या मार्गाने जात असताना मलकापूर मार्गे पन्हाळागडावर गेल्या नंतर तेथून पुन्हा आम्ही जोतिबा मंदीर येथे जावून दर्शन घेऊन नंतर कोल्हापूर येथे जावून तेथील महालकक्ष्मी मंदीर,खासबाग तालीम,रंकाळा तळे इत्यादि महत्वाची ठिकाणी पाहून कराड मार्गे ढेबेवाडी ता.पाटण जि.सातारा येथे रात्री उशिरा पोहचलो.अशी माझी ५३ वर्षापूर्वीची सहल होती....
लेखक..जी.एस.कुचेकर-पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
( 5)

सहल

सहल  या शब्दातच आनंद दडलेला आहे. सह म्हणजे सोबत सर्वांच्या सोबत काढलेली ती म्हणजे सहल. खरं म्हणजे सहल काढण्याचा उद्देश असा असतो की एकमेकांच्या सोबत राहून दिलखुलासपणे गप्पा गोष्टी गाणी याचा मनमुराद आनंद लुटणे तसेच आपण ज्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देणार आहोत त्या स्थळाची माहिती जाणून घेणे. आपल्या ज्ञानाची वृद्धिगत कक्षा वाढविणे. अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्याची लालसा निर्माण होणे. ही ज्ञान प्राप्तीची लालसा आपल्याला सहलीतून प्राप्त होते. सहलीमुळे आपल्याला वेगळा आनंद मिळतो. मित्र मैत्रिणी सोबत खाण्याची मेजवानी करता येते. आपण जिथे जाऊ सहलीला तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारचे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. सहल म्हणजे नुसता आनंद नव्हे तर विविध माहिती जाणून घेण्याची बुद्धीला लागलेली भूक आहे. ही बुद्धीची भूक आपण मिटविण्यासाठी आपल्यामध्ये जिज्ञासा, चिकाटी वृत्ती, ज्ञानलालसा हे गुण असणे आवश्यक आहे.

*संस्मरणीय सहल*
आज पर्यंत मी अनेकदा सहलीला गेले आहे.दरवर्षी आमची शालेय सहल निघत असते. मात्र एवढ्या सहलीपैकी मला माझ्या कुटुंबा सोबत केलेली चांदण्या रात्रीची सहल मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. ह्या चांदण्या रात्रीचा सहलीचा विचार आम्ही बहीण भावाने  मिळून मांडला होता. आणि हि आमची सहल एक आनंददायी , विलक्षण होती. आमच्या गावा जवळच्याच एका टेकडीवर जाण्याचे ठरले होते. घरातील आणि सर्व मंडळी मिळून निघालो. पौर्णिमेची रात्र होती. पौर्णिमेच्या रात्रीला  सारे आसमंत तुडुंब चांदण्यांनी भरलेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते आभाळ निरभ्र होते. आजूबाजूला शेती होती. गावाबाहेर शांतता होती. लखलखीत चांदण्यांचा प्रकाश झळकत होता. सुखद असा हवेतला थंडगार गारवा जाणवतं  होता . आजूबाजूला झाडे आणि आकाशातील चांदण्या असा सुंदरमय देखावा मनाला प्रसन्न करणारा होता. असा हा चांदण्या रात्रीच्या सहलीचा प्रवास अगदी आगळावेगळा होता. आम्ही यापूर्वी अनेक सहली काढल्या पुढेही काढू पण चांदण्या रात्रीचा तो सहलीचा प्रवास मनाला भावलेला होता.एक संस्मरणीय सहल म्हणून हा प्रवास जिवनात एक अविस्मरणीय, आनंददायी मनाला हर्ष करणारा होता. 

“आसमंतात दाटला चांदण्यांचा पसारा
नभात दिसे चंद्र हा शुभ्र लख्ख पांढरा
मधुमालतीचा पसरे हा गंध
 सारा
पुनवेच्या सहलीचा आनंदच न्यारा.”
〰️〰️〰️〰️〰️〰️
©️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे 
ता. हदगाव जि.नांदेड
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*माझी आगळीवेगळी सहल* 

*(09) सौ .यशोधरा सोनेवाने गोंदिया*
          पर्यटन म्हणजे दैनंदिन प्रवासाव्यतिरिक्त किंवा कामाव्यतिरिक्त केलेला प्रवास.कामातून सुट्टी मिळाली की त्यानुसार आनंद, मौज करीत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेले नियोजनबद्ध कार्यक्रम . पर्यटन म्हणजे फुरसतीचे पर्यटन होय.एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. मनोरंजन, फुरसत ज्ञानार्जन किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. 
    शैक्षणिक पर्यटन म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास होय.  यामध्ये शैक्षणिक सहली,शैक्षणिक परिषद किंवा संशोधनासाठी देशामध्ये किंवा देशाबाहेर केलेला प्रवास यांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या पर्यटनाला जास्त महत्त्व आहे कारण क्षेत्र अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या संकल्पना समजण्यास मदत होते.
    आरोग्य पर्यटनात पर्यटक आल्हाददायक स्वच्छ हवामानात आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्न् करतो. पूर्वी यालाच हवापालट असे म्हणत. प्रदूषणमुक्त व आल्हाददायक वातावरण व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात. अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात. उदा० महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा,  इत्यादी
    "निसर्ग "देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे .निसर्गामध्ये हवा ,पाणी, वृक्ष यांचा समावेश होतो.नैसर्गिक, भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. "निसर्ग" भौतिक जगाची घटना आणि सामान्यतः जीवनाशी संबंधित आहे. नैसर्गिक अभ्यासाचा एक मोठा भाग नसतो तर विज्ञानांचा एक भाग असतो. जरी मानव निसर्गाचा भाग असत, तरी मानवी क्रियाकलाप इतर नैसर्गिक घटनांपासून वेगळ्या श्रेणी म्हणून समजली जाते.
     माझी अनोखी सहल .आजवर दिवसा ढवळ्या सहलीला गेलेले आहोत.पण यात चांदण्यास रात्री सहलीला गेल्याास काय अनुभव येतो?  कोणते नयनरम्यन वातावरण आपल्यावला बघायला मिळु शकते  ? याचे वर्णन करण्यात आले आहे. चला तर मग सुरू करूया ,चांदण्या रात्रीची सहल चांदण्या रात्रीची सहल लिहीतांना मनात पुढील गोष्टी आल्याशिवाय राहत नाही. दिवसभराची सहल, वर्षा सहल, पहाटेची सहल, सायकलवरून सहल, गडावरचा फेरफटका असे सहलींचे विविध प्रकार आहेत . यावेळी  माझ्या  डोक्यात कल्पना आली की, आपण 'चांदण्या रात्रीची सहल' काढू या. एकदा कल्पना निघाली की, ती साकार करण्यास आम्हाला  विलंब लागत नाही.
     सध्या ही मे महिन्याचे दिवस आहेत. आकाशावर आक्रमण करण्याचे ढगांनी अदयापि योजिले नव्हते. त्यामुळे वैशाखी पौणिमेचा (बुद्ध पौर्णिमा ) दिवस निश्चित करण्यात आला. या दिवशी जंगलातील जाळयांतील करवंदे तयार होतात अशी माहिती कुणी तरी पुरविली, तेव्हा मुद्दाम डोंगराकडे जायचे असे एकमताने ठरले; आणि रात्री दहानंतर आम्ही सहलीसाठी प्रस्थान करण्याचे ठरविले. 
      गावातून बाहेर पडताना लक्षात आले की, सारे गाव शांतपणे झोपले होते, आपणच वेड्यासारखे घराबाहेर पडलो आहोत .नाहीतरी थोडासा वेडेपणा केल्याशिवाय कोणतेही असामान्य तत्व गवसतच नाही. पौणिमेचे चांदणे लक्षात घेऊन नगरपालिकेने आज रस्त्यावरचे दिवे लावलेच नव्हते. पण स्वच्छ पसरलेल्या कौमुदीने त्यांची उणीव भासू दिली नव्हती. कोणताच  कृत्रिम प्रकाश नसल्यामुळे चांदण्याचे खरेखुरे सौंदर्य आम्हांला तेव्हाच उमगले. चांदण्याला 'पिठूर' हे विशेषण लावणारी व्यक्ती खरोखरच कविमनाची! मे महिन्याचे दिवस असूनही ते चांदणे आपली शीतलता जाणवू  देत होते. दिवसभर होणारा अंगाचा दाह केव्हाच कुठे गायब झाला होता, त्यामुळे सहलीची लज्जत अधिकच वाढली होती. आजूबाजूच्या बंगल्यांच्या बागांतून फुललेल्या सायंकाळच्या फुलांच्या व रातराणीच्या मादक गंधाने सारे वातावरण भरून गेले होते. अशा वातावरणात शब्द मुके न झाले तरच नवल! त्या प्रसन्न चांदण्यात न्हाऊन निघत असतांना आम्ही गावाबाहेर केव्हा पडलो ते कळले देखील नाही, डोंगरचढणीचे दृश्य तर अनुपमच होते. नेहमी ओक्याबोक्या दिसणाऱ्या डोंगरांनी रुपेरी शाल पांघरली आहे. असे वाटत होते. करवंदांच्या जाळ्यावर तर चांदीची फुलेच फुलल्याचा भास होत होता. पायाखालच्या मातीचा स्पर्शही आगळावेगळा वाटत होता. दुपारच्या तळपत्या सूर्यकिरणांत पायांना टोचणारे आणि डोळ्यांत पाणी आणणारे सारे दगडगोटे कोठेतरी नाहीसे झाले होते ,आणि चांदण्याने धुऊन निघालेली ती भूमाताही मृदु मुलायम झाली होती. मला एकदम आठवण झाली कवी कुसुमाग्रजांची. त्यांनी आकाशातील या पूर्णचंद्राला 'स्वप्नांचा सौदागर' म्हणून संबोधिले आहे. माझी ही आठवण मी माझ्या सोबत्यांना ऐकविली, तेव्हा त्यांनाही अनेक आठवणी दाटून आल्या. मग काय? चांदण्याच्या गाण्यांचा पूर लोटला. जाळीत पिरणाऱ्या डोंगरच्या मैनेच्या कहाण्या आतापर्यंत केवळ ऐकल्या होत्या. पण आता समोर ती डोंगरजाळी पसरली होती. त्यांचा आस्वाद घेतांना बरोबर आणलेल्या खाऊच्या डब्यांची.आठवणही झाली नाही. पण आमच्या सोबत्यांनीही तेथे रसिकता दाखविली होती. रुपेरी चांदण्यात खाण्यासाठी निवडलेल्या वस्तूही तशाच होत्या. पांढरी "स्वच्छ मलईची बर्फी, पांढरीशुभ्र हलकीफुलकी इडली आणि मस्त, मऊ  दहीभात.
     रात्रभर त्या चांदण्यात लोळत असताना दुःख, द्वेष, असूया, चिंता हे सारे विकार हद्दपार झाले होते; साथ होती ती फक्त त्या चंद्रप्रकाशाचीच. कुणीतरी  त्या आकाशातील ग्रहतायऱ्यांची नावे सांगून त्यांची ओळख देऊ लागला. पण छे! ते रुक्ष शास्त्र कुणालाच तेथे रुचले नाही. तेथे कोणी शनी नव्हते, कोणी ध्रुव नव्हता, कोणी अरुंधती नव्हती. मग होते काय? लहानपणचा एक उखाणा आठवला, 'परडीभर फुले तुलाही वेचवेनात, मलाही वेचवेनात!'यापूर्वी अनेक सहली काढल्या होत्या, पुढेही काढू, पण चांदण्या रात्रीची ही सहल अगदी आगळीवेगळीच!

लेखिका 
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
   *(9420516306 )*
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
(08) *महेंद्र सोनेवाने गोन्दिया*

*पर्यटन गोंदिया जिल्ह्याचे*

 पर्यटन म्हणजे प्रवास.  इंग्रजी भाषेतील 'टुरिझम' या संज्ञेचा हा पर्याय आहे.  इंग्रजी भाषेत टुरिस्ट म्हणजे पर्यटक ही टुरिस्ट  ट्रॅव्हलर या शब्दाऐवजी एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी वापरण्यात येऊ लागली. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग म्हणून विकसित झाल्याचे दिसून येते. देशातील व परदेशातील पुरा वास्तू, इतिहासप्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे प्राचीन कला निर्मितीची केंद्रे, पवित्र तीर्थक्षेत्रे प्रचंड औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींचे आकर्षण ही पर्यटना मागील मुख्य प्रेरणा आहे.  ही प्रेरणा सार्वत्रिक व सर्वकालीन असली तरी आधुनिक काळातील ज्ञान प्रसाराची व दळणवळणाची सुलभ साधने विकसित झाल्याने आधुनिक पर्यटन उद्योगात विशेष चालना मिळाली. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित रम्य व भव्य असे ईहलोकीचे जे सौंदर्य आहे त्याची खास आस्था हा आधुनिक माणसाचा धर्म आहे. ते सौंदर्य सर्वांसाठी आहे अशी ही आधुनिक माणसाची धारणा आहे.  पर्यटना मागील आधुनिक माणसाची प्रेरणा वरील भूमिकेचा निर्वाळा देते.

आज मी येथे गोंदिया जिल्‍‍हयातील पर्यटन स्थळाबाबत थोडक्यात माहिती देत आहे. 
गोंदिया जिल्ह्यात मोजकी परंतू अतिशय सुंदर पर्यटन स्थळे आहेत. हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्ह्णून प्रसिद्ध आहे. पर्यटनासाठी या तलावांचा या जिल्हयात उपयोग करण्यात आला. या जिल्ह्यात पर्यटनासाठी ‍चांगला वाव आहे कारण या जिल्हाला मध्यप्रदेश व छत्तीासगड या दोन राज्यांची सिमा लागुन आहे. या जिल्हायात खालील प्रमाणे पर्यटन स्थळे आहेत.

सुर्यादेव मांडोबाई - हे स्थळ गोरेगाव तालुक्यातत आहे. गोंदिया पासून 37 किमी अंतरावर आहे.या ठिकाणी भगवान सुर्यादेव, देवी मांडोबाई, शिव, चे टेकडीवर मंदीर आहेत. हे स्थळ उंच हवेशीर आहे. याठीकाणी महाशिवरात्री, चैत्र नवरात्री व मकरसंक्रातीला यात्रा भरते.यावेळी जवळपास 15000ते 20000 पर्यंत भावीक याठीकाणी येवून पुजा अर्चना करतात.यावेळी प्रशानामार्फत तशी व्यवस्था  केली जाते.

महादेव पहाडी -महादेव पहाडी हे स्थळ आमगाव तालुक्यात आहे.आमगाव पासून 3 किमी अंतरावर आहे.या ठिकाणी भगवान शिव, दुर्गा माता, भैरव व गणेश यांचे मंदीर आहेत.हे स्थान उंच हवेशीर आहे. याठीकाणी महाशिवरात्री, चैत्र नवरात्री व अश्वि न नवरात्रीला यात्रा भरते.यावेळी जवळपास 15000ते 20000 पर्यंत भावीक याठीकाणी येवून पुजा अर्चना करतात.यावेळी प्रशानामार्फत तशी व्यवस्था केली जाते.

नवेगांव बांध - गोंदिया जिल्हयाच्या  दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्यात गोंदिया पासून 65 की.मी.वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस तसेच रेल्वेचे साधन आहे. यासाठी जवळचे रेल्वे  स्टेशन देवलगांव असून हे गोंदिय-चंद्रपुर या मार्गावर आहे.हे नागपुर पासून 150 की.मी.अंतरावर आहे.येथे धरण असून बोटींगसाठी प्रसिद्ध आहे.येथे जवळपास जंगलाचे प्रकार 5ए/सी3 असून याठीकाणी राष्ट्रीय उद्यान आहे यात 209 प्रकारचे पक्षी, 9 प्रकारचे सरपटणारे जाती, 26 प्रकारचे मांशाहारी जातीचे प्राणी राहतात.यात मुख्यत: वाघ,चिता,जंगली मांजर,हरीण, कोल्हा, लांडगा इत्यादी. येथे राहण्या साठी विश्रामगृह तसेच लॉज, हॉटेल्सह इ. आहे. आणि येथेच प्राणि संग्रहालय व वाचनालय आहे.

प्रतापगड - गोंदिया जिल्ह्याच्या  दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्यालत गोंदिया पासून 75 की.मी.वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस तसेच रेल्वेचे साधन आहे. हे नागपुर पासून 175 की.मी.अंतरावर आहे. येथे टेकडी असून महादेवाचे प्रसिध्द मंदीर आहे. येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. अतिशय रमनिय व नैसिर्गक देखवा आहे.

बोंडगाव-देवी- गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्याजत गोंदिया पासून 15 की.मी.वर हे स्थळ आहे. येथे जाण्या्साठी बस तसेच रेल्वेचे साधन आहे. हे नागपुर पासून 155 की.मी.अंतरावर आहे.येथे गंगा-जमूना देवीचे प्रशिध्द् मंदीर आहे. 

परसटोला- गोंदिया जिल्हयाच्या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्यात गोंदिया पासून 85 की.मी.वर हे स्थळ आहे. येथे जाण्या्साठी बस तसेच रेल्वेेचे साधन आहे. येथे महादेव चे प्रसिध्द मंदीर आहे.येथे यात्रा महाशिवरात्रीला भरते.

इटीयाडोह धरण- गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्यात गोंदिया पासून 90 की.मी.वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस तसेच रेल्वेचे साधन आहे. येथील भव्य जलाशय प्रसिध्द . मंदीर आहे.येथील निर्सगाचे रम्य स्थान आहे. 

शशिकरण पहाडी- गोंदिया जिल्हयाच्या दक्षिणेस सडक-अजूर्नी मोरगांव तालुक्यात गोंदिया पासून 30 की.मी.वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस तसेच रेल्वे चे साधन आहे. येथील भव्य जलाशय प्रसिध्द मंदीर आहे. येथे शशीकरण देवाचे मंदीर आहे. येथे नवरात्र व दसरा या दिवशी यात्रा भरते. 

घुकेश्वदरी माता मंदीर - गोंदिया जिल्ह्याच्या पुर्वेस देवरी तालुक्या त गोंदिया पासून 65 की.मी.वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे. येथील मंदीराचे मागील भागात अभयारण्य  आहे. व आदीवासी लोकांची वस्ती आहे.या ठीकाणी चैत्र नवरात्र चा सन यात्रेच्या  उत्साहात साजरा केला जातो. 

सिरपुर धरण- गोंदिया जिल्ह्याच्या पुर्वेस देवरी तालुक्यात गोंदिया पासून 75 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्या साठी बस चे साधन आहे. या धरणाच्यां चारही बाजूनी जंगल व टेकडया आहे. 

पुजारीटोला धरण- गोंदिया जिल्हयाच्यां पुर्वेस आमगाव तालुक्याकत गोंदिया पासून 50 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याधसाठी बस चे साधन आहे. या धरणाच्या चारही बाजूनी जंगल व टेकडया आहे. याठीकाणी  शैक्षणीक सहलसाठी अनेक शाळेतून विद्यार्थी येतात.

चित्रकुट पलार टेकडी- गोंदिया जिल्ह्याच्या पुर्वेस देवरी तालुक्यासत गोंदिया पासून 90 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याासाठी बस चे साधन आहे. हे स्थान देवरी - चिचगड -ककोडी या बस मार्गावर आहे.येथे श्रीराम हनुमान व गडमाता यांचे मंदीर आहेत. हे मंदीर जवळजवळ 150 ते 200 वर्षापुर्विचे आहेत.हे सथळ चारही बाजूनी जंगल घेरलेले आहे तसेच याठीकाणी उक तलाव सुध्दां आहे; याठीकाणी महाशिवरात्रीला, रामनवमी तसेच कार्तिक पौर्निमेला व हनुमान जंयती च्या दिवशी विविध कार्यक्रम घेतले जातात. व चैत्र नवरात्रीला मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्याात येते.

शिवमंदीर कामठा- गोंदिया जिल्हियाच्या  पुर्वेस गोंदिया तालुक्या त गोंदिया पासून 25 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याीसाठी बस चे साधन आहे. हे स्थान गोंदिया - कामठा -आमगांव या बस मार्गावर आहे.येथे भव्य शिवलींग आहेत. याठीकाणी महाशिवरात्रीला, मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्यामत येते. 

कोरणी-रजेगाव-गोंदिया जिल्ह्याच्या पुर्वेस गोंदिया तालुक्याात गोंदिया पासून 25 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे. हे स्थाचन गोंदिया - रजेगाव -बालाघाट या बस मार्गावर आहे. येथे भगवान विठठल- रूखमाई व हनुमान यांचे सुदंर मंदीर आहे. याठीकाणी आषाढी एकादशी व महाशिवरात्रीला, मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्‍यात येते.

शिवमंदीर नागरा- गोंदिया जिल्हयाच्या उत्तरेस गोंदिया तालुक्या्त गोंदिया पासून 7 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याीसाठी बस व आटोरिक्क्षा चे साधन आहे. हे स्थाान गोंदिया - रजेगाव -बालाघाट या बस मार्गावर आहे. येथे भगवान शिव ,भैरव व हनुमान यांचे सुदंर मंदीर आहे. याठीकाणी नवरात्री व महाशिवरात्रीला, मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्यात येते.

ताजूदीनबाबा-मजार-दांडेगाव-गोंदिया जिल्हीयाच्यार पश्चिमेला गोंदिया तालुक्यावत गोंदिया पासून 20 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्यांसाठी बस चे साधन आहे. हे स्थान गोंदिया - एकोडी - तिरोडा या बस मार्गावर आहे. येथे ताजूदीन बाबा चे व भगवान हनुमान चे मंदीर आहे. याठीकाणी उर्सच्या  वेळी मोठया प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्यात येते. 

नागझिरा - गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिनेस सडक-अजूर्नी तालुक्यात गोंदिया पासून 30 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याासाठी बस चे साधन आहे. हे स्थाान गोंदिया - कोहमारा या बस मार्गावर आहे. या अभारण्या चा परीसर एकुण 152.81 स्केस.कि.मी. आहे. या ठीकाणी 166 प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती, 36 सरपटणा-या प्राण्यांच्या  जाती व 34 प्रकारच्या जंगली प्राण्यांच्या  प्रजाती आहेत.
चुलबंध - गोंदिया जिल्हयाच्याा दक्षिनेस सडक-अजूर्नी तालुक्याात गोंदिया पासून 28 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे. हे स्थाान गोंदिया - कोहमारा या बस मार्गावर आहे. या ठीकाणी लघूपाटबंधारे विभागाचे मोठे जलाशय आहे. हा भाग वन विभागाचा आहे.

पोंगेझरा -बोळूंदा - गोंदिया जिल्ह याच्या  दक्षिनेस गोरेगाव तालुक्यात गोंदिया पासून 32 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे. येथे भगवान शिवचे मंदीर आहे.

पोंगेझरा -हिरडामाली- गोंदिया जिल्ह्य़ातील दक्षिनेस गोरेगाव तालुक्या्त गोंदिया पासून 15 की.मी. वर हे स्थ ळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे. येथे भगवान शिवचे मंदीर आहे. येथे भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

गडमाता- गोंदिया जिल्हयाच्या पुर्वेस सालेकसा तालुक्यात गोंदिया पासून 40 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याासाठी बस चे साधन आहे. येथे टेकडीवर देवी गडमाता चे मंदीर आहे. या टेकडी खालून कुवाढास नदी वाहते आहे. फार रमनिय असा नैसर्गिक वारसा या देवस्थानाला लाभला आहे. 

हाजरॉफाल- गोंदिया जिल्ह्याच्या पुर्वेस सालेकसा तालुक्यात गोंदिया पासून 55 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याासाठी बस चे साधन आहे. येथे टेकडीवरील पाणी खाली पडल्या मुळे धबधबा चे निसर्गरम्य व मनमोहक दृष्य आहे. या ठीकाणी धबधबा पाहण्यासाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

कचारगड- गोंदिया जिल्हायाच्याा पुर्वेस सालेकसा तालुक्याुत गोंदिया पासून 55 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याासाठी बस चे साधन आहे. येथे आदीवासी गोंड समाजाचे कुल दैवत असून चैत्र नवरात्रीला त्यांचा पांरपारीक सन मोठया उत्सासहात साजरा केला जातो. याचे मनमोहक दृष्य राहते. या ठीकाणी दोन मोठया गुहा आहेत. भाविक ,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

कालीसरार धरण- गोंदिया जिल्ह्याच्या पुर्वेस सालेकसा तालुक्या त गोंदिया पासून 55 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याासाठी बस चे साधन आहे. येथे येथील धरण हे मोठया टेकडयांनी बांधलेले आहे.त्यामुळे धरणाचे मनमोहक दृश्य दिसते. या ठीकाणी घनदाट जंगल पाहण्यासाठी जवळ-जवळ 30000 ते 35000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

डाकराम-सुकडी- गोंदिया जिल्हायाच्याा पश्चिमेस तिरोडा तालुक्या्त गोंदिया पासून 47 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस चे साधन आहे. येथे चक्रधरस्वाामीचे पुरातन काळातील मंदीर व महानुभव पंथाचे संत याची समाधी आहे. येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. 

बोदलकसा- गोंदिया जिल्ह्याच्या पश्चि‍मेस तिरोडा तालुक्याीत गोंदिया पासून 50 की.मी. वर हे स्थळ आहे. येथे जाण्याासाठी बस चे साधन आहे. येथे अतिशय रमनिय असा तलाव आहे हा तलाव जंगलात आहे. येथे पाटबंधारे विभागाचे विश्राम भवन आहे. येथे महाशिवरात्रीची यात्रा भरते. पाहण्याआसाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.
________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
मनाची सर्व्हिसिंग म्हणजे 'सहल'

मानवीदेहाला भगवंताने पाच ज्ञानेंद्रिये दिले आहेत.प्रत्येक ज्ञान हे वेगवेगळ्या इंद्रियांकडून माणसाला मिळत असते. त्यातल्या त्यात डोळे म्हणजे ८३ टक्के पेक्षा जास्त ज्ञान मिळवण्याचे साधन होय. 'भेटल्या भेटे आवडी' याप्रमाणे डोळ्यांची भूक भागवणे कठीणच.
'डोळ्यांची भूक नवजे माझ्या' या  संतोक्तीप्रमाणे डोळ्यांना इतरत्र बघतच रहावं वाटतं आणि निसर्गामध्ये ही ओतप्रोत भरलेलं सौंदर्य पाहण्यासाठी डोळे आतुर असतात. 

आदिमानव हा जंगलामध्ये वास्तव्यात राहत होता, नंतर तो समुदायामध्ये , टोळक्यांमध्येे राहू लागला. मानवी मनाची भूक भागवण्यासाठी,आणि निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी मनुष्याला डोळ्यांची माणसाला फार मदत झाली. पोट भरण्यासाठी मनुष्य पूर्वीपासूनच इतरत्र फिरू लागला. पोट भरताना त्याला निसर्गातलं सौंदर्य सुद्धा आनंद देऊ लागले. निसर्गातली स्वतः पाहिलेली गोष्ट आपल्या समुदायातील इतरांना सुद्धा दाखवावी ही भावना आणि उत्कंठा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. याच विचाराने आपण पाहिलेली एखादी गोष्ट कुटुंबातील इतरांना दाखवण्यासाठी तो प्रयत्न करु लागला. निसर्गातलं सौंदर्य,नदी ,डोंगर ,पर्वत ,समुद्र ,खाडी, कपारी ,आपल्या जवळच्यांना दाखवण्यासाठी त्याने आवर्जून 'शिवार फेरी' सुरू केली आणि यातूनच ' पर्यटन' अर्थातच सहल जीवनाला सुरुवात झाली.

'तीर्थाटन करणे' ही संकल्पना वैदिक काळापासून भारतीय समाजामध्ये रूढ आहे. तीर्थाटन करतांना देव-देवतांचे आशीर्वाद घेण्याचा मुख्य हेतू समोर ठेवून अनेक मंदिरे,लेण्या, स्तूप ,नद्यांना भेटी देण्याची परंपरा विकसित झाली. यामध्ये निसर्गातली सौंदर्य बघून,शुद्ध 'मनाची तृप्ति आणि समाधान' हेच जणू काय पुण्य मिळाले आहे.. अशी संकल्पना माणसाच्या मनात निर्माण झाली आणि आमचे डोळे तृप्त झाले,अशी भावना त्याच्या जिभेवरून उमटू लागली.
 
'बाल्यावस्था' अर्थातच 'ब्रह्मचर्य' अवस्थेमध्ये गुरूच्या घरी राहताना आवर्जून गुरुकुल पद्धती मध्ये निसर्गाचे सौंदर्य शिष्यांना दाखवण्याची परंपरा होती. तीर्थाटन आणि नर्मदा परिक्रमा या व्यवस्थेतील शिक्षण प्रक्रियेचा अविभाज्य घटक होत्या. याचा अर्थ वैदिक संस्कृतीतही तीर्थाटन  वा पर्यटन अथवा 'सहल' ही संकल्पना अस्तित्वात होती. 

त्यानंतरच्या काळामध्ये जाणीवपूर्वक पर्यटन करण्यासाठी माणसे घराबाहेर पडू लागली.नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यटनस्थळांना भेट देणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. यामध्ये निसर्गनिर्मित लेण्या, धबधबे,पर्वत, नद्या, पठारे, समुद्र,खााड्या यांचे पर्यटन होऊ लागले. मानवी मनाच्या आणि डोळ्यांच्या बाहुल्यांना 'नवे ते हवे' या मानसिक सिद्धांताचा वापर करीत नव्याने पर्यटनस्थळांची निर्मितीसुद्धा केली जाऊ लागली. यामध्ये बगीचे,पार्क ,उद्याने, प्राणीसंग्रहालय, समुद्र बीच, गोव्यासारख्या ठिकाणी पर्यटन अशा नवीन संकल्पना उदयास आल्या आणि पर्यटन हा एक व्यवसाय सुद्धा निर्माण झाला. यामध्ये प्रवासाची व्यवस्था करणारा व्यावसायिक, भोजनाची व्यवस्था करणारे हॉटेल वाले, मनोरंजन व करमणुकीची साधने विकणारे विक्रेते, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी फास्ट ची दुकाने, खेळणी,फोटोग्राफी ,शूटिंग यासारखे अनेक उद्योग आणि व्यवसाय निर्माण झाले. देवदेवतांच्या ठिकाणी आणि तीर्थाटनाच्या त्याच्या नावावर सुद्धा सहल काढली जाते.यातून देवतांचे दर्शन करणे, देवळांचे सौंदर्य पाहणे आणि खरेदी करणे हा सुद्धा हेतू असतो. कौटुंबिक सहली बरोबर शालेय सहल ही सुद्धा संकल्पना नव्याने रूढ झाली. तीर्थाटनाच्या ठिकाणीसुद्धा अनेक छोटे-छोटे व्यवसाय निर्माण झाले, आणि अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला. यामध्ये प्रसाद,खेळणी ,घरगुती जीवनावश्यक वस्तू यांची खरेदी विक्री होऊ लागली. यातूनच तीर्थाटन व पर्यटन, सहली याला आणखी चालना मिळत गेली.

पर्यटनामध्ये निसर्ग सौंदर्य पाहण्या सोबतच मनाला आनंद मिळवून घेणे ही सवय नव्याने रूढ झाली, आणि काही पर्यटनाच्या ठिकाणी नकोसे आणि गैर कृत्याचे प्रकार सुद्धा नजरेस प डू लागल्याने एक मोठी शोकांतिका निर्माण झाली आहे.किल्ल्यांच्या ठिकाणी सफर करताना तेथील भिंतीवर नकोसा मजकूर कोरण्याची लागलेली वाईट सवय ही खेदाची बाब आहे. अनेक लेण्यांमध्ये, गुफांमध्ये काही प्रकारचे लुटमार,चोऱ्या आणि बीभत्स वर्तन हीसुद्धा एक शोकांतिकाच असून पर्यटनाला लागलेली ती एक खीळ आहे.

शालेय जीवनामध्ये घडणारा 'सहल' हा प्रकार फारच आनंददायी आणि फायद्याचा आहे. नवीन ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक आणि मानवनिर्मित गोष्टींचे ज्ञान विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी सहल हा प्रकार अत्यंत उपयुक्त आहे. 'डोळ्याने मिळालेले ज्ञान हे मनुष्याच्या चिरकाल स्मरणात मध्ये राहते'  याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत फारच महत्त्वाचा आहे.
पर्यटन ही एक चांगली संधी असून यातून डोळ्यांचं पारणं फेडन्या सोबतच बुद्धीची भूक भागवण्यासाठी प्रयत्न केले जातात. आजकाल शासनस्तरावरून सुद्धा पर्यटनासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात, याचा फायदा घेऊन अनेक चाकरमाने मुद्दामहून आयुष्यामध्ये अनेक वेळा पर्यटन संधी उपभोगतात.

काहीकाही गोष्टींचे जाणीवपूर्वक ज्ञान मिळवण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये सफर जगाची ही संकल्पना रूढ झाली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल सफारी करण्याची पद्धत सुद्धा आता विकसित झाली आहे.समुद्राची सफर करण्यासोबतच समुद्रतळाची सफर करण्याची क्षमता सुद्धा तंत्रज्ञान विकसित केली आहे.हिमालयासारख्या पर्वतावर तंत्रज्ञानाच्या साह्याने घेऊन जाण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.याबरोबरच विश्वाची सफर करताना चंद्र तारे ग्रह यांच्या मध्ये सुद्धा कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने पर्यटन सुरू झाले आहे, हा एक विज्ञानाचा चमत्कारच म्हणावा लागेल. यासोबतच शेतकऱ्यांसाठी शिवार फेरी, मत्स्य पर्यटनासाठी व्यवसाय फेरी, उद्योगधंद्यांच्या विकासासाठी उद्योग  फेरी आणि सफर आज-काल नव्याने सुरू झाले आहे.

पर्यटन असो अथवा सहल यामधून डोळ्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा अनुभव मानवी मनाला मिळत असतो. अनेक भावभावनांचे चित्रण मनःपटलावर उमटते आणि यातून आनंदाच्या लाटा मनामध्ये निर्माण होतात.अनेक नवनवीन गोष्टींचे ज्ञान तर मिळतेच परंतु तेथे बघितलेल्या सौंदर्याने मन आनंदित आणि प्रफुल्लित होऊन जाते. मनाच्या हिंदोळ्यावर अनेक रचना सुचतात मन प्रसन्न होते, मनाची कळी फुलायला लागते आणि यातूनच खर्‍या अर्थाने मानवी मनाची सर्विसिंग होते. 

निसर्गाचे सौंदर्य बघून सोबतच ज्ञान मिळवता येईल यासोबतच निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी पाळूया... आणि आवर्जून पर्यटन करूया. पर्यटनाचा आनंद घेऊ या पर्यटनातून मानवी मनाची आणि बुद्धीची भूक भागवूया.  पर्यटनाला चालना देऊ या पर्यटन करूया आणि आपल्या मनाची सर्विसिंग सतत करत राहूया.

- श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी 
(वाकदकर)
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
एका ट्रिपची गोष्ट
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर(06) 
शहापूर ,(ठाणे)9226435827
         
 केल्याने देशाटन , पंडित मैत्री, 
सभेत संचार,
मनुजा चातुर्य येतसे फार ... "
  लहानपणापासून आपण अनेकदा ऐकलेली, वाचून - ऐकून अगदी पार गुळगुळीत झालेली ओळ.  या ओळींची सत्यता प्रत्येकाने आपल्या फिरस्तीमध्ये अनुभवली असेलच  फ्रान्सीस बेकन देखील म्हणतो -
"Travel in the younger sort , is a part of education ; in the elder, a part of experience ."
 थोडक्यात प्रत्येक पर्यटनात अनुभवांची शिदोरी आपल्या पदरात पडून आपलं व्यक्तिमत्त्व प्रगल्भ बनत असतं. असाच अनुभव देणारा पण थोडासा अंगावर शहारे आणणारा अनुभव आपल्याशी शेअर करीत आहे.
    1996/97 सालातली ही घटना आहे.शहापूर तालुक्यातील कळगाव ह्या गावातील जिल्हा परिषद शाळेत नुकताच शिक्षक म्हणून नोकरीला लागलो होतो.तसं हे गाव शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या सीमेवर आणि काळू नदीच्या तीरावर वसलेलं .शहापूर तालुक्यापासून तसं दूर असलेलं हे गाव. या गावातील विद्यार्थ्यांचा शहराशी तसा संबंध जवळ जवळ नव्हताच.अगदी तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहापुरलाही कधीतरी स्पर्धा व शैक्षणिक कार्यक्रमासाठी केव्हातरी मुलांना शिक्षकांच्या सोबत जाण्याची संधी मिळे.... तीही काही मुलांनाच...त्यावेळी शाळेत आम्ही चारच शिक्षक होतो.अशा परिस्थितीत शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक  व आम्ही सर्व शिक्षकांनी मुलांना कुठेतरी शहरी भागात सहलीस नेण्याची कल्पना मांडली.विचारविनिमय करता करता सहल मुंबई दर्शनला घेऊन जाण्याचं निश्चित केले. आमच्या वरिष्ठ कार्यालयाची व पालकांची रीतसर लेखी परवानगी घेऊन सहलीचा दिवस निश्चित केला. सहलीसाठी खास एस टी बस बुक करून पहाटेच 60 विद्यार्थी व 4 शिक्षकांसह आमची बस मुंबई दर्शनासाठी रवाना झाली.
   ग्रामीण भागातून आलेली मुले  मुंबईची चकाचक  दुनिया पाहून भारावून गेली. राणीच्या बागेतील विविध प्राणी(तेव्हा राणीच्या बागेत जवळपास सर्वच प्रकारचे प्राणी होते.)आणि तिथेच जवळपास असणारे वस्तू संग्रहालयात मुलांना गुंगून ठेवले.त्यानंतर आम्ही सारेजण गेट ऑफ इंडियाला आलो तिथल्या गर्दीत मुलांनी समुद्राचा व बाजूलाच असणाऱ्या ताजमहाल हॉटेलचं दुरूनच दर्शन घेतलं.त्यानंतर तारापोह मत्सालय पाहून नेहरू तारांगणात विविध ग्रह ताऱ्यांचं दर्शन घेऊन बच्चे कंपनी अगदी खुशी खुशीत हँगिंग गार्डन व चौपाटीचा फेरफटका मारून आमची बस संध्याकाळी 6 वाजता परतीच्या प्रवासाला लागली.
    सर्व बच्चे कंपनी  दिवसभरच्या गमती जमतीने व केलेल्या शॉपिंगने भलतीच खुश होती...गाणी म्हणत,भेंड्या खेळत आमचा परतीचा प्रवास मुंबईहून सुरू झाला.दुसऱ्या दिवशीच कोणतातरी सण असल्याने मुंबईमध्ये त्याकाळीही आजच्या सारखीच ट्रॉफीक होती. मुलांची गाणी खूप खूप रंगात आलेली असतानाच....अचानक आमची बस थांबली....आणि अचानक ड्रायव्हर सीट कडून एक जण वर चढला आणि त्याने ड्रायव्हरला खाली खेचण्यास सुरुवात केली.क्षणभर काय झालं हे आम्हा शिक्षकांसह कोणाच्याच लक्षात आलं नाही. पण "नीचे उतरो,नीचे उतरो..." हा दमदाटी भरला आवाज काहीतरी झाल्याचा आभास देत होता. ड्रायव्हर आपली स्टेरिंग सोडून खाली उतरत नाही हे पाहून 'त्या' व्यक्तीने ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली.ते पाहून खेडेगावातील आमच्या भांबालेल्या मुलांनी एकच गळका करून ओरडायला सुरुवात केली. एव्हाना आमच्या एक गोष्ट लक्षात आली होती की बसच्या पुढे असलेल्या रिक्षाला हलकासा धक्का लागल्याने हे सारं रामायण घडलं होतं.... आम्ही सर्व शिक्षकांनी विनंती करूनही समोरची व्यक्ती बस चालकाला खाली उतरण्याची गळ घालत होती....पण बस चालकाला खाली उतरल्यावर काय होऊ शकेल याचा अंदाज आल्याने तो उतरायला तयार नव्हता....एव्हाना रस्त्यावर भरपूर ट्राफिक झाल्याने अपले रक्षक पोलीस तिथे हजर झाले.... सरकारी गाडी असल्याने गाडीत चढणाऱ्या 'त्या' धटिंगाला ताब्यात घेतले त्यावेळी तो दारू पिलेला आढळला....पोलिसांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेऊन आमची गाडी  पुढे वाटेला लावून दिली...आम्ही सर्व शिक्षक व विद्यार्थी सुखरूप घरी पोहचलो पण मुंबईचा वेगळाच आवतार व ती भीती अजूनही आमच्या मनावर कायमची राहिली आहे.... जर पोलीस वेळेत पोहचले नसते तर......खरंच आजही हा प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात...

         डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
         शहापूर ,(ठाणे)9226435827
         harilbhoir74@gmail.com

(सदर माझा लेख 'महाराष्ट्र टाईम्स' वृत्तपत्रात मे 2017 मध्ये प्रसिद्ध झाला आहे)
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
(15)
एक सहल : निसर्गाच्या सानिध्यात

मुलांना अभ्यासातुन आणि शिक्षकांना अध्यापणातून थोडीशी विश्रांती म्हणुन आम्ही सहल काढण्याचे ठरविले होते. पण, सहल म्हटली की लांबचा प्रवास, त्यासाठी लागणारा खर्च, प्रवासात जाणारा वेळ, जाण्या-येण्याची दग-दग, प्रवासात मुलांची होणारी तग-मग या गोष्टी नजरेसमोर आल्या. मग या सर्व प्रश्नावर उत्तर म्हणून आम्ही शाळेपासून केवळ दोन-तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरजा-पूर्णा संगमेश्वराच्या पायथ्याशी सहल नेण्याचे ठरवले. हे ठिकाण असे होते ज्यामुळे सहलीसाठी खर्चही लागणार नव्हता, वेळसुद्धा वाया जाणार नव्हता आणि मुलांना मौज-मजा सुद्धा करता येणार होती.
याठिकाणी गिरजा आणि पुर्णा दोन नद्यांचा संगम झालेला असल्यामुळे इथला परिसर खूपच निसर्गरम्य असतो. 
सहलीचा दिवस उजाडला शाळेची निसर्ग सहल निघणार म्हणुन मुले अतिशय उत्साही होती. आज त्यांना दप्तरांपासुन सुटी मिळाली होती. मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या सोबत घेतल्या होत्या. सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यावर शाळेचा परिपाठ याच निसर्गरम्य वातावरणात पार पडला. त्यानंतर चिमुकल्यांनी खूप मौज-मजा-मस्ती केली. तरीसुद्धा त्यांना कुठलाही थकवा जाणवत नव्हता. उलट अतिशय उत्साहाने ते प्रत्येक कार्यात सहभागी होत होते. सर्वांनी येथील परिसराचे निरीक्षण केले. यावेळी शिक्षकांनी मुलांना या परिसराच्या अवती भोवती असलेल्या वनस्पतींची माहिती करुन दिली. त्यांचे वनस्पती शास्त्रामध्ये असलेले महत्व समजावुन सांगत आपल्या अवती-भवती असणाऱ्या झाडा-फुलांच्या इंग्रजी नावांची ओळख करून दिली. एरवी पर्यावरण हा विषय फक्त पुस्तकातच शिकणारे विद्यार्थी आज प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात हा विषय एकरुप होऊन समजुन घेत होते. 

विविध वनस्पतींची माहिती जाणुन घेतल्यानंतर सर्व मुलांनी आपल्या डब्यातील पदार्थ एकमेकांना देत एकत्रीत जेवण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. यावेळी शिक्षक सुध्दा मुलांमध्ये मित्रांप्रमाणेच मिसळुण गेले होते. 

पर्यावरण हा विषय मुळातच पुस्तकांमध्ये शिकण्याचा नसुन तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. त्यामुळे मुलांना केवळ पुस्तकात अडकवून ठेवुन आपण निसर्गालाही याच चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी निसर्ग संशोधन शाळा, निसर्ग वाचन, निसर्ग शाळा, निसर्ग परिचय केंद्र यांसारख्या संकल्पना पुढे येण्याची गरज आहे. अशा अनोख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनासुध्दा खुप फायदा होऊ शकतो याची प्रचिती त्यादिवशी आली. 
आमच्याच भोवताली असलेला परिसर नवीन दृष्टीने बघितल्याचा भास आम्हा सर्वांनाच होत होता.

सहलीचा आनंद घेतल्यानंतर शाळेकडे परततांना सोनू निगमचे मराठी चित्रपटातील हे गीत सर्व मुलं व शिक्षक एका सुरात म्हणू लागलो... 
“हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मग सरगम छेडा रे ...!” 

गणेश सोळुंके, जालना
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
      

           पर्यटन : माझी आवड


      'शाश्वत पर्यटन विकासाचे साधन' हे जागतिक पर्यटन दिनाचे म्हणजे 27 सप्टेंबर चे घोषवाक्य. पर्यटनातून विकास हे मूळ तत्व देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका महत्त्वाची आहे. निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालवण्याची आणि नवनवीन कला संस्कृती विषयी जाणून घेणे, हा पर्यटनाचा मूळ हेतू असतो. त्यामुळे आपल्याही ज्ञानात भर पडते. अर्थात करमणूक  मनोरंजन हा हेतू आहेच. त्या शिवाय नवीन जगाचे दर्शन होणे व रोजच्या जीवनापेक्षा नवा अनुभव मिळणे हाही हेतू साध्य होतो.

          पर्यटन म्हणजे एकटे किंवा समूहाने घर आणि कामाच्या जागी व्यतिरिक्त दूर राहून तेथील गोष्टींचा आनंद घेणे. या अनुभवांची शृंखला म्हणजे पर्यटन. पर्यटनामुळे आपली दृष्टी संकुचित न राहता व्यापक होते. त्यामुळे विचार चौफेर बनतात. पूर्वापार पर्यटन, देशाटन याला महत्त्व होते व आताही आहे.

          पर्यटनाचे विविध प्रकार आहेत. सांस्कृतिक पर्यटन, शेतीप्रधान पर्यटन, कौटुंबिक पर्यटन, इतिहास विषयक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, कौटुंबिक पर्यटन  व्यवसाय व व्यापार विषयक पर्यटन, शैक्षणिक पर्यटन, क्रीडा पर्यटन असे विविध प्रकार आहेत

          .आम्हाला टांझानिया या देशात वैद्यकीय पर्यटन म्हणून जायचा योग आला. तिथे बुकोबा हे शहर आहे. त्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर हे कगेरा गाव आहे. कगेरा नदी जेथून वाहते तिच्या काठावर वसलेलं एक छोटसं गाव. गाव कसलं आपल्या कोकणातील वाडीच म्हणा हवं तर ! नदीकाठ ,आफ्रिका खंड ,त्यामुळे बारा महिने पाऊस . त्यामुळे कायम सृष्टी देवीचे रूप हिरवे आणि हसरे .आमच्या पासून अगदी जवळच भोवताली दाट झाडीचे जंगल .अशा निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही रहात होतो . 

         जवळ ज्या साखर कारखान्याचे इरेक्शन चे काम चालू होते तो भाग. त्याच्याजवळ तिथल्या स्थानिक कामगारांची छोटीशी वस्ती.ही कृष्णवर्णीय धिप्पाड लोकं. काही जणांकडे पाहून खरच भीती वाटे. पण मनाने मात्र ही लोक अगदी साधी भोळी .त्या लोकांना शेती शिवाय दुसरे काही माहीतच नसायचे .तिथे जमीन इतकी सुपीक की त्यावर कसलाही दाणा टाका तो रुजलाच पाहिजे. त्यामुळे हे लोक मक्याचे पीठ ,कच्ची केळी , बीन्स आणि गाईचं मास उकडून खायचे. हेच त्यांचं अन्न.

        काळ्या मातीत वेगवेगळे वाफे तयार केले तर जसे दिसेल तशी तेथील बायकांची केशरचना असायची. अंगात वन पीस भडक रंगाचा केटंगे घातलेला असे . पाठीवर रंगीबेरंगी कपड्यात लहान बाळाला बांधलेले असायचे . ते मूल त्यात अगदी आरामात पहुडलेले असायचे. पुढून आपल्याला कळतच नाही की पाठीवर मूल आहे. हे पाहायला मला खूप मजा यायची . दोन्ही हात काम करायला मोकळे.

         आपल्याकडे कामाला येणाऱ्या बायकांकडून शुभ सकाळ ,सुप्रभात वगैरे ऐकण्याची सवय नाही . पण तिकडे मात्र आल्या आल्या आपल्याला विश करणार. कसे आहात म्हणून विचारणार. अर्थातच त्यांच्या भाषेत - स्वाहिलीत ‌. त्या भाषेला 'म' हे अक्षर जास्त आवडत असावे असे वाटते .प्रत्येक भाषेची काहीतरी खासीयत असतेच ना!

       माझे पती डॉक्टर. त्यामुळे लोकांना तपासणे ,औषधे देणे हे तर त्यांचे कामच. पण नुसते एवढे करून तिथे भागत नसे. आम्ही रहात होतो तो भाग खूप इंटेरिअर चा होता. पेशंट होमसिक होऊ नये म्हणून पण काळजी घ्यावी लागे. त्यांच्याशी गप्पा मारणे, टोमॅटोचे सूप करून देणे, या गोष्टीही करायला लागायच्या.  ह्यात पण मजा असायची . अशा साध्या क्षुल्लक गोष्टींमुळे मैत्रीतली वि‌ण कायमची घट्ट विणली गेली. तेथील मेडिकल टीमचे सेमिनार्स घेणे, लेक्चर देणे, याही गोष्टींचा अंतर्भाव होता

           आम्ही जेथे राहत होतो तिथे खरे तर एक जंगलच होते . माणसाने त्यावर अतिक्रमण केले होते. बरेचदा नाग-साप यांना राग अनावर झाला की ते घरात घुसायचा प्रयत्न करायचे.  सगळीकडे जाळ्या  होत्या . तरीही त्यांचा उपद्रव होत असे . कितीतरी वेळा जाळीवरुन साप सरपटत जाताना दिसे आणि माझ्या छातीत धडकी भरे .कारण मला सापाची फार भीती वाटते . मला ध्यानी-मनी-स्वप्नी तोच दिसायचा.

              तिथल्या जमिनीत डूडू नावाचे किडे असायचे. ते आपल्या पायाच्या बोटातून आत शिरायचे. मातीत जर लहान मुले खेळत असली तर बटॉक्स मधून आत शिरायचे. कसे ते कळायचे नाही. त्या जागी मग सेप्टीक होई. चार दिवसांनी त्यातून अळी सारखा भाग बाहेर काढावा लागे. त्यामुळे माझ्या मुलांची मला खूप काळजी घ्यावी लागे.

           तिथे कसेल त्याची जमीन.आपल्याकडे जमिनीचा तुकड्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठतात .पण येथे सारे मुबलक होते .लोकसंख्या खूप कमी . जमीन अगदी वर्जिन अन् सुपीक. मला नेहमी  वाटायचे भारतातून एक शेतकऱ्यांचा तांडा आणावा येथे जमीन कसायला.कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, कांदे ,विविध प्रकारच्या शेंगा भाज्या आणि केळी हे आम्हीपण परसात लावायचो. अशी सृजनशील सृष्टी बघायला खूप मजा वाटायची. इथे झाडांना पाणी घालायला लागायचे नाही .कारण रोज साधारण दुपारी तीन-चारच्या सुमारास पाऊस जोरात पडायचा .तास-दीड तास हजेरी लावून परतायचा .लगेच ऊन्हहि पडायचे. बरेचदा मस्त इंद्रधनुष्याचा गोफ आकाशात विणलेला दिसायचा. मन भारावून जायचे. पावसाचा कुठे चिखल नाही. पाणी जमिनीत लगेच मुरायचे .संध्याकाळी आम्ही तिथे बॅडमिंटन खेळायला पुन्हा मोकळे .अशी तिथल्या मातीची किमया.

             जवळच जंगल असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी आम्ही बरेचदा वनभोजनाला जायचो . तेथे नुसती दाट हिरवाई आणि त्याचा ओला सुगंध. किरणांना फांद्या ,पाने बाजूला सारून डोकवायला लागायचं.हिरवे गवत वाऱ्याला लवून मुजरा करीत होते .आम्ही वनभोजनासाठी अशीच जागा शोधली जिथे वृक्षांनी सभामंडप उभारला होता .या सभामंडपाची श्रीमंती डोळ्याचे पारणे फेडीत होती .सभामंडपाच्या हिरव्या किमयेने मन अगदी तृप्त होत होते. फांद्या वाऱ्याबरोबर झुलत होत्या .पोपटी छताच्या जाळी जाळीतून निळ्या आभाळाची नक्षी दिसत होती. वृक्ष शालीन आणि संयमी. हिरवेगार वृक्ष ऋषी मुनींसारखे एका जागी बसले होते आत्ममग्न होऊन. निसर्ग यागासाठीच ते एकत्र जमले असावेत. त्यांचा निसर्ग घोष कानांना तृप्त करीत होता.रानाशी आपलं मैत्र जुळावं लागतं. ही हिरव्या लोकांची मांदियाळी आनंदाने मैत्रीचा हात पुढे करत असते . वृक्षांच्या संगतीत मनातली जळजळ कमी होऊन शांत वाटायचे. इथे आल्यावर मैत्रीच्या झाडाला दिलखुलास फुले आल्यागत आनंदाला बहर येतो. मैत्रीची फुले उमलली पाहिजेत मग. सुंदर पक्षी पाहिले की डोळे त्यांचा फोटो काढून मनात ठेवून द्यायचे .कारण तेव्हा मोबाईल नव्हते ना. लांबवर एखादी हत्ती ची फॅमिली जाताना दिसायची .हरणांचे कळप पळत पळत जाताना दिसायचे .मग दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. तेथील कोकिळाहि तान घेताना कुहू कुहू करायची बर का !उरलेल्या खरकट्यावर ताव मारण्यासाठी कावळेही काव कावच करायचे हं! 

        तिथे चूल पेटवून स्वयंपाक करण्याची मजा काही औरच .त्यात गाण्याची साथ . तो माहौल असा असायचा की  ओठ आपोआप गाऊ लागायचे ! 

             वन्य प्राण्यांचे अभयारण्य म्हणजे सफारी पाहायलाही आम्ही गेलो होतो. किलिमांजारो ह्या ठिकाणी आम्ही सफारी ला गेलो होतो. लँड रोवर गाडीतून संपूर्ण अरण्याचा तीन ते चार तासाचा फेरफटका असतो. रस्त्यातून जाताना हत्तीची फॅमिली जाताना दिसली. ती जाईपर्यंत गाडी थांबत असे मधूनच झेब्रा कळप जाताना दिसले. मधून मधून जिराफही दिसत होते. पाण्यातील गेंडे पाहून मात्र भीती वाटत होती. लांबवरून हरणांचा कळप पळताना दिसले. एकदा तर आमच्या गाडीच्या जवळ एक सिंह व दोन बछडे असे बसले होते. इतके रुबाबदार की त्यांना जंगलचा राजा का म्हणतात हे मला अगदी पटलं. तळ्याकाठी इतके तऱ्हेतऱ्हेचे पक्षी बसलेले होते की ते पाहून डोळ्याचे पारणे फिटले. माकडांचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळाले. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहून मन भरून पावले..

          तेथे आम्हाला सृष्टीच्या जवळ जाता आलं.. सृष्टीने  काही आम्हाला नियम शिकवले. निसर्गाशी मैत्री केली तर ती आपल्याला भरभरून देते. मला सृष्टीचा आस्वाद खूप छान घेता आला. .आज इतकी वर्षे झाली तरी त्या गावा  बद्दलचे ममत्व थोडे सुद्धा कमी झालेले नाही .अंतरातला एक कप्पा त्याने व्यापलेला तसाच कायम आहे . हे सर्व खरे असले तरी त्या वास्तूचा निरोप घेणे अटळ होते. कारण आम्ही पर्यटनासाठी गेलो होतो.  जिची ओढ मला कायम होती त्या  माझ्या मायभूमीकडे आम्ही परत आलो....

शुभदा दीक्षित (11)
पुणे
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*गोमुख ट्रॅक*
     
      गोमुख म्हणजे  गंगाचा उगम. वयाच्या छपवनाव्या वर्षी मी गोमुखला गेले. गोमुखचा ट्रॅक म्हणजे  १३६००फूटाचे चढण १८ कि.मी. चालून चढायचे. गंगोत्री पर्यंत तर बसने पोहोचलो. दुसऱ्या दिवशीच पहाटे चढायला सुरुवात केली. 
       हा संपूर्ण ट्रॅक माझ्या करीता  विलक्षण अनुभव होता.
ती हिरवी वनराई  पाइन, देवदारची वृक्षराजी. विविध रंगछटाची फूले. ते खळखळ वाहणारे निर्झर. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या अवखळ नद्या. त्याचा प्रवाहालात्या आवाजात एक वेगळीच लय होती. सगळे वातावरणात एक वेगळीच दिव्यानुभूती होत होती. 
      भोजबासाला पहाटे चार वाजता सूर्योदय पहायला गेलो . चहूबाजूंची हिमशिखरे अगदी लालभडक दिसत होती जणू धरणीच्या भाली सूर्याने  मळवट भरला होता . हुळु हळू ती रक्तिम आभा तापलेल्या सुवर्णा सारखी दिसु लागली. हलकेच सोनेरी प्रकाशने ती सारी हिमशिखरे स्वर्णमंडित झाली. आकाशी रंगलेली ती  स्वर्णिम होळी च जणू. विलोभनीय दृश्य आणि अप्रतिम अनुभव.
       दुसर्‍या दिवशी सकाळी गोमुखला जायला निघालो 
जाऊन येऊन एकंदरीत अकरा किलो मिटरचा प्रवास होता.
 दिड - ते - दोन फूट रुंद ओबडधोबड पायवाट एका बाजूला उंच उंच  पर्वतांची रांग, आणि दुसऱ्या बाजूने हजारो फूट खोल दरी, त्यातून प्रचंड वेगाने वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याचा आवाज . पाण्याच्या वेगा बद्दल आमच्या ट्रॅक लिडरचे म्हणणे. "जर कोणी ह्या पाण्यात पडले तर त्याचा प्रवाहाच्या वेगाने शरीराची शंभर शकले होऊन पाच मिनिटांत पाचकिलोमीटर दूर पोहोचली असतील. अशी अवघड वाट. मला आठवले जुन्या काळी लोक चार धामची यात्रा आयुष्यात शेवटी करायचे. जाताना त्याचा विदाय समारोह सुद्धा बराच ह्रदय स्पर्शी असायचा जगलो वाचलो तर परत भेटू अशा भावना असायचा.
        शेवटच्या  टप्प्यात मी एकटीच  चढत होती,
अनोळखी जागा, अतिशय अवघड चढण, जीवन आणि मरणा मधे फक्त एका पावलांचे अंतर. पण भीतीचा लवलेश ही नव्हता. सोबत करणारा तो आवाज मला संजीवनी देणारा शंखनादच होता.  *एक अद्भुत अनुभव होता. मन अगदी निर्विचार ,निर्विकार झाले होते निसंगपणाचा साक्षात्कारच होता जणू*. मृत्युचे अस्तित्वच संपले होते.
      परतताना १४ किलोमिटर चा सलग ट्रॅक होता .अंधार व्हायचा आत गंगोत्रीला पोहोचायचे होते. वयोमाना मुळे मी हळु चालायचे. म्हणुन ट्रॅक  लिडरच्या सल्याने मी पहाटेच एकटी निघाली. तो च मंत्र मुग्ध करणारा पाण्याचा आवाज आणि मी,  ती अवघड पायवाट आता ओळखीची वाटत होती. दोनतीन  किलोमीटर चालल्या वर  समोर एक अवखळ नदी , पार करायला त्याच्या वर झाडाचा छोटासा अरुंद ओंडका टाकलेला. मला एकदम आठवले येताना मला ह्याचा वरुन चालायला जमले नव्हते . मी तिथेच थबकले. त्या ओंडक्या वर चालायची हिंमतच होत नव्हती. बराच वेळ झाला, आमची सगळी टीम पोहोचायला दोनेक तासाचा अवधी होता. काय करावे काही सुचेना. अचानक मागून आवाज आला,"चलो चलो पहाड़ोंमें ड़रते नहीं"  मान वळवून पाहिले तर एक भगवाधारी साधु. कशी काय पण माझ्यात हिंमत आली आणि मी पाऊल पुढे टाकले, आणि न घाबरता ती अवखळ नदी पार केली. दोन चार  पावले पुढे गेले, त्या साधु चा आभार  मानायला मागे वळून पाहिले, तर तो साधु तिथे नव्हताच आजुबाजुला कुठेही दिसेना , अदृश्य झाला होता . का कोण जाणे पण माझ्या अंर्तमन कृतज्ञतेच्या भावनेने काठोकाठ भरले.
 *एक अद्भुत अनुभव*,"  *साक्षात  दैवी कृपाच* ".

डाॅ.वर्षा सगदेव नागपूर 
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*पावसाळी सहल* 
       "पोट प्रपंच करतात सारेच स्वतःसाठी जगतात सारेच, दुसऱ्यांसाठी जगणारा, दु:खिताना तारणारा, माणूस मी शोधतो आहे, माणूस मी शोधतो आहे. माणूस म्हणजे परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती". परंतु आज माणसाने आपल्या कृतीतून प्रत्यक्ष निर्माण कर्त्यालाही लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे.
      सध्याच्या युगात मानव हा भरकटलेला आहे त्याला ध्यानधारणा खूप महत्वाची आहे. त्या साठी आम्ही कटंगी डॅम या ठिकाणी नेली आणि शालेय जीवनात आपण विद्यार्थ्यांना जर अशा ठिकाणी सहलीच्या निमित्ताने भेट दिली तर भेटीचा उद्देशही साध्य होतो.
      आगस्ट महिन्यात  एकदिवसीय/पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात आली. कटंगी डॅम येथे सत्संग सुरू होता.त्या निमित्त सहल आयोजन करण्यात आली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी अल्पोपहार केला नंतर सत्संगच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना विविध भजने/प्रवचन,आणि मानवकेंद्र म्हणजे काय ह्याविषयी जेष्ठ आणि अनुभवी व्यक्तींनी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी आपली कला ही सादर केली.यानंतर प्रसाद घेऊन निसर्गाच्या सानिध्यात /बागेत व डॅम वर सर्वांनी पावसाचा मनसोक्त आनंद घेतला.त्या ठिकाणी असलेल्या झाडाची ओळख करून देण्यात आली. पाण्यात असलेल्या लहान जीवनाची आपल्या पद्धती ने ओळख करून दिली त्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो,परतीचा प्रवासही अविस्मरणीय होय.

श्री. सुंदरसिंग साबळे
     मो .9545254856
गोंदिया
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
सहल
07

भिलार - पहिले पुस्तक गाव

  एकमेकांना मानवी मनाची भावना समजावून सांगण्याचा एकमेव चांगला मार्ग म्हणजे पुस्तक.पुस्तके आमचे चांगले मित्र आहेत.ज्यामुळे आपण स्वतःचे मनोरंजन करू शकतो.ज्ञान वाढवून आपण विकास करू शकतो पुस्तके जीवनाला चांगले वळण देण्याचे काम करतात पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती सहज मिळते.वेल्स शहरात हे-ऑन-वेपासून प्रेरित होऊन, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील भिलार गाव हे देशातील "पहिले पुस्तक गाव" म्हणून घोषित करण्यात आले.सरकारच्या वतीने त्याच खेड्यातील लोकांशी चर्चेनंतर त्यांच्या घरातले 45 लोक  जागा देण्याचे मान्य केले.  त्यापैकी 25 घरांची निवड करण्यात आली. 4 मे 2017 रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमंत्री माननीय विनोद तावडेजी यांच्या नेतृत्वात मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने भिलार गावाला "पुस्तक गाव" घोषित केले.गावात साहित्याची सुमारे 15000 पुस्तके आहेत.कल्पनारम्य, कविता, धार्मिक, महिला, बाल साहित्य, पर्यावरण, लोकसाहित्य, जीवन आणि आत्मकथन अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची स्थापना वेगवेगळ्या ठिकाणी झाली. भिलार गांव  महाबळेश्वरजवळ पाचगणीपासून km किमी अंतरावर आहे.  ज्या 25 घरांमध्ये ती पुस्तकांमध्ये ठेवली गेली आहेत तेथील घरमालकांनी वाचकांना त्यांच्या घरात बसण्यासाठी आणि वाचण्यास जागा दिली आहे.ज्या वाचकाला जे पुस्तक हवे आहे ते त्या त्या विभागाप्रमाणे तिथे असलेल्या घरात जाऊन पुस्तके वाचतात.वर्तमानपत्र, मासिकांचा एक वेगळा विभाग आहे.जे भाषा प्रेमी, साहित्यप्रेमी आहेत. त्यांच्यासाठी ही जागा चांगली आहे. मीही माझ्या काही मैत्रिणीसह तिथे गेले. प्रथम आम्ही ऑफिसला गेलो.  तिथे भिलारवर  प्रोजेक्टवर बनलेली एक डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली.खूप छान माहिती मिळाली.मग आम्ही आमची  लीहलेली पुस्तके ऑफिसमध्ये भेट म्हणून दिली.त्यामुळे त्यांनी आम्हाला आभाराचे पत्र दिले. आम्हाला ते खूप आवडले.तिथे जाऊन आलेली आठवण म्हणून भिलारचे चित्र असेले मुद्रित कीचेन ,चहाचा कप विकत घेतले.मग भुकेची जाणीव झाली. जवळच आम्हाला  स्वादिष्ट जेवण मिळाले. भोजना नंतर आम्ही एक एक विभाग बघू लागलो.प्रत्येक घराच्या बाहेरील खोलीत, वेगवेगळे विभाग आकर्षक चित्रांनी रंगविले ​​आहेत.वाचकांना वाचण्यासाठी छान सोय केली आहे. असे विविध विभागात भेटी दिल्या. माहिती घेतली.जवळच एका ठिकाणी थांबून कोकम सरबत पिले.मनाला, तनाला शांतता देऊन तिथून निघालो. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही आठवणी मनात ठेवून परत आलो.वाटेत येताना पाचगणीत थांबून विविध सरबते,चॉकलेटस् खरेदी करुन आनंदाने, समाधानाने घरी परत आलो.सर्व मैत्रिणी साहित्यिक असल्यामुळे सहलीला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला होता.

 श्रीमती माणिक नागावे 
 कुरुंदवाड, जिल्हा.  कोल्हापूर
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
पर्यटन

       सहलीला जायला कोणाला आवडत नाही? लहानांपासून वृद्धांपर्यंत सारेजण सहलीला जाण्यासाठी उत्सुक असतात. शालेय जीवनात असणाऱ्या छोट्यामोठ्या सहलीला परवानगी मागण्यासाठी मुले पालकांकडे मनधरणी करत असतात. काहींना परवानगी मिळते तर काहींना मिळत नाही, तेव्हा हिरमुसली होऊन ती बसतात. सहल, पर्यटनामुळे इतिहास, भूगोल, विज्ञान यांचे सखोल ज्ञान मिळते. नागरिकशास्त्राचे धडे मिळतात. जगात व्यवहार करण्याचे ज्ञान प्राप्त होते. म्हणूनच म्हटले आहे 'केल्याने देशाटन'.
        पर्यटनामुळे निसर्गातील सौंदर्यस्थळे कवीच्या लेखणीतून अजूनच रम्य वाटतात. 'जे न देख सके रवी ते देख सके कवी' असे उगीच नाही म्हटले. निसर्गसृष्टीत त्यांच्या प्रतिभाविश्वाला बहर येतो नि सुंदर कलाकृतींची निर्मिती होते. चित्रकार, पेंटर नि मूर्तिकार या सुंदर अशा सृष्टीसौंदर्याचा आविष्कार अजूनच फुलवतात. पर्यटनामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो. मार्गदर्शक, गाडीचे चालक, मालक, हॉटेल ,लॉजिंग क्षेत्रातील विविध उद्योगांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवला जातो. देशातील, जगातील पवित्र स्थानांचे दर्शन करून पापक्षालन केल्याचे समाधान मिळते. सर्व जाती धर्मांच्या संस्कृतीची ओळख होते.
          आपल्या परिसराचा,परिस्थितीचा आढावा घेता येतो.'जे जे काही आहे नवे तेथे सर्व डोळ्यांनी पाहायलाच हवे' असे वाटून आपण सर्व पर्यावरणाचा अभ्यास करतो,आनंद लूटतो. पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमींना पर्यटन ही आनंदाची पर्वणीच असते. अशा स्थळांना भेटी देऊन भौगोलिक वस्तुस्थितीचा आढावा घेतला जातो. जगात जे काही रमणीय, नयनरम्य आहे ते पाहिल्याने मनचक्षूंना आनंद प्राप्त होतो. गृहिणींना दैनंदिन कामातून तसेच नोकरदारांना ऑफिसच्या तणावातून मुक्त व्हायला पर्यटन हा उत्तम पर्याय आहे.प्रवासात, निरनिराळ्या  जातीधर्माचे, संस्कृती, भाषांचे लोक भेटतात. त्यातून ओळख, मैत्री आणि वैचारिक देवाणघेवाण होते. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता येते. हे सर्व पर्यटनामुळे साधता येते.चार आठ दिवसांचा विरंगुळा मनुष्याला भावी वाटचालीसाठी आनंद, चैतन्य, मनःशांती पुरवणारा ठरतो.मनसोक्त, स्वच्छंद हिंडल्यामुळे शरीराची आणि मनाची मरगळ निघून जाते. थकवा निघाल्यानंतर मनुष्य ताजातवाना बनतो. पुन्हा दैनंदिन कामाचा ताण वाटत नाही. कारण निसर्गाच्या कुशीत विरंगुळ्याची इतकी साधने आहेत की आपण नव्या जोमाने जगायला शिकतो.
            प्राणी पक्षी यांच्या सहवासाने त्यांच्यासारखे मुक्त होऊ पाहतो. आपल्या शरीराच्या, मनाच्या व्याधी दूर करायला पर्यटन उत्तम पर्याय आहे.आपले मन प्रसन्न होते. नवनवे खानपान, आहार, विहार आपणास एखाद्या अनोख्या दुनियेत गेल्याचा आनंद देऊन जातो. म्हणून वर्षातून एकदातरी घरापासून लांब निसर्गाच्या सानिध्यात जावे, हसावे. त्यामुळे नवसंजीवनी प्राप्त होते. निसर्गातील चमत्कार पाहायला मिळतात. लोकांचे दुःख दारिद्र्य पहायला मिळाले तर आपण त्यांच्याहून खूप सुखी आहोत याची प्रचिती येते नि दुसऱ्यांच्या साह्यासाठी आपली मदत होते. भाग्यविधात्याची आपल्यावर कृपा आहे याचा साक्षात्कार घडतो.आपल्यातील माणूसकीचा झरा आपसूकच जिवंत होतो.

सौ.भारती सावंत
मुंबई
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
23)  पर्यटन , मनमुराद आनंद
       सुधाकर रामदास पाटील
         ठाणे
7798963063

        सहल किंवा पिकनिक हा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर आनंदाची कळी उमलल्या शिवाय राहत नाही, कारण फिरणे हा प्रत्येकाचा स्थायिभाव आहे. प्रत्येकाला पर्यटन आवडते. एखाद्याला निसर्गात भटकायला आवडते तर एखाद्याला गड-किल्ले आवडतात. एखाद्याला तीर्थक्षेत्री फिरायला आवडते तर एखाद्याला देश विदेश हिंडायला आवडतं,  पण फिरणे मात्र सगळ्यांनाच आवडते . एप्रिल आणि मे महिने म्हटले सगळ्यांचे पर्यटन ठरलेलं असतं. किंबहुना एक वर्ष आधीच किंवा निदान सहा महिने आधी सर्व बुकिंग झालेली असते. सगळेजण एप्रिल मेच्या सुट्ट्यांची वाट पाहत असतात.  पण 2020 ने मात्र सर्वांची निराशा केली आहे. कोरोना नावाचं भूत आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर येऊन बसले आहे आणि त्याने सर्वांनाच घरातच स्थानबद्ध करून ठेवले आहे. सगळ्यांचीच एक प्रकारे घुसमट सुरू आहे. मुलांना समुद्रकिनारे खुणावताहेत. युवकांना गड किल्ले बोलवत आहेत तर वृद्धांना तीर्थक्षेत्रे आवतण देत आहेत.  पण सगळ्यांच्या पायात बेड्या घातल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. 2020 हे वर्ष कोरोना प्रभावित वर्ष म्हणून कायमस्वरूपी स्मरणात राहील. कोरोनाने सगळ्यांच्या मार्गात अडचणी निर्माण केल्या आहेत. मग त्यातून पर्यटन तरी कसे सुटेल?  संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा हिस्सा पर्यटनातून पूर्ण होत असतो. गोवा सारखे राज्य किंवा राजस्थान सारखे राज्य अशा राज्यांना पर्यटनातून खूप मोठा अर्थलाभ होत असतो. शिवाय पर्यटन स्थळी अनेक छोटे-मोठे व्यवसाय चालतात त्यातून अनेकांना रोजीरोटी भेटत असते . त्या सगळ्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचे खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . एवढेच नाही रेल्वे, विमान, बस सर्व प्रवासाच्या सुविधा ठप्प झालेल्या आहेत. परिणामी शासनाचे आणि उद्योगांचे देखील खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  वर्षभराचा शिण आपण पर्यटनातून घालवत असतो . पर्यटनातून एक नवी ऊर्जा मिळत असते . जास्तीत जास्त फिरल्यामुळे अनुभवांच्या कक्षा रुंदावतात. माणसाचा दृष्टीकोन व्यापक होतो. पर्यटनाच्या निमित्ताने अनेक मित्र एकत्र येतो. कधी सहकुटुंब तर कधी मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घेत असतो.  सगळे मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्याशी नवे बॉंडिंग तयार होत असते.  घरापासून काही दिवस बाहेर राहावे लागल्याने एक वेगळेच चैतन्य निर्माण होत असते.
आमचीही तळ कोकणची ट्रिप संस्मरणीय ठरली. सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर राहायला मिळालेला बंगला, त्याचबरोबर खायला मिळाले माशांचे सगळे प्रकार, पाण्यातील स्कुबा डायविंग, पॅरा सिलिंग, वॉटर स्पोर्ट्स इत्यादी प्रकार मनमुराद आनंद देणारे होते. त्याचबरोबर फणस ,आंबे ,जांभळे ,नारळ हा सर्व रानमेवा मनसोक्त खायला मिळाला आणि घरीही  आणता आला.
  कोकणातील वळणावळणाचे रस्ते एक वेगळाच आनंद देऊन गेले.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
.,...............सहल............,....s
      सहल हा शब्द म्हटलं तर लहान मुले असो किंवा मोठी माणसं हा एक मोठा उत्तेजक किंवा आनंदाचा विषय आहे.लहान मुले असो किंवा मोठी माणसे कुठ जायचे ते पूर्व नियोजित असले की त्या बाबतीत सारे त्या क्षणापर्यंत उत्सुकता लागलेली असते.त्या विषयाची ओढ लागलेली असते.आनंदाच्या लहरी मनात ओसंडत असतात.
अशीच एक सहल म्हणून मी एका स्काऊट गाईड मेळाव्याला उपस्थित होतो.माझी नियुक्ती पंचशील पूर्व माध्यमिक शाळा भंडारा येथे अप्रशिक्षित शिक्षण सेवक या पदावर झाली होती .परंतु प्रशिक्षित शिक्षकांची पूर्ण कामे माझ्याकडे यायची आपण खेड्यातील असल्यामुळे कोणत्याही कामाला नकार नसायचा.थोड्या फार चुका व्हायच्या पण ,"चुकातून  शिका" हा मार्ग अवलंबला होता.स्काऊट गाईड हा शब्द कधी ऐकलं नव्हतं आणि अचानक मला स्काऊट गाईड साठी प्रशिक्षण  रामटेक येथे आयोजन करण्यात आले आणि त्यात मी सहभाग घेऊन उत्तम रित्या प्रशिक्षण पूर्ण केलं नियमित प्रशिक्षण पेक्षा तो प्रक्षिषण परिपूर्ण वेगळा असतो. निवासी प्रशिक्षण कॅम्प असतो .तिथे चोवीस तासाचा कॅम्प चे नियोजन असते.
        याचाच अनुभव म्हणून मी 16  शाळेतील विद्यार्थी घेऊन मेळाव्याला हजर झालो.तिथे 17स्काऊट पथक( स्काऊट म्हणजे मुलांचा गट)आणि 14गाईड पथक (गाईड म्हणजे मुलींचा गट)अशी पथक वेळेवर जमा झाली .सर्व शाळा  वेळेवर पोहचल्या मुळे त्या शाळांना तंबू मिळाला होता.परंतु माझा पथक उशिरा पोहचल्या मुळे तंबू मिळाला नाही.तेंव्हा आम्ही दरी(गोना)पासून तंबू तयार केला.तंबू अवण्या साठी. कुदळ फावडे,सबळ या साधनांची गरज होती परंतु आमच्या जवळ काहीच नव्हते.दुसऱ्या कडून वास्तू मिळवणे आणि तंबू उभे कारण यामध्ये खूप पराकाष्ठा तयार होत होती .कारण पवसा ने ढग दाटून येत होते.रात्र पडत होती.थंडीचे दिवस होते .तंबू उभरण्या साठी सर्व मग्न झाली होती. तंबुचे सर्व काम उर्काऊन लगेच मुलांना आणि मुलींना दोन्ही पथकांना प्रत्येक स्पर्धेत सहभागी करावं लागत होत .मेळाव्याच्या ठिकाणी सर्व मुले गणवेवेशात होते.आकाशाच्या निळ्या रंगच्या खाली नील्यारांगाचे कवर लावल्या सारखे वाटत होते.प्रत्येक मुलाच्या डोक्यावर टोपी व तीन बोट दाखवणारे वागल विकासाची दिशा दाखवत होते.यशस्वी होण्याची तीन सूत्र सांगत होती.
     पहिल्या दिवशी मुले दिवस भर काम करून थकली होती.तेंव्हा आणलेली डबे मुलांनी एकत्र बसून खाल्ली.व झोपण्या साठी तंबू मध्ये सरसावली.मुली ना झोपन्या साठी गावातील एका व्यक्तीच्या घरी सोय करून दिली होती.
       थंडीचे दिवस होते मुले झोपल्यावर थंडीने कुडकडत होती.काही मुले चांगली झोपली आणि काही झोपली नाही.आणि पुन्हा सकाळी लवकर ३वा.उठून मुलांनी अंघोळ केली .मुलांनी कधीही ह्या गोष्टी ना पहिल्या होत्या आणि ना अनुभवल्या होत्या.त्या मुळे मुलांच्या शारिरात
उत्साह ओसंडत होता.
       दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांनी अंघोळ करून .पुन्हा मुले तंबू मध्ये बसले आणि तंबू निरीक्षणं साठी परीक्षक आले.सर्व मुलांनी तंबू छान सजवले होते. सर्व प्रकारचे गझेट तयार
 करण्यात  आले होते.शाळेचा बॅनर, शोष खड्डा,झुला ,झुला ,भांडे ठेवण्यासाठी गझेत बनवण्यात आले होते.बाथरूम गाझेत,गणपती मंदिर सजावट,तुळशी rounding अशी विविध गेझेत तयार करण्यात आली.सर्व गाझेट बांबूच्या काड्या पासून तयार करण्यात आल्या होत्या.बांबू काड्या सुद्धा मुबलक उपलब्ध नव्हत्या.तेंव्हा इकडून तिकडून गोळा करावे लागत असत.तेथे राम धून ,शेकोटी,शोभायात्रा, नृत्य, कवायत संचालन सावित्रीबाई फुले ,पर्यावरण रक्षण ,गणेश उत्सव, बिनभांड्याचा  स्वण्यपाक,स्कीलोरमा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,अशा विविध स्पर्धा झाल्या,सर्व स्पर्धे मध्ये मुलांनी भाग घेतला.होता.असे करत मुलांना चार दिवस कसे गेले पत्ता ही लागला नाही आणि शेवटच्या दिवशी मुले आनंदाने परत घरी पोहचली.आणि तो क्षण त्या मुलांच्या आणि माझ्या स्मरणात आजही आहे.त्या मधून मुलांना संघर्षाचे जीवन कसे असते हे शिकायला मिळाले .व परिस्थितीशी सामना कसा करावा
 हे मला शिकायला मिळाले ..........
म्हणून म्हणतात ना ""अनुभव हाच शिक्षणाचा पाया आहे" 
फक्त पुस्तकी ज्ञानाची पोप ट. पेक्षा  व्यासायिकदृष्ट्या ज्ञान महत्वाचे आहे.
जीवन खसावत 
भंडारा 9545246027
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
सहल


सहल शब्द उच्चारताच मनाला आनंद होतो. शरीराला व मनाला उत्साह देणारा हा महत्वाचा शब्द. लहान-थोर सर्वांना चैतन्य आणणारा शब्द. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे एक छान निमित्त म्हणजे सहल होय. सहल म्हटले की अनेक पर्याय समोर आहेत मुक्त पायी चालणे; बैलगाडीत बसणे, घोडा गाडीत जाणे, कार, जीप किंवा बस मध्ये जाणे, विमानाने जाणे, ट्रेन ने जाणे, बोटीने किंवा जहाजाने जाणे ही अनेक पर्याय सहलीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक सहलीचा आनंद अनुभव अगदी वेगळा आहे; त्यातली पहिली सहल पायी चालण्याची.ही सहल म्हटले की अगदी बिना पैशात होणारी सहल लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना ही सहल आवडते. या सहलीसाठी साधारण दहा मिनिटांच्या अंतरापासून तर अनेक किलोमीटर पर्यंत पायी चालण्याच्या सहली आहे. ज्यामध्ये गड,शिखर,डोंगर, टेकडी सर करणे हा सर्वात छान पर्याय उपलब्ध आहे. धार्मिक पर्यटनासाठी किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेली भटकंती किंवा शरीराचा व्यायाम म्हणून केलेली भटकंती ही या सहलीमध्ये येते. आनंददायी असली तरीदेखील व्यवस्थित नियोजन, शिस्तीचे पालन व ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणची योग्य माहिती असेल तर सहलीचा आनंद सर्वांनाच लुटता येतो. शाळेची सहल असो किंवा मित्रांबरोबर ,तिथे नियोजन हे खरेच हवे जाण्याचे ठिकाण, जाण्याची वेळ, कोणत्या ऋतूत जाणार आहोत त्यानुसार सोबत घ्यावयाच्या वस्तू, रस्त्याची माहिती असणारा माहितगार सोबत असणे गरजेचे आहे. अनोळख्या ठिकाणी जाणे माहितगार सोबत न घेता शक्यतो टाळावे. पायी चालावयाचे असल्यामुळे पायामध्ये चप्पल ऐवजी बूट वापरणे श्रेयस्कर असते त्याच प्रमाणे सोबत पाण्याची एखादी बाटली किंवा चढण असेल तर हातामध्ये काठी अवश्‍य असावी त्यामुळे चढणे सोपे जाते. या सहलीमध्ये वन्य प्राण्यांचे दर्शन देखील होते. आणि दुर्मिळ वनस्पती त्याचप्रमाणे फुले ,पाखरे बघता येतात .सहलीला एकट्याने किंवा समूहाने देखील जाता येते अनेक मोठ्या यात्रा कंपनी अशाप्रकारच्या सहलींचे आयोजन करत असते हे तर झाले  पायी जाणाऱ्या सहली बाबत परंतु; आता पाहू या बसने जाणाऱ्या सहली बाबत पाहू . काही व्यक्तींना बस लागण्याची शक्यता असते अशा वेळी सोबत औषधे असणे महत्त्वाचे म्हणजे सहलीचा आनंद मनमुराद लुटता येतो .काही सहलींना रेल्वेने देखील जाता येते रेल्वे किंवा बसने जाताना आधी बुकींग केल्यास आपल्या सर्वांची सोय होते गर्दी ,जागा न मिळणे ही गैरसोय टाळता येते. एसटी महामंडळ तर काही दिवसांचे पॅकेज देखील जाहीर करते. उन्हाळा व दिवाळीच्या सुट्टीत असे पॅकेज घेतल्यास आपले पैसेही वाचतात व सहलीचा आनंद मिळतो.
आता तर विमानाने ',जहाजाने देखील सहलीचा आनंद लुटता येतो .प्रत्येक सहलीचे वैशिष्ट्य वेगळे असते.  धकाधकीच्या आयुष्यातून काही फुरसतीचे क्षण मिळावेत म्हणून सहल हा उत्तम पर्याय आहे लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी देखील परंतु; काहीजण आपल्या लहान मुलांना सहलीला पाठवण्याचे टाळतात कारण त्यांना सहलीत सुरक्षिततेविषयी शंका असते. आजकाल शाळेच्या सहली मध्ये  किंवा मित्र-मैत्रिणींसोबत पर्यटन करताना , दुर्घटना होताना दिसतात त्यामुळे देखील पालक मुलांना सहलीला पाठवण्याचे टाळतात; परंतु शिक्षक विद्यार्थी यांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास हे अपघाताचे प्रसंग टाळता येतात तसेच अनोळख्या ठिकाणी पाण्यामध्ये जात असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज नसतो, अशावेळी पोहणे टाळावे.  बोटिंगचा आनंद घेणार असाल तर; लाइफ सुरक्षा जाकेट जरूर घालावे ज्यामुळे पाण्यात पडलो तरी बुडण्याची भीती नसते.
सुरक्षेची काळजी घेतली की पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येतो हे खरे! वर्षातून एकदातरी प्रत्येकाने सहलीला जायला हवे. शारीरिक व मानसिक थकवा यामुळे मनाला आलेली मरगळ ही सहलीने दूर होते. निसर्गाच्या सानिध्यात राहता येते. मनोरंजन, व्यायाम ,आप्त  स्वकीयांबरोबर बरोबर काही क्षण आनंदाने घालवता येतात. ही आनंदाची शिदोरी वर्षभर आपापल्या दैनंदिन कामे करताना उत्साह नक्कीच देतात. स्वतःच्या मनाशी छान संवाद साधता येतो. मग सहल हा सुंदर अनुभव प्रत्येक जण घेणार ना? जमिनीवरची सहल असो की पाण्यावरची सहल . सहल असं म्हटल की मन आनंदात न्हाऊन निघते. पाण्यावरची सहलित तर खूप मज्जा येते .अथांग अशा समुद्रावर आपण जर जहाजामध्ये बोटीमध्ये बसलेले असू तर आपल्या तरंगण्याचा भास होतो. वेगवेगळी जलचर जवळून अनुभवता येतात. पाण्याचे लाटांवरून सूर्यास्त बघताना खूप सुखद वाटते .पाण्याच्या आत देखील  स्कुबा डायविंग द्वारे सहल अनुभवता येते यावेळी तर अनेक जलचर जवळून अनुभवता येतात.
चांदण्या रात्रीची सहल तर खूपच रोमांचकारी असते अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा जवळ रात्री काजवा महोत्सव असतो पावसाळा सुरू होण्याच्या आधी हा महोत्सव असतो जंगलामध्ये टेंट बांधून तुम्ही राहू शकता आणि रात्रीचे काजवे पाहू शकता. जसे ओंजळीत फुलांचा भास होतो तसेच हे काजवे झाडांवर बसतात. आणि तो चमकता प्रकाश पाहताना मन आनंदून जाते झाडांवर असंख्य विद्युत दिवे बसवले आहेत असा भास होतो .आणि मन प्रकाशात न्हाऊन निघते. जंगल सफारी ही सहल देखील आनंददायक असते. जंगलातील प्राण्यांना जवळून पाहणे त्यांचे आयुष्य अनुभवता येते. ताडोबा अभयारण्यात असा अनुभव तुम्ही नक्कीच घेऊ शकता. काही अनुभव ऐकून सहलीला जाण्याची इच्छा होतेय ना! लहान-थोर सर्वांनी हा सुंदर अनुभव नक्कीच घेऊन पाहूया.

सविता साळूंके, श्रीरामपूर, कोड नंबर 13
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
सहल!  जीवनाचे एक टॉनिक(28)
   
            सर्वांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय असेल, तर तो म्हणजे सहल! सहल म्हटले तर थोऱ्या-मोठ्यांपासून सर्वाना फिरायचे म्हटले की,पहिला हात वरती येतो, प्रत्येकाला फिरायला आवडते,उंच डोंगरमाथ्यावर, गडकिल्ले, समुद्रकिनारी,छानसा धबधबा,रिसॉर्ट,पिकनिक पॉईंट,गार्डन,अगदीच शेत सुद्धा कोणाला नाही आवडणार,धकाधकीच्या जीवनापासून आपण कुठे तरी घडीभर शांत होण्याचे ठिकाण आणि त्या निसर्गरम्य ठिकाणच्या अविस्मरणीय आठवणी मनात साठवून ठेवायच्या आणि नव्या उमेदीने कामाला लागायचे.
            हनिमून ही कल्पना यासाठीच उदयास आली असावी,की माणसाने निसर्गात आपले भावी आयुष्य घडवावे. प्रत्येक माणूस कधीतरी सहलीला गेलाच असेल,त्याने अनुभवलेले असतात रमणीय क्षण! आणि वारंवार आपण त्याचा उल्लेख करत असतो.
           सहलीची ठिकाणे म्हणजेच पर्यटन स्थळे इतकी महागलेत की,सर्वसामान्य माणसाला इच्छा असून देखील जाता येत नाही,  "पैसा बोलता है"   आणि मग शक्य असेल तितकीच सहलीची मजल मारली जाते,शालेय सहलीमधून विदयार्थी बाहेरील जगाची माहिती घेतो,स्व संरक्षणाची जाणीव निर्माण होते,विविध स्थळांची माहिती अवगत होते.
        पर्यटनातून बराच पैसा सरकारला मिळतो,त्यात विदेशी पर्यटक असतील तर आणखीच भर पडते,पर्यटन ही आता फॅशन झाली आहे,आणि जास्तीत जास्त लोक याचा आनंद घेत आहेत,सहल हे आनंदाने जीवन व्यतीत करण्याचे एक साधनच म्हणावे लागेल...

सुजाता जाधव
नवी मुंबई
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
" सहल केळापूरची "

     मित्रांनो , सहल हा शब्द उच्चारला तरी चेहऱ्यावर कसा आनंदाचा झरा ओसंडून व्हाऊ लागतो . मग ती व्यक्ती कोणत्याही वयाची असू द्या . लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींनाही ही सहल एक आनंदाची पर्वणीच असते . ती सर्वांना हवीहवीशी वाटणारी एक गोष्ट असते . जिच्यामुळे मानवी मनाला आलेली एक प्रकारची मरगळ , ग्लानी दूर होऊन मन प्रफुल्लीत व टवटवीत होते . अशी ही ही सर्वांच्या जिव्हाळ्याची एक बाबच होऊन जाते .

     आम्ही आमच्या केंद्रांर्तगत पाच शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन केळापूर येथे सहलीला गेलो होतो .  20 फेब्रुवारी चा तो शुभ दिन . सर्व मुले शाळेत थंडीत काकडत पण चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य आनंद घेऊन जमली होती . सर्वांनी आपापल्या जवळ खाण्याचे डब्बे घेतले होते .आनंदानं गाण्याच्या भेंड्या खेळत खेळत आमची क्रूझर गाडी अंबाडी घाटातून सागवानी सोनं , उंच उंच गर्द झाडे मागेमागे ढकलत चालली होती . काही वेळानं सूर्योदय झाला . अशा मोकळ्या जंगलातील निसर्गरम्य वातावरणात सर्व मंत्रमुग्ध झाले . विविध पशूपक्ष्यांचा आवाज कर्णमधूर वाटत होता . मुलांना आम्ही या वनौषधी झाडांची माहिती व उपयुक्तता सांगितली . तेवढयातच उनकेश्वरच्या गरम पाण्याच्या कुंडाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर प्रवेश केला . तेथील गंधकयुक्त पाण्यामुळे शारीरिक त्वचाविकार कसे बरे होतात हे तेथील वैद्यांनी सांगितले . नंतर आम्ही परत मार्गस्थ झालो . एका भल्यामोठ्या डॕमचे मनमोहक दृश्य पाहून सर्वच मुले त्याला समुद्रच म्हणू लागली . तेथे पाणकावळा , कोतवाल , बदके , खंड्या इ . पक्षीदर्शन केले . मग तेथेच सर्वांनी मिळून सहभोजनांचा अंगतपंगत करून आस्वाद लुटला . आणि पुढे रवाना झालो . 

     शेवटी एकदाचे आमचे इच्छित स्थळ यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा हा तालुक्यात आलो . सर्व मुलांनी आनंदाने भवानीमातेच्या देवीच्या नामाचा जयजयकार केला . अत्यंत शिस्तबद्धतेने देवीदर्शन केले . नंतर पूजा प्रसाद घेऊन आम्ही तेथील गार्डनकडे मोर्चा वळवला . तेथे रंगीबेरंगी मासे , बहुरंगी पोपट , चिमण्या पाहून मुले पार आनंदून गेली . मग छोट्याशा रेल्वेने आम्ही मुलांसह प्रवासही केला . झुकू झुकू आगिनगाडी .. हे गीत गुणगुणत आम्ही खूपच मज्जा केली . नंतर आम्ही तेथील सी - सॉ , घसरगुंडी , रांऊडगेम ,झोके , इ .चा आस्वाद मुले आनंदाने लुटूत होती . मलाही झोके खेळण्याचा मोह आवरला नाही . आणि हाताला फोड येईपर्यंत मी भरपूर झोके खेळले . पुन्हा एकदा बालमनं होऊन . मग आम्ही तेथेच भेळ व पाणीपूरीवर यथेच्छ ताव मारला . मुलांनी काही खेळणी , प्रसाद , देवीचे फोटो , बांगड्या , इ . घेऊन परत घराकडे जड पावलान पण आनंदीत मनान गाडीत बसलो . मुले खेळून इतकी थकली होती की सुंडूमुंडू होऊन झोपेला पांगली . काही वेळानं अंधाराला चिरत चिरत आमची वाहन शाळेगावी आली . पालकांहाती सुखरूप मुले सुपूर्द करून आम्ही किनवटला आमच्या घरी एक अविस्मणिय केळापूर सहलीला मनात बंदिस्त करून आलो .

     अशा प्रकारे ही केळापूरची सहल मनाला फारच आनंदीत करून एक यादगार बाब बनून राहीली ....

अर्चना दिगांबर गरूड 
किनवट , जि. नांदेड 
मो. क्र . 9552954415

धन्यवाद

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...