*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- सतरावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 05 मे 2020 मंगळवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- मित्र / सखा*
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मैत्रीचे रोपटे
मनातील सुखदुःखाची उकल कुठेतरी झाली पाहिजे. उकल होण्यासाठी एखादा जीवा भावाचा कोणीतरी असला पाहिजे. सप्तरंग इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण पाहण्यासाठी कोणीच नसेल तर त्या इंद्रधनुष्याला तरी काय अर्थ. मनामधी लागलेली आग आणि निखारा विझवण्यासाठी जवळपास कोणीच नसेल तर त्या आगीला आणि निखाऱ्याला तरी काय अर्थ. इंद्रधनुष्याला पाहून स्वतःच उड्या मारायच्या आणि आनंद लुटायचा. आणि निखाऱ्यामध्ये स्वतः जळत राहायचं हे कितपत योग्य आहे. म्हणून एखादा जीवाचा मित्र असला पाहिजे. माणसं जोडत जाणे वेगळे आणि मित्र सांभाळत राहणं वेगळं. खरं पाहिलं तर आपले व्यक्तिमत्त्व स्वच्छ आणि निर्मळ असायला हवं. दुसऱ्याच्या गुनाची पारख करता आली पाहिजे.आणि त्या गुणाचं मनापासून कौतुक करता आलं पाहिजे ज्या वेळेला आपण दुसऱ्याच्या गुणाचं मनापासून कौतुक करू त्या वेळेला ते आपले मित्र बनल्यावाचून राहणार नाहीत. आणि ज्या माणसाला अगणित मित्र आहे तोच खरा या जगामध्ये श्रीमंत व्यक्ती होय. मैत्रीच्या रोपट्याला मायेचा ओलावा असला पाहिजे. बोटावर मोजण्याएवढे जरी मित्र असतील तरी चालेल परंतु तेही जवाभावाचे असावे ,एकमेकाची सुख दुख वाटून घेणारे असावे. संकटकाळात मदत करणारे असावे. मैत्रीचा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा श्रीकृष्ण आणि सुदामा यांचे उदाहरण दिले जाते. परंतु आज काल कृष्ण राहिला ना सुदामा. मतलबी जगामध्ये मतलबी मैत्री निर्माण झाली आणि मैत्रीच्या नात्याला भगदाड पडू लागले. स्वार्थाच्या पायावरती उभी असणारी मैत्री कितपत योग्य आणि किती दिवस टिकणारी असेल. परिस्थितीनुसार रंग बदलणारे आणि सरड्यालाही लाज वाटेल असा रंग बदलणारे मित्र जर आपल्या अवतीभवती असतील तर त्या मैत्रीचा अधिकार म्हणणे योग्य नव्हे का..? म्हणून मैत्री पारखून केली पाहिजे. पारखण्याचेच दिवस आले आहेत आता. खरं पाहिलं तर हे मी इथे बोलतो आहे ते सर्व मित्र मैत्रिणीसाठी लागू पडेल असे नाही. परंतु जिवाभावाची मैत्री आणि मित्र हे बोटावर मोजण्याएवढेच निघतील अशी सर्वत्र परिस्थिती दिसते आहे. जुन्या काळामध्ये एका ताटात जेवलेले मित्र,एकमेका शिवाय राहू न शकणारे मित्र,दिवसातील कित्येक तास सोबत असणारे मित्र,स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रगत होत गेल्यानंतर जुना काळ आणि जुनी मैत्री विसरून जाणारे मित्र, जुन्या नात्याला तिलांजली देणारे मित्र पाहिला मिळतातच मिळतात. जुन्यांना विसरून नव्यांचा शोध घेणारे मित्र. स्वतःच्या बरोबरीचा म्हणून शोधणारे मित्र. निश्चितच पाहायला मिळतात. अशा मित्रांना दगाबाज मित्र म्हणू नये का...? आपल्याला प्रिय असणारी गोष्ट आपल्याला आवश्यक असणारी गोष्ट आपल्या जवळ असताना मित्राला दयावी लागत असेल तर ती द्यावी. ह्याला दानत म्हणतात आणि अशी दानत संभाळणारी मैत्री आज पाहावयास मिळत नाही म्हणजेच आज असे चित्र आणि मित्र पहावयास मिळत नाहीत. म्हणजेच केवळ स्वार्थावर निर्माण झालेली मैत्रीही स्वार्थ साधला की मैत्री संपुष्टात येते. अशी तकलादू मैत्री आज पाहायला मिळते आहे. खरा मित्र जसा आपल्या गुणाचे कौतुक करतो, तसा तो आपल्यातील दोष सुद्धा दाखवतो. आणि खऱ्या मित्राची हीच खरी कसोटी असते. म्हणजे आज आपले मित्र आहेत त्यांना थोडं पारखा आणि मित्रांनो आपणही कुठं चुकत नाही ना याची खातरजमा करा. कारण मैत्री आणि मित्रत्व हे केवळ शब्द नाहीत अंतकरणाचे अंतकरणाशी जडलेले नाते आहे. आणि या नात्याला नंदनवनात रूपांतरित करण्यासाठी तुमची आमची कसोटी आहे. या कसोटीचा आधार म्हणजे आपले वर्तन आहे. आणि म्हणूनच मैत्री निभावून पहा, त्यातील आनंद पहा... तो अद्वितीयच असणार आहे. आणि म्हणूनच कित्येक वर्ष नव्हे वर्षानुवर्ष कृष्ण सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण देतात.
हणमंत पडवळ, उस्मानाबाद*
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मित्रावरुन आपली ओळख
मित्रानो, तुमचा स्वभाव कसा आहे ? हे तुमच्या मित्रमंडळी वरून सहजपणे ओळखता येते. ज्या प्रकारचे आपले मित्र असतील अगदी त्याच प्रकारचा आपला स्वभाव असतो. मानसशास्त्राने हे सिद्ध करून दाखवले आहे. जीवनात आई, वडील, भाऊ, बहिण इत्यादी नातेसंबंध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच मित्रांचे नातेसुद्धा महत्त्वाचे आहे. एखादा चांगला मित्र मिळविणे म्हणजे जीवनातील ती एक कसोटीच ठरते. संपूर्ण आयुष्यात आपण एकही मित्र बनविण्यात अयशस्वी झालो तर आपले जीवन व्यर्थ आहे, असे वाटायला लागते. मित्र कोणाला म्हणायचे, तर खूप पूर्वीपासून याची व्याख्या अशी केली आहे संकटकाळात जो मदत करतो तोच खरा मित्र. शालेय जीवनापासून ते व्हाया कॉलेजचे जीवन संपवून जेंव्हा आपल्या आयुष्याला खरी सुरुवात होते तेव्हा फार कमी मित्र आपल्या वाट्यास येतात आणि मग हेच मित्र संपूर्ण आयुष्यभर सोबत राहतात. अगदी लहानपणापासून आपल्यासोबत खेळलेले, नाचलेले, बागडलेले असे लंगोटीयार असो पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर वर्गात आजूबाजूला बसलेले पाटीमित्र असो, त्यांचे विस्मरण सहसा होत नाही.
शालेय जीवनात कळते वय झाल्यानंतर मात्र आपण वर्गातील सर्वच मुलांना मित्र करीत नाही, तर ज्याच्यासोबत आपले सुत जुळते, आपले विचार जुळतात अशा निवडक मुलांसोबतच मैत्री करतो. याच ठिकाणी आपली खरी कसोटी प्रारंभ होते. निव्वळ स्तुती करणारे मित्र म्हणजे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी जे अलंकार वापरले जातात त्याप्रमाणे असतात. असे मित्र फक्त स्वार्थ साधतात. कामापुरता मामा करून ते आपल्यापासून दूर होतात. वाईट विचारांच्या किंवा व्यसनी मित्रापासून नेहमीच अंतर ठेवून रहावे. संतानी ज्याप्रकारे म्हटले आहे सुसंगती सदा घडो । सुजन वाक्य कानी पडो ।। त्यामुळे नेहमी चांगल्या मित्राच्या संगतीत राहिल्याने आपले चांगलेच होते. समाजात सुद्धा आपली चांगली ओळख होते. आरशात ज्याप्रकारे आपली जशास तशी प्रतिमा दिसते त्यावरून आपण ठरवितो की मी कसा दिसतो ? तसेच काम मित्राचे असते. आपल्यातील नुसते गुणच नाही तर दोष सुद्धा दाखविण्याचे काम मित्र करतात. म्हणूनच मित्रांना जीवनप्रवाहाला वळण लावणारे तट असे म्हणतात. नदीच्या प्रवाहाप्रमाणे मित्र आपल्या जीवनाला वळण देणारे असावेत याचा शोध घ्या आणि अशा मित्रांच्या सहवासात नियमित राहण्याचा प्रयत्न करा
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769
( माझ्या पाऊलवाट या पुस्तकातून साभार )
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मित्र आयुष्याचा ठेवा
मित्र ईश्वराचा दूत, मित्र आयुष्याचा ठेवा
खिन्न एकांताच्याक्षणी तो मनाचा विसावा
खरा मित्र जो संकटातच आपल्या उपयोगी पडतो. आपल्या जीवनात मित्राला अनन्यसाधारण महत्त्व असते.लहानपणी जास्त मित्र असणे फुशारकीने सांगितले जायचे किंवा जास्त मित्र श्रीमंतीचे,प्रसिद्धीचे लक्षण वाटायचे.मैत्री धनसंपत्ती पाहून जुळत नाही तर स्वभाव पाहूनच जुळते.बालपणी खेळायला,शाळेत जातायेता,डबा खायला सुद्धा मित्रांची संगतच प्रिय वाटायची. "मित्र म्हणजे जीवीचा गोतावळा".मनात उठलेला कल्लोळही मित्र राशी बोलून शांत होतो. " मित्र हृदयीचे मर्म काळजाच्या आतल्या कप्प्यात ठेवणारा असावा".
आपले गुज मनात ठेवणारा,आपल्या आनंदाने आनंदी होणारा आणि दुःखाने दुःखी होणारा आणि आपल्या दुःखात आपल्याला सावरणारा असावा. आपल्या गैरहजेरीत देखील मित्र आपली चुगली करणारा नसावा. मैत्रीचे हे अभंग नाते आयुष्यभर टिकून राहते. एक वेळेस रक्ताची नातीही पैशाने, व्यवहाराने तुटतील पण मैत्रीचे नाते मात्र कधीही तुटत नाही.आई, वडील, भाऊ, बहीण ही सर्व नाती रक्ताची असतात. मित्रत्वाचे नाते आपल्या वागण्याने व आपसातील जिव्हाळ्याने जोडले जाते. जीवनात नातेवाईकांच्या नात्यांपेक्षा मित्राचे नाते जरा जास्त जवळचे वाटते. मित्राचे नाते दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देणारे व सुखाच्या अंगी आनंद द्विगुणित करणारे असल्यामुळे त्याचा ओढा वाटतो. अलंकाराप्रमाणे शोभा देणारे मित्र किंवा तोंडावर स्तुती करणारे मित्र खरे मित्र होऊच शकत नाहीत.
खरा मित्राची प्रतिमा आरशाप्रमाणे स्वच्छ असते त्यात आपले खरे प्रतिबिंब दिसते.खरा मित्र आपल्यातील त्रुटी दाखवून आपल्या गुणदोषांचे दर्शन घडवतो आणि चांगल्या गुणांसाठी तारिफही करतो.म्हणूनच खऱ्या मित्राला, जीवनप्रवाहाला वळण लावणाऱ्या तटाची उपमा देण्यात आली आहे. खरा मित्र हा सूर्यासारखा असतो. आपल्या मनाचा आरसा आपण मित्राच्या चेहऱ्यावरून पाहू शकतो. गरीब दीनदुबळ्यांची सेवा करणारा एखादा होतकरू आपला चांगला मित्र होऊ शकतो. मित्र नेहमी स्वच्छ दिलाचा असावा. सर्वांना सर्वगुणसंपन्न मित्र मिळत नसेल तरीही मित्र आपल्या मनाचे हितगूज सांगण्यासाठी किंवा आपल्या मनातली गोष्ट बोलण्यासाठी असावा असे वाटते. डझनभर मित्र असण्यापेक्षा एक सच्चा दिलाचा मित्र कधीही उपयोगी पडतो. आणि जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र असतो ना!
मित्र सुखाचा श्रावण, मित्र देहातला प्राण
सुन्न एकटेपणात मित्र राखतो इमान
सौ. भारती सावंत
मुंबई
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
*खरी मैत्री*
लिहिताना थरथरले हात माझे
आणि शाईतून तुझंच नाव सांडल
अन् काही अक्षरात का होईना
मी मैत्रिला सर्वांपुढे मांडल
ज्याच्याजवळ मनातील भाव व्यक्त करताना संकोच वाटत नाही, खोटे बोलावसं वाटत नाही,फसवावसे वाटत नाही, पाप-पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो, ज्याच्याजवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदु:खाशी आपण एकरूप होऊ शकतो, तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही म्हणून अशी मैत्री करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे.
प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कुणी वाटत असेल तर तो म्हणजे मित्र. पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वतःच मित्र व्हावं लागतं. कुण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळविण्यासाठी गरज असते ती स्वत:वर विश्वास ठेवण्याची, जाती-पातीची बंधने झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची, विशाल ह्रद्य, संवेदनशील मन जपण्याची, दुसर्यानां व्यवस्थितपणे समजून घेण्याची. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले सुर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारे एक सुमधुर गाणं! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर जो "माणूस" तयार होतो तो खरा मित्र अन तिच खरी मैत्री!
मित्राचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कर्ण. कर्णाचा मित्रासाठी त्याग, तो म्हणजे मित्रासाठीच वाट्टेल ते करणारा निश्रयी माणूस. दुर्योधनासारख्या वाईटाच्या मार्गी लागूनही त्याला अखेरपर्यंत न सोडणारा मित्र, त्याचा विश्वासघात न करणारा विश्वासू कर्ण. इतिहासात अजरमर होणारा असा हा कर्ण.
तंत्रज्ञानामुळे अनेकांशी संपर्क साधणं आज पूर्वीपेक्षा खूपच सोईस्कर बनलं आहे. आणि त्यामुळे इतरांशी मैत्री करणं खूप सोपं झालं आहे. पण इतरांसोबत जोडलेल्या या नातेसंबंधात एक प्रकारचा पोकळपणा असल्याचं तुम्हाला जाणवेल. तंत्रज्ञान याला काही प्रमाणात जबाबदार असू शकतं. आज मेसेजेस, चॅट, सोशल नॅटवर्किंग आणि इतर सोशल मिडियासारख्या माध्यमांमुळे मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष न भेटता मैत्री टिकवून ठेवणं शक्य आहे, असं अनेकांना वाटतं. शिवाय, अर्थपूर्ण संभाषणांची जागा आता झटपट आणि थोडक्यात केल्या जाणाऱ्या मेसेजेस आणि चॅटनी घेतली आहे. प्रत्यक्ष भेटून एकमेकांसोबत बोलण्याऐवजी इतर माध्यमांचा वापर करण्याकडे लोकांचा कल जास्त असल्याचं दिसून आलं आहे. विद्यार्थीदेखील एकमेकांसोबत वेळ घालवण्याऐवजी मोबाईल किंवा कंप्युटरसमोर तास न् तास वेळ घालवतात. तंत्रज्ञानामुळे कधीकधी आपल्याला वाटेल की इतरांसोबतची आपली मैत्री घनिष्ठ आहे. मग मेसेज आणि सोशल मिडियाद्वारे मित्रांच्या संपर्कात राहून मैत्री घनिष्ठ करणं शक्य नाही असा याचा अर्थ होतो का? नक्कीच नाही. या गोष्टी मैत्रीला हातभार लावतातच, पण मैत्री घट्ट करण्याकरता त्यांच्यासोबत ऑफलाईन संपर्क (इलेक्ट्रॉनिक माध्यमांशिवाय थेट संपर्क) असणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सोशल मिडिया बऱ्याच वेळा दोन व्यक्तींमध्ये संपर्क साधण्याचं केवळ एक माध्यम असतं. त्यामुळे मैत्री घनिष्ठ होत नाही.
मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्यला लाभलेला खरा आधार. तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे असं मैत्रीचा स्वरूप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्री मध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पाहायला मिळतो.
माझ्या आयुष्यातील मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर माझी पत्नी ही माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. आज पर्यंत पावलोपावली तिने मला साथ दिली आहे. आपल्याला समजून घेणारी व्यक्ती खरा मित्र बनू शकतो. हे मी अनुभवलेलं आहे. आयुष्यातली सगळी नाती आपल्याला जन्मापासूनच मिळत असतात. मैत्रीचं एकच नातं निवडायला आपल्याला पूर्ण वाव मिळतो. त्यामुळे आपला जिवलग मित्र कसा असावा हे ठरवता येतं . मैत्री ही खूप छान भावना आहे. असं मला वाटतं. मैत्रीला काळाची, वेळेची, वयाची बंधनं नसतात. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत कुणाशीही घट्ट मैत्री होऊ शकते. मैत्री जितकी जुनी आणि दणकट तितकीच नाजूकही असते. यामुळे ती काळजीपूर्वक जपावी लागते. माझ्यामते पती पत्नी ची मैत्री हे सर्वोच्च नातं ठरू शकते. कारण पती-पत्नी एकमेकांना आणि कुटुंबाला समजून घेणारे असतील तर सध्या अस्तित्वात असलेली विभक्त कुटुंब पद्धती लुप्त होईल आणि सशक्त समाज निर्माण होईल.
आजकल मित्र मैत्रिणींशी संपर्कात राहण्याचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मैत्री निभावणं सोपं झालं आहे. असं म्हणता येईल. व्हाट्सअप, फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट मुळे मित्र परिवाराशी सहजपणे संपर्कात राहता येतं. अशा मनमोकळ्या आणि निकोप मैत्रीची सुरुवात घरापासूनच झाली तर किती मजा येईल. जीवाला जीव देणारे मित्र असा शब्दप्रयोग बरेचदा केला जातो. मैत्री खरोखरच इतकी अतूट आहे का याचा विचार करणंही आवश्यक असतं . नुसतं बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही आणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही हे सूत्र मैत्रीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं कारण केवळ एकत्र वावरणारी मुलं-मुली मैत्रिणी होऊ शकत नाहीत त्यांच्यामध्ये मैत्रीचे सूर जोडणे आवश्यक असते मैत्री ही निर्व्याजच असली पाहिजे. त्यामध्ये काही स्वार्थ असेल तर त्याला मैत्री म्हणता येणार नाही.
_______________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
खरा मित्र
"सुख-दुःखात साथ देणारा
मित्र सदोदित असावा
कठीण प्रसंगी मदतीसाठी
धावून येणारा असावा"
जन्माला आल्यानंतर प्रत्येक मुल आपल्या समवयस्क मुलांसोबत खेळणे पसंद करतो.लहान मुलगा आपल्या बोबडे बोलानुसार आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत दिवसरात्र खेळण्यात मग्न असतात.समाजात वावरत असतांना नातेवाईक म्हणून रक्ताचे नाते जन्माने जोडले जातात तसेच समान विचाराचे धागे घट्ट जोडले जातात नि मैत्रीची रुजवात होते.घरी,शेजारी,समाजात,शाळेत जात असतांना समवयस्क विद्यार्थी एकमेकांचे मित्र होतात आणि शेवतपर्यत मित्रता टिकविली जाते यात काही मित्र स्वार्थी देखील असतात अशा मित्रपासून आपण दोन हात लांब असले पाहिजे.बेगडी मित्रता कधीही धोकादायक निर्माण होऊ शकते.कठीण प्रसंगी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणारा व्यक्तिमत्व म्हणजे मित्रता होय.
वयात आलेले विद्यार्थी बऱ्याच गोष्टी कुटुंबातील सदस्यांना सांगणे पसंद करीत नाही.अशाप्रसंगी आपले मन हलके करण्यासाठी विचार मित्रांमध्ये व्यक्त करीत असतात त्यावर उपाययोजना देखील सुचवत असतो म्हणजे मित्र देखील त्या ठिकाणी मार्गदर्शकाची भूमिका वठवित असतो.मित्रांमध्ये कधीही गरीब-श्रीमंतीचा भेद नसतोच याचेच उदाहरण सांगायचे झाल्यास श्रीकृष्ण व सुदामा यांच्यात घनिष्ठ मित्रता होती.सुदामा हा गरीब मुलगा होता पण मैत्री खातर त्यांनी आणलेले पोहे श्रीकृष्णाने आवडीने खाल्ले.वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असतांना एखाद्याने जेवणाचा डबा आणला नसेल तर विनातक्रार आपल्यामधील अन्न दोघे सम प्रमाणात वाटून घेण्याची निस्वार्थ वृत्ती मित्रांमध्ये निर्माण होते.
मित्र हा कठीण प्रसंगी मदत करतो.संकटसमयी धावून येतो.मित्राला काही दुःख झालं तर त्यांच्या दुःखात सहभागी होतो तोच खरा मित्र होय.अजय व विजय दोघे खूप चांगले मित्र होते.प्रत्येक प्रसंगी एकमेकाला साथ देत असत.एकदा मोटारसायकलने जात असतांना चारचाकी गाडीने त्या मोटारसायकलला धक्का दिला त्यामुळे अजयला खूप दुखापत झाली.विजयला देखील किरकोळ जखम झाली होती अशा अवस्थेत क्षणाचाही विलंब न करता अंबुलन्स ला बोलावून अजयला दवाखान्यात दाखल करण्यात आले.डोक्याला जबर मार लागल्याने रक्त गोठलं होतं. अजय शुध्दीवर नव्हता.डॉक्टरने तपासणी केल्यानंतर लक्षात आले की,रक्त देणे गरजेचे आहे.विजयने क्षणाचाही विलंब न करता किरकोळ जखम असतांना देखील आपल्या मित्राला रक्त देण्यास तयार झाला आणि अजयचे प्राण वाचविण्यात विजयला शक्य झाले.अशी जीवाला जीव देणारी मैत्री, निस्वार्थ भावनेने केलेली मैत्री असावी आणि विजय सारखाच जीवाला जीव देणारा खरा मित्र असावा.
✒ श्री दुशांत निमकर, चंद्रपूर 9765548949
dushantnimkar15@gmail.com
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मित्र जीवन हे सुख-दु:खाचा खेल आहे , बर्या वाईटाचा मेल आहे . अंधार-प्रकाशाचा भाग आहे .सोप्या कठीणाचा हिशोब आहे . चढ- उताराचा घाट आहे .उन-शिरालाचा लपंडाव आहे . म्हणजेच जीवन म्हटलं की एक सारख काही नसतं त्या मध्ये सारखा बदल होत असतो . या बदलत्या जीवनातील बदल झेलण्यासाठी , कधी कधी संघर्ष सहन करण्यासाठी परिस्थिती कमी पडते . अशा वेळी नातेवाईक संबंधीताला आधार देतात किंबहुना बल देतात . पण नातेसंबंध किंवा त्यातील मानबिंदूही कधी कधी अपुरे पडतात . कारण सर्वाचे सर्व नातेवाईक चांगलेच असतात असे कधी नसते , जवळ जवळ नसतातच असेच उत्तर माझ्या मते येईल . किंबहूना असलेच संबंध चांगले तर त्यामध्ये बर्याच वेळी कटुता येते कारण नातेवाईक हे दिल्या-घेतल्याचे सोबती असतात . कोणाचे चांगले सर्व नातेवाईक असतीलच तर गोष्ट फार उत्तम ! कारण सुभाषित बोलतंय " जोवरी चाले धंदा ! तोवरी बहिण म्हणे दादा . " म्हणजेच पडत्या काळात कोणी कोणाचे नाही हा मतितार्थ यामध्ये आहे . पण या मी आता पर्यंत केलेल्या प्रस्तावनेवरून दुसरीकडे नजर जाते ती एकदा गेली कि तिथंच थांबते , कितीही हटविण्याचा प्रयत्न केला तरी ती हटतच नाही ते ठिकाण म्हणजेच " मिञ " . मित्र , सखा, सवंगडी , सोबती , दोस्त , खेळगडी प्राणसखा इत्यादी नावं आपल्याला आल्हाददायक वाटतात . ईश्वराने नातेसंबंधा पलीकडे ही मित्रांची एक वेगळीच योनी किंवा आपण ठेवन म्हणू ती निर्मित केली . ईश्वराला धन्यता देऊ या !
मित्र या शब्दाची व्याप्ती खूप विशाल आणि भव्य अशी असते . किंबहूना ती आहेच आहे. मित्रत्व म्हटलं कि तिथं जात , धर्म , पंथ किंवा पशू पक्षी वर्ण भेद आडवे येत नाहीत. गरीबी श्रीमंती ही मित्र भावनेत आडवी येत नाही . आपणाला रामायणातील सांगेन दोन उदा हरण सांगा जटायु हा पक्षी , पक्षी. योनीतील असून सुद्धा प्रभू रामचंद्राना मदत देतो . सिता माता कोणत्या दिशेने नेली हे सांगतो . दुसरे उदाहरण सुग्रीव आणि हनुमान ही मर्कट योनीतील प्राणी असून सिता शोध प्रकरणात मदत करतात इथे मित्रभाव दाखवून देण्यासाठी सजातीय प्राणी नसताना सुद्धा मिञत्व सिद्ध होते . आणखी भागवतातील एक उदाहरण भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश राजा असतात नुसते सुदामा द्वारात आला आहे हे समजताच सर्व प्रकारचे शिष्टाचार सोडून त्याच्या कडे धावतात कारण सुदामा त्यांचा मिञ सहध्यायी होता . म्हणजे मिञत्वात गरीबी श्रीमंतीला थारा नाही . हे या द्वारे सिद्ध होते .
आता मग या युगात प्रश्न येतो तो मिञभाव सिद्धतेचा . मित्र कसा असला पाहिजे , मित्र निखल प्रेम करणारा असला पाहिजे
मित्र स्वार्थी नसावा , आत्मघातकी तर मिञ नसावाच कारण त्यापेक्षा परखड असा शञू परवडतो
अर्थात त्याच्या पासून आपण नेहमी सावध असतो . दूर असतो . म्हणून मिञ जीवा भावाचा असला पाहिजे विश्वासपाञ असला पाहिजे . कारण मिञ या शब्दाची व्याख्या कधीच करता येणं शक्य नाही . मित्राने मिञासाठी सदा सर्वकाल तत्पर असलं पाहिजे छञपती शिवाजी महाराजांचे मावळे जसे मिञभावनेने प्रेरित होऊन उठले आणि "हिंदवी स्वराज्याची स्थापना " करून त्या साठी जीवापाड जपले प्रसंगी प्राणाची बाजी लावून स्वराज्य वाढविले . धन्य महाराज आणि धन्य त्यांचे मावळे ! हे मिञत्वाचे महत्त्वाचे उदाहरण आहे . म्हणून चांगले मित्र मिळणं अतिशय कठीण असतं . जे कोणी नातेवाईका जवळ व्यक्त करू शकत नाही ते माणूस मिञा जवळच सांगतो , बोलतो मिञच वाईट प्रसंगी सावरतो Friend.in need , Friend indeed . तोच खरा आपला मित्र असतो कारण मिञ या शब्दावर बोलणं म्हणजे शब्दाला विराम देणं होय , मतलब मित्र हा व्यापक शब्द या दीड अक्षरात व्यक्त होतच नाही . मग नुसती डोळे टि प क त राहतात धन्य ते मित्र !
भागवत लक्ष्मण गर्कळ जि प मा शा चकलांबा ता गेवराई जि बीड
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मैत्री
यार दोस्त सखा हे शब्द
वापरले जातात मैत्रीच्या नात्याला
श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थान मिळते
मित्र परिवार असणाऱ्या खात्याला
मित्र म्हणजे सुखदुःखात उपयोगी पडतो, त्याच्यासमोर आपल्या मनातील कोणतीही भावना व्यक्त करायला संकोच वाटत नाही असा तो. खरे मित्र स्वच्छ आरशासारखे असतात. आपलं खरं रूप दाखवतात. तोंडावर गोड बोलत नाहीत तर तोंडावर परखडपणे आपलं काय चुकलं, कुठे चुकलं याची जाणीव करून देतात. पण तेच दुसऱ्यांसमोर आपल्या मित्राची पाठराखण ही करतात. बऱ्याचदा संकट ओढवले की नातेवाईकांना फोन करणाऐवजी मित्रांना फोन केला जातो. विश्वास असतो एक प्रकारचा. मैत्री कोणत्याही दोन व्यक्तीत होऊ शकते. तिला वयाचं बंधन नसतं किंवा पैसा बघून पण नाही होत मैत्री.सहज होते कोणाबरोबरही मैत्री. पण खरी मैत्री ही सीमित असते. मोजक्याच लोकांबरोबर केली जाते. आयुष्याच्या ह्या रंगमंचावर असावी साथ मैत्रीची. ऑक्सिजनचे काम करते ही मैत्री. कामापुरता मामा म्हणून वापरणारे मित्र बरेच असतात. खऱ्या मैत्रीची पारख आपणच करायची आणि ते नातं चिरकाल टिकवायचं. आजच्या काळात खरा मित्र मिळणे थोडे कठीणच. स्त्री-पुरुषातही खूप छान मैत्रीचं नातं होऊ शकतं. असं अजिबात नाही की फक्त स्त्रीची मैत्री स्री बरोबर आणि पुरुषांची मैत्री पुरुषाबरोबर.एक अतूट नातं मैत्रीचं नातं. खूप वर्षे टिकते ही मैत्री. कदाचित सख्ख्या नातपेक्षा ही जास्त.
प्रिती दबडे,पुणे
9326822998
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मैत्रीचं महत्त्व
मैत्रीचं सामर्थ्य ज्याला कळलेले असते,ती माणसं माणसाशी संवाद साधत जुळून घेत वाटचाल करतात. मित्र किंवा मैत्रीणीला मुठीत ठेवण्याच्या नादी लागून मैत्रीला मूठमाती देत नाहीत.
मैत्री असावी चंदनासारखी झिजून सुगंध देणारी.
मैत्रीत खूप मजा असते,
थोडी सजाही असते.
मैत्रीत
एकमेकांचा आदर
एकमेकांची
कदर असते.
बिघडू नये यास्तव
रागवण्याचं प्रयोजन असते
द्वेषाचा पदर नसते
मनाची भाषा मनाला कळतं नाही
ज्यांना
मनानं जवळ राहता येत नाही त्यांना
मैत्रीची परिभाषा कळते जेव्हा
दुराव्याची भाषा दूर होतेज्ञतेव्हा
मनं आणि मत़ं जेव्हा
उदात्त होतात
व्यापक होतात
त्यागासाठी तयार राहतात
मदतीला धावून येतात
धीर देतात
आधार देतात
जगण्याचं बळ होतात
तेव्हा मैत्रीचे बंध घट्ट होतात
असे बंध दुर्मीळ असतात
पण मनानं मलीन नसतात
मैत्री म्हणजे परिसचं जणू
मैत्रीच्या स्पर्शानं लोखडाचं सोनं होते
मैत्रीभावानं मन भारावून जाते
मैत्रीत मुठीत ठेवण्याची भाषा नसते
भावनिक मिठीची भाषा असते
मैत्रीत भावनिक बंध असतात
कृत्रिम बंधनं नसतात
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं कमी नसते
नातं म्हणजे प्रेम, जिव्हाळा
समर्पण
बाकी वेगळं नात्यात काय असते
सहवासानं आयुष्यात सुगंधून जाते
संवादानं ,
आठवणीनं मन उल्हासित होते
मनाचं मोरावाणी नृत्य सुरू राहते
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
*विश्वास ! हाच मैत्रीचा दागिणा*!
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
मैत्री हे मोठे विलक्षण असते. काळानुसार आपल्याला मित्र मैत्रिणी लाभत असतात . भुतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ या प्रत्येक कप्प्यात आपल्याला अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात. काहीच आठवणी स्मरणात राहतात .काहीं तर फक्त हाय-हॅलो पुरतेच असतात .तर काही आपल्या मनात घर करून राहणारे बोटावर मोजण्याइतके असतात .त्याःच्या बरोबरच मैत्री शेवटपर्यंत जाणीवपूर्वक जपली पाहिजे. मानवी मन हे मोठे विलक्षण असते . हातात हात धरून प्रत्येक्ष साथ देणारे विरळच असतात .मैत्री
हे कधी गरज म्हणून जोडायची नसते किंवा सोय म्हणून कधी तोडायचे ही नसते. कारण निस्वार्थी "मैत्रीही" व्यक्तीमधील नाजूक रेशीमगाठ असते. आपले जीवन अधिकाधिक सुंदर करत असते. अशा दिलखुलास मैत्रीमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतो प्रेरणा मिळते आणि आपल्या जीवनामध्ये आनंद उचबळून वाहत असते.मैत्री व रक्ताच्या नात्यात अनेक ताणतणाव ,मतभेद ,हेवेदावे , रुसवे-फुगवे येतात. नाती दुरावली जाते. पण मैत्रीतही तसे घडते पण जर आपल्या जीवाभावाच्या मित्राशी मैत्रिणीशी असे मतभेद झाले तर ; दुसर्याच क्षणी आपण हवा पाण्याचा मनोरंजनाच्या गोष्टी केल्या पाहिजे.यातच खरी वैचारिक परिपक्वता दिसून येईल की , जिच्यामुळे आपल्या मैत्रीला खतपाणी मिळून मैत्रीची रोपटं अधिकच बहरेल . आपल्यातील खरा मित्र आपल्या उणिवा सांगत असतो. परंतु नेहमी दुसऱ्यातील दुर्गुणच शोधण्यापेक्षा चांगले गुण पहावेत. कारण सौंदर्य हे त्या त्या गोष्टीत असते पण त्याहीपेक्षा ते पाहणाऱ्याच्या नजरेत जास्त असते. त्या मित्राचे मैत्रिणीचे आपण मनापासून कौतुक केले पाहिजे. आणि जर ते कुठे चुकत असेल तर त्यांना अडवले ही पाहिजे .खऱ्या मैत्रीत नक्कीच विश्वास असावा. तिसऱ्या कुणाचे तरी बोलणे ऐकून मैत्री तुटते अशा त्या व्यक्तीशी अबोला धरणे किंवा ती व्यक्ती ची वाईट सवय असे लेबल लावले जाते .पण तिला गरज असते ती विश्वासाची. विश्वाचा या खऱ्या मैत्री-विश्वात विश्वास हाच खऱ्या अर्थाने मैत्री चा दागिणा आहे .
मैत्री अशी असावी !!
पाखरा घराची वाट दाखवणारी !
फुलांना बहर आणणारी !
दुःखाच्या वाळवंटात प्रेमा पाझर फोडणारे !
गाराचा पावसाचा दिलासा देणारे!
सर्व काही समजून घेणारे !
डोळ्यातील भाव ओळखणारी!
मैत्री असावी*!!
माझ्या बालपणी ऐकलेली एक गोष्टआहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेला एक खेकडा पायाने नक्षीकाम उतरवत होता.आणि उमटलेले नक्षी पाहून अतिशय खुष होत होता.;पण समुद्राची एक मोठी लाट आली आणि ती नक्षी पुसून गेली .हे पाहून खेकडा म्हणाला ,"मी तर, तुला माझा जवळचा मित्र समजत होतो.;पण तू तर माझी केलेली सर्व नक्षी काम पुसून टाकले .मला हे असे केलेले तूझे काम तर नक्कीच आवडले नाही.त्यावर समुद्र म्हणाला, "तुझ्या पायाचे नक्षी केलेले चित्र पाहून , मासे मारणारा नक्कीच तुझ्या मार्गावर लागला असता ,आणि तुला पकडून गेला असता." म्हणून मित्रा ,तुला वाचविण्यासाठी मला हे करावे लागले .अशी असते मैत्री .मैत्री असोत वा नातेसंबंध ते सगळे विश्वासा वरच बांधलेली असतात.
मैत्री म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा. तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्हसवण्याचा प्रयत्न करावा.
मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड मित्र , पाळीव प्राणी मित्र, वगैरे. ज्याच्या जवळ मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही, पाप- पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही. ज्यांना आपला पराकर्म आनंदात सांगावासा वाटतं. काहीजण तक्रार करतात की, मैत्रीतला तो पूर्वीचा ओलावा, आपलेपणा आता राहिलेला नाही. पण का वाटत नाही? कधी या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आपण उत्तर शोधलं का? आपण मनाशी ठरवून टाकतो, त्यांना नाही गरज, तर मला पण गरज नाही. मात्र, गरज आहे! आजही मला माझ्या त्या मित्र -मैत्रिणिची ज्यांनी मला हसवलं, घडवलं, आधार दिला- त्यांची मला अतिशय गरज आहे. शेवटी हे विसरून कसं चालेल, की आपणच निवडतो आपले मित्र -मैत्रिणी. आपली निवड इतकी तर नाही चुकणार? फ्रेंडशिप, रिलेशनशिप हे इंग्रजी शब्द थोडा वेळ बरे वाटतात ऐकायला; पण थेट हृदयाला स्पर्श करतात ते मात्र नातं व मैत्रीच! या शब्दांचा गोडवा कायम ठेवण्यासाठी, मित्रांशी असलेलं नातं आणि नात्यांमधली मैत्री जपण्याकरता आपण मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी काय फरक पडतो? मनापासूनची ओढ असेल तर सारं काही शक्य आहे. हा शब्द जितका छोटा, तितकाच त्यात मोठा अर्थ सामावलेला आहे.
आतापर्यंतच्या आयुष्यात 'मित्र' या नात्याने मला कोण कोण भेटले ते मी आठवू लागले. खेळायला लागल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत, मग पुढे कॉलेज व हॉस्टेलमधील अनेक मित्र मैत्रिणींची आठवण झाली. त्यातील काहींशी गाढ मैत्री होती आहे. हल्ली तर फेसबुक व इतर माध्यमातून भेटलेल्या व न भेटलेल्या व्यक्तींबरोबरही मैत्री होऊ शकते, पूर्वी 'पेन फ्रेंड्स' होते ना तसे. आयुष्यात बरेच बदल घडून येतात व त्यामुळे काही मैत्रीच्या गाठी सैल होऊ लागतात. दुरावा निर्माण होतो. कधी तर नावे व चेहरा सुद्धा विसरून जायला होते. मान, अपमान, हेवे, दावे हे सांभाळावे लागते ते वेगळेच
जीवनात प्रत्येक क्षणी अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात. काहीच आठवणी स्मरणात राहतात .काहीं फक्त हाय-हॅलो पुरतेच असतात .,तर काही आपल्या मनात घर करून राहणारे बोटावर मोजण्याइतके असतात .त्याःच्या बरोबरच मैत्री शेवटपर्यंत जाणीवपूर्वक जपली पाहिजे. मानवी मन हे मोठे विलक्षण असते . हातात हात धरून प्रत्येक्ष साथ देणारे विरळच असतात .मैत्री
हे कधी गरज म्हणून जोडायची नसते किंवा सोय म्हणून कधी तोडायचे ही नसते. "काळ" निस्वार्थी मैत्रीमधील , व्यक्तीमधील नाजूक रेशीमगाठ असते. आपले जीवन अधिकाधिक सुंदर करत असते. अशा दिलखुलास मैत्रीमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते .प्रेरणापण मिळते.; आणि आपल्या जीवनामध्ये आनंद उचबळून वाहत असते.मैत्री व रक्ताच्या नात्यात अनेक ताणतणाव मतभेद हेवेदावे रुसवे-फुगवे येतात . नाती दुरावली जाते. पण मैत्रीतही तसे घडते ;पण जर आपल्या जीवाभावाच्या मित्राशी- मैत्रिणीशी असे मतभेद झाले तर; दुसर्याच क्षणी आपण हवा- पाण्याचा मनोरंजनाच्या गोष्टी केल्या पाहिजे. यातच खरी वैचारिक परिपक्वता दिसून येईल की, जिच्यामुळे आपल्या मैत्रीला खतपाणी मिळून मैत्रीची रोपटं अधिकच बहरेल .आपल्यातील खरा मित्र आपल्या उणिवा सांगत असतो. परंतु नेहमी दुसऱ्यातील दुर्गुणच शोधण्यापेक्षा चांगले गुण पहावेत. कारण सौंदर्य हे त्या त्या गोष्टीत असते ; पण त्याहीपेक्षा ते पाहणाऱ्याच्या नजरेत जास्त असते. त्या मित्राचे मैत्रिणीचे आपण मनापासून कौतुक केले पाहिजे. आणि जर ते कुठे चुकत असेल तर; त्यांना अडवले ही पाहिजे .खऱ्या मैत्रीत नक्कीच विश्वास असावा. तिसऱ्या कुणाचे तरी बोलणे ऐकून मैत्री तुटते अशा त्या व्यक्तीशी अबोला धरणे किंवा ती व्यक्ती ची वाईट सवय असे लेबल लावले जाते .पण तिला गरज असते ती विश्वासाची. विश्वाचा या खऱ्या मैत्रीत "विश्वास "हाच खऱ्या अर्थाने मैत्री चा दागिणा आहे .
खरच मैत्रीचं नातं हे कल्पनाशक्तीच्या बाहेरचे नाते आहे. त्या नात्याला किंमत द्यावे आणि या नात्यावर मनापासून विश्वास ठेवावे.
मैत्री असोत वा नाते संबंध नाते सगळे बंद हे विश्वासावरच बांधले जात असतात. आम्ही जन्माला एकटेच आलो. आपण एकटेच राहतो आपण एकटेच मरतो .केवळ आपल्यावर प्रेम आणि मैत्री करणार्यामुळेच आपणास विश्वास निर्माण होतो की आपण एकटे नाही. आपण एकटे नाही.
मैत्री हे शांतीचे प्रतीक आहेत
मैत्री असोत वा नातेसंबंध ते सगळे विश्वासा वरच बांधलेली असतात.मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा. तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा.
ज्याच्या जवळ मनातील भावना व्येक्त करताना संकोच वाटत नाही, पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही, ज्यांना आपल पराकर्म आनंदात सांगावस वाटत. . काहीजण तक्रार करतात की, मैत्रीतला तो पूर्वीचा ओलावा, आपलेपणा आता राहिलेला नाही. पण का वाटत नाही? कधी या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आपण उत्तर शोधलं का? आपण मनाशी ठरवून टाकतो, त्यांना नाही गरज, तर मला पण गरज नाही. मात्र, गरज आहे! आजही मला माझ्या त्या मित्रांची- ज्यांनी मला हसवलं, घडवलं, आधार दिला- त्यांची मला निरतिशय गरज आहे. शेवटी हे विसरून कसं चालेल, की आपणच निवडतो आपले मित्र. आपली निवड इतकी तर नाही चुकणार? पण थेट हृदयाला स्पर्श करतात ते मात्र ‘अवर व्हेरी ओन’ नातं व मैत्रीच! या शब्दांचा गोडवा कायम ठेवण्यासाठी, मित्रांशी असलेलं नातं आणि नात्यांमधली मैत्री जपण्याकरता आपण मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी काय फरक पडतो? मनापासूनची ओढ असेल तर सारं काही शक्य आहे. हा शब्द जितका छोटा, तितकाच त्यात मोठा अर्थ सामावलेला आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात 'मित्र' या नात्याने मला कोण कोण भेटले ते मी आठवू लागले. खेळायला लागल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत, मग पुढे कॉलेज व हॉस्टेलमधील अनेक मित्र मैत्रिणींची आठवण झाली. त्यातील जे गाढ मैत्री होती.आणि त्यांच्या सोबत घालविलेला वेळ हा चित्रपटातील प्रसंगासारखा माझ्या पुढे सरकत आहे.
लेखिका
*सो.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
(9420516306 )
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
( दि.05-05-2020)
लेख.....
मैत्री , मित्रता
'मैत्री म्हणजे ईश्वराने मनुष्याला दिलेले बक्षीस आहे'. ईश्वराने आपल्याला मैत्री स्वरूपात जे बक्षीस दिले त्याची जोपासना आपण निस्वार्थपणे करायला पाहिजे. कारण मैत्री जेव्हा निर्हेतुक असते तेव्हा ती दीर्घकाळ टिकते. मैत्रीत जर का स्वार्थ आला तर ती मैत्री संपण्याच्या दिशेने वाटचाल करत असते. म्हणून आपली मैत्री ही दीर्घकाळ टिकवायचे असेल तर आपल्यामध्ये निस्वार्थी भावना असणे आवश्यक आहे.
असं म्हणतात ' या जगी सन्मित्ञाहून श्रेष्ठ संपत्ती नाही'.
आपल्या मनामधील सर्वकाही सांगण्याची एकच जागा आहे ती म्हणजे आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्या सुखदुःखात आणि आपल्या डोक्यावर कोसळलेल्या संकटातून मुक्त होण्यासाठी आपण घेतलेला आधार म्हणजे आपला मित्र ,मैत्रीण होय.' मैत्री म्हणजे सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार होय' असे स्पॅनिश या विचारवंताचे मत आहे. जेव्हा काही आपल्याजवळ सांगण्यासारख असतं तेव्हा आपण ते मित्रास, मैत्रीणीस सांगतो कारण दुःख वाटून घेतले की हलकं होतं आणि सुख वाटून घेतलं तर ते वाढत. आपल्या या जीवनात मैत्रीसारखी आनंद व उत्साह देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही.
आपल्या हृदयात अपार सेवा असली म्हणजे आपल्याला सर्वत्र मित्रच दिसतात. मैत्रीच्या या रोपट्याला नेहमी मायेचे,प्रेमरूपी पाण्याचे सिंचन देणे आवश्यक असते. आपला खरा मित्र ,मैत्रीण तोच किंवा तीचअसतो जे तोंडावर कटू बोलले तरी परंतु माघारी आपली स्तुती करतात,आपल्याबद्दल चांगले विचार प्रकट करतात. माणसाने मैत्रीवर नेहमी विश्वास दाखवावा, कारण विश्वास नसलेली मैत्री कधीही खुंटते. आपल्यामध्ये असलेली जी मैत्री आहे या मैत्रीला शञूरूप प्राप्त होणार नाही याची काळजी सदैव घ्यायला हवी. तेव्हा पेटलेल्या हृदयात शत्रुत्व निर्माण होता कामा नये. कारण अरण्य जाळणाऱ्या वणव्याचा वायु मित्र होतो, परंतु तोच वारा दिवा विझवून टाकतो म्हणजेच दिव्याचा शत्रू होतो. यासाठी आपला मित्र शत्रू होणार नाही याची सतत खबरदारी घेतली पाहिजे. कारण शञूत्व हा मैत्रीचा अंत असतो.
मोराला पंख पसरून आनंदाने मोर पिसारा फुलवून नाचण्यासाठी जशी पावसाची गरज असते तशीच आपलं जीवन आनंदाने घालवण्यासाठी आपल्याला मित्राची मैत्रीणीची गरज असते. जेव्हा आपल्या बेचैन, ञस्त, अस्वस्थ , अशांत मनात विचारांचे काहूर निर्माण झालेले असते तेव्हा आपल्याला शांती, स्वास्थ्य देण्याचे काम आपले मित्रच, मैत्रीणच करत असतात. आपल्या जीवनात आनंदाची उधळण करीत असतात. म्हणून मैत्रीचा टिपून ठेवणारा हा टिपकागद आपण सदैव टिकवून ठेवला पाहिजे. ईश्वराने मनुष्याला दिलेल्या मैत्रीच्या या बक्षीस ला आपण सर्वांनी सदैव जपले पाहिजे.
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मित्रांची मांदीयाळी
उगवतीचा शृंगार
लाजून लाल ती होते
पाहुनी त्या 'मित्रास '
आकाशी चैतन्य येते
आपल्या रोजच्या दिवसाची सुरुवात 'मित्रा' पासूनच होते. मित्रासाठी प्राची, अरुणी लाल तांबडा सडा शिंपडते अशा 'रेड कार्पेट' वरून ऐटीत हसत हा तेजोमय 'मित्र' सहस्र करांनी येतो आणि आपल्याला अलगद सकाळी उठवतो. तो साऱ्या चराचराचा चा मित्र आहे.
पु.ल. म्हणतात, " ज्याच्याजवळ मनातील भाव व्यक्त करताना संकोच वाटत नाही. जालना फसवावेसे वाटत नाही. पाप-पुण्याची कबुली देण्यात मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम सांगावासा वाटतो. ज्याच्याजवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही. ज्याच्या दुःखाशी आपण एकरूप होतो, तो खरा मित्र.
मित्र आपल्या जीवनातला अविभाज्य भाग. या मैत्रीच्या नात्याला अनेक पदर असतात. काही सदैव अलवार, काहीसे हवेहवेसे वाटणारे, काही जरतारी, काही सोन्याच्या मुलाम्या सारखे, काहींच्या मैत्रीचे धागे विरलेले, विटलेले, नकोसे वाटणारे, पण ते धागे असतात! कधीतरी पुन्हा शिवून टाकावेत असे वाटणारे. 'तुझं माझं पटेना तुझ्याशिवाय करमेना' अशा पद्धतीचे. ह्या अशा जरतारी रेशमी धाग्यात गुंतत, सुखावत आपण पुढे वाटचाल करीत असतो.
मैत्र शाश्वत असते. निरपेक्ष निखळ असते. मैत्रीत बांधिलकी, सामिलकी हवीच. व्यवहारावर आधारलेली ती मैत्री नव्हेच.
मित्र शब्द म्हटला की आठवतो तो सुदामा. मैत्री कृष्ण सुदामा ची. गोष्ट पोह्याची. कृष्णाला या हृदयाचे त्या हृदयाला आपोआप सर्वकाही कळले होते. याला म्हणतात मैत्र.
भावनिक दृष्ट्या आपण मैत्री वर फार अवलंबून असतो. जेव्हा एखादी भीती, ताण-तणाव असुरक्षितता, अशा नकारात्मक भावनांच्या हिंदोळ्यावर आपण हेलकावत असतो, तेव्हा तोल कसा सांभाळावा हे समजत नसते. त्या वेळी आठवण होते ती मित्राची. तेव्हा तो आपला बेस्ट फ्रेंड, गाईड आणि फिलॉसॉफर असतो. ज्या गोष्टी जवळच्या नात्यात बोलता येत नाहीत, त्या गोष्टी सहज मित्राकडे बोलता येतात. तोच आपल्याला विचार आणि भावनांच्या बोगद्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो.
शुद्ध अंतःकरण, अगदी पाण्यासारखं निर्मळ, खोल पारदर्शक, निष्कपट, निर्मोही, असं मैत्र. पाण्यावर बघा. काठी मारली तरी ते दुभंगत नाही. पुन्हा पहिल्यासारखा दिसतं. तेच असावं खरं मैत्र!
फार पुरातन काळापासून ते अगदी आजपर्यंत पत्र मैत्री प्रसिद्ध आहे. व्यक्ती समोर असताना जे शब्द ओठावर येत नाही ते पत्रातून प्रकट होतात. कोणी ढगां बरोबर संदेश पाठवला आहे, कोणी कबुतरा द्वारे.
चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहिले, ते कोरेच होते. पण ते कोरे पत्रही बरेच काही बोलून गेले.
आपण रोज डायरी लिहितो. ती सुद्धा आपली जिवाभावाची मैत्रिण असते.
ज्ञानेश्वर नामदेवांची मैत्री आणखीन एका वेगळ्या स्तरावरील मैत्री नामा म्हणजे भक्ती आणि ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान भक्ती आणि ज्ञान हातात हात घालून मित्रासारखे पुढे जातात.
' सखा विरळा ज्ञानेश्वर, नाम्याचा जिव्हार'
आई-वडील, वडील -मुलगा, वडील -मुलगी, पती-पत्नी, या सर्व नात्यांनी आता कात टाकायला सुरुवात केली आहे. आपापसात मैत्रीचं नातं जपायला हवं हे या रक्ताच्या नात्याला पचनी पडायला लागले आहे.
सुरुवातीला पती-पत्नी अनोळखीच असतात. पण लग्न जसे मुरू लागते, तसे त्यांच्यातले मैत्रहि मुरू लागते. एकमेकांपासून दूर असले तरी मनाने ती जोडलेली असतात. मैत्र म्हणजे मनाची एकरूपता म्हणू या का? काही वेळा त्यांनी टेलीपथीचा अनुभव येतो ते मैत्र असल्यामुळेच का?
पुस्तक हा आपला खरा खरा मित्र कुठेही गेले तरी कायम बरोबर असणारा आपल्या ज्ञानाने उजळणारा मित्र.
आपल्या मातृभूमीशी मैत्र जडते सगळ्यांचेच. पण त्यातील काहींचे मित्र अतूट, जाज्वल्य असते. जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. म्हणून ते म्हणतात,
'ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला'
वि.स. खांडेकर म्हणतात, 'मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू जास्त क्लेशकारक असतो'.
जग किती बदललं तरी भावना त्याच असतात. मूल्य तीच आहेत. कदाचित परिमाणे बदललेली दिसतात. सख्खी भावंडे कमी म्हणून मित्रपरिवार वाढला का? पण त्यातही wavelength जमणं महत्त्वाचं. हल्ली फेसबुक आणि व्हाट्सअप मुळे ही मित्रांची भाऊ गर्दी वाढली आहे. पण त्यांना आपल्याला मित्र म्हणता येतं? का परिचित म्हणावं?
आज-काल मानत शास्त्रज्ञ सुद्धां कुत्रा मांजर पोपट आदिंशी मैत्री करायला सांगतात. अशा पाळीव प्राण्यांची मैत्री हे सर्वांनी आता मान्य केले आहे.
बऱ्याच वेळा असं होतं एखाद्या खोलीत, एखाद्या घरात ,एका कोपऱ्यात, झाडाखाली गेलं की खूप बरं वाटतं. मन शांत होतं. ह्या वस्तू सुद्धा मैत्रीच्या आड येत नाहीत. कवयत्री इंदिरा संत ह्यांना स्वतःची खुर्ची अशीच वाटते. त्यांचं मैत्र त्या खुर्ची जडलंय्.
तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितले.
जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे जडो
मैत्र जीवाचे
निसर्गाशी मैत्री करणं तर आपल्याला भागच आहे. 'जगा आणि जगू द्या' या निसर्ग नियमावर आधारलेले झाडांचे मैत्र खरंच अजब म्हणावे लागेल. म्हणूनच तुकाराम महाराज कानीकपाळी ओरडून सांगत होते,
' वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे'.
या मैत्रीच्या मांदियाळी आपलं स्वतःचं स्वतः बरोबर असलेलं नातं कधी पारखलं का? अगदी आपलं खोलवरचं नातं . आपला स्वतःचा स्वतःवर विश्वास, प्रेम असेल तर मैत्रीतही सहजता येते. त्यासाठी स्वतःचं स्वतःशी नातं अगदी मोकळं मैत्रीचं हवं. मनाशी खरं मैत्र जुळायलाच हवं!!
शुभदा दीक्षित पुणे
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मित्र/सखा
मनाचे सर्व कप्पे खोलणारे एकच सूत्र।
तो जिवलग सखाच फक्त आणि फक्त मित्र।।.....
'काहीही व्यक्त करतांना मनामध्ये कधीच शंका कुशंका राहत नाही, आपण केलेलं कार्य चांगलं असो की वाईट ते सगळंच ज्याच्याजवळ बोलून दाखवायला क्षणाचाही विलंब लागत नाही,ती व्यक्ती म्हणजे 'मित्र'. आपण त्याला सांगितल्यावर आपलं अयोग्य कृत्य पूर्णपणे स्वीकारून आपली चूक अगदी गढूळ पाण्यातून तुरटी फिरविल्यागत आपल्या लक्षात आणून देतो तोच खरा मित्र.
आजच्या या प्रसार माध्यमांच्या बाजारात मित्र हा शब्द तसा परवलीचा आणि मुल्य कमी करणारा दिसतोय... आजकाल ऑनलाईन पाच पाच हजार मित्र असलेल्या व्यक्तीला दुःखात अश्रू पुसायला नाममात्र उपस्थित होईल की नाही हे सुद्धा सांगणे अवघडच झालंय.
आपल्या जिवलग मित्रासाठी स्वतःच्या भावाच्या आणि भगवंताच्या विरोधात सुद्धा उभं राहून कंबर कसणारा कर्ण आणि आपल्या मित्राला डोळ्यात साठवून आपलं सगळं दुःख विसरणारा सुदामा. अश्या पुराणप्रसिद्ध मैत्री ला आजपर्यंत कुणीही विसरू शकले नाही याचे कारण त्यांच्यामध्ये असलेला मैत्रीचा सर्वोच्च बिंदू. आज ही आम्हाला मैत्री सांभाळताना त्यामध्ये जर एकमेकांविषयी तुलना करावीशी वाटत असेल तर नक्कीच आम्ही चुकतोय याची जाणीव मनाला करून देणं गरजेचं असतं.
मैत्री जोडतांना पद,प्रतिष्ठा आणि पैसा याला अजिबात स्थान नसावे. तसही अश्या विचारातून निर्माण होणारे असतात फक्त संबंध त्यामध्ये मैत्रीच नसते परंतु हल्ली आम्ही कोणत्याही संबंधाला मैत्रीचं नाव देतोय ...हेच मुळात चुकतंय असं वाटतं.
एखाद्या पुरुषाच्या कुठल्यातरी गुणांवर भाळून त्याच्यासो8जाणीवपूर्वक जर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले जात असतील तर कदाचित मैत्रीची ती केवळ एक पायरी समजावी...यांच्याही पुढे मैत्री या संबंधाला कळसाची उपमाच द्यावी लागेल. स्वार्थ आणि मतलब सांभाळण्यासाठी आजकाल जाणूनबुजून मैत्री जोडण्याचे प्रकार सध्या बघावयास मिळत असल्याने 'मैत्री ' या शब्दाची अनेक वर्तुळे मनात निर्माण होतात. आजकाल भारत पाकिस्तान यांच्यातला तर मैत्री करार भंगला म्हणे... याचा अर्थ करार करून आणा भाका खाऊन केल्या जातो तो व्यवहार असतो...त्याला मैत्री या व्याख्येत बांधुन घेणं म्हणजे तीर्थक्षेत्त्रातून चुनाळू आणल्यासारखच वाटतं.
ज्या नात्यात स्वार्थ ,मतलब, चालढकल असे शब्दच सापडत नाही ते अनमोल नातं म्हणजे मैत्री असते. 'तू किनाऱ्यावर पोहचशील तर मी तुझ्या सोबत असेल आणि तू तळाशी बुडत असशील तर मी तुझ्या आधी तळात असेल' हे संबोधन म्हणजे'मैत्री'. 'मित्राच्या केसाला धक्का तर आपल्या जीवाला धक्का' हा बालपणीचा मैत्रीतला डायलॉग आजही मनात घर करून बसलेलाच आहे.
मित्र या संकल्पनेतून मग निर्माण होतात मैत्रीची वर्तुळे. ज्यामध्ये अशी अनेक नाती गोती असतात ज्यामध्ये मैत्री निदर्शनास येते . कोणी एके वेळी पिता- पुत्रांची ,भावा-भावांची, पती -पत्नीची ,गुरू-शिष्याची ,राजकारणात, व्यवहारात आणि दैनंदिन जीवनात अशी वेगवेगळी मैत्रीची वलय आढळून येतात. अगदी काही मुक्या प्राण्यावर प्रेम करून मैत्री निर्माण करणारे महात्मे सुद्धा आहेत.
मैत्री आणि सख्यात्वाला तर नवविधा भक्तींमधील एका भक्तीचेच स्थान मिळाले आहे. सुदम्याने श्रीकृष्णाशी केलेलं सख्यत्व हे आजही अजरामर आहे.....
-श्री.झगरे गुरुजी (वाकदकर)
9923528494
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
परमेश्वरा ने दिलेली भेट म्हणजे मित्र
जन्माला आल्यानंतर आई ला जर सोडले तर सगळ्यात सुंदर नातं असेल तर ते म्हणजे मैत्रीचे. लहानपणी गळ्यातगळे घालून शाळेत जावे,एका बाकावर बसने, एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालते, कोणी नुसते आपल्या मित्रांना काही बोलले तरी त्यांच्या अंगावर धावून जाणे.अज्ञानामुळे बरेच हेवेदावे चालायचे पण जसजसं मोठं होऊ लागलो की समजायला लागतं आणि मैत्रिचे नाते घट्ट होऊ लागते.शालेय जिवनात तर प्रत्येक घडणारी कुठलीही गोष्ट असो आधि मैत्रिमध्ये शेयर होईल मग इतरांना सांगायची. कधी कधी तर काही गोष्टी घरी सुद्धा माहित नसे पण मैत्रिणी जवळ कुठलीच गोष्ट लपवीली जात नसे.मैत्रि मध्ये कधी उच,निच, गरीब,श्रींमत असा भेदभाव जाणवत नाही.मित्रांनो ,मग मित्र कोणाला म्हणायचे तर जो सगळ्या सुख,दुंखात साथ देतो तो खरा मित्र,सखा. आपल्या सगळ्यांच्या परीचयाची असलेली मैत्री म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा.सांदिपनी ऋषी च्या आश्रमात कृष्ण, सुदामा लहानपणापासूनच सोबत राहिले,खेळले , सुदामा गरीब ब्राह्मण होता तर कृष्ण द्वारकेचा राजा.सुदामा दिवस रात्र आपला सखा,मित्र असलेल्या कृष्णाचे नामस्मरण करीत असे पण सुदामा गरीब असल्यामुळे त्याची कृष्णाची भेट घ्यायची हिंमत होन नसे पण एकदा सुदामा कृष्णाच्या भेटीला निघाला.पहिल्यांदा इतके वर्षाने भेटीला जायचे तर मित्रांसाठी काय न्यावे हे देखील त्याला कळत नव्हते.कारण त्याला देण्यासाठी सुदामाजवळ काही च नव्हते.शेवटी सुदामाच्या पत्नीने शेजारच्या घरी जाऊन थोडे पोहे आणले आणि संकोचित मनाने सुदामा कृष्णाच्या भेटीला गेला पण राजदरबारातुन एक तुच्छ गरीब ब्राह्मण कृष्णाचा मित्र होऊ शकत नाही असे म्हनुन जेव्हा शिपायाने बाहेर काढले .हे ऐकुन श्रीकृष्ण हुंदके देऊन रडले आणि स्वता रथात सुदामाला बसवून घेऊन आले.ऐवढेच नाही तर माझ्या साठी तु काय आणलं याचा आग्रह करून लपवून ठेवलेली पोह्याची छोटीशी ती गाठोडी कृष्णाने हातात घेतली व मोठ्या आनंदाने खाऊ लागला.मित्रांनो राजदरबारातले वैभवापेक्षाहि सुदामाने आणलेल्या त्या पोह्यात असलेलं प्रेम,निस्वार्थि मैत्रिचा सुंगध दरवळत होता. यालाच मैत्रि म्हणतात.अलिकडे काही ठिकाणी मैत्रिमध्ये सुध्दा भेसळ दिसते . आपल्या लेवलच्या सोसायटी मध्ये राहण्याची धडपड चालली असते. पण तिथे थोडा सुध्दा मैत्रिचा जिव्हाळा नसतो.फक्त बडेजाव पणा.मैत्रि करा पण मैत्रित दगाबाजी करू नका, गैरसमज करु नका,कोणाचे काही ऐकून मेत्रिवर संशय घेऊ नका,आपला मित्र जर अडचणीत असेल तर त्याला मदतिचा हात ,तो कुठे चुकत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करा.आणि हे सगळं करीत असतांनाच तो जर तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत असेल तर ही मैत्रि नावाची संपत्ती आयुष्यभर उराशी बाळगून ठेवा.मला नाही वाटत की ज्याच्या जवळ मित्र आहे .तो कधी एकटा पडला असेल किंवा उदास राहिला असेल.कारण घरी मुलांनसमोर आपण जेष्ठ नागरिक आहोत, वडिलधाऱ्या समोर लहान आहोत,पण कीतीही आयुष्य गेलं तरी मित्रांन साठी तरुनच आहोत. हे तारुण्य कायम ठेवायचे असेल तर आपल्या मित्रांना सांभाळा.मोबाईलच्या माध्यमातून सगळे मित्र गोळा करा. त्यांच्या बरोबर चाटिंग करा. तरुण वयात घडलेल्या गोष्टींची आठवण काढा , खुप पोटधरून हसा आणि मैत्रिचा आनंद लुटा.
सौ.मेघा विनोद हिंगमिरे वर्धा
7798159828
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
. .मित्र.. मित्र हा जीवनातील अनमोल दागिना आहे. मानव हा समाजशील प्राणी आहे.माणूस चांगल्या मित्रातून चांगले घडत असतो .तर वाईट संगतीतून वाईट घडत असतो. काही मित्र आपल्याला नशिबाने मिळत असतात तर काही मित्र आपल्या कृत्त्वातून मिळत असतात. चांगले मित्र अनमोल दगिण्या सारखे असतात पू.ल.देशपांडे आपल्या लेखात सांगतात की चांगले मित्र आणि चांगले पुस्तक वाचल्याशिवाय समजत नाही. चांगले मित्र कसोटीतून समजत असतात. बंजारा समाजाचे थोर संत समाज सेवक संत सेवालाल महाराज मैत्री विषयी सांगतात की पाहिले जनजो ,म्हणजे आधी जाणून घ्या. पछ छानजो..,म्हणजे विश्वास पात्र आहे का तपासून पाहा . पछ मानजो...म्हणजे मगच मैत्री करा.असे सुवचन सांगितले आहे. मैत्री जुळण्या साठी एकसंघ विचाराची आवश्यकता असते. दोन मनाचे विचार एकत्र जुळल्यावर विचाराचे रूपांतर मैत्रीत होते.मैत्रीतून माणसाची अथांग प्रगती पण होऊ शकते. किंवा अधोगती पण होऊ शकते.मैत्री मुळे माणसाला आपल्यातल्या छोट्या मोठ्या
चुका समजतात.आपल्या मनातल्या भावना मोकळ्या मनाने व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणजे मैत्री असते. मैत्री मुळे आपल्याला आधार मिळते. मैत्री मुळे चांगल्या कामाला प्रोत्साहन मिळते. मैत्री मध्ये गरीब श्रीमंत हा भेद नसतो तर फक्त ताळमेळ असतो फक्त भावनांचा .कृष्ण भगवंताने ,सुदामा गरीब तर होतेच त्या शिवाय अपंग ही होते .तरी सुध्धा दोघांचे विचार जुळल्या मुळे दोघांमध्ये चांगली मैत्री जमली होती. मैत्रीत जात पात पाहिली जात नाही. मैत्री ही काचे सारखी असते .एकदा तडक बसली तर पुन्हा जुडत नाही.ज्यांनी खूप सारी मित्र जमावले असतील त्यांना धन संपती कमावण्याची गरज नाही. शिवाजी महाराजांनी मित्रत्वाच्या जोरावर संवंगड स्वराज्य निर्माण केलं. मैत्री ही जन्माची शिदोरी असते ती पुरत ही नाही आणि उरतही नाही.
जीवन खासावात भंडारा 9545246027
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
*मैत्री*
*जीवनातील अक्षय प्रसाद*
*यात नसे वाद की मैत्र*
*सारखा भाव नाही जगात*
मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले सुर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारे एक सुमधुर गाणं! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर, त्या व्यक्तिच्या सान्निध्यात आल्यानंतर, त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर, जो "माणूस" तयार होतो तो खरा मित्र अन तिच खरी मैत्री!
कृष्णाला आठवण यावी आणी *सुदाम्याला उचकी लागावी, खरच अशीच असावी मैत्री* .मी ई म्हणावं आणी मित्रानं री ओढावी , आपल्याला इच्छा व्हावी आणी मित्रानं ती पुर्ण करावी , दुखाःत दुखाःचा आणी सुखात सुखाचा वाटेकरी व्हावा , मनात नेहमी ओलावा असावा ।राग द्वेष लोभ मोह मत्सर यांचा लवलेशही नसावा , मित्र असाच असावा , हसतांना तोही हसावा , रडतांना अश्रु व्हावा । *असला मित्र तर असाच असावा ,नाही तर मित्रच नसावा*
खरे मित्र असतात ह्रदयाच्या ढासळलेल्या भिंतीना नव्यावे उभे करणारे कारागीर. आशेचे नवे नवे रंग देणारे रंगारी. मित्राच्या जीवनात प्रेरणा भरणारे प्रेरणास्तोत्र. मित्र वाईट मार्गाकडे जाताना रोखणारे, प्रसंगी टोकणारे, मित्राचे कौतुक करणारे! किती रुपं या मित्राची असतात नाही का?
गरज पडली की मेणाहून मऊ अन् वज्राहून कठीण बनणार्या मित्राची, मैत्रीची नितांत गरज आहे. जगाचा विचार न करता, आपल्या मित्राच्या सुख्-दु:खा साठीच झ्टणार्या, आपल्याजवळ असणांर ज्ञान, आपल्या मित्रांसाठी देऊन त्याला उभं करणार्या, आर्थिक मद्द्त करणार्या, कल्पव्रक्षाप्रमाणं असणार्या माणसातच खरा मित्र वसतो असं मला वाटतं. अशा माणुसकीने भरलेल्या माणसाशी मैत्री व्हायला वेळ लागत नाही.
मित्र भेटला की कैक दशकांचा प्रवास अवघ्या एका क्षणात होतो, आणि मैत्रीचा अलवार पावा तना-मनात घुमतो. मित्राच्या गळा भेटी एक क्षण सुद्धा मनाला आल्हाद देउन जातो. वर्ष सरते ; ऋतू बदलते, पण मैत्रीची विण धट्ट होत जाते,जेव्हा जेव्हा मैत्रीच्या साठलेल्या आठवणी जाग्या होतात तेव्हा तेव्हा त्या मैत्री चे टीपूर चांदणे मनात अवतरते .कधी भेट होते कधी नाही होत, तरी मैत्री चा हा शाश्वत विश्वास, श्वासा श्वासातून मूकेपणी,वाहत राहतो.
आजच्या बेरोजगारीच्या युगात तर गरज आहे, ती समाजाने बेकार ठरवलेल्या हुशार, *सुशिक्षित 'सुदाम्या'ला* मैत्रीखातर त्याच्याजवळ उंची पोहे जरी नसले तरीही त्याच्या एका 'कट चहा' वरूनच त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याला मदत करणार्या *सखा श्रीकृष्णाची*! असा '_सखा श्रीकृष्ण_' मित्ररुपात भेटण्यासाठी _स्वतः सुदामा_ असावं लागतं तर श्रीकृष्ण- सुदामासारखी अतूट मैत्री व्हायला वेळ लागत नाही.
ना बंध,ना वचन, मैत्री म्हणजे आयुष्याच्या
पानाचे उत्स्फूर्त वाचन
मैत्री म्हणजे निखळ झरा खोल
रुजलेल्या भावनांचा
मैत्री म्हणजे नाद खुळा अल्लड-अवखळ
जगण्याचा.
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मैत्री एक सुंदर नातं
मूल जन्माला आल्यानंतर त्याचं पहिलं नातं निर्माण होतं ते आई-वडिलांशी मग कुटुंबात आजी-आजोबा व काका-काकू ही नाती देखील त्याला मिळायला लागतात .बहिण भाऊ ही नाती देखील त्याला मिळतात हळूहळू बोल बोलायला लागतं मग त्याचा संबंध समाजाशी येतो पहिल्यांदा घरापासून दूर जातं ते शाळेमध्ये शाळेत गेल्यानंतर बाकावर बसल्यावर घरची कुठलीच नाती तिथे नसतात समोर उभे असतात शिक्षक आणि बाकावर नवीन नातं तयार व्हायला सुरुवात झालेली असते त्याचा पहिला मित्र असे आपल्याला म्हणता येईल शेजारी बसलेल्या व्यक्तीशी त्याची ओळख होते मग हळूहळू सोबत डबा खाणे,एकत्र अभ्यास करणे, एकत्र खेळणे सुरू होते हळूहळू इतरांच्या खोड्या काढायला सुरुवात होते .सुरुवात होते इथेच एका नव्या नात्याची हो मैत्रीचे नातं .मित्र किंवा मैत्रीण कधीकधी भांडतात सुद्धा, रुसतात मग या भांडणानंतर काहीवेळा अबोला असतो एकमेकांची मनधरणी केली जाते चॉकलेट असो किंवा डबा आवडीची वस्तू देणे असो अशा गोष्टींची सुरुवात होते. अरे यार तुला ही गोष्ट चांगली जमते तुला जमतच नाही तुझ्यापेक्षा मला छान जमतं अशीही कधीकधी मजा येते कुठून आणला आहे तू नवीन कंपास मला सांग मी आणतो नाहीतर हे मला दे दुसरं आण मित्रासाठी त्याग करायला इथूनच सुरुवात होते .शाळेत असेपर्यंत ही मैत्री कायम राहते पुढे कॉलेजला गेल्यावर सोबत असलो तर मैत्री टिकते पुढे मात्र पदवी किंवा अभ्यासाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जाणं होतं पण मैत्री मात्र कायम टिकते पुढे आयुष्यभर सुखदुःखात हे मित्र किंवा मैत्रिणी एकमेकांना साथ देतात अस हे सुंदर चित्र दिसायला छान वाटते पण सर्वांच्याच बाबतीत ही मैत्री शेवटपर्यंत टिकते असे नाही काही कारणास्तव मध्ये टिकू शकत नाही जसं की दूर राहायला जाण,वेगवेगळ्या ठिकाणी असणं, एकमेकांना भेटायला न जमणं हे पूर्वी हे असं होतं परंतु आज व्हाट्सअप फेसबुकच्या काळामध्ये आपण काही प्रमाणात तरी संपर्क साधू शकतो व मैत्री कायम ठेवू शकतो मैत्रीचं नातं टिकतं ते विश्वासावर एकमेकांवर विश्वास असेल तर हे नातं टिकू शकते; परंतु जर अविश्वास आला तर मात्र मैत्रीला तडा जातो भांड फुटावं तसं होतं आणि मैत्री तुटते स्वार्थ आला की मैत्री संपुष्टात येते गरीब-श्रीमंत हा भेद भाव आला की मैत्री संपते इतिहासात डोकावले तर एक मैत्रीचं सर्वात सुंदर असं उदाहरण म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांचे. शिवाजी महाराज आणि तानाजी लहानपणापासून एकमेकांचे मित्र होते स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मित्र म्हणून तानाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती निभावली मित्र असावा तर तानाजी मालुसरे सारखा मित्र असावा तर श्रीकृष्णासारखा वैभव मिळाल्यावरही तो आपल्या गरीब मित्राला विसरला नाही गरीब सुदामाचे अतिशय सुंदर पद्धतीने आदरातिथ्य केले .सुदामा गरीब होता सुदामा च्या बायकोने श्रीकृष्णासाठी भेट म्हणून पोहे दिले होते श्रीकृष्णा पुढे सर्व सुखे हात जोडून उभी होती काय शक्य नव्हते श्रीकृष्णाला पण ;गरीब सुदामाची पोह्याची भेट आनंदाने स्वीकारली अशी असावी मैत्री.
संपत्तीचा संचय करण्यापेक्षा चांगल्या मित्रांचा संचय केल्यास तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होय. कोणतंही नातं असो त्या नात्यांमध्ये एकदातरी अग्नीपरीक्षा द्यावीच लागते राम सीतेचा पती-पत्नीचं नातं असलं तरीदेखील सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती भगवंत आणि परमेश्वर यात भक्त आणि सखा हे नातं असलं तरी परमेश्वर आपल्या भक्ताची परीक्षा घेतोच आई मुलाचं नातं असलं तरीदेखील आई आपलं मूल संस्कारी आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याची परीक्षा घेतेच सासू-सून यांच्या नात्यामधील देखील सासू-सुनेची परीक्षा घेतेच मैत्रीच्या नात्यात देखील परीक्षेचा प्रसंग येतोच कधी येतो हा प्रसंग आयुष्यात संकट आले म्हणजे आपल्या मित्राची खरी परीक्षा सुरू होते या संकटात आपला मित्र आपल्याबरोबर राहिला त्याने यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत केली तरच तो आपला खरा मित्र .हीच मित्राची कसोटी हीच मित्राची परीक्षा होय. असे म्हणतात सुखात सर्व जग सोबत असते पण दुःखात मात्र कोणीच सोबत नसते अशा वेळी सोबत राहतो तो मित्र आणि साथ सोडतात ते आपले वैरी .मैत्री फक्त मनुष्या मध्येच होते असे नाही तर प्राणी-पक्षी यांच्यासोबत देखील मैत्री होते याचे उदाहरण म्हणजे कुत्रा हा प्राणी होय कुत्रा हा अतिशय इमानदारीने आपली मैत्री निभावतो व सदैव आपल्या सोबत संरक्षक म्हणून राहतो श्रीरामाला रावणाशी युद्ध करताना मित्र म्हणून वानर लाभले होते हनुमंत सुग्रीव जामवंत यांनी मैत्रि निभावली व श्रीरामाला युद्धात सहाय्य केले होते मैत्रीला वयाचे बंधन नसते चार वर्षाच्या मुलाशी सत्तर वर्षांच्या आजोबांची मैत्री होऊ शकते मनातलं सांगायला कुणीतरी जवळच हवं असतं कधीकधी कुटुंबात आपण काही गोष्टी सांगू शकत नाही अशा वेळी मित्राची किंवा मैत्रिणीची गरज भासते मित्राला किंवा मैत्रिणीला आपण आपली अडचण ,आपली घुसमट ,आपल्या चुका बिनदिक्कतपणे सांगू शकतो, मन मोकळं करू शकतो खरा मित्र किंवा मैत्रीण सुखात आपली साथ देतो. संकटात खंबीरपणे पाठीशी उभा राहतो आणि आपली चूक असेल तर कान पिळायला देखील मागेपुढे पाहत नाही.
"जीवनात जर लाभली
खऱ्या मित्रांची साथ'
काटेरी मार्गही बनतील
प्रगतीचे पाथ.
संकटकाळी मैत्रीची साथ'
आकाशाला गवसणी घालतील हात.
सविता साळुंके
9604241747
salunkesavita42@gmail. com
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
"एक विश्वासाचे नाते म्हणजे मैत्री"
मित्र-मैत्रिणी नाहीत अशी व्यक्ती या भूतलावर सापडणे शक्यच नाही. कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुणीतरी मित्र असतोच. मित्र हा प्रत्येक सुख-दुःखाचा साक्षीदार असतो. एकवेळ आई,वडील, भाऊ, बहीण यांना आपल्याबद्दल जे माहिती असणार नाही ते आपल्या मित्राला माहित असते. प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट त्याला माहित असते.
आपण कोणत्या घरात, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या कुळात जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं. त्यामुळेच तर आपली आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा कोण असावेत आणि कसे असावेत हे आपल्या हातात नसते मात्र आपले मित्र कोण आणि कसे असावेत हे मात्र आपल्याच हातात असते.
आपल्या आयुष्यात बऱ्याच व्यक्ती येत-जात असतात म्हणजे ते सगळेच आपले मित्र असतातच असे नाही. ज्याच्या समोर आपण आपले मन मोकळे करू शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो असे मोजकेच मित्र आपल्या आयुष्यात असतात.
आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासात बरेच प्रवासी येत-जात राहतात पण हा प्रवास करत असतांना प्रत्येक खाच-खळग्यात, उतार-चढावात जो शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतो तोच खरा मित्र. एकमेकांचे सुख-दुःख समजून घेणे म्हणजेच मैत्री नव्हे तर एकमेकांच्या चुका लक्षात आणून देणे हे सुद्धा मित्रांचे कर्तव्य असते. चुका दाखवतो तो खरा निस्वार्थी मित्र.
पण, हि झाली मैत्रीची एक चांगली बाजू परंतु तशीच या मैत्रीची दुसरी बाजू सुद्धा आहे. आठ-चार मित्र एकत्र आले की गल्लीत गोंधळ घालणारे, दारू पिऊन धिंगाणा घालणारे मित्रच असतात. एखादी एकटी मुलगी दिसली की तिला छेडणारे मित्रच असतात. याला पण मैत्रीचं म्हणावे का ? असं मैत्रीची शपथ घालून दारू पिण्यास लावणे, एखाद्या मुलीची छेड काढायला लावणे, सिगारेट, तंबाखू सारखे व्यसन लावणे. या सवयी बऱ्याच प्रमाणात मित्रांमुळेच लागतात हि सुद्धा वास्तविकता आहे.
नातलगांची निवड करणे आपल्या हातात नसले तरी मित्र निवडणे मात्र आपल्याच हातात आहे त्यामुळे आयुष्यात मित्र निवडतांना विचारपूर्वक निवडले गेले पाहिजे. विश्वासू मित्र असले की आयुष्यात विश्वासघात होण्याचा धोका नसतो.
---------
गणेश सोळुंके (जालना)
8390132085
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मैत्री
जेव्हा दूर तुमचं घरटं असत तेव्हा आधार देणार मैत्रीच रोपटं असत.त्या रोपाला हळुवारपणे जपायच असतं. विश्वासाच्या छायेखाली फुलवायचं असत.
मैत्री म्हणजे कशाचेही बंधन नाही.जिथे मनसोक्त वावरता येते.भावनांचे आदानप्रदान होते.कोणी सोबत नसले तरी मी आहे सोबत असा म्हणणारा एक हात .
स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला मैत्री ही हवी असते .कारण जगण्याची उमेद निर्माण करण्याची ताकत मैत्रीमध्ये असते.मला तर मैत्री करणे फार आवडते.
कधी हसवणारे ,कधी चिडवणारे,कधी रागावणारे आणि वेळप्रसंगी मदत करण्यासाठी मित्र उपयोगी येतात. भेट नाही झाली तरी चालेल पण हक्काने शिव्या घालणारा मित्र एक तरी असावा.ज्याच्या असण्याने आपल्या जीवनात रंगांची उधळण होईल.
मैत्रीबद्दल जितके लिहावे तितके कमीच. मैत्री असावी जय विरु सारखी 👬" ये दोस्ती हम नही तोडेंगे..."राहूल अंजली सारखी😉.मैत्रीसाठी त्याग करणे.
कधी कोणाला न भेटता पण मैत्री होते, आणि कधी कोणाचा सहवास खूप आवडला की मैत्री होते.मैत्रीला नियम नाही ,कधी कुठे होईल. आपल्या भावना समजून घेणारा भेटला की मैत्रीची दारे आपोआप खुली होतात.
मैत्रीचे पण प्रकार असतात .कधी निखळ असते तर कधी स्वार्थी....स्वार्थापोटी केलेली मैत्री कधीही टिकत नाही. मैत्री करावी दिलखुलास,निस्वार्थी..या मैत्रीत इतके प्रेम भेटतेना की कोणाशीच तुलना करू शकत नाही.विश्वकर्त्याने जसे आपल्यासाठी आई वडील निर्माण केलेत तसेच मित्र नावाचा प्राणी पण निर्माण केला आहे. मैत्रीची व्याख्या होऊच शकत नाही.
मैत्री कशी असावी ,
मी म्हणेल कृष्ण सुदामा सारखी...आठवण सुदामाने काढावी आणि उचकी कृष्णाला लागावी. ठेच मला लागावी आणि वेदना त्याला व्हाव्या, मनात एखादी गोष्ट यावी आणि ती मित्राने पूर्ण करावी..मैत्री अशी असावी...
निलम गायकवाड पुणे
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
माझा मित्र
पुस्तक आमचे मित्र आहे असं आम्ही मानतो.कारण तसं सगळेच म्हणतात आणि ते खरंही आहे.कारण पुस्तकासारखा दुसरा कोणता मित्र जगात नाही.म्हणून पुस्तक हाताळणं महत्वाचं आहे.
पुस्तकामध्ये ज्या गोष्टी असतात.त्याच गोष्टी वाचन करुन आपण शिकत असतो नव्हे तर त्याचा उपयोग जीवनात करीत असतो.पुस्तक जर नसतं तर आज आपली अवस्था जंगलातील प्राण्यांसारखी झाली असती.अर्थात त्या प्राण्यांना आपण गुलाम बनवले तशी.
आपण गाई,म्हशी,घोडे,मेंढी,उंट आणि बक-याही पाहिल्या.वाघ,हत्ती,तडस,चित्ता,कुत्री,लांडगी,साप,आणि सिंहही पाहिले.गाई म्हशींना पाळतो.बकरी, कुत्रा,मेंढी,घोडे,उंट आणि मांजरीही पाळतो.कारण ते शाकाहार खातात.कुत्र्यांनाही आपण आता भात आणि पोळी खाणे शिकवलेले आहे.तसेच मांजरालाही दूध पिणे शिकवले आहे.ते माणसाला खात नाही.परंतू वाघ,सिंह,चित्ते,लांडगे,तडसे आणि अस्वली हे मांसाहारी आहेत.प्रसंगी माणसांंनाही खायला मागेपुढे पाहात नाही.पुर्वी कुत्रेही मांस खायचे आणि मांजरीही.तसेच गाई,बैलं,म्हशीही जंगलीच होत्या.अशा हिंस्र प्राण्यांवर जय मिळवत माणसानं त्यांना माणसाळवलं.त्यांना पाळीव बनवलं.आज आपण सापाला भीत नाही.तसेच वाघ आणि सिंहालाही भीत नाही.याचं सर्वात मोठं कारण आपलं ज्ञान आहे.कारण ज्ञान,अनुभव हे सुद्धा आपलं पुस्तकंच आहे.आजही वाघ आणि सिंहासारखे प्राणी आपल्याकडे पिंज-यात कैद असतात.नव्हे तर सर्कशीत विदुषकाच्या चाबकावर त्या विदुषकाच्या म्हणण्यानुसार क्लृप्त्या करतात.आजही हत्तीसारखे अजस्र प्राणी केवळ चाबकानं ताकद असूनही ताकद दाखवीत नाही.तसेच जो बैल आपल्या प्रचंड ताकदीनं बैलगाडीवरचं वजनी सामान वाहून नेतो,त्या बैलाला लहानसा मुलगा सुद्धा आपल्या इवल्याशा हाताने खिचतो.हा अनुभवाचाच भाग.आपला बाप आपल्या घरच्या बैलाला आपल्या मनासारखं वागवतो हे सतत पाहणारा मुलगा एखाद्या वेळी जेव्हा त्या बैलाला खिचून पाहतो,तेव्हा त्याच्या सहज लक्षात येते की तो खिचल्या जातो.त्याची भीती नष्ट होते.हे केवळ अनुभवासारख्या पुस्तकामुळं घडतं.
आज कोरोनाचं संकट आलं आहे.संपुर्ण लाकडाउन आहे.घरी बसून राहण्याला पर्याय नाही.अशावेळी लोकांचा वेळ जावा म्हणून दुरदर्शननही आपल्यासाठी रामायण,महाभारत आणलं.काही चैनलनं तेनालीराम आणला.काहींनी अजून काही.आपल्यालाही त्या पाहावाश्या वाटतात.कारण त्या सिरीयला आपल्याला आनंद देतात.पण हे कशामुळे घडलं.याचा विचार जर केला तर नक्कीच पुस्तकाचं नाव समोर येईल.आज ऋग्वेद,सामवेद,यजुर्वेद,अथर्ववेद तसेच इतर सारे ग्रंथ पुस्तकरुपात असून काही अभंगही पुस्तकरुपात आहेत.काही का असेना,पण आम्हाला या पुस्तकाच्या रुपानं आद्य कवी मुकूंदराज कळला.संत ज्ञानेश्वरांही समजला.आम्ही चोखामेळा अनुभवला नव्हे तर तुकाराम,रामदासही समजला.एवढंच नाही तर वृक्षाचं आजमितीला महत्व कसे? हेही समजलं.
महाभारतातील खांडववनाचा संदर्भ आजही आम्हाला समजावून घेता येणे,त्यानुसार शक्य झाले आहे.एवढंच नाही तर आम्हाला याच पुस्तकवाचनावरुन हवामानाचा अंदाज वर्तवता येतो.शेतक-यांनी कोणते बी बियाणे घ्यावे.कोणते घेवू नये.कोणत्या राज्यात किती मेले,किती उरले.कोणत्या राज्यात किती सरासरी पाऊस पडला.किती नाही.पुढे आपण काय करायला पाहिजे,काय नको हे सगळं पुस्तकाच्या रुपानं कळतं.तसेच याच पुस्तकाच्या वाचनातून आमच्या शेतीची कशी सुपीकता वाढवता येईल तेही कळण्यास मदत होते.पण असे जरी असले तरी ह्या पुस्तकाच्या रुपानं काही विघातक शक्ती नाही जोर येतं.कोणी परमानूबाँबचे लिहिलेले संदर्भ वाचून अणुबाँब बनवितात,जे अणुबाँब आज देशालाच नाही तर जगाला हानीकारक आहेत.आजही ह्या पुस्तकामुळच जग विनाशाच्या मार्गावर जात असलेले दिसते.
आजही याच पुस्तकात दडलेल्या मनुच्या नियमानुसार व विचारानुसार देश चालत होता हे सर्वांना माहित आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृती जाळली नसती तर ते मनुचे कायदे मोडले नसते.तसेच आजही भारत संविधानानुसार चालतो हेही संविधान म्हणजे एक पुस्तकच आहे.
महत्वाचं म्हणजे पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.पुस्तकात चांगले चांगले आचार विचार असतात..जे विचार वाचून आपण आपल्यात बदल घडवू शकतो.परीवर्तन करु शकतो.जर पुस्तक नसेल जीवनात तर त्याचं जगणं जंगलातल्या प्राण्यासमान होतं हे विसरु नये.पुस्तकच माणसाला चांगलं बनवू शकतं.पुस्तकच माणसाला वाईटही.आपण कसं आपलं वर्तन बनवावं हे केवळ आपल्यावर आहे.कारण चांगल्या विचारांचा अंत नाही.वाईट विचारांचा मात्र कधी ना कधी अंत आहे.राम आणि रावण एकाच राशीची माणसं.दोघंही विद्वान होते.दोघांंनाही शास्र पारंगत होतं.दोघांजवळही दैवी शक्ती होत्या.दोघंही प्रकांड पंडीत होते.पण रामाने अभ्यासलेलं ज्ञान हे विधायक कार्यासाठी वापरलं.रावणानं मात्र त्याचा वापर विघातक कार्यासाठी केला.म्हणून रावणाचा विध्वंस झाला,रामाचा नाही.आजही ज्या मनुस्मृती नुसार अख्खा देश चालत होता.त्या मनुस्मृतीत लिहिलं होतं,
नारी एक पुत्र माता कन्या जरी असेल तरी ती स्वतंत्र राहायला नको(अध्याय९श्लोक २ ते ६),पती पत्नीचा केव्हाही त्याग करु शकतो.कारण तिला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही.कोणत्याही स्थितीत विवाहानंतर पत्नी सदैव पत्नीच राहात असते.म्हणजे तिच्यावर पुरुषांना/पतीने कधीही अत्याचार करण्याची मोकळीक.(अध्याय ९श्लोक ४५)
स्रिला संपत्ती ठेवण्याचा अधिकार नाही.शुद्रांच्या स्रिया सुद्धा दास आहेत.स्रिने कितीही मिळकत कमविली तरी तिचा पती किंवा पुत्र किंवा पिता तिच्या संपत्तीचा मालक असतो.(अध्याय ९श्लोक ४१६)ढोर,गवार शुद्र आणि नारी हे सर्व ताडन करण्यायोग्य आहेत.म्हणजे स्रियांना ढोरासारखे मारता येवू शकते.(अध्याय ८श्लोक २९९)असत्य ज्याप्रमाणे पवित्र नसते.त्याप्रमाणे स्रिया सुद्धा पवित्र नाहीत.शिकायचा,शिकवायचा,वेद मंत्र म्हणायचा,उपनयन करण्याचा अधिकार स्रियांना नाही.(अध्याय २श्लोक ६६,अध्याय ९श्लोक १८)स्रिया या नरकातच जाणा-या असल्यामुळे त्यांना यज्ञकार्य किंवा अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही.(अध्याय ११श्लोक३६,३७)यज्ञ कार्य करणा-या किंवा वेदमंत्र बोलणा-या या स्रियांच्या हातचे भोजन ब्राम्हणांनी वज्र मानावे.स्रियांच्या हातचे सर्व कार्य वज्र मानावे.ते कार्य अशुभ असल्यानं ते देवांना स्विकार नाही.(अध्याय ४श्लोक २०५,२०६)स्री पुरुषांना मोहीत करणारी असते.(अध्याय २श्लोक २१४)स्री पुरुषांना दास बनवून पदभ्रष्ट करणारी असते.(अध्याय २श्लोक २१४)स्री एकांताचा दुरुपयोग करणारी असते.(अध्याय २श्लोक २१५)स्री संभोगप्रिय असते.त्यासाठी ती वय किंवा कुरुपता बघत नसते.(अध्याय२श्लोक ११४)स्री चंचल,ह्रृदयहिन,पतीशी एकनिष्ठ राहणारी नसतेर.(अध्याय २श्लोक ११५)स्री केवळ शैया,आभुषण आणि वस्र यावर प्रेम करणारी,वासनायुक्त,बेईमान,ईर्षाखोर,दुराचारी असते.(अध्याय ९श्लोक १७)सुखी संसारासाठी मनू सांगतो की स्रियांनी जीवनभर पतीच्या आज्ञेचे पालन करावे.(अध्याय ५श्लोक ११५)पती जरी दुराचारी असेल तरी तो इतर स्रियांवर आसक्त असतो.दुर्गुणांचे भांडार असो,नपुंसक असो,कसाही असला तरी स्रिने पतीव्रता होवून देवासारखी त्याची पुजा करायला पाहिजे.(अध्याय ५श्लोक १५४)
खरंच अशी पुस्तके वाचून स्रियांनाच नाही तर माणसाच्या जगण्याला व माणुसकीला काळीमा फासणारे लिहिले असेल तर अशी पुस्तके व असे ज्ञान कोणत्या कामाचे? धर्मग्रंथ चांगले संदेश देणारेही होते.पण ज्या धर्मग्रंथानुसार सतीप्रथा केशवेपण होतं.विधवेला जगण्याचा अधिकार नव्हता.त्यांच्या शिक्षणाला बंदी घातली होती नव्हे तर ज्या धर्मग्रंथानुसार अस्पृश्यांना बंदी होती.त्या ग्रंथाना न वाचलेले बरे.पुस्तक वाचावीत.पण चांगली वाचावीत.पुस्तकानुसार आचरण करावे.पण त्यातील चांगल्या विचारांचे आचरण करावे..वाईट विचार त्यागून द्यावे.कारण कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात.चीत आणि पट.ज्या पुस्तकातील गोष्टी चांगल्या त्याच घ्याव्या.दुस-या घेवू नये.मनुस्मृतीतही काही काही गोष्टी चांगल्या असतीलही.पण बाकी सुक्ते व कवने वाईट असल्यानं ती जाळावी लागली.भाला आणि संग्रामचीही तीच गत झाली.
आजही कोरोनाची साथ आहे.आम्ही लढाई लढतो आहे.ह्या कोरोनाबद्दल कोणीतरी आधीच लिहून ठेवले आहे की ही महाभयंकर महामारी येणार.त्यानुसार व्हाट्सअप वर मेसेज येत आहेत.काही अफवा आहेत.काही चांगल्या गोष्टी.तेही एक पुस्तकाचं स्वरुपच आहे.तेव्हा अफवांवर विश्वास न ठेवता आपण चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर चांगलेच होईल.नाहीतर पुस्तक जरी आपला चांगला मित्र असला तरी तेच पुस्तक आपला एक दिवस शत्रूही ठरेल.मग आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही.पुस्तकही नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
" मित्र हीच आयुष्याची पुंजी "
मानवी जआता वनात आई - वडील , गुरू याप्रमाणेच मित्रांनाही अनमोल स्थान आहे . तो एक न दिसणारा असा अदृश्य दागिनाचं होय ! जो ह्दयाच्या शिरोमुकूटी आपण धारण करतो . असा प्रामाणिक आणि निःस्वार्थी मित्र हीच आयुष्याची पुंजी आहे ....
माणूस जितका मोठा होत जातो ... तितका तो एकटा , एकाकी होत जातो ! तो वरवर आपल्या मुखावर आनंद दाखवतो , पण आतून मात्र कुढत असतो . इच्छा असूनही आपल्या भावना - दुःख व्यक्त करू शकत नाही ...... म्हणूनच म्हणतात वाटते , " जया अंगी मोठेपण ! तया यातना कठीण !! " माणसाची खरी कमाई ही मित्र असते .... आणि तेच फक्त डिप्रेशनमधून बाहेर काढून जीवनात खरा आनंद निर्मितात .
मी खरंच खूपच भाग्यवान आहे ! मला अशा काही जीवलग मित्र - मैत्रीणींची साथ मिळाली . आमच्या डी . एड . कॉलेजातील गंगाधर पेंटे या तल्लख बुद्धीच्या मित्रांने आपल्या यशाचा शिखर गाठत तो नगरपालीकेचा मुख्याधिकारी झाला !! एवढया मोठ्या पदावर असूनही त्याला कसलाही गर्व नाही की अहंकाराचा वाराही स्पर्शू शकला नाही . आजही तो आपल्या कामाचा पदभार सांभाळून आमच्यांशी दररोज ग्रुपवर मनमोकळ्या गप्पा करतो !! अगदी एकेरीत हाक मारणारा असा मित्र असावाच ..... ज्याच्याजवळ बरे - वाईट सर्व प्रसंग share करता आले पाहिजे . स्वार्थ सोडून सर्वार्थाने धाऊन येणारे मित्र नसतील तर .....? जीवन हे नरकमयच होऊन जाईल ....
शिवाय मैत्री ही वयावर आधारित नसून विचारावर आधारित असते . त्यामुळे आपल्या अवती - भवती अनेक व्यक्ती ह्या समविचारामुळे आपले नकळत मित्र बनतात . म्हणतात ना , " खूप सोप आहे जमिनीवर घर बांधून दाखवणं . पण एखाद्याच्या मनात घर करून दाखवणं व ते टिकवणं फार कठीण आहे . आणि तेवढं करण्यासाठी पूर्ण आयुष्य निघून जात !! " मैत्री ही पैसा - अडका , दाग - दागिने , रंग - वंश , जात - वर्ग , हे पाहून कधीच जुळत नसते ... तर मैत्री ही एक मनो - भावनेचे मिलन असते ... जणू स्वर्ग उद्यानातील एक सुगंधीत व कधीच न सुकणारे असे स्वर्गपुष्प असते ...
अशाच एका स्वर्गपुष्पाची ओळख जेमतेम एक - दिड महिन्यापूर्वी झाली . तिचे नाव ज्योती रावते असून आम्ही दोघीही प्रत्यक्षात अजूनही एकमेकांशी भेटलो नाही ... पण आमच्या गप्पा मात्र फोनवर तासन् तास रंगतात . माझ्याप्रमाणेच तिलाही काव्यनाद आहे ! मग काय आम्ही दोघीही मिळून दोन - दोन ओळींचे देवाणघेवाण करून एका सुंदरशा कवितेला जन्म देतो .... ह्याचा काव्याच्या जन्म सोहळ्यात रमताना रात्रीचे बारा कधी वाजले हेही आम्हाला कळत नाही.... कारण मैत्रीला काळ - वेळेचे बंधन थोडेच असते ! हे खरंय ना ....
" पूर्व जन्मीचीच पूण्याई
लाभली अशी अशाच
अशा मैत्रीची नवलाई
जीवनही झाले सुखी !!
शिवाय या धकाधकीच्या संघर्षमय जीवनात आपल्याला समजून घेणारा एक जीवलग मित्र असावा लागतो . जो आपल्याला आत्मनिर्भर व धाडसी बनवतो . तो एक ज्ञानसूर्य होऊन आपल्यातील दोष दूर सारण्याचा प्रयत्न अविरत करत असतो . कठीण प्रसंगी आपले मनोधैर्य वाढवून प्रसंगाला सामोरे जाण्याची प्रेरणा देतो .
" भरकटलेल्या पाखरा
दावी घरची वाट
सुकलेल्या फुला
बहरवी गच्च दाट !!
दुःखी वाळवंटी
वाही प्रेमझरा
एकांती आठवणीने
वाटे सान्निध्यी घरा !!
निःशब्द मनीचा घेई ठाव
न सांगताही कळे मनोभाव
व्हावी ऐसी मैत्री अजरामर
जैसे फणसामाजी गोड गर !!
अशी ही मैत्री आयुष्याची खरीखुरी कधीही चोरीस न जाणारी .... परस्परांच्या दुःखाचे ओझे शून्य करणारी ..... आयुष्याचा यशोलेख नेहमीच चढता ठेवणारी .... अर्ध्या रात्रीही हाकेला धाऊन जिवंत माणूसकीचा कळस गाठणारी ....सुख - दुःखात परस्परांना सावरून जीवनाचा मैत्री गाठणारी .... ही मैत्री एक देवाने पृथ्वीवर पाठवलेली दैवी देणगीच होय !!
शेवटी , या मैत्रीबद्दल एवढंच म्हणावेसे वाटते ....
" मुझसे दोस्त नहीं बदले जाते
चाहे लाख दूरी हो !
लोगों के भगवान बदल जाते हैं
अगर एक मुराद पूरी न हो !! "
✍️ अर्चना दिगांबर गरूड
मु. पो. किनवट , जि. नांदेड
मो. क्र. 9552954415
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मित्र असावा पण.....
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
कोणीतरी म्हटले आहे-
'मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!'
'मित्र म्हणजे दिलखुलास हसण्याची जागा,मित्र म्हणजे हक्काने सुख आणि दुःख शेअर करण्याचं भांडार,मित्र म्हणजे एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त टाकलेला विश्वास' खरोखर मित्राची व्याख्या करणे कठीण आहे.
मैत्री मध्ये स्वार्थ भावना नसतेच..!खरं म्हणजे सुख दुःखात नाती अधिक गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतात तर मित्र सावरण्याचा!!आनंदाच्या क्षणात मान न बघता धावपळ करणारा तर दुःखाच्या वेळी हवं नको बघत सर्व बघणारा देवदूत असतो मित्र!!
या जगात ज्याला मैत्री कळली आणि ज्याला निभावता आली त्याला काहीही कमी पडत नाही.हक्काने आणि विश्वासाने ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवावं अस नातं असतं मैत्रीचं!!
फार पुरातन काळापासून हे नातं सुरू आहे.कृष्ण सुदामा, कर्ण दुर्योधन अशा कितीतरी मित्रांच्या जोड्या सांगता येतील!! आपल्या मित्राचं दुःख जो त्याच्या डोळ्यातील भावा वरून जाणतो....सुदाम्याने आणलेले पोहे आनंदाने खाऊन आपल्या मित्राला न मागता सर्व काही देणारी कृष्ण सुदम्याची यारी म्हणजे मित्र प्रेमाची अनोखी मिसाळ म्हणावी लागेल!
या जगात कोणीही परिपूर्ण नसतो आणि त्यामुळे मैत्री म्हटली म्हणजे गुण दोष आलेच..!पण गुण दोषांसह स्वीकार हा मैत्रीचा खरा उसुल असतो.मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व अर्पण करणारे मित्र लाभणे म्हणजे आयुष्याला मिळणारा मोठा आधार असतो.'तू किनारा गाठलास तर मी तुझ्या सोबत आणि तळाशी गेलास तर तुला वाचवायला तुझ्या अगोदर' असं मैत्रीचं स्वरूप असायला हवं. मैत्रीला ना काळाचं, ना वेळेचं, ना वयाचं ,ना लिंगाचं बंधन इतकी निखळ मैत्री असावी लागते.खरं तर मैत्री ही भावना आहे कारण जशी मैत्री माणसांशी होते तशी ती एखाद्या प्राण्या बरोबरही ,इतकंच काय एखाद्या वस्तू बरोबरही मैत्री असू शकते.म्हणूनच तर पुस्तका सारखा दुसरा मित्र जगात नाही असं म्हटलं असावं!मैत्री मध्ये देणं घेणं,आणा भाका यांना काहीही स्थान नसतं. असतो तो फक्त एकमेकांवरचा विश्वास तुटू न देण्याचा अलिखित करार व विश्वास! व्यक्त अव्यक्त अशा आपल्या साऱ्या भावना समजून घेऊन आपला मार्गदीप बनून वाट दाखवण्याचं काम करतो तो खरा मित्र!
रक्ताच्या नात्याइतकेच मैत्रीचे नातेदेखील घट्ट असते. मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखात हसवते.मैत्री मध्ये स्वार्थ हा विषयच नसतो....आणि तो असेल तर ती मैत्री नसते तो असतो मनाने मनाशी केलेला एक व्यापार..!! आज काल केवळ सोशल मीडियावर दिसणारी तकलादू मैत्रीचा महापूर आला आहे.तासनतास हाय बाय करून चॅटिंग करणारे तथाकथित सोशल मीडियावरील दोस्त प्रत्येक्षात भेटल्यावर चेहऱ्यावर साधं हास्य सुद्धा दाखवत नाही....किती हा मैत्रीतील तकलादूपणा!!
खरं तर एरव्ही एकमेकांच्या तोंडातील घास खाणारे हॉटेलात गेल्यावर बिल देण्याची वेळ आल्यावर कल्ला करणारे पण मित्राला किंवा त्याच्या आई वडिलांना दवाखान्यात दाखल केलं आहे हे समजताच गुपचूप कॉन्ट्री करून बील भरणारे...असे असतात मित्र.मैत्री ही जगातील सर्वोच्च स्थानी असणारे नाते आहे.त्यात घेण्यापेक्षा देण्यात आनंद मानण्याची उदत्तता आहे...ज्यात कमावण्यापेक्षा मित्रासाठी गमावण्याची सिद्धता असते तर भोगा पेक्षा एकमेकांसाठी त्यागाची भावना असते. असे मित्र ज्याला लाभतात तोच खरा श्रीमंत माणूस असतो....!!कारण 'शितं दिसल्यावर जमा होणारी 'भुतं' म्हणजे मित्र नव्हेत....!!म्हणूनच जाता जाता एव्हढच वाटतं की एका कवीने म्हटल्या प्रमाणे प्रत्येकाला मित्र असावा---
हसतांना तोही हसावा ।
रडतांना अश्रु व्हावा ।
असला मित्र तर असाच असावा ।
नाही तर मित्रच नसावा ।
डॉ.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर
शहापूर ,(ठाणे)9226435827
harilbhoir74@gmail.com
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
लेख
मित्र
सोन्यासारखी मैत्री आपली ,
अशीच नेहमी राहूदे .
मैत्रीच्या या नात्यात ,
गोडवा असाच टिकु दे.
आधार आपण एकमेकांना ,
संघर्षाच्या या दुनियेत .
संवेदना आपल्या जागृत ठेऊ ,
बोथट झालेल्या माणुसकीत.
प्रत्येकाच्या जीवनात मित्र-मैत्रिणी असतातच. कारण मैत्री शिवाय आपलं जीवन हे भकास निराशमय होऊन जातं. अगदी सुरुवातीचे बालमित्र,वर्गमित्र, समाज मित्र, कामाच्या ठिकाणी असलेले मित्र. व आयुष्याच्या संध्याकाळी भेटलेले निवांत गप्पा मारण्यास मिळालेले मित्र. या सगळ्या मित्रांमध्ये महत्त्वाची म्हणजे नवरा बायकोची मैत्री होय. कारण बाकीचे मित्र तरी आपणाला कधी ना कधीतरी सोडून जाऊ शकतात. पण नवरा-बायकोचं नातं,त्यांच्यातली मैत्री ही शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहते.
बालपणीची मैत्री अत्यंत निरागस असते. प्रकारचा स्वार्थ, द्वेष,वैरत्वाची भावना नसते. या मैत्रीला जात,धर्म,पंथ याचे कशाचेच बंधन नसते. याला निखळ मैत्री असे म्हणतात. हायस्कूल व कॉलेजमध्ये असणारी मैत्री आयुष्याच्या एका वळणावर आपल्या जीवनाला एक कलाटणी देणारी ठरते. यावेळचे मित्र-मैत्रीण आपल्याला आपल्या शिक्षकांच्या पेक्षा आई-वडिलांच्या पेक्षा जवळचे वाटत असतात. आपले मित्र आणि मैत्रिणी हेच आपले सर्वस्व आहे, असे या वयात वाटत असते. आपल्याला गटातून बाहेर काढतील या एका भितीने सर्व मित्र मैत्रिणी आपल्या ग्रुप मध्ये जे काही नियम ठरतील ते आटोकाट पाळण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी जर काही गोष्टी त्यांना पटत नसतील, किंवा घरच्या लोकांना पटत नसतील तरीही त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध करणे भाग पडते व मग अशावेळी त्यांना ताण तणावाला सामोरे जावे लागते. हा आयुष्याचा विषय महत्त्वाचा टप्पा असतो की यावेळेला जे मित्र भेटतील, त्यांची पक्की दोस्ती होईल त्या व्यक्तीचे पुढचे जीवन सुद्धा या मैत्री वरच अवलंबून असते. जीवन चरितार्थ चालवण्यासाठी आपण ज्या ठिकाणी नोकरी करत असतो त्या ठिकाणी काम करत असणारे सहकारी यांच्यामध्येही सहकार्याचे नाते हे मित्रत्वाच्या नात्यांमध्ये हळूहळू परिवर्तित होत जाते व आपल्याला मित्रत्वाचा हात देऊन जाते. ही मैत्री आपली नोकरी संपेपर्यंत आपल्याबरोबर राहते. आपल्या सुखात दु:खात सहभागी होते.आयुष्याची संध्याकाळ म्हणजे वृद्धावस्था होय. यावेळची मैत्री हे समवयस्क समदु:खी अशा लोकांच्या बरोबर होते. मुलं-मुली हे त्यांच्या नोकरी संसारात रमलेले असतात. अशावेळी सहाजिकच या वृद्ध व्यक्तींच्या कडे दुर्लक्ष होत जाते.अशावेळी सहाजिकच प्रथम आपल्या जीवनाचा जोडीदार मग तो पती किंवा पत्नी असू देत ते एकमेकाचे चांगले सहकारी मित्र बनतात. एकमेकांची काळजी घेतात.
आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला आपले जीवन सुसह्य करण्या करता मैत्रीची आवश्यकता भासतेच भासते. कृष्ण व सुदामा, अकबर ,बिरबल, तेनालीरामन व राजा कृष्णदेवराय यांचे मित्र प्रेम सर्वांना माहीतच आहे. खऱ्या मित्रांमध्ये असे निस्वार्थी प्रेम असते. प्रियकर व प्रेयसी यांच्यामधील मैत्री ही प्रेमाची मैत्री असते. या मैत्रीला जबाबदारीची, कर्तव्याची जाण नसते. म्हणून तर अशा ह्या प्रेमवीरांच्या कडून आततायीपणाचा निर्णय घेतला जातो. व बऱ्याच वेळा त्यांना आयुष्यभर पस्तावत बसावे लागते. मग अशा वेळेला सुरवातीची मैत्री हळूहळू कमी होत जाते. प्राण्यांच्या बरोबर ही आपली मैत्री होऊ शकते. प्राण्यांच्या बरोबर केलेली मैत्री कदाचित आपण विसरू शकू पण ते प्राणी कधीही विसरत नाहीत. आयुष्याच्या वळणावर जेव्हा तुम्ही त्यांना भेटतात तेव्हा ते आपली मैत्री दाखवतात, प्रकट करतात व आपल्याला प्रेमाने बिलगतात.
मैत्री ही विश्वासाच्या पायावर टिकते.दोन मित्रांच्यामधे असलेला एकमेंकांबद्दलचा विश्वास हा मैत्री चा भक्कम पाया आहे.मैत्री म्हणजे असा परीस आहे की ज्याच्या जीवनात या मैत्रीरुपी परीसाने स्पर्श केला आहे त्याचे जीवन सोन्यासारखे मौल्यवान होते.
स्त्री व पुरुषाची निखळ मैत्री असू शकते . समाजात एक मानसिकता झाली आहे की स्त्री व पुरुष कोणत्याही नात्याशिवाय मैत्री करु शकत नाही.पण हे खरे नाही.माझ्या मते स्त्री व पुरुष हे एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात. मैत्रीला लिंगभेदाचे बंधन नसते.मैत्रीत एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं.
एक स्त्री व पुरुष जर विचारांच्या पातळीवर एकत्र आले तर त्यांच्यात वैचारिक नाते निर्माण होते .विचारांची देवाणघेवाण एकमेकांना समजून घेणे , भावनांची कदर करणे , संकटसमयी मदत करणे हे सर्व ओघाने येतेच .
पण समाजातील मानसिकता हे मान्य करत नाही.जे या वैचारिक पातळीवर पोहोचले आहेत त्यांना यावर आक्षेप मुळीच नसतो .समाजाने बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे .सर्व नात्यांना एकाच मापात तोलून चालणार नाही .महत्त्वाचे म्हणजे स्त्री व पुरुष या दोघांनीही एकमेकांना पूर्ण ओळखले पाहिजे.मैत्रीत अंधविश्वास कामी येत नसतो . सुज्ञास सांगणे न लगे .
बदलत्या समाजव्यवस्थेत बदलत्या काळानुसार आपणही सामाजिक व वैचारिक पातळीवर बदलले पाहिजे.स्त्री व पुरुष यांची निखळ मैत्री असू शकते हे आपल्या वागण्यातून व व्यक्तिमत्वातून दाखवून दिले पाहिजे.
हाक हवीय विवेकाची ,
बुद्धी जागृत करायला .
मैत्रीचा परीसच ऊजळेल ,
तावून सुलाखून विश्वासाला.
विश्वासच मैत्रीचा परीस,
नाही तुटायची कधीही .
जपूया नाते अखंड ,
संकटे आली तरीही .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ
जि. कोल्हापूर
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मित्र
मित्र असणे आणि तेही जिवाभावाचे ही फार मोठी संपत्ती आहे.माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे.संवाद साधणे ही सुद्धा मानवी जीवनात आवश्यक गोष्ट आहे.संवादातूनच मैत्री होत जाते.मैत्री कशी असावी? किंवा मित्र कसे असावे?हे सुद्धा महत्त्वाचे आहे.तुमच्या सुखदु:खात तुम्हाला साथ देणारे, तुमच्या हितासाठी झटणारे आणि प्रसंगी तुमचे चुकत असेल तर तसे परखडपणे सांगणारे मित्र पाहिजेत.जो खरा मित्र असतो तो तुम्हाला कधीच चुकीचा सल्ला देत नाही.तुमच्या मनातील अचूकपणे जो ओळखतो तो खरा मित्र.अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो की आपलेच काही मित्र आपल्या आनंदाच्या प्रसंगात अगदी न चुकता हजेरी लावतात.पण जर का एखादा बाका प्रसंग उद्भवला तर सरळ सरळ आपल्याला टाळतात.अशा मित्रांना वेळीच ओळखून त्यांच्यापासून लांब राहणे हे कधीही श्रेयस्कर.
खऱ्या मित्राची पारख संकटात असताना अचूकपणे करता येते.असतील शिते तर जमतील भुते या म्हणीनुसार स्वार्थी मित्र आपल्याला पदोपदी भेटतात.त्यामुळे मैत्री करताना नीट पारखून करावी हे जरी खरे असले तरी बरेचदा आपण चुकीच्या व्यक्तींशी मैत्री करतो आणि मग आपली मानसिक फसवणूक होते.म्हणून दोन चारच मित्र किंवा मैत्रिणी असाव्यात पण त्या जिवाला जीव देणाऱ्या असाव्यात.समोरची व्यक्ती आपला चांगला मित्र होण्यासाठी आपल्यालाही त्याप्रमाणे वर्तन करावे लागते.मित्र आणि मैत्री कायम टिकवण्यासाठी आपणही ती प्रामाणिकपणे निभवावी लागते.मित्राच्या चेहऱ्यावरून त्याचे दु:ख,वेदना समजता आली पाहिजे.आपल्याकडून शक्य होईल तेवढी मानसिक, शारिरीक वेळप्रसंगी आर्थिक मदत करायला पाहिजे.
मित्राच्या दु:खात सांत्वन,आनंदात आनंद जर देता आला तर मित्रही तुम्हाला ते निश्चितपणे देतो.खरा मित्र कधी मोठा भाऊ,कधी गुरू तर कधी शिष्य होतो.तुमच्या मनाला त्याच्याशी बोलून खूप समाधान वाटतं.तर अशा मित्राला,मैत्रीला नेहमी जपायला हवे.
©सौ.गौरी ए.शिरसाट
मुंबई
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
निखळ मैञी
जीवन जगताना अनेकांच्या सहवासाची गरज भासत असते.अनेक नाती रक्ताची असूनही कधीकधी ती बोजड वाटायला लागतात.अशावेळी मनाने मानलेली ,विश्वास जपलेली पविञ मनाचं निर्मळ ,निखळ नात म्हणजे मैञी होय.मैञीमध्ये कुठलेही बंधन नसतात ना मर्यादा नसते.मनातील भावना व परिस्थिती सहज उलगडता येत ते स्थान मैञी.पण या मैञीचा विश्वास हा धागा महत्वाचा असतो.तो मजबूत असला की कुठल्याही तकलादू कारणाने हे नातं तुटत नाही.विचार पटले व अाचरण साफ ठेवले की ऋणानुबंध घट्ट होत जातात.हे नाते खूप पविञ मानले जाते.यात मिञांनी कधीही दगाफटका करता कामा नये.जिवनाच्या प्रत्यैक संकटात दत्त म्हणून पाठीशी न राहता सोबतीने सावलीसारखा चालतो त्या नात्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येते.कारण जीवापेक्षाही जास्त कांमत इथे मैञीला असते.
जीवन हे क्षणभंगूर अाहे .प्रत्यैकाला एका चांगल्या मिञाची नितांत गरज असते.सुखदुःखाच्या ,हितगुजाच्या विरंगुळ्यासाठी निर्मळ वाहणार्या झर्यासारख हे नात प्रत्येकालाच असते.पुरातन काळापासून हे दिसून येतं.सुदाम्याचे मुठभर पोहे असो की,शिवरायांच्या जीवनात अालेला कवीकलश असो किती अगाध अाणि पविञ मैञी होती त्यांची.
अाज अापल्या समाजात मिञाला फक्त मिञच असावा किंवा मैञीणिला मैञीणचं असावी हाच समज अाहे.पण मला हे योग्य वाटतही नाही.कारण एखाद्या मिञाला चांगली मैञिण असण काय वाईट अाहे??लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात.किंवा एखाद्या मैञीणीला चांगला मिञ असणे यात काय वाईट???हे अामच्या समाजाला पटत नाही.पण लक्षात घ्यावयाची एक गोष्ट म्हणजे जेंव्हा अापण अापला मिञ किंवा मैञिण निवडत असतो यावेळी योग्य निवड करूनच नात जुळलेलं असतं.मग मुलामुलींची मैञी असो की,मुलींमुलींची वा मुलामुलांची.निवड माञ योग्य व्हायलाचं हवी.या नात्यात कसलाही स्वार्थ नसला म्हणजे झालं.स्वार्थ असेल ती मैञीच नव्हे..म्हणून मैञीचं नातं निखळ असैल तर ते कुठल्याही परिस्थितीत साथ देईल.जगण्याला बळ देईल.सुखदुःखात हक्काने त्याच्याजवळ सल्ला मागता येईल.तोही तितक्याच पोटतिडकीने ते नातं निभावेल हा अाधार ..यालाच तर मैञी म्हणतात.जी गोष्ट अापण घरच्यांना सांगू शकत नाही ती मिञमैञीणजवळ सहज बोलू शकतो.म्हणजे हक्काचं योग्य ठिकाण मैञी..
अाजकाल सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक मिञ मैञिण बनत अाहेत.काही खूप चांगलेही नाते बनत अाहेत तर काही फसवतही अाहेत.म्हणूनच निवड योग्य करावी व नंतरच निर्णय घ्यावा.या सोशल मिडियाच्या माध्यमातून अशाच एका मैञिणीने माझ्या अायुष्यात प्रवेश केला.अाज अाम्ही जिवाभावाच्या सख्या बनलो अाहोत.सुखदुःख शेअर करून जीवनाची रांगोळी सजवत अाहोत.तिने माझ्या अायुष्यात येऊन माझ्या जीवनाला कलाटणी दिली अाहे.तिचा तो समजुतदारपणा मला खूप भावतो.वारंवार सुचना देऊन मला ती दुःखापासून दूर नेते.सतत हसवत असते.जगण्याचा नवा अर्थ मला तिच्यामुळे मिळाला.अाज पुन्हा नवचैतन्य बहरले.तिच्या त्या मनमुराद हसण्याने जीवन स्वच्छ झाले अाहे.अाजपर्यंत अाम्ही भेटलोही नाही तरी पण अामचं नातं असचं अाम्ही निभावत अाहोत.
म्हणतात ना शरीराने दूर राहीलं तरी चालतं,,,,पण मनाने माञ जवळ असावं ..,,तेच नात अायुष्यभर टिकत..तस अामच अाहे..
प्रत्येकाच्याच जीवनात हे मैञीच फुल बहरत असतं..त्याचा दरवळ अापल्या अायूष्यावर पसरून हे जीवन सुंदर वाटू लागत...म्हणून मैञी ही great.....
श्रीम.रावते ज्योती नांदेड
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
मैत्री
"मैत्री एक नात्यातील अवखळ विश्व"
मैत्री हे असे नाते आहे की,त्याला उपमा अनेक,आपण विविध नातेसंबंधातून जोडले जात असतो.परंतु हे नाते सर्व नात्यापेक्षा वेगळे आहे,आई-वडील आपले पालक असले तरी त्यांच्यात आणि पाल्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं की,ते अधिक दृढ होते. आताच्या काळात ते गरजेचे आहे,त्यामुळे अधिक जवळीकता येते.
मैत्री समान व्यक्ती नुसारच नसते, तर ती एक मुलगी व मुलगा यांच्यातही असू शकते,परंतु या मैत्रिकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा वेगळा असतो,स्त्री पुरुष यांच्यात देखील मैत्री होत असते.
मैत्री असावी सुदाम्यासारखी, कारण असा मित्र असणे तसेच कृष्ण सारखा जिवलग मित्र जो मित्राचे मन ओळखणारा,अशी मैत्री धन्यच!मैत्री मध्ये कधीच उच्च-नीच असा भेद नसतो.
मैत्री आपल्याला दिशा देण्याचे काम करते,आपल्या मनातील भाव व्यक्त करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री होय.म्हणूनच बालपणातील मैत्री आपल्याला निरंतर आठवते,कारण त्या वयात कच्च्या मनावर आठवणी कोरल्या जातात,आणि त्या ठसा उमटवल्यागत सदा आठवतात,त्या वयात भेटलेले मित्र,मैत्रिणी आताही भेटावेत वाटते.
मनाचा कोपरा प्रत्येकाकडे असतो, तो आपण इतरांसोबत व्यक्त करू शकत नाही पण मैत्रीत तो मनमोकळेपणे व्यक्त होतो.मैत्रीत स्वछंदी बागडायचे असते,अगदी निरागस फुलपाखरासारखे. मैत्री एकमेकांस सावरते, चुकत असल्यास दिशा दाखविते,चांगले मित्र फार कमी असतात,अशा मैत्रीत
आपण चांगले शिकायचे असते.
मैत्री निभवता माणसे वृद्ध ही होतात,लहानपासूनच मित्र वृद्धपकाळात ही असतो,अशा मैत्रीला सलाम!
सुजाता जाधव
नवी मुंबई
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~◆~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें