*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- आडतीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 26 मे 2020 मंगळवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- मुलाचे वडिलांस पत्र*
( शिक्षणासाठी किंवा नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहत असलेल्या )
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
(37)
सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया.
*बाहेर शिकणाऱ्या मुलाचे वडिलास पत्र*
||श्री||
दि. 26/5/2020
तिर्थरुप,
प्रिय पप्पास,
साष्टांग नमस्कार.
तुम्ही सर्व खुशाल आहात अशी अपेक्षा करतो, मीसुद्धा इकडे छान आहे. आता होस्टेलवर रुळलोआहे. माझे रूम पार्टनर खूप चांगले आणि मनमिळावू आहेत. एका रूममध्ये आम्ही दोघे जण आहोत. रूमपण छान आहे, समोरच एक बगीचा आहे सकाळी सकाळी येणारे कोवळे ऊन एकदम छान वाटते.अंगणात एक पाळणा आहे. जेवण पण बरे आहे, माझी काळजी करू नका मी या वातावरणात आता रुळायला लागलो आहे.
सगळं छान आहे, पण सकाळी सकाळी उठायची सवय नव्हती ना, मम्मीला ५ मिनिट अजून झोपू दे ना, असे म्हणण्यातली मजा नाहीच. अलार्म लावून झोपावं लागतं. तुमच्यासोबत नाश्ता करताना होणाऱ्या गप्पा तर मी प्रचंड मिस करतो. मी कधी स्वतः हाताने चहा केला नाही कि ग्लास भर पाणी घेतलं नाही. मम्मीला तर कामात कधी मदत केलीच नाही, इकडे सगळे स्वतःचे स्वतः करावे लागत आहे. मी उठलो कि मम्मी अगदी हातात चहा आणून देई, तुम्हाला माहित आहे का ? आता माझा चहा रोज मीच करतो आणि पाळण्यावर बसून पितो पण एकटाच.
पप्पा इथे घराची उब नाही, कधीकधी रडू येते तुमची खूप आठवण येते, पण मग तो प्रसंग आठवतो, आपल्या घरातल्या चिमणीच्या घरट्यात जेव्हा पिल्लाना चिमणी उडायला शिकवत होती तेव्हा ते बघून मी तुम्हाला म्हणालो होतो, कशाला या एवढ्याशा पिल्लाला असा त्रास द्यायचा ? नाही उडाला तर काय होते ? बरा आहे कि घरट्यातच. तेव्हा तुम्ही मला समजावले होते ,उडायचे असेल तर घरटे सोडावेच लागते पिल्लांनी घरटे सोडले नाही तर ते कधीच उडणार नाही आणि पक्ष्याला एक ना एक दिवस उडावेच लागते. याचा अर्थ मला आज आता कळतो पप्पा. एकदम बरोबर होते तुमचे, जर मी घर सोडले नाही तर कधीच उडू शकणार नाही, कधीच स्वावलंबी होऊ शकणार नाही. तुमचे, माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला घर सोडावे लागणारच होते.
मला माहिती आहे पप्पा कि तुम्हाला सुद्धा माझी खूप आठवण येत असणार, तुम्हाला कदाचित माझ्यापेक्षा जास्त त्रास होत असणार. मी तुमचा त्रास फुकट जाऊ देणार नाही पप्पा, ज्या ध्येयाने ज्या उद्देशाने मी घर सोडले आहे, तुमच्यापासून दूर राहत आहे, ते मी पूर्ण करूनच घरी परतणार पप्पा आणि तेसुद्धा वेळेत. आजपर्यंत कोणत्याही गोष्टीची कमी तुम्ही मला जाणवू दिली नाही, कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हंटले नाही. घरची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असतांना माझ्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही मला एवढ्या दूर सर्वात चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन दिला, तुम्ही तुमच्या प्रेमात कुठेही कमी पडला नाहीत पप्पाआणि आता माझी पाळी , मी तूम्हाला नाराज करणार नाही पप्पा. तुमच्या आणि मम्मीच्या सर्व कष्टांचे मी चीझ करेल. एक दिवस असा येईल पप्पा की तुम्हाला माझा गर्व असेल.
पुढच्या महिन्यापासून परीक्षा सुरु होणार होत्या पण कोविड19 ने संपूर्ण जगाला ग्रासले असल्याने सध्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अजून परीक्षेचं काही निश्चित नाही. आम्हाला लवकरच होस्टल सोडून घरी जाण्याची परवानगी देणार आहेत. मी लवकरच घरी येतो. मग आपण सर्व बसून गप्पा मारू, इथल्या खूप गमती जमती मला तुम्हाला सांगायच्या आहेत. ताई सोबत कालच बोलणं झालं. ताई पण लवकरच यायचं बोलली. आपण आपली आणि मम्मीची काळजी घ्या. अत्यावश्यक असेल तरच बाहेर जा. सोफी आणि टफी कसे आहेत. त्यांची पण खूप आठवन येते. मी माझ्या मित्रांना त्यांचे फोटो दाखवतो. सगळ्यांना ते खुप आवडले. मम्मीला सांगा सोफी ला सकाळी बाहेर फिरायला ने म्हणून आणि टफीला सुद्धा. मी लवकरच येतो. आल्यावर आपण खुप गप्पा मारू आणि सोबत ताई पण राहणार आहे. मग तर मज्जाच मज्जा आणि यावेळी मी मम्मीला मदत पण करणार आहे. बरं पत्र पुर्ण करतो. लवकरच भेटू. मम्मीला माझा शिर साष्टांग नमस्कार.
तुमचा लाडका
शिरीष
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
( 5)
नोकरीसाठी बाहेर गावी गेलेल्या मुलाचे वडीलास पञ
श्री
दि.२६-०५-२०२०
तीर्थस्वरूप बाबास श्री साष्टांग नमस्कार.
वि.वि.पत्र लिहिण्यास कारण की
मी घरून निघालो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच शहरी पोहोचलो.
माझ्या मित्राने अगोदरच रूम पाहून ठेवले असल्याकारणाने मला रूमवर जायला फारसा वेळ लागला नाही. माझा मित्र आनंद मला रेल्वे स्टेशनला घ्यायला आला होता. त्यानंतर आम्ही दोघे मिळून घरी पोहोचलो. तिथे गेल्यावर मी फ्रेश होऊन जेवण केले. त्या दिवशी मला मेस चा डब्बा खावा लागला. जेवण करता करता मला आईने बनवलेल्या स्वयंपाकाची फार आठवण आली. इतकी वर्षे तिच्या हातचे जेवण जेवून मला सवय झाली होती. बाबा त्यादिवशी मी आरामाच केला. दुसर्या दिवशी पहाटेच उठून नोकरीवर पहिला दिवस असल्याकारणाने जायचे होते. नोकरीचा पहिला दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आनंदाचा होता. मी तयारी केली आणि लगेच ऑटो रिक्षा बसून ऑफिसला गेलो. तिथे गेल्यावर मला सगळे नवीन नवीन वाटले. सर्वांची ओळख झाली. मी ही माझी ओळख करून दिली. मला नेमून दिलेले काम मी दिवसभर करून सायंकाळी रूम ला पोहोचलो. खूप थकून गेलो होतो. चहा घ्यावा वाटत होता. आईची खूप आठवण आली. ती मला वेळोवेळी चहा जेवण नाश्ता किती आनंदाने करत होती व देत होती.बर असो. त्यानंतर फ्रेश होऊन मी पायऱ्या उतरून खाली गेलो चहाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन चहा घेतला. लगेच परतलो. मित्राने येता येताच मेस चा डब्बा आणला दोघे मिळून जेवण केलं. मला जेवण गेले नाही. कारण जी भाजी सकाळच्या डब्यात होती तीच भाजी संध्याकाळी सुद्धा आली होती.
खूप दुःख वाटले.
बरं असो.
बाबा
तुम्ही माझी काळजी करू नका. मला आता हळूहळू सवय होऊन जाईल.
तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या व आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आईला म्हणावं माझी आठवण आली तर रडत जाऊ नकोस. लवकरच मी सुट्टी पाहून घरी तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत असंच संभाषण करत राहू.
आई बाबा मला तुमची खूप खूप आठवण येते.
पुन्हा एकदा तुम्हा दोघांना नमस्कार.
तुमचा लाडका मुलगा
पवन
〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे
ता. हदगाव जि.नांदेड.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
१) *मुलाचे वडिलांना पत्र*
प्रिय,
बाबा,
सा.न.वि.वि.
आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि माझे भविष्य घडविण्यासाठी मी आपल्यापासून दूर आहे. पण आपल्या आठवणी मला छळतात. मला आईच्या हातच्या भाकरीची आणि आपल्या मायेची आस लागून राहिली आहे. बाबा मी परवाचे वृतपत्र वाचले.आपल्याच गावच्या गणपत दादाच्या पोराचे कारनामे वृतपत्रामधून कळले. आणि मला लगेच आपल्या सर्वांची खूप खूप आठवण झाली. कारण तुम्हालाही माझ्या बद्दल विचार सतावत असतील. गणपत दादांच्या कैलास सारखे आपलेही पोर वाया जाईल की काय असा विचार तुमच्याही मनात आला असेल. आणि कदाचित आलाही नसेल. कारण मला ठाऊक आहे. तुमचा माझ्यावर कमी, पण तुम्ही दिलेल्या संस्कारावर जास्त विश्वास आहे. याचा अर्थ गणपतदादांनी कैलासवर काय कमी संस्कार केले होते. पण घडलेच ना,नको ते घडले. आणि म्हणूनच मी मुद्दाम आपणाला हे पत्र विस्ताराने लिहित आहे. बाबा घरट्यातून नुकतीच बाहेर पडलेली पाखरं पंखात बळ भरल्याचा फाजील आत्मविशास बाळगून आकाश कवेत घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना या आकाशाची दिशा कळलेली असते ना मार्ग माहित असतो. घरटयात मिळलेले सुख आणि आधार, घरटयाबाहेर पडल्यावर चारचौघांच्या संगतीने सहज विसरून जातात. आणी मग अनर्थ ओढून घेतात. जे कैलासच्या बाबतीत घडले. मी आपणाला विश्वास देतो आहे. तुमच्या अपेक्षाप्रमाणे मी नाही घडलो तर किमान बिघडणार तरी नाही. कारण समाजात राहायचे बाळकडू तुम्ही मला जे दिले आहे ते मी कोळून पिलो आहे. पुस्तकातील बंदिस्त ज्ञानापेक्षा समाजातील खुले ज्ञान आम्हाला दिले आहे. तो संस्कार पेलण्याचे सामर्थ्य प्रथम तुम्ही आमच्यात निर्माण केलं. आणि त्यामुळेच आमच्या वर्तनावर, आमच्या वागण्यावर, आमच्या आचारावर, आमच्या विचारावर तुमचा असीम विश्वास आहे. सहवासाने माणसे बिघडतात हे जेवढे खरे आहे. तेवढेच मनावर ताबा ठेवून आईवडिलांच्या कष्टाची जाणिव ज्याला आहे त्यांना बिघडण्यासाठी वेळ नसतो. हे देखील खरे आहे. आपण माझ्या बाबतीत कुठलाही गैर विचार आणू नये. मी केवळ आणि केवळ माझे लक्ष्य साध्य करण्यात व्यस्त आहे. आईनेही माझी काळजी करू नये.चि. संकेत आणि कु. गीताला शुभाशिर्वाद... ! तुम्ही पण काळजी घ्यावी.
कळावे
तुमचा आज्ञाधारक मुलगा
विशाल.
++++++++++++++++++++++++++
*हणमंत पडवळ*
*उस्मानाबाद*
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*(09)*सौ यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*मुलाचे वडीलांस पत्र*
प्रिय ,बाबा
शि.सा.नमस्कार वि.वि.
पत्रास प्रयोजन असे आहे की,आज थोडं एकट एकट वाटलं,
बाकी काही नाही,तुमची खुपखुप आठवण आली, म्हणून जरा बोलावसं वाटलं……मी चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,कळलच नाही.मी हात सोडुन चालायला व धावायला लागलो ते.आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं. मनात अनेक गोष्टी दाटून येतात.त्यांना आपल्या जवळ पत्र रूपाने बोलून वाट मोकळी करून देत आहे.मला आठवतात ,बाबा आपण जेवतांना काऊ, चिऊ शिवाय कधी घास माझ्या पोटात गेला नाही,आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,वातावरणात एवढं प्रदूषण वाढल्ं आहे यामुळे ,तसेच पाण्याचा तूडवटा होत असल्याने बिचारे काऊ चिऊसोबत इतरही पक्षी भटकत नाही. पण तरीही काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसावसं वाटते. बाबा....एक सांगू बाबा '"सध्या कोरोणा या वैश्विक महामारीने जगाला ग्रासले आहे", .सर्वत्र *लाँकडाऊन*सूरू असल्यामुळे एक मात्र चांगली गोष्ट घडत आहे .ती म्हणजे पर्यावरणाचे प्रदूषण कमी कमी होत आहे .आपल्या भारतातील जी "गंगा-यमूणा बचाव" मोहीम सुरू केली होती.ती मात्र "लाकडाऊन "ने यशस्वी होत आहे असे वाटते. नदीचे तळ दिसत आहे..आणि हं आमच्या चिकूच्या झाडावर फंडकुल ने घरटे बांधले आहे.त्यात इवलेसे दोन पिल्लूदेखील *"चिवचिवाट"* करतात.आणि बालपणीच्या आठवणीना उजाळा देतात.
लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटतं .ओला चिंब होऊन तुमच्या सोबत नाचावस वाटतं .एकदा घरात एकटा असताना,"मी सर्व घर रडून- रडून डोक्यावर घेतलं होत,
पण तुम्ही धावत पळत येउन " मी आहे,मी तुझ्या सोबत आहे.घाबरू नकोस "असं सांगितलं होत,आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकटं एकटं " वाटतं.बाबा तुम्हांला आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,त्यादिवशी तर पूर्ण आभाळच तुमच्या डोळ्यात दाटलं होत,आज उगाचंच अडखळून पडावसं वाटतं आणि आपण धावत येऊन मला मलम पट्टी करावी असं वाटते .
रात्री झोपतांना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,
तुम्ही नसतांना आईच्या कुशीतही
झोप येत नसायची.आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावंस वाटतं .आणि गोड स्वप्ननाच्या जगात रममाण होत राहायची ईच्छा होत आहे.बाबा तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,पण तोच हात पकडून घरी जातांना मात्र कसलेच भान नसायचे, बाबा आपल्याला आठवते का? मी सायकल शिकतांना कितीदा तरी पडलो, रडलो पण हार नाही मानला.आणि आपल्या मुळेच एका दिवसात सायकलशिकलो.आणि धूम पळवायला लागलो देखील.बाबा,"एक चक्कर ,एक चक्कर "म्हणून मी आपल्याला चक्कर मारायचो.शेवटी माझाच विजय होत होता.
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटते.सायकल चालवावी वाटते.तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटते.
"बाप हा बाप असतो, कर्तव्याचा माप असतो," म्हणतात ते शंभर टक्के खरं आहे.
बाबा मला चांगल्या शाळेत घालण्यासाठी आपली केलेली धडपड,donation साठी उधार मागून आपण माझ्या शाळेची फी भरली . का? तर ,मला चांगले शिक्षण मिळावे म्हणून तर होती ना ती सर्व धडपड .पण बाबा खुपखुप छान केलं की , मला तिसरीतच प्राईवेट शाळेतून काढून नगरपरिषद शाळेत शिकविले कारण मी बघत आहे प्राईवेट शाळेत शिकलेले विद्यार्थ्याना फक्त पोपट पंचीच असते.त्यांना आपल्या भारताचा इतिहास,भुगोल तर नूसताच गोल वाटतो. .हे विद्यार्थी आमच्यासारखं स्पर्धा परिक्षेत आणि जीवनाच्या परिक्षेतही मागेच राहतात .
बाबा आपण पहिल्यांदा कॉलेज मध्ये सोबत आला होतात.होस्टेल शोधण्यासाठी देखील आपण माझ्या सोबत होतात.
आपण स्वतः फाटक् बनियान घालून आमच्यासाठी jeans व pant घेऊन दिलात.बाबा आपण स्वतः टपरा mobile वापरून,आम्हाला stylish mobileघेऊन दिलात .आमची शानशौकत पूर्ण करण्यासाठी आपण किती जीवाचा आटापिटा केलात बाबा. तुम्ही prepaid चे पैसे स्वतःच भरून माझा आवाज ऐकण्यासाठी तरसत असता."सगळ नीट पाहिलं का?" "अभ्यासाचे समजते का? "असं ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले
आहेत बाबा.बरं आता पत्राला विराम देतो.पत्र पाठवित जा.बरं वाटते.जवळ असल्याचा आभास होतो.
आईला शि.सा,ताईला नमस्कार सांगा.
आपला लेक
संतोष
*सौ यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*बाहेर ठिकाणी शिकायला गेलेल्या मुलांचे आईवडीलास पत्र*
*✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)*
तीर्थरूप आई-बाबा
साष्टांग नमस्कार!!!
पत्र पाठविण्याचे कारण हेच आहे की,मी अजूनपर्यंत तुम्हाला सोडून कोठेही राहिलो नाही त्यामुळे तुम्ही देखील खूप चिंतेत असणार आहे. मी खेड्यात राहणारा लाजाळू मुलगा शहरातील मुलांशी मिसळून राहणार का???शिक्षणासाठी गेलेला मुलगा अभ्यास करेल का??अशा नाना चिंता तुम्हाला भेडसावत असेल नाही का???पण आई-बाबा तुम्ही काहीही काळजी करू नका.मला असलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे कसे???ते तुम्हीच छोट्या-छोटया गोष्टीतून वळण लावले आहेत.ते संस्कार माझ्या नसानसात भिनलेले आहे त्यामुळे असं कोणतेही वाईट कृत्य करणार नाही त्यामुळे तुमची मान खाली जाईल.मी खूप मजेत आहे थोडा येथील विद्यार्थ्यांशी जुळवून घेण्यात थोड्या अडचणी आहेत पण काळजी करण्याची काहीच गरज नाही.
मी अगदी लहानपणापासून शिक्षण घेण्यासाठी आग्रही आहोच. मी व माझा अभ्यास यात गुरफटून राहतो. शिक्षण घेण्यासाठी म्हणून तुमच्यापासून दूर आलेलो आहे.मराठी माध्यमातून थेट विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याने थोडं समजायला अवघड जात आहे परंतु कठोर मेहनत,जिद्दीच्या बळावर ते शिखर देखील नक्कीच पार पाडणार आहेत.तुम्ही खोली करून राहू नको,वसतिगृहात राहण्याचा दिलेला सल्ला अगदी मोलाचा आहे कारण इथे आम्ही 60 जण वेगवेगळ्या शाखेचे विद्यार्थी आहोत.शिक्षणाच्या बाबतीत काही समजले नाही तर बिनदिक्कतपणे त्यांच्या कडून समजावून घेतो त्यामुळे 'एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ' याप्रमाणे एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे कुटुंबच इथे मिळाले आहेत.ज्याप्रमाणे शाळा व महाविद्यालय मध्ये शिस्त,मूल्यशिक्षण,परिपाठ,जीवनाचा सार सांगत असतात त्याचप्रमाणे वसतिगृहात सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यत शिस्त ,अनुशासन नि स्वावलंबी बनण्याचे मंत्र दिले आहे.सकाळी योगासन,प्रार्थना,नास्ता मिळत असते त्याचसोबत दुपारी 12 वाजता स्वादिष्ट जेवण दिल्या जाते आणि सायंकाळी 8 वाजता 'इतनी शक्ती हमे देना दाता' ही प्रार्थना सामुदायिक रित्या म्हणत असतो.इथे जीवन जगतांना आवश्यक असलेली सारी मूल्ये प्रत्यक्ष शिकविल्या जाते.
मी ज्या ज्ञानदा वसतिगृहात राहतो तिथून अगदी जवळच माझे आनंद निकेतन महाविद्यालय आहे.त्यामुळे खूप दूर आहे अशी तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर चिंता करायची काहीही गरज नाही.तुम्ही माझ्यासाठी शिक्षणात उंच भरारी मारण्यासाठी शेतात काबाडकष्ट तुम्ही करीत आहात.तुमचे ऋण कधीही फेडू शकत नाही.कधी कोणतीही अडचण असल्यास बरे-वाईट गावाकडील खुशाली कळवत जावी.तुम्ही आई-बाबा,भाऊ कसे आहेत.हे पत्राद्वारे मला कळवावे.
कळावे लोभ असावा
तुमचाच लाडला
दुशांत
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
34
*श्री.सुंदरसिंग साबळे गोंदिया*
मो.9545254856
===============
आपण बाहेर गावी हॉस्टेलमध्ये राहतो याविषयी माहिती सांगणारे आईवडिलांना पत्र,
दिनांक
२६. ०५. २०२०
तिर्थरुप , आईस
साष्टांग नमस्कार
माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व खुशाल असाल.
मी येथे उत्तम आहे तुला माझ्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. मी हॉस्टेल आणि विद्यालय यामध्ये गुंतून गेलो आहे . मला इथे राहण्यात आता कसलीही अडचण येत नाही. माझी रूम पहिल्या मजल्यावर आहे. माझ्या रूम मध्ये माझ्या सोबत आणखी एक मुलगा राहतो. त्याचे नाव पवन आहे आणि तो गोंदिया चा आहे . तो ही माझ्या वर्गातलाच आहे. आम्ही आता चांगले मित्र झालो आहे आणि रोज एकत्रच जातो येतो. तो मला होस्टेलच्या सर्व सवयी अवगत करून देतो आहे . त्याचे आणखी मित्र पण माझ्या ओळखीचे झाले आहे. तर आता मला एकटेपणा वाटत नाही.
हॉस्टेलचा पर्यावरण अभ्यासास खूपच उपयुक्त आहे. कारण आम्ही वेळापत्रकानुसार अभ्यास करतो. त्यामुळे आम्हाला अभ्यास आणि खेळण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. माझ्या सर्व मित्राना त्यांच्या अभ्यासात खूप रस आहे. म्हणूनच आमच्या अभ्यासाच्या विषयांवर बऱ्याच वादविवाद होत असतात ज्यामुळे एखाद विषय सहजतेने लक्षात राहतो. हॉस्टेल मध्ये खूप सारे नियम आहेत ज्यामुळे आम्ही नेहमी अनुशासित, शिस्तीत राहतो.
मी एक गोष्ट मान्य करततो कि मी आता जास्त जेवत करतो. पण आई तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते. तशी मला आता होस्टेलच्या जेवणाची सवय झाली आहे तरी तू चिंता करु नकोस.
आई मला तुझी आणि पप्पांची कमी जाणवते. येणाऱ्या उन्हाळी सुट्टीची मी आतुरतेने वाट पाहत आहे , सुट्टी लागल्या वर मी घरी येतो.
तुझाचा लाडला
सुंदर
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
बाहेर गावी शिक्षण घेत असलेल्या मुलाचे वडीलास पत्र.*
39)सौ.भारती दिनेश तिडके
गोंदिया.
|| ॐ||
तीर्थरूप बाबास,
संस्कार चा शिरसाष्टांग नमस्कार.
तुमचे पत्र मिळाले. मी खुशाल आहे. सध्या अभ्यास जोरात सुरू झालेला आहे. कारण पुढील महिन्यात दुसऱ्या सेमिस्टर ची परीक्षा होणार आहे. होस्टेलमध्ये खूप सारे मित्र झाले आहेत. आता होस्टेलच्या वातावरणात मी खूप रूळलो आहे. पण घरची आठवण आज खूप येत आहे.
आज थोडं एकटे-एकटे वाटले. बाकी काही नाही तुमची आठवण झाली म्हणून जरा बोलावसं वाटलं. आठवतय बाबा लहानपणी मी खेळता खेळता पडलो होतो मला खूप लागलं होतं. त्या दिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होतं. आजही ते दृश्य डोळ्यासमोर आले की भावना दाटून येतात.
इकडे नागपूरला तापमान फार वाढत आहे. वस्तूवर खूप गर्मी होते. जेवण म्हटले तर आईचे जेवणाची खुप आठवण येते. कारण टिफिन चे जेवण तेवढे चांगले नसते. कसे तरी पोट भरावे लागते. आमच्या सीपीसी कॉलेजमध्ये संपूर्ण 525 विद्यार्थी आहेत. त्यात बीबीए चे स्टुडन्ट एकशे पन्नास आहेत. माझा अभ्यास जोरात सुरू आहे. सर्व शिक्षक माझी प्रशंसा करतात कारण फर्स्ट सेमिस्टर ला मला चांगले मार्क आलेले आहेत. आता मी दुसऱ्या सेमिस्टर ची तयारी करीत होतो परंतु covid-19 मुळे परीक्षा अनिश्चित कालीन झाले आहेत. परंतु परीक्षेत मला चांगले मार्क घ्यायचे आहे. नागपूरला माझ्या सीपीसी कॉलेजचा रिझल्ट नेहमीच चांगला लागतो.
मी इथे अभ्यासासाठी पुस्तके विकत घेतली आहे. तुम्ही मागच्या महिन्यात मला पाच हजार रुपये पाठवले होते. त्यात पुस्तके दोन हजार रुपयाची झालीत. मला सध्या पैशाची गरज नाही. कॉलेजमधील समरीत चौधरी हा माझा खास मित्र आहे. तो देखील गोंदियाचाच आहे. त्याच्यासोबतच मी नेहमी अभ्यास करतो. एकमेकांचे सुख-दुःख शेअर करतो. कॉलेजमधील कोलते सर तर मला नेहमी शिक्षणाविषयी, अभ्यासाविषयी खूप चांगले मार्गदर्शन करतात. ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग करून मी अवांतर वाचन करतो. कोलते सर म्हणजे प्रेमाचा झरा आहेत. कॉलेजचे कोलते सर व सर्व टीचर स्टॉफ खूप छान आहे. सर्वांचे शिकवणे मला समजते. आता कॉलेजची वेळ दुपारी न राहता सकाळची आठ ते बारा झाली आहे. कारण की नागपूरला तापमान फार वाढलेले आहे. कॉलेजचे वातावरण खूप छान आहे. कॉलेजमध्ये गार्डन सुद्धा आहे. हॉस्टेल पासून कॉलेज अगदी जवळच आहे. कॉलेजमध्ये अभ्यास छान शिकवत असल्याकारणाने मला शिकवणी वर्गाची गरज नाही. मी ट्युशन लावली नाही. मित्र मित्र मिळून आम्ही होस्टेलमध्ये कॉलेजमधून लायब्ररीतून आणलेल्या पुस्तकातून नोट्स काढतो तुम्ही माझ्या शिक्षणाविषयी अजिबात काळजी करू नका. कारण मला भविष्यात चांगला अभ्यास करून एमबीए करून कंपनीत नोकरी करायची हे माझे स्वप्न आहे. यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.
फर्स्ट सेमिस्टर आटोपल्यानंतर ची एक रोमहर्षक घटना मला आठवली बाबा. ती तुम्हाला मी सांगतो. वर्गातील आम्ही मित्र मिळून अजिंक्यतारा वर गिर्यारोहणासाठी गेलो होतो. तू गड चढणे फार अवघड होते व त्यात खूपच रोमांचकता होती. भर दुपारची वेळ होती. अचानक आमच्यातील राजेश नावाच्या एका मित्राचे हात सटकले आणि तो खाली घसरू लागला. खरे पाहता राजेशला गिर्यारोहणाचा सराव आहे पण ही घटना त्याच्या दृष्टीने केवळ अपघात होता.
घसरत जाणाऱ्या राजेशच्या हाताशी झाडाची एक फांदी आली.आणि राजेश त्या फांदीला लोंबकळत राहिला. आम्हा तिघा चौघांना काय करावे कळेना! पण तेवढ्यात मला जवळच माळ्याची एक झोपडी दिसली. मी धावतच तिथे गेलो आणि माळयाकडून एक मोठा जाडजुड दोर घेतला. दोराची एक टोक मी माझ्या कमरेला बांधले. दुसरे टोक टेकडीवरील एका प्रचंड वृक्षाला बांधले. हळूहळू सावरत मी राजेश पर्यंत आलो. त्यालाही त्या दोराला गच्च बांधून घेतले. मग टेकडीवरील आमच्या मित्रांनी आम्हाला वर खेचून घेतले. तेथे आलेल्या काही इतर लोकांनीही आम्हाला वर खेचण्यास मदत केली. जीवावर बेतलेले मोठे संकट केवळ खरचटलं वर निभावले.
राजेशला संकटातून सोडवण्याचा हा मार्ग मला सुचला म्हणून कॉलेजमधील सर्वांनी माझे खूप कौतुक केले.मला बक्षीस सुद्धा दिले. राजेशच्या बाबांनी तर
मला एक अति सुंदर व किमती फाउंटेन पेन बक्षीस दिले.
तसं काही मला गरज पडली तर मी मी नागपूरला आजोबांच्या घरी जातो. माझी काळजी करू नका. तुम्ही कसे आहात? आई कशी आहे? संस्कृतीचा अभ्यास कसा सुरू आहे? सर्वांची मला खुप आठवण येते. आता उन्हाळ्याच्या सुट्टी मी नक्की घरी येणार. तीर्थरूप आईला शिरसाष्टांग नमस्कार.
तुमचा लाडला
संस्कार
सौ. भारती दिनेश तिडके
गोंदिया.
8007667039
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
(08) *महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*दिपेश चे आपल्या बाबांना पत्र*
प्रिय बाबास
साष्टांग नमस्कार.
पत्रास प्रयोजन की , तुमची आठवण मला दररोज येत राहते. किती तरी वेळा मला तुमची कमी जाणवत असते. मी जेव्हापासून बाहेर शिकायला आलो तेव्हापासून मला एकटा-एकटा वाटते. मला असं वाटायला नको. पण कधी कधी तर मी माझे काही निर्णय घेऊ शकत नाही, पण मला तुम्ही अनेक प्रकारचे प्रसंग सांगितले व त्याचे निर्णय सांगत होते त्याची आठवण येते व मी माझ्या निर्णयाला पूर्ण करू शकतो.
बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं . जे नाही कळलं ते आज दूर राहून समजून येत आहे. मला अभ्यासाच्या वेळी सुद्धा तुमचे लॉजिक आठवतात . मी अभ्यास कसा करावा व तो डोक्यात कसा भरून ठेवावा हे मी आपल्याकडूनच शिकलो. मी दररोज अभ्यासासोबतच आपला व्यायाम ही करत असतो. माझा सकाळच्या ध्यान सुद्धा व्यवस्थित सुरू आहे. मला आधी मुले त्रास द्यायची कारण त्यांना ध्यान म्हणजे काही समजत नव्हते. मी डोळे बंद करून आपल्या बेडवर जेव्हा बसत होतो तेव्हा माझ्या रूम मध्ये राहणारे सोबती मला जाणून बुजून आवाज लावायची. नंतर मी त्यांना समजावलं की त्यावेळी मला त्रास द्यायचा नाही नाहीतर भांडण होणार तेव्हा ते समजले व त्यानंतर मी एकट्यात ध्यान करत आहे.
व्यायाम व ध्यान केल्यामुळे मला माझ्या अभ्यासात फार फरक जाणवत आहे . मला ज्या कामासाठी इथं पाठवलं आहे ते कार्य मी माझ्या हातून पूर्ण करीन. अशी मी आपल्याला हमी देतो. मला माहित आहे की या इन्स्टिट्यूटची फीस खूप जास्त आहे . तरी आपण मला इथे ऍडमिशन दिलं. यातून मला खूप काही शिकायचे आहे.
बाहेर राहील्यावरच समजते की घरचे माणसं आपल्या किती हिताचे असतात . बाबा मला तर शिक्षणाविषयी बिल्कुल इंटरेस्ट नव्हता. मला शाळेत जाणे म्हणजे फार जिवावर येत असे. लहानपणी शाळेत जाताना तुम्हाला खूप त्रास दिला . पण तुम्ही तो सर्व त्रास सहन करून मला रोज शाळेत पाठवत होते. कितीदा तरी मी शाळेत झोपा काढत होतो. आज मागच्या गोष्टी आठवल्या की नवलच वाटते. शिक्षणाने माणूस किती बदलून जातो याचा प्रत्यक्ष उदाहरण मी आहे. त्याकरिता तुमची प्रेरणा आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. कधी कधी आता मला माझा लहानपणीचा रिक्षावाला मिळाला तर तो सांगतो की मी त्याला शाळेत जातानी खूप त्रास दिला आहे . मी त्याचा कितीदातरी चावा घेतला आहे. त्याच्या रिकक्षावरून कितीदा तरी खाली कुदलो आहे. माझे सर्व चाळे सहन करून तो मला व्यवस्थितपणे शाळेत घेऊन गेला. आणि आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे.
बाबा मला पुस्तकांची किती चिड होती पण तुमच्या प्रयत्नांनी आज मी मोठी मोठी पुस्तक सहज वाचू शकतो. तुम्ही केलेले मार्गदर्शन हे मला नेहमी कामात पडतात. मी नुकतेच शिवाजी एक मॅनेजमेंट ही पुस्तक वाचली आहे . त्यात जे बिजनेस बद्दल सांगितलेला आहे त्याच्यातले पुष्कळ मुद्दे आधीच मी तुमच्याकडून ऐकलेले आहेत. तसेच मी अजून एक पुस्तक वाचलं ते म्हणजे मृत्युंजय . आधी पुस्तक पाहून तर वाचायची इच्छा झाली नाही. पण जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा मी ती पूर्ण वाचली. मला त्यावरून आठवण झाली आपण आम्हाला नेहमी रामायण-महाभारताच्या कहाण्या सांगत होते. त्या छोट्या-छोट्या प्रसंगांची आठवण ताजी झाली . हे प्रसंग जीवनात कसे कामात येतात ते आपल्याला कळते .
आता मी जेव्हा घरी येणार तेव्हा मला तुम्ही माझ्यासाठी एक लॅपटॉप घेऊन द्याल. आता त्याची गरज मला आहे. माझ्या वर्गात जवळजवळ सर्व मुलांजवळ लॅपटॉप आहे. आमचे सर आम्हाला लॅपटॉपवरून शिकवतात व होमवर्क सुद्धा देतात ते नसल्यामुळे मी कुठेतरी मागे पडत आहे असं मला वाटते.
माझ्या परीक्षेचे वेळापत्रक अजून आलेला नाही. जुलै महिन्यात परीक्षा होणार आहे . अशी सूचना मिळाली आहे . ईथला जेवण ठीक आहे. आम्हाला दर रविवारी नवीन सिनेमा दाखवतात. आणि रोज सकाळी पाच वाजता उठून धावायला लावतात . कुणाची प्रकृती बरी नसली तर ईथे डॉक्टरांची सोय आहे. या ठिकाणी वातावरण “चांगले आहे. आमच्या होस्टेलमध्ये प्रत्येक हालला एसी लावलेली आहे. तसेच प्रत्येक क्लास रुम ला सुद्धा एसी आहे. त्यामुळे आम्हाला उष्णतेचा त्रास जास्त होत नाही. आई कशी आहे? तिच्या हातून बनविलेल्या जेवणाची आता मला आठवण आली आहे. मी लवकरच येणार आहे. मी आठ दिवसाच्या सुट्टीचा अर्ज टाकून ठेवलेला आहे. सुट्टी मंजूर झाली की मी घरी येणार आहे. आईला सांगा आपली काळजी घ्यायला. मी बरा आहे. आपण सुद्धा आपली काळजी घ्यावी. आईला साष्टांग नमस्कार.
आपलाच लाडला
दिपेश
_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
(४०) मनिषा पांढरे, सोलापूर
आदरणीय बाबा,
सा.न. वि. वि.
पत्रास कारण की बरेच दिवस झाले पत्र लिहिण्याचा विचार करत होते पण अभ्यासातून वेळच मिळत नव्हता.
सतत अभ्यासाचा ताण व परीक्षा जवळ आल्याने वेळच मिळत नाही.तुम्ही माझ्या पत्राची वाट पाहत असणार हे मला माहीत आहे.माझे ध्येय समोर ठेवून मी यश मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.
त्यातच कधी तुमची आठवण झाली की मन भरून येते, आठवणींच काहूर माजतं आणि मग एकटेपणा जाणवायला लागतो म्हणून मी स्वत:ला अभ्यासात गुंतवून घेतले आहे.
माझे ध्येय मला गाठायचे आहे. तुमची मुलगी खूप मोठी अधिकारी व्हावी असे तुमचे स्वप्न आहे नां मग मला ते पूर्ण करायला नको का?
आईची तब्येत कशी आहे? ती माझी आठवण काढते का? आणि छोटी काय म्हणते? तुम्हाला खूप त्रास देत असेल नां.
तिला गोड बोलून समजावून सांगत जा. तिचीही मला खूप आठवण येते. आईला सांगा मला येथे काहीही त्रास नाही. मी अगदी आनंदात आहे.तुम्हीच सर्वजण काळजी घ्या.
परीक्षा संपली की लगेच येईल.
तुमची लाडकी,
मनिषा .
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
विषय : -मुलाचे वडीलास पत्र तीर्थस्वरूप बाबाना माझा सि. सा.न. वि. वि. पत्रास कारण की, मी गावाहून आल्यापासुन आपणास पत्र पाठवले नाही त्या उशिरा बध्दल मी आपली माफी मागतो.कारण इकडे आल्यापासुन मला राहने साठी रूम शोधन्यास फार वेळ गेला शेवटी रूम पाहिली आहे पण दर महिन्याला ५०००/-रुपये व डिपॉज़िट म्हणून तीन महिन्याच भाड़ म्हणजे १५००/- रूपये भरावे लागणार आहे.पहिला पगार होई पर्यंत आपणास हा खर्च करावा लागणार आहे आपण मला येते वेळेस दिलेल्या पैशातून एक मेस सुरु केली आहे.रोज सकाळी एकदा कामावर जाणेपूर्वी व कामावरून आलेनंतर रात्री एकदा अशा दोन वेळी घरगुती मेस आहे. पण काहीहि झाले तरी आपल्या घरची चव कुठे मिळणार ? येईल त्या संकटास हसत हसत तोंड दिलेच पाहिजे हे तुम्हीच शिकवलेले आहे त्यामुळे मी येईल त्या प्रसंगाला मी तोंड देणार आहे माझी काळजी करू नका मला तुमचीच दोघांची काळजी वाटते. कामाचा जास्त त्रास घेऊ नका होईल तेवढे च करा वेळ पडली तर एखादा मजूर महिन्याच्या पगारावर ठेवा.माझा पगार झाले नंतर दरमहा त्या मजूराचे पैसे देता येतील पण तुम्ही काही करु नका.तुम्हाला घरात करमत नसेल तर फक्त मजूरांचे कडून सर्व कामे करु शकता.आज पर्यंत तुम्ही आमच्या साठी भरपूर कष्ट केले आहे तुम्ही कष्ट केल्यामुळे माझ्या शिक्षणाचा आजपर्यतचा खर्च तुम्ही करु शकला. शिकल्यामुळेच मला चांगली नोकरी मिळाली हीच तुम्ही प्रामाणिक पणे केलेल्या कामाची पावती आहे नव्हेतर तुमच्या केलेल्या कष्टाचे
फळ आहे. आता मी माझ्या कामावर रोज जात असतो.माझे वरीष्ठ अधिकारी सुध्दां चांगले आहेत. मला ते व्यवस्थित समजून सांगून मी केलेल्या कामाचे पण कौतुक करतात.कार्यालयातील इतर कर्मचारी सुध्दा चांगले आहेत.आम्ही सर्वजण एक टीम वर्क समजून काम करतो तुम्ही माझ्या बाबत काही काळजी करु नका.तुम्ही तुमची औषधे वेळेवर सकाळ संध्याकाळी घ्या.आईचे मनावर काही घेत जावू नका. ती जास्तअंधश्रद्धाळु आहे. देवा धर्मावर तिचा जास्त विश्वास आहे. तुम्ही ते काही थोतांड मानत नाही .त्यामुळे तुम्हा दोघांचे विचार भिन्न असल्यामुळे तुमचे पटत नाही तिच्यामुळे तुमची मानसिकता बदलू देऊ नका.तसेच माझ्यासाठी मुलीची स्थळे चौकशीसाठी पाहणे घरी येत असतील पण माझा विचार घेतल्या शिवाय कोणाला होकार देवू नका. माझे काय जास्त वय झालेले नाही. नुकतेच आता मला २४ वर्षे झालेली आहेत. मुलगी शिकलेली करावी लागेल कारण भविष्यात तिला सुध्दा नोकरी मिळू शकेल कारण भविष्यात एकाच पगारावर कुटुंबातील खर्च भागविणे जिकीरीचे होणार आहे.गावचे यात्रेला येताना एक दोन रजा घेऊन आले नंतर बघू.थोडी बहुत शेती घरदार आणि सरकारी नोकरी असलेमचळे लग्ना संबधी काही अडचण येणार नाही. आणि नोकरी करीत असलेली मिळाली तर कोठे तरी तडजोड करून ठरवून टाकू.म्हणजे आपण भविष्यात सगळेच माझ्या नोकरीच्या ठिकाणी राहवयास येवू.आम्ही दोघे कामावर जाऊ तुम्ही दोघे निवांत घर संभाळू शकाल आणि गावची शेती वाट्याने एखाध्या गरीबास कसण्यास देवू.त्या गरीबास रोजगाराची संधी सुध्दा मिळेल.जाऊ ध्या हे माझे विचार आहेत ते तुम्हा दोघांना किती पटतात का? नाही हे तुमचे तुम्हीच ठरवू शकता.मला वाटले ते सांगीतले आहे.चुकले असेल तर क्षमा असावी.आताच काही नाही.घोडे मैदान अजून लांब आहे."गहू तेव्हा पोळया".आता जास्त काही लिहीत नाही पावसाळा सुरु होत आहे.वीजा वा-यात बाहेर दोघेहि जा्ऊ नका.दोघानी आपल्या तब्बेतीची काळजी घ्या.पोटाची हयगय करू नये. आपली खुशाली वरचेवर कळविणे.तमच्या मित्राना माझा साष्टांग नमस्कार सांगा.भेटी अंती सविस्तर बोलूच.आता येथेच पत्राला पुर्णविराम देतो. आपलाच लाडका आणि आज्ञाधारक मुलगा .. xyz.........
लेखक ..जी.एस.कुचेकर- पाटील भुईंज ता.वाई जि.सातारा मो.नं.७५८८५६०७६१.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
(15)
बाहेर गावी नोकरीसाठी गेलेल्या मुलांचे वडीलास पत्र
तीर्थस्वरूप आप्पा,
साष्टांग नमस्कार...!
पत्र लिहिण्यास कारण की, मी सर्व इकडे आनंदात आहे. तुम्ही आणि आई सुद्धा आनंदात असाल अशी देवाचरणी प्रार्थना करतो.
नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला सोडून इतक्या दूर यावे लागेल याचा विचार सुद्धा केला नव्हता. तुम्ही सुद्धा काळजावर दगड ठेऊन मला जाण्याची परवानगी दिली हे माहिती आहे मला.
जळगावला आल्यावर सुरुवातीला बराच कंटाळा येत होता. ओळखीचं कुणीच नसल्यामुळे दिवस खुपच कंटाळवाणा जात होता. परंतु आता सवय झाली आहे या सर्वांची. ऑफिसमधले कर्मचारी सुद्धा स्वभावाने चांगले असल्यामुळे आता फारसा एकटेपणा वाटत नाही.
आईला आवर्जून सांगा की, मी इकडे अतिशय मजेत आहे त्यामुळे काळजी नसावी. ती उगाच काळजी करत असेल. तुम्ही सुद्धा तब्बेतीची काळजी घ्या. औषध वेळेवर घेत जा आणि पैशांची गरज पडल्यास आवर्जून कळवा. खुपच अत्यावश्यक काम पडल्यास पत्राच्या पाठीमागील बाजूस ऑफिसचा फोन नंबर लिहिलेला आहे. त्यावर फोन केला तरी चालेल.
पत्र पुरे करतो. तुमच्या व आईच्या तब्बेतीची काळजी घ्या.
तुमचा
गणेश
गणेश सोळुंके (जालना)
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
07 पत्र
बाहेर शिकणाऱ्या मुलाचे वडिलांना पत्र
सनी
पुणे,हिंजवडी,
आदरणीय बाबा,
आज तुम्हाला मी हे पत्र लिहण्यास कारण की मी काल रुमवर येत असताना मला एक म्हातारे आजोबा दिसले.अगदी तुमच्यासारखे दिसत होते.मी त्यांची जवळ जाऊन चौकशी केली तर ते आपल्या मुलाला भेटायला पुण्यात आले होते.हे ऐकून मला खूप बरे वाटले. मला तुमची खूप आठवण आली.म्हणून हे पत्र लिहायला घेतले.
मी इयत्ता पाचवी पासून बाहेरच शिकायला आहे.सुरवातीला मला खूप त्रास व्हायचा.पण नंतर नंतर सवय होत गेली.आता मी एका मोठ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. इथेही सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत पण मला घरच्या लोकांची,तुमची,आईची, लहान भावा बहीणींची खूप आठवण येते.पण मी काहीही करू शकत नाही. म्हणून हे पत्र लिहीत आहे.
परवा तुमची तब्येत बरी नव्हती असं कळालं.काय झाले होते बाबा तुम्हाला? दवाखान्यात होता म्हणे.आता कसे आहे? कळवत जावा मला.
मी आता रुळलो आहे.अभ्यास, खेळ,वाचन,लेखन सर्व वेळच्या वेळी चालू आहे. तुम्ही सांगीतल्याप्रमाणे मी वागत आहे.मी सर्वांशी प्रेमानेच वागतो.माझ्या शांत स्वभावामुळे शक्यतो मला कुणी त्रास देत नाही. मीही मग मी व माझा अभ्यास एवढ्यावरचं लक्ष केंद्रित केले आहे.मागच्या चाचणीत मला चांगले मार्क मिळाले आहेत.आमच्या सरांनीही माझं कौतुक केलं.बरं वाटलं ना ऐकून ? मी अशीच अभ्यासात प्रगती करत आहे.
मला एवढचं सांगायचं आहे की मला भेटायला तुम्हीपण यायचं व आपण पोटभर गप्पा मारू.एकत्र जेऊ,सगळ्यांच्याबरोबर मला बागडायचं.खूप मस्ती करायची आहे.पुढच्या शनिवारी च पालकभेट आहे.तुम्ही या व माझी प्रगती सर्व शिक्षकांना भेटा, माझी चौकशी करा.येताना खाऊपण आणा.
परत एकदा सांगतो सगळे तब्येतीला जपा आनंदी रहा.पुढच्या वेळी मोठ्ठ पत्र लिहणार आहे.तोपर्यंत बाय.
तुमचाच
सनी
पत्ता
रामचंद्र पाटील
कुरुंदवाड
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
बाहेर शिकणाऱ्या मुलाचे बाबास पत्र
दि 26.5.2020
तीर्थरूप बाबा
नमस्कार
मी इथे आनंदात आहे. माझ्या आधीच्याच दोन मित्रां बरोबर मी फ्लॅट मधे राहतो. आमच्या कडे सगळ्याच कामाला एक बाई ठेवली आहे. ती सकाळीच येते आणि केर फरशी करून आमचा नाश्ता बनवते आणि मग कपडे घुते. सकाळीच सर्व काम पूर्ण होतात. दुपारचे जेवण कम्पनीतच घेतो. आईला सांगाल की माझी खाण्यापिण्याची काही आबाळ होत नाही.
मी कम्पनीत व्यवस्थित अॅडजस्ट झालोय. कामही माझ्या आवडीचे आहे. आमचा प्रोजेक्ट मॅनेजर खूपच चांगल्या स्वभावाचा आहे. त्याची पूर्ण फॅमिली इथे स्थाईक झाली आहे. त्याचे बाबा पुढच्या वर्षी रिटायर होणार आहेत.
गेल्या आठवडय़ात आमच्या कंपनीत एक अॅडवेंचर कॅम्प झाला. अगदी मिलिटरी सारख्याच सर्व एक्टीवीटीज होत्या.रोप वाॅकींग , बर्मा ब्रीज वाकींग ,वाल क्लाईम्बींग रेपलींग अश्या अनेक एकटीवीटीज होत्या. सगळा अनुभव खूपच थ्रिलींग होता. मी खूपच एन्जॉय केले.
बाबा माझे इथे खूप व्यवस्थित चालू आहे.,तुम्ही अजिबात काळजी करु नका. उन्हाळ्यात तुम्ही दोघेही आपली काळजी घ्या नागपूर सध्या खूप तापत आहे. उन्हात बाहेर पडू नका. खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घ्या. अरे हो मी बँकेत घराचा हप्ता इथून भरून टाकला आहे. ह्या पुढे सगळे हप्ते मी ऑनलाईन भरून टाकत जाईन काळजी करु नका.आणि हो तुमच्या फोन आणि इलेक्ट्रिक बिलाची कोपी मला पाठवा मी ऑनलाईन भरून टाकत जाईन, तुम्ही उन्हात बिल भरायला बाहेर जाऊ नका.
पुढच्या सोमवार पासून मी नवीन ऑनलाईन कोर्स चालू करणार आहे,त्यामुळे माझ्या फोनच्या वेळा पुढे मागे होतील. तर काळजी करु नका. आईला सांगा आता मोबाईल वापरायला शिक , जग किती पुढे गेले आहे .
बाबा तुम्ही दोघेही खात्री बाळगा तुमचे संस्कार कधीच वाया नाही जाणार. मी विसरलो ही नाही आणि कधी विसरणार ही नाही की मला मोठं करताना, माझ्या शिक्षणासाठी तुम्ही किती कष्ट घेतले आहेत. मी माझ्या लक्ष्य पासून तसु भरही ढळणार नाही . माझी पुढची वाट चाल चालू आहे.
तुमच्या दोघांची खूप आठवण येते, तुमचे प्रेम आठवते. मला तुमचा खूप अभिमान वाटतो.
आता पूर्णविराम देतो.
तुमचा लाडका
अंकुश.
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
Code 26
नोकरीसाठी बाहेर गावी गेलेल्या मुलाचे वडिलांना पत्र..
!! श्री !!
दि.२६/५/२०२०
प्रिय
तीर्थरूप बाबा,
शीर साष्टांग दंडवत
स.न. वि. वि.
प्रिय बाबा पत्र लिहिण्याचे प्रयोजन असे की मी इकडे सुखरूप आहे.आपण ही सुख रूप असाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
बाबा तुम्ही मला शिकवण्या साठी खूप मेहनत घेतली.तुम्ही मला अतोनात प्रेम दिलात .ज्या वेळी घरात खाण्या साठी दोन वेळची तजवीज नसाययची
त्याही वेळी तुम्ही मला लागणाऱ्या पैशासाठी कधीच कमी पणाची भास जानऊ दिली नाही.प्रत्येक कार्यात तुम्ही मला समोर करून माझा आत्मवश्वास वाढवलात.मला कसं जगायचं ते आपण शिकवलंय.येवढाच नाही तर तुम्ही मला व्यावहारिक ज्ञानाचे धडे देताना मानस ओळखायला शिकवली.माझ्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला आहात.मी पण प्रत्येक वेळी आपल्या विश्वासाला तडा बसता कामा नये याचं गोष्टीचा विचार केला .तुम्हीच माझे सचे गुरु,खरे मार्गदर्शक आणि जवळचे मित्र पण आहात ही ऐवडी मोठी भूमिका बजावताना आपण एक निरक्षर असून तुमच्या कडे ऐवधी मोठी दैवी शक्ती ओसंडते कुठून हा मला विचार करण्याची गोष्ट आहे.आपण माझ्या साठीच नाही तर माझ्या सारख्या अनेक तरुणासाठी मार्ग दर्शक आहात
तुम्ही अजिबात शिकले नाही परंतु मला तुम्ही सांगायचे की तू खूप शिकून मोठा हो.शिकल्याने माणूस विचार शिल होतो,शहाणा होतो.हे वाक्य तुमच्या तोंडून नेहमी निघायचे आणि ते मला प्रेरणा दाई ठरायचे.तुमची कल्पना शक्ती आघाध आहे.तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे.तुम्ही मला परिसरातील घरी राहून अभ्यास करून नोकरीला लागलेल्या लोकांचे उदाहरण देत होतात.तेंव्हा माझ्या मध्ये सुद्धा एक जिद्ध निर्माण व्हायची आणि मी पण तुम्ही दिलेली प्रेरणा माझ्या आत्मविश्वासाला बळकट करत गेले.
बाबा मी लहान असताना तुम्ही माझ्या प्रत्येक पावालावर लक्ष दिलं आणि चुकेल तिथे टोकत राहिले हे खऱ्या यशस्वी पालकाचे लक्षण आहे.म्हणून मी यशस्वी झालो म्हणून मी आजही सकाळी उठल्या बरोबर तुमचीच आठवण
करतो.माझ्यासाठी माझ्या आयुष्याचे शिल्पकार आपणच आहात.
जेंव्हा मी लहान असताना पासूनच तुम्ही मला वसतिगृहात ठेऊन गेलात आणि तुम्ही जेंव्हा मला सोडून जात होते आणि तुम्ही चेहरा लपून डोळ्यातले पाणी पापण्यावरून पुसलात तेंव्हा चा तुमच्या मनातून ओसंडणारा प्रेम आजही आठवण येऊन डोळे पणावणारा क्षण ठरतो.
बाबा मी जेंव्हा नोकरी ला लागलो तेंव्हा सुध्दा तुमचे पूर्ण लक्ष माझ्याकडे होत.मीच तुमचा जीव की प्राण होतो.तुम्ही मला गाव सोडू नको हा सल्ला दिला होतात पण मीच तुम्हाला सांगितलं होत की ," काही वडिलांनी तर आपली मुले सीमेवर लढण्यासाठी पाठवले आहेत,,,," माझे तसे अवघड काम नाही .तुम्हीच मला सल्ला देत होतात की वेगल काही करून दाखवायचं म्हणूनशेवटी मला घरा बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला.मी बाहेर पडल्या मुळे तुमच्यावर खूप मोठी जवाबदारी पडली दोन बहीण ,दोन भाऊ सांभाळणे त्यांना घडवणे अशी खुपमोठी जवाबदारी आपल्यावर पडली .तुम्हाला खूप कष्ट सहन करावं लागत आहे त्या बद्दल क्षमा मागतो .
माझी ईश्वर चरणी एकच प्रार्थना आहे की मी जेंव्हा ही मानव जन्म घेईल तेंव्हा तेंव्हा तु तुमचीच पोटी जन्म घेईल .हीच प्रार्थना.आहे.
बाबा तुम्ही आपली काळजी घ्या मला तुमची सेवा करायला सेवा मिळणे हीच माझी ईश्वर सेवा आहे.
बस जास्त नको
तुमचाच लाडका
. जीवन
जीवन खसावात
9545246027
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
शुभदा दीक्षित (11)
पुणे
मुलाचे आई वडिलांना पत्र
श्री
पुणे
26.52020
ती. आई व बाबांना शिरसाष्टांग नमस्कार
तुमच्या सावलीतून निघून येथे उन्हात येऊन पडलो आहे की काय, असं सुरुवातीला वाटत होतं. पण आता मीच माझ्यासाठी सावली तयार केली आहे. त्यामुळे त्याखालचा गारवा मला सुखावतो आहे.
ही अमेरिका आणि त्यातलं अर्व्हाइन हे छोटेसे टुमदार गाव. मला खूप आवडलं. इथे आम्ही चौघे मिळून एका फ्लॅटमध्ये राहतो. आम्ही चौघेही स्टूडंट्स आहोत. प्रत्येकाची कॉलेजची वेळ वेगळी आहे. त्यामुळे जो घरात असेल त्याने त्या वेळचे काम करायचे, हे कोणीही न ठरवता आपोआप ठरून गेले आहे. त्यामुळे घरी करायचो तसा कामचुकारपणा इथे करून चालत नाही. आपले काम आपणच करायचे, हा आईचा फंडा मला इथे चांगलाच उपयोगी पडतो आहे. आपल्या घरी असताना सुट्टीच्या दिवशी आई मला कामाला लावायची. पंखे पुसणे, घरातली जळमटे काढणे, अशी कामे सांगायची. तेव्हा मला आईचा फार राग यायचा. मी दोन दोन दिवस आईशी बोलत नसेल. पण त्याला बधत नसे. पण मनापासून सांगतो, त्यामुळेच मला स्वावलंबनाची चांगली सवय लागली. इथे मला त्यामुळे जड जात नाही.
मला स्वयंपाक मात्र करता येत नाही. हळूहळू कुकर लावणे, कणिक मळून देणे, वगैरे शिकतो आहे. स्वयंपाक येत नसल्यामुळे मी मित्रांना भाजी चिरून देणे, स्वयंपाक झाल्यावर भांडी घासणे, ओटा आवरणे, अशी कामे न सांगता करतो. त्यामुळे मित्रही माझ्यावर खूष असतात.
स्कॉलरशिप मुळे मला इथे फी भरावी लागत नाही. टीचिंग असिस्टंटशिप मिळाल्यामुळे मला स्टायपेंड ही मिळतो. त्यात माझा महिना आरामात भागतो . त्यामुळे तुम्ही दिलेले जास्तीचे पैसे मी तसेच शिलकीत ठेवले आहेत. आता मला आईची काटकसर लक्षात येते. तेथे असताना आईचा चिकू पणा वाटायचा. राग यायचा. स्वतः मिळवायला लागल्यावर पैशाची किंमत कळते हेच खरे.
तुमच्या दोघांच्या बोलण्यातल्या ठाम पणामुळे नेहमी मला सुरक्षित असल्या सारखं वाटायच. तोच ठामपणा बहुदा माझ्यातही आला असावा. त्यामुळे माझे शिकवणे, लेक्चर्स, मुलांना आवडतात. Thanks Aai-Baba.
कुठे चुकले की तुम्ही माझा लगेच कान धरायचात. मला संताप आलेला असायचा. तुम्हाला खाऊ कि गिळू असे मला व्हायचे. पण तुमच्या नुसत्या डोळ्यांकडे पाहून मी गप्पगार होत असे. पण तुम्ही माझ्या त्या चुका सुधारल्यात त्याचा फायदा मला आज कळतो आहे. कुणाकडे कधी उसने न मागणे, आहे त्यात भागवणे, दुसऱ्याच्या गोष्टी गरज नसताना न वापरणे, दुसऱ्याला मदत करणे, या तुम्ही लावलेल्या सवयी आता खूप उपयोगी पडत आहेत.
मला अजूनही लहानपणची गोष्ट आठवते. मला आवडले म्हणून शेजारच्या मुलाचे इरेझर मी घरी आणले. आईने घरी आल्यावर मला रागे भरले. असे का करायचे नाही, ते समजावून सांगितले. "सॉरी" म्हणून इरेझर परत करण्यास सांगितले. तेव्हा मला माझा अपमान वाटला. पण पुन्हा तीच चूक कधी घडली नाही. घडणार नाही नाही.
इतर मुलांचे पाहून मी तुमच्याकडे कुठल्यातरी महागड्या गोष्टीची मागणी करायचो, जे तुम्हाला आणून देणे त्रासाचे होणार असे. अशावेळी तुम्ही मला समजावून सांगायचा. त्याची जरुरी आहेत का याचा विचार हि मला करायला लावायचा. 'मी काहीही मागेन ते मला मिळेल' अशी मानसिकता माझी झाली नाही. तीच गोष्ट तुम्ही सवडीने, मी कशातरी प्राविण्य मिळवले की बक्षीस म्हणून देत होतात. त्यामुळे कष्टाशिवाय फळ नाही हे आपोआप मला कळत गेले.
आई, तू अभ्यासासाठी फार मागे लागायचीस. हे मात्र मला आवडायचं नाही बरं का! आता इथे मला कोण सांगणार 'अभ्यासाला बस' म्हणून.
बाबा तुम्ही मला नेहमी गॅरेजमधून गाडी बाहेर काढून द्यायला सांगायचात. ते मला खूप आवडायचं. त्यामुळे इथे मला ड्रायव्हिंग ला काहीच त्रास झाला नाही. मी लवकर शिकलो. तुम्ही मला लहान समजून काही करून दिले नसते, तर अशा बऱ्याच गोष्टी मला आल्या नसत्या. Kiss u Baba.
बाबा तुम्ही मला एक लहानसे उडणारे विमान आणून दिले होते. पण दोन दिवसात ते खोलून मी पसारा केला. परत असेंबल करणे मला जमेना. आई खूप रागावली. पण तुम्ही नाही रागावला. उलट माझे कौतुक करून माझ्या मदतीला आलात. मनातून मी तुम्हाला शंभर वेळा थँक्स म्हणालो असेन.
अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी मला इथे एकटा असताना आठवतात. पण एक सांगू आई- बाबा. रागवू नका हं. तुम्ही दोघे आपापसात किती छोट्या गोष्टीवरून भांडत असता. तसे नका ना भांडू प्लीज. I love u both.
आजी- आजोबा कसे आहेत? त्यांना मी फोन करेनच. आपलाही फोन होतोच. पण यावेळी मुद्दाम पत्र लिहिले. उत्तराची अपेक्षा करतो.
माझी अजिबात काळजी करू नका.
Take care.
तुमचा
XYZ
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
*(38)*
*बाहेर शिकणाऱ्या मुलाचे आईबाबास पत्र*
प्रिय आईबाबा,
नमस्कार
कसे आहात तुम्ही मजेत न...मि इथे आनंदात आहे. तुम्हाला माझ्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही ..मला खुप तुमची आठवण येते. आणि मला माहिती आहे कि तुम्हाला सुद्धा माझी खूप आठवण येत असणार, तुम्हाला कदाचित माझ्यापेक्षा जास्त त्रास होत असणार. मी तुमचा त्रास फुकट जाऊ देणार नाही आईबाबा ज्या ध्येयाने ज्या उद्देशाने मी घर सोडले आहे, तुमच्यापासून दूर राहत आहे, ते मी पूर्ण करूनच घरी परतणार पप्पा आणि ते सुद्धा वेळेत. आजपर्यंत कोणत्याही गोष्टीची कमी तुम्ही मला जाणवू दिली नाही, कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हंटले नाही. घरची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असतांना माझ्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही मला एवढ्या दूर सर्वात चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन दिला, तुम्ही तुमच्या प्रेमात कुठेही कमी पडु दिले नाहित आणि आता माझी पाळी , मी तूम्हाला नाराज करणार नाही आईबाबा. एक दिवस असा येईल आईबाबा की तुम्हाला माझा गर्व असेल.
आईबाबा मी ज्या कॉलेज च्या वसतिगृहात राहतो तिथून अगदी जवळच महाविद्यालय आहे.त्यामुळे जास्ती दूर काही आहे नाही माझी माहाविद्यालय तर तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल चिंता करायची नाही.. मस्त आणि शिक्षक सुद्धा चागले आहेत..खुप चागले शिकवतात.. आणि हॉस्टेल मध्ये जेवण वगैरे पण वेळे प्रमाणे मिळत असतो...तुम्ही माझी काळजी करू नका. मी अगदी आनंदात आहे .... मला महिन्याभराची सुट्टी लागली की तुम्हाला नक्की भेटायला येईन . तो परन्त दोघे ही एकमेकांची कळजी घ्या...
तुमचाच लडका
अम्मू
- अमित प्र. बडगे, नागपुर
(7030269143)
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
सविता साळुंके, श्रीरामपूर ,कोड नं 13
नोकरीनिमित्त बाहेर राहणाऱ्या
मुलाचे वडिलांना पत्र
तीर्थरूप बाबा
साष्टांग नमस्कार.
वि .वि .पत्रास कारण की बाबा मला जॉब लागून आता दोन-तीन महिने झाले आहेत .मी इथे माझ्या मित्रांसमवेत रूम घेऊन भाड्याने राहत आहे .रूम व्यवस्थित आहे रूम पार्टनर्ससही व्यवस्थित आहेत .काळजी नसावी मी नोकरीनिमित्त प्रथमच आई-बाबा तुमच्या पासून दूर राहत आहे .लहानपणापासून तुम्ही व आईने जे जे संस्कार माझ्यावर केले ते ते मला या काळात उपयोगी पडत आहेत. याचा अनुभव मला येत आहे. घरातील कामे जसे स्वयंपाक करणे, केर कचरा काढणे, धुणीभांडी ही फक्त स्त्रियांची मक्तेदारी आहे असे नाही तर कोणत्याही कामाची लाज बाळगायची नसते हे बाळकडू बाबा तुम्ही आम्हाला तुमच्या कृतीतून जाणवून दिले. गॅस बर्नर स्वच्छ करणे ,फॅन पुसणे, वर्तमानपत्रे व्यवस्थित लावणे, आठवड्यातून एकदा बागेची, घराची आपल्या सामानाची आवराआवर करणे हे तुम्ही स्वतः करत असल्यामुळे तेच संस्कार आमच्यावर नकळत झाले. आपले बाबा करत आहेत मग आपण या गोष्टी नक्की करायला हव्यात हे आम्हाला समजले. आणि आम्ही देखील तुम्हाला मदत करत असू. भाजी आणणे, किराणा सामानाची यादी करणे हे तुमच्यामुळे समजले . आज इथे रूम पार्टनर मला म्हणतात तू बाजार चांगला करतोस तेव्हा भाजीपाला तूच आणायचा कोवळी भेंडी कशी ओळखायची तुमच्या मुळेच मला समजले. तुमच्याबरोबर बाजारात आम्ही यायचो किराणा सामान आणण्यासाठी. मला आठवते किराणा सामान आणण्यासाठी यायचं आणि दोन बिस्कीट पुडे मला त्या बदल्यात मिळायचे तो आनंद अवर्णनीय होता. आता आमचे रूम पार्टनर म्हणतात तुला बाहेरच्या आणि घरातीलही कामाचा चांगला अनुभव आहे तेव्हा वस्तू ने आन करण्यासाठी तू बरोबर हवाच. संध्याकाळी बाहेर पडताना एखादी कापडी पिशवी खिशात हवीच हे मला आईने आवर्जून सांगितलेले लक्षात आहे. त्याचा फायदा मला आज होतो आहेच कुठे एखादी वस्तू मिळाली तर आवर्जून खरेदी करून पिशवीत आणता येते.
घरातील कुठल्या वस्तू संपल्या आहे हे आपण डायरीत रोज लिहित जायचे ती डायरी बरोबर असली किंवा डायरीचे एखादे पान बरोबर असले की बाहेर पडल्यावर ती वस्तू दिसल्यावर खरेदी करण्याचे भान राहते .ही यादी करण्याची सवय देखील तुमच्यामुळेच मला लागली बर का बाबा. घर सोडून इथे आल्यावर सुरुवातीला मला करमले नाही परंतु हळूहळू इथे राहण्याची सवय लागली .ऑफिसमधील स्टाफ चांगला आहे दिवसभर ऑफिसमध्ये कामात वेळ जातो. काम वेळेवर व व्यवस्थित केल्यामुळे ऑफिस मधील सर्वजण ही माझ्यावर खुश असतात. घरी आल्यावर घरातील कामे, काही वाचन करतो. इतर मित्र देखील चांगले आहेत त्यांच्यासोबत काही गोष्टी शेअर करतो. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे रूम पार्टनर आहोत त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील अनुभव देखील माझे मित्र सांगतात. त्यामुळे माझे ज्ञानही वाढत आहे. पैसा हातात आल्यावर काही दुर्बुद्धी सुचते असेही म्हटले जाते परंतु; बाबा, माझे रूम पार्टनर देखील चांगल्या संस्कारात वाढलेले आहेत त्यामुळे आम्ही सर्वजण व्यवस्थित राहतो. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही मला सूर्यनमस्कार घालण्याची सवय लावली इथेदेखील मी सुर्य नमस्कार घालतो, योगासने करतो आणि प्राणायाम करतो. माझ्यामुळे माझ्या मित्रांना देखील ही चांगली सवय लागली आहे. ध्यानधारणेमुळे मन एकाग्र होते याचा अनुभव माझ्या मित्रांना आल्यामुळे ते आता ध्यानधारणा ही करतात. एका गोष्टीची खंत वाटते बाबा; मी आईकडून स्वयंपाक मात्र शिकलो नाही जर तो आला असता तर काय मजा आली असती. इथे मला आईच्या हातच्या जेवणाची चव मनात रेंगाळत आहे. माझ्या मित्रांना मात्र स्वयंपाक करता येतो, त्यामुळे आता आम्हीही त्यांच्याकडूनही गोष्ट हळूहळू शिकत आहे. महिन्याला पगार हातात आल्यावर त्याचा व्यवस्थित हिशोब मी लिहितो. बाबा आता मला माझ्या छोट्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची इच्छा आहे. तुम्ही आमच्यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत . आमच्या शिक्षणासाठी पैशाची तरतूद व्हावी म्हणून तुम्ही तुम्हाला हव्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी केलेल्या नाहीत. कधी महागडे कपडे घातलेले नाही. साधी राहणी उच्च विचार या पद्धतीने तुम्ही राहिलात. चैनीच्या वस्तू घेताना विचार करावा हे मी तुमच्याकडून शिकलो. आपली गरज कुठली आहे हे आपण ओळखायला शिकले पाहिजे त्यानुसारच मी माझी खर्चाची पद्धत ठरवली आहे.; आणि काटकसर करून पैसेही वाचवत आहे. तुम्ही ,आई व मी आपण सर्व व्यवस्थित आपल्या गरजा पूर्ण करू शकू या दृष्टीने मी आता आर्थिक नियोजन करणार आहे अर्थात त्यासाठी तुमच्या व आईच्या सल्याची ही मला गरज आहे. मला वेळोवेळी तुमचेच मार्गदर्शन आहे आणि म्हणून पुढचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करू शकेल याची खात्री वाटते. तिकडे सध्या खूप उष्णता आहे परंतु आईने सांगितल्याप्रमाणे लिंबुसरबतची बाटली नेहमी बरोबर ठेवतो व वेळोवेळी पितो, त्यामुळे उन्हाचा त्रास कमी जाणवतो तसेच कॅप घालतो त्यामुळेही उन्हापासून बरेच संरक्षण मिळते पण आता इथे आईच्या हातचे काही कैरीचे पन्हे मिळत नाही याची खंत मात्र वाटते. लवकरच काही दिवसांची सुट्टी घेऊन मी गावी येणार तेव्हा मात्र आईच्या हातचे मनमुराद पदार्थ खाणार, आणि तुमच्याशी मनसोक्त गप्पा करणार. छोट्या सोनुला आशीर्वाद .
तुमचाच आज्ञाधारक
अमेय
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
[ 14 ]
" बाहेरगावी शिकणार्या मुलीचे बाबास पत्र "
तिर्थरूप बाबांस
बायडूचा नमस्कार .
वि. वि. पत्र लिहिण्यास कारण की , मी इकडे हदगावला रूममध्ये मजेत आहे . सुरूवातीला काही दिवस तुम्हां सर्वांना सोडून राहिल्याने विरहात गेले . पण तुमचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी हा विरह कठोर मनाने पचवीत आहे . कारण तुम्हाला मी एका शिक्षिकेच्या भूमिकेत प्रत्यक्षात पाहायचंय ना ! मग त्यासाठी मला हा एकांतवास स्विकारून आत्मनिर्भर व स्वावलंबी व्यक्तीमत्वासाठी आगेकूच करावी लागेलच ना ? तुम्हीच तर म्हणता ना , " जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं ! " बाबा मला तुम्हां सर्वांची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा मी हेच वाक्य मनाशी वारंवार पुटपुटते . नि स्वतःला धीर देऊन माझा आत्मविश्वास वाढवते . बाबा मला देखील तुमच्यासारखेच एक जबाबदार नागरिक व्हायचंय ! मला तुम्ही बालपणापासून तुमची अनुभवाची शिदोरी खाऊ घालत आलात . ती मी आयुष्यभर माझ्या मेंदूच्या गाठीशी अगदी घट्ट बांधून पाहिजे तेव्हा ती खात जाईल ... तुमची लेक तुमच्यासारखीच निर्भिड व धाडसी बनणार ... हाती घेतलेले कार्य तनमन ओतून सिद्धीस नेणार ... एक कुटुंबवत्सल व देशभक्तही होणार ... कारण तुम्ही मला बालपणी शाळेत स्काऊट गाईडमध्ये सहभागी होण्यास लावून माझ्या मनी समाजसेवेची जी ज्योत पेटवीली ती माझ्या प्राणज्योतीसहच मालवणार .... आणि हो माझ्या अंगी श्रमप्रतिष्ठेचा जो गुण रूजवीला त्याचा फायदा मला आता येथे रूमवर होत आहे ... मी माझी सर्व कामे स्वतःच करून घेत आहे ... शिवाय तुम्ही घालून दिलेल्या " Health is Wealth " चा पायंडा मी अगदी नित्य नेमाने दररोज व्यायाम व प्राणायामाने करत आहे बरं ... कारण तुम्हीच म्हणता ना , " सुदृढ शरीरात सुदृढ मन असते ! " म्हणून माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे ... शिवाय जेवण व झोप वेळेवर घेऊन अभ्यासही भरपूर करते ... तेव्हा तुमच्या मनात माझ्याबद्दल काही धुकधुक असेल तर ती काढून टाका ... मी एका शूर वाघाची बच्ची आहे ... तेव्हा माझी काळजी अजीबात नसावी ... आणि हो तुम्हाला वाटत असेल की मी एकटी आहे ... कुणी माझी छेड काढेल ? तर बाबा हे हात आणि पायातली चप्पल कशासाठी आहे ? मी आता लहान नाहीये ... स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम आहे ... आणि हो तुमची मान खाली झुकवेल असे घाणेरडे कृत्येही मी आयुष्यात कधीच करणार नाही ! तेव्हा निश्चिंत मनाने रहा ... आई व दोन्ही भावांची काळजी घ्या ... आईला समजून सांगा मी लहान नाही म्हणून ! ती उगीचच माझी आठवण काढून हुरहुर करते . तिला वाटते मी तिच्यासारखीच हळवी व भित्री आहे ... मी कॉलेजला सुट्या लागल्या की लवकरच घरी येईल ... अनिल सुनिलला जी राखी पाठविले ती मिळाली की नाही तेही कळवा ... बरं बाबा पुरे करते पत्रलेखन ... उत्तर लगेचच पाठवा .. पत्र वाचताना तुमच्या अक्षरांतून मायेचा उबदार स्पर्श जाणवतो हो ! आणि तुमच्याशी प्रत्यक्षात भेटल्याचा भास होतो ... ओके बाय बाबा ....
तुमचीच लाडकी
बायडू .
अर्चना दिगांबर गरूड
ता . किनवट , जि. नांदेड
मो. क्र. 9552963376
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
पत्रलेखन (28)
विषय:शिक्षणासाठी बाहेर रहाणाऱ्या मुलाचे वडिलांस
पत्र
प्रति,
आदरणीय बाबा
मुंबई
प्रिय,
स.न.वि.वि.बाबास नमस्कार! बरेच दिवस झाले पण आपले बोलणेच झाले नाही, अभ्यासातून वेळचं मिळत नाही,कॉलेज आणि घरी आल्यावर अभ्यास त्यामुळे थकून जातो बाबा,म्हणून पत्र इतक्या दिवसाने लिहिण्यास विलंब झाला. तुम्हा सर्वांची आठवण येते,मेसचे जेवण येथे मिळते,पण आपल्या घरच्या जेवणाची चव नाही,येथे माझी कामे मीच करतो,मला आईची फार आठवण येते.
बाबा मी चांगले शिकावे म्हणून तुम्ही मला शिक्षणासाठी कोल्हापूरच्या कॉलेज मध्ये टाकलेत,मी तुमच्या मेहनतीचे चीज करेन,तुमची इच्छा आहे मी डॉक्टर व्हावे,यासाठी मी मन लावून अभ्यास करत आहे.
बाबा मी घरापासून लांब आहे ,पण तुमची तत्व लक्षात आहेत की,डॉक्टर झाल्यावर दीन- दुबळ्यांची सेवा करायची.
बाबा लवकरच तुमचे स्वप्नं पुरे होईल,प्रकटिकल मध्ये मला चांगले गुण प्राप्त झाले आहेत,अजून चांगला अभ्यास करेन.
माझी चिंता नसावी,आईला, ताईला नमस्कार सांगा,तुमची काळजी घ्या.
सुजाता जाधव
नवी मुंबई
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
मुलाचे वडिलांना पत्र
...........................
श्री. ज्ञानेश्वर भगरे गुरुजी वाकदकर.[ १७]
...,.,..................
तिर्थस्वरूप बाबांना,
शि सा नमस्कार.
पत्र लिहण्यास कारण की, बऱ्याच दिवसापासून आपणास मुद्दाम पत्र लिहावे वाटत होते, आज त्याचा प्रत्यक्ष योग जुळून आला. इकडे मी अगदी तसा आनंदातच आहे. बऱ्याच दिवसापासून ग कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू झालेले असून सगळीकडे काम धंदा बंद आहे. परंतु बाबा तुम्ही मला सुरुवातीपासून बचत करायची लावलेली सवय मला या काळामध्ये फार उपयोगी पडली. सुरुवातीपासूनच जीवनोपयोगी वस्तू आणि पैसे यांची केलेली काटकसर मला फार कामी पडली.
मी घरापासून दूर असलो तरी सुद्धा तुमच्या विचारांची शिदोरी माझ्याजवळ फार कायम आहे.तुम्ही माझ्यावर केलेले संस्कार आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये समर्थपणे लढण्याची दिलेली शिकवण मला सतत कामी पडते. तुम्हीसुद्धा गावाकडे मजेत असेलच अशी आशा करतो.
बाबा कोरोना या रोगाचा संसर्ग सध्या आपल्याकडे फार फोफावत आहे. आणि यापासून सावध राहणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे.आजपर्यंत तुम्ही आम्हाला घरांमध्ये दिलेली शिकवण सुद्धा या रोगापासून दूर राहण्यासाठी उपयोगी पडते.तुम्हीच आम्हाला नेहमी बाहेरून आल्यानंतर पादत्राणे घराबाहेरच काढून हात-पाय धुऊन आल्याशिवाय घरांमध्ये येऊ देत नव्हते, कोणाच्या अंत्यविधीला जाऊन आलात तर आंघोळ केल्याशिवाय घरात पाऊल सुद्धा देत नव्हते, वेगवेगळ्या प्रकारचा शारीरिक विटाळ पाळत होते, याचं कारण आता आम्हाला कळायला लागलं. काही गोष्टींपासून शारीरिक सुदृढता ठेवणे गरजेचे असते हे आम्हाला यात करून लोकांना दाखवून दिलं. बऱ्याच दिवसापासून तर आम्ही घरातच लोक डाऊन होतो.आता आता कुठे तरी काही कामानिमित्त बाहेर जायला मिळते तेव्हा आम्हीसुद्धा कधी ब तोंडाला मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. फार पोरांना आपला चेहरा दाखवणारा माणूस आज मात्र या रोगाने त्याच्या चेहर्याला बंदोबस्त करू पाहत आहे. तसंही तुम्ही पूर्वीपासून तुमच्या डोक्यावर उपरणं वापरायचे, आणि आम्ही मात्र होतो तुम्हाला हसत होतो. आता एखादा रुमाल किंवा उपरणे किती गरजेचे आहे हे आम्हाला कळायला लागलं.
माणूस म्हणून जगताना इतरांचा विचार करत करत स्वतःची ओळख करण्यासाठी तुम्ही आम्हाला पूर्वीपासून सांगत आले, परंतु अभी मात्र या मायेच्या जगामध्ये स्वतःचीच ओळख विसरून जगाला कवेत घेण्याचा वेडा प्रयत्न करत होतो, आज आम्हाला कळायला लागलं शेवटी मी आणि माझी ओळख मला माझ्या कामी पडते.
कोरोना विषाणूच्या प्रसाराने जगाला फार थांबून दिलंय बाबा.तुम्ही नेहमी म्हणायचे आरे पोटाला दोन घास आणि चांगलं बोललं की माणूस आनंदाने जगू शकतो, पण आमची मात्र धावपळ सुरू होती, हे करू का ते करू अशी आमची आशा होती,आज मात्र आम्हाला कळलं की माणूस म्हणून जगण्यासाठी किती गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता अपेक्षांचा चुराडा आम्हीच आमच्या पावलाखाली करून टाकला. आता आठवतय गाव आणि गावची माणसं गावातले भोळेभाबडे गोरगरीब जनता. आपली माणस सतत डोळ्यासमोर दिसतात परंतु बंदीमुळे आता तिकडे येणे शक्य नाही.
तिकडे शहरातल्या लोकांनी सगळ्यांनी आपापले खिडक्या दारे बंद करून घेतले. इकडे माणसातलं माणूसपण हरवून गेले की काय अशी शंका मनात निर्माण होत आहे. आपला गावच बरा असा आता वाटायला लागले. नक्कीच आता संधी मिळेल तेव्हा गावाकडे येण्याचा प्रयत्न करतो.
तूर्तास तरी माझी काळजी करू नका. तुम्ही नक्कीच माझी दररोज आठवण करत आहात हे हे मला माहीतच आहे, परंतु मी आनंदात आहे. घरातून उडून गेलेल्या पाखराला पुन्हा आता परत घरट्यात यावस वाटत आहे. नक्कीच संधी मिळाल्याबरोबर मी इकडून उडणार आणि आपल्या घरी येऊन तुम्हाला मिठीच मारणार.
आता पत्र पुरे करतो.
तुमचाच-बाळू
~~~~~~~~~~★~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें