सोमवार, 25 मई 2020

रोज एक लेख :- दिवस सदतीसावा वडिलांचे मुलीस पत्र

*साहित्य सेवक समूह आयोजित*

रोज एक लेख :- सदतीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 25 मे 2020 सोमवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6

*विषय :- आई-बाबाचे मुलीस पत्र*

शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*विषय: स.न.वि.वि.पत्रास कारण की....*
‼‼‼‼‼‼‼‼‼‼
(किशोर वयातील आपल्या मुलाला आईचे पत्र......)

चि.विश्वास,
    स.न.वि.वि. पत्रास कारण की,.....
कालच तुझे अकरावीचे अॅडमिशन लातुरच्या शाहु कॉलेजला मिळाले असे समजले. आणि तुझ्यासह मलाही खुप आनंद झाला.तुला तुझ्या मनासारखे कॉलेज मिळाले.आता तुझी शिक्षणाची भुक भागनार आहे.
            बाळा,तु लहाणपनापासुनच अभ्यासात हुशार आहेस.हे माझ्यासह तुझ्या शिक्षकांच्याही लक्षात आले होते.आणि तेव्हापासुन मी माझ्या अतृप्त इच्छा तुझ्यामध्ये पहात आहे.तु खुप शिकावेस असे मला सतत वाटतेय.त्यामुळे तुला कोणतीच गोष्ट कमी पडु नये म्हणुन मी व तुझ्या बाबांनी खुप काळजी घेतली.तुझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले.नंतर माध्यमिक शिक्षणातही तु तुझा पहिला नंबर कधी सोडला नाहिस.शिक्षणासोबतच तुझ्यावर संस्कार व नितिमूल्य रुजवण्यात मी कसलीही कसर केली नाही.परिस्थितीशी जुळवून घेण्याचे बाळकडू मी तुला खुप लहाण वयापासुनच दिलेत.तु कधीतरी चिडायचास,म्हणायचास कि माझ्या वर्गातील मुले बघ कसे बाहेर एैश करतात ,सिनेमाला जातात,बाहेरचे चमचमीत खातात त्यांचे आईवडील त्यांना पैसे देतात.पण बाळा मी तुला पटवून दिल्यावर तुझ्या चिडण्याचा तुलाच राग यायचा.आणि नंतर तु कधीही हट्ट करत नसायचास.
       बाळा, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही.तुझा दहावीचा निकाल लागला तुला ९६% मार्कस् मिळाले.व मला माझ्या कष्टाचे चिज झाल्यासारखे वाटले.पण आता खरी सुरवात आहे.आणि म्हणुनच हा पत्रप्रपंच.......
      तुझे कॉलेज सुरु होवून आता चार दिवस झालेत.तु एकटा कधी कोठे राहिला नाहीस पण बाळा,आता तुला सवय करुन घ्यावी लागेल.तु स्वत:ला एकटा समजु नकोस.मी तनाने नसली तरी मनाने सतत तुझ्या सोबत असते हे विसरु नको.एक लक्षात ठेव बाळा आपण हलाखीचे दिवस काढले आहेत.जसे पक्षाला पंख फुटल्यानंतर ती गगन भरारी घ्यायला उत्सुक असतात तशी तुझी अवस्था मी पाहिली आहे.याप्रसंगी काही गोष्टी तुला सांगाव्यात असे मला वाटते.
१)आपण इथे कशासाठी आलोत हे सतत स्मरणात ठेव.
२) मित्र असुदे पण मित्राची निवड करतांना त्याना पारखुन निवड.संगत नेहमी चांगल्या मुलांची असावी .वाईट संगतीचे दुष्परिणाम खुप घातक असतात.
३)तुझ्या मनाला जे योग्य आहे असे वाटेल तेच करत जा.
४)कष्टाची कधीही लाज वाटु देवू नकोस.
५)आणि शेवटचे जसा दहावी पर्यंत पहिला नंबर सोडला नाहिस तसा पहिला नंबर सोडू नकोस.
लहानपणापासुनच तुला डॉक्टर होण्याची इच्छा आहे .आणि त्या ध्येयाने तु अभ्यास मन लावून करत आहेस.मला त्याबद्दल अजिबात शंका नाही.
    बाळा , तु गेल्यापासुन घर कसं खायला उठतेय बघ.सगळे काम हरवल्यासारखे वाटतेय.पण पुन्हा मी मनाला समजावुन सांगते.बाळा तुझ्या यशातच माझा आनंद दडलेला आहे.मला खात्री आहे तु नक्की डॉक्टर होणारच.पण बाळा तुला पुढचेही सांगते,तु डॉक्टर झालास ना तरी पैशाच्या मागे धावू नको.गरीबांची, अडल्या नडल्यांची सेवा कर. माझे संस्कार कधी विसरु नकोस.मी हे काय बोलायला लागले ? तु बोअर तर झाला नाहीस ना ! पण काय करु बाळा आईचं मनच अस असते आई आपल्या मुलाचं भल व्हाव यासाठीच असते हे कस विसरु.
     तुझ्या शिक्षणाला आता दिशा मिळाली आहे.तु खुप मेहनत घेत आहेस,घेणार आहेस हे मी जानते.पण प्रकृतीची काळजी घेत जा बाळा.आणि महत्वाचं म्हणजे आता तुझ्याजवळ थोडेफार पैसे असतील .जे तुला आम्ही शिक्षणासाठी पाठवत आहोत.ते कसे पाठवतोत याची जानीव तुला असल्यामुळे तु ते व्यर्थ खर्च करणार नाहीसच. पण जर तुला कुणी काही अमिष दाखवले तर,वेळीच सावध हो बाळा. खर्च करतांना तो योग्य ठिकाणी करावा याचे महत्व तुला माहित आहेच 
   आणखी एक बाहेरच्या कोणत्याही मोहजाळात अडकु नकोस.कधी खोटे बोलु नको. सत्याची कास सोडू नको.मन लावुन अभ्यास कर. कारण स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अथक परिश्रमाची गरज आहे. ते तु करशीलच यात शंका नाही. आणि, हो,बाळा कधी जर अपयश आलच तर खचून जावू नकोस.मी तुझ्या यश अपयशात सतत तुझ्या पाठिसी असेल  हे लक्षात घे.
  जास्त काही लिहीत नाही पुन्हा एकदा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत अशी प्रार्थना करते.बस....
इकडची काळजी करु नको .
               तुझीच आई
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
       सौ.खेडकर सुभद्रा बीड
      मो.नं.  9403593764
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*बाबांचे लाडलीस पत्र*
प्रिय
लाडली तुझं पत्र मिळालं आणि मन हेलावून गेलं. तू भेटल्याचा अनुभव आम्ही त्या पत्रातून घेतला. काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हवाली करताना आई-वडिलांच्या अंतःकरणाला काय वेदना होतात. हे तुला सांगून कसं पटणार आहे. ईश्वरानं प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिका दिलेल्या आहेत आणि त्या भूमिका प्रत्येकाला पार  पाडायच्या आहेत. तू जेव्हा आईच्या भूमिकेत येशील तेव्हा तुला सारं समजून येईल. सासरची माणसं तुला मुलीसारखं सांभाळतात हे ऐकून आपसुक डोळ्यातून पाणी आले बेटा. खरं पाहिलं तर तू तरी कुठे कमी आहेस. तुझी केलेली जडण-घडण आणि आईने दिलेले संस्कार, घरंदाजपणा एकूणच आपल्या घराची संस्कृती आणि संस्कार तू घेऊन तिथे गेली आहेस. तुझ्या जाण्यानं इथलं अंगण उदास भासत आहे. तुला पडणारे प्रश्न आणि आईला विचारलेले प्रश्न खरंच विचार करायला लावणारे आहेत. तु म्हणालीस की आई-वडील सर्व नाती, सर्व गोष्टी  सोडून नव्या माणसात नव्या लोकात नव्या संस्कारात येऊन मुलीने सर्वांसोबत कसे जमवून घ्यायचे. ही पद्धत ही रीत कशी काय असेल असा तुझा प्रश्न होता बेटा. पण हीच कसोटी आहे बाईच्या जातीची. आणि परंपरेनं चालत आलेली. ती कसोटी यशस्वीपणे तिने स्विकारली आणि त्यात ती बाजी मारून गेली. वेदना होतात साऱ्या गोष्टीच्या परंतु या बाबी आपल्याला स्वीकारायलाच लागतील. डोळ्यातून अश्रु वाहतील आणि आई तुझे वाटणारे दुःख ओघळून मोकळी होईल. पण मला धड रडताही येत नाही अंतकरणात हे साठवताही येत नाही माझी घुसमट होती बेटा. पण माझ्या अंतरीच्या वेदना तुला सांगून तुला दुःखी करू इच्छित नाही. तु आनंदी असणं तुझा बहरणारा संसार बघून कोणत्याही आई बापाला दुःख कशाला वाटेल. आणि तुला समजून घेणारी माणसं तुला मिळाली आहेत,तुझा स्वभावा  त्यांच्यासाठी सुखदायी आहे. आणि ते सुखी आहेत,त्याचं तुला समाधान आहे. आणि तू समाधानी आहे त्यातच आम्हाला आनंद आहे. आईवडिलांनी प्रमाणापेक्षा जास्त मुलीच्या संसारात लक्ष देणे म्हणजे तिच्या संसारात ढवळाढवळ करणे असते. तू इथं नाहीस तेव्हा घराची अवस्था दयनीय झाली आहे. प्रत्येक गोष्टीला तुझा लागलेला लळा सगळेजण कसे काय विसरतील. पण हळूहळू होईल सवय. पण तूही लक्षात घे भूतकाळातील आठवणीत राहण्यापेक्षा वर्तमानात तुला जगायचे आहे. आणि तो वर्तमानच तुझे भविष्य घडवणार आहे. 

येतं नशीबी नांदणं
जवा लाडक्या लेकीचं...
परकं होतं अंगणं
माहेरच्या गं घराचं...||

तिळतिळ तुटं जीव
भरं हुरदं मायेचं...
पाठवणी येता तुझी
डोळं पाणावलं बाचं...||

पाठीराखा भाऊ तुझा
मुसमुस रडतोयं...
आज जाता सोडून तू
सख्या काढतील सय...||

सुनं वाटेल गं घरं
जाता सासरी लेकरु...
झाड उदास भासतं
तिथं नसता पाखरू...||

जीव जडो तुझा तिथं
आई करी बोळवण...
नाव माहेराचं कर
हिच तुला शिकवण...||
   म्हणून आमची कुठलीही काळजी न करता कसलीही काळजी न करता तुझ्या संसारात तू आनंदी राहा. तुझ्या घरातील सर्वांना यथानुक्रम सप्रेम नमस्कार आणि शुभाशीर्वाद...!!
                          तुझाच बाबा
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
          *हणमंत पडवळ*
           *उस्मानाबाद*
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
(37)
सौ जयश्री निलकंठ सिरसाटे
गोंदिया
9423414686

*वडीलांचे विवाहित मुलीला पत्र*
            ||श्री||
                      दि. 25/5/2020
     चि.इंदिरास,
            अनेक आशीर्वाद.
          तुझे पत्र मिळाले वाचून तुम्ही सगळे सुखरूप असल्याचा आनंद झाला. आम्ही सुद्धा इकडे आनंदात आहोत. वयानुसार थोडं सुरूच असते प्रकृतीच्या बाबतीत पण चिंता करण्याचे कारण नाही. औषध सुरू आहेत आणि  माझा विद्यार्थी आहे ना रवि नागपुरे तो डॉक्टर झाला आहे आणि गावातच दवाखाना उघडलाय. कधीही गरज पडली तर फोन करा मी घरीच येईल म्हणतो पण मीच त्याला पेशंट सोडून यायला नको म्हणून जाऊन येतो. खुप चांगला डॉक्टर म्हणून ओळखतात त्याला आणि खरंच खूप चांगला आहे अजूनही त्याच्या वागण्यात अजिबात अभिमान नाही. मी गेलो की पाया पडतो व फी पण घ्यायचे नाकारतो पण मीच त्याला जबरदस्तीने देऊन येतो.
    अगं हो तुझ्या आईला तुझं पत्र वाचून दाखवलं. बेटा, तु कधी एवढी मोठी झाली कळलंच नाही.
तु आपल्या कार्यक्षेत्रात करत असलेली प्रगती बघून मन अभिमानानं भरून येतं. तुझ्या पत्रातून पायल शिरीष आल्याचं कळलं खुप बरं वाटलं. यानिमित्ताने तरी तुम्हाला काही दिवस सोबत राहता येईल. नेहमी तुम्ही दोघेही आपल्या नोकरीमध्ये आणि मुलं बाहेर. हीच एक संधी आहे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची, बरे वाईट मधील फरक समजावण्याची.आजच्या पिढीमध्ये आणि आधीच्या पिढीमध्ये फरक आहे. मुलांची आई म्हणून नव्हे तर त्यांची मैत्रीण म्हणून त्यांच्याशी वाग म्हणजे ते सुद्धा मनमोकळे वागतील. मोबाईल, संगणक, दुर दर्शन चा वापर कमी करून जास्तीत जास्त वेळ मुलांना द्या. भविष्याची प्लानिंग करा हीच वेळ आहे सगळे व्यवस्थित करायची.
      आमची जास्त काळजी करू नको आणि हो तु लिहिलेले आहे की दिवसभर व्यस्त असतेस थोडा आराम कर स्वतःला पण वेळ दे. दररोज काहीवेळ स्वतःसाठी राखून ठेव.आपला छंद जोपास तोच तुला कामात येईल. मलाच बघ शब्द कोडे भरण्याचा माझा छंद अजूनही जोपासला आहे. तोच माझे एकाकीपणा भरून काढण्यासाठी मदत करतो. एका वयानंतर माणूस एकाकी पडतो तेव्हा हे छंद आपल्या कामी पडतात.                             तु एक आदर्श मुलगी, आदर्श सुन, वहिणी, नणंद, जाऊ व आदर्श पत्नी म्हणून आपल्या समाजात तुला ओळखलं जातं. तुझ्या बद्द्ल असं ऐकलं की मन भरून येतो व तु माझी मुलगी असल्याचा अभिमान होतो. बेटा, आता तुला आदर्श आई बनून दाखवायचं आहे. मला खात्री आहे तु हे सुद्धा नक्कीच करु शकतेस. मुलांवर योग्य वेळी केलेले संस्कारच त्याचं भविष्य घडवित असतात. मुलांना घडवण्यात आईची भूमिका फार मोलाची असते.
      जसं आम्हाला तु आमची मुलगी असल्याचा अभिमान आहे तसाच अभिमान तुला सुद्धा वाटेल.
     तु मुलांना घेऊन यावं, काहीदिवस आमच्यासोबत घालवावे अशी खुप इच्छा होती पण आता ते शक्यच नाही. आपण जरी शरिराने दुर असलो तरी मनाने जवळच आहोत. सोबत राहु शकत नाही याचं दुःखं बाळगू नको.
 तुझ्या सारखी मुलीचे आम्ही आईवडील आहोत ही आमच्यासाठी खुप आनंदाची गोष्ट आहे.
 मला तर हेच कळत नाही लोकं मुलाचा हव्यास कशापायी धरतात. मुलगा काय आणि मुलगी काय दोन्ही सारखेच आहेत हे तु जगाला पटवून दिलंस.
  नोकरीमध्ये तु माझ्या पावलावर पाऊल ठेवून माझ्या आदर्शावर चालत असल्याचं मला खुप समाधान आहे. पैसा तर सगळे कमावतात पण माणसं जोडायची कला ज्याला आली तो जीवनात खुप चांगला व्यक्ती असतो. सोबतच तु जे समाजसेवेचे व्रत घेतले ते सुद्धा खुप छान आहे. आपल्याकडे आहे ते सगळ्यात वाटून खाल्ले की मनाला समाधान मिळते ते इतर कुठल्याही गोष्टीत नाही.
       मी तुला सासरी जातांना तुला  जे बोललो होतो ते तुला आजही आठवते. मी हे तुझ्या भल्यासाठी बोललो होतो आणि म्हणूनच आज तु आपल्या सुंदर सांसारिक जीवनात यशस्वी झाली आहे.
 तु माझ्या आवडीचं गीत आठवन करून दिलं आणि पत्र वाचतांना मी भुतकाळात हरवून बसलो. ते तुझं गीत गायन, मधुर सुरेल आवाज कानात घुमायला लागला. आजही ते गीत मी आवडीने ऐकतो.
     जावईबापूंची सुद्धा काळजी घे. त्यांचे आईवडील गेल्यापासून ते एकटे पडलेत त्यांना धीर दे व फक्त पत्नी बनून नाही तर प्रसंगी आई, बहीण व मैत्रीणीच्या भूमिका सुद्धा साकारावी लागते हे विसरू नको.
 सगळं व्यवस्थित झालं की तु ये काही दिवस मुलांना घेऊन. रहा चार दिवस तुलाही बरं वाटेल आणि आम्हालाही. तुझी आई तर तुझीवाटच बघत असते आधी तुम्ही यायचे तेव्हा तिच्याकडे जास्त वेळ नसायचा आणि आता वेळच वेळ आहे पण येत नाही म्हणत असते.
   खुप दिवसांनी पत्र लिहिले. पायल व शिरीष ला आशीर्वाद व आमचं प्रेम दे आणि जावईबापुंना सुद्धा अनेक आशीर्वाद. फोन करत रहा व खुशाली कळवायला विसरू नको. तुझ्या पत्राच्या प्रतिक्षेत.
                      तुझेच वडील 
        शालीग्राम धुवाधपारे
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
बाबांचे मुलीस उपदेशपर पत्र.
39)सौ.भारती दिनेश तिडके
गोंदिया.
            ||  श्री||
प्रिय लाडकी भारतीस
          बाबांचा अनेक आशीर्वाद.
      तुझे पत्र मला कालच मिळाले. पत्र वाचून तुझ्या मनातील भावना व सासर-माहेर यातील तू सांगितलेला फरक सविस्तर समजला. दिनेश राव यांना माझा नमस्कार सांग. तुझ्या मनातील घालमेल मी समजलो. पण बेटा आता तुझे लग्न झालेले आहे. एका कुटुंबाची तू सून झाली आहेस. दोन घराचे ऋणानुबंध तुला जोडून ठेवायची आहे. इकडे घरी तू जरी स्वच्छंद होती तरी आता ते तुझे सासर आहे. सासरची मंडळी ही तुझी नातीगोती आहेत. मला हे म्हणायचे नाही की तू पूर्ण माहेर विसरून जायचे परंतु आता तू त्या घरची सून म्हणून सर्व सांसारिक जबाबदाऱ्या पार पडावे लागेल. सर्वांची सेवा शुशृषा करणे हा तुझा धर्म आहे. संसार रुपी रथ गाडीचे नवरा-बायको ही दोन चाके आहेत. सर्वांची मने जिंकून तुला नवीन घरात रममाण व्हावे लागेलच. त्यांना आपलंसं करून सर्वांना खुश ठेवावे लागेल. तुम्ही रात्री सर्वजण मिळून एकत्र जेवण करीत जा. त्यामुळे प्रेमाचा ओलावा वाढतो. आपल्या प्रकृतीची आपणच काळजी घ्यायची असते बेटा. तू आनंदी राहा.
       तुझी आई या घरात आली तेव्हा ती देखील नवीन सूनच होती. परंतु तिने तुझ्या काकांचे, आजींची सर्वांची सेवा केली. कधीच तिने माझ्या जवळ कुरकुर केली नाही. तीसुद्धा सकाळी उठून सर्व कामे करून तुमचंही सांभाळ करायचीच ना. तिने तुझ्या वरही तेच संस्कार पेरले आहेत. पण तुझ्या मनातील जी घालमेल होत आहे ना ती तुला आता कदाचित कळणार नाही. कारण जोवर तू स्वत: आईच्या भूमिकेत जात नाहीस तोवर तुला कौटुंबिक बाजू आईची बाजू समजणार नाही. सांसारिक जबाबदाऱ्या फार महत्त्वपूर्ण असतात. तू तर शिकली आहेस. एम ए
एम एड झालेली आहे. तू नोकरी चा सुद्धा प्रयत्न कर. नोकरी करून अर्थार्जन करून कुटुंबाला मदत कर. भांडी धुण्यासाठी बाई ठेव, तेवढाच तर तुला त्रास कमी होईल. सासू-सासरे म्हणजे आपले आई-वडील समजायचे. त्यांनी रागावले, काहीही म्हटले तरी त्यांना काही उलट न बोलता त्यांच्यावर प्रेम करायचे. म्हातारे माणूस थोडं चिडचिड करतातच. नवीन नवीन संसारात कुठेही त्रास असतोच. परंतु एकदा का त्या कुटुंबात रुळले तर तेच कुटुंब स्वर्ग बनते. आजवर तू माहेरी कुटुंबाच्या छायेत मनमोकळे जीवन जगत होतीस. पण आता सर्वांची जबाबदारी आपली आहे असे समजून कार्यतत्पर हो.
    तेच घर, तेच कुटुंब तुझे आहे. त्याला तू " वसुधैव कुटुंब"बनव. तुझे दीर ,ननंद यांना प्रेमाचा ओलावा दे. पतीराजांना नेहमी खुश ठेव. घरात प्रेमळ मायेच वातावरण ठेव कारण तेव्हाच आम्ही तुला जे संस्कार दिली त्याची प्रचिती येईल. प्रत्येकाला वाटते की मनमोकळेपणा हवा. त्या बाबी तू दिनेशरावा जवळ शेअर करीत जा. परंतु घरातील व्यक्तींच्या तक्रारी सांगत जाऊ नकोस. सर्वांची तू स्वतःच्या मायने, आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांची मने जिंक, म्हणजे तुला बघ माहेरची आठवण देखील येणार नाही. बहिणाबाईंनी म्हटलेलेच आहे की"अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर."कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल तर जीवनाचे, संकटाची चटके खावेच लागते. बेटा नवीन संसारात अडचणी येणारच पण त्यातच समायोजन करणे हे तुझे कार्य आहे.
   स्वतःचा विकास, कुटुंबाचा विकास करताना सामाजिक भानही ठेव. तसं तू आधीपासूनच ठेवलेले आहेस. समाजासाठी काही करण्याची संधी शोधत राहा.
    इकडे तुझ्या आईची प्रकृती ठीक आहे. बी.पी .कधी कधी कमी होतो. परंतु औषध सुरू आहे. माझी पण प्रकृती ठीक आहे. तू काळजी करू नकोस. ऋतुजा आणि शैलेश देखील मजेत आहेत. गौरी आता एक वर्षाची पूर्ण झाली. तू लावलेले रातराणी चे झाड जगले. मी त्याला रोज पाणी घालतो. आता हळूहळू ते मोठे होत आहे.
    तसे तुला घेण्यासाठी मी येणारच होतो. परंतु covid-19 मुळे नागपूर रेड झोन मध्ये आहे. म्हणून लाॅक डाऊन संपल्यानंतर किंवा दिवाळीत तुला घ्यायला येईलच. सर्वांना माझा नमस्कार सांग. काळजी करू नकोस.
                    तुझेच बाबा

सौ. भारती दिनेश तिडके
 गोंदिया 8007664039
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*वडिलांचे लाडक्या लेकीस प्रेरणादायी पत्र*

  *(09)सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*

चिरंजीव कुमारी सुनिता,
अनेक उत्तम आशीर्वाद.

      पत्रास कारण की तू प्रथमच नोकरीसाठी  बाहेरगावी कुटुंब सोडून राहत आहेस,  आणि तेही दोनशे पासष्ट कि मी.परजिल्ह्यात.त्यामुळे राहावले नाही,  हे पत्र लिहीत आहे.
आतापर्यंत तू कधीही मला आणि आईला सोडून बाहेर राहिलेली नाहीस. सुरुवातीला  नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला तुला थोडेसे अवघड जाईल परंतु सवय झाल्यावर मग मात्र काही वाटणार नाही.  तुझा नोकरीचा पहिला दिवस कसा राहिला ?तुझा वेळ कसा जात आहे ?सकाळी किती वाजता उठणे होते ?कारण उठ म्हणायला किंवा आलाराम लावायला आता मी किंवा आई तुझ्या सोबत नाही. त्यामुळे तुझा तुझाच आलाराम लावावा लागेल. आणि स्वतःलाच उठवावे लागेल. यापूर्वी तुझ्या मदतीला आम्ही इथे असायचो. परंतु आता तिथे तुझी तुला सर्व कामे करावी लागणार आहेत .तुला आमची आठवण येत असणार हे नक्की परंतु सारखे सारखे शनिवार-रविवार तू लाखांदूर वरून एवढ्या दूर गोंदियाला आम्हाला भेटायला येऊ शकत नाहीस .आता थेट दिवाळीला येणे होईल.  तुला पूर्वी हिशोब लिहिण्याची सवय नव्हती परंतु आता हिशोब लिहिण्याची सवय करुन घे.  आपला व्यवहार चोख ठेवण्यासाठी हिशोब लिहीत राहणे चांगली सवय अंगवळणी पाडून घ्यावे.म्हणजे तुला दर महिन्याला किती पैसे लागतात हे तुलाही समजेल आणि  काटकसर कर ,असे मी तुला म्हणत नाही परंतु, तुझ्या गरजा तुला ओळखायला येणे ही सध्या तुला मिळालेली मोठी संधी आहे; असे समजून  तुला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतील .त्यातून पुढे आयुष्याचे गणित सोडवायला तुला नक्कीच मदत होणारआहे.अभ्यासाला ही वेळ दे.कारण तू खुप नशिबवान आहे .दहावी  डी.एड्.झाल्यानंतर लगेच तुला नोकरी मिळाली आहे .तू संधीचं सोनं कर.अध्ययन कार्य सातत्याने  सुरू ठेव.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,ते जो ग्रहण करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही." तिथे तुला बघण्यासाठी टीव्ही नाही तुला इथे फार सवय होती .टीव्हीची परंतु आता मात्र ही सवय मोडली असेल; पण अभ्यासात मन रमवले, लायब्ररीची थोडी पुस्तके वाचली तर तुझे मनोरंजनही होईल आणि ज्ञानही वाढेल.आता आवडीची भाजी करायला तुझी आई तिथे नाही म्हणून तू  स्वतःच्या आवडीनिवडी स्वतःनेच जपत जावे .पालेभाज्या खात जाणे व्यवस्थित मोसमात जी फळे मिळतील ती खा. अन् हो.तुझ्या नोकरीच्या सोनी (चप्राड) ला तिन नद्यांचं संगम आहे .ताजी ताजी भाजी ,ताजे फळ,  मोसमातील सर्व फळे खात जा पैशासाठी मागेपुढे पाहू नकोस .
     तुला घाईघाईने जेवणाची सवय आहे .जरा सावकाश जेवत जा. आणि पाणी मात्र भरपूर पिणे त्यामुळे तुला पोट दुखी होणार नाही. काही चांगल्या सवयी आपोआप लागतील. .सकाळी लवकर उठून योगासने आणि प्राणायाम कर आणि हो तुझ्या वर्गातील विद्यार्थ्याना देखील ही चांगली सवय लाव बरं . ह्याने आरोग्य आयुष्यभर चांगले राहील.
 
तुझे घरमालक ठाकरे गुरुजी चांगल्या स्वभावाचे आहेत.अडल्या-नडल्याला त्यांचे मार्गदर्शन घेत जा.मी घर मालकास तसे सांगून ठेवले आहे .
आईचे तुला एक विशेष सांगणे आहे .
प्रवास करीत असतांना "मी मुलगी आहे"असे समजून राहू नको.मानव समजून वाग.आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत.घाबरायच नसून धैर्याने आणि झाशीची  राणी लक्ष्मीबाई  सारखे वाग . कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड दे.
शाळेत मुलांच्या विश्वात रममान हो.त्यांना अभ्यासाबरोबर संस्काराचे धडे गिरव.आजचे बालक उद्याचे सुजाण नागरिक बनणार आहेत.देश घडविणार आहेत तुला देशाचे भविष्य घडवायच आहे.भविष्य हातात आहे. लहान मुल म्हणजे कुंभाराघरचा मातीचा गोळा आहे .त्याला सुंदर कलाटणी देण्याचे कार्य तुझ्या हातातआहे .त्या कोवळ्या बालकांना निर्भिड,  धीटपणाने आणि बिनधास्त जगण्यासाठी तयार कर.या जगात वावरताना  त्यांना तू दिलेल्या अभ्यास रूपीसंस्कारा चा उपयोग झाला पाहिजे असेच विद्यार्थी घडव.आणि हो मुलांना मोठमोठी स्वप्न  पाहायला लाव.ध्येय निश्चित करून त्यांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करायला शिकव. बर आता थांबते बाकी इकडे सगळे खुशाल आहेत पत्र लिहून खुशाली कळवत जावे.तुझी आजी म्हणाली आपल्या घराण्यातील पहिल्यांदा कोणी तरी  मुलगी बाहेर गावी शिकविण्यासाठी जात आहे. त्यामुळे तू नोकरी करताकरता भरपूर शिकली तर आपली मान नक्कीच उंचावणार आहे. आजोबांना देखील तुझी काळजी वाटते परंतु त्यांना विश्वास आहे तू नक्कीच खूप नावलौकिक मिळविणारआणि घराण्याचे नाव उंच  करशील. आजी-आजोबांचा तुला आशीर्वाद. अरे आता पुरे करतो, नाहीतर वाचून कंटाळशील
आणि बाबा खूप उपदेशाचे डोस पाजतात असे म्हणशील .आई, आजोबा ,आजीकडून तुला खुपखुप  आशीर्वाद .तुझ्या पत्रांच्या प्रतिक्षेत.
                              तुझेच
                               बाबा
*सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया*
*(9420516306 )*
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*बाबांचे लाडक्या मुलीस पत्र*

प्रिय बेटी,
आज मला तुला काही तरी बोलायचं आहे. मनातंल्या काही गोष्टींचा उलगडा करायचा आहे. मात्र तुझ्या समक्ष उभे राहून बोलू शकत नाही. म्हणून या पत्राद्वारे माझ्या मनातील काही गोष्टी तुला सांगत आहे. मला खात्री आहे तू समजून घेशील आणि आई-बाबांचा समाजात जो मानसन्मान आहे ते टिकवून ठेवशील.
हे वय असंचअसतं, या वयात कुणावर तरी आपलं प्रेम असावं असे प्रत्येकांना वाटत असते. आपल्या स्वप्नातला राजकुमार कसं असावं आणि कसं दिसावं याची स्वप्न प्रत्येक मुलगी पाहत असते. स्वतःच्या मर्जीनुसार आपल्या साथीदारांची निवड करणे योग्य आहे यात यत्किंचित सुद्धा वाद नाही मात्र अनुभवाची कमतरता आणि माणसं ओळखू न येणे या कारणांनी धोका होऊ शकतो. लग्न हे जीवनातील असा एक प्रसंग आहे ज्यामुळे मुलींचा दुसरा जन्म समजल्या जातो. आईच्या गर्भातून घेतलेला पहिला जन्म आणि आईच्या घरातून नवऱ्याच्या घरात घेतलेला प्रवेश हा दुसरा जन्म. पहिला जन्म आई देते आणि सांभाळपण करते मात्र काही काळासाठी. हा दुसरा जन्म मात्र आयुष्यभर आपल्या सोबत असतो. आई बाबांसाठी मुलगी म्हणजे खूप काळजी करण्यासारखी बाब आहे. तु ही जेंव्हा एका मुलीची आई होशील ना त्यावेळी तुला नक्की कळेलच. या वळणावर घेतलेला एक निर्णय आयुष्य सुधारू ही शकतो आणि बिघडवू सुद्धा शकतो. म्हणून या वयात निर्णय घेतांना शंभर वेळा विचार करणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा आपण चित्रपटातील कहाणी पाहून किंवा कोणाच्या तरी गोष्टी ऐकून त्याला बळी पडतो. काही वर्षानंतर ते सर्व कळते मात्र फार उशीर झालेला असतो. सैराट प्रेम करून पाहतो. पण पळून जाऊन लग्न करणे किती त्रासदायक घडते याची परिचिती नागराज मंजुळे यांनी सैराट मध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या चित्रपटांतुन आपण चांगले काही तरी शिकण्याच्या ऐवजी त्यातील परश्या आणि आर्चीचं प्रेम फक्त लक्षात घेतो. चित्रपटाचे कथानक ही वेगळी बाब आहे. त्याला प्रत्यक्षात जीवन जगतांना तेच करता येत नाही. हीर-रांझा किंवा लैला-मजनू यांच्या कथा वाचायला आणि पाहण्यापुरते सीमित ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक जीवन जगतांना बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो. घरातील जे कोणी वाडवडील मंडळी असतील ते आपल्या हिताचे निर्णय घेतात. त्यांना असं वाटत नाही का ? आपली मुलगी दिल्या घरी सुखी रहावी. एकाच जातीत मुलां-मुलींचे लग्न झाल्यास समाजात सर्व बाबी सोईस्कर प्राप्त होतात. तेच जर आंतरजातीय लग्न होत असेल तर त्या जोडप्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. ही भारतातील सत्य परिस्थिती आहे. विदेशात ना जातआहे ना धर्म, त्याठिकाणी कुटुंब नावाची संस्था अस्तित्वात नाही. प्रेमप्रकरणातील लग्न विशेषतः भिन्न जातीच्या मुलांमुलींचे होतात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. वरवरून दिसायला आकर्षक जरी दिसत असेल तरी यात लग्नानंतर खूप वेदना सहन करावे लागतात. प्रेम करणारे मुलांची स्थिती म्हणजे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. काही मुले निव्वळ मुलींची फसवणूक करतात. मला तर असे ही ऐकायला मिळाले आहे की काही मुले मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि हैद्राबाद, बंगळूर, मुंबई आणि पुणे सारख्या मोठ्या शहरात नेऊन त्या मुलींना काही पैशात विकून टाकतात. त्यांचा तो धंदाच असतो. मात्र प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलींना ते काही दाखवू शकत नाहीत. सर्व काही नाटकं करता येतात मात्र पैशाचे नाटक करता येत नाही. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तो खरोखरच आपले पालनपोषण करण्यास योग्य आहे का याची खातरजमा करून कोणी प्रेम करत नाही. म्हणून ज्यांच्यावर आपण प्रेम करीत आहोत त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ? स्वतःची कमाई करतो का बापाच्या पैशावर जगतो हे ही एकदा पडताळून पाहणे आवश्यक आहे. जे की तुम्ही पाहू शकत नाही. तुम्ही दोघे जवळपास समवयस्क असता त्यामुळे तुमची विचारधारा जुळेलच हे सांगता येत नाही. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची पूर्ण ओळख करून घ्यावी. त्याच्या चार मित्राकडून आणि चार नातेवाईकाकडून सर्व माहिती मिळवावी. आपल्या कुटुंबाला त्याची ओळख करून द्यावी. सर्व काही समन्वयक पद्धतीने केल्यास या प्रेमात खरा विजय मिळू शकतो. ज्या प्रेमात दोन्ही कुटुंबाची साथ असेल तेच प्रेम चिरकाल टिकून राहते आणि यशस्वी जीवन जगता येते. म्हणून हा निर्णय घेतांना शंभरदा नाही तर हजारदा विचार करावं असे मला वाटतं. त्याच सोबत शिकण्याच्या वयात असे प्रेम प्रकरणात अडकून पडणे योग्य नाही. त्याऐवजी आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष देऊन स्वतःच्या पायावर उभे राहून चार पैसे हातात आले तर स्वतःच्या जीवनाचे निर्णय नक्की घेता येऊ शकेल. अश्या वेळी तुझ्यात एवढी शक्ती निर्माण झालेली असते की कोणी तुझा विश्वासघात जरी केला तरी तुला समर्थपणे जीवन जगता येऊ शकते. मात्र तू कमावती नसशील आणि प्रेमात तुला धोका झाला तर तुझे जीवन बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेम करण्यासाठी वय लागत नाही. पण तरुणपणातील प्रेमाला योग्य दिशा नसते हे एकदा कळायला हवं. उच्च शिक्षणाने तुला खूप काही ज्ञान मिळालेले असते, त्यावेळी त्याचा वापर करून तू निर्णय घेऊ शकतेस आणि तो निर्णय अर्थात चांगला असू शकतो. नाते तोडल्याने संसारात काही रस राहत नाही मात्र नाते जोडत गेल्यास जीवन पुन्हा पुन्हा जगावेसे वाटते. एक बाप म्हणून शेवटी मला एवढंच सांगावेसे वाटते की, बेटा आम्हांला तुझी खूप काळजी वाटते आणि आपलं लेकरू जीवनात मोठ्या उच्च शिखरावर पोहोचलेलं पाहावं वाटतं, एवढं विसरू नको म्हणजे झालं.

तुझाच बाप

– नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
आईवडिलाचे आपल्या लाडक्या मुलीस पञ
             
   दि.२५-०५-२०२०

             श्री 

प्रिय लाडलीस आई  बाबाचा शुभ आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले. पत्र वाचून फार फारआनंद झाला. तू लिहिलेल्या पत्रातील मजकुरातील शब्द आम्ही दोघांनी खूप खूप वेळेस वाचले. तुझे पत्र वाचून आमचे मन भारावून गेले. तू तिकडे तुझ्या संसारात रमलीस यातच आम्हा दोघांना खूप आनंद आहे. आपली मुलगी दिल्या घरी सुखी आहे, आनंदी आहे हीच आईवडिलांसाठी मोठी गोष्ट असते. आमच्या  दोघांची तू काही काळजी करू नकोस. आम्ही इकडे आनंदात आहोत. तू तुझी व घरातील सर्व मंडळींची काळजी घेत जा. घरातील सर्वांना आनंदी ठेवण्याचे काम आता तुझे आहे. सर्वांचे सुखदुःख जाणणे व प्रेमाने राहणे  हे काम आता  तुझे आहे. कारण तू त्यांच्या घरची लक्ष्मी आहे, सून आहेस, व मुलगी सुद्धा आहेस. सासू-सासर्‍यांची सेवा करणे, व जावईबापूंना अगदी आनंदात ठेवून त्यांची सहचरणी म्हणून सोबत देणे हे तुझे कर्तव्य आहे. तू घेतलेल्या शिक्षणाचा फायदा घेऊन आपल्या संसाराला हातभार लावशील हीच अपेक्षा ठेवून आम्ही तुला जे उच्च शिक्षण दिले त्याचे सार्थक आम्हाला वाटेल व तुलाही आनंद मिळेल.

बर असो. तू व तुझा परिवार सुखरूप, कुशलपूर्वक  आहे. त्यातच आमचा आनंद आहे. तुझ्या घरच्या मंडळींना आमच्याकडून सप्रेम नमस्कार, तसेच जावईबापूंना व तुला अनेक शुभ आशीर्वाद. बेटा अधून मधून वेळात वेळ काढून पत्र लिहीत जा. व सर्व कुशल मंगल आहेत की नाही ते आम्हाला कळवत जा. आम्ही ख्यालीखुशाली तुला कळवत जातो. आमच्या दोघांची तब्येत चांगली आहे काही काळजी करू नकोस. तू पण तुझ्या व परिवारातील सर्वांच्या तब्येतीला जप.  कारण आता कोरोना आजाराचे संकट आहे. हा आजार महाभयंकर असल्यामुळे आपण सर्वांनी व्यक्तिशः काळजी घेणे गरजेचे आहे. आवश्यक तेव्हाच बाहेर जा. नाहीतर घरीच रहा , सुरक्षित रहा, स्वतःस जपा. 
ठीक आहे बेटा. तुझी आठवण आम्हाला येते. व तुलाही आमची आठवण येते. आठवणीच्या मनातील कल्लोळ चालूच राहणार आहे. लवकरच हे कोरोणाचे संकट गेल्यावर मी तुला भेटायला येईल.
काळजी घ्या, सुखरूप रहा, आनंदी राहा.

 कळावे तुझेच आईबाबा.

प्रमिला सेनकुडे
ता.हदगाव जि. नांदेड.
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
(08) *महेंद्र सोनेवाने गोन्दिया*

*बाबांचे आपल्या मुलीस पत्र*

प्रिय नेहास
सस्नेह आशिष. 

            पत्रास प्रयोजन की तुझी आठवण आली. किती दिवस झाले तू मला पत्र पाठविले नाही किंवा तू घरी सुद्धा आली नाही. तू कशी आहेस? मुलं कसे आहेत? घरचे लोक कसे आहेत? तुला इकडे यायला मनाई तर करत नाही ना? 
          आम्ही इकडे मजेत आहोत पण तुझी काळजी असते. नवीन घर नवीन शहर तिथं तू ऍडजेस्ट झाली की नाही? तिथलं हवा, पाणी, वातावरण कसा आहे? आम्हाला तू कळवत जा. मला माहीत आहे, तुम्हाला यासाठी वेळ मिळत नसेल तरी ही आमची अशी इच्छा अशी असते की तू आम्हाला पत्र पाठवावे आणि आपला हालचाल कळवावा.
           तुझ्या मावशीच्या मुलीचे लग्न पुण्यातील मुलासोबत जमलेले आहे. तीही पुण्यात राहायला येणार आहे . तुला तिची सोबत मिळेल. मुलगा चांगला आहे. एका अमेरिकन खाजगी कंपनीत इंजिनीयर आहे. तो तिलाही त्याच कंपनीत नोकरी लावून देऊ असं म्हणाला. 
           तुम्ही ज्या कंपनीत काम करता ती कंपनी कशी आहे , मला माहित आहे तिथं काम बारा तास करावे लागते. मग मुलाला कोण सांभाळता? मुलापासून तू जास्त वेळ दूर राहत नका जाऊ. असं का नाही करत, जोपर्यंत मुलगा तीन वर्षांचा होत नाही तोपर्यंत तू आपल्या कंपनीतून सुट्टी घेऊन घे. तसे होत नसेल तर नोकरी सोडून दे. अगं तुला घर बसल्या तुझ्या विषयाची ट्युशन घेता येते घरी राहून ट्युशन ने पैसाही कमावता येतो व मुलाची देखरेख ही करता येते. हे माझे विचार आहेत, जावयांना सांग. पटलं तर बघा.
          इकडे उष्णता खूप आहे 40 डिग्री च्या वर टेंपरेचर गेला आहे. कुलर सुद्धा नीट काम करीत नाही. तुझ्याकडे वन बेडरूम किचन घेतला आहे. असं कळलं. चांगलं झालं. त्यासाठी लोन सुद्धा घेतला असेल. लोन हा कधीही नॅशनलाईज बँकेचा घ्यावा. कारण भरलेल्या हप्त्यातून इन्कम टॅक्स सुद्धा कमी होतो. 
आपण बाहेर राहीलो तर सांभाळून राहिलं पाहिजे नवीन लोकांशी जास्त रिलेशन ठेवू नये. लोक फार काम काढू असतात. घरी जावई नसले तर कोणालाही घरी येऊ देऊ नये. आले तर त्यांना सांगा की तुम्ही नंतर या म्हणून. नवीन शहरात कोण काय आहे सांगता येत नाही. आपली काळजी आपल्याच हातात असते. नवीन माणसाची मदत सुद्धा मागायची नाही. आधी त्या शहराला समजून घ्यायचं, नंतरच बाकीचे संबंध ठेवायचे.
           तुमची ऑफिसला जायची वेळ किती आहे .आणि घरी किती वाजेपर्यंत परत येता . परत येताना आपल्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे, सोबत  घेऊन यावे. एकदा घरी आले तर पुन्हा बाहेर जायची गरज भासणार नाही. सुट्टीच्या दिवशी तिघांनी मिळून नवीन ठिकाणं बघून यावं. बाहेर आपण राहिलो तर एक दुसर्‍याच्या भावनेला समजून घ्यावं. काही कमी जास्त बोलणं झालं तर ते आपल्या चार भिंतीतच ठेवायचं. हे याकरिता सांगतो की तुम्ही दोघेही उच्चशिक्षित आहात. कधी आपला इगो हर्ट होतही असेल तर त्याला समजून घ्यावा . अटीतटीची गोष्ट असली तर एकाने शांतपणे ऐकावे व ती वेळ निघून गेल्यावर दोन्ही शांत वातावरणात बाहेर फिरायला जावे. सुट्टीच्या दिवशी नवीन सिनेमा पहावा. नाटकं पहावी. मनोरंजना करीता बगीच्यात फिरायला जावे. एक दुसऱ्याच्या कामात मदत करावी. कोणाचं मन दुखेल असे बोलू नये. आणि असं कुणी वागलं तर त्याला माफ करून देण्याचे भाव आपल्या मनात ठेवावे.
          तुझ्या आईला वाटते की आम्ही तुझ्याकडे यावं. पण तिची प्रकृती काही बरी रहात नाही. अशा अवस्थेत तिला घराबाहेर काढणे म्हणजे आपलीच समस्या . पर्वाच मी तिला डॉक्टरकडे नेले होते . आराम करायला सांगितले . बाहेर फिरायला मनाई केलेली आहे. घरी राहून ती चांगली आहे . पण तुझी आठवण काढत राहते. नातवाची आठवण काढत असते. दोन वर्षाच्या झाल्यावर त्याला तू आमच्याकडेच राहू दे. त्याचा सांभाळ करू आम्ही दोघेही. एक आसरा होईल आम्हाला. असे मत माझे आहे. तुला पटत असेल तर पाहू अन्यथा तशी काही काळजी आमची करू नको. आमच्या सेवेला इथं पुष्कळ लोक आहेत. 
तू आपली काळजी घे. आपल्या बाळाची काळजी घे. सध्या तू गरम पाणीच पित जा. गरम पाणी पिल्याने डायजेशन साफ राहतो तसेच कफ होत नाही. सर्दी पडसे होत नाही आणि तबियत समजा खराब झाली तर लगेच डॉक्टरला दाखवून औषध करून घ्यायची. आज नाहीतर उद्या जाऊ असं करायचं नाही. आपन व आपला परिवार स्वस्थ राहिला पाहिजे याची काळजी तुला करावी लागेल.
          जंक फूड किंवा बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. स्वयंपाक तयार करताना काम चोरी किंवा आळस करू नये . ताजे शिजवा ताजे खा.   खाण्यात सलाम, फळे याचा वापर करा दूध, दही, लोणी याचाही वापर करा. शरीर स्वस्थ राहील तर मनही स्वस्थ राहते आणि मन स्वस्थ राहिला तर कामही चांगले होतात. सकाळी उठून व्यायाम किंवा योगा करा. नंतर आपल्या कामात व्यस्त रहा आणि मस्त रहा. 
पत्र मिळताच त्याचा उत्तर पाठवा. आम्हालाही तुझ्या उत्तराची अपेक्षा राहते. 

तुझे बाबा

_________________________
*महेंद्र सोनेवाने गोन्दिया*
*मो. 9421802067*
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*बाबांचे आपल्या लाडक्या मुलास पत्र*

*✒️श्री दुशांत निमकर,चंद्रपूर (02)*

प्रिय बेटा,

उदांत

        पत्र पाठविण्याचे कारण हेच आहे की,बरेच दिवस झालेत.माझ्या मनातील भावना माझ्या मुलापर्यंत पोहचाव्यात यासाठी पत्राचा माध्यम निवडून हितगुज साधण्याचे ठरविले आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे.पूर्वी लिहिता वाचता येणाऱ्या व्यक्तीला साक्षर संबोधले जायचे पण सध्याची परिस्थिती बघता संगणक,मोबाईल हाताळता येणे यालाच साक्षर म्हणता येईल म्हणून मोबाईल,संगणक हाताळता यायलाच हवं पण त्याला देखील मर्यादा आहेत.आज लहान मुलांना अँड्रॉइड मोबाईलचे असलेलं वेड आणि मोबाईल वरील विविध गेम खेळण्यात आपला वेळ वाया घालवीत आहेत त्यामुळे आपल्या शरीरावर देखील त्याचा विपरीत परिणाम होऊन शारीरिक व मानसिक वाढ खुंटू शकते.सातत्याने मोबाईलवरील गेम खेळत असल्याने मानदुखी,पाठदुखी,हाताची बोटे दुखणे,मेंदूवर विपरीत परिणाम होतो. विचारशक्ती, निर्णयक्षमता यावर देखील परिणाम होतो म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक योग्य नाही म्हणूनच म्हणतो की,'अती तिथे माती' होत असते.त्यामुळे बेटा, अधिक काळ मोबाईलच्या सानिध्यात राहिल्याने डोळ्यावर परिणाम होऊन कायमचे अंध होण्याची भीती नाकारता येत नाही त्यामुळे वाजवीपेक्षा जास्त संगणक,मोबाईलच्या सानिध्यात राहू नये.

            प्रत्येकाच्या जीवनात बालपण येत असतो.बालपणीच्या काळात घडलेल्या नानातर्हेच्या गोष्टी आपणास ज्ञात असतो.माझ्या बालपणी या सगळ्या गोष्टी नव्हत्याच मुळी.. तरीदेखील आमचं बालपण खूप मजेत गेलं आहे.माझ्या बालपणी कवेलूचे तुकडे,भांडे,पॉवडरचे रिकामे डब्बे,चिंचोके,विटी-दांडू,कंच्या, हिरोचे छोट्या छोट्या समान पट्या,धावणे,एकमेकांना मारणे,लपाछपी यासारखे खेळ खेळायचो.सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आम्हा साऱ्या मित्र-मैत्रिणीचा धांगडमस्ती चालायची.यामध्ये शारीरिक विकास व्हायचा आणि खूप खेळल्यामुळे दमून भूक लागल्याने छान जेवण व्हायचे..ते सारे खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अजूनही बालपण आठवलं की,'लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा' असं वाटतोय. बेटा, माझ्या सांगण्याचा हेतू हाच आहे की,जर मोबाईल हेच तुझं विश्व म्हणून बालपण घालवलास तर उद्या तुझ्या मुलाबाळांना तू काय सांगणार??? त्यामुळे तुझ्यात आमूलाग्र बदल होऊन नैसर्गिक खेळाकडे अधिक लक्ष देऊन मन, तन, बुद्धीचा विकास होईल याकडे लक्ष द्यावे.

        भारत देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ डॉ.ए पी जे अब्दुल कलाम नेहमी सांगायचे की,'झोपेपणी पडले ते स्वप्न नव्हेत तर जे स्वप्न आपल्याला दिवसादेखील स्वस्थ बसू देत नाही तेच खरे स्वप्न आहे.प्रत्येक बालकाने आपले ध्येय निश्चित केल्यावर दुसऱ्याला हसू येत नसेल तर ते तुमचे ध्येय कमी दर्जाचे आहेत असे मुलांना सांगत असत त्यामुळे बेटा,केवळ मोबाईल मधील गेम खेळून आनंद मिळविण्यापेक्षा तुझ्यातील सकारात्मक विचाराला चालना देणाऱ्या क्षमतांचा विकास केल्यास बरे होईल.आज अनेक जीव जगात किड्या-माकोड्यासारखे जगत आहेत तसे न जगता सत्याच्या बाजूने,अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचे सामर्थ्य तुझ्यात निर्माण व्हावे.जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्चतम ध्येय निर्माण करून पूर्ण होईपर्यंत मागे वळून पाहू नये.मला माहिती आहे,तुला मनोरंजनसहित ज्ञान मिळविण्याची भूक आहे.सध्याचे स्पर्धेचे युग आहे आणि यामध्ये टिकण्यासाठी कठोर परिश्रम, मेहनत,जिद्द,चिकाटीच्या जोरावर निश्चितच यश संपादन करशील अशी आशा आहे तरी देखील वडिलांच्या इच्छेप्रमाणे वर्तन करण्याची काहीही गरज नाही.माझा मुलगा आय.ए. एस. बनावा, डॉक्टर,इंजिनिअर की वेगळं काही..पण माझी इच्छा नसून तुला ज्या क्षेत्रात भरारी घ्यायची आहे त्याच क्षेत्रात मार्गक्रमण करीत राहा.मी फक्त एवढे सांगेन की,कोणत्याही क्षेत्रात जावे पण तिथे त्या क्षेत्रात नंबर एक राहावे अशी प्रेमळ इच्छा...

       बऱ्याचदा,बेटा तू बोलून जातो की,बाबा असल्यावर मला कशाचीही चिंता नाही.मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहणार नाही.ग्रामीण भागात नोकरीच्या निमित्याने इकडे-तिकडे जाणे होते त्यामुळे माझ्याशिवाय राहण्याचा लहानपणापासून शिकले पाहिजे त्यात स्वावलंबन ही एक जगण्याची सचोटी आहे.कोणतेही कार्य करीत असतांना दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये.स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच कृत्य करावे आणि स्वतःसह आईवडिलांचे व कुटुंबियांचे नाव उज्जल करावे.

ही सदिच्छा!!!🌹🌹🌹🌹🌹

तुझाच बाबा
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
आपल्या मुलीस पत्र या उपक्रमांतर्गत सादर विवाहित *मुलीस वडिलांचे पत्र* 

प्रिय ताई
     अनेक आशीर्वाद
                मी आशा करतो कि भगवान पांडुरंग परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने तू आणि तुझा परिवार सुखात असेल  संतांची मार्गदर्शक तत्वे व आपल्या संस्कृतीचे पालन करुन तू एक आदर्श मुलगी, सून, पत्नी, आई या सर्व भूमिका पार पाडशील यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही म्हणूनच वडील  या नात्याने तुला पत्र मी लिहीत आहे 
  ज्याप्रकारे एक आदर्श मुलगी म्हणून तू आज आमच्या आमच्या परिवाराचा मान-सन्मान वाढला त्याच प्रकारे भविष्यातही तू तूझ्या घराचा मानसन्मान वाढवशील.  ज्या प्रकारे तू आपल्या आईवर माझ्या प्रेम केले त्याच  प्रमाणे तुझ्या सासू वर  प्रेम करुन त्यांच्या सुखदुःखाची वाटे दार होशील  माझ्यावर आपल्यात जीवापेक्षाही प्रेम केले त्याच प्रकारे तू आपल्या पिता  रुपी सासर्यावर प्रेम करशील .त्यांची आपल्या वडिलांप्रमाणे सेवा करशील  नाही तुला करावीच लागेल हीच तुला माझी शिकवण आणि समज आहे

तू हे सर्व चांगल्याप्रकारे करशील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही त्याच्या बरोबर एक गोष्ट लक्षात ठेव कृतीप्रमाणे आपला पोशाख आपल्या राहणीमान टिकवून ठेवणे गरजेचे आहे तुझ्या कुठल्याही एका चुकीमुळे परिवाराचे नाव जाईल अशी कुठलीही गोष्ट तू आपल्या जिवणात करणार नाहीस याची मला पूर्णपणे खात्री आहे.
समाजातील बदलत्या काळानुसार नव्याचा स्वीकार करणे योग्य पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक अयोग्य आहे हे.तू विसरणार नाही तू आपल्या परिवाराचा समाजाचं नाव उज्वल करशील हीच आशा

तुझ्या भावी आयुष्यासाठी आशीर्वाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा

तुझाच बाबा
   ..पत्रलेखन
✒संदिप नानासाहेब वाकडे
       रा.खेडा ता.कन्नड
        जी.औरंगाबाद 
      📲9766992776
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
...बाबांचे आपल्या मुलीस पत्र..
       प्रिय सोनू
                बाबांचा अनेक
                     आशिर्वाद 
         सोनू तुझे पत्र काही दिवसापूर्वीच प्राप्त झाले .पत्र वाचून आनंद झाला.मी इकडे राहतो परंतु दिवसातून एकदा तरी मला तुझी आठवण येते.कालच तुझ्या आईने तुझी आठवण काढली आणि मन भरून आणले .डोळ्यातून पाणी येत होते.परंतु मी तुझ्या आईला तू लहान असताना तू मला घरात कोंडून बाहेर पळाली होती .तो किस्सा सांगितला तेंव्हा तुझी आई जोराजोराने हसू लागली.तुझ्या आईला पण तुझी आठवण येत आहे.
       सोनू तुला लग्न असताना पासून खूप तुला जोपासले .तू पण लहान असताना खूप छान सर्वांसोबत मन मिसळून राहायची 
कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला प्रेमाचा ओलावाद्यायची नी आपलेसे करून घ्यायची.कुणी तुझ्यावर आवाज चढुन बोळलेकी रागात यायची असा तुझा मित स्वभाव.
 सोनू तुझे शिक्षण पण छान झाले आहे.त्या मुळे "चांगले काय आणि वाईट काय आहे" या गोष्टीची विचार करण्याची क्षमता तुझ्या मध्ये आहे.चांगलं ते आपले म्हणून स्वीकारायचे आणि वाईट ते सोडायचे.ही तुझी सवय आहे.
माझी तू लहान असताना पासूनच इच्छा आहे मी मनातच ठेवत होतो.कुणाजवळ बोलण्याचा शब्द नव्हता आणि तो मी जपून ठेवला होता तो खरा ठरला तो म्हणजे .तुझ्या साठी संस्कारित ,समजदार वर मिळायला हवा.ही माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आहे.ही ईश्वराची कृपा .
        सोनू तू सर्व गुण संपन्न आहेस.आणि आता तू एका कुटुंबाची सून आहेस.तुला आपल्या कुटुंबाची  काळजी घ्यायला हवी.मुलगी ही आईच्या पोटी एकदा जन्म घेत असली तरीही संस्काराने दोन घरी जन्म घेते.मी आणि तुझी आई जरी तुझे आई वडील असले तरीही पण आमच्या जवळ तुझी फक्त आशा उरलेली आहे.तुझी सासू आणि तुझे सासरे यांनाच आई वडील समजून त्यांची सेवा कर.तुला तुझे विश्व तयार करायचे आहे.त्या साठी तू कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपले समजून प्रेमाचा ओलावा देऊन आपलेसे करून.प्रत्येक कार्यात सहभागी होऊन सगळ्यांच्या विचारात समरस होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती कशी साधेल या कडे लक्ष दे.आणि आपल्या कुटुंबच नाव लौकीक कर .तुझ्या चांगल्या वागण्यात माझे नाव समाजात खराब होणार नाही ही काळजी घे.
        तुझी आई या घरात आली होती तेंव्हा या घराची परिस्थिती अतिशय नाजूक होती .पण संसाराचा गडा हाकताना तुझ्या आईने मला कोणत्याच गोष्टीला नकार दिला नाही माझ्या प्रत्येक कामात हात भार लावला.आणि माझे धीर कधी खचू दिले नाही.म्हणून मी खूप मोठी प्रगती केली.
  तू पण जावई बापूला प्रत्येक कामात मदत करशील आणि आपले सुखी संसार सोन्या चे करशील ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
   मी लवकरच तुझ्या सुखी संसाराची नांदी पाहण्यासाठी येणार आहे.तुझ्या कुटुंबातील सर्व लोकांना माझा नमस्कार सांग.
 बस जास्त लिहीत नाही.
                       तुझेच बाबा
                           अ. ब. क
जीवन खासावत
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
*38)*
*बाबांचे लाडक्या मुलास पत्र*


माझ्या लाडक्या मुला,
मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव….

जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या.
           मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
         माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे.
         तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.
          जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.
            आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.
             प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.
           अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना.
           माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा.
आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.

तुझाच बाबा

- अमित प्र. बडगे, नागपुर
  (7030269143)
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
४०) मनिषा पांढरे, सोलापूर

आईचे मुलीस पत्रलेखन

प्रिय मुली,
अनेक आशीर्वाद.
खूप दिवस झाले तुला बोलेल म्हणते पण सांगायची हिम्मत होत नाही त्यासाठी आज हे पत्र लेखन करत आहे.
हे बघ तू आता मोठी झाली आहेस तेव्हा वयाच्या मानाने काही गोष्टी समजणे आवश्यक आहे. मुलगी च्या मोठे होते तेव्हा आई या नात्याने तुला गोष्ट काही गोष्टी सांगणे माझे कर्तव्य समजते.
मुलगी मोठी झाली की तिच्यात शारीरिक आणि मानसिक बदल जाणवायला लागतात. सैराट सारख्या चित्रपटातून आर्ची आणि परशा चे प्रेम पाहून त्याचे अनुकरण कितीतरी मुली करतात. पळून जाऊन लग्न करणे हे तर अतिशय चुकीचे आहे.योग्य ती निर्णय क्षमता नसल्याने या चुका होतात.
     यामुळे मैत्री करतांना सुध्दा योग्य व्यक्तीशीच ती केली पाहिजे. माणसे ओळखली पाहिजे. कोणाच्याही जवळ जाण्यापूर्वी मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा.काही मुलं स्वार्थापुरती मैत्री करतात आणि नंतर धोका देतात यासाठी आपण आपले चारित्र्य आणि शील जपलं पाहिजे.
     काही गोष्टी अशा न सांगता तुला समजल्या पाहिजेत. या तरुण वयात तुझ्याकडून कोणतेही चुकीचे पाऊल पडणार नाही याची मला खात्री आहे.तू याचा पूर्ण विचार करूनच वागशील अशी आशा आहे.


तुझीच आई.
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
           वडिलांचे मुलास पत्र


                  श्री 

                                       पुणे 
                                25.5.2020
  
चि. पार्थला अनेक आशीर्वाद,

     माझे पत्र पाहून हात थरथरायला लागले  नाही ना? अरे, पण मी तुला झापण्यासाठी किंवा रागवण्यासाठी हे पत्र लिहिलेच नाही. हल्ली तू नेहमी जवळ कुठे जायचे असले की म्हणतोस, "बाबा तुमची चप्पल मी घालून जातो". तुझ्या आणि माझ्या चपलेचे माप एक झाल्यामुळे तू माझा मुलगा होतासच पण आता मित्र झाला आहेस. त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने मी आज पत्रातून तुझ्याशी गप्पा मारणार आहे. फोनवर नाही रे बोलता येत ह्या गोष्टी.

           सध्या तुझे कॉलेजचे सोनेरी दिवस आहेत. फिरणे, गप्पा मारणे, टाईमपास करणे हे सगळे ओघाने आलेच. पण त्यात रॅगिंग मुळे गोंधळून जाऊ नकोस. रॅगिंग आमच्यावेळी पण होते. आता रॅगिंगला बंदी असली, तरी या ना त्या प्रकारे रागिंग होत असतेच. त्याचा बाऊ करण्यापेक्षा try to enjoy ragging . Try to wriggle out of it . ही कला साधली की त्याचा तुला त्रास होणार नाही. बघ जमतंय् का?

             तुला माहित आहे, मी कुठल्याही गोष्टीला सारखा विरोध करणारा मागास बाप नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपवून करण्यापेक्षा, माझ्या समोर, माझ्याबरोबर कर. समजा उत्सुकतेपोटी तुला smoking करावेसे वाटले. तर पहिल्यांदा मी बरोबर असेन तर चांगल्या- वाईट सगळ्या गोष्टी मला तुला सांगता येतील. मग पुढचे तू ठरव.

           हल्ली एकदा बाहेरच्या जगात प्रवेश केला की आकर्षणे खूप आहेत. फास्ट कम्युनिकेशन, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मुळे सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला अधिक व आधीच असते. ह्या सगळ्या आकर्षणाला बळी किती पडायचे ते आपण ठरवायचे. प्रायोरिटी कशाला द्यायची हे आपण ठरवायचे. आमच्यावेळी पण काही प्रमाणात असेच होते. त्यामुळे त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सगळ्याचा लगाम तू तुझ्या हातात ठेव म्हणजे झालं. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तुला आम्ही दिलेलेच आहे. चांगले झाले, वाईट झाले तरी आपली जबाबदारी नाकारायची नाही. दुसऱ्याला दोष द्यायचा नाही.

           ह्या वयात तुम्हा मुलांना मित्र सर्वात जास्त जवळचे वाटतात. आई-वडील, नातेवाईक यांच्यापेक्षाही मित्रांचे सल्ले पटकन आणि जास्त पटतात. हा ही  वयाचा दोष. माझा एक जवळचा मित्र होता. म्हणजे मी त्याला जवळचा मानायचो. त्याने सेकंड इयरला,  महत्त्वाचा पेपरच्या आधी, माझ्या नोट्स ची वही लंपास केली. माझी खूपच पंचाईत झाली. ही गोष्ट, त्याने केली, हे अर्थात मला नंतर कळले. म्हणजे माणूस ओळखायला मी चुकलो होतो. बघ यावरून काही धडा घेता आला तर.

           लग्न, मुंज असल्या कार्यक्रमांना तू आमच्याबरोबर येण्याचे टाळतोस. मला मान्य आहे. पण जवळच्या नातेवाईकांचे गेट-टुगेदर असते, तेव्हाही तुला यायचे नसते. हे काही मला पटत नाही. किंवा आलास तर अगदी अलूफ असतोस. पण एक लक्षात ठेव सगळेच नातेवाईक- रक्ताची नाती- वाईट नसतात. ती आपण आपल्या वागण्याने टिकवून धरायची असतात. त्यात चांगलेेेे रंग भरायचे असतात. आपल्या भोवती आपल्यावर प्रेम करणारी माणसं जेवढी जास्त, तीच खरी आपली श्रीमंती. हे कदाचित तुला आता पटणार नाही. पण यावरही थोडा विचार करावास, असं मला वाटतं.

           कुणाच्या प्रेमात पडलास तर निभावून नेण्याची क्षमता ठेव. प्रेमभंग झाला तर कोलमडून पडणार नाही ही दक्षता घे. कुठल्याही कठीण प्रसंगी स्वतःला सावरायला शिक. खंबीर व्हायला शिक. तू शिक्षण अर्ध्यावर सोडणाार  नाहीस हे मी जाणतो. शेवटी काय रे, नॉलेज, ज्ञान यामुळे बुद्धीला तेज येते . ते पैस कमावण्याचे एक शस्त्र आहे.  पुढे सायकलवरून फिरायचे कि मर्सिडीज मधून, ते तू ठरव.  कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेव. 

            तुझ्याशी मित्र म्हणून गप्पा मारता मारता मी तुझी 'शाळा' कधी घेतली ते कळलेच नाही. आता फार सांगत बसत नाही माझ्या शहाण्या मुलाला! या महिन्याचे पैसे मिळाले ना? आता सुट्टी लागेल तेव्हा मी आणि तुझी आई आम्ही दोघे तुला घ्यायला येऊ. येताना मजा करत परतू.

           Have a nice time.  Take care .

 

                                   तुझा मित्र 
                                       बाबा 


शुभदा दीक्षित (11)
पुणे
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
पत्रलेखन

मी डीएड ला असताना माझ्या वडिलांनी मला लिहिलेले हे पत्र

चिरंजीव कुमारी सविता,
अनेक उत्तम आशीर्वाद.
वि. वी. पत्रास कारण की तू प्रथमच  शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी कुटुंब सोडून राहत आहेस .त्यामुळे तुला हे पत्र लिहीत आहे.
आतापर्यंत तू कधीही मला आणि आईला सोडून बाहेर राहिलेली नाहीस. सुरुवातीला नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला तुला थोडेसे अवघड जाईल परंतु सवय झाल्यावर मग मात्र काही वाटणार नाही. कॉलेजची वेळ कशी आहे ?सकाळी किती वाजता उठने होते ?कारण उठ म्हणायला किंवा आलाराम लावायला आता मी किंवा आई तुझ्या सोबत नाही त्यामुळे तुझा तुला आलाराम लावावा लागेल. आणि स्वतःलाच उठावे लागेल. यापूर्वी तुझ्या मदतीला आम्ही इथे असायचो परंतु आता तिथे तुझी तुला सर्व कामे करावी लागणार आहेत .तुला आमची आठवण येत असणार हे नक्की परंतु सारखे सारखे शनिवार-रविवार तू बीड वरून एवढ्या दूर राहुरीला आम्हाला भेटायला येऊ शकत नाहीस आता थेट दिवाळीला येणे होईल. बरं दरमहा मी तुला मनीऑर्डर पाठवणार आहे. तुला पूर्वी हिशोब लिहिण्याची सवय नव्हती परंतु आता हिशोब लिहिण्याची सवय करुन घे म्हणजे तुला दर महिन्याला किती पैसे लागतात हे तुलाही समजेल आणि मलाही तसे पैसे पाठवता येतील. काटकसर कर असे मी तुला म्हणत नाही परंतु तुझ्या गरजा तुला ओळखायला येणे ही सध्या तुला मिळालेली मोठी संधी आहे; असे समजून या दोन वर्षात तुला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतील .त्यातून पुढे आयुष्याचे गणित सोडवायला तुला नक्कीच मदत होणार आहे.
कॉलेजमध्ये तुझ्यासारख्याच आणखि तुझ्या मैत्रिणी आई-वडिलांना सोडून इथे परगावी राहत असणार सर्वांनाच आपल्या घरची आठवण येत असणार परंतु ;सर्वांनी एकमेकींची काळजी घ्या. काय हवं नको ते एकमेकींना विचारा. अडचणींना एकमेकींना मदत करा. कारण सर्वजणी प्रथमच आपल्या आई-वडिलांपासून दूर आले असतील त्यातील  काही जणींना हॉस्टेलचा अनुभव असेल परंतु तू मात्र अशी आहेस  तुला तर हॉस्टेलचा अनुभव नाही. त्यामुळे स्वतःची कामे स्वतः करावी लागणार. थोडे अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही.
तुम्ही मैत्रिणी मिळून स्वयंपाक करता ना ?मग तुमचे  नंबर असतील भांडी घासण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी ,स्वच्छतेची कामे करण्यासाठी. मिळून-मिसळून काम करा आणि अभ्यासाला ही वेळ द्या बरं. गप्पागोष्टीत रमणार हे आहे परंतु अभ्यासाचे भान असावे. तिथे तुला बघण्यासाठी टीव्ही नाही तुला इथे फार सवय होती टीव्हीची परंतु आता मात्र ही सवय मोडली असेल; पण अभ्यासात मन रमवले, लायब्ररीची थोडी पुस्तके वाचली तर तुझे मनोरंजनही होईल आणि ज्ञानही वाढेल. वक्तृत्व, निबंध अशा विविध स्पर्धा कॉलेजमध्ये होत असतीलच की याशिवाय क्रीडा स्पर्धा होत असतील त्यातही भाग घ्यायचे. जिथे पाठ लागले तिथे व्यवस्थित जाणेयेणे रिक्षाने करावे. सोबत मैत्रिणी असतील आपली काळजी व्यवस्थित घ्यावी .आता आवडीची भाजी करायला तुझी आई तिथे नाही म्हणून तू  स्वतःच्या आवडीनिवडी स्वतःनेच जपत जावे .पालेभाज्या खात जाणे व्यवस्थित मोसमात जी फळे मिळतील ती खा. मोसमातील सर्व फळे खात जा पैशासाठी मागेपुढे पाहू नकोस मी दरमहा व्यवस्थित तुला मनीऑर्डर पाठवित जाईल. तुला घाईघाईने जेवणाची सवय आहे जरा सावकाश जेवत जा. आणि पाणी मात्र भरपूर पिणे त्यामुळे तुला पोट दुखी होणार नाही. काही चांगल्या सवयी आपोआप लागतील बघा .सकाळी लवकर उठून योगासने आणि प्राणायाम कर आणि हो तुझ्या मैत्रिणींना देखील ही चांगली सवय लाव बरे. ह्याने आरोग्य आयुष्यभर चांगले राहील. तुमच्या घरमालकाला आम्ही ऑफिसचा नंबर दिलेला आहे तुला काही अडचण असल्यास अवश्य फोन करून कळवणे, मी घर मालकास तसे सांगून ठेवले आहे .छोट्या निलूस तुझी आठवण येते त्याला मी सांगितले आहे ताई आता दिवाळीमध्ये भेटणार आता मध्ये मध्ये सारखे गावाकडे यायचं नाही. त्याने अभ्यासावर परिणाम होईल ,समजले ना ?आता आपली भेट दिवाळीत होईल चांगला अभ्यास करावा व चांगली श्रेणी मिळवावी. मैत्रिणींना माझा शुभ आशीर्वाद सांग .आईची तुला एक विशेष सूचना आहे तुला डोक्याला तेल लावायला आवडत नाही; थोडा कंटाळा येतो परंतु अशाने केसांचे मात्र वाटोळे होईल. तेव्हा केसांना तेल भरपूर लावणे आणि वेळेवर व्यवस्थित धुणे. कॉलेजातील शिक्षकांच्या आज्ञा व्यवस्थित पाळणे. त्याप्रमाणे सर्वकाही अभ्यास करणे बाकी इकडे सगळे खुशाल आहेत पत्र लिहून खुशाली कळवत जाणे .
तुझी आजी म्हणाली आपल्या घराण्यातील पहिल्यांदा कोणी तरी  मुलगी बाहेर गावी शिकण्यासाठी जात आहे त्यामुळे तू भरपूर शिकली तर आपली मान नक्कीच उंचावणार आहे. आजोबांना देखील तुझी काळजी वाटते परंतु त्यांना विश्वास आहे तू नक्कीच खूप अभ्यास करून घराण्याचे नाव करशील. आजी-आजोबांचा तुला आशीर्वाद. अरे आता पुरे करतो नाहीतर वाचून कंटाळशील
आणि बाबा खूप उपदेशाचे डोस पाजतात असे म्हणशील

तुझाच बाबा

सविता साळुंके, श्रीरामपूर, कोड नंबर 13
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
07 पत्रलेखन

बाबांचे मुलीस पत्र

श्री.भुपाल दिवटे
कुरुंदवाड, जिल्हा, कोल्हापूर
416106

प्रिय माणिक,

 पत्र लिहिण्यास कारण की, परवाच तुझे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. आम्ही इकडे सर्वजण सुखात, आनंदात, समाधानात आहोत. काळजी नसावी.

 तुझी आई वेळेवर औषध घेते. मी पण वेळेवर औषध घेतो.थोडा वेळ सकाळी व थोडा वेळ संध्याकाळी गावात जाऊन फिरून येतो. जास्त त्रास घेत नाही. तू काळजी करू नकोस. तुझी व तुझ्या मुलांची काळजी घे. आमच्या पेक्षा आम्हाला तुझीच काळजी जास्त असते.

 आम्हाला माहिती आहे की तू अतिशय धाडसी आहेस ,खंबीर आहेस. बापाच्या पाठीमागं मुलांना तू अतिशय  छान वाढवलं आहेस. त्यांना सुसंस्कृत, सुशिक्षित केलं आहेस. तुझ्यावर हे आलेलं संकट खूप मोठे आहे याची मला जाणीव आहे. तरीही तू अतिशय शहाणपणानं, संयमाने सर्वकाही रेटून नेत आली आहेस. तू तुझ्या दोन्ही मुलांना म्हणजेच माझ्या नातवांना अतिशय चांगलं उच्च शिक्षण देऊन त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम बनवून  त्यांना योग्य मार्ग दाखवला आहेस.ते दोघेही आता सुस्थितीत आहेत.

 मला आनंद आहे की तुला मिळालेला मोकळा वेळ तू वायफळ खर्च न करता त्याचा योग्य वापर करतेस. तू स्वतःला लेखनामध्ये , वाचनामध्ये गुंतवून घेतली आहेस, ही फार चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तू नेहमी व्यस्त असतेस.ते पाहून आम्हाला दोघांनाही खूप आनंद होतो.

  मी असा आशीर्वाद देतो की, तुझ्या भविष्यामध्ये सुखी रहा, आनंदी रहा, समाधानी रहा.आपली मुले नेहमी सुखी समाधानी रहावेत हीच  सर्व आई-वडिलांची इच्छा असते. ती इच्छा तू पूर्ण केलीस त्याबद्दल मी तुझे कौतुकच करतो.

तुझे भावी जीवन असेच यशस्वी होऊ दे, बहरू दे ही सदिच्छा व्यक्त करून मी येथेच थांबतो.

तुझेच बाबा
भुपाल

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
विषय :- पत्र लेखन ( आई बाबा कडून लग्न होवून सासरी गेलेल्या मुलीस पत्र).... प्रिय रुपालीस आई बाबा यांचा अनेक शुभ आशीर्वाद  वि.वि.पत्रास कारण की ब-याच दिवसापासुन तुझ्यापत्राची वाट पाहत होतो.आम्ही तर तुला "गेली ती मेली"असाच विचार आजपर्यंत केलेला होता पण अचानक तुझे पत्र आले आणि आमच्या मनात आजपर्यंत तुझ्या विषयी जो विचार होता तो सर्व विरघळून गेले आहेत.खरा विचार केला तर तुला समजून घेणेस आमचीच चूक झालेली आहे.कारण लग्ना विषयी तू तुझे मत आम्हाला सांगितले होते पण त्याकडे आम्ही विशेष लक्ष दिले नाही त्यामुळेच तुला आमच्या मनाविरुद्ध टोकाचा निर्णय घ्यावा लागला त्या मध्ये तूझी काही चूक नाही."झाले गेल गंगेला मिळाले" असे आम्ही समजत आहोत. तुझ्या पत्रातून कळते पतीचा शिक्षकी पेशा आहे. शिक्षक म्हटले की सुसंस्कारीतआणि निर्व्यसनी असणार ही काळ्या दगड़ावरची रेष च असणार आणि सासरी एकत्र कुटुंब आहे.तू पती आणि सासु सासरे सर्वजन गोळ्या  मेळ्याने राहतात ही जमेची बाजू आहे. कारण प्रेम विवाह करणारे शक्यतो विभक्त राहतात मात्र त्यांचे फार हाल होतात तशी वेळ अविभक्त कुटुंबात येत नाही एखादे वळेस आजारी पडली किवा इतर कोणतेहि संकट आले तरी सर्वजण मदतीसाठी धावून येतात.नाही तर"हम दो हमारे दो" ही चुकीची प्रथा समाजात रुजत आहे ती हानी कारक आहे.पण तू अशाच कुटुंबातील मुलाची निवड केलीस त्यामुळे तू आमची मुलगी म्हणून अआम्हाला तुझा अभिमानच वाटतो.या प्रकारच्या विवाह पध्दतीमुळे लग्नाचा अवाढव्य होणारा खर्च वाचतो हे तुच आमच्या लक्षात आणून दिलस हे लोक जाग्रती चे छान काम आहे.तुमचे एकमेकांचे स्वभाव कळतात आवडी निवडी कळतात तुमची मने जुळली जातात.मात्र ठरवून केलेल्या विवाहात केवळ गुण जुळले पण त्यांची मने जुळलेली नसतात.त्यामुळे तू केले हे चागलेच केले नाही तर मला सुध्दा कर्जबाजारी व्हावा च लागले असते.तसेच सासू सासरे प्रेमळ आहेत ते तुला त्यांची मुलगीच समजतात शिता वरून भाताची परिक्षा करत येते त्या ना आमचा सप्रेम नमस्कार सांगा व आमच्या कडुन काही रागात चुक झाली  असेल तर विसरून जावा असे त्याना आमच्या वतीने सांग.तुझ्या वाढदिवसाला तुला टूव्हीलर भेट म्हणून दिलेले पत्रात वाचून समाधान वाटले. अग काही हि झाले तरी आपली रक्ताची नाती कधी तुटतात का ? आम्ही दोघेही थोड्याच दिवसात तुला भेटण्यास येत आहोत. तू सुखी रहावे हीच आमची भाबडी इच्छा व वेडी माया.अशीच खुशाली वरचेवर पत्राने कळविणे.आपल्या पत्राची वाट पहात आहे........आपले आई बाबा.
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
आईबाबांचे मुलीला पत्र
प्रिय जान्हवी,
कशी आहेस बाळा?
     तू तिथे बारा बारा तास ड्युटी करती आहे. तेही ह्या जीवघेण्या कोरोनाच्या वार्डात. मला तुझी खूप काळजी  वाटते, माझ्या जीवाची खूप  घालमेल होते. मला माहित आहे की हा कसोटीचा काळ आहे. आणि आपण डाॅक्टर मंडळीचे कर्तव्यच आहे रुग्णांची सेवा करण्याचे. तू ते अगदी
इमानेइतबारे करावे. ते सर्व रुग्ण सुद्धा  खूप घाबरलेले असशीलच ! परत सोबतीला कोणीही नाही. बरेच रुग्ण खूप नैराश्यने ग्रस्त असतील . कोरोना इतका अनपेक्षित आजार आहे की त्या रुग्णांना काहीच कळत नाही. आपण परत घरी जाऊं शकणार का नाही?  जवळच्या नातलगांना परत भेटणे होणार  की नाही  अशा अनेक  निराशाजनक विचारात ते बुडाले असतात. तुला तर माहितच आहे की नैराश्यमुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती ,इम्युनीटी कमी होते.
       तुम्ही सर्व डाॅक्टरांनी रुग्णाची हिंमत वाढवायला पाहिजे, त्यांना सकारात्मक विचार, सकारात्मक भावना किती महत्वाची गोष्ट आहे हे ही समजवून सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे. रुग्णांची व्यवस्थित काळजी घ्या त्यात वाद नाहीच. पण एक लक्षात ठेवा  की  ह्या  कसोटीच्या काळात 
स्वतःची सुद्धा तेवढीच  काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. अशा अतिशय निराशा जनक आणि अनिश्चततेच्या वातावरणात स्वतःला पूर्णपणे सकारात्मक ठेवणे अवघड असते, पण सकारात्मकता आणि ईश्वरा वर विश्वास हे खूप महत्वाचे आहे. त्यानी शरीरात प्रतिकारशक्ती  आणि मनात धैर्य आणि जोश टिकून राहते. 
       मी तुला एक 30सेकेंदाची सकारात्मक प्रार्थना पाठविली आहे. अगदी न चुकता तासाभरात एकदा ते तीस सेकंद तू स्वतःला अगदी न चुकता दे.स्वतःला सकारात्मक आणि सक्षम ठेव. ईश्वर सदैव तुझ्या पाठीशी आहे.  काळजी करु नको पण पावलोपावली दक्षता घे,सावधगिरी बाळग. 
    आम्ही तुझ्या कल्याणासाठी रोज प्रार्थना करतो आहोत.
संपूर्ण जगाच्या भल्यासाठी सुद्धा रोज प्रार्थना करतो आहोत. भारत मातेच्या कल्याणासाठी सकाळी आणि संध्याकाळी महश्री अरविंदांचे दुर्गास्त्रोचा पाठ करतो. देव परीक्षा पाहतोय. आणि तुला माहित आहे की प्रत्येक परीक्षा आपल्या उत्कर्षाची गुरुकिल्ली असते. ह्या भयानक काळात सुद्धा खूप चांगल्या मानव कल्याणच्या गोष्टी घडत आहे.
मानवता आज तिच्या चरमबिंदूवर आहे. प्रत्येक जण एकामेकांच्या कामी येत आहे. काळजी करू नकोस बाळा, ही वेळ सुद्धा जाईल.
अनेक आशीर्वाद 
आई-बाबा
डाॅ.वर्षा सगदेव नागपूर
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
पत्रलेखन (28)
           विषय:आई-बाबांचे सासरी गेलेल्या मुलीस पत्र

            
प्रति,
सुजाता जाधव
मु.पो. सासरनगरी

प्रिय,
          सुजू,तुला आई बाबांचा नमस्कार!तुझे पत्र मिळाले वाचून आंनद झाला,इथे सर्व ठीक आहोत,तुझी ही खुशाली पत्राद्वारे कळाली बरे वाटले,फोन वर बोलतो,पण पत्राद्वारे बोललो जुने दिवस आठवले, असेच कधी तरी पत्रव्यवहार व्हावा,ही अपेक्षा,बेटा, तू बरेच काही पत्रात लिहिले होतेस मन मोकळे केलेस स्त्रीला परक्या घरी जावे लागते,परंतु तू आम्हांला कधीच परकी झाली नाहीस,तुझी कमतरता अजूनही या घरात जाणवते,घरातला सदस्य आपला विकू नावाचा पोपट त्याला पिल्लू असताना आणले होते,त्याचे संगोपन तू केलेस,तो इतरांची नावे घेऊन जसे बोलतो,तसे अजूनही तो ताई-ताई असे नाव घेतो,तो विसरू शकत नाही,मग तुझे अस्तित्व आम्ही कसे विसरू!!
         माहेर व सासर यात नक्कीच फरक असतो बाळा,पण त्यात बदल करणे तुझे कर्तव्य आहे,चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न कर, व नको असलेल्या त्याग.तू शाळेत जसे विद्यार्थी घडवते,तसे उत्तम माणूस घडविण्याचा कुटुंबात प्रयत्न कर, मनाला दुःखी करू नको,"प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती"
असे समजून वाग, आणि जावईबापू तर खूप चांगले आहेत,तू नशीब काढलंस मुली,की कोणीतरी समजूतदार साथी तुझ्यासोबत आहे.
          जीवन हे फार सुंदर आहे,आईनेही संसार किती छान केला आजवर कधी तक्रार केली नाही,अन बाबांचीही आईला साथ होती,बस्स!झालं तर मग आता सुखी संसार करा,आनंदी रहा!मुलांकडे लक्ष द्या, सर्वांना अनेक आशीर्वाद!
 
  तुझेच,आई बाबा
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
वडिलांचे मुलीस पत्र
******************************
श्री ज्ञानेश्वर झगरे गुरुजी 
(वाकदकर) [१७]

******************************
प्रिय छबू,
अनेक आशीर्वाद.

पत्र लिहिण्यास कारण की, तुझे पत्र मिळाले आणि त्या पत्राच्या रूपाने जणू आमची छबू आमच्या सोबत बोलती आहे असे आम्हास वाटले. अगं तुझं पत्र आल्याची वार्ता तर तुझ्या आईने अख्ख्या आपल्या वाड्यात केली बघ. दररोज तुझी आई तुझे पत्र दिवसातून एकदा तरी वाचते. तू अनेक वेळेस आम्हाला फोन करून बोलते परंतु यापेक्षा जास्त आनंद तुझ्या पत्राने आम्हाला झालाय.


बाळे तू आम्हाला सोडून सासरी गेली, यामुळे तुला नक्कीच आमच्या प्रेमाची,लडिवाळ पणाची छाया तिथे मिळत नसेल. शेवटी सासर हे सासर आणि माहेर माहेरच असतं. लहानपणापासून तू आमच्यामध्ये खेळलीस बागडली आणि आमची छबू कधी मोठी झाली आणि कधी तिचं लग्न लागलं.... हे आम्हाला कधीच कळलं नाही, हे सगळं स्वप्नांवत झालं बघ. परंतु आता तू गेल्यापासून मात्र एकेक दिवस आम्हाला फार मोठा वाटतोय. तुझी आठवण येत नाही असा कोणताच दिवस नाही. सकाळी उठल्याउठल्या घर झाडणारी छबू , घरासमोर सडा संमार्जन करणारी छबू, तुळशीवृंदावनासमोर रांगोळी काढणारी छबू., मी बाहेर पडतांना "बाबा लवकर या" असं बोलणारी छबू. मी कितीही थकलो , रागावलो तरी आग्रहाने जेवू घालणारी छबू, आई आजारी असली तरी घराचं घरपण ठेवणारी छबू..... आम्हाला सतत आठवतच राहते बघ.


फोटोच्या अल्बम मध्ये असलेले तुझे फोटो बघून तुझं बालपण ,तरुणपण आम्हाला सतत आठवतं... बाळ तू गेली आणि आपल्या अंगणातला गुलाब सुद्धा तुझ्या मागेच निघून गेला, गुलाब पार सुकून गेला, वाळून गेला ,त्याला आता एकही पान नाही राहिलं... तुळशीवृंदावनासमोर चा लखलखाट सुद्धा तुझ्या रुपाने गेलाय असंच अाम्हाला जाणवतय ..
घरट्यामध्ये राहिलेले पक्षी एक दिवस आपलं घरटे सोडून उडून जातातचं न हा संसाराचा नियम आहे. अगदी तसंच तुलासुद्धा सासरी पाठवावं लागलं.पण बाळे तुला तुझ्या आई कडून मिळालेली संस्काराची शिदोरी नक्कीच तू सासर मध्ये सुद्धा आनंदाने जीवन जगताना उपयोगी पाडशील हीच आशा आहे. वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये तुझ्या आईने तुला दिलेले संस्कार नक्कीच तू दिव्याप्रमाणे प्रज्वलित करून संसार थाट. मुलीचे आदर्श वागणे म्हणजे माय बापाचं नाव मोठं करणं असतं बघ. मुलीच्या प्रत्येक पावलागणिक तिच्या आई बापाचे संस्कार उमटत असतात ना... म्हणून आमचं नाव आता तुझ्या हातात आहे. नक्कीच तू आनंदाने संसार कर. कुठल्याही संकटाला धैर्याने सामोरे जा.कुठलीही आणि कोणतीही परिस्थिती सतत बदलत असते याची जाणीव ठेव...धनुष्यातून गेलेला बाण आणि मुखातून गेलेला शब्द पुन्हा कधीच परत येत नाही म्हणून आपल्या जिभेला आवर घालून बोल. सासरच्यांची मनधरणी करून हेच हुशार सुनेचं कर्तव्य असतं. स्वयंपाक करण्यात तर तू सुगरण आहेसच, विचाराची मेजवानी सुद्धा घरच्यांना दिल्याशिवाय राहू नको. संतांच्या आणि संस्कृतीचे विचार त्यांच्या हृदयात पेरत जा..

माहेरामधे जशी दररोज गाईला गोग्रास आणि तुळशीला पाणी घालायची तीच तुझी परंपरा अखंडित चालू ठेव.... सासू-सासर्‍यांना आई वडिलां सारखीच वागणूक दे. वडिलांचं प्रेम तुला भावासारखेच मिळेल असंच तूु बहिणीचे प्रेम त्यांना दे.


शेजाऱ्यांवाचून घराला शोभा नसते म्हणून शेजारीपाजारी यांच्याशीे सुद्धा प्रेमाने वाग. 

तुझी आई दररोज तुळशीजवळ दिवा लावताना तुझी आठवण करत असते... असाच आमचा तू दिवा म्हणून सतत तेवत रहा... तुझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच..

सर्वांना आमचा नमस्कार सांगशील. तुला खूप खूप आशीर्वाद... आणि तुझा गोड पापा.

तुझाच बाबा....
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~
" पत्र लेखन "

" आईचे सासुरवाशीण लेकीस पत्र " [ 14 ]

     चि. अर्च्यूस ,
           शुभार्शीवाद .
                 पत्र लिहण्यास कारण की , कालच तुझे पत्र मिळाले . वाचून आनंदाने डोळे पाणावले बघ ! खरंच , माझी बायडी , माझी अर्च्यू एवढी मोठी झाली ! की ती हा संसारवेल अगदी हसत खेळत आनंदाने फुलवत आहे . मला माहीत आहे गं , तू असे वरवर हसतीस आणि आतून अंतःकरणातून कुढत , रडत असतीस .... कारण तुझा जीव माझ्यापेक्षा तुझ्या बाबांवरच जास्त होता .... तू चारचौघांच्या नकळत एकांती बसून आपल्या आसवांना वाट मोकळी करून देतीस ... अगं मी आई आहे तुझी ! या देहाच्या हाडामासांतून वाढवून जन्म दिलाय तुला ... तू मला हळवी व भोळी म्हणतेस .... तू तर हरिणकाळजी आहेस गं .... नि तेवढीच वज्रासम कठोर ... बाबांना आठवून जास्त रडू नकोस .... देवाघरी गेलेले पाखरू फिरून परत कधी येत नाही बेटा .... सावर या विरहातून स्वतःला ... नशीबी जे आहे ते टळणार थोडीच .... बाबांनी दिलेल्या ज्ञानाची व अनुभवाची अक्षय शिदोरी तुला संसारी बळकटी देईल ... सासूसास-यांची मनापासून सेवा कर ... आता तेच तुझे मायबाप आहेत गं ... त्यांनी काही बोलले तर फडफड उद्धटपणे बोलून खरं खोटं करत बसू नकोस .... मोठ्या मनान चूक नसली तरी ती स्विकारून पोटात घालं .... असं केल्याने काही अंगास भोक पडत नाही माय .... हं मन थोडं दुखल तुज ..कारण तुला व तुझ्या बाबांना अन्याय सहन करणे आवडत नव्हते ना .... आता बघ बाबाही नाहीत तुला समजावायला ... आणि मी अशी आता एका पंखान उघडी झाले बघ ... बाई संसार लयी नेटाने करावा लागतो गं ... चार बुक वाचून तो चालवता येत नाही राणी ... त्यासाठी हाडाची काड व रक्ताचे पाणी करून ही संसारबाग फुलवावी लागते ... देवाचे उपकार म्हणून तुला अशी भाग्यवान माणसं मिळाली ... दिरा जाऊशी प्रेमाने वाग ... " माणूस गोड नाही काम गोड असते ! " हे कायम लक्षात ठेव ... आम्ही सगळे इकडे ठीक आहोत ... तुझे दोन्ही भाऊ तुझी रोज आठवण काढतात ... एकतर तुझे बाबा गेलेत नि त्यातच तू लग्न होऊन सासरी गेलीस ... घर कसं सुनसुन वाटतंय ... होईल आम्हांला सवय हळूहळू ... आणि हो चुलीवर स्वयंपाक करताना जरा जपून गं बाई ... साडीचा पदर जरा सावरून ठेव आगीपासून ... आणि जावईबापूशी व्यवस्थित रहा ... शाळेतील मुलांमुलीसारखे उणेदुने काढत बसू नकोस ... तेच  तुझा कर्ता करवीता आहेत .... त्यांची मर्जी सांभाळ ... मग तुझा संसार आपोआपच सुंगधीत होऊन दरवळेल ... तुझ्या सासूसास- यांना माझा नमस्कार व जावईबापूस आशीर्वाद सांग ... बरं आता पत्र लिहिणे थांबवते ... लगेचच पत्राचे उत्तर पाठवून दे ... आम्ही चातकासारखी पत्राची वाट पाहतो ...बर बायडू स्वतःसह सर्वांची काळजी घे ....
                       तुझीच 
                           लाडकी आई .

अर्चना दिगांबर गरूड 
 ता. किनवट जि. नांदेड 
मो. क्र. 9552963376
~~~~~~~~~~◆~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...